|
श्रीमद् भागवत पुराण उद्धवगोपीसंवादः; भ्रमरगीतम्; उद्धवस्य मथुरागमनंच - उद्धव व गोपिंचा संवाद आणि भ्रमरगीत - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( मिश्र ) तं वीक्ष्य कृषानुचरं व्रजस्त्रियः प्रलम्बबाहुं नवकञ्जलोचनम् । पीताम्बरं पुष्करमालिनं लसत् मुखारविन्दं मणिमृष्टकुण्डलम् ॥ १ ॥ सुचिस्मिताः कोऽयमपीच्यदर्शनः कुतश्च कस्याच्युतवेषभूषणः । इति स्म सर्वाः परिवव्रुरुत्सुकाः तमुत्तमःश्लोकपदाम्बुजाश्रयम् ॥ २ ॥
( इंद्रवज्रा ) श्रीशुकदेव सांगतात - त्या पाहती उद्धव कृष्णभक्त कृष्णापरी भूषित कंजनेत्र । विशाल बाहू अन पीत वस्त्र माळा तसे कुंडल शोभले ते । मुखारविंदो अतिही प्रसन्न गोपींसि भासे जणु कृष्ण आला ॥ १ ॥ पवित्र हास्ये वदल्या सख्यांना हा सुंदरो कोण नि दूत कोणा । कृष्णापरी धारियतोय वेष गोपी तया घेरुनिया उभ्या तै ॥ २ ॥
शुचिस्मिताः सर्वाः व्रजस्त्रियः - प्रसन्न व हास्ययुक्त अशा सर्व गोपस्त्रिया प्रलंबबाहुं नवकञ्जलोचनं - आजानुबाहू व प्रफुल्लित कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या पीताम्बरं - पिवळे वस्त्र नेसलेल्या पुष्करमालिनं - व गळ्यात कमळाच्या माळा घातलेल्या लसन्मुखारविन्दं - तेजःपुंज कमळाप्रमाणे शोभणारे ज्याचे मुखकमळ आहे अशा मणिमृष्टकुण्डलं - व रत्नांची उज्ज्वलित आहेत कुंडले ज्यांची अशा तं कृष्णानुचरं वीक्ष्य - त्या श्रीकृष्णाच्या सेवकाला पाहून अच्युतवेषभूषणः - श्रीकृष्णाप्रमाणे वेष भूषणे धारण करणारा अपीच्यदर्शनः अयं कः - व सुंदर आहे रूप ज्याचे असा हा कोण कस्य कुतः - कोणाचा व कोठून आला च उत्सुकाः - असे जाणण्याविषयी उत्कंठित झालेल्या उत्तमश्लोकपदाम्बुजाश्रयं - श्रीकृष्णाच्या चरणकमलाचा आश्रय केलेल्या तं परिवव्रुः स्म - त्या उद्धवाच्या सभोवती एकत्र जमल्या ॥१-२॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिले. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. ताज्या कमलदलाप्रमाणे प्रसन्न नेत्र होते. त्याने पीतांबर धारण केला होता. त्याच्या गळ्यात कमळांची माळ व कानांमध्ये रत्नजडित कुंडले झगमगत होती आणि मुखकमल प्रफुल्लित होते. (१)
गोपी आपापसात म्हणू लागल्या, "हा पुरुष अतिशय देखणा आहे. परंतु हा आहे कोण ? कोठून आला ? कोणाचा दूत आहे ? याने श्रीकृष्णांसारखी वेषभूषा धारण केली आहे ?" हे सर्व जाणून घेण्यासाठी गोपी उत्सुक झाल्या आणि पवित्रकीर्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रित असणार्या उद्धवाला चारी बाजूंनी घेरून पवित्र स्मित करीत उभ्या राहिल्या. (२)
तं प्रश्रयेणावनताः सुसत्कृतं
सव्रीडहासेक्षणसूनृतादिभिः । रहस्यपृच्छन् उपविष्टमासने विज्ञाय सन्देशहरं रमापतेः ॥ ३ ॥
हा कृष्णसंदेश पहूचण्याला आला असे हे कळले तयांना । सलज्ज हास्ये बघता तयाला नेवोनि एकांतिच बोलल्या त्या ॥ ३ ॥
प्रश्रयेण अवनताः (ताः) - नम्रतापूर्वक लीन झालेल्या त्या गोपी सव्रीडहासेक्षणसूनृतादिभिः - लज्जायुक्त हास्य, कटाक्ष, मधुर भाषण इत्यादि उपचारांनी सुसत्कृतं आसने उपविष्टं तं - अत्यंत सत्कारलेल्या व आसनावर बसलेल्या त्या उद्धवाला रमापतेः सन्देशहरं विज्ञाय - श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आलेला असे जाणून रहसि अपृच्छन् - एकांतात विचारत्या झाल्या ॥३॥
हा रमारमणांचा संदेश घेऊन आला आहे, असे जेव्हा त्यांना समजले, तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे, लज्जेने स्मित हास्य करीत त्याच्याकडे पाहून मधुर भाषणाने त्याचा चांगला सत्कार केला आणि एकांतात तो आसनावर बसल्यावर त्याला त्यांनी विचारले, (३)
( अनुष्टुप् )
जानीमस्त्वां यदुपतेः पार्षदं समुपागतम् । भर्त्रेह प्रेषितः पित्रोः भवान् प्रियचिकीर्षया ॥ ४ ॥
( अनुष्टुप् ) उद्धवा जाणितो आम्ही कृष्णाचे पार्षदो तुम्ही । निरोप घेउनी आले माता नी पितरास तो ॥ ४ ॥
त्वां यदुपतेः पार्षदं - तू श्रीकृष्णाचा सेवक असून समुपागतं जानीमः - येथे आला आहेस हे आम्ही जाणतो (अस्माकं) भर्त्रा - आमचा स्वामी जो श्रीकृष्ण भवान् पित्रोः - त्याने तुला आईबापांचे प्रियचिकीर्षया - प्रिय करण्यासाठी पाठविले आहे ॥४॥
उद्धवा ! आपण यदुनाथांचे दूत आहात. आपल्या स्वामींनी, त्यांच्या माता-पित्यांना खुशाली कळविण्यासाठी आपल्याला येथे पाठविले आहे, हे आम्हांला कळले. (४)
अन्यथा गोव्रजे तस्य स्मरणीयं न चक्ष्महे ।
स्नेहानुबन्धो बन्धूनां मुनेरपि सुदुस्त्यजः ॥ ५ ॥
अन्यथा नंदगोठ्यात तुमचे काय काम ते । नात्याच्या स्नेहबंधाला ऋषीही तोडु ना शके ॥ ५ ॥
अन्यथा - तसे नसेल तर गोव्रजे तस्य स्मरणीयं - गोकुळात त्याला आठवण होण्यासारखे दुसरे काही न चक्ष्महे - आम्हाला दिसत नाही बन्धूनां स्नेहानुबन्धः - आप्तजनांचा स्नेहसंबंध मुनेः अपि सुदुस्त्यजः - ऋषीलाही टाकण्यास कठीण आहे ॥५॥
नाहीतर, आता या गोकुळात त्यांना आठवण यावी, अशी दुसरी वस्तू आम्हांला दिसत नाही. बांधवांवरचे प्रेम मुनीलासुद्धा सोडणे कठीण असते. (५)
विवरण :- हुबेहुब कृष्णाप्रमाणे वेशभूषा केलेल्या उद्धवास यमुनानदीवरून परत येताना पाहून गोपी त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी संभाषण करू लागल्या. त्या म्हणाल्या, तू निश्चितच कृष्णाचा दूत म्हणून त्याचा संदेश घेऊन आला असणार. कृष्णानेही आपल्या माता-पित्यानाच संदेश दिला असणार; कारण आई-वडिलांचा स्नेहबंध तोडणे ऋषी-मुनींनाही शक्य होत नाही, तर कृष्णासारख्या प्रेमळ पुत्रास कसे शक्य व्हावे ? ऋषी-मुनी सार्या सांसारिक मोहपाशातून मुक्त असतात. ते विरक्त असतात. कोणताहि सांसारिक मोहपाश त्यांना बांधून ठेऊ शकत नाही; पण आई-वडिलांच्या प्रेमात मात्र ते गुंतलेले असतात. इथे माता-पित्यांच्या प्रेमाची तर महती कळतेच; पण कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचेही वैशिष्टय दिसून येते. त्याला आता त्याचे खरे माता-पिता, वसुदेव-देवकी, हे भेटले होते, त्याने शत्रूला जिंकले होते, त्याचे विश्व विशाल झाले होते. परंतु तोपर्यंत ज्या नंद-यशोदेने त्याचे पालन-पोषण करून त्याच्यावर जिवापाड प्रेम केले होते; त्यांना तो विसरला नव्हता. (तो जरी विष्णूचा अंश असला तरी सध्या तो मानवी अवतारात असल्याने सर्व भाव-भावनांनी युक्त होता.) शैशवावस्थेत लहान बालकास आईवडिलांच्या ज्या प्रेमाची, त्यांच्या लाडाकोडाची आवश्यकता असते, त्यांनीच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो, ते ते सर्व त्याला नंद-यशोदेकडून भरभरून मिळाले होते. असे आईवडिल आपल्या विरहाने अतीव दुःखी असणार याची त्यास कल्पना होती. तोही त्यांच्या मायापाशात गुंतला होता, म्हणून त्याने दूताकरवी संदेश दिला हे योग्यच म्हणावयास हवे. (५)
अन्येष्वर्थकृता मैत्री यावदर्थविडम्बनम् ।
पुम्भिः स्त्रीषु कृता यद्वत् सुमनःस्स्विव षट्पदैः ॥ ६ ॥
प्रेमाचे सोंग ते अन्या स्वार्था पायीच होतसे । फुलांसी भृंग नी स्त्रीया साथी पुरुष स्वार्थ तो ॥ ६ ॥
अन्येषु मैत्री अर्थकृता - इतरांवर केलेले प्रेम स्वार्थासाठीच असते यद्वत् पुंभिः स्त्रीषु कृता (मैत्री) - ज्याप्रमाणे पुरुषांनी स्त्रियांवर केलेले प्रेम षट्पदैः सुमनः सु इव च - भ्रमरांनी फुलांवर केलेल्या प्रेमासारखेच यावत् अर्थविडम्बनम् - जोपर्यंत स्वार्थ साधावयाचा आहे (तावत् एव) - तोपर्यंतच होय ॥६॥
मातापित्यांखेरीज इतरांबरोबर प्रेम-संबंधाचे जे सोंग आणले जाते, ते स्वार्थासाठीच असते. जसे भ्रमरांचे फुलांवर प्रेम असते तसेच पुरुषांचे स्त्रियांवरील प्रेम. (६)
निःस्वं त्यजन्ति गणिका अकल्पं नृपतिं प्रजाः ।
अधीतविद्या आचार्यं ऋत्विजो दत्तदक्षिणम् ॥ ७ ॥
निर्धन्या हाकती वेश्या प्रजा न रक्षि त्या नृपा । गुरुशी शिकता शिष्य दक्षिणोत्तर ते द्विज ॥ ७ ॥
गणिकाः निः स्वं - वेश्या दरिद्री पुरुषाला प्रजाः अकल्पं नृपतिं - प्रजा अशक्त राजाला अधीतवेदाः आचार्यं - वेदाध्ययन केलेले शिष्य गुरूला ऋत्विजः दत्तदक्षिणं - ऋत्विज ज्याची दक्षिणा देऊन झाली अशा यजमानाला (त्यजति) - सोडून देतो. ॥७॥
धन संपलेल्या माणसाला गणिका, रक्षण करु न शकणार्या राजाला प्रजा, शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरूला आणि दक्षिणा मिळाली की ऋत्विज यजमानाला सोडून देतात. (७)
खगा वीतफलं वृक्षं भुक्त्वा चातिथयो गृहम् ।
दग्धं मृगास्तथारण्यं जारो भुक्त्वा रतां स्त्रियम् ॥ ८ ॥
बहार संपता पक्षी त्यागिती वृक्ष तो जसा । जेवता अतिथी जैसा न थांबे अन्य त्या घरी ॥ वनास लागता आग पळती पशु पक्षिही । स्त्रियेचे जतरि ते प्रेम जार ना पाहि मागुती ॥ ८ ॥
खगाः वीतफलं वृक्षं - पक्षी फलरहित झाडाला अतिथयः भुक्त्वा गृहं - अतिथि भोजनोत्तर यजमानाच्या गृहाला मृगाः दग्धं अरण्यं - हरिण जळलेल्या अरण्याला त्यजन्ति - टाकतात तथा जारः रतां स्त्रियं - त्याप्रमाणे जार प्रेम करणार्या स्त्रीचा भुक्त्वा (त्यजति) - उपभोग घेतल्यानंतर तिला टाकितो ॥८॥
पक्षी फळे नसलेल्या झाडाला, भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला, पशू जळलेल्या जंगलाला आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातात. (८)
विवरण :- आई-वडिल आणि आप्तेष्टांखेरीज इतरांशी केलेली मैत्री ही केवळ कामापुरतीच असते, असे गोपी म्हणतात. निरनिराळी व्यावहारिक उदाहरणे देऊन त्या हे सिद्धही करतात. किती झाले तरी आम्ही परक्या ! कामापुरते आमच्यावर प्रेमाचे नाटक केले आणि नंतर दिले सोडून, असा बोलण्याचा भाव. मात्र या बोलण्यातून त्यांच्या मनातील जरी कोप-चीड दिसली तरी त्यामागे श्रीकृष्णावरील आत्यंतिक प्रेमच आहे, हे ही समजून येते. कृष्णाने परत यावे, आपल्याबरोबर क्रीडा करावी, हा त्यांच्या मनातील सुप्त हेतू. तो पूर्ण होत नाही, म्हणून कृष्णमय झालेल्या गोपींच्या आत्यंतिक निराशेचा झालेला तो उद्रेक आहे. (६-८)
इति गोप्यो हि गोविन्दे गतवाक्कायमानसाः ।
कृष्णदूते समायाते उद्धवे त्यक्तलौकिकाः ॥ ९ ॥ गायन्त्यः प्रीयकर्माणि रुदन्त्यश्च गतह्रियः । तस्य संस्मृत्य संस्मृत्य यानि कैशोरबाल्ययोः ॥ १० ॥
परीक्षित् मन वाणीने गोपी तल्लीन त्या रुपी । उद्धवा बोलता सर्व न कळे काय त्यां वदो ॥ ९ ॥ आठ-आठवुनी चित्ती किशोर-बाल त्या लिला । गायिल्या लाज सोडोनि रडल्या स्फुंद-स्फुंदुनी ॥ १० ॥
कृष्णदूते उद्धवे व्रजं याते - श्रीकृष्णाचा सेवक उद्धव गोकुळात आला असता इति गोविन्दे - याप्रमाणे श्रीकृष्णाच्या ठिकाणी गतवाक्कायमानसाः - वाणी, शरीर व अंतःकरण आसक्त झाले आहे व त्यामुळे त्यक्तलौकिकाः - लोकव्यवहार सोडून दिलेल्या अशा कैशोर बाल्ययोः यानि (कृतानि) - किशोर अवस्थेत व बाल्यावस्थेत जी केलेली होती तानि तस्य प्रियकर्माणि - ती त्यांची आवडीची कृत्ये संस्मृत्य संस्मृत्य गायन्त्यः - आठवून आठवून गाणार्या गतह्रियः च - आणि लज्जारहित झालेल्या गोप्यः रुदत्यः हि - गोपी खरोखर रुदन करु लागल्या ॥९-१०॥
गोपींचे मन, वाणी आणि शरीर श्रीकृष्णांमध्येच तल्लीन झालेले होते. श्रीकृष्णांचा दूत म्हणून जेव्हा उद्धव व्रजभूमीमध्ये आला तेव्हा त्या लोकव्यवहार विसरल्या आणि श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोर अवस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या होत्या, त्या सर्वांची आठवण कर-करून त्या लीलांचे गायन करु लागल्या. शिवाय संकोच सोडून रडूही लागल्या. (९-१०)
काचिन्मधुकरं दृष्ट्वा ध्यायन्ती कृष्णसङ्गमम् ।
प्रियप्रस्थापितं दूतं कल्पयित्वेदमब्रवीत् ॥ ११ ॥
कृष्ण संगम तो कोणी स्मरता भृंग एक ये । कृष्णाचा दूत त्या मानी, गोपी भृंगास सांगते ॥ ११ ॥
कृष्णसंगमं ध्यायन्ती काचित् - श्रीकृष्णाच्या समागमाचे चिंतन करणारी एक गोपी मधुकरं दृष्ट्वा - भ्रमराला पाहून (तं) प्रियप्रस्थापितं दूतं कल्पयित्वा - तो पतीने पाठविलेला दूत आहे असे मानून इदं अब्रवीत् - असे म्हणाली ॥११॥
एका गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचे स्मरण झाले. त्यावेळी एक भ्रमराला गुणगुणताना पाहून तिल वाटले की, आपली मनधरणी करण्यासाठी प्रियतमाने याला दूत म्हणून पाठविले आहे. ती त्याला म्हणाली. (११)
गोप्युवाच -
( मालिनी ) मधुप कितवबन्धो मा स्पृशङ्घ्रिं सपत्न्याः कुचविलुलितमाला कुङ्कुमश्मश्रुभिर्नः । वहतु मधुपतिस्तन् मानिनीनां प्रसादं यदुसदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमीदृक् ॥ १२ ॥
( मालिनी ) मधुपि कपटि कृष्णो त्याजचा तू सखा की । नच पदि शिवु आम्हा कृष्णमाळा सखीची ॥ हलद उटिहि लागे पीत तो रंग पुच्छीं । नच करि प्रित तू ही एक पुष्पास कोण्या ॥ मधुपति हरि जैसा मानिना नायिका जै । हळदउटि तशीची न्यावि तू त्या हरीला ॥ १२ ॥
कितवबन्धो मधुप - हे कपटी अशा कृष्णाच्या मित्रा भ्रमरा सपत्न्याः कुचविलुलित - माझ्या सवतीच्या स्तनांवर लोळणार्या मालाकुङ्कमश्मश्रुभिः - व केसरांनी युक्त अशा तोंडावरील केसांनी नः अङ्घ्रि मा स्पृश - आमच्या चरणाला स्पर्श करू नकोस मधुपतिः तन्मानिनीनां प्रसादं वहतु - श्रीकृष्ण त्या मानवती स्त्रियांचाच प्रसाद मिळवो यस्य त्वं ईदृक् - ज्याचा तू अशाप्रकारचा दूत आहेस यदुसदसि विडम्ब्यं - जे श्रीकृष्णकृत्य यादवसभेत थट्टेलाच पात्र होत असते. ॥१२॥
गोपी म्हणाली - अरे कपटी प्रियकराच्या सख्या मधुकरा ! तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस. कारण श्रीकृष्णांची जी वनमाला आमच्या सवतीच्या वक्षःस्थळाच्या घर्षणाने चुरगळली गेली, तिच्या वक्षाला लावलेले व माळेला लागलेले पिवळे केशर तुझ्या मिशांनासुद्धा लागले आहे. मधुपती श्रीकृष्ण मथुरेतील मानी नायिकांची मनधरणी करु दे आणि त्यांचा जो केशररूप प्रसाद, ज्याचा यादव सभेत उपहास होणार आहे, तो त्यांच्याजवळ राहू दे ! तो तुझ्याकडून येथे पाठविण्याची काय आवश्यकता आहे ? (१२)
सकृदधरसुधां स्वां मोहिनीं पाययित्वा
सुमनस इव सद्यस्तत्यजेऽस्मान् भवादृक् । परिचरति कथं तत्पादपद्मं नु पद्मा ह्यपि बत हृतचेता ह्युत्तमःश्लोकजल्पैः ॥ १३ ॥
हरिहि तव परी तो कृष्णवर्णीच आहे । कुसुमि बसुनि तू जै जाशि दूरी उडोनी ॥ अधर मधु पिवोनी कृष्ण गेला तसाची । नच मनि कळते की सेविते लक्ष्मि कैसी ॥ १३ ॥
भवादृक् (यः) - तुझ्यासारखाच जो कृष्ण सुमनसः इव - पुष्पांप्रमाणे मोहिनीं स्वां अधरसुधां - मोह पाडणारे आपले अधरामृत अस्मान् सकृत् पाययित्वा - आम्हाला एकदा पाजून सद्यः तत्यजे - तत्काळ सोडून देता झाला पद्मा अपि तु - लक्ष्मीसुद्धा तर तत्पादपद्मं कथं हि परिचरति - त्याच्या चरणकमळाला कशी खरोखर सेविते बत (सा) - खरोखर ती उत्तमश्लोकजल्पैः - पुण्यकीर्ति अशा श्रीकृष्णाच्या गोड शब्दांनी ह्रतचेताः (स्यात्) - मोहित झाले आहे चित्त जिचे अशी असावी ॥१३॥
तू फुलांतील मध एकदा घेऊन उडून जातोस, तसेच तेही फक्त एकदाच आपले मोहक अधरामृत पाजून आम्हांला सोडून निघून गेले. बिचारी लक्ष्मी त्यांच्या चरणकमलांची सेवा कशी करते कोण जाणे ! बहुधा श्रीकृष्णाच्या गोड गोड बोलण्याने तिचेसुद्धा चित्त चोरले गेले असावे. (म्हणूनच तिला त्यांचे खरे रूप कळले नाही.) (१३)
विवरण :- उद्धवाचे भोवती जमलेल्या गोपींपैकी एक गोपी जवळच असलेल्या एक भ्रमरालाच कृष्णाचा दूत समजते आणि त्याला दूषणे देताना म्हणते, 'तुम्ही दोघे एकसारखेच आहात. फुल हुंगून त्यातला मध प्राशन करून तू फुलाचा त्याग करतोस. (वास्तविक फुल काही तुला आपल्याजवळ बोलवीत नाही.) कृष्णानेहि आपल्या अधरामृताची मोहिनी आमच्यावर टाकली. आम्हाला ते अधरामृत फक्त एकदाच प्राशन करविले. ती मोहिनी आजपर्यंत कायम टिकून आहे. त्याने आम्ही अगदी कायमच्या वेडया झालो आणि तो मात्र आम्हास टाकून गेला. अशा कृतघ्न कृष्णाची चरणसेवा लक्ष्मी तरी कशी करते ? सर्व लोक तिचे दास असतात आणि ही याची दासी ! ती आपला आत्मसन्मान विसरली असे दिसते आणि हा काही आपला चंचलपणा सोडत नाही. नैराश्यामुळे कोणाकोणाला दूषणे दिली जातील सांगता येत नाही.' (१३)
किमिह बहु षडङ्घ्रे गायसि त्वं यदूनाम्
अधिपतिमगृहाणां अग्रतो नः पुराणम् । विजयसखसखीनां गीयतां तत्प्रसङ्गः क्षपितकुचरुजस्ते कल्पयन्तीष्टमिष्टाः ॥ १४ ॥
वनज अम्हि असू कां गातसे गीत कृष्णी । मन जर वळवाया गासि तू गीत त्याचे ॥ अनुनय नच चाले गीत ते रे पुराणे । नववधु हरिप्रीया तेथ जा गीत गा हे ॥ १४ ॥
षडङ्घ्रे - हे भ्रमरा त्वं इह - तू तेथे अगृहाणां नः अग्रतः - घरदार नसणार्या आमच्या पुढे पुराणं यदूनां अधिपतिं - पुराणपुरुष अशा यादवाधिपति श्रीकृष्णाचे किं बहु गायसि - काय म्हणून तेच ते गायन करीत आहेस तत्प्रसङ्गः विजयसखसखीनां - त्याचे चरित्र श्रीकृष्णाच्या प्रिय मैत्रिणीच्या अग्रतः गीयतां - समोर गावे क्षपितकुचरुजः - नष्ट केली आहे स्तनांची पीडा ज्यांची अशा (तस्य) ईष्टाः स्त्रियः - त्याच्या प्रिय स्त्रिया ते इष्टं कल्पयन्ति - तुझे इच्छित पुरवितील ॥१४॥
अरे भ्रमरा ! वनात राहणार्या आमच्यासमोर तू यदुपती श्रीकृष्णांचे पुष्कळसे गुण का गात आहेस ? ते आम्हांला काही नवीन नाहीत. ज्यांच्याजवळ सदा विजय असतो, त्या श्रीकृष्णांच्या नव्या सख्यांच्यासमोर जाऊन त्यांचे गुणगान कर. कारण यावेळी त्यांनी त्यांच्या हृदयाची पीडा शमवली असल्याने त्या त्यांना प्रिय आहेत. तू करीत असलेल्या गुणगानावर प्रसन्न होऊन तू मागशील ती वस्तू त्या तुला देतील. (१४)
दिवि भुवि च रसायां काः स्त्रियस्तद्दुरापाः
कपटरुचिरहासभ्रूविजृम्भस्य याः स्युः । चरणरज उपास्ते यस्य भूतिर्वयं का अपि च कृपणपक्षे ह्युत्तमश्लोकशब्दः ॥ १५ ॥
कपटि हरि हसोनी उंचवी भूवई तै । पळत नच हरीशी ये न स्त्री या जगात ॥ चरण रज उपासि लक्ष्मि त्याच्या पदासी । मग अम्हि पुढती त्या कोण ऐशा रुपाने ॥ इथुनि निघुनि जावे सांगणे त्या हरीला । गुण तव जन गाती लाविशी खोट त्याला ॥ १५ ॥
दिवि भुवि च रसायां - स्वर्गात, भूलोकी व पाताळात याः स्त्रियः स्युः - ज्या स्त्रिया असतील ताः काः कपटरुचिरहास - त्यापैकी कोणत्या कपटाने सुंदर हास्य करून भ्रूविसृजृम्भस्य - वाकड्या भिवयांनी कटाक्ष फेकणार्या कृष्णाला तत् दुरापाः - दुर्मिळ झाल्या आहेत यस्य चरणरजः भूतिः उपास्ते - ज्याच्या चरणधूळीचे लक्ष्मी सेवन करीते तत्र वयं काः - तेथे आमची कथा काय अपि च कृपणपक्षे हि - पण खरोखर जो दीनांचा पक्ष स्वीकारतो त्याला उत्तम श्लोकशब्दः - पुण्यश्लोक ही पदवी जुळते ॥१५॥
हे भ्रमरा ! त्यांचे कपटपूर्ण मनोहर हास्य आणि भुवयांच्या इशार्याने त्यांना वश होणार नाहीत, अशा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पाताळात कोणत्या स्त्रिया आहेत ? स्वतः लक्ष्मीसुद्धा ज्यांच्या चरणरजांची सेवा करीत असते, तिच्यापुढे आमची काय योग्यता ? परंतु तू त्यांना सांग की, तुमचे नाव ’उत्तमश्लोक’ आहे, ते दीनांवर दया करण्यामुळे. त्याला मात्र बट्टा लागेल. (१५)
विसृज शिरसि पादं वेद्म्यहं चातुकारैः
अनुनयविदुषस्तेऽभ्येत्य दौत्यैर्मुकुन्दात् । स्वकृत इह विषृष्टापत्यपत्यन्यलोका व्यसृजदकृतचेताः किं नु सन्धेयमस्मिन् ॥ १६ ॥
निपुण अनुनयीं तू ना पदासी शिवू तू । मनि मम गमते की याचण्यासी क्षमा ही ॥ हरि तुज वदला ती ना चले येथे मात्रा । हरिसिच वद तू की ना तुझा तो भरोसा ॥ १६ ॥
शिरसि (कृतं) पादं विसृज - मस्तकावरील पाय काढ अहं - मी मुकुन्दात् अभ्येत्य - श्रीक्रुष्णाजवळ येऊन दौत्यैः चाटुकारैः - दूतांच्या गोड गोड भाषणांनी अनुनयविदुषः ते - प्रार्थना करण्याच्या कामी निष्णात अशा तुला वेद्मि - जाणते अकृतचेताः यः - चंचल मनाचा जो स्वकृते इह - ज्यासाठी ह्या लोकी विसृष्टापत्यपत्यन्यलोका - मुले, पति व परलोक ह्यांना सोडणार्या (नः) व्यसृजत् - आम्हाला सोडिता झाला अस्मिन् किं नु संधेयं - ह्यावर कसे बरे प्रेम करावे ॥१६॥
अरे मधुकरा ! तू माझ्या पायावर डोके टेकवू नकोस. तू मनधरणी करण्यात पटाईत आहेस, हे मी जाणते. दूताने काय केले पाहिजे, हे तू श्रीकृष्णांच्याचकडून शिकून आला आहेस, हे मला माहीत आहे. परंतु ज्यांनी त्यांच्यासाठीच आपल्या पती, पुत्र आणि अन्य नातेवाईकांना सोडले, त्या आम्हांला ते कृतघ्नपणे सोडून निघून गेले. अशा व्यक्तीशी आम्ही कशी तडजोड करावी ? (१६)
मृगयुरिव कपीन्द्रं विव्यधे लुब्धधर्मा
स्त्रियमकृत विरूपां स्त्रीजितः कामयानाम् । बलिमपि बलिमत्त्वावेष्टयद् ध्वाङ्क्षवद् यः तदलमसितसख्यैर्दुस्त्यजस्तत्कथार्थः ॥ १७ ॥
अति हरि अपराधी राम रूपात तेणे । कपिबलि वधियेला जंगली त्या लपोनी ॥ वधियलि विरुपाही काम घेवोनि येता । वरुणकरि धरी हा दानदात्या बळीला ॥ १७ ॥
अलुब्धधर्मा यः मृगयुः इव - ज्याविषयी लोभ नाही असा जो पारध्याप्रमाणे कपीन्द्र विव्यधे - वानराधिपति वालीला मारता झाला स्त्रीजितः कामयानां स्त्रियं - स्त्रीलंपट होऊन कामातुर अशा स्त्रिला विरूपां अकृत - विरूप करिता झाला बलिम् अपि - बलिराजालाही ध्वाङ्क्षवत् बलिं अत्वा - कावळ्याप्रमाणे बळी भक्षून अवेष्टयत् - बांधून टाकिता झाला तत् असितसख्यै अलं - म्हणून तशा त्या कृष्णाची मैत्री पुरे झाली तत्कथार्थः - मात्र त्याच्या कथांचा विषय आम्हाला दुस्त्यजः - टाकता येणे कठीण आहे ॥१७॥
अरे मधुकरा ! त्यांचा जेव्हा रामावतार होता, तेव्हा त्यानी कपिराज बालीला व्याधाप्रमाणे लपून मारले. शूर्पणखा त्यांची कामना करीत होती, परंतु त्यांनी पत्नीप्रेमामुळे त्या बिचार्या स्त्रीचे कान-नाक कापून तिला कुरूप केले. कावळा जसा बळी घालणार्याचा बळी खाऊन पुन्हा त्यालाच त्रास देतो, त्याप्रमाणे बलीकडून वामनरूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच वरूणपाशाने बांधून पाताळात ढकलले. म्हणून या काळ्याशी आता मैत्री पुरे झाली. परंतु काय करणार ? आमची इच्छा नसली तरी आम्ही त्यांच्या विषयीच्या गोष्टी टाळू तर शकत नाही ना ! (१७)
विवरण :- अतिप्रेमाने निर्माण झालेला राग तर फारच विचित्र. तो काय काय विधाने करेल, सांगता येत नाही. आता या गोपी कृष्णाच्या प्रत्येक अवतारातील कृतीत दोषच पहातात. रामावतारात त्याने वालीला विनाकारणच मारले; अगदी क्रूर पारधी श्वापदाची शिकार करतो, त्याप्रमाणे. पारधी पशूला का मारतात ? मांस भक्षणासाठी, पण हा मात्र जातीचाच क्रूर. म्हणून त्याने वालीला मारले, कारण नसताना एखाद्या स्त्रीचे नाक-कान कापून तिला विद्रूप करणे तेही ती स्त्री कामातुर झाली असता, हे किती बरे निंद्य, पण केवळ आपल्या पत्नीसाठी (सीतेसाठी) याने शूर्पणखेचे नाक-कान कापले. कहर म्हणजे बळीराजाकडून बटु होऊन सर्व दान पदरात पाडून घेतले, आणि त्यालाच पाताळात ढकलून दिले, कावळ्याप्रमाणे. इथे 'कावळा' हा शब्द महत्वाचा. कारण तो ज्या थाळीत अन्न खातो, त्यालाच टोच्या मारतो. कावळयात अन याच्यात फरकच काय ? दोघेही अंतर्बाह्य काळेच अन कृतघ्न. नको या काळ्यांची मैत्री. (गंमत म्हणजे कृष्णाचा हाच सावळा रंग गोपींना प्रिय होता.) मग त्याच्याबद्दल जर इतका राग, तर त्याच्या दर्शनाची ओढ का ? इतका ध्यास का ? हा प्रश्नहि साहजिकच निर्माण होईल. त्याला गोपींचे उत्तर, 'दुस्त्यज स्तत्कथार्थः।' जो, ज्याचे चरित्र मनात, हृदयात भरले आहे, त्याला आम्ही दूर नाही ठेऊ शकत ! आम्ही त्याच्या कथेत, प्रेमात लाचार झालेल्या आहोत, असहाय्य आहोत. (१७)
यदनुचरितलीलाकर्णपीयूषविप्रुट्
सकृददनविधूतद्वन्द्वधर्मा विनष्टाः । सपदि गृहकुटुम्बं दीनमुत्सृज्य दीना बहव इह विहङ्गा भिक्षुचर्यां चरन्ति त त ॥ १८ ॥
कण जरि कुणि घेतो कीर्ति कानात त्याची । नच मग भय त्यासी द्वंद्वही ते तुटे की ॥ भरति उदर ते की पक्षियांच्या समान । मधु अति रस त्याचा नाद ना तो सुटे की ॥ १८ ॥
यदनुचरितलीला - ज्या कृष्णाच्या चरित्रलीलारूपी कर्णपीयुषविप्रुट्सकृददन - अमृताचे बिंदु कर्णद्वारा एकदा प्राशन केल्यामुळे विधूतद्वन्द्वधर्माः - ज्यांचे रागद्वेषादि धर्म पार नाहीसे झाले आहेत असे विनष्टाः - हताश झालेले बहवः दीनाः विहंगाः - पुष्कळ दीन पक्षी इह सपदि - ह्या गोकुळात तत्काळ दीनं गृहकुटुम्बं उत्सृज्य - दीन अशा घरातील परिवाराला सोडून भिक्षुचर्यां चरन्ति - भिक्षा मागत फिरतात ॥१८॥
श्रीकृष्णांच्या लीलारूप कर्णामृताच्या एका थेंबाचेही जे फक्त एकदाच प्राशन करतात, त्यांची राग-द्वेषादी सगळी द्वंद्वे समूळ नाहीशी होऊन ते असून नसल्यासारखेच होतात. एवढेच काय, पण पुष्कळसे लोक आपला दुःखमय प्रपंच तत्काळ सोडून अकिंचन होतात आणि सारासार विवेक करणार्या हंसाप्रमाणे परमहंसाचे जीवन जगतात. (आमचीही अवस्था अशीच झाली आहे.) (१८)
विवरण :- या श्लोकात स्तुतिगर्भ निंदा दिसून येते. गोपी तर त्याच्या कथाश्रवणात आकंठ बुडाल्या आहेतच, चरित्रकथामृताने तृप्त झाल्या आहेत. मात्र जे याच्या चरित्रामृताच्या एखाद्या बिंदूचेहि प्राशन करून मुक्त झाले आहेत त्यांना चिदानंदाची प्राप्ती झाली आहे. श्रीकृष्णकथेचा हा महिमा. गोपींना ती कथा वेड लावेल यात काय नवल ? (१८)
वयमृतमिव जिह्मव्याहृतं श्रद्दधानाः
कुलिकरुतमिवाज्ञाः कृष्णवध्वो हरिण्यः । ददृशुरसकृदेतत् तन्नखस्पर्शतीव्र स्मररुज उपमन्त्रिन् भण्यतामन्यवार्ता ॥ १९ ॥
सुमधुर गति गाता गुंतते ती मृगी जै । गति स्तशि मम झाली बोलता गोष्टि गोड ॥ नझ जरि हरि टोची कामव्याधी गमे ती । नच वदु मुळि त्याते बोल ते शब्द अन्य ॥ १९ ॥
हरिण्यः कुलिकरुतम् इव - हरिणी जशा व्याधाचे गाणे ऐकून त्याप्रमाणे वयम् - आम्ही अज्ञाः कृष्णवध्वः - अडाणी अशा कृष्णाच्या दासी जिह्मव्याह्रतम् ऋतम् - लबाड कृष्णाच्या भाषणावर खर्याप्रमाणे श्रद्दधानाः - श्रद्धा ठेवणार्या तन्नखस्पर्श - त्या कृष्णाच्या नखाच्या स्पर्शामुळे तीव्रस्मररुजः - उत्पन्न झालेला जो तीव्र कामविकार त्याचे दुःख एतत् असकृत् ददृशुः - सांप्रत एकसारखे पहात आहो उपमंत्रिन् - हे दूता अन्यवार्ता भण्यताम् - दुसरे काही वर्तमान सांगावे ॥१९॥
जशा काळविटाच्या भोळ्या माद्या हरिणी, कपटी व्याधाच्या मधुर गाण्यांवर विश्वास ठेवल्यामुळे त्याच्या बाणांनी विद्ध होतात, त्याचप्रमाणे आम्ही श्रीकृष्णांच्या प्रेयसी गोपीसुद्धा त्या कपटी कृष्णांचे गोड गोड कपटी बोलणे खरे समजलो आणि त्याच्या नखस्पर्शाने उत्पन्न झालेल्या तीव्र प्रेमव्याधीचा वारंवार अनुभव घेत राहिलो. म्हणून हे उपमंत्र्या ! आता तू त्यांच्याशिवाय दुसरे काहीही सांग. (१९)
प्रियसख पुनरागाः प्रेयसा प्रेषितः किं
वरय किमनुरुन्धे माननीयोऽसि मेऽङ्ग । नयसि कथमिहास्मान् दुस्त्यजद्वन्द्वपार्श्वं सततमुरसि सौम्य श्रीर्वधूः साकमास्ते ॥ २० ॥
प्रियतम हरिमित्रा जाउनी ये पुन्हा तू । मग अम्हि समजू की कृष्ण तो धाडि तू ते ॥ परि पदि रिघतो तो ना निघे तो फिरोनी । अम्हि जर पदि जातो साहि ना ती रमा की ॥ २० ॥
प्रियसख - हे प्रियकराच्या मित्रा प्रेयसा प्रेषितः - प्रिय श्रीकृष्णाने पाठविलेला तू पुनः आगाः किं - पुनः आलास काय अङ्ग - हे भ्रमरा मे माननीयः असि - तू मला पूज्य वाटतोस किं अनुरुन्धे - तुला काय मागावयाचे आहे वरय - माग सौम्य - हे शांतचित्ता भ्रमरा इह अस्मान् - तू आम्हाला दुस्त्यजद्वन्द्वपार्श्वं - ज्यांचा संबंध तोडण्यास कठीण आहे अशा श्रीकृष्णाजवळ कथं नयसि - कशाला नेतोस (यस्य) उरसि - ज्या श्रीकृष्णाच्या वक्षस्थलावार वधूः श्री - त्याची स्त्री लक्ष्मी साकं सततं आस्ते - नित्य चिकटून राहिली आहे ॥२०॥
! हे प्रियतमाच्या सख्या ! तू त्यांच्याकडे जाऊन परत आलास वाटते. आमची मनधरणी करण्यासाठीच आमच्या प्रियतमाने तुला पुन्हा पाठिवले काय ? प्रिय भ्रमरा ! तू आम्हांला आदरणीयच आहेस, म्हणून तुला जे पाहिजे ते माग. अरे ! ज्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर परत येणे अतिशय कठीण, अशा आम्हांला येथून तेथे नेऊन काय करणार आहेस ? बाबा रे ! त्यांच्याजवळ, त्यांच्या वक्षःस्थळावर त्यांची प्रिय पत्नी लक्ष्मी नेहमी राहात असते ना ? (२०)
अपि बत मधुपुर्यामार्यपुत्रोऽधुनाऽऽस्ते
स्मरति स पितृगेहान्सौम्य बन्धूंश्च गोपान् । क्वचिदपि स कथा नः किङ्करीणां गृणीते भुजमगुरुसुगन्धं मूर्ध्न्यधास्यत्कदा नु ॥ २१ ॥
मधुपरि हरि कैसा मोदितो हा न तैसा । गुरुकुल त्यजुनीया पातला तो कधी की ॥ कधि तरि स्मरतो का नंद गोपादि आम्हा । वद वद मज भृंगा ठेवि का डोइ हात ॥ २१ ॥
बत सौम्य - बरे तर हे भ्रमरा आर्यपुत्रः मधुपुर्यां - श्रीकृष्ण मधुपुरीत अधुना आस्ते अपि - हल्ली आहे काय ? सः पितृगेहान् बन्धून् - तो पित्याच्या घराची, बांधवांची गोपान् च स्मरति - व गोपांची आठवण करतो काय ? सः क्वचित् किंकरीणां नः - तो आम्हा दासींच्याविषयी कथाः गृणीते अपि - काही गोष्टी करितो काय (सः) अगुरुसुगंधं - तो धूपादि सुगंधी पदार्थांप्रमाणे भुजं मूर्ध्नि - सुवासिक असा आपला हात आमच्या मस्तकांवर कदा नु अधास्यत् - केव्हा बरे ठेवील ? ॥२१॥
हे मधुकरा ! आम्हांला हे सांग की, आर्यपुत्र सध्या मथुरेत आहेत ना ? आई-बाबा, नातलग आणि गोपाळांची कधी त्यांना आठवण येते का ? आणि आम्हा दासींविषयी ते कधी काही सांगतात काय ? आणि अगुरूसारखे सुगंधी करकमल ते कधी आमच्या मस्तकावर ठेवतील काय ? (२१)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) अथोद्धवो निशम्यैवं कृष्णदर्शनलालसाः । सान्त्वयन् प्रियसन्देशैः गोपीरिदमभाषत ॥ २२ ॥
उद्धव म्हणाला - अनुष्टुप् परीक्षित् गोपि अस्वस्थ कृष्णाच्या दर्शनार्थ की । ऐकता उद्धवे त्यांचे केले सांत्वन ते बहू ॥ २२ ॥
अथ उद्धवः - नंतर उद्धव एवं निशम्य - याप्रमाणे ऐकून कृष्णदर्शनलालसाः गोपीः - कृष्णाला पहाण्याविषयी उत्कंठित झालेल्या गोपींना प्रियसंदेशैः सांत्वयन् - श्रीकृष्णाचे निरोप सांगून शांत करीत इदं अभाषत - हे म्हणाला. ॥२२॥
श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्णांच्या दर्शनाला लालचावलेल्या गोपींचे हे म्हणणे ऐकून उद्धवाने त्यांना त्यांच्या प्रियतमाचा संदेश सांगून, त्यांचे सांत्वन करीत म्हटले. (२२)
श्रीउद्धव उवाच -
अहो यूयं स्म पूर्णार्था भवत्यो लोकपूजिताः । वासुदेवे भगवति यासामित्यर्पितं मनः ॥ २३ ॥
गोपिंनो आज मी धन्य पूजनीय तुम्ही जगा । तुम्ही तो कृष्णदेवाला प्राण सर्वस्व अर्पिले ॥ २३ ॥
अहो यूयं पूर्णार्थाः स्म - गोपींनो, तुम्ही कृतार्थ आहा यासां मनः - ज्याचे मन भगवति वासुदेवे - भगवान वासुदेवाच्या ठिकाणी इति अर्पितं - अशा रीतीने लागून राहिले आहे भवत्यः लोकपूजिताः - तुम्ही लोकमान्य झालेल्या आहा. ॥२३॥
उद्धव म्हणाला - गोपींनो ! तुम्ही कृतकृत्य आहात. सार्या जगाला तुम्ही पूजनीय आहात; कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे आपले मन समर्पित केले आहे. (२३)
दानव्रततपोहोम जपस्वाध्यायसंयमैः ।
श्रेयोभिर्विविधैश्चान्यैः कृष्णे भक्तिर्हि साध्यते ॥ २४ ॥
दान व्रत तपो यज्ञ जप ध्यान समाधिही । कल्याणकारि त्या कर्मे प्रयत्न भक्तिचा असे ॥ २४ ॥
हि - कारण विविधैः दानव्रततपो - अनेक प्रकारचे दान, व्रत, तप, होमजपस्वाध्यायसंयमैः - होम, जप, वेदाध्ययन व इंद्रियनिग्रह यांनी च अन्यैः श्रेयोभिः - आणि पुण्यकारक दुसर्या कृत्यांनी कृष्णे भक्तिः साध्यते - कृष्णाच्या ठिकाणी भक्ति उत्पन्न होते. ॥२४॥
दान, व्रत, तप, होम, जप, वेदाध्ययन, ध्यान, धारणा, समाधी आणि कल्याणाच्या विविध उपायांच्याद्वारा भगवंतांचीभक्ती प्राप्त व्हावी, एवढाच उद्देश असतो. (२४)
भगवत्युत्तमश्लोके भवतीभिरनुत्तमा ।
भक्तिः प्रवर्तिता दिष्ट्या मुनीनामपि दुर्लभा ॥ २५ ॥
भाग्याची गोष्ट ही श्रेष्ठ कृष्णाची प्रेमभक्ती ती । साधुनी दाविला मार्ग न गावे ऋषिसीहि जो ॥ २५ ॥
भवतीभिः - तुम्ही उत्तमश्लोके भगवति - श्रेष्ठ कीर्ति अशा भगवंताचे ठिकाणी मुनीनाम् अपिदुर्लभा - ऋषींनासुद्धा दुर्लभ अशी अनुत्तमा भक्तिः प्रवार्तिता - श्रेष्ठ भक्ति स्थापित केली (एतत्) दिष्टया - ही मोठया सुदैवाची गोष्ट होय. ॥२५॥
तुमची पवित्रकीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मुनींनासुद्धा दुर्लभ अशी सर्वोत्तम भक्ती आहे आणि तिचा आदर्श तुम्ही लोकांपुढे ठेवला आहे, ही मोठी भाग्याचीच गोष्ट आहे. (२५)
दिष्ट्या पुत्रान् पतीन् देहान् स्वजनान् भवनानि च ।
हित्वावृनीत यूयं यत् कृष्णाख्यं पुरुषं परम् ॥ २६ ॥
खरेच भागय हे आहे पति पुत्र नि देह हा । स्वजनो घर सोडोनी कृष्ण तो वरिला पती ॥ २६ ॥
यूयं - तुम्ही पुत्रान् पतीन् देहान् - पुत्र, पति, देह, स्वजनान् भवनानि च हित्वा - आप्त आणि घरदार ह्यांना टाकून कृष्णाख्यं - श्रीकृष्ण नावाच्या परं पुरुषं यत् अवृणीत - श्रेष्ठ पुरुषाला ज्याअर्थी वरित्या झाल्यात तत् दिष्टया - त्याअर्थी तुम्ही दैववान आहात. ॥२६॥
ही किती भाग्याची गोष्ट आहे की, तुम्ही पुत्र, पती, शरीर, स्वजन आणि घरे सोडून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना वरले आहे. (२६)
सर्वात्मभावोऽधिकृतो भवतीनामधोक्षजे ।
विरहेण महाभागा महान्मेऽनुग्रहः कृतः ॥ २७ ॥
गोपिंनो विरहा मध्ये ईंद्रियातीत भाव तो । साधिला, सर्व वस्तूत पाहता कृष्णरूप ते । तो भाव मजला झाला दया ती तुमची असे ॥ २७ ॥
महाभागाः - अहो भाग्यवंत गोपींनो भवतीनां - तुमचा भगवति अधोक्षजे - भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी विरहेण सर्वात्मभावः अधिकृतः - विरहामुळे अखंड भाव जडला आहे (तेन) मे महान् अनुग्रहः कृतः - त्यामुळे माझ्यावर मोठा अनुग्रहच झाला आहे.॥२७॥
हे भाग्यशाली गोपींनो ! श्रीकृष्णांच्या वियोगात तुमची त्यांच्या ठिकाणी जी एकान्तभक्ती जडली, तिचे दर्शन मला झाले, ही माझ्यावर तुमची मोठी कृपाच होय. (२७)
श्रूयतां प्रियसन्देशो भवतीनां सुखावहः ।
यमादायागतो भद्रा अहं भर्तू रहस्करः ॥ २८ ॥
गुप्तसंदेश स्वामीचा देण्या मी पातलो इथे । कृष्णसंदेश तो ऐसा सांगतो ऐकणे तुम्ही ॥ २८ ॥
भद्राः - गोपींनो भवतीनां सुखावहः प्रियसन्देशः श्रूयतां - तुम्हाला सुख देणारा प्रियकराचा निरोप ऐका भर्तुः रहस्करः अहं - तुमच्या प्रिय स्वामीचा एकांतभक्त मी यं आदाय आगतः - जो निरोप घेऊन आलो आहे. ॥२८॥
मी स्वामींचे गुप्त काम करणारा दूत आहे. देवींनो ! प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हांला आनंद देण्यासाठी एक संदेश पाठिवला आहे. तोच घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे, तो ऐका ! (२८)
श्रीभगवानुवाच -
भवतीनां वियोगो मे न हि सर्वात्मना क्वचित् । यथा भूतानि भूतेषु खं वाय्वग्निर्जलं मही । तथाहं च मनःप्राण भूतेन्द्रियगुणाश्रयः ॥ २९ ॥
भगवान् श्रीकृष्णाने सांगितले की - सर्वात राहतो मी नी आत्मा सर्वात मी असे । वियोग न सहे तेणे, सर्व वस्तूत मी वसे । माझ्यात सर्व त्या वस्तू त्या रूपे सत्य मी दिसे ॥ २९ ॥
भवतीनां मे वियोगः - तुमचा माझ्याशी वियोग सर्वात्मना क्वचित् नहि - मी सर्वत्र आत्मरूपाने रहात असल्यामुळे कधीच होत नाही यथा भूतेषु खं वाय्वग्निः जलं मही - ज्याप्रमाणे भूतांमध्ये आकाश, वायु, अग्नि, उदक व पृथ्वी (एतानि) भूतानि - ही भूते तथा च अहं - तसाच मी मनः प्राणभूतेन्द्रियः - मन, प्राण, भूते, इंद्रिये, गुणाश्रयः - व सत्त्वादि गुण ह्यांना व्यापून राहिलो आहे. ॥२९॥
श्रीकृष्णांनी सांगितले आहे- तुमचा माझ्याशी पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकत नाही. सर्व भौतिक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते व्यापून आहेत, त्याचप्रमाणे मी मन, प्राण, पंचमहाभूते, इंद्रिये आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहे. (२९)
आत्मन्येवात्मनात्मानं सृजे हन्म्यनुपालये ।
आत्ममायानुभावेन भूतेन्द्रियगुणात्मना ॥ ३० ॥
इंद्रीय विषया भूता आश्रयो मीचि तो असे । रचितो रूप मी माझे पोषितो लीन होतसे ॥ ३० ॥
आत्ममायानुभावेन - स्वतःच्या मायेच्या सामर्थ्याने भूतेन्द्रियगुणात्मना आत्मना - भूते, इंद्रिये व सत्त्वादि गुण ह्यांचा अंगीकार करून स्वतः आत्मनि एव आत्मानं सृजे - मी स्वतःच्या ठिकाणी स्वतःला उत्पन्न करितो अनुपालये हन्मि च - रक्षण करितो व संहार करितो. ॥३०॥
मीच आपल्या मायेच्या द्वारे पंचमहाभूते, इंद्रिये आणित्यांच्या विषयांच्या रूपाने स्वतःमध्ये स्वतःलाच उत्पन्न करतो, पाळतो आणि विलीन करतो. (३०)
विवरण :- कृष्णाचे वर्तमान जाणून घेण्यास, त्याचे दर्शन घेण्यास गोपी उत्सुक होत्याच, मग निदान त्याचा संदेश तरी ऐकवून त्यांचे कान तृप्त करू या, या भावनेने उद्धव संदेश सांगावयास प्रारंभ करतो, त्यामध्ये कृष्ण म्हणतो, 'माझा तुमच्याशी कधीच वियोग झाला नाही. ज्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात वायु, अग्नी, जल इ. पंचमहाभूतांचा वास असतो, तसा मीही मन, प्राण, बुद्धी इ. मध्ये अस्तित्वात आहे. सर्व जगात कारणरूपाने सामावलेला आहे. मी माझ्यामधूनच देहादींची, सृष्टीची निर्मिती करतो, पालन आणि संहारहि करतो. (२९-३०)
आत्मा ज्ञानमयः शुद्धो व्यतिरिक्तोऽगुणान्वयः ।
सुषुप्तिस्वप्नजाग्रद्भिः मायावृत्तिभिरीयते ॥ ३१ ॥
आत्मा माया नि ते कर्म वेगळे शुद्ध सर्वथा । गुणांचा स्पर्श ना त्यांना माया त्रीरुपिणी गुणी ॥ ३१ ॥
ज्ञानमयः शुद्धः व्यतिरिक्तः - ज्ञानमूर्ति, शुद्ध, निर्विकार अगुणान्वयः आत्मा - व निर्गुण असा आत्मा मायावृत्तिभिः - मायेच्या सत्त्वादि गुणांच्या कार्यांनी सुषुप्तिस्वप्नजाग्रद्भिः - व निद्रा, स्वप्न, जागृति या तीन अवस्थांनी ईयते - प्रत्ययास येतो. ॥३१॥
मायेपासून वेगळा असलेला आत्मा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्रिगुणांशी त्याचा संबंध नाही. तथापि सुषुप्ती, स्वप्न व जागृती या मायेच्या तीन वृत्तींमुळे तो प्रत्ययाला येतो. (३१)
येनेन्द्रियार्थान् ध्यायेत मृषा स्वप्नवदुत्थितः ।
तन्निरुन्ध्यादिन्द्रियाणि विनिद्रः प्रत्यपद्यत ॥ ३२ ॥
इंद्रीय विषयो सारे स्वप्नवत् मानणे जिवे । रोधावे विषयी चित्त साक्षात्कारे मला पहा ॥ ३२ ॥
उत्थितः (पुमान्) - निजून उठलेला पुरुष येन मृषा स्वप्नवत् - ज्याअर्थी खोटया स्वप्नाप्रमाणे इन्द्रियार्थान् ध्यायेत - इंद्रियाच्या विषयाचे ध्यान करितो इन्द्रियाणि (च) प्रत्यपद्यत - इंद्रियांकडे धाव घेतो तत् विनिद्रः - त्याअर्थी आळस सोडून (तानि) निरुन्ध्यात् - त्या इंद्रियांचा निग्रह करावा. ॥३२॥
जागा झालेला मनुष्य स्वप्नात दिसलेले पदार्थ ज्या मनाने खोटे आहेत, हे जाणतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष दिसणारे पदार्थही खोटे आहेत, असा त्याच मनाने निश्चय करून निरलसपणे इंद्रियांना विषयांपासून आवरावे. (३२)
एतदन्तः समाम्नायो योगः साङ्ख्यं मनीषिणाम् ।
त्यागस्तपो दमः सत्यं समुद्रान्ता इवापगाः ॥ ३३ ॥
नद्या जै सगळ्या जाती सागरा अंती मेळुनी । तपादी सर्व तै धर्म मलाच मिळती पुन्हा ॥ ३३ ॥
मनीषिणां - मनोनिग्रह करणार्यांचे समाम्नायः योगः साङ्ख्यं त्यागः - वेद, योग, सांख्य, संन्यास, तपः दमः - तप, इंद्रियनिग्रह सत्यं (इति विविधाः मार्गाः) - व सत्य इत्यादिक विविध मार्ग समुद्रान्ताः आपगाः इव - समुद्राला जाऊन मिळणार्या नद्यांप्रमाणे एतदन्तः - यालाच जाऊन मिळणारे आहेत. ॥३३॥
सर्व नद्या ज्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी वाहात जाऊन समुद्रालाच मिळतात, त्याचप्रमाणे ज्ञानी माणसांचा वेदाभ्यास, योग, आत्मानात्मविवेक, त्याग, तपश्चर्या, इंद्रियसंयम, सत्य इत्यादी सर्वांचे खरे फळ मनाचा निग्रह करुन परमात्म्याला मिळणे, हेच आहे. (३३)
विवरण :- आपल्या संदेशात भगवंत पुढे म्हणतात, आत्मा ज्ञानमय आहे, मन हे त्याचे सर्वातीत आहे. जागृती, सुषुप्ती, स्वप्न ही सर्व माया आहे, मन हे त्याचे निमित्त. म्हणून ते ताब्यात ठेवणे आवश्यक. मन ताब्यात ठेवल्याने माझी प्राप्ती होणे सुलभ होईल. वेद (समाम्नाय), ज्ञान, योग, विवेक, तप, इंद्रियनिग्रह, सत्य या सर्व मार्गांनी माझी प्राप्ती होऊ शकते. ज्याप्रमाणे नद्या सागरास मिळतात, त्याप्रमाणे हे सर्व माझ्याशीच एकरूप होतात. (३१-३३)
यत्त्वहं भवतीनां वै दूरे वर्ते प्रियो दृशाम् ।
मनसः सन्निकर्षार्थं मदनुध्यानकाम्यया ॥ ३४ ॥
ध्रुव मी तुमच्या नेत्रा राहतो दूर मी असा । तेणे तुम्हा घडे ध्यान असेचि चित्त ठेविणे ॥ ३४ ॥
भवतीनां वै प्रियं अहं - तुम्हाला प्रिय असा मी दृशां दूरे वर्ते - तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो यत् तत् तु - असे जे आहे ते तर मदनुध्यानकाम्यया - माझे चिंतन करण्याच्या इच्छेने मनसः सन्निकर्षार्थं - मनाला जवळ ओढून घेण्याकरिताच आहे. ॥३४॥
गोपींनो ! मी तुम्हांला प्रिय असूनही तुमच्या दृष्टीपासून दूर राहातो. याचे कारण तुम्ही नेहमी माझे ध्यान करीत राहाण्यामुळे मनाने अगदी माझ्याजवळ राहाण्याचा तुम्हांला अनुभव यावा, म्हणून. (३४)
विवरण :- आपण गोपींपासून दूर का आहोत, याचे स्पष्टीकरण देताना भगवंत म्हणतात, प्रियकर नजरेआड झाल्यावर स्त्री त्याचे जितके चिंतन करते, तितके तो नजरेसमोर असताना नाही. मी अखंड, रात्रंदिवस चिंतनाद्वारे तुमच्याजवळ असावा, म्हणून तुमच्यापासून दूर आहे. (३४)
यथा दूरचरे प्रेष्ठे मन आविश्य वर्तते ।
स्त्रीणां च न तथा चेतः सन्निकृष्टेऽक्षिगोचरे ॥ ३५ ॥
दूर प्रीय असे तेंव्हा प्रेमिका प्रेम वाढते । समोर असता तैसे न वाढे प्रेम ते मनी ॥ ३५ ॥
स्त्रीणां मनः - स्त्रियांचे अंतःकरण दूरचरे प्रेष्ठे आविश्य - दूर गेलेल्या प्रियतमाच्या ठिकाणी यथा वर्तते - जसे आसक्त होते तथा - तसे अक्षगोचरे सन्निकृष्टे - जवळ डोळ्यांसमोर राहणार्या प्रियतमाच्या ठिकाणी चेतः नः - अंतःकरण तितके आसक्त होत नाही. ॥३५॥
कारण स्त्रियांचे चित्त आपल्या दूरदेशी असलेल्या प्रियतमाच्या ठायी जितके गुंतून राहाते, तितके जवळ डोळ्यांसमोर राहाणार्याच्या ठिकाणी लागत नाही. (३५)
मय्यावेश्य मनः कृत्स्नं विमुक्ताशेषवृत्ति यत् ।
अनुस्मरन्त्यो मां नित्यं अचिरात् मामुपैष्यथ ॥ ३६ ॥
अशेष वृत्ति ठेवोनी मजसी चित्त ठेविणे । शीघ्र तै मज गोपिंनो सदाच्या मिळताल की ॥ ३६ ॥
विमुक्ताशेषवृत्ति यत् - सर्वस्वी सोडल्या आहेत निरनिराळ्या वृत्ति ज्याने असे जे मन तत् कृत्स्नं मनः - ते संपूर्ण मन मयि आवेश्य - माझ्या ठिकाणी ठेवून नित्यं मा अनुस्मरन्त्यः - नेहमी माझे चिंतन करणार्या तुम्ही अचिरात् मां उपैष्यथ - लवकरच माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल. ॥३६॥
कोणतीही वृत्ती मनात उठू न देता संपूर्ण मन माझ्या ठिकाणी लावून जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल, तेव्हा लवकरच कायमच्या मला प्राप्त व्हाल. (३६)
या मया क्रीडता रात्र्यां वनेऽस्मिन् व्रज आस्थिताः ।
अलब्धरासाः कल्याण्यो माऽऽपुर्मद्वीर्यचिन्तया ॥ ३७ ॥
रासक्रीडेस ज्या गोपी येऊ ना शकल्या तदा । स्मरता मजला त्याही चित्ताने मिळल्या पहा ॥ ३७ ॥
कल्याण्यः - अहो भाग्यवंत गोपींनो या रात्र्यां - ज्या गोपी रात्री अस्मिन् वने क्रीडता मया - ह्या वनात क्रीडा करणार्या माझ्यासह अलब्धरासाः व्रजे आस्थिताः - रासक्रीडेचा लाभ न होता गोकुळातच राहिल्या (ताः) मद्वीर्यचिन्तया - त्या गोपी माझ्या पराक्रमाच्या चिंतनामुळे मा आपुः - मला प्राप्त झाल्या. ॥३७॥
हे कल्याणींनो ! ज्यावेळी मी वृंदावनामध्ये पौर्णिमेच्या रात्री रासक्रीडा केली होती, त्यावेळी ज्या गोपी स्वजनांनी येऊ न दिल्यामुळे व्रजातच राहिल्या व माझ्याबरोबर रासक्रिडेत सामील होऊ शकल्या नाहीत, त्या माझ्या लीलांचे स्मरण केल्यानेच मला प्राप्त झाल्या होत्या. (३७)
श्रीशुक उवाच -
एवं प्रियतमादिष्टं आकर्ण्य व्रजयोषितः । ता ऊचुरुद्धवं प्रीताः तत्सन्देशागतस्मृतीः ॥ ३८ ॥
श्रीशुकदेव सांगतात - कृष्णसंदेश ऐकोनी गोपिंना हर्ष जाहला । रूप लीला स्मरोनीया प्रेमाने पुसती पुन्हा ॥ ३८ ॥
ताः व्रजयोषितः - त्या गोपी एवं प्रियतमादिष्टं आकर्ण्य - याप्रमाणे अत्यंत प्रिय अशा श्रीकृष्णाचा निरोप ऐकून तत्संदेशागतस्मृतीः - त्याच्या निरोपाच्या श्रवणाने ज्यांना आठवण झाली आहे प्रीताः - व त्यामुळे आनंदित झालेल्या अशा उद्धवं ऊचुः - उद्धवाला म्हणाल्या. ॥३८॥
श्रीशुक म्हणतात - आपल्या प्रियतमाचा हा संदेश ऐकून गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांच्या संदेशामुळे त्यांना श्रीकृष्णांचे स्वरूप आणि लीलेचे स्मरण होऊ लागले. त्या उद्धवाला म्हणाल्या. (३८)
गोप्य ऊचुः ।
दिष्ट्याहितो हतः कंसो यदूनां सानुगोऽघकृत् । दिष्ट्याप्तैर्लब्धसर्वार्थैः कुशल्यास्तेऽच्युतोऽधुना ॥ ३९ ॥
गोपिका म्हणाल्या - भाग्यची ! मारिला कंस यदुंना त्रासिले जये । आता ते सुखि हो सर्व आनंद त्यातही अम्हा ॥ ३९ ॥
यदूनां अहितः अघकृत् - यादवांचा शत्रू पापी कंस सानुगः कंसः दिष्टया हतः - सेवकांसह मारिला गेला हे सुदैवच होय (च) दिष्टया अच्युतः - आणि दैवानेच श्रीकृष्ण लब्धसर्वार्थैः आप्तैः - पूर्ण मनोरथ अशा बांधवांसह कुशली आस्ते - खुशाल आहे. ॥३९॥
गोपी म्हणाल्या - यादवांचा शत्रू पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेला, ही अत्यंत आनंदाची गोष्ट झाली. तसेच श्रीकृष्णांच्या आप्तेष्टांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आणि ते सर्वजण आता अच्युतांसह खुशाल आहेत, ही सुद्धा काही कमी आनंदाची गोष्ट नाही. (३९)
कच्चिद् गदाग्रजः सौम्य करोति पुरयोषिताम् ।
प्रीतिं नः स्निग्धसव्रीड हासोदारेक्षणार्चितः ॥ ४० ॥
उद्धवा सांगणे हेही आम्ही कृष्णासि प्रेमिले । आता तेथील त्या स्त्रीया हरीला प्रेमितात का ॥ ४० ॥
सौम्य - हे उद्धवा स्निग्धसव्रीडहासोदारेक्षणार्चितः - प्रेमळ, लज्जायुक्त मंद हास्यामुळे गंभीर झालेले कटाक्षपात यांनी पूजिलेला गदाग्रजः - श्रीकृष्ण नः प्रीतिम् - आम्हावर करण्याजोगी प्रीति पुरयोषितां करोति कच्चित् - नगरातील स्त्रियांवर करतो काय ? ॥४०॥
हे साधो ! एक गोष्ट तुम्ही आम्हांला सांगा. ज्याप्रमाणे आम्ही आमचे प्रेमयुक्त लज्जापूर्ण स्मितहास्य आणि त्यांच्याकडे मनसोक्त पाहाणे, या उपचारांनी त्यांची पूजा करीत होतो व तेही आमच्यावर प्रेम करीत होते, त्याच रीतीने मथुरेतील स्त्रियांवरही ते प्रेम करतात का ? (४०)
कथं रतिविशेषज्ञः प्रियश्च पुरयोषिताम् ।
नानुबध्येत तद्वाक्यैः विभ्रमैश्चानुभाजितः ॥ ४१ ॥
प्रेमतज्ञ असा कृष्ण न वशे कोण त्याजला । पदासी कोणिही येता हरि तो प्रेम अर्पितो ॥ ४१ ॥
रतिविशेषज्ञः - कामशास्त्र जाणणारा वरयोषितां प्रियः च (सः) - व सुंदर स्त्रियांना आवडणारा श्रीकृष्ण तद्वाक्यैः विभ्रमैः च अनुभाजितः - त्याच्या भाषणांनी व विलासांनी सत्कारिलेला कथं न अनुबध्येत - कसा त्यांच्या प्रेमाने बांधला जाणार नाही. ॥४१॥
तोपर्यंत दुसरी म्हणाली- "अग सखी ! आमचे श्यामसुंदर प्रेमाची मोहिनी घालण्यात निष्णात आहेत आणि श्रेष्ठ स्त्रियाही त्यांच्यावर प्रेम करतात. तर मग जेव्हा नगरातील स्त्रिया गोड गोड बोलण्याने आणि विलासांनी त्यांची पूजा करतील, तेव्हा ते त्यांच्यात का बरे रममाण होणार नाहीत ?" (४१)
अपि स्मरति नः साधो गोविन्दः प्रस्तुते क्वचित् ।
गोष्ठिमध्ये पुरस्त्रीणां ग्राम्याः स्वैरकथान्तरे ॥ ४२ ॥
वदली तिसरी कोनी साधू सांगा अम्हा तसे । स्त्रियांत बोलता कृष्ण स्मरतो कां कधी अम्हा ॥ ४२ ॥
साधो - हे सच्छील उद्धवा गोविन्दः - श्रीकृष्ण पुरस्त्रिणां गोष्ठीमध्ये - नगरस्त्रियांच्या समाजामध्ये स्वैरकथान्तरे प्रस्तुते - स्वच्छंदाने चालणार्या गोष्टी सांगत असता ग्राम्याः नः - गावंढळ अशा आम्हाला क्वचित् स्मरति अपि - एखादे वेळी तरी स्मरतो काय ॥४२॥
दुसरी एकजण म्हणाली- "हे साधो ! जेव्हा कधी नागरी स्त्रियांच्या समूहात काही गप्पा चालतात आणि आमचे प्रिय श्रीकृष्ण स्वच्छंदपणे, त्यांच्यात सामील होतात, तेव्हा कधीतरी प्रसंगवशात आम्हा ग्रामीण गवळणींचीसुद्धा ते आठवण काढतात काय ?" (४२)
विवरण :- कृष्णाचा उपदेश ऐकून गोपींचे समाधान झाले. पण त्यांच्या मनात स्त्रीसुलभ असूया जागी झालीच. त्या म्हणाल्या, 'मथुरेतील स्त्रिया नागर, आम्ही खेडवळ. त्यांच्याशी हास्यविनोद करताना आमची आठवण तरी येते का ?' (त्यावेळी आमची आठवण येतच नसणार असा बोलण्याचा भाव.) (४२)
( वसंततिलका )
ताः किं निशाः स्मरति यासु तदा प्रियाभिः वृन्दावने कुमुदकुन्दशशाङ्करम्ये । रेमे क्वणच्चरणनूपुररासगोष्ठ्याम् अस्माभिरीडितमनोज्ञकथः कदाचित् ॥ ४३ ॥
( वसंततिलका ) रात्री कधी हरि अम्हा स्मरतो मनीं का त्या चांदण्यात फुलता कळे जळीची । रासक्रीडेत रमला हरि आमुच्यात गावोनि गोपिसह तो बहु नाचला की ॥ ४३ ॥
कुमुदकुन्दशशाङकरम्ये - कुमुद, कुंद, इत्यादि फुलांनी व चंद्रप्रकाशांनी शोभणार्या वृन्दावने - वृंदावनातील क्वणच्चरणनूपुररासगोष्ठयां - शब्द करणार्या पायांतील पैंजणांनी शोभणार्या रासक्रीडेमध्ये अस्माभिः प्रियाभिः - त्याला प्रिय असणार्या आम्हाकडून ईडितमनोज्ञकथः - वर्णिलेल्या आहेत सुंदर कथा ज्याच्या असा सः - तो श्रीकृष्ण तदा यासु रेमे - त्यावेळी ज्यामध्ये क्रीडा करिता झाला ताः निशाः - त्या रात्री कदाचित् स्मरति किम् - एखादे वेळी तरी आठवतो काय ॥४३॥
आणखी एकीने विचारले- "जेव्हा कमळे आणि कुंदफुले उमलली होती, सगळीकडे चांदणे पसरले होते आणि त्यामुळे वृंदावन रमणीय दिसत होते, त्या रात्री त्यांनी रासमंडल तयार करून आमच्याबरोबर नृत्य केले होते. त्यावेळी आमच्या पायांतील नूपुरे वाजत होती. आम्ही सगळ्याजणी त्यांच्याच सुंदर सुंदर लीलांचे गायन करीत होतो आणि ते आमच्याबरोबर विहार करीत होते. त्या रात्रींची ते कधी आठवण काढतात का ?" (४३)
( अनुष्टुप् )
अप्येष्यतीह दाशार्हः तप्ताः स्वकृतया शुचा । सञ्जीवयन्नु नो गात्रैः यथेन्द्रो वनमम्बुदैः ॥ ४४ ॥ कस्मात् कृष्ण इहायाति प्राप्तराज्यो हताहितः । नरेन्द्रकन्या उद्वाह्य प्रीतः सर्वसुहृद्वृतः ॥ ४५ ॥
( अनुष्टुप् ) वदली आणखी कोणी विरहे जळतो अम्ही । चंद्रस्पर्शे तृणा जीव तसा स्पर्शील का हरी ॥ ४४ ॥
दाशार्हः - श्रीकृष्ण स्वकृतया - स्वतः उत्पन्न केलेल्या शुचा तप्ताः नः - विरहजन्य शोकाने संतप्त झालेल्या आम्हाला गात्रैः - अवयवांनी यथा इंद्रः अम्बुदैः वनं - जसा इंद्र मेघांनी अरण्याला तथा संजीवयन् - तशी टवटवी आणीत इह एष्याति अपि नु - येथे येईल काय हताहितः - ज्याने शत्रू मारिले आहेत असा प्राप्तराज्यः - राज्य मिळालेला सर्वसुहृद्वृतः - सर्व मित्रांनी वेष्टिलेला नरेन्द्रकन्याः उद्वाह्य प्रीतः - राजकन्यांशी विवाह लावून आनंदित झालेला कृष्णः - श्रीकृष्ण इह कस्मात् आयाति - येथे कशाला येईल ? ॥४४-४५॥
आणखी कुणी म्हणाली- "आम्ही सगळ्याजणी त्यांच्या विरहाग्नीमध्ये पोळत आहोत. इंद्र ज्याप्रमाणे पाऊस पाडून वनाला जिवदान देतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णसुद्धा कधीतरी आपल्या करस्पर्श इत्यादींनी आम्हांला जीवनदान देण्यासाठी येथे येतील काय ?" (४४)
तोपर्यंत आणखी एक गोपी म्हणाली- "अग ! आता तर त्यांनी शत्रूंना मारून राज्य मिळवले आहे. आता ते राजकुमारींशी विवाह करुन सर्व आप्तेष्टांबरोबर आनंदाने राहतील. आता इकडे कशाला येतील बरे ?" (४५)
किमस्माभिर्वनौकोभिः अन्याभिर्वा महात्मनः ।
श्रीपतेराप्तकामस्य क्रियेतार्थः कृतात्मनः ॥ ४६ ॥
वदे दुजी सखे त्याने शत्रूचे राज्य घेतले । वरिती राजकन्या त्या कशास येइ तो इथे ॥ ४५ ॥ वदे कुणी हरी तृप्त स्वयं तो लक्षुमीपती । कोणाशी काम ना त्याचे आडतो काय तो कुठे ॥ ४६ ॥
महात्मनः श्रीपतेः - गंभीर मनाचा, लक्ष्मीचा स्वामी आप्तकामस्य कृतात्मनः - व पूर्णकाम आणि कृतकृत्य अशा त्या श्रीकृष्णाचे वनौकोभिः अस्माभिः - वनात राहणार्या आमच्याशी वा अन्याभिः - किंवा दुसर्यांशी किं अर्थः क्रियेताः - काय कार्य करावयाचे आहे ? ॥४६॥
दुसरी गोपी म्हणाली- "महात्मा श्रीकृष्ण स्वतः लक्ष्मीपती आहेत. त्यांना कसलीच कामना नाही. ते कृतकृत्य आहेत. आम्ही वनवासी गौळणी किंवा दुसर्या राजकुमारी यांच्याशी त्यांना काय करायचे आहे ?" (४६)
परं सौख्यं हि नैराश्यं स्वैरिण्यप्याह पिङ्गला ।
तज्जानतीनां नः कृष्णे तथाप्याशा दुरत्यया ॥ ॥
पिंगला वदते वेश्या अशा त्यागात सौख्य ते । सुटेना हरिची आशा त्यात धन्यचि जीव हे ॥ ४७ ॥
स्वैरिणी पिङगला अपि - यथेष्ट आचरण करणारी वेश्या पिंगला सुद्धा नैराश्यं हि परं सौख्यं - आशारहित होणे हेच श्रेष्ठ सुख होय (इति) आह - असे म्हणाली तथा अपि - तरीसुद्धा तत् जानतीनां नः - ते जाणणार्या आमची कृष्णे - कृष्णाविषयीची आशा दुरत्यया - आशा नाहीशी होणे कठीण आहे. ॥४७॥
संसारात कोणतीही आशा न धरणे हेच सगळ्यांत मोठे सुख आहे. असे पिंगला हिने वेश्या असूनही योग्य तेच सांगितले. हे माहीत असूनही आम्ही श्रीकृष्णांच्या भेटण्याची आशा सोडून देऊ शकत नाही. (४७)
विवरण :- कृष्णाबद्दलची आसक्ती कितीही सोडायची म्हटले तरी सुटत नाही; हे सांगताना गोपी म्हणतात, 'निराशेतच खरे सुख.' इथे 'निराशा' हा शब्द द्वयर्थी घेता येईल. कोणतीही आशाच नाही, अशी अवस्था, आणि आशा सफल न झाल्याने झालेली मनाची अवस्था. (कृष्णदर्शनाची) कोणतीही आशा न ठेवणे यातच खरे सुख. कारण ती फलद्रुप न झाल्याने मग जी निराशा होते; मनाला ज्या यातना होतात, ती अत्यंत वाईट अवस्था असते. कोणत्याही गोष्टीत मन गुंतवले आणि अपेक्षित इच्छापूर्ती झाली नाही की, अपेक्षाभंगाचा धक्का मनाला बसतो. तो फार वाईट. तेव्हा कशातहि (कृष्णाचे ठिकाणी) मन न गुंतवणे अधिक इष्ट. मग त्याचे दर्शन होवो, न होवो, सगळे सारखेच. (एवढे तत्त्वज्ञान सांगितले, पण सगळे फुकट, गोपी पुन्हा मूळपदावर येऊन म्हणतात, काय करावे ? अगदी असहाय्य आहोत आम्ही. काही झाले तरी त्याची आस काही सुटत नाही. निःसंग प्रेम, भक्ती ती हीच !) (४७)
क उत्सहेत सन्त्यक्तुं उत्तमःश्लोकसंविदम् ।
अनिच्छतोऽपि यस्य श्री-रङ्गान्न च्यवते क्वचित् ॥ ४८ ॥
संत गाती जया नित्य बोले एकांति तो अम्हा । क्षण ना लक्षुमी त्यागी त्यां कैसा त्यजु गे अम्ही ॥ ४८ ॥
उत्तमश्लोकसंविदं - पुण्यकीर्ति श्रीकृष्णाच्या कथा संत्यक्तुं कः उत्सहेत - टाकण्यास कोण बरे उत्सुक होईल अनिच्छतः अपि - इच्छा न करणार्याहि यस्य अंगात् - ज्या श्रीकृष्णाच्या शरीरापासून श्रीः क्वचित् न च्यवते - लक्ष्मी कधीहि दूर होत नाही. ॥४८॥
ज्यांची किर्ती महात्मे गातात, त्यांनी एकांतात आमच्याशी ज्या प्रेमाच्या गोष्टी केल्या, त्या विसरणे, कोणाला शक्य आहे ? पहा ना ! त्यांची इच्छा नसतानासुद्धा त्यांना वरणारी स्वतः लक्ष्मी एक क्षणभरसुद्धा त्यांना सोडून दूर जात नाही. (४८)
सरिच्छैलवनोद्देशा गावो वेणुरवा इमे ।
सङ्कर्षणसहायेन कृष्णेन आचरिताः प्रभो ॥ ४९ ॥ पुनः पुनः स्मारयन्ति नन्दगोपसुतं बत । श्रीनिकेतैस्तत्पदकैः विस्मर्तुं नैव शक्नुमः ॥ ५० ॥
उद्धवा ही नदी येथे पोहला कृष्ण तो इथे । फिरला धेनु चाराया वन हे समिपी असे ॥ रासक्रीडा करी रात्री येथोनी येइ जाइ तो । ओठांनी वाजवी वेणू आथवे सर्व सर्व ते ॥ ४९ ॥ पदचिन्ह इथे त्याचे धुळीत शोभले बहु । नित्य तो आठवे आम्हा विसरू आम्हि तो कसा ॥ ५० ॥
प्रभो - हे उद्धवा सङकर्षणसहायेन कृष्णेन - बलराम ज्यास सहाय्य करणारा आहे अशा श्रीकृष्णाने आचरिताः इमे - उपभोगिलेले हे सरिच्छैलवनोद्देशाः - नद्या, पर्वत व वनप्रदेश गावः वेणुरवाः च - गाई आणि मुरलीचे शब्द नंदगोपसुतं - श्रीकृष्णाचे पुनः पुनः स्मारयन्ति - वारंवार खरोखर स्मरण करवितात श्रीनिकेतैः - लक्ष्मीचे निवासस्थान तत्पदकैः - अशा त्याच्या ठिकाणी उमटलेल्या पावलांमुळे (तं) विस्मर्तुं - त्याला विसरून जाणे न एव शक्रुमः - आम्हाला शक्यच नाही.॥४९-५०॥
उद्धव महोदय ! बलरामांसह श्रीकृष्ण जेथे विहार करीत, तीच ही नदी, तोच हा पर्वत आणि तेच हे वनप्रदेश. ज्यांना ते चारण्यासाठी नेत, त्याच गाई. आणि त्यांच्या वेणूचे ते स्वर अजूनही येथे घुमत आहेत. (४९)
येथील प्रत्येक जागी त्यांच्या परम सुंदर चरणकमलांची चिन्हे उमटली आहेत. ती आम्हांला वारंवार नंदनंदनांचीच आठवण करुन देतात. त्यांना आम्ही विसरूच शकत नाही. (५०)
गत्या ललितयोदार हासलीलावलोकनैः ।
माध्व्या गिरा हृतधियः कथं तं विस्मराम हे ॥ ५१ ॥
हंसाच्या परि तो चाले मधूर शब्द हास्य ते । कृष्णाने चोरिले चित्त विसरू आम्हि तो कसा ॥ ५१ ॥
ललितया गत्या - सुंदर चालीने उदारहासलीलावलोकनैः - उत्कृष्ट हास्ययुक्त लीलाकटाक्षांनी माध्व्या गिरा - मधुर भाषणाने च हृतधियः - ज्यांची बुद्धी हरण करून गेली आहे अशा आम्ही तं कथं विस्मरामहे - त्याला कशा विसरून जाऊ ? ॥५१॥
त्यांची ती सुंदर चाल, उन्मुक्त हास्य, विलासपूर्ण पाहाणे आणि मधुर वाणी ! या सर्वांनी आमचे चित्त हिरावून घेतले आहे. त्यांना आम्ही कशाविसरु ? (५१)
हे नाथ हे रमानाथ व्रजनाथार्तिनाशन ।
मग्नमुद्धर गोविन्द गोकुलं वृजिनार्णवात् ॥ ५२ ॥
स्वामी तू प्रीय कृष्णारे रमानाथ जरीहि तू । आमुचा एक तू स्वामी गायी आम्हास रक्ष तू ॥ ५२ ॥
हे नाथ - हे नाथा हे रमानाथ - हे लक्ष्मीपते व्रजनाथ - हे गोकुलपालका आर्तिनाशक - हे दुःखहारका गोविंद - हे श्रीकृष्णा मग्नं गोकुलं - बुडून गेलेल्या ह्या गोकुळाला वृजिनार्णवात् उद्धर - दुःखसागरापासून बाहेर काढ. ॥५२॥
हे स्वामी ! हे लक्ष्मीनाथ ! हे व्रजनाथ ! आमची संकटे दूर केलीत. हे गोविंदा ! दुःखसागरात बुडालेल्या या गोकुळाला तुम्हीच वाचवा." (५२)
श्रीशुक उवाच -
ततस्ताः कृष्णसन्देशैः व्यपेतविरहज्वराः । उद्धवं पूजयां चक्रुः ज्ञात्वाऽऽत्मानमधोक्षजम् ॥ ५३ ॥
श्रीशुकदेव सांगतात - कृष्ण संदेश ऐकोनी गोपी त्या शांत जाहल्या । आत्म्यात पाहिला कृष्ण उद्धवा तै प्रशंसिले ॥ ५३ ॥
ततः श्रीकृष्णसंदेशैः - नंतर श्रीकृष्णाच्या निरोपांनी व्यपेतविरहज्वराः ताः - ज्यांचा वियोगजन्य ताप दूर झाला आहे अशा त्या गोपी अधोक्षजं आत्मानं ज्ञात्वा - श्रीकृष्ण आपल्या अंतर्यामी आहे असे ओळखून उद्धवं - उद्धवाला पूजयाञ्चक्रुः - पूजित्या झाल्या. ॥५३॥
श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली. कारण इंद्रियातीत श्रीकृष्णच आपला आत्मा आहे, हे त्यांना कळले. आता त्यांनी उद्धवाचा सत्कार केला. (५३)
उवास कतिचिन्मासान् गोपीनां विनुदन्शुचः ।
कृष्णलीलाकथां गायन् रमयामास गोकुलम् ॥ ५४ ॥
गोपिंचे दुःख वाराया राहिले कैक मास तै । कृष्णाच्या सांगुनी लीला व्रजिंना मोद तो दिला ॥ ५४ ॥
गोपीनां शुचः विनुदन् - गोपींचा शोक दूर करीत (उद्धवः) कतिचित् मासान् उवास - उद्धव कित्येक महिने राहता झाला कृष्णलीलाकथा गायन् - श्रीकृष्णाच्या लीलांच्या कथा गात गोकुलं रमयामास - गोकुळाला रमविता झाला. ॥५४॥
गोपींचा शोक मिटविण्यासाठी उद्धव काही महिने तेथे राहिला. श्रीकृष्णांच्या अनेक लीला आणि गोष्टी वारंवार सांगून तो व्रजवासियांना आनंदित करीत असे. (५४)
यावन्त्यहानि नन्दस्य व्रजेऽवात्सीत् स उद्धवः ।
व्रजौकसां क्षणप्रायाणि आसन् कृष्णस्य वार्तया ॥ ५५ ॥
जेवढे दिन ते तेथे कृष्णलीलेस सांगता । राहिले उद्धवो तेथे व्रजिंना क्षण भासला ॥ ५५ ॥
सः उद्धवः - तो उद्धव यावन्ति अहानि - जितके दिवस नन्दस्य व्रजे अवात्सीत् - नन्दाच्या गोकुळात राहिला तावन्ति अहानि - तितके दिवस कृष्णस्य वार्तया - श्रीकृष्णांच्या कथांनी व्रजौकसाम् क्षणप्रायाणि आसन् - गोकुळातील लोकांना क्षणासारखे झाले. ॥५५॥
जितके दिवसपर्यंत नंदांच्या व्रजामध्ये उद्धव राहिला, तितके ते दिवस श्रीकृष्णांशी संबंधित गोष्टींमुळे व्रजवासियांना क्षणासारखे वाटले. (५५)
सरिद्वनगिरिद्रोणीः वीक्षन् कुसुमितान् द्रुमान् ।
कृष्णं संस्मारयन्रेमे हरिदासो व्रजौकसाम् ॥ ५६ ॥
उद्धवो हरिभक्तो ते कधी जात नदीतिरी । वनीं गिरी कधी जाती रमती पुष्प पाहुनी । व्रजिंना नित्य ते देती कृष्णाचे स्मरणो तसे ॥ ५६ ॥
हरिदासः - भगवद्भक्त उद्धव सरिद्वनगिरिद्रोणीः - नद्या, अरण्ये, पर्वत, व गुहा ह्यांना कुसुमितान् द्रुमान् (च) - आणि फुललेल्या वृक्षांना वीक्षन् - पहात व्रजौकसां कृष्णं - गोकुळवासी लोकांना श्रीकृष्णाची संस्मरयन् रेमे - आठवण देत आनंदविता झाला. ॥५६॥
भगवंतांचा भक्त उद्धव नदी, वन, पर्वत, दर्या आणि फुलांनी लहडलेले वृक्ष पाहून तेथे श्रीकृष्णांनी कोणती लीला केली होती, असे विचारून विचारून व्रजवासियांना श्रीकृष्णांचेच स्मरण करून देऊन त्या स्मरणात त्यांच्यासह स्वतः रमत असे. (५६)
दृष्ट्वैवमादि गोपीनां कृष्णावेशात्मविक्लवम् ।
उद्धवः परमप्रीतः ता नमस्यन्निदं जगौ ॥ ५७ ॥
गोपिंचे पाहिले प्रेम कृष्णतन्मयता अशी । आनंद उद्धवा झाला गोपीस वंदुनी वदे ॥ ५७ ॥
उद्धवः - उद्धव गोपीनां एवमादि - गोपींची अशाप्रकारची कृष्णावेशात्मविक्लवं - श्रीकृष्णाविषयीच्या तन्मयतेमुळे झालेली मनाची विव्हळ दृष्ट्वा - अवस्था पाहून परमप्रीतः - अत्यंत संतुष्ट झालेला असा ताः नमस्यन् - त्या गोपींना नमस्कार करून इदं जगौ - असे म्हणाला. ॥५७॥
उद्धवाने गोपींची अशा प्रकारची श्रीकृष्णांमध्येच तन्मयता झाल्याचे पाहून त्याचेही मन कृष्णविषयक प्रेमाने अतिशय भरून गेले. गोपींना नमस्कार करीत तो असे म्हणाला.(५७)
( वसंततिलका )
एताः परं तनुभृतो भुवि गोपवध्वो गोविन्द एव निखिलात्मनि रूढभावाः । वाञ्छन्ति यद्भवभियो मुनयो वयं च किं ब्रह्मजन्मभिरनन्तकथारसस्य ॥ ५८ ॥
( वसंततिलका ) गोपीत प्रीत धरिसी बरवी हरी तू हे उच्च प्रेम न मिळे तपियास ऐसे । गोविंदप्रेम मिळता मग यज्ञि काय ब्रह्मीतनूहि मिळता हरिवीण व्यर्थ ॥ ५८ ॥
एताः गोपवध्वः - ह्या गोपी निखिलात्मनि गोविन्दे एव - सर्वत्र आत्मरूपाने रहाणार्या श्रीकृष्णाच्या ठिकाणीसुद्धा रूढभावाः - भक्ति उत्पन्न झाली आहे ज्यांना अशा आहेत यत् - जे कृष्णरूप भुवि परं तनुभृतः - पृथ्वीवर श्रेष्ठ शरीर धारण करणारे भवभियः मुनयः - व संसाराची भीति बाळगणारे मुनि वयं च - आणि आम्ही वाच्छन्ति - जे इच्छितो अनन्तकथारसस्य - भगवंताच्या चरित्राची गोडी लागलेल्या त्यांना ब्रह्मजन्मभिः किम् - ब्राह्मण जन्माचीच काय जरूरी आहे ? ॥५८॥
फक्त या गोपींचेच शरीर धारण करणे या पृथ्वीवर सार्थकी लागले, कारण सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणीच यांचे प्रगाढ प्रेम आहे. प्रेमाच्या या स्थितीची मुमुक्षू पुरुष आणि आम्ही भक्तसुद्धा अपेक्षा करतो. ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या कथांची गोडी लागली, त्यांना ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ जन्माची तरी काय आवश्यकता ? (५८)
विवरण :- गोपींची कृष्णावरील दृढ भक्ती, प्रेम पाहून उद्धव थक्क झाला. त्याला कळून चुकले, कृष्णदर्शनाची मूर्तिमंत लालसा, म्हणजेच या गोपी. या आणि यांचे जीवन म्हणजेच खरे जीवन, तेच जीवन सफल. सर्व जगाचा आत्मा असलेला श्रीकृष्णच यांचे सर्वस्व आहे. आराध्य दैवत आहे. जप-तप करून मुक्तीची इच्छा करणारे ऋषी-मुनी याहून आणखी वेगळे ते काय मागतात ? या गोपी नागर नाहीत, वनचर आहेत, अज्ञ आहेत, परंतु कृष्णावर किती प्रेम ! भगवंताच्या कथेमध्ये, त्याच्या चरित्रश्रवणामध्ये रस निर्माण झाला नाही, तर ब्रह्मजन्माला येऊन फायदा काय ? (शुक्ल, सावित्र, याज्ञिक या जन्मांचा काय फायदा ?) वस्तुस्थिती अशी आहे की, जरी नकळत अज्ञानी माणसाने भगवद्भक्ती केली तरी परमात्मा त्याचे कल्याण करतो. गोपींचे तसेच आहे. अमृतपान समजून करा किंवा न समजता; त्याचा व्हायचा तो परिणाम होणारच ना ? (५८)
क्वेमाः स्त्रियो वनचरीर्व्यभिचारदुष्टाः
कृष्णे क्व चैष परमात्मनि रूढभावः । नन्वीश्वरोऽनुभजतोऽविदुषोऽपि साक्षाच् छ्रेयस्तनोत्यगदराज इवोपयुक्तः ॥ ५९ ॥
कोठे हरी नि वनजा हरिप्रेम कोठे येणेचि सिद्धि घडते हरिप्रेम व्हावे । तेणेचि पावुनि करी मग भद्र सारे पीता चुकून रस हा मग मृत्यु कैसा ॥ ५९ ॥
वनचरीः - अरण्यात फिरणार्या व्यभिचारदुष्टाः इमाः स्त्रियः क्व - व व्यभिचाराचा दोष घडलेल्या ह्या स्त्रिया कोठे च परमात्मनि श्रीकृष्णे - आणि परमेश्वर श्रीकृष्णाच्या ठिकाणी एषः रूढभावः क्व - उत्पन्न झालेली ही भक्ति कोठे ननु साक्षात् ईश्वरः - खरोखर प्रत्यक्ष श्रीकृष्ण अनुभजतः अविदुषः अपि - सेवा करणार्या अज्ञ जनांचेहि उपयुक्तः अगदराजः इव - उपयोगात आणिलेल्या उत्तम औषधाप्रमाणे श्रेयः तनोति - कल्याण करितो. ॥५९॥
कोठे ह्या आचारहीन, रानात राहाणार्या स्त्रिया आणि कोठे सच्चिदानंदघन भगवान श्रीकृष्णांचे ठायी त्यांचे हे अनन्य प्रेम ! जसे एखाद्याने अजाणतेपणाने अमृतप्राशन केले तरी ते पिणार्याला अमर करते, त्याप्रमाणे जर कोणी भगवंतांचे स्वरूप न जाणताही त्यांच्यावर निरंतर प्रेम केले, तर ते स्वतः त्याचे परम कल्याण करतात. (५९)
नायं श्रियोऽङ्ग उ नितान्तरतेः प्रसादः
स्वर्योषितां नलिनगन्धरुचां कुतोऽन्याः । रासोत्सवेऽस्य भुजदण्डगृहीतकण्ठ लब्धाशिषां य उदगाद्व्रजवल्लभीनाम् ॥ ६० ॥
गोपीस तो करितसे बहु प्रेम रासीं यांच्या परी न करितो कधि प्रीत श्रीसी । देवांगनास मग ते मिळते कुठून अन्यस्त्रियास नच हा करणे विचार ॥ ६० ॥
अङग - अहो रासोत्सवे - रासक्रीडेच्यावेळी अस्य - ह्या श्रीकृष्णाच्या भुजदण्डगृहीतकण्ठलब्धाशिषां - बाहूंनी आलिंगन मिळालेल्या, ज्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत अशा व्रजबल्लवीनां यः प्रसादः - गोकुळांतील गोपींना जो प्रसाद उदगात् - मिळाला अयं - हा प्रसाद नितान्तरतेः श्रियः उ न - आसक्त असणार्या लक्ष्मीलाहि खरोखर मिळाला नाही च नलिनगन्धरुचां - आणि ज्यांच्या शरीराला कमळासारखा सुवास येत आहे स्वयोषितां - अशा देवस्त्रियांनाहि मिळाला नाही अन्याः कुतः - तर मग दुसर्यांना कसा मिळणार ? ॥६०॥
रासलीलेच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी या गोपींच्या गळ्यात हात टाकून यांना जो कृपा-प्रसाद दिला, तसा परम प्रेम करणार्या लक्ष्मीलासुद्धा दिला नाही किंवा कमलासारख्या सुगंध आणि कांतीने युक्त अशा देवांगनांनासुद्धा मिळाला नाही; तर मग अन्य स्त्रियांची काय कथा ! (६०)
आसामहो चरणरेणुजुषामहं स्यां
वृन्दावने किमपि गुल्मलतौषधीनाम् । या दुस्त्यजं स्वजनमार्यपथं च हित्वा भेजुर्मुकुन्दपदवीं श्रुतिभिर्विमृग्याम् ॥ ६१ ॥
वृंदावनात मज हो तरु वेलि जन्म व्रजांगनापदधुळे मह स्नान व्हावे । सोडोनि सर्व हरिशी मन अर्पिती या ते प्रेम रूप न गवे श्रुति आदिकांना ॥ ६१ ॥
अहो - अहो वृंदावने - वृंदावनात आसां - ह्या चरणरेणुजुषां - भगवच्चरणाच्या धुळीला सेवन करणार्या गुल्मलतौषधीनाम् - झुडपे, वेली व वृक्ष ह्यांपैकी किमपि अहं स्याम् - कोणीतरी एक मी होईन काय याः - ज्या गोपी दुस्त्यजं - टाकण्यास कठीण अशा स्वजनं च आर्यपथं हित्वा - आप्तेष्टांना व सद्धर्माला टाकून श्रुतिभिः विमृग्यां - वेदांनी शोधिल्या जाणार्या मुकुन्दपदवीं भेजुः - श्रीकृष्णाच्या चरणाला सेवित्या झाल्या. ॥६१॥
मी या वृंदावनामध्ये एखादे झुडूप, वेल किंवा वनस्पती झालो, तरी ते मी माझे भाग्यच समजेन. कारण त्यामुळे मला या व्रजांगनांची चरणधूळ सेवन करण्यास मिळेल. ज्यांनी सोडण्यास कठीण असा स्वजनांचा मोह आणि शिष्टाचार सोडून भगवंतांचे पद प्राप्त करून घेतले की, जे वेदांनाही अद्यापि सापडलेले नाही. (६१)
या वै श्रियार्चितमजादिभिराप्तकामैः
योगेश्वरैरपि यदात्मनि रासगोष्ठ्याम् । कृष्णस्य तद्भगवतः चरणारविन्दं न्यस्तं स्तनेषु विजहुः परिरभ्य तापम् ॥ ६२ ॥
लक्ष्मीस देव पुजिती शिव विप्रदेव ती सेविते हरिपदा नित सर्वभावे । ते पाय गोपि धरिती स्तनि आपुल्या की आलिंगुनी करिती शांत व्यथा जिवाची ॥ ६२ ॥
यत् - जे चरणकमल श्रिया अजादिभिः - लक्ष्मीने, ब्रह्मादि देवांनी आप्तकामैः योगेश्वरैः अपि - तसेच पूर्णकाम अशा मोठमोठया योग्यांनीसुद्धा आत्मनि अर्चितं - अंतःकरणात पूजिलेले तत् - ते रासगोष्ठयां स्तनेषु न्यस्तं - रासक्रीडाप्रसंगी स्तनांवर ठेविलेले असे भगवतः कृष्णस्य चरणारविन्दं - भगवान श्रीकृष्णाचे चरणकमल परिरभ्य - आलिंगून याः - ज्या गोपी तापं विजहुः - दुःखमुक्त झाल्या. ॥६२॥
स्वतः लक्ष्मीने व ब्रह्मदेव, शंकर इत्यादी पूर्णकाम देवांनी ज्यांची पूजा केली, योगेश्वर आपल्या हृदयामध्ये ज्यांचे (सदैव) चिंतन करीत असतात, त्याच भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदांना गोपींनी रासलीलेच्यावेळी आपल्या वक्षःस्थळावर ठेवून घेतले आणि त्यांनाच आलिंगन देऊन आपल्या हृदयाचा ताप शांत केला. (६२)
( अनुष्टुप् )
वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः । यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् ॥ ६३ ॥
( अनुष्टुप् ) नंदव्रजस्त्रियांच्या मी वंदितो पदधूळिसी । कृष्णाच्या गाति त्या लीला त्रिलोकात पवित्र की ॥ ६३ ॥
नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुं - नंदाच्या गोकुळातील गोपींच्या पायधुळीला अभीक्ष्णशः वन्दे - मी वारंवार नमन करितो यासां हरिकथोद्गीतं - ज्या गोपींचे भगवद्गुणविषयक गायन भुवनत्रयं पुनाति - त्रैलोक्याला पवित्र करते. ॥६३॥
नंदांच्या व्रजात राहाणार्या गोपांगनांच्या चरणधुळीला मी वारंवार नमस्कार करतो. ज्या गोपींनी श्रीकृष्णांच्या कथांसंबंधी जे काही गायन केले, ते तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे. (६३)
श्रीशुक उवाच -
अथ गोपीरनुज्ञाप्य यशोदां नन्दमेव च । गोपानामन्त्र्य दाशार्हो यास्यन् आरुरुहे रथम् ॥ ६४ ॥
श्रीशुकदेव सांगतात - यशोदा नंदबाबांना गोपिंनाही विचारुनी । देता निरोप गोपांना जाण्यास रथि बैसले ॥ ६४ ॥
अथ दाशार्हः - नंतर उद्धव गोपीः यशोदां नन्दं एव च अनुज्ञाप्य - गोपी, यशोदा, आणि नंद ह्यांची आज्ञा घेऊन गोपान् च आमन्त्र्य - आणि गोपांना विचारून यास्यन् रथं आरुरुहे - निघाला असता रथात चढला. ॥६४॥
श्रीशुक म्हणतात - नंतर उद्धव गोपी, नंद आणि यशोदा यांची अनुमती घेऊन आणि गोपाळांचा निरोप घेऊन मथुरेला जाण्यासाठी रथावर स्वार झाला. (६४)
तं निर्गतं समासाद्य नानोपायनपाणयः ।
नन्दादयोऽनुरागेण प्रावोचन् अश्रुलोचनाः ॥ ६५ ॥
व्रजा बाहेर येताची नंदे गोपे सअश्रुने । उद्धवा बोलता प्रेमे भेटवस्तूहि अर्पिल्या ॥ ६५ ॥
नानोपायनपाणयः - अनेकप्रकारच्या भेटी ज्यांच्या हातात आहेत असे नन्दादयः - नंदादि गोप निर्गतं तम् आसाद्य - परत जाण्यास निघालेल्या त्या उद्धवाजवळ येऊन अनुरागेण अश्रुलोचनाः - प्रेमाने ज्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळत आहेत प्रावोचन् - असे बोलू लागले. ॥६५॥
तो निघालेला पाहून नंद इत्यादी गोपगण हातात पुष्कळशा भेटवस्तू घेऊन त्याच्याजवळ आले आणि डोळ्यांत अश्रू आणून मोठ्या प्रेमाने म्हणाले. (६५)
मनसो वृत्तयो नः स्युः कृष्ण पादाम्बुजाश्रयाः ।
वाचोऽभिधायिनीर्नाम्नां कायस्तत् प्रह्वणादिषु ॥ ६६ ॥
उद्धवा सर्व या वृती कृष्णपदाश्रितोचि हो । गावो वाणी नमो देह आज्ञापालनही घडो ॥ ६६ ॥
नः मनसः वृत्तयः - आमच्या मनोवृत्ति कृष्णपादाम्बुजाश्रयाः स्युः - श्रीकृष्णाच्या चरणकमळाचा आश्रय करणार्या होवोत वाचः - वाणी नाम्नां अभिधायिनीः (स्युः) - श्रीकृष्णाच्या नावाचा जप करणार्या होवोत कायः - शरीराने तत्प्रह्वणादिषु (स्यात्) - श्रीकृष्णाला वंदन करणे इत्यादि कार्यात आसक्त होवो. ॥६६॥
आमच्या मनाच्या वृत्ती श्रीकृष्णांच्या चरण-कमलांच्या आश्रयाने राहोत. आमच्या वाणी त्यांच्याच नामांचे उच्चारण करोत आणि शरीरे त्यांनाच प्रणाम इत्यादी करीत राहोत. (६६)
कर्मभिर्भ्राम्यमाणानां यत्र क्वापीश्वरेच्छया ।
मङ्गलाचरितैर्दानै रतिर्नः कृष्ण ईश्वरे ॥ ६७ ॥
खरेचि सांगतो ऐका मोक्षा आम्ही न इच्छितो । लाभो जन्म कुठेही तो शुद्ध राहोनि दान ते । करोत, फळ हो त्याचे वाढवी कृष्णभक्ति ही ॥ ६७ ॥
ईश्वरेच्छया - ईश्वराच्या इच्छेने कर्मभिः - अनेकप्रकारच्या कर्मांना यत्र क्व अपि - जेथे कोठेहि भ्राम्यमाणानां नः - फिरणार्या आमची मङगलाचरितैः दानैः - मंगलकारक कर्मांनी व दानांनी ईश्वरे कृष्णे - समर्थ अशा कृष्णाच्या ठिकाणी रतिः (स्यात्) - प्रीति उत्पन्न होवो. ॥६७॥
भगवंतांच्या इच्छेने आमच्या कर्मानुसार आम्हांला कोणत्याही योनीमध्ये जन्म येवो, मात्र तेथे आम्ही शुभ आचरण करावे, दान करावे आणि त्यांचे फळ म्हणून भगवान श्रीकृष्णांचे ठायीच आमचे प्रेम असावे. (६७)
एवं सभाजितो गोपैः कृष्णभक्त्या नराधिप ।
उद्धवः पुनरागच्छन् मथुरां कृष्णपालिताम् ॥ ६८ ॥
परीक्षित् नंद गोपांनी दिला सत्कार उद्धवा । आता ते कृष्ण कृपेने मथुरापुरि लोटले ॥ ६८ ॥
नराधिप - हे परिक्षित राजा गोपैः कृष्णभक्त्या - गोपांनी श्रीकृष्णाविषयीच्या भक्तिमुळे एवं सभाजितः - याप्रमाणे सत्कारिलेला उद्धवः - उद्धव कृष्णपालितां - श्रीकृष्णाने रक्षिलेल्या मथुरां पुनः आगच्छत् - मथुरेला परत आला. ॥६८॥
परीक्षिता ! गोपींना अशा प्रकारे कृष्णाप्रमाणेच समजून उद्धवाचा सन्मान केला. नंतर श्रीकृष्णांनी रक्षण केलेल्या मथुरेला तो परतला. (६८)
कृष्णाय प्रणिपत्याह भक्त्युद्रेकं व्रजौकसाम् ।
वसुदेवाय रामाय राज्ञे चोपायनान्यदात् ॥ ६९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे उद्धवप्रतियाने सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
पोचता वंदिले कृष्णा व्रजिंची प्रेमभक्ति ती । वदले सर्वच्या सर्व भक्ति उद्रेक सर्व तो । वसुदेव बळिरामा भेट वस्तुहि अर्पिल्या ॥ ६९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्तेचाळिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
प्रणिपत्य - नमस्कार करून (सः) कृष्णाय व्रजौकसां - तो कृष्णाला गोकुळातील लोकांच्या भक्त्युद्रेकं आह - भक्तीचा थोरपणा सांगता झाला वसुदेवाय रामाय च - वसुदेवाला, बलरामाला राज्ञे - आणि उग्रसेन राजाला उपायनानि च अदात् - भेटी अर्पण करिता झाला. ॥६९॥
तेथे पोहोचल्यावर त्याने भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि व्रजवासियांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली. त्यानंतर नंदांनी दिलेल्या भेटवस्तू त्याने वसुदेव, बलराम आणि राजा उग्रसेनाला दिल्या. (६९)
अध्याय सत्तेचाळिसावा समाप्त |