श्रीमद् भागवत पुराण
स्कान्दे भागवत माहात्म्ये
चतुर्थोऽध्यायः

श्रीमद् भागवतस्य वक्तृश्रोतॄणां
लक्षणानि, भागवतश्रवणस्य फलं विधिश्च -

श्रीमद्‌भागवताचे स्वरूप, प्रमाण, श्रोता-वक्त्यांची
लक्षणे, श्रवण विधी आणि माहात्म्य -


संहिता
मराठी अनुवाद


ऋषयः ऊचुः -
साधु सूत चिरं जीव चिरमेवं प्रशाधि नः ।
श्रीभागवमाहात्म्यं अपूर्वं त्वन् मुखाच्छ्रुतम् ॥ १ ॥
शौनकादी ऋषी म्हणाले - सूत महोदय ! आपणास उदंड आयुष्य मिळो आणि आपण आम्हांला असाच उपदेश दीर्घकाळपर्यंत करीत राहावा. आम्ही आपल्या तोंडून श्रीमद्‌भागवताचे अपूर्व माहात्म्य ऐकले. (१)


तत्स्वरूपं प्रमाणं च विधिं च श्रवणे वद ।
तद्वक्तुर्लक्षणं सूत श्रोतुश्चापि वदाधुना ॥ २ ॥
सूत महोदय ! आता आपण आम्हांला श्रीमद्‌भागवताचे स्वरूप, त्याचे प्रमाण, ते श्रवण करण्याची पद्धत, तसेच वक्‍ता आणि श्रोते यांची लक्षणे सांगावीत. (२)


सूत उवाच -
श्रीमद् भागवतस्याथ श्रीमद्‌भगवतः सदा ।
स्वरूपमेकमेवास्ति सच्चिदानन्दलक्षणम् ॥ ३ ॥
सूत म्हणतात - श्रीमद्‌भागवत आणि श्रीभगवंतांचे स्वरूप सदासर्वदा एकच आहे आणि ते म्हणजे सच्चिदानंदरूप हेच. (३)


श्रीकृष्णासक्तभक्तानां तन्माधुर्यप्रकाशकम् ।
समुज्जृम्भति यद्वाक्यं विद्धि भागवतं हि तत् ॥ ४ ॥
भगवान श्रीकृष्णांचे ठायी ज्यांचे प्रेम आहे, त्या भक्‍तांच्या हृदयामध्ये भगवंतांचे माधुर्य अभिव्यक्‍त करणारे काव्य म्हणजेच श्रीमद्‌भागवत होय. (४)


ज्ञानविज्ञान भक्त्यङ्‌ग चतुष्टयपरं वचः ।
मायामर्दनदक्षं च विद्धि भागवतं च तत् ॥ ५ ॥
जे वाड्मय ज्ञान, विज्ञान , भक्‍ती व त्याच्या प्राप्तीच्या साधन-चतुष्टयाला प्रकाशित करणारे असून, मायेचे समूळ उच्चाटन करणारे आहे, ते म्हणजे श्रीमद्‌भागवत समज. (५)


प्रमाणं तस्य को वेद ह्यनन्तस्याक्षरात्मनः ।
ब्रह्मणे हरिणा तद्दिक् चतुःश्लोक्या प्रदर्शिता ॥ ६ ॥
श्रीमद्‌भागवत अनंत अक्षरस्वरूप आहे. त्याचे प्रमाण कोण जाणू शकेल बरे ? प्रथम विष्णूंनी ब्रह्मदेवांना चार श्र्लोकांच्या द्वारे याची केवळ दिशा दाखविली होती. (६)


तदानन्त्यावगाहेन स्वेप्सितावहनक्षमाः ।
ते एव सन्ति भो विप्रा ब्रह्मविष्णुशिवादयः ॥ ७ ॥
विप्रगणहो ! या भागवताच्या अतिशय खोल असलेल्या पाण्यात बुडी मारून त्यातून आपल्यासाठी इष्ट वस्तू प्राप्त करण्यास फक्‍त ब्रह्मदेव विष्णू, शंकर इत्यादीच समर्थ आहेत. (७)


मितबुद्ध्यादिवृत्तीनां मनुष्याणां हिताय च ।
परीक्षिच्छुकसंवादो योऽसौ व्यासेन कीर्तितः ॥ ८ ॥
ग्रन्तोऽष्टादशसाहस्रो योऽसौ भागवताभिधः ।
कलिग्राहगृहीतानां स एव परमाश्रयः ॥ ९ ॥
परंतु ज्यांच्या बुद्धी इत्यादी वृत्ती मर्यादित आहेत. त्या माणसांनी आपले हित साधावे, म्हणून श्रीव्यासमुनींनी परीक्षित आणि शुकदेव यांच्यात झालेल्या संवादरूपाने जे कथन केले, त्याचेच नाव श्रीमद्‌भागवत आहे. या ग्रंथाची श्र्लोकसंख्या अठरा हजार आहे. जे लोक कलिरूप अजगराच्या विळख्यात सापडले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हाच सर्वोत्कृष्ट उपाय आहे. (८-९)


श्रोतारोऽथ निरूप्यन्ते श्रीमद् विष्णुकथाश्रयाः ।
प्रवरा अवराश्चेति श्रोतारो द्विविधा पताः ॥ १० ॥
भगवान श्रीकृष्णांच्या कथांचे श्रवण करणार्‍या श्रोत्यांविषयी आता सांगतो. उत्तम आणि अधम असे श्रोत्यांचे दोन प्रकार मानलेले आहेत. (१०)


प्रवराश्चातको हंसः शुको मीनादयस्तथा ।
अवरा वृकभूरुण्डवृषोष्ट्राद्याः प्रकीर्तिताः ॥ ११ ॥
चातक, हंस, शुक, मीन इत्यादी उत्तम श्रोत्यांचे पुष्कळ भेद आहेत. वृक, भूरूंड, वृष, उष्ट्र इत्यादी अधम श्रोत्यांचे सुद्धा अनेक भेद सांगितले आहते. (११)


अखिलोपेक्षया यस्तु कृष्णशास्त्रश्रुतौ व्रती ।
सः चातको यथाम्भोदमुक्ते पाथसि चातकः ॥ १२ ॥
चातक ढगातून पाडणार्‍या पाण्याचीच जशी अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे जो श्रोता सर्व काही सोडून देऊन फक्‍त श्रीकृष्णांसंबंधीच्या शास्त्रांचे श्रवण करण्याचे व्रत घेतो, त्याला चातक म्हटले आहे. (१२)


हंसः स्यात् सारमादत्ते यः श्रोता विविधाच्छ्रुतात् ।
दुग्धेनैक्यं गतात्तोयाद् यथा हंसोऽमलं पयः ॥ १३ ॥
हंस ज्याप्रमाणे पाणी मिसळलेल्या दुधातून शुद्ध तेवढे घेतो, त्याचप्रमाणे जो श्रोता अनेक गोष्टी ऐकून त्यातील सार तेवढे घेतो, त्याला हंस म्हणतात. (१३)


शुकः सुष्ठु मितं वक्ति व्यासम् श्रोतॄंश्च हर्षयन् ।
सुपाठितः शुको यद्वत् शिक्षकं पार्श्वगानपि ॥ १४ ॥
ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने शिक्षविला गेलेला पोपट आपल्या मधुर वाणीने शिक्षकाला तसेच येणार्‍या इतरांनासुद्धा प्रसन्न करतो, त्याचप्रमाणे जो श्रोता ऐकलेली कथा मधुर वाणीने आणि थोडक्या शब्दात दुसर्‍यांना ऐकवितो व त्यायोगे व्यास व इतर श्रोत्यांना आनंद देतो, त्याला शुक म्हणतात. (१४)


शब्दं नानिमिषो जातु करोत्यास्वादयन् रसम् ।
श्रोता स्निग्धो भवेन्मीनो मीनः क्षीरनिधौ यथा ॥ १५ ॥
जशी क्षीरसमुद्रातील मासोळी मौन धारण करून पापण्या न मिटता पाहात राहून दुग्धपान करते, त्याप्रमाणे जो श्रोता कथा ऐकताना डोळ्यांच्या पापण्याही न मिटता आणि तोंडातून एक शब्दही बाहेर न काढता अखंड कथारसाचाच आस्वाद घेत राहातो, तो प्रेमी श्रोता मीन म्हटला गेला आहे. (१५)


यस्तुदन् रसिकान् श्रोतॄन् व्रौत्यज्ञो वृको हि सः ।
वेणुस्वनरसासक्तान् वृकोऽरण्ये मृगान् हथा ॥ १६ ॥
वनामध्ये बासरीचा मधुर आवाज ऐकण्यात मग्न झालेल्या हरिणांना लांडगा जसा भयानक ओरडण्याने भिववितो, त्याचप्रमाणे मूर्ख माणूस कथा श्रवण करीत असतांना रसिक श्रोत्यांना डिवचीत मध्येच मोठ्याने बोलतो, तो वृक म्हणावा. (१६)


भूरुण्डः शिक्षयेदन्यात् श्रुत्वा न स्वयमाचरेत् ।
यथा हिमवतः श्रृंगे भूरुण्डाखो विहंगमः ॥ १७ ॥
हिमालयाच्या शिखरावर असलेला भूरुंड नावाचा पक्षी कोणाची तरी उपदेशपर वाक्ये ऐकून तसेच बोलतो, परंतु स्वतः त्यापासून बोध घेत नाही. याप्रमाणे जो उपदेशपर गोष्टी ऐकून त्या दुसर्‍यांना शिकवितो, परंतु स्वतः तसे आचरण करीत नाही, अशा श्रोत्याला भूरुंड म्हणतात. (१७)


सर्वं श्रुतमुपादत्ते सारासारान्धधीर्वृषः ।
स्वादुद्राक्षां खलिं चापि निर्विशेषं यथा वृषः ॥ १८ ॥
बैलासमोर द्राक्षे येऊ देत किंवा कडवट पेंड, दोन्ही तो एकाच चवीने खाते, त्याप्रमाणे जो ऐकलेले सारेच ग्रहण करतो, परंतु घेण्याजोगे काय व टकण्याजोगे काय हे ठरविण्यास ज्याची बुद्धी असमर्थ असतो, असा श्रोता वृष म्हटला जातो. (१८)


स उष्ट्रो मधुरं मुञ्चन् विपरीते रमेत यः ।
यथा निम्बं चरत्युष्ट्रो हित्वाम्रमपि तद्‌युतम् ॥ १९ ॥
उंट ज्याप्रमाणे आंबा सोडून फक्‍त कडूलिंबाचा पालाच चघळतो, त्याप्रमाणे जो भगवंतांच्या मधुर कथा ऐकण्याचे सोडून त्याऐवजी संसारातील गोष्टीत रममाण होतो, त्याला उंट म्हणतात. (१९)


अन्येऽपि बहवो भेदा द्वयोर्भृङ्‌गखरादयः ।
विज्ञेयास्तत्तदाचारैः तत्तत्प्रकृतिसम्भवैः ॥ २० ॥
असे काही थोडेसे भेद सांगितले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्‍तसुद्धा उत्तम-अधम अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांचे ’भ्रमर’, ’गाढव’ इत्यादी अनेक भेद आहेत. हे भेद त्या त्या श्रोत्यांच्या स्वाभाविक आचार-व्यवहारावरून ओळखता येतात. (२०)


यः स्थित्वाभिमुखं प्रणम्य विधिवत्
     त्यक्तान्यवादो हरेः ।
लीलाः श्रोतुमभीप्सतेऽतिनिपुणो
     नम्रोऽथ कॢपाञ्जलिः ।
शिष्यो विश्वसितोऽनुचिन्तनपरः
     प्रश्नेऽनुरक्तः शुचिः ।
नित्यं कृष्णजनप्रियो निगदितः
     श्रोता स वै वक्तृभिः ॥ २१ ॥
जो वक्‍त्याला योग्य रीतीने प्रणम करून त्याच्यासमोर बसतो आणि इतर संसारातील गोष्टी सोडून फक्‍त श्रीभगवंतांच्या कथाच ऐकण्याची इच्छा ठेवतो, समजून घेण्यात अत्यंत कुशल असतो, नम्र असतो, हात जोडलेले असतात, शिष्यभावनेने श्रद्धा ठेवून, ऐकले असेल त्याचे सतत चिंतन करीत राहातो, जे समजले नसेल ते विचारतो, पवित्र भावनेने वागतो, तसेच श्रीकृष्णभक्‍तांवर सदैव प्रेम करतो, अशाच श्रोत्याला वक्‍ते लोक उत्तम श्रोता म्हणतात. (२१)


भावगन्मतिरनपेक्षः सुहृदो दीनेषु स्मानुकम्पो यः ।
बहुधा बोधनचतुरो वक्ता सम्मानितो मुनिभिः ॥ २२ ॥
आता वक्‍त्याची लक्षणे सांगतात. ज्याचे मन नेहमी भगवंतांच्या चरणी लागलेले असते, ज्याला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसते, जो सर्वांचा प्रिय सखा आणि दीनांवर दया करणारा असतो, तसेच अनेक उदाहरणे देऊन तत्त्वाचा अर्थ सांगण्यात चतुर असतो, असा वक्‍ता मुनींना सन्माननीय वाटतो. (२२)


अथ भारतभृस्थाने श्रीभागवतसेवने ।
विधिं श्रृणुत भो विप्रा येन स्यात् सुखसन्ततिः ॥ २३ ॥
विप्रगण हो ! भारतवर्षाच्या भूमीवर श्रीमद्‌भागवत कथेचे सेवन करण्याचा जो आवश्यक विधि आहे, तो मी आता सांगतो, ऐका. ज्यामुळे सुख अधिकाधिक वाढते. (२३)


राजसं सत्त्विकं चापि तामसं निर्गुणं तथा ।
चतुर्विधं तु विज्ञेयं श्रीभागवतसेवनम् ॥ २४ ॥
सात्त्विक, राजस, तामस, आणि निर्गुण हे श्रीमद्‌भागवत-सेवनाचे चार प्रकार आहेत. (२४)


सप्ताहं यज्ञवद् यत्तु सश्रमं सत्वरं मुदा ।
सेवितं राजसं तत्तु बहुपूजादिशोभनम् ॥ २५ ॥
एखाद्या यज्ञासारखा निरनिरळ्या प्रकारच्या पूजा-सामग्रीने मोठ उत्सव केला जातो, अतिशय परिश्रमपूर्वक घाईगडबडीत, सात दिवसात आनंदाने पारायण केले जाते, ते राजस म्हटले जाते. (२५)


मासेन ऋतुना वापि श्रवणं स्वादसंयुतम् ।
सात्त्विकं यदनायासं समस्तानन्दवर्धनम् ॥ २६ ॥
कथेच्या रसाचा आस्वाद घेत, अति परिश्रम न घेता, एक किंवा दोन महिनेपर्यंत जेव्हा श्रवण केले जाते, ते पूर्ण आनंद वाढविणारे सात्त्विक सेवन म्हटले जाते. (२६)


तामसं यत्तु वर्षेण सालसं श्रद्धया युतम् ।
विस्मृतिस्मृतिसंयुक्तं सेवनं तच्च सौख्यदम् ॥ २७ ॥
श्रद्धेने आरंभ करून श्रवण थांबते. आठवण झाल्यावर पुन्हा सुरू केले जाते, अशा प्रकारे आळसामुळे जे वर्षभर सेवन केले जाते, ते तामस सेवन होय. हे सुद्धा सुख देणारेच असते. (२७)


वर्षमासदिनानां तु विमुच्य नियमाग्रहम् ।
सर्वदा प्रेमभक्त्यैव सेवनं निर्गुणं मतम् ॥ २८ ॥
जेव्हा वर्ष, महिने आणि दिवस या नियमांचा आग्रह सोडून नेहमीच प्रेम आणि भक्‍तियुक्‍त अंतःकरणाने श्रवण केले जाते, ते सेवन निर्गुण मानले गेले आहे. (२८)


पारीक्षितेऽपि संवादे निर्गुणं तत् प्रकीर्तितम् ।
तत्र सप्तदिनाख्यानं तदायुर्दिनसंखय्या ॥ २९ ॥
परीक्षित आणि शुकदेव यांच्यातील संवादरूपाने सुद्धा जे भागवताचे सेवन झाले होते, तेही निर्गुणच होय. तेथे जी सात दिवसांची मर्यादा आहे, ती राजाच्या उरलेल्या आयुष्याच्या दिवसांच्या संख्येमुळे आहे. सप्ताह कथेचा नियम म्हणून नव्हे. (२९)


अन्यत्र त्रिगुणं चापि निर्गुणं च यथेच्छया
यथा कथञ्चित् कर्तव्यं सेवनं भगवच्छ्रुतेः ॥ ३० ॥
भारतवर्षाव्यतिरिक्‍त इतर ठिकाणी सुद्धा त्रिगुण किंवा निर्गुण कोणत्याही प्रकारे का होईना, श्रीमद्‌भागवताचे सेवन करावे. (३०)


ये श्रीकृष्णविहारैक भजनास्वादलोलुपाः ।
मुक्तावपि निराकाङ्‌क्षाः तेषां भागवतं धनम् ॥ ३१ ॥
फक्‍त श्रीकृष्णांच्या लीलांचेच श्रवण, कीर्तन व रसास्वादनासाठी जे लोक हापापलेले असतात आणि मोक्षाचीसुद्धा अपेक्षा ठेवीत नाहीत, त्यांचे श्रीमद्‌भागवत हेच धन आहे. (३१)


येऽपि संसारसन्तापनिर्विण्णा मोक्षकाङ्‌क्षिणः ।
तेषां भवौषधं चैतत् कलौ सेव्यं प्रयत्‍नतः ॥ ३२ ॥
त्याचप्रमाणे जे संसारातील दुःखांना भिऊन मुक्‍ती मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी सुद्धा हे भवरोगावरील औषध आहे. म्हणून या कलियुगात प्रयत्‍नपूर्वक याचे सेवन केले (३२)


ये चापि विषयारामाः सांसारिकसुखस्पृहाः ।
तेषां तु कर्म मार्गेण या सिद्धिः साधुना कलौ ॥ ३३ ॥
सामर्थ्यधनविज्ञानाभावादत्यन्तदुर्लभा ।
तस्मात्तैरपि संसेव्या श्रीमद्‌भागवती कथा ॥ ३४ ॥
पाहिजे. वरील लोकांखेरीज लोक विषयातच रमणारे आहेत, ज्यांना नेहमी संसारातील सुखेच मिळावीत अशी इच्छा असते, त्यांच्यासाठी सुद्धा, आता या कलियुगात सामर्थ्य, धन आणि वैदिक कर्मांचे ज्ञान नसल्याने, कर्ममार्गानेच मिळणारी सिद्धी भागवतकथेचेच सेवन करावे. (३३-३४)


धनं पुत्रांस्तथा दारान् वाहनादि यशो गृहान् ।
असापत्‍न्यं च राज्यं च दद्यात् भागवती कथा ॥ ३५ ॥
ही भागवताची कथा धन, पुत्र , स्त्री, वाहने, इत्यादी यश, घर आणि निष्कंटक राज्यसुद्धा देऊ शकते. (३५)


इह लोके वरान् भुक्त्वा भोगान् वै मनसेप्सितान् ।
श्रीभागवतसंगेन यात्यन्ते श्रीहरेः पदम् ॥ ३६ ॥
या भागवताचा आश्रय घेणारे लोक या संसारातील मनाजोगते उत्तम भोग भोगून भागवताची संगत धरल्याने शेवटी श्रीहरींचे परमधाम प्राप्त करून घेतात. (३६)


यत्र भागवती वार्ता ये च तच्छ्रवणे रताः ।
तेषां संसेवनं कुर्याद् देहेन च धनेन च ॥ ३७ ॥
जेथे श्रीमद्‌भागवताचे कथा-कथन चालू असते, तसेच जे लोक ही कथा श्रवण करण्यात तत्पर झालेले असतात, त्यांची सेवा शरीराने व धनाने करावी. (३७)


तदनुग्रहतोऽस्यापि श्रीभागवतसेवनम् ।
श्रीकृष्णव्यतिरिक्तं यत्तत् सर्वं धनसंज्ञितम् ॥ ३८ ॥
त्या लोकांच्या कृपेने अशी मदत करणार्‍यांनासुद्धा भागवतसेवनाचे पुण्य प्राप्त होते. श्रीकृष्णांखेरीज ज्या अन्य कशीचीही इच्छा केली जाते, त्या सर्वांना धन अशी संज्ञा आहे. (३८)


कृष्णार्थीति धनार्थीति श्रोता वक्ता द्विधा मतः ।
यथा वक्ता तथा श्रोता तत्र सौख्यं विवर्धते ॥ ३९ ॥
श्रोता वक्‍ता हे सुद्धा दोन प्रकारचे मानले गेले आहेत; एक श्रीकृष्णांची इच्छा करणारे आणि दुसरे धनाची ! जसा वक्‍ता तसाच श्रोता जर असेल, तर त्या ठिकाणी कथेच्या सुखामध्ये वाढ होते. (३९)


उभयोर्वैपरीत्ये तु रसाभासे फलच्युतिः ।
किन्तु कृष्णार्थिनां सिद्धिः विलम्बेनापि जायते ॥ ४० ॥
जर दोघांचे विचार एकमेकांच्या विरुद्ध असतील, तर कथेची गोडी वाढत नाही आणि फळ मिळत नाही. परंतु जर दोघेही श्रीकृष्णप्राप्तीची इच्छा करणारे असतील तर त्यांना उशिरा का होईना, सिद्धी अवश्य प्राप्त होते. (४०)


धनार्थिनस्तु संसिद्धिः विधिसंपूर्णतावशात् ।
कृष्णार्थिनोऽगुणस्यापि प्रेमैव विधिरुत्तमः ॥ ४१ ॥
धनार्थीचे अनुष्ठान व्यवस्थितपणे पार पडले तरच त्याला सिद्धी प्राप्त होते. परंतु श्रीकृष्णांची इच्छा करण्यार्‍याच्या विधीमध्ये काही कमतरता राहिली, तरीसुद्धा जर त्याच्या हृदयात प्रेम असेल तर ते प्रेमच त्याच्यासाठी सर्वोत्तम विधी आहे. (४१)


आसमाप्ति सकामेन कर्त्तव्यो हि विधिः स्वयम् ।
स्नातो नित्यक्रियां कृत्वा प्राश्य पादोदकं हरेः ॥ ४२ ॥
पुस्तकं च गुरुं चैव पूजयित्वोपचारतः ।
ब्रूयाद् वा श्रृणुयाद् वापि श्रीमद्‌भागवतं मुदा ॥ ४३ ॥
सकाम पुरुषाने कथा समाप्त होईपर्यंत स्वतः सर्व विधींचे पालन केले पाहिजे. दररोज प्रातःकाळी स्नान व नित्यकर्म पूर्ण करावे. नंतर भगवंतांचे चरणामृत घेऊन पूजेच्या साहित्याने ग्रंथ आणि गुरू (व्यास) यांचे पूजन करावे. त्यानंतर प्रसन्न मनाने श्रीमद्‌भागवताची कथा सांगावी किंवा ऐकावी. (४२-४३)


पयसा वा हविषेण मौनं भोजमाचरेत् ।
ब्रह्मचर्यमधःसुप्तिं क्रोधलोभादिवर्जनम् ॥ ४४ ॥
दूध किंवा हविष्यान्नाचे भोजन मौन पाळून करावे. दररोज ब्रह्मचर्याचे पालन करून भूमीवर झोपावे. क्रोध आणि लोभ यांचा त्याग करावा. (४४)


कथान्ते कीर्तनं नित्यं समाप्तौ जागरं चरेत् ।
ब्रह्मणान् भोजयित्वा तु दक्षिणाभिः प्रतोषयेत् ॥ ४५ ॥
दररोज कथा संपल्यानंतर कीर्तन करावे आणि कथा समाप्त होईल, त्या दिवशी रात्री जागरण करावे. ब्राह्मणांना भोजन घालून त्यांना दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. (४५)


गुरवे वस्त्रभूषादि दत्त्वा गां च समर्पयेत् ।
एवं कृते विधाने तु लभते वाञ्छितं फलम् ॥ ४६ ॥
दारागारसुतान् राज्यं धनादि च यदीप्सितम् ।
परंतु शोभते नात्र सकामत्वं विडम्बनम् ॥ ४७ ॥
कथेचे वाचन करणार्‍या गुरूला वस्त्र, अलंकार इत्यादी देऊन गाईचेही दान करावे. अशा प्रकारे विधान पूर्ण केल्याने माणसाला स्त्री, घर, पुत्र, राज्य, धन इत्यादी जे जे पाहिजे, ते सर्व मनोवांछित फळ प्राप्त होते. परंतु हा सकामभाव वाईटच. श्रीमद्‌भागवताच्या कथेला तो शोभत नाही. (ही कथा वाचून वा ऐकान श्रीभगवंतांच्या ठिकाणीच प्रेम निर्माण झाले पाहिजे. प्रपंचावर नव्हे.) (४६-४७)


कृष्णप्राप्तिकरं शश्वत् प्रेमानन्दफलप्रदम् ।
श्रीमद्‌भागवतं शास्त्रं कलौ कीरेण भाषितम् ॥ ४८ ॥
इति श्रीस्कान्दे महापुराण् एकशीतिसाहस्र्यां संहितायां द्वितीये वैष्णवखण्डे
श्रीमद् भागवतमाहात्म्ये भागवत श्रोतृवक्तृ लक्षणविधिनिरूपणं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
श्रीशुकदेवांनी सांगितलेले हे श्रीमद्‌भागवत शास्त्र कलियुगामध्ये साक्षात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणारे आणि नित्य प्रेमानंदरूप फळ देणारे आहे. (४८)


स्कान्दे भागवत माहात्म्ये अध्याय चवथा समाप्त

GO TOP