समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ११ वा

भगवंताचे अंग उपांग व आयुधांचे व विभिन्न सूर्यगणनेचे वर्णन -

शौनक म्हणाले -
( अनुष्टुप् )
सूतजी भगवंताचे तुम्ही भक्त शिरोमणी ।
समस्त शास्त्रसंबंधी आम्ही प्रश्न विचारितो ॥ १ ॥
क्रियायोगाचिये ज्ञाना जाणण्या इच्छितो अम्ही ।
चातुर्य करिता, ज्याने अमरत्वहि लाभते ॥ २ ॥
विष्णु आराधने वेळी पदादी अंग कोनते ।
तसेचि आयुधादींची कल्पना करणे कशी ॥ ३ ॥
सूत सांगतात -
नमस्कार गुरुंना मी करोनी सर्व सांगतो ।
ब्रह्मादी सांगती तंत्री वेदही पंचरात्रिला ॥ ४ ॥
मायेने निर्मुनी ईशे विकारमय जे विराट् ।
पंचेविस् तत्व जे दावी चेतनाऽधिष्ठितो अशी ॥ ५ ॥
पुरूष रूप हे त्याचे चरणो पृथिवी असे ।
अंतरीक्षचि नाभी ती स्वर्ग डोके नि सूर्य तो ।
नेत्रे नी नासिका वायु दिशा त्या कानची पहा ॥ ६ ॥
लिंगप्रजापती तैसे गुदां मृत्युहि तो असे ।
लोकपाल भुजा त्याच्या मन चंद्र भ्रुवा यमो ॥ ७ ॥
मोह लाज अधरोष्ठ चांदण्या दंतपंक्ति नी ।
वृक्षरोम ढग केश हास्य ते भ्रमची पहा ॥ ८ ॥
व्यष्टि जै सात वीते ती मोजिता आपुल्या विते ।
तसा समष्टि पुरुषो सात वीती असे पहा ॥ ९ ॥
कौस्तुभा कारणे घेई चैतन्य रूप ही तसे ।
सर्वव्यापी प्रभा ऐसी वक्षीं श्रीवत्स ये पहा ॥ १० ॥
त्रैगुणी वनमाला ती पीत अंबर छंद ते ।
त्रिमात्रा प्रणवो त्याने पवीत धारिले असे ॥ ११ ॥
सांख्य नी योग हे त्याचे मकराकार कुंडले ।
अभया किरिटो धारी ब्रह्मलोक शिरावरी ॥ १२ ॥
अव्ययी शेषशय्या ती तिथे नित्य विराज ती ।
धर्मादी ज्ञान सत्त्वो हे नाभिचे रूप वर्णिले ॥ १३ ॥
देहेंद्रिय मनो शक्ति प्राणतत्त्व अशी गदा ।
पांचजन्यो जलतत्त्व तेजतत्त्व सुदर्शन ॥ १४ ॥
शुद्ध आकाश ते खड्ग अज्ञान तम ढाल ती ।
धनु ते कालरूपो नी कर्म भाता असे पहा ॥ १५ ॥
इंद्रीय बाणरूपी ते क्रियाशक्ति मनोरथ ।
रथ बाह्यांग तन्मात्रा मुद्रा ती अभयो वर ॥ १६ ॥
सूर्य मंडल नी अग्नि पूजास्थान तया असे ।
संस्कारा मंत्रदीक्षा ती पूजा ती पापनाशची ॥ १७ ॥
षडैश्वर्य असे पद्म भगवत्‌करिं जे असे ।
क्रमेचि चवरी पंखा धर्म नी यश ते पहा ॥ १८ ॥
वैकुंठ छत्र रूपाने निर्भयो धारिले असे ।
त्रिवेद गरुडा नाम तो याचे वाहनोच की ॥ १९ ॥
आत्माशक्ति असे लक्ष्मी पार्षदो पंचरात्र ते ।
अष्टसिद्धिरुपी त्याचे आठ ते द्वारपाल की ॥ २० ॥
वासुदेवो संकर्षणो प्रद्युम्न अनिरुद्ध हे ।
चारीही रूप ते त्याचे चतुर्व्यूह रुपो असे ॥ २१ ॥
जागृति विश्व तो होय स्वप्नीं तैजस होतसे ।
सुषुप्तीतचि तो प्राज्ञ तुरियीं ज्ञानपीठ तो ॥ २२ ॥
अंगोपांगायुधे ऐसे चारी रूपास घेउनी ।
विश्व तैजस नी प्राज्ञ तुरियीं तळपे हरी ॥ २३ ॥
( मालिनी )
श्रुतिसिहि मुळ ऐसा स्वीय तेजी असा तो ।
     रचिहि स्वयचि माया ब्रह्मरूपास हेतू ॥
नच तरि मुळि लिंपे नाम कर्मात कोठे ।
     जरि रुप श्रुति वर्णी, आत्मरूपीं मिळे तो ॥ २४ ॥
( वसंततिलका )
श्रीकृष्ण पार्थसखया यदुवंशि जन्मे ।
     द्रोही नृपास वधुनी यश वाढवी तो ॥
गाती लिला हरि तुझ्या नित गोपबाला ।
     आम्ही पदास धरितो करणेच रक्षा ॥ २५ ॥
( अनुष्टुप् )
असे चिन्ह उपांगाचे महापुरुष लक्षण ।
वर्णिता लाविता चित्त ब्रह्मज्ञानचि त्या मिळे ॥ २६ ॥
शौनक म्हणाले -
भगवान् शौकदेवाने विष्णुरातास बोधिले ।
प्रत्येक महिन्या मध्ये येती ते गणसौर की ॥ २७ ॥

आदित्या सह ते बारा काय कार्यास साधिती ।
नामे व्यक्तिंचि ती काय सूर्य ते भगवान् स्वय ।
श्रद्धेने इच्छितो ऐकू कृपया सांगणे अम्हा ॥ २८ ॥
सूत सांगतात -
सर्व देहात तो विष्णु अविद्यारूपि या जगा ।
दाविण्या सूर्य तो झाला आकाशी भ्रमतो असा ॥ २९ ॥
आदिकर्ता खरा एक आंतरात्मचि सूर्य तो ।
एक तो कैक रूपाने वेदांनी वर्णिला असे ।
समस्त वेदक्रीयांचा मूळ तो सूर्यची पहा ॥ ३० ॥
मायेने व्यक्त तो काळ देश क्रीया नि कर्म नी ।
कर्ता स्रुवा नि करणो कर्ता शाकल्य द्रव्यही ॥ ३१ ॥
कालरूप असा भानु व्यव्हारा चैत्र आदिने ।
भिन्न बाराहि मासात गणांच्या सह तो फिरे ॥ ३२ ॥
धाता कृतस्थली हेति वासुकी रथकृत् मुनी ।
पुलस्य तुंबरो तैसे गंधर्व चैत्रि कार्यरत् ॥ ३३ ॥
अर्यमा पुलहोऽथौजा प्रहेति पुंजकस्थली ।
नारदो कच्छनीरो हे वैशाखी कार्य साधिती ॥ ३४ ॥
मित्र अस्त्री पौरुषेयो तक्षको मेनका दहा ।
रथस्वन् ज्येष्ठ मासात कार्य निर्वाह साधिती ॥ ३५ ॥
वसिष्ठ वरुणो तंभा सहजन्य हुहू तसे ।
शुक्र चित्रस्वनो ऐसे आषाढी असती पहा ॥ ३६ ॥
इंद्र विश्वावसु श्रोता एलापत्र नि अंगिरा ।
प्रम्लोचा राक्षसोवर्य श्रावणीं कार्य साधिती ॥ ३७ ॥
विवस्वान् उग्रसेनो नी व्याघ्र आसारणो भृगु ।
अनुम्लोचा शंखपालो रहती भादव्या ते ॥ ३८ ॥
पूषा धनंजयो वात सुषेण सुरुची तथा ।
घृताची गौतमो माघी आपुले कार्य साधिती ॥ ३९ ॥
क्रतु वर्चा नि पर्जन्यो सनजित् फाल्गुनात त्या ।
विश्व ऐरावतो सर्प करिती कार्य ते पहा ॥ ४० ॥
अंशु काश्यप नी तार्क्ष्य कृतसेननि उर्वशी ।
विद्युच्छत्रु महा शंख मार्गशीर्षात राहती ॥ ४१ ॥
भग स्फूर्जारिष्ठनेमी ऊर्ण आयू नि पाचवा ।
कर्कोटको पूर्वचित्ती पौषात असती पहा ॥ ४२ ॥
आश्विनी जामदग्नी नी कंबलो नि तिलोत्तमा ।
ब्रह्मपेतो नि शतजित् धृतराष्ट्रास काळ तो ॥ ४३ ॥
विष्णु अश्वतरो रंभा सूर्यवचा नि सत्यजित् ।
विश्वामित्रो मखापेत आपुले कार्य साधिती ॥ ४४ ॥
भगवद्‌विभुती सर्व संध्याकाळी सकाळी ते ।
स्मरता नष्टते पाप सूर्यासी ऋषिनो पहा ॥ ४५ ॥
सप्तगणांसवे बारा महिने फिरतो असे ।
लोक नी परलोकात बुद्धिविस्तार तो करी ॥ ४६ ॥
ऋक् यजू सामवेदांच्या मंत्राने ऋषि गाति ती ।
सूर्याची स्तुति नी गान अप्सरा नाचती पुढे ॥ ४७ ॥
सर्पदोर रथासी त्या यक्ष त्यां साज घालिती ।
बलवान् राक्षसो त्याला मागोनी ढकलीत ते ॥ ४८ ॥
वालखिल्यादि ते साठ हजार विमलो ऋषि ।
स्तविती सूर्य पाहोनी चालती नित्य ते पुढे ॥ ४९ ॥
अनंत नि अनादी हा अजन्मा भगवान् हरी ।
कल्पीं रूपा विभागोनी लोकांना पोषितो पहा ॥ ५० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ ११ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP