|
श्रीमद् भागवत पुराण मत्स्यावतारकथा - मस्त्यावताराची कथा - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीराजोवाच -
भगवन् श्रोतुमिच्छामि हरेरद्भुतकर्मणः । अवतारकथामाद्यां मायामत्स्यविडम्बनम् ॥ १ ॥
भगवन् - हे शुकाचार्य- अद्भुतकर्मणः हरेः - आश्चर्यकारक कर्म करणार्या विष्णूच्या- मायामत्स्यविडम्बनं - मायेच्या योगे मत्स्यरूप धारण - (यस्यां तां) आद्यां अवतारकथां - केल्याचे वृत्त ज्यात आहे असे श्रेष्ठ अवतारचरित्र- श्रोतुं इच्छामि - मी ऐकण्याची इच्छा करितो. ॥१॥
राजाने विचारले - मुनिवर्य, अद्भुत कर्म करणार्या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यावतार धारण करून जी लीला केली होती, त्यांच्या त्या आदिअवताराची कथा मी ऐकू इच्छितो. (१)
यदर्थमदधाद् रूपं मात्स्यं लोकजुगुप्सितम् ।
तमःप्रकृतिदुर्मर्षं कर्मग्रस्त इवेश्वरः ॥ २ ॥
ईश्वरः - विष्णु- कर्मग्रस्तः इव - कर्मांनी ग्रासिलेल्या जीवाप्रमाणे- लोकजुगुप्सितं तमः प्रकृति - लोकांत निंद्य मानिलेले तमोगुणी - दुर्मर्षं मात्स्यं रूपं - आणि दुःसह असे माशाचे स्वरूप- यदर्थं अघात् - ज्याकरिता धारण करिता झाला. ॥२॥
भगवंतांनी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी, लोकांना न आवडणारे, असह्य असे हे माशाचे रूप का धारण केले ? (२)
एतन्नो भगवन्सर्वं यथावद्वक्तुमर्हसि ।
उत्तमश्लोकचरितं सर्वलोकसुखावहम् ॥ ३ ॥
भगवन् - हे शुकाचार्य- एतत् सर्वं - हे सगळे- सर्वलोकसुखावहं - सर्व लोकांना सुख देणारे - उत्तमश्लोकचरितं - भगवंताचे चरित्र- नः यथावत् - आम्हाला जसेच्या तसे - वक्तुं अर्हसि - सांगण्याला तू योग्य आहेस. ॥३॥
भगवन, महात्म्यांना कीर्तनीय अशा भगवंतांचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आहे. आपण कृपा करून त्यांची ती सर्व लीला आम्हांला सांगावी. (३)
श्रीसूत उवाच -
इत्युक्तो विष्णुरातेन भगवान् बान्बादरायणिः । उवाच चरितं विष्णोः मत्स्यरूपेण यत्कृतम् ॥ ४ ॥
विष्णुरातेन इति उक्तः - परीक्षित राजाने याप्रमाणे प्रार्थिलेला - भगवान् बादरायणिः - सर्वगुणसंपन्न व्यासपुत्र शुकाचार्य- मत्स्यरूपेण यत् कृतं - माशाचे रूप घेऊन - (तत्) विष्णोः चरितं उवाच - विष्णूने जे केले ते विष्णुचे चरित्र सांगता झाला. ॥४॥
सूत म्हणतात - जेव्हा परीक्षिताने भगवान श्रीशुकांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी, भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्राचे वर्णन केले. (४)
श्रीशुक उवाच -
गोविप्रसुरसाधूनां छन्दसामपि चेश्वरः । रक्षां इच्छन् तनु धत्ते धर्मस्यार्थस्य चैव हि ॥ ५ ॥
ईश्वरः - परमेश्वर- गोविप्रसुरसाधूनां छंदसां च अपि - गाई, ब्राह्मण, देव, साधु आणि वेद यांचेही- धर्मस्य अर्थस्य च एव - धर्म आणि अर्थ यांचेही - रक्षाम् इच्छन् - रक्षण करण्याची इच्छा करणारा- तनूः हि धत्ते - शरीरे खरोखर धारण करितो. ॥५॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! गाई, ब्राह्मण, देव, साधू, वेद आणि अर्थ यांचे रक्षण करण्यासाठी भगवान शरीर धारण करतात. (५)
उच्चावचेषु भूतेषु चरन् वायुरिवेश्वरः ।
नोच्चावचत्वं भजते निर्गुणत्वाद्धियो गुणैः ॥ ६ ॥
ईश्वरः वायुः इव - परमेश्वर वायूप्रमाणे - धियः गुणैः - बुद्धीच्या गुणांनी - उच्चावचेषु भूतेषु - लहान-मोठया प्राण्यांच्या ठिकाणी - चरन् (अपि) - संचार करीत असताही- निर्गुणत्वात् - निर्गुण असल्यामुळे - (स्वयं) उच्चावचत्वं न भजते - लहान-मोठेपणा स्वतः स्वीकारीत नाही. ॥६॥
ते सर्वशक्तिमान प्रभू वायूप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामीरूपाने राहूनही त्या प्राण्यांच्या बुद्धिगत गुणांनी लहान-मोठे होत नाहीत. कारण ते निर्गुण आहेत. (६)
आसीद् अतीतकल्पान्ते ब्राह्मो नैमित्तिको लयः ।
समुद्रोपप्लुतास्तत्र लोका भूरादयो नृप ॥ ७ ॥
नृप - हे राजा- अतीतकल्पान्ते - गेल्या कल्पाच्या शेवटी - ब्राह्मः नैमित्तिकः - ब्रह्मदेवाची रात्र आली असता - लयः आसीत् - त्या कारणास्तव प्रलय झाला- तत्र भूरादयः लोकाः - त्या प्रलयात पृथ्वी आदी करून सर्व लोक - समुद्रोपप्लुताः (आसन्) - समुद्रात बुडून गेले. ॥७॥
परीक्षिता, मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्राह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता. त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते. (७)
कालेनागतनिद्रस्य धातुः शिशयिषोर्बली ।
मुखतो निःसृतान् वेदान् हयग्रीवोऽन्तिकेऽहरत् ॥ ८ ॥
बली हयग्रीवः - बलिष्ठ हयग्रीव- कालेन आगतनिद्रस्य - योग्यकाळी निद्रित झालेल्या - शिशयिषोः धातुः मुखतः - व झोप घेउ इच्छिणार्या ब्रह्मदेवाच्या मुखातून- अन्तिके निसृतान् - जवळ बाहेर पडलेले - वेदान् अहरत् - वेद हरण करिता झाला. ॥८॥
प्रलयकालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते. त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहणार्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. (८)
ज्ञात्वा तद् दानवेन्द्रस्य हयग्रीवस्य चेष्टितम् ।
दधार शफरीरूपं भगवान् हरिरीश्वरः ॥ ९ ॥
भगवान् हरिः ईश्वरः - षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर विष्णु- दानवेन्द्रस्य - दानवाधिपति - हयग्रीवस्य तत् चेष्टितं ज्ञात्वा - हयग्रीवाचे ते कृत्य जाणून- शफरीरूपं दधार - माशाचे रूप धरिता झाला. ॥९॥
सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींनी दानवराज हयग्रीवाचे हे दुष्कृत्य जाणले, म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला. (९)
तत्र राजऋषिः कश्चित् नाम्ना सत्यव्रतो महान् ।
नारायणपरोऽतप्यत् तपः स सलिलाशनः ॥ १० ॥
तत्र - तेथे- नाम्ना सत्यव्रतः - सत्यव्रत नावाचा- नारायणपरः कश्चित् - भगवंताची भक्ति करणारा - महान् राजऋषिः - कोणी महात्मा राजर्षि- सः सलिलाशनः - केवळ उदक प्राशन करून - तपः अतप्यत् - तो तप करिता झाला. ॥१०॥
परीक्षिता, त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवत्परायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता. (१०)
योऽसौ अस्मिन् महाकल्पे तनयः स विवस्वतः ।
श्राद्धदेव इति ख्यातो मनुत्वे हरिणार्पितः ॥ ११ ॥
यः असौ (राजर्षिः) - हा जो राजर्षि होता- सः - तो- अस्मिन् महाकल्पे - ह्या चालू मोठया कल्पात - श्राद्धदेव इति ख्यातः - श्राद्धदेव या नावाने प्रसिद्ध असा- विवस्वतः तनयः (भूत्वा) - सूर्याचा पुत्र होऊन- हरिणा - परमेश्वराकडून - मनुत्वे अर्पितः - मनूच्या अधिकारावर योजिला गेला. ॥११॥
तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव नावाने प्रसिद्ध झाला आणि भगवंतांनी वैवस्वत मनू बनविले. (११)
एकदा कृतमालायां कुर्वतो जलतर्पणम् ।
तस्याञ्जलि उदके काचित् शफर्येकाभ्यपद्यत ॥ १२ ॥
एकदा कृतमालायां - एके दिवशी कृतमालानामक नदीच्या तीरी - जलतर्पणं कुर्वतः - तर्पण करणार्या - तस्य अञ्जल्युदके - सत्यव्रताच्या ओंजळीतील पाण्यात- काचित् एका शफरी अभ्यपद्यत - कोणी एक शफरी जातीचा मासा आला. ॥१२॥
तो राजर्षी एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. त्याचवेळी त्याच्या ओंजळीतील पाण्यात एक लहानशी मासळी आली. (१२)
सत्यव्रतोऽञ्जलिगतां सह तोयेन भारत ।
उत्ससर्ज नदीतोये शफरीं द्रविडेश्वरः ॥ १३ ॥
भारत - हे परीक्षित राजा- द्रविडेश्वरः सत्यव्रतः - द्रविड देशाचा अधिपति सत्यव्रत- तोयेनसह अञ्जलिगतां शफरीं - पाण्याबरोबर ओंजळीत आलेल्या शफरीला- नदीतोये उत्ससर्ज - नदीच्या पाण्यात टाकिता झाला. ॥१३॥
परीक्षिता, द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच नदीत सोडले. (१३)
तं आह सातिकरुणं महाकारुणिकं नृपम् ।
यादोभ्यो ज्ञातिघातिभ्यो दीनां मां दीनवत्सल । कथं विसृजसे राजन् भीतामस्मिन् सरिज्जले ॥ १४ ॥
सा महाकारुणिकं - ती शफरी अत्यंत दयाळू अशा - तं नृपं अतिकरुणं आह - त्या राजाला करुणस्वराने म्हणाली- दीनवत्सल राजन् - दीनांवर प्रेम करणार्या हे सत्यव्रत राजा- ज्ञातिघातिभ्यः - जातभाईंना मारणार्या - यादोभ्यः भीतां दीनां मां - जलचरांपासून भ्यालेल्या दीन अशा मला- अस्मिन् सरेज्जले - ह्या नदीच्या उदकात - कथं विसृजसे - कसे टाकितोस ? ॥१४॥
अत्यंत कळवळून ती मासळी परम दयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली, "राजन, आपण दीनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतु आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात, हे आपल्याला माहीत आहेच. तरी त्यांना भ्यालेल्या मला पुन्हा नदीत का सोडीत आहात ?" (१४)
तमात्मनोऽनुग्रहार्थं प्रीत्या मत्स्यवपुर्धरम् ।
अजानन् रक्षणार्थाय शफर्याः स मनो दधे ॥ १५ ॥
आत्मनः अनुग्रहार्थ - आपल्यावर कृपा करण्याकरिता - प्रीत्या मत्स्यवपुर्धरं - प्रेमाने मत्स्यरूप धारण करणार्या - तं अजानन् सः - त्याला न जाणणारा तो- शफर्याः - त्या शफरीच्या - रक्षणार्थाय मनः दधे - रक्षणासाठी निश्चय करिता झाला. ॥१५॥
स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रूपाने आले आहेत, याची राजाला कल्पना नव्हती, तरी त्या मासळीचे रक्षण करण्याचा त्याने मनोमन संकल्प केला. (१५)
तस्या दीनतरं वाक्यं आश्रुत्य स महीपतिः ।
कलशाप्सु निधायैनां दयालुर्निन्य आश्रमम् ॥ १६ ॥
सः दयालुः महीपतिः - तो दयाळू राजा- तस्याः दीनतरं वाक्यम् आश्रुत्य - तिचे अत्यंत दीन भाषण ऐकून- एनां कलशाप्सुनिधाय - त्याला कमंडलूतील उदकात ठेवून- आश्रमं निन्ये - आश्रमाला नेता झाला. ॥१६॥
त्या मासळीचे दीनवाणे बोलणे ऐकून दयाळू राजाने तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणले. (१६)
सा तु तत्रैकरात्रेण वर्धमाना कमण्डलौ ।
अलब्ध्वाऽऽत्मावकाशं वा इदमाह महीपतिम् ॥ १७ ॥
सा तु - ती शफरी तर- तत्र कमण्डलौ - त्या कमंडलूमध्ये- एकरात्रेण वर्धमाना - एका रात्रीत वाढणारी अशी- आत्मावकाशं अलब्ध्वा - स्वतःला जागा न मिळाल्यामुळे- महीपतिं इदं वै आह - राजाला हे खरोखर म्हणाली. ॥१७॥
आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना. त्यावेळी मासळी राजाला म्हणाली; (१७)
नाहं कमण्डलौ अवस्मिन् कृच्छ्रं वस्तुमिहोत्सहे ।
कल्पयौकः सुविपुलं यत्राहं निवसे सुखम् ॥ १८ ॥
अहं इह अस्मिन् कमण्डलौ - मी येथे ह्या कमंडलूत - कृच्छ्रं वस्तुं न उत्सहे - संकटाने राहण्यास इच्छित नाही - सुविपुलं ओकः कल्पय - अत्यंत विस्तीर्ण असे स्थान तयार कर- यत्र अहं सुखं निवसे - जेथे मी सुखाने राहीन. ॥१८॥
आता मोठ्या कष्टानेसुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही. म्हणून माझ्यासाठी एखादे मोठे ठिकाण शोधून काढ. तेथे मी आरामात राहू शकेन. (१८)
स एनां तत आदाय न्यधादौदञ्चनोदके ।
तत्र क्षिप्ता मुहूर्तेन हस्तत्रयमवर्धत ॥ १९ ॥
सः एनां ततः आदाय - तो राजा त्याला त्या कमंडलूतून काढून - औदंचनोदके न्यधात् - रांजणांतील पाण्यात ठेविता झाला- तत्र क्षिप्ता (सा) - त्यात ठेविलेली ती- मुहूर्तेन हस्तत्रयं अवर्धत - दोन घटकांत तीन हात वाढली. ॥१९॥
राजा सत्यव्रताने मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेर्यात ठेवले. परंतु तेथे सोडल्यानंतर ती मासळी दोन घटकात तीन हात मोठी झाली. (१९)
न मे एतद् अलं राजन् सुखं वस्तुमुदञ्चनम् ।
पृथु देहि पदं मह्यं यत्त्वाहं शरणं गता ॥ २० ॥
राजन् - हे राजा- एतत् उदञ्चनं - हा पाण्याचा रांजण- मे सुखं वस्तुं न अलं - मला सुखाने राहण्यास पुरेसा नाही- मह्यं पृथू पदं देहि - मला विस्तीर्ण स्थान दे- यत् अहं त्वा शरणं गता - कारण मी तुला शरण आले आहे. ॥२०॥
राजा, आता हा डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही. मी तुला शरण आले आहे. म्हणून मला राहण्यायोग्य एखादे मोठे ठिकाण दे. (२०)
तत आदाय सा राज्ञा क्षिप्ता राजन् सरोवरे ।
तद् आवृत्यात्मना सोऽयं महामीनोऽन्ववर्धत ॥ २१ ॥
राजन् - हे परीक्षित राजा- राज्ञा ततः आदाय - राजाकडून तेथून काढून - सा सरोवरे क्षिप्ता - ती एका तलावात सोडिली गेली- सः अयं महामीनः - तो हा मोठा मासा- आत्मना तत् आवृत्य - आपल्या शरीराने त्या तलावात व्यापून- अन्ववर्धत - वाढू लागला. ॥२१॥
परीक्षिता, सत्यव्रताने तिथून मासळीला काढून एका सरोवरात सोडले. परंतु थोड्याच वेळात ती एवढी मोठी झाली की तिने एका महान माशाचा आकार धारण करून त्या सरोवरातील पाणी व्यापून टाकले. (२१)
नैतन्मे स्वस्तये राजन् उदकं सलिलौकसः ।
निधेहि रक्षायोगेन ह्रदे मामविदासिनि ॥ २२ ॥
राजन् - हे राजा- सलीलौकसः मे - पाण्यात राहणार्या मला - एतत् उदकं स्वस्तये न (भवति) - हे उदक सुख देण्यास समर्थ नाही- अविदासिनि ह्लदे - पाणी कधी न आटणार्या डोहात - रक्षायोगेन मां निघेहि - रक्षणास उपाय करून मला ठेव. ॥२२॥
आणि म्हणाली - "राजन, मी जलचर प्राणी आहे. ह्या सरोवरातील पाणीसुद्धा मला आरामात राहण्यासाठी पुरेसे नाही. म्हणून आपण सुरक्षितपणे मला एकादा विपुल पाण्याच्या खोल डोहात ठेवावे." (२२)
इत्युक्तः सोऽनयन्मत्स्यं तत्र तत्राविदासिनि ।
जलाशयेऽसम्मितं तं समुद्रे प्राक्षिपज्झषम् ॥ २३ ॥
इति उक्तः सः - याप्रमाणे प्रार्थिलेला तो- मत्स्यं तत्र तत्र - माशाला एका मागून एक त्या त्या - अविदासिनि जलाशये अनयत् - न आटणार्या सरोवरात नेता झाला- संमितं तं झषं - त्या सरोवराएवढया वाढलेल्या त्या माशाला - समुद्रे प्राक्षिपत् - समुद्रात टाकिता झाला. ॥२३॥
त्याने असे म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणार्या अनेक जलाशयांत सोडले. परंतु जलाशय जेवढा मोठा असे, तेवढा मोठा तो होत असे. शेवटी राजाने मत्स्याला समुद्रात सोडण्यासाठी आणाले. (२३)
क्षिप्यमाणस्तमाहेदं इह मां मकरादयः ।
अदन्त्यतिबला वीर मां नेहोत्स्रष्टुमर्हसि ॥ २४ ॥
क्षिप्यमाणः - समुद्रात टाकिला जाणारा - तं इदं आह - तो मासा त्या राजाला हे म्हणाला- वीर - हे पराक्रमी राजा- इह अतिबलाः - येथे अतिबलाढय - मकरादयः - सुसरी आदिकरून प्राणी - मां अदन्ति - मला खातात- इह मां उत्स्रष्टुं - येथे मला सोडणे - न अर्हसि - तुला योग्य नाही. ॥२४॥
समुद्रात सोडीत असताना मत्स्य सत्यव्रताला म्हणाला, "हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी इत्यादी राहतात, त्या मला खाऊन टाकतील. म्हणून आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नये. (२४)
एवं विमोहितस्तेन वदता वल्गुभारतीम् ।
तमाह को भवान् अस्मान् मत्स्यरूपेण मोहयन् ॥ २५ ॥
एवं वल्गुभारतीं वदता - याप्रमाणे मधुर भाषण करणार्या - तेन विमोहितः (सः) - त्या माशाने मोहित केलेला तो- तं आह - त्या माशाला म्हणाला- मत्स्यरूपेण - माशाच्या रूपाने - अस्मान् मोहयन् - आम्हाला मोहित करणारे - भवान् कः - आपण कोण आहात ? ॥२५॥
मत्स्याची ही मधुर वाणी ऐकून राजा गोंधळून गेला. तो म्हणाला, "मत्स्याचे रूप धारण करून मला मोहित करणारे आपण कोण आहात ? (२५)
नैवं वीर्यो जलचरो दृष्टोऽस्माभिः श्रुतोऽपि वा ।
यो भवान् योजनशतं अह्नाभिव्यानशे सरः ॥ २६ ॥
अस्माभिः एवं वीर्यः - आम्ही अशाप्रकारचा पराक्रमी - जलचरः न दृष्टः - जलचर प्राणी पाहिला नाही- वा श्रुतः अपि (न) - किंवा ऐकिलाहि नाही- यः भवान् अह्ना - जो तू एका दिवसांत - योजनशतं - शंभर योजने विस्ताराचे - सरः अभिव्यानशे - सरोवर व्यापिता झालास. ॥२६॥
आपण एकाच दिवसात चारशे कोस विस्ताराचे सरोवर व्यापून टाकले. एवढी शक्ती असणारा जलचर जीव मी आजपर्यंत कधी पाहिला नाही की कधी ऐकला नाही. (२६)
नूनं त्वं भगवान् साक्षात् हरिर्नारायणोऽव्ययः ।
अनुग्रहाय भूतानां धत्से रूपं जलौकसाम् ॥ २७ ॥
नूनं त्वं साक्षात् - खरोखर तू प्रत्यक्ष - भगवान् अव्ययः - षड्गुणैश्वर्यसंपन्न अविनाशी - नारायणः हरिः (असि) - जलशायी विष्णु आहेस- भूतानां अनुग्रहाय - प्राण्यांवर कृपा करण्याकरिता - जलौकसां रूपं धत्से - जलचराचे स्वरूप धरिले आहेस. ॥२७॥
आपण निश्चितच साक्षात सर्वशक्तिमान सर्वांतर्यामी अविनाशी श्रीहरी आहात. जीवांवर कृपा करण्यासाठीच आपण जलचराचे रूप धारण केले आहे. (२७)
नमस्ते पुरुषश्रेष्ठ स्थित्युत्पत्त्यप्ययेश्वर ।
भक्तानां नः प्रपन्नानां मुख्यो ह्यात्मगतिर्विभो ॥ २८ ॥
पुरुषश्रेष्ठ - हे महापुरुषा- स्थित्युत्पत्त्यप्ययेश्वर - रक्षण, उत्पत्ति व संहार यांच्या नियंत्या- ते नमः - तुला नमस्कार असो- हि - खरोखर- विभो - हे परमेश्वरा- प्रसन्नानां भक्तानां नः - शरणागत भक्त अशा आमचा- (त्वं) मुख्यः आत्मगतिः (असि) - तू खरा अंतर्यामी व आश्रय आहेस. ॥२८॥
हे पुरुषोत्तमा, आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणारे आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. प्रभो, आम्हा शरणागत भक्तांचे आपणच आत्मा आणि आश्रय आहात. (२८)
सर्वे लीलावतारास्ते भूतानां भूतिहेतवः ।
ज्ञातुमिच्छाम्यदो रूपं यदर्थं भवता धृतम् ॥ २९ ॥
ते सर्वे लीलावताराः - लीलेने घेतलेले तुझे सर्व अवतार- भूतानां भूतिहेतवः (सन्ति) - प्राणिमात्रांच्या ऐश्वर्याला कारण होत- भवताः अदः रूपं यदर्थं धृतं - आपण हे स्वरूप ज्याकरिता धारण केले- (तत्) ज्ञातुम् इच्छामि - ते जाणण्यास मी इच्छितो. ॥२९॥
आपले सर्व लीलावतार जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठीच असतात, तरीसुद्धा मी हे जाणू इच्छितो की, आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केले आहे ? (२९)
न तेऽरविन्दाक्ष पदोपसर्पणं
मृषा भवेत्सर्वसुहृत् प्रियात्मनः । यथेतरेषां पृथगात्मनां सतां अदीदृशो यद्वपुरद्भुतं हि नः ॥ ३० ॥
अरविंदाक्ष - हे कमलनेत्रा- सर्वसुहृत्प्रियात्मनः - सर्व प्राण्यांचा हितकर्ता व प्रिय आत्मा अशा - तेः पदोपसर्पणं - तुझ्या चरणाजवळ येणे- मृषा न भवेत् - फुकट जाणार नाही- यथा - जसे- इतरेषां पृथगात्मनां - जसे इतर देहाभिमान धरणार्यांच्या - सतां (भवति) - पायांजवळ जाणे व्यर्थ होते- यत् नः अद्भुतं - कारण तू खरोखर आम्हाला हे आश्चर्यजनक - वपुः हि अदीदृशः - स्वरूप दाखविलेस. ॥३०॥
हे कमलनयन प्रभो, जसे देहादी अनात्म पदार्थांमध्ये मीपणाचा अभिमान धरणार्या संसारी पुरुषांचा आश्रय व्यर्थ ठरतो, त्याप्रमाणे आपल्या चरणांना शरण जाणे व्यर्थ होऊ शकत नाही. कारण आपण सर्वांचे अहेतुक प्रेमी, परम प्रियतम आणि आत्मा आहात. आपण यावेळी जे रूप धारण करून आम्हांला दर्शन दिले आहे, ते अतिशय अद्भुत आहे. (३०)
श्रीशुक उवाच -
इति ब्रुवाणं नृपतिं जगत्पतिः सत्यव्रतं मत्स्यवपुर्युगक्षये । विहर्तुकामः प्रलयार्णवेऽब्रवीत् चिकीर्षुः एकान्तजनप्रियः प्रियम् ॥ ३१ ॥
इति ब्रुवाणं सत्यव्रतं नृपतिं - असे बोलणार्या सत्यव्रत राजाला- एकांतजनप्रियः - प्रिय आहेत एकनिष्ठ भक्त ज्याला असा- युगक्षये प्रलयार्णवे - प्रलयकाळी प्रलयसमुद्रात - विहर्तुकामः - विहार करण्याची इच्छा करणारा- मत्स्यवपुः जगत्पतिः - माशाचे शरीर धारण केलेला विष्णु- प्रियं चिकीर्षुः - प्रिय करण्याची इच्छा करणारा- अब्रवीत् - म्हणाला. ॥३१॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणार्या जगत्पती मत्स्यावतारी भगवंतांनी आपला प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली, तेव्हा त्याचे कल्याण करण्यासाठी आणि त्याचबरोबर कल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्याला म्हटले - (३१)
श्रीभगवानुवाच -
(अनुष्टुप्) सप्तमे ह्यद्यतनाद् ऊर्ध्वं अहन्येतदरिन्दम । निमंक्ष्यत्यप्ययाम्भोधौ त्रैलोक्यं भूर्भुवादिकम् ॥ ३२ ॥
अरिंदम - हे शत्रूदमना- अद्यतनात् उर्ध्व सप्तमे अहनि - आजपासून पुढे सातव्या दिवशी- अप्ययाम्भोधौ - प्रलयसमुद्रात - भूर्भुवादिकं एतत् - भूर्लोक, भुवर्लोक व स्वर्ग असे हे - त्रैलोक्यं निमंक्ष्यन्ति - त्रैलोक्य बुडून जाईल. ॥३२॥
श्रीभगवान म्हणाले - सत्यव्रता, आजपासून सातव्या दिवशी भू, भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जातील. (३२)
त्रिलोक्यां लीयमानायां संवर्ताम्भसि वै तदा ।
उपस्थास्यति नौः काचिद् विशाला त्वां मयेरिता ॥ ३३ ॥
वै संवर्ताम्भसि - खरोखर प्रलयोदकांत - त्रिलोक्यां लीयमानायां - त्रैलोक्य लीन होत असता- तदा मया ईरिता - त्यावेळी मी प्रेरिलेली - काचित् विशाला नौः - एक मोठी नौका- त्वाम् उपस्थास्यति - तुझ्याजवळ येईल. ॥३३॥
जेव्हा तिन्ही लोक प्रलयकालच्या अथांग पाण्यात बुडू लागतील, तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. (३३)
त्वं तावदोषधीः सर्वा बीजानि उच्चावचानि च ।
सप्तर्षिभिः परिवृतः सर्वसत्त्वोपबृंहितः ॥ ३४ ॥
त्वं तावत् सर्वाः ओषधीः - तू तितक्यामध्ये सर्व औषधी- उच्चावचानि बीजानि च (आदाय) - आणि लहान-मोठी बीजे घेऊन- सप्तर्षिभिः परिवृतः - सप्तर्षींसह- सर्वसत्वोपबृंहितः - सर्व प्राण्यांनी वृद्धिंगत झालेला- ॥३४॥
त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्षींसह त्या नौकेवर चढावेस. तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि लहानसहान अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत. (३४)
आरुह्य बृहतीं नावं विचरिष्यस्यविक्लवः ।
एकार्णवे निरालोके ऋषीणामेव वर्चसा ॥ ३५ ॥
बृहतीं नावम् आरुह्य - मोठया नौकेवर चढून- अविक्लवः - निर्भय असा- निरालोके - प्रकाशरहित अशा - एकार्णवे - एकच एक झालेल्या समुद्रामध्ये- ऋषीणाम् एव वर्चसा विचरिष्यसि - ऋषींच्याच तेजाने संचार करशील- ॥३५॥
त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या सहाय्यानेच तू न भिता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावास. (३५)
दोधूयमानां तां नावं समीरेण बलीयसा ।
उपस्थितस्य मे शृंगे निबध्नीहि महाहिना ॥ ३६ ॥
बलीयसा समीरेण - मोठया वादळाने - दोधूयमानां तां नावं - हलणार्या त्या नौकेला- उपस्थितस्य मे शृङगे - जवळ आलेल्या माझ्या शिंगाला- महाहिना - मोठया सर्पाने- निबध्नीहि - बांध. ॥३६॥
जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागले, तेव्हा मी याच रूपात तेथे येईन. त्यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध. (३६)
अहं त्वां ऋषिभिः साकं सहनावमुदन्वति ।
विकर्षन् विचरिष्यामि यावद्ब्राह्मी निशा प्रभो ॥ ३७ ॥
प्रभो - हे राजा- अहं ऋषिभिः साकं - मी ऋषींसह नौकेत - सहनावं त्वां - बसलेल्या तुला- उदन्वति विकर्षन् - समुद्रात ओढून- यावत् ब्राह्मी निशा (वर्तते तावत्) - जोपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र असेल तोपर्यंत - विचरिष्यामि - संचार करीन. ॥३७॥
सत्यव्रता, यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला या नावेतून ओढीत समुद्रात विहार करीन. (३७)
मदीयं महिमानं च परं ब्रह्मेति शब्दितम् ।
वेत्स्यसि अनुगृहीतं मे संप्रश्नैर्विवृतं हृदि ॥ ३८ ॥
च मे अनुगृहीतं - आणि मी कृपा करून दिलेले- संप्रश्नैः हृदि विवृतं - केलेल्या प्रश्नामुळे मी तुला हृदयात प्रकाशित केलेले- परं ब्रह्म इति शब्दितं - परब्रह्म या नावाने प्रसिद्ध असे- मदीयं महिमानं वेत्स्यसि - माझे माहात्म्य जाणशील. ॥३८॥
त्यावेळी जेव्हा तू प्रश्न विचारशील, तेव्हा मी तुला उपदेश करीन. माझ्या कृपेने, ज्याचे नाव ’परब्रह्म’ आहे, तो माझा महिमा तुझ्या हृदयात प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल. (३८)
इत्थमादिश्य राजानं हरिरन्तरधीयत ।
सोऽन्ववैक्षत तं कालं यं हृषीकेश आदिशत् ॥ ३९ ॥
हरिः राजानं इत्थं आदिश्य - श्रीविष्णू सत्यव्रत राजाला याप्रमाणे सांगून- अन्तरधीयत - गुप्त झाला- हृषीकेशः यं आदिशत् - विष्णूने जो सांगितला - तं कालं सः अन्ववैक्षत - त्या काळाची वाट पाहात बसला. ॥३९॥
राजाला असे सांगून श्रीहरी अंतर्धान पावले. नंतर राजा भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहू लागला. (३९)
आस्तीर्य दर्भान् प्राक्कूलान् राजर्षिः प्रागुदंमुखः ।
निषसाद हरेः पादौ चिन्तयन् मत्स्यरूपिणः ॥ ४० ॥
राजर्षिः - सत्यव्रत राजा- प्राक्कूलान् दर्भान् आस्तीर्य - पूर्व दिशेकडे अग्रे केलेले दर्भ पसरून- मत्स्यरूपिणः - मत्स्यस्वरूपी - हरेः पादौ चिन्तयन् - विष्णुच्या पायांचे चिंतन करीत- प्रागुदङ्मुखः निषसाद - ईशान्य दिशेकडे तोंड करून बसला. ॥४०॥
पूर्वेकडे कुशांची टोके असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसला आणि मत्स्यरूप भगवंतांच्या चरणांचे चिंतन करू लागला. (४०)
ततः समुद्र उद्वेलः सर्वतः प्लावयन् महीम् ।
वर्धमानो महामेघैः वर्षद्भिः समदृश्यत ॥ ४१ ॥
ततः वर्षद्भिः - नंतर पाऊस पाडणार्या - महामेघैः वर्धमानः - मोठया मेघांमुळे वाढलेला- उद्वेलः समुद्रः - मर्यादा सोडून गेलेला समुद्र- सर्वतः महीं - सर्व ठिकाणी पृथ्वीला - प्लावयन् समदृश्यत - बुडवून टाकणारा असा दिसला. ॥४१॥
एके दिवशी राजाने पाहिले की, प्रलयकालचे भयंकर मेघ पाऊस पाडत असून समुद्र मर्यादा सोडून वाढत आहेत. पाहता पाहता सर्व पृथ्वी बुडू लागली. (४१)
ध्यायन् भगवदादेशं ददृशे नावमागताम् ।
तामारुरोह विप्रेन्द्रैः आदायौषधिवीरुधः ॥ ४२ ॥
भगवदादेशं ध्यायन् - श्रीविष्णूच्या आज्ञेचे चिंतन करणारा सत्यव्रत- आगतां नावं ददृशे - आलेल्या नौकेला पाहता झाला- ओषधिवीरुधः आदाय - औषधी व वेली घेऊन- विप्रेन्द्रैः तां आरुरोह - श्रेष्ठ ब्राह्मणांसह त्या नौकेवर चढला. ॥४२॥
तेव्हा राजाला भगवंतांच्या आज्ञेच स्मरण झाले आणि नावसुद्धा आलेली दिसली, तेव्हा तो धान्य आणि इतर बीजे घेऊन सप्तर्षींसह तीत बसला. (४२)
तं ऊचुर्मुनयः प्रीता राजन् ध्यायस्व केशवम् ।
स वै नः संक्स्द् अस्माद् अविता शं विधास्यति ॥ ४३ ॥
प्रीताः मुनयः तं ऊचुः - प्रसन्न झालेले ऋषी त्याला म्हणाले- राजन् - हे राजा- केशवं ध्यायस्व - श्रीविष्णूचे चिंतन कर- सः वै नः अस्मात् - तोच खरोखर आम्हाला - संकटात् अविता - या संकटांतून रक्षील- शं विधास्यति - कल्याण करील. ॥४३॥
सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणाले, " राजा, तू भगवंतांचे ध्यान कर. तेच आम्हांला या संकटातून वाचवतील आणि आमचे कल्याण करतील" (४३)
सोऽनुध्यातस्ततो राज्ञा प्रादुरासीन् महार्णवे ।
एकशृंगधरो मत्स्यो हैमो नियुतयोजनः ॥ ४४ ॥
ततः राज्ञा अनुध्यातः - नंतर राजाने ध्यायिलेला- सः नियुतयोजनः - तो दहा लक्ष योजने विस्तृत असा - एकशृङगधरः हैमः मत्स्यः - एक शिंगाचा सुवर्णाचा मासा - महर्णवे प्रादुरासीत् - मोठया समुद्रात प्रकट झाला. ॥४४॥
त्यांच्या आज्ञेनुसार राजाने भगवंतांच्ये ध्यान केले. त्यावेळी त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाने शरीर असलेला चार लक्ष कोस लांबीचा एक शिंगाचा एक प्रचंड मासा प्रगट झाला. (४४)
निबध्य नावं तत् श्रृंगे यथोक्तो हरिणा पुरा ।
वरत्रेणाहिना तुष्टः तुष्टाव मधुसूदनम् ॥ ४५ ॥
पुरा यथा हरिणा उक्तः - पूर्वी जसे विष्णूकडून उपदेशिला गेला- (तथा) अहिना वरत्रेण - त्याप्रमाणे सर्परूपी दोरखंडाने - तच्छृङगे नावं निवध्य - त्या माशाच्या शिंगाला नौका बांधून- तृष्टः मधुसूदनं तुष्टाव - स्वतः संतुष्ट झालेला श्रीविष्णूला स्तविता झाला. ॥४५॥
भगवंतांच्या सांगण्यावरून ती नाव वासुकी नागाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंतांची स्तुती करू लागला. (४५)
श्रीराजोवाच -
अनाद्यविद्योपहतात्मसंविदः तन्मूलसंसारपरिश्रमातुराः । यदृच्छयेहोपसृता यमाप्नुयुः विमुक्तिदो नः परमो गुरुर्भवान् ॥ ४६ ॥
अनाद्यविद्योपहतात्मसंविदः - अनादि अज्ञानाने आत्मविषयक ज्ञान आच्छादून गेले आहे ज्याचे असे- तन्मूलसंसारोपरिश्रमतुराः - अज्ञानमूलक जो संसार त्याविषयीच्या श्रमाने पीडिलेले- इह यदृच्छया उपसृताः - ह्या संसारात ज्याच्या कृपेने आश्रय केलेले- यं आप्नुयुः - ज्याला मिळवितात- सः भवान् नः परमः - तो तू आमचा श्रेष्ठ - विमुक्तिदः गुरुः (असि) - मुक्तिदाता गुरु आहेस. ॥४६॥
सत्यव्रत म्हणाला - जगातील जीवांचे आत्मज्ञान अनादी अविद्येमुळे झाकले गेले आहे. याचमुळे ते संसारातील अनंत दुःखांच्या भाराने त्रस्त होत आहेत. जेव्हा आपल्या इच्छेने ते आपल्याला शरण येतात, तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात. म्हणून आम्हांला मुक्ती देणारे परम गुरू आपणच आहात. (४६)
जनोऽबुधोऽयं निजकर्मबन्धनः
सुखेच्छया कर्म समीहतेऽसुखम् । यत्सेवया तां विधुनोत्यसन्मतिं ग्रन्थिं स भिन्द्याद् हृदयं स नो गुरुः ॥ ४७ ॥
निजकर्मबन्धनः - आपल्या कर्मांनी बांधून गेलेला - सः अयं अबुधः जनः - हा अज्ञ समाज- सुखेच्छया - सुखाच्या इच्छेने - असुखं कर्म समीहते - दुःखकारक कर्म करितो- पुमान् यत्सेवया - पुरुष ज्याच्या सेवेने - तां असन्मतिं विधुनोति - त्या दुष्ट बुद्धीला सोडितो- सः गुरुः नः - तो गुरु परमेश्वर आमची - हृदयग्रन्थिं भिन्द्यात् - हृदयरूपी गाठ तोडून टाको. ॥४७॥
हा जीव अज्ञानी आहे. आपल्याच कर्मांनी बांधलेला आहे. सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो. ज्यांची सेवा केल्यामुळे त्यांचे हे अज्ञान नष्ट होते, तेच माझे परम गुरू आपण, माझ्या हृदयाची अज्ञानरूप गाठ तोडून टाका. (४७)
यत्सेवयाग्नेरिव रुद्ररोदनं
पुमान् विजह्यान् मलमात्मनस्तमः । भजेत वर्णं निजमेष सोऽव्ययो भूयात् स ईशः परमो गुरोर्गुरुः ॥ ४८ ॥
अग्नेः रुद्ररोदनं इव - अग्नीच्यायोगे जसे सोने रूपे मळ टाकते तसा- पुमान् यत्सेवया - पुरुष ज्याच्या सेवेने - आत्मनः मलं विजह्यात् - आत्म्यावरील अज्ञानरुपी मळ टाकतो- निजवर्णं (च) भजेत - व स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त होतो- सः एषः अव्ययः ईशः - तो हा अविनाशी परमेश्वर - नः (गुरुः) भूतात् - आमचा गुरु होवो- (यतः) सः परमः गुरोः गुरुः (अस्ति) - ज्याअर्थी तो श्रेष्ठ गुरूचा गुरू होय. ॥४८॥
जसे अग्नीमध्ये तापविलेल्याने सोन्याचांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्यांचे खरे स्वरूप दिसू लागते, त्याचप्रमाणे ज्यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुऊन टाकतो आणि आपल्या खर्या स्वरूपात स्थिर होतो, ते आपण सर्वशक्तिमान अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परम गुरू आहात. म्हणून आपण आमचे सुद्धा गुरू व्हा. (४८)
न यत्प्रसादायुतभागलेशं
अन्ये च देवा गुरवो जनाः स्वयम् । कर्तुं समेताः प्रभवन्ति पुंसः तं ईश्वरं त्वां शरणं प्रपद्ये ॥ ४९ ॥
अन्ये देवाः गुरवः जनाः च - दुसरे देव, गुरू व लोक- समेताः - एकत्र जमलेले- स्वयं पुंसः - स्वतः पुरुषावर - यत्प्रसादायुतभागलेशं - ज्या तुझ्या प्रसादाच्या दहा हजाराव्या लेशाइतकाही - कर्तुं न प्रभवन्ति - अनुग्रह करण्यास समर्थ नाहीत- तं ईश्वरं त्वां शरणं प्रपद्ये - त्या तुला ईश्वराला मी शरण आलो आहे. ॥४९॥
सर्व देव, गुरू आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली, तरीसुद्धा ती आपल्या कृपेच्या दहा हजाराव्या अंशाइतकी सुद्धा असू शकणार नाही. अशा आपणास मी शरण आलो आहे. (४९)
अचक्षुरन्धस्य यथाग्रणीः कृतः
तथा जनस्याविदुषोऽबुधो गुरुः । त्वं अर्कदृक् सर्वदृशां समीक्षणो वृतो गुरुर्नः स्वगतिं बुभुत्सताम् ॥ ५० ॥
अचक्षु यथा - नेत्रहीन पुरुष जसा - अन्धस्य अग्रणीः कृतः - आंधळ्याचा पुढारी करावा- तथा अविदुषः जनस्य अबुधः गुरुः - तसा अज्ञानी पुरुषाचा अज्ञानी गुरु होय- अर्कदृक् सर्वद्दशां - सूर्य हीच ज्याची दृष्टि आहे असा - समीक्षणः त्वं - व सर्व इंद्रियांचा प्रकाशक असा तू- स्वगतिं बुभुत्सतां - आत्मगति जाणण्याची इच्छा करणार्या - नः गुरुः वृतः (असि) - आमचा गुरु वरिला गेला आहेस. ॥५०॥
जसा एखादा आंधळा आंधळ्याला आपला मार्गदर्शक बनवितो, त्याचप्रमाणे अज्ञानी जीव अज्ञानी माणसालाच आपला गुरू बनवितो. आपण सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आणि सर्व इंद्रियांचे प्रेरक आहात. आत्मतत्त्वाचे जिज्ञासू असलेल्या आम्ही आपल्यालाच गुरू केले आहे. (५०)
जनो जनस्यादिशतेऽसतीं गतिं
यया प्रपद्येत दुरत्ययं तमः । त्वं त्वव्ययं ज्ञानममोघमञ्जसा प्रपद्यते येन जनो निजं पदम् ॥ ५१ ॥
जनः जनस्य - लोक मनुष्याला - असतीं मतिं आदिशते - वाईट बुद्धि शिकवितो- यया दुरत्ययं - ज्यायोगे सुटून जाण्यास कठीण अशा - तमः प्रपद्येत - संसारांधकारात तो पडतो- त्वं तु अव्ययं - तू तर अविनाशी - अमोघं ज्ञानं (आदिशसि) - व खरे ज्ञान शिकवितोस- येन जनः निजं पदं - ज्यायोगे लोक आपल्या स्वरूपाला - अञ्जसा प्रपद्येत - तत्काळ प्राप्त होतो. ॥५१॥
अज्ञानी मनुष्य, अज्ञानी मनुष्यांना ज्या ज्ञानाचा उपदेश करतो, ते तर अज्ञानच असते. त्यामुळे संसाररूपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते. परंतु आपण मात्र त्या अविनाशी आणि अमोघ ज्ञानाचा उपदेश करता, त्यामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खर्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. (५१)
त्वं सर्वलोकस्य सुहृत् प्रियेश्वरो
ह्यात्मा गुरुर्ज्ञानमभीष्टसिद्धिः । तथापि लोको न भवन्तमन्धधीः जानाति सन्तं हृदि बद्धकामः ॥ ५२ ॥
त्वं सर्वलोकस्य सुहृत् (असि) - तू सर्व लोकांचा मित्र आहेस- (त्वं) प्रियेश्वरः - तू प्रिय करणारा स्वामी, - आत्मा गुरुः - आत्मा, गुरु, - ज्ञानं अभीष्टसिद्धिः (असि) - ज्ञान व इष्टसिद्धी देणारा आहेस- तथा अपि अंघधीः - तरी सुद्धा अंध बुद्धीचा - बद्धकामः लोकः हृदि सन्तं - कामी पुरुष हृदयात असणार्या - भवन्तं न जानाति - तुला जाणत नाही. ॥५२॥
आपण सर्व लोकांचे सुहृद, प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात. गुरू, त्यांचे द्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्ट वस्तूची प्राप्ती हेसुद्धा आपलेच स्वरूप आहे. असे असताही इच्छांच्या बंधनात जखडले जाऊन लोक आंधळे झाले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असताना या गोष्टींचा त्यांना पत्ताच लागत नाही. (५२)
तं त्वामहं देववरं वरेण्यं
प्रपद्य ईशं प्रतिबोधनाय । छिन्ध्यर्थदीपैर्भगवन् वचोभिः ग्रन्थीन् हृदय्यान् विवृणु स्वमोकः ॥ ५३ ॥
अहं तं देववरं - मी त्या देवश्रेष्ठ - वरेण्यं ईशं त्वां - व सर्वोत्कृष्ट अशा सर्वैश्वर्यसंपन्न तुला - प्रतिबोधनाय प्रपद्ये - ज्ञानप्राप्तीकरिता शरण आलो आहे- भगवन् - हे ईश्वरा- अर्थदीपैः वचोभिः - अर्थाचे स्पष्टीकरण करणार्या भाषणांनी - हृदय्यान् ग्रन्थीन् छिन्धि - हृदयातील वासनारूप ग्रंथी तोडून टाक- स्वं ओकः विवृणु - आपले स्वरूप प्रगट कर. ॥५३॥
आपण पूजनीय परमेश्वर आहात. आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलो आहे. भगवन, परमार्थ प्रकाशित करणार्या आपल्या वाणीने आपण माझ्या हृदयातील अज्ञानग्रंथी तोडून टाका आणि आपले स्वरूप प्रगट करा. (५३)
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) इत्युक्तवन्तं नृपतिं भगवान् आदिपूरुषः । मत्स्यरूपी महाम्भोधौ विहरन् तत्त्वमब्रवीत् ॥ ५४ ॥
मत्स्यरूपी - माशाचे रूप घेतलेला - भगवान् आदिपुरुषः - सर्वैश्वर्यसंपन्न पुराणपुरुष विष्णु- महाम्भोधौ विहरन् - महासागरात खेळणारा असा- इति उक्तवन्तं नृपतिं - याप्रमाणे बोलणार्या सत्यव्रतराजाला- तत्त्वं अब्रवीत् - तत्त्वज्ञान सांगता झाला. ॥५४॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशी प्रार्थना करणार्या राजाला मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्त्वाचा उपदेश केला. (५४)
पुराणसंहितां दिव्यां सांख्ययोगक्रियावतीम् ।
सत्यव्रतस्य राजर्षेः आत्मगुह्यमशेषतः ॥ ५५ ॥
सत्यव्रतस्य राजर्षेः - सत्यव्रतनामक राजर्षीला- साङ्ख्ययोगक्रियावतीं - सांख्य व योग ह्यांची कर्मे उपदेशिणारी - दिव्यां पुराणसंहितां - दिव्य पुराणसंहिता- अशेषतः - संपूर्ण गुप्त - आत्मगुह्यं च (आह) - आत्मज्ञान सांगता झाला. ॥५५॥
भगवंतांनी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान, भक्ति आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्याला ’मत्स्यपुराण’ म्हणतात. (५५)
अश्रौषीद् ऋषिभिः साकं आत्मतत्त्वं असंशयम् ।
नाव्यासीनो भगवता प्रोक्तं ब्रह्म सनातनम् ॥ ५६ ॥
ऋषिभिः साकं - ऋषींसह- नावि आसीनः - नौकेत बसलेला सत्यव्रत- भगवता प्रोक्तं - भगवंताने सांगितलेले - असंशयं आत्मतत्त्वं - संशयरहित असे आत्मज्ञान- सनातनं ब्रह्म च - आणि अनादि ब्रह्मविषयक ज्ञान- अश्रौषीत् - श्रवण करिता झाला. ॥५६॥
ऋषींसह नावेत बसलेला असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंतांच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे श्रवण केले. (५६)
अतीतप्रलयापाय उत्थिताय स वेधसे ।
हत्वासुरं हयग्रीवं वेदान्प्रत्याहरद्धरिः ॥ ५७ ॥
सः हरिः - तो विष्णु- अतीतप्रलयापाये - गेल्या प्रलयाच्या शेवटी- उत्थिताय सवेधसे - जागा झालेल्या ब्रह्मदेवाला- हयग्रीवं असुरं हत्वा - हयग्रीव नामक दैत्याला मारून- वेदान् प्रत्याहरत् - वेद परत देता झाला. ॥५७॥
यानंतर जेव्हा प्रलयकाळ संपून ब्रह्मदेव उठले, तेव्हा भगवंतांनी हयग्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. (५७)
स तु सत्यव्रतो राजा ज्ञानविज्ञानसंयुतः ।
विष्णोः प्रसादात् कल्पेऽस्मिन् आसीत् वैवस्वतो मनुः ॥ ५८ ॥
ज्ञानविज्ञानसंयुतः - ज्ञान व विज्ञान ह्यांनी युक्त - सः सयव्रतः राजा तु - तो सत्यव्रत राजा तर- विष्णोः प्रसादात् - विष्णूच्या प्रसादामुळे- अस्मिन् कल्पे - ह्या मात्स्यनामक कल्पामध्ये- वैवस्वतः मनुः आसीत् - वैवस्वत नावाचा मनु झाला. ॥५८॥
भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. (५८)
सत्यव्रतस्य राजर्षेः मायामत्स्यस्य शार्ङ्गिणः ।
संवादं महदाख्यानं श्रुत्वा मुच्येत किल्बिषात् ॥ ५९ ॥
सत्यव्रतस्य राजर्षेः - सत्यव्रत राजर्षि - मायामत्स्यस्य - आणि मायेने मत्स्यावतार घेतलेला - शार्ङगिणः च संवादं - विष्णु यांमधील भाषण ज्यात आहे असे- महत् आख्यानं श्रुत्वा - मोठे चरित्र श्रवण करून- (नरः) किल्बिषात् मुच्येत - मनुष्य पापापासून मुक्त होईल. ॥५९॥
आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापांतून मुक्त होतो. (५९)
अवतारं हरेर्योऽयं कीर्तयेद् अन्वहं नरः ।
संकल्पास्तस्य सिध्यन्ति स याति परमां गतिम् ॥ ६० ॥
हरेः यः अयं अवतारः (तं) - विष्णुचा जो हा अवतार त्याला- (यः) नरः अन्वहं कीर्तयेत - जो मनुष्य रोज वर्णील- तस्य संकल्पाः सिद्ध्यन्ति - त्याचे संकल्प सिद्धीला जातील- सः परमां गतिं याति - तो श्रेष्ठ गतीला प्राप्त होईल. ॥६०॥
जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो, त्याचे सर्व संकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते. (६०)
प्रलयपयसि धातुः सुप्तशक्तेर्मुखेभ्यः
श्रुतिगणमपनीतं प्रत्युपादत्त हत्वा । दितिजमकथयद् यो ब्रह्म सत्यव्रतानां तमहमखिलहेतुं जिह्ममीनं नतोऽस्मि ॥ ६१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे मत्यावतारचरितानुवर्णनं चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
यः - जो- प्रलयपयसि सुप्तशक्तेः - प्रलयोदकामध्ये निजली आहे शक्ति ज्याची अशा - धातुः मुखेभ्य अपनीतं श्रुतिगणं - ब्रह्मदेवाच्या मुखांतून पळविलेले वेद- दितिजं हत्वा प्रत्युपादत्त - दैत्याला मारून परत आणिता झाला- सत्यव्रतानां (चं) ब्रह्म अकथयत् - आणि सत्यव्रतादिकांना ब्रह्मोपदेश करिता झाला- तं अखिलहेतुं - त्या सर्व जगाला कारणीभूत अशा - जिह्ममीनं - मायेने मत्स्यरूप घेणार्या - अहं नतः अस्मि - विष्णुला मी नमस्कार करितो. ॥६१॥
प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त झाले होते, त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती, त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेल्या श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात घेऊन गेला होता. भगवंतांनी त्याला मारून त्या श्रुती ब्रह्मदेवांना परत दिल्या आणि सत्यव्रत तसेच सप्तर्षींना ब्रह्मतत्त्वाचा उपदेश केला. समस्त जगताचे परम कारण असलेल्या त्या लीलामत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो. (६१)
स्कंध आठवा - अध्याय चोविसावा समाप्त |