श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १४ वा

दितीची गर्भधारणा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणाले - राजन, विशिष्ट हेतूने वराह बनलेल्या श्रीहरींची मैत्रेयांच्या तोंडून कथा ऐकूनही भक्तीचे व्रत धारण केलेल्या विदुराची पूर्ण तृप्ती झाली नाही. म्हणून त्याने हात जोडून पुन्हा विचारले. (१)

विदुर म्हणाला - मुनिवर, आम्ही आपल्याकडून ऐकले की, आदिदैत्य हिरण्याक्षाला भगवान यज्ञमूर्तींनीच मारले. ब्रह्मन, ज्यावेळी भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या दाढेवर ठेवून वर काढीत होते, त्यावेळी त्यांचे आणि दैत्यराज हिरण्याक्षाचे युद्ध कशासाठी झाले ? (२-३)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, तुझा प्रश्न मोठा सुंदर आहे. कारण तू श्रीहरीच्या अवतारकथांसंबंधीच विचारीत आहेस. या कथा मनुष्यांचे मृत्युपाश तोडणार्‍या आहेत. पहा ना ! उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच श्रीनारदांनी सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंतांच्या परमपदावर आरूढ झाला होता. पूर्वी एकदा देवांनी प्रश्न विचारल्यावरून श्रीब्रह्मदेवांनी त्यांना हाच इतिहास सांगितलेला मी ऐकला आहे. विदुरा, एकदा दक्षाची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातुर हो‌ऊन तिन्हीसांजेच्या वेळीच आपले पती मरीचीनंदन कश्यपांच्या सहवासाची कामना केली. त्यावेळी कश्यप अग्नी हीच जिव्हा असलेल्या भगवान यज्ञपतींना पायसाच्या आहुती देऊन सूर्यास्ताचे वेळी अग्निशाळेत ध्यानस्थ बसले होते. (४-८)

दिती म्हणाली - अहो विद्वन, उन्मत्त झालेला हत्ती जसा केळीचे झाड चुरगळून टाकतो, त्याचप्रमाणे हा धनुर्धर कामदेव अबला असलेल्या मला जबरदस्तीने तुमच्यासाठी बेचैन करीत आहे. आपल्या पुत्रवती सवतींचे सुख पाहून मी इर्षेने जळत आहे. म्हणून आपण माझ्यावर कृपा करा. आपले कल्याण असो. ज्यांच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्ररूपाने जन्म घेतो, त्याच स्त्रिया आपल्या पतींपासून सन्मानित समजल्या जातात. त्यांचे सुयश जगात सगळीकडे पसरते. आमचे वडील प्रजापती दक्ष यांचे आपल्या मुलींवर अतिशय प्रेम होते. एकदा त्यांनी आम्हा सर्वांना स्वतंत्रपणे बोलावून विचारले की, "आपला पति कोण असावा, असे तुम्हांस वाटते ?" ते आपल्या मुलींची काळजी घेणारे होते. म्हणून आमच्या भावना जाणून त्यांनी आमच्यापैकी तेरा कन्यांचा, गुण आणि स्वभावाला अनुरूप अशा आपल्याशी विवाह लावून दिला. म्हणून हे मंगलमूर्ती, हे कमलनयन, आपण माझी इच्छा पूर्ण करावी. कारण हे महत्तम, दीनजनांचे आपल्यासारख्या महापुरुषांकडे जाणे निष्फळ होत नाही. (९-१४)

विदुरा, कामाच्या अतिवेगाने दिती अत्यंत बेचैन झाली होती. तिने या रीतीने पुष्कळ प्रकारांनी विनवून कश्यपांना प्रार्थना केली. तेव्हा तिला समजावीत मधुर वाणीने ते म्हणाले, अधीर प्रिये, तुझ्या इच्छेनुसार मी आताच तुझ्या मनासारखे अवश्य करीन. जिच्यामुळे धर्म, अर्थ, आणि काम या तिन्हींची सिद्धी होते, अशा आपल्या पत्‍नीची कामना कोण पूर्ण करणार नाही ? ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागर पार करतो, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी दुसर्‍या आश्रमांना आश्रय देत आपल्या आश्रमद्वारा स्वतःही दुःखसमुद्रातून पार होतो. हे मानिनी ! त्रिविध पुरुषार्थांची इच्छा असणार्‍या पुरुषांची स्त्री ही अर्धे अंग समजली जाते. तिच्यावर आपल्या गृहस्थाश्रमाचा भार टाकून पुरुष निश्चिंत राहातो. इंद्रियरूप शत्रूंना जिंकणे अन्य आश्रमवासीयांना अत्यंत कठीण आहे. परंतु ज्याप्रमाणे किल्लेदार लुटारूंना सहज आपल्या अधीन करून घेतो, त्याचप्रमाणे आम्ही जिच्या आश्रयाने इंद्रियरूप शत्रूंना सहज जिंकून घेतो. हे गृहस्वामिनी, तुझ्यासारख्या पत्‍नीच्या उपकारांची परतफेड आम्ही किंवा कोणताही गुणग्राही पुरुष या जन्मात किंबहुना जन्मांतरातही पूर्णपणे करू शकत नाही. तरीसुद्धा तुझी संतानप्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करीन. पण तू एक मुहूर्तभर थांब, त्यामुळे लोक माझी निंदा करणार नाहीत. ही अत्यंत भयंकर वेळ राक्षसादी भयंकर प्राण्यांची आहे आणि दिसण्यातही भयानक आहे. यावेळी भगवान भूतनाथांचे भूत, प्रेत, इत्यादी गण फिरत असतात. हे साध्वी, या तिन्हीसांजेच्या वेळी भूतभावन भूतपती भगवान शंकर, भूत, प्रेत इत्यादी आपल्या गणांना बरोबर घेऊन नंदीवर बसून फिरत असतात. स्मशानभूमीतून उडालेल्या वावटळीच्या धुळीने धूसर झालेल्या ज्यांच्या जटा दैदीप्यमान दिसत आहेत आणि ज्यांनी सुवर्णकांतिमय गोर्‍या शरीराला भस्म लावले आहे, ते तुझे दीर महादेव आपल्या सूर्य, चंद्र आणि अग्निरूप अशा तिन्ही डोळ्यांनी सर्वांना पाहात आहेत. या जगात त्यांना कोणी आपला किंवा परका नाही. कोणी विशेष आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे, असेही नाही. आम्ही तर अनेक व्रतांचे पालन करून त्यांच्या मायेला जवळ करू इच्छितो की, जिचा उपभोग घेऊन तिला त्यांनी दूर लोटले आहे. विवेकी पुरुष अविद्येचे आवरण दूर करण्याच्या इच्छेने त्यांच्या निर्मल चरित्राचे गायन करतात. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच काय, त्यांच्या बरोबरीचाही कोणी नाही आणि फक्त सत्पुरुषच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. एवढे सगळे असूनही ते स्वतः पिशाचासारखे आचरण करतात. माणसाचे शरीर हे कुत्र्याचे खाद्य आहे, जो अविवेकी पुरुष त्याला आत्मा मानून वस्त्र, अलंकार, माळा, चंदन इत्यादींनी सजवितो, तो अभागीच आत्माराम भगवान शंकरांच्या आचरणाला त्याचा हेतू न कळल्यामुळे हसतो. ब्रह्मदेवादी लोकपालसुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्ममर्यादेचे पालन करतात, तेच या विश्वाचे अधिष्ठान आहेत आणि ही मायासुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते. असे असूनही ते पिशाचासारखे आचरण करतात. अहो ! त्या जगद्‌व्यापक प्रभूची ही अद्‌भुत लीला काही समजत नाही. (१५-२८)

मैत्रेय म्हणाले - पतीने अशा प्रकारे समजावल्यानंतरही कामातुर झालेल्या दितीने वेश्येप्रमाणे निर्लज्ज हो‌ऊन ब्रह्मर्षी कश्यपांच्या वस्त्राला हात घातला. अशा निंद्य कर्मासाठी आपल्या पत्‍नीचा हट्ट पाहून कश्यपांनी दैवाला नमस्कार केला आणि एकांतात तिचाशी समागम केला. नंतर त्यांनी स्नान करून प्राणायाम केला आणि मौन धारण करून विशुद्ध सनातन तेजाचे ध्यान करीत ते गायत्रीजप करू लागले. विदुरा, दितीलासुद्धा त्या निंद्य कर्माविषयी लाज वाटू लागली, आणि ब्रह्मर्षींच्या जवळ जाऊन खाली मान घालून ती म्हणू लागली. (२९-३२)

दिती म्हणाली - ब्रह्मन, भगवान रुद्र भूतांचे स्वामी आहेत. मी त्यांचा अपराध केला आहे. परंतु ते भूतश्रेष्ठ माझा हा गर्भ नष्ट न करोत ! भक्तवांछाकल्पतरू, उग्र आणि रुद्ररूप अशा महादेवाला मी नमस्कार करते. ते सत्पुरुषांचे कल्याण करणारे आणि त्यांना दंड न देणारे आहेत, परंतु दुष्टांना मात्र रागाने दंड देणारे आहेत. आम्हां स्त्रियांवर तर शिकारी लोकसुद्धा दया दाखवितात. मग ते सतीपती तर माझे मेहुणे आणि परम कृपाळू आहेत. ते माझ्यावर प्रसन्न होवोत ! (३३-३५)

मैत्रेय म्हणाले - सायंकालीन संध्यावंदन आदी झाल्यावर प्रजापती कश्यपांनी पाहिले की, दिती थरथर कापत आहे आणि आपल्या संतानाच्या लौकिक पारलौकिक उन्नतीसाठी प्रार्थना करीत आहे. तेव्हा ते तिला म्हणाले. (३६)

कश्यप म्हणाले - कामवासनेने तुझे चित्त मलीन झाले होते. ती वेळही शुभ नव्हती. तू माझे म्हणणे ऐकले नाहीस. तसेच देवांची सुद्धा अवहेलना केलीस. हे अमंगल स्त्रिये, तुला दोन अमंगळ आणि अधम पुत्र उत्पन्न होतील. ते वारंवार संपूर्ण लोक आणि लोकपालांना आपल्या अत्याचारांनी रडवतील. जेव्हा त्यांच्या हातून पुष्कळसे निरपराध आणि दीन प्राणी मारले जाऊ लागतील, स्त्रियांवर अत्याचार होऊ लागतील आणि महात्म्यांना क्रुद्ध केले जाईल, त्यावेळी सर्व लोकांचे रक्षण करणारे भगवान श्रीजगदीश्वर क्रुद्ध हो‌ऊन अवतार घेतील आणि इंद्राने ज्याप्रमाणे पर्वतांना शासन केले त्याप्रमाणे ते त्यांचा वध करतील. (३७-४०)

दिती म्हणाली - प्रभो, माझीसुद्धा अशीच इच्छा आहे की, जर माझ्या पुत्रांचा वध होणार असेल, तर तो साक्षात भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच होवो. क्रुद्ध ब्राह्मणांच्या शापामुळे होऊ नये. जो जीव ब्राह्मणांच्या शापाने दग्ध झालेला किंवा प्राण्यांना भय उत्पन्न करणारा असतो, तो कोणत्याही योनीत गेला तरी त्याच्यावर पापी असणारे जीवसुद्धा दया दाखवीत नाहीत. (४१-४२)

कश्यप म्हणाले - देवी, तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चात्ताप प्रगट केला आहेस. तुला योग्य काय व अयोग्य काय यांचा बोधही तत्काळ झाला आणि भगवान विष्णू, शंकर आणि माझ्याबद्दल तुला फार आदर आहे. म्हणून तुझ्या एका पुत्राच्या चार पुत्रांपैकी एक असा होईल की, सत्पुरुषसुद्धा ज्याचा सन्मान करतील आणि ज्याचे पवित्र यश, भक्तजन, भगवंतांच्या गुणांसह गातील. ज्याप्रमाणे अशुद्ध सोने वारंवार तापवून शुद्ध केले जाते, त्याप्रमाणे साधुजन त्याच्या स्वभावाचे अनुकरण करण्यासाठी निर्वैरता इत्यादी उपायांनी आपले अंतःकरण शुद्ध करतील. ज्यांच्या कृपेमुळे त्यांचेच स्वरूपभूत असणारे हे जग आनंदित होते, ते स्वयंप्रकाश भगवानसुद्धा त्याच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होतील. तो मुलगा मोठा भगवद्‌भक्त, प्रभावशाली आणि महान पुरुषांनाही पूज्य होईल. तसेच वाढलेल्या भक्तिभावाने विशुद्ध आणि भावविभोर झालेल्या अंतःकरणात श्रीभगवंतांची स्थापना करून तो देहाभिमानाचा त्याग करील. तो विषयांत अनासक्त, शीलवान, गुणांचे भांडार, तसेच दुसर्‍यांच्या समृद्धीत सुख आणि दुःखात दुःख मानणारा होईल. त्याला कोणी शत्रू असणार नाही. चंद्र जसा ग्रीष्म ऋतूत होणारा उष्णतेचा दाह नाहीसा करतो, त्याप्रंमाणे तो जगाचे दुःख दूर करणारा होईल. जो या विश्वाच्या आत आणि बाहेर व्यापून आहे, आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रूप प्रगट करतो, लक्ष्मीरूप लावण्यमूर्ती स्त्रीचीही शोभा वाढवितो, तसेच ज्याचे मुखकमल झगमगणार्‍या कुंडलांनी सुशोभित झाले आहे, त्या परमपवित्र कमलनयन श्रीहरीचे तुझ्या नातवाला प्रत्यक्ष दर्शन होईल.(४३-४९)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, दितीने जेव्हा असे ऐकले की माझा नातू भगवंतांचा भक्त होईल, तेव्हा तिला मोठा आनंद झाला. तसेच आपले मुलगे प्रत्यक्ष श्रीहरीच्या हातून मारले जातील, हे ऐकून ती अधिकच प्रसन्न झाली. (५०)

स्कंध तिसरा - अध्याय चवदावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP