समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २ रा

पृषध्र आदी मनुच्या पाच वंशाचे वर्णन -

श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्‌)
सुद्युम्न तो तपासाठी वनात जधि पातला ।
तदा वैवस्वते केले यमुनातटि ते तप ।
पुत्रांचा हेतु ठेवोनी मनूने शतवर्ष तै ॥१॥
पुन्हा आराधिला विष्णु संतानासाठि श्रीहरि ।
दहा पुत्र तया झाले इक्ष्वाकू थोर त्यातला ॥२॥
पृषध्र त्यातला एक वसिष्ठे नेमिले तया ।
गोरक्षा करण्या नी तो रात्री वीरासनी बसे ॥३॥
वर्षा ती एकदा होता घुसला व्याघ्र त्या स्थळी ।
भिवोनी उठल्या गाई गोठ्यात पळु लागल्या ॥४॥
वाघाने धरिता एक भीतीने हंबरे तदा ।
पृषध्रे ऐकता गेला पळता गाई पाशि तो ॥५॥
अंधारी रात्र ती घोर ढगांनी नभ व्यापिले ।
न दिसे वाघ जाणोनी गायीचे शिर कापिले ॥६॥
खड्‌गाचे टोक लागोनी वाघाचा कान कापला ।
पळाला वाघ तेथोनी मार्गात रक्त सांडले ॥७॥
पृषध्रा वाटले की हा कापिला व्याघ्र आपण ।
परंतु संपता रात्र पाहता दुःखि जाहला ॥८॥
नेणता घडली चूक वसिष्ठे तरि शापिले ।
न क्षत्रीय परी आता जा तू शूद्र रहा तसा ॥९॥
पृषध्रे जोडुनी हात आज्ञा ती मानिली असे ।
नैष्ठिक ब्रह्मचारी या तपा तो दृढ लागला ॥१०॥
समस्त प्राणिया त्याने सम नी हित साधिले ।
भगवान्‌ वासुदेवाच्या अनन्य पायि लागला ॥११॥
आसक्ती मिटल्या सर्व इंद्रिये वश राहिली ।
परिग्रह न संचेयो दैवे लाभे तसे जगे ॥१२॥
संतुष्ट आत्मज्ञानाने ईशात स्थित राहता ।
बहिरा नी मुका जैसा फिरे तो कधि भूतळी ॥१३॥
वनात फिरता ऐसा वनवा तेथ पेटला ।
पृषध्रे अग्निशी देह टाकिता ब्रह्मि पावला ॥१४॥
(इंद्रव्रजा)
होता कवी सान तयात पुत्र
     निःस्पृह गेला वनि तो तपार्थ ।
स्वयं प्रकाशी सहजीच झाला
     परंपदासी असुनी किशोर ॥१५॥
(अनुष्टुप)
करूष मनुच्या पुत्रे कारूष क्षत्रियो पुढे ।
निर्मिलो द्विजभक्तो ते धर्मी नी उत्तरापथी ॥१६॥
क्षत्रीय धार्ष्ट नावाचे धृष्टा पासून जन्मले ।
शेवटी याचि देहात जाहले द्विज सर्वची ।
नृगाचा पुत्र सुमती तयाचा भूत ज्योति तो ।
वसू तो भूत ज्योतीला सुपुत्र जाहला पुढे ॥१७॥
वसूचा प्रतिको पुत्र तयाला ओघवान नी ।
पुत्री ओघवती झाली पत्‍नी जी त्या सुदर्शना ॥१८॥
नरिष्यंता चित्रसेनो तयासी ऋक्ष नी तया ।
मिढवान पुढे कूर्च कूर्चाचा इंद्रसेन तो ॥१९॥
इंद्रसेना वीतिहोत्र सत्यश्रवा तयास नी ।
सत्यश्रव्या उरुश्रवा तयाचा देवदत्त तो ॥२०॥
देवदत्ता अग्निवेश्यो स्वयं जो अग्निदेव तो ।
पुढे विख्यात त्या नामे जातुकर्मण्य, कानिनो ॥२१॥
अग्निवेश्यासनी गोत्र याचि नामे पुढे असे ।
नरिष्यंती असा वंश दिष्टाचा वंश ऐकणे ॥२२॥
दिष्टा नाभागतो पुत्र परी ना पुढचाचि हा ।
वैश्य हा आपुल्या कर्मे ययाचा तो भलंदन ॥२३॥
वत्सप्रीतीशि प्रांशू नी तयाचा प्रमती पुढे ।
खानित्राशीच चाक्षूष तयाचा तो विविंशती ॥२४॥
विविंशतीस तो रंभ रंभास खनिनेत्र तो ।
करंधम तया पुत्र याचा पुत्र अविक्षितो ॥२५॥
चक्रवर्ती असा राजा मरूत्त पुत्र यास हा ।
यये आरंभिले यज्ञ महर्षि अंगिरा करें ॥२६॥
न झाले पुढती यज्ञ मरूत्ते योजिले तसे ।
सर्वची पात्र सोन्याचे यज्ञी होती सुरेख त्या ॥२७॥
मत्त इंद्र तिथे झाला पिऊनी सोमपान तो ।
दक्षिणेने द्विजा तृप्ती विश्वेदेवो सभासद ॥२८॥
मरूत्ता दम हा पुत्र दमाचा राज्यवर्धन ।
तयाचा सुधृती आणि तयाचा नर पुत्र तो ॥२९॥
नराचा केवलो पुत्र तयाचा बंधुमान्‌ पुढे ।
तयाचा बंधु नी याचा तृणबिंदूचि पुत्र तो ॥३०॥
आदर्श गुणभांडार तृणबिंदु असाचि तो ।
देवी अलंबुजा श्रेष्ठ अप्सरे वरिले यया ॥
तयांचे पुत्र ते कांही पुत्री इडविडाहि ती ॥३१॥
पुलस्त्य मुनिचा पुत्र विश्रवा योग साधुनी ।
इडाविडा हिच्या पोटी कुबेर गर्भि जन्मिला ॥३२॥
तृणबिंदु यया पोटी विशाल शून्यबिंदु नी ।
धूम्रकेतू असे झाले वंशधर विशालने ॥
स्थापिली नगरी थोर वैशाली नावची पहा ॥३३॥
विशालां हेमचंद्रो नी धूम्राक्ष पुत्र जाहला ।
तयाचा संयमो याचे कृताश्व देवजो द्वय ॥३४॥
सोमदत्त कृशाश्वाचा अश्वमेध करी पुढे ।
पूजुनी हरि संतांना गती उत्तम पावला ॥३५॥
सोमदत्तासि सुमती तयाचा जनमेजय ।
सर्व हा तृष्णबिंदूचा कीर्तिमान्‌ राजवंश जो ॥३६॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ९ ॥ २ ॥
॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP