समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ११ वा
भगवान् श्रीरामाच्या उर्वरित लीलांचे वर्णन -
श्रीशुकदेव सांगतात-
(अनुष्टुप्)
भगवान् श्रीरामाचे वसिष्ठाचार्य योजुनी ।
सर्वदेव स्वरूपात्म्या स्वयेचि याजिले असे ॥१॥
होत्याला पूर्वचे राज्य ब्रह्मणा दक्षिणी दिशा ।
अध्वर्यू पश्चिमेला नी उद्गात्या उत्तरो दिली ॥२॥
उरली भूमि त्या मध्ये आचार्या स्थान ते दिले ।
मानिले भूमिला सर्व स्वामी निस्पृह ब्राह्मणा ॥३॥
म्हणोनी दिधले दान वस्त्रालंकार ठेवुनी ।
सीतेला मांगली वस्त्र अलंकारचि राहिले ॥४॥
पाहिले द्विज आचार्ये श्रीराम इष्ट देवता ।
द्विजांना हृदयी मानी प्रसन्न चित्त ठेवुनी ॥
द्विजांनी भूमि ती सर्व श्रीरामा परती दिली ॥५॥
वदले प्रभु तू स्वामी सर्व लोकांस एकला ।
तू तो हृदयज्योतीने अज्ञानतम नाशिसी ॥
ऐशा स्थितीमधे तू ते देण्याचे काय ठेविले ॥६॥
अनंत तुझिये ज्ञान पवित्र पुरुषोत्तमा ।
न पीडी संत जो कोणा तया तू पद अर्पिशी ॥
इष्टदेव तरी तू तो ब्राह्मणा मानिसी जगी ।
भगवान् रामरूपी तू नमस्कार तुला असो ॥७॥
एकदा भगवान् राम प्रजेची स्थिति जाणण्या ।
पालटी वेश नी गेला दांपत्य एक बोलता ॥८॥
थांबला, पति तो बोले कुलटा दुसर्या घरी ।
राहसी नच मी साही सीतेचे राम साहि जैं ॥९॥
श्रीरामे ऐकता ऐसे लोकपावादि त्रासला ।
सीतेला त्यजुनी त्याने वाल्मिकाश्रमि ठेविले ॥१०॥
सीता गर्भार तै होती प्रसूत जाहली तिथे ।
झाले लवांकुशो दोघे केले जातक वाल्मिके ॥११॥
लक्ष्मणा द्वय ते पुत्र चित्रकेतु नि अंगदो ।
भरता जाहले तैसे पुष्कलो तक्ष हे द्वय ॥१२॥
श्रुतसेन सुबाहू हे शत्रुघ्ना पुत्र जाहले ।
दिग्विजयात भरते गंधर्व कैक मारिले ॥१३॥
लुटोनी धन ते सर्व रामाच्या पायि अर्पिले ।
मधुवनी मधूपुत्र लवणो नाम राक्षसा ॥
शत्रुघ्ने मारिले तेथे मथुरापुर स्थापिले ॥१४॥
सीतेने लव अंकूशा वाल्मिका हाति देउनी ।
श्रीरामा चिंतिता चित्ती पृथ्विलोकात पावली ॥१५॥
ऐकता नावरे शोक शोकात बुडला हरी ।
वारंवार तया ध्यानी सीतेचे गुण पातले ॥१६॥
स्त्री - पुरूष प्रसंगात दुःखाचे मूळ ते असे ।
थोरांची गति ही झाली लोभ्याचे काय सांगणे ॥१७॥
पुन्हा त्या भगवान् रामे ब्रह्मचर्यचि धारुनी ।
तेराहजार वर्षे ते अग्निहोत्रास यागिले ॥१८॥
दंडकारण्यि ज्या पायी रुतले कंटको अशा ।
आपुल्या चरणा ध्याती हृदयी स्थापुनी तया ॥
स्वयंप्रकाश धामाला ज्योतिर्मयिचि पावले ॥१९॥
(वसंततिलका)
ना श्रेष्ठ कोणि जगती रघुराम ऐसा ।
बांधी पुला नि वधि राक्षस हे न कांही ॥
आश्चर्य, त्या गरज ना मुळि वानरांची ।
सार्या लिलाचि करितो नवलाव कैसा ॥२०॥
श्रीरामयेश हरिते मुळि पाप सारे ।
गाती मुनी नि नृपती पुढती कितेक ॥
राजे नि देव सगळे नमिती तयाला ।
पादांबुजा रघुपती शरणार्थ आलो ॥२१॥
(अनुष्टुप्)
श्रीरामी सहवासात राहिले वागले तसे ।
सर्व ते कोसलोदेशी श्रीरामधामि पावले ॥२२॥
चरित्र रामचंद्राचे ऐके त्या मार्दवो मिळे ।
परीक्षिता ! वदू काय तुटती कर्मबंध ही ॥२३॥
राजा परिक्षिताने विचारिले-
सांगा बंधुसि ते राम वागले कोणत्या रिती ।
बंधु प्रजा नर नारी रामाशी वागले कसे ॥२४॥
श्रीशुकदेव सांगतात -
त्रिभुवनपती राजा श्रीराम जाहला तदा ।
आज्ञापी बंधुते तेंव्हा दिग्वीजय तुम्ही करा ॥२५॥
अयोध्या नगरींमार्ग गंधे संमार्जितो सदा ।
वाटे श्रीरामचंद्राला पाहोनी मत्त ही पुरी ॥२६॥
महाली नी सभास्थानी फाटकीं देवमंदिरी ।
सुवर्ण कलशो होते पताकाही फरारती ॥२७॥
केळिंचे स्तंभ नी तेथे पूगीफळ डहाळिया ।
आरसे वस्त्र नी माला नाचरे चित्र शोभती ॥२८॥
भेटवस्तूसि देवोनी लोक ते प्रार्थिती तया ।
देवा तू तारिली पृथ्वी आताही तारि तूच की ॥२९॥
(इंद्रवज्रा)
श्रीराम जाता पथि लोक सारे
स्त्रीया पुरूषो नमिण्या तयाला ।
घरा त्यजोनी नित येत मार्गी
वर्षाव पुष्पे कमलाक्षि होई ॥३०॥
(अनुष्टुप्)
निरखोनि प्रजा सर्व राजा येई सभेत तैं ।
पूर्ववर्ती नृपांद्वारे नित्यसेवा तिथे चले ॥
अक्षेय खनिजे तेथे मौल्यवान् वस्तुही तिथे ॥३१॥
दारे नी खिडक्या सर्व पोवळ्यांनी सुशोभित ।
वैडूर्यमणिचे खांब फरशा माणकाचिया ॥
भिंती चमकती तेथे स्फटिकमणि शोभता ॥३२॥
बहुरंगी अशा माला पताका मणि शोभती ।
स्वच्छ मोती असे भोगी सुगंधी धूप दीप तै ॥३३॥
भूषणांकित स्त्रीयादी सेवेत नित्य पातती ।
फुले नी दागिने यांनी महाल सजला असा ॥३४॥
भगवान् राम तो होता जितेंद्रिय शिरोमणी ।
सर्व सीता विहारे तैं प्रेमाने याच मंदिरी ॥३५॥
सर्व स्त्री-पुरुषो ध्यान आजही लाविती तयी ।
श्रीरामा परि ते भोग मर्यादे भोगिती सदा ॥३६॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ ९ ॥ ११ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|