|
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य - अध्याय ६ वा
सप्ताहयज्ञाचा विधी - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सनकादिक म्हणाले - आम्ही आता आपल्याला सप्ताहश्रवणाचे विधान सांगतो. साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या साहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले जाते. सुरुवातीला ज्योतिष्याला बोलावून मुहूर्त विचारावा. तसेच विवाहासाठी जेव्हढ्या धनाची आवश्यकता असते, तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी. सप्ताह करण्यासाठी आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व मार्गशीर्ष हे सहा महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत. देवर्षे ! या महिन्यांतही भद्रा, व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावेत. दुसरे जे उत्साही लोक असतील, त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावे. नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की, येथे भागवतकथा होणार आहे, तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे. जे भागतवतकथा आणि हरिनाम-संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात त्यांना तसेच स्त्रिया, शूद्रादी यांनाही निमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी. देशोदेशी जे विरक्त वैष्णव आणि हरीकीर्तनात गोडी असणारे असतील, त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे. त्यांना निमंत्रण पाठविण्याची पद्धत अशी आहे. "महोदय, येथे सात दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद्भागवताची कथा होणार आहे. आपण भगवत्कथारसाचे रसिक आहात, म्हणून श्रीभागवतामृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोव येणाची कृपा करावी. जर आपणांस इतके दिवस सवड नसेल, तर निदान एक दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी. कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे." अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील, त्यांच्यासाठी निवासाची योग्य ती व्यवस्था करावी. (१-११) कथाश्रवण तीर्थक्षेत्रात, वनामध्ये किंवा आपल्या घरी सुद्धा योग्य मानले गेले आहे. जेथे प्रशस्त मैदान असेल, तेथेच कथेचे आयोजन करावे. (१२) जागेची स्वच्छता, सडा-संमार्जन, रंग-रंगोटी इत्यादी करावी. घरातील सर्व सामान एका कोपर्यात ठेवावे. चार-पाच दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंज्या वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या आणि केळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा. तो चारी बाजूंनी पाने, फुले, फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि चारी बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा. त्या मंडपात एका उंच स्थानावर सात विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे. पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावी. त्यांच्यामागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावे. जर वक्ता उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल, तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे. किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावे. देशकाल इत्यादि जाणणार्या विद्वानांनी श्रोत्यांच्यासाठी असाच नियम सांगितला आहे. जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे, वेगवेगळे दृष्टांन्त देऊ शकतो आणि अत्यंत निःस्पृह आहे असा विरक्त आणि विष्णुभक्त बाह्मण वक्ता असावा. जे अनेक धर्ममतांमुळे गोंधळात पडले आहेत, स्त्रीलंपट आहेत, नास्तिक आहेत, असे लोक जरी विद्वान असले, तरी त्यांना भागवतकथा सांगण्यासाठी नेमू नये. वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसविला पाहिजे. तोसुद्धा सर्व प्रकारच्या संशयांची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे. (१३-२२) कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षौर केले पाहिजे. तसेच सूर्योदयाच्या वेळी शौच-मुखमार्जन करून स्नान करावे. संध्या वगैरे आपली नित्यकर्मे थोडक्यात आटोपून कथा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून श्रीगणेशाचे पूजन करावे. त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित करावे आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी. नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारांनी पूजन करावे. त्यानंतर प्रदक्षिणा, नमस्कार, करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी. हे करुणानिधे, मी संसारसागरात बुडालेला एक दीन आहे. कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसारसागरातून वर काढावे. नंतर धूप, दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद्भागवताचीही योग्य प्रकारे पूजा करावी. त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी. श्रीमद्भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात. नाथ, या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणांस शरण आलो आहे. कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथास्थित पूर्ण करावा. हे केशवा ! मी आपला दास आहे. (२३-३१) याप्रकारे करुणापूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे. वक्त्याला सुंदर वस्त्रालंकारांनी सुशोभित करून त्याच्या पूजनानंतर त्याचीही अशी स्तुती करावी. "हे शुकस्वरूप भगवन, समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आहात आणि शास्त्रात पारंगत आहात. कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे." त्यानंतर प्रसन्नेतेने आलया कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून सात दिवसपर्यंत त्यांचे यथाशक्ती पालन करावे. कथेमध्ये विघ्न येऊ नये, म्हणून आणखी पाच ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंतांच्या द्वादशाक्षर मंत्राचा (’ॐ नमो भगवते वासुदेवाय’) जप करावा. यानंतर ब्राह्मण, अन्य विष्णुभक्त आणि संकीर्तन करणार्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, घर, पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्धचित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो, त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते. (३२-३७) बुद्धिमान वक्त्याने सूय्योदयाला कथेची सुरुवात करून साडेतीन प्रहरांपर्यंत मध्य स्वरात, चांगल्या तर्हेने स्पष्ट उच्चारांसहित कथेचे वाचन करावे. दुपारच्या वेळी दोन घटका कथा बंद ठेवावी. यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवद्गुणांचे संकीर्तन करावे. कथेच्या वेळी मल-मूत्र-वेग ताब्यात राहावा, यासाठी अल्पाहार हितकारी असतो. म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळ हविष्यान्नच घ्यावे. सुदृढ असेल त्याने सात दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे किंवा फलाहार घ्यावा अगर दिवसातून एक वेळ एकाच प्रकारचे अन्न खावे. ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल, त्याने तो नियम कथाश्रवणाचे वेळी पाळावा. कथा श्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो. उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल, तर असा उपवास न केलेला बरा. (३८-४३) नारदमुने ! नियमपूर्वक सप्ताह ऐकणार्या पुरुषांसाठी नियम ऐका. ज्याने विष्णुभक्तांची दीक्षा घेतली नाही, तो कथाश्रवण करण्यास अधिकारी नाही. जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो, त्याने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यावर पत्रावळीवर भोजन करावे. डाळ, मध, तेल, पचण्यास जड, वाईट भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे. कथाश्रवणाचे व्रत घेतलेल्याने काम, क्रोध, मद, मान-सन्मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊन नये. त्याने वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरू, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज्य करावी. व्रतस्थ पुरुषाने रजस्वला स्त्री, चांडाल, म्लेंच्छ, पापी, गायत्रीजप न करणारे ब्राह्मण, ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये. कथा श्रवण करणार्याने सत्य, शौच, दया, मौन, आर्जव, विनय आणि औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे. दरिद्री, क्षयरोगी, कोणत्याही रोगाने पीडित, अभागी, पापी, पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनीही ही कथा ऐकावी. ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे, जिला फक्त एकच संतान झाले आहे, जी वांझ आहे, जिचे संतान जिवंत राहात नाही किंवा जिचा गर्भपात होतो अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी. वरील सर्वजण जर नियमांचे पालन करून कथा ऐकतील, तर त्यांना अविनाशी फल प्राप्त होऊ शकते. ही सर्वांत उत्तम दिव्य कथा कोट्यवधी यज्ञांचे फळ देणारी आहे. (४४-५३) अशा प्रकारे नियमांचे पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे. ज्याला विशिष्ठ फलप्राप्तीची इच्छा असेल, त्याने गोकुळाष्टमी व्रताप्रमाणे याचे उद्यापन करावे. परंतु जे भगवंतांचे निष्कांचन भक्त आहेत, त्यांना उद्यापन करण्याचे बंधन नाही. ते निष्काम भगवद्भक्त असल्याने केवळ श्रवणानेच पवित्र होतात. (५४-५५) याप्रकारे जेव्हा सप्ताहयज्ञाची समाप्ती होईल, तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता यांची पूजा करावी. नंतर वक्त्याने, श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्यावात आणि सर्वांनी मृदंग, झांज यांच्या सुंदर गजरात भगवत्कीर्तन करावे. जयजयकार, नमस्कार आणि शंखनाद करावा. तसेच ब्राह्मण आणि याचक यांना धन आणि अन्न द्यावे. श्रोता विरक्त असेल तर त्याने या कर्माच्या समाप्तीसाठी दुसर्या दिवशी गीतापठण करावे. गृहस्थाने हवन करावे. हवन करताना दशमस्कंधाचा एक एक श्लोक वाचून विधिपूर्वक पायस, मध, तूप, तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुती द्याव्यात. (५६-६०) किंवा एकाग्रचित्ताने गायत्रीमंत्राने हवन करावे. कारण, खरे पाहू जाता हे महापुराण गायत्रीस्वरूपच आहे. होम-हवन करण्याचे सामर्थ्य नसेल तर कथाश्रवणाचे फल प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवनसामग्री दान करावी. तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विधिनियम पालनात जे कमी-अधिक दोष राहिले असतील, ते नाहीसे करण्यासाठी विष्णुसहस्रनामाचा पाठ करावा. त्यामुळे सर्व कर्मांचे पूर्तता होते. कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही. (६१-६३) नंतर बारा ब्राह्मणांना पायस, मध असे उत्तम पदार्थयुक्त भोजन द्यावे, तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान करावे. आर्थिक क्षमता असेल तर, तीन ’पल’ सुवर्णाचा एक सिंह करून, त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमद्भागवत ग्रंथ ठेवावा. आवाहनादी विविध उपचारांनी त्याची पूजा करावी आणि जितेंद्रिय आचार्याला वस्त्र, अलंकार, गंध वगैरेंनी पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा. बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्म-मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. हा सप्ताह पारायणाचा विधी सर्व प्रकारची पापे नाहीसे करणारा आहे. हे मंगलमय भागवतपुराण इष्ट फल प्राप्त करून देते. तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे हे साधन आहे, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. (६४-६८) सनकादिक म्हणाले - मुनिवर्य, अशा प्रकारे हा सप्ताहश्रवणविधी आम्ही आपणास सविस्तर सांगितला. आणखी काय ऐकू इच्छिता ? या श्रीमद्भागवतानेच भोग आणि मोक्ष दोन्हीही हाती लागतात. (६९) सूत म्हणतात - हे शौनका, असे म्हणून महात्म्या सनकादिकांनी विधिपूर्वक एक सप्ताहपर्यंत सर्व पापांचा नाश करणार्या, परम पवित्र आणि भोग-मोक्ष देणार्या या भागवतकथेचे प्रवचन केले. सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले. त्यानंतर त्यांनी विधिपूर्वक भगवान पुरुषोत्तमांची स्तुती केली. कथेच्या शेवटी ज्ञान, वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली आणि ती तिघे एकदम तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागली. आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृतकृत्य झाले. त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद झाला. भगवंतांचे प्रिय नारदमुनि याप्रकारे कथा ऐकून, हात जोडून, प्रेमाने सद्गदित होऊन सनकादिकांना म्हणाले - (७०-७४) नारद म्हणाले - मी धन्य झालो. दयाळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला. सर्वपापहारी भगवान श्रीहरींची आज मला प्राप्ती झाली. हे तपोनिधी ! मी श्रीमद्भागवत श्रवणाला सर्व धर्मांत श्रेष्ठ मनतो. कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणार्या श्रीकृष्णांची प्राप्ती होते. (७५-७६) सूत म्हणाले - वैष्णवश्रेष्ठ नारद असे बोलत आहेत, तोच भ्रमण करीत करीत योगेश्वर शुकदेव तेथे आले. कथा समाप्त होतेवेळीच व्यासपुत्र श्रीशुकदेव तेथे आले. सोळा वर्षांचे वय, आत्मलाभाने तृप्त, ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेव प्रेमाने सावकाश श्रीमद्भागवताचा पाठ करीत होते. तेजःपुंज शुकदेवांना पाहून उपस्थित सर्वजण लगेच उठून उभे रहिले आणि त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसविले. देवर्षी नारदांनी त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केले. तेथे शांतपणे बसून शुकदेव म्हणाले, आपण माझी पवित्र वाणी ऐका. (७७-७९) सूत म्हणाले - रसिक आणि भाविक जनहो, हे श्रीमद्भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे. श्रीशुकदेवांच्या मुखातून निघालेले असल्याने अमृतरसाने हे परिपूर्ण आहे. यात केवळ रसच रस आहे. या फळाला साल किंवा बी नाही. जोपर्यंत शरीरात जीव आहे, तोपर्यंत आपण याचे वारंवार श्रवणरूप पान करावे. महामुनी व्यासदेवांनी श्रीमद्भागवत-महापुराणाची रचना केली आहे. यामध्ये निष्कपट, निष्काम, अशा परमधर्माचे निरूपण केलेले आहे. शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांनी जाणण्याजोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे यात वर्णन आहे. यामुळे तिन्ही तापांची निवृत्ती होते. जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो, तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात. मग इतर साधनांची आवश्यकताच काय ? हे भागवत पुराणांच्या अग्रभागी असून हे वैष्णवांचे धन आहे. परमहंसमुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केले आहे. तसेच यात ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्तिमार्ग प्रकाशित केलेला आहे. जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण, पारायण आणि मनन करण्यात तत्पर असतो, तो मुक्त होतो. हे भाग्यवान श्रोत्यांनो ! हा रस स्वर्गलोक, सत्यलोक, कैलास व वैकुंठातही नाही. म्हणून तुम्ही याचे यथेच्छ पान करा. यापासून मुळीच परावृत्त होऊ नका. (८०-८३) सूत म्हणाले - श्रीशुकदेव याप्रमाणे सांगत होते, तोच तेथे प्रह्लाद, बली, उद्धव, अर्जुन आदी भक्तांसहित साक्षात श्रीहरी प्रगट झाले. तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि त्यांचे भक्त यांचे यथोचित पूजन केले. भगवंतांना प्रसन्नचित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसविले आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही आले. त्या संकीर्तनात प्रह्लाद उत्साहाने टाळ वाजवू लागला. उद्धवाने झांजा घेतल्या. देवर्षी नारद वीणा वाजवू लागला. सनकादिक मधून-मधून जयजयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले. या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नटांप्रमाणे नाचू लगले. असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, "मी तुमच्या या कथा-कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे. तुझी माझ्याकडे वर मागा." भगवंताचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतःकरण भरून येऊन भगवंतांना म्हणाले. भगवन ! आमची अशी इच्छा आहे की, येथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल, तेथे आपण आपल्या या भक्तांसह अवश्य यावे, आमचा हा मनोरथ पूर्ण करा. "तथास्तु" म्हणून भगवान अंतर्धान पावले. (८४-८९) यानंतर नारदांनी भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणकमलांना उद्देशून नमस्कार केला. तसेच शुकदेव आणि अन्य तपस्व्यांनाही नमस्कार केला. कथामृतपानाने सर्वांना मोठा आनंद झाला, त्यांचा सर्व मोह नाहीसा झाला. नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले. त्याचवेळी शुकदेवांनी भक्तीला तिच्या पुत्रांसहित आपल्या भागवत शास्त्रात समाविष्ट केले. म्हणून भागवतकथापान केल्याने श्रीहरी वैष्णवांच्या हृदयात विराजमान होतात. जे लोक दारिद्र्याने गांजले आहेत, ज्यांना मायारूपी पिशाच्चाने जखडून टाकले आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत, त्यांचे कल्याण होईल, अशी श्रीमद्भागवत सिंहगर्जना करीत आहे. (९०-९२) शौनकांनी विचारले - सूत महोदय, शुकदेवांनी राजा परीक्षिताला, गोकर्णाने धुंधुकारीला आणि सनकादिकांनी नारदमुनींना कोणकोणत्या वेळी ही कथा सांगितली, ही माझी शंका दूर करा. (९३) सूत म्हणाले - भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण तीस वर्षे उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला शुकदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला. राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची दोनशे वर्षे लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णांनी ही कथा सांगितली होती. यानंतर कलियुगाची आणखी तीस वर्षे निघून गेली. कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिकांनी हा कथा सांगण्यास प्रारंभ केला. हे निष्पाप शौनका ! आपण जो प्रश्न विचारला होता, त्याचे मी आपणांस उत्तर दिले आहे. या कलियुगात भागवत-कथा हे भवरोगावरील रामबाण औषध आहे. (९४-९७) संतसज्जनहो ! आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी. ही कथा श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय, सर्व पापांचा नाश करणारी, मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्ति वृद्धिंगत करणारी आहे. असे असताना तीर्थयात्रा इत्यादि तरी कशाला पाहिजेत ? हातात पाश घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यमराजांनी त्यांच्या कानात सांगितले की, "हे पहा जे भगवंतांच्या कथाकीर्तनात एकाग्रचित्त झाले आहेत त्यांच्यापासून दूर रहा. माझ्यात इतरांना दंड देण्याची शक्ती आहे. वैष्णवांना नाही." या असार संसारात विषयरूप विषाच्या आसक्तीमुळेच व्याकूळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो, आपल्या कल्याणासाठी, अर्धा क्षण का होईना त्या शुककथारूप अवीट गोडीच्या अमृताचे प्राशन करा. निंद्य कथांनी युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता ? या कथेचा कानात प्रवेश होताच मुक्ति मिळते, या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे. श्रीशुकदेवांनी प्रेमरसाच्या प्रवाहात स्थित राहून ही कथा सांगितली आहे, या कथेचा कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो. शौनका ! अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मी हे परम गुह्य आताच तुला सांगितले. सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांचे हे सार आहे. या संसारात शुकशास्त्राइतकी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून आपण परमानंदप्राप्तीसाठी या बारा स्कन्ध असलेल्या भगवतरसाचे पान करा. जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो, तसेच जो अंतःकरण शुद्ध असणार्या भगवद्भक्तांना याचे कथन करतो, असे दोघेही सर्व नियमांचे पूर्णतः पालन केल्याकारणाने याचे यथार्थ फळ मिळवितात. अशांसाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीच राहात नाही. अध्याय सहावा समाप्त |