प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

३० मे

सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा.


    Download mp3

अकर्तेपणे करीत राहावे कर्म । हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग ॥

न करावा कोणाचा द्वेष मत्सर । सर्वांत पाहावा आपला रघुवीर ॥

परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥

गुणांचे करावे संवर्धन । दोषांचे करावे उच्चाटन ॥

जेथे जेथे जावे । चटका लावून यावे ॥

याला उपाय एकच जाण । रघुनाथावांचून न आवड दुजी जाण ॥

देहाचे दुःख अत्यंत भारी । रामकृपेने त्याची जाणीव दूर करी ॥

मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम । हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम ॥

अभिमान नसावा तिळभरी । निर्भय असावे अंतरी ॥

जे दुःख देणे आले रामाचे मनी । ते तू सुख मानी ॥

देह टाकावा प्रारब्धावर । आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर ॥

मी असावे रामाचे । याहून जगी दुसरे न दिसावे साचे ॥

प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा । आपण न सोडावा रघुनाथा ॥

आपण नाही म्हणू कळले जाण । ज्ञानाचे दाखवावे अज्ञान ॥

दोष न पाहावे जगाचे । आपले आपण सुधारून घ्यावे साचे ॥

कोणास न लावावा धक्का । हाच नेम तुम्ही राखा ॥

एक रामसेवा अंतरी । सर्वांभूती भगवद्‌भाव धरी ॥


राम ज्याचा धनी । त्याने न व्हावे दैन्यवाणी ॥

नका मागू कुणा काही । भाव मात्र ठेवा रामापायी ॥

वाईटांतून साधावे आपले हित । हे ठेवावे मनी निश्चित ॥

भगवंताचे विस्मरण । हे वस्तूच्या मोहाला कारण ॥

म्हणून भक्ति व नाम । याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान ॥

परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणे । त्यातच त्यास पाहावे आपण ॥

सर्व कर्ता राम हा भाव ठेवता चित्ती । खर्‌या विचारांची जोडेल संगति ॥

व्यवहारातील लाभ आणि हानि । मनापासून आपण न मानी ॥

मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी । सुखाने वर्तत जावे जनी ॥

एकच क्षण ऐसा यावा । जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा ॥

रामाविण उठे जी जी वृत्ति । त्यासी आपण न व्हावे सांगाती ॥

मी रामाचा हे जाणून । वृत्ति ठेवावी समाधान ॥

धन्य मी झालो । रामाचा होऊन राहिलो ।

ही बनवावी वृत्ति । जेणे संतोषेल रघुपति ।

वृत्ति बनविण्याचे साधन । राखावे परमात्म्याचे अनुसंधान ॥

शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति तशी नाही बनली ॥

विषयाधीन जरी होय वृत्ति । तरी दुरावेल तो रघुपति ॥

संतांची जेथे वस्ती । तेथे आपली ठेवावी वृत्ति ॥

सतत विवेक अखंड चित्ती । रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्हा परम प्राप्ति ॥

नामामध्ये ऐसी सत्ता । जेणे जोडे रघुनाथा ॥

नामापरते न मानावे हित । हेच आजवर सांगत आलो सत्य ॥

भगवंताला आपले होणे आवडते फार । श्रीरामनामी राहावे खबरदार ॥


१५१. रघुनाथस्मरणात असावे आनंदात । तेथे न चाले कोणाची मात ॥