श्रीमद् भागवत पुराण
स्कान्दे भागवतमाहात्म्य
द्वितीयोऽध्यायः

श्रीकृष्णपत्‍नीकालिन्दीसंवादः, कालिन्दी उपदेशेन
श्रीकृष्णसंकीर्तनोत्सवारम्भः, तत्रोद्धवदर्शनं च -

यमुना आणि श्रीकृष्णपत्‍न्यांचा संवाद, किर्तनोत्सवामध्ये उद्धवांचे प्रगट होणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


ऋषयः ऊचुः -
शाण्डिल्ये तौ समादिश्य परावृत्ती स्वमाश्रमम् ।
किं कथं चक्रतुस्तौ तु राजानौ सूत तद् वद ॥ १ ॥
ऋषींनी विचारले - सूत महोदय ! आता आम्हांला हे सांगा की, परीक्षित आणि वज्रनाभ यांना असे सांगून शांडिल्य मुनी आपल्या आश्रमाकडे परत गेले, तेव्ह या दोन्ही राजांनी कोणकोणती कासे कस-कशी केली ? (१)


सूत उवाच -
ततस्तु विष्णुरातेन श्रेणीमुख्याः सहस्रशः ।
इन्द्रप्रस्थान् समानाय्य मथुरास्थानमापिताः ॥ २ ॥
सूत म्हणाले -त्यानंतर परीक्षिताने इंद्रप्रस्थहून हजारो मोठमोठ्या शेठ - सावकारांना बोलावून त्यांना राहाण्यासाठी मथुरेत जागा दिली. (२)


माथुरान् ब्राह्मणान् तत्र वानरांश्च पुरातनान् ।
विज्ञाय माननीयत्वं तेषु स्थापैतवान् स्वराट् ॥ ३ ॥
सम्राट परीक्षिताने त्यांच्याखेरीज मथुरा-मंडलातील ब्राह्मण व प्राचीन वानर आदर करण्यास योग्य आहेत, असे समजून त्यांनाही मथुरा नगरीमध्ये वसविले. (३)


वज्रस्तु तत्सहायेन शाण्डिल्यस्याप्यनुग्रहात् ।
गोविन्दगोपगोपीनां लीलास्थानान्यनुक्रमात् ॥ ४ ॥


विज्ञायाभिधयाऽऽस्थाप्य ग्रामानावासयद् बहून् ।
कुण्डकूपादिपूर्तेन शिवादिस्थापनेन च ॥ ५ ॥
परीक्षिताचे साहाय्य आणि शांडिल्यांच्या कृपेने, वज्रनाभाने सर्व स्थानांचा क्रमाने शोध घेतला, जेथे भगवान श्रीकृष्ण गोप-गोपींसह अनेक प्रकारच्या लीला करीत होते. लीला-ठिकाणांची निश्चिती झाल्यावर त्यांनी त्या त्या ठिकाणच्या लीलांच्याप्रमाणे त्या ठिकाणांना नावे दिली. भगवंतांच्या लीला-विग्रहांची स्थापना केली. त्याचप्रमाणे त्या त्या ठिकाणी अनेक गावे वसविली. ठिकठिकाणी भगवंतांच्या नावांनी तलाव आणि विहिरी खोदल्या. पुष्प-कुंज आणि बगीचे लावले. शंकर इत्यादी देवतांची स्थापना केली. (४-५)


गोविन्दहरिदेवादि स्वरूपारोपणेन च ।
कृष्णाइकभक्तिं स्वे राज्ये ततान च मुमोद ह ॥ ६ ॥
गोविंददेव, हरिदेव इत्यादी नावांनी भगवद-मूर्ती स्थापन केल्या. वज्रनाभाने अशा रीतीने आपल्या राज्यामध्ये सगळीकडे फक्‍त श्रीकृष्णभक्‍तीचाच प्रचार करून तो अतिशय आनंदित झाला. (६)


प्रजास्तु मुदितास्तस्य कृष्णकीर्तनतत्पराः ।
परमानन्दसम्पन्ना राज्यं तस्यैव तुष्टुवुः ॥ ७ ॥
त्याच्या प्रजाजनांनाही अतिशय आनंद झाला होता. भगवंतांच्या संकीर्तनामध्ये संलग्न राहून परमानंदाच्या समुद्रात डुंबत असणारी प्रजा वज्रनाभाच्या राज्याची नेहमीच प्रशंसा करीत असे. (७)


एकदा कृष्णपत्‍न्यस्तु श्रीकृष्णविरहातुराः ।
कालिन्दीं मुदितां वीक्ष्य पप्रच्छुर्गतमत्सराः ॥ ८ ॥
श्रीकृष्णांच्या विरह-वेदनांनी व्याकूळ झालेल्या राण्या एके दिवशी कालिंदीला आनंदित असल्याचे पाहून मत्सर सोडून सरळ भवनेने विचारू लागल्या. (८)


श्रीकृष्णपत्‍न्य ऊचुः -
यथा वयं कृष्णपत्‍न्यस्तथा त्वमपि शोभने ।
वयं विरहदुःखार्तास्त्वं न कालिन्दि तद् वद ॥ ९ ॥
श्रीकृष्णांच्या राण्या म्हणाल्या- कालिंदीताई ! आम्ही जशा श्रीकृष्णांच्या धर्मपत्‍नी आहोत, तशीच तूसुद्धा आहेस. आम्ही तर त्यांच्या विरहाग्नीत होरपळून निघत आहोत. परंतु तू मात्र तशी नाहीस. याचे कारण काय ? कल्याणी ! सांग तर खरे ! (९)


तच्छ्रुत्वा स्मयमाना सा कालिन्दी वाक्यमब्रवीत् ।
सापत्‍न्यं वीक्ष्य तत्तासां करुणापरमानसा ॥ १० ॥
हा प्रश्र ऐकून या आपल्याच सवती आहेत, या विचाराने तिचे मन दयेने द्रवले, म्हणून ती हसून म्हणाली. (१०)


कालिन्दी उवाच -
आत्मारामस्य कृष्णस्य ध्रुवमात्मास्ति राधिका ।
तस्या दास्यप्रभावेण विरहोऽस्मान् न संस्पृशेत् ॥ ११ ॥
कालिन्दी म्हणाली- आत्माराम श्रीकृष्णांची आत्मा आहे श्रीराधा. मी तिचे दास्य करीत असल्यामुळे हा विरह आम्हांला स्पर्श करू शकत नाही. (११)


तस्या एवांशविस्ताराः सर्वाः श्रीकृष्णनायिकाः ।

नित्यसम्भोग एवास्ति तस्याः साम्मुख्ययोगतः ॥ १२ ॥
श्रीकृष्णांच्या सर्व राण्या श्रीराधाराणींच्या अंशाचा विस्तार आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राधा सदैव एकमेकांच्या समोर आहेत. त्यांचा परस्पर नित्य संयोग आहे. म्हणून राधेच्या स्वरूपातच अंशतः विद्यमान असणार्‍या श्रीकृष्णांच्या ज्या अन्य राण्या आहेत, त्यांनासुद्धा भगवंतांचा नित्य सहवास प्राप्त झालेला आहे. (१२)


स एव सा स सैवास्ति वंशी तत्प्रेमरूपिका ।

श्रीकृष्णनखचन्द्रालि सङ्‌घाच्चन्द्रावली स्मृता ॥ १३ ॥
श्रीकृष्णच राधा आहेत आणि राधाच श्रीकृष्ण आहेत. त्या दोघांचे प्रेम हीच बासरी आहे. त्याचप्रमाणे राधाराणींची प्रिय सखी चंद्रावली हीसुद्धा श्रीकृष्णचरणांच्या नखरूपी चंद्रम्याच्या सेवेमध्येच आसक्‍त असल्यामुळे "चंद्रावली" नावाने ओळखली जाते, (१३)


रूपान्तरमगृह्णाना तयोः सेवातिलालसा ।
रुक्मिण्यादिसमावेशो मयात्रैव विलोकितः ॥ १४ ॥
श्रीराधा आणि श्रीकृष्णांच्या सेवेची तिला अतिशय आवड आहे. म्हणून ती दुसरे कोणतेच रूप धारण करीत नाही. याच श्रीराधेमध्ये मी, रुक्मिणी इत्यादींचा समावेश असल्याचे पाहिले आहे. (१४)


युष्माकमपि कृष्णेन विरहो नैव सर्वतः ।
किन्तु एवं न जानीथ तस्माद् व्याकुलतामिताः ॥ १५ ॥
तुम्हा सर्वांचासुद्धा सर्वांशाने श्रीकृष्णांशी वियोग झालेला नाही. परंतु तुम्हांला हे रहस्य माहीत नसल्याने तुम्ही इतक्या व्याकूळ होत आहात. (१५)


एवमेवात्र गोपीनां अक्रूरावसरे पुरा ।


विरहाभास एवासीद् उद्धवेन समाहितः ॥ १६ ॥
पूर्वी अशाच प्रकारे अक्रूरसुद्धा श्रीकृष्णांना नंदगावाहून जेव्हा मथुरेला घेऊन आला होता, त्यावेळी गोपींना श्रीकृष्ण-विरचाहा जो अनुभव आला होता, तोसुद्धा विरहाचा फक्‍त आभास होता. हे रहस्य जोपर्यंत त्यांना माहीत नव्हते, तोपर्यंत त्या अत्यंत दुःखी होत्या. नंतर उद्धवाने येऊन जेव्हा त्यांचे समाधान केले, तेव्हा त्यांना ही गोष्ट समजली, (१६)


तेनैव भवतीनां चेद् भवेदत्र समागमः ।
तर्हि नित्यं स्वकान्तेन विहारमपि पल्स्यथ ॥ १७ ॥
जर तुम्हांलासुद्धा उद्धवाचा सहवास लाभला, तर तुम्ही सुद्धा आपल्या पतीबरोबर नित्य विहार करीत असल्याचे सुख प्राप्त करू शकाल. (१७)


सूत उवाच -
एवमुक्तास्तु ताः पत्‍न्यः प्रसन्नां पुनरब्रुवन् ।
उद्धवालोकनेनात्म प्रेष्ठसङ्‌गमलालसाः ॥ १८ ॥
सूत म्हणतात- असे सांगितल्यावर प्रसन्न असणार्‍या यमुनारणीला श्रीकृष्णपत्‍न्या पुन्हा म्हणाल्या. त्यावेळी त्यांच्या मनात उद्धवाला भेटून त्याच्याकडून प्रियतमाचा नित्य सहवास कसा घडेल, हे जाणून घेण्याची इच्छा होती. (१८)


श्रीकृष्णपत्‍न्य ऊचुः -
धन्यासि सखि कान्तेन यस्या नैवास्ति विच्युतिः ।
यतस्ते स्वार्थसंसिद्धिः तस्या दास्यो बभूविम ॥ १९ ॥
श्रीकृष्णपत्‍न्या म्हणाल्या- हे सखी ! तू धन्य आहेस. कारण तुझा कधीही पतीशी वियोग नाही. जिच्या कृपेने तुझे इच्छित तुला प्राप्त झाले, तिच्या आता आम्हीसुद्धा दासी होऊ. (१९)


परन्तूद्धवलाभे स्याद् अस्मत् सर्वार्थसाधनम् ।
तथा वदस्व कालिन्दि तल्लाभोऽपि यथा भवेत् ॥ २० ॥
परंतु तू म्हणालीस की, उद्धवाशी भेट झाल्यावरच आमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. म्हणून, हे कालिंदी ! त्याची भेट कशी होईल, ते सांग. (२०)


सूत उवाच -
एवमुक्ता तु कालिन्दी प्रत्युवाचाथ तास्तथा ।
स्मरन्ती कृष्णचन्द्रस्य कलाः षोडशरूपिणीः ॥ २१ ॥
सूत म्हणतात- त्यांनी असे विचारले, तेव्हा श्रीकृष्ण-चंद्रांच्या सोळा कलांचे स्मरण करीत कालिंदा सांगू लागली. (२१)


साधनभूमिर्बदरी व्रजता कृष्णेन मंत्रिणे प्रोक्ता ।


तत्रास्ते स तु साक्षात् तद् वयुनं ग्राहयन् लोकान् ॥ २२ ॥
कालिन्दी म्हणाली- भगवान श्रीकृष्ण जेव्हा परमधामाकडे जाण्यास निघाले, तेव्हा ते आपला मंत्री असलेल्या उद्धवाला म्हणाले. ’हे उद्धवा ! साधना करण्याचे ठिकाण म्हणजे बदरिकाश्रम. तू तेथे जा.’ भगवंतांच्या या आज्ञेनुसार सध्या उद्धव प्रत्यक्ष रूपात बदरिकाश्रमामध्ये आहे आणि तेथे जाणार्‍या जिज्ञासूंना, भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानाचा तो प्रत्यक्ष उपदेश करीत असतो. (२२)


फलभूमिर्व्रजब्ःउमिः दत्ता तस्मै पुरैव सरहस्यम् ।

फलमिह तिरोहितं सत्तद् इहेदानीं स उद्धवोऽलक्ष्यः ॥ २३ ॥
साधनेचे फळ देणारी भूमी म्हणजे व्रजभूमी. हे रहस्यसुद्धा भगवंतांनी उद्धवाला सांगून पूर्वीच ही भूमीसुद्धा त्याला दिली. परंतु भगवान येथून अंतर्धान पावल्यानंतर ही फलभूमी अदृश्य रूपात आहे. म्हणून उद्धवही आता येथे दृष्टीस पडत नाही. (२३)


गोवर्द्धनगिरिनिकटे सखीस्थले तद्‍६रजः कामः ।

तत्रत्याङ्‌‍कुरवल्लीरूपेणास्ते स उद्धवो नूनम् ॥ २४ ॥
उद्धवाचे दर्शन होऊ शकेल असे आणखी एक ठिकाण आहे. गोवर्धन पर्वताजवळ भगवंतांच्या लीलासहचारिणी असणार्‍या गोपींचे विहारस्थळ आहे. त्यांची चरणधूळ अंगावर पडावी म्हणुन तेथे अंकुर किंवा वेलींच्या रूपात निश्चितच उद्धव तेथे असणार. (२४)


आत्मोत्सवरूपत्वं हरिणा तस्मै समार्पितं नियतम् ।
तस्मात् तत्र स्थित्वा कुसुमसरःपरिसरे सवज्राभिः ॥ २५ ॥
शिवाय भगवंतांनी त्याला आपले नित्य उत्सवस्वरूप दिले आहे. म्हणून तुम्ही सर्वजणी आता वज्रनाहाबरोबर कुसुम सरोवराजवळ जा. (२५)


वीणावेणुमृदङ्‌गैः कीर्तनकाव्यादिसरससङ्‌गीतैः ।
उत्सव आरब्धव्यो हरिरतलोकान् समानाय्य ॥ २६ ॥
तेथे भगवद्‌भक्तांना एकत्र आणून वीना, बासरी, मृदंग इत्यादी वाद्यांसह भगवंतांचे नाम आणि लीलांचे कीर्तन असलेल्या सरस संगीताने उत्सव सुरू करा. (२६)


तत्रोद्धवावलोको भविता नियतं महोत्सवे वितते ।
यौष्माकीणां अभिमतसिद्धिं सविता स एव सवितानाम् ॥ २७ ॥
जेव्हा अशा प्रकारे तेथे मोठा किर्तनमहोत्सव चालू होईल, तेव्हा निश्चितच तेथे उद्धवाचे दर्शन होईल. तो तुम्हा सर्वांचे मनोरथ अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण करील. (२७)


सूत उवाच -
इति श्रुत्वा प्रसन्नास्ताः कालिन्दीं अभिवन्द्य तत् ।
कथयामासुरागत्य वज्रं प्रति परीक्षितम् ॥ २८ ॥
सूत म्हणतात- हे ऐकून प्रसन्न झालेल्या त्यांनी यमुनादेवीला नमस्कार केला आणि तेथून परत येऊन वज्रनाभ आणि परीक्षित यांना सर्व वृत्तांत सांगितला. (२८)


विष्णुरातस्तु तत् श्रुत्वा प्रसन्नस्तद्युतस्तदा ।
तत्रैवागत्य तत् सर्वं कारयामास सत्वरम् ॥ २९ ॥
ते ऐकल्यावर परीक्षिताला अतिशय आनंद झाला आणि तो त्याचवेळी त्यांना बरोबर घेऊन त्याच ठिकाणी आला व त्याने ताबडतोब सर्व कामांना सुरुवात केली. (२९)


गोवर्द्धनाददूरेण वृन्दारण्ये सखीस्थले ।
प्रवृत्तः कुसुमाम्भोधौ कृष्णसंकीर्तनोत्सवः ॥ ३० ॥
गोवर्धन पर्वताच्याजवळ वृंदावनात कुसुमसरोवरावर जे श्रीकृष्णसख्यांचे विहारस्थळ होते, तेथेच श्रीकृष्णकीर्तनाचा उत्सव सुरू झाला. (३०)


वृषभानुसुताकान्त विहारे कीर्तनश्रिया ।
ाक्षादिव समावृत्ते सर्वेऽनन्यदृशोऽभवन् ॥ ३१ ॥
कीर्तनमहोत्सवाने श्रीराधाकृष्णांची लीलाभूमी जेव्हा साक्षात साकारली, तेव्हा तेथे आलेले सर्व भक्‍तजन एकाग्रचीत्त झाले. (३१)


ततः पश्यत्सु सर्वेषु तृणगुल्मलताचयात् ।
आजगामोद्धवः स्रग्वी श्यामः पीताम्बरावृतः ॥ ३२ ॥

गुञ्जमालाधरो गायन् वल्लवीवल्लभं मुहुः ।
तदागमनतो रेजे भृशं सङ्‌कीर्तनोत्सवः ॥ ३३ ॥

चन्द्रिकागमतो यद्वत् स्फाटिकाट्टालभूमणिः ।
अथ सर्वे सुखाम्भोधौ मग्नाः सर्वं विसस्मरुः ॥ ३४ ॥
तेव्हा सर्वांच्या देखतच, तेथे वाढलेल्या गवत आणि वेलींच्या झुडपांतून प्रगट होऊन उद्धव सर्वांच्या समोर आला. त्याचे शरीर श्यामवर्णाचे होते. त्यावर पीतांबर शोभून दिसत होता. त्याने गळ्यात वनमाळा आणि गुंजांची माळ घातली होती. मुखाने तो सदैव गोपीवल्लभांच्या मधुर लीलांचे गायन करीत होता. उद्धवाच्या येण्याने त्या संकीर्तनाची शोभा अनेक पटींनी वाढली. स्फटिकाने मढलेल्या गच्चीवर चांदणे पडल्यावर जशी शोभा वाढते तशी. त्यावेळी आनंदसमुद्रात डुंबणारे सर्वजण इतर सर्व विसरून गेले. (३२-३४)


क्षणेनागतविज्ञाना दृष्ट्वा श्रीकृष्णरूपिणम् ।
उद्धवं पूजयाञ्चक्रुः प्रतिलब्धमनोरथाः ॥ ३५ ॥
इति श्रीस्कान्दे महापुराण् एकशीतिसाहस्र्यां संहितायां द्वितीये वैष्णवखण्डे श्रीमद् भागवतमाहात्म्ये
गोवर्धनपर्वतसमीपे परीक्षिदादीनां उद्धवदर्शनवर्णनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
थोड्या वेळाने जेव्हा ते शुद्धीवर आले, तेव्हा मनोरथ पूर्ण झाल्याने त्यांनी उद्धवाची पूजा केली. (३५)


स्कान्दे भागवत माहात्म्ये अध्याय दुसरा समाप्त

GO TOP