श्रीमद् भागवत पुराण
सप्तमः स्कंधः
सप्तमोऽध्यायः

मातुर्गर्भे स्थितस्य प्रह्रादस्य देवर्षिनारदमुखात् उपदेशश्रवणम् -

मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदांच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


नारद उवाच -
(अनुष्टुप्)
एवं दैत्यसुतैः पृष्टो महाभागवतोऽसुरः ।
उवाच स्मयमानस्तान् स्मरन् मदनुभाषितम् ॥ १ ॥
नारदजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
युधिष्ठिरा ! असा प्रश्न दैत्य पुत्रे विचारिता ।
माझे स्मरण त्यां आले हासुनी बोलला तया ॥१॥

एवं - याप्रमाणे - दैत्यसुतैः - दैत्यपुत्रांनी - पुष्टः - प्रश्न केलेला - महाभागवतः - मोठा भगवद्‌भक्त - असुरः - प्रल्हाद - मदनुभाषितं - माझे भाषण - स्मरन् - स्मरणारा - तान् - त्या - स्मयमानान् (दैत्यपुत्रान्) - जिज्ञासा उत्पन्न झालेल्या दैत्यपुत्रांना - उवाच - बोलला
नारद म्हणतात – दैत्यपुत्रांनी जेव्हा असा प्रश्न केला, तेव्हा भगवंतांच्या परम प्रेमी भक्त प्रल्हादाला मी सांगितलेल्या गोष्टींचे स्मरण झाले. मंद हास्य करीत तो त्यांना म्हणाला. (१)


प्रह्राद उवाच -
पितरि प्रस्थितेऽस्माकं तपसे मन्दराचलम् ।
युद्धोद्यमं परं चक्रुः विर्विबुधा दानवान्प्रति ॥ २ ॥
पिपीलिकैरहिरिव दिष्ट्या लोकोपतापनः ।
पापेन पापोऽभक्षीति वदन्तो वासवादयः ॥ ३ ॥
प्रल्हाद म्हणाला -
पिताश्री आमुचे जेंव्हा तपार्थ मंदराचली ।
गेले इंद्रादि देवे तै दानवा युद्ध छेडिले ॥२॥
तदा ते बोलले ऐसे मुंग्याही साप मारिती ।
तसाचि पापि हा दैत्य पापाने गिळले तया ॥३॥

अस्माकं - आमचे - पितरि - वडील - तपसे - तपश्चर्येकरिता - मंदराचलं - मंदरपर्वतावर - प्रस्थिते - गेले असता - वासवादयः - इंद्रादि - विबुधाः - देव - पिपीलिकैः - मुंग्यांनी - अहिः इव - जसा साप तसा - लोकोपतापनः - लोकांना दुःख देणारा - पापः - पापी हिरण्यकशिपु - पापेन - स्वतःच्या पापाने - अभक्षि - भक्षिला गेला - दिष्टया - ही आनंदाची गोष्ट आहे - इति - असे - वादिनः - बोलणारे - दानवान् प्रति - दैत्यांबरोबर - परं - मोठा - युध्दोद्यमं - युध्याचा उद्योग - चक्रुः - करिते झाले
प्रल्हाद म्हणाला – आमचे वडील जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी मंदराचलावर गेले होते, तेव्हा इंद्रादी देवांनी दानवांशी युद्ध करण्याची फार मोठी तयारी केली. (२) ते म्हणू लागले की, जशा मुंग्या सापाला खातात, त्याचप्रमाणे लोकांना त्रास देणार्‍या पापी हिरण्यकशिपूला त्याच्या पापानेच खाऊन टाकले. (३)


तेषामतिबलोद्योगं निशम्यासुरयूथपाः ।
वध्यमानाः सुरैर्भीता दुद्रुवुः सर्वतो दिशम् ॥ ४ ॥
कलत्रपुत्रवित्ताप्तान् गृहान् पशुपरिच्छदान् ।
नावेक्ष्यमाणास्त्वरिताः सर्वे प्राणपरीप्सवः ॥ ५ ॥
दैत्य सेनापतीला हा कळता सर्व उद्दम ।
गळाले बळ ते सारे गेले नाही समोरही ॥४॥
घेतला मार तो खूप स्त्री पुत्र मित्र नी गुरू ।
पशू समान सर्वांना पळाले टाकुनी दुरी ॥५॥

सुरैः - देवांनी - वध्यमानाः - मारपीट केलेले - असुरयूथपाः - दैत्यांचे सेनापती - तेषां - त्या देवांच्या - अतिबलोद्योगं - अत्यंत प्रबल उद्योगाला - निशम्य - श्रवण करून - भीताः - घाबरलेले - सर्वतोदिशं - दाही दिशांना - दुद्रुवुः - पळाले. ॥ ४ ॥ प्राणपरीप्सवः - प्राणरक्षणाची इच्छा करणारे - सर्वे - सर्व दैत्य - कलत्रपुत्रमित्राप्तान् - स्त्री, पुत्र, मित्र व इष्ट यांना - गृहान् - घरांना - पशुपरिच्छदान् - पशु आणि संसारसामग्री यांना - न अवेक्षमाणाः - न पाहणारे - त्वरितः - त्वरेने पळून गेले. ॥ ५ ॥
देवांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे, असे जेव्हा दैत्यांच्या सेनापतींना समजले, तेव्हा त्यांचे साहस कमी होऊ लागले. देवांकडून मार खाल्यानंतर, स्त्री, पुत्र, मित्र, आप्तेष्ट, वाडे, गुरेढोरे आणि इतर साहित्य यांपैकी कशाचीही चिंता न करता भयभीत होऊन आपले प्राण वाचविण्यासाठी ते सर्वजण अतिशय लगबगीने जिकडे तिकडे पळून गेले. (४-५)


व्यलुम्पन् राजशिबिरं अमरा जयकाङ्‌क्षिणः ।
इन्द्रस्तु राजमहिषीं मातरं मम चाग्रहीत् ॥ ६ ॥
विजयी देवतांनी तै महाल लुटले तसे ।
माता कयाधुराणीला इंद्रे कैदेत टाकिले ॥६॥

जयकांक्षिणः - जयाची इच्छा करणारे - अमराः - देव - राजशिबिरं - राजवाडयाला - व्यलुंपन् - लुटते झाले - च - आणि - इंद्रः - इंद्र - तु - तर - राजमहिषीं - राजाच्या राणीला - मम - माझ्या - मातरं - आईला - अग्रहीत् - पकडता झाला. ॥ ६ ॥
आपला विजय व्हावा या हेतूने देवांनी राजमहालात लुटालूट केली. ऐवढेच काय, इंद्राने माझी माता पट्टराणी कयाधूलासुद्धा बंदी बनविले. (६)


नीयमानां भयोद्विग्नां रुदतीं कुररीमिव ।
यदृच्छयागतस्तत्र देवर्षिर्ददृशे पथि ॥ ७ ॥
माझी मॉं टिटवी ऐसी रडता ओढिले तिला ।
सुदैवे नारदे तेंव्हा माझी आई बघीतली ॥७॥

नीयमानां - नेल्या जाणार्‍या - भयोद्विनां - भयाने गांगरून गेलेल्या - कुररीं इव - टिटवीप्रमाणे - रुदतीं (मम मातरं) - रडत असणार्‍या त्या माझ्या आईला - तत्र पथि - त्या मार्गात - यदृच्छया - सहजगत्या - आगतः - आलेला - देवर्षिः - नारद ऋषि - ददृशे - पाहता झाला. ॥ ७ ॥
भीतीने व्याकूळ होऊन माझी माता टिटवीप्रमाणे रडत होती आणि इंद्र बळजबरीने तिला घेऊन जात होता. दैवयोगाने देवर्षी नारद तेथून जात होते. त्यांनी वाटेत माझ्या मातेला पाहिले. (७)


प्राह नैनां सुरपते नेतुमर्हस्यनागसम् ।
मुञ्च मुञ्च महाभाग सतीं परपरिग्रहम् ॥ ८ ॥
इंद्रा निरपराधीही हिला नेणे उचीत ना ।
सती साध्वी परनारी निरस्कारू नको हिला ।
त्वरीत सोडणे हीस वदले नारदो असे ॥८॥

प्राह - म्हणाला - सुरपते - हे इंद्रा - अनागसं - निरपराधी अशा - एनां - हिला - नेतुं - नेण्याला - मा अर्हसि - तू योग्य नाहीस - महाभाग - हे भाग्यवंता - परपरिग्रहम् - परस्त्री अशा - सतीं - पतिव्रतेला - मुंच मुंच - सोड सोड. ॥ ८ ॥
ते म्हणाले, "देवराज, ही निरपराध आहे. हिला घेऊन जाणे योग्य नाही. महाभागा, या साध्वी परस्त्रीला ताबडतोब सोड." (८)


इन्द्र उवाच -
आस्तेऽस्या जठरे वीर्यं अविषह्यं सुरद्विषः ।
आस्यतां यावत्प्रसवं मोक्ष्येऽर्थपदवीं गतः ॥ ९ ॥
इंद्र म्हणाला -
देवद्रोही असा दैत्य वीर्य त्याचे प्रभावित ।
वाढते गर्भरूपाने जन्मता मारितो तया ॥९॥

अस्याः - हिच्या - जठरे - उदरात - सुरद्विषः - देवशत्रूचे - अविषह्यं - दुःसह असे - वीर्यं - वीर्य - आस्ते - आहे - यावत्प्रसवं - प्रसूतीपर्यंत - आस्यतां - हिने येथे राहावे - अर्थपदवीं - कार्याच्या पूर्णत्वाला - गतः अहं - प्राप्त झालेला मी - (इमां) मोक्ष्ये - हिला सोडीन. ॥ ९ ॥
इंद्र म्हणाला – देवद्रोही हिरण्यकशिपूचे अत्यंत प्रभावशाली वीर्य हिच्या पोटात आहे. प्रसुत होईपर्यंत ही माझ्याजवळ राहील. बालक झाल्यावर त्याला मारून मी हिला सोडून देईन. (९)


नारद उवाच -
अयं निष्किल्बिषः साक्षात् महाभागवतो महान् ।
त्वया न प्राप्स्यते संस्थां अनन्तानुचरो बली ॥ १० ॥
श्रीनारद म्हणाले -
हिच्या गर्भी परं भक्त सेवको हरिचा असे ।
निष्पापचि वसे साधू तुझी ना शक्ति मारण्या ॥१०॥

त्वया - तुझ्या हातून - अयं - हा - निष्किल्बिषः - पापरहित - अनंतानुचरः - परमेश्वराचा सेवक - साक्षात् - प्रत्यक्ष - महान् - मोठा - बली - प्रतापवान - महाभागवतः - मोठा भगवद्‌भक्त - संस्थां - मरणाला - न प्राप्स्यते - पोचविला जाणार नाही. ॥ १० ॥
नारद म्हणाले – भगवंतांचा साक्षात परमप्रेमी भक्त आणि सेवक हिच्या गर्भात आहे. तो अत्यंत बलवान आणि निष्पाप महात्मा आहे. तू त्याला मारू शकणार नाहीस. (१०)


इत्युक्तस्तां विहायेन्द्रो देवर्षेर्मानयन्वचः ।
अनन्तप्रियभक्त्यैनां परिक्रम्य दिवं ययौ ॥ ११ ॥
देवर्षी नारदांची ती इंद्राने गोष्ट मानिली ।
प्रदक्षिणा तिला केली सोडुनी स्वर्गि पातला ॥११॥

इति - याप्रमाणे - उक्तः - सांगितला गेलेला - इंद्रः - इंद्र - देवर्षेः - नारदाच्या - वचः - भाषणाला - मानयन् - मान देणारा - तां - तिला - विहाय - सोडून - अनंतप्रियभक्त्या - ईश्वराच्या भक्तावरील प्रेमामुळे - एनां - हिला - परिक्रम्य - प्रदक्षिणा घालून - दिवं - स्वर्गाला - ययौ - गेला. ॥ ११ ॥
देवर्षी नारदांचे हे म्हणणे मान्य करून इंद्राने माझ्या मातेला सोडून दिले. शिवाय हिच्या गर्भामध्ये भगवद्‌भक्त आहे, हे जाणून त्याने माझ्या मातेला प्रदक्षिणा केली आणि तो आपल्या लोकी निघून गेला. (११)


ततो नो मातरं ऋषिः समानीय निजाश्रमम् ।
आश्वास्येहोष्यतां वत्से यावत् ते भर्तुरागमः ॥ १२ ॥
मातेसी समजावोनी नारदे आश्रमी स्वयें ।
नेले नी वदले बाळे पतीचे तप पूर्ण ते ।
होईपर्यंत येथेची सुखाने राहि तूं कशी ॥१२॥

ततः - नंतर - ऋषिः - नारद - नः मातरं - आमच्या आईला - निजाश्रमं - आपल्या घरी - समानीय - आणून - आश्वास्य (उवाच) - आश्वासन देऊन म्हणाला - वत्से - हे मुली - यावत् - जेव्हा - ते - तुझ्या - भर्तुः - पतीचे - आगमः (भवति तावत्) - आगमन होईल तेथपर्यंत - इह - येथे - (त्वया) उष्यतां - त्वा राहावे. ॥ १२ ॥
यानंतर देवर्षी नारद माझ्या मातेला आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि तिची समजूत घालून म्हणाले, "मुली, तुझे पती तपश्चर्या करून परत येईपर्यंत तू येथेच रहा." (१२)


तथेत्यवात्सीद् देवर्षेः अन्ति साप्यकुतोभया ।
यावद् दैत्यपतिर्घोरात् तपसो न न्यवर्तत ॥ १३ ॥
’जशी आज्ञा’ म्हणोनीया पतीचे तप थोर ते ।
संपेपर्यंत ती तेथे निर्भये राहिली असे ॥१३॥

सा अपि - तीहि - अकुतोभया - सर्वथा निर्भय झालेली - तथा इति - बरे आहे असे म्हणून - देवर्षेः - नारदाच्या - अंति - जवळ - यावत् - जोपर्यंत - दैत्यपतिः - दैत्यराज - घोरात् तपसः - घोर तपश्चर्येहून - न न्यवर्तत (तावत्) - परत आला नाही तोपर्यंत - अवात्सीत् - राहिली
जशी आपली आज्ञा असे म्हणून निर्भयपणे देवर्षी नारदांच्या आश्रमात दैत्यराज घोर तपश्चर्या पूर्ण करून परत येईपर्यंत ती राहू लागली. (१३)


ऋषिं पर्यचरत् तत्र भक्त्या परमया सती ।
अन्तर्वत्‍नी स्वगर्भस्य क्षेमायेच्छाप्रसूतये ॥ १४ ॥
माझी गर्भवती माता गर्भीच्या शिशुमंगला ।
चिंतोनी प्रेमभावाने संतसेवेत राहिली ॥१४॥

सा अन्तर्वत्नी - ती गर्भिणी - सती - पतिव्रता - तत्र - त्याठिकाणी - परमया भक्त्या - मोठया भक्तीने - स्वगर्भस्य क्षेमाय - आपल्या गर्भाच्या कल्याणाकरिता - इच्छाप्रसूतये (च) - आणि आपल्याला इच्छा होईल तेव्हा प्रसूत होता यावे याकरिता - ऋषिं पर्यचरत् - नारदाची सेवा करिती झाली
माझी गरोदर माता गर्भातील बाळाचे कल्याण व्हावे आणि योग्य वेळी प्रसूती व्हावी, या इच्छेने मोठ्या भक्तिभावाने नारदांची सेवा करीत राहिली. (१४)


ऋषिः कारुणिकस्तस्याः प्रादादुभयमीश्वरः ।
धर्मस्य तत्त्वं ज्ञानं च मामप्युद्दिश्य निर्मलम् ॥ १५ ॥
समर्थ ऋषिकारण्यी ज्ञानोपदेश हा तिला ।
दिला तेंव्हा तयांची ती दृष्टी माझ्यावरी असे ॥१५॥

कारूणिकः - दयाळू - ईश्वरः - समर्थ - ऋषिः - नारद - मां अपि - मलाहि - उद्दिश्य - उद्देशून - तस्य - तिला - धर्मस्य - धर्माचे - तत्त्वं - तत्त्व - च - आणि - निर्मलं - निर्मळ - ज्ञानं - ज्ञान - उभयं - अशी दोन्ही - प्रादात् - देता झाला
देवर्षी नारद अतिशय दयाळू आणि सर्वसमर्थ आहेत. त्यांनी माझ्या मातेला भागवत धर्माचे रहस्य आणि विशुद्ध ज्ञान असा दोन्हींचा उपदेश दिला. उपदेश करतेवेळी त्यांचे लक्ष्य मी ही होतो. (१५)


तत्तु कालस्य दीर्घत्वात् स्त्रीत्वात् मातुस्तिरोदधे ।
ऋषिणानुगृहीतं मां नाधुनाप्यजहात् स्मृतिः ॥ १६ ॥
अनंत काळ तो गेला तशी स्त्री बुद्धिच्या मुळे ।
माता विसरली सर्व परी ऋषि कृपे मुळे ।
स्मृती ती राहीली सर्व जशीच्या तशि की मला ॥१६॥

मातुः - आईचे - तत् - ते धर्माचे तत्त्वज्ञान - तु - तर - कालस्य - काळाच्या - दीर्घत्वात् - दीर्घपणामुळे - स्त्रीत्वात् (च) - आणि स्त्रीस्वभावामुळे - तिरोदधे - नाहीसे झाले - ऋषिणा - नारदाने - अनुगृहीतं मां - कृपा केलेल्या मला - स्मृतिः - आठवण - अधुना अपि - अजूनही - न अजहात् - सोडून गेली नाही
पुष्कळ कालावधी निघून गेल्यामुळे आणि स्त्री स्ववाभानुसार माझ्या मातेला त्या ज्ञानाचे स्मरण राहिले नाही. परंतु देवर्षींची विशेष कृपा असल्याने अजूनही मला त्याची विस्मृती झाली नाही. (१६)


भवतामपि भूयान्मे यदि श्रद्दधते वचः ।
वैशारदी धीः श्रद्धातः स्त्रीबालानां च मे यथा ॥ १७ ॥
विश्वास धरिता माझा तुम्हा हे ज्ञान हो शके ।
श्रद्धेने बाल स्त्रीयांची बुद्धी माझ्या परी घडे ॥१७॥

यदि - जर - मे वचः - माझ्या भाषणावर - (भवन्तः) श्रद्दधते (तर्हि) - तुम्ही विश्वास ठेवाल तर - भवतां अपि धीः - तुमचीही बुध्दि - श्रध्दातः - श्रध्देने - वैशारदी भूयात् - निपुण होईल - यथा - जशी - स्त्रीबालानां - बायकामुलांची - मे च (अभवत) - आणि माझी झाली
माझ्या या म्हणण्यावर तुम्ही श्रद्धा ठेवाल, तर तुम्हालाही ते ज्ञान प्राप्त होऊ शकेल; कारण श्रद्धेमुळे स्त्रिया व मुले यांची बुद्धीसुद्धा माझ्याप्रमाणेच देहादिकांविषयीचा अहंकार नष्ट करणारी होऊ शकते. (१७)


जन्माद्याः षडिमे भावा दृष्टा देहस्य नात्मनः ।
फलानामिव वृक्षस्य कालेनेश्वरमूर्तिना ॥ १८ ॥
जसे काळकृपेने त्या फळे वृक्षांस लागती ।
थांबती वाढती पक्व पडती क्षीण होवुनी ।
सहा हे भाव या देहा आत्मा त्याला शिवेहिना ॥१८॥

जन्माद्यां - जन्म आदिकरुन - इमे - हे - षट् - सहा - भावाः - विकार - ईश्वरमूर्तिना कालेन - ईश्वररूपी काळाच्या योगे - वृक्षस्य फलानां इव - झाडाच्या फळांप्रमाणे - देहस्य - देहाला - दृष्टाः- दिसून येतात - आत्मनः - आत्म्याला - न (दृष्टाः) - दिसून येत नाहीत
ज्याप्रमाणे ईश्वरमूर्ती कालाच्या प्रेरणेने वृक्षांच्या फळांना सहा विकार होतात, त्याचप्रमाणे जन्म, अस्तित्वाची जाणीव, वाढ, परिणाम, क्षय आणि विनाश हे सहा विकार शरीरालाच दिसतात; त्यांचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. (१८)


आत्मा नित्योऽव्ययः शुद्ध एकः क्षेत्रज्ञ आश्रयः ।
अविक्रियः स्वदृग् हेतुः व्यापकोऽसङ्‌गि अनावृतः ॥ १९ ॥
अविनाशी नित्य शुद्ध एक क्षेत्रज्ञ आश्रय ।
निर्विकार स्वयं तेज कारणी व्यापको असा ॥१९॥

आत्मा - आत्मा - नित्यः - नित्य - अव्ययः - नाशरहित - शुध्दः - शुध्द - एकः - अद्वितीय - क्षेत्रज्ञः - शरीरसाक्षी - आश्रयः - आधार - अविक्रियः - विकाररहित - स्वदृक - स्वयंप्रकाश - हेतुः - उत्पत्त्यादिकांना कारण - व्यापकः - व्यापक - असंगी - संगरहित - अनावृतः (च अस्ति) - व आवरणशून्य आहे ॥ १९ ॥
आत्मा नित्य, अविनाशी, शुद्ध, एक, क्षेत्रज्ञ, आश्रय, निर्विकार, स्वयंप्रकाश, सर्वांचे कारण, व्यापक, असंग तसेच कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेला असा आहे. (१९)


एतैर्द्वादशभिर्विद्वान् आत्मनो लक्षणैः परैः ।
अहं ममेत्यसद्‍भावं देहादौ मोहजं त्यजेत् ॥ २० ॥
असंग नि अनावृत्त आत्मा द्वादश लक्षणी ।
ज्ञात्यांनी जाणणे त्याला अहंता सर्व सोडणे ॥२०॥

एतैः - ह्या - परैः - श्रेष्ठ अशा - द्वादशभिः - बारा - आत्मनः लक्षणैः - आत्म्याच्या लक्षणांनी - तं विद्वान् - त्याला जाणणार्‍या मनुष्याने - मोहजं - मोहापासून उत्पन्न होणार्‍या - अहं मम - मी आणि माझे - इति - अशा - देहादौ - देहादिकांच्या ठिकाणी होणार्‍या - असद्‌भावं - दुराभिमानाला - त्यजेत् - सोडून द्यावे
ही आत्म्याची बारा उत्कृष्ट लक्षणे होत. यांच्या योगाने आत्मतत्त्व जाणणार्‍या पुरुषाने, अज्ञानामुळे, शरीर इत्यादींच्यामध्ये जो मी-माझे पणाचा खोटा भाव उत्पन्न उत्पन्न होतो त्याचा त्याग केला पाहिजे. (२०)


स्वर्णं यथा ग्रावसु हेमकारः
     क्षेत्रेषु योगैस्तदभिज्ञ आप्नुयात् ।
क्षेत्रेषु देहेषु तथात्मयोगैः
     अध्यात्मविद् ब्रह्मगतिं लभेत ॥ २१ ॥
(इंद्रवज्रा)
सोने जसे माति मधोनि काढी
    सोनारे तैसा हरि मेळवावा ।
क्षेत्रज्ञ तेणे तनुक्षेत्र यात
    ब्रह्मपदाची अनुभूति घ्यावी ॥२१॥

यथा - ज्याप्रमाणे - तदभिज्ञः - ते काम जाणणारा - हेमकारः - सोनार - क्षेत्रेषु - खाणीतील - ग्रावसु - दगडातून - योगैः - प्रयोगांनी - स्वर्ण - सोने - आप्नुयात् - मिळवितो - तथा - त्याप्रमाणे - अध्यात्मवित् - अध्यात्मविषय जाणणारा मनुष्य - क्षेत्रेषु - क्षेत्ररूप - देहेषु - देहांच्या ठिकाणी - आत्मयोगैः - आत्मप्राप्तिमूलक साधनांनी - ब्रह्मगतिं - ब्रह्मगतीला - लभेत - प्राप्त होतो
जसे दगडात असलेले सोने काढण्याची युक्ती माहीत असणारा सुवर्णकार त्या युक्तीने सोन्याची प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे अध्यात्मतत्व जाणणारा पुरुष आत्मप्राप्तीच्या उपायांच्या द्वारे आपल्या शरीररूप क्षेत्रातच ब्रह्मपदाचा साक्षात्कार करून घेतो. (२१)


(अनुष्टुप्)
अष्टौ प्रकृतयः प्रोक्ताः त्रय एव हि तद्‍गुणाः ।
विकाराः षोडशाचार्यैः पुमानेकः समन्वयात् ॥ २२ ॥
(अनुष्टुप्‌)
आचार्ये आठ तत्वांची प्रकृती मानिली असे ।
तयांचे गुण ते तीन विकार षोडशी तयां ।
सर्वात्मा जो पुरूष तो कथिला बंधुनो असा ॥२२॥

आचार्यैः - आचार्यांनी - अष्टौ - आठ - प्रकृतयः - प्रकृति - त्रयः एव हि - तीनच - तग्दुणाः - त्या प्रकृतीचे सत्त्वादि गुण - षोडश - सोळा - विकाराः - विकार - प्रोक्ताः - सांगितले आहेत - समन्वयात् - सर्वत्र साक्षित्वाने असल्यामुळे - पुमान् - आत्मा - एकः (प्रोक्तः) - एक सांगितला आहे
मूळ प्रकृती, महतत्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या आठ तत्वांना आचार्यांनी मूळ प्रकृती म्हटले आहे. सत्व, रज, तम हे तिचे तीन गुण आहेत आणि दहा इंद्रिये, एक मन आणि पंचमहाभूते हे तिचे सोळा विकार आहेत. या सर्वांमध्ये एक पुरुषतत्व व्यापून राहिले आहे. (२२)


देहस्तु सर्वसङ्‌घातो जगत् तस्थुरिति द्विधा ।
अत्रैव मृग्यः पुरुषो नेति नेतीत्यतत्‌ त्यजन् ॥ २३ ॥
अन्वयव्यतिरेकेण विवेकेनोशताऽऽत्मना ।
सर्गस्थान समाम्नायैः विमृशद्‌भिरसत्वरैः ॥ २४ ॥
सर्वाचा संघ तो देह स्थावरो जंगमो द्वय ।
निराळा इंद्रियादींसी आत्मा हा धुंडिणे असा ॥२३॥
सर्वात वसतो आत्मा परी तो वेगळा असे ।
निवांत बोध हा घ्यावा नको घाई मुळीच ती ॥२४॥

देहः - देह - तु - तर - सर्वसंघातः - सर्वांचा समुदायरूप - जगत् - जंगम - तस्थुः - स्थावर - इति - असा - द्विधा (अस्ति) - दोन प्रकारचा होय - अन्वयव्यतिरेकेण - आत्मा सर्वत्र व्यापूनहि पुनः सर्वांपासून अलिप्त आहे अशा - विवेकेन - विवेकाने - उशता - निर्मल अशा - आत्मना - मनाने - सर्गस्थानसमाम्नायैः - सृष्टि, स्थिति व लय ही आपल्यापसून होतात या अर्थाच्या वेदवचनांनी - विमृशद्‌भिः - मनन करणार्‍या - असत्वरैः - गंभीर पुरुषांनी - अत्र एव - या संघातरूप देहांतच - न इति न इति - हे आत्मा नव्हे हे आत्मा नव्हे - इति - अशा परीक्षेने - अतत् - जे जे आत्मा नव्हे ते ते सर्व - त्यजन् - टाकीत - पुरुषः - आत्मा - मृग्यः - शोधिला जावा
या सर्वांचा समुदाय म्हणजेच हा देह होय. हा स्थावर व जंगम असा दोन प्रकारचा आहे. या देहात अंत:करण इंद्रिये इत्यादी अनात्म वस्तूंचाच "हा आत्मा नाही," असा निषेध करीत आत्म्याला शोधले पाहिजे. (२३) आत्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे. परंतु तो त्या सर्वांपासून वेगळा आहे. अशा प्रकारे शुद्ध बुद्धीने हळू हळू सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांवर विचार केला पाहिजे. (२४)


बुद्धेर्जागरणं स्वप्नः सुषुप्तिरिति वृत्तयः ।
ता येनैवानुभूयन्ते सोऽध्यक्षः पुरुषः परः ॥ २५ ॥
बुद्धीच्या वृत्ति त्या तीन जागृत स्वप्न नि निद्रित ।
वृत्तींना चेतना ज्याची आत्मा तो साक्षिभूतची ॥२५॥

जागरणं - जागेपण - स्वप्नः - स्वप्नस्थिति - सुषुप्तिः - गाढ झोप - इति - असा - बुध्देः - बुध्दिच्या - वृत्तयः (सन्ति) - तीन वृत्ती आहेत - ताः - त्या - येन एव - ज्याच्या योगानेच - अनुभूयंते - अनुभविल्या जातात - सः - तो - अध्यक्षः - मुख्य - परः - श्रेष्ठ - पुरुषः (अस्ति) - पुरुष होय
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्या तीन वृत्ती आहेत. या वृत्तींचा ज्याच्यामुळे अनुभव येतो, तोच सर्वांपलीकडचा सर्वांचा साक्षी परमात्मा होय. (२५)


एभिस्त्रिवर्णैः पर्यस्तैः बुद्धिभेदैः क्रियोद्‍भवैः ।
स्वरूपमात्मनो बुध्येद् गन्धैर्वायुमिवान्वयात् ॥ २६ ॥
वार्‍यांच्या आश्रये गंध कळतो त्याचिये परी ।
बुद्धीच्या या अवस्थांनी आत्म्याला जाणने असे ॥२६॥

पर्यस्तैः - चोहोकडे टाकलेल्या - क्रियाद्‌भवैः - कर्मापासून उद्‌भवणार्‍या - एभिः - ह्या - त्रिवर्णैः बुध्दिभेदैः - तीन प्रकारच्या वृत्तींनी - अन्वयात् - व्याप्यव्यापक संबंधाच्या ज्ञानाने - गंधैः - गंधाच्या योगाने - वायुं इच - जसा वायु तसा - आत्मनः - आत्म्याचे - स्वरुपं - स्वरुप - बुध्येत् - जाणावे
जसे गंधामुळे त्याचा आश्रय असलेल्या वायूचे ज्ञान होते, त्याचप्रमाणे बुद्धीच्या या कर्मजन्य आणि बदलणार्‍या तिन्ही अवस्थांच्या द्वारा त्यांत साक्षीभावाने व्याप्त असणार्‍या आत्म्याला जाणावे. (२६)


एतद्द्वारो हि संसारो गुणकर्मनिबन्धनः ।
अज्ञानमूलोऽपार्थोऽपि पुंसः स्वप्न इवेष्यते ॥ २७ ॥
भवचक्री गुणकर्मी आत्मा नी तनु वेगळी ।
न देखता भ्रमे भास मिथ्या अज्ञानमूळ जे ॥२७॥

संसारः - संसार - हि - खरोखर - एतद्‍द्वारः अस्ति - बुध्दि हेच ज्याचे द्वार आहे असा होय - गुणकर्मनिबंधनः - गुण व कर्मे यांनी जखडलेला - अज्ञानमूलः - अज्ञानमूलक - अपार्थः अपि - मिथ्था असाही - पुंसः - पुरुषाला - स्वप्नः इव - स्वप्नाप्रमाणे - इष्यते - कल्पिला जातो
गुण आणि कर्मांमुळे उत्पन्न होणारे हे जन्म-मृत्यूचे चक्र आत्म्याला शरीर आणि प्रकृतीपासून वेगळे करीत नसल्यानेच चालू आहे. हे अज्ञानमूलक आणि मिथ्या आहे, असे असूनसुद्धा जीवाला याची स्वप्नाप्रमाणे प्रचीती येत असते. (२७)


तस्माद्‍भवद्‌भिः कर्तव्यं कर्मणां त्रिगुणात्मनाम् ।
बीजनिर्हरणं योगः प्रवाहोपरमो धियः ॥ २८ ॥
म्हणोनी गुणकर्माचे जाळावे बीज ते तुम्ही ।
तेणे निवृत्त हो चित्त हेवि परमात्म दर्शन ॥२८॥

तस्मात् - म्हणून - भवद्‌भिः - तुम्हाकडून - विगुणात्मनां - सत्त्व, रज, तमोगुणात्मक - कर्मणां - कर्माच्या - बीजनिर्हरणं - बीजाचे दहन - कर्तव्यं - केले जावे
म्हणून तुम्ही प्रथम या गुणांना अनुसरून होणार्‍या कर्मांचे बीजच नाहीसे केले पाहिजे. असे केल्याने बुद्धीच्या निरनिराळ्या वृत्तींचा प्रवाह नाहीसा होतो. यालाच दुसर्‍या शब्दांत योग किंवा परमात्म्याशी मिलन होणे असे म्हणतात. (२८)


तत्रोपायसहस्राणां अयं भगवतोदितः ।
यदीश्वरे भगवति यथा यैरञ्जसा रतिः ॥ २९ ॥
कर्माचे मूळ खंडाया अनेक साधने जरी ।
परी श्रीहरिची भक्ती स्वल्प ती वदला हरी ॥२९॥

तत्र - त्या - उपायसहस्त्राणां - ज्ञानप्राप्तीच्या हजारो उपायांमध्ये - भगवता - नारदाने - अयं - हा - उदितः - सांगितला - यत् - की - भगवति - ऐश्वर्यसंपन्न अशा - ईश्वरे - ईश्वराच्या ठिकाणी - यथा यैः - जेणे करून ज्या साधनांनी - अञ्जसा - त्वरित - रतिः स्यात् - रति जडेल
हे करण्यासाठी हजारो साधने आहेत. परंतु ज्या उपायाने सर्वशक्तिमान भगवंतांविषयी स्वाभाविक निष्काम प्रेम निर्माण होईल, तोच उपाय सर्वश्रेष्ठ होय. ही गोष्ट स्वत: भगवंतांनीच सांगितली आहे. (२९)


गुरुशुश्रूषया भक्त्या सर्वलब्धार्पणेन च ।
सङ्‌गेन साधुभक्तानां ईश्वराराधनेन च ॥ ३० ॥
श्रद्धया तत्कथायां च कीर्तनैर्गुणकर्मणाम् ।
तत्पादाम्बुरुहध्यानात् तल्लि~ङ्‌गेक्षार्हणादिभिः ॥ ३१ ॥
गुरूसी सेविता लाभे ती कृष्णार्पण बुद्धि की ।
नामसंकीर्तनी भक्ती संतांचा संग तो सदा ॥३०॥
ध्यान त्या पादपद्माचे मंदिरी पूजिणे तया ।
अशा या साधनांनी हो हरीची प्रीति अंतरी ॥३१॥

गुरुशुश्रूषया - गुरुच्या सेवेने - भक्त्या - ईश्वराच्या भक्तीने - च - आणि - सर्वलब्धार्पणेन - मिळालेले सर्व परमेश्वराला अर्पण करण्याने - साधुभक्तांनां संगेन - साधु व भक्त यांच्या संगतीने - च - आणि - ईश्वराराधनेन - ईश्वराच्या पूजेने ॥ ३० ॥ तत्कथायां - परमेश्वराच्या कथेवर - श्रद्धया - श्रद्धा ठेवण्याने - गुणकर्मणां - परमेश्वराचे गुण व कर्मे यांच्या - कीर्तनैः - कीर्तनाने - तत्पादाम्बुरुहध्यानात् - परमेश्वराच्या चरणकमलांच्या ध्यानाने - तल्लिंगेक्षार्हणादिभिः (रतिः संपाद्या) - परमेश्वराच्या मूर्तीचे दर्शन व पूजन इत्यादिकांच्या योगे प्रीती संपादन करावी ॥ ३१ ॥
गुरूंची प्रेमपूर्वक सेवा, आपल्याला जे मिळेल ते सर्व प्रेमाने भगवंतांना समर्पित करणे, भगवत्प्रेमी महात्म्यांचा सत्संग, भगवंतांची आराधना, त्यांच्या कथांविषयी श्रद्धा, त्यांच्या गुण आणि लीलांचे कीर्तन, त्यांच्या चरणकमलांचे ध्यान, त्यांची मंदिरे-मूर्ती इत्यादींचे दर्शन, पूजन इत्यादी साधनांनी भगवंतांविषयी स्वाभविक प्रेम उत्पन्न होते. (३०-३१)


हरिः सर्वेषु भूतेषु भगवानास्त ईश्वरः ।
इति भूतानि मनसा कामैस्तैः साधु मानयेत् ॥ ३२ ॥
शक्तिमान्‌ भगवान्‌ कृष्ण समस्तीं तो विराजितो ।
यथा शक्ती अशा भावे हृदयी आदरे धरा ॥३२॥

भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - ईश्वरः - समर्थ असा - हरिः - हरि - सर्वेषु - सर्व - भूतेषु - प्राणीमात्रांच्या ठिकाणी - आस्ते - आहे - इति - अशा - मनसा - भावनेने - भूतानि - प्राण्यांना - तैः कामैः - त्या कामना पुरवून - साधु - चांगला - मानयेत् - मान द्यावा ॥ ३२ ॥
सर्वशक्तिमान भगवान श्रीहरी सर्व प्राण्यांमध्ये विराजमान आहेत. या भावनेने सर्व प्राण्यांची इच्छा यथाशक्ती पूर्ण करून अंत:करणपूर्वक त्यांचा सन्मान करावा. (३२)


एवं निर्जितषड्वर्गैः क्रियते भक्तिरीश्वरे ।
वासुदेवे भगवति यया संलभ्यते रतिः ॥ ३३ ॥
सहा शत्रूंसि जिंकोनी साधी जो भक्ति ही अशी ।
त्याला श्रीकृष्ण पायाची अनन्य भक्ति लाभते ॥३३॥

एवं - याप्रमाणे - निर्जितषड्‍वर्गैः - षड्रिपूंचा समुदाय जिंकलेल्या पुरुषांकडून - ईश्वरे - ईश्वराच्या ठिकाणी - भक्तिः - भक्ती - क्रियते - केली जाते - यया - जिच्या योगाने - भगवति- षड्‍गुणैश्वर्यसंपन्न अशा - वासुदेवे - श्रीकृष्णाच्याठिकाणी - रतिं - प्रीती - (नरः) संलभते - मनुष्य प्राप्त करुन घेतो
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा शत्रूंवर विजय प्राप्त करून जे लोक भगवंतांची भक्ती करतात, त्यांना त्या भक्तीमुळे भगवान वासुदेवांविषयी प्रेम निर्माण होते. (३३)


निशम्य कर्माणि गुणानतुल्यान्
     वीर्याणि लीलातनुभिः कृतानि ।
यदातिहर्षोत्पुलकाश्रुगद्‍गदं
     प्रोत्कण्ठ उद्‍गायति रौति नृत्यति ॥ ३४ ॥
यदा ग्रहग्रस्त इव क्वचिद्धसति
     आक्रन्दते ध्यायति वन्दते जनम् ।
मुहुः श्वसन्वक्ति हरे जगत्पते
     नारायणेत्यात्ममतिर्गतत्रपः ॥ ३५ ॥
तदा पुमान्मुक्तसमस्तबन्धनः
     तद्‍भावभावानुकृताशयाकृतिः ।
निर्दग्धबीजानुशयो महीयसा
     भक्तिप्रयोगेण समेत्यधोक्षजम् ॥ ३६ ॥
(इंद्रवज्रा)
अद्‌भूत लीला नि पराक्रमाच्या
    कथा अशा श्रीहरिच्याच गाता ।
रोमांच अंगी उठती जिवाच्या
    प्रेमाश्रु नी कंठ भरून येतो ॥३४॥
तो भक्त सोडी मग लाज सारी
    नाचे नि गायी मग कीर्तनात ।
हासे कधी नी रडतो तसाची
    वेड्यापरी नी कधि ध्यान घेतो ॥३५॥
मानोनि विष्णू कधि जीव वंदी
    उच्छ्‌वास होतो मग दीर्घ तेंव्हा ।
सुटोनि जाते मग लाज सारी
    वाचेसि नारायण कृष्ण बोले ।
तद्रुप होता तुटतात बंध
    तयासि लाभे हरिकृष्ण देव ॥३६॥

यदा - जेव्हा - कर्माणि - परमेश्वराच्या चरित्रांना - अतुल्यान् - अनुपम अशा - गुणान् - श्रीहरीच्या गुणांना - लीलातनुभिः - लीलेसाठी घेतलेल्या अवतारांनी - कृतानि - केलेल्या - वीर्याणी - पराक्रमांना - निशम्य - श्रवण करुन - अतिहर्षोत्पुलकाश्रुगद्‍गदं - अत्यंत हर्षाने अंगावर रोमांच उभे राहिले आहेत व नेत्रांतून अश्रू वहात आहेत अशा सद्‍गदित स्थितीत - प्रोत्कंठः - ज्याचा कंठ भरुन आला आहे असा - (भक्तः) उद्‍गायति - भक्त मोठयाने गातो - नृत्यति - नाचतो - रौति - रडतो
जेव्हा भगवंतांनी लीलाशरीरांनी केलेल्या अद्‌भुत पराक्रमांनी, त्यांचे अनुपम गुण आणि चरित्रांचे श्रवण करून अत्यंत आनंदाच्या उद्रेकाने मनुष्याचे शरीर रोमांचित होते, अश्रुंमुळे कंठ दाटून येतो आणि तो लाजलज्जा सोडून मोठमोठ्याने गाऊ-नाचू लागतो आणि ओरडतोही. ज्यावेळी तो ग्रहपीडेने वेडा झालेल्या माणसाप्रमाणे कधी हसतो, कधी रडतो, कधी ध्यान करतो, तर कधी भगवद्‌भावाने लोकांना नमस्कार करू लागतो, जेव्हा तो भगवंतांमध्येच तन्मय होऊन दीर्घ नि:श्वास टाकू लागतो आणि संकोच सोडून "हरे, जगत्पते, नारायणा, असे म्हणू लागतो, तेव्हा भक्तियोगाच्या महान प्रभावाने त्याची सर्व बंधने तुटून पडतात आणि भगवद्‌भावाचीच भावना करीत करीत त्याचे हृदयसुद्धा तदाकार-भगवन्मय होऊन जाते. त्यावेळी त्याच्या जन्म-मृत्यूच्या बीजांचा साठासुद्धा जळून जातो आणि तो श्रीभगवंतांना प्राप्त होतो. (३४-३६)


अधोक्षजालम्भमिहाशुभात्मनः
     शरीरिणः संसृतिचक्रशातनम् ।
तद्‍ब्रह्मनिर्वाणसुखं विदुर्बुधाः
     ततो भजध्वं हृदये हृदीश्वरम् ॥ ३७ ॥
अशूभ ऐशा भवकर्दमात
    फसे तयाला हरिनाम तारी ।
यालाचि कोणी वदतात ब्रह्म
    निर्वाण सौख्यो वदती कुणी ते ।
हो ! मित्र बंधो तुम्हि आपुल्या त्या
    म्हणोनि चित्ती हरिसी भजावे ॥३७॥

इह - इहलोकी - अघोक्षजालंभं - परमेश्वराला मनाने केलेला स्पर्श - अशुभात्मनः - अनेक दोषयुक्त अंतःकरण असलेल्या - शरीरिणः - प्राण्याला - संसृतिचक्रशातनं (अस्ति) - संसाररूपी चक्र तोडून टाकणारा होतो - तत् - ती स्थिती - बुधाः - ज्ञानी लोक - ब्रह्मनिर्वाणसुखं - ब्रह्मरूपी मोक्षसुख - विदुः - समजतात - ततः - म्हणून - हृदये - हृदयात असणार्‍या - हृदीश्वरं - अंतर्यामी परमेश्वराचे - भजध्वं - भजन करा ॥ ३७ ॥
या जगात पापात्म्या जीवासाठी भगवंतांची प्राप्ती ही संसारचक्राला मिटवून टाकणारी आहे. काही विद्वान ह्या वस्तूला ब्रह्म आणि काहीजण निर्वाण सुखाच्या रूपात ओळखतात. म्हणून शहाण्या मित्रांनो, आपापल्या हृदयात तुम्ही हृदयेश्वर भगवंतांचे भजन करा. (३७)


कोऽतिप्रयासोऽसुरबालका हरेः
     उपासने स्वे हृदि छिद्रवत्सतः ।
स्वस्यात्मनः सख्युरशेषदेहिनां
     सामान्यतः किं विषयोपपादनैः ॥ ३८ ॥
आकाश ऐसा हरि अंतरात
    ध्यानात नाही मुळि कष्ट कांही ।
सुहृद असा तो सम प्राणिमित्र
    त्याला त्यजावे किति मूर्खताही॥३८॥

आसुरबालकाः - हे दैत्यपुत्रानो - स्वे हृदि - आपल्या हृदयात - छिद्रवत् - आकाशाप्रमाणे - सतः - असणार्‍या - स्वस्य - स्वतःचा - आत्मनः - आत्मारूप अशा - सख्युः - मित्ररूप अशा - हरेः - हरीच्या - उपासने - उपासनेमध्ये - (कः) अतिप्रयासः (अस्ति) - कोणता मोठा आयास आहे - सर्वदेहिनां - सर्व प्राण्यांना - सामान्यतः - समान असल्यामुळे - विषयोपपादनैः - विषयांच्या प्राप्तीने - किं (स्यात्) - काय कार्य होणार
असुरकुमारांनो, आपल्या हृदयातच आकाशाप्रमाणे नित्य विराजमान असणार्‍या भगवंतांचे भजन करण्यासाठी कोणते असे विशेष कष्ट पडतात ? ते समानरूपाने सर्व प्राण्यांचे प्रेमळ मित्र आहेत. एवढेच काय, आपले आत्माच आहेत. त्यांना सोडून भोगसामग्री का गोळा करायची ? (३८)


रायः कलत्रं पशवः सुतादयो
     गृहा मही कुञ्जरकोशभूतयः ।
सर्वेऽर्थकामाः क्षणभङ्‌गुरायुषः
     कुर्वन्ति मर्त्यस्य कियत्प्रियं चलाः ॥ ३९ ॥
स्त्री पुत्र पुत्री धन नी महाल
    पशू नि हत्ती अन तो खजीना ।
स्वयेचि सारे क्षणभंगुरी ते
    ते काय कोणा मग सौख्य देती ॥३९॥

रायः - धन - कलत्रं - स्त्री - पशवः - पशु - सुतादयः - पुत्र इत्यादि - गृहाः - घरे - मही - पृथ्वी - अथ - तसेच - कुंजरकोशभूतयः - हत्ती, भांडार व दुसरी ऐश्वर्ये - सर्वे - हे सर्व - चलाः - चंचल - कामाः - भोग - क्षणभंगुरायुषः - क्षणभंगुर आयुष्य असणार्‍या - मर्त्यस्य - मनुष्याचे - कियत् - कोणते - प्रियं - प्रिय - कुर्वेति - करितील
धन, पत्‍नी, गुरे-ढोरे, पुत्र, घर, जमीन, हत्ती, खजिना इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे ऐश्वर्य, एवढेच काय, संसारातील विनाशी संपूर्ण धन आणि भोगसामग्री क्षणभंगूर जीवन असणार्‍या या मनुष्याला कितीसे सुख देऊ शकेल ? (३९)


एवं हि लोकाः क्रतुभिः कृता अमी
     क्षयिष्णवः सातिशया न निर्मलाः ।
तस्माद् अदृष्टश्रुतदूषणं परं
     भक्त्योक्तयेशं भजतात्मलब्धये ॥ ४० ॥
संपत्ति सारी जशि नाशवंत
    स्वर्गादि लोको तशि सान थोर ।
निर्दोष ना ते हरि तोचि शुद्ध
    म्हणोनि गावी हरिकीर्तने ती ॥४०॥

एवं - याप्रमाणे - हि - आणखी - क्रतुभिः - यज्ञांनी - कृताः - संपादन केलेले - अमी - हे - लोकाः - स्वर्गादि लोक - क्षयिष्णवः - नाशवंत - (तारतम्येन) सातिशयाः (सन्ति) - आणि परस्परांच्या मानाने श्रेष्ठ होत - निर्मलाः - स्वच्छ - न (सन्ति) - नव्हेत - तस्मात् - याकरिता - आत्मलब्धये - आत्मप्राप्तीकरिता - अदृष्टश्रुतदूषणं - ज्याच्या ठिकाणी दोष कोणी पाहिले नाहीत व ऐकिले नाहीत अशा - परं - श्रेष्ठ - ईशं - ईश्वराला - एकया - अनन्य अशा - भक्त्या - भक्तीने - भजत - भजा ॥ ४० ॥
त्याचप्रमाणे यज्ञयागामुळे प्राप्त होणारे स्वर्गादी लोकसुद्धा नाशवान आणि उच्चनीच असे आहेत. म्हणून ते सुद्धा निर्दोष नाहीत. केवळ परमात्म्यामध्ये दोष असलेला कोणी पाहिला नाही की ऐकला नाही. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनन्य भक्तीने त्याचेच भजन केले पाहिजे. (४०)


(अनुष्टुप्)
यदर्थ इह कर्माणि विद्वन्मान्यसकृन्नरः ।
करोत्यतो विपर्यासं अमोघं विन्दते फलम् ॥ ४१ ॥
(अनुष्टुप्‌)
स्वताला मानुनी मोठा उद्देश धरूनी मनीं ।
विद्वान करिती कर्म फळ त्यां उलटे मिळे ॥४१॥

विद्वन्मानी - स्वतःला पंडित मानणारा - नरः - मनुष्य - इह - इहलोकी - यत् - जे - अध्यर्थ्य - इच्छून - असकृत् - वारंवार - कर्माणि - कर्मे - करोति - करितो - अतः - त्याच्या - विपर्यासं - उलटे - फलं - फळ - अमोघं - मिळवितो
याशिवाय स्वत:ला मोठा विद्वान समजणारा मनुष्य या लोकात ज्या उद्देशाने वारंवार अनेक कर्मे करतो, त्या उद्देशांची प्राप्ती तर लांबच, उलट त्याच्या विपरीतच फळ त्याला खात्रीने मिळते. (४१)


सुखाय दुःखमोक्षाय सङ्‌कल्प इह कर्मिणः ।
सदाऽऽप्नोतीहया दुःखं अनीहायाः सुखावृतः ॥ ४२ ॥
कर्माचे हेतु ते दोन सुख प्राप्ती नि दुःख ते ।
सुटणे परि नी पूर्ती म्हणोनी दुःख भोगितो ॥४२॥

इह - इहलोकी - कर्मिणः संकल्पः - कर्मे करण्याची इच्छा - सुखाय - सुखाकरिता - दुःखमोक्षाय च (अस्ति) - आणि दुःखापासून मुक्त होण्याकरिता असते - ईहया - इच्छेमुळे - सदा - सदा - दुखं - दुःखाला - आप्नोति - प्राप्त होतो - अनीहायाः - निरिच्छपणापासून - सुखावृतः भवति - सुखात निमग्न होतो
या जगात कर्म करणार्‍याचे दोन उद्देश असतात – सुख मिळविणे आणि दु:खापासून सुटका करून घेणे. परंतु जो अगोदर इच्छा नसल्यामुळे सुखात राहात असे, त्याला आता इच्छेमुळे नेहमी दु:ख भोगावे लागते. (४२)


कामान्कामयते काम्यैः यदर्थमिह पूरुषः ।
स वै देहस्तु पारक्यो भङ्‌गुरो यात्युपैति च ॥ ४३ ॥
जगी सकाम वृत्तीने जगे ती तनु नाशवान्‌ ।
कोल्हे कुत्रे हि त्या खाती भोग लाभे नि तो सुटे ॥४३॥

पुरुषः - पुरुष - इह - इहलोकी - यदर्थं - ज्याकरिता - काम्यैः - काम्यकर्मांनी - कामान् - भोग - कामयते - इच्छितो - सः - तो - भंगुरः - नष्ट होणारा - पारक्यः - परक्यांचा - देहः - देह - तु - तर - वै - खरोखर - याति - जातो - च - आणि - उपैति - प्राप्त होतो ॥ ४३ ॥
मनुष्य सकाम कर्मांनी या लोकी ज्या शरीरासाठी भोग प्राप्त करू इच्छितो, ते शरीरच मुळी आपले नाही, नाशवान आहे आणि येणारे-जाणारे आहे. (४३)


किमु व्यवहितापत्य दारागारधनादयः ।
राज्यकोशगजामात्य भृत्याप्ता ममतास्पदाः ॥ ४४ ॥
देहाची गति ही ऐसी मग ते धन पुत्र नी ।
स्त्रिया संपत्ति आदींची गोष्ट ती नच सांगणे ॥४४॥

ममतास्पदाः - माझेपणाची स्थळे अशी - व्यवहितापत्यदारागारधनादयः - देह, अपत्ये, स्त्री, घर, द्रव्य इत्यादि - राज्यं - राज्य - कोशगजामात्यभृत्याप्ताः - भांडार, हत्ती, प्रधान, चाकर व आप्त - (यान्ति इति) किम् उ (वक्तव्यम्) - जातील हे काय सांगितले पाहिजे ॥ ४४ ॥
जेथे शरीराचीच ही अवस्था आहे, तेथे त्याच्यापासून वेगळे असणार्‍या पुत्र, स्त्री, घर, धन, राज्य, खजिनाम हत्ती-घोडे, मंत्री, नोकर-चाकर, आप्तेष्ट आणि आपले वाटणारे इतर यांची काय कथा ? (४४)


किं एतैः आत्मनस्तुच्छैः सह देहेन नश्वरैः ।
अनर्थैः अर्थसङ्‌काशैः नित्यानन्दरसोदधेः ॥ ४५ ॥
तुच्छ हे विषयो सारे तनूच्यासह नष्टती ।
पुरूषार्थ गमे चित्ता परी सर्व अनर्थची ।
आनंदसागरा ऐसा स्वयं आत्मा अनंत तो ।
मग या वस्तुची सर्व गरज नच भासते ॥४५॥

नित्यानंदमहोदधेः - नित्य आनंदाचा मोठा समुद्र अशा - आत्मनः - आत्म्याला - देहेन सह - देहासह - एतैः - ह्या - तुच्छैः - तुच्छ - नश्वरैः - नाशिवंत - अर्थसंकाशैः - हितकर्त्याप्रमाणे भासणार्‍या अशा - अनर्थैः - अनर्थकारी पदार्थांशी - किं (प्रयोजनम्) - काय करावयाचे आहे
हे विषय शरीराबरोबरच नष्ट होणारे, अर्थपूर्ण वाटले तरी अनर्थ करणारेच आहेत. आत्मा स्वत:च परम आनंदाचा महान समुद्र आहे. त्याला या वस्तूंचा काय उपयोग ? (४५)


निरूप्यतां इह स्वार्थः कियान् देहभृतोऽसुराः ।
निषेकादिषु अवस्थासु क्लिश्यमानस्य कर्मभिः ॥ ४६ ॥
गर्भाच्या पासुनी मृत्यू पर्यन्त क्लेश होत ते ।
कर्माधीन जगी सर्व त्यात स्वार्थ न तो मुळी ॥४६॥

असुराः - दैत्य हो - निषेकादिषु - गर्भवासादि - अवस्थासु - अवस्थांमध्ये - क्लिश्यमानस्य - क्लेश पावणार्‍या - देहभृतः - शरीरधारी प्राण्याला - इह - इहलोकी - कर्मभिः - कर्मानी - कियान् - कोणता - स्वार्थः - स्वार्थ आहे तो - निरूप्यतां - सांगावा. ॥ ४६ ॥
बंधूंनो, विचार करा. जो जीव गर्भात असल्यापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये आपल्या कर्मांच्या अधीन होऊन अनंत क्लेश भोगतो, त्याचा या संसारात काय स्वार्थ आहे ? (४६)


कर्माण्यारभते देही देहेनात्मानुवर्तिना ।
कर्मभिस्तनुते देहं उभयं त्वविवेकतः ॥ ४७ ॥
जीव हा सूक्ष्म देहाला आत्मा मानून वर्तता ।
पुन्हा भोगार्थ कर्मांना शरीरा धारितो पहा ।
अविवेके असे नित्य घडते ही परंपरा ॥४७॥

देही - शरीरधारी प्राणी - आत्मानुवर्तिनां - मनाच्या धोरणाने वागणार्‍या - देहेन - देहाने - कर्माणि - कर्मे - आरभते - आरंभितो - कर्मभिः - कर्मानी - देहं - देहाला - तनुते - निर्माण करितो - उभयं तु - पण दोन्ही - अविवेकतः (तनुते) - अविवेकानेच करितो. ॥ ४७ ॥
सूक्ष्म शरीरालाच तो जीव आपला आत्मा मानून त्याच्या द्वारा अनेक प्रकारची कर्मे करतो आणि कर्मांमुळेच पुन्हा शरीर ग्रहण करतो. अशा प्रकारे कर्मामुळे शरीर आणि शरीरामुळे कर्म ही परंपरा चालू राहाते आणि हे सर्व अविवेकामुळे होते. (४७)


तस्मादर्थाश्च कामाश्च धर्माश्च यदपाश्रयाः ।
भजतानीहयाऽऽत्मानं अनीहं हरिमीश्वरम् ॥ ४८ ॥
तरी निष्काम भावाने निष्क्रीय आत्मरूप त्या ।
हरिसी भजणे नित्य लाभते सर्व त्या मुळे ।
न इच्छी त्याजला कैसी हरिची प्राप्ति ती कधी ॥४८॥

तस्मात् - याकरिता - अर्थाः - अर्थ - च - आणि - धर्माः - धर्म - यदपाश्रयाः (सन्ति) - ज्याच्या आश्रयाने असतात अशा - (तं) आत्मानं - त्या आत्मस्वरूप - अनीहं - निरिच्छ - च - आणि - ईश्वरं - समर्थ अशा श्रीहरीला - अनीहया - निष्कामपणाने - भजत - भजा. ॥ ४८ ॥
म्हणून निष्काम भावाने निष्र्किय आत्मस्वरूप भगवान श्रीहरींचे भजन करा. धर्म, अर्थ आणि काम हे त्यांच्या इच्छेखेरीज मिळत नाहीत. (४८)


सर्वेषामपि भूतानां हरिरात्मेश्वरः प्रियः ।
भूतैर्महद्‌भिः स्वकृतैः कृतानां जीवसंज्ञितः ॥ ४९ ॥
सर्वांभूत असा आत्मा हरी हा परमप्रिय ।
पंचभूत अशा देहा, जीवाला नाम ते मिळे ॥४९॥

ईश्वरः - ईश्वर - हरिः - हरि - स्वकृतैः - स्वतः उत्पन्न केलेल्या - महद्‌भिः भूतैः - पंचमहाभूतांनी - कृतानां - निर्मिलेल्या - सर्वेषां अपि - सगळ्याही - भूतानां - प्राण्यांचा - जीवसंज्ञितः - जीवसंज्ञक - प्रियः - आवडता - आत्मा - आत्मा - ईश्वरः - ईश्वर - हरिः (अस्ति) - हरि होय. ॥ ४९ ॥
भगवान श्रीहरी सर्व प्राण्यांचे ईश्वर, आत्मा आणि परम प्रियतम आहेत. आपणच निर्माण केलेल्या पंचमहाभूते आणि सूक्ष्मभूते इत्यादींच्या द्वारे निर्माण केलेल्या शरीरामध्ये ते जीव म्हणून राहातात. (४९)


देवोऽसुरो मनुष्यो वा यक्षो गन्धर्व एव वा ।
भजन्मुकुन्दचरणं स्वस्तिमान् स्याद् यथा वयम् ॥ ५० ॥
मनुष्य देवता दैत्य गंधर्व कोणिही असो ।
मुकुंदचरणा ध्याता आमुच्या सम संत हो ॥५०॥

देवः - देव - असुरः - असुर - मनुष्यः - मनुष्य - वा - किंवा - यक्षः - यक्ष - च - आणि - गंधर्वः - गंधर्व - एव - सुद्धा - मुकुंदचरणं - परमेश्वराच्या चरणाला - भजन् - भजणारा - स्वस्तिमान् - कल्याण भोगणारा - स्यात् - होतो - यथा वयम् (आस्म) - जसे आम्ही झालो. ॥ ५० ॥
देवता, दैत्य, मनुष्य, यक्ष किंवा गंधर्व, कोणी का असेना जो भगवंतांच्या चरण कमलांचे सेवन करतो, त्याचे आमच्याप्रमाणेच कल्याण होते. (५०)


नालं द्विजत्वं देवत्वं ऋषित्वं वासुरात्मजाः ।
प्रीणनाय मुकुन्दस्य न वृत्तं न बहुज्ञता ॥ ५१ ॥
न दानं न तपो नेज्या न शौचं न व्रतानि च ।
प्रीयतेऽमलया भक्त्या हरिरन्यद् विडम्बनम् ॥ ५२ ॥
देवता ऋषि नी विप्रा सदाचारी नि ज्ञानियां ।
दान तप तसे यज्ञ व्रते शौच न ते पुरे ॥५१॥
निष्काम भजता प्रेम पावतो भगवान्‌ हरी ।
विडंबन असे सर्व अन्य यत्‍न तयासि ते ॥५२॥

असुरात्मजाः - दैत्यपुत्र हो - मुकुंदस्य - ईश्वराच्या - प्रीणनाय - संतोषाकरिता - द्विजत्वं - ब्राह्मणपणा - देवत्वं - देवपणा - ऋषित्वं - ऋषिपणा - न अलं भवति - पुरा होत नाही - वा - किंवा - वृत्तं - चांगले शील - न (अलम्) - पुरे होत नाही - बहुज्ञता - बहुश्रुतपणा - न (अलम्) - पुरा होत नाही. ॥ ५१ ॥ दानं - दान - न (अलम्) - पुरे होत नाही - तपः - तपश्चर्या - न - नाही - इज्या - यज्ञ - न - नाही - शौचं - पवित्रपणा - न - नाही - च - आणि - व्रतानि - व्रतेही - अमलया - निर्मळ अशा - भक्त्या - भक्तीने - हरिः - परमेश्वर - प्रीयते - संतुष्ट होतो - अन्यत् - दुसर्‍या गोष्टी - विडंबनम् (अस्ति) - सोंगे होत. ॥ ५२ ॥
दैत्यबालकांनो, भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी ब्राह्मण, देवता किंवा ऋषी होणे, सदाचार आणि विविध ज्ञानाने परिपूर्ण होणे, दान, तप, यज्ञ, शारीरिक आणि मानसिक पवित्रता तसेच व्रतांचे अनुष्ठान हे पुरेसे नाही. भगवंत केवळ निष्काम भक्तीनेच प्रसन्न होतात. इतर सर्व निरर्थक आहे. (५१-५२)


ततो हरौ भगवति भक्तिं कुरुत दानवाः ।
आत्मौपम्येन सर्वत्र सर्वभूतात्मनीश्वरे ॥ ५३ ॥
दानवांनो तरी भक्ती करावी हरिची सदा ।
समान ठेविणे दृष्टी सर्वात्मा शक्तिमान तो ॥५३॥

ततः - म्हणून - दानवाः - दैत्य हो - सर्वभूतात्मनि - सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी अशा - ईश्वरे - समर्थ - भगवति - ऐश्वर्यसंपन्न अशा - हरौ - परमेश्वराच्या ठिकाणी - सर्वत्र - सर्व ठिकाणी - आत्म्यौपम्येन - आत्म्यासारख्या भावनेने - भक्तिं - भक्ति - कुरुत - करा. ॥ ५३ ॥
म्हणून दानव बंधूंनो, सर्व प्राण्यांना आपल्यासारखेच समजून सर्वत्र विराजमान, सर्वात्मा, सर्वशक्तिमान भगवंतांची भक्ती करा. (५३)


दैतेया यक्षरक्षांसि स्त्रियः शूद्रा व्रजौकसः ।
खगा मृगाः पापजीवाः सन्ति ह्यच्युततां गताः ॥ ५४ ॥
भक्तीच्या त्या प्रभावाने दैत्य यक्ष नि राक्षस ।
गोपाळ नी स्त्रिया शूद्र पशू पक्षी असे जिवो ।
पापीही असता कोणी मिळाले भक्तिने पदां ॥५४॥

हि - कारण - दैतेयाः - दैत्य - यक्षरक्षांसि - यक्ष व राक्षस - स्त्रियः - स्त्रिया - शूद्राः - शूद्र - व्रजौकसः - गवळी - खगाः - पक्षी - मृगाः - पशु - पापजीवाः - अनेक पापी जीव - अच्युततां - परमेश्वरस्वरूपाला - गताः - मिळालेले - संति - आहेत. ॥ ५४ ॥
भगवंतांच्या भक्तीच्या प्रभावाने दैत्य, यक्ष, राक्षस, स्त्रिया, शूद्र, गवळी, पशु-पक्षी आणि पिष्कळसे पापी जीवसुद्धा भगवद्‌भावाला प्राप्त झाले आहेत. (५४)


एतावानेव लोकेऽस्मिन् पुंसः स्वार्थः परः स्मृतः ।
एकान्तभक्तिर्गोविन्दे यत्सर्वत्र तदीक्षणम् ॥ ५५ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे प्रह्रादानुचरिते दैत्यपुत्रानुशासनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
मनुष्य जीवना मध्ये स्वार्थ नी परमार्थ तो ।
कृष्णाची भक्ति ती एक अनन्य साधिणे अशी ।
सर्वत्र दिसणे कृष्ण भक्तीचे रूप ते असे ॥५५॥
। इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ ७ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत्‌ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

यत् - जी - गोविंदे - परमेश्वराच्या ठिकाणी - एकान्तभक्तिः - अचल भक्ति - सर्वत्र - सर्व ठिकाणी - तदीक्षणं - ईश्वर आहे असे पाहणे - एतावान् एव - हाच - अस्मिन् - ह्या - लोके - लोकी - पुंसः - पुरुषाचा - परः - श्रेष्ठ - स्वार्थः - स्वार्थ - स्मृतः - सांगितला आहे. ॥ ५५ ॥
या शरीरात जीवाचा सगळ्यांत मोठा स्वार्थ एवढाच आहे की, त्याने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त करून घ्यावी. नेहमी सर्व ठिकाणी आणि सर्व वस्तूंमध्ये भगवंतांचे दर्शन करणे हेच त्या भक्तीचे स्वरूप आहे. (५५)


स्कंध सातवा - अध्याय सातवा समाप्त

GO TOP