श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ९ वा

ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ब्रह्मदेव म्हणाले - प्रभो, आज पुष्कळ काळानंतर मी आपल्याला जाणू शकलो. पहा ना ! केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे की, देहधारी जीव आपल्याला जाणू शकत नाहीत. भगवन, आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही, जी जी वस्तू दिसते, तीसुद्धा खरे पाहाता सत्य नाही. कारण मायेच्या गुणांत विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपणच अनेक रूपांत प्रतीत होत आहात. देवाधिदेवा ! आपण आपल्याच चित्‌शक्तीने प्रकाशित असल्याकारणाने आपल्यापासून अज्ञान नेहमीच दूर राहाते. ज्यांच्या नाभिकमलापासून मी प्रगट झालो, ते आपले रूप शेकडो अवतारांचे मूळ कारण आहे. सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठीच आपण हे पहिल्याप्रथम प्रगट केले आहे. परमात्मन, आपले जे आनंदरूप, भेदरहित व अखंड तेजोमय स्वरूप आहे, ते मी या रूपाहून वेगळे समजत नाही. आपण विश्वाची रचना करणारे असूनही, विश्वातीत व अद्वितीय आहात. भूतमात्र आणि इंद्रिये यांचे कारणही आपणच आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. हे विश्वकल्याणमय देवा, मी आपला उपासक आहे. माझ्या हितासाठीच आपण मला ध्यानात आपले हे रूप दाखविले. जो जीव पापात्मा, विषयासक्त आहे, तोच याचा अनादर करतो. मी आपल्या या रूपाला वारंवार नमस्कार करतो. स्वामी, जे लोक वेदरूप वायूने आणलेल्या आपल्या चरणरूपी कमलकोशातील सुगंध आपल्या कानांनी ग्रहण करतात, त्या आपल्या भक्तजनांच्या हृदयकमलातून कधीच आपण बाहेर पडत नाही. कारण त्यांनी पराभक्तिरूप दोरीने आपल्या चरणकमलांना बांधले आहे. जोपर्यंत माणूस आपल्या अभय देणार्‍या चरणकमलांचा आश्रय घेत नाही, तोपर्यंत त्याला धन, घर आणि सुहृदांपासून होणारे भय, शोक, लालसा, अपमान आणि अत्यंत लोभ सतावीत राहातात. शिवाय तोपर्यंतच त्याच्यामध्ये जो दुःखाचे एकमात्र कारण आहे, तो ‘मी-माझे ’असा दुराग्रह राहातो. सर्व प्रकारच्या अमंगल गोष्टी नष्ट करणारे आपले श्रवण-कीर्तनादी प्रसंग यांच्यापासून इंद्रियांना दूर ठेवून किंचित विषय-सुखासाठी दीन आणि लोभाने मनोमन लाचार हो‌ऊन नेहमी दुष्कर्मात गढून जातात, अशा बिचार्‍या लोकांची बुद्धी दैवाने हिरावून घेतलेली असते.हे अच्युता, हे उरुक्रमा, या प्रजेला तहान-भूक, वात, पित्त, कफ, सर्दी, उष्णता, हवा आणि पाऊस अशा परस्पर भिन्न तसेच कामाग्नी आणि सहन न होण्यासारख्या क्रोधामुळे जे कष्ट सोसावे लागतात, ते पाहून माझे मन फारच खिन्न होते. स्वामी, जोपर्यंत मनुष्य इंद्रिय आणि विषयरूपी मायेच्या प्रभावाने स्वतःला तुमच्यापासून वेगळा समजतो, तोपर्यंत त्याची या संसारचक्रातून सुटका होत नाही. हा संसार जरी खोटा आहे, तथापि कर्म-फलभोग याद्वाराच भोगावे लागत असल्याने ते त्याला अनेक दुःखात लोटतात. (१-९)

देवाधिदेवा, साक्षात मुनीसुद्धा जर आपल्या कथा-कीर्तनांना विन्मुख झाले, तर त्यांनाही संसारात अडकावे लागते.ते दिवसा अनेक प्रकारच्या कामकाजात राहिल्याने त्यांचे चित्त विचलित होते, रात्री ते झोपेत अचेतनासारखे पडून राहतात, त्यावेळी निरनिराळे मनोरथ केल्यामुळे क्षणाक्षणाला त्यांची झोप उडते आणि दैवयोगाने अर्थसिद्धीचे त्यांचे सर्व उद्योगही विफल होतात. नाथ, केवळ आपले गुणगान ऐकल्यानेच आपला मार्ग कळतो. आपण निश्चितच माणसाने केलेल्या भक्तियोगाने शुद्ध झालेल्या हृदयकमलात निवास करता.हे पुण्यश्लोक प्रभो, आपले भक्त ज्या ज्या भावनेने आपले चिंतन करतात, त्या साधुपुरुषांवर कृपा करण्यासाठी आपण तेच रूप धारण करता. भगवन, आपण एक आहात. तसेच सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहणारे त्यांचे परम हितकारी असे अंतरात्मा आहात. म्हणून जरी देवतांनी आपल्या हृदयांत निरनिराळ्या प्रकारच्या कामना ठेवून हरतर्‍हेच्या भरपूर सामग्रींनी आपले पूजन केले, तरीसुद्धा आपण तितके प्रसन्न होत नाही, जितके सर्व प्राण्यांवर दया केल्याने प्रसन्न होता. परंतु ही सर्वभूतदया अभक्त पुरुषांना दुर्लभ आहे. जे कर्म आपल्याला अर्पण केले जाते, त्याचा कधीही नाश न होता ते अक्षय राहाते. म्हणून दान, खडतर तप, व्रते, यज्ञ इत्यादी कर्मे यांच्या द्वारा आपली आराधना करणे हेच मनुष्याचे सर्वांत मोठे कर्मफळ आहे. आपण नेहमी आपल्या स्वरूपाच्या प्रकाशानेच प्राण्यांचा भेदभ्रमरूप अंधकार नाहीसा करता. आपण ज्ञानाचे अधिष्ठान साक्षात परमपुरुष आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांच्या निमित्ताने जी मायेची लीला होते, तो सर्व आपला खेळ आहे अशा परमेश्वरास मी वारंवार नमस्कार करतो.जे लोक प्राणत्याग करताना आपले अवतार, गुण आणि कर्मांना सूचित करणारी नावे पराधीन स्थितीतही घेतात, ते अनेक जन्मांच्या पापांतून तत्काल मुक्त हो‌ऊन माया-आवरणरहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त करतात.त्या अजन्मा अशा आपल्याला मी शरण आलो आहे. भगवन, या विश्ववृक्षाच्या रूपात आपणच विराजमान आहात. आपणच आपल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यासाठी मी, आपण आणि महादेव अशा तीन प्रमुख रूपांत विभक्त झाला आहात आणि पुन्हा प्रजापती, मनू इत्यादी शाखा-उपशाखांच्या रूपांत विस्तार पावला आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. भगवन, आपली आराधना हाच आपण लोकांना स्वधर्म सांगितला आहे; परंतु ते याबाबतीत उदासीन असून नेहमी निषिद्ध कर्मातच गुरफटलेले असतात. अशा जीवांच्या जीवन-आशेला जो तत्काळ तोडून टाकतो, तो बलवान काल आपलेच स्वरूप आहे. अशा आपल्याला मी नमस्कार करतो. दोन परार्धांपर्यंत राहाणारा आणि सर्वांना वंदनीय अशा सत्यलोकाचा मी अधिष्ठाता असलो, तरी मी कालाला भितो. आपली प्राप्ती करून घेण्यासाठी मी पुष्कळ काळपर्यंत तपश्चर्या केली. अधियज्ञरूपाने त्या तपाचे साक्षीदार असणार्‍या आपल्याला मी नमस्कार करतो. कोणत्याही विषयसुखाची ज्यांना इच्छा नाही, तरीसुद्धा ज्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी पशु-पक्षी, मनुष्य, देव इत्यादी जीवयोनींमध्ये आपल्याच इच्छेने शरीर धारण करून अनेक लीला केल्या आहेत, अशा भगवान पुरुषोत्तमाला माझा नमस्कार असो. प्रभो, आपण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश यांपैकी कशानेही ग्रस्त नाही, तरीसुद्धा या वेळी सर्व विश्वाला आपल्या पोटात लीन करून घेऊन भयंकर लाटांनी प्रक्षुब्ध झालेल्या प्रलयकालीन जलामध्ये पूर्वकल्पातील कर्मपरंपरेने थकलेल्या जीवांना विश्रांती देण्यासाठी आपण शेषरूप कोमल शय्येवर शयन करीत आहात. हे स्तुत्य असणार्‍या भगवन, आपल्या नाभिकमलरूप घरात माझा जन्म झाला आहे. हे संपूर्ण विश्व आपल्या पोटात सामावले आहे. आपल्या कृपेने मी त्रैलोक्याची रचना करण्याच्या उपकाराला समर्थ झालो आहे. यावेळी आपली योगनिद्रा समाप्त झाली असल्याकारणाने आपले नेत्रकमल उघडू लागले आहेत. अशा आपणास माझा नमस्कार असो. आपण संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृद आणि आत्मा आहात, तसेच शरणागतांवर कृपा करणारे आहात. आपल्या ज्या ज्ञान आणि ऐश्वर्याने आपण या विश्वाला आनंदित करीत आहात, त्यानेच माझ्या बुद्धीलाही युक्त करावे.त्यामुळे मी पूर्वकल्पातल्याप्रमाणे यावेळीही सृष्टीची रचना करू शकेन. आपण भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहात. आपली शक्ती असलेल्या लक्ष्मीसहित अनेक गुणावतार घेऊन आपण जी जी अद्‌भुत कर्मे कराल, त्यांपैकीच एक म्हणजे मी करीत असलेला सृष्टीरचनेचा हा उद्योग ! म्हणून यावेळी आपण माझ्या चित्तात प्रेरणा निर्माण करावी की ज्यामुळे सृष्टिरचनाविषयक अभिमानापासून मी दूर राहू शकेन. प्रभो, या जलात शयन करीत असताना अनंतशक्ती अशा परम पुरुषाच्या नाभिकमलातून माझी उत्पत्ती झाली आहे. आणि मीच आपली विज्ञानशक्ती आहे म्हणून या जगाच्या विविधतेने नटलेल्या रूपाचा विस्तार करतेवेळी माझ्या वेदरूप वाणीच्या उच्चारणाचा लोप न होवो. आपण अपार करुणा असलेले पुराणपुरुष आहात. आपली परम प्रेममय स्मितहास्ययुक्त नेत्रकमले उघडावीत आणि शेषशय्येवरून उठून विश्वाच्या उत्पत्तीसाठी आपल्या सुमधुर वाणीने माझा विषाद दूर करावा. (१०-२५)

मैत्रेय म्हणाले - विदुरा ! अशा प्रकारे तप, विद्या, आणि समाधीच्याद्वारा ब्रह्मदेवांनी आपले उत्पत्तिस्थान श्रीभगवंतांना पाहिले आणि आपले मन व वाणीच्या शक्तीनुसार स्तुती करून जणू थकून जाऊन त्यांनी मौन धारण केले. श्रीमधुसूदन भगवंतांनी पाहिले की, या प्रलयराशीला पाहून ब्रह्मदेव फारच घाबरलेला आहे. तसेच लोकरचनेच्या संदर्भात काही निश्चित विचार त्याच्या मनात नसल्याने तो फारच खिन्न झाला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाची ती स्थिती पाहून गंभीर वाणीने त्याचा खेद जणू नाहीसा करीत ते म्हणाले. (२६-२८)

श्री भगवान म्हणाले - वेदगर्भा ! तू आळस करू नकोस; सृष्टिरचनेचा प्रयत्‍न कर. तुला माझ्यापासून जे अपेक्षित आहे, ते मी अगोदरच केले आहे. तू पुन्हा एकदा तप कर आणि भागवत ज्ञानाचे अनुष्ठान कर. त्यामुळे तू सर्व लोकांना स्पष्टपणे आपल्या अंतःकरणात पाहाशील. नंतर भक्तियुक्त आणि एकाग्र चित्त झाल्यावर तू संपूर्ण लोकांत आणि तुझ्यात मला व्याप्त पाहाशील. तसेच माझ्यामध्ये संपूर्ण लोक आणि तू आहेस, असे पाहाशील. ज्यावेळी जीव, काष्ठात व्याप्त असलेल्या अग्नीप्रमाणे सर्व भूतांमध्ये मला पाहतो, त्याचवेळी तो अज्ञानातून मुक्त होतो. जेव्हा तो स्वतःला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण यांनी रहित तसेच माझ्यापासून स्वरूपतः अभिन्न आहे, असे पाहातो, तेव्हा तो मोक्षपद प्राप्त करून घेतो. ब्रह्मदेवा, अनेक प्रकारच्या कर्मसंस्कारांना अनुसरून विविध प्रकारच्या जीवसृष्टीची रचना करण्याची इच्छा असूनही तुझे चित्त मोहवश होत नाही, हे तुझ्यावरील माझ्या मोठ्या कृपेचे फळ आहे. तू पहिला मंत्रद्रष्टा आहेस. प्रजा-उत्पत्तीच्या वेळीही तुझे मन माझ्यातच लागून राहिलेले असते. म्हणूनच पापमय रजोगुण तुला बद्ध करीत नाही. तू मला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण, आणि अंतःकरण यांनी रहित समजतोस. देहधारी जीवांना माझे ज्ञान होणे जरी अवघड आहे, तरी तू मात्र मला जाणले आहेस." आपला आश्रय कोणी आहे की नाही ?" या शंकेने तू कमळाच्या देठाद्वारे पाण्यामध्ये त्याचे मूळ शोधीत होतास. तेव्हा मी तुला माझे हे स्वरूप तुझ्या अंतःकरणात दाखविले. (२९-३७)

प्रिय ब्रह्मदेवा, माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी तू माझी जी स्तुती केली आहेस आणि तपश्चर्येमध्ये तुझी जी निष्ठा आहे, तेसुद्धा माझ्या कृपेचेच फळ आहे. लोकरचनेच्या इच्छेने, सगुण प्रतीत हो‌ऊन सुद्धा तू जे निर्गुणरूपाने माझे वर्णन करून स्तुती केलीस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे कल्याण असो. सर्व इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असणारा जो पुरुष दररोज या स्तोत्राने स्तुती करून माझे भजन करील, त्याच्यावर मी लगेच प्रसन्न होईन. तत्त्ववेत्त्यांचे असे मत आहे की, वास्तुनिर्माण, तप, यज्ञ, दान, योग आणि समाधी इत्यादी साधनांनी प्राप्त होणारे परमकल्याणकारी फळ जर कोणते असेल तर ते म्हणजे माझी प्रसन्नता ! हे विधात्या, मी आत्म्यांचा आत्मा आणि प्रिय वस्तूंमध्ये अत्यंत प्रिय आहे. म्हणून देहादिक ज्याच्यासाठी प्रिय आहेत, त्या माझ्यावरच प्रेम केले पाहिजे. ब्रह्मदेवा ! त्रैलोक्य तसेच जी प्रजा यावेळी माझ्यामध्ये लीन आहे, या सर्वांची तू पूर्वकल्पाप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आपल्या सर्ववेदमय स्वरूपापासून स्वतःच रचना कर. (३८-४३)

मैत्रेय म्हणाले - प्रकृती आणि पुरुषाचे स्वामी कमलनाभ भगवान सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाला याप्रमाणे जगाचे स्वरूप दाखवून आपल्या त्या नारायणरूपात अदृश्य झाले. (४४)

स्कंध तिसरा - अध्याय नववा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP