प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

५ जून

वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे.


    Download mp3

पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्‍न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय.

प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते.


१५७. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति । चित्ति असावा एक रघुपति ॥