श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २ रा

भगवंतांच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्री शुकदेव म्हणाले - जेव्हा विदुराने परम भक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्णासंबंधी विचारले, तेव्हा त्याला आपल्या स्वामींची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे हृदय उचंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही. जेव्हा उद्धव पाच वर्षांचा होता, तेव्हा बालपणी खेळतानाही श्रीकृष्णाची मूर्ती करुन तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की, न्याहारीसाठी आईने बोलावले तरी तो येत नसे. तोच आता पुष्कळ वर्षे त्यांच्याच सेवेत राहून म्हातारा झाला होता. म्हणून विदुराने विचारल्यावर आपल्या प्रिय प्रभूंच्या चरणकमलांच्या स्मरणाने तो व्याकूळ झाला. अशा स्थितीत तो कसे उत्तर देऊ शकणार ? तो दोन घटका काहीच बोलू शकला नाही. नंतर श्रीकृष्णांच्या चरणारविंद-मकरंद-सुधापानाने तीव्र भक्तियोगात बुडून जाऊन तो आनंदमग्न झाला. त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आले आणि अर्धोन्मीलित नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या. अशा प्रकारे उद्धवाला प्रेमप्रवाहात बुडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य मानले. हळूहळू जेव्हा उद्धव भगवंतांच्या प्रेमधामातून पुन्हा या लोकात आला, तेव्हा त्याने आपले डोळे पुसले आणि भगवंतांच्या लीलांच्या स्मरणाने आश्चर्यचकित हो‌ऊन तो विदुराला म्हणाला. (१-६)

उद्धव म्हणाला - श्रीकृष्णरूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना कालरूप अजगराने गिळून टाकले आहे. आमची घरे ओसाड झाली आहेत. आता मी त्यांचे काय कुशल सांगू ? अहो ! हा मनुष्य-लोक केवढा अभागी आणि त्यातून यादव तर अतिशय भाग्यहीन आहेत. जे नेहमी श्रीकृष्णांच्या बरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाहीत; जसे अमृतमय चंद्राला समुद्रात राहात असतांनाही मासे ओळखू शकले नाहीत. यादवलोक तर मनातील भाव ओळखणारे, मोठे समजूतदार आणि भगवंतांच्या बरोबर एकाच ठिकाणी राहून त्यांच्याबरोबर व्यवहार करणारे होते. तरीसुद्धा ते सर्वजण, समस्त विश्वाचे आश्रय, सर्वांतर्यामी श्रीकृष्णांना एक श्रेष्ठ यादवच समजले. परंतु भगवंतांच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंतांशी विनाकारण वैर करणारे शिशुपाल इत्यादी यांच्या अवहेलना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच ज्यांचे प्राण आहेत, त्या महात्म्यांची बुद्धी कधी विचलित होत नाही. ज्यांनी कधी तप केले नाही, त्या लोकांनासुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्यांची दर्शन-इच्छा तृप्त न करताच ते भगवान श्रीकृष्ण आपल्या श्रीविग्रहाला लपवून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचे डोळेच जणू काढून घेतले आहेत. भगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रभाव दाखविण्यासाठी मानवी-लीलांसाठी योग्य असे जे दिव्य रुप घेतले होते, ते इतके सुंदर होते की, ते पाहून संपूर्ण जग तर मोहित झालेच होते; परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होत होते. त्या रूपामध्ये सौभाग्य आणि सुंदरतेची पराकाष्ठा झाली होती. त्यांच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विभूषित झाली होती. (७-१२)

धर्मराज युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंतांच्या त्या नयनमनोहर रूपावर लोकांची दृष्टी गेली, तेव्हा त्रैलोक्यातील लोकांना असेच वाटले की, सध्याच्या मानव सृष्टीच्या रचनेमध्ये विधात्याची जेवढी चतुराई आहे ती सर्व या रूपात पूर्णतया उतरली आहे. त्यांचा प्रेमळ हास्यविनोद आणि लीलेने पाहण्याने संमानित व्रजबालांच्या नजरा त्यांच्यावरच खिळून राहात असत आणि त्यांचे चित्त असे तल्लीन हो‍ऊन जात असे की, त्या घरातील काम-धंदा अर्धवट सोडून पुतळ्याप्रमाणे उभ्या राहात असत. चराचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की, शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्याच घोररूपात असलेल्या असुरांकडून पीडा होत आहे, तेव्हा ते करुणेने द्रवले आणि अजन्मा असूनही बलरामासह, लाकडातील अग्नीप्रमाणे प्रगट झाले. (१३-१५)

अजन्मा असूनही वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लीला करणे, सर्वांना अभय देणारे असूनही जणू काही कंसाच्या भीतीने व्रजवनात जाऊन लपून राहाणे आणि अतुल पराक्रमी असूनही कालयवनाच्या समोरून मथुरानगरी सोडून पळून जाणे या भगवंतांच्या लीला आठवून मला काही सुचेनासे होत आहे. देवकी-वसुदेवांना नमस्कार करून श्रीकृष्ण म्हणाले होते - ‘तात ! माते ! कंसाचे मोठे भय असल्या कारणाने मी आपली काही सेवा करू शकलो नाही. या माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे.’ श्रीकृष्णांचे हे शब्द जेव्हा आठवतात, तेव्हा आजही माझे चित्त व्याकूळ होते. कालरूप असलेल्या ज्यांनी आपल्या केवळ भुवया वाकडया करून पृथ्वीवरील सर्व भार नष्ट केला, त्या श्रीकृष्णांच्या चरणकमलपरागाचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल ? आपण सर्वांनी राजसूय यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षच पाहिले की, श्रीकृष्णांचा द्वेष करणार्‍या शिशुपालाला अशी गती प्राप्त झाली की, जी योगी कठोर योगसाधना करून प्राप्त करू इच्छितात. त्या श्रीकृष्णांचा विरह कोणाला बरे सहन होईल ? शिशुपालाप्रमाणेच महाभारत-युद्धामध्ये ज्या शत्रुपक्षाच्या योद्ध्यांनी आपल्या डोळ्यांनी नयनाभिराम श्रीकृष्णांच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनाच्या बाणांनी घायाळ हो‌ऊन प्राणत्याग केला, ते सर्वजण पवित्र हो‌ऊन भगवंतांच्या परमधामाला प्राप्त झाले. स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहेत. त्यांच्या बरोबरीचा सुद्धा कोणी नाही, तर त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल ? ते आपल्या स्वतःसिद्ध ऐश्वर्याने नेहमीच पूर्णकाम आहेत. तरीही इंद्रादी पूर्वीपासूनचे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपापल्या मुकुटांच्या पुढील टोकांनी त्यांच्या पाय ठेवण्याच्या आसनाला प्रणाम करतात. विदुरा, तेच भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावर बसलेल्या उग्रसेन महाराजांच्या समोर नम्रपणे उभे राहून म्हणत असत की, "महाराज, आमची प्रार्थना ऐका." हा त्यांचा सेवा-विनम्रभाव आठवून आमच्यासारख्या सेवकांचे चित्त अत्यंत व्यथित होत आहे. पापिणी पूतनेने आपल्या स्तनांना हलाहल विष लावून श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने त्यांना दूध पाजले होते. तिलाही भगवंतांनी दाईस मिळण्याजोगी गती दिली. अशा त्या श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळू आहे, ज्याला आम्ही शरण जावे ? मी असुरांना सुद्धा भगवंतांचे भक्त समजतो. कारण वैरभाव मनात असल्याने क्रोधामुळे त्यांचे चित्त नेहमी श्रीकृष्णांकडे लागलेले असे. रणभूमीमध्ये सुदर्शन चक्रधारी भगवंतांना खांद्यावर घेऊन आपल्याकडे झेपावणार्‍या गरुडाचे त्यांना दर्शन होत असे. (१६-२४)

ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंतांनी कंसाच्या कारागृहात वसुदेव-देवकीच्या पोटी अवतार घेतला. कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वसुदेवांनी त्यांना नंदबाबाच्या गोकुळामध्ये नेऊन पोचविले, तेव्हा तेथे ते बलरामांसह अकरा वर्षे आपले तेज गुप्त ठेवून राहिले. यमुनेच्या उपवनातील हिरव्यागार वृक्षांवर कलकलाट करणार्‍या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी रहातात. तेथे श्रीकृष्णांनी वासरांना चारून गोपबालांच्या समवेत विहार केला होता. व्रजवासीयांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाललीला करीत. कधी रडवेले होत, कधी हसत, तर कधी सिंहाच्या छाव्याप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहात असत. पांढरे शुभ्र बैल आणि निरनिराळ्या रंगांच्या गाईंना चारता चारता ते आपले साथीदार गोपबालकांची बासरी वाजवून करमणूक करीत असत. याच कालात त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळसे मायावी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे राक्षस पाठविले, तेव्हा त्यांना भगवंतांनी लहान मुलांनी खेळणी मोडावी, त्याप्रमाणे सहज मारले. यमुनेचे विषमिश्रित पाणी प्याल्यामुळे मेलेले गोपबालक आणि गाई यांना जिवंत केले. कालियाला निश्चेष्ट केले आणि कालिया डोहाचे पाणी विषरहित करून ते पिण्यायोग्य केले. अपार धनाचा सुयोग्य उपयोग करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ ब्राह्मणांच्या द्वारा नंदबाबाकरवी, गोवर्धनपर्वताच्या पूजेच्या रुपाने गोयज्ञ करविला. हे महाभाग ! इंद्रयज्ञ न केल्याने आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागावून गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाडावयास सुरुवात केली. तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्यांनी लीलेने छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि व्रजाचे रक्षण केले. शरद ऋतूतील चांदणे जेव्हा सर्व वृंदावनावर पसरत असे, तेव्हा श्रीकृष्ण त्या चांदण्याचा आदर करून मधुर गाणे गात आणि फेर धरलेल्या गोपींची शोभा वाढवीत. त्यांच्याबरोबर रासक्रीडा करीत. (२५-३४)

स्कंध तिसरा - अध्याय दुसरा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP