॥ श्रीसद्गुरुलीलामृत ॥ अध्याय  सातवा समास पहिला
 
 
जशी माउली ग्रास देते मुलाला । तसें बोधुनी ज्ञान पाजी जनांला ॥  
धरेसारखी ज्या वसे नित्य शांति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ७ ॥    
जयजयाजी एकदंता । विघ्नहारी सुखदाता ।   
वंदूं श्रीशारदामाता । जगज्जननी मति देईं ॥ १ ॥  
साधका साह्य हनुमंत । वंदन करूं तया सतत ।  
भुभुःकारें दुमदुमवित । लोकत्रय ॥ २ ॥  
तेहतीस कोटी देवभाव । एकचि नटला रामराव ।  
वंदूं दुजा धरूनि भाव । भक्तिसोहळा भोगावया ॥ ३ ॥  
जयजय श्रीगुरुमाय । आम्हां अर्भकाची सोय ।  
अपाय छेदूनि उपाय । करीतसे ॥ ४ ॥  
आमुचें हित आम्हांसी । ठाऊक नसे निश्चयेंसी ।  
परि माय जाणें मानसीं । वेळोवेळां सांवरीतसे ॥ ५ ॥  
लोभछंदे क्रीडा करितां । दुःखगर्तीं पडेल आतां ।  
जाणोन सद्गुरुमाता । निवारीतसे तेथूनी ॥ ६ ॥  
अहंता अज्ञान भरलें । वासनातस्करीं मोहिलें ।  
विषयआमिषा दावोनि नेलें । आडमार्गीं जीवासी ॥ ७ ॥  
विवेकइंद्रियें तोडिली । सुकृतभूषणें लुबाडिली ।  
जन्ममृत्युदरीं लोटिली । अज्ञान बालकें निर्दयीं ॥ ८ ॥  
तेव्हां माय आठवली । दीर्घस्वरें करुणा भाकिली ।  
तंव ती धांवोनि कुरवाळी । त्रिविध ताप हराया ॥ ९ ॥  
माय ममतें कुर्वाळी । सद्गुरु माय निर्दाळी ।  
हेतुरहित प्रेमजिव्हाळी । गुरुमायेची ॥ १० ॥  
माय एक जन्मींची । गुरुमाय जन्मोजन्मींची ।  
सत्ता त्रिभुवनीं जिची । चाले अखंड ॥ ११ ॥  
माय संसृतीत गोवी । सद्गुरु करीत गोसावी ।  
दुजेपणाची यादवी । उठोंचि नेदी ॥ १२ ॥  
ऐसी गुरुमाय धन्य । भक्तिरस पाजवी स्तन्य ।  
धरितां आश्रय भिवोन । यमकिंकर न शिवती ॥ १३ ॥  
धरितां सद्गुरु कांस । सीमा नाहीं आनंदास ।  
बेगुमानी कळिकाळास । मानेना अल्पही ॥ १४ ॥  
माय पर गुरु माय । जी दीन अर्भकांची सोय ।  
चुकवीतसे जन्ममरणघाय । बोधामृत पाजोनी ॥ १५ ॥  
गुरुमायवचनीं विश्वासले । ते कृतकृत्य होवोनि गेले ।  
नित्य पाहिजेत वंदिले । चरण तयांचे ॥ १६ ॥  
असो ऐसी गुरुमाउली । आम्हां लाभली गोंदावलीं ।  
बोधकवळ मुखीं घाली । चमत्कृति दावोनी ॥ १७ ॥  
आम्ही अर्भके अज्ञान । बसतों हट्ट धरोन ।  
वैभवछंदा दावोन । बोधग्रास घालीतसे ॥ १८ ॥  
ऐसे जे वरचेवरी । ग्रास माय मुखीं भरी ।  
तेचि बोलूं ये अवसरीं । सात्विक परम ॥ १९ ॥  
पादपूरणार्थ कांही । क्वचित येईल नवाई ।  
परि जाणा साक्षात् सर्वही । सद्गुरुवचनें ॥ २० ॥  
ऐसा हा विवेकसिंधु । गुरुमुखींचा अनुवादु ।  
सेवितां तो परमानंदु । अनुभवा येईल ॥ २१ ॥  
गुरुवचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे ।  
दासबोधीं समर्थें ऐसें । पाहा प्रत्यक्ष कथियेलें ॥ २२ ॥  
चित्त दुश्चित न करावें । बोल हृदयीं धरावे ।  
म्हणजे संसृतीचे गोवे । तुटोनि जाती ॥ २३ ॥  
असो गुरुबोधामृत । कवळकवळी मुखीं घेत ।  
बैसावें जी गुरुभक्त । विनंती माझी ॥ २४ ॥  
येथें काय निरोपिलें । श्रवणें काय हातीं आलें ।  
तें तें संकलित कथिलें । अवधान द्यावें ॥ २५ ॥  
   
गुरुबोधो महामंत्रो ब्रह्मचैतन्यधी ऋषिः ।   
देवता रामचंद्रश्च ओवीच्छंदस्तु प्राकृतः ॥ १ ॥   
धर्महानिः कलौ बीजं श्रद्धा शक्तिस्तु सात्त्विकी ।   
रामनाम जपेन्नित्यं सद्धर्म इति कीलकम् ॥ २ ॥   
   
नरदेहाचे सार । कांही करावा विचार ।   
ना तरी श्वानसूकर । पशु जैसे ॥ २६ ॥  
स्त्री-पुत्र-देह रक्षण । हें जीवमात्राचें लक्षण ।  
असेल भगवंताचें अनुसंधान । तरीच मनुष्य म्हणवावें ॥ २७ ॥  
एवं संसृतिजन्य विकार । तितुके दुःखाचे डोंगर ।  
त्यांतून जावया पार । साधन नरदेह एकला ॥ २८ ॥  
येथें ज्यानें आळस केला । तो पशूंमाजी गणला ।  
याकारणें विवेक भला । केला पाहिजे ॥ २९ ॥  
येथें जे वाटे सुख । तें परिणामीं देई दुःख ।  
याकारणें साधकें विवेक । केलाचि करावा ॥ ३० ॥  
 
कलि झाला प्रबळ । विवेकाचें न चाले बळ ।  
चित्त झाले विकळ । सुख कोठें दिसेना ॥ ३१ ॥  
अतृप्त वासना दुःख । माया उपजवी शोक ।  
वासना माया दोष अनेक । करविती स्वसत्तें ॥ ३२ ॥  
तेणें चित्त होय आंधळें । विश्रांती कोठें नाढळे ।  
समाधान दुरी राहिलें । वृत्ति स्थिर होईना ॥ ३३ ॥  
परमार्थाचा नाहीं लेश । मायाभ्रमें कासावीस ।  
तेणें गुणें आला त्रास । श्वासोच्छ्वासीं दुःख भोगी ॥ ३४ ॥  
इच्छेचा पाहतां व्यापार । विषयावरी प्रेम फार ।  
कीर्ति असावी महीवर । अभिमान वाहे मस्तकीं ॥ ३५ ॥  
ऐसा संसार दुर्धर । केवळ दुःखाचे डोंगर ।  
यांतचि सुख इच्छी नर । जेवीं दीप्तीं पतंग ॥ ३६ ॥  
ऐसी दुःखें भोगावयासी । मूळ वासना विवसी ।  
अज्ञानें योजी घातासी । बहुतांच्या ॥ ३७ ॥  
ती वासना कैसी परी । तुज सांगतों निर्धारी ।  
बाळ खेळोन आलें घरीं । वणवा लावोनी वनासी ॥ ३८ ॥  
तेथें वृक्ष व्याघ्र जळती । वनचर प्राणी नेणों किती ।  
बाळ गृहीं असोन मिति । नाहीं प्राणीवधासी ॥ ३९ ॥  
ऐसी वासना वृथा अज्ञान । नसतेंचि उठवी विघ्न ।  
अलिप्त जीवा जन्ममरण । अज्ञानें घात करितसे ॥ ४० ॥  
आत्म्यास नाहीं जन्ममरण । हें सत्य आहे जाण ।  
देहाचेनि दीर्घ स्वप्न । पडलें वासनेचेनि योगें ॥ ४१ ॥  
उदकीं उठे बुद्बुदाकार । आत्मत्वीं देहादि विकार ।  
उदक बुद्बुद प्रकार । भिन्न नाहीं ॥ ४२ ॥  
तैसे देह अनंत दिसती । द्वैतभावें जोजावती ।  
परी आत्माराम सर्वांभूतीं । एकला एक ॥ ४३ ॥  
वासनायोगें भेद पडला । तेणें सुखदुःखाचा गलबला ।  
स्वप्नीं राजपद पावला । पदच्युत झाला क्षणामाजीं ॥ ४४ ॥  
सुख वाटलें तेंही मिथ्या । दुःखाचीही तीच वार्ता ।  
परि लोभ शोक अहंता । जाच करिती ॥ ४५ ॥  
सुखालागीं करी तळमळ । आंत वासना मळमळ ।  
देह पद्मपत्रींचे जळ । क्षण एक स्थिरावेना ॥ ४६ ॥  
जेथें सुखाचें अधिष्ठान । तें नाथिलें अशाश्वत जाण ।  
मृगजळीं शमवावी तहान । म्हणोनि प्राणी धांवतसे ॥ ४७ ॥  
येथें कोणी भेटेल ज्ञानी । तरी सांगेल मृगजळ कहाणी ।  
तंववरी हा लक्षयोनी । फिरतचि राही ॥ ४८ ॥  
असो ऐसी ही वासना । प्रपंचीं गोवित जनां ।  
असतीं दुःखें नाना । गणती नाहीं ॥ ४९ ॥  
दारिद्र्य लोभ आधिव्याधि । मन अहंकार माया बुद्धि ।  
दुष्ट वासना भय शोक उपाधि । कामेषणा पीडीतसे ॥ ५० ॥  
संसारी सुख इच्छिणें । इंगळावरी झोंप घेणें ।  
दोन्ही सारखीं प्रमाणें । पहावें सूक्ष्मदृष्टीं ॥ ५१ ॥  
परि तो संसार सोडवेना । सोडूं जाता सुटेना ।  
याकारणें मूळ वासना । नाशिली पाहिजे ॥ ५२ ॥  
वासनाक्षय कैसा करावा । संसार कैसा जिंकावा ।  
तो मार्ग गुरूसी पुसावा । दीन लीन होवोनी ॥ ५३ ॥  
गुरुवाक्य विवरोनि । शरीर झिजवावें साधनीं ।  
मुख्य नेम अनुसंधानीं । वासनाबीज भाजावें ॥ ५४ ॥  
अखंड करावें नामस्मरण । अलक्ष्यीं लावावें मन ।  
भक्तिभावें जगज्जीवन । आपुलासा करावा ॥ ५५ ॥  
तरी आधी करावें काय । केव्हां धरावे सद्गुरुपाय ।  
जेणें चुकती हे अपाय । तेंही आतां परिसावें ॥ ५६ ॥  
स्वधर्म करोनि जतन । कामक्रोधवर्जित मन ।  
शांति क्षमा परिपूर्ण । निर्लोभ निर्ममत्व ॥ ५७ ॥  
निरामय अंतःकरण । भूतीं दया परिपूर्ण ।  
समदृष्टि ठेवोन । गुणदोष न काढावे ॥ ५८ ॥  
परपीडा परनिंदा । परद्रव्यापहार कदा ।  
परस्त्रीअभिलाषप्रमादा । स्व्प्नींही येऊं न द्यावें ॥ ५९ ॥  
पाप भय अनुताप विराग । करोनि अवगुणांचा त्याग ।  
आदरें धरावा सत्संग । सद्गतीकारणें ॥ ६० ॥  
सद्गुरूसी जावें शरण । चरणीं वहावें तन मन धन ।  
स्वस्वरूप घ्यावें ओळखून । समाधानाकारणें ॥ ६१ ॥  
तरी सद्गुरु कैसा ओळखवा । काय पदार्थ त्यांना द्यावा ।  
कोण अनुभव स्वयें घ्यावा । सद्गुरुपासोनी ॥ ६२ ॥  
या प्रश्नाचें निरूपण । पुढील समासीं होईल जाण ।  
स्थिर ठेवोनि मन । श्रवण करावें ॥ ६३ ॥  
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥   
श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥ 
 
  
अध्याय सातवा समास दुसरा
 
  
सद्गुरु बहुत म्हणविती । नाना सोंगे दाविती ।    
भोळ्याभाविकां फसविती । गल्लोगल्लीं कित्येक ॥ १ ॥  
शब्दज्ञानामाझारीं चतुर । वेदान्त बोलती घरोघर ।  
म्हणती उपदेश ग्या माझा थोर । ब्रह्म दावितों तुम्हांसी ॥ २ ॥  
सद्गुरुहून देव न श्रेष्ठ । ऐसे सद्गुरु आम्ही वरिष्ठ ।  
विपरीत आधार देऊन स्पष्ट । भोळ्यभाबड्यां दगा देती ॥ ३ ॥  
कपटबुद्धीनें भोंदुनी । आयाबाया तुच्छ करोनी ।  
गरीब सत्पात्र स्वल्पज्ञानी । यांची करिती हेळणा ॥ ४ ॥  
सत्ताधीश राजे श्रीमान । यांचे होती रजःकण ।  
ऐसें जया विपरीत ज्ञान । त्यास गुरु म्हणों नये ॥ ५ ॥  
जे अधर्मकर्में सांगती । मजला द्रव्य द्या म्हणती ।  
तयांचा अनुग्रह कल्पांती । घेऊं नये कदा ॥ ६ ॥  
द्वेष मत्सर कपट । लोभ तृष्णा वासना खट ।  
भक्तीवांचूनि पोंचट । बोधिती त्यांस मानूं नये ॥ ७ ॥  
ज्ञान गर्व आणि ताठा । म्हण माझा उपदेश मोठा ।  
तरी तो जाण खोटा । कदापिही घेऊं नये ॥ ८ ॥  
देहबुद्धि नाहीं गेली । परि ब्रह्मविद्या हातीं आली ।  
म्हणती, तयांची साउली । पडों देऊ नये ॥ ८ ॥  
अहं ब्रह्मास्मि निर्मळ । आम्हां नाही पापाचा मळ ।  
ऐसें बोलती दुर्जन खळ । ती सत्य कलिमुर्ति ॥ १० ॥  
आम्ही ब्रह्म ऐसें बोलतां । ब्रह्म न होय सर्वथा ।  
सोडून द्यावी देह ममता । तरीच तो ज्ञानसिंधु ॥ ११ ॥  
मार्ग चालत असतां कांही । पाहणेंचे कारण नाही ।  
सहज नेत्रीं दिसून येई । जेथींचे तेथें ॥ १२ ॥  
आम्हा जाणतो ब्रह्म । हाच दुजेपणाचा भ्रम ।  
अहंता दिसे परम । देहबुद्धीची ॥ १३ ॥  
ऐसे गुरु बहुत असती । यांचेनि नव्हे वानसानिवृत्ति ।  
जेथें मिळे अखंड शांति । त्यांची लक्षणणें अवधारा ॥ १४ ॥  
सद्गुरुस्वरूपाची ओळखण । त्याचें करील वर्णन ।  
ऐसा कोण जगीं निर्माण । मी तों अल्पज्ञ काय बोलूं ॥ १५ ॥  
परि थोडें बाह्य लक्षण । त्यचें करूं विवरण ।  
जेणें घडेल समाधन । साधकांसी ॥ १६ ॥  
दयाशांतीचा पुतळा । जाणे चौदा विद्या चौसष्ट कळा ।  
परि आपण वेगळा । प्राकृताऐसा राहोनि ॥ १७ ॥  
कामक्रोधा नसे ठाव । नव्हे देहबुद्धीची धांव ।  
एक जाणे रामराव । जनप्रियत्व सर्वदा ॥ १८ ॥  
जाणोनि निर्गुणाची खूण । सगुण भक्ति परिपूर्ण ।  
सदा बोलेन सत्यवचन । पुण्यपावन तपोराशी ॥ १९ ॥  
सकळ तीर्थें येवोनि । घालिती स्नान जयालागोनि ।  
मी मोठा ऐसा मनीं । न धरी अभिमान ॥ २० ॥  
जो भवसागरीं बुडत । तया हात देऊनि काढित ।  
शिष्यासी पसरीना हात । कांही द्यावें म्हणोनी ॥ २१ ॥  
क्वचित् शिष्य आपुला । दुसर्यासी शरण गेला ।  
क्रोध न येई जयाला । तोचि एक सद्गुरु ॥ २२ ॥  
जागृति स्वप्न सुषुप्तीसी । तिन्ही अवस्थां एक साक्षी ।  
चौदेह वेगळे लक्षी । ऐसा पाहिजे सद्गुरु ॥ २३ ॥  
तयासी जावें शरण । तोचि चुकवील जन्ममरण ।  
याव्यतिरिक्त असतां लक्षण । शिष्यसमाधान करीना ॥ २४ ॥  
कांहीच नसतां ज्ञान । कोरडा धरी अभिमान ।  
हाच अधर्म सत्य जाण । तुवां तेथें नवजावें ॥ २५ ॥  
गुरुओळख न सांपडे तरी । वरील लक्षणें बाह्यात्कारीं ।  
असलीं तरी चरणावरी । मस्तक ठेविजे ॥ २६ ॥  
दुजेपणाची मात । विसरोनि जाय तेथ ।  
विनवावे सद्गुरु समर्थ । मोक्षेच्छा धरूनी ॥ २७ ॥  
बहुत केल्या येरझारा । वासना घेऊं नेदी थारा ।  
मी अज्ञान दुबळा दातारा । शरण आलों तुम्हांसी ॥ २८ ॥  
मन वैखरी एक करी । अज्ञान दीनत्वातें धरी ।  
अहंता सांडोन दुरी । विनवावें श्रीगुरूंसी ॥ २८ ॥  
गुरुवचन हाचि स्वार्थ । गुरुवचन हाचि परमार्थ ।  
गुरुवचनावीण व्यर्थ । सकल कांही ॥ २९ ॥  
घेवोनि अनुग्रहप्रसाद । सेवावें सद्गुरुपद ।  
कृपाकटाक्षें जाईल खेद्च । वासना वृत्ती ॥ ३१ ॥  
सद्गुरुकृपा व्हावयासी । कारण विश्वास निश्चयेंसी ।  
गुरुआज्ञा प्राणासरिसी । मानितां वृत्ति वळतसे ॥ ३२ ॥  
शरण जावोनि गुरूसी । साधनीं झिजवा शरीरासी ।  
साधनस्थिति आहे कैशी । सांगूं परमार्थी जनहो ॥ ३३ ॥  
सुद्ध साधकाची खूण । मी आणि माझेपण ।  
मिथ्या आळ हा टाकून । शुद्धज्ञानीं रहावें ॥ ३४ ॥  
निरिच्छ सदा असावें । मन जाळून स्वस्थ बसावे ।  
आपले स्वरूपीं मिळून जावें । कल्पनातीत ॥ ३५ ॥  
वासनाबीज जाळूनि । आत्मज्ञान पाहावें झणीं ।  
मग पुनर्जन्मास त्यांनी यावें न लागे।म ॥ ३६ ॥  
सामर्थ्यें मिळवूनि सिद्धी । जगीं मिरविती प्रसिद्द्दि ।  
उठवोनि जे प्रेतादि । दिवसां मशाली लाविती ॥ ३७ ॥  
पुढें कोणी न बोलत ।समस्त राजे पादाक्रांत ।  
आत्मस्तुतीं सदा डुल्लत । आनंदित होवोनि ॥ ३८ ॥  
परि वासनाबीज न मोडे । आणि सिद्ध म्हणविती गाढे ।  
आत्मज्ञानी म्हणती वेडे । तयांलागीं ॥ ३९ ॥  
वासनाबीज गेलें मुरोन । ताच ब्रह्मज्ञानाची खूण ।  
दुधासी घातलें मुरवण । तया दूध कोण म्हणे ॥ ४० ॥  
वृक्ष पाहतां आहे एक । पल्लव दिसती हजारों लाख ।  
तैसा विश्वीं विश्वंभर एक । भूतें पाहतां अनंतचि ॥ ४१ ॥  
वासना निमालिया पाथीं । आत्मरूप एक दृष्टि ।  
ना तरी भूतसृष्टि । विविध प्रकार ॥ ४२ ॥  
वासना निमालिया पाहीं । देहीं असतांच विदेही ।  
सुखदुःखादि सर्वहि । देहाकरितां ॥ ४३ ॥  
धान्य भाजोन काढिलें । परि तें दिसेनासें नाहीं झालें ।  
तैसे दृश्य जरी भासले । तरी तें निरुपद्रवी ॥ ४४ ॥  
कोणासी न वाटती वांकदे । ऐसे शब्द बोलावे रोकडे ।  
साधन करावें गाढें । जनांसीहि रिझवावें ॥ ४५ ॥  
वृत्ती असावी कल्पनारहित । सदा रहावें ध्यानस्थ ।  
देहभाव त्यजोनि सतत । मन रामीं रंगवावें ॥ ४६ ॥  
नम बुद्धि दुराचरी । देहीं गुंतती बहुपरी ।  
कैंचा पावेल पैलतीरीं । आत्मज्ञान शब्दमात्रें बोलतां ॥ ४७ ॥  
 
साधनाविणें आत्मज्ञान । अंगी न बाणे म्हणोन ।  
वृथा बोलूंच नये जाण । अंतरीं मात्र विवरावें ॥ ४८ ॥  
स्वप्नीं बैसला नृपासनीं । जागृतीं भिक्षा दुजे दिनीं ।  
कां नाट्यसदनीं राजपत्नी । झालिया काय प्राप्त ॥ ४९ ॥  
पाळण्या बाशिंग भांधलें । वरात मिरवोनि घरीं आले ।  
तत्क्षणीं तया मूल झालें ऐसी वार्ता न घडेचि ॥ ५० ॥  
तदुपरि साधनाविण । बोलूं नये आत्मज्ञान ।  
साधनीं असावें परिपूर्ण । परि सिद्ध म्हणवूं नये ॥ ५१ ॥  
शंकर करीतसे साधन । जोगी वैराग्यशील जाण ।  
ऐसा दुजा आहे कोण । त्रैलोक्य धुंडितां ॥ ५२ ॥  
शतकोटीचें काधोनि सार । उमेसह स्मरे शंकर ।  
तेथें मानव बापुडे किंकर । पाड काय तयाचा ॥ ५३ ॥  
पाकनिष्पत्ति न होतां । क्षुधा न निवारे सर्वथा ।  
तेवीं साधनाविणें ज्ञान हातां । येईना निश्चयें ॥ ५४ ॥  
स्वस्वरूपीं व्हावें लीन । ऐसें करावें साधन ।  
परि वृत्ती सांवरोन । साधन दृढ धर्तावें ॥ ५५ ॥  
साधकस्थिति बाणोनि गेली । ज्ञानदशा प्राप्त झाली ।  
परि वृत्ति पाहिजे सांभाळिली । वाटमारू जाणोनि ॥ ५६ ॥  
जाणावें सर्व वेदसार । सकळ तीर्थांचे माहेर ।  
साधकांचे निजघर । परि नेणतेंसें वागावें ॥ ५७ ॥  
अर्ध हळकुंडे पिवळे झाले । ऐसे बहुत बुडाले ।  
यास्तव साधकें वायचाळे । करूं नये सर्वथा ॥ ५८ ॥  
आणिक एक साधकखूण । मुमुक्षु असावें पूर्ण ।  
तरीच साधनीं गहन । विस्वास राही ॥ ५९ ॥  
मुमुक्षु नसतां चावटी । साधनीं कपाळीं आंठी ।  
त्रासेल अपुले पोटी । त्याचें काम नव्हे हें ॥ ६० ॥  
कसाबास नाही गाईची दया । जारिणीस नव्हे बालकाची माया ।  
तैसें मुमुक्षु नसतां वांया । तो कुतर्की होय बाधक ॥ ६१ ॥  
आतां ऐका श्रोतेजन । गुरुपुत्राचें कक्षण ।  
कोठें चुकलों असेन मी दीन । तरी मज सावध करावें ॥ ६२ ॥  
नव्हे हें माझ्या पदरींचे । जाणा स्वयें गुरुगृहींचे ।  
लक्षण कथिलें निर्गुणाचें । खूण समजा गुरुघरची ॥ ६३ ॥  
निर्गुणाची जाणून खूण । सगुणाचें करावें ध्यान ।  
नित्य नेम जप अनुष्थान । मानसपूजा करावी ॥ ६४ ॥  
आधीं करून अध्यात्मश्रवण । विवरविवरों निरूपण ।  
तीर्थ व्रत होम दान । साधुब्राह्माणीं आदर ॥ ६५ ॥  
प्रेमें करावें भजन पुराण । वेदशास्त्रीं आस्था पूर्ण ।  
भूतदया समसमान । शांति अतिगहन असावी ॥ ६६ ॥  
लीन असावे प्राणीमात्रासी । मत्सर नसावा मानसीं ।  
ऐसें जाणोन राहसी । तरी श्लाघ्यवाणें । ॥ ६७ ॥  
रामचिंतन करीत जावें । वैखरी क्षणही न विसंबावे ॥  
कामक्रोधाचे प्राण घ्यावे । विवेकें सतत ॥ ६८ ॥  
जें वाल्मीकीचें सार । प्रल्हादाचा भाव थोर ।  
मारुति जपे निरंतर । शिव ध्यायी सर्वदा ॥ ६९ ॥  
पार्वती जी विश्वजननी । नित्यनिम जपे स्मरणी ।  
तेंच रामनाम ध्यानीं । आणि मुखींहि असावें ॥ ७० ॥  
अओस्जा नेमाच्या हातवटी । प्राणी कधी न होय कष्टी ।  
भवबंधन आटाआटी । विरोन होय समाधान ॥ ७१ ॥  
अभ्यास लावितां मना । अंतकाळीं दुजी निठे वासना ।  
मग जीव भवबंधना- । पासोनि सोडवितसे ॥ ७२ ॥  
नित्य नेम दृढ करीं । नेम दृढ झालियावरी ।  
देहात्मबुद्धि सत्वरीं । लया जाय ॥ ७३ ॥  
ऐसें हें न होय जरी । दुःख भोगावें लागे जन्मवरी ।  
यमयातना क्लेश भारी । न चुकेचि निर्धार हा ॥ ७४ ॥  
क्लेशें फिरावें देह नाना । चारी खाणीं ध्यानीं आणा ।  
यांत संदेह नसे जाणा । दुःख शोक अनिवार ॥ ७५ ॥  
हे मागील होतसे उगवण । आतां राखावें सावधपण ।  
स्वाधीन करावें आपुलें मन । भलते भ्रांतीं पडूं नये ॥ ७६ ॥  
देह जातां कष्ट भारी । जरी मनाचे पडशील भरीं ।  
तरी सत्यज्ञान न ये पदरीं । उन्मत्तपणाचेनि गुणें ॥ ७७ ॥  
ब्रह्मज्ञान फार कथिण । राघवाचे भक्तीविण, ।  
म्हणे मज झाले आत्मज्ञान । तो दैवहीन पापी जाणावा ॥ ७८ ॥  
एकवीस सहस्र सहाशें जप । हें असे शिवाचें माप ।  
यासीच म्हणती अजपाजप । शिव योगी जपतसे ॥ ७९ ॥  
सर्व देवांमाजी शिरोमणि । अयोनिसंभव लावण्यखाणी ।  
पूर्णब्रह्म जो निर्गुणी । त्या शिवें सृष्टीकारणें देह धरिला ॥ ८० ॥  
ब्रह्मरंध्री कुंडलिनी लाहे । तयानें विषबाधा न जाये ।  
जोंवरी सगुण देह आहे । तोंवरी भजन सोडावें ना ॥ ८१ ॥  
समाधी लावोन बैसती देख । न तुटती देहाचे कलंक ।  
देहसंबंधी विष निःशंक । नामावांचोन शमेना ॥ ८२ ॥  
देहस्मरण राहे कुडीं । तोंवरी रामनाम न सोडीं ।  
शिव चाखित निगोडी । मानवाचा पाद काय ॥ ८३ ॥  
म्हणोन सांगितलें साधन । अंतर्निष्ठेची ही खूण ।  
सोडून षड्रिपूंचे बंधन । अखंड चिंतन असावें ॥ ८४ ॥  
रामरूप होऊन चिंतन करावें । देहाहून वेगळें वागावे ।  
अंतरी जग पाहावें । कसें आहे ॥ ८५ ॥  
एका देहाचेचि अवयव । नामकरणीं भिन्न भाव ।  
चैतन्य भरलें स्वयमेव । दृश्यीं राहोन जाणिजे ॥ ८६ ॥  
आपण एक स्मरण एक । हा जाणावा हीन विवेक ।  
चित्त देवोनि थोडे ऐक । आपुलें आपण स्मरण करीं ॥ ८७ ॥  
कागद शाई भिन्न असतां । एक करी लेखक मिळतां ।  
सुवर्णरज आणि सरी पाहतां । एकचि करणी ॥ ८८ ॥  
तैसें अभ्यासावें साधन । मग प्रकृति पुरुष एक जाण ।  
निष्काम करूनियां मन । रामरूप पाहावें ॥ ८९ ॥  
परेपासोन वैखरीपर्यंत । रामनाम घ्यावें सतत ।  
हेच सार साधका सत्य । मुख्यत्वें जाणावें ॥ ९० ॥  
वैखरीस रामनाम । न पडावें कधीं खंडण ।  
कोठेंही न फिरावें मन । तेंचि अधिष्ठान परेचें ॥ ९१ ॥  
वासनाक्षय साधनसार । राम राम दों अक्षर ।  
गुरुमुखीं ओळख सत्वर । कृपेंकरोनि घ्यावी ॥ ९२ ॥  
आतां याहून आणिक । संशय घेसी तरी देख ।  
न दावी आपुलें मुख । आम्हांप्रती ॥ ९३ ॥  
ऐसा हा अमृतघुटका । सेवितां दवडील धोका ।  
साधकहो नित्य घोका । मननक्रियेसहित ॥ ९४ ॥   
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥   
श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥ 
 
  
अध्याय सातवा समास तिसरा
 
  
महान् साधु तत्त्वज्ञानी । माता पिता श्रेष्ठ दोनी ।  
वंदोनि श्रीचापपाणी । बोलूं श्रीसद्गुरुकृपें ॥ १ ॥  
ब्रह्मज्ञान योगियांचे गुज । जें असे त्रिभुवनीं पूज्य ।  
तेंचि प्रांजल करूं आज । निजनिर्धारें ॥ २ ॥  
मायाब्रह्माचा निवाडा । शुद्ध परमार्थाचा धडा ।  
मुख्य अभिमान सोडा । मुमुक्षु जनहो ॥ ३ ॥  
अभिमान तो म्हणाल कैसा । मी देही म्हणतो ऐसा ।  
या देहाचा नाहीं भरंवसा । उदकीं जैसें प्रतिबिंब ॥ ४ ॥  
देही म्हणतां अवघें बंधन । देहातीत आत्मज्ञान ।  
ऐसा आधार जाणून । भुलले जन पुन्हां किती ॥ ५ ॥  
देहाभिमान विलक्षण । कामक्रोधांचे बंधन ।  
म्हणती झाले ब्रह्मज्ञान । हा प्रभाव कलीचा ॥ ६ ॥  
क्रियेविण ब्रह्मज्ञान । म्हणे सद्गुरु झाले प्रसन्न ।  
हर हर तो जीव जाण । नाडला विपरीतज्ञानें ॥ ७ ॥  
अर्थ गहन वेदमथित । ऐसें बोलती पंडित ।  
धन्य म्हणविती जगांत । संमत घेवोनि भागवत गीता ॥ ८ ॥  
पुस्तक ज्ञानी मिथ्या म्हणों तरी । अवघ्या बुडती नरनारी ।  
परि भाविकां नाडिती भारी । शब्दज्ञान पांडित्य ॥ ९ ॥  
पुस्तक ज्ञान सत्य कैसें । असत्य म्हणतां लागेल पिसें ।  
सत्यासत्य जाणोन विलसे । अनुभवी ज्ञानराशी ॥ १० ॥  
चारी अवस्थांबाहेर ब्रह्मज्ञान । उन्मनीपलिकडे जाण ।  
तरी हा बोलतो कोण । त्याची शुद्ध तया नाही ॥ ११ ॥  
तो जीव होवोनि राही । तेथें ज्ञान नाहीं नाहीं ।  
शब्दब्रह्मीं भ्रमला पाहीं । अनुभव तो वेगळा ॥ १२ ॥  
चित्राचा वाघ केला । तो काय मारील मेंढ्याला ।  
प्रेताचा काय गौरव केला । तरी काय सुख तयासी ॥ १३ ॥  
तैसे शब्द लाघव विचार । कैसा तरेल भवसागर ।  
दृश्य-द्रष्टा-दर्शन प्रकार । त्यावेगळें स्थान माझे ॥ १४ ॥  
अहं सोऽहं याहून आगळा । माझा मी असें भला ।  
त्रिगुणरहित असे संचला । निवांतपणें ॥ १५ ॥  
ऐसा वदसी सिद्धांत खरा । तूं निर्गुण म्हणतोस पामरा ।  
विश्व जगाच थारा । परमात्मा म्हणतोसी ॥ १६॥  
त्या परमात्म्याची चिच्छक्ति । नाहीं बा तुज कल्पांतीं ।  
देहप्रारब्धगती । चुकणार नाहीं ॥ १७ ॥  
ती असेल तैसी घडो । परि आत्मानुसंधान न मोडो ।  
व्यर्थ नको बडबडों । अवघड असे तुजला हें ॥ १८ ॥  
पहा रे भ्रांती बसली जडोन । कोणी केला तुझा अपमान ।  
तेणें तुझें दुखलें मन । होय कीं नव्हे ॥ १९ ॥  
एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति । ऐसें कथिती वेद श्रुती ।  
तरी मना दुःखितस्थिति । कोठून आली ॥ २० ॥  
’मी ब्रह्म’ म्हणविसी । आकाररहित अससी ।  
तरी कैसारे उरशी । जगामाजीं ॥ २१ ॥  
जगीं भरोन उरला । तोचि म्हणविसी भला ।  
ऐसा तुज भ्रम झाला । शास्त्रग्रंथ पढोनिया ॥ २२ ॥  
तरी ऐसा पडूं नको भ्रमांत । स्वानुभवें बोलती संत ।  
तेचि शब्द मात्र बोलोनि घात । करिसी तूं आपुला ॥ २३ ॥  
जगीं म्हणवोनि महंत । बुडविसी जीव अनंत ।  
आतां शुद्ध करोन चित्त । आदि अंत पहावा ॥ २४ ॥  
परमात्मा निर्गुण निराकार । असोन झाला साकार ।  
तैसाच साधूचा प्रकार । करिती सर्वही कर्में ॥ २५ ॥  
परि ते कर्में करोनि अलिप्त । तूंही मानिसी तैसेंचि सत्य ।  
या अहंकारे होसी उन्मत्त । येणेंचि जीव नरकीं बुडती ॥ २६ ॥  
अरे ऐसा अधिकार आला । तो कोणी सांग पाहिला ।  
जोंवरी स्वतःसी ज्ञाता मानला । तोंवरी अल्पज्ञान ॥ २७ ॥  
चौदेह वाचा चारी । चार वेद अवस्था चारी ।  
चार मात्रा पंचतत्त्वेंवरी । पंचविषयी पंचकोश ॥ २८ ॥  
पिंड ब्रह्मांड बाह्य सोहळा अघटित । सच्चिदानंद रसभरित ।  
उपनिषदांचा मतितार्थ । तें तूं स्वरूप ॥ २९ ॥  
ऐसा शब्दे अनुभव येता । तरी सृष्टिक्रम झाला नसता ।  
तें गुरुगम्य न ये हातां । ती शब्दातीत ओळखण ॥ ३० ॥  
ऐसी परात्पराची खूण । तेथें काय शब्दज्ञान ।  
गुरुपुत्र तें जाणून । भ्रांत म्हणती तुजलागीं ॥ ३१ ॥  
दरवेशानें मर्कट पाळिला । शब्दज्ञानें तया पढविला ।  
घरोघरीं संसार मांडिला । पोटास्तव ॥ ३२ ॥  
म्हणे तुझा पति आला । तो लाजून बसे कोंपर्याला ।  
सासूची घागर म्हणून दिला । दगड एक मस्तकीं ॥ ३३ ॥  
तत्क्षणीं क्रोधें भारी । फेंकून देत दगड दूरी ।  
पतीचा म्हणतां सत्वरीं । प्रेमें घेत मस्तकीं ॥ ३४ ॥  
काय लाज मर्कटाची । क्रोध येवोन करी ची ची ।  
शिकवण दरवेशाची । मर्कट तो केवळ पशु ॥ ३५ ॥  
तैसें तुझें गुरूचें ज्ञान । हे दृष्टांतें ये दिसोन ।  
पोटासाठीं पराधीन । मर्कट क्रिया करितोसी ॥ ३६ ॥  
राघवाचे भक्तीविण । सत्य सत्य हें अज्ञान ।  
तुझे गुरुही भ्रमिष्ट जाण । जरी शब्दज्ञान बडबडसी ॥ ३७ ॥  
 
अन्यान गुरु अडक्यास तीन । मिळाले तरी त्यजावे जाण ।  
लावणी लाविती ब्रह्मज्ञान । गुरुगम्य तें वेगळें ॥ ३८ ॥  
कर्म उपासना तुच्छ मानिती । सत्कर्म कर्तव्य ज्ञान नीति ।  
परि जें प्रथमांग वेद बोलती । तें साधकासी अवश्य पाहिजे ॥ ३९ ॥  
दुसरें अंग उपासना । तिसरें आत्मज्ञान जाणा ।  
ऐशा सत्पुरुषांच्या खुणा । तुज कैशा न मानवती ॥ ४० ॥  
तयांसी तूं दूषण दिलें । कर्मौपासनेविण ज्ञान स्थापिलें ।  
हें उचित कैसें गमलें । विवरोन पाहा ॥ ४१ ॥  
वेदांत म्हणजे क्रियेसहित । आणि पाहिजे अनुभवयुक्त ।  
क्रियेवीण जो वेदांत । तोचि घात जीवाचा ॥ ४२ ॥  
पुत्र प्रसवली स्त्री कोणी । तो थोर झाला तत्क्षणीं ।  
क्षुधा लागली म्हणोनी । अन्न मागे हंडाभरी ॥ ४३ ॥  
तो पुत्र नव्हे ऐसे म्हणती । तैसें कर्म उपासना नीति ।  
सत्क्रिया वैराग्य विवेकज्योति । अणुभरी नाहीं ॥ ४४ ॥  
कामक्रोध असतां । आत्मज्ञान नव्हे सर्वथा ।  
भासलें ते मिथ्या । निश्चित जाणावें ॥ ४५ ॥  
आत्मज्ञानाचें मुख्य कारण । सगुण पाहिजे सुप्रसन्न ।  
म्हणोनिया भावें भजन । केलेंचि पाहिजे ॥ ४६ ॥  
सगुण साक्षात् नाहीं झाले । नित्यानित्य नाहीं ओळखिले ।  
आणि म्हणती आत्मज्ञान झालें । तरी हें विपरीत ॥ ४७ ॥  
वेदशास्त्रबाह्य वर्तन । दुराचरण रात्रंदिन ।  
कामक्रोधीं अंतःकरण । गर्व ताठा भरलासे ॥ ४८ ॥  
जाणे मानापमान । मना आलें तैसें वर्तन ।  
करी सत्याचें खंडण । समाधान नाहीं अंतरी ॥ ४९ ॥  
परपीडा निंदा करीत । साधु देव ब्राह्मण संत ।  
वेदाशास्त्र पुराणमत । यांचा करी अव्हेर ॥ ५० ॥  
तीर्थ व्रत नित्यनेम । सगुणोपासना भजन सुगम ।  
जप तप साधन परम । दूषण देती यां सर्वांसी ॥ ५१ ॥  
भेदिती दुज्याचें अंतःकरण । भरीं भरोन आपण ।  
ऐसे कलियुगींचे जन । त्यांचे वदन न पाहावें ॥ ५२ ॥  
त्यांसी दूषणही न द्यावें । त्यांचे शहाणपण न ऐकावें ।  
त्यांचे गुण न सेवावे । वाद त्यांसी करूं नये ॥ ५३ ॥  
केव्हांच देतील दगा । अभिमान लावितील अंगा ।  
उपासना पावेल भंगा । हातोहातीं ॥ ५४ ॥  
इतुके प्रकार सांगाया कारण । कली दुर्जन वाढला गहन ।  
बहुत पावती पतन । साधनातें सोडोनी ॥ ५५ ॥  
वरील बोध घेऊन ध्यानीं । आतां कांही करा करणीं ।  
तेणें व्हाल समाधानी । हे सत्य वेदाज्ञा ॥ ५६ ॥  
सहज सद्गुरुकृपा वोळे । वेदशास्त्र ज्ञान कळे ।  
साधनीं चित्त असतां भलें । सहज होय जीवन्मुक्त ॥ ५७ ॥  
प्रथम आवडे परमार्थ । त्यानें हस्तगत होय चित्त ।  
तैसेंचि साधन करितां सतत । समाधान प्राप्त होय ॥ ५८ ॥  
ज्यासी पाहिजे शुद्धज्ञान । त्याचें सुप्रसन्न असावें मन ।   
वेदशास्त्र पुराण श्रवण । रात्रंदिन करावें ॥ ५९ ॥  
सतत मनन असावें । मनीं अनुसंधान ठेवावें ।  
स्वधर्मरक्षण करावें उपासनीं प्रेम ॥ ६० ॥  
दया लीनता आणि शांति । आश्रमधर्म न्याय नीति ।  
असोनि मुका निंदास्तुतीं । साधु-ब्राह्मणीं पूर्ण आस्था ॥ ६१ ॥  
विश्व अवघे परब्रह्मसमान । आपण व्हावें अणुहून लहान ।  
टाकून गर्व दंभ मान । आदर राखावा गुरुवचनीं ॥ ६२ ॥  
घेवोनि सद्गुरुवचन । श्रीरामरूप करीं मन ।  
अखंड करीं रामचिंतन । सुखदुःख सम मानावें ॥ ६३ ॥  
टाकून निद्रा दुर्गुण आळस । गुरुआज्ञे विश्वास ।  
विवेक वैराग्य भाग्यास । उणें नसावें ॥ ६४ ॥  
प्रपंच व्यापारीं खबरदार । संचित प्रारब्धावरी शरीर ।  
प्रवृत्तिमार्ग साचार । आपण वेगळें असावें ॥ ६५ ॥  
जोंवरी देहाची संगति । तोंवरी पापें पदरी असती ।  
त्यांची व्हावया निवृत्ति । अनुताप पूर्ण पाहिजे ॥ ६६ ॥  
तरी तो कोणता अनुताप । जन्मजन्मांतरींचे पाप ।  
जीवासी लागलें माप । दारिद्र्य दुःख अपजय ॥ ६७ ॥  
आपणा वाटे मी शहाणा । परि लोक निंदिती आपणां ।  
जीव बहु श्रमला जाणा । क्लेश भोगी अनिवार ॥ ६८ ॥  
पूर्वपापाची संचिति । न चाले उपाय युक्ति ।  
कामक्रोधांची संगति । भ्रांति पडे ममत्वें ॥ ६९ ॥  
सूक्ष्म अहंकार जाईना । वैभवेच्छा सुटेना ।  
वृत्ति आवरितां आवरेना । म्हणोन तळमळ असावी ॥ ७० ॥  
संसारगिरि कैसा उल्लंघावा । काय भोग भोगावा ।  
काय करूं देवाधिदेवा । ऐसी करुणा भाकावी ॥ ७१ ॥  
तैसेंचि गुरूंसी पुसावें । नित्यनेमें अंतर शोधावें ।  
सुगुण दुर्गुण पाहावें । कैसे उठती ॥ ७२ ॥  
तरूसी लागलें भिरड । कांही दिसां नासेल झाड ।  
तैसें विवेकें विवरोनि जाड । दुर्गुणांसी त्यागावे ॥ ७३ ॥  
तो विवेक कैसा करावा । साधनीं देह कैसा असावा ।  
जेणें तुटेल हा गोवा । पुढील समासीं निरूपण ॥ ७४ ॥  
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥   
श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥ 
 
  
अध्याय सातवा  समास चवथा
 
  
मागां जो प्रश्न झाला । तोचि येथें अनुवादला ।   
संसारगिरि उल्लंघिला । जाईल कैसा ॥ १ ॥  
सुखें उतरवेल संसार । मातापित्यांसह उद्धार ।  
तें तुज सांगेन सार । वेदशास्त्रगुज ॥ २ ॥  
योग तपानुष्ठान तीर्थ । धर्म व्रत नेम वेदांत ।  
सिद्धांत मथितार्थीं निभ्रांत । आत्मदर्शी होइजे ॥ ३ ॥  
गुरुकृपेचें अंजन । सहज होय आत्मज्ञान ।  
असत्य मानी तो जाण । गुरुसहित लटिका ॥ ४ ॥  
त्याचें न ऐकावें भाषण । मोठें चातुर्य शहाणपण ।  
मिथ्या पोंचट शब्दज्ञान । संगति पीडा करील ॥ ५ ॥  
हें एक मुख्य लक्षण । आतां सांगतो साधन ।  
ब्रह्मकर्माची खूण । तुम्हांप्रति ॥ ६ ॥  
संध्या स्नान प्राणायाम । अखंड जपा रामनाम ।  
आतां ज्ञानयज्ञ सांगतो सुगम । विवेक अग्नि पेटवावा ॥ ७ ॥  
कामक्रोध जाणावे दोनी । निष्काम वृत्ति ठेवोनि ।  
नामरूपीं चित्त जडवोनि । असावें सर्वकाळ ॥ ८ ॥  
दया शांति करी जतन । अक्रोध सर्वांभूतीं लीन ।  
जितेंद्रियत्व श्रवण मनन । जनप्रियत्व असावें ॥ ९ ॥  
समसमान सुखदुःख । मान अपमान नसावा देख ।  
शत्रुमित्रा मान एक । भगवद्भाव सर्वांठायी ॥ १० ॥  
आळस निद्रा आणि तृष्णा । लोभ दंभ आणि वासना ।  
यांचे बीज भाजूनि म्हणा । अखंड मुखीं राम राम ॥ ११ ॥  
देह ठेवोनि प्रारब्धावरी । उद्योगधंदा सर्व करी ।  
परि आपण राहे दूरी । श्रीरामचिंतनीं ॥ १२ ॥  
हृदयांत स्मरण श्रीराम । म्हणजे वैखरी जपे नाम ।  
ऐसा ज्याचा नित्य नेम । न विसंबे एकही पळ ॥ १३ ॥  
विश्वासपूर्वक वचन प्रमाण । तेथें सत्य आत्मज्ञान ।  
या व्यतिरिक्त पाखंड जाण । कलीमाजीं उदंड ॥ १४ ॥  
जीवन्मुक्ताचें लक्षण । देहदुःखीं नसे मन ।  
अखंड ज्याचें समाधान । स्वानंदभरित ॥ १५ ॥  
नामरूपीं जडले चित्त । चारी वाचा नाम गर्जत ।  
धन्य तो एक जगांत । धन्य कुळ धन्य देश ॥ १६ ॥  
सर्व दुःखांचा परिहार । करी नामाचा गजर ।  
कामक्रोध आवर आवर । आतां तरी ॥ १७ ॥  
नामस्मरणाविण कांहीं । दुजी वार्ता तूं न घेईं ।  
अखंड जप वैखरी पाहीं । तेंचि परेचें अधिष्ठान ॥ १८ ॥  
तेणें होईल सर्व काम । हातां येईल पुरुषोत्तम ।  
तोचि आत्मज्ञानी परम । तोचि खरा गुरुपुत्र ॥ १९ ॥  
नामीं रंगलें अंतर । तोचि ब्रह्मज्ञानी नर ।  
तेथें कोण वैभव काय थोर । हें एक तो जाणे ॥ २० ॥  
तोचि गुरुपुत्र गहन । एरवीं जे पुस्तकज्ञान ।  
बहु जल्पती अज्ञान । तेथें अति सावध राहे ॥ २१ ॥  
आपलें निजनिष्ठेचें साधन । तेथून न ढळावें मन ।  
ही तुज सांगितली खूण । साधकाची ॥ २२ ॥  
त्यानेंच पावसी आत्मज्ञान । बहुतेक करिती श्रवण ।  
परि निभ्रांत न होती जाण । नामानुसंधानाविरहित ॥ २३ ॥  
पक्षी बोले 'गंगाराम' । पोपटपंची चतुर परम ।  
परि त्याचें तो न जाणे नाम । अजाणबुद्धि म्हणोनी ॥ २४ ॥  
तैसा देहाभिमानी गुंतला । तो काय जाणे भगवंताला ।  
कपटी ताठा गर्वीं भरला । धन्य म्हणे मी एक ॥ २५ ॥  
मज झाले आत्मज्ञान । जग अवघें अज्ञान ।  
हा बुद्धिभेद विलक्षण । निर्गुण ठाव न लागे ॥ २६ ॥  
सगुणासी देव न मानत । अर्थाचा करी अनर्थ ।  
कर्म उपासना म्हणे व्यर्थ । मीच म्हणे झालो देव ॥ २७ ॥  
काय पराक्रम केला । वेदशास्त्र धुंडाळोनि आला ।  
परि अहंभाव नाही गेला । तो सत्य बद्ध जीव ॥ २८ ॥  
कैसा ज्ञानी म्हणतोसी । मी ब्रह्म जाहलो म्हणविसी ।  
तरी दीनरूप कां होसी । उत्तर कांही सुचेना ॥ २९ ॥  
असो ऐसें मानूं नये । भलते भ्रमीं पडूं नये ।  
साधन आपुलें सोडूं नये । महंतीसी फसोनी ॥ ३० ॥  
सकल देवांचा जो देव । साक्षात् परमेश्वर गिरिजाधव ।  
तोहि स्मरे रामराव । सिद्धपणा न भोगी ॥ ३१ ॥  
एवं देह जंव सगुण । तोंवरी न सोडावें साधन ।  
जरी आलें सिद्धपण । तरी भजन सोडूं नये ॥ ३२ ॥  
मी ज्ञानी ऐसें मानूं नये । ज्ञानी ऐसें सांगूं नये ।  
सिद्धपणें वागूं नये । जनांमध्यें ॥ ३३ ॥  
येथें एक संशय आला । सिद्ध होवोन मौनी झाला ।  
तरी बोध कैसा होईल जनाला । भवसिंधु तराया ॥ ३४ ॥  
त्यासी एक प्रमाण । गुरुआज्ञा मुख्य जाण ।  
तेणें उद्धरती जन । भवार्णवापासोनी ॥ ३५ ॥  
गुरुआज्ञेवांचून कांही । बोध निश्चयें रुजणार नाहीं ।  
यास्तव जंव आज्ञा नाहीं । तंव बोध करूं नये ॥ ३६ ॥  
स्वयें करितां विवरण । आर्त सहज शिकती जाण ।  
यास्तव अधिक उपाधीपासोन । अलिप्त असावें ॥ ३७ ॥  
गुरु अंतरसाक्षी ज्ञाना । शिष्याअंगी पात्रता येतां ।  
आज्ञा करिती क्षण न लागतां । जगा बोध कराया ॥ ३८ ॥  
दुसरें सगुण उपासना । अखंड करितां चालना ।  
सहज पावती समाधाना । संगतीं होय फलप्राप्ती ॥ ३९ ॥  
आणि या राघवाची भक्ति । वाढवावी यथाशक्ति ।  
परि न वाढवावी महंती । सिद्धपणाची ॥ ४० ॥  
महंती वाढवितां वाढेना । सहज धांवती जीव नाना ।  
कस्तुरीसी शोधिती पहा ना । घोर अरण्यांत ॥ ४१ ॥  
निर्जन वनीं मैलागिरी । तो चंदन घरोघरीं ।  
तैसे लोक बोधिले जरी । ज्ञानी ऐसें म्हणों नये ॥ ४२ ॥  
पुनरपि ज्ञानाचें लक्षण । ऐक गुरुकृपेची खूण ।  
दया शांति अति गहन । समदृष्टि असावी ॥ ४३ ॥  
 
इंद्रियें जिंकावी समस्त । मन होऊं न द्यावें व्यस्त ।  
अक्रोधवृत्ति भाषण सत्य । भूतीं नम्रता असावी ॥ ४४ ॥  
व्यवहार असावा युक्त । रजतमोगुणविरहित ।  
सगुणोपासना नेमस्त । प्रपंची परमार्थ साधावा ॥ ४५ ॥  
अखंड पांचवी अवस्था । सदैव समाधान चित्ता ।  
वेळ व्यर्थ न दवडितां । लय साक्षित्व ठेवावें ॥ ४६ ॥  
सदोदित रामचिंतन । कामक्रोधीं लोभी मन ।  
कधींही नसावे जाण । अहंकार संपूर्ण छेदावा ॥ ४७ ॥  
मोहमायेसी दूर करावें । जनप्रियत्वही ठेवावें ।  
दुर्बुद्धीसी फिरकों न द्यावें । घरांत शांति असावी ॥ ४८ ॥  
बायकामुलें आप्तगोत । सखे सज्जन अभ्यागत ।  
यांचे रक्षण नेमस्त । साधन साधोनि करावें ॥ ४९ ॥  
विवेकयुक्त अंतःकरण । चित्त प्रसन्न करून ।  
निरंतर राम चिंतन । भक्तियुक्त करावें ॥ ५० ॥  
आतां ऐका वागणूक । नित्य नेम निःशंक ।  
जेणें घडेल सार्थक । नरजन्माचें ॥ ५१ ॥  
प्रातःकाळीं प्रातःस्मरण । प्रथम नमावा गजवदन ।  
जानकीजीवन उमारमण । सधु सज्जन ऋषिमुनी ॥ ५२ ॥  
जनक जननी नद्या सागर । यांसी करूनि नमस्कार ।  
शुद्ध करोनि अंतर । मानसपूजा करावी ॥ ५३ ॥  
घालोनिया सिद्धासन । श्वासोच्छ्वासीं नामस्मरण ।  
अंतरीं ध्यावा सीतारमण । सायुध सालंकार ॥ ५४ ॥  
तैसेंचि ध्यावें गुरूसी । पूजा करावी षोडशी ।  
साधोनियां एकांतासी । नेत्रोन्मीलन करावें ॥ ५५ ॥  
वृत्ति असावी स्वानंदरमणीं । चहूंकडील परतवोनी ।  
बळेंचि लावा भगवच्चरणीं । विवेकें सतत ॥ ५६ ॥  
विवेक वैराग्य नाम ही त्रिपुटी । असावी सदा गांठी ।  
कम क्रोध मोह ही त्रिपुटी । दृष्टीसमोर आणूं नये ॥ ५७ ॥  
मान अपमान समसमान । सुखदुःख एक जाण ।  
चिंता नसावी तिळप्रमाण । नामस्मरणीं वैखरी ॥ ५८ ॥  
बहुत विचारें वागावें । सदा संतोषी रहावें ।  
देहा प्रारब्धीं टाकावें । संसारी प्रयत्न करावा ॥ ५९ ॥  
वृद्धाचार कुलाचार लौकिक । कधीं सोडूं नये देख ।  
शास्त्रविरुद्ध निंदिती लोक । ऐसें वर्तन असूं नये ॥ ६० ॥  
अन्यायें धन जोडूं नये । परपीडा करूं नये ।  
वादें भरीं भरों नये । भांडूं नये नास्तिकासी ॥ ६१ ॥  
मन वृत्ति कोठें राहते । चित्त काय चिंतीत असते ।  
हें शोधावें विवेकपंथें । दुर्गुणातें त्यजावया ॥ ६२ ॥  
अहंभाव वासना-रहित । वागावया प्रयत्न सतत ।  
करावा जाणोनि प्राप्त । कलियुग दुर्बुद्धीचें ॥ ६३ ॥  
काळ जन आणि मन । हे ह्या कलीचे स्वाधीन ।  
सद्धर्म सत्कर्म अनुष्ठान । करणें बहु कठिण असे ॥ ६४ ॥  
कलीचा तो ऐसा नेम । कोणी न भजावा राम ।  
योग जप तप होम । सत्क्रिया न करावी ॥ ६५ ॥  
म्हणून बहु सावधान । स्वधर्माचें करावें रक्षण ।  
युक्त व्यवहार करोनि धन । प्रपंच करा दक्षत्वें ॥ ६६ ॥  
करोनियां स्नानसंध्या । श्राधपक्ष प्रपंच धंदा ।  
वैखरीसी विसर कदा । नामाचा पडों देवो नये ॥ ६७ ॥  
मन चंचल फिरणार । परि वैखरीं नसावा विसर ।  
वेद शास्त्र गुरुवर । येथें आदर असावा ॥ ६८ ॥  
देव साधु ब्राह्मण । यांचे करावें पूजन ।  
आदिकरोनि दुर्जन । भूतीं दया असावी ॥ ६९ ॥  
सदा शांत असावें । मन निर्लोभी ठेवावें ।  
विषयचिंतन नसावें । सतत करा अभ्यास हा ॥ ७० ॥  
कोणास तुच्छ मानूं नये । गर्वें कधीं वागूं नये ।  
असत्य भाषण बोलूं नये । ऊर्मि सतत आवरावी ॥ ७१ ॥  
प्राणान्त बेतला तरी । स्वप्नीं न चिंतावी परनारी ।  
तेणें आकळिला श्रीहरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ७२ ॥  
काय देहाचा भरंवसा । कोण दिवस येईल कैसा ।  
काळ संगतीसरसा । हें लहन थोर जाणती ॥ ७३ ॥  
काम क्रोध गर्व वासना । शोक चिंता वैभव जाणा ।  
सुखदुःखादि कल्पना । हेंचि देहाचें देहपण ॥ ७४ ॥  
चित्त शुद्ध नाहीं झालें । तरी जन्मा येवोनि काय केलें ।  
नाहीं देवा ओळखिलें । स्वधर्म तो कोण जाणे ॥ ७५ ॥  
सन्मार्ग तो नाहीं ठावा । संतसंग कोणी करावा ।  
आयता सद्गुरु भेटावा । ऐसें म्हणती वाचाळ ॥ ७६ ॥  
तरी ऐसें करूं नये । प्रयत्नें संतां शरण जाये ।  
नातरी वासना विये । चौर्यांशी लक्ष योनी ॥ ७७ ॥  
संतसंगाची लक्षणें । सांगतों तीं परिसणें ।  
साधन करा प्रयत्नें । निजहितासी ॥ ७८ ॥  
मनोवृत्तीस आवरावें । देहदुःख विसरावें ।  
धैर्य बल सांभाळावें । विषयवासना आवरावी ॥ ७९ ॥  
छळ कपट शब्दबाण । द्रव्य-दारा-वर्जित मन ।  
जाणोन संताची खूण । सर्वत्रीं लीन असावें ॥ ८० ॥  
श्रीरामीं प्रेम फार । अभिमान नसे तिळभर ।  
सगुणोपासना निरंतर । हर्ष ना विषाद ॥ ८१ ॥  
भय चिंता भेदाभेद । नसे लोभ ममता मद ।  
उद्विग्न चित्त आणि क्रोध । निंदा न करी कोणाची ॥ ८२ ॥  
न सेवी कोणाचें वित्त । न करी कोणाचा घात ।  
परदारावर्जित चित्त । आवडी संतसंगाची ॥ ८३ ॥  
असत्य न बोले वाणी । जनप्रिय मधुरवचनी ।  
दया शांति अंतःकरणीं । परदुःखें दुखे मन ॥ ८४ ॥  
परोपकारीं शूर । अंगी वैराग्याचा भर ।  
विवेक जागृत बरोबर । तोचि संतकदर जाणे ॥ ८५ ॥  
ऐसीं लक्षणें धरावीं । संतसंगगोडी घ्यावी ।  
नित्य जीवीं धरावी । सद्गुरुवचनें ॥ ८५ ॥  
॥ इति श्रीसद्गुरुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥   
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ 
 
  
अध्याय सातवा  समास पाचवा
 
  
आता ऐका शिकवण । युक्ति बुद्धि शहाणपण ।   
जेणें घडे समाधान । प्रपंची आणि परमार्थी ॥ १ ॥  
कोणास आशा दाखवूं नये । स्वयेंही कोणाची धरूं नये ।  
कोणास उत्तर देऊं नये । हेतु जाणल्यावांचोनी ॥ २ ॥  
सुखदुःखाची येतां वेळ । आपलें समाधान न ढळेल ।  
ऐशी वृत्ति सखोल । स्थिर राखावी ॥ ३ ॥  
साधनासी जी सबब । ती नुकसान स्वयंभ ।  
याकारणें साधन दुर्लभ । तेंचि आधीं साधावें ॥ ४ ॥  
जपासी बैसल्यावरी । कोणी द्रव्य घालील पदरी ।  
अथवा पितामह जरी । आला तरी बोलूं नये ॥ ५ ॥  
नाम जपा श्वासोच्छ्वासी । भजा श्रीरामरायासी ।  
याचनावृत्तीनें कोणासी । कांहीही मागूं नये ॥ ६ ॥  
जो हिशोबी पैशाचा । तोचि दरिद्री साचा ।  
जेथें आयात निर्गतीचा । हिशेब नसे तो धन्य ॥ ७ ॥  
याकारणें द्रव्यचिंतन । कदा करूं नये जाण ।  
आशाळभूत आपुलें मन । कदापि असूं नये ॥ ८ ॥  
या मृत्युलोकामाझारीं । रोग नाश शरीरीं ।  
होणार हें निर्धारीं । त्याचें दुःख मानूं नये ॥ ९ ॥  
देहममता सांडावी । आशा तृष्णा सोडावी ।  
रामभक्ति करावी । म्हणजे रामचि होय ॥ १० ॥  
ज्यांची जयावरी प्रीति । तेंचि रूप ते होती ।  
अंतकाळीं उपजे सन्मति । तोचि अभ्यास करावा ॥ ११ ॥  
स्त्रियांचे रूप आणि भाषण । शब्द स्पर्श ममता जाण ।  
कधींही प्रिय न मान । जरी परमार्थ तुज व्हावा ॥ १२ ॥  
प्रेम क्वचितचि सच असतें । बहुतेक साधकां नाडितें ।  
यास्तव वारेंहि अंगावरतें । पडों देऊं नये ॥ १३ ॥  
ध्यानीं धरावें पुढील नेम । धरितां होईल आराम ।  
तोचि परमार्थ परम । अन्यथा अवघी मळमळ ॥ १४ ॥  
अजिंक्य मन जिंकी सदा । परपीडा परनिंदा ।  
परदारा परापवादा । परदोषा न पहावें ॥ १५ ॥  
सुख दुःख मानापमान । हर्ष विषाद समसमान ।  
दंभ गर्व त्यागोन । सत्य शांति धरावी ॥ १६ ॥  
अक्रोध जनप्रियता । निर्लोभता विवेक समता ।  
भूती दया विरक्तता । लय साक्षिता असावी ॥ १७ ॥  
भगवद्भक्ति प्रेमरस । आत्मज्ञानाचा हव्यास ।  
स्वानंद स्मरण श्वासोच्छ्वास । चित्त निर्विषय असावें ॥ १८ ॥  
दुर्जन छळावया येती । तरी राखें समाधान नीति ।  
साह्य होईल श्रीपति । प्रयत्नें निवारितां ॥ १९ ॥  
धर्मसंकट महान आलें । तेथें नीतिनें वागले ।  
धनाशें अधर्मीं न गुंतले । तेचि धन्य सत्पुरुष ॥ २० ॥  
उदरभरण लागे करावें । म्हणोनि उद्योगी असावें ।  
परंतु नीतिन्यायें जोडावें । अल्प धन ॥ २१ ॥  
परमार्थ निका साधीत जावा । अल्पकाळ धंदा करावा ।  
देह सेवेसी न विकावा । धनिका वा नृपासी ॥ २२ ॥  
प्रारब्धें घडेल ताबेदारी । तेथें राखा खबरदारी ।  
भाकरी दे त्याची चाकरी । कुचराईविण करावी ॥ २३ ॥  
जो असे निरपेक्षा । त्यानें वरावी दीक्षा ।  
उदरापुरती भिक्षा । मागोन साधनीं रमावें ॥ २४ ॥  
आतां सांगूं स्त्रीधर्म । पति हें दैवत परम ।  
अंतरीं ध्यावा श्रीराम । शुद्ध भाव ठेवोनी ॥ २५ ॥  
जरी पति रागीट तामसी । तरी सोसावें बोलासी ।  
अथवा ग्रासला रोगें बहुवसीं । तरी वीट मानूं नये ॥ २६ ॥  
पतिसेवा मुख्य साधन । पतिवचन मुख्य प्रमाण।  
सदा संतोषी ठेवी मन । सत्कार्यें पतीचें ॥ २७ ॥  
पतीवांचोन इतर पुरुष । बाप बंधू मानून त्यांस ।  
अखंड नामस्मरणास । जपत रहावें ॥ २८ ॥  
काम क्रोध लोभ वर्जून । सदा करा सत्य भाषण ।  
पतीनें आज्ञा दिल्याविण । इतर साधन न करावें ॥ २९ ॥  
पति असतां दरिद्री । संतोषी असावें घरीं ।  
परवैभव परोपरी । वांछोनि न हिणवावें ॥ ३० ॥  
पतिआज्ञा पंचप्राण । अंतरीं अखंड नामस्मरण ।  
ऐशिया माउलीचे चरण । वंदूं आम्ही ॥ ३१ ॥  
आमुची कथा कायसी । देव साधु वंदिती तिसी ।  
उद्धरील उभय कुळांसी । पतिव्रता माउली ॥ ३२ ॥  
स्त्रियेसी पति दैवत । पतीचा स्त्री डावा हात ।  
त्यानेंही निववावें तिचें चित्त । सद्धर्मा अनुलक्षोनी ॥ ३३ ॥  
असो पतिव्रत्या जपावे । धैर्य बळें सांभाळावें ।  
संकटकाळीं आळवावें । भगवंतासी ॥ ३४ ॥  
ऐसा असे स्त्रीधर्म । सद्गुरुवचनामृत सुगम ।  
सेवितां हरतील श्रम । जे मायामोहें भासले ॥ ३५ ॥  
वडिलांची आज्ञा पाळिती । तीच जाणा गुरुभक्ती ।  
येणेंचि घडे सायुज्यमुक्ति । देव साधु मानिती ॥ ३६ ॥  
अखंड नामस्मरण करणें । सोपें आहे कठिणपणें ।  
चित्त मलिन असे याकारणें । फुकाचें नाम घेववेना ॥ ३७ ॥  
अनंतजन्मींची विषयासक्ति । तेणें चित्तें मलिन होती ।  
याकारणें बळें वृत्ति । नामस्मरणीं लावावी ॥ ३८ ॥  
 
अभ्यासें जरी नाम वाढे । तरीच चित्तशुद्धि घडे ।  
संकल्प विकल्प भगदाडें । भरोन येती ॥ ३९ ॥  
मन नामीं लागेल गोडी । वासना जाय देशोधडी ।  
सद्गुरु होवोनि नावाडी । रामभेटी करील ॥ ४० ॥  
नामीं जितुकी गोडी कमी । तितुके दोष अंतर्यामीं ।  
चित्त मलिन विषयधामीं । गेलें ऐसें जाणावें ॥ ४१ ॥  
मीठ कडू लागेल जरी । तरी ज्वर असे शरीरीं ।  
जाणोन उपाय सत्वरीं । करावा लागे ॥ ४२ ॥  
अमृताहून नाम गोड । साधु बहु करिती कोड ।  
परि आपणा वाटे अवघड । आपुल्या पूर्वपापे जाणावें ॥ ४३ ॥  
यास्तव धरोनि नेट । बाळेंचि करी नामपाठ ।  
तरीच भवसागर हा अफाट । तरशील तूं ॥ ४४ ॥  
या कलियुगाचे राहाटीं । नामावांचोन होसी कष्टी ।  
नामें प्राप्त पुढील गोष्टी । अन्य साधनें होती ना ॥ ४५ ॥  
साधनीं उपजेल गोडी । गुरुकृपा होईल गाढी ।  
विमल ज्ञानाची परवडी । बाणेल सत्य अंतरी ॥ ४६ ॥  
शांति भक्ति आणि मुक्ति । प्रपंचीं आणिक परमार्थीं ।  
विघ्नें बाधा न करिती । समाधान अक्षय ॥ ४७ ॥  
नामें विमल ज्ञानोदय । स्वयंसिद्ध अप्रमेय ।  
जें पाठका दुर्लभ होय । नामधारका सुखसाध्य ॥ ४८ ॥  
प्रपंच परमार्थ संकटीं । नाम पावे उठाउठी ।  
नामावांचोन जगजेठी । धांव न घेईं ॥ ४९ ॥  
अहो जे शिष्य सज्जन । करिती गुरुभक्ति नामस्मरण ।  
तयां मी सदा सन्निधान । पाठींपोटीं रक्षितसें ॥ ५० ॥  
विषयी पोसी जैसा काम । अथवा कृपण रक्षी जैसा दाम ।  
तैसा जोडावा श्रीराम । साधकानें ॥ ५१ ॥  
त्रैलोक्य व्यापून उरला । दशांगुल परमात्मा भरला ।  
तोचि पूजीत जा भला । हृदयमंदिरीं ॥ ५२ ॥  
आधीं चित्त शुद्ध व्हावें । तरीच तें ध्यान ठसावें ।  
चित्तशुद्धीकारणें घ्यावें । रामनाम अखंड ॥ ५३ ॥  
अखंड व्हावया नामस्मरण । मुख्य उपाय सतत प्रयत्न ।  
नित्यप्रयत्नें उल्लंघोन । महागिरि मुंगी जाय ॥ ५४ ॥  
रुक्मांगदादि स्वयें तरले । तीहीं इतरांही तारिलें ।  
खरें पाहतां तेही जन्मले । आम्हांसारिखे मानवचि ॥ ५५ ॥  
याकारणें देहबुद्धि । सोडोनि जोडा ज्ञाननिधि ।  
देहबुद्धीची उपाधि । मनाहोनि कठिण आहे ॥ ५६ ॥  
सर्प मरोन गेला । परि सांगडा असे पडला ।  
तया हात लागतां दचकला । प्राणी जैसा ॥ ५७ ॥  
प्रेत म्हणजे केवळ माती । परि त्यातेंचि लोक भिती ।  
देहवासना धरोनि राहती । कित्येक जीव स्मशानीं ॥ ५८ ॥  
देहीं नव्हे जो आसक्त । तोचि एक जीवन्मुक्त ।  
देहबंधनें हीं सतत । तोडीत जावीं ॥ ५९ ॥  
मरणाची तयारी असावी । वासना कोठें न गुंतावी ।  
गुंततां यातना भोगावी । लागेल पुढें ॥ ६० ॥  
मुलांनी खेळ मांडिला । बाहुलाबाहुली संसार केला ।  
मातेनें संबोधितांचि टाकिला । जेथील तेथें ॥ ६१ ॥  
क्षणामाजीं विसरोनि जाई । तैसें उदास सर्वां ठायीं ।  
चित्त एक रामापायीं । रामीं ज्योत मिळवावी ॥ ६२ ॥  
हें परिसतां सुलभ वाटे । आचरूं जातां हृदय फांटे ।  
दक्ष तोचि काढी नेटें । मोहळासारिखें ॥ ६३ ॥  
निद्रा आळस चित्त मलिन । अश्रद्धा थोरवी विषयध्यान ।  
टाकोन हे पापलक्षण । देहबंधन तोडावें ॥ ६४ ॥  
मरोन जातां आपुली गोष्टी । कांही रहावी मागें सृष्टी ।  
ऐसे वर्तन जीवनराहाटी । माजीं कांहीं असावें ॥ ६५ ॥  
जगाचें हित करूं इच्छिती । सामर्थ्य पाहिजे तयांप्रति ।  
म्हणोनि आधीं भगवप्रीति । संपादिली पाहिजे ॥ ६६ ॥  
शब्दज्ञान बडबडे । प्रसंग येतां दरडीं दडे ।  
तोहि संतां नावडे । शब्दज्ञानी आळशी ॥ ६७ ॥  
धरितां कांहीं साधन नीति । सद्गुरु तया तारिती ।  
सद्गुरु तारतील म्हणती । आळशी वा वितंडवादी ॥ ६८ ॥  
बुडतिया नरासी । दोरी देती धरावयासी ।  
न धरी अविवेकी आळशी । तरी दोष कोणाचा ॥ ६९ ॥  
येथें दुज्या बोल नाहीं । आपुलीचि करणी सर्व ही ।  
यास्तव अभ्यास प्रत्यहीं । केलाचि करावा ॥ ७० ॥  
असो ऐसी गुरुमाउली । बोधपान्हा पान्हवली ।  
सुवत्सें सेवितां धालीं । कीतीयेक ॥ ७१ ॥  
सकलांअध्यायीं मेरुमणि । हा सप्तमाध्याय गुरुवाणी ।  
ठेवितां सदा स्मरणीं । भवजाचणी लया जाईल ॥ ७२ ॥  
सद्गुरुवचनें हीं सुरस । परि पाद-अर्थपूर्ततेचे दोष ।  
घडलिया श्रोतेजेनीं या दीनास । क्षमा करावी ॥ ७३ ॥  
पुढील अध्यायीं निरूपण । गुरुकृपें समाधान ।  
पावले इह पर कोण । कांहीं विशद होईल ॥ ७४ ॥  
कृपामृताचा सागर । सच्छिष्य जलचरें अपार ।  
समस्त गणती करणार । ऐसा कवण ॥ ७५ ॥  
इति श्रीसद्गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।  
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ७६ ॥  
॥ इति श्रीसद्गुगुलीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः  पंचमः समासः ॥  
॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥ 
 
  
GO TOP 
  
 |