श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः

श्रीकृष्णप्रादुर्भावः

भगवान श्रीकृष्णाचे प्रगटणे


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच ।
कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः ।
राज्ञां च उभयवंश्यानां चरितं परमाद्‍भुतम् ॥ १ ॥
यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम ।
तत्रांशेन अवतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंस नः ॥ २ ॥
( अनुष्टुप् )
राजा परिक्षिताने विचारले -
तुम्ही तो शशि सूर्याच्या वंशा अद्‌भुत वर्णिले ।
मुनीजी भगवत्‌प्रेमी ! कृपा करुनि ते पुढे ॥ १ ॥
ज्या वंशीपूर्ण रूपाने बळीरामा सवे हरी ।
कृष्ण तो जन्मला त्याची पवित्र कीर्ति सांगणे ॥ २ ॥

भवता सोमसूर्ययोः वंशविस्तारः कथितः - आपण चंद्र आणि सूर्य या दोन्ही वंशांचा विस्तार सांगितला - उभयवंश्यानां राज्ञां च - आणि दोन्ही वंशातील राजांचे - परमाद्‍भुतं चरितं कथितम् - अत्यंत आश्चर्यकारक चरित्रेही सांगितलीत (१) - मुनिसत्तम ! - हे मुनिश्रेष्ठा - नितरां धर्मशीलस्य यदोः च चरितं कथितम् - अत्यंत धार्मिक अशा यदुराजाचेही चरित्र सांगितलेत - तत्र अंशेन अवतीर्णस्य विष्णोः - आता त्या यदुकुलात अंशाने अवतीर्ण झालेल्या विष्णूचे - वीर्याणि शंसः - पराक्रम आम्हाला सांगा. (२)

नवमस्कंधाच्या अखेर संक्षेपाने सांगितलेले श्रीहरीचे चरीत्र ऐकून श्रीकृष्णाचे चरित्र श्रवण करण्याच्या इच्छेने परीक्षिताने शुकाचार्यांना विचारले -
राजा परिक्षिताने विचारले - भगवन ! आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार, दोन्ही वंशांच्या राजांची अद्‍भुत चरित्रे, तसेच धर्मप्रेमी यदूंचेसुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले. आता त्याच वंशात, आपला अंश असलेल्या श्रीबलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान् श्रीकृष्णांचे चरित्र आम्हांला ऐकवावे. (१-२)


अवतीर्य यदोर्वंशे भगवान् भूतभावनः ।
कृतवान् यानि विश्वात्मा तानि नो वद विस्तरात् ॥ ३ ॥
सर्वात्मा हरिश्रीकृष्ण यदुवंशात जन्मुनी ।
लीला केल्या जशा त्याने विस्तारे ऐकवा अम्हा ॥ ३ ॥

विश्वात्मा भूतभावनः भगवान् - जगाचा आत्मा व जगाची उत्पत्ति करणार्‍या भगवंताने - यदोः वंशे अवतीर्य - यदूच्या कुळात अवतार घेऊन - यानि चरितानि कृतवान् - ज्या ज्या लीला केल्या - तानि नः विस्तरात् वद - त्या आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. (३)

प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या, त्या विस्ताराने आम्हांला सांगा. (३)

विवरण :- ’महाभारत’ या महाकाव्याची निर्मिती करून महर्षी वेदव्यासांनी भारततैलपूर्ण असा ज्ञानमय प्रदीप प्रज्वलित केला आणि ’व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ अशी ख्याती त्यांना प्राप्त झाली. स्वतः महर्षी मात्र या निर्मितीने संतुष्ट झाले नाहीत. (आपसातील युद्ध, हेवेदावे, कूटनीति, कट-कारस्थान याचे चित्रण कोणत्याच कविहृदयाला आवडणारे नाही; मग ते कितीही वास्तव असले तरी !) उलट ते अस्वस्थच झाले. नंतर महर्षी नारदांच्या उपदेशावरून भगवान श्रीकृष्णांचे लीलाचरित्र गायन करणारे, भक्ति आणि तत्त्वज्ञानाचा गाभाच असणारे, वेदांचे नवनीत असे भागवत महापुराण रचल्यानंतर मात्र त्यांना पूर्ण मनःशांतीचा लाभ झाला.
महर्षी शुकाचार्य आणि राजा परीक्षित यांमधील हा संवाद. भागवताच्या दशम स्कंधाचे प्रारंभी राजा परीक्षित शुकाचार्यांना कृष्णचरित्रच आणखी विस्ताराने कथन करण्याची विनंती करतो. कथितो वंशविस्तारः - वास्तविक नवव्या स्कंधापर्यंत परमाद्‌भुत अशा राम व कृष्णचरित्राचे गायन झाले होतेच. मग आताच त्याला कृष्ण चरित्र विस्ताराने श्रवण करण्याची आस का बरे लागली असावी ? ती इच्छा व्यक्त करताना तो ’सोमसूर्य’ असेही म्हणतो. वास्तविक ’यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले’ - पृथ्वीवर पर्वत व नद्या अस्तित्वात असेपर्यंत, म्हणजेच जगाच्या अंतापर्यंत रामकथा गायन - श्रवण केली जाईल असे तिचे माहात्म्य. शिवाय चंद्रापेक्षा सूर्य सर्वार्थाने कितीतरी श्रेष्ठ. तसेच सूर्यकुलोत्पन्न राजेही. मग कृष्णचरित्राचेच श्रवण अधिक विस्ताराने का ?
आपलेपणा, कुलाभिमान हा मानवी स्थायीभाव त्याला कारण असावा. श्रीकृष्ण हा परीक्षिताचा पूर्वज - आद्यः - त्याची आजी सुभद्रा हिचा भाऊ. म्हणजे त्याला कृष्णचरित्र संपूर्ण अज्ञात होते असे नाही. परंतु या पार्श्वभूमीवर आतापर्यंत त्याने जे ऐकले ते इतके हृदयंगम, उत्सुकता वाढविणारे आणि ’क्षणे क्षणे यन्नवतामुपैति’ - या स्वरूपाचे की, ते अधिकाधिक ऐकावे अशी उत्सुकता निर्माण होणे साहजिकच. श्रीकृष्णाचे वर्णन ’सावला-सलोना’ असे केले जाते. मिठाने चव येते पण तहानही वाढते. त्यामुळे थोडे ऐकून तृप्ती न होता अधिक ऐकण्याची त्याची पिपासा इथे दिसून येते. शिवाय ’वीर्याणि शंस’ असेही तो म्हणतो. आपल्याला आवडणारी गोष्ट पुन्हा पुन्हा वाचावी, ऐकावी हाही मानवी स्वभावाच एक पैलू. आणि विशेष म्हणजे शुकमुखाने कथन करणारी महर्षी व्यासांसारखी अधिकारी व्यक्ती. दुधात साखरच जणू. मग अमृताच्या बिंदु पानाने संतुष्ट न होता संपूर्ण पेल्याचा आस्वाद घेण्याची इच्छा होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.
महर्षी व्यासांची आजपर्यंतची कथनपद्धती पुराण-पद्धतीस अनुसरून होती. प्रथम संक्षेप आणि श्रोत्याच्या इच्छेनुसार मग विस्तार. त्यामुळे राजाची ही मागणी शुकाचार्यांना निश्चितच सुखावून गेली असणारच.
आपल्या बोलण्यास सतत पुष्टी देत राजा विस्ताराने कथन करण्याची विनंती करतो, त्या ओघात तो श्रीकृष्णास जी विशेषणे देतो, त्यामधून त्याची अपेक्षा व्यक्त होते. भगवान - अर्थात् परमात्मस्वरूप, श्रीयुक्तरूप (कृष्णस्तु भगवान् स्वयम् !), भूतभावन, विश्वात्मा - यांनी कृष्णाच्या विराट स्वरूपाचे वर्णन त्यास अपेक्षित आहे. त्याच ओघात ’अंशेन अवतीर्णस्य’ असाही समर्पक शब्द तो वापरतो. विष्णुचा अंशावतार श्रीकृष्ण - त्याने पार्थिव अवतार घेतल्याने तो पूर्णावतार होऊ शकत नाही म्हणून अंशावतार. परंतु ’अंशेन शंस’ असा अन्वय केल्यास निदान आणखी थोडेतरी सांगा, कारण ते चरित्रच इतके बहुआयामी की त्याचे संपूर्ण वर्णन अशक्यच. मग ’यद् स्वल्पमपि तद् बहु’ या न्यायाने आणखी थोडेतरी सांगा असेही त्यास सुचवायचे असावे. (१-३)



निवृत्ततर्षैः उपगीयमानाद्
     भवौषधात् श्रोत्रमनोऽभिरामात् ।
क उत्तमश्लोकगुणानुवादात्
     पुमान् विरज्येत विना पशुघ्नात् ॥ ४ ॥
( इंद्रवज्रा )
ते संत तृप्तो तरि कीर्ति गाती
     जी रामबाणो भवरोगवल्ली ।
आनंद देते विषयी जनांना
     श्रीकृष्ण चंद्रामृत ही कथा की ।
जे आत्मघाती नि पशुघ्न त्यांच्या
     विना कुणाला नच आवडे ही ॥ ४ ॥

पशुघ्नात् विना कः पुमान् - निरपराधी प्राण्यांना मारणार्‍या मनुष्याशिवाय - निवृत्ततर्षौः उपगीयमानात् - ज्यांच्या सर्व कामना पूर्ण झालेल्या आहेत (अर्थात् अनासक्त झालेले आहेत) अशांकडून गायिल्या जाणार्‍या - भवौषधात् श्रोत्रमनोभिरामात् - जे संसाररूपी रोगाचे औषध असून कानांना व चित्ताला आनंदित करणार्‍या अशा - उत्तमश्लोक गुणानुवादात् - परमेश्वराच्या गुणकथांपासून - विरज्येत ? - कोण बरे पराङ्‌मुख होईल ? (४)

अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात, जे भवरोगावरील औषध आहे, जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारे आहे अशा भगवंतांच्या गुणवर्णनाला, आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल ? (४)

विवरण :- पुढे ओघात तो म्हणतो - ’निवृत्ततर्षैः उपगीयमानात्’ - मी तर सामान्य. या कथा श्रवणास मीच अधीर आहे असे नाही, तर भावमुक्त, विरक्तही यास अधीर आहेत. विरक्तांना एका मुक्तीखेरीज, मोक्षाखेरीज दुसर्‍या कशाचेही आकर्षण नसते. पण या कथेचे वैशिष्ट्यच असे आहे की, तिच्या श्रवण-गायनात तेही रममाण होतात आणि त्यांना परम शांती, मुक्तिसुख मिळते. हे झाले मुनींबद्दल - विरक्तांबद्दल. मात्र बहुसंख्य अशा सामान्य लोकांसाठी देखील हे रामबाण औषध आहे त्यांचे भवरोग दूर करणारे. - मात्र तोंडाऐवजी कानांनी प्राशन करायचे. बहुसंख्य असा सामान्य मनुष्य जरी षडरिपूंच्या अमलाखाली असला तरी तो पाषाण हृदयी नसतो. त्याला हरिकथेच्या श्रवणाने निश्चितच आनंद व समाधानाची प्राप्ती होते. पण असेही असतीलच की, ज्यांना याची मोहिनी पडत नाही. मग त्यांना काय म्हणावे - ’मनुश्यरूपेण मृगाश्चरन्ति’ ? (४)



पितामहा मे समरेऽमरञ्जयैः
     देवव्रताद्यातिरथैस्तिमिङ्‌गिलैः ।
दुरत्ययं कौरवसैन्यसागरं
     कृत्वातरन् वत्सपदं स्म यत्प्लवाः ॥ ५ ॥
पितामहो ते लढता रणात
     ते इंद्रजीतो भय दाविताना ।
कृष्णाश्रयेची तरले तयात
     गोक्षूरगर्तो ज‍इ पार व्हावा ॥ ५ ॥

यत्प्लवाः मे पितामहाः - ज्याला नौका समजणारे माझे आजोबा पांडव - समरे - युद्धात - अमरंजयः - देवांनाही जिंकणार्‍या - देवव्रतादि अतिरथैः तिमिंगलः - भीष्माचार्यादि अतिरथी हे जणू भयंकर मत्स्य असताही - दुरत्ययं कौरवसैन्यसागरं - त्यांच्यामुळे तरून जाण्यास अत्यंत कठीण झालेल्या कौरवसैन्यरूपी सागराला - वत्सपदं कृत्वा अतरम् स्म - वासराच्या पावलाने झालेल्या चिमुकल्या डबक्याल्या सह ओलांडावे तसे तरून गेले. (५)

युद्धात देवांनासुद्धा जिंकणारे भीष्मादि अतिरथीरूपी प्रचंड मासे ज्यात होते, असा कौरवसेनेचा अपार सागर, माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने, वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडावे, इत्यक्या सहजतेने पार केला. (५)

विवरण :- राजा परीक्षिताला कृष्णकथा आधी माहीत होतीच. नवव्या स्कंधापर्यंत ती अधिक कळली. पण आता उत्सुकता अधिकच वाढली. मग हा कृष्ण कसा आहे ? पांडवांनी त्याला आपला सखा, गुरू मानून त्याच्यावरील आपली श्रद्धा कशी प्रकट केली, हे सांगताना तो म्हणतो - कौरवांकडे सेनेचा अथांग सागर होता. कारण ’भगवान श्रीकृष्ण हवेत का बलाढ्य सेना ?’ यामध्ये कौरवांनी सेनेची निवड केली होती. आणि पांडवांनी एकट्या श्रीकृष्णाची. कौरवांच्या सेनेत भीष्म, द्रोण, कर्ण यांसारखे देवांनाही जिंकणारे अतिरथी, महारथी होते, जे असंख्य योजने पसरलेल्या मत्स्यांना गिळू शकत होते (तिमिंगल), त्यांच्यावर काबू मिळवू शकत होते. पण या सर्व सेनासागराला एकट्या श्रीकृष्णरूपी नौकेच्या साहाय्याने पांडवांनी अगदी सहजगत्या पार केले आणि विनयरूपी पैलतीर गाठला. शारीरिक शक्तीपेक्षा, युद्धनीतिपेक्षा, कृष्णाची कूटनीति वरचढ ठरली. शिवाय संख्येपेक्षा अविचल श्रद्धाही तितकीच श्रेष्ठ ठरली. (५)



द्रौण्यस्त्रविप्लुष्टमिदं मदङ्‌गं
     सन्तानबीजं कुरुपाण्डवानाम् ।
जुगोप कुक्षिं गत आत्तचक्रो
     मातुश्च मे यः शरणं गतायाः ॥ ६ ॥
त्या दोन वंशा तनु माझि एक
     ब्रह्मास्त्र येता जळु लागता ती ।
माता हरीच्यापदि लागली तै
     गर्भात चक्रे मज रक्षि कृष्ण ॥ ६ ॥

यः च आत्तचक्रं - आणि जो हातात चक्र धारण करणारा भगवान श्रीकृष्ण - शरणं गतायां मे मातुः कुक्षिंगतः - शरण गेलेल्या माझ्या आईच्या उदरात प्रवेश करून - कुरुपांडवानां संताजबीजं - कौरवपाण्डवांच्या पुढील वंशाचे बीज अशा - द्रौण्यस्त्रविप्लुष्टं इदं मदंगं - अश्वत्थाम्याच्या अस्त्राने दग्ध होऊ लागलेल्या ह्या माझ्या शरीराचा - जुगोप - रक्षण करता झाला. (६)

कौरव आणि पांडव या दोन्ही वंशांचे बीज, असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळून गेले होते, त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली. तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले. (६)

विवरण :- भारतीय युद्धाच्या विध्वंसामध्ये कौरव पांडवांची तरुणपिठी कामी आली त्यामुळे वंशसातत्य खुंटले. उरला केवळ उत्तरेचा, अभिमन्यू पत्‍नीचा गर्भ (म्हणजेच परीक्षित). पण तोही सूडाने पेटलेल्या खुनशी अश्वत्थाम्याने रणनीति धुडकावून लाऊन ब्रह्मशीर्ष अस्त्राने जाळून टाकला. कुरुकुलाचा निर्वंश होण्याचा बाका प्रसंग निर्माण झाला. असहाय्य उत्तरा श्रीकृष्णास शरण गेली. चक्रधारी श्रीकृष्णाने तिच्या गर्भात प्रवेश केला, गर्भाचे रक्षण केले आणि वंशसातत्य कायम राहिले. शरणागतास अभय हे कृष्णाचे ब्रीदच. त्याचे सामर्थ्यही कसे होते हे या प्रसंगावरून दिसतेच. परंतु गर्भाची हानी झाल्यानंतर त्याची पुनःस्थापना करण्याइतके जीवशास्त्र महाभारतकाळी प्रगत होते याचाही प्रत्यय येतो. (६)



वीर्याणि तस्याखिलदेहभाजां
     अन्तर्बहिः पूरुषकालरूपैः ।
प्रयच्छतो मृत्युमुतामृतं च
     मायामनुष्यस्य वदस्व विद्वन् ॥ ७ ॥
आतोनि रक्षी हरि सर्व जीवा
     बाहेर रक्षी त‍इ काळ रूपे ।
मनुष्य भासे त‍इ खेळ सारे ।
     ऐश्वर्य त्याचे मधुशब्दि सांगा ॥ ७ ॥

विद्वन् ! - हे ज्ञानी शुकदेवा - अखिलदेहभाजां अंतः बहिः च - सर्व प्राण्यांच्या आंत आणि बाहेर - पूरुषकालरूपैः अमृतं उत मृत्युं प्रयच्छतः - क्रमाने पुरुष व काल या रूपाने राहून मोक्ष व मृत्यू देणार्‍या - तस्य मायामनुष्यस्य वीर्याणि वदस्व - मायेने मनुष्यरूप धारण करणार्‍या त्या परमेश्वराचे पराक्रम सांगा. (७)

हे विद्वन ! सर्व शरीर धारण करणार्‍याच्या आत आत्मरूपाने राहून अमृततत्वाचे आणि बाहेर कालरूपाने राहून मृत्यूचे दान करणार्‍या आणि मनुष्यरूपाने प्रगट होणार्‍या त्यांच्या लीलांचे आपण वर्णन करावे. (७)

विवरण :- आपली इच्छा अधिक स्पष्ट करताना राजा पुढे बोलतो - भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी. ते शरीराच्या आत राहून अमृतदान करतात आणि शरीर कालरूपाने नष्ट करतात. म्हणूनच ते माया मानव, मानवी शरीर विनाशी, पण आत्मा अमर अर्थातच श्रीकृष्णाचे अंतर्यामी वास्तव्यच मानवास हितकर. पण सामान्य मनुष्यास विनाशी, बाह्य रूपाचेच अधिक आकर्षण. त्यामध्ये खरे मुक्तिसुख नाही हे त्यास कळत नाही. त्यामुळे अनंत यातना देणार्‍या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात तो सतत हिंडत राहतो. मात्र जेव्हा त्याची दृष्टी अंतर्यामी होते, पुण्यसंचय अधिक होतो, तेव्हा त्याला अविनाशी परमात्म्याची ओढ लागते आणि मुक्तिसुख मिळते. ते देणार्‍या श्रीकृष्णाचे वर्णन करण्यास आपणांसारखे आत्मज्ञानी मुनीच योग्य. इतरांचे ते काम नव्हे. (७)



रोहिण्यास्तनयः प्रोक्तो रामः संकर्षणस्त्वया ।
देवक्या गर्भसंबंधः कुतो देहान्तरं विना ॥ ८ ॥
( अनुष्टुप् )
रोहिणी तनयो राम पुन्हा हा देवकी सुतो ।
एकदा अंशरूपाने जन्मता हा दुजा कसा ॥ ८ ॥

त्वया संकर्षणः रामः - तुम्ही आत्ताच संकर्षण नाव धारण करणारा बलराम - रोहिण्याः तनयः प्रोक्तः - रोहिणीचा मुलगा म्हणून सांगितलेत - तेन देहांतरं विना देवक्याः गर्भसंबंधः कुतः प्राप्तः ? - मग दुसरा देह प्राप्त झाल्याशिवाय त्याला देवकीचा गर्भसंदर्भ कसा प्राप्त झाला. (८)

आपण आताच सांगितले की, बलराम रोहिणीचे पुत्र होते (९.२४.४६). त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्येसुद्धा आपण त्यांची गणना केलीत. दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांना पुत्र होणे कसे शक्य आहे ? (८)



कस्मात् मुकुन्दो भगवान् पितुर्गेहाद् व्रजं गतः ।
क्व वासं ज्ञातिभिः सार्धं कृतवान् सात्वतां पतिः ॥ ९ ॥
असुरां मुक्ति देणारा भक्तांचा प्रिय हा सखा ।
वात्सल्य स्नेह सोडोनी व्रजिं कां पातला असे ।
नंदगोपादि बंधुंच्या सवे हा क्रीडला कुठे ॥ ९ ॥

भगवान् मुकुंदः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - कस्मात् पितुः गेहात् व्रजं गतः - कोणत्या कारणामुळे पित्याचे घर सोडून गोकुळात गेला - सात्वतां पतिः - यादवाधिपति श्रीकृष्ण - ज्ञातिभिः सार्धं - बांधवांसह - क्व वासं कृतवान् ? - कोणकोणत्या ठिकाणी वास करता झाला ? (९)

भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून व्रजभूमीकडे का गेले ? तसेच भक्तवत्सल प्रभूंनी नातलगांसह कोठे कोठे निवास केला ? (९)



व्रजे वसन् किं अकरोत् मधुपुर्यां च केशवः ।
भ्रातरं चावधीत् कंसं मातुः अद्धा अतदर्हणम् ॥ १० ॥
शास्ता जो शिव ब्रह्मासी व्रजात क्रीडला कसा ।
कंस मामा असोनीया मारिला काय कारणे ॥ १० ॥

व्रजे मधुपुर्यां च वसन् केशवः - गोकुळात व मथुरेत राहणार्‍या श्रीकृष्णाने - किं अकरोत् ? - तेथे काय काय केले ? मातुः भ्रातरं च - आणि आईचा भाऊच असल्याने - अतदर्हणं कंसं - ज्याला मारणे योग्य नव्हे अशा कंसाला - अद्धा किं अवधीत् ? - खरेच त्याने का मारले ? (१०)

केशवांनी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या ? तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले ? (१०)



देहं मानुषमाश्रित्य कति वर्षाणि वृष्णिभिः ।
यदुपुर्यां सहावात्सीत् पत्‍न्यः कत्यभवन् प्रभोः ॥ ११ ॥
मनुष्याकार तो ब्रह्म द्वारकीं राहिला किती ।
यदुवंशासवे तेथे पत्‍न्या त्या प्रभुसी किती ॥ ११ ॥

मानुषं देहं आश्रित्य - मनुष्य देह धारण करून - वृष्णिभिः सह - यादवांसह - यदुपुर्यां - द्वारकेमध्ये - कति वर्षाणि अवात्सीत् ? - किती वर्षे राहिला - प्रभोः पत्‍न्यः कति अभवत् ? -त्या प्रभू श्रीकृष्णाच्या स्त्रिया तरी किती होत्या ? (११)

मनुष्यदेह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांसह त्यांनी किती वर्षे निवास केला ? आणि त्यांना किती पत्‍न्या होत्या ? (११)



एतत् अन्यच्च सर्वं मे मुने कृष्णविचेष्टितम् ।
वक्तुमर्हसि सर्वज्ञ श्रद्दधानाय विस्तृतम् ॥ १२ ॥
मुनी मी कृष्णलीलांना पुसो वा न पुसोहि ते ।
विस्तारे सांगणे सर्व श्रद्धेने ऐकु इच्छितो ॥ १२ ॥

सर्वज्ञ मुने ! - हे सर्वज्ञ मुने ! - एतत् अन्यत् च सर्वं - मी विचारलेले आणि आणखी इतर सर्व - कृष्णचेष्टितं - कृष्णाचे चरित्र - श्रद्दधानाय मे - ज्याविषयी श्रद्धा बाळगतो अशा मला - विस्तृतं वक्तुं अर्हसि - विस्ताराने सांगण्यास तूच योग्य आहेस. (१२)

हे सर्वज्ञ मुनिवर ! श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा असणार्‍या मला त्यांच्या या व इतरही सर्व कथा विस्ताराने सांगाव्यात. (१२)

विवरण :- यापुढे बलरामाच्या जन्माबद्दलही त्याच्या मनांत थोडेसे शंकायुक्त कुतुहल दिसून येते. तो म्हणतो, संकर्षण = बलराम हा तर रोहिणीचा पुत्र असे सांगितलेत (९.२४.४६) आणि तो देवकीचाही (९.२४.५३) - श्रीकृष्णाचा सख्खा वडील बंधू, हे कसे घडले ? एकाच बलरामाचा एकाच शरीराने दोन ठिकाणी जन्म, हे कसे शक्य आहे ?
(बलरामाला इथे संकर्षण असे म्हटले आहे - अर्थात् संकर्षणात्तु गर्भस्य’) असा त्याचा जन्म झाला. वंशसातत्यासाठी जसे उत्तरेच्या गर्भाचे रक्षण भगवंतांनी केले, तसेच, त्याहीपूर्वी कंसापासून वाचविण्यासाठी देवकीच्याही गर्भाचे रक्षण - संकर्षणात् - असे झाले असावे का ? असा प्रश्न इथे पडतो. तत्कालीन प्रगत शरीरशास्त्राची कल्पनाही यावरून येऊ शकते. परीक्षिताची चिकित्सक वृत्तीही समजते.
आणखी प्रश्न - आपल्या वडिलांना सोडून कृष्ण गोकुळात का गेला ? राजा सतत प्रश्न विचारतो यावरून त्याची चौकस दृष्टी दिसतेच. पण कृष्ण कथेत अवगाहन करण्याची त्याची इच्छा समजून येते. प्रश्न विचारताना राजा म्हणतो - ’देह मानुषमाश्रित्य’ - मानवी देह धारण करून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण म्हणजे परमेश्वरच. पण गोकुळात आपल्या जातभाईंबरोबर राहताना तो त्यांचा सखा झाला. त्यांच्यातलाच एक झाला. त्यामुळे आपलेपणा वाढला. तसेच राजा स्वतःला श्रद्दधान म्हणवितो (श्रद्धेने, डोळस श्रद्धेने श्रवण करणारा). अर्थातच असा श्रोता (वक्ता दशसहस्रेषु श्रोता भवति वा न वा !) वक्त्याला निश्चितच आवडतो. (८-१२)



नैषातिदुःसहा क्षुन्मां त्यक्तोदं अपि बाधते ।
पिबन्तं त्वन्मुखाम्भोज अच्युतं हरिकथामृतम् ॥ १३ ॥
भुकेचे पुसणे नाही पाणी मी त्यागिले असे ।
थोडाही त्रास ना त्याचा कथा अमृत प्राशितो ॥ १३ ॥

एषा अतिदुःसहा क्षुत् - ही सहन करण्यास अत्यंत कठीण अशी तहान - त्य्रक्तोदं अपि - किंचितहि अन्न सेवन न करता व उदकहि वर्ज्य केले असता - त्वन्मुखांभोजच्युतं हरिकथामृतं पिबंतं मां - तुझ्या मुखकमलातून निघालेले हरिकथारूप अमृत प्राशन करणार्‍या मला - न बाधते - तहानभूक बाधा करीत नाही. (१३)

आपल्या मुखकमलातून पाझरणार्‍या, भगवंतांच्या अमृतकथेचे पान करीत असल्यामुळे पाणीही न पिणार्‍या मला असह्य अशी ही तहानभूक मुळीच सतावीत नाही. (१३)



सूत उवाच ।
एवं निशम्य भृगुनन्दन साधुवादं ।
     वैयासकिः स भगवान् अथ विष्णुरातम् ।
प्रत्यर्च्य कृष्णचरितं कलिकल्मषघ्नं ।
     व्याहर्तुमारभत भागवतप्रधानः ॥ १४ ॥
( वसंततिलका )
सूतजी सांगतात -
सर्वज्ञशूक हरिचे प्रियभक्त तेंव्हा
     तो ऐकुनी उचित प्रश्नचि हर्षले नी ।
श्रीकृष्णकीर्ति वदण्या परिसिद्ध झाले
     जी मार्जिते कलिमला मुळ शोधुनीया ॥ १४ ॥

भृगुनंदन ! - हे शौनकमुने ! - अथ सः भागवतप्रधानः भगवान् वैयासकिः - नंतर भगवद्‌भक्तांत श्रेष्ठ असा तो व्यासपुत्र भगवान शुकाचार्य - एवं साधुवादं निशम्य - याप्रमाणे उत्तम प्रश्न ऐकून - विष्णुरातं प्रत्यर्च्य - परीक्षिताचे अभिनंदन करून - कलिकल्मषघ्नं कृष्णचरितं व्याहर्तुं आरभत । - कलियुगातील पापांचा नाश करणारे कृष्णाचे चरित्र सांगू लागला. (१४)

सूत म्हणतात ! शौनका ! भगवंतांच्या भक्तात अग्रगण्य अशा सर्वज्ञ शुकदेवांनी परीक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून त्याचे कौतुक केले आणि कलिमलांना नाहीसे करणार्‍या श्रीकृष्ण चरित्राचे वर्णन करण्यास प्रारंभ केला. (१४)



श्रीशुक उवाच ।
सम्यग्व्यवसिता बुद्धिः तव राजर्षिसत्तम ।
वासुदेवकथायां ते यज्जाता नैष्ठिकी रतिः ॥ १५ ॥
( अनुष्टुप् )
श्री शुकदेव म्हणतात -
कृष्णलीला रसीका रे प्रश्न हा अति छान की ।
हृदयीं धरिता कृष्ण प्रीत त्याचीच वाढते ॥ १५ ॥

राजर्षिसत्तम ! - हे राजश्रेष्ठा ! - तव बुद्धिः सम्यक् व्यवसिता - तुझ्या बुद्धीने चांगला निश्चय केला आहे - यत् वासुदेवकथायां ते नैष्ठिकी रतिः जाता । - कारण श्रीकृष्णाच्या कथेविषयी तुला श्रद्धायुक्त प्रीती उत्पन्न झाली आहे. (१५)

श्रीशुकाचार्य म्हणाले - हे श्रेष्ठ राजर्षे ! तू जो काही निश्चय केला आहेस, तो अतिशय सुंदर आहे; कारण श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झाली आहे. (१५)



वासुदेवकथाप्रश्नः पुरुषान् त्रीन् पुनाति हि ।
वक्तारं पृच्छकं श्रोतॄन् तत्पादसलिलं यथा ॥ १६ ॥
येतो प्रश्न असा तेंव्हा वक्ता श्रोता नि जो पुसे ।
तिघेही पावनो होती गंगा पावन जै करी ॥ १६ ॥

यथा तत्पादसलिलं - जसे परमेश्वराच्या चरणकमलापासून निघालेले उदक - तथा - त्याप्रमाणेच - वासुदेवकथाप्रश्नः - श्रीकृष्णाच्या कथेविषयीचा प्रश्न - वक्तारं पृच्छकं श्रोतृन् - कथा सांगणार्‍या, त्याविषयी प्रश्न करणार्‍या व त्या ऐकणार्‍या - त्रीन् पुरुषान् पुनाति हि - अशा तिन्ही पुरुषांना पवित्र करतो. (१६)

भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक्ता, प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो. (१६)

विवरण :- परंतु शुकमुनींच्या मनात संदेह निर्माण होण्याची शक्यता आहे. हा तर राजा. संयम, इंद्रियनिग्रह यास कसा जमणार ? हरिकथा श्रवण तहानभूक हरपून करायची. मग ती ऐकताना याचे एकचित्त होईल ? याची उत्सुकता क्षणभर टिकणारी, वळवावरचे पाण्याप्रमाणे तर टिकणारी नाही ना ? राजाने या संदेहाचे यथोचित निराकरण केले. आपल्या मुखचंद्रातून स्रवणार्‍या हरिकथारूपी अमृताचे प्राशन करून निश्चितच तृप्त होईन, मग अन्न-पाण्याची काय कथा ? आणि मला ही अवस्था तर माझ्या तहान भूकेमुळेच प्राप्त झाली ना ? आपण निश्चिंत असावे.
राजाने इथे मुखचंद्र असा समर्पक शब्द वापरला आहे. वास्तविक सुंदर मुखाला, विशेषतः तरुणीच्या सुंदर मुखाला मुखचंद्र म्हणतात. परंतु इथे चंद्र आणि त्यातून पाझरणार्‍या अमृताचा संदर्भ अभिप्रेत आहे. चंद्र पौर्णिमेला आपल्या सर्व कलांनी परिपूर्ण असतो, सुधाकर हे नाव सार्थ करतो. मात्र प्रतिपदेपासून त्याची एक एक कला क्षीण होते. कारण त्याच्या प्रत्येक कलेत भरलेले अमृत एक एक देव क्रमाने प्राशन करतो आणि तृप्त होतो. आपल्या अमृतरूपी वैभवाचा र्‍हास झाला तरी दानशूर चंद्र संतुष्ट होतो. आणि अमृताचे प्राशन करून देवही तृप्त होतात.
आता मात्र शुकमुनि निःसंदेह होतात. त्यांची खात्री पटते. "कृष्णकथेचे गायन आणि श्रवण करणारे दोघेही धन्य. कारण ती कथा त्यांना पवित्र करते;" असे सांगून मुनि येथून कथा गायनास प्रारंभ करतात. (१३-१६)



भूमिः दृप्तनृपव्याज दैत्यानीकशतायुतैः ।
आक्रान्ता भूरिभारेण ब्रह्माणं शरणं ययौ ॥ १७ ॥
तदा लाखोहि ते दैत्य गर्विष्ठ नृप जाहले ।
आक्रंदे पृथिवी भारे ब्रह्म्या निस्त्राण ती स्तवी ॥ १७ ॥

भूमिः - पृथ्वी - दृप्तनृपव्याज - मदोन्मत्त राजांच्या रूपाने उत्पन्न झालेल्या - दैत्यानीकशतायुतैः - दैत्यांच्या लक्षावधी सैन्यांच्या योगे - भूरिभारेण आक्रांता - अतिशय भाराने दडपून गेलेली अशी - ब्रह्माणं शरणं ययौ - त्यावरील उपायाच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला शरण गेली (१७)

त्यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते. त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून ती पृथ्वी ब्रह्मदेवांना शरण गेली. (१७)



गौर्भूत्वा अश्रुमुखी खिन्ना क्रन्दन्ती करुणं विभोः ।
उपस्थितान्तिके तस्मै व्यसनं स्वं अवोचत ॥ १८ ॥
गाय ती रूप घेवोनि दुःखे अश्रूहि पातले ।
हंबरे कृश ती खिन्न ब्रह्म्याला दुःख बोलली ॥ १८ ॥

गौः भूत्वा - तिने गाईचे रूप धारण केले - खिन्ना अश्रुमुखी - कष्टी व जिच्या मुखावरून अश्रुधारा वहात आहेत अशी - करुणं क्रंदंती - व दीन स्वराने आक्रोश करीत - विभोः अंतिके उपस्थिता सा - परमेश्वराजवळ गेलेल्या अशा तिने - तस्मैः स्वं व्यसनं अवोचत - त्या प्रभूला आपले दुःख कथन केले. (१८)

त्यावेळी तिने गाईचे रूप धारण केले होते. तिच्या डोळ्यांतून आसवे वाहात होती. ती खिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडीत होती. ब्रह्मदेवांकडे जाऊन तिने त्यांना आपले संकट सांगितले. (१८)



ब्रह्मा तद् उपधार्याथ सह देवैस्तया सह ।
जगाम स-त्रिनयनः तीरं क्षीरपयोनिधेः ॥ १९ ॥
कारुण्ये ऐकुनी ब्रह्मा सवे शंकर घेउनी ।
गाय ही घेतली आणि पातले क्षीरसागरी ॥ १९ ॥

अथ तत् उपधार्य - त्यानंतर तिचे म्हणणे ऐकून - देवैः सह तया सह च - इतर देवांसह आणि त्या पृथ्वीसह सत्रिनयनः ब्रह्मा - तसेच त्रिनयन शंकरांसह तो ब्रह्मदेव - क्षिरपयोनिधेः तीरं जगाम् - क्षीरसमुद्राच्या तीरावर गेला. (१९)

ब्रह्मदेवांनी ते ऐकून तिला बरोबर घेतले आणि ते भगवान शंकर व अन्य देवांसह क्षीरसागराच्या किनार्‍यावर गेले. (१९)



तत्र गत्वा जगन्नाथं देवदेवं वृषाकपिम् ।
पुरुषं पुरुषसूक्तेन उपतस्थे समाहितः ॥ २० ॥
देवाधिदेव भगवान् पुरवी भक्तकामना ।
नष्टितो सर्व ती दुःखे समर्थ एकलाचि तो ।
गाता पुरुषसूक्तारे ब्रह्म्याला ध्यान लागले ॥ २० ॥

तत्र गत्वा - त्याठिकाणी जाऊन - समाहितः सः - स्वस्थ अंतःकरणाने युक्त असा तो - जगन्नाथं देवदेवं वृषाकपिं पुरुषं - जगाचा स्वामी, सर्व देवांचा देव व सर्वांतर्यामी अशा प्रभूचे - पुरुषसूक्तेन उपतस्थे - समाधी लावून पुरुषसूक्ताने स्तवन करू लागला. (२०)

तेथे जाऊन ब्रह्मदेवांनी एकाग्रचित्त होऊन पुरुषसूक्ताने जगत्पालक, सर्वांतर्यामी, देवाधिदेव श्रीविष्णूंची स्तुती केली. (२०)



गिरं समाधौ गगने समीरितां
     निशम्य वेधास्त्रिदशानुवाच ह ।
गां पौरुषीं मे श्रृणुतामराः पुनः
     विधीयतां आशु तथैव मा चिरम् ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा )
आकाशवाणी त‍इ ऐकि कानी
     त्या देवतांना वदला उठोनी ।
मी सांगतो ते तुम्हि सर्व ऐका ।
     विलंब यासी नच हो मुळीही ॥ २१ ॥

समाधौ - समाधीमध्ये - गगने समीरितां गिरं निशम्य, वेधां - आकाशात झालेली वाणी ऐकून तो ब्रह्मदेव - त्रिदशान् ह उवाच - आश्चर्याने सर्वांना सांगू लागला - अमराः ! - हे देवहो ! - पौरुषीं गां मे श्रृणुत - परमेश्वराने आज्ञा करून सांगितलेले शब्द माझ्याकडून ऐका - पुनः तथा एव आशु विधीयतां - आणि त्वरित त्याप्रमाणे आचरण करा - मा चिरं - आणि अजिबात विलंब करू नका. (२१)

त्यांनी समाधी अवस्थेत असतानाच आकाशवाणी ऐकली. त्यानंतर ब्रह्मदेव देवांना म्हणाले, देवांनो ! भगवंतांची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा. वेळ लावू नका. (२१)



पुरैव पुंसा अवधृतो धराज्वरो
     भवद्‌भिः अंशैः यदुषूपजन्यताम् ।
स यावद् उर्व्या भरं इश्वरेश्वरः
     स्वकालशक्त्या क्षपयन् चरेद् भुवि ॥ २२ ॥
पूर्वीच जाणी मनि सर्व विष्णु
     देवाधिदेवो अतिदुःख भूचे ।
तो कालशक्त्ये हरि भार सर्व
     जन्मोनि जावे तुम्हि अंशि तेथे ।
यदूकुळासि तुम्हि जन्मुनिया
     सहाय्य व्हावे हरिला सदाचे ॥ २२ ॥

पुंसा धराज्वरः पुरा अवधृतः - पृथ्वीचे दुःख परमेश्वराने आधीच जाणले आहे - सः इश्वरेश्वरः - तो परमेश्वर - यावत् उर्व्याः भरं - जोपर्यंत पृथ्वीचा भार - स्वकालशक्त्या क्षपयन् - आपल्या कालशक्तीच्या योगाने दूर करीत - भुवि चरेत् - पृथ्वार संचार करेल - तावत् भवद्‌भिः अंशैः - तोपर्यंत तुम्ही आपापल्या अंशाने - यदुषु उपजन्यताम् - यदुकुळात अवतरावे. (२२)

पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील, तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरूपाने जन्म घेऊन राहा. (२२)



वसुदेवगृहे साक्षाद् भगवान् पुरुषः परः ।
जनिष्यते तत्प्रियार्थं संभवन्तु सुरस्त्रियः ॥ २३ ॥
( अनुष्टुप् )
वसुदेवाघरी जन्मे स्वयं श्रीपुरुषोत्तम ।
देवांगनाहि जन्मा तैं श्रीराधा पद सेविण्या ॥ २३ ॥

वसुदेवगृहे साक्षात् भगवान् परः पूरुषः जनिष्यते - वसुदेवाच्या घरी प्रत्यक्ष षड्‌गुणैश्वर्यसंपन्न परमपुरुष अवतार घेईल - तत्प्रियार्थं सुरस्त्रियः संभवंतु - त्याच्या संतोषाकरता देवांच्या स्त्रियांनी जन्म घ्यावा. (२३)

वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनांनीही जन्म घ्यावा. (२३)



वासुदेवकलानन्तः सहस्रवदनः स्वराट् ।
     अग्रतो भविता देवो हरेः प्रियचिकीर्षया ॥ २४ ॥
सहस्रमुखिचा शेष स्वयं अंशोचि श्रीहरी ।
भगवत्‌कार्य साधाया होईल ज्येष्ठ बंधु तो ॥ २४ ॥

वासुदेवकला सहस्रवदनः - परमेश्वराचा अंश असा सहस्रमुखांचा - देवं स्वराट् अनंतः - प्रकाशमान व जगदाधार असा शेष - हरेः प्रियचिकीर्षया अग्रतः भविता - परमेश्वराचे प्रिय करण्याच्या इच्छेने प्रथम अवतार घेईल. (२४)

स्वयंप्रकाश भगवान शेषसुद्धा, जे भगवंतांची कला असल्याकारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्र मुखे आहेत, ते भगवंतांचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील. (२४)



विष्णोर्माया भगवती यया सम्मोहितं जगत् ।
     आदिष्टा प्रभुणांशेन कार्यार्थे संभविष्यति ॥ २५ ॥
ऐश्वर्यशालिनी त्याच्या मायेने जग मोहिले ।
आज्ञा मानोनि त्याची ती जन्मेल अंशरूपिणी ॥ २५ ॥

यया जगत् संमोहितं - जिने सर्व जग मोहून टाकले आहे - सा भगवती विष्णोः माया - ती ऐश्वर्यसंपन्न विष्णूची योगमाया - प्रभुणा आदिष्टा - प्रभूने आज्ञा केलेली - अंशेन - अंशाने - कार्यार्थे संभविष्यति - त्याच कार्याकरिता जन्म घेईल. (२५)

जिने सार्‍या जगाला मोहित केले आहे, ती भगवंतांची ऐश्वर्यशालिनी योगमायासुद्धा, त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीलाकार्य संपन्न करण्यासाठी, अंशरूपाने अवतार घेईल. (२५)



श्रीशुक उवाच ।
इत्यादिश्यामरगणान् प्रजापतिपतिः विभुः ।
आश्वास्य च महीं गीर्भिः स्वधाम परमं ययौ ॥ २६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
स्वामी प्रजापतींचा तो आज्ञापी देवतास हे ।
धरेला समजावोनी स्वधामा पातले पुन्हा ॥ २६ ॥

प्रजापतिपतिः विभुः - मरीच्यादिक प्रजापतींचा स्वामी ब्रह्मदेव - इति अमरगणान् आदिश्य - याप्रमाणे देवगणांना आज्ञा करून - महीं च गीर्भिः आश्वास्य - आणि पृथ्वीला आपल्या भाषणाने आश्वासन देऊन - परमं स्वधाम ययौ - श्रेष्ठ अशा आपल्या स्थानाला निघून गेला. (२६)

श्रीशुकदेव म्हणतात - प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रह्मदेवांनी देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजून घालून तिला धीर दिला. त्यानंतर ते आपल्या परम धामाकडे गेले. (२६)

विवरण :- ब्रह्मदेव रुद्रासह, अनेक देवतांसह क्षीरसागराच्या तीरावर जाऊन विष्णूची स्तुती करतात - पुरुषं पुरुषसूक्तेन - त्याच्याच कर्णाने केलेली स्तुति ऐकून विष्णू (ब्रह्माचे मुखातून) दिव्य वाणीद्वारे आदेश देतात - पृथ्वीची व्यथा भगवंतास आधीपासूनच माहीत आहे. आता आपण यदुवंशात जन्म घ्या. तो वसुदेवाघरी जन्म घेऊन कालशक्तीद्वारा कृष्णरूपाने असुरांचा नाश करेल. देवांनी आपल्या स्त्रियांना त्याच्या सेवेस पाठवावे.
इथे एक प्रश्न पडतो - पृथ्वीला सर्व व्यथा असह्य होऊन ती ब्रह्माला सांगेपर्यंत भगवंतास माहीत असणे अशक्यच होते का ? तो तर सर्वज्ञ, त्याला हे अज्ञान कसे ? अशक्य कसे ? पण इथे एक व्यावहारिक तत्त्व लागू पडते. कोणतीही गोष्ट घडण्याची, तिचे योग्य ते फळ मिळण्याची वेळही यावी लागते. शिशुपालाला शासन होण्यास त्याच्या शंभर पापांचा घडा भरावयाची वाट भगवंतासही बघावीच लागली. रावणाचा वध करून पृथ्वीवरील अन्याय नष्ट करण्याआधी प्रभु रामचंद्रांना नुसती वाटच पहावी लागली. कौरवांच्या नाशासाठी पांडवांना वनवास भोगून १२-१३ वर्षे वाट पहावीच लागली. त्यामुळे पृथ्वीला पापांचा भार असह्य झाल्यानंतर मगच कृष्णावतार झाला.
भगवंतांनी पुढे आदेश दिला की ऋषींनी गोरूप घ्यावे, गोदोहनाने विष्णूला संतुष्ट करावे. विष्णूच्या मायेने त्यांची माया अंशावतार धारण करेल, आणि बलरामाचा जन्म होईल कृष्णाचा वडील भाऊ म्हणून. सर्व देवांना आज्ञा करून, पृथ्वीचे सांत्वन करून ब्रह्मा स्वधामी निघून गेले.
’परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ - स्वतः भगवंतांनी म्हटल्याप्रमाणेच कृष्णावताराचे हे कारण. अर्थातच हे सर्व पूर्वनियोजितच. त्याचप्रमाणे गोकुळातील गोधन, पशुधन, गोप-गोपी हे सुद्धा सर्वसाधारण नसून देवगण, ऋषिगण होते आणि विष्णू, ब्रह्मा यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या पुढील लीला घडून येणार होत्या. स्वतः बलरामही, जे पूर्वावतारात अनुजरूपाने रामाचे आज्ञापालक होते. त्यांनीही लीलेने आता अग्रजाचे रूप घेतले. एवढ्याच हेतूने असावे की आता थोडासा वडीलकीचा अधिकार गाजवायची लीला करून पहावी. श्रीकृष्ण त्यांना दादा, दादा म्हणून आपल्या मनाप्रमाणेच सर्व काही करवून घेत होते हा भाग वेगळा. (१९-२६)



शूरसेनो यदुपतिः मथुरां आवसन् पुरीम् ।
माथुरान् शूरसेनांश्च विषयान् बुभुजे पुरा ॥ २७ ॥
यदुवंशी शूरसेनो मथुरा मंडली तसे ।
शूरसेन अशा देशा शास्ता तो पूर्वकालिचा ॥ २७ ॥

पुरा यदुपतिः शूरसेनः - पूर्वी यादवांचा राजा शूरसेन - मथुरां पुरीं आवसन् - मथुरा नगरीत राहात - माथुरान् शूरसेनान् च विषयान् बुभुजे - मथुरेच्या जवळचे धेश व शूरसेन देश ह्या राज्यांचा उपभोग घेत असे. (२७)

पूर्वी यदुवंशी राजा शूरसेन मथुरानगरीत राहून माथुर शूरसेन या देशांवर राज्य करीत होता. (२७)



राजधानी ततः साभूत् सर्वयादव भूभुजाम् ।
मथुरा भगवान् यत्र नित्यं सन्निहितो हरिः ॥ २८ ॥
समस्त यदुवंशाची मथुरा राजधानि तै ।
भगवान् श्रीहरि तेथे विराजे नित्यचि स्थळी ॥ २८ ॥

ततः सा मथुरा - तेव्हांपासून ती मथुरा - सर्वयादवभूभुजां राजधानी अभूत् - सर्व यादवराजांची राजधानी झाली - यत्र भगवान् हरिः नित्यं सन्निहितः - ज्या ठिकाणी भगवान परमेश्वराचा नित्य वास असतो. (२८)

त्या वेळेपासून मथुरा ही सर्व यादवांची राजधानी झाली होती. भगवान श्रीहरी नेहमी तेथे विराजमान असतात. (२८)



तस्यां तु कर्हिचित् शौरिः वसुदेवः कृतोद्‌वहः ।
देवक्या सूर्यया सार्धं प्रयाणे रथमारुहत् ॥ २९ ॥
मथुरीं वसुदेवाचा विवाह जाहला तदा ।
वधू घेवोनि बैसे तो गेही जाण्यास त्या रथी ॥ २९ ॥

तस्यां तु - त्या मथुरेमध्ये तर - कर्हिचित् - एकदा - कृतोद्वाहं शौरिः वसुदेवः - नुकताच विवाह झालेला शूरसेनाचा पुत्र वसुदेव - सूर्यया देवक्या सार्धं - नवीन लग्न झालेली जी देवकी तिच्यासह - प्रयाणे रथं आरुहत् - आपल्या घरी जाण्याकरिता रथावर बसला. (२९)

एकदा शूरसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्य नवपरिणीत पत्‍नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. (२९)



उग्रसेनसुतः कंसः स्वसुः प्रियचिकीर्षया ।
रश्मीन् हयानां जग्राह रौक्मै रथशतैर्वृतः ॥ ३० ॥
उग्रसेनसुतो कंस चुलत बहिणीस त्या ।
प्रसन्न करण्या घेई घोड्यांचा दोर तो करी ।
रथ हाकी स्वयें तेंभा शेकडो रथ सोबती ॥ ३० ॥

रौक्मैः रथशतैः वृतः - सोन्याने मढलेल्या शेकडो रथांनी वेष्टिलेला - उग्रसेनसुतः कंसः - उग्रसेनाचा मुलगा कंस याने - स्वसुः प्रियचिकीर्षया - आपल्या बहिणीला संतुष्ट करण्याच्या इच्छेने - हयानां रश्मीम् जग्राह - रथाच्या घोड्यांचे लगाम आपल्या हातात घेतले. (३०)

उग्रसेनाचा पुत्र कंस, याने आपली चुलत बहीण देवकी हिला खूष करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले. (३०)



चतुःशतं पारिबर्हं गजानां हेममालिनाम् ।
अश्वानां अयुतं सार्धं रथानां च त्रिषट्शतम् ॥ ३१ ॥
दासीनां सुकुमारीणां द्वे शते समलंकृते ।
दुहित्रे देवकः प्रादात् याने दुहितृवत्सलः ॥ ३२ ॥
देवका सातवी पुत्री लाडकी बहु देवकी ।
निरोप तिजला देण्या रत्‍नांकितचि चारशे ॥ ३१ ॥
हत्ती नी अश्व ते तैसे सहस्र पंधरा पहा ।
आठराशे रथो तैशा दोनशे दासिही दिल्या ॥ ३२ ॥

पारिबर्हं हेममालिनां गजानां चतुःशतं - आंदण म्हणून सोन्याने अलंकृत चारशे हत्ती - अश्वानां सार्धं अयुतं - पंधरा हजार घोडे - रथानां त्रिषटशतं - अठराशे रथ - सुकुमारीणां दासीनां च समलंकृते द्वे शते - आणि सुंदर अलंकार घतलेल्या दोनशे सुंदर दासी - दुहितृवत्सलः देवकः - कन्येवर प्रेम करणार्‍या देवकाने - देवक्याः याने - देवकी जाऊ लागली असता - दुहित्रे प्रादात् - कन्येला दिले. (३१,३२)

देवकाचे (देवकीचा पिता) आपल्या कन्येवर प्रेम होते, म्हणून तिला सासरी पाठविते वेळी त्याने तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले चारशे हत्ती, पंधरा हजार घोडे, अठराशे रथ तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित दोनशे सुकुमार दासी हुंड्याच्या रूपाने दिल्या. (३१-३२)



शंखतूर्यमृदंगाश्च नेदुः दुन्दुभयः समम् ।
प्रयाणप्रक्रमे तावत् वरवध्वोः सुमंगलम् ॥ ३३ ॥
पथि प्रग्रहिणं कंसं आभाष्य आह अशरीरवाक् ।
अस्यास्त्वां अष्टमो गर्भो हन्ता यां वहसे अबुध ॥ ३४ ॥
निरोप समयी वाद्ये शंख भेर्‍या तुतारि नी ।
मृदंग भेरिनादाने मांगल्य गीत गायिले ॥ ३३ ॥
थाटात चालता ऐसे कंसा संबोधुनी तदा ।
आकाशवाणि ती झाली मूर्खा तू रथि बैसला ।
तिचा तो आठवा पुत्र मारील तुज ठार की ॥ ३४ ॥

तावत् वरवध्वोः प्रयाणप्रक्रमे - त्यावेळी वधूवर जावयास निघाले असता - शंखतूर्यमृदंगाः दुंदुभयः च - शंख, तुतार्‍या, मृदंग व नगारे ही सर्व - सुमंगलं समं नेदुः - मंगलकारक वाद्ये एकाच वेळी वाजू लागली. (३३) पथि प्रग्रहिणं कंसं आभाष्य - तेवढ्यात रस्त्यात लगामाच्या दोर्‍या हातात घेतलेल्या कंसाला उद्देशून - अशरीरवाक् आह - एक आकाशवाणी झाली आणि म्हणाली, - अबुध ! यां वहसे - हे मूर्खा, तू जिला रथात वाहून नेत आहेस - अस्याः अष्टमः गर्भः त्वां हंता - हिचा आठवा गर्भ तुला ठार करणार आहे. (३४)

निघण्याच्या वेळी वर-वधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदंग आणि दुंदुभी वाजू लागल्या. वाटेमध्ये ज्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवीत होता, त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की, अरे मूर्खा ! जिला तू रथात बसवून घेऊन चालला आहेत, तिचा आठवा पुत्र तुला मारील. (३३-३४)



इत्युक्तः स खलः पापो भोजानां कुलपांसनः ।
भगिनीं हन्तुमारब्धः खड्गपाणिः कचेऽग्रहीत् ॥ ३५ ॥
कंस तो थोर पापी नी न सीमा दुष्टतेस त्या ।
कलंक भोजवंशाचा ऐकता वाणि ही अशी ।
काढिले खड्ग नी वेणी धरिली मारण्या वधू ॥ ३५ ॥

इति उक्तः - या प्रमाणे बोलला गेलेला - भोजानां कुलपांसनः सः पापः खलः - आणि भोजकुलाला कलंक लावणारा तो पापी दुष्ट कंस - भगिनीं हंतुं आरब्धं - बहिणीला ठार मारण्यास सिद्ध झाला - खड्गपाणिः तां कचे अग्रहीत् - आणि हातात तलवार घेऊन त्याने तिचे केस धरले. (३५)

कंस अत्यंत पापी व दुष्ट होता, तो भोजवंशाला कलंकच होता. आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला. (३५)

विवरण :- कृष्णावताराच्या या पार्श्वभूमीनंतर मूळ कथेचा प्रारंभ मधुरापुरीचा राजा यदुपती शूरसेन - त्याचा मुलगा वसुदेव. विवाहानंतर नवोढा देवकीसह रथारूढ होऊन आपल्या नगरीस निघाला. देवकीचा भाऊ कंस (हा चुलत बंधू होता) याने मोठ्या प्रेमाने त्या रथाच्या घोड्यांचे लगाम हाती घेतले. देवकीला हुंड्यादाखल भरपूर धन - हत्ती, रथ, घोडे, दास-दासी देण्यात आले होते. या सर्वांसह बहिणीला सासरी धाडणारा कंस अगदी आनंदात होता. पण एका अशरीरी वाणीने त्याला सावध केले. ’ज्या बहिणीला तू आनंदाने सासरी पाठवीत आहेस तिचे आठवे अपत्य तुला ठार करेल’ हे ऐकून तो मूर्ख, अविवेकी कंस बहिणीला ठार मारायला हाती खड्ग घेऊन धाऊन गेला. पण त्या क्रूर कंसाला विवेकी, बुद्धिमान् वसुदेवाने अडविले अन् त्याची समजून घातली.

एका वाणीने केवढा हा बदल ! किंचित्‌ही विचार न करता कंस देवकीला ठार मारायला धावला - इतकाही विचार नाही की आठवे अपत्य - तोपर्यंत धीराने वाट पाहू, विचार करू. संयम, धैर्य, विचारीपणा हे खर्‍या पुरुषाचे लक्षण की जी लक्षणे वसुदेवाकडे दिसून येतात. (२७-३३)

प्रसंग म्हटले तर साधाच, परंतु कंसाच्या व्यक्तिरेखेवर, सर्व कथानकावर आणि एकूणच पुढच्या सर्व अनर्थांचा इथे सूत्रपात झालेला दिसून येतो. तसे पाहिले तर कंस राजघराण्यातला. राजाची, राजपुत्राची बुद्धी धीरगंभीर, समतोल असणे आवश्यक; नव्हे त्याला हे गुण वंशपरंपरेनेच मिळालेले असतात. सारासार विवेक त्याच्याजवळ हवाच. क्षणापूर्वी नवोढा वहिणीच्या रथाच्या घोड्याचे लगाम हाती धरून तिला आनंदाने सासरी पाठविण्याची तयारी करणारा भाऊ दुसर्‍या क्षणी त्याच बहिणीला यमसदनी पाठवायला तयार होतो, हे कशाचे लक्षण ?

कंस भले शूर असेल, पण ते शौर्य वहिणीपुढे ? स्त्रीपुढे ? युद्धामधे - निर्णायक प्रसंगीही स्त्रीशी लढायला पितामह भीष्मांनी नकार दिला, त्यामुळे आपले मरण ओढवणार हे माहीत असूनही - मग इथे तर दिल्ली अजून खूपच दूर होती. आत्ता कुठे विवाह झाला. बहिणीचे आठवे अपत्य त्याचा काळ बनणार होते. मग आत्ताच तिचा वध का ? अर्थात् ’मूले कुठारः’ या न्यायाने देवकीलाच मारले, तर तिचे आठवे अपत्य जन्मणेच शक्य नाही. ’न रहेगा बांस न बजेगी बांसुरी’ हाही विचार कंसाने केला असेल. परंतु स्त्री, त्यातून बहिण आणि भविष्यवाणीचा काल, या सर्वांचा विचार करून कंसाने केलेली कृती त्याचा अविचारच दाखविणारी आहे हे दिसून येते. म्हणूनच शुकमुनीही त्याचे वर्णन ’खलः’, ’पापः’, ’कुलपांसनः’ असेच करतात. मात्र एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की, कपटी, दुष्ट मनुष्य वरवर कितीही क्रूर, स्वार्थी, मतलबी असला तरी मनातून तो तितकाच भीरु असतो. कारण त्याच्या वागण्याला सत्याचा पाया नसतो. मृत्यूची भीति नेहमीच त्याला अस्थिर, असुरक्षित बनवीत असते. म्हणूनही कंस इथे हत्यारा बनला असावा. (३४-३५)



तं जुगुप्सितकर्माणं नृशंसं निरपत्रपम् ।
वसुदेवो महाभाग उवाच परिसान्त्वयन् ॥ ३६ ॥
क्रूर तो करिता पापे निर्लज्ज जाहला असे ।
पाहोनी क्रोध तो त्याचा बोलले वसुदेव ते ॥ ३६ ॥
वसुदेव म्हणाले -

महाभागः वसुदेवः - उदारबुद्धीचा वसुदेव - तं जुगुप्सितकर्माणं नृशंसं - त्या निंद्य कर्म करणार्‍या घातकी - निरपत्रपं परिसांत्वयन् उवाच - व निर्लजा कंसाला शांत करण्याकरता म्हणाला – (३६)

तो क्रूर, निलज्जपणे निंद्यकर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाले. (३६)



श्रीवसुदेव उवाच ।
श्लाघनीयगुणः शूरैः भवान् भोज-यशस्करः ।
स कथं भगिनीं हन्यात् स्त्रियं उद्‌वाहपर्वणि ॥ ३७ ॥
राजपुत्रा कुळाची ती कीर्तीच नित्य वाढवी ।
प्रशंसिती तुला वीर भगिनी वधिसी कसा ॥ ३७ ॥

शूरैः श्लाघनीयगुणः - शूर पुरुषांनी ज्याच्या गुणांची प्रशंसा करावी असा - भोजयशस्करः सः भवान् - भोजकुलाला कीर्तिमान करणारा तू - उद्वाहपर्वणि - या विवाहप्रसंगी - स्त्रियं भगिनीं कथं हन्यात् ? - स्त्रीजातीला व त्यातही भगिनीला कसा मारतोस ? (३७)

वसुदेव म्हणाले - तू भोजवंशाची कीर्ति वाढविणारा आहेस. अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ति गातात. असे असता एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला या विवाहाच्या शुभसमयी मारायला तू कसा तयार झालास ? (३७)



मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते ।
अद्य वाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः ॥ ३८ ॥
वीरश्रेष्ठा ठवे मृत्यू जन्मतो प्राणि तेधवा ।
आज वा शतवर्षाने मृत्यू होणार तो खरा ॥ ३८ ॥

वीर ! - हे पराक्रमी कंसा ! - जन्मवतां मृत्युः देहेन सह जायते । - जन्मास आलेल्या प्राण्याला मृत्यू हा देहाबरोबरच उत्पन्न होतो - अद्य वा अब्दशतांते वा - मग तो आज का शंभर वर्ष झाल्यानंतर काय - प्राणिनां मृत्युः वै ध्रुवः । - खरोखरच प्राण्यांना मृत्यू हा ठरलेलाच आहे. (३८)

हे वीरा ! जे जन्म घेतात, त्यांच्या शरीराबरोबरच मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो. आज किंवा शंभर वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे. (३८)



देहे पञ्चत्वमापन्ने देही कर्मानुगोऽवशः ।
देहान्तरं अनुप्राप्य प्राक्तनं त्यजते वपुः ॥ ३९ ॥
मृत्यू येता तदा घेतो दुसरा देह साजिरा ।
सोडता पाहिला देह मोहाने घडते असे ॥ ३९ ॥

कर्मानुगः अवशः देही - कर्माच्या अनुषंगाने जाणारा पराधीन जीव - देहे पंचत्वं आपन्ने - देह मृत्यूप्रत प्राप्त झाला असताही - देहांतरं अनुप्राप्य - दुसर्‍या देहाप्रत प्राप्त होऊन - प्राक्तनं वपुः त्यजते । -पूर्वीचे शरीर टाकतो. (३९)

जेव्हा शरीराचा अंत होतो, तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो आणि आपले पहिले शरीर सोडतो. त्याची इच्छा नसली तरी त्याला असे करावेच लागते. (३९)



व्रजन् तिष्ठन् पदैकेन यथैवैकेन गच्छति ।
यथा तृणजलूकैवं देही कर्मगतिं गतः ॥ ४० ॥
चालता ठेवणे पाय उचली तो दुजा पुन्हा ।
तसाचि ठरतो देह नवा नी त्यजिणे जुना ॥ ४० ॥

यथा व्रजन् पुरुषः - जसा चालणारा पुरुष - एकेन पदा तिष्ठन् -एका पायाने उभा राहात - एकेन एव गच्छति - एका पायानेच पुढे जातो - यथा तृणजलूका - जशी गवतावरील जळू (एका पायानेच पुढे जाते) - एवं कर्मगतिं गतः देही करोति । - त्याचप्रमाणे कर्मानुसार मिळालेल्या गतीला प्राप्त झालेला जीव कार्य करतो. (४०)

ज्याप्रमाणे चालतेवेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवूनच दुसरा उचलतो, किंवा जशी अळी दुसरी गवताची काडी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते, त्याचप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो. (४०)

विवरण :- वसुदेवाचे व्यक्तिमत्त्व मात्र विवेकी, विचारी व धीरोदात्त दिसून येते. तोही शूरच होता, राजघराण्यातील होता. आपल्या पत्‍नीवर तिचा भाऊ वार करतो हे पाहून तोही खड्ग उगारू शकला असता. परंतु तो कंसाला अडवून त्याला उपदेश करतो. इथून पुढे वसुदेवाने जे सांगितले, ते म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचाच गाभा; जे सर्व जगास वंद्य अशा भगवद्‌गीतेचा मूलमंत्र आणि वैश्विक सत्यच (universal truth) आहे, जे त्रिकालाबाधीत (eternal) आहे. यावरून त्याच्या व्यक्तिरेखेचा सुसंस्कृतपणा व्यक्त होतो. कंसाला तो म्हणतो - ’अरे, तू इतका शूर अन् मृत्यूला घाबरतोस ? मृत्यू तर मानवासोबतच जन्माला येतो. तो अटळ आहे हे नक्की - (जातस्य हि ध्रुवो मृत्यू). मृत्यू हेच सत्य आहे, बाकीचे सारे भासमान आहे. जिवासवे जने मृत्यू, जोड जन्मजात । दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत ॥ (’वीर्याणि तस्य अखिल’ या ७ व्या श्लोकात काहीसा असाच विचार मांडला आहे.) ज्याप्रमाणे जीर्ण झालेले वस्त्र टाकून मनुष्य नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा दुसरे शरीर धारण करतो (वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोऽपराणि । ) वसुदेवाने यापुढे एक सुंदर दृष्टान्त दिला आहे, चालताना मनुष्य एक पाय पुढे ठेवतो आणि मग मागचा पाय उचलतो - व्रजांस्तिष्ठेनेकेन पदेन - त्याचप्रमाणे मानवाचे पाहिले शरीर नष्ट होते आणि त्याला कृतकर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त होते. म्हणजेच, जे जे दृश्य, वर्धमान आहे ते नाशाकडे जाते (वर्धमान ते ते चाले, मार्ग रे क्षयाचा) - पुन्हा निर्माणही होते. (३६-४०)



स्वप्ने यथा पश्यति देहमीदृशं
     मनोरथेन अभिनिविष्टचेतनः ।
दृष्टश्रुताभ्यां मनसानुचिन्तयन्
     प्रपद्यते तत् किमपि ह्यपस्मृतिः ॥ ४१ ॥
( इंद्रवज्रा )
स्वप्नात भोगी तनु इंद्रराज्य
     स्वप्नात दारिद्र्य भुलोनी जातो ।
तसेचि देहा पहिल्या त्यजीता ।
     नव्या तनूने विसरोनि जातो ॥ ४१ ॥

यथा - ज्या प्रमाणे - दुष्टश्रुताभ्यां विषयाभ्यां - पाहिलेल्या आणि ऐकिलेल्या विषयांच्या योगाने - मनसा अनुचिन्तयन् - मनाने चिंतन करणारा मनुष्य - मनोरथेन अभिनिविष्टचेतनः - त्या विषयांच्या इच्छेने मन भरून गेले आहे असा होत्साता - तत् प्रपद्यते - त्या त्या विषयाला मिळवितो - स्वप्ने च - आणि स्वप्नामध्ये - अपस्मृतिः हि - पूर्वीच्या स्थितीचा विसर पडला आहे असा - ईदृशं किं अपि देहं पश्यति । - त्या चिंतलेल्या विषयांसारखा काही विषय जीव पाहतो. (४१)

ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर्य पाहून आणि इंद्रादिकांचे ऐश्वर्य ऐकून मनाने त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीत त्याच गोष्टींमध्ये गुंतून त्यांच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नामध्ये स्वतः राजा किंवा इंद्र बनतो आणि आपले मूळ स्वरूप विसरतो. त्याचप्रमाणे जीव कर्मानुसार कामना करून दुसर्‍या शरीराला जाऊन मिळतो आणि पहिल्या शरीराला विसरतो. (४१)



यतो यतो धावति दैवचोदितं
     मनो विकारात्मकमाप पञ्चसु ।
गुणेषु मायारचितेषु देह्यसौ
     प्रपद्यमानः सह तेन जायते ॥ ४२ ॥
विकारपुंजो मन या जिवाचे ।
     संचीत कर्मे मग मोहि गुंते ।
तल्लीनतेने स्मरता स्वताला ।
     तो जन्म लाभे पुढती तयाला ॥ ४२ ॥

दैवचोदितं विकारात्मकं मनः - दैवाने प्रेरणा केलेले विकारात्मक मन - मायारचितेषु पंचसु गुणेषु - मायेने रचलेल्या पाच भूतांपैकी - यतः यतः धावति - ज्या ज्या शरीराकडे धावते - आप च - आणि ज्या शरीराला जाऊन पोचते - तत् प्रपद्यमानः असौ देही तेन सह जायते । - ते बनणारा हा जीव त्या देहासह जन्मास येतो. (४२)

देहांताच्या वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पांचभौतिक शरीरांकडे धावता धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते, तेच शरीर ग्रहण करते आणि त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो. (४२)



ज्योतिर्यथैव उदकपार्थिवेष्वदः ।
     समीरवेगानुगतं विभाव्यते ।
एवं स्वमायारचितेष्वसौ पुमान् ।
     गुणेषु रागानुगतो विमुह्यति ॥ ४३ ॥
जळात जैसे प्रतिबिंब हाले ।
     तरंग येता गमते मनासी ।
अज्ञान योगे त‍इ क्रोध काम ।
     मानी विकारे अपुलाचि देह ॥ ४३ ॥

यथा एव - अथवा ज्याप्रमाणे - अदः ज्योतिः - हा तेजोगोल - उदकपार्थिवेषु - पाण्याने भरलेल्या भांड्याने - समीरवेगानुगतं विभाव्यते - वायूच्या वाहण्याच्या वेगाना अनुसरून हालल्यासारखा दिसतो - एवं असौ पुमान् - त्याप्रमाणे हा पुरुष - स्वामायारचितेषु गुणेषु -आपल्या मायेने रचलेल्या विषयांच्या ठिकाणी - रागानुगतः विमुह्यति । - प्रेमाच्या स्वाधीन होऊन मोह पावतो. (४३)

ज्याप्रमाणे सूर्य-चंद्रादि वस्तू पाणी, तेल इत्यादि द्रव पदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वार्‍याने द्रवपदार्थ हलल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूसुद्धा हलताना दिसतात, त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरांवर प्रेम करून ते आपणच आहे, असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या-जाण्याला आपले येणे-जाणे मानू लागतो. (४३)



तस्मात् न कस्यचिद् द्रोहं आचरेत् स तथाविधः ।
आत्मनः क्षेममन्विच्छन् द्रोग्धुर्वै परतो भयम् ॥ ४४ ॥
( अनुष्टुप् )
कल्याण इच्छितो तेणे द्रोह तो सोडणे पहा ।
कर्माच्या अधिनी जीव तेणे त्या भय राहते ॥ ४४ ॥

तस्मात् तथाविधः सः - म्हणून तशाप्रकारच्या त्या पुरुषाने - आत्मनः क्षेमं अन्विच्छन् - स्वतःच्या कल्याणाची इच्छा असल्यास - कस्यचित् द्रोहं न आचरेत् - कोणाचाही द्वेष करू नये - वै - खरोखर - द्रोग्धुः परतः भयं अस्ति । - द्वेष करणार्‍यालाच दुसर्‍याकडून भय असते. (४४)

म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते, त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नये. कारण जीव कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील, त्याला या जीवनात शत्रूकडून आणि जीवानंतर परलोकापासून भय असतेच. (४४)



एषा तव अनुजा बाला कृपणा पुत्रिकोपमा ।
हन्तुं नार्हसि कल्याणीं इमां त्वं दीनवत्सलः ॥ ४५ ॥
कंसा दीन तशी सान बहीण तुझि ही पहा ।
तुला कन्येपरी साजे आत्ताच लग्न जाहले ।
मांगल्य चिन्हही ताजे प्रेमळे वधिणे कशी ॥ ४५ ॥

एषा कृपणा तव अनुजा बाला - ही दीन अशी तुझी धाकटी बहीण - पुत्रिकोपमा अस्ति - बाहुलीप्रमाणे आहे - दीनवत्सलः त्वं - दीनांवर दया करणारा तू - इमां कल्याणीं हंतुं न अर्हसि । - या निरपराध मुलीला मारणे तुझ्यासारख्याला योग्य नव्हे. (४५)

ही तुझी धाकटी बहीण अजून लहान असून बिचारी बाहुलीसारखी दीन झाली आहे. म्हणून तुझ्यासारख्या दीनवत्सल पुरुषाने ह्या बिचारीचा वध करणे बरे नव्हे ! (४५)

विवरण :- आपल्या बोलण्याला वसुदेवाने एक सुंदर उदाहरणाची पुष्टी दिली. वास्तविक मनुष्याचे शरीर आणि मनोरथ, स्वप्न यामधे मनुष्याचे शरीर वास्तव आहे. पण स्वप्नामध्ये, मनोराज्यामध्ये मनुष्य शरीराचे अस्तित्व विसरतो आणि विकारी मन नेईल तिकडे आणि तसे धावत जातो. तेच सर्व त्याला खरे वाटते. तो आपल्या मनातील पाप-पुण्य, सुखदुःखादि विकारांना खरे मानतो आणि हवा तसा आकार धारण करतो. ज्याप्रमाणे सूर्य स्थीर असतो, पण हलणार्‍या पाण्यातील त्याचे प्रतिबिंब हलत असते, अस्थिर असते. त्या अस्थिर प्रतिबिंबालाच मनुष्य मोहाने सत्य मानतो, वास्तव मानतो. त्याचप्रमाणे स्वप्नातील आपल्या विकारी शरीरालाच तो मोहाने वास्तव अज्ञानाने मानतो, म्हणूनच विकार, द्रोह, द्वेष या विकारांना सोडून दे. त्यामुळे तुझे कल्याणच होईल. विकारी, संशयी माणसालाच दुसर्‍याची भीति वाटते. (द्रोग्धुर्वै परतो भयम्) - तू भीति सोडून दे. या तुझ्या बहिणीला मारू नको. हे दीनवत्सला तिला सोड. (४१-४५)



श्रीशुक उवाच ।
एवं स सामभिर्भेदैः बोध्यमानोऽपि दारुणः ।
न न्यवर्तत कौरव्य पुरुषादान् अनुव्रतः ॥ ४६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
भेद साम भयो नीती बोलले वसुदेव ते ।
परी राक्षसिवृत्तीचा संकल्प कंस सोडिना ॥ ४६ ॥

कौरव्य ! - हे परीक्षिता ! - एवं सामभिः भेदैः च - याप्रमाणे सामाच्या व भेदाच्या गोष्टी सांगून - बोध्यमानः अपि - समजाविले असताही - दारुणः सः - अतिदुष्ट असा तो कंस - पुरुषादान् अनुव्रतः - राक्षसांचे अनुकरण करीत - न न्यवर्तत । - मारण्यापासून निवृत्त झाला नाही. (४६)

श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता ! वसुदेवांनी अशा प्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजाविले. परंतु तो क्रूर, राक्षसांच्या मताप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही. (४६)



निर्बन्धं तस्य तं ज्ञात्वा विचिन्त्यानकदुन्दुभिः ।
प्राप्तं कालं प्रतिव्योढुं इदं तत्रान्वपद्यत ॥ ४७ ॥
मृत्युर्बुद्धिमतापोह्यो यावद्‍बुद्धिबलोदयम् ।
यद्यसौ न निवर्तेत नापराधोऽस्ति देहिनः ॥ ४८ ॥
विकट हट्ट पाहोनी कंसाचा वसुदेवजी ।
प्रसंग टाळण्या ऐशा निश्चयाप्रत पोचले ॥ ४७ ॥
बुद्धीनी बळ लावोनी चतुरे मृत्यु टाळणे ।
प्रयत्‍ने नटळे तेंव्हा दोष ना मानणे तदा ॥ ४८ ॥

आनकदुंदुभिः - वसुदेव (हे त्याचे दुसरे नाव) - तस्य तं निर्बंधं ज्ञात्वा विचिंत्य - त्या कंसाचा तो निर्धार जाणुन् आणि मनात विचार करून - प्राप्तं कालं प्रतिव्योढुं - प्राप्त झालेल्या प्रसंगाला टाळण्याकरिता - तत्र इदं अन्वपद्यत । - त्याने एक वेगळा उपाय योजायचे ठरविले. (४७) बुद्धिमता - त्याने विचार केला की बुद्धिमान पुरुषाने - यावत् बुद्धिबलोदयं - जोपर्यंत आपली बुद्धी व शक्ती चालेल तोपर्यंत - मृत्युः अपोह्यः -मृत्यू दूर सारला पाहिले - एवं अपि यदि असौ न निवर्तेत - इतके करून जर तो मृत्यू टळला नाही - तर्हि - तर - देहिनः अपराधः न अस्ति । - प्राण्याला क्काही दोष लागत नाही. (४८)

कंसाचा हा हट्ट पाहून वसुदेवांनी विचार केला की, कोणत्याही प्रकारे ही वेळ तर टाळली पाहिजे. तेव्हा त्यांनी ठरविले की, "जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे, तो पर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. प्रयत्‍न करूनही जर तो टळला नाही, तर त्यात प्रयत्‍न करणार्‍याचा काही दोष नाही. (४७-४८)



प्रदाय मृत्यवे पुत्रान् मोचये कृपणां इमाम् ।
सुता मे यदि जायेरन् मृत्युर्वा न म्रियेत चेत् ॥ ४९ ॥
पुत्र कंसास देण्याच्या वचने वाचवू हिला ।
पुत्र ते जन्मण्या पूर्वी कंस ही मरुही शके ॥ ४९ ॥

मृत्यवे पुत्रान् प्रदाय - कंसरूपी प्रत्यक्ष मृत्यूला आपले पुत्र देऊन - कृपणां इमां मोचये । - दीन अशा हिला सोडवतो. - यदि मे सुताः जायेरन् - जर मुला मुलगे होतील - मृत्युः वा न म्रियेत चेत् - आणि प्रस्तुत प्रत्यक्ष हा मृत्यूरूपी कस जर मरणार नाही, (असे घडले) (४९)

म्हणून या मृत्युरूप कंसाला आपले पुत्र देऊन या बिचारीला वाचवावे. जर मला पुत्र झाले, आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही तर (निदाह ही तरी वाचेल). (४९)



विपर्ययो वा किं न स्याद् गतिर्धातुः दुरत्यया ।
उपस्थितो निवर्तेत निवृत्तः पुनरापतेत् ॥ ५० ॥
संभवे उलटे ऐसे पुत्र मारील याजला ।
पार न विधि संकेता टळता नटळे कधी ॥ ५० ॥

वा अत्र विपर्ययः किं न स्यात् । - वा यामध्ये काही उलटेसुलटे कशावरून होणार नाही - धातुः गतिः दुरत्यया - कारण दैवगति तर उल्लंघविणे कठीण आहे - उपस्थितः मृत्युः निवर्तेत - कदाचित् अगदी जवळ येऊन ठेपलेला मृत्यू टळेल - निवृतः पुनः आपतेत् । - वा टळलेला मृत्यू ताबडतोब प्राप्त होईल. (५०)

न जाणो उलटही होईल. कारण विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे. प्रसंगी मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेला सुद्धा परत येतो. (५०)



अग्नेर्यथा दारुवियोगयोगयोः
     अदृष्टतोऽन्यन्न निमित्तमस्ति ।
एवं हि जन्तोरपि दुर्विभाव्यः
     शरीर संयोगवियोगहेतुः ॥ ५१ ॥
( इंद्रवज्रा )
वनात अग्नि जधि पेटतो तै
     समीप वा ते दुरचे जळावे ।
न कोणि जाणी हरिच्या विना ते
     तसेच मृत्यू अन जन्म याचे ॥ ५१ ॥

यथा अग्नेः दारुवियोगयोगयोः निमित्तं - जसे अग्नीच्या काष्ठाशी होणार्‍या संयोगाचे व वियोगाचे कारण - अदृष्टतः अन्यत् न अस्ति, -दैवाशिवाय दुसरे नाही - एवं हि - अगदी त्याप्रमाणे - जंतोः अपि शरीर संयोगवियोगहेतुः दुर्विभाव्यः । - प्राण्याच्याही शरीराशी होणार्‍या संयोगाचे वा वियोगाचे कारण जाणण्यास कठीण आहे. (५१)

ज्यावेळी जंगलात आग लागते, त्यावेळी कोणते लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही, या गोष्टीला अदृष्टाशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही. त्याचप्रमाणे प्राण्याचा शरीराशी होणारा संयोग व वियोग यांचे कारण कळणे अत्यंत अवघड आहे." (५१)



एवं विमृश्य तं पापं यावद् आत्मनिदर्शनम् ।
पूजयामास वै शौरिः बहुमानपुरःसरम् ॥ ५२ ॥
( अनुष्टुप् )
निश्चये वासुदेवाने बुद्धीनुसार आपुल्या ।
सन्माने पापि कंसाच्या प्रशंसा केलि ही असे ॥ ५२ ॥

एवं - याप्रमाणे - यावत् आत्मदर्शनं विमृश्य, - आपल्या ज्ञानाच्या मर्यादेनुसार विचार करून शौरिः - वसुदेव (हे त्याचे आणखी एक नाव) - तं पापं - त्या पापी कंसाला - बहुमानपुरःसरं वै पूजयामास । - खरोखर मोठ्या मानाने स्तवन करता झाला. (५२)

आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवांनी अत्यंत सन्मानपूर्वक त्या दुष्ट कंसाची अतिशय प्रशंसा केली. (५२)

विवरण :- कथेचा धागा पुढे नेत श्रीशुकदेव सांगतात - इथे वसुदेवाने कंसाला ’दीनवत्सल’ म्हटले, हे कसे ? पण साम, दान, भेद आणि दंड या नीतिनुसार ते योग्यच आहे. कारण वसुदेवाला पुढचा अनर्थ टाळायचा शेवटचा प्रयत्‍न म्हणून. जसे वालीपुत्र अंगदाला श्रीरामांनी लंकेला पाठविले होते त्याप्रमाणे कोणताच उपाय चालला नाही तर युद्ध अटळच असतेच, त्याप्रमाणे.
मात्र इतके करूनही कंसाने ऐकले नाहीच. तो त्या मनःस्थितीतही नव्हता. चाणाक्ष व विवेकी वसुदेवाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सध्यातरी रक्तपात टाळण्याचा प्रयत्‍न करू; मग पुढचे पुढे - असा विचार करून ’सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः’ या न्यायाने तडजोड करून पाहण्यासाठी आपली होणारी मुले कंसाला देण्याचे ठरविले. इथेही वसुदेवाची काहीशी कूटनीतिच दिसते, की तिचा अवलंब पुढे स्वतः श्रीकृष्णानेही केलेले आढळते. बलाढ्य कालयवनाला प्रत्यक्ष युद्धात पराभूत करणे अशक्य होते; त्यामुळे श्रीकृष्णाने त्याला हलवून दूर नेले. कृष्णाच्या या कृत्यानेच त्याचे नाव ’रणछोडदास’ पडले.
वसुदेवाला होणारी मुले कंसाला देण्याचे मान्य केले यात त्याने असा विचार केला की सगळे मुलगेच होतील कशावरून ? अर्थात आकाशवाणीस् तसा स्पष्ट उलीख नव्हताही. तेथे ’गर्भ’ हा शब्द वापरला होता. दरम्यानच्या काळात कंस मरणारच नाही कशावरून ? माझी मुलेही त्याला मारू शकतील. इथे ’अशुभस्य कालहरणम्’ या नीतिचा वसुदेवाने अवलंब केलेला दिसतो. त्याला आणखी वाटले, कोणाचाही मृत्यू केव्हा, कसा आणि कोठे होईल हे कुणी सांगावे ? इथे शुकमुनि उदाहरण देऊन सांगतात् - जंगलात लागलेल्या आगीमध्ये लांबवरची झाडे व इतर गोष्टी जळून जातात आणि कधी योगायोगाने जवळचीच झाडे आश्चर्यकारकरित्या वाचतातही. याला तर्क लावण्यापेक्षा अदृष्टाची इच्छा केच कारण असते.
वसुदेवाला आणखी वाटते - कदाचित् उलटेही होण्याची शक्यता आहेच. ’बलीयसी केवल योगेश्वरेच्छा’ - तिचा अंत कोणासही लागत नाही. तेच सत्य. मार्कंडेयासमोर प्रत्यक्ष मृत्यू उभा ठाकला. पण त्याने मृत्यूला जिंकले आणि अमरत्वाचे वरदान मिळूनही हिरण्यकशिपू मरण पावला. ईश्वरेच्छेचीच ही उदाहरणे. इथे तर्क चालत नाही. अशा परिस्थितीत मृत्यू टाळण्याचा प्रयत्‍न तर करावा. आणि इतके करूनही मृत्यू जर टळलाच नाही, तर मग ’प्रयत्‍नच केला नाही’ हा दोष लागत नाही. (४६-५२)



प्रसन्न वदनाम्भोजो नृशंसं निरपत्रपम् ।
मनसा दूयमानेन विहसन् इदमब्रवीत् ॥ ५३ ॥
परीक्षित् क्रूर निर्लज्ज कंस तो असल्यामुळे ।
त्रासले वसुदेवो ते तरी हास्यचि दाविले ॥ ५३ ॥

दूयमानेन मनसा - खरे तर दुःखित झालेल्या अंतःकरणाने - प्रसन्नवदनांभोज सः - पण आपले मुखकमळ प्रसन्न ठेऊन - विहसन् - हसत हसत - निरपत्रपं नृशंसं - निर्लज्ज व घातकी अशा कंसाला - इदं अब्रवीत् । - असे म्हणाला. (५३)

कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता, म्हणून असे करतेवेळी वसुदेवांच्या मनाला क्लेश होत होते, तरीसुद्धा त्यांनी वरवर आपला चेहरा प्रफुल्लित करीत, हसत हसत ते म्हणाले, (५३)



श्रीवसुदेव उवाच ।
न ह्यस्यास्ते भयं सौम्य यद् वाक् आहाशरीरिणी ।
पुत्रान् समर्पयिष्येऽस्या यतस्ते भयमुत्थितम् ॥ ५४ ॥
वसुदेव म्हणाले -
सौम्या रे ! तुजला नाही देवकीभय ते मुळी ।
भय त्या आठ पुत्रांचे तरी ते तुज देइ मी ॥ ५४ ॥

सौम्य ! - हे शांत स्वभावाच्या कंसा - सा अशरीरवाक् - ती आकाशवाणी - यत् हि आह - जे काही बोलली त्याप्रमाणे - अस्याः ते वै भयं न । - हिच्यापासून तर तुला खरोखर भय नाही - यतः ते भयं उत्थितं - ज्याच्यापासून (म्हणजे हिच्या पुत्रापासून) तुला भय उपस्थित झाले आहे - तान् अस्याः पुत्रान् समर्पयिष्ये । - ते हिचे पुत्र मी तुला अर्पण करीन. (५४)

वसुदेव म्हणाले - हे सौम्य ! आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भिती नाही. भय तर पुत्रापासून आहे, म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपवीन. (५४)



श्रीशुक उवाच ।
स्वसुर्वधात् निववृते कंसः तद्वाक्यसारवित् ।
वसुदेवोऽपि तं प्रीतः प्रशस्य प्राविशद् गृहम् ॥ ५५ ॥
श्रीशुकदेव म्हणतात् -
कंस तो जाणिता चित्ती बोल यांचे असत्य ना ।
सुसंगतचि जाणोनी सोडिले देवकीस त्या ।
प्रसन्ने वसुदेवाने देवकी आणिली घरा ॥ ५५ ॥

तत् वाक्यसारवित् कंसः - वसुदेवाच्या त्या भाषणातील तात्पर्य जाणून कंस - स्वसुः वधात् निववृते - बहिणीच्या वधापासून परावृत्त झाला - वसुदेवः अपि प्रीतः - वसुदेवही संतुष्ट झाला - तं प्रशस्य गृहं प्राविशत् । - आणि त्याची प्रशंसा करून तो आपल्या घरी गेला. (५५)

श्रीशुकदेव म्हणतात - वसुदेव खोटे बोलणार नाही, हे कंस जाणून होता म्हणून त्याने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा वसुदेवांनी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आले. (५५)



अथ काल उपावृत्ते देवकी सर्वदेवता ।
पुत्रान् प्रसुषुवे चाष्टौ कन्यां चैवानुवत्सरम् ॥ ५६ ॥
देवकी सति साध्वि ती देवता अंगि सर्व त्या ।
समयी प्रतिवर्षाला आठ पुत्र नि पुत्रि ती ।
जन्मली देवकीगर्भे संतती वसुदेवची ॥ ५६ ॥

अथ सर्वदेवतास्वरूपी देवकी - काही काळ गेल्यानंतर सर्वदेवतारूपी देवकी - काले उपावृते - योग्य काळ आला असता - अनुवत्सरं अष्टौ पुत्रान् कन्यां च प्रसुषुवे । - प्रतिवर्षी एक अशा रीतीने आठ मुलांना व एका मुलीला प्रसविती झाली. (५६)

योग्य वेळी सर्वदेवतास्वरूप देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे आठ पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला. (५६)



कीर्तिमन्तं प्रथमजं कंसायानकदुन्दुभिः ।
अर्पयामास कृच्छ्रेण सोऽनृताद् अतिविह्वलः ॥ ५७ ॥
पहिला कीर्तिमान् पुत्र कंसासी दिधला असे ।
खोटे न वचनो होवो म्हणोनी कष्टले बहू ॥ ५७ ॥

अनृतात् अतिविह्वलः सः आनकदुंदुभिः - असत्य भाषणाने अत्यंत व्याकुल होणारा तो वसुदेव - प्रथमजं कीर्तिमंतं पुत्रं - प्रथम झालेला कीर्तिमान् नावाचा पुत्र - कृच्छ्रेण कंसाय अर्पयामास । - अति कष्टाने पण, कंसाला देता झाला. (५७)

पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते. वसुदेवांनी त्याला मोठ्या कष्टाने कंसाकडे आणून दिले. कारण त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते. (५७)



किं दुःसहं नु साधूनां विदुषां किं अपेक्षितम् ।
किं अकार्यं कदर्याणां दुस्त्यजं किं धृतात्मनाम् ॥ ५८ ॥
साहिती कष्ट ते सत्यी ज्ञान्यांची गोष्ट वेगळी ।
नीच ते वर्तती हीन भक्त ते सर्व त्यागिती ॥ ५८ ॥

साधूनां किं न दुःसहं ? - सज्जनांना खरोखर दुःसह असे काय आहे ? - विदुषां किं अपेक्षितं ? - ज्ञानी पुरुषांना इच्छा ती कसली असणार ? - कदर्याणां किं अकार्यं । - स्वार्थ परायणता जेथे असते त्यांना कोणतेही कृत्य करताना त्यात काही गैर असे काही कधी वाटते का ? - धृतात्मनां दुस्त्यजं किं ? - आणि ज्यांनी इंद्रियांसहित मन जिंकले आहे त्यांना टाकण्याला (त्याग करण्याला) कठीण असे काही असे काय आहे ? (५८)

सज्जनांना असह्य असे काय असते ? ज्ञानी पुरुषांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते ? नीच पुरुषांना न करण्यासारखे काय असते ? आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखे काय असते ? (५८)



दृष्ट्वा समत्वं तत् शौरेः सत्ये चैव व्यवस्थितिम् ।
कंसस्तुष्टमना राजन् प्रहसन् इदमब्रवीत् ॥ ५९ ॥
समान वसुदेवाला कंसाने पाहिले तदा ।
सत्यनिष्ठा बघोनी तो हांसोनी बोलला असे ॥ ५९ ॥

राजन् ! - हे परीक्षित राजा ! - कंस तत् समत्वं कंस च - कंस वसुदेवाचा तो सरळपणा आणि - सत्ये एव व्यवस्थितिं - आणि सत्यावरील खरोखर निष्ठा - दृष्ट्वा - पाहून - तुष्टमनाः प्रसहन् इदं अब्रवीत् । - संतुष्ट झालेल्या असा तो म्हणाला, (५९)

हे राजा ! वसुदेवांचा जीवन-मृत्यूमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत म्हणाला. (५९)



प्रतियातु कुमारोऽयं न ह्यस्मादस्ति मे भयम् ।
अष्टमाद् युवयोर्गर्भान् मृत्युर्मे विहितः किल ॥ ६० ॥
वसुदेवा तुझा बाळ नेणे हा भय ना यये ।
आकाशवाणि ती बोले आठवा शत्रु तो मला ॥ ६० ॥

अयं कुमारः प्रतियातु । - हा तुझा मुलगा परत जाऊ दे - हि, - कारण - अस्मात् मे भयं न अस्ति, -ह्याच्यापासून मला भिती नाही - युवयोः अष्टमात् गर्भात् मे मृत्युः किल विहितः । - तुम्हां दोघांपासून होणार्‍या आठव्या गर्भापासून मला खरोखर मृत्यू ठरलेला आहे. (६०)

आपण या बालकाला परत घेऊन जा. याच्यापासून मला काहीही भिती नाही; कारण तुमच्या आठव्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे. (६०)



तथेति सुतमादाय ययौ आनकदुन्दुभिः ।
नाभ्यनन्दत तद्वाक्यं असतोऽविजितात्मनः ॥ ६१ ॥
ठीक हो म्हणूनी त्यांनी घरी बाळास आणिले ।
कंसाचे बदले चित्त हेही ठावूक त्यां असे ॥ ६१ ॥

तथा इति । - ठीक आहे असे म्हणून - आनकदुंदुभिः सुतं आदाय ययौ, - वसुदेव आपल्या मुलाला घेऊन परत गेला - किंतु असतः अविजितात्मनः - परंतु जो दुष्ट आहे आणि ज्याचे अंतःकरण स्वाधीन नाही अशा त्या कंसाचे - तद्वाक्यं न अभ्यनंदत । - ते म्हणने त्याला खरे वाटले नाही. (६१)

ठीक आहे असे म्हणून वसुदेव त्या बालकाला घेऊन परत आले. परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. (६१)

विवरण :- चाणाक्ष अन् बुद्धिमान वसुदेवाने अशा प्रकारचा साधक बाधक विचार केला आणि मनातील दुःखाचे कढ आवरून तो त्या दुष्ट दुरात्म्याशी बोलू लागला. मात्र बोलताना आपल्या दुःखाचा मागमूसही चेहेर्‍यावर न दाखविता कंसाला विश्वास वाटावा म्हणून त्याने आपला चेहरा हसरा ठेवला होता. तो म्हणाला, "या अबलेपासून तर तुला काहीच भीति नाही, मग राहिली होणारी मुले. ती मी तुला अर्पण करतो, मग तर झाले ?" वसुदेव सत्यवादी आहे हे कंस जाणून होता. त्याच्या शब्दावर त्याचा विश्वास होता. तो त्याच्या आश्वासनाने आश्वस्त झाला. त्याची समजून पटली. इथे वसुदेवाने निम्मी लढाई जिंकली. यथावकाश देवकीला मुले झाली. पहिले अपत्य झाल्यावर वसुदेव कंसाकडे गेला, पण कंसाने त्याचा स्वीकार केला नाही. सामान्यतः वसुदेव आपला पहिला मुलगा कीर्तिमान् याला गेऊन कंसाकडे गेला ही गोष्ट खटकणारी वाटते. पण त्याच्या आनकदुन्दुभी नावाप्रमाणे तो प्रतिज्ञापालक सत्यधर्मी म्हणून प्रसिद्ध होता. अनृत, असत्यवादीच्या कल्पनेनेही ’अतिविह्वलः’ होणारा होता. कंसाने वसुदेव आपल्या शब्दाला जागणारा पाहून त्याला म्हणाला - ’प्रतियातु, जा, याला घेऊन जा. मला ह्याच्यापासून भय नाही. भय आहे तो तुझ्या आठव्या पुत्रापासून. मात्र वसुदेवाला कंसाच्या शब्दांची खात्री वाटेना. त्याने त्याच्या या कृतीचे अभिनंदन केले नाही. याच्या वागण्याची शाश्वती नाही - क्वचित् रुष्टः क्वचित् तुष्टः - अशा अस्थिर लोकांचा - प्रसादोऽपि भयङ्करः । (५३-६१)



नन्दाद्या ये व्रजे गोपा याश्चामीषां च योषितः ।
वृष्णयो वसुदेवाद्या देवक्याद्या यदुस्त्रियः ॥ ६२ ॥
सर्वे वै देवताप्राया उभयोरपि भारत ।
ज्ञातयो बन्धुसुहृदो ये च कंसं अनुव्रताः ॥ ६३ ॥
एतत् कंसाय भगवान् शशंसाभ्येत्य नारदः ।
भूमेर्भारायमाणानां दैत्यानां च वधोद्यमम् ॥ ६४ ॥
इकडे नारदे कंसा सर्व वृत्तांत बोधिला ।
व्रजात राहती सर्व नंद गोप नि गोपिका ॥ ६२ ॥
तयांचे सर्व ते बंधू देवता अंशरूपची ।
तुझ्या सेवेत ते सारे अंशरूपीच दैवते ॥ ६३ ॥
दैत्यांचा भार हा वाढे तयांना वधिण्या अशी ।
तयारी चालली सर्व वदले नारदो असे ॥ ६४ ॥

नारद कंसाची भेट घेऊन त्याला सांगतात -
-व्रजे ये गोपा सन्ति, - अरे कंसा गोकुळात जे गोप आहेत, - याः च अमिषां योषितः, - आणि या ज्या गोपांच्या स्त्रिया आहेत - वसुदेवाद्याः च ये वृष्णयः, - आणि वसुदेवादिक जे यादव आहेत - देवक्याद्याः यदुस्त्रियः च, - आणि देवकी आदिकरूप यादवांच्या ज्या स्त्रिया आहेत - ये च कंसं अनुव्रताः बन्धुसुहृदः ज्ञातयः, - आणि कंसाला अनुसरणारे बंधू, स्नेही आणि संबंधी लोक - उभयोः वसुदेवनंदयोः अपि सन्ति । - जे लोक वसुदेव व नंद या दोघांच्याही घरात आहेत. (६२, ६३) हे भारत ! - हे परीक्षित राजा ! - ते सर्वे वै देवता प्रायाः - ते सगळे बहुतेक सर्वच्या सर्व देव आहेत - भूमेः भारायमाणानां दैत्यानां वधोद्यमं - आणि भूमीला भारभूत अशा दैत्यांच्या नाशाविषयी चाललेला उद्योग - एतत् अभ्येत्य, भगवान् नारदः - हे सर्व भगवान नारद येऊन - कंसाय शशंस । - कंसाला सांगता झाला. (६४)

परिक्षिता ! इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले आणि त्याला म्हणाले की, " अरे कंसा ! गोकुळात राहणारे नंद इत्यादि गोप, त्यांच्या पत्‍न्या, वसुदेव इत्यादि वृष्णिवंशी यादव, देवकी इत्यादि यदुवंशातील स्त्रिया आणि नंद, वसुदेव या दोघांचेही नातलग हे सर्वजण देव आहेत. यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत, तेसुद्धा देवच आहेत." त्यांनी असेही सांगितले की, "दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे, म्हणून देव आता त्यांच्या वधाची तयारी करीत आहेत." (६२-६४)

विवरण :- आता कंसाच्या सत्कर्माचे पारडे जड होऊ लागले. इतका चांगुलपणा ? मग पुण्य वाढायला लागले तर त्याच्या पापांचा हिशेब कधी व्हायचा ? ती वेळ लांबली तर वसुदेव-देवकी सहित सार्‍या संसाराची यातना देखील वाढेल. नारदांनी विचार केला नाही, नाही, असे होता उपयोगी नाही. कंसाचा निःपात करायला भगवंताला लवकरच अवतरीत होणे आवश्यक आहे. त्यांचे ब्रीदच आहे ना - अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् - कंसाच्या या वागण्याने नारद अस्वस्थ झाले आणि आले त्याच्याकडे ’नारायण... नारायण... करीत. त्याला म्हणाले - ’अरे बाबा, तुला कळत कसे नाही ? भ्रमात राहू नको. हे जे वसुदेव-देवकी, सर्व यदुवंशी वगैरे वगिअरे आहेत ना ते सर्व देव आहेत - दैत्यांचा नाश करायलाच पृथ्वीवर आले आहेत. सावध हो. (६२-६४)



ऋषेः विनिर्गमे कंसो यदून् मत्वा सुरान् इति ।
देवक्या गर्भसंभूतं विष्णुं च स्ववधं प्रति ॥ ६५ ॥
देवकीं वसुदेवं च निगृह्य निगडैर्गृहे ।
जातं जातं अहन् पुत्रं तयोः अजनशंकया ॥ ६६ ॥
देवर्षी बोलुनी ऐसे गेले ते पुढती तसे ।
कंसाने ताडिले चित्ती यदुवंशात विष्णु तो ।
मारण्या जन्म तो घेई तेंव्हा त्याने बहीण नी ॥ ६५ ॥
वसुदेव अशा दोघां बंदिशाळेत टाकिले ।
शंका येताचि चित्ती तो बाळ होता वधी पहा ॥ ६६ ॥

ऋषेः विनिर्गमे - नारदऋषि निघून गेल्यावर - कंसः यदून् सुरान् मत्वा, - कंस यादवांना देव समजून - विष्णुं च - आणि विष्णूला - स्ववधं प्रति - आपला वध करण्याकरिता - देवक्याः गर्भसंभूतं मत्वा - - देवकीच्या गर्भात उत्पन्न झालेला मानून, (६५) देवकीं वसुदेवं च - देवकीला आणि वसुदेवाला - निगडैः गृहे निगृह्य - बेड्यांनी बंदिगृहात कोंडून ठेऊन - तयोः जातं जातं पुत्रं अजनशंकया अहन् । - त्यांच्या जन्मलेल्या प्रत्येक मुळाला हा विष्णुच आहे अशी शंका घेऊन मारू लागला. (६६)

असे म्हणून नारद जेव्हा निघून गेले, तव्हा कंसाचा निश्चयच झाला की, हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहे. म्हणून त्याने देवकीला आणि वसुदेवांना बेड्या घालून कैदेत टाकले आणि त्या दोघांना जे पुत्र होत गेले, त्यांना विष्णू समजून मारून टाकले. (६५-६६)



मातरं पितरं भ्रातॄन् सर्वांश्च सुहृदस्तथा ।
घ्नन्ति ह्यसुतृपो लुब्धा राजानः प्रायशो भुवि ॥ ६७ ॥
पृथ्वीसी दिसते ऐसे स्वार्थी-लोभी नृपो कसे ।
वधिती पुत्र माता नी पिता बंधू नि मित्रही ॥ ६७ ॥

हि प्रायशः भुवि - खरोखर, या लोकी - असुतृपः लुब्धाः राजानः - आपल्या जीवाची तृप्ती करणारे लोभी असे राजे - मातरं पितरं भ्रातृन् तथा सर्वान् सुहृदः च घ्नन्ति । - (कशाचीही पर्वा न करता अगदी) आई, बाप, भाऊ तसेच इष्ट मित्र या सर्वांना मारतात. (६७)

पृथ्वीवर बहुधा स्वतःचेच पोषण करणारे लोभी राजे स्वार्थासाठी माता-पिता, बंधू किंवा इष्ट-मित्र यांचीही हत्या करतात. (६७)



आत्मानं इह सञ्जातं जानन् प्राग् विष्णुना हतम् ।
महासुरं कालनेमिं यदुभिः स व्यरुध्यत ॥ ६८ ॥
ओळखून असे कंस आसुरीपूर्वजन्म तो ।
कालनेमी तदा होता वधिले विष्णुने तदा ।
म्हणोनी यदुवंशाला काळाच्या परि हा बघे ॥ ६८ ॥

आत्मानं प्राक् - स्वतःला पूर्वजन्मीचा - इह संजातं - आणि या लोकी जन्मलेला हे - महासुरं कालनेमिं - हे जाणत असलेला तो महादैत्य कालनेमि - विष्णूना हतं - ज्याला विष्णूने मारले होते - जानन् सः - हे जाणत असलेला तो कंस - यदुभिः व्यरुध्यत । - यादवांचा विरोध करू लागला. (६८)

कंसाला हे माहीत होते की, आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होतो आणि विष्णूने आपल्याला मारले होते. म्हणूनच त्याने यादवांशी वैर मांडले होते. (६८)



उग्रसेनं च पितरं यदुभोजान्धकाधिपम् ।
स्वयं निगृह्य बुभुजे शूरसेनान् महाबलः ॥ ६९ ॥
बलवान् कंस हा होता उग्रसेन पित्यासही ।
कैदेत टाकुनी हाकी राज्य ते शूरसेनचे ॥ ६९ ॥

यदु-भोज-अंधिकाधिपं उग्रसेनं पितरं च निगृह्य - आणि यदु, भोज व अंधक या तिघांचा अधिपति असा जो आपला पिता उग्रसेन त्याला कारागृहात कोंडून - महाबलः स्वयं शूरसेनान् बुभुजे । - महासामर्थ्यवान कंस स्वतः शूरसेन देशाचे राज्य भोगू लागला. (६९)

बलवान कंसाने यदू, भोज आणि अंधक वंशांचे राजे असलेल्या आपल्या पित्याला - उग्रसेनाला कैद केले आणि तो स्वतः शूरसेनदेशाचे राज्य करू लागला. (६९)

विवरण :- कंसाच्या आसुरी वृत्ती उफाळून आल्या. देवकीच्या गर्भातील विष्णू आपला नाश करेल या भीतिने त्याला ग्रासून टाकले. पूर्व जन्मी आपण कालनेमी होतो तेव्हा विष्णूने आपला घात केला आणि याही जन्मात तो आपला नाश करणार हे तो जाणून होता. वसुदेव देवकीला तर त्याने बेड्या घालून ताबडतोब बंदीगृहात टाकले. कीर्तिमान सहित सवे मुलांची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर यदुवंशीयांचा हितसंबंधी असा आणि भोज - अंधक व यादवांचा अधिपति असलेल्या आपल्या पित्यालाही त्याने सोडले नाही. महासामर्थ्यवान असल्याने त्याने उग्रसेनालाही कैदेत टाकले आणि स्वतः राजा झाला.
स्वार्थ, मरणाची भीति पापी मनुष्याला किती क्रूर आणि अविचारी बनविते यादे हे उदाहरण ! नारदाच्या अल्प वक्तव्याने कंसाचा तथाकथित चांगुलपणा कापरासारखा उडून गेला. तो मूळ पदावर आला. असे लोक स्वार्थापायी कोणाचीही पर्वा करीत नाहीत. मग तो त्याच्या अहिताच्या दूरान्वयेही संबंध नसलेला आपला पिता उग्रसेन का असेना ? त्याचा काय दोष ? पण हे त्याच्या लक्षात आले नाही - स्वभावो दुरतिक्रमः । (६५-६९)



अध्याय पहिला समाप्त

GO TOP