प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

९ फेब्रुवारी

नित्यनेम करणे म्हणजे काय ?


    Download mp3

नित्यनेम करणे म्हणजे सर्वकाळ नित्यात राहणे. आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत. नित्य जो परमात्मा त्याला विसरून, विषय जे अनित्य त्यांत पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होईल असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात. आपण नेहमीच नित्यनेमात असावे, पण तसे होत नाही; म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे, म्हणजे त्याची सवय होते. जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो. नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंदबुवांनीच. आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा. याकरिता गुरूआज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे. गुरू सांगेल तोच नित्यनेम होय. त्याला शरण जावे. रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण, आणि शेवटी गुरूस अनन्यशरण, हाच साधकाचा साधनक्रम आहे, आणि हाच त्याचा नित्यनेम होय.

आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये; साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे. साशंक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्यानात ठेवावे. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे साधन करताना आपले आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते. लोकेषणा, मान, फार घातक आहेत. मोठमोठे साधकसुद्धा त्यांच्यापायी अधोगतीला जातात. तसेच, पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधनी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात. भगवंताचा पाश हाच खरा पाश. तोच आपल्याला सर्व बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो.

जगाच्या मान अपमानाला कधी भुलू नये. पैसा आणि कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. तिथे अगदी सावध असावे. जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसले तर "हे भगवंताचे देणे आहे" असे मनापासून समजावे. जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरीत नाही, आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल. जाता-येता देवाला नमस्कार करावा, "राम, राम" म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुनः सुटणार नाही.


४०. भगवंताचा पाश हा पाशच खरा. पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो.