श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ७ वा

विदुराचे प्रश्न -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणाले - मैत्रेय मुनींचे हे भाषण ऐकून बुद्धिमान व्यासपुत्र विदुराने आपल्या वाणीने त्यांना प्रसन्न करीत विचारले. (१)

विदुर म्हणाला- ब्रह्मन ! भगवंत शुद्ध बोधस्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहेत. त्यांचा लीलेने का असेना पण गुण आणि क्रियांशी संबंध कसा येतो ? बालकामध्ये कामना आणि दुसर्‍यांच्या बरोबर खेळण्याची इच्छा असते; म्हणूनच ते खेळण्याचा प्रयत्‍न करते. परंतु भगवंत तर स्वतः नित्यतृप्त आणि नेहमी आसक्तिरहित आहेत. असे असता ते क्रीडा करण्यासाठी का होईना, संकल्प कशासाठी करतील ? भगवंतांनी आपल्या गुणमय मायेने जगाची रचना केली आहे, त्या मायेनेच ते त्याचे पालन करतात आणि नंतर मायेद्वारेच त्याचा संहार पण करतील. ज्यांच्या ज्ञानाचा, काल किंवा अवस्थेमुळे, आपोआप किंवा दुसर्‍या कोणत्याही निमित्ताने कधीच लोप होत नाही, त्यांचा मायेबरोबर कसा संयोग होऊ शकेल ? एकमात्र हे भगवंतच सर्व (जीवांमध्ये) साक्षीरूपाने आहेत, तर मग त्यांना दुर्दैव कोठून असेल ? किंवा कर्मांमुळे क्लेश कसे होऊ शकतील ? भगवन, या अज्ञानसंकटात पडल्याने माझे मन खिन्न होत आहे. आपण माझ्या मनातील हा महामोह कृपा करून दूर करा.(२-७)

श्रीशुकदेव म्हणतात - तत्त्वजिज्ञासू विदुराचेकडून प्रेरणा मिळालेल्या अहंकाररहित मैत्रेयांनी भगवंतांचे स्मरण करीत सुहास्यवदनाने म्हटले.(८)

मैत्रेय म्हणाले - जो आत्मा सर्वांचा स्वामी आणि सर्वथा मुक्तस्वरूप आहे, त्याला दीनता आणि बंधन प्राप्त झाले, ही गोष्ट युक्तिसंगत नाही. परंतु तीच तर भगवंतांची माया आहे. ज्याप्रमाणे स्वप्न पाहाणार्‍या पुरुषाला आपले मस्तक छाटले आहे इत्यादी घटना न होताही अज्ञानामुळे खर्‍या वाटतात, त्याचप्रमाणे या जीवाला बंधन इत्यादी काहीही नसताना अज्ञानामुळे तसा भास होतो. ज्याप्रमाणे पाण्यावर उठणारे तरंग चंद्राच्या प्रतिबिंबावर न उमटताही तसे भासतात, आकाशातील चंद्रावर नाही, तसे देहाभिमानी जीवांनाच देहाच्या मिथ्या धर्मांची प्रचीती येते, परमात्म्याला नाही. या जगात निष्कामभावाने धर्माचे आचरण केल्यावर भगवत्कृपेने प्राप्त झालेल्या भगवंतांच्या भक्तियोगाच्या द्वारे ही प्रचीती हळूहळू नाहीशी होते. जेव्हा सर्व इंद्रिये विषयांपासून परावृत्त हो‌ऊन साक्षी असणार्‍या परमात्मा श्रीहरीमध्ये निश्चलभावाने स्थिर होतात, तेव्हा गाढ झोपलेल्या मनुष्य़ाप्रमाणे जीवाचे रागद्वेषादी सर्व क्लेश पूर्णपणे नाहीसे होतात. श्रीकृष्णांच्या गुणांचे वर्णन आणि श्रवण दुःखाच्या सर्व राशींना शांत करते; तर मग जर आमच्या हृदयात त्यांच्या चरणकमळपराग-सेवनाविषयी प्रेम जागृत झाले, तर काय विचारावे ? (९-१४)

विदुर म्हणाला - भगवन, आपल्या सयुक्तिक वचनांच्या तलवारीने माझे संदेह छिन्न-भिन्न झाले आहेत. आता माझे चित्त भगवंतांची स्वतंत्रता आणि जीवाची परतंत्रता या दोन्ही विषयांत प्रवेश करू लागली आहे. अहो विद्वान, जीवाला जे क्लेश जाणवतात, त्याला आधार केवळ भगवंतांची माया, हे आपले म्हणणे बरोबर आहे. हे सर्व क्लेश मिथ्या तसेच आधाररहित आहेत. कारण या विश्वाचे मूळ कारण मायेशिवाय दुसरे कोणतेच नाही. या संसारात दोनच प्रकारचे लोक सुखी आहेत. जे अत्यंत अज्ञानी आहेत किंवा बुद्धीच्या पलीकडे असणार्‍या भगवंतांची ज्यांनी प्राप्ती करून घेतली आहे. मधल्या श्रेणीतील संशयी लोक मात्र दुःखच भोगीत राहतात. भगवन, आपल्या कृपेमुळे माझा आता निश्चय झाला आहे की, हे अनात्म पदार्थ खरे पहाता नाहीतच, ते केवळ आहेत असे वाटतात. आता मी आपल्या चरणसेवेच्या प्रभावाने तसे वाटणेही नाहीसे करीन. आपल्या श्रीचरणांच्या सेवेने नित्यसिद्ध भगवान श्रीमधुसूदनांच्या चरणकमलांचे ठायी उत्कट प्रेम आणि आनंदाची वृद्धी होते, ज्यामुळे जन्म-मरण फेरा नाहीसा होतो. महात्मे लोक भगवत्प्राप्तीच्या मार्गावरील वाटाडेच होत, ते नेहमीच देवाधिदेव श्रीहरींच्या गुणांचे गान करीत असतात. कमी पुण्याई असणार्‍या माणसांना त्यांच्या सेवेची संधी मिळणे अत्यंत कठीण आहे. (१५-२०)

भगवन, आपण सांगितलेत की सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांनी महदादी तत्त्वे आणि त्यांच्या विकारांची क्रमाने रचना केली आणि मग त्यांच्या अंशापासून विराटाला उत्पन्न करून ते स्वतः त्यामध्ये प्रविष्ट झाले. त्या विराट पुरुषाला हजारो पाय, मांडया आणि हात आहेत, त्यालाच वेद ‘आदिपुरुष’ म्हणतात, त्यातच हे सर्व लोक ऐसपैस राहिले आहेत. आपण असे वर्णन केले की, त्या विराट पुरुषातच इंद्रिये, विषय, इंद्रियाभिमानी देवता त्यांच्यासह तीन प्रकारचे दहा प्राण आहेत आणि त्यापासूनच ब्राह्मणादी वर्णसुद्धा उत्पन्न झाले आहेत. आता आपण मला ब्रह्मदेव इत्यादी विभूतींचे वर्णन ऐकवा, ज्यांच्यापासून पुत्र, नातवंडे आणि कुटुंबियांसहित निरनिराळ्या प्रकारची प्रजा उत्पन्न हो‌ऊन हे सारे ब्रह्मांड भरून गेले. तो विराट पुरुष ब्रह्मदेव इत्यादी प्रजापतींचाही ईश्वर आहे. त्याने कोणकोणत्या प्रजापतींना उत्पन्न केले ? तसेच सर्ग, उपसर्ग आणि मन्वन्तरांचे अधिपती असलेल्या मनूंचीसुद्धा कोणत्या क्रमाने रचना केली ? मैत्रेय महोदय ! त्या मनूंचे वंश, वंशधर राजांची चरित्रे, पृथ्वीच्या वरच्या आणि खालच्या भागातील निरनिराळे लोक तसेच भूलोकाचा विस्तार आणि स्थिती यांचेही वर्णन करावे. मनुष्य़ेतर प्राणी, मनुष्य, देवता, सरपटणारे प्राणी व पक्षी, जरायुज, स्वेदज, अंडज, उद्‌भिज्ज या चार प्रकारचे प्राणी कशा प्रकारे उत्पन्न झाले तेही सांगावे. श्रीहरींनी सृष्टी निर्माण करतेवेळी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्यासाठी आपले गुणावतार जे ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांच्या रूपाने ज्या कल्याणकारी लीला केल्या त्यांचेही वर्णन करावे. वेष, आचरण आणि स्वभावानुसार वर्ण-आश्रमांचे विभाग, ऋषींची जन्म-कर्मे इत्यादी, वेदांचे विभाग, यज्ञांचे विस्तार, योगमार्ग, ज्ञानमार्ग व त्याचे साधन सांख्य मार्ग, तसेच भगवंतांनी सांगितलेली नारदपांचरात्र इत्यादी तंत्रशास्त्रे, निरनिराळ्या नास्तिकवादी मार्गांच्या प्रचाराने होणारी विषमता, नीचवर्णाचा पुरुष आणि उच्चवर्णाची स्त्री यांच्यापासून होणार्‍या संतानांचे प्रकार, शिवाय वेगवेगळे गुण आणि कर्मांच्यामुळे जीवाला ज्या ज्या आणि जितक्या गती प्राप्त होतात, ते सर्व मला सांगावे. (२१-३१)

ब्रह्मन ! धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी लागणारी एकमेकांना विरोध नसणारी साधने, व्यापार, राजनीती, शास्त्रश्रवण करण्याचा विधी, श्राद्धाचा विधी, पितृगणांची सृष्टी त्याचबरोबर कालचक्रामध्ये ग्रह, नक्षत्रे आणि तारागणांची स्थिती यांचेही वेगवेगळे वर्णन करावे. दान, तप, यज्ञयाग आणि विहीर, धर्मशाळा इत्यादी बांधणे या कर्मांचे फळ काय आहे ? प्रवास आणि संकटाच्या वेळी मनुष्याचा धर्म कोणता ? हे महानुभाव मैत्रेय मुनी धर्माचे मूळ कारण असणारे श्रीजनार्दन भगवान कोणते आचरण केल्याने संतुष्ट होतात आणि कोणाचा अनुग्रह करतात, त्याचे वर्णन करावे. हे ब्राह्मणश्रेष्ठा, दीनवत्सल असणारे गुरुजन, आपले अनुयायी शिष्य आणि पुत्र यांना त्यांनी विचारले नसताही त्यांच्या हिताची गोष्ट सांगतात. भगवन, त्या महदादी तत्त्वांचा प्रलय किती प्रकारचा आहे ? तसेच जेव्हा भगवान योगनिद्रेत शयन करतात, तेव्हा त्या तत्त्वांतील कोणती तत्त्वे त्यांची सेवा करतात आणि कोणती त्यांच्यामध्ये लीन होतात ? जीवाचे तत्त्व, परमेश्वराचे स्वरूप, उपनिषदांनी प्रतिपादन केलेले ज्ञान तसेच गुरू आणि शिष्य यांच्या परंपरेचे प्रयोजन काय आहे ? हे पवित्रात्मन, त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी विद्वानांनी कोणकोणते उपाय सांगितले आहेत ? कारण मनुष्यांना ज्ञान, भक्ती किंवा वैराग्याची प्राप्ती आपोआप कशी होईल ? मायेमुळे माझी विचारदृष्टी नष्ट झालेली आहे. मी अजाण आहे. आपण माझे परम सुहृद आहात. म्हणून श्रीहरीच्या लीलांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी जे काही प्रश्न विचारले आहेत, त्यांचे मला उत्तर द्यावे. हे पुण्यवान मैत्रेय मुनी ! सर्व वेदांचे अध्यन, यज्ञ, तपश्चर्या आणि दान इत्यादींमुळे होणारे पुण्य, जीवाची जन्म-मृत्यूपासून सुटका करून त्याला निर्भय करणारे जे पुण्य आहे, त्याच्या काही अंशाचीही बरोबरी करू शकत नाही. (३२-४१)

श्रीशुक म्हणतात - राजन, जेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मैत्रेय मुनींना या प्रकारे पुराणाविषयी प्रश्न विचारले, त्यामुळे भगवच्चर्चा करण्याला प्रेरणा मिळाल्यामुळे ते फारच प्रसन्न झाले आणि सुहास्य वदनाने त्यांना सांगू लागले. (४२)

स्कंध तिसरा - अध्याय सातवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP