समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १४ वा

ब्रह्मदेवकृत भगवंताची स्तुति -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( वसंततिलका )
श्रीब्रह्मदेव म्हणतात -
तू एकला प्रभू स्तुतेय तुला नमस्ते
     ही श्यामला तनु तुझी झळके हि वस्त्र ।
घुंगूर माळ मकराकृति कुंडले ती
     डोईस ते खवियले अन मोरपंख ।
वक्षास ही रुळतसे वनमाळ ऐशी
     वाटी दह्यासहित ही करि घेतलेली ।
शिंगी नि वेत कमरासचि बासुरीही
     ही कोवळी पद तुझे अन गोप वेष ॥ १ ॥
श्रीविग्रहो करितसे मनमेतु पूर्ण ।
     हे चिन्मयी रुप तुझे मज बोधिते नी ।
अप्राकृत तव रुपो नच आकळे की
     एकाग्र ध्याउनि तुझे नकळेचि कोडे ॥ २ ॥
ज्ञानी प्रयत्‍न करुनी स्थिरबुद्धि होती
     संतांसि सेवुनि तुझे करितात गान ।
नाही तुझ्या विण तयां मुळि काम कांही
     ते मेळिती तुज हरी जरि वैभवो ना ॥ ३ ॥
( इंद्रवज्रा )
भक्ती तुझी भद्र मुळात स्त्रोत
     ते ज्ञानि कष्टे बहु दुःख घेती ।
क्लेशोचि क्लेशो उरतो तळाशी
     तांदूळ भूसा कुटता न लाभे ॥ ४ ॥
अनंत ! अच्युत ! जगात थोर
     झालेहि योगी नच त्या कळला ।
लौकिक कर्मा तुज अर्पिती जे
     ते ज्ञान भक्ती पद मेळवीती ॥ ५ ॥
निर्गूणरूपो जरि ते कठीण
     ते शुद्ध चित्ता कळते विशेष ।
न ज्ञेय आत्मा घट पाट जैसा
     न सांगता ये परि ज्योत तैसा ॥ ६ ॥
आकाशबिंदू कण हे धरेचे
     न मोजता ये तव रूप तैसे ।
तारावया लोकचि रूप घेसी
     न जाणता ये महिमा तुझी ही ॥ ७ ॥
कृपे तुझ्या जो समचित्त राही
     नी प्रेम भावे चरणास येई ।
पदाधिकारी तवपाशि हो तो
     जैं वारसाला मिळतेचि वित्त ॥ ८ ॥
कुटील माझ्या परि थोर तेही
     मायीं तुझ्या चक्रिचि गुंगलेलो ।
प्रभो न गण्यो तुजपाशि मी तो
     अग्नी कुठे नी ठिणगी कुठे ती ॥ ९ ॥
रजोगुणाने मम जन्म झाला
     न जाणितो तव रूप सत्य ।
मानीतसे मी मजलाचि स्वामी
     कृपा करोनी मजला क्षमावे ॥ १० ॥
( वसंततिलका )
ब्रह्मांड हे मम असे तनु स्वामि कृष्णा
     नी कैक ते मज परी तव रोमि विश्व ।
रेणू जसे उडत ते बहु अग्निमध्ये
     मी औट हात तनुच्या तवरूप कोठे ॥ ११ ॥
( इंद्रवज्रा )
पोटात गर्भो जरि पाय झाडी
     तरीहि माता अपराध साही ।
असे नसे त्या जरि वस्तु तैशा
     ते सर्व कुक्षी नच का तुझ्या या ॥ १२ ॥
जगत्रयाचा जधि लोप होतो
     त्या नाभ पद्मी मम जन्म होतो ।
हे सर्व श्रूती वदतात ऐसे
     ते सत्य मिथ्या वदणे मला जे ॥ १३ ॥
नारायणो हे तव नाम सत्य
     तू सर्व आत्मा अन ईश्वरो ही ।
तू साक्षि तैसा जलि राहसी नी
     माया तुझी ही जरि अंश सर्व ॥ १४ ॥
जळात होते जरि ते विराट
     कां मी न पाही जरि होय सत्य ।
धुंडी तया मी शतवर्ष तेथे
     तपात भासे मग कान होसी ॥ १५ ॥
ते पूर्व सोडी अवतारि याही
     पोटात विश्वा तुचि दावितोसी ।
पाहोनि होतो नवलाव माते
     हे सिद्ध की विश्व तुझीच माया ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
जेंव्हा तुझ्या सवे विश्व पोटात दिसते तसे ।
विना माया असे कैसे लीला सारी तुझी असे ॥ १७ ॥
( शार्दूलविक्रीडीत )
पूर्वीचे जरि सोडले तरि अजी तू दाविला खेळ तो
कृष्णा तू जरि एकचि असुनिया बाळे नि वत्से तुची ।
चारी हात तुझ्या परी करितसे सेवा तुझी सृष्टि ती
ब्रह्मांडा धरिशी विभक्त रुपनी ते शेष ब्रह्मो उरे ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
अज्ञानि ते ना कधि रूप जाणो
     त्यांना जिवांच्या परि भासतोसी ।
हे निर्मिता तू मम रूप घेसी
     पाळावया विष्णु नि लीनि रुद्र ॥ १९ ॥
स्वामी विधात्या तुज जन्म नाही
     तरी ऋषी नी पशु पक्षि देव ।
योनीत घेसी अवतार कैक
     नी रक्षिसी संत नि दैत्य मारी ॥ २० ॥
योगेश्वरा तू परमात्म रूपी
     त्या योगमाये करिशी लिला या ।
कोठे कधी नी करिशी किती त्या
     न कोणि जाणी त्रयलोकि त्याते ॥ २१ ॥
( वसंततिलका )
स्वप्ना समान भ्रम विश्वचि सर्व आहे
     अज्ञान रूप सगळे भरलेचि दुःख
आनंदकंद हरि तू अन ज्ञान रूपी
     माये तुलाचि गमते भ्रम सर्व सत्य ॥ २२ ॥
( इंद्रवज्रा )
प्रभो खरा तू जगि एकलाची
     पुराण आत्मा गुणहीन तूची ।
हा देश कालोहि परप्रकाशी
     स्वयंप्रकाशी तुचि एकला की ।
तू नित्य आनंद विशुद्ध तैसा
     तू पूर्ण मुक्तो रुप अमृतीही ॥ २३ ॥
जिवांसि रूपो तव रूप सार्‍या
     तू ज्ञान सूर्यो दिसतोसि ज्ञान्या ।
तरूनि जाती मग ते भवात
     खोट्यास पाहो अति दृष्टि खोटी ॥ २४ ॥
न जाणितो जो परमात्मरूपा
     तयांस होतो भ्रम या भवाचा ।
ज्ञानेचि नाशे भ्रम त्या जिवांचा
     रज्जूच भासे नच सर्प राही ॥ २५ ॥
अज्ञान दोन्ही भवबंध मोक्ष
     ते ज्ञान सत्यो नच भिन्न रूपा ।
सूर्या न रात्रो दिन तो हि नाही
     अखंड आत्मा नच बंध मोक्ष ॥ २६ ॥
( अनुष्टुप् )
आत्मा तू असुनी लोक दुजाचि पाहती तुला ।
अज्ञानी धुंडिती आत्मा जगात वेगळा पहा ॥ २७ ॥
( इंद्रवज्रा )
सर्वां हृदेयी वसशी अनंता
     न तू जिथे ते त्यजितात संत ।
नी आत रूपा तुज शोधिताची
     कळोनि दोरी मग भीत कोण ॥ २८ ॥
नष्टेची सृष्टी मग अज्ञ भाव
     श्रेष्ठत्व ऐसे तवरूप ज्ञान ।
तुझ्या कृपेचा कण लाभता हो
     वैराग्य ज्ञानीं नच शक्ति ऐशी ॥ २९ ॥
म्हणोनि कृष्णा कुठल्याहि जन्मी
     ते भाग्य लाभो मजला असे की ।
तुझ्याच दासातिल दास व्हावा
     नी पायसेवा तव मी करीन ॥ ३० ॥
मोठ्याहि यज्ञीं नच तृप्तलासी
     परी व्रजीं बालक वत्स होता ।
झडाडुनी तू स्तनपान केले
     त्या धन्य माता अन सार्थ जीणे ॥ ३१ ॥
( अनुष्टुप् )
नंदादि व्रजवासींचे अहो धन्यचि भाग्य ते ।
प्रत्यक्ष ब्रह्म तै नांदे होवोनी सोयरे सुहृद् ॥ ३२ ॥
( वसंततिलका )
सौभाग्य याजपरि दैवत आम्हि जे की
     अक्राहि इंद्रियि वसोनि पितोत भक्ती ।
ते तृप्तती तदिच दैवत तृप्त होती
     तो काय भाग्य पुसणे मग त्या व्रजींचे ॥ ३३ ॥
व्रजी विशेष करुनी मज गोकुळात
     व्हावाचि जन्म म्हणिजे धुळ घेइ अंगी ।
तेथील प्रेमजिव त्यां जिवनोचि तू जो
     धुंडिति श्रुति सगळ्या धुळ ती कधीची ॥ ३४ ॥
( शार्दुलविक्रीडित )
गोकूळी जन जे तयास फळ ते तू कोणते देसि जे
नाही श्रेष्ठचि याहुनी म्हणवुनी चित्तासि मी मोहिलो ।
ते रूपो अपुले जरी पुतन ती नी राक्षसे मेळिले
यांनी तो तुजला जिवोचि दिधला त्यां काय तू देशि की ॥ ३५ ॥
( अनुष्टुप् )
सच्चिदानंद श्यामा रे लुटिती राग द्वेष ते ।
बांधिती मोह पाशाने हो जीव पूर्ण तो तसा ॥ ३६ ॥
विश्वाच्या गुंतड्यातून सर्वथा तू अलिप्तची ।
अपार मोदिशी भक्तां लीलाविस्तार साधिसी ॥ ३७ ॥
काय बोलू बहू स्वामी महिमा कळली जयां ।
जाणती जाणिले त्यांनी मी तो त्यां असमर्थची ॥ ३८ ॥
सच्चिदानंद श्रीकृष्णा सर्वांचा साक्षिभूत तू ।
तुझ्यात स्थित हे विश्व जाण्या आज्ञा असो मला ॥ ३९ ॥
( वसंततिलका )
प्राणा मनास वशिसी वचने नि रूपे
     तू सूर्य ते यदुकुलोत्पल फुल्लवाया ।
देवा द्विजो नि पशुचा अभिचंद्र तूची
     पाखंड घोर तम त्यासि शशी नि सूर्य ।
सर्वांसि वंद्य हरि तू वधितोसि दैत्या
     कल्पो नि कल्प तुजला मम हा प्रणाम ॥ ४० ॥
( अनुष्टुप )
श्रीशुकदेव सांगतात -
विधाता स्तुति गावोनी करोनी त्या परीक्रमा ।
वंदुनी कृष्णपायाते गेला तो सत्यलोकि ही ॥ ४१ ॥
आधीच ब्रह्मजी यांनी पोचिले गोप वत्स ते ।
कृष्णो ब्रह्म्या निरोपोनी पातला पुळणीत त्या ॥ ४२ ॥
परीक्षित् वर्ष ते गेले प्राणवल्लभ सोडुनी ।
परी क्षण तया वाटे माया श्रीहरिची अशी ॥ ४३ ॥
आचार्य वदती शास्त्रे परी जीवास तो भ्रम ।
माया श्रीहरीची मोठी कोणाला भ्रम ना पडे ? ॥ ४४ ॥
कृष्णाला पाहता सर्व वदले बंधु ये असा ।
आम्ही ना घेतला घास आनंदे जेव येथ तू ॥ ४५ ॥
हासता बाळ गोपाळीं कृष्णाने भोज घेतले ।
ते अघासुर सांगाडा पाहता व्रजिं पातले ॥ ४६ ॥
( वसंततिलका )
ते मोरपीस हरिच्या मुकुटास होते
     केसात पुष्प अतिवो रुळतीच छान ।
त्या श्यामदेहि हरिच्या बहु चित्ररेखा
     बासूरि पर्ण अन् शिंगि तशीच फुंकी ।
पाठीसि बाळ सगळे हरि कीर्ति गाती
     वत्सास हाक कुणि त्या कुरवाळतात ।
गोपी द्वयास बघता हरि मुग्ध झाल्या
     गोठ्यात कृष्ण मग तो अपुल्याहि आला ॥ ४७ ॥
( अनुष्टुप् )
व्रजात पातता बाळे मातांना वदु लागले ।
अज्‌गरा मारिले कृष्णे आम्हाला रक्षिले असे ॥ ४८ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
दुसर्‍या कुळिचा कृष्ण असोनी प्रेम एवढे ।
करिती गोप गोपी त्यां सांगा कारण काय ते ॥ ४९ ॥
श्रीशुकदेव म्हणतात -
जगीच्या सर्व जीवांना आत्मा तो आवडे बहू ।
पुत्र धन ययाहूनी आत्मा तो आवडे बहू ॥ ५० ॥
जेवढा आवडे प्राण प्राण्यांना रे परीक्षिता ।
तेवढे ते धन पुत्र प्रीय ना असती तया ॥ ५१ ॥
नृपेंद्रा देह हा आत्मा मानिती तेहि ते तसे ।
देहाच्याहुनि त्या पुत्रां धनाला प्रेम नार्पिती ॥ ५२ ॥
विचारे कळते तेंव्हा शरीर मी न तो असे ।
माझे शरीर ते आहे तेंव्हा न प्रेम तो धरी ।
म्हणोनी जगतो जीर्ण शरीर जाहले तरी ॥ ५३ ॥
येणे ते सिद्ध होते की सर्व प्राण्यास प्राण तो ।
प्रीय तो जगती सार्‍या प्रेम तो लवितो तया ॥ ५४ ॥
प्राणाचा प्राण हा कृष्ण समजा तुम्हि हे असे ।
जगकल्याण साधाया मायेने देह धारितो ॥ ५५ ॥
जयाला कळले रूप चराचर पदार्थ ते ।
ब्रह्म नारायणो कृष्ण तयांना जाहले पहा ॥ ५६ ॥
अंतीम रूप सार्‍याचे कारणी स्थित राहते ।
कृष्णाच्या वीण ते कांही सांगा काय जगी असे ॥ ५७ ॥
( इंद्रवज्रा )
पुण्यो मुरारी पदपत्र नौका
     ज्या लाभलीं त्यां भव भेय नाही ।
त्यांना मिळाले पद थोर जाणा
     न दुःख त्यांना भवि राहुनीया ॥ ५८ ॥
( अनुष्टुप् )
पाचव्या वर्षिची लीला सहाव्या वर्षि ते कसे ।
मातांना सांगती बाळे वदलो सर्व हे असे ॥ ५९ ॥
( इंद्रवज्रा )
गोपाळ बाळे अन कृष्ण क्रीडा
     अघासुरो मृत्यु नि भोजनाते ।
अप्राकृतो वत्स नि ब्रह्मस्तोत्र
     ऐके तया लाभति पूरुषार्थ ॥ ६० ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! बळि श्रीकृष्णे नेत्रपल्लव खेळ ते ।
माकडा सम त्या लीला व्रजींच त्यागिल्या पहा ॥ ६१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP