समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ९ वा

ध्रुव वर घेऊन घरी येतो -

मैत्रेयजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
होताचि देवो भय मुक्त तेंव्हा
    हरीसि वंदूनि निघोनि गेले ।
सहस्त्रशीर्षा गरुडी बसोनी
    भेटीस वृंदावनि पातला तो ॥ १ ॥
तो ध्रुव तेंव्हा बिजली समान
    दैदिप्य मूर्ती स्मरता विराला ।
भिऊनि डोळे उघडोनि पाही
    ते अंतरीचेच उभे समोर ॥ २ ॥
हर्षोनि गेला बघता प्रभूसी
    केला तये दंडवत प्रणाम ।
पाही पुन्हा प्रेमभरोनि दृष्टी
    आलिंगना चुंबन इच्छितो तो ॥ ३ ॥
जोडोनि हाता स्तवनास इच्छी
    परी तया ते नव्हतेचि ठावे ।
सर्वज्ञ जाणे मनी भावना ती
    गालास लावी मग वेदशंख ॥ ४ ॥
होताचि तो स्पर्श मनात वेदां
    जीवस्वरुपा मग दिव्य पाही ।
श्रद्धे नि धैर्ये मग विश्वख्यात
    त्या श्रीहरीची स्तवनेचि गायी ॥ ५ ॥
ध्रुवजी म्हणाले -
(वसंततिलका)
माझ्याच अंतःकरणी शिरुनी तुम्ही तो
    निद्रीत वाणि अन इंद्रिय त्या स्वतेजे ।
जागृतची करितसा अन शक्ति देता
    मी हो तुम्हा करितसे प्रणिपात घ्यावा ॥ ६ ॥
तू एकला परि गुणे रचितोस सृष्टी
    राहूनि आत गमसी बहुरूप ऐसा ।
ते ठीकची जणुहि काष्ठ जळोनि राही
    अग्नीत भास गमतो बहुरूप जैसा ॥ ७ ॥
आरंभ सृष्टि असता शरणात ब्रह्मा
    येताचि तो बघतसे जणु जाग आली ।
या आपुल्या चरणि मुक्तिहि आश्रिता ती
    कोणी कृतज्ञ मग ते विसरे कसा हो ॥ ८ ॥
प्रेतासमान तनु ही विषयातुनीच
    भोगी सुखास तरि तो नरकोचि लाभे ।
भोगातची रमति नी तुज नाठवीती
    त्यांची अवश्य मति तूचि हरोनि नेली ॥ ९ ॥
नाथा ! तुझ्याचि चरणा नित ध्यात गाता
    जो होय मोद तसला नच ब्रह्मरूपी ।
ज्यांच्यावरी लटकते तलवार ऐसी
    तैसेचि पुण्य सरण्या मनि धाक देवा ॥ १० ॥
द्यावा मला विमलसा तव भक्तसंग
    ज्यांच्या मनात वसतो तव भाव नित्य ।
ऐकोनि त्यां मुखिचिया तव रम्य लीला
    होईन मत्त पिउनी भविही तरेल ॥ ११ ॥
जे लुब्धची चरणपद्म सुगंध घेता
    ऐशाचिया करित संग महानुभावा ।
कांही नसेचि मुळि शुद्ध स्वदेह पुत्रा
    गृहादिकीं नि रमणी ययि ऐहिकात ॥ १२ ॥
मी जाणितोचि पशुवृक्ष नि पर्वतांना
    सर्पादिका नि सुर दैत्य मनुष्य यांना ।
आणिक त्या स्थुल रुपा तव पूर्व जाणे
    जेथे न शब्द पुरती रुप ते न जाणे ॥ १३ ॥
कल्पांति योग स्थित जो उदरात विश्व
    घेवोनि पोटि करितो शयनो समुद्री ।
ज्याचेचि नाभिकमळे प्रगटेचि ब्रह्मा
    तो तूचि होय तुजला नमितो हरी मी ॥ १४ ॥
तू नित्य मुक्त परिशुद्ध विबुद्ध आत्मा
    आदीपुरुष भगवान्‌ त्रिगुणेश्वरा तू ।
जीवाहुनी विलग नी तरि याच विश्वा
    स्थापावया यजनि तूचि विराजमान ॥ १५ ॥
शक्ती तुझ्या प्रगटतात विद्या अविद्या
    ज्या भासती गति तुझ्या परिही विरुद्ध ।
ब्रह्मस्वरुप जगकारण तू अनादी
    आनंदरुप तुजला नमितो असा मी ॥ १६ ॥
आनंदरुप तुजला भजता न हेते
    त्यांना तुझेचि पद श्रेष्ठ, न राज्य‌आदी ।
हेही खरे परि जसी बछड्यास गाय ।
    पाजी नि रक्षि तशिची तव ती कृपा त्यां ॥ १७ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
बुद्धिमान्‌ ध्रुवबाळाने शुभसंकल्प हा असा ।
प्रार्थिता भगवान्‌विष्णु बोलला भक्तवत्सल ॥ १८ ॥
श्री भगवान म्हणाले -
व्रती रे राजपुत्रा मी संकल्प जाणितो तुझा ।
दुर्लभो पद ते सत्य तरी देतो ‘सुखी भव’ ॥ १९ ॥
भद्रा ! तेजोमयी ऐसा अविनाशीचि लोक जो ।
कोणासी न लभे, तारे परीक्रमिति ज्यां सदा ॥ २० ॥
बैल जै त्या खळ्यामाजी खुंटाशी फिरती सदा ।
धर्म कश्यप नी अग्नी शुक्रादी ऋषिसप्त ते ।
प्रदक्षिणा जया देती देतो तो लोक मी तुला ॥ २१ ॥
या लोकी राज्य देवोनी जाता तात वनात तै
छत्तिस्‌ हजार वर्षे तू राज्य ते करशील नी ।
शक्ति ऐसीच राखोनी धर्माने पाळसी प्रजा ॥ २२ ॥
उत्तम जो तुझा बंधू मृगया करिता मरे ।
माता सुरुचि पुत्राच्या प्रेमाने वेडि होइल ॥
वनात शोधिता त्याला वणव्यात मरेल की ॥ २३ ॥
यज्ञ माझी प्रियोमूर्ती असे मोठेचि यज्ञ ते ।
करिशील अशी भक्ती भोगींही मजला स्मरे ॥ २४ ॥
अंती तू सर्व लोकांना वंदनीय अशा पदा ।
जाशील जिथुनी येणे न घडे भवसागरीं ॥ २५ ॥
मैत्रेयजी सांगतात -
पूजा घेवोनिया ऐसी ध्रुवाला पद देउनी ।
पाहता पाहता गेला भगवान्‌ गरुडध्वज ॥ २६ ॥
भक्तीने साधता हेतू निवृत्त जाहला ध्रुव ।
प्रसन्न नच होता ही आला स्वनगरास तो ॥ २७ ॥
विदुरजी विचारतात -
(इंद्रवज्रा)
मायापती श्रीहरिचे पदासी
    जाण्यासि त्याचे पद नित्य ध्यावे ।
त्या ध्रूवबाळा क्षिर-नीर बुद्धी
    असोनि कां तो नच हो प्रसन्न ॥ २८ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
सावत्रमातृ बोलाचे दुःख त्यां सलता मनीं ।
न मागे हरिसी मुक्ती यासाठी खंतला ध्रुव ॥ २९ ॥
ध्रूवजी (स्वगत) म्हणाले -
(इंद्रवज्रा)
ध्याता जया सिद्ध कितेक जन्म
    तेंव्हा तयां लाभ मिळे असा तो ।
षण्मास मध्ये मिळाला मला की
    मी कामनेने परि दूर झालो ॥ ३० ॥
(अनुष्टुप्‌)
अहो दुर्भागि मी माझी मूर्खता कसली पहा ।
भवासी नाशितो विष्णु पाहुनी वस्तु याचिली ॥ ३१ ॥
सरता स्वर्गिचे भोग देवता भवि येति त्या ।
त्यांना ना सहवे माझे श्रेष्ठत्व तरि बुद्धि ही ॥
माझी केली असे भ्रष्ट नारदी बोध ना स्मरे ॥ ३२ ॥
आत्म्याविण न संसार परी मी व्याघ्र तो जसा ।
स्वप्नात पाहता भ्यावे तसे बंधूसि पाहिले ॥ ३३ ॥
पावाया दुर्लभो तो की करोनी तप घोरही
पावता व्यर्थ मी मागे विश्वात्मा हरिच्या पुढे ।
आयुष्य सरता होते चिकित्सा व्यर्थ सर्वची
संसार मोडितो विष्णु त्याला संसार प्रार्थिला ।
हाय ! ऐसा असे मी तो भाग्यहीन कसा पहा ॥ ३४ ॥
पुण्यहीन असा मी की सम्राट पावता तया
भुसाच्या सह मागाव्या कण्या तैसेचि जाहले ।
आत्मानंद प्रदात्याला मूर्खतावश हो‌उनी ।
व्यर्थ गर्वास नेईजे उच्च ते पद प्रार्थिले ॥ ३५ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
तुम्हापरी नित्य पदारविंदी
    भृंगापरी सेवुनि तुष्ट होती ।
न मागती ते कधि अन्य वस्तू
    हेतू तयांचा हरि एक होतो ॥ ३६ ॥
(अनुष्टुप्‌)
राजाने ऐकता पुत्र घरासी येतसे पुन्हा ।
विश्वास नकरी चित्ती माझे ना भाग्य तेवढे ॥ ३७ ॥
तदाचि नारदी बोल स्मरता सर्व ओळखी ।
आनंदे उठला वेगे निरोप्यां हारही दिला ॥ ३८ ॥
पुत्रमुख पहाया तो उत्सूक जाहला मनीं ।
विप्र मंत्री तसे त्याने बंधूजन हि घेउनी ॥ ३९ ॥
सुवर्ण रथि बैसोनी पुरा बाहेर पातला ।
पुढे वेदध्वनी शंख दुंदुभी वंशि वाजल्या ॥ ४० ॥
सजोनी पालखी माजी सुरुची सुनिती द्वयां ।
सवे उत्तम घेवोनी निघाल्या स्वागता तदा ॥ ४१ ॥
उद्यानापासि तो ध्रूव राजाने पाहता क्षणी ।
त्वरीत पातला खाली उत्सूक पुत्र भेटिला ॥ ४२ ॥
बाहूत घेतला बाळ नव्हता पाहिला ध्रुव ।
प्रभूच्या पादस्पर्शाने आता पुनित जाहला ॥ ४३ ॥
आकांक्षा जाहली पूर्ण पुत्राचे शिर हुंगुनी ।
थंड त्या प्रेम‌अश्रुंनी बाळाला न्हाविले तये ॥ ४४ ॥
सज्जनाग्र अशा बाळे पित्यासी वंदिले पुन्हा ।
कुशलो पुसुनी माता दोघीही वंदिल्या तदा ॥ ४५ ॥
पायासी झुकता बाळ सुरुची हृदयास त्यां ।
लावोनी बोलली वाणी व्हावे बाळा चिरंजिव ॥ ४६ ॥
जसे जळ स्वयं खाली वाहते त्याच की परी ।
मित्रादी सर्वही लोक गुणवंतासि वंदिती ॥ ४७ ॥
उत्तम ध्रुव हे दोघे प्रेमाने भेटले पुन्हा ।
स्पर्शे रोमांचित झाले नेत्रासी अश्रु लोटले ॥ ४८ ॥
सुनिती प्रिय पुत्राला गळ्यासी लाविता तदा ।
विरली सर्व संतापा स्पर्शाने हर्षली मनीं ॥ ४९ ॥
विदुरा वीरमातेचे अश्रुंनी भिजले स्तन ।
पुनःपुन्हा तयातून दुधाची धार लोटली ॥ ५० ॥
प्रशंसे बोलले लोक राणीजी ! लाल हा तुझा ।
भाग्याने लोटला आता रक्षील बहु ही धरा ॥ ५१ ॥
हरीचा भक्त हा आहे तप मृत्यूहि जिंकितो ॥ ५२ ॥
या परी सर्व त्या लोके व्यक्त प्रेम करोनिया
उत्तमा सह ध्रुवाते कुंजरा वरि त्या नृपे ।
आणिले नगरा माजी शुभेच्छा सर्व बोलले ॥ ५३ ॥
नगरीं मकराकार कमानी त्या उभारिल्या ।
सजविल्या फळें पुष्पे केळीखांब सुशोभित ॥ ५४ ॥
द्वार द्वारात ते दीप कलश शोभले बहू ।
आम्रपत्रे नि वस्त्रांनी पुष्पमाला विशोभल्या ॥ ५५ ॥
अनेक फाटके तैसे घरेही शोभली तदा ।
सोन्याचे चमके जैसे विमान सजले नभी ॥ ५६ ॥
चौक रस्ते नि गल्ल्याही झाडुनी चंदनी जले ।
शिंपिली ठेविली तेथे फळ भातादि भोजना ॥ ५७ ॥
राजमार्गे ध्रुवो जाता कुलवान्‌ सुंदर्‍या तदा ।
जल दूर्वा दही पुष्प फळेही वाहुनी तया ॥ ५८ ॥
वात्सल्य दाटले चित्ती बोलती शुभ बोलही ।
मंजूळ ऐकता गाणी महाली ध्रुव पातला ॥ ५९ ॥
सजले मणि रत्‍नांनी श्रेष्ठ भूवन हे असे ।
लाडात वाढला बाळ जसे सुर निवासती ॥ ६० ॥
हस्तिदंती पलंगासी जेथे त्याचा निवास तो ।
सुवर्ण कशिदा वस्त्र होते मौलीक आसने ॥ ६१ ॥
भिंती ही मणि रत्‍नांच्या आणीक स्फटिकाचिया ।
मूर्तींच्या वरती दीप मण्यांचे तेवती सदा ॥ ६२ ॥
महाला चारि बाजूसी वृक्ष उद्यान शोभले ।
तिथे पक्षी नि भृंगांचा नित्य गुंजारवो असे ॥ ६३ ॥
उद्यानी पुष्कराजाची बारवो शोभली तशी ।
विवीध रंगि पद्मांनी हंसादी क्रीडती तिथे ॥ ६४ ॥
उत्तानपाद राजर्षी प्रभाव ऐकिला जसा ।
तसा तो पाहुनी पुत्र मनीं आश्चर्य पावला ॥ ६५ ॥
तरुण ध्रुव तो होता अमात्य मानिती तया ।
प्रजाही चाहते ऐसे पाहुनी राज्य त्यां दिले ॥ ६६ ॥
स्व जरा जाणुनी राजा आत्मचिंतनि लागला ।
प्रपंच त्यागुनी सारा गेला तो तै वनातही ॥ ६७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ४ ॥ ९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP