श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ४ था

उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धव म्हणाला - नंतर ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवांनी भोजन केले आणि मग वारुणी नावाचे मद्य ते प्याले. त्यामुळे त्यांचा विवेक नष्ट झाला आणि लागट बोलून ते एकमेकांच्या मर्मावर आघात करू लागले. मदिरेच्या नशेने त्यांची बुद्धी बिघडली आणि ज्याप्रमाणे वेळू एकमेकांवर घासल्याने त्यांना आग लागते, त्याप्रमाणे सूर्यास्तापर्यंत ते मारामारी करू लागले. आपल्या मायेचा तो परिणाम पाहून भगवंत सरस्वती नदीच्या पाण्याने आचमन करून एका झाडाखाली बसले. शरणागतांचे दुःख दूर करणार्‍या भगवंतांनी आपल्या कुलाचा संहार करावा, असे ठरविले होते. म्हणून त्यांनी मला बदरिकाश्रमास जावयास सांगितले. विदुरा, त्यांच्या या म्हणण्याचा आशय जरी मला समजला होता, तरीसुद्धा स्वामीचरणांचा वियोग सहन न होऊ शकल्याने मी त्यांच्या पाठोपाठ प्रभासक्षेत्राला गेलो. तेथे मी पाहिले की, जे सर्वांचे आश्रयस्थान आहेत, परंतु ज्यांना कोणाचाही आश्रय नाही, ते माझे प्रियतम परमसुंदर प्रभू सरस्वती नदीच्या तीरावर एकटेच बसले आहेत. दिव्य, अत्यंत विशुद्ध सत्त्वमय असे सुंदर श्यामवर्ण शरीर, शांत भाव असलेले तेजस्वी डोळे, चार हात आणि रेशमी पीतांबर हे पाहूनच मी त्यांना ओळखले. ते एका छोटयाशा पिंपळाला टेकून डाव्या मांडीवर उजवे चरणकमल ठेवून बसले होते. खाण्या-पिण्याचा त्याग करूनदेखील ते अतिशय आनंदी दिसत होते. त्याच वेळी व्यासांचे प्रिय मित्र, परम भागवत, सिद्ध-पुरुष, मैत्रेय ऋषी आनंदाने विहार करीत योगायोगाने तेथे येऊन पोहोचले. मैत्रेय मुनी भगवंतांचे प्रेमी भक्त आहेत. आनंद आणि भक्तिभावामुळे ते सदैव विनम्र असतात. त्यांच्या देखतच प्रेम आणि सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहून मला आनंदित करीत श्रीहरी म्हणाले. (१-१०)

श्रीभगवान म्हणाले - मी तुझे मनोगत जाणतो. म्हणूनच दुसर्‍या कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेले असे साधन मी तुला सांगतो. उद्धवा, मागील जन्मी तू वसू होतास. विश्वाची रचना करणार्‍या प्रजापती आणि वसू यांनी केलेल्या यज्ञात माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच तू माझी आराधना केली होतीस. हे उद्धवा, या जगात तुझा हा जन्म शेवटचाच आहे. कारण या जन्मात तू माझा अनुग्रह प्राप्त करून घेतला आहेस. हा मर्त्यलोक सोडून मी आता माझ्या धामाकडे जाऊ इच्छितो. तुझ्या अनन्य भक्तीमुळेच यावेळी अशा एकांतात तुला माझे दर्शन झाले, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. पूर्वी पाद्मकल्पाच्या प्रारंभी मी आपल्या नाभि-कमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाला माझा महिमा प्रगट करणार्‍या ज्या श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश केला होता आणि ज्याला विवेकी लोक भागवत म्हणतात, तेच ज्ञान मी तुला देतो. (११-१३)

विदुरा, माझ्यावर प्रत्येक क्षणी त्या परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव होत होता. जेव्हा ते असे आदरपूर्वक म्हणाले, तेव्हा स्नेहभावाने माझे अंग रोमांचित झाले, वाणी सद्‌गदित झाली आणि डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. मी हात जोडून त्यांना म्हणालो, स्वामी आपल्या चरणकमलांची सेवा करणार्‍या पुरुषांना या जगात अर्थ, धर्म, काम, मोक्ष या चारांपैकी काहीच दुर्लभ नाही. तथापि हे प्रभो, मला त्यांपैकी कशाचीच इच्छा नाही. मी तर केवळ आपल्या चरणकमलांच्या सेवेसाठीच आसुसलेला आहे. हे प्रभो, आपण निःस्पृह असूनही कर्म करता. अजन्मा असून जन्म घेता. स्वतः कालरूप असूनही शत्रूच्या भीतीने पळून जाऊन द्वारकेच्या किल्ल्यात लपून बसता आणि स्वात्माराम असूनही सोळा हजार स्त्रियांसमवेत रममाण होता. असे हे विचित्र चरित्र पाहून विद्वानांची बुद्धीसुद्धा संभ्रमात पडते. देवा, आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान सर्वथैव अबाधित आणि अखंड आहे. असे असूनही सल्ला घेण्यासाठी मला बोलावून भोळ्या-भाबडया मनुष्याप्रमाणे आपण लक्षपूर्वक मला प्रश्न विचारता. प्रभो ! आपली ती लीला माझ्या मनाला संभ्रमित करते. अहो स्वामी, आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रगट करणारे जे श्रेष्ठ आणि समग्र ज्ञान आपण ब्रह्मदेवाला सांगितले, ते समजण्यास मी योग्य असेन, तर मला सांगावे. त्यायोगे मी या संसारदुःखातून सहज पार होईन. (१४-१८)

माझ्या हृदयातील भाव याप्रमाणे मी जेव्हा निवेदन केला, तेव्हा परमपुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी मला आपल्या परम स्थितीचा उपदेश केला. अशा प्रकारे पूज्यपाद गुरु श्रीकृष्णांकडून आत्मतत्त्व समजावून घेण्याचे साधन ऐकून आणि प्रभूच्या चरणांना वंदन करून तसेच त्यांना प्रदक्षिणा घालून मी येथे आलो आहे. यावेळी त्यांच्या विरहाने माझे चित्त अत्यंत व्याकूळ झाले आहे. विदुरा, त्यांचे दर्शन झाल्याने सुरुवातीला मला आनंद झाला होता, परंतु आता त्यांच्या विरहाने माझ्या हृदयाला कष्ट होत आहेत. मी आता त्यांना प्रिय असलेल्या बदरिकाश्रमक्षेत्राला जातो. तिथे भगवान श्रीनारायणदेव आणि नर हे दोन ऋषी लोकांवर कृपा करण्यासाठी दीर्घकालीन, सौ‌म्य, परंतु कठीण तपश्चर्या करीत आहेत. (१९-२२)

श्रीशुक म्हणाले - उद्धवाच्या तोंडून आपल्या प्रिय बंधूंच्या विनाशाचा असा असह्य वृत्तांत ऐकल्यानंतर परम ज्ञानी विदुराला जो शोक उत्पन्न झाला, तो त्याने ज्ञानाने शांत केला. भगवान श्रीकृष्णांच्या परिवारातील प्रमुख महाभागवत उद्धव जेव्हा बदरिकाश्रमाकडे जाण्यास निघाला, तेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मोठया श्रद्धेने त्याला विचारले. (२३-२४)

विदुर म्हणाला - उद्धवा, योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रगट करणारे जे परमज्ञान आपल्याला दिले होते, ते आपण आम्हांलाही ऐकवावे. कारण आपल्या सेवकांचे कार्य करण्यासाठीच भगवंतांचे सेवक विहार करीत असतात. (२५)

उद्धव म्हणाला - हे तत्त्वज्ञान ऐकण्यासाठी तू मुनिवर मैत्रेयांची सेवा केली पाहिजेस. हा मर्त्यलोक सोडताना स्वतः भगवंतांनीच तुला उपदेश करण्याची त्यांना आज्ञा केली होती. (२६)

श्रीशुकदेव म्हणाले- विदुराबरोबरच्या संभाषणात भगवान श्रीकृष्णांच्या गुणांच्या त्या कथामृतामुळे उद्धवाचे भगवंतांशी वियोगाचे दुःख कमी झाले. यमुनेच्या तीरावरील त्याची ती रात्र त्याला एका क्षणासारखी वाटली. प्रातःकाल होताच तो तिथून निघून गेला. (२७)

राजा परीक्षिताने विचारले - भगवान ! आणि भोजवंशातील सर्व महारथी आणि सेनापतींचेही सेनापती नष्ट झाले होते. एवढेच काय त्रिलोकीनाथ श्रीहरींनीही आपले ते रूप केले होते. असे असता सर्वांचे प्रमुख उद्धव कसे वाचले ? (२८)

श्रीशुकदेव म्हणाले - ज्यांनी केलेली इच्छा कधी व्यर्थ होत नाही, त्या श्रीहरींनी ब्राह्मणांच्या शापरूपी ‘काळा’चा बहाणा करून आपल्या कुळाचा संहार केला आणि आपला अवतार समाप्त करताना असा विचार केला "आता या लोकातून मी निघून गेल्यानंतर अत्यंत संयमशील असा उद्धवच मी सांगितलेले ज्ञान ग्रहण करण्यास योग्य अधिकारी आहे. आत्मज्ञानी उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्रसुद्धा कनिष्ठ नाही. तो विषयांमुळे कधी विचलित झाला नाही. म्हणून माझ्या ज्ञानाचे लोकांना शिक्षण देण्यासाठी त्याने येथेच राहावे" वेदांचे मूळ कारण असणार्‍या जगद्‌गुरु श्रीकृष्णांची अशी आज्ञा झाल्यावर उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन समाधियोगाने श्रीहरीची आराधना करू लागला. कुरुश्रेष्ठ परीक्षिता, परमात्मा श्रीकृष्णांनी लीलेनेच आपला श्रीविग्रह प्रगट केला होता आणि लीलेनेच तो अदृश्य केला. त्यांचे हे अंतर्धान पावणेसुद्धा धैर्यवान पुरुषांचा उत्साह वाढविणारे आणि दुसर्‍या पशुतुल्य अशा अधीर पुरुषांना अत्यंत असह्य होते. परम भागवत उद्धवाच्या तोंडून भगवंतांची प्रशंसनीय कर्मे आणि अशा प्रकारे त्यांचे अंतर्धान होणे ऐकून तसेच भगवंतांनी परमधामाला जाताना आपली आठवण काढली, हे विदुराने ऐकल्यानंतर तो प्रेमविव्हल हो‌ऊन अश्रू ढाळू लागला. यानंतर भरतश्रेष्ठ सिद्ध विदुर यमुनातटावरून काही दिवसांनी गंगेच्या किनार्‍यावर पोहोचला. श्रीमैत्रेय ऋषी तिथेच राहात होते. (२९-३६)

स्कंध तिसरा - अध्याय चवथा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP