[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
शिष्य बृहस्पतीची तो उद्धवो वृष्णिवीर जो ।
बुद्धिमान् त्याहूनी कोण कृष्णप्रीय नि मंत्रिही ॥ १ ॥
एकदा भक्तप्रीयो या कृष्णाने उद्धवास त्या ।
एकांती धरुनी हात त्याच्याशी बोलले असे ॥ २ ॥
उद्धवा व्रजि जा तुम्ही तेथे माता-पिता तसे ।
गोपिंना सुखवा माझा निरोप देउनी असा ॥ ३ ॥
उद्धवा नित्य माझ्यात गोपिंचे चित्त लागले ।
सर्वस्व मीच तो त्यांचा यजिले सर्व त्यांनि ते ।
अशांना पोषितो मीच माझे ते व्रतची असे ॥ ४ ॥
गोपिंचा प्रीय मी आहे दूर येथेहि मानिती ।
मूर्छित नित्य त्या होती प्रतिक्षा करिती सदा ॥ ५ ॥
सख्या गोपी अशा दुःखे कष्टेही नच वाचती ।
येईन वदलो त्यांना तेणे जीवित सर्व त्या ।
आत्मा त्यांचा असे मी नी माझ्यात रमती सदा ॥ ६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
ऐकता शब्द कृष्णाचे उद्धवो आदरे रथीं ।
संदेश घेउनी आले नंदगावास चालले ॥ ७ ॥
अस्तमानी व्रजी आले वनीच्या धेनु येति तै ।
खुरांनी धूळ ती लोटे रथही झाकला तये ॥ ८ ॥
माजर्या धेनुच्या साठी आपसी लढती वळू ।
दुधाचा भार घेवोनी दुभत्या धेनु धावती ॥ ९ ॥
धावती वत्स ते श्वेत सुरेख दिसती पहा ।
धारानी बासुरीच्या त्या नादाने व्रज शोभले ॥ १० ॥
सजोनी गोप गोपी ते गाती कृष्णलीला तदा ।
या परी व्रजिती शोभा अपूर्व वाढली असे ॥ ११ ॥
अग्नी सूर्य द्विजो गाय अतिथी पितरे तसे ।
देवता गोपगेहात पूजिता गंध येतसे ॥ १२ ॥
रांगेत शोभले वृक्ष सपुष्प डवरोनिया ।
भुंगे नी पक्षिही गाती हंसादी ते विहारती ॥ १३ ॥
कृष्णाचा सेवको भक्त भेटता लागला गळीं ।
नंदा मोद बहू झाला कृष्णची भेटला जसा ॥ १४ ॥
भोजने जाहली श्रेष्ठ मंजकी बैसले तदा ।
सेवके दाबिलें पाय पंखाही ढाळिला असे ॥ १५ ॥
पुसले नंदबाबाने भगवान् उद्धवा अता ।
मित्र ते जाहले मुक्त आता ते सुखि होत ना ? ॥ १६ ॥
भाग्याची गोष्ट ही आहे मारिला कंस दुष्ट तो ।
यदुवंशीय साधुंचा कदाचि द्वेषितां असां ॥ १७ ॥
आठवी कृष्ण का आम्हा आई मित्र नि गोप ते ।
आठवी कृष्ण का सर्व गाई वृंदावनो गिरी ॥ १८ ॥
एकदा तरि गोविंद येई का भेटण्या अम्हा ।
येतील तर ती दृष्टी मुखही पाहु की अम्ही ॥ १९ ॥
अनंत हरिची शक्ती अग्नी वर्षा नि दानवे ।
त्रासिता रक्षिले अम्हा वदू कितिक मी तसे ॥ २० ॥
विचित्र हरिची लीला मोकळे हास्य दृष्टी ती ।
बोलणे स्मरतो आम्ही तन्मये कांहिना सुचे ॥ २१ ॥
ही नदी पोहला कृष्ण हा गिरी क्रीडला इथे ।
ह्या गाई वाजवी वंशी मन ते कृष्ण होय की ॥ २२ ॥
मानितो कृष्ण रामाला देवाधिदेव त्या द्वया ।
करण्या कार्य देवांचे जन्मले गर्ग बोलले ॥ २३ ॥
सिंह जै हत्तिला मारी विनाशस्त्र तसाचि तो ।
मारितो जगराजाला तसे मल्लास कैकही ॥ २४ ॥
त्रिताड एवढा उंच धनुष्य तोडिला यये ।
गोवर्धन करीं घेई सप्तदिन प्रियोहरी ॥ २५ ॥
हाचि सर्वांपुढे खेळ खेळल्या परि मारितो ।
प्रलंब धेनुकारिष्टा तृणावर्त बकास ही ॥ २६ ॥
परीक्षित् नंद हृदयो भरले प्रेमभक्तिने ।
स्मरता दाटला कंठ पुन्हा ते गप्प राहिले ॥ २७ ॥
यशोदा ऐकता गोष्टी प्रेमाश्रू नेत्रि पातले ।
पुत्रप्रेमे तिच्या आला दुग्धधारा स्तनातुनी ॥ २८ ॥
यशोदा नंदबाबाचे उद्धवे प्रेम पाहिले ।
आनंदमग्न होवोनी तयांना बोलु लागले ॥ २९ ॥
उद्धव म्हणाला -
मानदा ! तुम्हि तो दोघे पृथिवीवरि भाग्यवान् ।
तुमच्या पुत्र मी मानी नारायण जगद्गुरु ॥ ३० ॥
( इंद्रवज्रा )
दोघेचि विश्वासहि बीज योनी
रामो मुकुंदो पुरुषो प्रधान ।
दोघे जिवांना जिवदान देती
ज्ञानस्वरूप्या नियते द्वयोही ॥ ३१ ॥
जो मृत्युकाळी मन शुद्ध ठेवी
नी एक लावी क्षण त्या पदासी ।
तैं वासना सर्व जळोनि जाती
दैदीप्य तो हो मग ब्रह्मरुप ॥ ३२ ॥
तो विश्वआत्मा निजभक्तइच्छा
पुर्या कराया मग देह धारी ।
त्यांच्यावरी आपुला वत्सभाव
सत्कार्य सांगा मग काय शेष ॥ ३३ ॥
( अनुष्टुप् )
भक्तवत्सल तो कृष्ण येईल वाट ती पहा ।
माय-बाप तुम्ही त्याचे तुम्हास सुखवील तो ॥ ३४ ॥
मारुनी कंस मंची तो तुमच्या पाशि एउनी ।
येईन व्रजि मी बोले बोलास सत्य तो करी ॥ ३५ ॥
भाग्यवंत तुम्ही दोघे खेद ना करणें मनीं ।
कृष्ण तो हृदयी सार्या अग्नि काष्ठात जै वसे ॥ ३६ ॥
अभिमान नसे त्याला प्रीयाप्रीय असेहि ना ।
समभाव असा ठेवी सारखे जीव त्यास की ॥ ३७ ॥
न माय बापही त्याला पत्नि पुत्र न त्याजला ।
आपुला परका तो ना देह ना जन्म ना तया ॥ ३८ ॥
परित्राणार्थ साधुंच्या लीला दावि अशा जगा ।
मत्स्यादि रूप तो घेतो त्याचा ना हेतु या जगी ॥ ३९ ॥
अजन्मा, गुण ना त्याला सहजी गुण धारितो ।
जन्मितो पोषितो मारी त्रैगुणे खेळ हा करी ॥ ४० ॥
फुगडी खेळता वाटे फिरते पृथिवी जशी ।
मी कर्ता मानितो जीव अहंता असता तशी ॥ ४१ ॥
न पुत्र तुमचा फक्त जीवांचा जीव तो तसा ।
पिता माता तसा पुत्र स्वामी सर्वांस तो असे ॥ ४२ ॥
( इंद्रवज्रा )
जे ऐकिले पाहियले स्व नेत्रे
ते हे असे की अणु पर्वतेही ।
आहेत होते अन जेपुढे हो
कृष्णा विना त्या नच कांहि वस्तू ।
जे जे दिसे ते परमात्म रूप
तोचि खरा हो परमार्थ सत्य ॥ ४३ ॥
गोष्टीत ऐशा सरली निशा ती
त्या नंद नी उद्धव या द्वयाची ।
पहाट होता उठल्याहि गोपी
सडा करोनी मंथु लागल्या त्या ॥ ४४ ॥
हातातले कंकण शोभती नी
नितंब हारो स्तन हालती ते ।
कुंकू सुशोभे अन कुंडले ती
ज्योतीत रत्ने बहु शोभती की ॥ ४५ ॥
गाती तदा गोपिका कृष्णगाणी
गानध्वनी नी मथनध्वनी तो ।
स्वर्गामधे त्या मिसळोनि गेला
अमंगलो ते दिशि नष्ट झाले ॥ ४६ ॥
( अनुष्टुप् )
सकाळी पाहता सर्व आपसी त्या व्रजांगना ।
सुवर्ण रथ कोणाचा वदती नंदद्वारि हा ॥ ४७ ॥
अक्रूर बातमीदार कंसाचा पातला असे ।
जेणे श्री प्रीय कृष्णाला नेलेसे मथुरापुरीं ॥ ४८ ॥
आम्हास नेउनी हा का कंसाचे पिंडदान ते ।
करितो, वदती ऐशा तेंव्हा उद्धव पातले ॥ ४९ ॥