श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २१ वा - अन्वयार्थ

भरतवंशाचे वर्णन, राजा रंतिदेवाची कथा -

वितथस्य सुतः मन्युः - वितथाचा पुत्र मन्यु- ततः बृहत्क्षत्रः - त्यापासून बृहत्क्षत्र, - जयः महावीर्यः नरः गर्गः (आसन्) - जय, महावीर्य, नर व गर्ग झाले- नरात्मजः तु संकृतिः - नराचा पुत्र संकृति. ॥१॥

पांडुनंदन - हे परीक्षित राजा- संकृतेः गुरुः रंतिदेवः च - संकृतीला गुरू आणि रंतिदेव हे झाले- रंतिदेवस्य यशः इह - रंतिदेवाची कीर्ति या लोकी - च अमुत्र हि गीयते - व परलोकी खरोखर गायिली जाते. ॥२॥

वियद्वित्तस्य - आकाशातून आपोआप मिळालेल्या द्रव्याचे सेवन करणार्‍या, - बुभुक्षतः - भूक लागली असता - लब्धं ददतः - मिळालेल्या वस्तु याचकांना देणार्‍या - निष्किंचनस्य धीरस्य - द्रव्यरहित, धैर्यशाली - सकुटुंबस्य सीदतः - व कुटुंबासह कष्ट सोसणार्‍या- अपिबतः (तस्य) - पाणीही न पिणार्‍या त्या रंतिदेवाचे- अष्टचत्वारिंशत् अहानि व्यतीयुः - अठठेचाळीस दिवस निघून गेले- प्रातः - एकोणपन्नासाव्या दिवशी सकाळी - घृतपायससंयावतोयं उपस्थितं - तूप, खीर, सांजा व पाणी इतके समोर आले. ॥३-४॥

कृच्छ्रप्राप्तकुटुंबस्य - ज्याचे कुटुंब संकटात सापडले आहे - काले भोक्तुकामस्य - असा तो योग्यकाळी भोजन करू इच्छित असता- क्षुत्तृड्‌भ्यां - भुकेने व तहानेने - जातवेपथुः - व्याकुळ होऊन कापत असलेला- ब्राह्मणः अतिथिः आगमत् - एक ब्राह्मण अतिथि आला. ॥५॥

श्रद्धया अन्वितः सः - श्रद्धेने युक्त असा रंतिदेव - सर्वत्र हरिं पश्यन् - सर्व ठिकाणी विष्णूला पाहणारा असल्यामुळे- आहृत्य तस्मै - त्या ब्राह्मणाला बोलावून - अन्नं संव्यभजत् - सत्कारपूर्वक अन्न विभागून देता झाला- सः द्विजः भुक्त्वा प्रययौ - तो ब्राह्मण भोजन करून गेला. ॥६॥

महीपते - हे परीक्षित राजा- विभक्तस्य (तस्य) - नंतर उरलेले अन्न कुटुंबाला वाटून देऊन - भोक्ष्यमाणस्य - स्वतः भोजन करीत असता- अन्यः (आगमत्) - दुसरा अतिथि आला- हरिं स्मरन् (सः) - श्रीविष्णूचे स्मरण करीत तो रंतिदेव- तस्मै वृषलाय विभक्तं व्यभजत् - त्या शूद्र अतिथीला अन्न विभागून देता झाला. ॥७॥

शूद्रे याने श्वभिः आवृतः - शूद्र गेला असता कुत्र्यांनी वेष्टिलेला - अन्यः अतिथिः तं अगात् (आह च) - दुसरा अतिथि त्या रंतिदेवाजवळ आला व म्हणाला- राजन् - हे रंतिदेवा राजा- बुभुक्षते सगणाय मे अन्नं दीयताम् - माझ्या परिवारासह भुकेलेल्या मला अन्न द्यावे. ॥८॥

सः विभुः - तो समर्थ रंतिदेव- आदृत्य - आदरपूर्वक- यत् अविशिष्टं तत् - जे उरलेले अन्न होते ते- बहुमानपुरस्कृतं - मोठया सन्मानाने- श्वपतये श्वभ्यः च दत्त्वा - चांडाळाला व कुत्र्यांना देऊन - नमश्चक्रे - नमस्कार करिता झाला. ॥९॥

पानीयमात्रं उच्छेषं - पाणीच काय ते शेष राहिले- तत् च एकपरितर्पणं (आसीत्) - व ते सुद्धा जेमतेम एकाची तृप्ति होण्यापुरते होते- तत् पास्यतः - ते पीत असता- पुल्कसः अभ्यगात् (आह च) - एक चांडाळ आला व म्हणाला- अशुभस्य मे अपः देहि - अशुद्ध अशा मला उदक दे. ॥१०॥

तस्य तां कृपणां - त्याचे ते दीनवाणे - विपुलश्रमां वाचं निशम्य - व जे बोलताना पुष्कळ श्रम होत होते असे शब्द ऐकून- कृपया भृशसंतप्तः - दयेने अत्यंत व्याकूळ झालेला - इदं अमृतं वचः आह - रंतिदेव हे गोड भाषण बोलला. ॥११॥

अष्टर्धिंयुक्तां परां गतिं - आठ प्रकारच्या सिद्धीने युक्त अशी श्रेष्ठ गति- अपुनर्भवं वा अहं ईश्वरात् न कामये - किंवा मोक्ष मी ईश्वरापासून मिळवू इच्छित नाही- अखिलदेहभाजां अन्तः स्थितां आर्तिं प्रपद्ये - सर्व प्राण्यांच्या अंतःकरणातील पीडा मी स्वीकारीन- येन (ते) अदुःखाः भवन्ति - ज्यामुळे सर्व प्राणी दुःखरहित होतील. ॥१२॥

कृपणस्य जिजीविषोः जन्तोः - दीन व जगण्याची इच्छा करणार्‍या प्राण्याला- जीवजलार्पणात् - जीवदान व उदकदान केल्याने- मे - माझे- क्षुतृट्‌श्रमः - क्षुधेमुळे व तहानेमुळे होणारे श्रम- दैन्यं क्लमः च शोकविषादमोहाः - दैन्य, ग्लानि, शोक, खेद व मोह- (इति सर्वे) - ते सर्व- निवृत्ताः - नाहीसे झाले. ॥१३॥

इति प्रभाष्य - असे बोलून- पिपासया म्रियमाणः - तहानेने मरणोन्मुख झालेला - धीरः निसर्गकरुणः नृपः - गंभीर व स्वभावतःच दयाळू असा रंतिदेव राजा- पुल्कसाय पानीयं अददात् - चांडाळाला पाणी देता झाला. ॥१४॥

फलं इच्छतां - फलाची इच्छा करणार्‍यांना - फलदाः त्रिभुवनाधीशाः - फल देणारे त्रैलोक्याधिपती देव- तस्य विष्णुविनिर्मिताः मायाः - त्या रंतिदेवाला विष्णूने निर्मिलेल्या माया - आत्मानं च दर्शयांचक्रुः - व स्वतःचे खरे स्वरूप दाखविते झाले. ॥१५॥

निःसंगः विगतस्पृहः सः - सर्वसंगपरित्याग केलेला व निरिच्छ असा तो रंतिदेव- तेभ्यः वै नमस्कृत्य - त्या देवांना नमस्कार करून- भगवति वासुदेवे भक्त्या - भगवान वासुदेवाच्या ठिकाणी असलेल्या भक्तीने - परं नमः चक्रेः - परमेश्वराला नमस्कार करिता झाला. ॥१६॥

राजन् - हे राजा- चित्तं ईश्वरालम्बनं कुर्वतः - अंतःकरण ईश्वराच्या ठिकाणी लावणार्‍या व ईश्वरप्राप्तीशिवाय - अनन्यराधसः (तस्य) - दुसर्‍या कोणत्याही फलाची इच्छा न करणार्‍या त्या रंतिदेवाची- गुणमयी माया - त्रिगुणात्मक माया - स्वप्नवत् प्रत्यलीयत - स्वप्नाप्रमाणे लीन झाली. ॥१७॥

रंतिदेवानुवर्तिनः सर्वे - रंतिदेवाची सेवा करणारे सर्व सेवक- तत्प्रसंगानुभावेन - त्या रंतिदेवाच्या संगतीच्या प्रभावाने- नारायणपरायणाः योगिनः अभवन् - परमेश्वराची भक्ति करणारे योगी झाले. ॥१८॥

गर्गात् शिनिः - गर्गापासून शिनि- ततः गार्ग्यः - त्यापासून गार्ग्य- क्षत्रात् ब्रह्म हि अवर्तत - क्षत्रियापासून कित्येक खरोखर ब्राह्मण उत्पन्न झाले- महावीर्यात् दुरितक्षयः - महावीर्यापासून दुरितक्षय- तस्य अरुणिः कविः - त्याला अरुणि, कवि - पुष्करारुणिः इति त्रयी - व पुष्करारुणि असे तीन पुत्र झाले - ये अत्र - जे या क्षत्रियवंशात जन्मून - ब्राह्मणगतिं गताः - ब्राह्मणपणाला प्राप्त झाले- बृहत्क्षत्रस्य हस्ती पुत्रः अभूत् - बृहत्क्षत्राला हस्तीनामक पुत्र झाला- यत् हस्तिनापुरं - ज्याने हस्तिनापूर निर्माण केले. ॥१९-२०॥

हस्तिनः अजमीढः - हस्तीला अजमीढ, - द्विमीढः च पुरुमीढः - द्विमीढ व पुरुमीढ असे तीन पुत्र झाले. ॥२१॥

अजमीढात् बृहदिषुः - अजमीढापासून बृहदिषु- तस्य पुत्रः बृहद्धनुः - त्याचा पुत्र बृहद्धनु- ततः बृहत्कायः - त्या बृहद्धनूचा पुत्र बृहत्काय- तस्य पुत्रः जयद्रथः आसीत् - त्याचा पुत्र जयद्रथ हा होता. ॥२२॥

तत्सुतः विशदः - त्या जयद्रथाचा पुत्र विशद- तस्य सेनजित् समजायत - त्या विशदाला सेनजित् पुत्र झाला- तत्सुतः रुचिराश्वः - त्या सेनाजिताला रुचिराश्व, - दृढहनुः काश्यः च वत्सः - दृढहनु, काश्य व वत्स असे पुत्र झाले. ॥२३॥

रुचिराश्वसुतः प्राज्ञः - रुचिराश्वाचा पुत्र प्राज्ञ- तदात्मजः पृथुसेनः - त्या प्राज्ञाचा मुलगा पृथुसेन- तत्तनयस्य पारस्य नीपः - त्या पृथुसेनाचा पुत्र जो पार त्याचा पुत्र नीप- तस्य तु पुत्रशतं अभूत् - त्या नीपाला तर शंभर मुलगे झाले. ॥२४॥

सः कृत्व्यां शुककन्यायां - तो नीप कृत्वी नामक शुककन्येच्या ठिकाणी - ब्रह्मदत्तं अजीजनत् - ब्रह्मदत्ताला उत्पन्न करिता झाला- योगी सः गवि भार्यायां - योगी असा तो ब्रह्मदत्त सरस्वतीरूपी भार्येच्या ठिकाणी - विष्वक्सेनं सुतं अधात् - विष्वक्सेन नावाचा पुत्र उत्पादिता झाला. ॥२५॥

(सः) जैगीषव्योपदेशेन - विष्वक्सेन जैगीषव्य ऋषीच्या सांगण्यावरून - योगतंत्रं चकार ह - योगशास्त्र निर्माण करिता झाला- ततः उदंक्स्वनः - त्यापासून उदक्स्वन- तस्मात् भल्लादः - त्यापासून भल्लाद- (एते) बार्हदीषवः (राजानः) - हे सर्व बृहदिषु राजाच्या वंशात जन्मलेले राजे होते. ॥२६॥

द्विमीढस्य यवीनरः - द्विमीढाचा यवीनर- तत्सुतः कृतिमान् नाम्ना - त्याचा पुत्र कृतिमान जो - सत्य धृतिः स्मृतः - सत्यधृति नावाने प्रसिद्ध झाला- यस्य सुपार्श्वकृत् - ज्या सत्यधृतीला सुपार्श्वाचा पिता असा - दृढनेमिः - दृढनेमिनामक पुत्र झाला. ॥२७॥

सुपार्श्वात् सुमतिः - सुपार्श्वापासून सुमती- तस्य पुत्रः सन्नतिमान् - त्याचा पुत्र संनतिमान- ततः कृतिः - त्यापासून कृति- यः - जो- हिरण्यनाभात् योगं प्राप्य - हिरण्यनाभापासून योग मिळवून- प्राच्यसाम्नां षट् संहिताः जगौ - प्राच्यसामांच्या सहा संहिता गाता झाला- ततः हि वै उग्रायुधः नीपः - त्यापासून खरोखर तीक्ष्ण शस्त्रे धारण करणारा नीप झाला- तस्य क्षेम्यः - त्याचा पुत्र क्षेम्य- अथ सुवीरः - त्या क्षेम्याला सुवीर- सुवीरस्य रिपुंजयः - सुवीराचा पुत्र रिपुंजय. ॥२८-२९॥

ततः बहुरथः नाम (पुत्रः जातः) - त्यापासून बहुरथ नावाचा पुत्र झाला- पुरुमीढः अप्रजः अभवत् - पुरुमीढ निपुत्रिक होता- अजमीढस्य नलिन्यां नीलः (जातः) - अजमीढाला नलिनीच्या ठिकाणी नील हा पुत्र झाला- ततः शांतिः सुतः अभवत् - त्यापासून शांती नामक पुत्र झाला. ॥३०॥

शान्तेः सुशान्तिः - शांतीचा पुत्र सुशांति- तत्पुत्रः पुरुजः - त्याचा पुत्र पुरुज- तत् अर्कः अभवत् - त्यापासून अर्क झाला- (तस्य) तनयः भर्म्याश्वः - त्या अर्काचा पुत्र भर्म्याश्व- तस्य मुद्वलादयः पंच आसन् - त्या भर्म्याश्वाला मुद्वलादिक पाच पुत्र होते. ॥३१॥

यवीनरः बृहदिषुः कांपिल्यः - यवीनर, बृहदिषु, कांपिल्य - संजयः (एते इतरे) सुताः - व संजय असे दुसरे पुत्र होत- भर्म्याश्वः प्राह - भर्म्याश्व म्हणाला- हि मे पुत्राः पंचानां विषयाणां - माझे पुत्र पांचहि देशांचे रक्षण - रक्षणाय अलं - करण्यास खरोखर समर्थ आहेत- इति ते पंचालसंज्ञिताः (अभवत्) - म्हणून ते पंचाल नावाने प्रसिद्ध झाले- मुद्वलात् ब्रह्म निर्वृत्तं - मुद्वलापासून ब्राह्मण उत्पन्न झाले- (तत्) मौद्गल्यसंज्ञितं गोत्रं - ते मौद्गल्यनामक गोत्र होय. ॥३२-३३॥

भार्म्यात् मुद्गलात् मिथुनं - भर्म्याश्वाचा पुत्र जो मुद्गल त्याला जुळी मुले झाली- (तयोः) दिवोदासः पुमान् अभूत् - त्यात दिवोदास पुत्र होता- अहल्या कन्यका - आणि अहल्या ही मुलगी होती- यस्यां गौतमात् - जिच्या ठिकाणी गौतमापासून - तु शतानंदः - शतानंद नावाचा पुत्र झाला. ॥३४॥

तस्य धनुर्वेदविशारदः - त्याला धनुर्विद्येत पारंगत असा - सत्यधृतिः पुत्रः - सत्यधृति नावाचा पुत्र होता- तत्सुतः शरद्वान् - त्याचा पुत्र शरद्वान - यस्मात् उर्वशीदर्शनात् - ज्याचे उर्वशीच्या दर्शनामुळे - शरस्तम्बे रेतः अपतत् - दर्भाच्या बेटावर वीर्य पडले- तत् च किल शुभं मिथुनं अभवत् - आणि त्यापासून खरोखर दोन सुंदर मुले जन्मली. ॥३५॥

मृगयां चरन् शंतनुः - मृगया करणारा शंतनु - तत् दृष्ट्‌वा कृपया अगृह्‌णात् - ती मुले पाहून दयेने उचलून घेता झाला- कुमारः कृपः - मुलगा कृप- कन्या च कृपी - आणि कन्या कृपी- या द्रोणपत्‍नी अभवत् - जी द्रोणाचार्याची पत्‍नी झाली. ॥३६॥

नवमः स्कन्धः - अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP