समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ९ वा

भगीरथ चरित्र आणि गंगावतरण -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)
गंगेला आणण्या साठी अंशुमाने बहू तप ।
करिता संपली आयू मेला गंगा न पातली ॥१॥
त्यां पुत्रे दिलिपे तैसे केले मेला तसाच तो ।
त्याचा पुत्र भगिरथे घोर ते तप मांडिले ॥२॥
तपाने पावली गंगा वदली माग काय ते ।
विनम्र बोलला राजा मृत्युलोकासि पातणे ॥३॥

गंगा म्हणाली -
पृथ्वीशी पडता वेगे धारिले पाहिजे कुणी ।
अन्यथा फोडुनी पृथ्वी रसातळात जाय मी ॥४॥
तसेच तेथिचे लोका स्नाने पापे धुतील ते ।
ते मी धुवू कुठे सांग विचार कर मानसी ॥५॥

भगीरथ म्हणाला -
ब्रह्मनिष्ठ असे साधू संन्यासी लोकपावनो ।
नष्टितील तुझे पाप हरि तो वसतो तयीं ॥६॥
जीवात्मा रुद्रदेवो तो धारील वेगही तुझा ।
दोरे व्याप्त जसे वस्त्र रुद्रात विश्व हे तसे ॥७॥
गंगेला वदता ऐसा राजाने शंकरा तपे ।
प्रसन्न करुनी तेंव्हा कृपाही मेळिली असे ॥८॥
हितैषी शिव विश्वाचा तथास्तु ! वदला असे ।
शिवे सावध होवोनी गंगा मस्तकि धारिली ॥
भगवत्‌चरणी स्पर्शे पवित्र म्हणुनी असे ॥९॥
रक्षाढीग वडीलांचा तिथे राजा भगीरथ ।
गंगेला घेउनी गेला ती त्रिभुवनपावनी ॥१०॥
रथी बैसोनि वायूच्या वेगे राजा पुढे चले ।
पवित्र करिता देशा गंगा पाठीसि चालली ॥
सागरा संगमी येता जळात पितृ न्हाविले ॥११॥
द्विजद्वेषे जरी भस्म सगरी पुत्र सर्व ते ।
गंगेचा स्पर्श तो होता स्वर्गात पातले पहा ॥१२॥
राखेला स्पर्शिता गंगा पुत्र स्वर्गात पातले ।
तर श्रद्धे करी स्नान तयांचे पुसणे नको ॥१३॥
गंगेची महिमा ऐसी न कांही नवलो तयीं ।
जिथोनी पातली गंगा पाय ते स्मरता मनीं ॥१४॥
पवित्र मुनिही होती गुणबंधन ते तुटे ।
संसार बंध ही गंगा कापी ते नवलो नसे ॥१५॥
श्रुत भगिरथा पुत्र तया नाभ न पूर्विचा ।
नाभा सिंधुद्विपो त्याचा अयुतायु तयास तो ॥१६॥
ऋतुपर्ण नला मित्र शिकवी फास तो नला ।
अश्वविद्या नलाची ती शिकला ऋतुपर्ण तो ।
सर्वकाम असा पुत्र ऋतुपर्णास जाहला ॥१७॥
सुदास सर्वकामाचा सौदास पुत्र त्याजला ।
दमयंती तया पत्‍नी सौदास नाम ते कुणी ॥
कल्माषपाद तैसेची मित्रसह वदे पहा ।
वसिष्ठे शापिता झाला राक्षसो नी निपुत्रिक ॥१८॥

राजा परीक्षिताने विचारिले -
भगवन्‌ ! इच्छितो तो जाणू वसिष्ठे शाप का दिला ।
जर गुप्त नसे कांही कृपया तर सांगणे ॥१९॥

श्रीशुकदेव सांगतात -
सौदास मृगयीं जाता वधिले राक्षसा कुण्या ।
बंधू तो सुटला त्याचा बंधूवध मनीं धरी ॥
स्वयंपाकी बनोनीया पाकशाळेत राहिला ॥२०॥
राजाकडे गुरूश्रेष्ठ वसिष्ठ भोजना जधी ।
पातता स्वयपाक्याने नरमांसचि वाढिले ॥२१॥
सर्वसमर्थ वसिष्ठे अभक्ष्य जाणुनी तदा ।
क्रोधाने शापिला राजा वदले राक्षसोचि हो ॥२२॥
जेंव्हा ते कळले त्यांना राक्षसी कृत्य हे असे ।
शाप तै वर्ष बाराची ठेविला गुरुने तदा ॥
सौदास जल घेवोनी उलटा सिद्ध जाहला ॥२३॥
थांबवी दमयंती त्या सौदासे चिंतिले मनीं ।
आकाश पृथ्वी सारे जीवमय तदा जळां ॥
सोडणे नच ते योग्य स्वपायीं सोडिले जल ।
म्हणोनी म्हणती त्याला मित्रसह असेहि ते ॥२४॥
काळे ते पडले पाय कल्माषपाद नाम तैं ।
सौदास राक्षसो झाला वनात फिरता तये ॥
द्विजदांपत्य एकांती एकदा पाहिले असे ॥२५॥
भुकेल्या राक्षसे विप्र खाण्यासी धरिला असे ।
कामना द्विजपत्‍नीची न झाली पूर्ण यद्यपी ॥२६॥
वदली राक्षसो ना तू दमयंतिपती असे ।
संतान इच्छितो आम्ही अधर्म नच हा करी ॥२७॥
देह हा माणसाचा तो साधण्या पुरुषार्थ ते ।
मारता पुरूषार्थाची हत्या ती मानिली असे ॥२८॥
पती हा द्विज शीलो नी तपी नी गुणिही तसा ।
इच्छितो प्राणिमात्रात हरि पाहून पूजिण्या ॥२९॥
राजा तू शक्तिशाली नी धर्मज्ञ श्रेष्ठ हा असा ।
पिता ना वधितो पुत्री उचीत नच हे तसे ॥३०॥
तुला सन्मानिती संत द्विजाचा अपराध ना ।
गायीच्या परि हा विप्र न योग्य समजून घे ॥३१॥
तरीही इच्छिशी खाऊं तर तू मज भक्षिणे ।
क्षण एक पतीवीण न मी पा जगुही शके ॥३२॥
वदता करुणापूर्ण अनाथा परि ती रडे ।
परी तो शापमोहाने जाहला भक्षिता द्विजां ॥
वाघ तो पशु जैं खाई तसा तेणेहि भक्षिला ॥३३॥
गर्भाधानासि उत्सूक पतीला पाहता तसे ।
सती ब्राह्मणिने त्याला क्रोधोनी शाप तो दिला ॥३४॥
अरे पाप्या अशी कामे-पीडिता पति मारिला ।
मूर्खा तू करिता इच्छा मृत्यु होईल तो तुझा ॥३५॥
सौदासाला असा शाप ब्राह्मणीने दिला तशी ।
पतीच्या सह ती गेली चितेत सति तेधवा ॥३६॥
सरता वरुषो बारा सौदास मुक्त जाहला ।
जाता हा पत्‍निच्या पाशी पत्‍नीने रोधिले असे ॥
ब्राह्मणीचा तसा शाप हिजला कळला असे ॥३७॥
सर्वथा त्यागिला त्याने स्त्रीसंग म्हणुनी तया ।
संतान नच ते झाले तयाचा हेतु मानुनी ॥
वसिष्ठे दमयंतीला गर्भ तो भरला असे ॥३८॥
उदरी सात वर्षे ही राहिला गर्भ तो परी ।
दमयंती प्रसूती ना वसिष्ठे घेतला तदा ॥
अश्म नी मारता पोटी जन्मला अश्मको पुन्हा ॥३९॥
अश्मका मूलको झाला क्षत्रीयहीन पृथिवी ।
केली त्या परशूरामे सर्वांचा मूळ हा उरे ॥
लपला नारि मध्ये तो म्हणोनी वाचला असे ।
नारीकवच हे नाम नारीत लपल्यामुळे ॥४०॥
दशरथो अश्मकाचा तयाच्या ऐडवीडला ।
विश्वसहासि खट्‌वांगो चक्रवर्ती पुन्हा तसा ॥४१॥
अजिंक्य समरी राही देवांनी प्रार्थिता तये ।
वधिले दैत्य ते सारे देव तैं वदले तया ॥
घटिका उरले दोन तुझे आयुष्य ते पहा ।
येता घरी तदा त्याने हरिसी ध्यान लाविले ॥४२॥
विचार करि तो चित्ती कुळाची द्विज देवता ।
तेवढे प्रेम तो माझे प्राणासी ही असेचि ना ॥
पत्‍नी पुत्र धनो राज्य मला ना प्रीय ती तशी ॥४३॥
अधर्मा चित्त ना गेले पवित्रकीर्ति तो हरी ।
सर्वत्र पाहिला मी तो अन्य ना पाहिले मुळी ॥४४॥
त्रिलोकस्वामि देवांनी वरही दिधला तरी ।
भोगा त्या नेच्छिले मी तो नामात मग्न राहिलो ॥४५॥
इंद्रिये देवतांची ती सुखार्थ फिरती सदा ।
आत्मरूपा न ते जाणो अन्यांचे काय ते घडे ॥४६॥
(इंद्रवज्रा)
म्हणोनि नेच्छी रमण्यात संगी
     खोटा रची खेळ अशीच माया ।
अज्ञान ग्रासी मन शुद्ध ऐसे
     त्या सत्य ईशाचरणी पडे मी ॥४७॥
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! हरिने त्या बुद्धि ओढोनि घेतली ।
म्हणोनी विश्व हे खोटे मानिता स्थिर राहिला ॥४८॥
सूक्ष्मात सूक्ष्म जै शून्य शून्याच्या परि शून्य ना ।
परब्रह्म परं सत्य भगवान्‌ वासुदेव या ॥
नावाने भक्त ते गाती साक्षात्‌ रूप असेचि ते ॥४९॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ९ ॥ ९ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP