प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

१४ जुलै

गुरू सांगेल तेच साधन.


    Download mp3

परमार्थ म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ति सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले, म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कुणाला करावे ? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरूला कोठे आडनाव असते का ? गोंदवलेकर गोंदवल्यास राहात असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहात असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते. तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरू समजा, आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा; त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळापांगळा आहे की काय, हे पाहू नका. तो देहाने कसाही असला, तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज, जिथून गुरुपद निर्माण झाले, त्याला असते. गुरुआज्ञा हाच परमार्थ; तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात, तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात, तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरूकडे जा. गुरू सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा.

खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे. एकाने कोळश्याचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले; दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे, प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून, मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला, म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे, की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी, की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून, मनाने मात्र ईश्वरोपासना करावी.


१९६. हृदयी ठेवा राम । मुखी सदा त्याचे नाम ।
हातात असावे प्रपंचाचे काम । हेच खरे परमार्थाचे मर्म ॥