परिच्छेद १ - ५


परिच्छेद ६ - १०


परिच्छेद ११ - १५


परिच्छेद १६ - २०


परिच्छेद २१ - २५
॥ श्रीराम समर्थ ॥

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत

अमृतघुटका

'बोले तैसा चाले' हे संतांचे एक प्रमुख लक्षण आहे. संत हे 'आधी केलें, मग सांगितलें' या कोटीतले असतात. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे त्यांच्या चरित्रांतली मुख्य सूत्रें दाखवितात, त्याचप्रमाणे त्यांच्या चरित्रावरून त्यांचे ग्रंथ समजण्यास मदत होते. म्हणून 'अमृतघुटका' समजावून घेण्यासाठीं श्रीमहाराजांचे सविस्तर चरित्र वाचणें इष्ट आहे. ज्या गोष्टीं कराव्यात म्हणून 'अमृतघुटका' या प्रकरणांत सांगितल्या आहेत त्या श्रीमहाराजांनी स्वतः केलेल्या आहेत.


'अमृतघुटका' हा ग्रंथ श्रीमहाराजांनी उज्जयिनी येथें सांगितला. त्याचे २५ परिच्छेद आहेत. ग्रंथ जरी लहान असला तरी त्यांतील विवेचनावरून परमार्थ म्हणजे काय व त्याचे साधन कोणतें हे नीट समजून येते. वैद्य ज्याप्रमाणे रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी औषधाची गुटिका म्हणजे लहानशी गोळी किंवा औषधाचा घोट देतो त्याप्रमाणे भवरोग्याला ही गुटिका म्हणा किंवा औषधाचा लहान घोट श्रीमहाराजांनी दिला आहे. यावरून "अमृतघुटका" हे ग्रंथनाम सार्थ वाटतें.


अमृतघुटका या ग्रंथाव्यतिरिक्त श्रीमहाराजांनी लिहिलेली लहानमोठी परमात्मपर प्रकरणें आणि ३९८ अभंग केले आहेत. या सर्व वाङ्‍मयात नामाचे महत्त्व आग्रहाने पतिपादलेले आढळते; कारण नामस्मरणाने प्रपंच साधून परमार्थ सुलभतेनें साध्य होतो असें त्यांचे म्हणणे आहे.


अमृतघुटका या ग्रंथातील विषय थोडक्यांत असा आहे : सर्व दुःखांचे मूळ देहबुद्धी आहे. वासना, निरनिराळे मनोविकार, भय, चिंता इ. स्वरूपांनी देहबुद्धि प्रगट होते. स्वस्वरूपीं लीन होण्यानें ती नाहीशी होते' आणि साधक सुखरूप होतो. पोकळ शब्दज्ञानानें आत्मज्ञान होत नाही; त्यासाठी साधन आवश्यक आहे. अखंड नामस्मरण हे मुख्य साधन होय. नित्यनेम, व्रत, दान, अध्यात्मश्रवण दया इ. उपसाधने चित्तशुद्धि करतात, आणि नामस्मरणाचें प्रेम निर्माण करतात. नाम घेण्यानें देहबुद्धि जाते आणि साधक जन्म-मरणाच्या चक्रांतून सुटतो. हें या ग्रंथाचें सार आहे. [ श्री. परशुराम गणेश गद्रे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमधून . . .]

त्याच प्रस्तावनेंत "अमृतघुटका" प्रथम प्रसिद्ध केलेल्या श्री. दामोदर सीताराम हिर्लेकर यांच्या पुस्तकाच्या 'निवेदनांतील' कांही भाग यापुढे . . ]

"पहिल्या (शके १८३६) पुण्यतिथीचे वेळी, दहा दिवसांचे उत्सवांत कोणकोणत्या ग्रंथांची पारायणें व पाठ करावयाचे, याबद्दल सर्व सेवेकरी मंडळीनें कार्यक्रम ठरवून, त्याची यादी श्रीब्रह्मानंदमहाराज यांना दाखविली; तेव्हां 'यांत महाराजांचा अत्यंत आवडता "अमृतघुटका" नाही, त्याचा पाठ अगोदर पाहिजे, नंतर इतर गोष्टींचा विचार !' असे त्यांनी सांगितले ते मी स्वतः ऐकलें. "

यावरून "अमृतघुटका" चे महत्त्व कळून येते.

* * * * *