श्रीमत् शंकराचार्यकृत् सौन्दर्यलहरीस्तोत्रम्

[ विवेचन - महामहोपाध्याय पं. पांडुरंगशास्त्री गणेशशास्त्री गोस्वामी - सुबोधस्तोत्रसंग्रह]

संस्कृत भाषेतील स्तोत्रवाङ्‍ग्‍मयात सौंदर्यलहरी या स्तोत्राचे स्थान फारच उच्च कोटीचे आहे. हें स्तोत्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आत्मा आहे. श्रीशक्तिदेवीच्या उपासनाक्षेत्रांत कांहीं घडले नाहीं तरी निदान सौंदर्यलहरी या स्तोत्राचा पाठ तरी अवश्य घडावा. या स्तोत्राच्या पाठानेंही श्रीविद्येची उपासना घडते असे या स्तोत्राचें माहात्म्य आहे. प्रायः सात्विक, सुविद्य आणि सुस्थितीतील लोकच या उपासनेच्या क्षेत्रांत पदार्पण करीत असतात. अथवा भाग्याने जे कोणी श्रीविद्येची उपासना करतात, त्यांना ते सात्विक, सुविद्य आणि सुस्थितीतील म्हटलें जाईल अशीच अवस्था श्रीदेवी भगवतीच्या कृपेने प्राप्त होत असते असें दृष्टीस पडते. असा हा श्रीविद्येच्या उपासनेचा महिमा आहे. या सर्व फलापेक्षांही तात्विकदृष्ट्या शुद्ध समाधानाचा लाभ होणें हे श्रीविद्येच्या उपासनेचें असाधारण फल आहे. तांत्रिकदृष्ट्या श्रीविद्येची उपासना घडणे हें अत्यंत दुरापास्त आहे. श्रीविद्येच्या उपासनेत श्रीचक्रपूजेला अथवा श्रीयंत्राच्या पूजेला अग्रस्थान आहे. या श्रीयंत्राची माहिती श्रीसौंदर्यलहरीस्तोत्राच्या अकराव्या श्लोकांत दिलेली आहे. श्रीचक्राच्या पूजेचे फल अत्यंत श्रेष्ठ असेल यांत नवल काय, केवळ भक्तियुक्त अन्तःकरणानें श्रीयंत्राचे दर्शनही घेतलें तरी सांगोपांग शंभर यज्ञ केल्याचे, सोळा महादानें दिल्याचें आणि साडेतीन कोटि तीर्थामध्ये स्नान केल्याचे फळ मिळतें, असा श्रीचक्राच्या दर्शनाचा महिमा शास्त्रांत वर्णिलेला आहे.

श्रीविद्येच्या उपासनेच्या दृष्टीने आचार्यांनीं केलेली भवानीभुजंगमस्तोत्र, देवीभुजंगमस्तोत्र, कल्याणवृष्टिस्तोत्र, मंत्रमातुकामानसपूजास्तोत्र ही स्तोत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. मानसपूजेच्या दृष्टीने आचार्यांनी केलेली श्रीत्रिपुरसुंदरी देवीची आणखी एक-दोन स्तोत्रे चांगली आहेत. पण तीं मोठी असल्यामुळें त्यांचा अंतर्भाव इथे करतां येत नाही. तथापि जी स्तोत्रे इथे दिली आहेत तीं श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या उपासनेला अत्यंत उपयुक्त अशींच आहेत. त्यांतही ही सौदर्यलहरी म्हणजे फारच महत्त्वाचे स्तोत्र आहे 'सर्वे पादा हस्तिपदे निमग्नाः' या न्यायाने सर्व स्तोत्रांचा भाव यांत समाविष्ट झालेलाच आहे. भगवद्‌गीतेच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास हे स्तोत्र "सर्वतः सम्प्तुतोदके" अथांग जलाने भरलेल्या महासागरासारखे सर्वांग संपूर्ण आहे: अथवा श्रीविद्येच्या उपासना-साधन-मंदिराचा हे स्तोत्र कळस आहे असें म्हटलें तरी त्यांत अतिशयोक्ति होणार नाहीं. या स्तोत्राने संस्कृत भाषेतील महा-महा विद्वानांची मने आपल्याकडे आकृष्ट करून घेतलेली आहेत. या स्तोत्रावर प्राचीन विद्वानांच्या छत्तीस टीका उपलब्ध आहेत, हीच एक गोष्ट या स्तोत्राचे बड्या-बड्या विद्वान् लोकांना केवढे आकर्षण वाटत आहे, हें लक्षांत घेण्यास पुरेशी आहे. अशा या अधिकारी आणि विद्वान लोकांनी पुरस्कारलेल्या श्रीसौंदर्यलहरीचा महिमा मी काय वर्णन करणार ? आणि तो कोणत्या शब्दानी वर्णन करणार ? असें हें अत्यंत महत्त्वाचे स्तोत्र मराठी भाषेच्या भाविक भक्तांच्या हातीं देतांना मनाला अत्यंत आनंद वाटत आहे. हें स्तोत्र म्हणजे आचार्यांनी श्रीविद्येच्या भाविक भक्तांना दिलेला हा एक अपूर्व आनंदाचा निधीच आहे.

आचार्यांना हें स्तोत्र कोणत्या वयांत व कसें स्फुरले ! याचा इतिहास, मोठा मनोरम आहे. [तो वाचकांनी सुबोधस्तोत्रसंग्रहाच्या पहिल्या भागांत दिलेल्या आचार्यांच्या संक्षिप्त चरित्रांत पान एक्कावनमध्यें "काव्यस्फूर्ति" या सदरांत अवश्य पहावा.] हे स्तोत्र आचार्यानीं केलेले नसावे अशी शंका एक-दोन विज्ञानांनी घेतलेली आहे. पण त्यांचा युक्तिवाद अगदीच पोकळ असल्यामुळें असंख्य विद्वानांनीं तिकडे लक्षच दिलेले नाही. एवढेच नव्हे तर हें स्तोत्र निश्चित आचार्यांनींच केलेले आहे असा आपला निर्वाळा देऊन बहुसंख्य विद्वज्जनांनी या स्तोत्राचा पुरस्कार केलेला आहे. आपणही या निरर्थक असलेल्या शंका-कुशंकांच्या कर्दमापासून आपल्याला अलिप्त ठेवावे हेंच श्रेयस्कर होय.

अशीही एक आख्यायिका आहे कीं, एकदा भगवाच आद्य श्रीशंकराचार्य कैलासावर गेले. तेथें पार्वतीसह विराजमान असलेल्या शंकरांना पाहून त्यांनीं भक्तिभावानें साष्टांग प्रणिपात केला. आशुतोष भगवान् शंकर प्रसन्न झाले. म्हणाले काय पाहिजे आहे ? आचार्यांनी उत्तर दिलें, कृपा करून आपण मला सौंदर्यलहरी द्या. शंकरांनी सौंदर्यलहरीचीं लिहिलेली पाने आचार्यांच्या स्वाधीन केली ! आचार्य तीं पाने घेऊन निघाले तोंच नंदिकेश्वराची दृष्टि त्यांच्यावर गेली. तो नंदी आचार्यांच्या अंगावर झपाड्याने धावला ! त्यानेंआचार्यांच्या हातांतील कांहीं पाने तोंडाने हिसकावून घेतली. राहिलेली पाने, हातांत घेऊन आचार्य मोठ्या लगबगीने धूम ठोकून भूमंडलावर आले. निवांतपणे बसून श्लोकांची जुळवाजुळव करूं लागले. तो काही श्लोक खंडित असल्याचें आढळून आलें. त्यांनीं पुन्हा शंकरांची आराधना केली. शंकरांच्या कृपेने त्रुटित झालेले श्लोक त्यांना स्फुरले आणि संपूर्ण सौंदर्यलहरी हातीं आल्याचा आनंद झाला. तीच ही सौंदर्यलहरी आहे. कांहीं असो, आख्यायिका या निर्णायक नसल्या तरी सौंदर्यलहरी हें स्तोत्र अलौकिक आहे यांत शंकाच नाही. अशा या अलौकिक स्तोत्राचा लाभ आचार्यांकडूनच जनतेला झाला आहे हेही तितकेच निश्चित होय.

कांहीं लोक सौंदर्यलहरीचे दोन भाग मानतात. एक्केचाळीस श्लोकांच्या पहिल्या अंशाला आनंदलहरी असें म्हणतात, तर एकूणसाठ श्लोकांचा दुसरा अंश सौंदर्यलहरी म्हणून मानला जातो. कांहीं लोकांच्या मताने सौंदर्यलहरीचे लोक एकशेएक आहेत, तर कांहीं ग्रंथांत एकशेदोन व एकशेतीनही श्लोक असल्याचें दृष्टीस पडते. पहिला अंश मननाला योग्य अशा त्रिपुरसुंदरीच्या तात्त्विक स्वरूपाचे प्रतिपादन करीत आहे, तर दुसरा अंश ध्यानाला योग्य अशा तिच्या सगुण स्वरूपाचें प्रतिपादन करीत आहे. प्रायः लोकव्यवहारामध्ये या दोन्ही अंशांना मिळून सौंदर्यलहरी हें एकच नांव दिलेले आढळतें.

साहित्यशास्त्राच्या दृष्टीनेंही या स्तोत्राकडे दृष्टि टाकल्यास हें स्तोत्र हें एक अद्वितीय काव्य आहे, असेंच कोणालाही मान्य करावे लागेल, अशीच या स्तोत्राची रचना आहे. तंत्रशास्त्र, मंत्रशाख, योगशास्त्र, आणि तत्त्वज्ञान यांतील गूढ रहस्ये इतक्या सहज रीतीनें यांत समावलेलीं आहेत कीं, सामान्यपणे स्तोत्र म्हणतांना चटकन् तीं लक्षांतही येत नाहींत. अनेक विद्वानांनी याच्यावर इतक्या टीका लिहिल्या त्यांतील रहस्यही हेंच आहे. शाखीय सिद्धान्त अवघड, पण ते मोठ्या गोड शब्दांत येथें मांडलेले आहेत. "कान्तासंमिततयोपदेशयुजे" प्रिय पत्नी आपल्या पतिराजाच्या मनांत ज्याप्रमाणें गोड गोड शब्द बोलून सुविचार भरविते त्याचप्रमाणें काव्याचाही उपयोग होत असतो. हा जो काव्याचा एक हेतु सांगितला जातो तोही या स्तोत्रांत पूर्णपणे सिद्धीस गेलेला आहे.

ज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटल्याप्रमाणे "वाचे बरवे कवित्व । कवित्वींहि रसिकत्व । रसिकत्वीं परतत्त्व । स्पर्श जैसा" असा हा उत्तरोत्तर उत्कर्षाकडे धांव घेणारा उत्कृष्ट काव्याचा जो स्वभाव तोही या स्तोत्रांत पहावयास सापडेल. आचार्यांच्या शब्दांत कवित्व तर आहेच, पण त्या कवित्वांतही रसिकत्व म्हणजे रसिक जनांच्या चित्ताला आकृष्ट करणारे शृंगार, करुणा, अद्‌भुत आणि शांत इत्यादि विविध रसही ठिकठिकाणी दृष्टीस पडतात. शांतरस हा तर आचार्यांच्या स्तोत्रांतला जणूं कांहीं आत्माच आहे ! शरीरांत जसा आत्मा नांदत असावा त्याप्रमाणें आचार्यांच्या स्तोत्रांत शांतरस हा आपल्या अद्वितीय वैभवाने विराजत आहे.आचार्यांच्या स्तोत्रवाङ्‌मयांत परतत्त्वाला - शिवाद्वैत, शाक्ताद्वैत अथवा ब्रह्माद्वैत कांहीं म्हणा सर्वश्रेष्ठ अद्वैततत्त्वाला सहजच स्पर्श करतां येतो म्हणून आचार्यांच्या या स्तोत्ररूपी काव्याने उत्कर्षाच्या परंपरेची चरम सीमा गाठलेली आहे. या विधानाचे पूर्ण सत्यत्व आपल्याला सौंदर्यलहरी या स्तोत्रांत पहावयास सापडेल. या स्तोत्रांत ओज आहे, प्रसाद आहे, माधुर्य आहे, विविध अलंकार आहेत. इष्ट देवतेची स्तुति करण्याच्या दृष्टीने योजिले शिखरिणीवृत्तही अत्यंत बहारीचे आहे.

आचार्यांचे सौंदर्यलहरी हें स्तोत्र तंत्रशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यांतील प्रत्येक श्कोक मंत्रस्वरूप आहे. प्रत्येक श्लोकांत कांहीं बीजभूत मंत्र अंतर्भूत असतातच. प्रत्येक श्लोकाला पृथक पृथक यंत्रही आहे. त्याची पूजा-अनुष्ठानपद्धति आहे. त्या सर्वांची फलेही पण पृथक पृथक निर्दिष्ट केलेली आहेत. श्रीयंत्र हें तर या स्तोत्रांतील मुख्य यंत्र आहे. श्रीविद्या ही या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीचक्राच्या निरूपणाच्या मिषाने आपल्या देहालाच श्रीचक्र समजून देहातील षदचक्राचें या स्तोत्रांत विषयसंदर्भानें अत्यंत उत्तम विवेचन केले असून उपासकाची कुंडलिनी कशी जागृत होते व तो कुंडलिनीशक्तीच्या जागृतीने अन्तर्मुख होऊन शिवशक्तिस्वरूपाशी कसा समरस होतो, हाही विषय मोठ्या बहारीने प्रतिपादन केलेला आहे. अष्टांगयोगाच्या अनुष्ठानानें योगी ज्या निर्बीज समाधि-अवस्थेला पोहोंचतो ती अवस्था या स्तोत्राच्या पाठाने, मननानें व निदिध्यासाने उपासकाला प्राप्त होईल अशीच या स्तोत्राची रचना आचार्यांनी मोठ्या कुशलले केलेली आहे. रचना म्हणण्यापेक्षा कांहीं विचारवंत लोक या स्तोत्रालाआचार्यांची स्फूर्तिच मानतात. अशा या स्तोत्राचा लाभ होणे हें एक आपलें मोठे भाग्यच आहे यांत संशय नाहीं. जगज्जननी श्रीललितामहात्रिपुरसुंदरी आम्हांला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देऊन कृतार्थ करो हीच तिच्या चरणी आमची अनन्यभावाने प्रार्थना आहे.

अनुष्ठान पद्धतीने या स्तोत्राचा पाठ करावयाचा झाल्यास आचमन आणि प्राणायाम करून देशकाल संकीर्तन करावे. गोत्रोच्चारपूर्वक स्वतःच्या नांवाचा उच्चार करून संकल्प करावा. अस्य श्रीसौन्दर्यलहरी-स्तोत्रमन्त्रस्य गोविन्द ऋषिः अनुष्टुप् छन्दः । श्रीमहात्रिपुरसुन्दरीदेवता मम अभीष्टसिध्यर्थे जपे विनियोगः । ॐ ह्रां ॐ ह्रीं याप्रमाणे सहा बीजाक्षरांनी करन्यास आणि हृदयादि न्यास करावेत. ॐ भूर्भुवः सुवरोमिति दिग्बन्धः असें म्हणून दिग्बंध करावा. श्रीगोविन्दर्षये नमः शिरसि । अनुष्टुपच्छन्दसे नमो मुखे । श्रीललितामहात्रिपुरसुन्दरीदेवतायै नमः हृदये । अभीष्टसिद्ध्यर्थे जपे विनियोगाय नमः सर्वाड्रेगषु । अथ ध्यानम् ।

लौहित्यनिर्जित-जपा-कुसुमानुरागां
पाशाङ्‍कुशौ धनुरिषूनपि धारयन्तीम् ।
ताम्रेक्षणामरुण-माल्य-विशेषभूषां
ताम्बूल-पूरित-मुखीं त्रिपुरां नमामि ॥

श्रीललितामहात्रिपुरसुंदरीदेवतायै नमः लं पृथिव्यात्मकं गंधं परिकल्पयामि । याप्रमाणे पंचमानसोपचार पूजा करून मंदस्वराने स्तोत्राचा पाठ करावा. या स्तोत्राचे ऋषि आणि छंद यांविषयी मतभेद दृष्टीस पडतात. कांहीं ग्रंथांत गोविंद ऋषि आणि अनुष्टुपछंद असा उल्लेख आहे, तर कांहीं ग्रंथांत सदाशिव ऋषि आणि जगतीछंद असा उल्लेख आहे. कोठे कोठे ईशानभैरव ऋषि आणि गायत्र्यनुष्टुप् असा दोन छंदांचा जोडीने उल्लेख आहे. या भेदाचें मूळ संप्रदाय भेदांत असावेसें वाटतें. तांत्रिक संप्रदायांत एखाद्या स्तोत्रामध्ये जो मंत्र अभिप्रेत असेल त्या मंत्राचाच छंद त्या स्तोत्राला लावतात असा सामान्यपणे संकेत आहे. प्रस्तुत सौंदर्य-लहरी स्तोत्रांत कादिविद्या, हादिविद्या अथवा पंचदशी, षोडशी इत्यादि स्वरूपाचे अनेक मंत्र अभिप्रेत आहेत. गुरुपरंपराप्राप्त संप्रदायाला अतुलक्षून छंदांचा उल्लेख होणें हें योग्यच आहे. ऋषींच्या बाबतींतही आचार्यांनी या स्तोत्राचे द्रष्ट्टत्व आपल्या गुरूंकडे गोविदयतींकडे दिले असल्याचें दिसत आहे, तर मतभेदाने ते सदाशिवाकडे अथवा ईशानभैरवाकडे मानले जात आहे. आम्ही मात्र श्रीशृंगेरीपीठ अथवा श्रीकांची कामकोटिपीठ या पीठांना अभिप्रेत असलेला शांकरसंप्रदायानुसारी पाठ स्वीकारलेला आहे. असो, आतां आपण या स्तोत्राच्या अर्थाचे मनन करूं या.]

शिवा शक्त्या युको यदि भवतिशक्तः प्रभवितुं
नचेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि
अहस्त्वामाराध्यां हरि-हर-विरिञ्चादिभिरपि
प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ॥ १ ॥

भगवाच शिव हे जर शक्तीनें युक्त असतील तरच ते सर्व कार्य करण्यास समर्थ होतात. ते शक्तियुक्त नसतील तर त्यांच्या ठिकाणी खरोखर स्पंदन करण्याचेंही सामर्थ्य असूं शकत नाहीं ! म्हणून हे सकलशक्तिस्वरूपिणी माते ! ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी देखील आराधना करण्यास योग्य असलेल्या तुझ्या चरणी प्रणाम करण्यास किंवा तुझी स्तुति करण्यास, ज्याच्या पदरीं पुण्याची सामग्री नाहीं असा कोण बरें समर्थ होईल ? अर्थात पदरीं पुण्याची सामग्री असल्याशिवाय तुझ्या चरणी प्रणाम करण्याची बुद्धि होणार नाहीं आणि तुझी स्तुति करण्याचीही पण बुद्धि होणार नाहीं. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे.

" देवः शिवः यदि शक्त्या युक्तः भवति तदैव प्रभवितुं शक्तः, एवं न चेत् सः स्पन्दितु अपि खलु कुशलः न । अतः हरिहरविरिञ्चादिभिः अपि आराध्या त्वां प्रणन्तुं स्तोतुं वा अकृतपुण्यः कथं प्रभवति ॥ " असा या लोकाचा अन्वय आहे.

आतां आपण या श्लोकाच्या विशेष अर्थाचा विचार करूं. श्रीराजराजेश्वरी श्रीविद्यास्वरूप असलेली ललितामहात्रिपुरसुंदरी ही या स्तोत्राची अधिष्ठाची देवता आहे. ती शुद्धचैतन्यस्वरूप आहे. तिलाच आदिमाया चिच्छक्ति अथवा केवलशक्ति असेही म्हणतात. उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय यारूपानें या विश्वप्रपंचाची जी अविरत घडामोड चाललेली आहे त्याच्या मुळाशीं तीच शक्ति कारणीभूत आहे. ती अनादि आणि अनंत असल्यामुळें तिला सनातन असेंही म्हणतात. अभिव्यक्त होणाऱ्या सर्व कार्यांचा ती शक्ति आश्रय असून तीच सर्व कार्यांच्या रूपाने नटते. याच अभिप्रायानें " सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि । गुणाभये गुणमयि नारायणि नमास्तु ते " असें मार्कण्डेय पुराणांत तिचे वर्णन केले आहे.

यावर कोणी असें विचारील कीं, अहो या विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाला आदिविष्णु अथवा आदिनारायण असें म्हणतात. "विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता" अशा लगी शब्दांनीच त्याचें वर्णन केले आहे. शक्तितत्त्व हें विश्वाच्या उत्पत्तीचे अथवा प्रवृत्तीचे मूळ आहे असें तत्त्ववेत्ते मानीत नाहीत. पण ही आशंका बरोबर नाहीं. विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाचें प्रतिपादन करणारा शब्द पुंल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे हा खरा महत्वाचा मुद्दा नसून त्या तत्त्वाचे स्वरूप काय आहे ? हाच खरा महत्त्वाचा विषय आहे. स्नेही अथवा मित्र या अर्थाने प्रतिपादन करणारा संस्कृतमधला मित्र शब्द नपुंसकलिंगी आहे. जल अथवा पाणी या अर्थाचा संस्कृतमधील "आप" शब्द स्त्रीलिंगी आहे पत्नी अथवा स्त्री या अर्थाचा संस्कृतमधील "दार" शब्द पुंलिंगी आहे. याप्रमाणे शब्दाचे लिंग भिन्न असलें तरी अर्थामध्यें भेद होत नाहीं. याच न्यायानें विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाला आदिनारायण, आदिविष्णु, आदिशिव असे शब्द योजले काय किंवा आदिमाया, आदिशक्ति असे शब्द योजले काय, तत्त्वांत कांहींच फरक पडत नाही.

आदिभगवान्, आदिविष्णु, आदिनारायण अथवा आदिशिव इत्यादि शब्दांनी ओळखले जाणारे, विश्वाच्या मुळाशी असलेलें जें सोपाधिक चित्तत्त्व त्या तत्त्वाचेंही अधिष्ठान असलेलें जें निरुपाधिक चित्तत्त्व तेंच प्रकृतस्थळी आचार्यांना आदिशक्ति, महाशक्ति अथवा केवलशक्ति या शब्दाने विवक्षित आहे. याच शक्तीच्या प्रेरणेने परमात्मा ब्रह्मा, विष्णु आणि शिव या रूपानें नटला अनुक्रमे सर्व जगाची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय ही कार्य करूं लागला ! शक्तीशिवाय प्रेरणा नाहीं हा सिद्धान्त निर्विवाद आहे. याच शक्तीमुळे अव्यक्ताच्या ठिकाणी " तदैक्षत, बहुस्याम्, प्रजायेय " या वाक्यांत सांगितल्याप्रमाणें ईक्षण आणि बहुरूपानें नटण्याच्या संकल्पाचे स्फुरण अभिव्यक्त झाले. याच शक्तीमुळे परमात्मा बहुरूपाने नटूं शकला. याच परमात्म्याला कोणी आदिविष्णू म्हणतात तर कोणी आदिशिव असेही म्हणतात.

आदिविष्णूच्या किंवा आदि शिवाच्या ठिकाणी असलेली ही शक्ति त्यांच्याहून निराळ्या स्वरूपाने पहाता येत नाहीं म्हणूनच शक्ति आणि शक्तिमान् यांच्यामध्ये अभेद मानला जातो. लौकिक व्यवहारामध्ये देखील शक्तीने शक्तिमानाला सोडले कीं तो शक्तिमान् पूर्वींप्रमाणे शक्तिमान या स्वरूपांत शिल्लक उरत नाही. तो शक्तिहीन अर्थात् अचेतन, जड होतो. याच मूलशक्तीला 'चिच्छक्ति' असें म्हटलेले आहे. हीच चिच्छक्ति भिन्नभिन्न पदार्थांमध्ये त्या त्या पदार्थांच्या विशिष्ट शक्तीच्या रूपाने प्रतीतीला येत असते. याच अभिप्रायाने "अम्बास्तव" नांवाच्या स्तोत्रांत या शक्तीचे वर्णन करतांना "हे जगज्जननी अम्बे ! चंद्रामध्ये आल्हाददायक असलेली चंद्रिका हें तुझेच रूप आहे. सूर्यामध्ये प्रखर तेजाच्या रूपानें तूंच विराजमान झालेली आहेस. पुरुषांमध्यें चैतन्यरूपानें तूंच वास्तव्य करतेस. चराचर सर्व भूतांना प्राणदान देण्याचे अथवा बल देण्याचें वायूमध्ये असलेले सामर्थ्यही तूंच आहेस. गोडीच्या रूपाने पाण्यांत आणि उष्णतेच्या रूपाने अग्नींत तूंच रहातेस. फार काय सांगावे, या विश्वातील पदार्थमात्रांत साररूपानें तूंच रहातेस. साररूपानें सर्वत्र तूं आहेस म्हणूनच हें विश्व रमणीय आहे. तूं जर या विश्वांतील पदार्थांना सोडलेस तर हे सारे पदार्थ असार, तुच्छ, त्याज्य असेच होतील. "त्वं चन्द्रिका शशिनि तिग्मरुचौ रुचिस्त्वं, त्वं चेतनाऽसि पुरुषे पवने बलं त्वम् । त्वं स्वादुताऽसि सलिले शिखिनि त्वमूषा, निःसारमेव निखिलं त्वदृते यदि स्यात् । "

याच शक्तीचे आणखी एका ठिकाणीं स्तवन करतांना असें म्हटलें आहे कीं, हें आई जगदंबे ! या त्रैलोक्यामध्ये साऱ्या शब्दप्रपंचाची व विश्वप्रपंचाची जननी तूंच आहेस. तुलाच वाग्वादिनी अथवा सरस्वती असें म्हणतात. तुझ्यापासूनच सृष्टीच्या आरंभी ब्रह्मा, विष्णु, महेश त्याचप्रमाणे इन्द्र, वरुण, कुबेर इत्यादि देव प्रकट होतात आणि सृष्टीच्या अंती खरोखर ते सर्व तुझ्यामध्येच लीन होतात ! खरोखर तुझा रूपमहिमा अचिंत्य आहे. तुझें काय वर्णन करावे ? "सर्वश्रेष्ठ शक्ति" याच एका शब्दानें तुझें वर्णन केलें जातें ! "शब्दानां जननी त्वमत्र भुवने वाग्वादिनीत्युच्यसे, त्वत्तः केशव-वासव-प्रभृतयोऽप्याविर्भवन्ति ध्रुवम् । लीयन्ते खलु यत्र कल्पविरमे ब्रह्मादयस्तेऽप्यमी, सा त्वं काचिदचिन्त्यरूपमहिमा शक्तिः परा गीयसे ॥ "

असो, ही शक्ति ज्याच्यामध्ये वास्तव्य करते ती त्याच्याहून निराळी दिसत नाहीं. म्हणून शक्ति आणि शक्तिमान हे दोघेही एकरूपच मानले जातात. वस्तुतः ते एकरूपच आहेत. शक्ति आणि शक्तिमान यांच्यांत भेद मानणें हें अपरिपक्व विचारांचेंच द्योतक आहे. एकाग्र चित्ताने तत्त्वचिंतन करणाऱ्या योग्यांना - तत्त्ववेत्त्यांना - शक्ति आणि शक्तिमान यांच्यांत भेद दिसत नाहीं. "शक्तिशक्ति मतोर्भेदं वदन्त्यपरमार्थतः । अभेदमनुपश्यन्ति योगिनस्तत्त्वचिन्तकाः" (कूर्मपुराण). तात्पर्य, चिच्छक्ति, महाशक्ति, आदिशक्ति, शक्ति, अम्बा, जगज्जननी, दुर्गा, भवानी, ललिता, महाविद्या, श्रीविद्या, महात्रिपुरसुंदरी, महामाया इत्यादि सर्व नांवे एकाच तत्त्वाची आहेत.

आतां आपण "शिव" या शब्दाच्या अर्थाचा विचार करूं. शिव म्हणजे मंगलमय कल्याणस्वरूप सदाशिवतत्त्व. यालाच परमात्मा आदिविष्णु अथवा आदिशिव असेही म्हणतात. जन्ममरणादिरूप कोगत्याही विकाराचा ज्याला तिळमात्रही स्पर्श नाहीं, आध्यात्मिक, आधिदैविक अथवा आधिभौतिक अशा त्रिविध दुःखांपैकी कोणत्याही दुःखाचा ज्याच्या ठिकाणीं लेशही नाहीं; कोणत्याही प्रकारचे अशुभ, अमंगल ज्याच्या ठिकाणी नाहीं तो सदासर्वकाळ नित्य निरतिशय आनंदरूप असलेला परमात्मा हाच या ठिकाणी शिव शब्दाचा अर्थ आहे. 'वश्' या धातूपासून शिव शब्द निष्पन्न झालेला आहे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या इच्छाशक्तीचा तो आश्रय असल्यामुळें त्याला शिव असें म्हणतात. "वष्टि इति शिवः" अशी शिव शब्दाची व्युत्पत्ति आहे. 'वश्' धातूचा अर्थ प्रकाशणें असा घेतल्यास "वशति" म्हणजे प्रकाशतो तो शिव. अर्थात स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असलेला परमात्मा असा त्याचा अर्थ होतो. तो स्वतः स्वयंप्रकाश आहे, एवढेच नसून तो आपल्या प्रकाशाने साऱ्या विश्वालाही प्रकाशित करतो म्हणूनही त्याला शिव असे म्हटलेले आहे.

यावर कोणी असें विचारील की, अहो ! वश् धातूवरून शिव शब्द कसा निष्पन्न होणार ? पुढचा श मागें व मागचा व पुढे कसा गेला ? याला उत्तर असें कीं, क्वचित् प्रसंगीं असा वर्णविपर्यय होतो, अर्थात् विपरीत वर्णरचना होते. ही गोष्ट व्यवहारसिद्ध आहे. हिंस्र म्हणजे मारणें, ठार करणें या धातूपासून सिंह शब्द बनला. दृश् पश्य पहाणे या धातूपासून पश्यक शब्द बनावयाचा, पण व्यवहारामध्ये पश्यक या शब्दाऐवजी कश्यप हाच शब्द रूढ असल्याचें दिसत आहे. याच न्यायाने वश् धातूपासून वर्णविपर्ययानें शिव शब्द निष्पन्न होऊन व्यवहारांत रूढ झाल्याचे दिसत आहे. मराठी भाषेंतही कोठे कोठे हा गमतीचा प्रकार पहावयास सांपडतो. अरसा या शब्दांतील रस शब्दाचा अर्थ पारा असा आहे. कांचेच्या एका बाजूस पारा लावला म्हणजे ती कांच प्रतिबिंब ग्रहण करण्यास योग्य बनते. वस्तुतः ही कांच रसाने म्हणजे पाऱ्याने युक्त झाल्यामुळे सरस झाली. पण व्यवहारांत तिला आपण आरसा म्हणतो ! त्याचप्रमाणे वधूला वरण्यासाठी आलेल्या वरदेवाला उद्देशून आपण नवरदेव असा शब्दप्रयोग करतो. याप्रमाणें मराठी भाषेत रूढीने वराचा नवरा केला. त्याचप्रमाणे वश् धातूपासून रूढीने शिव शब्द निष्पन्न झाल्याचें दृष्टीस पडते "हिंसि धातोः सिंहशब्दो, वशकान्तौ शिवः सूतः । वर्णव्यत्ययतः सिद्धौ पश्यकः कश्यपो यथा ॥ "

शी धातूचा अर्थ निद्रा घेणे व वा धातूचा अर्थ फेकणे, दूर टाकणे. या दोन धातूंपासून निष्पन्न झालेल्या शिव शब्दाचा अर्थ ज्यानें अज्ञानरूपी निद्रेला फेकून दिलेले आहे तो सदासर्वकाळ जागृत असलेला परमात्मा असाही करतात. वा धातूचा अर्थ वाहणे, जाणें असा केल्यास निद्रा शब्दाने उपलक्षित असलेल्या अज्ञानाला - अविद्येला अथवा मायेला धारण करून जीवभावाला प्राप्त होणारा परमात्मा असाही शिव शब्दाचा अर्थ करतात. तात्पर्य, कोणतीही व्युत्पत्ति घेतली तरी शिव शब्दाचा अर्थ परमात्मा भगवान सदाशिव असाच होतो. हा परमात्माच ब्रह्मा, विष्णु आणि शंकर या रूपाने नटतो व अखिल विश्वप्रपंचाचे उत्पादन, परिपालन आणि नियमन करीत रहातो. शिवस्वरूप असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणीं हे सर्व सामर्थ्य आले कोठून ? यावर आचार्य उत्तर देतात, शिव म्हणजे परमात्मा. हा जेव्हां शक्तीने युक्त होतो तेव्हांच तो हें सर्व कार्य करण्यास समर्थ होतो. शिव शब्दांत असलेला इकार हा शक्तीचा वाचक आहे. शिव शब्दांतून तो इकार काढल्यानंतर राहिलेल्या शब्दाला कांहीं महत्त्वाचा अर्थ उरत नाहीं. शक्तिविरहित झालेला शिव हा शवासारखा जड अचेतन बनतो ! शक्तीमुळेच शिवाला देवपण आले आहे. शक्तीने त्याला सोडले कीं, तो तिळमात्रही हालचाल करूं शकत नाही. "न खलु कुशलः स्पन्दितुमपि" खरोखर स्पंदन करण्याचेंही सामर्थ्य त्याच्या ठिकाणी उरत नाहीं, मग तो विश्वाची घडामोड काय करणार ? तात्पर्य, परमेश्वराच्या ठिकाणी "कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुं" असें जें सामर्थ्य आहे तें सर्व शक्तीमुळेच आहे. हे शक्तिस्वरूपिणी माते महात्रिपुरसुंदरी ! हा सर्व तुझाच प्रभाव आहे.

व्यवहारांमध्यें देखील वधूवर हे लक्ष्मीनारायणस्वरूप अथवा शिवशक्तिस्वरूपच मानले जातात. त्यांत वधू ही लक्ष्मीस्वरूप अथवा शक्तिस्वरूप आहे. या शक्तीचें साहाय्य नसेल तर वर हा नारायणस्वरूप अथवा शिवस्वरूप असूनही प्रपंचक्षमता त्याच्या ठिकाणी असूं शकत नाहीं ही गोष्ट प्रसिद्धच आहे. जें पिंडीं तें ब्रह्मांडीं हा न्याय प्रसिद्धच आहे.

अशा रीतीनें सर्व विश्वाची आधारशक्ति, ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति सर्व कांहीं श्रीमाता ललिता ललितामहात्रिपुरसुंदरीच असल्यामुळें ब्रह्मा विष्णू आणि रुद्र त्याचप्रमाणे इंद्र, वरुण, कुबेर, अग्नि आणि वायु इत्यादि देवही आपआपल्या अंगीकृत कार्याचें अर्थात् तें निर्वेधपणे पार पाडण्याचे सामर्थ्य आपल्याला लाभावे म्हणून तिची आराधना करीत असतात. सकलांचे सकल मनोरथ पूर्ण करण्याला तीच समर्थ असल्यामुळें या विश्वांत आराधना करण्याला तीच योग्य आहे .आचार्य म्हणतात, "आई ! तुझ्या अंगीं असलेले हे स्वतःसिद्ध गुण लक्षांत घेऊन मी तुझी स्तुति करण्यास प्रवृत्त झालो आहें. नसते गुण तुझ्या अंगीं कल्पून मी कांहीं तुझी खोटी स्तुति करीत नाही. आई ! तुझी स्तुति करण्याला अथवा तुझ्या चरणी प्रणाम करण्याला देखील पूर्वी कांहीं सुकृताची शिदोरी संपादन केलेली असेल तरच तो समर्थ होऊं शकेल. पदरीं पूर्वार्जित पुण्याची सामग्री नसेल तर तुझ्या चरणी प्रणाम करणें किंवा तुझी स्तुति करणें हे त्याला घडणार नाहीं."

भक्तांची सर्व दुःखे हरण करतो म्हणून विष्णूला हरि असें म्हणतात. प्रलयकालीं सर्व सृष्टीचा संहार करण्याचें कार्य महादेवाकडे असल्यामुळे महादेवाला हर असें म्हणतात. "विशेषेण रिञ्चति इति विरिञ्चः" विशेषेंकरून भौतिक सृष्टि निर्माण करतो म्हणून ब्रह्मदेवाला 'विरिञ्च' असें म्हणतात. हरिहरादिकांवर जसा तूं अनुग्रह करतेस तसाच माझ्यावरही पण कर. असा आचार्यांचा यांतील गर्भितार्थ आहे. या श्लोकातील शिव, शक्ति इत्यादि सर्व शब्द अभिप्रायगर्भित असल्यामुळें साहित्यशास्त्राच्या दृष्टीने परिकरालंकार होतो ! तसेंच पूर्वार्धांतील विषय उत्तरार्धांतील विषयाला कारणीभूत असल्यामुळें काव्यलिंग या नांवाचाही अलंकार आहेंच. श्लेष आणि समासोक्ति हेही अलंकार दृष्टीस पडतात. मंगलमय ध्येयभूत वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन हा तर सर्वांत मोठा अलंकार आहे. हें संपूर्ण स्तोत्र शिखरिणी वृत्तांत आहे. या वृत्तांत चार चरण असून प्रत्येक चरणांत सतरा अक्षरें असतात. सहाव्या आणि अकराव्या अक्षरावर विराम असतो. क्रमाने य्गण, मगण, नगण, सगण आणि भगण अशी गणांची योजना असून त्यापुढे एक लघु अक्षर आणि एक गुरु अक्षर असतें. "रसै रुद्रैश्छिन्ना यमनसभलागः शिखरिणी"

या स्तोत्रांतील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप असल्यामुळें त्याचें सबीज यंत्र, त्याची पूजा-अनुष्ठान पद्धति व त्याचें फल इत्यादि सर्व प्रकार आंग्ल, केरळ, द्रविड, तामिळ, आंध्र आणि संस्कृत अशा अनेक भाषांतून प्रसिद्ध आहेत. आम्ही मराठीच्या जिज्ञासू वाचकांना त्याचा संक्षिप्त परिचय येथे देत आहों. यद्यपि कर्म हें निष्काम बुद्धीने अर्थात परमेश्वरार्पणबुद्धीनेच अतुष्ठिलें जाणें श्रेयस्कर असतें. तथापि, एखाद्या काम्य फलाची कामना अपरिहार्य असेल आणि त्यांत कोणाचा द्वेष, मत्सर अथवा शोक, दुःख अभिप्रेत नसेल तर तें काम्य कर्मही करावयास हरकत नाहीं. हें यंत्र तांदळाचे पीठ कालवून स्थंडिलावर काढावे. त्याची पूर्वेकडे तोंड करून शास्त्रोक्त पूजा करावी. गूळ, नारळ आणि केळांचे मिश्रण करून नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा लाबून बारा दिवस रोज एक हजार वेळ या श्लोकाचा जप करावा. सकल कार्यसिद्धि हें याचे फळ आहे. सोन्याच्या पत्र्यावर यंत्र काढून याच पद्धतीने तें सिद्ध करावें व कंठांत धारण करावें.

तनीयांसं पांसुं तव चरणपङ्‌केरूहभवं
विरिञ्चिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम्
वहत्येनं शौरि कथमपि सहस्रेण शिरसां
हरः संक्षुद्यैनं भजति भसितोद्धूलनविधिम् ॥ २ ॥

"हे भगवति ! विरिञ्चिः तव चरणपङ्‌केरूहभवं तनीयांसं पांसुं सञ्चिन्वन् लोकान् अविकलं विरचयति । शौरिः शिरसां सहस्रेण एनं कथमपि वहति । हरः एनं संक्षुद्य भसितोद्‌धूलनविधिं भजति" असा या लोकाचा अन्वय आहे. मागच्या श्लोकामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र त्याचप्रमाणें इंद्र, अग्नि आणि वायु इत्यादि इतरही देव थीललितामहात्रिपुरसुंदरीची आराधना करतात असा उल्लेख केला आहे. तिच्या कृपेनेच ते या विश्वरूपी संस्थेंतील आपआपलें अंगीकृत कार्य सुव्यस्थित रीतीनें पार पाडण्यास समर्थ होतात असा हा चिच्छक्तिस्वरूप असलेल्या जगन्मातेचा महिमा आहे असेही सांगितले. हाच विषय या दुसऱ्या श्लोकांत अधिक स्पष्ट करून सांगत आहेत.

हे जगन्माते महात्रिपुरसुंदरी ! ब्रह्मदेव, विष्णु आणि शंकर हे या सृष्टीच्या रचनेचे, संरक्षणाचे आणि संहाराचे अधिकारी आहेत. अधिकारपरत्वे आपआपलें कार्य ते तुझ्याच चरणकमलाच्या प्रभावानें पार पाडीत असतात. तुझ्या चरणकमलाचा महिमा मी काय वर्णन करूं ? त्याचें साकल्याने वर्णन करणें अशक्य आहे. आई ! ब्रह्मदेवाचे हे अवाढव्य सृष्टिरचनेचें कार्य चाललेले आहे, पण त्याचें भांडवल काय आहे ? असा जर कोणी प्रश्न केला तर तुझ्या चरणकमलांतील परागाचा एक लहानसा रजःकण हेंच त्याचें उत्तर आहे. कमळाप्रमाणें सुकोमल आणि आरक्तवर्ण असलेल्या तुझ्या चरणाचा एक लहानसा रजःकण गोळा करून अथवा हातीं घेऊन ब्रह्मदेव संपूर्ण भूतभौतिक विश्वप्रपंचाची रचना करीत असतो. भूलोक, भुवर्लोक स्वर्लोक इत्यादि वरची सात भुवने आणि अतल, वितल, सुतल इत्यादि खालची सात भुवने याप्रमाणे चतुर्दश भुदनात्मक प्रचंड ब्रह्मांडाच्या रचनेचें ब्रह्मदेवाचे साधन काय, तर तुझ्या चरणकमलांतील एक रजःकण !

प्रलयकाळीं सर्व कार्यप्रपंचाचा नाश होऊन जिकडे तिकडे पृथ्वी, जल तेज आणि वायु या महाभूतांचे परमाणूच परमाणु भरलेले असतात. ते परमाणू स्वभावतः जड असल्यामुळें त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हालचाल असूं शकत नाहीं. पुढें जन्माला येणाऱ्या प्राणिमात्रांच्या अदृष्टकर्मामुळे आदिशक्तिस्वरूप जगन्मातेकडून ब्रह्मदेवाला सृष्टि निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेनंतर ब्रह्मदेव संकीर्ण असलेल्या परमाणूंचे पृथक्करण करतात. पार्थिव परमाणू, जलीय परमाणु, तैजस परमाणु आणि वायवीय परमाणु असें परमाणूंचे संकलन झाल्यानंतर दोन-दोन पार्थिव परमाणूंना एकत्र करून त्यांच्या संयोगाने द्‍व्यणुके निर्माण केली जातात. अशा तीन द्‍व्यणुकांचे एकत्रीकरण करून एक त्रसरेणु निर्माण केला जातो. हा त्रसरेणु इतका सूक्ष्म असतो की, कडोशाच्या रूपानें झरोक्यांतून घरांत येणाऱ्या सूर्याच्या किरणांतच आपण त्याला अंतराळांत परिभ्रमण करीत असलेल्या स्वरूपांत पाहूं शकतो. असे अनेक त्रसरेणु एकत्र झाले म्हणजे व्यवहारक्षम, कार्यरूप पृथ्वी उत्पन्न होते. याच पद्धतीने जल, तेज आणि वायु यांचीही पण उत्पत्ति होत असते. ही सर्व रचना आकाशाच्या उदरांत होत असल्यामुळे आकाशही निमित्तरूपानें त्यांत घटक झालेलें असतेंच. अशा या पंचमहाभूतांपासूनच ब्रह्मदेव, वृक्ष, लता, वेली, वनस्पति, डोंगर, नद, नद्या, सागर, अग्नि, विद्युत, ग्रह, नक्षत्र, सूर्य, चंद्र आणि विविध जातींचे वायु निर्माण करतात. याच पंचमहाभूतांपासून स्त्री, पुरुष, पशु, पक्षी, कीट, पतंग इत्यादि रूपांनीं अनंत शरीरांचीही रचना ब्रह्मदेवाकडून होत असते. यालाच आपण सृष्टि असें म्हणतो.

मनानेंही जिचे आकलन करतां येत नाहीं अशा या विशाल सृष्टिरचनेचें बह्मदेवाचें भांडवल म्हणजे आदिशक्तिस्वरूप असलेल्या जगज्जननीच्या चरणकमलांतील एक सूक्ष्म रजःकण होय. जिच्या चरणकमलाचा एक सूक्ष्म रजःकण ब्रह्मांडरूपाने नटला तिच्या संपूर्ण चरणकमलाचें स्वरूप केवढे विशाल असेल आणि त्याच्याही पलीकडे तिचे संपूर्ण नखशिखान्त स्वरूप किती विशाल असेल याचे कल्पनेलाही आकलन होत नाही ! तात्पर्य, आचार्य म्हणतात, "आई ! तुझ्या चरणकमलाच्या एका अत्यंत लहान रजःकणापासून ब्रह्मदेव अत्यंत सुस्पष्टपणे अथवा अविरतपणे या संपूर्ण स्थिरचर विश्वाची रचना करीत आहे. असा महिमा तुझ्या चरणकमलांतील एका लहानशा रजःकणाचा आहे. तर मग प्रत्यक्ष तुझा महिमा केवढा असणार ? आणि मी त्याचें वर्णन काय करणार ? " असा हा या श्लोकांतील पूर्वार्धाचा अभिप्राय झाला.

या श्लोकांतील उत्तरार्धाने भगवान विष्णु आणि श्रीशंकर यांच्याही दृष्टीने श्रीललिता महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलाच्या रजःकणाचा महिमा वर्णन करीत आहेत. शौरी म्हणजे भगवाच विष्णु. यदुवंशांत शूर नांवाचा राजा होऊन गेला. त्याच्याच कुलांत जन्माला आलेल्या वसुदेवाच्या पोटीं श्रीकृष्णरूपानें विष्णूने अवतार घेतला म्हणून श्रीकृष्णाप्रमाणे विष्णूला देखील शौरी असे म्हणतात. भगवाच विष्णु यांना हजारों मस्तकें आहेत. "सहस्रशीर्षा पुरुषः" असें वेदांत त्यांचे वर्णन केलेले आहे "नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे" याप्रमाणे पुराणांतही श्रीविष्णूला हजारों मस्तके असल्याचें वर्णिलेलें आहे. भगवान् श्रीविष्णू हें आपल्या हजारों मस्तकांनी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील परागाच्या अत्यंत सूक्ष्म रजःकणाला मोठ्या आदराने धारण करीत आहेत. अर्थात् त्याचें संरक्षण करीत आहेत. सृष्टीचे संरक्षण करणें हें विष्णूच्या अवतारांतील मुख्य कार्य आहे. संपूर्ण सृष्टि ही श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील परागाचा एक लहानसा रजःकण आहे हें आपण वर पाहिलेच आहे. तात्पर्य, भगवान् विष्णु देखील हें कार्य आपल्या शक्तीच्या बाहेरचे आहे, ही जाणीव ठेवून "कथमपि" म्हणजे कसें तरी अत्यंत सावध-पणाने अर्थात् अत्यंत जपून सृष्टिस्वरूप असलेल्या महात्रिरसुंदरीच्या चरणकमलातील रजःकणाचें संगोपन करीत आहेत. केवढा हा श्रीविद्यारूपी आदिशक्तीच्या चरणकमलाचा महिमा आहे !

भगवान् शंकरदेखील प्रलयकाळीं आपल्या सर्वांगाला आदिमाता शक्तिस्वरूप असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच चरणकमलांतील रजःकणाचा भस्म म्हणून लेप लावीत असतात. सुष्टीचा संहार करणें हें महादेवाचे कार्य आहे. म्हणून प्रलयकाळीं महादेव या सृष्टीचे अर्थात् सृष्टिस्वरूप असलेल्या महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील रजःकणाचें चूर्ण करून तें भस्म म्हणून आपल्या सर्वांगाला लावीत असतात. हाच त्यांचा भस्मोद्धूलनविधि किंवा भस्मधारणविधि होय. तात्पर्य, आई जगज्जननी ! प्रत्यक्ष भगवाच शंकर देखील तुझ्या चरणकमलांतील एका भूत-भौतिक प्रपंचरूपी सूक्ष्म रजःकणाला भस्म म्हणून आपल्या सर्वांगाला चर्चितात आणि स्वतःला पवित्र व धन्य मानतात ! असा हा तुझ्या चरणकमलांतील रजःकणाचा महिमा अद्वितीय आहे ! पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें व त्यांच्यापासून उत्पन्न झालेला भौतिक विश्वप्रपंच भस्मस्वरूपच आहे असें वेदानेंही वर्णन केलेले आहे. "अग्निरिति भस्म, वायुरिति भस्म, जलमिति भस्म, स्थलमिति भस्म, व्योमेति भस्म, सर्वं ह वा इदं भस्म, मन एतानि चक्षूंषि भस्मानि" असो. जिच्या चरणकमलांतील रजःकणाचा हा महिमा आहे तर मग प्रत्यक्ष या श्रीमहात्रिपुरसुंदरीचा महिमा किती अगाध असेल याची कल्पना करावी.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या कृतीवरून जगज्जननीच्या अगाध महिम्याचे या श्लोकांत निदर्शन केलेलें असल्यामुळें येथें 'निदर्शना' हा अलंकार मानतात. निदर्शनेच्या जोडीला स्वभावोक्ति हाही अलंकार आहेच.

या ऊर्ध्वमुख त्रिकोणांत ह्रीं हें बीज आहे. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचावन दिवस उत्तरेकडे तोंड करून त्याची विधिपूर्वक पूजा करावी. पायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां या श्लोकाचा जप करून यंत्र सिद्ध करावे व तें दंडांत अथवा कंठांत धारण करावे. याने सर्व लोक वश होतील, प्रकृतीवर ताबा राहील आणि आरोग्य लाभेल. अनुष्ठानाच्या वेळीं सर्वत्र तुपाचा दिवा आणि उत्तम सुवासिक उदबत्ती लावलेली असावी.

आवद्यानामन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी
जडानां चेतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी ।
दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका जन्मजलधौ
निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ॥ ३ ॥

"हे मातः तव चरणकमलपांसुः अविद्यानां अन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी भवति, जडानां चैतन्यस्तबक-मकरन्द-स्त्रुति-झरी भवति, दरिद्राणां चिन्तामणि- गुणनिका भवति, जन्मजलधौ निमग्नानां मुररिपु-वराहस्य दंष्ट्रा भवति, स कथं मां अनुपयुक्तो भविष्यति ?" आचार्य म्हणतात, आई जगल्जननी ! तूं म्हणशील कीं, तूं माझी स्तुति करावयास कसा समर्थ होशील ? तूं अज्ञानी आहेस, जड आहेस, तुझ्या ठिकाणी विचारसंपत्ति नाहीं, तूं दरिद्री आहेस, संसार-सागरांत बुडालेला आहेस. संसारांत गर्क झालेला आहेस, तुला काय माझी स्तुति करतां येणार ? यावर माझें उत्तर असें आहे कीं, आई ! तुझ्या चरणकमलाच्या रजःकणाचे सामर्थ्य फार मोठे आहे. अर्थात तुझेंही पण. मग मी तुझ्या कृपेने नाहीं कां समर्थ होणार ?

तुझ्या चरणकमलाचा राजःकण म्हणजे "अविद्य" अर्थात् अज्ञानी असलेल्या लोकांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी तिमिराचा नाश करणाऱ्या सूर्याची ती उदयस्थानांतील अथवा उदयाचलावरील नगरी आहे. सूर्य उदयाला आला म्हणजे अंधकार जसा मावळतो त्याप्रमाणें आई ! तुझ्या चरणकमलाच्या रजःकणानेंही अज्ञ जनांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी अंधकार मावळतो यांत शंका नाहीं. त्याचप्रमाणें तुझ्या चरणकमलांतील राजःकण म्हणजे जड अर्थात मतिमंद असलेल्या लोकांना चैतन्यरूपी पुष्पगुच्छांतील मकरंदाला अविरत स्रवणारा तो एक झराच आहे. तात्पर्य, जडालाही चैतन्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आई ! तुझ्या चरणकमळाच्या रजःकणांत आहे. तो राजःकण म्हणजे दयनीय दरिद्री लोकांचे सकल मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणिरत्नांचा समूहच आहे. गुणनिका शब्दाचा अर्थ माळा अथवा राशि, समूह असा आहे. एक चिंतामणि जरी हातीं लागला तरी दारिद्र्याचा परिहार होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतात, तर मग चिंतामणि रत्नांची माळ अथवा राशि हातीं आल्यानंतर दारिद्र्याचा परिहार होईल हे काय सांगावयास पाहिजे ? आई ! तुझ्या चरागकमलाच्या कृपेनें माझ्या सर्व विचारदारिद्र्याचा परिहार होईल यांत शंकाच नाही.

आई जगज्जननी ! तुझ्या चरणकमलाचा राजःकण म्हणजे जन्ममरणरूपी संसारसागरांत पार बुडून गेलेल्या लोकांना त्यांचा उद्धार करणारी ती एक आदि विष्णूस्वरूप असलेल्या वराहाची दाढाच आहे ! पूर्वी ही पृथ्वी समुद्रामध्ये रसातळाला गेली असतां आदिविष्णूंनीं वराहाचा अवतार धारण करून विरोध करणाऱ्या हिरण्याक्षाचा वध केला आणि आपल्या दाढेवर तोलून धरून पृथ्वीचा उद्धार केला ही पुरातन ऐतिहासिक कथा प्रसिद्धच आहे. आई ! माझ्यासारख्या संसारसागरांत बुडालेल्या जनांचा उद्धार करण्याकरितां तुझ्या चरणकमलाचा रजःकण म्हणजे आदि-विष्णुस्वरूप असलेल्या वराहाची ती एक दाढाच आहे. तात्पर्य, संसारसागर कितीही गहन असला तरी तुझ्या चरणकमलाच्या कृपेने उद्धार होण्यास कांहींच अवघड नाहीं ! आई ! हा सर्व विचार करूनच मी तुझी स्तुति करण्यास प्रवृत्त झालो आहें. तात्पर्य, तुझ्या कृपेने माझे सकल मनोरथ पूर्ण झालेच पाहिजेत.

या श्लोकांत महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील रजःकणाला नगरी, झरी, चिंतामणि-माला आणि वराहदंष्ट्रा अशी कल्पना करूनआचार्यांनी परंपरित रूपकाची जणुं कांहीं मालाच तयार केली आहे ! प्रत्येक ठिकाणी कल्पनेचे रमणीयत्व, गांभीर्य हें कांहीं अपूर्व आहे. कांहीं लोक या ठिकाणी परिणामालंकारही मानतात.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून त्याची ईशान्य दिशेकडे तोंड करून विधिपूर्वक चोपन दिवस पूजा करावी. उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज दोन हजार वेळां श्लोकाचा जप करून यंत्र सिद्ध करावे. याने सर्व ऐश्वर्याचा व विद्येचा लाभ होतो.

त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः
त्वमेका नैवासि प्रकटितवरभीत्यभिनया ।
भयात्त्रातुं दातुं फलमपि च वाञ्छासमधिकं
शरण्ये लोकानां तव ही चरणावेव निपुणौ ॥ ४ ॥

'हे मातः जगज्जननि ! त्वदन्यः दैवतगणः पाणिभ्यां अभयवरदः अस्ति । एका त्वं प्रकटितवरभीत्यत्यभिनया नैव असि । हे लोकानां शरण्ये ! ही भयात् त्रातुं अपि च वाच्छासमधिकं फलं दातुं तव चरणौ एव निपुणौ स्तः ।" हे आई जगज्जननी ! तूं म्हणशील कीं, इतर पुष्कळ दैवतें भक्तजनांना अभय आणि इष्ट वर देण्याकरितां तत्पर आहेत. हें त्यांनीं धारण केलेल्या अभयमुद्रेवरून आणि वरमुद्रेवरून स्पष्टच दिसत आहे. मग त्यांनाच का नाहीं शरण जात ? यावर माझें उत्तर असें आहे कीं, तुझ्याहून निराळा असलेला देवतांचा समुदाय केवळ हातानेच आपण अभय आणि इष्ट वर देणारे आहोंत असें सुचविणारा आहे. हा केवळ त्यांचा अभिनय म्हणजे नाटकांतल्या सोंगासारखी कृति आहे. तत्त्वतः त्यांच्यामध्यें ते सामर्थ्य नाहीं असें आचार्यांनी "अभिनय" या शब्दाचा प्रयोग करून ध्वन्यर्थानें सूचित केलेले आहे. इतर देवांमध्ये जें कांहीं थोडेंबहुत सामर्थ्य आहे तेही त्यांना श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच कृपेनें प्राप्त झालेले आहे. हें सर्व त्यांच्या इतिहासावरून उघड आहे. "ये ही ब्रह्मादयो देवा भवन्ति वरदायिनः । त्वद्‌रूपां शक्तिमासाद्य ते भवन्ति वरप्रदाः ॥ "

आई ! तूं मात्र एकच एक अशी आहेस कीं, तूं कोणत्याही प्रकारें वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण करण्याचें सोंग केले नाहीस, आणि तसें करण्याचें तुला कांहीं कारणही नाहीं. कारण तूं सर्व लोकांनी शरण जाण्याला योग्य आहेस. अथवा सर्व लोकांचे संरक्षण करण्याला तूं योग्य आहेस. भक्तजनांचें भयापासून संरक्षण करण्याला अथवा त्यांना त्यांच्या इच्छेपेक्षांही अधिक फल देण्याला तुझे चरणच निपुण म्हणजे प्रवीण आहेत. निपुण शब्दाचा कुशल अर्थात समर्थ असाही अर्थ होतो. अशा स्थितींत हे आई ! तुला हातांनी वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण करण्याचें कांहींच कारण नाही. डाव्या हाताची चार बोटें तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठिका हीं एकास एक जुळवून उताणा तळहात किंचित् अधोमुख धारण केला म्हणजे वरमुदा बनते. त्याचप्रमाणें उजवा तळहात ऊर्ध्वमुख धारण केला म्हणजे अभयमुद्रा तयार होते. "अधोमुखो वामहस्तः प्रधृतो वरमुदिका ऊर्ध्वीकृतो दक्षहस्तः प्रधृतोऽभयमुद्रिका" अशीं या दोन मुद्रांची लक्षणें आहेत. तात्पर्य, आई महात्रिपुरसुंदरी ! तुझ्या कृपेनें हरिहरादि देवांचेही मनोरथ सफल होतात मग माझे होतील यात काय नवल आहे ! हें तुझें सामर्थ्य लक्षांत घेऊनच मी तुझ्या चरणी शरण आलो. "हि" या अव्ययाचा प्रयोग कारण आणि निश्चय अशा दोन्ही अर्थाने होतो. या श्लोकांत उपमेय हें उपमानापेक्षांही श्रेष्ठ असल्याचें वर्णन केले असल्यामुळें साहित्यशास्त्रदृष्ट्या व्यतिरेकालंकार सिद्ध होतो.

हे यंत्र चांदीच्या पत्र्यावर लिहून त्याची पूर्वेकडे तोंड करून यथाशास्त्र पूजा करावी. सोळा दिवस अथवा छत्तीस दिवस या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. नैवेद्य केशरी भात. यानें साम्राज्य-सिद्धि, सर्व रोगांचा नाश व दारिद्र्याचा परिहार होतो. कांहीं लोक 'दुं'च्या ऐवजीं 'श्रीं' हें बीज लिहितात.

हरिस्त्वामाराध्य प्रणत-जन-सौभाग्यजननीं
पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत् ।
स्मरोऽपि त्वां नत्वा रति-नयन-लेह्येन वपुषा
मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम् ॥ ५ ॥

"हे मातः हरिः प्रणतजनसौभाग्यजननीं त्वां आराध्य पुरा नारी भूत्वा पुररिपुं अपि क्षोभं अनयत् । स्मरः अपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुषा महतां मुनीनां अपि अन्तः मोहाय प्रभवति हि ।" हे माते जगदंबे ! भगवान श्रीविष्णू यांनी तुझीच आराधना करून सामर्थ्य संपादन केले आहे. कारण तूं चरणीं नम्र झालेल्या भक्तजनांना सर्व प्रकारचे उत्तम भाग्य प्राप्त करून देणारी आहेस. भगवान श्रीविष्णू तुझ्या कृपेनेच परम विरक्त असलेल्या शंकरांच्याही अंतःकरणांत मोह निर्माण करण्यास समर्थ झाले आहेत. पूर्वी देवांना अमृताची प्राप्ति करून देण्यासाठी समुद्राचे मंथन करण्यांत आलें. त्या वेळीं हातांत अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी समुद्रांतून बाहेर आले. पहाता पहाता दैत्यांनी त्यांच्या हातून अमृताचा कलश पळविला. देव हताश झाले. इकडे दैत्यामध्ये अहमहमिका सुरू झाली. हा म्हणतो मी अगोदर घेईन. तूं कोण ? तो म्हणतो मी अगोदर घेईन. तूं कोण ? इतक्यांत भगवान विष्णू मोहिनीचे रूप घेऊन तेथें आले. मोहिनीला पहातांच सर्व दैत्यांना मोह निर्माण झाला. ते तिच्या पाठीमागे लागले ! ते तिच्या अंकित बनले ! त्यांनीं तो अमृतकलश तिच्या स्वाधीन केला ! तिने मोठ्या युक्तिप्रयुक्तीने तें अमृत देवांना वांटून टाकले ! देव संतुष्ट झाले. देवांच्या संतोषानें त्रैलोक्यही संतोषले. पुढें शंकरांना तें रूप पहावेसें वाटलें. पार्वतीसह ते विष्णूकडे गेले. तें रूप दाखविण्याची श्रीविष्णूला त्यांनीं विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन विष्णूने पुन्हा मोहिनीचे रूप घेतलें. भगवान् शंकर स्वतः कामारि, मदनाला भस्म करून टाकणारे. पण तें रूप पाहून त्यांच्याही चित्ताचा क्षोभ झाला ! जवळ असलेल्या पार्वतीला सोडले आणि ते मोहिनीच्या पाठीमागे लागले ! ! हा इतिहास लक्षांत घेऊनच आचार्यांनी "पुरा नारी भूत्वा" इत्यादि वर्णन केलेले आहे. तात्पर्य, विष्णूच्या अंगीं त्रैलोक्यरक्षणाचें व विविध रूपें धारण करण्याचें जें सामर्थ्य आहे तें महात्रिपुरसुंदरीच्याच आराधनेचें फळ आहे.

स्मर म्हणजे कामदेव. केवळ स्मरणानेंही लोकांच्या चित्ताला अस्वस्थ करून टाकतो म्हणून त्याला "स्मर" असें म्हणतात. याला शंकरांनी जाळून टाकले होतें. पण आदिभवानीच्या जगदंबेच्या कृपेने त्याला जीवदान मिळाले. पुढें त्यानें महात्रिपुरसुंदरीची आराधना केली. त्या आराधनेच्या प्रभावानेंच पुढें तो त्रैलोक्यविजयी बनला. रति कामदेवाची स्त्री, ती अतिशय सुंदर, पण तिनेंही आपल्या सौंदर्याचा अभिमान बाजूला ठेवून अहोरात्र आपल्या डोळ्यांची ओंजळ करावी व मदनाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा. इतकें सुंदर रूप महात्रिपुरसुंदरीच्याच कृपेने कामदेवाला मिळाले. मोठ्या मोठ्या ऋषिजनांच्याही अंतरंगांत मोह निर्माण करण्याला तो समर्थ झाला. आचार्य म्हणतात आई ! हा तुझ्याच कृपेचा प्रभाव आहे.

कोणी म्हणेल विष्णूने आणि कामदेवानें श्रीमहात्रिपुरसुंदरीची आराधना केली याला काय प्रमाण ? यावर उत्तर असें कीं, वामकेश्वर महातंत्रांतच हा इतिहास वर्णिलेला आहे. पहा -

"एतामेव पुराऽऽराध्य विद्यां त्रैलोक्यमोहिनीम् ।
त्रैलोक्यं मोहयामास कामारिं भगवान् हरिः ॥
कामदेवोऽपि देवेशीं देवीं त्रिपुरसुन्दरीम् ।
समाराध्याभवल्लोके सर्व सौभाग्यसुन्दरः ॥"

श्रीविद्येच्या मंत्राचे विविध प्रकार आहेत. त्यांपैकीं एका मंत्राचे ऋषि अर्थात द्रष्टे प्रत्यक्ष श्रीविष्णूच आहेत. त्याचप्रमाणे कामदेव देखील एका मंत्राचे द्रष्टे असल्याबद्दलचा उल्लेख दृष्टीस पडतो. असा हा श्रीविद्यास्वरूप महात्रिपुरसुंदरीचा प्रभाव लक्षांत घेऊनच आचार्य म्हणतात, आई ! मी तुझ्या चरणी शरण आलों आहे. कृपा कर.

हें यंत्र तांब्याच्या पत्र्यावर काढून त्याची विधिपूर्वक वायव्य दिशेला तोंड करून आठ दिवस पूजा करावी. गूळ आणि पायस यांचा नैवेद्य दाखवावा. रोज दोन हजार वेळां या श्लोकाचा जप करावा हें यंत्र सकलजन संमोहन करणारे आहे. पति आणि पत्नी यांच्यांतील वैमनस्य दूर होईल. हें यंत्र गळ्यांत अथवा वेणींत घालावे.

धनुः पोष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्च विशिखाः
वसन्तः सामन्तो मलय-मरुदायोधन-रथः ।
तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपा-
मपाङ्‌गात्ते लब्ध्वा जगदिदमनङ्‌गो विजयते ॥ ६ ॥

"हे हिमगिरिसुते ! अनङ्‌गः ते अपाङ्‌गात् कां अपि कृपां लब्ध्वा इदं सर्वं जगत् एकः विजयते" हे हैमवती गिरिजे माते ! हा अनंग म्हणजे शरीर नसलेला मदन अर्थात् कामदेव तुझ्या कृपापूर्ण कटाक्षांतून अनिर्वचनीय असा कृपेचा लेश संपादन करून त्याच्या जिवावर हें सर्व जग तो एकटाच जिंकतो. असा या श्लोकातील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागच्या श्लोकांत अनंग म्हणजे कामदेव हा श्रीविद्येच्या उपासनेनें समर्थ झाला असें सांगितले. त्याचेंच अधिक स्पष्टीकरण या श्लोकांत करीत आहेत. कामदेव हा स्वतः अनंग म्हणजे शरीररहित आहे. तरी तो सर्व जगाला जिंकीत असतो. बरें त्याची युद्धाची सामग्री तरी काय आहे ? त्याचे धनुष्य पहावें तर तें "पौष्पं" म्हणजे फुलांचें तयार केले असतें. म्हणूनच मदनाला संस्कृत भाषेमध्ये पुष्पधन्वा असें नांव आहे. मौर्वी म्हणजे धनुष्याची दोरी. ती पहावी तर "मधुकरमयी" अर्थात भ्रमरांची माळा. भ्रमरांचा समुह ! तो काय धनुष्याच्या दोरीचे काम करणार ? आणि फुलांचें धनुष्य तरी काय उपयोगाला येणार ? "विशिख" म्हणजे बाण. ते पहावेत तर ते संख्येने पांचच आहेत. हे पांच बाण हातचे निघून गेले कीं, पुढें तो काय युद्ध करणार ? बरें मदनाला साहाय्य करणारा पहावा तर तो वसंत. वर्षांतून दोन महिने त्याचें अस्तित्व ! तो बिचारा किती साहाय्य करणार ? बरें याचा युद्ध करण्याचा रथ तरी कोणता आहे ? असें विचाराल तर सांगतात, "मलयमरुत्" म्हणजे दक्षिणेकडील मलय पर्वतावरचा वारा ! त्याला ना रूप ना आकार ! असा हा कामदेवाच्या युद्धाच्या सामग्रीचा थाट आहे ! तरी देखील तो एकटा या सर्व जगाला जिंकीत असतोच. हा कशाचा प्रभाव आहे ? हे नगाधिराजतनये माते पार्वती ! हा तुझ्या कृपाकटाक्षाचा प्रभाव आहे ! तात्पर्य, आई जगदंबे ! तुझी कृपा मुक्यालाही वाचस्पति बनवते ! पंगुलाही मेरु पर्वताचे उल्लंघन करायला लावते ! राईचा पर्वत बनविते तर पर्वताचाही खंदक करते ! योग्य कारण नसतांनाही कार्याची निष्पति दाखविल्यामुळे या श्लोकांत विभावना अलंकार साधला आहे.

शंकरांनी कामदेवाला जाळून टाकले, पण पार्वतीने आपल्या कृपापूर्ण अमृतमय दृष्टीनें त्याला पुन्हा जन्म दिला ! अक्षि म्हणजे डोळा. पार्वतीच्या अक्षीपासून कामदेवाला पुन्हा जन्म मिळाल्यामुळे तिला कामाक्षी असें नांव पडलें. कांची नगरीची ती अधिष्ठात्री देवता आहे. "कामोऽक्षितो यतो जातस्तस्याः कामेश योषितः । कामाक्षीति ततः ख्यातिं सा गता काञ्चिचकापुरे" कामेश्वरयोषित् याचा अर्थ भगवान् सदाशिव यांची पत्नी जगन्माता महात्रिपुर सुंदरी असा आहे. तात्पर्य, आई जगज्जननी ! तुझा हा अद्‌मुत प्रभाव पाहूनच मी तुझ्या चरणीं शरण आलों आहे. कृपा करून तूं मलाही कृतार्थ कर.

यंत्र क्रमांक ११ प्रमाणेंच याही श्लोकाचें यंत्र केवळ त्रिशूलयुक्त समभुज चतुष्कोण तयार करून मध्यभागीं क्लीं क्लीं क्लीं या बीजांच्या एकाखाली एक अशा दोन ओळी लिहाव्यात. त्या दोन ओळींमध्ये थोडे अंतर ठेवून त्या जागी साध्याचा उल्लेख करावा. सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पूर्वेकडे तोंड करून यथाशास्त्र एकवीस दिवस अनुष्ठान करावे. उंसाचे सोलीव तुकडे करून त्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज पांचशे वेळां श्लोकाचा जप करावा. फल = षांढ्यनिवृत्ति आणि पुत्रप्राप्ति.

क्वणत्काञ्चीदामा करिकलभ-कुम्भस्तननता
परिक्षीणा मध्ये परिणत-शरच्चन्द्र-वदना ।
धनुर्बाणान्पाशं सृणिमपि दधाना करतलैः
पुरस्तादास्तां नः पुरपथितुराहोपुरुषिका ॥ ७ ॥

"पुरमथितु आहोपुरुषिका नः पुरस्तात् आस्ताम्" त्रिपुरारि भगवान् सदाशिव यांनी जिच्याबद्दल अहंकार बाळगावा, जिच्यामुळे स्वतःला धन्य मानावे, जिच्या सामर्थ्यावर विश्वाला सुखी करावे, शिव म्हणजे मंगलमय आणि शंकर म्हणजे सुखी करणारा अशी बहुमानाची ख्याति मिळवावी, ती शंकरांची आहोपुरुषिका म्हणजे मूर्तिमंत अहंकार अथवा उत्साहशक्ति श्रीदेवी महात्रिपुरसुंदरी, "नः" म्हणजे आमच्या "पुरस्तात्" म्हणजे पुढें अर्थात् हृदयमंदिरामध्यें किंवा हृत्कमलामध्ये निरंतर विराजमान असो, असा या श्लोकांतील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील दोन श्लोकांत भगवाच श्रीविष्णू आणि कामदेव यांनी श्रीविद्येची उपासना करूनच महात्रिपुरसुंदरीची कृपा संपादन केली व तिच्या कृपेनेच ते पूर्ण समर्थ बनले असे प्रतिपादन केलें. आपणही तिची उपासना करून कृतार्थ व्हावें या अभिप्रायाने या श्लोकांत श्रीविद्यास्वरूप असलेल्या महाशक्तीचे सगुण स्वरूप आचार्य स्पष्ट करीत आहेत. ध्यानाकरितां सगुण स्वरूपाचीच आवश्यकता असते. इष्टदेवतेच्या सगुण स्वरूपांत चित्ताला स्थिर करून तेथें त्याची एकतानता करणें यालाच ध्यान असें म्हणतात. तें ध्यान सगुण स्वरूपाचेंच होऊं शकते. निर्गुणाचे चिंतन करतां येतें पण ध्यान करतां येत नाहीं. याच अभिप्रायाने "अथ ध्यानं" असें म्हणून आपण जे लोक म्हणत असतो त्या श्लोकांत इष्ट देवतेच्या सगुण स्वरूपाचेंच वर्णन केलेलें असतें असें आपल्या दृष्टीस पडेल.

यावर कोणी असें म्हणेल कीं, अहो ! " ब्रह्मानन्दं परमसुरवदं केवल ज्ञानमूर्तियम्" या सद्‌गुरूच्या ध्यानांत सद्‌गुरूच्या निर्गुण स्वरूपाचेंच वर्णन केलेले आहे. तेव्हां ध्यानाकरितां सगुण स्वरूपच लागतें, हें विधान बरोबर नाहीं. यावर उत्तर असें कीं, "ब्रह्मानन्दं परमसुखदं" या श्लोकांत शेवटीं "सद्‌गुरु तं नमामि" असें जें वाक्य आहे त्या वाक्यांतील सद्‌गुरु हाच शब्द त्यांच्या सगुण स्वरूपाचा द्योतक आहे. ब्रह्मानन्द इत्यादि शब्दांनी त्यांचा स्वभाव वर्णिलेला आहे. सद्‌गुरु हे आकृतीने मानव असले, तरी स्वभावाने ते परब्रह्म स्वरूप असतात. सद्‌गुरूंच्या स्वभावाचे चिंतन व आकृतीचे ध्यान हेंच त्या श्लोकांत विवक्षित आहे. निर्गुणाचेंही ध्यान करतां येतें असा कोणी आग्रहच धरला तर "क्लेशोऽधिकतरस्तेषां " त्यांना अत्यंत क्ल्श पडतात हें श्रीकृष्णाचे वचन त्यांनी लक्षांत घ्यावे.

असो. प्रकृतस्थलीं श्रीविद्यास्वरूप महात्रिपुरसुंदरीचे भक्तजनांना सहज सुलभ रीतीनें ध्यान करतां यावें म्हणून आचार्य तिच्या सगुण स्वरूपाचें वर्णन करीत आहेत. कशी आपली माता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी आहे तें पहा : तिने आपल्या कमरेला रत्नजडित सुवर्णाचा कंबरपट्टा घातलेला आहे. त्या कंबरपट्ट्यांतील साखळ्यांना घुंगरे बसविलेली आहेत. त्या घुंगरांचा कर्णमधुर आवाज होत आहे. जगजननी त्रिपुरांबा श्रीविद्या आपल्यावर अनुग्रह करण्याकरितां चालत येत आहे. आपल्या हृत्कमलांत वास्तव्य करण्याकरितां ती चालत येत आहे. ती चालत आहे म्हणूनच तिच्या कंबरपट्ट्यांतील घुंगरांचा आवाज होत आहे याच अभिप्रायाने "क्वणत्काञ्चीदामा" या पदात क्वणत् या शब्दाचा उपयोग केलेला आहे. जिचा काञ्चीदाम म्हणजे कंबरपट्टा क्वणर् म्हणजे मधुर शब्द करणारा आहे अशी ती माता त्रिपुरसुंदरी. असा पहिल्या विशेषणाचा अर्थ आहे. कंबरपट्टा हें एक उदाहरणमात्र आहे. इतरही सर्व अलंकार यथायोग्य रीतीनें तिने घातलेले आहेत असेंच तिचे ध्यान करावे.

"करि-कलभ-कुम्भ-स्तन-नता" भक्तजनांचें पोषण करण्याकरितां तिने आपल्या स्तनांमध्यें स्तन्य अर्थातू अमृतरूप दुग्ध धारण केलेले असल्यामुळें ती तीस वर्षांच्या हत्तीच्या गंडस्थलाप्रमाणें पुष्ट असलेल्या स्तनभारानें किंचितू नम्र झालेली दिसत आहे. भगवान सदाशिव हे विश्वंभर आहेत तर त्यांची अर्धांगी जगज्जननी श्रीविद्या ही तत्स्वरूपच असल्यामुळें ती विश्वंभरा आहे. विश्वाच्या भरण-पोषणाला अनुरूप असा स्तनभार धारण करणें हें तिच्या अंगीं असलेल्या अनन्यसाधारण वात्सल्याचें द्योतक आहे. अनन्यभावानें आपण तिची आराधना केल्यास भक्तवत्सला जगज्जननी आपली उपेक्षा करणार नाही हें निश्चित समजावे असा भाव या विशेषणांत आहे.

"मध्ये परिक्षीणा" भक्तजनांनीं ध्यान करण्याकरितां तिने धारण केलेला देह हा मध्यभागी म्हणजे कमरेजवळ परिक्षीण म्हणजे कृश झालेला दिसत आहे. कमरेजवळ उदराची दिसणारी कृशता ही विकृति नसून तें देहरूपी उपाधीचे प्राकृतिक सौंदर्य आहे. जगज्जननीचे मुखकमल हें शरदृतूंतील पूर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी आणि आल्हाददायक आहे. तिच्या वरच्या दोन्ही हातांत अंकुश आणि पाश ही दोन आयुधें आहेत. उजव्या हातांत अंकुश असून डाव्या हातांत पाश म्हणजे दोरी आहे. ही दोन्ही आयुधे सुवर्णाची आहेत. खालच्या उजव्या हातांत पुष्पांचे बाण असून डाव्या हातांत उंसाचे धनुष्य तिने धारण केले आहे. कपाळी केशराचा मळवट असून तिने केसांच्या भांगापर्यंत उभा कस्तूरीचा टिळा धारण केलेला आहे. नेत्र प्रफुल्लित आहेत. मुखावर मंद हास्य झळकत आहे. अरुण वर्णाचे वस्त्र परिधान केले असून, अरुण वर्ण असलेल्या फुलांची माळ तिच्या गळ्यांत शोभत आहे. तिची अंगकांतीही जास्वंदीच्या फुलाप्रमाणे देदीप्यमान आहे. असेंच जपाच्या वेळीं तिचे ध्यान करावे. याप्रमाणें आचार्यांनी तिचे दुसरीकडेही वर्णन केलेले आहे. श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही स्वतः निर्गुण, निराकार, निर्विकार, शुद्ध, चिन्मय, आनंदमय असूनही केवळ भक्तजनांच्या कल्याणासाठी तिने हें सगुण साकार रूप धारण केले आहे. साधकाने तिच्या याच स्वरूपाचे चिंतन करावे. ध्यान करावे. या श्लोकांतील "आहोपुरुषिका" या शब्दाचा अर्थ अहंकार, स्वाभिमान असा आहे. गर्व त्याज्य असला तरी स्वत्वाभिमान हा आदरणीयच असतो. ही गोष्ट सर्वमान्य आहे तात्पर्य, अशी ही श्रीदेवी ललितामहात्रिपुरसुंदरी आमच्यापुढे नित्य विराजमान असो.

या श्लोकाचें यंत्र त्रिशूलरहित केवळ सोन्याच्या पत्र्यावर समभुज चतुष्कोण काढून मध्यभागी क्लीं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूर्वेकडे तोंड करून विधियुक्त पूजा करावी. रोज या लोकाच्या एक हजार जप करावा. पायसाचा नैवेद्य दाखवावा. सिद्ध केलेले हें यंत्र शत्रूवर विजय मिळविण्यास अत्यंत उपयुक्त आहे.

सुधासिन्धोर्मध्ये सुरविटपि-वाटी-परिवृते
मणिद्वीपे नीपोपवनवति चिन्तामणिगृहे ।
शिवाकारे मञ्चे परमशिव-पर्यङ्‍क-निलयां
भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीम् ॥ ८ ॥

"हे मातः धन्याः कतिचन चिदानन्दलहरीं त्वां भजन्ति" हे जगज्जननी माते ! धन्य म्हणजे भाग्यवान पुण्यवान असलेले असे फारच थोडे लोक अखंड चिदानन्द-प्रवाहस्वरूप असलेल्या तुझी उपासना करीत असतात. अर्थात चिदानन्द-स्वरूप असलेल्या तुझी उपासना करणारे फारच थोडे भाग्यवंत लोक असतात. असा या श्लोकातील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील श्लोकांत ध्यान करण्याला उपयुक्त असें महात्रिपुरसुंदरीच्या सगुण स्वरूपाचे वर्णन केलें. आतां या श्लोकांत तिच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत आहेत. .सुधासिंधु म्हणजे अमृताचा महासागर, क्षीरसागर असा अर्थ समजावा. या क्षीरसागरांत एक पुष्पराग, पद्यराग, गोमेद, वज्र, वैडूर्य, नील, मौक्तिक, प्रवाळ इत्यादि विविध रत्नांचे सुंदर द्वीप आहे. त्या द्वीपामध्ये जिकडे तिकडे देवांना अत्यंत प्रिय असलेल्या वृक्षांची अर्थात कल्पवृक्ष, संतानवृक्ष, हरिचंदनवृक्ष, मंदारवृक्ष आणि पारिजातवृक्ष या वृक्षांची गर्दी आहे. त्यांची वनेंच्या वनें दृष्टीस पडतात. वाटी म्हणजे उपवनें अथवा बगीचे. त्यांतही आंतल्या बाजूला कदंबवृक्षांचें सुंदर उपवन आहे. त्या कदंबवनांत चिंतामणि रत्‍नांचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरांत परमरमागीय मंगलमय अशा स्वरूपाचे सिंहासन आहे. जणुं कांहीं भगवान् सदाशिव हेच सिंहासन बनलेले आहेत. त्या सिंहासनावर त्यांच्या अंकी अर्थात् वामांकीं श्रीललितामहात्रिपुरसुंदरी विराजमान झालेली आहे. शिवतत्त्वाच्याही पलीकडे असलेलें परमशिवतत्त्व हेंच तिचे पर्यंकाप्रमाणें "निलय" म्हणजे वास्तव्यस्थान आहे. परमशिवतत्त्वामध्येंही ती शक्तिरूपानें अधिष्ठित् झालेली आहे. ती शुद्धचित्स्वरूप आणि आनंदस्वरूप आहे. साधक ध्यान करीत करीत तेथपर्यंत जाऊन पोहोंचला कीं, साधकाच्याही अंतःकरणांत अनिर्वचनीय आनंदाच्या लहरी उसळतात ! चित् म्हणजे शुद्ध आत्मस्वरूपाचें ज्ञान, त्याच्या प्रकाशाने प्राप्त होणारा जो अद्वितीय अनिर्वचनीय आनंद अर्थात नित्य निरतिशय सुख अथवा आत्यंतिक समाधान. त्याचे तरंग साधकाच्या अंतःकरणांत उसळत असतात. त्याच्या आत्यंतिक आनंदाला सारखे भरते येत असतें ! आई ! केवढा तुझ्या स्वरूपसाक्षात्काराचा हा महिमा आहे ! तो फारच थोड्यांच्या वाट्याला येतो. तो ज्यांच्या वाट्याला येतो ते खरोखर धन्य होत. यद्यपि चिदानंद हा निर्विकार असल्यामुळें त्याला उसळी येणे किंवा भरते येणे हे संभवत नाहीं, तथापि या ठिकाणीं त्या आनंदाची परिपूर्ण अवस्थाच या ठिकाणी लहरी, उचंबळणे अथवा भरते येणें या शब्दांनी विवक्षित आहे. या ठिकाणचा हा आनंदलहरी शब्दच या स्तोत्राच्या पूर्वार्धाचा वाचक असल्याचें कांहीं विद्वान् मानतात.

कांहीं लोक या श्लोकाचा अर्थ श्रीचक्राला अनुलक्षूनही लावतात. श्रीचक्रामध्ये नऊ आवरणे असतात. आवरण शब्दाचाही अर्थ मंडल किंवा चक्र असाच करतात. श्रीचक्रामध्यें खालची चार चक्रें शिवाची व वरची पांच चक्रें शक्तीच्यी मानली जातात. शिवचक्रें आणि शक्तिचक्रें यांच्यामध्ये असलेल्या अवकाशाला सुधासिंधु असे म्हटलेले आहे. भूपुर, त्रिवलय, षोडशदल कमल आणि अष्टदल कमल हा परिसर ओलांडून आपण पुढें गेलों कीं, शक्तिचक्रांना आरंभ होतो. या शक्तिचक्रांच्या सभोंवारच परिसर हाच सुधासिंधु होय. या सुधासिंधूमध्यें चौदा त्रिकोणांचें एक चक्र दहा-दहा त्रिकोणांची दोन चक्रें आणि आठ त्रिकोणांचें एक चक्र, या सर्वच चक्रांतील बेचाळीस त्रिकोण ह्या जणुं कांहीं मंदार, पारिजात कल्पवृक्ष इत्यादि देववृक्षांच्या वाटिका म्हणजे बागाच आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या अंशभूत असलेल्या या त्रिकोणांतील देवता कल्पद्रुमाप्रमाणे भक्तजनांचे सकल मनोरथ पूर्ण करीत असतात म्हणून या त्रिकोणांना कल्पद्रुम असे म्हटलेले आहे या बेचाळीस त्रिकोणांनी मध्यवर्ति असलेला त्रिकोण हा सर्व बाजूंनी वेष्टिलेला आहे. या मुख्य त्रिकोणाला चिंतामणि-मंदिर म्हटलेले असून त्याच्या बाहेरच्या बेचाळीस त्रिकोण असलेल्या चक्रांना मणिद्वीप कल्पिलेलें आहे. या त्रिकोणांच्या घटक असलेल्या रेखा हे जणु कांहीं त्या मणिद्वीपांतील कदंबवृक्षच होत. कदंबवृक्ष हे श्रीमहात्रिपुरसुंदरीचे अत्यंत आवडते वृक्ष आहेत. म्हणूनच आचार्यानी तिला कदंबवनवासिनी, कदंबवनचारिणी, कदंबवनमध्यगा अशीं विशेषणे दिलेली आहेत. "कदम्बकाननावासा कदम्बकुसुमप्रिया" असें त्रिशतीमध्यें तिचे वर्णन केलेले आहे. "कदम्बमञ्जरिकॢप्तकर्णापूरमनोहरा" कदंबाच्या मंजरी कर्णभूषण म्हणून तिने आपल्या कानांवर धारण केलेल्या असल्यामुळें ती मोठी मनोहर दिसत आहे असें ललितासहस्रनामांत तिचे वर्णन केलेले आहे. कदंब हा एक कल्पवृक्षांतलाच प्रकार आहे.

श्रीचक्रांतील मध्यवर्ति मुख्य त्रिकोणालाच या श्लोकांत चिंतामणिगृह असें म्हटले असून त्यांतील बिंदु हाच शिवाकार म्हणजे परमरमणीय मंगलमय मंच म्हणजे पर्यंक अर्थात् पलंग अथवा सिंहासन होय. त्या ठिकाणीं विराजत असलेलें प्रकाशस्वरूप परमशिवतत्त्व म्हणजेच भगवाच सदाशिव, त्यांच्या अर्धांगीं विराजमान असलेली विमर्शस्वरूप महाशक्ति श्रीत्रिपुरसुंदरी हिलाच या श्लोकामध्ये चिदानंदंलहरी असें म्हटलेले आहे. आचार्य म्हणतात, आई त्रिपुरसुंदरी ! श्रीचक्रामध्यें तुझ्या या मंगलमय स्वरूपाचे फारच थोडे लोक चिंतन करतात. जे चिंतन करतात ते खरोखर धन्य होत.

आपला देह हाच शिवशक्तीचे अधिष्ठान असल्यामुळें कांहीं लोक सुधासिंधु शब्दाचा अर्थ देह असाच करतात. पाय किंवा मुलाधारचक्र ही शरीराची उत्तम रीतीने धारणा करीत असतात म्हणून त्यांना "सुध" असें म्हणतात. सुध + आसिन्धु = सुधासिन्धु. आसिन्धु म्हणजे मस्तकामध्ये विराजमान असलेल्या सहस्रदल कमलांतील चंद्रमंडल "आसमन्तात् सेधति सिञ्चति नाडीमार्गं इति आसिन्धु" अशी आसिंधु या शब्दाची व्युत्पत्ति आहे. मस्तकस्थानीं विराजत असलेल्या चंद्रमंडलांतूनच अमृताचा स्त्राव होत असतो व त्याच्या योगानें देहांतील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांच्या द्वारां संपूर्ण देहाचें पोषण होत असतें, म्हणून त्या चंद्रमंडलाला आसिंधु म्हणणें योग्यच आहे. तात्पर्य, सुधासिंधु म्हणजे आपला नखशिखांत देह. या देहामध्ये मुलाधारचक्र स्वाधिष्ठानचक्र इत्यादि चक्रस्थाने रत्नाप्रमाणे विलसत असल्यामुळें तीं चक्रेच "मणीद्वीप" या शब्दाचा अर्थ समजावा. मणि म्हणजे रत्न आणि द्वीप म्हणजे देवतांचें विशिष्ट आश्रयस्थान. मुलाधारादि चक्रे ही गणेशादि देवतांची अधिष्ठानें आहेत हे प्रसिद्धच आहे. ही सर्व द्वीपें जीवचैतन्यानें व्यापलेली आहेत. म्हणूनच तीं कार्यप्रवण आहेत. याच अभिप्रायाने त्या मणिद्वीपांना "सुरविटपि वाटीपरिवृते" असें विशेषण दिलेले आहे.

"सुष्ठु राजते प्रकाशते इति सुरः" या व्युत्पत्तीप्रमाणे या देहांत विराज-मान असलेलें आत्मचैतन्यच सुर शब्दाचा अर्थ समजावा. या आत्मचैतन्यानें नरवशिखान्त देहाला व्यापलेले असल्यामुळें त्याला "विटपी" म्हणजे विशालवृक्ष असें म्हटले आहे. या वृक्षानें शरीरांतील चक्रस्थाने वेष्टिलेली आहेत. "वाटी" म्हणजे वेष्टन. या देहांत नीपांचीं उपवनें आहेत. नीप शब्दाचा प्रसिद्ध अर्थ कदंब असा आहे. शरीरदृष्टीनें त्रिपुरसुंदरीच्या वसतिस्थानाची कल्पना करीत असतांना नीप शब्दाचा अर्थ पांच मुख्य प्राण आणि पांच उपप्राण असा करतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान यांना मुख्य प्राण असें म्हणतात तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय या पांच वायूंना उपप्राण असें म्हणतात. हे सर्व वायु शरीराचा निर्वाह करीत असतात. शरीराला वागवितात व जगवितात म्हणून यांना "नीप" म्हटले आहे. " नयन्ति पान्ति च इति नीपाः" अशी नीप शब्दाची व्युत्पत्ति आहे. तात्पर्य, शरीरातील दशविध वायु अथवा इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता हेच या मणिद्वीपांतील कदंबवृक्ष होत. या कदंबसमूहांत असलेलें हृत्पुंडरीक अर्थात अनाहत चक्ररूपी हृदयकमल हेंच आपल्या इष्ट देवतेचें "चिन्तामणिगृह" होय. हृदय हें संकल्प-विकल्पात्मक मनाचें वसतिस्थान व आत्म्याचें अधिष्ठान असल्यामुळे आणि तो देहांतील सर्वश्रेष्ठ अवयव असल्यामुळें त्याला चिंतामणिगृह असें म्हणणें योग्यच आहे. तात्पर्य, अशा या हृत्कमलांत मंगलमय सिंहासनावर सदाशिवाशी अभिन्न रूपाने विराजमान असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीचे जें ध्यान करतात ते खरोखर धन्य होत.

कांहीं विद्वान् लोक सुधासिंधु शब्दाचा अर्थ ऋषिमुनींना अभिप्रेत असलेला संपूर्ण अखंड भारतवर्ष असाच करतात. सुधा म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा खडीचा पांढरा शुप्र चुना. त्या चुन्याप्रमाणेच सदासर्वकाळ हिमालय पर्वत बर्फाने आच्छादित असल्यामुळें शुभ्र दिसत असतो, म्हणून सुधा शब्दाने हिमालय पर्वत घेतात. त्या हिमालयापासून "आसिन्धु" म्हणजे सेतु अथवा कन्याकुमारीपर्यंतचा सर्व भाग अर्थात् मानससरोवर आणि कैलास पर्वत यांच्यासह कन्याकुमारीपर्यंतचा सर्व भाग अखंड भारतांत समाविष्ट होतो. त्याचप्रमाणें भारताची पूर्व आणि पश्चिम मर्यादा ही हिमालयानें दाखविलेलीच आहे. "पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्याः इव मानदण्डः" असें कविकुलगुरू श्रीकालिदासानें त्याचें वर्णन केलेलेच आहे. असा हा अखंड भारत हाच प्रकृतस्थलीं सुधासिंधु शब्दाचा अर्थ आहे. अयोध्या मथुरा, हरिद्वार काशी, कांची त्याचप्रमाणे बदरीनाथ, केदारनाथ इत्यादि क्षेत्रें - त्याचप्रमाणे गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधु, कृष्णा, तुंगभद्रा इत्यादि तीर्थें त्याचप्रमागणें ज्योतिर्लिंगें हीच या भारतरूपी सुधासिंधूतील मणिमयद्वीपें समजावींत. यांत कदंबांची उपवनें तर आहेतच. त्या त्या तीर्थक्षेत्रांतील देवता ह्या कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या असल्यामुळें त्याच या सुधासिंधूतील कल्पवृक्ष होत. अशा या अखंड भारतरूपी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या मंदिरांत चिंतामणीप्रमाणें मनोहर मंदिरे आहेत. अशा या भारतवर्षरूपी सुधासिंधूमध्यें विराजत असलेला कैलास पर्वत हाच "शिवाकार मंच" होय. कैलास पर्वताच्या भोंवताली असलेल्या पायथ्याच्या पर्वतांच्या रांगा या श्रीयंत्रांतील पहिल्या मुख्य त्रिकोणाप्रमाणेच दिसतात. जणुं कांहीं ती शंकरांची शाळुंकाच आहे. प्रत्यक्ष कैलास पर्वत हा त्या शाळुंकेंतील महादेवाच्या पिंडीप्रमाणे दिसतो. अथवा श्रीचक्रांतील मुख्य त्रिकोणांत असलेला मध्यवर्ती बिंदु जसा असावा तसाच तो कैलास पर्वत मानससरोवराच्या जवळ शोभत आहे. त्रैलोक्याचे गुरु भगवान् सदाशिव तेथेंच विराजमान झालेले आहेत. त्यांच्या वामभागीं अंकरूपी पर्यंकावर देवी श्रीमहात्रिपुरसुंदरी विराजत आहे. म्हणूनच तिला "परमशिवपर्यंकनिलया" असें म्हटलेले आहे. तात्पर्य, अखंड भारतरूपी सुधासिंधूमध्ये विलसत असलेल्या कैलासरूपी मंचकावर सदाशिवाच्या वामभागीं तादात्म्याने विराजत असलेल्या श्रीत्रिपुरसुंदरीचे जे कांहीं थोडे लोक ध्यान करतात ते धन्य होत. यद्यपि श्रीत्रिपुरसुंदरीच्या मंदिराचा परिसर असलेला भारत आज अखंड राहिला नाहीं तरी भक्तजनांच्या ध्यानाला यथार्थता यावी म्हणून सर्वसमर्थ असलेली श्रीमहात्रिपुरसुंदरी या भारताला पुन्हा अखंड करील. जगाला उपद्रव देणाऱ्या शुंभ, निशुंभ, चंड, मुंड अथवा महिषासुर इत्यादि दैत्यांचा जसा तिनें नाश केला तसाच ती भारताला खंडित करणाऱ्या दुष्टांचाही नाश करील. "इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति तदा तदावतीर्याहं करिष्याम्यरिसक्षयम्" असें तिनेंच आश्वासन दिले आहे. मात्र वर वर्णन केल्याप्रमाणें तिची उपासना करणाऱ्या भक्तांची बहुसंख्या आणि अनन्यभक्ति यांची आवश्यकता आहे. कांहीं लोक ॐकारांतील अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा हाच शिवाकार मंचक समजून त्यावर विराजत असलेल्या शिवशक्तिस्वरूपाचे ध्यान करतात.

हें यंत्र रक्तचंदनाच्या तुकड्यावर तयार करून रक्तपुष्पांनी त्याची बारा दिवस विधिपूर्वक पूजा करावी. काळ्या मिऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा बाराशे जप करावा. या प्रमाणें यंत्र सिद्ध करून धारण केल्यास कारागारांतून सुटका होते व सर्व कार्यांमध्यें विजय मिळतो.

महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि ।
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे ॥ ९ ॥

"हे मातः त्वं मूलाधारे महीं, मणिपूरे कं, स्वाधिष्ठाने स्थित हुतवहं अपि, हदि मरुतं, उपरि आकाशं, भ्रूमध्ये मनः अपि (एवं) सकलं अपि कुलपथं भित्त्वा सहस्रारे पद्मे रहसि पत्या सह विहरसे ।" ( एतादृशीं त्वां ये ध्यायन्ति ते धन्याः) आई त्रिपुरसुंदरी ! मूलाधारचक्रांत पृथ्वीतत्त्वाला, मणिपूरचक्रांत जलतत्त्वाला, त्याचप्रमाणे स्वाधिष्ठानचक्रांत असलेल्या अग्नितत्त्वालाही भेदून तसेंच हृदयाजवळ असलेल्या अनाहतचक्रांतील वायुतत्त्वाला, त्याच्याही वर कंठस्थानी असलेल्या विशुद्धिचक्रांतील आकाशतत्त्वाला आणि भ्रूमध्यप्रदेशीं असलेल्या आज्ञाचकक्रांतील मनस्तत्त्वाला भेदून, अर्थाद सर्वच कुलपथाला म्हणजे मुलाधारादि षट्चक्रांना अथवा सुषुम्नामार्गाला भेदून मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदल कमलामध्ये आपल्या परमशिवस्वरूप पतीसह तूं एकांतामध्यें विहार करतेस. तुझ्या या चिदानन्दस्वरूप अवस्थेचे जे कोणी ध्यान करतात, खरोखर ते धन्य होत. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी सरळ अर्थ आहे.

आपलः संपूर्ण देहच श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान आहे. त्यांतही विशेषेंकरून या देहांत असलेल्या मुख्य मुख्य चक्रांत तिचे प्रामुख्यानें वास्तव्य आहे. त्यांतही मुलाधारादि सहा चक्रांच्याही वर मूर्धस्थानीं विराजमान असलेलें सहस्रदल कमल हें तर तिचे अत्यंत आवडतें स्थान आहे. या देहांत श्रीत्रिपुरसुंदरी ही कुंडलिनीच्या रूपाने वास्तव्य करीत असते. कुंडलिनी ही एक विशिष्ट प्रकारची शक्ति आहे. ती प्रसुप्त असते तेव्हां इंद्रिये ही विषयोन्मुख होतात व मन विषयानंदामध्यें गर्क होत असतें. ती कुंडलिनीशक्ति जेव्हां जागृत होते तेव्हां सर्व इंद्रिये अंतर्मुख होतात व बुद्धि ही स्वतःसिद्ध, नित्य आणि निरतिशय अशा निजानंदाचा अनुभव घेत असते. "नीवारशूकवत्तन्वी कुंडली परदेवता" देवभाताच्या कुसाचा शेंडा जसा अगदीं बारिक असतो त्याप्रमाणें कुंडलिनी ही अत्यंत सूक्ष्म असून ती एक श्रेष्ठ देवता आहे असें संमोहनतंत्रांत तिचे वर्णन केले आहे.

ही कुंडलिनी मूलाधारचक्राचा आधार घेऊन स्वाधिष्ठानचक्रावर अधिष्ठित झालेली आहे. तेथें तिचे साडेतीन वेटोळे असल्याचें वर्णन करतात. नागाचें पिले । कुंकुमें न्हाले । वळण देऊनि आले । सेजे जैसे ॥ तैसी ते कुंडलिनी । मोटका औटे वळणी । अधोमुख सर्पिणी निदेली असे ॥ ( ज्ञानेश्वरी ६-१२२-१२३) मूलाधारचक आणि स्वाधिष्ठानचक्र ही दोन्हीं चक्रें अगदीं जवळ जवळ आहेत. मुलाधारचक्र हें चार दलाच्या कमलाप्रमाणे आहे तर स्वाधिष्ठानचक्र हें सहा दले असलेल्या कमलाप्रमाणे आहे. मुलाधारचक्र हे देहाच्या अगदीं मूलस्थानी म्हणजे गुदस्थानाच्या सान्निध्यांत आहे, तर स्वाधिष्ठानचक्र हे त्याच्या किंचित् वर उपस्थेंद्रियाच्या सान्निध्यांत आहे. मूलाधारचक्र हें देहांतील सर्व चक्रांचे आणि कुंडलिनीचेंही मुळ आधारभूत चक्र असल्यामुळें त्याला मूलाधार हें यथार्थ नांव आहे. त्याचप्रमाणे स्वाधिष्ठानचक्र याच्यांतील स्व शब्दाचा अर्थ कुंडलिनीच असल्यामुळे व तिचे तें चक्र अधिष्ठान म्हणजे वसतिस्थान असल्यामुळें त्या चक्रालाही स्वाधिष्ठानचक्र असें यथार्थ नांव मिळाले आहे. या दोन्ही चक्रांत वास्तव्य करणारी कुंडलिनी ही या प्रस्तुत सौंदर्यलहरीस्तोत्राची अधिष्ठात्री देवताच होय.

ललितासहस्रनामामध्यें "कुण्डलिनी" हें एक त्रिपुरसुंदरीचे नांव आहेच. " महासक्तिः कुण्डलिनी बिसतन्तुतनीयसी" कमळांतील तंतूप्रमाणें अत्यंत सूक्ष्म व गौरवर्ण असलेली ही कुण्डलिनी "महासक्ति" म्हणजे सर्वश्रेष्ठ सहस्रदल कमलामध्यें अत्यंत तेजस्वी असलेल्या चंद्रमंडलात शिवस्वरूपाशी समरस होऊन रहाण्याची तिला मोठी आवड आहे. अशी ती आहे म्हणूनच ती शरीरातील षट्चक्रांचे उल्लंघन करून सहस्रदल कमलामध्यें असलेल्या अमृतमंडलांत सचिदानंद परब्रह्मस्वरूप असलेल्या श्रीसदाशिवतत्त्वाशीं समरस होऊन रहाते म्हणून तिला "महासक्ति" म्हणतात. याच अभिप्रायानें कुण्डलिनीस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीला "चिच्छक्तिश्चेतनारूपा" आणि "चिदेकरसरूपिणी " अशीही नांवे दिलेली आहेत. सहस्रदल कमल हें साही चक्रांच्या वर असल्यामुळें "षट्चक्रोपरि संस्थिता " असेही तिला म्हटले आहे.

"मूलाधाराम्बुजारूढा" "स्वाधिष्ठानांबुजगता" " मणिपूराब्जनिलया " "अनाहताब्जनिलया" "विशुद्धिचक्रनिलया" "आज्ञाचक्राब्जनिलया" "सहसदलपद्मस्था" अशी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीची ललितासहस्रनामांमध्यें नांवे आहेत. या नावांवरून ती शरीरातील सर्वच चक्रांची अधिष्ठात्री असल्याचे स्पष्टच दिसत आहे. या सर्व चक्रांत अधिष्ठित होऊन ती त्या त्या चक्रातील बीजांना, भूततत्त्वांना व देवतांना कार्यप्रवण करीत असते. ती जीवचैतन्याच्या रूपाने सर्व देहालाच जीवन देत असते. म्हणूनच तिला "प्राणदा प्राणरूपिणी" अथवा जीवा, जीवभूता असेही म्हटलें जातें. तंत्रसारग्रंथांतही मुलाधारचक्राच्या ठिकाणी इष्ट देवतास्वरूप कुंडलिनीचे एकाग्र मनाने ध्यान केंले असतां सर्व अशुभांचा निरास होतो असें सांगितले आहे. "ध्यायेत्कुण्डलिनी सूक्ष्मां मुलाधारनिवासिनीम् । तामिष्टदेवतारूपां सार्धत्रिवलयान्विताम् ॥ अशेषाशुभशान्त्यर्थं समाहितमनाश्चिरम्" मुलाधारचक्राप्रमाणेंच इतरही चक्रांत कुंडलिनीरूप त्रिपुरसुंदरीचे ध्यान केलें असतां निरनिराळी फलें प्राप्त होतात असेही सांगितलेले आहे. मूलाधारचक्र हें पृथ्वी तत्त्वाचें असल्यामुळें पृथ्वीचा धारकत्व हा गुण त्याच्यामध्ये आहे. धरा, धरित्री, धरणी अशी पृथ्वीची नावें आहेत. देहाला धारण करणारे पृथ्वीतत्त्व हें मुलाधारचक्रांत नसतें तर हा देह खाली तरी पडला असता अथवा आकाशांत तरी उडून गेला असता असे रुद्ररहस्यात म्हटलेले आहे. " सर्वाधारा मही यस्मात्, मूलाधारतया स्थिता । तदभावे तु देहस्य पातः स्यादुद्‌ग‍मोऽपि वा ॥"

स्वाधिष्ठानचक्र हें अग्नितत्त्वाचे आहे. अग्नि हा सर्व शक्तींचे मूळ आहे. अग्नीमुळेंच देहामध्ये सर्व प्रकारची शक्ति नांदत असते. "अग्निमुलं बलं पुंसाम्" हा सिद्धान्तच आहे. कांही लोक स्वाधिष्ठानचक्र हें जलतत्त्वाचे असून मणिपूरचक्र हें अग्नितत्त्वाचे आहे असे म्हणतात. तें कांहीं असो. आपली कुंडलिनीशक्ति ही ब्रह्मरन्ध्रांतील चंद्रमंडलाकडे जाण्यास उत्सुक झाली म्हणजे क्रमशः ती सर्व चक्रांचे उल्लंघन करीत असते. यालाच योगशास्त्रांत षट्चक्रभेदन असें म्हणतात.

माणिपूरचक्र हें दहा दलांच्या कमळासारखें आहे. मृलाधारचक्रांतील चार दलांत वं, शं, षं आणि सं अशी बीजे आहेत तर स्वाधिष्टानचक्रांतील सहा दलांत बं भं मं यं रं आणि लं अशी सहा बीजे आहेत. त्याचप्रमाणे मणिपूरचक्राच्या दहा दलांत ड-पासून फ-पर्यंतची अक्षरे बीजरूपाने रहातात. अक्षरे ही अनुस्वारयुक्त झाली कीं, त्यांना बीजांचे स्वरूप येते. मणिपूरचक्राच्या वर हृदयाच्या शेजारी असलेल्या चक्राला अनाहतचक्र असें म्हणतात. विविध प्रकारच्या अनाहत नादांना अभिव्यक्त होण्याची अवस्था याच चक्रांत प्राप्त होत असल्यामुळें या चक्राला अनाहतचक्र असें म्हटलें जातें. या चक्राला बारा पाकळ्या असून त्यांत कपातून ठ-पर्यतचीं बारा अक्षरे बीजरूपानें वसलेली आहेत. हे चक्र वायुतत्त्वाचे मानले जातें. या तत्त्वाचा भेद करून कुंडलिनीशक्तिस्वरूप श्रीमहात्रिपुरसुंदरी वर जाते तेव्हां ती विशुद्धिचक्रांत येते. विशुद्धिचक्र हे कंठस्थानीं आहे. हें आकाशतत्त्वाचे चक्र असल्यामुळें व आकाश हें स्वभावतःच अत्यंत शुद्ध, निर्मल असल्यामुळें अथवा शुद्ध स्फटिकाप्रमाणे त्याचा वर्ण स्वच्छ असल्यामुळें या चक्राला विशुद्धिचक्र असें म्हटले जातें. या चक्राला सोळा पाकळ्या असून त्यांत क्रमशः अ-पासून अः-पर्यत सोळा स्वर विराजमान झालेले आहेत. येथूनच अक्षरप्रपंचाला मूर्त स्वरूप येतें व पुढें तीं अक्षरे स्थानभेदानें कंठ, तालव्य इत्यादि शब्दांनी व्यवहारिलीं जातात.

विशुद्धिचक्राचा भेद करून कुंडलिनी वर गेली की, ती आज्ञाचक्रांत प्रवेश करते. आज्ञाचक्र हें दोन भुवयांच्या मध्ये असून याला दोनच पाकळ्या आहेत. या दोन पाकळ्यांत हं आणि क्षं ही दोन बीजे विराजत आहेत. साधकाला याच चक्राच्या आधारे आपल्या उपास्यदेवतेचा, श्रीमहात्रिपुरसुंदरीचा थोडासा साक्षात्कार होत असतो. आ म्हणजे थोडे आणि ज्ञा म्हणजे ज्ञान. अथवा श्रीत्रिपुरसुंदरी ही फारच थोडा काळ या चक्रांत विद्युलेखेप्रमाणें प्रतीतीला येते म्हणूनही या चक्राला आज्ञाचक्र असें म्हटलें जाते. मन हे या चक्राचें तत्त्व होय. या ठिकाणी मन या शब्दाने पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांचाही अंतर्भाव विवक्षित आहेच. त्याचप्रमाणें पंचमहाभूतांनी पंचतन्मात्राही घेतल्या जातात. षट्चक्रांचे भेदन करतांना या एकवीस तत्त्वांचाही भेद होतोच. अर्थात् ही एकवीस तत्त्वें साधकाच्या अधीन होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याची साधकाला शक्ति प्राप्त होत असते. पुढें श्रीत्रिपुरसुंदरी सहस्रदल कमलांत प्रवेश करते तेव्हां ती माया, शुद्धविद्या, महेश्वर आणि सदाशिव या तत्त्वांशी संपृक्त होते. मायाविशिष्ट महेश्वर हा जीवभावाला प्राप्त होत असतो, तर शुद्धविद्याविशिष्ट सदाशिव हा परमशिवपदाला प्राप्त होत असतो. या परमशिवपदालाच शास्त्रांत सादाख्यकला असें म्हटले आहे. याच सहस्रदल कमलांत विलसत असलेल्या चंद्रमंडलांत आपली उपास्यदेवता श्रीमहात्रिपुरसुंदरी ही परमशिवतत्त्वाशीं समरस होऊन विहार करीत असते. अर्थात् एकरूप होऊन रहाते. तें शिवशक्तींचें ऐक्य एकमेव, अद्वितीय, परिपूर्ण, परब्रह्मस्वरूपच आहे.

आपल्या देहांत असलेल्या मुलाधारादि चक्रांपेक्षां मूर्धस्थानी असलेलें सहस्रदल कमल हें अत्यंत श्रेष्ठ होय. म्हणूनच या कमलाला चक्रराज असें म्हटलें जातें. हेंच आपल्या त्रिपुरसुंदरीचें निकेतन म्हणजे निवासस्थान असल्यामुळें याही अभिप्रायाने श्रीत्रिपुरसुंदरीला "चक्रराजनिकेतना" असें म्हटलेले आहे. परस्पर तादात्म्यभावाला प्राप्त झालेलें शिवतत्त्व आणि शक्तितत्त्व ही परस्परांच्या तपश्चर्येचीं जणुं मूर्तिमंत फळेंच होत. असे है सदासर्वकाळ पुरातनच असलेले विश्वप्रपंचाचे माता आणि पिता यांना आमचा नमस्कार असो. आम्ही भक्तिभावाने त्यांची स्तुति करीत आहोंत "परस्परतपःसंपत्फलायितपरस्परौ । प्रपञ्चमातापितरौ प्राञ्चौ जायापती स्तुमः" असें एका भक्ताने या शिवशक्तीचे वर्णन केलेले आहे तें अत्यंत योग्य आहे.

या श्लोकांतील "कुलपथ" या शब्दाचा अर्थ कांहीं विद्वान सुषुम्णामार्ग असा करतात, तर कांहीं विद्वान् षट्चक्रें असाही करतात. तात्पर्य, देहामध्यें कुंडलिनीच्या रूपानें विराजमान असलेली श्रीत्रिपुरसुंदरी ही सुषुम्णामार्गाने षट्चक्रांचा भेद करून साधकाच्या उपासनाबलानें ज्या वेळेला सहस्रदल कमलांत प्रवेश करते आणि तेथें असलेल्या चंद्रमंडलांत सच्चिदानंदरूप परमशिवतत्त्वाशीं समरस होते त्या वेळेला तिचा तो आपल्या परमप्रिय शिवतत्त्वस्वरूप पतीबरोबर "रहसि" म्हणजे एकान्तांत होणारा सामरस्य विहार ही तिची नित्यनिरतिशय आनंदरूप अवस्था होय. ही अवस्था लक्षांत घेऊनच तिला "सच्चिदानन्दरूपिणी" असें नांव दिलेले आहे. या अवस्थेंत जे भक्त तिचे चिंतन करतात ते खरोखर धन्य होत.

आसनें, प्राणायाम, धारणा आणि ध्यान या क्रियांनी शरीरातील वर सांगितलेल्या षट्चक्रांचा भेद करतां येतो. योगमार्गांतील मुलबंध, ओड्याणबंध आणि जालंधरबंध, त्याचप्रमाणे कांहीं मुद्रा यांचाही षट्चक्रभेदनाला उपयोग होतो. मुलाधारादि चक्रांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या इष्ट देवतेच्या उपासनेनेंही षट्चक्रांचा भेद घडवून आणता येतो. त्या त्या चक्रांतील बीजे, अधिष्ठात्री देवता आणि पृथ्वी, जल इत्यादि भूततत्त्वें यांचें चिंतन करीत श्रीललितामहात्रिपुरसुंदरीची त्या त्या चक्रांत जर उपासना केली तर कुंडलीस्वरूप असलेली भक्तकामकल्पद्रुम श्रीमहात्रिपुरसुंदरी ही स्वयंजागृत होऊन साधकाच्या षट्चक्रांचे भेदन करीत करीत सकलतत्त्वातीत असलेल्या सहस्रदलकमलांतील निष्कलंक आणि सर्व कलांनी पूर्ण अशा चंद्रमंडलात जेव्हां परमशिवतत्त्वाशीं विहार करते तेव्हां उपासनाबलानें तिच्या स्वरूपाशी तादात्म्य पावलेलें साधकांचे मनही त्या अद्वितीय आनंदाचा अनुभव घेत असते. असा हा अर्धनरनटेश्वरी असलेल्या श्रीत्रिपुरसुंदरीच्या उपासनेचा प्रभाव आहे.

मुलाधारचक्रात पृथ्वीतत्त्वाचा भेद झाल्यानंतर साधकाचे शरीर पृथ्वीचा आधार घेतल्यावांचूनही इतस्ततः संचार करूं शकते. वह्नितत्त्वाचा भेद केल्यानंतर त्याला अग्नि शीतल होतो. जलतत्त्वाचा भेद केल्यानंतर पाणी त्याला बुडवू शकत नाही. अनाहतचक्रांत वायुतत्त्वाचा भेद केल्यानंतर साधक वायुगतीनें संचार करूं शकतो. श्रीसदाशिवेंद्रसरस्वती, श्रीवासुदेवानंदसरस्वती इत्यादि सिद्ध सत्पुरुषांच्या चरित्रांत ह्या गोष्टी पहावयास सांपडतात. आकाशतत्त्वाचा भेद केल्यानंतर साधक आकाशगामी होतो. मनस्तत्त्वाचा भेद केल्यानंतर तो मनोगतीने त्रैलोक्यामध्ये संचार करतो. सहस्रदल कमलांतील विहार हा अनिर्वचनीय आनंदस्वरूप असल्यामुळें सर्व सिद्धींची तेथें परिसमाप्ति होते. "सा काष्ठा सा परागतिः" आई ! तुझ्या कृपेने ही अवस्था ज्यांना लाभली खरोखर ते मोठे धन्य होत असें 'रहस्यसिद्धिसोपान' या ग्रंथांत मोठे सुंदर वर्णन केलेले आहे.

पुढील यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून दहा दिवस त्याची रोज विधिपूर्वक पूजा करावी. आटीव दुधाचा अथवा पायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां श्लोकाचा जप करावा. देशांतरीं गेलेला माणूस लौकर परत येईल. याच यंत्राला केशर, कस्तूरी, चंदन इत्यादि सुगंधी द्रव्यांनी लेप करून ४५ दिवस वरच्याप्रमाणे आराधना केल्यास साधकाला पंचमहाभूतांवर विजय संपादन करतां येईल.

सुधा-धारासारैश्चरण-युगलान्तर्विगलितैः
प्रपञ्चं सिञ्चती पुनरपि रसाम्नाय-महसः ।
अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्ट-वलयं
स्वमात्मानं कृत्वा स्वपिषि कुलकुण्डे कुहरिणि ॥ १० ॥

हे मातः चरणयुगलान्तर्विगलितेः सुधाधारासारैः प्रपञ्चं सिञ्चन्ती रसाम्नायमहसः (सकाशात्) स्वां भूमिं पुनः अपि अवाप्य भुजगनिभं अध्युष्टवलयं स्वं आत्मानं कृत्वा कुलकुण्डे स्वपिषि" आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या दोन्ही चरणकमलांतून स्रवणाऱ्या अमृताच्या धारावृष्टींनीं तूं देहांतील सर्व नाड्यांच्या समूहाला आणि नाड्यांच्या द्वारा देहालाही पण शिपडतेस, तृप्त करतेस, त्यांचें पोषण करतेस आणि त्यानंतर पुन्हा चंद्रमंडलांतून खाली उतरतेस. आपल्या पहिल्या स्थानाला येतेस. तेथें सर्प जसा वेटोळें घालून बसावा त्याप्रमाणें तूं स्वतःचें (साडेतीन) वेटोळे करून कुंडाप्रमाणे असलेल्या आधारचक्रांतील कुहरांत अर्थात् छिद्रामध्ये पूर्वीप्रमाणेच झोंपतेस. तात्पर्य, लोकोपकाराकरितां हा तुझा सर्व खेळ चालला आहे ! असा या लोकाचा अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील श्लोकांत कुंडलिनीरूप श्रीमहात्रिपुरसुंदरी मुलाधारादि चक्रांच्या ठिकाणी क्रमशः पृथ्वी, जल इत्यादि तत्त्वांचा लय करीत मस्तकामध्यें असलेल्या हजार पाकळ्यांच्या कमलांतील चंदमंडलामध्यें विहार करते असें सांगितलें. आतां या श्लोकांत ती त्या चंद्रमंडलांतील आपल्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अमृताच्या वृष्टीने साधकाच्या देहांतील सर्व नाड्यांना व नाड्यांच्या द्वारा साधकाच्या शरीरपिंडालाही तृप्त करते, पुष्ट करते आणि पुन्हा पूर्ववत् सृष्टिक्रमाच्या अनुरोधानें सर्व तत्त्वांचा आविष्कार करीत मूलाधारचक्राजवळ असलेल्या आपल्या स्थानांत स्वाधिष्ठानचक्रांत वेटोळे घालून स्वस्थ झोपते. हें सर्व तिचे कार्य साधकाच्या शरीरपिंडाचें पोषण आणि परिपालन होण्याच्या दृष्टीनेंच चाललेले असतें. जें पिंडी तें ब्रह्माडी या न्यायाने साधकाच्या शरीरपिंडाप्रमाणेंच अखिल बह्मांडाचेंही ती पोषण आणि परिपालन करीत असतेच. अशा या तिच्या दयापूर्ण लीलेचें वर्णन आचार्य करीत आहेत.

आपल्या शरीरांत एक सहस्रदल कमल आहे. ज्याला आपण व्यवहारामध्ये मेंदू, मगज अथवा मस्तिष्क म्हणतो तेंच हें सहस्रदल कमल होय. हें सर्व तत्त्वांचे बीजस्थान आहे. सर्व तत्त्वांचा लय यांतच होत असतो. हेंच सच्चिदानंदरूप महात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान आहे. श्रीविद्येच्या ध्यानात्मक समाराधनेमध्यें या सहस्रदलकमलाला श्रीचक्र असेंच म्हटलेले आहे. नामरूपात्मक विश्वप्रपंचाचीं मूळ बीजभूत असलेली अक्षरें आणि तत्त्वें ही बाह्य श्रीचक्राप्रमाणेंच या ब्रह्मरंध्रस्थानीं असलेल्या सहस्रदल कमलरूपी श्रीचक्रांतही अंतर्भूत झालेलीं आहेत. शक्तितत्त्व हें वाक्प्रपंचाचें उगमस्थान आहे तर शिवतत्त्व हें अर्थप्रपंचाचें उगमस्थान आहे. शब्दप्रपंच आणि अर्थप्रपंच या दोन्ही प्रपंचाचे मूळ अक्षरांतच असल्यामुळें श्रीचक्रांतील सर्व त्रिकोणांत आणि कमलदलांत आपल्याला अक्षरांचाच विन्यास दृष्टीस पडेल. श्रीचक्र हें शिवशक्तिस्वरूप पूर्ण तत्त्वाचें अधिष्ठान असल्यामुळें श्रीचक्रांत आपल्याला शिवचक्रांचा आणि शक्तिचक्रांचाही एकत्र समावेश असलेला दृष्टीस पडतो. आपल्या घराला सर्व बाजूंनी जसा परिघ असावा किंवा कुसूं असावें त्याप्रमाणे श्रीचक्रांत आपल्याला बाहेरून आंत प्रवेश करतांना पहिल्या प्रथम तीन रेघांचा चतुष्कोण दिसेल. यालाच भूपुर असें म्हणतात. या भूपुराला चार द्वारे आहेत. तीं क्वचित उघडी असतात तर क्वचित भूपुरांशीं अखंडपणें संलग्न असतात. आपण भूपुरांत प्रवेश केला कीं, त्या ठिकाणी कांहीं भाग मोकळा दृष्टीस पडेल. त्यापुढे आपल्याला तीन वर्तुळे दिसतील. अर्थात् तीन वर्तुळाकार रेघा दिसतील. कांहीं ठिकाणी त्या चारही असल्याचे दिसते. सर्वत्र विकल्प हा मतभेदामुळे अथवा संप्रदायभेदामुळें असतो ही गोष्ट लक्षांत घ्यावी. ही तीन वर्तुळे जणु कांहीं बाह्य विश्वाच्या त्रैगुण्याची द्योतक आहेत.

या वर्तुळांच्या आंत षोडशदल कमल आहे. त्याच्याही औत एक अष्टदल कमल आहे. षोडशदळकमलातील प्रत्येक पाकळीत अं, आ इत्यादि सोळा स्वरांची बीजे लिहिलेली असतात. श्रीचक्र आपल्या हातावर घेऊन पहा. त्यांत आंतल्या बाजूला असलेल्या भूपुराच्या द्वारामध्ये जें दल येईल त्यांत अं हें बीज दिसेल. पुढें उजवीकडून उलट्या बाजूनें प्रत्येक दलांत आ, ई इत्यादि स्वरबीजे पृथक पृथक् लिहिलेली असतात. याप्रमाणे सोळा दलांत सोळा स्वर पूर्ण होतात.

षोडशदल कमलानंतर आपल्याला आंतल्या बाजूस अष्टदल कमल दिसेल. पुढच्या बाजूस ऊर्ध्वमुरव त्रिकोणाशी संलग्न असलेल्या दलात क - वर्गातील बीजाक्षरें सरळ क्रमाने लिहिलेली दिसतील. आपल्या बाजूस असलेल्या अधोमुख त्रिकोणाशी संलग्न असलेल्या दलांत ट - वर्गांतील बीजाक्षरें लिहिलेली असतात. उजवीकडींल दलांत च - वर्गाचीं बीजाक्षरें लिहितात, तर डावीकडील दलात त - वर्गाची बीजाक्षरें लिहितात. उजव्या बाजूकडील वरच्या कोपऱ्यांतील दलांत प - वर्गातलीं बीजाक्षरें पहावयास सांपडतील तर खालच्या बाजूच्या कोपऱ्यांतील दलांत य - वर्गातील चार बीजाक्षरें लिहिलेली दिसतील. त्याचप्रमाणें डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यांतील दलांत श - वर्गातील चार बीजे लिहिलेलीं असून वरच्या कोपऱ्यातील दलात ळं आणि क्षं ही दोन बीजाक्षरें लिहिलेली असतात. याप्रमाणे अष्टदल कमलापर्यंतची सर्व चक्रे ही शिवचक्रे म्हणून समजली जातात. या शिवचक्रांच्या आंत आपण गेलों म्हणजे आपल्याला शक्तिचक्रांचा समूह दिसेल.

आतां आपण शक्तिचक्रांचा विचार करूं. अष्टदल कमलाचे अवलोकन करून आपण आंत गेलों की, प्रथम आपल्याला सर्व बाजूंनी मोकळा असलेला बराच मोठा वर्तुळाकार प्रदेश दृष्टीस पडेल. या प्रदेशांत अनेक त्रिकोणांनी संलग्न असलेली पांच चक्रें आहेत. पांचवे चक्र केवळ त्रिकोणात्मकच आहे. यांत पहिलें चक्र चौदा त्रिकोणांचे आहे, तर त्याच्या आंतील दोन चक्रे ही दहा-दहा त्रिकोणांची आहेत. त्यांच्या आंतील एक चक्र आठ त्रिकोणांचे असून त्याच्या आंत शुद्ध त्रिकोण दिसत आहे. पहिल्या चौदा त्रिकोणांच्या चक्राला "चतुर्दशार" असें म्हणतात, तर त्याच्या आतील दहा-दहा त्रिकोण असलेल्या दोन चक्रांना क्रमशः "बहिर्दशार" आणि "अन्तर्दशार" असे म्हणतात. त्यांच्याही पलीकडे असलेल्या आठ त्रिकोणांच्या चक्राला अष्टकोण अथवा वसुकोण अशीं नांवे दिलेली आहेत. त्याच्याही आंत आपल्याला शुद्धत्रिकोण पहावयास सापडेल. या त्रिकोणात्मक चक्रांत दुसरा कोणताही त्रिकोण घटक झालेला नाहीं. म्हणून या चक्राला शुद्धित्रिकोण असेंच म्हटलें जातें. चतुर्दशार चक्रामध्यें खालच्या बाजूला जो त्रिकोण आहे त्यांत कं हें बीजाक्षर असून क्रमाक्रमाने उजवीकडून डावीकडे खं, गं या क्रमाने ढं पर्यंत चौदा बीजाक्षरें आहेत. त्याचप्रमाणे बहिर्दशारचक्रांतील दहा त्रिकोणांत खालच्या त्रिकोणापासून उजवीकडून डावीकडे णं-पासून भं-पर्यंत दहा बीजें लिहिली जातात, तर अंतर्दशार चक्रांतील दहा त्रिकोणांत मं पासून क्षं पर्यंत असलेलीं दहा बीजे लिहिलेली दृष्टीस पडतात. आपल्या देहांतही मूलाधारचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जी सहा चक्रें आहेत त्या चक्रांच्याही दलांत सर्व स्वर आणि व्यंजने बीजरूपानें समावलेलींच आहेत. म्हणून कुलपथांतील अर्थात् सुषुम्नामार्गांतील षट्चक्रे आणि श्रीयंत्रांतील चक्रें ही एकरूपच समजली जातात.

मूर्धस्थानीं असलेल्या सहस्रदल कमलांतही श्रीचक्राची भावना केली जाते. या श्रीचक्रांतही स्वरवर्णात्मक मातृकाबीजांची स्थापना केलेली असतेच. या मूर्धस्थानी विलसत असलेल्या सहस्रदलकमलांतील श्रीचक्रांत सर्व कलांनी परिपूर्ण असलेले, वृद्धिक्षयविरहित आणि निष्कलंक असें एक चंद्रमंडल आहे. श्रीचक्रांतील त्रिकोणांत मध्यवर्ती जसा बिंदु आहे त्याचप्रमाणें हा पूर्ण चंद्र सहस्रदल कमलांतील श्रीचक्रांत विराजमान झालेला आहे. या पूर्ण चंद्रांतच आपली उपास्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही मंगलमय शिवततत्त्वाशीं समरस होऊन विहरत असते. याच वेळेला तिच्या चरणकमलाच्या स्पर्शानें स्पंदित झालेल्या चंद्रमंडलातून अमृताचा स्त्राव होत असतो व त्या अमृताने शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांबरोबर देहाचेंही परिपोषण होत असतें असा योग्यांचा व तांत्रिकांचा सिद्धान्त आहे.

श्रीचक्रांतील मूलभूत मध्यवर्ति असलेल्या त्रिकोणाच्या बाहेर जे आठ त्रिकोण असलेलें चक्र आहे, ज्याला "अष्टार" किंवा वसुकोण अथवा अष्टकोणचक्र म्हणतात, त्या चक्रांत आपल्या बाजूला अधोमुख असलेल्या त्रिकोणापासून उजवीकडून डावीकडे उलट्या क्रमाने प्रत्येक त्रिकोणांत मंत्रस्वरूप वाग्देवतांची बीजें स्थापन केलेली असतात. तीं क्रमाने र्ब्लूं, न्व्लीं, य्लूं, ज्र्मीं, ह्स्ल्व्यूं, झ्म्य्र्‌रूं, क्ष्म्रीं अशी आहेत. या अष्टारचक्राच्या आंत असलेल्या त्रिकोणांत आपल्या उपास्य देवतेचा पंचदशाक्षरी महामंत्रराज विराजमान झालेला आहे.

देवीभुजंगमस्तोत्रांतील सोळावा श्लोक पहा. या त्रिकोणांतही मध्यवर्ती असलेला बिंदू हा पूर्ण अर्थात् पोकळ स्वरूपाचा असून त्यामध्ये महामंत्रराजाच्या अंतिम बीजानें घटित असलेला "ॐ ईं ईं नमः" हा मंत्रच तादात्म्यभावाला प्राप्त झालेल्या शिवशक्तीच्या रूपाने विलसत आहे. उपासनाबलानें येथपर्यंत पोहचलेल्या साधकाच्या आनंदाला पारावार उरत नाहीं.

हें सर्व अंतर्गत व बहिर्गत श्रीचक्रसमाराधनेचें स्वरूप आणि फल लक्षांत घेऊन आचार्य या श्लोकाने वस्तुस्थितीनें श्रीललिता महात्रिपुरसुंदरीचें वर्णन करीत आहेत. आई जगज्जननी ! तुझे चरणकमल हें खरोखर अमृताचा वर्षाव करणारे आहेत. त्या अमृताच्या वृष्टीने तूं व्यष्टी आणि समष्टीच्या विश्वप्रपंचाचें सिंचन करतेस. "रसाम्नायमहसः" रसाम्नायमहस् शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. कारण तेथें रसाची - अमृताची पूर्ण अभिवृद्धि असते. आम्नाय शब्दाचा अर्थ जसा वेद आहे तसाच अभिवृद्धि असाही पण आहे. ज्याच्यामध्ये अमृताची पूर्ण अभिवृद्धि आहे असा 'महस्' म्हणजे तेजोमय अथवा कांतिरूप असलेला चंद्र, त्या चंद्रांतून अमृताचा वर्षाव होतो व त्या वृष्टीनें साधकाच्या सर्व नाड्यांचे व देहाचेंही पोषण होत असतें. हें सर्व कार्य कुंडलिनीच्या रूपाने चाललेले असतें. त्यानंतर पुन्हा ती त्रिपूरसुंदरी कुंडलिनीच्या रूपाने खालीं उतरते. पुन्हा पूर्ववत् ती आपल्या प्रदेशांत म्हणजे मूलाधारभूत चक्रावर आधारित होऊन स्वाधिष्ठानचक्रामध्यें एखाद्या सर्पाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालून झोप घेत असते. ती तिची निदा आधारचक्राच्या मध्यभागी कुंडाप्रमाणे असलेल्या खळग्यांत तोंड घालून होत असते. त्याच ठिकाणी उगम पावणाऱ्या सुषुम्ना नाडीचाही मार्ग तिनें आपल्या मुखानें अवरुद्ध केलेला असतो. कु म्हणजे पृथ्वी तिचे लं इत्याकारक बीज तेथेंच लीन असतें. म्हणून आधारचक्राला कुल असें म्हटले आहे. त्या आधारचक्रांतला मध्यवर्ति भाग सखल असल्यामुळें त्याला कुलकुंड असे म्हणतात. त्या कुलकुंडांतही एक सूक्ष्म छिद्र आहे. त्यालाच आचार्यांनी कुहर असें म्हटले आहे. इडा आणि पिंगला यांच्यामध्ये असलेली सुषुम्ना नाडी येथूनच उगम पावत असते. निद्रिस्त असलेल्या सर्पाकार कुंडलिनीच्या मुखाने सुषुम्नेचें द्वार झाकलेले असतें. त्यामुळें प्राणवायुचा सुषुम्नेमध्यें प्रवेश होत नाहीं. जोपर्यंत सुषुम्ना नाडींत प्राणवायूचा प्रवेश होत नाहीं तोपर्यंत साधकाला अंतर्मुखता प्राप्त होत नाहीं. जोपर्यंत अंतर्मुखता नाहीं तोपर्यंत मनाला स्वास्थ्याचा लाभ होत नाहीं व जोपर्यंत स्वास्थ्याचा लाभ नाहीं तोपर्यंत समाधानही नाहीं. तात्पर्य समाधानासाठी स्वास्थ्य पाहिजे, स्वास्थ्यासाठी अंतर्मुखता पाहिजे, अंतर्मुखतेसाठी सुषुम्ना नाडीचे द्वार उघडले जाणें आवश्यक आहे व सुषुम्ना नाडीच्या द्वाराचें उद्‌घाटन होण्यासाठी कुंडलिनीची जागृति होणें आवश्यक आहे. ही कुंडलिनीची जागृति श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या उपासनेने घडवून आणता येते. श्रीत्रिपुरसुंदरी ही कुंडलिनीस्वरूपच आहे. तेव्हां तिची उपासना हेंच तिच्या जागृतीचे उत्कृष्ट साधन आहे यांत संशय नाहीं. कांहीं लोक "कुहरिणि" हें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचेच विशेषण मानतात. कांहीं मानले तरी वर निर्दिष्ट केलेल्या अर्थाला बाध येत नाहीं.

या यंत्रातील चारी त्रिकोणांत ह्रीं बीज असल्याचें लक्षांत घ्यावें. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून त्याची विधिपूर्वक सहा दिवस पूजा करावी. केळांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. तांबड्या रेशमी दोऱ्यांत बाधून ते यंत्र धारण केल्यास शरीरातील तेजःस्वरूप शुक्र धातूची वृद्धि होते. षांढ्य जाते. हें सिद्ध यंत्र धारण केल्यास स्त्रियांच्या शरीरांतही रजःप्रवृत्ति निर्माण होते.

चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिरपि
प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः ।
चतुश्चत्वारिंशद्वसुदल-कलाश्र-त्रिवलय-
त्रिरेखाभिः सार्धं तव शरणकोणाः परिणताः ॥ ११॥

"हें मातः त्रिपुरसुंदरि ! चतुर्भिः श्रीकण्ठैः शम्भोः सकाशात् प्रभिन्नाभिः पञ्चभिः शिवयुवतिभिः नवभिः अपि मूलप्रकृतिभिः तव शरण कोणाः वसुदल- कलाश्र-त्रिवलय-त्रिरेखाभिः सार्धं परिणताः सन्तः चतुश्चत्वारिंशत् भवन्ति" असा या श्लोकाचा अन्वय आहें. हे माते त्रिपुरसुंदरी ! चार ऊर्ध्वमुख त्रिकोण, ते शंकरांचे त्रिकोण असल्यामुळें त्यांना श्रीकंठ असें म्हणतात त्याचप्रमाणे मूळ बिंदुस्वरूप जो शंभु म्हणजे भगवान् सदाशिव त्याच्यापासून खालीं पांच अधोमुख त्रिकोण आहेत ते शक्तीचे त्रिकोण असल्यामुळें त्यांना "शिवयुवति" असें म्हटलेले आहे. हे ऊर्ध्वमुख चार त्रिकोण आणि अधोमुख पांच त्रिकोण मध्यवर्ति असलेल्या बिंदूनें प्रभिन्न म्हणजे पृथक् झालेले आहेत. असे हे श्रीचक्रांतील नऊ त्रिकोण म्हणजे जणुं कांहीं विश्वपपंचाचीं मूळ कारणेंच आहेत. ऊर्ध्वमुरव शिवचक्रांतील त्रिकोण आणि अधोमुख शक्तिचक्रांतील त्रिकोण सर्व मिळून त्रेचाळीस त्रिकोण होतात. श्रीत्रिपुरसुंदरीचे प्रत्यक्ष निवासस्थान असलेला मध्यवर्ति बिंदु हा चव्वेचाळीसावा समजावा. या सर्व त्रिकोणांच्या भोंवतालीं अष्टदल कमल, त्याच्याही बाहेर षोडशदल कमल, त्यांच्या बाहेर तीन वर्तुलें अथवा मेखला आणि त्यांच्याही बाहेर चतुष्कोणाकार तीन भूपुराच्या रेखा, अशा क्रमाने परिणत झालेलें, पूर्णतेला पोहोचलेलें श्रीचक्र हे तुझें मंदिर आहे. त्याचा महिमा मी काय वर्णन करूं ? तो अवर्णनीय आहे. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

विश्वाचे माता आणि पिता त्याचप्रमाणे आपलें इष्ट दैवत असलेल्या अदैतभावापन्न शिवशक्तिस्वरूप श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचें मंदिर असलेल्या श्रीचक्राचा काय थाट वर्णन करावा ? त्याचें जितके अवलोकन करावे, जितके चिंतन करावे तितके तें अपुरेच वाटतें. विविध वैभवाने संपन्न अशा एखाद्या विशाल राजमंदिरांत प्रवेश केल्यानंतर मन जसे तेथें रमते अथवा श्रीरामेश्वराच्या विशाल मंदिराचे प्राकार ओलांडून आपण जसा जसा आत संचार करतो तशी तशीं आपल्याला अनेक मंदिरें व तीर्थे दृष्टीस पडतात. अनेक देवतांचे दर्शन घडते. थाटामाटांत विराजमान झालेल्या श्रीरामेश्वराचें दर्शन घडले म्हणजे जीवाला एक प्रकारचे अनिर्वचनीय समाधान वाटतें. तोच प्रकार श्रीचक्राच्या स्वरूपाचे चिंतन करीत असतांना आपल्या प्रतीतीला येतो. मनाला समाधान वाटतें. आनंद वाटतो.

"चत्रुर्भिः शिवचक्रैश्च शक्तिचक्रैश्च पञ्चभिः ।
शिवशक्त्यात्मकं ज्ञेयं श्रीचक्र शिवयोर्वपुः ॥ "

ऊर्ध्वमुख चार शिवत्रिकोण आणि अधोमुख पांचः शक्तित्रिकोण असें हें नऊ त्रिकोणांचे शिवशक्तिस्वरूप असलेलें श्रीचक्र हें प्रत्यक्ष शिवपार्वतीचे स्वरूपच होय. या श्रीचक्रांत मध्यभागी असलेल्या एका वर्तुळांत ऊर्ध्वमुरव असे चार त्रिकोण दिसत आहेत तर अधोमुख असे पांच त्रिकोण दिसत आहेत. हा नऊ त्रिकोणांचा समूह हें श्रीचक्राचें अंतरंग स्वरूप आहे तर आठ दलांचे कमल, सोळा दलांचे कमल, तीन वर्तुळाकार मेखला आणि तीन रेघांचें भूपुर हें श्रीचक्राचे बहिरंग स्वरूप होय. अंतरंगाची मुख्य देवता शक्ति आहे तर बहिरंगाची मुख्य देवता शिव आहे. मध्यवर्ती असलेल्या बिंदुस्थानांत शिव आणि शक्ति तादात्म्यभावाला प्राप्त होऊन विराजमान झालेलीं आहेत. त्यांतही शक्तिस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरी ही परमशिवाच्या अंकावर विराजमान झालेली आहे. अशा रीतीनें बिंदुस्थानाची देवता शिवशक्ति हीच मानली जाते. या शिवशक्तीलाच "परदेवता" असें म्हटलें आहे.

श्रीचकाचीं एकंदर नऊ आवरणे आहेत. या प्रत्येक आवरणाला चक्र असेंच म्हटलें जातें. अधोमुख पांच त्रिकोण असलेली आपल्याकडील बाजू ही पश्चिम दिशा समजावी. ऊर्ध्वमुख चार त्रिकोण असलेली आपल्यासमोरची वरची बाजू ही पूर्वेकडील समजावी. आपल्या डाव्या बाजूस उत्तर आणि उजव्या बाजूस दक्षिण दिशा समजावी. पश्चिम आणि उत्तर यांमधील कोपरा वायव्य दिशेचा असून उत्तर आणि पूर्व यांमधील कोपरा ईशान्य दिशेचा समजावा. पूर्व आणि दक्षिण यांमधील कोपरा आग्नेय दिशेचा असून दक्षिण आणि पश्चिम यांमधील कोंपरा ही नैर्कत्य दिशा समजावी. असा हा श्रीचक्राचा दिग्विभाग लक्षांत घ्यावा. श्रीचक्रांतील तीन रेघांचे चतुष्कोणाकार भूपुर हे पहिलें आवरण असून याला त्रैलोक्यमोहनचक्र असें नांव आहे. सोळा पाकळ्यांचें कमल हें दुसरे आवरण असून याला सर्वाशापरिपूरकचक्र असें म्हणतात. आठ पाकळ्यांचें कमल हें श्रीचक्रांतील तिसरे आवरण असून याला सर्वसंक्षोभणचक्र असें म्हटले आहे. यानंतर चौदा त्रिकोण असलेलें चौथे चक्र हें श्रीचक्रांतील चौथे आवरण मानले जातें. या आवरणाला सर्वसौभाग्यदायकचक्र असें म्हणतात. यानंतर दहा त्रिकोण असलेलें बहिर्दशारचक्र हें पांचवे आवरण असून याला सर्वार्थसाधकचक्र असें नांव दिले आहे. त्यानंतर दहा त्रिकोणांचे दुसरें चक्र असून त्याला अंतर्दशारचक्र असें म्हणतात. हें चक्र श्रीचक्रातील सहावे आवरण असून त्याला सर्वरक्षाकरचक्र असें म्हटले आहे. याच्या आंत आठ त्रिकोण असलेलें सातवे आवरण असून त्याला सर्वरोगहरचक्र असें म्हटलें जातें. या सभोवार आठ त्रिकोण असलेल्या सातव्या आवरणांत मध्यवर्ती एक त्रिकोण आहे. तो मुख्य त्रिकोण असून श्रीचक्रांतील तें आठवे आवरण मानतात. या आवरणाला सर्वसिद्धिप्रदचक्र असें म्हणतात. या त्रिकोणांतही जो पोकळ शून्याकार बिंदु आहे तो या श्रीचक्रांतील नववे आवरण होय. या नवव्या आवरणाला सर्वानंदमयचक्र असें म्हणतात. याच चक्रामध्ये आपली आराध्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही शिवस्वरूपाशीं समरस होऊन विराजमान झालेली आहे. साधकाचें चित्त आपल्या या उपास्यदेवतेशी जेव्हां समरस होते तेव्हां त्याच्या आनंदाला सीमा रहात नाहीं. म्हणूनच या आवरणाला "सर्वानन्दमय" असें अगदीं योग्य नांव दिलेले आहे. बाकीची आवरणेंही आपआपल्या नांवाप्रमाणे साधकाला फले देतच असतात.

श्रीचक्रांतील भूपुराच्या चारी दिशांना चार दारे आहेत. चतुष्कोणाकृति भूपुर हें तीन रेघांचे आहे. जणु कांहीं ते तीन प्राकारच आहेत. पहिली रेषा शुक्र वर्णाची आहे तर दुसरी रेषा अरुण वर्णाची आहे. तिसऱ्या रेषेचा वर्ण पिवळा आहे. पहिल्या रेषेच्या चारी दरवाजांत, चारी कोंपऱ्यांत आणि पश्चिम आणि नैर्ऋत्य यांच्यामध्यें व पूर्व आणि ईशान यांच्यामध्यें दहा प्रकारच्या सिद्धि अर्थात त्या त्या सिद्धींच्या अधिष्ठात्री देवता विराजमान झालेल्या आहेत. अणिमा, महिमा, लघिमा, ईशित्व, वशित्व इत्यादि त्यांची नावे आहेत. भृपुराच्या दुसऱ्या रेषेंत चारी दरवाजामध्ये आपल्या वाम भागाकडे चार आणि चारी कोंपर्‍यांत चार अशा आठ मातृका ( लोकमाता) विराजमान झालेल्या आहेत. ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी इत्यादि त्यांची नावे आहेत. सात मातृका प्रसिद्धच आहेत.

या ठिकाणी महालक्ष्मी ही आठवी मातृका असल्याचें दृष्टीस पडते. भूपुराच्या तिसऱ्या रेषेंत आपण आलों म्हणजे तेथें पहिल्या रेषेप्रमाणेंच सर्वसंक्षोभिणीमुद्राशक्ति, सर्वविद्राविणीमुद्राशक्ति इत्यादि दहा शक्तिदेवता चारी द्वारांत आणि चारी त्रिकोणांत त्याचप्रमाणे पश्चिम आणि नैर्ऋत यांच्यामध्यें एक आणि पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्ये एक याप्रमाणे आपआपल्या स्थानी सुप्रतिष्ठित असलेल्य दृष्टीस पडतील. यांना प्रकट योगिनी असेही म्हणतात.

वर निर्दिष्ट केलेलें भूपुर ओलांडून आपण आत गेलों कीं पुढें सर्व बाजूंनी विशाल पटांगण असलेलें दृष्टीस पडेल. त्या पटांगणांतून पुढें आल्यावर आपल्याला तीन वलयें दिसतील. ही तीन वलये सत्त्व रज, आणि तम या तीन गुणांची द्योतक आहेत. अथवा सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांची द्योतक आहेत अथवा इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति या तीन शक्तींची तीं द्योतक आहेत असेंही मानतात. कांहीं श्रीचक्रांतून ही तीन वलये षोडशदल कमलाला लागून असलेल्या वरच्या बाजूच्या वलयानंतर दाखवितात तर कांहीं श्रीचक्रांत चौदा त्रिकोण असलेल्या चतुर्दशारचक्राच्या बाहेर एक वर्तुल दाखवतात, तर अष्टदल कमलाच्या बाहेर दुसरें वर्तुळ दाखवितात. तसेंच तिसरे वर्तुल सोळा पाकळ्या असलेल्या कमलाच्या बाहेर त्या कमलदलांना लागून असलेलें दाखवितात. कांहीं श्रीचक्रातून पांच वर्तुलें दिसतात तर काहीतून तीं सहाही दिसतात.

श्रीचक्रांतील तीन मेखला ओलांडून आपणा आत गेलों म्हणजे आपल्याला सोळा पाकळ्यांचे कमल दिसेल. या सोळा पाकळ्या म्हणजे जशा कांहीं चंद्राच्या सोळा कलाच होत. म्हणूनच या सोळा पाकळ्यांच्या कमलाप्रमाणे असलेल्या चक्राला चंद्रस्वरूप मानलेलें आहे. बरोबर आपल्या बाजूकडील खालच्या पाकळीला आरंभ करून उजवीकडून डावीकडे प्रत्येक पाकळींत कामाकर्षिणी नित्या कलादेवी, बुद्ध्याकर्षिणी नित्या कलादेवी याप्रमाणें सोळा देवींची मंदिरे आहेत. या सोळा देवींना गुप्त योगिनी असें म्हणतात. या सर्व देवतांचे दर्शन घेऊन आपण आत गेलों म्हणजे आपल्याला आठ दलांचे कमल दिसेल. या कमलाची आठ दलें म्हणाजे भगवान् श्रीशंकर यांच्या प्रत्यक्ष आठ मूर्तिच होत. पृथ्वी, जल तेज, वायु आणि आकाश, त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र आणि आत्मा ह्याच त्या शंकरांच्या आठ मूर्ति आहेत. शिवाय या कमलाच्या चारी दिशांची चार दलें आणि चारी कोणांतील चार दलें यांच्यामध्ये अनंगकुसुमादेवी, अनंगमेखलादेवी, अनंगमदनादेवी इत्यादि आठ देवतांची मंदिरे आहेत. त्या मंदिरांत सुप्रतिष्ठित असलेल्या या आठ देवता म्हणजे आपली उपास्यदेवता असलेल्या श्रीराजराजेश्वरी महात्रिपुरसुंदरीदेवीच्या गुप्तचर योगिनीच होत. हें गुप्त खाते मोठे जबरदस्त असून चौदाही भुवनांचे तें निरीक्षण करीत असतें. येथपर्यंत तीन आवरणे संपली.

अष्टदलकमलाचें वर्तुळ ओलांडून आपण आंत गेलों कीं, सर्व बाजूंनी मोकळा असलेला वर्तुलाकार असा बराच मोठा प्रदेश दृष्टीस पडेल. याच प्रदेशाला सुधासिंधु अथवा क्षीरसागर असें म्हटले आहे. या क्षीरसागरांत पुढें मोठे द्वीप दृष्टीस पडेल. याच द्वीपाला मणिद्वीप असें म्हटलेले आहे. यांत आपण प्रवेश केला कीं आपल्याला चौदा त्रिकोण असलेलें श्रीचक्रांतील चौथे आवरण दृष्टीस पडेल. याला सर्वसौभाग्यदायकचक्र असें म्हणतात. या चक्रांतील अधोमुख असलेल्या खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने उजवीकडून डावीकडे असलेल्या प्रत्येक त्रिकोणांत सर्वसंक्षोभिणीशक्ति, सर्वविद्राविणीशक्ति इत्यादि नावे असलेल्या चौदा देवता विराजमान झालेल्या आहेत. यांना संप्रदाययोगिनी असें म्हणतात. याच्यापुढें दोन दशारचक्रें आहेत. एक बहिर्दशार व एक अंतर्दशार. यांतील बाहेरच्या दहा त्रिकोण असलेल्या चक्रांत खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने सर्वसिद्धिप्रदादेवी, सर्वसंपत्प्रदादेवी इत्यादि नांवे असलेल्या दहा देवता सर्व त्रिकोणांत पहावयास सापडतील. हे चक्र दशावतारात्मक श्रीविष्णुस्वरूप आहे असें मानतात. यांतील देवतांना कुलोत्तीर्णयोगिनी असें म्हटलेले आहे. याच दशारचक्राप्रमाणें दुसऱ्या दहा त्रिकोण असलेल्या चक्रांतील प्रत्येक त्रिकोणांत सर्वज्ञादेवी, सर्वशक्तिदेवी, सर्वैश्वर्यप्रदादेवी इत्यादि दहा देवता आहेत. यांना निगर्भयोगिनी असे म्हणतात. याप्रमाणे पाचवे आणि सहावे आवरण ओलांडून आपण आत गेलो म्हणजे आपल्याला आठ त्रिकोण असलेलें सातवें आवरण दिसेल. या सातव्या आवरणांतही खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने वशिनी वाग्देवता, कामेश्वरी वाग्देवता इत्यादि नांवे असलेल्या आठ वाग्देवता प्रत्येक त्रिकोणांत एक-एक याप्रमाणे प्रतिष्ठित झालेल्या आहेत. यांना रहस्ययोगिनी असें म्हणतात.

सर्वरोगहर नांव असलेल्या या सातव्या आवरणांतून आपण आत गेलों की, आपल्याला मुख्य त्रिकोणाचे दर्शन होईल. या त्रिकोणाला सर्वसिद्धिप्रद असें नांव आहे. या त्रिकोणाच्या सभोंवार श्रीकामेश्वर भगवान् सदाशिव आणि श्रीकामेश्वरी महात्रिपुरसुंदरी यांची आयुधे आहेत. धनुष्यबाण, पाश आणि अंकुश अशीं त्या आयुधांची स्वरूपे आहेत. या त्रिकोणाच्या तीन भुजा म्हणजे सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुणप्रधान अशा त्या तीन मूर्तिमंत शक्तिदेवताच आहेत. हा त्रिकोण नादशक्तीचे अधिष्ठान आहे. या त्रिकोणाचा वर्ण तांबड्या दुपारीच्या फुलासारखा आरक्त आहे. या त्रिकोणाच्या भुजांजवळ कामगिरिपीठ, जालंधरपीठ आणि पूर्णगिरिपीठ अशी तीन पीठें म्हणजे आसनस्थाने अथवा सिंहासने आहेत. या सिंहासनांवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपआपल्या शक्तिदेवतेसह विराजमान झालेले आहेत. या देवता जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांच्या अधिष्ठात्री आहेत. त्याचप्रमाणे सृष्टि, स्थिति आणि प्रलय यांच्याही त्या अधिष्ठात्री देवता आहेत. या त्रिकोणाच्या तीन भुजा म्हणजे अग्निचक्र, सूर्यचक्र आणि सोमचक्रच होत. इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति यांच्याही त्या अधिष्ठान आहेत. याच त्रिकोणांत आपल्या महात्रिपुरसुंदरीचेंच रूप बालात्रिपुरसुंदरीच्या रूपाने विराजमान झालेलें आहे. देवता ही मंत्रमय असल्यामुळें श्रीबालात्रिपुरसुंदरीचा मंत्रच या त्रिकोणांत दिलेला असल्याचें आढळतें, तर कांहीं श्रीचक्रांतून श्रीमहात्रिपुरसुंदरीचा पंचदशाक्षरी महामंत्र अथवा महामंत्रराज याच त्रिकोणांत विराजमान झालेले दिसतील. असा हा त्रिकोण अत्यंत महत्त्वाचा आहे.

वर निर्दिष्ट केलेल्या त्रिकोणाच्या आंत मध्यवर्ति असलेला बिंदु, ज्याला बैंदवस्थान असें म्हणतात, तो या श्रीचक्रांतील नववे आवरण होय. या बिंदुस्थानाला सर्वानंदमयचक्र असें म्हणतात. या नांवावरूनच आवरणाचे महत्त्व लक्षांत घ्यावे. हें या चक्रातील सर्वोच्च स्थान होय. जसा किल्ल्यांतील बालेकिल्ला व बालेकिल्ल्यांतील सभागृह. या सभागृहांत मधोमध एक रत्नजडित सिंहासन आहे. या सिंहासनाला चार पाय आहेत. या चारी पायांशीं ब्रह्मदेव विष्णु, रुद्र आणि महेश्वर हे सेवाभावानें नम्र होऊन बसले आहेत. त्या सिंहासनावर परम शिवस्वरूपाशी तादात्म्य पावलेली आपली उपास्यदेवता राजराजेश्वरी श्रीमहात्रिपुरसुंदरी विराजमान झालेली आहे. ती या ठिकाणी शुद्धसच्चिदानंदस्वरूपच आहे. जो साधक श्रीचक्राचा सांगोपांग विचार करीन येथपर्यंत येऊन पोहोंचतो आणि येथें श्रीमहात्रिपुरसुंदरीचे अनन्यचित्ताने दर्शन घेतो तो धन्य होतो. त्याची कर्माधीन जन्ममरण परंपरा संपते व तो साक्षात् शिवस्वरूप होतो.

या बाह्य श्रीचक्राप्रमाणेंच आपल्या देहांतही षट्चक्रस्वरूपी श्रीचक्राचें वर्णन करतां येण्यासारखें आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मरंध्रांतर्गत सहस्रदलकमल हेही एक स्वतंत्र श्रीचक्रच आहे. किंबहुना आपला संपूर्ण देहच श्रीचक्रस्वरूप आहे. या देहातील रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि हे धातु शक्तिचक्रस्वरूप आहेत तर मज्जा, शुक्र प्राण आणि जीव हे धातु शिवचक्रस्वरूप आहेत. "धारणाद्धातवः" या न्यायाने प्राण आणि जीव हे देहाची धारणा करीत असल्यामुळें त्यांनाही धातूच म्हटलें आहे. देहाप्रमाणेच संपूर्ण बाह्मांडही श्रीचक्रस्वरूपच आहे. पंचमहाभूतें हीं शक्तिचक्रस्वरूपच आहेत तर माया, शुद्धविद्या, महेश्वर आणि सदाशिव ही चार तत्त्वें शिवचक्रस्वरूप आहेत. या सर्वामध्ये सर्वोच्च स्थानीं असलेलें श्रीसच्चिदानंदघन परब्रह्मतत्त्व हीच आपली उपास्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी होय.

असें हें श्रीचक्राचें अलौकिक स्वरूप लक्षांत घेऊनच आचार्य वर्णन करीत आहेत : हे आई त्रिपुरसुंदरी ! बिंदुस्थानासह त्रेचाळीस त्रिकोणांनीं अर्थात् चव्वेचाळीस संख्येने पूर्णत्वाला पोहचलेलें तुझें श्रीचक्ररूपी मंदिर मोठे अवर्णनीय आहे. या श्लोकांत श्रीकंठ आणि शिवयुवति हे शब्द लाक्षणिक आहेत. श्रीकंठ हा शब्द शिवाचा वाचक आहे. प्रकृतस्थली श्रीकंठ शब्दानें चार शिवचक्रें समजावींत. त्याचप्रमाणे शिवयुवति या शब्दाचा वाच्यार्थ पार्वती अर्थात् शक्ति असा आहे. पण या ठिकाणी शिवयुवति या शब्दाचा अर्थ शक्तिचक्रें असा समजावा. त्याचप्रमाणें साक्षात् त्रिकोणांची संख्या त्रेचाळीस होत असल्यामुळें कांही पुस्तकांतून "त्रयश्चत्वारिंशात्" असा पाठ आढळतो. या मतानें "शरणकोणाः" या शब्दाचा षष्ठीतत्पुरुष समास मानावा लागतो. "चतुश्चत्वारिंशत्" हा पाठ मानल्यास "शरणकोणाः" या ठिकाणी शरणं च कोणाश्च असा द्वन्द्व समास स्वीकारावा लागतो. कांहीं केलें तरी तात्पर्य एकच आहे. शरण शब्दाचा अर्थ घर किंवा मंदिर असा आहे. <
> हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून एक्याऐंशी दिवस शास्त्रोक्त् पूजा करावी. नैवेद्य गूळ आणि पायस. श्लोकाचा जप रोज एक हजार. यंत्र सिद्ध करून धारण करावे. अथवा या श्लोकाने लोणी अभिमंत्रून एक्याऐंशी दिवस प्राशन करावे, याने वंध्या-दोष निवृत्त होतात.

त्वदीयं सौन्दर्यं तुहिन-गिरि-कन्ये तुलयितुं
कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि-प्रभृतयः ।
यदालोकौत्सुक्यादमर-ललना यान्ति मनसा
तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिश-सायुज्य-पदवीम् ॥ १२॥

श्रीचक्राचे वर्णन केल्यानंतर आचार्य या श्लोकाने श्रीचक्राच्या ठिकाणी अधिष्ठित असलेल्या त्रिपुरसुंदरीच्या रूपसंपत्तीचें वर्णन करीत आहेत. हे तुहिनगिरिकन्ये, तुहिन म्हणजे बर्फ - त्यानें सतत आच्छादिलेला जो गिरि म्हणजे पर्वत अर्थात हिमालय पर्वत, त्याची तूं कन्या आहेस. हे पर्वतराजतनये आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या सौंदर्याची तुलना करण्याकरितां अर्थात् त्याला उपमा देऊन त्याचें वर्णन करण्याकरितां ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र बृहस्पति यांच्यासारखे मोठे मोठे कवि म्हणजे श्रेष्ठ विद्वान असलेले प्रत्यक्ष देव देखील कथमपि म्हणजे कसें तरी मोठा प्रयास करून सुद्धां, "कल्पन्ते किम्" म्हणजे समर्थ होतात काय ? नाही. असेंच या प्रश्नाचें उत्तर द्यावे लागेल. तात्पर्य, हे आई जगज्जननी ! तुझ्या सौंदर्याचें तुलना करून वर्णन करावयास मोठे मोठे इंद्र-बृहस्पतीसारखे देवही समर्थ नाहींत तेथें माझी कथा काय ? मी काय वर्णन करणार ? तुझें सौंदर्य खरोखरच अवर्णनीय आहे.

अमरललना म्हणजे देवांच्या स्त्रिया देवता, अप्सरा वगैरे तुझें लावण्य अवलोकन करण्यास जेव्हां उत्कंठित होतात तेव्हां त्या मनाने शंकरांची समाराधना - उपासना करतात. योग, याग, तपश्चर्या इत्यादि साधनांनींही मिळविण्यास कठीण असलेले शिवपद, त्या भक्तिपूर्वक शंकरांची उपासना करून प्राप्त करून घेतात. "गिरिशसायुज्यपदवीं यान्ति" केवल मनःपूर्वक केल्या जाणाऱ्या भक्तीने त्या देवता आणि अप्सरा गिरिशांच्या म्हणजे शंकरांच्या सायुज्य पदवीला शिवसायुज्यपदाला पोहोंचतात, अर्थात् त्या शिवस्वरूप होतात. तात्पर्य, शिवस्वरूप होऊनच त्या तुझ्या सौंदर्याचा आस्वाद घेतात. केवळ मनाने शिवस्वरूप होऊन तुझ्या सौंदर्याला अवलोकन करण्याचा त्या मनोरथ करीत असतात असाही याचा अर्थ कांहीं विद्वान् करतात. तात्पर्य, श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या सौंदर्याशीं तुलना करावी असें जगांत दुसरें कोणीच नाहीं. ब्राह्मी, वैष्णवी, इंद्राणी इत्यादि देवता किंवा उर्वशी, तिलोत्तमा, रंभा इत्यादि अप्सरा ह्या तर श्रीत्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यलेशाच्या पासंगालाही पुरत नाहींत मग त्रिपुरसुंदरीच्या सौंदर्याला त्यांची काय उपमा देणार ?

श्रीत्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यांचा आस्वाद भगवाच श्रीसदाशिवच घेऊं शकतात म्हणून त्या देवता मनानें सदाशिवाची उपासना करून सदाशिवस्वरूप होतात व सदाशिवाशीं तादात्म्य पावूनच त्या महात्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यांचा आस्वाद घेतात, असें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचे सौंदर्य अपूर्व आहे. या अभिप्रायाने आचार्य म्हणतात, आई ! तुझ्या सौंदर्याचें मी काय वर्णन करणार ? यांत आचार्यांनी अनन्वयालंकार मोठ्या युक्ताने ध्वनित केला आहे.

या श्लोकाचे यंत्र समचतुष्कोण असून त्यांत एकाखाली एक सौः सौः अशीं अक्षरे लिहिलेली असतात. हें यंत्र देवाच्या ताम्हणांत पाण्यावर लिहावे पंचेचाळीस दिवस विधिवत् पूजा करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. ताम्हणांतील जलाला स्पर्श करून या श्लोकाचा एक हजार रोज जप करावा. याप्रमाणे अभिमंत्रित केलेलें तें पाणी व मध प्राशन करावा. याने विद्या, वक्तुरत्व आणि सर्व लोकवशित्व प्राप्त होतें.

नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसु जडं
तवापाङ्‌गालोके पतितमनुधावन्ति शतशः ।
गलद्वेणी-बन्धाः कुच-कलश-विस्रस्त-सिचया
हठात् त्रुट्यत्काञ्च्यो विगलित-दुकूला युवतयः ॥ १३॥

श्रीमहात्रिपुरसुंदरी ही स्वतः तर अत्यंत सुंदर आहेच, पण तिच्या कृपाकटाक्षाचा लेशही ज्याला लाभतो तो देखील सुंदर बनतो अशा अभिप्रायाने आचार्य वर्णन करीत आहेत. आई त्रिपुरसुंदरी ! मनुष्य "वर्षीयांसं" म्हणजे कितीही वृद्ध असला, डोळयांनी पहावत नाहीं असा विद्रूप असला, मनोरंजक हावभाव विनोद वगैरे गोष्टींमध्ये तो जड म्हणजे अनभिज्ञ असला तरी देखील तो तुझ्या कृपाकटाक्षाच्या टप्प्यांत आला असतां अर्थात् तुझ्या कृपाकटाक्षाची त्याला प्राप्ति झाली असतां शेकडो तरुण स्त्रिया पाठीमागे धांवतात. त्यांची जणुं कांहीं तारांबळ उडते. वेणीबंध शिथिल होतात. खांद्यावरचे "सिचय" म्हणजे पदर खालीं पडतात. कंबरपट्टे निसटतात आणि त्यांना वस्त्राचेंही भान उरत नाहीं ! तात्पर्य, तुझ्या कृपाकटाक्षाला पात्र झाल्याबरोबर तुझा भक्त इतका आकर्षक बनतो कीं, त्याच्याकडे पाहून तरुण स्त्रियांचीही ही अवस्था होते मग इतरांना तो आकर्षक वाटेल यांत नवल काय ? आई, धन्य आहे तुझा कृपाकटाक्षमहिमा !

या श्लोकाचें यंत्र एक लंब चतुष्कोण काढून त्यामध्ये क्लीं क्लीं क्लीं अशा तीन बीजांच्या दोन ओळी एकाखालीं एक लिहाव्यात. त्या दोन ओळींत मध्ये थोडे अंतर सोडावे. त्या अंतरांत आपल्या साध्याचा उल्लेख करावा. हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून सहा दिवस आराधना करावी. नैवेद्य गुळ, नारळ आणि केळांचें मिश्रण. या श्लोकाचा एक हजार जप करावा. फल स्त्री वश होते.

क्षितौ षट् पञ्चाशद् द्वि समधिक पञ्चाशदुदके
हुताशे द्वाषष्टिश्चतुरधिक-पञ्चाशदनिले ।
दिवि द्विष्षट्त्रिंशन् मनसि च चतुःषष्टिरिति ये
मयूखास्तेषामप्युपरि तव पादाम्बुज-युगम् ॥ १४॥

श्रीविद्यारूप महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलाचा महिमा या श्लोकाने आचार्य वर्णन करीत आहेत. आपल्या शरीरामध्ये सहा चक्रें आहेत. मूलाधार स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धि आणि आला अशी त्या चक्रांची नावे आहेत. या सर्वांशी चक्र शब्द योजिला जातो. क्रमशः पृथ्वी अग्नि जल, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें आणि मन या सर्व तत्त्वांची ही चक्रें अधिष्ठान आहेत. ही तत्त्वें, या तत्त्वांतून अभिव्यक्त होणारा शब्दप्रपंच आणि अर्थप्रपंच म्हणजे त्या शब्दाचे वाच्यार्थ असलेल्या पदार्थांची सृष्टि. त्याचप्रमाणें त्या अक्षरांच्या व अर्थांच्या अधिष्ठात्री देवता हे सर्व त्या षट्चक्रांच्या दलांतूनच वास्तव्य आणि व्यवहार करीत असतात. या सर्व देवता चित्स्वरूप आणि स्वयंप्रकाश असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच अंशभूत देवता आहेत. अग्नीपासून जसे स्फुलिंग प्रकट व्हावेत किंवा सूर्यापासून जसे चोहोंकडे किरण पसरावेत त्याचप्रमाणे हीं सर्व तत्त्वें आणि या सर्व देवता श्रीललितात्रिपुरसुंदरीच्याच स्वरूपांतून प्रकट झालेल्या आहेत. श्रीविद्यास्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीचे ते किरणच मानले जातात. या किरणांनाच उद्देशून प्रस्तुत श्लोकाच्या चौथ्या चरणांत मयूख हा शब्द उपयोगांत आणला आहे. "मयूख" म्हणजे किरण.

किरणें ही अनंत असली तरी परम सूक्ष्म मुलतत्त्वस्वरूप निरनिराळ्या चक्रांतील निरनिराळ्या तत्त्वांची किरणें ही सांकेतिक स्वरूपानें व संक्षिप्त संख्येने निर्दिष्ट करून सांगत आहेत. "क्षितौ" म्हणजे पृथ्वीतत्त्वाने युक्त असलेल्या मुलाधारचक्रामध्यें, "षट्पञ्चाशत्" म्हणजे छप्पन किरणें आहेत. सोळा स्वर आणि चौतीस व्यंजने मिळून पन्नास अक्षरे होतात. ही अक्षरें पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पचज्ञानेन्द्रियें, पंचकर्मेन्द्रिये, अंतःकरणचतुष्टय, दशविधमाण प्रकृतितत्त्व पुरुषतत्त्व इत्यादि तत्त्वांची सूचक आहेत. ही पन्नास अक्षरे अधिक ऐं ह्रीं श्रीं, ऐं क्लीं सौः ही मंत्रबीजाक्षरें सहा मिळून छप्पन्न किरणें पृथ्वीची अर्थात पृथ्वीतत्त्वाच्या मूलाधारचक्रांतील आहेत. ही छप्पन किरणे शिवशक्तिस्वरूप असल्यामुळें त्यांची जोडीजोडीनें अठ्ठावीस नांवेंही शास्त्रांत सांपडतात. उदाहरणार्थ, त्रिपुरसुंदरी, त्रिपुरसुंदर; महावज्रेश्वरी, महावज्रेश्वर; कुलसुंदरी, कुलसुंदर; परमेश्वरी, परमेश्वर इत्यादि. याप्रमाणे अठ्ठावीस दुणे छप्पन्न किरणें पृथ्वीतत्त्वात्मक मूलाधारचक्रांत आहेत. याचप्रमाणें जलतत्त्वामक मणिपूरचक्रांत बावन्न किरणे आहेत. याचप्रमाणें अग्नितत्त्वात्मक स्वाधिष्ठानचक्रामध्ये बासष्ट किरणें आहेत. श्लोकातील उदक शब्दानें मणिपूरचक्र आणि हुताश शब्दानें अग्नितत्त्वाचें स्वाधिष्ठानचक्र घ्यावयाचें आहे.

"अनिले" अनिल म्हणजे वायु अर्थात् वायुतत्त्वात्मक हृदयाच्या जवळ असलेलें अनाहतचक्र. या चक्रांतही पन्नास मातृका म्हणजे मुळाक्षरे अधिक चार भूतांची बीजे यं रं लं वं मिळून चोपन्न किरणे आहेत. त्यांचींही अमृताकर्षिणी अमृताकर्षण; शरीराकर्षणी शरीराकर्षण इत्यादि नांवे आहेत. यानंतर "दिवि" म्हणजे कंठस्थानीं असलेल्या आकाशतत्त्वयुक्त विशुद्धिचक्रामध्यें "द्विः षट्त्रिंशत्" म्हणजे बहात्तर किरणें आहेत. याच्याही वर मन या तत्त्वानें युक्त असलेल्या आज्ञाचक्रांत चौसष्ट किरणें आहेत. या सर्व किरणांची बेरीज केली तर एकंदर तीनशेसाठ संख्या होते. एक वर्षाच्या कालचक्रांतही तीनशेंसाठ दिवस समाविष्ट झालेले असतात हें आपणांस माहीतच आहे. आपल्या देहांत जशी षट्चक्रे आहेत त्याचप्रमाणे एका वर्षाच्या कालखंडांतही वसंत, ग्रीष्म इत्यादि सहा अयनें असतात. ही अयनें संवत्सरात्मक कालपिंडांतील मुलाधारादि षट्चक्रेंच होत. तात्पर्य, जें कालपिंडांत तेंच देहपिंडांत आणि जें देहपिंडांत तेंच ब्रह्माण्डपिंडात अशी ही सर्व कल्पना लक्षांत घेऊन आचार्य म्हणतात, हे आई त्रिपुरसुंदरी ! याप्रमाणे वेदांत, शास्त्रांत आणि योगीजनांच्या अनुभवांत प्रसिद्ध असलेली जी किरणें (देवता आणि तत्त्वें) आहेत "तेषां अपि उपरि तव पादाम्बुजयुगं आस्त" म्हणजे त्या सर्वांच्याही वर श्रीचक्रांतील बिंदुस्थानांत, त्याचप्रमाणें कालचक्राच्याही वर आणि सर्वतत्त्वात्मक ब्रह्मांडाच्याही वर अर्थात् कालातीत आणि सर्वतत्त्वातीत अशा अनिर्वचनीय सर्वानंदमय आवरणांत तुझे चरणारविंद विराजमान झालेले आहेत. ते आमच्या देहपिंडांतही सर्वांच्यावर विराजमान असलेल्या ब्रह्मरंध्रांतर्गत सहस्रदलकमलातील पूर्ण चंद्रमंडलातही विराजमान झालेले आहेत. आई ! त्या तुझ्या चरणारविंदांचा महिमा मी काय वर्णन करणार ?

या श्लोकाचे यंत्र - समभूज चतुष्कोण काढावा. चारी कोणांत एकत्र मिळणाऱ्या रेघांची टोकें किंचित् बाहेर काढून तेथें त्रिशूळाचा आकार द्यावा. एकंदर आठ त्रिशूल होतील. मधल्या भागांत क्लीं क्लीं क्लीं ही बीजे आडव्या दोन ओळींत लिहावींत. त्या दोन ओळींमध्ये आपल्या साध्याचा निर्देश करावा. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून पूर्वेकडें तोड करून एकवीस दिवस समाराधना करावी. उसाच्या गंडेऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज पाचशे वेळां या श्लोकाचा जप करावा. सिद्धयंत्र धारण करावे याने षंढत्वनिरास आणि पुत्रप्राप्ति होते.

शरज्ज्योत्स्ना-शुद्धां शशि-युत-जटाजूट-मुकुटां
वर-त्रास-त्राण-स्फटिक-घटिका-पुस्तक-कराम् ।
सकृन्न त्वा नत्वा कथमिव सतां सन्न्निदधते
मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः ॥ १५॥

"हे मातः त्वा सकृन्नत्वा सतां मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः कथं इव न सन्निदधते ? अपि तु सन्निदधते एव" असा या श्लोकाचा मुख्य अन्वय आहे. आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या चरणी (भक्तिभावाने) एक वेळ जरी नमस्कार केला तरी देखील त्याला मोठ्या मोठ्या सज्जनांचे, कवीश्वरांचे गोड गोड शब्द - जे दूध, मध अथवा मनुका-द्राक्षें यांच्या माधुर्यालाही मागें सारतील ते कां बरें प्राप्त होणार नाहींत ? का बरें ते त्याच्या सान्निध्यांत येणार नाहींत ? अर्थात् अवश्य येतील. त्याच्या मुखांत उत्तम वाणी, उत्तम शब्द वास करतील. असा या मुख्य अन्वयाचा अर्थ आहे.

आई ! कशी आहेस तूं ! "शरज्ज्योत्स्नाशुद्धाम्" तुझें रूप, तुझी कांति ही शरदृतूंतील चंद्राच्या चांदण्याप्रमाणे अत्यंत शुद्ध म्हणजे स्वच्छ, शुभ्र, आहाददायक अशी आहे. त्याचप्रमाणे "शशियुत-जटा-जूट-मुकुटाम्" म्हणजे तुझ्या जटाजूटावर अर्थात् मस्तकावर शोभणाऱ्या मुकुटांत चंद्राची कोर झळकत आहे. चंद्राची कोर ही तुझें शिरोभूषण आहे. आई ! तुझ्या चार हातांपैकीं एका हातानें तूं "वर" म्हणजे वरसुद्धा धारण केलेली आहेस. दुसऱ्या हातानें "त्रासत्राण" म्हणजे भयापासून संरक्षण अर्थात् अभयमुदा धारण केलेली आहेस. एका हातांत स्फटिकाचा कलश धारण केलेला आहेस तर एका हातांत पुस्तकच धारण केले आहेस. स्फटिकघटिका या ठिकाणी कांहीं विद्वान "स्फटिकघुटिकां" असा पाठभेद स्वीकारतात आणि स्फटिक मण्यांची माळ असा त्याचा अर्थ करतात तोही योग्यच आहे. "स्फटिकगुलिका" असाही पाठ कांहीं ठिकाणी आढळतो. अर्थ एकच आहे. आई ! अशा या तुझ्या स्वरूपाचें ध्यान करून तुझ्या चरणी भक्तिभावाने एक वेळ जरी नमस्कार केला तरी त्याला दूध, मध आणि द्राक्षें यांच्या माधुर्यालाही जिंकून पुढें पाऊल टाकतील असे गोड शब्द, मनोहर शब्द आणि "सतां" म्हणजे बृहस्पतीसारख्या सज्जनांचे - कवीश्वरांचेही गुण त्याला प्राप्त होतात. आई ! तुझ्यासारखी सर्वसमर्थ कृपाळू प्रसन्न झाल्यानंतर काय बरें दुर्लभ आहे ?

हें श्रीत्रिपुरसुंदरीच्या वाग्वादिनी रूपाचें अथवा श्रीसरस्वतीरूपाचें ध्यान असल्यामुळें चौथ्या श्लोकाशी विरोध मानण्याचे कांहींच कारण नाहीं. श्रीबालात्रिपुरसुंदरीचेंही ध्यान असेंच आहे. फणिति शब्दाचा अर्थ वाग्वैभव अथवा वक्तृत्वशक्ति असा समजावा.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून एक्केचाळीस दिवस त्याची समाराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. नैवेद्य मध, केळे आणि साखर. सिद्ध यंत्र धारण करावें अथवा हें यंत्र पाण्यामध्यें लिहून पूर्ववत् पूजा आणि जप करून तें पाणी प्यावें. साधकाला कवित्वशक्ति - लाभ होईल तो ज्ञानविज्ञान संपन्न होईल.

कवीन्द्राणां चेतःकमलवन-बालातप-रुचिं
भजन्ते ये सन्तः कतिचिदरुणामेव भवतीम् ।
विरिञ्चि-प्रेयस्यास्तरुण-तर-शृङ्‌गार-लहरी-
गभीराभिर्वाग्भिर्विदधति सतां रञ्जनममी ॥ १६॥

"ये अरुणामेव भवतीं भजन्ते ते वाभिः सतां रञ्जनं विदधति" असा या लोकाचा मुख्य अन्वय आहे. हे आई त्रिपुरेश्वरी ! तुझा स्वाभाविक वर्ण अरुण आहे आणि तुझें नांवही पण अरुणाच आहे तेव्हां वर्णानें आणि नांवानेंही तूं अरुणा असल्याचें शास्त्रांत वर्णन केले आहे. तुझ्या या स्वरूपाचें जे कोणी सल्जन ध्यान करतात ते आपल्या अपूर्व वाग्विलासांनी सजनांची, मोठ्या मोठ्या विद्वानांची अथवा देवतांचीही मने रमविण्यास समर्थ होतात असा या अन्वयाचा अभिप्रेतार्थ आहे.

वामकेश्वर तंत्रामध्यें "अरुणाख्यां भगवतीमरुणाभां विचिन्तयेत्" असें सांगितले आहे. श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचेंच हें एक रूप आहे या रूपांत अंगकांति अरुणवर्ण आहे. नांवही अरुणा असेंच आहे. सर्वैश्वर्यसंपन्न असलेल्या या अरुणादेवीला आठ हात असून पाश, अंकुश, धनुष्य, बाण, वरमुद्रा, अभयमुद्रा, पुस्तक आणि स्फटिकाच्या मण्यांची माळ तिने आपल्या हातांनीं धारण केलेली आहेत. तिला तीन नेत्र आहेत. ती अमृताच्या सागरामध्ये क्रीडा करीत आहे. याप्रमाणे जो साधक त्या मंगलमय देवीचे ध्यान करतो तो मोठा विद्वान् आणि कवि होतो. आपल्या अद्‌भुत आणि मधुर वाणीने तो विद्वानांचे व सज्जनांचे मनोरंजन करतो. या वर्णनाला अनुलक्षून आचार्य या श्लोकांत वर्णन करीत आहेत. हे आई, षड्गुणैश्वर्यसंपन्न माते ! ब्रह्मदेव, बृहस्पति इंद्र इत्यादि जे कवींद्र म्हणजे कवीश्वर अर्थात् ज्ञानी लोक, त्यांच्या अंतःकरणरूपी कमलांच्या वनाला प्रफुल्लित करणाऱ्या बालातपाप्रमाणें म्हणजे बालरवीच्या किरणांमाणे तुझी अंगकांति अरुणवर्ण आहे. बालरवि म्हणजे नुकताच उदयाला आलेला सूर्य. तो जसा अरुणवर्ण तशीच तुझी अंगकांति अरुणवर्ण आहे. तुझें नांवही पण अरुणा असेंच आहे. जे कांहीं सज्जन अशा तुझ्या रूपाचे ध्यान करतात, अशा रूपानें तुला भजतात ते देखील "विरिश्चिप्रेयसी" म्हणजे ब्रह्मदेवाची जी प्रिय पत्नी श्रीसरस्वतीदेवी तिच्या नव्या नव्या मधुरतम श्रृंगाररसाच्या तरंगानी युक्त अशा वाग्विलासांनीं सज्जनांच्या मनांचे रंजन करतात. तात्पर्य, "अमी" म्हणजे हे तुझी उपासना करणारे साधक तुझ्या उपासनेने प्राप्त झालेल्या अशा सर्वगुणसंपन्न वाग्वैमवाने सज्जनांची आणि मोठ्या मोठ्या विद्वज्जनांचींही मने रमवितात. आई, असा हा तुझा महिमा आहे. तो "मूकं करोति वाचालम्" म्हणजे मुक्यालाही "वाचा" म्हणजे वाग्वैभवाने "अलंकरोति" म्हणजे अलंकृत करतो, भूषवितो. आई ! माझा तुला नमस्कार असो. कांहीं लोक या श्लोकांत श्रीबालात्रिपुरसुंदरीचें ध्यान अभिप्रेत आहे असे मानतात.

"अरुण-किरण-जालैरञ्जिता सावकाशा
विश्वत-जप-पटीका-पुस्तकाऽभीति-हस्ता ।
इतरकर-वराढ्या फुल्ल-कल्हार-माला
निवसतु हाई बाला नित्य-कल्याणशीला ॥ "

श्रीबालात्रिपुरसुंदरीच्या चिंतनानेंही साधकाचे ऐहिक व पारलौकिक जीवन धन्य होतें.

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढावा. त्रिकोणाच्या तिन्ही कोंपर्‍यांत बाहेरच्या बाजूनने त्रिशूळाचा आकार काढावा. एकेचाळीस दिवस समाराधना करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. सिद्ध यंत्र धारण करावे. वेदशाखादि विद्येमध्ये तो निष्णात होईल.

सवित्रीभिर्वाचां शशि-मणि-शिला-भङ्‍गरुचिभि-
र्वशिन्याद्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः ।
स कर्ता काव्यानां भवति महतां भङ्‌गिरुचिभि-
र्वचोभिर्वाग्देवी-वदन-कमलामोद-मधुरैः ॥ १७॥

"हे जननि ! वाचा सवित्रीभिः शशि-मणि-शिला-भङ्‌ग-रुचिभिः वशिन्याद्याभिः सह त्वां यः सश्चिन्तयति, सः महतां भङ्‌गिरुचिभिः वाग्देवी-कमला-गोदमधुरेः वचोभिः काव्यानां कर्ता भवति" असा या श्लोकाचा अन्वय आहे. हे आई जगज्जननी ! वाक्‌शक्तीला निर्माण करणाऱ्या आणि सर्व मुळाक्षरांच्या अधिष्ठात्री असलेल्या तसेंच चंद्रकांत रत्नाच्या तुकड्याप्रमाणे ज्यांची अंगकांति स्वच्छ व शुभ्र आहे अशा वशिनी, कामेश्वरी, मोदिनी इत्यादि ज्या आठ वाग्देवता आहेत त्यांच्यासह जो भक्त भक्तियुक्त अंतःकरणानें, तुझें चिंतन करील तो खरोखर मोठ्या मोठ्या विश्वमान्य असलेल्या सुप्रसिद्ध कवींच्या काव्यरचने प्रमाणे सुंदर असलेल्या आणि वाग्देवीच्या अर्थात् सरस्वतीच्या मुखकमलांतील आमोदाने मधुर असलेल्या अशा गोड गंभीर व मनोरंजक शब्दांनी उत्तम काव्य करणारा होईल. असें तुझ्या ध्यानाचे फल आहे. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

यांतील अभिप्राय असा आहे कीं, श्रीललितात्रिपुरसुंदरी ही मातृकारूप आहे. मातृका शब्दाचा अर्थ वर्णसमुह असा आहे. अ- पासून क्ष-पर्यंत संपूर्ण वर्णसमूहाच्या अधिष्ठात्री देवतेला ही मातृका असेंच म्हणतात. या सर्व मातृकांचा समावेश श्रीचक्रांत झालेलाच आहे. श्रीचक्राची अधिष्ठात्री देवता आणि संपूर्ण मातृकांची अधिष्ठात्री देवता श्रीमहात्रिपुरसुंदरी ही एकच आहे. याच अभिप्रायाने तंत्र शास्त्रांत "मातृकां वशिनीयुक्तां योगिनीभिः समन्विताम् । गन्धाद्याकर्षिणीयुक्ता संस्मरेत्त्रिपुराम्बिकाम्" या श्लोकाने मातृका आणि त्रिपुराम्बिका या दोन्ही शब्दांनी एकाच देवतेचा निर्देश केलेला आहे. वेदांतही "गन्धद्वारां दुराधर्षां" या मंत्राने -याच मातृकारूप श्रीविद्यामहात्रिपुरसुंदरीचाच मंत्राच्या शेवटीं "श्रियम्" पदाने निर्देश केलेला आहे. श्रीचक्रामध्यें अधिष्ठित असलेल्या मातृकारूपी श्रीविद्या देवीच्या उपासनेनें उपासक कवि आणि विद्वान् होतो. अशी या उपासनेची फलश्रुति आहे.

वर निर्दिष्ट केलेल्या मातृका संख्येने पन्नास आहेत. या मातृकांचे आठ वर्ग कल्पिलेले आहेत. अवर्ग, कवर्ग, चवर्ग, टवर्ग तवर्ग, पवर्ग, यवर्ग आणि शवर्ग अशीं त्या वर्गांची नावें आहेत. अवर्गामध्यें सोळा स्वर येतात. कवर्गापासून पवर्गापर्यंत पंचवीस अक्षरे येतात. यांना व्याकरणांत स्पर्श अशी संज्ञा आहे य-वर्गामध्यें य, व, र, ल अशीं चार अक्षरे आहेत. त्यांना अंतस्थवर्ण असें म्हणतात. तसेंच शवर्गामध्यें श, ष, स, ह आणि क्ष अशीं पांच अक्षरे येतात एकूण या अक्षरांची संख्या पन्नास अक्षरे म्हणजे आपल्या श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचेंच रूप होय.

वर सांगितलेल्या आठ वर्गांच्या ज्या आठ देवता आहेत त्यांना वाग्देवता असें म्हणतात. वशिनी, कामेश्वरी, मोदिनी, विमला इत्यादि त्यांचीं नावें आहेत. या वाग्देवतांबरोबरच विद्या, रेचिका, मोचिका इत्यादि बारा योगिनी आणि गंधाकर्षिणी, रूपाकर्षिणी इत्यादि चार शक्तिदेवता या सर्वांसह शास्त्रांत वर्णन केल्याप्रमाणें त्यांची नांवे, रूपे व ध्यानें लक्षांत घेऊन श्रीमहात्रिपुरसुंदरीचे चिंतन केलें असतां साधकाला विद्वत्त्व आणि कवित्व यांचा लाभ होतो. अशा अभिप्रायाने आचार्यांनी या सतराव्या श्लोकांत महात्रिपुरसुंदरीचें वर्णन केलेले आहे.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून एक्याण्णव दिवस त्याची विधिपूर्वक पूजा करावी. मध, केळे, दूध, साखर आणि खडीसाखर यांचें मिश्रण करून नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार या श्लोकाचा जप करावा. सिद्ध यंत्र धारण करावें. याच्या योगें बुद्धि सर्व कलामध्यें निष्णात होईल.

तनुच्छायाभिस्ते तरुण-तरणि-श्रीसरणिभि-
र्दिवं सर्वामुर्वीमरुणिमनि मग्नां स्मरति यः ।
भवन्त्यस्य त्रस्यद्वन-हरिण-शालीन-नयनाः
सहोर्वश्या वश्याः कति कति न गीर्वाणगणिकाः ॥ १८॥

हे आई जगज्जननी ! नुकतेच उदयाला येत असलेलें सूर्यांचे बिंब जसें आरक्तवर्ण असावें त्याचप्रमाणे तुझ्या शरीराची कांति आरक्त आहे. तरुणतर म्हणजे अत्यंत बालस्वरूपांतला अर्थात् नुकताच उदयाला येणारा असा जो तरणि म्हणजे सूर्य अर्थात् बालरवि. त्याच्या कांतीप्रमाणे आहे श्रीसरणि म्हणजे शोभेचा प्रकार अथवा पद्धति ज्यांची अशा तुझ्या "तनुच्छाया" म्हणजे अंगकांतींनीं अंतरिक्षलोक आणि संपूर्ण भूलोक जणुं कांहीं अरुणवर्णामध्यें निमग्न झाला आहे. तुझ्या अरुणवर्णामध्यें स्वर्गलोक आणि संपूर्ण भूलोक न्हाऊन निघाला आहे अशा स्वरूपानें जो कोणी तुझें चिंतन करील, स्वच्छंदपणे अरण्यामध्यें बागडत असतांना भ्यालेल्या - घाबरलेल्या हरिणीप्रमाणे ज्यांचे नेत्र शालीन म्हणजे सुंदर आणि चंचल आहेत अशा उर्वशीसह किती तरी देवांच्या गणिका म्हणजे अप्सरा त्याला कां वश होणार नाहींत ? सर्वच अप्सरा त्याला वश होतील. असा याचा अर्थ समजावा. तात्पर्य, तो तुझा भक्त अप्सरांच्याही चित्ताला मोह पडेल इतका सुंदर होतो. हा तुझ्या ध्यानाचा महिमा आहे. उर्वशी हें एका अप्सरेचे नांव आहे ती आपल्या रूपानें 'उरु' म्हणज श्रेष्ठ अशा ऋषिमुनि-देवांनाही 'वशयति' म्हणजे वश करते म्हणून तिला उर्वशी असें नाव पडले.

है यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. नैवेद्य दूध, पायस आणि तांबूल. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्धयंत्र यंत्र धारण करावे. चंद्रन, केशर अथवा फूल अभिमंत्रून द्यावे. सकल प्राणी वश होतील.

मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो
हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषि ते मन्मथकलाम् ।
स सद्यः संक्षोभं नयति वनिता इत्यतिलघु
त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवीन्दु-स्तन-युगाम् ॥ १९॥

"हे हरमहिषि ! मुखं बिन्दुं कृत्वा, तस्य अधः कुचयुगं कृत्वा, तदध हरार्धं कृत्वा, यः ते मन्मथकलां ध्यायेत् सः वनिताः सद्यः संक्षोभं नयति इति अतिलघु सः रवीन्दुस्तयुगां त्रिलोकीं अपि आशु भ्रमयति " असा या श्लोकाचा अन्वय आहे. या श्लोकाचा अर्थ वाचण्यापूर्वी वाचकांनी देवीभुजंगमस्तोत्रांतील सोळाव्या आणि सतराव्या श्लोकाचें विवेचन अवश्य वाचावे.

हर म्हणजे कामेश्वर भगवाच श्रीशंकर. त्यांची महिषी म्हणजे पट्टराणी कामेश्वरी श्रीललितामहात्रिपुरसुंदरी देवी. हे माते, त्रिपुरसुंदरी ! तुझी मन्मथकला म्हणजे कामकला अर्थात क्लीं हें बीजाक्षर अथवा ह्रीं या बीजांतील केवल ईं इत्याकारक बीजाक्षर. हें बीजाक्षर मंत्ररूपानें तर तुझें स्वरूप आहेच, पण आकृतीनेही तें तुझें मूर्तस्वरूप आहे. जो कोणी तुझ्या या मूर्तस्वरूपाचे ध्यान करील - उपासना करील, तो आपल्या अद्वितीय प्रभावाने त्रैलोक्यालाही मोहित करील. अशा अभिप्रायाने आचार्य या श्लोकानें महात्रिपुरसुंदरीचे वर्णन करीत आहेत.

ईं या बीजांत सर्वात वर एक बिंदु आहे. त्याच्या खाली दोन बिंदु असून त्यांच्याही खालीं ह या अक्षराचा अर्धा भाग आहे, ज्याला हार्दकला, योनि अथवा त्रिकोण असें म्हणतात. हार्दकला या शब्दाचाही अर्थ मन्मथकला किंवा कामकला असाच आहे. काम शब्दाचा अर्थ या ठिकाणी परमेश्वर भगवान सदाशिव असा आहे. "काम्यते सर्वैः इति कामः" आपल्या अभ्युदयासाठी सर्वांकडून ज्याची अपेक्षा केली जाते तो काम म्हणजे परमात्मा. त्याचें वास्तव्यस्थान हृदयच आहे. "ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति" हें गीतावचन प्रसिद्धच आहे. या अभिप्रायानें ईश्वराला 'हार्द' असे म्हणतात. त्याची जी कला म्हणजे शक्ति ती कामकला. अर्थात् श्रीललितामहात्रिपुरसुंदरी असा कामकला या शब्दाचा अर्थ होतो. त्रिपुरसुंदरीचा जो बीजमंत्र ईं इत्याकारक अक्षर, त्यालाही पण कामकला असेंच म्हणतात. कारण मंत्र आणि देवता दोन्ही एकरूपच असतात.

ईं या बीजांतील वरचा बिंदु हा शुद्ध रविस्वरूप आहे. "रूयते स्तूयते इति रविः" या व्युत्पत्तीप्रमाणे रवि शब्दाचा अर्थ सर्वांकडून स्तविला जाणारा परमात्मा असा होतो. तोच शक्तिसहकृत परमात्मा मुख्य बिंदूच्या रूपानें सर्वांत वर आहे. त्याच्या खालीं असलेले दोन बिंदु हे अग्नितत्त्व आणि सोमतत्त्व या स्वरूपाचे आहेत. अग्नि आणि सोम या दोन तत्त्वांनींच सर्व जगाचें पोषण होत असतें. याच अभिप्रायाने सर्व जगच "अग्नीषोमात्मक" मानले जातें. त्याच्याही खालीं असलेलें तत्त्व ज्याला योनि अथवा प्रकृति म्हणतात तें तर या जगाचे मूळकारणच आहे. याप्रमाणे परमात्मा, अग्नि, सोम आणि मूलप्रकृति हेंच आपल्या त्रिपुरसुंदरीचे रूप होय.

"नभो महाबिन्दुमुखी चन्द्रसूर्यस्तनद्वया ।
सुमेरु-हार-वलया शोभमाना महीपदा ॥
पाताल-तलविन्यासा त्रिलोकीयं तवाम्बिके ।
कामराज-कला-रूपा जागर्ति सचराचरा ॥ "

असें हें कामकलारूप श्रीत्रिपुरसुंदरीचे चित्र रुद्रयामलामध्ये वर्णिले आहे. या स्वरूपाच्या उपासनेला तंत्रशास्त्रांत मादनप्रयोग असेंही म्हटले आहे. निष्कामरूपानें केली जाणारी ही उपासना साधकाचे जीवन धन्य करते.

ईं बीजामध्ये तो जो रविरूप सर्वांत वर असलेला बिंदु तेंच श्रीमहात्रिपुरसुंदरीचे मुख आहे अशी भावना करावी. असा हा मुखं बिन्दुं कृत्वा याचा अर्थ झाला. त्यानंतर त्याच्या खालीं दोन बिंदूंच्या रूपाने अग्नि आणि सोम ही जी दोन तत्त्वे आहेत ते महात्रिपुरसुंदरीचें स्तन समजावेत. या ठिकाणीं स्तन या शब्दाने कंठापासून नाभिस्थानापर्यंतचा भाग समजावा. त्याचप्रमाणें त्या दोन बिंदूंच्या खालीं असलेला, ह या अक्षराच्या अर्धा भागाप्रमाणे दिसणारा भाग किंवा त्रिकोणामध्ये दिसणारा हा भाग आपल्या श्रीत्रिपुरसुंदरीच्या नाभिस्थानापासून चरणकमलापर्यंतचा भाग आहे अशी भावना करावी. याप्रमाणे माते ! जो तुझ्या मन्मथकलेचें अर्थात् ईं या बीजमंत्राच्या रूपाने नटलेल्या तुझें "यो ध्यायेत्" म्हणजे जो ध्यान करील, 'सः' तो भक्त त्या उपासनेच्या बलाने इतका प्रभावी होईल कीं, तो आपल्याकडे सर्व जगांतील स्त्रियांना आकृष्ट करून घेईल हें अगदीं सामान्य आहे. तो सूर्यमंडल आणि चंद्रमंडल हे दोन जिचे स्तन आहेत अर्थात विश्वाच्या पोषणाची साधने आहेत, त्या त्रिलोकरूपी कामिनीलाही आपल्याकडे सत्त्वर आकृष्ट करून घेईल. सारें त्रैलोक्य त्याच्यावर मुग्ध होईल असा याचा अर्थ आहे. आचार्य म्हणतात, आई, ईं या बीजाक्षराच्या रूपाने नटलेल्या तुझ्या स्वरूपाच्या ध्यानाचा हा केवढा महिमा आहे ! तंत्रशास्त्रांतील निरनिराळ्या ग्रंथांत ठिकठिकाणी याप्रमाणें श्रीमहात्रिपुरसुंदरीचें ध्यान करण्याचें विधान केलेलें आहे. विस्तारभयास्तव त्यांचा येथें निर्देश करतां येत नाहीं.

सोन्याच्या पत्र्यावर वर्तुलाकार यंत्र काढून त्यांत एकापुढे एक व एकाखालीं एक अशी चार "ह्रीं" ही बीजे लिहावींत. रोज विधिपूर्वक पूजा करून बाराशे वेळां या श्लोकाचा जप करावा. तें यंत्र धारण करावे अथवा चंदन, पुष्प, पंचवीस दिवस भस्म किंवा केशर अभिमंत्रून धारण करावे दूध, मध आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. राजे-महाराजे, राक्षस, पशु, स्त्री, पुरुष सर्व वश होतील.

किरन्तीमङ्‌गेभ्यः किरण-निकुरुम्बामृतरसं
हृदित्वामाधत्ते हिमकर-शिलामूर्तिमिव यः ।
स सर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव
ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया ॥ २०॥

"हे जननि ! किरणनिकुरुम्बामृतरस किरन्तीं हिमकर-शिलामुर्तिं इव यः त्वां हृदि आधत्ते सः शकुन्ताधिपः इव सर्पाणां दर्पं शमयति, सुधाधारसिरया दृष्ट्या ज्वरप्लुष्टान् सुखयति च" हे आई जगज्जननी, तूं आपल्या देहांतून किरणांचा समुदाय हाच कोणी अमृतरस. या अमृतरसाला चोहींकडे शिंपडित आहेस. चन्द्रकांतरत्नाप्रमाणे तुझी मूर्ति अत्यंत स्वच्छ आहे. जणुं कांहीं चंद्रकांतरत्नाचीच ती घडविलेली आहे ! आई ! तुझ्या या स्वरूपाला "अमृतेश्वरी" असें नांव आहे. तुझ्या या अमृतेश्वरीरूपाचें जो कोणी भक्त आपल्या हृदयामध्ये चिंतन करतो, त्याची उपासना करतो, तो सर्व पक्ष्यांचा राजा असलेल्या गरुडाप्रमाणें सर्पांचा दर्प शमवितो. त्याला पाहून सर्प घाबरतात व दाही दिशांना पळून जातात. त्याच्या दृष्टीनें सर्पविषाची बाधा नाहीशी होते. एक दिवसाआड, दोन दिवसांआड येणाऱ्या थंडी-तापांना व इतरही ज्वरबाधांना त्याची दृष्टि जणुं कांहीं अमृताच्या धारेला स्रवणारी "सिरा" म्हणजे प्रणालीच बनते. अमृताचा ती पाटच बनते. आई ! अमृतेश्वरीरूपानें केल्या जाणाऱ्या तुझ्या उपासनेचा हा केवढा प्रभाव आहे ! या उपासनेनें साधक हा गरुडासारखा प्रभावी होत असल्यामुळें या साधनाला "गरुडध्यानयोग" असे तंत्रशास्त्रांत नांव दिलेले आहे.

"षण्मासध्यानयोगेन जायते गरुडोपमः ।
दृष्ट्या कर्षयते लोकं दृष्ट्‍वैव हरते विषम् ॥
दृष्ट्या चातुर्थिकादींश्च ज्वरान्नाशयते क्षणात् ॥ "

याप्रमाणें चतुःशतीमध्यें या ध्यानाची फलश्रुति सांगितलेली आहे.

हें यंत्र भस्मावर लिहावे. विधिपूर्वक देवतेची पूजा करून एक हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. या भस्माने सर्पविष उतरेल. हे भस्म सर्पावर टाकल्यास सर्पाला मुर्च्छा येते. साधकाने हा मंत्र म्हणतच भस्माचा प्रयोग करावा.
अमृतेश्वरीरूपानें श्रीत्रिपुरेश्वरीची पूजा करून या श्लोकाचा रोज हजार वेळां जप करावा. पंचेचाळीस दिवस अनुष्ठान करावे. हा मंत्र सिद्ध होतो व साधकाला कधींही विषबाधा होत नाहीं.
मयुरताम्र आणि पुन्नागताम्रमिश्रित केलेल्या सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून वर सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान करून यंत्र सिद्ध करावे. तें यंत्र आंगठीत बसवून धारण करावे. साधकानें वरचा श्लोक म्हणत त्या हाताने सर्पदंश झालेल्या मनुष्यावर - गाय, म्हैस, घोडा इत्यादि प्राण्यांवरही जल शिंपडावे. विषबाधा निवृत्त होईल.

तटिल्लेखा-तन्वीं तपन-शशि-वैश्वानर-मयीं
निषण्णां षण्णामप्युपरि कमलानां तव कलाम् ।
महापद्माटव्यां मृदित-मल-मायेन मनसा
महान्तः पश्यन्तो दधति परमाह्लाद-लहरीम् ॥ २१॥

या शरीरांत सहा चक्रे आहेत. त्यांना मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर इत्यादि नावे आहेत. या चक्रांना कमल अशी संज्ञा आहे. कारण कमलाप्रमाणे त्या चक्रांना दले असतात. उदाहरणार्थ, मुलाधारचक्राला चतुर्दलकमल असें म्हणतात, तर स्वाधिष्ठनाचक्राला षड्दलकमल असें म्हणतात. मणिपूरचक्राला दशदलकमल असें म्हणतात, तर अनाहतचक्राला द्वादशदलकमल असें म्हणतात, तर आज्ञाचक्राला द्विदलकमल असें म्हणतात. क्वचित् कमल या शब्दाच्या ऐवजी पद्य असाही शब्द वापरतात. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. आचार्य म्हणतात, आई ! या साही कमळांच्या वर तुझी कला म्हणजे मूर्ति अथवा स्वरूप विराजमान झालेलें आहे. अथवा कला शब्दाचा सकलतत्त्वातीत, सर्वाधारभूत, शुद्धसच्चिदानंदरूप आदिशक्ति असाही अर्थ करतात. ही कला तंत्रशास्त्रांत सांगितलेल्या पंचवीस, छत्तीस अथवा एक्कावन तत्त्वांच्याही पलीकडची आहे. तिला शास्त्रांत "सादकला" असें म्हटलेलें आहे. ती सर्वांपेक्षा श्रेष्ट असल्यामुळें तिला परा, परात्परा अथवा परमेश्वरी असें म्हटलेलें आहे. आई जगज्जननी ! तूंच या शरीरांतील सर्व कमलांच्या वर विराजमान झालेली आहेस.

कांहीं लोक कला शब्दाचा अर्थ प्रकृतस्थलीं कुंडलिनीशक्ति असा करतात. कुंडलिनी ही श्रीत्रिपुरसुंदरीचेंच रूप आहे हें आपण नवव्या व दहाव्या लोकांत पाहिलेंच आहे. तीही पण शरीरातील साही चक्रांचा भेद करून अर्थात् साही कमळांचा भेद करून सर्वांच्या वर सहस्रदलकमलांतील चंद्रमंडलामध्यें विराजमान होत असते. कांही लोक कला शब्दाने कामकलाच येथें विवक्षित आहे असें म्हणतात. कामकला म्हणजे ईं हें बीजाक्षर. ईं हा बीजमंत्र महात्रिपुरसुंदरीस्वरूपच आहे. श्रीचक्रामध्ये ईं हा बीजमंत्र सर्व आवरणांच्या वर असलेल्या बैन्दवस्थानांत विराजमान झालेला आहे. आपल्या शरीरातही हे बैन्दवस्थान सर्व चक्रांवर असलेल्या ब्रह्मरंध्रांतील सहस्रदलकमलांत असलेलें चंद्रमंडलच मानलेले आहे. हाच अभिप्राय लक्षांत घेऊन आचार्यांनी साही कमलांच्या वर "निषण्या" म्हणजे विराजमान असलेली तुझी कला असें वर्णन केलें आहे.

आई ! कशी आहे तुझी कला असें कोणी विचारील तर सांगतो. " तटिल्लेखातन्वी तपन-शशि-वैश्वानरमयीं" तटिल्लेखा म्हणजे विद्युल्लता. ती जशी दीर्घ सूक्ष्म कुटिलाकार, प्रकाशमय आणि क्षणभर प्रतीतीला येणारी असते त्याचप्रमाणे तुझ्या उपासकाला आज्ञाचक्रामध्यें प्रतीति येत असते. त्याचप्रमाणें तपन म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र आणि वैश्वानर म्हणजे अग्नि हेंच तुझें रूप आहे. तूं श्रीचक्रस्वरूप आहेस. श्रीचक्र हें त्रिखंड आहे. सोम, सूर्य आणि अग्नि हेच ते श्रीचक्रांतील तीनखंड होत. "त्रिखण्डं मातृकाचक्रं सोमसूर्यानलात्मकम्" असें श्रीचक्राचे वर्णन केले आहे. तेंच श्रीमहात्रिपुरसुंदरीचे रूप होय. श्रीचक्रांतील नऊ आवरणे म्हणजे अवांतर चक्रे यांचें पूर्वी वर्णन केलेलेंच आहे. त्यांतील बिंदुत्रिकोण आणि वसुकोण हा एक खंड समजला जातो. दहा-दहा त्रिकोण असलेलीं दोन चक्रें आणि चौदा त्रिकोणांचें एक चक्र यांना दुसरा खंड म्हणतात. तर अष्टदलचक्र, षोडशदलचक्र आणि भूपूरचक्र यांना तिसरा खंड म्हणतात. हे तीन खंड सोम, सूर्य आणि अग्निस्वरूप आहेत. या त्रिखंडालाच जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति; स्थूल, सूक्ष्म आणि कारण, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय; विश्व तैजस आणि प्राज्ञ, सृष्टि, स्थिति आणि प्रलय; ज्ञान, इच्छा आणि क्रिया इत्यादि त्रिपुटीसूचक नांवे दिली जातात. आपली आराध्यदेवता ही या त्रिपुटीची अधिष्ठात्री असल्यामुळेंच तिला त्रिपुरा अथवा त्रिपुरसुंदरी हें नांव पडलें. हे त्रिखंडात्मक श्रीचक्र हेंच त्रिपुरसुंदरीचे स्वरूप असल्यामुळें आणि तें सोम, सूर्य आणि अग्निस्वरूप असल्यामुळें आचार्यांनी त्रिपुरसुंदरीच्या कलेला "तपनशशिवैश्वानरमयी" असें विशेषण दिले आहे.

शरीरांतील षट्चक्रांच्या दृष्टीने विचार केला असतां मूलाधार आणि स्वाधिष्ठान या दोन चक्रांचें एक खंड मानतात. मणिपूर आणि अनाहत या दोन चक्रांचे दुसरें खंड मानतात तर विशुद्धिचक्र आणि आज्ञाचक्र या दोन चक्राचे तिसरें खंड मानतात. ही तिन्ही खंडें देखील सोम, सूर्य आणि अग्रिस्वरूपच आहेत. या तिन्ही खंडांच्या वर "महापद्माटवी" म्हणजे सहस्रदलकमलरूपी अरण्य आहे. मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलाला हजार पाकळ्या असल्यामुळें महापद्म असें म्हटलें आहे. शरीरांतील सर्व कमलांत तें मोठे आहे. त्या कमलाचीं दले हीं अरण्यासारखीं दाट आणि जटिल आहेत, म्हणून त्या कमलाला "महापद्माटवी" असें म्हटलेलें आहे. अटवी म्हणजे अरण्य. आई त्रिपुरसुंदरी ! या अरण्यांत तुझा संचार असतो. तेथें तूं "निषण्णा" म्हणजे बसलेली आहेस. त्या सहस्रदलकमलांतील पूर्ण चंद्रांत तूं विराजमान झालेली आहेस. "महान्तः" म्हणजे मोठेमोठे तुझे अनन्यभक्त असलेले योगीश्वर हेच तुझ्या स्वरूपाला पहात असतात. कारण त्यांनीं आपल्या मनाला निर्मल केलेलें असतें. कामक्रोधादि विकार हेंच मनांतले मल होत. माया म्हणजे अविद्या, अहंकार, अभिनिवेश इत्यादि हें सर्व त्यांनीं जिंकलेले असतात. त्यांचा त्यांनी निरास करून आपल्या मनाला निर्मल केलेलें असतें. त्या निर्मल मनानेंच ते तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. सकल तत्त्वातीत असलेल्या तुझ्या स्वरूपालाच "सादकला" असें म्हटलेलें आहे. साद म्हणजे चरम गति किंवा परम अधिष्ठान असा साद शब्दाचा अर्थ आहे. त्रिपुरसुंदरीच्या सादकलेचा साक्षात्कार झाल्यानंतर ते नित्य आणि निरतिशय आनंदाच्या लहरींत निमग्न होतात. "परमानन्दलहरीं दधति" आनंदाला सतत भरतें येत असल्याचा ते अनुभव घेत असतात. त्यांचा तो आनंद कधींही क्षीण होत नाहीं. अतृप्तीचा लेशही त्यांच्या चित्ताला स्पर्श करीत नाहीं. गीतेच्या शब्दांत सांगावयाचें झाल्यास "यलब्ध्वा चापरं लाभ मन्यते नाधिकं ततः" अशा अवस्थेला ते पोहोचतात. आई ! मलाही या आनंदाचा लाभ होईल. असा माझ्यावर तूं अनुग्रह कर हीच माझी प्रार्थना आहे.

सोन्याच्या, चांदीच्या अथवा तांब्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज एक हजार या श्लोकाचा जप करावा. नैवेद्य मध, गुळ आणि केळें. याचें फल सर्व जनविरोधाचा निरास होऊन लोक वश होतील.

भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा-
मिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः ।
तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य-पदवीं
मुकुन्द-ब्रह्मेन्द्र-स्फुट-मकुटनी-राजित-पदाम् ॥ २२॥

आई त्रिपुरसुंदरी ! भवानी हें त्रिपुरसुंदरीचेंच नांव आहे. "भवानी भावनागम्या भवारण्यकुठारिका ।" असें सहस्रनामांत तिचे वर्णन केले आहे. खरोखरच तूं अत्यंत उदार आहेस. तुझ्या ध्यानाने त्रिविध पुरुषार्थाचा लाभ होईल यांत नवल काय आहे ? तुझी केवळ करुणा भाकण्याला आरंभ केला तरी देखील तूं त्याला परम पुरुषार्थाचा लाभ करून देतेस ! धन्य आहेस तूं. अशा अभिप्रायानें आचार्य स्तुति करीत आहेत. "हे भवानि त्वं दासे मयि सकरुणां दृष्टिं वितर" आईभवानी ! मी तुझा दास आहें. तूं माझ्यावर आपली करुणायुक्त दृष्टि टाक. तूं माझ्याकडे कृपापूर्ण दृष्टीने पहा. याप्रमाणे तुझी स्तुति करण्याची मनांत इच्छा ठेवून वाक्य उच्चारावयास जो कोणी आरंभ करतो, तो "भवानि त्वं" एवढी अक्षरे उच्चारतांक्षणींच "त्वं तस्मै निजसायुज्य-पदवीं दिशसि " तूं त्याला आपलें सायुज्यपदही देतेस ! ! कशी आहे तुझी सायुज्यपदवी ? असें कोणी विचारील तर सांगतो. "मुकुन्दब्रह्मेन्द्र-स्फुट-मकुट-नीराजित पदं" मुकुंद म्हणजे विष्णु, तसेंच ब्रह्मदेव आणि इंद्र इत्यादि देवही रत्नजडित मुकुट घालून तुझ्या चरणी नम्र होत असतांना जणुं कांहीं ते आपल्या मुकुटांनी स्पष्टपणे तुझ्या चरणकमलांना नीरांजनांनीं ओवाळींत आहेत असें वाटतें. तात्पर्य, ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, वरुण, कुबेर इत्यादि बडेबडे देवही तुझ्या चरणारविंदीं नम्र होऊन प्रणाम करीत आहेत. यावरून तुझ्या सायुज्यपदाचा महिमा लक्षांत घ्यावा.

या श्लोकांतील गूढ अभिप्राय असा आहे कीं, भवानि त्वं इत्यादि अन्वय वाक्यांतील भवानि हे पद संबोधन आहे. "हे आई भवानी ! तूं" अशा अभिप्रायानें स्तुतिवाक्याला आरंभ करीत असतांनाच "त्वं भवानि" आई तूंच मी व्हावें. भू-धातूचें आज्ञार्थी प्रथम पुरुषाचे एकवचन. अशा अभिप्रायाने जणुं कांहीं तो स्तुति करण्यास प्रवृत्त झालेला, तुझी अहंग्रहोपासनाच करीत आहे, असें समजून तूं त्याला सत्वर उत्तम फल देतेस. जप, होम इत्यादि साधनांपेक्षां अहंग्रहोपासनेनें फलप्राप्ति सत्त्वर होते. "अहं ब्रह्मास्मि" "अयमात्मा ब्रह्म" या महावाक्याप्रमाणेंच तो "तूं मी व्हावें" मी त्वत्स्वरूप व्हावें अशा तादात्म्य चिंतनाचेंही फल अनपेक्षित रीतीनें तुझ्याकडून त्याला प्राप्त होतें ! आई ! असा हा तुझा नाममहिमा आहे. कोणत्याही मिषाने का होईना तें मुखी आलें तरी कृतार्थता प्राप्त होते. "विक्रुश्य पुत्रमघवान् यदजामिलोऽपि नारायणेति स्त्रियमाण इयाय मुक्तिम्" (भागवत). पापी अजामिल मुलाला हाक मारण्याच्या मिषाने नारायण नारायण म्हणतांच कृतार्थ झाला. याच न्यायाने तुझ्या नाम संकीर्तनानेंही सायुज्यमुक्तीचा लाभ होतो मग इतर फलांची कथा काय ? सायुज्य म्हणजे तादात्म्य. जेथे सायुज्यमुक्तीचा लाभ झाला तेथें सालोक्य सारूप्य आणि सामीप्य प्राप्त होईल हें काय सांगावयास पाहिजे ? तें तर कैमुतिकन्यायानेंच सिद्ध होत आहे ! मागील सात श्लोकांनी ध्यानाचा महिमा सांगितला, तर या श्वोकाने नामाचाही महिमा वर्णिला आहे हें लक्षांत घ्यावे.

सायुज्यपदवी म्हणजे मोक्षाचा मार्ग अथवा मोक्षाची अवस्था. पदवी शब्दाचा अर्थ पद किंवा स्थान असाही आहे. सायुज्य पदवी म्हणजे मोक्षपद, परमात्मपद अथवा ब्रह्मपद. यालाच मुक्ति असें म्हणतात. ही मुक्ति चार प्रकारची मानलेली आहे. सालोक्य, सामीप्य, सारूप्य आणि सायुज्य अशी त्यांची नावे आहेत. उपासनेनें इष्टदैवतेच्या लोकाचा लाभ होणें याला सालोक्य म्हणतात. वैकुंठ लोक, कैलास लोक, गोलोक इत्यादि विविध लोक प्रसिद्ध आहेत. आनंद हें मोक्षाचे स्वरूप आहे. इष्टदेवतेचा लोक प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या चित्ताला एक प्रकारचा अनिर्वचनीय आनंद होत असतो. म्हणून या अवस्थेला सालोक्यमुक्ति असें म्हणतात. इष्टदेवतेचा लोक प्राप्त झाल्यानंतर आपल्याला इष्टदेवतेचें सान्निध्य लाभते. इष्टदेवतेच्या सान्निध्याने साधकाचा आनंद पूर्वीपेक्षा अधिकच वाढतो. या अवस्थेला सामीप्यमुक्ति असे म्हणतात.

इष्टदेवतेच्या सान्निध्याचा लाभ झाल्यानंतर साधकाला इष्टदेवतेचें रूप प्राप्त होत असतें. असिस्टंट कलेक्टर किंवा पर्सनल सेस्टेरी झाला म्हणजे आपण मोठ्या पदाला चढल्याचे समाधान वाटत असतें. इष्टदेवतेचें रूप प्राप्त झाल्यानंतर असाच एकप्रकारचा अनिर्वचनीय आनंद वाढलेला असतो. या अवस्थेला सारूप्यमुक्ति असें म्हणतात. सारूप्यामुळें इष्टदेवता आणि त्या देवतेचा उपासक यांच्यांत भेद असतोच. भेद आहे तोंपर्यंत अपूर्णतेची जाणीव होतच असते. अपूर्णतेच्या जाणिवेने सुखांत न्यूनता येते. ती न्यूनता साधक हा आपल्या इष्टदेवतेशीं जेव्हां तादात्म्य पावतो तेव्हांच नाहीशी होत असते. इष्टदेवता ही तत्त्वतः सत्, चित् आणि आनंदस्वरूप असल्यामुळें इष्टदेवतेशीं तादात्म्य पावलेला साधकही सत् चित् आनंदस्वरूप होत असतो. याच अवस्थेला सायुज्यपदवी असें म्हणतात. ही पदवी ब्रह्मस्वरूपच असल्यामुळें हिला ब्रह्मपद असेही म्हणतात. मोक्षाचेही हेंच स्वरूप असल्यामुळें याला मोक्षपद असेही म्हणतात.

मोक्षाच्या स्वरूपाविषयी तत्त्ववेत्त्यांत अनेक मतभेद आहेत. मरण म्हणजेच मोक्ष असें चार्वाक म्हणतो. त्याची धाव याच्या पलीकडे गेलीच नाहीं.

नित्य ऊर्ध्वगमन म्हणते महाकाशांत वरवर जाणे हेंच मोक्षाचे स्वरूप होय असें जैन म्हणतात. निर्विषय, शुद्ध, क्षणिक, विज्ञानपरंपरेचा सतत अनुभव येत रहाणे म्हणजेच मोक्ष असें बौद्धांचे मत आहे. कायमचा दुःखांचा नाश होणें यालाच मोक्ष म्हणतात असें तार्किकांचे म्हणणें आहे. आदि विद्वान् सिद्धपुरुष असा जो ईश्वर त्याच्या नित्ययोग-शक्तीचा साक्षात्कार होऊन अनिर्वचनीय व नित्य आनंदाचा लाभ होणें म्हणजेच मोक्ष असें योगतत्त्ववेत्त्यांचें मत आहे. तर त्रिगुणात्मक मुलप्रकृति आणि चेतनपुरुष यांच्या पार्थक्याचा वास्तव भूमिकेवरून साक्षात्कार होणे म्हणजे मोक्ष होय, असें सांख्य तत्त्ववेत्त्यांचे म्हणणें आहे. नित्य आणि निरतिशय सुखाची अभिव्यक्ति होणें म्हणजेच मोक्ष असें मीमांसक म्हणतात, तर अविद्येची - अज्ञानाची निवृत्ति होणें म्हणजेच मोक्ष होय, असेही कांहीं वेदांती म्हणतात. "कर्मणामात्मलाभान्न परं विद्यते" सर्व कर्मांचे अंतिम फल म्हणजे आत्मलाभ. त्यालाच मोक्ष असें म्हणतात, असें आपस्तंबांचें म्हणणें आहे. सच्चिदानंदस्वरूप असलेल्या आपल्या उपास्यदेवतेशीं पूर्ण तादात्म्य प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष होय, असा उपासनाशास्त्राचा सिद्धान्त आहे. प्रकृतस्थलीं परस्पर अभिन्न, एकरूप असलेल्या शिव-शक्तिस्वरूप इष्टदेवतेशीं पूर्ण तादात्म्य प्राप्त होणें हेंच मोक्षाचे स्वरूप असून यालाच प्रकृतस्थलीं सायुज्यपदवी असें म्हटलेले आहे. आई ! अनन्यचित्तानें तुझें नांव घेताक्षणीच तूं आपल्या भक्ताला सायुज्यमुक्तीचा लाभ करून देतेस ! धन्य आहे तुझें औदार्य.

वरील यंत्र हे श्रीयंत्र. सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची एखाद्या तीर्थक्षेत्रांत अथवा देवीच्या मंदिरांत रोज पंचेचाळीस दिवस विधिवत् पूजा करावी. गुळ, नारळ, केळे, दही, दूध, मध आणि खिचडीचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. याने ऐहिक सर्व कामना पूर्ण होतील. ऐश्वर्यप्राप्ति व साम्राज्यलाभही होईल.

त्वया हृत्वा वामं वपुरपरितृप्तेन मनसा
शरीरार्धं शम्भोरपरमपि शङ्‌के हृतमभूत् ।
यदेतत्त्वद्‌रूपं सकलमरुणाभं त्रिनयनं
कुचाभ्यामानम्रं कुटिल-शशि-चूडाल-मकुटम् ॥ २३॥

आई ! कदाचित तूं असें विचारशील की, लोक शिवसायुज्याची अपेक्षा करीत असतात. तूं माझ्या सायुज्याची अपेक्षा कां करतोस ? यावर माझें उत्तर असे आहे कीं, मला तुझें सायुज्य मिळाले की, शिवसायुज्य मिळाल्यासारखेच आहे. कारण तूंच शिवस्वरूप आहेस. पहा. तूं प्रथम शंकरांच्या देहाचा वामभाग हरण केलास. तेवढ्याने मन संतुष्ट झालें नाहीं म्हणून अतृप्त मनानें शंकरांच्या शरीराच्या दुसऱ्याही भागाचे हरण केलें आहेस असा मी तर्क करतो. कारण तुझें अरुणवर्ण असलेलें हें जें सगळे रूप आहे तें शंकरांच्या रूपासारखेच दिसत आहे. स्वभावतः अरुणवर्ण आणि स्तनभारानें किंचित् नम्र असलेली तूं शंकरांप्रमाणे "त्रिनयन" दिसत आहेस. त्रिलोचना, त्रिनयना, त्र्यंबका ही तुझीं नावे प्रसिद्धच आहेत. सूर्य, चंद्र आणि अग्नि हेच तुझे तीन नेत्र आहेत. आई ! तुझें हें त्रिनेत्रत्व शिवसायुज्याचेच द्योतक आहे. त्याचप्रमाणे हा अरुणवर्णही शिवसायुज्याचाच द्योतक आहे. भगवाच शंकर हे अरुणवर्ण आहेत. "असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रूः" असें वेदांत शंकरांचे वर्णन केले आहे. हा अरुणवर्ण शंकरांनी तुझ्याकडून घेतला का तूं शंकरांकडून घेतला ? माहीत नाहीं; पण तुम्ही दोघेही अरुणवर्णानें एकरूप आहां हें निश्चित. तसेंच तुझें रूप "कुटिलशशिचूडालमकुटं" म्हणजे चंद्राची किंचित वाकडी कोर तुऱ्याप्रमाणें जेथें मुकुटावर शोभत आहे असें आहे. म्हणजे भगवान् शंकर चंद्रचूड आहेत तर तूंही पण चंद्रचूड आहेस ! तुझ्या मस्तकावरील चंद्र हा अष्टमीच्या चंद्रासारखा शोभत आहे, "अष्टमीचन्द्रविभ्राजदलिकस्थलशोभिता" असें तुझें वर्णन प्रसिद्धच आहे. अशा रीतीनें हे आई ! तूं शिवसायुज्य प्राप्त करून घेतलेलेच आहेस. अथवा शिवाने तुझें सायुज्य प्राप्त करून घेतलेले आहे असें म्हटलें तरी हरकत नाहीं. दोहोंचाही अर्थ एकच आहे. तूं आणि शिव परस्पर सायुज्यभावाला प्राप्त झालेले असल्यामुळें तुम्ही दोघेही एकरूपच आहांत. "न शिवेन विना शक्तिः न शक्तिरहितः शिवः ।" तात्पर्य, तुझ्या सायुज्याने शिवसायुज्याचा व शिवसायुज्यानें तुझ्या सायुज्याचा लाभ हा सहजच होतो. आई ! सर्व कांहीं तूंच आहेस म्हणूनच मी तुझी प्रार्थना करीत आहे. तूं करुणादृष्टीनें माझ्याकडे पहा.

वरील पुढील यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. चौरंगावर ठेवून त्याची रोज विधिपूर्वक पूजा करावी. तीस दिवस या लोकाचा रोज तीन हजार जप करावा. दूध अथवा पायसाचा नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे हें यंत्र सिद्ध करून धारण करावें अथवा घरांत ठेवावे. यानें ऋण फिटेल. त्याचप्रमाणे भूतप्रेत, पिशाचबाधाही टळेल.

जगत्सूते धाता हरिरवति रुद्रः क्षपयते
तिरस्कुर्वन्नेतत्स्वमपि वपुरीशस्तिरयति ।
सदापूर्वः सर्वं तदिदमनुगृह्णाति च शिव-
स्तवाज्ञामालम्ब्य क्षणचलितयोर्भ्रूलतिकयोः ॥ २४॥

आई ! तुझ्या केवळ भुवयांच्या संकेताने ब्रह्मांडांच्या घडामोडीची केवढी प्रचंड कामें चाललेली आहेत. पहा - "धाता जगत् सूते" ब्रह्मदेव तुझ्या भुवयांचा संकेत होतांक्षणींच जग निर्माण करतो. "हरिः अवति" विष्णू त्या जगाचे पालन-पोषण करतो आणि "रुद्रः क्षपयते" म्हणजे प्रलयकाली रुद्र त्या जगाचा लय करतो. यापमाणें जगाची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय या कामी नियुक्त असलेले अधिकारी देव "तव भ्रूलतिकयोः आज्ञां आलम्ब्य" तुझ्या क्रियाशील झालेल्या भ्रूलतांची आज्ञा होतांच आपआपले कार्य करूं लागतात. रुद्रदेवतेनें प्रलयकाळीं सर्व कार्याचा नाश केल्यानंतर त्या कार्याची कारणें शिल्लक रहातात. घट फुटला तरी खापरे शिल्लक रहातात. पट फाटला तरी धागेदोरे शिलक रहातात. त्याचप्रमाणें कार्यप्रपंचाचा नाश झाला तरी कारणप्रपंच शिल्लक रहातोच. त्या कारण प्रपंचाचाही लय करण्याचें कार्य महेशाचे आहे. तो महेश देखील, आई ! तुझ्या भ्रुकुटीचा संकेत होतांच ती तुझी आज्ञा समजून त्या विस्कळित झालेल्या कारणप्रपंचाचा आपल्या स्वरूपांत लय करून घेतो. येथें लय शब्दाचा अर्थ अव्यक्त स्वरूपांत रहाणे असा समजावा. सर्व कारणप्रपंचाला आत्मस्वरूपांत लीन करून घेऊन शेवटीं तो महेश्वर देखील स्वतःला सदाशिवस्वरूपांत लीन करून घेतो. हाच अभिप्राय श्लोकाच्या दुसऱ्या चरणांत सांगितला आहे. "ईशः एतत् तिरस्कुर्वन् स्वं अपि वपुः तिरयति" ईश म्हणजे महेश्वर. या सर्वांचा लय करीत स्वतःच्या देहाचाही सदाशिवतत्त्वांत लय करून घेतो. सदाशब्दपूर्वक शिवतत्त्व म्हणजे भगवात् सदाशिव. हे ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश या सर्वांनाच अव्यक्तरूपानें आपल्या स्वरूपांत ते लीन होऊन राहिले असतांना पुन्हां सृष्टिकालीं आविर्भूत करण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा प्रयत्नही आई, तुझ्या भ्रुकुटीच्या संकेतानेच होत असतो. ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि ईशान म्हणजे महेश्वर यांना सृष्टिकाली त्यांच्या कार्यासह आविर्भूत करणें या क्रियेला अनुग्रह असें म्हणतात. सदाशिवाच्या अनुग्रहानेच हे सर्व देव सृष्टिकाली प्रकट होऊन आपआपली कार्यें करीत असतात. हा सदाशिवाचा अनुग्रह देखील तुझ्या भ्रूसंकेतावरच अवलंबून आहे. तात्पर्य, हे माते त्रिपुरसुंदरी ! तुझ्या केवळ भुवयांच्या संकेतानेच ब्रह्मा, विष्णु, रुद्र, ईशान आणि सदाशिव या पांचही देवता आपआपले कार्य सृष्टि, स्थिति, प्रलय, तिरोधान आणि अनुग्रह क्रमशः करीत असतात. आई ! तुझ्या नुसत्या भुवयांचा हा प्रभाव आहे तर मग साक्षात तुझा प्रभाव काय वर्णन करावा ? सर्वांवर अनुग्रह करणाऱ्या सदाशिवावर देखील तुझा अनुग्रह आहे, म्हणूनच तो सर्वांवर अनुग्रह करूं शकतो. ही सगळी कार्ये तत्त्वतः तूंच करीत आहेस, म्हणूनच तुझें वर्णन करतांना ललितासहस्रनामामध्यें -

सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविन्दरूपिणी ॥
संहारिणी स्वरूपा तिरोधानकरीश्वरी ।
सझाशवानुग्रहदा पञ्चकृत्यपरायणा ॥

असें वर्णन केलेले आहे. पंचकृत्य शब्दाचा अर्थ वर सांगितलेली उत्पत्ति स्थिति इत्यादि पांच कार्ये असा समजावा. या पांचही कार्यांचा आश्रय किंवा त्यामध्ये तत्पर श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच आहे. सकलजननीस्तवामध्येंही हाच अभिप्राय मोठ्या बहारीने वर्णन केलेला आहे.

"विरिञ्चाख्या मातः सुजसि हरिसंज्ञा त्वमवसि
त्रिलोकीं रुद्राख्या हरसि विदधासीश्वरतया ।
भवन्ति सादाख्या प्रभवसि च पाशौघदलने
त्वमेवैकाऽनेका भवसि कृतिभेदैर्गिरिसुते ॥ "

हे आई ! ब्रह्मदेव हें नांव धारण करून तूं हे सर्व जग निर्माण करतेस. विष्णु हें नांव धारण करून त्याचें तूं संरक्षण करतेस. रुद्र हें नांव धारण करून तूं त्रैलोक्याचा संहार करतेस. तर पुन्हां ईश्वर हें नांव धारण करून या सर्वांना उत्पन्न करतेस. तूंच सच्चिदानंदरूप सर्वाधारभूत सादाख्यकलारूपाने सर्व जीवांच्या भवपाशांचे दुःखपाशांच्या समूहाचे निर्दालन करतेस. आई गिरिसुतु ! तत्त्वतः तूं एकच असून कार्यभेदानें अनेक नांवे व रूपें धारण करतेस धन्य आहेत तूं.

हें शिवयंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. विधिपूर्वक त्याची तीस दिवस पूजा करावी. मध उडदाचे वडे आणि तिळकुटाचा नैवेद्य दाखवावा. यंत्राजवळ बसून रोज या चोविसाव्या श्लोकाचा एक हजार जप करावा. हें यंत्र धारण केलें असता ३ भूतप्रेत-पिशाच बाधा नाहीशी होते. अपस्मार म्हणजे फीट येण्याचा विकार थांबतो.

त्रयाणां देवानां त्रिगुण-जनितानां तव शिवे
भवेत्पूजा पूजा तव चरणयोर्या विरचिता ।
तथा हि त्वत्पादोद्वहन-मणि-पीठस्य निकटे
स्थिता ह्येते शश्वन्मुकुलित-करोत्तंस-मकुटाः ॥ २५॥

आई जगज्जननी ! तुझी पूजा केली म्हणजे सर्व देवांची पूजा केल्याचे श्रेय मिळतें. कारण सर्वांमध्ये श्रेष्ठ तूंच आहेस. ब्रह्मा, विष्णु आणि रुद्र हे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानले जातात. पण हे तिन्ही देव तुझ्या सत्व, रज आणि तम या तीन गुणांपैकी एका-एका गुणापासून जन्माला आलेले आहेत. अथर ती तुझी लेकरेंच आहेत. "ब्रह्मविष्णूमहादेवा अस्याः पुत्रा वरानने । चतुर्थोऽहं महेशानि सुतस्तस्या महेश्वरः ॥" असें भगवान् शंकरच प्रत्यक्ष पार्वतीला शिवशक्ति तत्त्वाचे वर्णन करतांना दक्षिणामूर्तिसंहितेत सांगत आहेत. हे शिवा भवानी ! "शिवयति इति शिवा" सर्व विश्वाचें तूं कल्याण करतेस म्हणून तुला शिवा असें म्हटलेलें आहे. हे जगत्कल्याणकारिणी माते ! तुझ्या चरणकमलांची पूजा केली म्हणजे या सर्व देवांची पूजा केल्यासारखीच आहे. "तव चरणकमलयोः या पूजा विरचिता सा देवानां पूजा भवेत्" आई ! तूं म्हणशील, असें कसें म्हणतोस ? एकाची पूजा केल्याने दुसऱ्याची पूजा केल्यासारखे कसें होईल ? सांगतो ऐक.

सर्व देवांत श्रेष्ठ असलेले ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश हे चारही देव तुझे पाय ठेवण्याकरितां तयार केलेले जें रत्नखचित पादपीठ म्हणजे चौरंगासारखें आसन अथवा उपसिंहासन आहे त्याच्या जवळ हात जोडून निरंतर नम्र भावाने उभे आहेत. त्यांनीं जोडलेले दोन्ही हात आपल्या मुकुटाला लावलेले असल्यामुळें त्यांचे मुकुट जणुं कांहीं तुरे लावल्याप्रमाणे दिसत आहेत. तात्पर्य, ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश्वर हे सर्व देवांत श्रेष्ठ असलेले देव, तुझी सेवा घडावी म्हणून निरंतर तुझ्या सान्निध्यांत हात जोडून नम्र भावानें उभे आहेत. अशा स्थितींत एखाद्या भक्तानें तुझी पूजा केली तर त्यांत त्यांना अत्यंत संतोषच वाटतो. उलट तुझी पूजा सोडून त्यांची पूजा केली तर त्यांत त्यांना संतोष वाटणार नाहीं. हा भक्तांचा स्वभाव असतो. ते तुझे भक्त आहेत. तुझी पूजा केल्यानेंच त्यांना आनंद वाटत असल्यामुळें तुझी पूजा हीच त्यांची पूजा होय. हाच अभिप्राय लक्षांत घेऊन श्रीत्रिपुरसुंदरीच्या पूजेचा महिमा आगमग्रंथांत गालेला आहे.

"विष्णुपूजासहस्राणि शिवपूजाशतानि च
अम्बिकाचरणार्चायाः कलां नार्हन्ति षोडशीम्"

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढून त्याच्या तिन्ही कोणाला बाहेरच्या बाजूने त्रिशूळ काढावेत. त्रिकोणामध्ये सौः हें बीजाक्षर लिहावे. पंचेचाळीस दिवस त्याची पूजा करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्ध यंत्र धारण करावे. याच्या योगाने राजकीय अधिकाराचा लाभ होईल. उत्कृष्ट पदवीचाही लाभ होईल.

विरिञ्चिः पञ्चत्वं व्रजति हरिराप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम् ।
वितन्द्री माहेन्द्री विततिरपि संमीलितदृशा
महासंहारेऽस्मिन् विहरति सति त्वत्पतिरसौ ॥ २६॥

आई ! तुझा महिमा मी काय वर्णन करूं ? हा सृष्टिकर्ता ब्रह्मदेव पंचत्वाला जातो म्हणजे पृथक् पृथक् पंचमहाभूतांत तो विलीन होतो. हरि म्हणजे भगवान विष्णु देखील पंचमहाभूतांत विलीन होतात. "कीनाशः विनाशं भजति" म्हणजे यमाचाही नाश होतो. यम हा लोकांचा निष्ठुरपणें नाश करीत असतो म्हणून त्यास "कीनाश" असें म्हणतात. तात्पर्य, तो यमही मरतो आणि धनद म्हणजे कुबेर तोही निधन पावतो. "माहेन्द्री विततिः अपि सम्मीलितदृशा वितन्द्री भवति" चौदा भुवनांचे अधिपति चौदा इंद्र. त्यांना लोकपाल अथवा महेंद्र असे म्हणतात. या चौदा महेंद्रांचा समुदाय म्हणजे माहेन्द्री वितति या शब्दांचा अर्थ झाला. या इंद्रांच्या समुदायालाही कायमची तंद्री लागते. अर्थात् प्रलयकाळी त्यांचेही डोळे मिटतात, तेही मरतात. अशा या "महासंहारे" म्हणजे शेवटच्या कल्पांतकाळीं तुझे पति भगवान् सदाशिव हे तुझ्यासह आनंदाने विहार करीत असतात. इतरांप्रमाणे त्यांना मरण नाहीं, नाश नाहीं. हें त्यांचें अविनाशित्व हा तुझ्याच पातिव्रत्याचा प्रभाव होय.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून अमावस्येच्या दिवशीं अथवा सहा दिवस विधिपूर्वक पूजा करून गुळपायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार या श्लोकाचा जप करून यंत्र धारण करावे. फल सर्व कार्यसिद्धि व शत्रुजय.

जपो जल्पः शिल्पं सकलमपि मुद्राविरचना
गतिः प्रादक्षिण्य-क्रमणमशनाद्याहुति-विधिः ।
प्रणामं संवेशः सुखमखिलमात्मार्पणदृशा
सपर्या-पर्यायस्तव भवतु यन्मे विलसितम् ॥ २७॥

आई ! मी तुझी पूजा काय करणार ? निसर्गतः माझ्याकडून जें कांहीं होत असेल ते सर्व तुझी पूजाच आहे असें समज. अशा अभिप्रायानें आचार्य प्रार्थना करीत आहेत. आई ! लोक तुझ्या मंत्राचा जप करतात. माझ्या हातून तो कांहीं होत नाही. तेव्हां मी जें कांहीं व्यवहाराच्या निमित्ताने बोलत असेन तें माझें बोलणे हाच तुझा जप होय असें समज. व्यवहारांत वागतांना मला जे कांहीं हातानें अभिनय करावे लागतात त्या तुझ्या मुद्राच आहेत असें समज. तात्पर्य, " मे जल्पः ते जपः भवतु, मे शिल्पं ते मुद्राविरचना भवतु" माझी बडबड हीच तुझी स्तुति किंवा मंत्राचा जप होय. तसेच शिल्प म्हणजे हातापायानें केले जाणारे व्यवहार अथवा कामें. मुद्रा म्हणजे उपासनेच्या वेळीं इष्ट देवतेला हाताने जे निरनिराळे आकार दाखविले जातात ते. शंखमुद्रा, योनिमुद्रा, धेनुमुद्रा, इत्यादि. श्रीविद्येच्या उपासनेमध्यें सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वाकर्षिणी इत्यादि मुद्रांची नांवे आहेत. जपाने इष्टदेवतेचें सान्निध्य लाभते तर मुद्रा या इष्टदेवतेला संतुष्ट करीत असतात. मुदं म्हणजे संतोषाला रान्ति म्हणजे देतात त्या मुद्रा. "स्वाध्यायादिष्ट-देवता-संप्रयोगः" इष्ट देवतेचा जप करणें हाही एक प्रकारचा स्वाध्यायच होय. सम्प्रयोग म्हणजे चांगल्या प्रकारें उत्कृष्ट सान्निध्याचा सहयोगाचा लाभ होणें. हें इष्टदेवतेचें उत्कृष्ट सान्निध्य मन लावून केल्या जाणाऱ्या जपानें मिळतें. "स्वाध्यायाद्योगमासीत योगात्स्वाध्यायमामनत् । स्वाध्याययोगसम्पत्त्या परमात्मा प्रकाशते" जपानें इष्टदेवतेचें सान्निध्य मिळवावें व इष्टदेवतेच्या सान्निध्यानें उपासनेचे बळ वाढवावें. उपासनेचे बळ आणि इष्टदेवतेचा अनुग्रह हींच परमेश्वराच्या साक्षात्काराची साधनें होत, असें स्मृतीत म्हटलेलें आहे. "श्रोतव्यः श्रुतिवाक्येभ्यः मन्तव्यश्चोपपत्तिभिः । मत्वा च सततं ध्येयः एते दर्शनहेतवः" ईश्वराच्या साक्षात्काराकरितां प्रथम श्रुतिवाक्यांनी त्याचें श्रवण करावे, त्याचें स्वरूप जाणावे. तें जाणल्यानंतर साधक- बाधक प्रमाणांनीं त्याचा विचार करावा. विचारानें ते स्वरूप मनामध्ये ठसवावें. मननानें मनांत ठसलेल्या स्वरूपाचा पुढें निदिध्यास घ्यावा. सतत त्याचें ध्यान करावे. हींच ईश्वराच्या साक्षात्काराची साधने होत. आचार्य म्हणतात आई ! माझी बडबड हीच तुझी स्तुति किंवा हाच तुझा जप आणि हातांनीं होणाऱ्या निरनिराळ्या हालचाली ह्याच तुझ्या मुद्रा समज. "मुद्राविरचना" म्हणजे मुद्रा करणें.

आई ! माझ्या पायांची यदृच्छेने होणारी हालचाल गति-गमन हेंच माझें तुला प्रदक्षिणा घालणे होय. प्रादक्षिण्यक्रमण म्हणजे प्रदक्षिणा घालण्याच्या उद्देशाने पावलें टाकणें. तसेंच "अशनादि आहुतिविधिः" म्हणजे मी जें कांहीं खातों-पितो तेंच तुझ्या उपासनेचे अंगभूत असलेलें हवनकर्म समज. आहुतिविधि म्हणजे होमहवन करणें. त्याचप्रमाणे "संवेश" म्हणजे झोपणें, सुखानें गादीवर लोळणे हाच माझा प्रणाम समज. "मे अखिलं विलसितं आत्मार्पणदृशा तव सपर्या-पर्यायः भवतु" माझा हा सर्व जीवनविलास म्हणजे आत्मार्पणदृष्टीनें केल्या जाणाऱ्या तुझ्या पूजेचाच प्रकार होवो. मी तुलाच आत्मा समजून हें सर्व कांहीं अर्पण करीत आहें. "आत्मा त्वं, गिरिजा मतिः, सहचराः प्राणाः, शरीरं गृहं ... यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्"

"जपो जल्पः" या श्लोकांत आचार्यांनी जो भाव व्यक्त केला आहे त्याला मानसपूजा असें म्हणतात. पूजेचे दोन प्रकार आहेत. एक अंतःपूजा व दुसरी बाह्य पूजा. अंतःपूजेलाच मानसपूजा असे म्हणतात. यालाच तंत्रशास्त्रांत "समयाचार" असें म्हटलेले आहे. आपल्या इष्ट देवतेचे परब्रह्मस्वरूपाने सहस्रदलकमलांत ध्यान करून आपला संपूर्ण जीवनव्यवहार ही इष्टदेवतेची पूजाच होय अशी भावना समयाचार पद्धतीत ठेवावी लागते तर कौलाचार पद्धतीत सर्व बाह्यपूजेची साधनसामग्री संग्रहीत करून थाटामाटानें व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी लागते. बाह्यपूजेपेक्षां अंतःपूजा श्रेष्ठ आहे म्हणूनच आचार्यांनी या श्लोकांत अंतःपूजेचा निर्देश केला आहे.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढून त्याच्या तिन्ही कोनांना त्रिशूळाचा आकार दाखवा. मध्यभागी ह्रीं हें बीज लिहावे. यंत्राची विधिपूर्वक पूजा करून पंचेचाळीस दिवस या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. नैवेद्य गुळ आणि पायस यांचा दाखवावा. याप्रमाणे यंत्र सिद्ध करून धारण केल्यास मंत्रसिद्धि होते. देवीचें दर्शन घडते आणि आत्मज्ञानाचाही लाभ होतो. याचप्रमाणे यंत्र काढून याच पद्धतीने चौतिसाव्या श्लोकाने आराधना केल्यास साधक अत्यंत बुद्धिमात् होतो. नैवेद्य फक्त मध.

सुधामप्यास्वाद्य प्रतिभय-जरा-मृत्युहरिणीं
विपद्यन्ते विश्वे विधि-शतमखाद्या दिविषदः ।
करालं यत्क्ष्वेलं कवलितवतः कालकलना
न शम्भोस्तन्मूलं तव जननि ताटङ्‌कमहिमा ॥ २८॥

इतर सर्व तत्त्वांचा व त्या तत्त्वांच्या अधिष्ठात्री असलेल्या देवतांचा सदाशिवतत्त्वांमध्यें लय होतो, पण सदाशिवतत्त्वाचा मात्र कधींच कोठे लय होत नाहीं. सदाशिवतत्त्व हें अखंड अविनाशी आहे. सदाशिवाला प्राप्त झालेलें हें अविनाशित्व श्रीत्रिपुरसुंदरीच्याच प्रभावाने प्राप्त झालेलें आहे. अशा अभिप्रायानें आचार्य वर्णन करीत आहेत. "विधिशतमखाद्याः विश्वे दिविषदः सुधां आस्वाद्य अपि विपद्यन्ते" विधि म्हणजे ब्रह्मदेव. शतमख म्हणजे इंद्र इत्यादि सर्व देव अमृताचा आस्वाद घेऊनही - अमृत प्राशन करूनही शेवटीं "विपद्यन्ते" म्हणजे मरतात. सुधा म्हणजे अमृत. तें प्राशन केलें असतां अत्यंत भयंकर असलेल्या जरा-मृत्यूचाही नाश होतो, तथापि त्यालाही कांहीं कालमर्यादा आहे. ती कालमर्यादा संपली कीं, जरामृत्यु यांचा नाश करणारे अमृत प्राशन करूनही देवांना मृत्यु येतोच. देवांचें अजरत्व आणि अमरत्व हें अखेर कालाच्या उदरांत गडप होतच असतें. याच्या उलट भगवान् शंकर हे विष प्राशन करूनही अविनाशी आहेत. वस्तुतः विष हें अत्यंत भयंकर आणि मारक असते, तथापि तें शंकरांना मारक झालें नाहीं. कारण -

कराल म्हणजे अत्यंत जहाल भयंकर अशा विषाचेंही शंकराने प्राशन करून टाकले होतें. म्हणूनच तर त्यांना नीलकंठ नांव पडलें. एवढे भयंकर विष प्राशन करूनही त्यांना "कालकलना न" म्हणजे काळ कांहीं ग्रासूं शकला नाहीं ! हा काय त्या शंभूमहादेवाचा स्वतःसिद्ध प्रताप आहे ? छे, तो त्यांचा स्वतःसिद्ध महिमा नव्हे. मग त्याचें मूळ कशांत आहे असें विचारशील तर सांगतो. आई ! तो तुझ्या ताटंकांचा म्हणजे कानांत घालावयाच्या सौभाग्यालंकारांचा महिमा आहे ! जिचे कुंकू बळकट तिचा पति दीर्घायु हें प्रसिद्धच आहे. याच न्यायाने जिचे सौभाग्यालंकार प्रभावी तिचा पति दीर्घायु असणें स्वाभाविकच आहे. तात्पर्य, आई ! शंकराचे अविनाशित्व हा तुझ्या कानांतील ताटंकांचा म्हणजे कर्णभूषणांचा महिमा आहे ! ! जिच्या सौभाग्यालंकाराचा हा महिमा आहे, तिचा साक्षात स्वतःचा महिमा केवढा असणार !

सोन्याच्या पत्र्यावर सममुज चतुष्कोन काढावा. चारी कोनांत मिळणाऱ्या रेषांची टोकें किंचित् पुढें करून त्यांना त्रिशुळाचा आकार द्यावा. चारी कोपऱ्यात आठ त्रिशूळ होतील. मध्यभागीं एकाखाली एक ठं ठं ठं अशीं तीन बीजे लिहावींत. पंचेचाळीस दिवस विधिपूर्वक पूजा करून या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. द्‌ध, पायस, गुळ, नारळ, केळे आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे स्त्रियांची सर्व कार्यें सिद्ध होतील व पुरुषांचा अपमृत्यु टळेल.

किरीटं वैरिञ्चं परिहर पुरः कैटभभिदः
कठोरे कोटीरे स्खलसि जहि जम्भारिमुकुटम् ।
प्रणम्रेष्वेतेषु प्रसभमुपयातस्य भवनं
भवस्याभ्युत्थाने तव परिजनोक्तिर्विजयते ॥ २९॥

आई त्रिपुरसुंदरी ! भगवान् शंकर हे जेव्हां तुझ्या मंदिरामध्यें येतात तेव्हां तुझी सेवा करण्याकरितां नियुक्त असलेल्या देवतांची काय धांदल उडते ! पहा. तुझ्या दर्शनाकरिता आलेले ब्रह्मदेव, विष्णु, इंद्र इत्यादि देव तुझ्या जवळ गर्दी करून उभे असतात. ते नम्र झालेले असतात. ते तुला साष्टांग प्रणिपात करीत असतात. भगवान् शंकर आल्याबरोबर तूं जेव्हां त्यांचें स्वागत करण्याकरितां सामोरी जातेस तेव्हां तुझा सेवकगण "वैरिञ्चं किरीटं परिहर" हा ब्रह्मदेवाचा मुकुट आहे त्याला बाजूला सारा. आणि हा कैटभजित् म्हणजे कैटभारि विष्णु त्यांच्या मुकुटाचे हे तीक्ष्ण टोंक आहे. ते लागेल पायाला. हा जंभारि म्हणजे इंद्र, त्याचा मुकुट आहे. "जहि" म्हणजे तो बाजूला टाका. आई ! याप्रमाणे सर्व देव तुझ्या चरणीं प्रणिपात करीत असतांना अकस्मात् जेव्हां शंकर येतात तेव्हां त्यांच्या स्वागताकरितां तूं उद्युक्त होतेस त्या वेळीं तुझें "परिजन" म्हणजे सेवक, त्यांच्या मुखांतून बाहेर पडणारे हे शब्द तुझा अपार महिमा सुचवीत आहेत. त्यांचा उत्कर्ष असो. त्यांचा विजय असो.

आई त्रिपुरसुंदरी ! सर्व देवांची तुझ्या चरणी साष्टांग प्रणिपात करण्यासाठी अलोट गर्दी होत असते. अशा वेळीं शंकराचे तूं सामोरे जाऊन स्वागत करतेस. यांत तुझ्या मनाचें औदार्य आणि तुझें पातिव्रत्य प्रकट होत आहे. हाही तुझा महिमाच आहे. तूं शंकरांना हात दिला नसतास तर त्यांची संसारांत फटफजिति झाली असती. शंकरांना स्वतःला पांच तोंडे आहेत. एक मुलगा सहा तोंडांचा षडानन - कार्तिकस्वामी, तर दुसरा मुलगा हत्तीच्या तोंडाचा - गजानन लंबोदर. परिवार पहावा तर तो भूत, प्रेत, पिशाच ! ! आई त्रिपुरसुंदरी ! खरोखर तूं जर अन्नपूर्णा या रूपानें शंकरांना हात दिला नसतास तर त्यांना पोटभर खावयास मिळालेंही नसतें ! तुझ्यावांचून शंकर हे मृततुल्य झाले असते ! (श्लोक १ पहा). तात्पर्य, आई ! तुझा महिमा अपार आहे. या श्लोकांत श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या समृद्धीचें वर्णन केलेले असल्यामुळें हा श्लोक उदात्त अलंकाराचे उत्कृष्ट उदाहरण झाला आहे.

श्लोक १० मध्यें दाखविलेल्या यंत्राप्रमाणें सोन्याच्या पत्र्यावर सहा त्रिकोण असलेले यंत्र काढून मधल्या षट्कोनांत फक्त क्लीं हें एकच बीजाक्षर लिहावे. पंचेचाळीस दिवस विधिपूर्वक पूजा करून या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. नैवेद्याला मध आणि उडदाचे वडे असावेत. हें यंत्र धारण केल्यास दुष्ट आणि मुर्ख लोकांची दुर्बुद्धि नष्ट होऊन त्यांच्या मनांत आपल्याबद्दल सद्धावना निर्माण होईल व ते वश होतील.

स्वदेहोद्भूताभिर्घृणिभिरणिमाद्याभिरभितो
निषेव्ये नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः ।
किमाश्चर्यं तस्य त्रिनयन-समृद्धिं तृणयतो
महासंवर्ताग्निर्विरचयति निराजनविधिम् ॥ ३०॥

तादात्म्यभावनेनें इष्टदेवतेची उपासना करणें याला अहंग्रहोपासना असें म्हणतात. ही इतर सर्व साधनांपेक्षां साधकाला सत्त्वर फलप्राप्ति करून देत असते. या दृष्टीने या श्लोकांत आचार्य महात्रिपुरसुंदरीच्या तादात्म्यभावनेनें केल्या जाणाऱ्या उपासनेचा महिमा वर्णन करीत आहेत. आई त्रिपुरसुंदरी ! तूं नित्या म्हणजे आदि आणि अंत यांनी रहित आहेस. त्याचप्रमाणे निषेव्या म्हणजे नित्य उपासना करण्यास योग्य आहेस. तुझ्या देहांतून अर्थात् चरणकमलापासून प्रकट झालेल्या किरणांना देवताच म्हणतात. घृणि शब्दाचा अर्थ किरण असा आहे. त्या देवता किरणासारख्या प्रकाशमान असल्यामुळें त्यांना किरण असें म्हटलेले आहे. या देवता श्रीत्रिपुरसुंदरीचा देहच असलेल्या श्रीचक्रामध्ये विराजमान झालेल्या आहेत. श्रीचक्रवर्णन पहा. तुझ्या भोंवतालीं विराजमान असलेल्या त्या देवता तुझी नित्य सेवा करीत आहेत. त्या सर्व देवतांसह सच्चिदानंदस्वरूप असलेली तूं, जो कोणी साधक तादात्म्यभावनेनें "सोहमस्मि" म्हणजे तो सच्चिदानंद आत्माच मी आहे. या भावनेप्रमाणे "त्वमहमस्मि" म्हणजे तूंच मी आहें अशा तादात्म्यभावनेनें तुझी उपासना करील तो पूर्ण समृद्ध होईल. त्रिनयन म्हणजे भगवान् सदाशिव. नयन म्हणजे मार्ग अर्थात् प्राप्तीचे साधन. सूर्य, चंद्र आणि अग्नि ही शंकरांच्या प्राप्तीचीं तीन साधने आहेत म्हणून शंकरांना त्रिनयन असे म्हणतात. अथवा इडा, पिंगला आणि सुषुन्ना या तीन मार्गांनींच योगी लोक सदाशिवतत्त्वाचा साक्षात्कार करून घेत असतात. म्हणूनही शंकरांना त्रिनयन असे म्हटलेले आहे. अथवा सूर्य, चंद्र आणि अग्नि हे त्यांचे तीन नेत्र आहेत म्हणूनही त्यांना त्रिनयन असें म्हणतात. त्रिनयन म्हणजे शंकर. त्यांची समृजि देखील तो साधक कस्पटाप्रमाणे तुच्छ मानतो. "महासंवर्ताग्नि" म्हणजे कल्पांतकाळाचा प्रळयाग्नि त्याला नीरांजनविधि करतो. तो स्वतःलाच नीरांजनदीपाप्रमाणें त्याच्यावरून ओवाळून घेतो यांत आश्चर्य काय आहे ? तात्पर्य, हे आई ! अत्यंत भक्तवत्सल असलेल्या तुझी तादात्म्यभावनेने उपासना केली असतां तो तुझ्या कृपेने शंकरापेक्षांही अधिक समृद्ध होतो ! प्रत्यक्ष तूंच तो होतो !

सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र काढून शहाण्णव दिवस त्याची आराधना करावी. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. मध, व गूळ, नारळ, केळे आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. यंत्र धारण करावे. फल अणिमाद्यैश्वर्यसिद्धि, परकायप्रवेश, अग्निस्तंभन.

चतुष्षष्ट्या तन्त्रैः सकलमतिसन्धाय भुवनं
स्थितस्तत्तत्सिद्धि-प्रसव-परतन्त्रैः पशुपतिः ।
पुनस्त्वन्निर्बन्धादखिल-पुरुषार्थैक-घटना-
स्वतन्त्रं ते तन्त्रं क्षिति-तलमवातीतरदिदम् ॥ ३१॥

आई त्रिपुरसुंदरी ! तुझें भक्तवात्सल्य किती वर्णन करावे ? भक्तजनांचे सकल मनोरथ पूर्ण करण्याला समर्थ असें हें श्रीविद्यातंत्र शंकरांना प्रकट करावयास तूंच भाग पाडलेस. शंकरांनींही पण तुझ्या आग्रहास्तव तें प्रकट केलें, अशा अभिप्रायानें स्तुति करीत आहेत. "पशुपतिः चतुःषष्ट्या तन्त्रैः सकलं भुवनं अतिसन्धाय पुनः त्वन्निर्बन्धात् इदं ते तन्त्रं क्षितितलं अवातीतरत्" असा या श्लोकाचा मुख्य अन्वय आहे. शंकरांनी चौसष्ट तंत्रांची रचना करून लोकांना सिद्धींच्या व काव्य फळांच्या नादी लावले. केवळ मोक्ष प्रतिपादन करणारा वेदान्तही सांगितला आणि ते स्वस्थ बसले. ज्या योगें धर्म, अर्थ आणि काम यांच्यासह परम पुरुषार्थाचा लाभ होईल, असे साधन प्रकट होणें आवश्यक होतें. आई जगज्जननी ! असें साधन प्रकट करण्याचा तूंच त्यांना आग्रह केलास तेव्हां त्यांनी पुन्हा साधकांना सकल पुरुषार्थांचा प्रामुख्याने लाभ होईल अशा योग्यतेचें तुझें एक स्वतंत्रच तंत्र या भूमंडलावर अवतरविले, प्रकट केलें. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी तात्पर्यार्थ आहे.

विशिष्ट प्रकारच्या निरनिराळ्या सिद्धि अथवा ऐहिक फलें सत्वर प्राप्त करून देणाऱ्या साधनांचा अथवा उपासनांचा मार्ग दाखविणाऱ्या शास्त्राला तंत्र असें म्हणतात. तंत्रशास्त्राचे आद्य प्रवर्तक भगवान् शंकरच आहेत. ही तंत्रे बुद्धीमध्ये काय फलांविषयी मोह निर्माण करतात. अद्‌भुत सिद्धि प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य तंत्रविद्येच्या नादी लागतो. पण शेवटीं त्यांत त्याचा नाशच होतो. याकरितां शहाणे लोक सिद्धींचा अथवा ऐहिक फळांचा मोह विवेकानें जिंकतात व तंत्र विद्येपासून दूर रहातात. बहुतेक तंत्रविद्या या अवैदिक असल्यामुळेंही विवेकी लोक त्यांची उपेक्षा करतात. एकंदर या तंत्रविद्या संख्येने चौसष्ट आहेत. तंत्रविद्यांना शंबरतंत्र अथवा शंबरविद्या असेही म्हणतात. शंबर शब्दाचा अर्थ मायावी अथवा जादूगार असा आहे.

वाचकांना कल्पना यावी म्हणून आम्ही या ठिकाणी कांहीं तंत्रविद्यांचा उल्लेख करीत आहोंत. १. महामायाशंबरतंत्र. या तंत्राच्या साधनानें साधक हा लोकांच्या डोळ्यांना घटाचा पट भासवितो तर पटाचा घट भासवितो. अत्तराला घासलेटाचा वास भासवील तर घासलेटाला अत्तराचा वास भासवील. रडण्याच्या आवाजाला सुस्वराचा भास निर्माण करील तर सुस्वर गायनाला रडण्याचा भास दाखवील. काट्यांची टोके गादीप्रमाणे मऊ असल्याचें दाखवील. तर पराची गादी कांट्याप्रमाणे टोचत असल्याची प्रतीति आणून देईल इत्यादि. यालाच मोहनतंत्र असेंही म्हणतात. २. यो गिनीजालतंत्र. स्मशानांत अपरात्री बसणे, प्रेतें उकरणें इत्यादि वाममार्गानें या तंत्रातील साधनांचे अनुष्ठान करावे लागतें. त्यानें योगिनी प्रसन्न होतात व वाटेल तें कार्य करता येतें. ३. तत्त्वशंबरतंत्र. यायोगे पृथ्वीचें जल आणि जलाची पृथ्वी याप्रमाणे भूततत्त्वांचें परिवर्तन करतां येतें. ४. सिद्धभैरवतंत्र. ५. बटुकभैरवतंत्र. ६. काळभैरवतंत्र ७. कालाग्निभैरवतंत्र. ८. योगिनीभैरवतंत्र. ९. महाभैरवतंत्र. १०. शक्तिभैरवतंत्र. या तंत्रांच्या साधकांना कापालिक असें म्हणतात. ११. बहुरूपाष्टकतंत्र. यांत ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी इत्यादि देवतांची तंत्रें येतात. १२. यमलाष्टकतंत्र. यांत ब्रह्मयामल, विष्णुयामल, रुद्रयामल, लक्ष्मीयामल, उमायामल, स्कंदयामल, गणेशयामल आणि जयद्रथयामल अशीं आठ यामले आहेत. १३. चंद्रज्ञानविद्यातंत्र. १४. मालिनीविद्यातंत्र. १५. महासंमोहनतंत्र. १६. वामजुष्टतंत्र. १७. महादेवतंत्र. १८. वातुलतंत्र. १९. वातलोत्तरतंत्र. २०. कामिकतंत्र. २१. हद्‌भेदतंत्र. २२, तंत्रभेदतंत्र. २३. गुह्यतंत्र. २४. कलावादतंत्र. २५. कलासारतंत्र. २६. कुंडिकातंत्र. २७. मतोत्तरतंत्र. २८. वीणातंत्र. २९. त्रोतलतंत्र. ३०. त्रोतलोत्तरतंत्र. ३१. पंचामृततंत्र. ३२. रूपभेदतं व इत्यादि. एकंदर तंत्रांची संख्या चौसष्टापेक्षांही अधिक भरते. यांतील कांहीं तंत्रे अवैदिक आहेत तर कांहीं तंत्रे अंशतः वैदिक व अंशतः अवैदिक आहेत. ही सर्व तंत्रे राजस व तामस असल्यामुळें सात्त्विक सत्प्रवृत्तीच्या दृष्टीने त्याज्यच आहेत.

यावर कोणी असें विचारील कीं, शंकरांनीं या तंत्रांचा उपदेश करून लोकवंचना कां केली ? यांत शंकरांचा दोष नाहीं का ? पण हा आक्षेप बरोबर नाही. समाजामध्ये अनेक स्वभावाचे लोक असतात. त्यांचे अधिकारही भिन्न भिन्न असतात. अशा स्थितींत अधिकारभेदानें उपदेश करणें अपरिहार्य असतें. कांहीं उद्योग न करतां पशुतुल्य जीवन व्यतीत करण्यापेक्षा कांहीं उपासना करून सिद्धि मिळविणे, इष्ट सुखे संपादन करणें हें केव्हांही ये योयच होय. अशा रीतीने बहुजनसमाजाला उद्योगाचा मार्ग दाखविण्याच्या दृष्टीनें शंकरांकडून तंत्रांचा उपदेश केला गेला. सिद्धींच्या आणि ऐहिक सुखाच्या लोभानें व मोहानें सात्त्विक आणि वैदिक मार्गानुयायी लोकही जर त्या तंत्रमार्मानें जाण्यास प्रवृत्त झाले तर त्यांत शंकरांचा काय दोष आहे ? दीपक, पाचक, रेचक, वामक, अवष्टंभक इत्यादि अनेक प्रकारची औषधें असतात. रोग्याने आपल्या रोगाचा, प्रकृतीचा व अवस्थेचा विचार करून त्यांतील योग्य ते औषध घ्यावयाचे असतें. भलत्याने भलते औषध घेतल्यास त्याचा परिणाम अनिष्ट होणार हें निश्चित. यांत औषधिशास्त्राचा किंवा तें शास्त्र सांगणाऱ्याचा काय दोष आहे ? ग्रंथालयांत अनेक विषयांचे ग्रंथ असतात. वाचकानें आपल्या अधिकाराप्रमाणें ग्रंथांची निवड करूनच ते वाचावयाचे असतात. भलत्याने भलते ग्रंथ वाचून काळाचा अपव्यय केल्यास त्यांत ग्रंथालयाचा किंवा ग्रंथकाराचा काय दोष आहे ? भोजनामध्ये राजशाही थाटाच्या विविध प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, कुरडया, पापड, वडे, भजीं, कढी, आमटी, वरण, पांढरा भात, केशरीभात, मसालेभात, साजूक तूप, पुरणपोळी, खीर, बासुंदी, श्रीखंड, पुरी, लाडू, इत्यादि अनेक प्रकारचे पदार्थ असतात. खाणाऱ्यानें आपली शक्ति पाहूनच ते सेवन करावयाचे असतात. मोहाला आणि जिव्हालौल्याला बळी पडून एखाद्याने न सोसणारे पदार्थ खाल्ले आणि ते बाधले तर त्यांत भोजन घालणाऱ्याचा काय दोष आहे ? याच न्यायाने तंत्रमार्गाचा उपदेश शंकरांनीं करण्यांत त्यांनीं लोकवंचना केली असें म्हणतां येत नाहीं. ते तर परम दयाळू आहेत. अवैदिक मार्ग आणि वैदिक आणि अवैदिक असा मिश्र मार्ग सुजनांनी सोडून द्यावा असे स्वतः शंकरांनीच सांगितलेले आहे. "मिश्रकं कौलमार्गं च परित्याज्यं ही शांकरि" शंकर म्हणतात, हे पार्वती ! अवैदिक आणि वैदिक व अवैदिक अशा मिश्र स्वरूपाचा हा वाममार्ग - तंत्रमार्ग अखेर त्याज्यच आहे.

तंत्रवाङ्‌मयांत शुभागमतंत्र नांवाचा एक भेद आहे. शुभागमतंत्रांतील सर्व अंगें ही वेदमार्गानुसारी आहेत. वसिष्ठ, शुक, सनक, सनंदन आणि सनत्‌कुमार हे या तंत्रमार्गाचे पुरस्कर्ते आहेत. वासिष्ठसंहिता, सनकसंहिता, शुकसंहिता, इत्यादि त्यांची नांवे आहेत. या पांच संहितांना शुभागमपंचक असेंच म्हणतात. या सर्व ग्रंथांत श्रीचक्राधिष्ठीत श्रीविद्येचाच पुरस्कार केलेला आहे. यालाच नित्याषोडशिकातंत्र अथवा महात्रिपुरसुंदरीतंत्र असें म्हणतात. याचेंही मुख्य उपदेशक लोकहिततत्पर भगवान् श्रीसदाशिवच आहेत. तात्पर्य पशुपति म्हणजे भगवान् शंकर यांनी "तत्तत्सिद्धि-प्रसव-परतन्त्रैः" म्हणजे भिन्नभिन्न सिद्धींच्या प्राप्तीसाठी रचली गेलेली अशीं चौसष्ट तंत्रे लोकांना उपदेशिलीं. या तंत्राच्या योगाने सर्व लोकांना सिद्धींच्या व काम्यफलांच्या नादी लावून (अतिसंधाय) ते स्वस्थ बसले. तेव्हां हे आई त्रिपुरसुंदरी ! तूंच त्यांना निर्बंध म्हणजे आग्रह केलास. तुझ्याच आग्रहावरून त्यांनीं चारी पुरुषार्थांची प्रामुख्याने प्राप्ति करून देण्यांत स्वतंत्र असलेलें तुझें हे तंत्र या भूतलावर प्रकट केलें. या तंत्रालाच महात्रिपुरसुंदरीतंत्र अथवा श्रीविद्यातंत्र असें म्हणतात. तेंच तंत्र या सौंदर्यलहरीचा विषय आहे.

श्रीचक्र हेंच या श्वोकाचें यंत्र होय. या श्लोकांतील व बाविसाव्या श्लोकातील श्रीयंत्रांत मध्यवर्ति त्रिकोणांत असलेला बिंदु हा त्या त्रिकोणाच्या वरच्याच बाजूस असलेल्या बारक्या चतुष्कोणांत दाखविलेला आहे. श्रीचक्रलेखनांतही कौलचक्र आणि समयचक्र असे दोन भेद आहेत. कौलचक्रांत बिंदु हा मध्यवर्ती त्रिकोणांत असतो तर समयचक्रांत तो त्रिकोणाच्यावर असलेल्या चतुष्कोणांत दाखावतात.

हें श्रीयंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची पंचेचाळीस दिवस समाराधना करावी. यंत्र हातावर ठेवून या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. दुधाचा आणि मधाचा नैवेद्य दाखवावा. सिद्ध यंत्र धारण करावे. याने सर्व लोक आणि राजेही वश होतील.

शिवः शक्तिः कामः क्षितिरथ रविः शीतकिरणः
स्मरो हंसः शक्रस्तदनु च परामारहरयः ।
अमी हृल्लेखाभिस्तिसृभिरवसानेषु घटिता
भजन्ते वर्णास्ते तव जननि नामावयवताम् ॥ ३२॥

देवता ही मंत्रमय असल्यामुळें तंत्रशास्त्रांत मंत्रालाच प्राधान्य असतें. मागील श्लोकांत श्रीमहात्रिपुरसुंदरी देवीच्याच आग्रहावरून लोककल्याणाकरिता शंकरांनी हें सर्व तंत्रामध्ये श्रेष्ठ असलेलें महात्रिपुरसुंदरीतंत्र अथवा श्रीविद्यातंत्र भूतलावर प्रकट केलें असें सांगितलें. आतां त्या तंत्रातील प्रधान अंग असलेल्या मंत्रालाच या श्लोकामध्ये निर्दिष्ट करीत आहेत. मंत्र हा अत्यंत गोपनीय असल्यामुळें प्रत्यक्ष अक्षरांनी मंत्राचा निर्देश न करतां तो परोक्षपद्धतीनेंच केला जात आहे. व्यवहारामध्यें देखील पुष्कळांना प्रत्यक्ष नांवानेंच केलेला व्यवहार रुचत नाहीं. दादासाहेब, बाबासाहेब असें म्हटलें म्हणजे बरे वाटते. हाच देवांचाही स्वभाव आहे. "परोक्षप्रिया इव ही वै देवाः" हें श्रुतिवचन प्रसिद्धच आहे. परोक्षपद्धतीनें व्यवहार केल्यास मुख्य नांवाची गुप्तताही राखली जाते व देवतांचाही संतोष होतो. अशा अभिप्रायानें आचार्य मोठ्या युक्ती या श्लोकांत श्रीविद्येचा निर्देश करीत आहेत.

पंचदशीविद्या, षोडशीविद्या, कादिविद्या, हादिविद्या असे श्रीविद्यामंत्राचे संप्रदायभेदानें अनेक भेद आहेत. आपआपल्या संप्रदायाप्रमाणे आपल्याला अभीष्ट असलेल्या मंत्राचा उद्धार अनेक विद्वानांनी या श्लोकांतून केलेला आहे. मंत्रातील अक्षरांची आनुपूर्वी ही प्रत्यक्ष गुरुमुखांतूनच अवगत करून घ्यावयाची असते. अधिकारी गुरूंच्या मुखांतून प्राप्त झालेल्या मंत्राक्षरांत एक प्रकारचा अनिर्वचनीय प्रभाव असतो यांत शंकाच नाहीं. भगवापूज्यपाद श्रीमान् आद्य शंकराचार्य हें आपले श्रीविद्यातंत्राचे गुरूच आहेत असें आपण समजू या. जगाचेच गुरु आहेत ते. आणि आपण तर त्यांच्याच शब्दांच्या आधारे श्रीमहात्रिपुरसुंदरीचे स्वरूप पहात आहोंत. आतां आपण आपल्या इष्टदेवतेचें मंत्रमय स्वरूप त्यांच्याच शब्दानी पाहूं.

या श्लोकांत "शिवः शक्तिः" इत्यादि शब्दांनी श्रीविद्येतील एका एका अक्षरांचा उल्लेख केलेला आहे. हे शब्द शास्त्रीय परिभाषेनें क्वचित् साक्षात, क्वचित् लक्षणेने तर क्वचित् लक्षितलक्षणेनें मंत्रातील घटक अक्षरांचा बोध करून देतात. जशा चंद्राच्या कला सोळा आहेत त्याचप्रमाणें श्रीविद्येच्या देखील सोळा कला आहेत. याच अभिप्रायाने श्रीविद्यातंत्राला चंद्रकलाविद्यातंत्र असेंही नांव आहे. या सोळा कलांपैकी "दर्शा" नांवाची पहिली कला, तिची अधिष्ठात्री देवता त्रिपुरसुंदरीच आहे. ती कला शिवतत्त्वात्मक असल्यामुळें प्रकृत स्थळी शिव शब्दाचा अर्थ ती "दर्शा" नांवाची कला असा करतात. दर्शाकलेचें प्रकृतिभूत अक्षर क आहे म्हणून श्लोकांतील शिव शब्दाने क हेंच अक्षर समजावे. त्याचप्रमाणे शक्ति हा शब्द "दृष्टा" नांवाच्या दुसऱ्या कलेचा वाचक आहे. दृष्टाकला ही शक्तितत्त्वात्मक असल्यामुळें शक्तितत्त्वाचे प्रकृतिभूत अक्षर ए आहे. तेंच श्रीविद्यामंत्रातील दुसरें अक्षर होय. काम शब्द हा "दर्शता" नांवाच्या तिसऱ्या कलेचा वाचक आहे. या तिसऱ्या कलेची देवता कामच आहे. दर्शताकलेचें बीजभूत अक्षर ई असल्यामुळें तेंच या मंत्रातील तिसरे अक्षर होय. क्षिति शब्दाचा अर्थ पृथ्वी असा आहे. पृथ्वीतत्त्वाचें बीज ल हें प्रसिद्धच आहे. तेंच प्रस्तुत मंत्रातील चौथें अक्षर होय. अथ शब्द हा मागील चार अक्षरांचा एक खंड पूर्ण झाल्याचे सुचवीत आहे. प्रत्येक खंडाच्या शेवटी ह्रीं बीज असतेंच. ह्रीं बीजासह चार अक्षरांच्या या खंडाला अग्रिखंड असें म्हणतात. या खंडांत ह्रीं या बीजासह पांच अक्षरें होतात. या पांच अक्षरांच्या समूहाला वाग्भवकूट असें म्हणतात.

श्लोकांतील अथ शब्दानंतर दुसऱ्या खंडाला आरंभ होतो. दुसऱ्या खंडातील पहिला शब्द रवि आहे. दुसरें खंड सूर्यतत्त्वाचें आहे. याला सूर्यखंड असेंच म्हणतात. ज्याप्रमाणें श्रीचक्र हें "सोमसूर्यानलात्मकं" या वचनाप्रमाणें त्रिखंड म्हणजे सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांचे आहे. त्याचप्रमाणें श्रीमंत्र देखील त्रिखंड अर्थात् अग्नि, सूर्य आणि सोम या तीन तत्त्वांचा आहे. रवि शब्दाने सूचित होणारें सूर्यतत्त्वाचे 'ह' हें अक्षर या मंत्रातील सहावें अक्षर होय "शीतकिरण" या शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. "सकारश्चन्द्रबीजं" असा शास्त्रसंकेत आहे. या संकेताप्रमाणें शीतकिरण या शब्दाचा अर्थ स हें अक्षर समजावे. सकार हा या मंत्रातील सातवे अक्षर होय. स्मर म्हणजे कामदेव. कामराजाचे प्रकृतिभूत अक्षर क आहे. तेंच या मंत्रातील आठवे अक्षर होय. "हंस" म्हणजे सूर्य. तो ह या अक्षराचा अधिपति आहे. म्हणून लोकातील हंस शब्दाने हकार समजावा. हकार हा या मंत्रातील नववें अक्षर होय. त्याचप्रमाणे शक म्हणजे इंद्र. " लकार इन्द्रबीज " या शास्त्रीय संकेताप्रमाणे शक्र शब्दाचा अर्थ ल असा झाला. लकार हा श्रीमंत्रांतील दहावे अक्षर होय. याला पहिल्या खंडाप्रमाणें ह्रीं हें बीजाक्षर जोडले म्हणजे दुसरा खंड पूर्ण होतो. दुसऱ्या खंडांत सहा अक्षरे आहेत. या दुसऱ्या खंडाला कामराजकूट असें म्हणतात.

"तदतु च" म्हणजे आणि त्यानंतर. "परा-मार-हरयः" परा शब्दाचा अर्थ या ठिकाणी चंद्रकला असा आहे. चंद्राचे बीजभूत अक्षर सकार आहे. स हें अक्षर आपल्या उपास्यदेवतेच्या पंचदशाक्षरी मंत्रातील बारावें अक्षर होय. याचप्रमाणे "मार" म्हणजे कामदेव. तो सर्वांना मारतो अथवा त्याच्यापायी सर्व मरतात म्हणून त्याला 'मार' असे नांव दिलेले आहे. कामराजाचे प्रकृतिभूत अक्षर क आहे. तें या मंत्रातील तेरावें अक्षर होय. तसेंच हरि या शब्दाचा अर्थ इंद्र असा आहे. इंद्राचें बीजभूत अक्षर ल आहे. तेंच आपल्या या मंत्रातील १४ चौदावे अक्षर होय. त्याच्या पुढें ह्रीं हें बीज जोडले म्हणजे मंत्राचा तिसरा खंड पूर्ण होतो. या खंडाला सोमखंड अथवा चंद्रखंड असें म्हणतात. या तिसर्‍या खंडाला शक्तिकूट असेंही म्हणतात. शेवटच्या ह्रीं या बीजासह एकंदर पंधरा अक्षरें होतात. "अवसानेषु तिसृभिः हृल्लेखाभिः घटिताः ते अमी वर्णाः हे जननि तव नामावयवतां भजन्ते" वर सांगितल्याप्रमाणें पहिल्या खंडांत चार अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे. दुसऱ्या खंडांत पांच अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे, आणि तिसऱ्या खंडांत तीन अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे. "अवसानेषु" म्हणजे प्रत्येक खंडाच्या शेवटीं 'हृल्लेखाभिः' म्हणजे ह्रीं या बीजांनी, "घटिताः" म्हणजे युक्त असलेले, "ते अमी वर्णाः " म्हणजे ते हे वर्ण अर्थात ही अक्षरे, "जननि" हे मातोश्री ! तुझ्या मंत्रात्मक नामाच्या अवयवांचें रूप धारण करीत आहेत. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अक्षरार्थ आहे.

ह्रीं हें बीज मंत्रशास्त्रांत फार महत्त्वाचे मानले आहे. हें बीज सर्वमंत्रांची जणुं कांहीं प्राणशक्ति आहे. ह्रीं हे बीज मंत्राच्या सामर्थ्याचे उद्‌बोधन करीत असतें. ह्रीं या बीजाने मंत्रामध्ये चैतन्य निर्माण होत असते ! ह्रीं हें बीज नसेल तर मंत्रराशि निर्जीव होतो. हृदयामध्ये जशी प्राणांची ज्योत विलसत असते, त्याचप्रमाणे ह्रीं हें बीज मंत्रांतील प्राणज्योतच आहे. आकाशांत जशी विद्युलेखा चमकते त्याचप्रमाणें ह्रीं हें बीज साधकाच्या हृदयांत प्रकाश देणारे आहे म्हणूनच ह्रीं या बीजाला हृल्लेखा असे म्हणतात.

"हृदि लेखेव जागर्ति प्राणशक्तिरियं परा ।
हृलेखा कथ्यते तस्मान्मायैवाचिन्त्यवैभवा ॥
अनया रहिताः सर्वे निर्जीवा मन्त्रराशयः ।
अतस्तु सर्वमन्त्राणामियमुद्‌बोधनी मता ॥ "

असें मंत्रशास्त्रांत ह्रीं या बीजाचें वर्णन केले आहे. विश्वाची उत्पत्ति, स्थिति आणि संहार या तिन्ही अवस्था ह्रीं बीजांत सामावलेल्या आहेत. त्याचें प्रामुख्याने कर्तुत्त्व श्रीत्रिपुरसुंदरीकडेच असल्यामुळें तिला ह्रींकारी असे म्हटलेले आहे. " ह्रींकारी ह्रींमती हृद्या" ही तिचीं नांवेच आहेत. फार काय सांगावे, ह्रीं हें तिचेच स्वरूप होय. याच अभिप्रायाने तिला त्रिशतीमध्ये "ह्रींषींशरीरिणी" असे म्हटलेले आहे. श्रीत्रिपुरसुंदरी ही माया अथवा महामायास्वरूप असल्यामुळें ह्रीं या बीजाला मायाबीज असें म्हणतात. त्रिपुरसुंदरी ही सर्व भुवनांची अधिष्ठात्री असल्यामुळें तिला भुवनेश्वरी असेंही म्हणतात. आणि याच अभिप्रायाने ह्रीं या बीजाला भुवनेश्वरीबीज असेंही म्हटले आहे. असें हे ह्रीं बीज अत्यंत महत्त्वाचें असल्यामुळें या मंत्रातील तिन्ही खंडांच्या शेवटीं ह्रीं या बीजाचा प्रयोग झालेला आहे.

या पंचदशाक्षरी श्रीविद्यामंत्रांतील पहिली चार अक्षरे अग्निखंड म्हणून मानली जातात. त्यानंतर ह्रीं हें बीज आहे. त्याच्यापुढील पांच अक्षरे सौरखंड म्हणून ओळखली जातात. सूर्य हा त्यांचा अधिष्ठाता आहे. अग्निखंड आणि सूर्यखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं या बीजाला रुद्रग्रंथि असे म्हणतात. दुसऱ्या खंडाच्या शेवटींही ह्रीं बीज आहेच. या ह्रीं बीजापुढील तीन अक्षरे हा या मंत्रातील तिसरा खंड होय. या तिसऱ्या खंडाला सौम्यखंड अथवा चांद्रखंड असें म्हणतात. सौरखंड आणि चांद्रखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं बीजाला विष्णुग्रंथि असें म्हणतात. तिसऱ्या खंडापुढे असलेल्या ह्रीं बीजानंतर आणखी एक अक्षर आहे. ते फारच महत्त्वाचे आहे, तें गुरुमुखानेंच जाणावे असें सांगितलेले आहे. त्या अक्षरासह आपल्या उपास्यदेवतेचा - श्रीत्रिपुरसुंदरीचा मंत्र हा सोळा अक्षरांचा होतो. म्हणूनच या मंत्राला षोडशीविद्या असें म्हणतात. हें अक्षरही स्वतंत्र मंत्रस्वरूप आहे. या अक्षराचा अंतर्भाव न करतां राहिलेल्या पंधरा अक्षरांच्या मंत्राला पंचदशीविद्या असें म्हणतात. षोडशीविद्येंतील सोळाव्या अक्षराला चंद्रकलाखंड असें म्हणतात. सौम्यखंड आणि चंद्रकलाखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं बीजाला ब्रह्मग्रंथि असें म्हणतात. याप्रमाणे " त्रिखंडो मातृकामन्त्रः सोमसूर्यानलात्मकः" मातृका म्हणजे माता त्रिपुरसुंदरी, तिचा हा मंत्र त्रिखंड म्हणजे चंद्र, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांचा आहे ही गोष्ट लक्षांत घ्यावी. त्रिखंड या विशेषणाने आणखी एक विशेष सूचित केला जात आहे. तो म्हणजे ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति. त्याचप्रमाणे जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति. तसेच विश्व, तैजस आणि प्राज्ञ या चैतन्याच्या तीन अवस्था. तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण. त्याचप्रमाणें स्थूल सूक्ष्म आणि कारण अशा विविधरूपाने श्रीयंत्राचे व श्रीमंत्राचें त्रिखंडत्व पहाता येतें.

वर चौथे खंड म्हणून चंद्रकलाखडाचा उल्लेख केलेला आहे. हें खंड तिन्ही खंडांच्या पलीकडचे आहे. तें सर्वातीत आहे. अवस्थात्रयातीत, गुणत्रयातीत देहत्रयातीत, कूटत्रयातीत खण्डत्रयातीत इत्यादि शब्दानी त्याचें वर्णन करतात. वस्तुतः तें वर्णनातीत आहे. "सत्यं ज्ञानमननं", "नित्य विज्ञानमानन्द" अशा शब्दांनी उपनिषदे ज्याचे वर्णन करतात तेंच तें श्रीविद्येचें चतुर्थ खंड होय. त्याला तुरीयखंड असें म्हणतात. हें शुद्धचित्स्वरूप असल्यामुळें याला 'चिदेकरस' असेंही म्हटलेले आहे. तिला पराकला असे म्हणतात. परा म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि कला म्हणजे तत्त्व. चन्द् धातूचा अर्थ आनंद देणे किंवा प्रकाशणें असा आहे. "चन्दयति अथवा चन्दति इति चन्द्रा" जी सर्वांना आनंद देते, प्रकाश देते अथवा आपल्या स्वतःसिद्ध प्रकाशाने प्रकाशते ती चन्द्रा. "चंद्रा चासौ कला च चन्द्रकला." तात्पर्य, सर्वांना आनंद देणार, प्रकाश देणार आणि स्वतःसिद्ध प्रकाशानें प्रकाशित असलेले असें जें अनिर्वचनीय तत्त्व तेंच चंद्रकला या शब्दाचा अर्थ होय. या चंद्रकलेलाच महात्रिपुरसुन्दरी असें म्हटलेले आहे. श्रीसूक्तामध्ये तर चंद्रा हेंच नांव श्रीमहात्रिपुरसुंदरीला दिलेले आहे. "चन्द्रा हिरण्मयीं लक्ष्मीं" "चन्द्रा प्रभासां यशसा ज्वलन्तीं" इत्यादि. असो

चंद्र जसा सोळा कलानी पूर्ण असतो त्याचप्रमाणे श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही सोळा कलांनी पूर्ण आहे. त्रिपुरसुंदरीकला, कामेश्वरीकला, भगमालिनी- कला इत्यादि पंधरा कलांची पंधरा नांवे आहेत. सोळावी कला ही स्वतः श्रीमहात्रिपुरसुंदरीच होय. ज्योतिःशास्त्रामध्यें चंद्राच्या पहिल्या कलेला प्रतिपदा हें नांव दिले आहे. दुसऱ्या कलेला द्वितीया व तिसऱ्या कलेला तृतीया याप्रमाणें सर्व तिथींची नावे ही चंद्राच्या कलांचीच नांवे होत. या तिथि एकंदर सोळा आहेत. पंधराव्या तिथीला पौर्णिमा आणि सोळाव्या तिथीला अमावास्या असें म्हणतात. प्रतिपदेपासून पूर्णिमेपर्यंत चंद्राची एक एक कला रोज वाढत असते व पूर्णिमेच्या दिवशीं आपल्याला पूर्ण चंद्राचे दर्शन घडते. सोळावी कला त्यांतच सामावलेली असल्यामुळें सोळा कलांचा पूर्णचंद्र पूर्णिमेला दृग्गोचर होत असतो. त्यानंतर क्रमाक्रमानें रोज एक एक कला ऱ्हास पावते. सोळावी कला ही कधींच ऱ्हास पावत नसते. कारण ती नित्य आणि सच्चिदानन्दस्वरूप आहे. " दर्शाद्याः पूर्णिमान्ताश्च कलाः पञ्चदशैव तु । षोडशी तु कला श्रेया सच्चिदानन्दरूपिणी । " (सुभगोदयतन्त्र)

वस्तुस्थिति अशी आहे कीं, चंद्राच्या कला किंवा चंद्र हा ऱ्हासही पावत नाहीं आणि वृद्धिंगतही होत नाहीं. चंद्र हा तत्त्वतः सदासर्वकाळ परिपूर्ण स्वरूपांतच असतो. महात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान असलेल्या मुर्धस्थानच्या सहस्त्रदलकमलांतील चंद्रमंडलाचें स्वरूपही असेंच मानलेले आहे. यावर कोणी असें विचारील कीं, चंद्र जर सदासर्वकाळ पूर्णरूप आहे तर मग त्याच्या कलांची वृद्धि आणि ऱ्हास का दिसतात ? यावर उत्तर असें कीं, चंद्रमंडल हें आप्य म्हणजे जलीय आहे. सूर्यमंडल हें तेजोमय आहे. सूर्यमंडळ आणि चंद्रमंडल ही दोन्ही मंडलें एका नक्षत्रामध्यें आली म्हणजे चंद्रमंडल आपल्याला दिसत नाहीं. कारण तें आपल्या दृष्टीने सूर्यमंडळाच्या आड गेले असतें. अर्थात् आपली दृष्टि आणि चंद्रमंडल यांच्यामध्ये समरेषेत सूर्यमंडल मध्येंच आलेले असतें. त्यामुळें चंद्रमंडल आपल्याला दिसत नाहीं. त्या काळाला आपण अमावास्या असें म्हणतो. अमा म्हणजे एकत्र, सह, बरोबर. आणि वास्या म्हणजे रहाणे. अर्थात् सूर्य आणि चंद्र यांचें ज्या काळीं एकत्र रहाणें घडते त्या काळाला अमावास्या असें म्हणतात तें अगदीं बरोबर आहे. यालाच ज्योतिषशास्त्रांत दर्श असें म्हणतात.

दर्शाच्या दिवशीं आपली दृष्टि आणि चंद्रबिंब यांच्यामध्ये सूर्यमंडळ आलेले असल्यामुळें आपल्या दृष्टीला चंद्रबिंब दिसत नाहीं. आपल्या दृष्टीला तें दिसलें नाहीं म्हणून ते नाहीं असें कसें म्हणतां येईल ? मोठ्या पर्वताच्या पलीकडे समरेषेत असलेला छोटा पर्वत आपल्याला दिसला नाहीं. म्हणून तो नाहीं असे म्हणतां येत नाहीं. तो त्या मोठ्या पर्वताच्या आड असतोच. चंद्राला एका नक्षत्रांतून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाण्यास साठ घटकांचा अवधि लागतो, तर सूर्याला एका नक्षत्रांतून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाण्यास तेरा दिवस लागतात. .प्रतिपादेपासून सूर्यमंडळ रोज थोडें थोडे बाजूला होत असतें. रोज सूर्यमंडळाचा पंधरावा हिस्सा बाजूला होत असतो. पंधरावा हिस्सा म्हणजेच एक कला. सूर्याचा जेवढा भाग बाजूला होत असतो तेवढाच तो चंद्रविबामध्यें प्रतिबिंबित होत असतो. तीच आपण शुक्लपक्षामध्यें प्रतिपदेच्या दिवशीं अथवा द्वितीयेच्या दिवशीं चंद्राची कोर म्हणून पहातो. याप्रमाणें सूर्याची रोज एक एक कला चंद्रबिंबामध्यें प्रतिबिंबित होत असते व कलेकलेने चंद्र वाढला असें आपण म्हणत असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमंडल आणि सूर्यमंडल यांच्यामध्यें पूर्ण व्यवधान असल्यामुळें आपल्याला पूर्णचंद्र पहावयास सांपडतो. अशा रीतीनें आपल्या दृष्टीच्या आड येणाऱ्या सूर्यमंडलाच्या गतीचा हा खेळ आहे. तात्पर्य, चंद्रबिंब हें नेहमींच पूर्ण असतें, तथापि वर सांगितलेल्या कारणामुळे कळांची बुद्धि आणि ऱ्हास हे औपचारिक स्वरूपाने मानले जातात. चंद्राची सोळावी कला ही नेहमींच सर्व कलांमधून अनुस्यूत असतेच. लाक्षणिकदृष्ट्याही तिला वृद्धि-ऱ्हासांचा संपर्क नाहीं म्हणून ती कला नित्य मानली जाते.

प्रतिपदा, द्वितीया इत्यादि तिथिक्रमानें १ दर्शा, २ दृष्टा ३ दर्शता ४ विश्वरूपा, ५ सुदर्शना, ६ आप्यायमाना, ७ आप्यायमाना, ८ आप्याया ९ सूनृता, १० इरा, ११ आपूर्यमाणा, १२ आपूर्यमाणा, १३ पूरयन्ती, १४ पूर्णा, १५ पूर्णमासी अशी सर्व तिचीची वेदामध्ये नावे दिलेली आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याही सोळा कला आहेत. त्रिपुरसुंदरी, कामेश्वरी, भगमालिनी नित्यक्लिन्ना, भेरूण्डा, वह्निवासिनी, महावजेश्वरी, रोद्री, त्वरिता, कुलसुंदरी नीलपताका, विजया, सर्वमंगला, ज्वाला, मालिनी अशीं त्यांची क्रमशः नावें आहेत. सोळावी कला नामरूपातीत आहे. म्हणूनच तिला "सच्चिदानन्दरूपिणी" असें म्हटलेले आहे. तथापि उपासकांच्या कल्याणाकरितां तिचाही एकाक्षरी बीजभूत मंत्र तंत्रशास्त्रामध्ये निर्दिष्ट केलेला आहेच. तो मंत्र गुरुमुखानेच जाणावा. शकार, रेफ, ईकार आणि बिंदु यांचें क्रमशः समुच्चित स्वरूप म्हणजेच तो मंत्र होय. याच बीजाला श्रीविद्या असे म्हणतात. हें बीज आणि पंचदशाक्षरी श्रीविद्येतील तीन खंड मिळून हा मंत्र चार खंडांचा मानला जातो.

"त्रिखण्डो मातृकामंत्र" या ठिकाणी मातृका शब्दाचा अर्थ वर्णमाला अथवा मुळाक्षरे असाही करतात. त्रिपुरसुंदरीमंत्र हा पंधरा आणि सोळा अक्षरांचा आहे. संपूर्ण मंत्र त्रिपुरसुंदरीचें स्वरूप असल्यामुळें ही सोळा अक्षरे त्रिपुरसुंदरीच्या सोळा कलाच मानल्या जातात. प्रत्येक कला देवतास्वरूप आहे. त्यांची नांवे वर दिलींच आहेत. या मंत्रातील सोळा अक्षरांतच संपूर्ण वाक्प्रपंचाला कारणीभूत असलेली मुळाक्षरे समाविष्ट झालेलीं आहेत. या मंत्रातील पहिलें अक्षर क आणि तिसऱ्या खंडातील शेवटचे अक्षर ल मिळून कला हा प्रत्याहार तयार होतो. प्रत्याहार म्हणजे अनेकांचा थोड्यांत संग्रह करणें. कला शब्दाने क-पासून ळपर्यंतची सर्व व्यंजने संगृहीत होतात. व्यंजने ही परतंत्र असतात. स्वरावांचून त्यांचा उच्चार होत नाहीं. तेव्हां व्यंजनांचे पूर्ण उच्चार होण्यासाठीं स्वरही उपलब्ध व्हावेत म्हणून या मंत्रातील दुसऱ्या अक्षराच्या मागे असलेला अ आणि तृतीय खंडातील शेवटचा ल मिळून "अल्" प्रत्याहार मानतात. व्याकरणशाखाच्या दृष्टीने अल् प्रत्याहारांत अ-पासून ह पर्यंतचे सर्व वर्ण येतात. शंकरांच्या डमरूंतून प्रकट झालेल्या "अइउण्" इत्यादि सूत्रांत पहिलें अक्षर अ आहे तर शेवटचे अक्षर ल् हें व्यंजन आहे. गा अल् प्रत्याहारामध्यें अ-पासून ह-पर्यंत सर्व वर्ण समाविष्ट होतात ही एक प्रकारें वर्णमालाच तयार होते. या वर्णमालेचा मेरुमणि क्ष असल्यामुळें या वर्णमालेला अक्षमाला असे म्हणतात. असा हा त्रिखंडमंत्र संपूर्ण मातृका म्हणजे वर्णप्रपंचाचें अधिष्ठान आहे. या त्रिखंडांत नाद, बिंदु आणि कला यांचाही समावेश करतात.

अ पासून ह - पर्यंतच्या सर्व वर्णांना पृथक् पृथक् अधिष्ठात्री देवता आहेत व हे वर्ण नामरूपाने नटलेल्या विश्वप्रपंचाला कारणीभूत असलेली जी तत्त्वें आहेत त्या तत्त्वांचे बीजभूत वर्ण म्हणून मानले जातात. या दृष्टीने ह्या सर्व वर्णांचा षोडशकलात्मक श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या स्वरूपांतच अन्तर्भाव होतो. "षोडशेन्दोः कला भानोर्द्विर्द्वादश दशानले । ताः पचाशत्कला ज्ञेया मातृकाचक्ररूपिणी ॥" कला म्हणजे वर्ण किंवा अक्षर. श्रीविद्येंतींल पंधरा अक्षरे ज्याप्रमाणें सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांत विभागली आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण मुळाक्षरे देखील या तीन तत्त्वांत विभागली गेली आहेत. सोळा अक्षरें चंद्राची आहेत तर चोवीस अक्षरें सूर्याचीं आहेत. अग्नितत्त्वाचीं दहा अक्षरें आहेत. ही सर्व श्रीचक्रांत दाखविलेली आहेत. याप्रमाणे आपली श्रीत्रिपुरसुंदरी देवता ही "मातृकाचक्ररूपिणी" म्हणजे वर्णसमुहस्वरूप आहे. अशा रीतीनें मंत्र, मातृका, श्रीचक्र, देहांतील चक्रे, पिंड आणि ब्रह्मांड यांच्यांतील शब्दप्रपंचाच्या व अर्थप्रपंचाच्या दृष्टीने असलेली एकरूपता लक्षांत घ्यावी. त्याचप्रमाणें सर्वोच्च तत्त्वस्वरूप असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीचेंही स्वरूप लक्षांत घ्यावे आणि गुरुमुखानें प्राप्त झालेल्या श्रीमंत्राच्या मननानें साधकाने सर्व दुःखांतून मुक्त व्हावें आणि आपलें जीवन धन्य करावे. अर्थमननाचें सामर्थ्य नसलें तरी साधकाने केवळ मंत्रजपानेंही सिद्ध व्हावें, धन्य व्हावें, कृतार्थ व्हावें असें सामर्थ्य या अक्षरांतही आहे. श्रीविद्येच्याच कृपेने श्रीविद्येच्या तत्त्वाचा साक्षात्कार व्हावयाचा असतो व ही कृपा अनन्यशरणागतीवरच अवलंबून असते. "यस्य वा पश्चिम जन्म यदि वा शंकरः स्वयम् । तेनैव लभ्यते विद्या श्रीमत्पञ्चदशाक्षरी ॥" ज्याची जन्ममरणपरंपरा शेवटाला येऊन पोंहचली असेल अथवा जो स्वयं शंकर असेल त्यालाच ही पंचदशाक्ष्री श्रीविद्या प्राप्त होऊं शकते. असा या मंत्राचा महीमा आगमतंत्रांत गाइलेला आहे. आम्ही स्थालीपुलाकन्यायानें वाचकांना या विषयाचे दिग्दर्शन मात्र केलेले आहे.

हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. नैवेद्य दहींभात आणि उडदाचे वडे. हे सिद्धयंत्र धारण केल्यास सर्व विद्या सिद्ध होतात. रसायनेंही सिद्ध होतात.

स्मरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौ तव मनोः
निधायैके नित्ये निरवधि-महाभोग-रसिकाः ।
भजन्ति त्वां चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः
शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभि-घृत-धाराहुति-शतैः ॥ ३३॥

" हे नित्ये निरवधिमहाभोगरसिकाः एके तव मनोः आदौ स्मरं योनिं लक्ष्मीं इदं त्रितयं निधाय चिन्तामणिगुणनिबद्धाक्षवलयाः शिवाग्नौ सुरभिघृतधाराहुतिशतैः जुह्वन्तः त्वां भजन्ति" असा या श्लोकाचा अन्वय आहे. आई जगज्जननी ! तूं अनादि आणि अनंत असल्यामुळें तुला नित्या असें म्हणतात. तुझे कांहीं भक्त निरवधि म्हणजे निःसीम, अनंत आणि अपरिच्छिन्न असा "महाभोग" म्हणजे निरतिशय आनंद, ज्याच्या शतांशाने ब्रह्मदेवाच्याही आनंदाची तुलना करतां येणार नाही असा महान आनंद, त्या आनंदाचा रसास्वाद घेण्यांत रसिक म्हणजे तत्पर असलेले तुझे ज्ञानी भक्त तुझ्या पंचदशाक्षरी मंत्राच्या आरंभी "स्मर" म्हणजे काम अर्थात् कामबीज ऐं अथवा क्लीं हे अक्षर तसेंच "योनि" म्हणजे भुवनेश्वरी बीज अर्थात् ह्रीं हें अक्षर आणि लक्ष्मी म्हणजे श्रीं हें बीज अशा तीन बीजांचे पल्लव जोडतात. अर्थात् ही तीन बीजाक्षरें त्या मंत्राच्या आरंभीं योजून तुझा जप करीत असतात. हा जप करतांना त्यांनीं चिंतामणिरत्‍नाच्या मण्यांची तयार केलेली माळ आपल्या हातांत धारण केलेली असते. आपल्या हृत्कमलरूपी वेदीवर स्थापन केलेल्या शिवशक्तिस्वरूप अग्नीमध्ये मंत्ररूपी कामधेनूच्या तुपाच्या धारा - शेकडों हजारों धारा आहुति म्हणून अर्पण करीत करीत ते "त्वां भजन्ति" म्हणजे तुझी उपासना करीत असतात. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

मागील श्लोकांत श्रीविद्येमध्यें घटक असलेल्या पंधरा अक्षरांचा निर्देश केला. या पंधरा अक्षरांत ककार हें पहिलें अक्षर असल्यामुळें या मंत्राला कादिविद्या म्हणतात हेही सांगितलें. त्याचप्रमाणे ही अक्षरें सर्व अक्षरप्रपंचाचे व सर्व तत्त्वांचें मूळ असल्याचा निर्देश केला. अक्षरप्रपंचांतून आणि तत्त्वप्रपंचांतून सर्व नामरूपात्मक विश्वप्रपंच निर्माण होत असल्यामुळें ही अक्षरें सर्व विश्वाची मूलभूत अक्षरें होत, हेही आपण पाहिले. ही पंधरा अक्षरें षोडशकलात्मक श्रीमहात्रिपुरसुंदरीचेच रूप असल्याचेंही आपण पाहिले. श्रीमंत्र, श्रीयंत्र, मातृकाप्रपंच, तत्त्वप्रपंच शब्दप्रपंच, विश्वप्रपंच, पिंड आणि ब्रह्मांड या सर्वांचा परस्परसंबंध, साम्य आणि ऐक्य या सर्व गोष्टींचा विचार केला. असा हा विश्वव्यापी मूलमंत्राचा महिमा लक्षांत घेतल्यानंतर त्या मंत्राच्या जपाचें फल निर्दिष्ट करणें हे क्रमप्राप्तच आहे. प्रस्तुत लोकाच्या मिषानें मूल विद्येचाच फलनिर्देश केला जात आहे.

यावर कोणी असे विचारील कीं, या श्लोकात पल्लवित मंत्रांचा निर्देश आहे. मूलमंत्राचा फलनिर्देश यात नाहीं. पण ही शंका बरोबर नाही. पल्लवित मंत्राच्या फलनिर्देशांतच मूलमंत्राचाही फलनिर्देश सामावलेला आहे. मुळमंत्रामध्यें घटक असलेल्या केवळ ही या बीजमंत्राच्या किंवा त्या बीजमंत्रांतही घटक असलेल्या केवळ "ईं" या बीजमंत्राच्या जपानेंही सर्व ऐश्वर्याची सुखें ज्याच्यावरून ओवाळून टाकावीत अशा नित्यनिरतिशय आनंदाचा लाभ होतो असें सांगितलें आहे. तेथें मूलपंचदशाक्षरी मंत्राचे फळ काय निराळें सांगावयास पाहिजे ? तें तर कैमुतिकन्यायानेंच सिद्ध होत आहे. यावर प्रश्न असा येईल कीं, जर निरवधिक सौख्याचा लाभ मूलपंचदशाक्षरी कादिविद्येनेंच प्राप्त होत असेल तर मग या श्लोकांत कांहीं लोक तीन बीजांचें पल्लव जोडून या मंत्राचा जप करतात असें वर्णन का केलें यावर "रुचिवैचित्र्य" हेंच उत्तर आहे. "भिन्नरुचिर्ही लोकः" हा लोकस्वभाव प्रसिद्धच आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, चंद्र, कुबेर, सूर्य, यमदेव, कामदेव, कार्तिकस्वामी, दुर्वास, मनु, अगस्ति आणि अगस्तिऋषींची पत्नी श्रीलोपामुद्रा, त्याचप्रमाणे नंदिराज या सर्वांनी श्रीविद्येच्या मूलमंत्रानेच आपले मनोरथ सिद्ध करून घेतलेले आहेत. हे सर्व श्रीविद्येचे द्रष्टे मानले जातात. आचार्यपुरस्कृत कादिविद्येचें द्रष्ट्टत्व श्रीदक्षिणामूर्तिदेवाकडे आहे. या सर्व देवांच्या व ऋषिमुनींच्या वैभवावरून त्यांनीं पुरस्कारिलेल्या मंत्राचे व अनुष्ठिलेल्या जपाचें माहात्म्य लक्षांत घ्यावे. याप्रमाणे प्रस्तुत मूल मंत्रांत संपूर्ण फल देण्याचें सामर्थ्य असतांना पल्लव, संपुट इत्यादि कल्पना केवळ रुचिवैचिन्यमुलक आहेत असेंच म्हणावे लागतें.

कांहीं लोक मागील श्लोकांत लोपामुद्रापुरस्कृत हादिविद्या सांगितली आहे व या श्लोकांत कामदेवपुरस्कृत कादिविद्या सांगितली आहे असें वर्णन करतात. हादिमंत्र आणि कादिमंत्र हे दोन्ही मंत्र पंचदशाक्षरीच आहेत. हादिमंत्र हा मोक्षफलदायी आहे तर कादिमंत्र हा भोगफलदायी आहे असा फलभेदही ते कल्पितात. आमच्या मते श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचा कोणताही मंत्र उपासकाला अभीष्ट फल देण्याला समर्थ आहे. भोग किंवा मोक्ष हा फलमेद उपासकाच्या इच्छेवर अवलंबून आहे. याच अभिप्रायाने सप्तशतीमध्यें "आराधिता सैव नृणां भोगस्वर्गापवर्गदा " असे म्हटलेले आहे. आराधना करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे भोग म्हणजे ऐहिक सुखे, स्वर्ग म्हणजे पारलौकिक सुखें आणि मोक्ष म्हणजे दुःखाचा जेथे लेशही स्पर्श करूं शकत नाहीं असें नित्य आणि निरतिशय सुख, हें सर्व कांहीं ती जगन्माता देवी भवानी आपल्या भक्ताला देते असें वर्णन केलेले आहे. राजा सुरथ आणि समाधि नांवाचा वैश्य दोघांनींही देवीमाहात्म्य ऐकले, एकच अनुष्ठान केलें पण दोघांनाही फळें मात्र निरनिराळी मिळाली. प्रसन्न झालेल्या देवीनें वर मागा असें म्हटल्याबरोबर समाधिवैश्यानें अध्यात्मज्ञान वरले व तो मुक्त झाला. सुरथ राजानें मात्र चित्तांत वैराग्य नसल्यामुळे राज्यच मागितले. मरेपर्यंत राज्य भोगले आणि मेल्यानंतरही तो पुन्हा सावर्णि नांवाचा मनु राजाच झाला ! तात्पर्य, मंत्र आणि देवता समर्थ असली तरी फलभेद हा उपासकाच्या अधीनच असतो. याच न्यायाने महात्रिपुरसुंदरीस्वरूप असलेली कादिविद्या ही एक भोगैश्वर्यच देते आणि हादिविद्या ही मोक्ष देते असा फलभेद मानणे हें शास्त्रसंगत आणि युक्तिसंगत होऊं शकत नाहीं, ही गोष्ट लक्षांत घ्यावी.

मागील श्लोकांत हादिविद्या सांगितली आहे असें म्हणणार्‍यांच्या मतानें मागील श्लोकांतील शिव शब्दाचा अर्थ ह, शक्ति शब्दाचा अर्थ स आणि काम शब्दाचा अर्थ क असा आहे. बाकीची सर्व अक्षरें मागील श्लोकांत सांगितल्याप्रमाणेच समजावींत. याप्रमाणें पंधरा अक्षरांचा हादि मंत्र तयार होतो. चालू श्लोकांत स्मर शब्दाने क, योनि शब्दाने ए आणि लक्ष्मी शब्दाने ई अशीं ही तीन अक्षरे घ्यावींत व हादिविद्येतील पहिली तीन अक्षरे काढून त्यांच्या जागी तीं योजावीत म्हणजे या श्लोकाने कादिविद्येचाच निर्देश केला असें म्हणतां येतें.

"निरवधि-महा-भोग-रसिकाः" आचार्यानी साधकांना हें जें विशेषण दिले आहे तें मोठे मार्मिक आहे. "भुज्यते इति भोगः" या व्युत्पत्तीप्रमाणे भोग शब्दाचा अर्थ सुख आणि दुःख असा होतो. दुःख हा कधींच इच्छेचा व मिळविण्याचा विषय होऊं शकत नाही. ते अनपेक्षित रीतीनें पुढें येतें व भोगावे लागतें. घटपटादि इष्ट पदार्थ हे जरी इच्छेचा आणि मिळविण्याचा विषय होत असले तरी अंतत सुख हाच इच्छेचा व मिळविण्याच्या प्रयत्नाचा विषय मानावा लागतो. या दृष्टीने प्रकृतस्थलीं भोग शब्दाचा अर्थ सुख असाच करावा लागतो. भोगाला निरवधि आणि महा ही दोन विशेषणें दिलेली असल्यामुळें या ठिकाणी निरवधि-महाभोग शब्दानें नित्यनिरतिशय निजानंदरूपी सुखच घ्यावे लागतें. सामान्य मानवाच्या आनंदापासून तो ब्रह्मदेवाच्या आनंदापर्यंत विषयजन्य सर्व सुखें ही निरवधि आणि महा या विशेषणांना पात्र होत नाहींत. कारण तीं सर्व सुखे विषयजन्य असल्यामुळें नाशिवंत असतात व नित्य आणि निरतिशय सुख त्यांच्यापेक्षां निराळेंच असतें. त्याच सुखाला अपवर्ग म्हणतात. "अपवृज्यन्ते सांसारिकदुःखानि यत्र स अपवर्गः" जेथे सर्व सांसारिक दुःखे निराळी होतात, सुटतात, मावळतात ती अवस्था म्हणजेच अपवर्ग होय. तात्पर्य, निरवधि-महाभोग शब्दाचा अर्थ अपवर्ग म्हणजे मोक्ष असाच होतो. या अपवर्गसुखाचे रसिक म्हणजे उत्कंठेने आस्वाद घेणारे भक्त असा हा निरवधि-भहाभोग-रसिक या शब्दाचा अर्थ झाला. हे भक्त परम विरक्त असल्यामुळे कोणत्याही विषयवैभवाची अपेक्षा न करतां कादिविद्येनें श्रीललिता महात्रिपरसुंदरीची उपासना करीत असतात.

"चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः" चिंतामणि रत्‍नाप्रमाणे इष्ट फल देणाऱ्या, त्याचप्रमाणे गुणनितबद्ध म्हणजे रेशमाच्या दोऱ्यात गोंवलेल्या अथवा सोने, चांदी, तांबे इत्यादि निर्मल धातूंच्या तारेंत गांठलेल्या, अक्ष म्हणजे मण्यांची, वलय म्हणजे माला त्यांनीं आपल्या हातांत धारण केलेली असते. अक्षमाला या शब्दाचा एक निराळा अर्थ अभिप्रेत आहे. अक्ष म्हणजे अपासून क्ष पर्यंतचे सर्व वर्ण. यांत क्ष हा माळेतल्या मेरूच्या मण्याप्रमाणें सर्वांच्या वर ठेवून अ पासून ळ पर्यंत पन्नास वर्ण उलट्या आणि सुलट्या क्रमाने योजले म्हणजे शंभर संख्येची अक्षमालाच तयार होते. स्फटिक, विद्रुम (पोवळें), मौक्तिक, रुद्राक्ष, पद्याक्ष अथवा पुत्रवंती यांच्या मण्यांची माळ केल्यानंतर त्या माळेंतील मण्यांवर अक्षमालेंतील वर्णांची स्थापना करावयाची असते. याला मालासंस्कार असें म्हणतात. अशी ही संस्कारसंपन्न माला जपाचे फल त्वरित प्राप्त करून देणारी असते. अशा तऱ्हेची अक्षमाला ज्यांनीं आपल्या हातांत धारण केलेली आहे असे भक्त असा याचा अर्थ झाला.

आई त्रिपुरसुंदरी ! तुझे हे भक्त आपल्या संवित्कमलामध्यें अंतर्हृदयावकाशामध्यें मंगलमय वेदिका अथवा स्थंडिल निर्माण करून तेथें तुझें आवाहन करतात. मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलांतील पूर्णचंद्रबिंबामध्ये तूं विराजमान झालेली असतेस. तेथून तुला ते आपल्या हृत्कमलामध्यें आणतात. तेथें तुझी स्थापना करतात. त्यांची इष्ट व उपास्य देवता तूं, तुलाच ते अग्नि कल्पून सन्निरोधन अवकुंठन त्याचप्रमाणे जातकर्मादि संस्कारही तें तुझ्या ठिकाणी करीत असतात. याप्रमाणे संस्कारसंपन्न उपास्यदेवतारूपी अग्नीमध्यें कामधेनूच्या दुधापासून तयार केलेल्या मंत्ररूपी पवित्र घृताच्या शेकडो आहुति ते अर्पण करीत असतात. या त्यांच्या मानसउपासनेमध्यें "ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्" असा सर्व यागाचा थाट असतो. याला तंत्रशास्त्रांत "अन्तर्याग" असेंच नांव दिलेलें आहे. याप्रमाणे उपास्थदेवतेशी सर्वस्वीं समरस झाले ते शेवटीं उपास्यदेवतारूपच होतात. श्रीललितामहात्रिपुरसुंदरीस्वरूपच ते होतात. ही अवस्था निरवधिमहाभोगस्वरूप असल्यामुळें त्यांतच ते तन्मय होऊन रहातात. आई ! तुझ्या जपाचा हा केवढा महिमा आहे !

पहिल्या श्लोकांतील यंत्राप्रमाणेच या श्लोकाचें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. त्यांत क्लीं या बीजाऐवजी श्रीं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. मुगाची खिचडी मुगदळ आणि मध याचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्धयंत्र धारण करावे. विपुल धनाचा लाभ हें त्याचें फळ सांगितले आहे.

शरीरं त्वं शम्भोः शशि-मिहिर-वक्षोरुह-युगं
तवात्मानं मन्ये भगवति नवात्मानमनघम् ।
अतः शेषः शेषीत्ययमुभय-साधारणतया
स्थितः सम्बन्धो वां समरस-परानन्द-परयोः ॥ ३४॥

"हे भगवति त्वं सम्भोः शशिमिहिरवक्षोरुहयुगं शरीरं असि, अहं तव आत्मानं अनघं नवात्मानं मन्ये; अतः समरसपरानन्दपरयोः वां शेषः शेषी इति अयं सम्बन्धः उभयसारणतया स्थितः अस्ति." भगवती हें त्रिपुरसुंदरीचें विशेषण आहे. समग्र ऐश्वर्य समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण वैराग्य या सहांच्या समुच्चयाला भग असे म्हणतात. या सहांचा समुच्चय जेथे पूर्णत्वानें विराजतो त्या व्यक्तीला भगवान किंवा भगवती असें म्हणतात. अथवा सर्व विश्वाची उत्पत्ति, प्रलय, प्राणिमात्रांची उत्पत्ति कोठून व कशी होते, सर्व प्राण्यांचा शेवट कसा व कोठे होतो, विद्या म्हणजे काय आणि अविद्या म्हणजे काय, हें सर्व साकल्याने जो जाणतो त्याला भगवान् असें म्हणतात. त्या देवतेला भगवती असें म्हणतात. " ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः । ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णा भग इतीङ्‍गना ॥" "उत्पत्तिं प्रलयं चैव भूतानामागतिं गतिम् । वेत्ति विद्यामविद्यां च स वाच्यो भगवानिति ॥" अशा या भग आणि भगवान या शब्दांच्या दोन व्याख्या प्रसिद्धच आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या ठिकाणी या दोन्ही व्याख्या पूर्णपणें सार्थ होत असल्यामुळें तिला भगवती हें विशेषण दिलेले आहे तें सर्वस्वी योग्य आहे. हे सर्वैश्वर्यादिगुणसंपन्न माते जगज्जननी ! तूं भगवान् शंकर यांचेंच शरीर म्हणजे मूर्तस्वरूप आहेस. या शिवशक्तीच्या मूर्तस्वरूपांत सूर्य आणि चंद्र हे स्तनाप्रमाणें शोभत आहेत. शशी म्हणजे चंद्र आणि मिहिर म्हणजे सूर्य. आई ! शिवस्वरूपाशीं समरस झालेला तुझा देह "अनघ" म्हणजे अत्यंत शुद्ध, निर्दोष असून तो जेव्हां पहावे तेव्हां "नवात्मा" म्हणजे नव्या स्वरूपाचाच दिसत असतो. तारुण्याच्या तेजाने तो मुसमुसत असतो. आई जगज्जननी ! तुझ्याशी समरस झालेले परानंद म्हणजे भगवान् शंकर आणि त्यांच्याशी समरस झालेली "परा" म्हणजे परात्पर शक्तिस्वरूप तूं, या तुम्हां दोघांभध्यें परस्परांशी परस्परांचे एवढें तादात्म्य आहे कीं, त्यामुळें तुमचा तो तादात्म्यसंबंध तुम्हां दोघांकडेही सारखाच दिसतो. तुमच्या तादात्म्यांत अणुमात्रही भेद दिसत नसल्यामुळे तुम्हां दोघांमध्ये कोण मुख्य आणि कोण गौण, कोण प्रधान आणि कोण अंग हें कळतच नाहीं. एकदा भगवान् शंकर प्रधान आहेत तर तूं अंगभूत म्हणजे गौण आहेस. एकदा तूं मुख्य आहेस तर भगवान् सदाशिव हे अंगभूत आहेत. असे हे तुझें स्वरूप मोठे अनिर्वचनीय आहे.

या लोकांमध्यें "नवात्मानं" या शब्दांत श्लेष आहे. एकाच शब्दांत अनेक अर्थ विवक्षित असणें याला श्लेष असें म्हणतात. काव्यशास्त्रांत हा एक अलंकार मानला जातो. नवात्मा याचा एक अर्थ आपण वर पाहिलाच आहे. आतां दुसरा अर्थ आपण पाहूं. नवात्मा या शब्दांतील नव शब्द नऊ या संख्येचा वाचक आहे. आत्मा म्हणजे स्वरूप. ज्याचे स्वरूप नऊ संख्येने विभागलें गेले आहे तो नवात्मा. नवात्मा म्हणजे भगवात् सदाशिव. ज्यांचा निर्देश पहिल्या चरणांत शंभु या शब्दाने केलेला आहे. त्यांनाच महाभैरव अथवा आनंदभरव असें म्हणतात. या आनंदभैरवालाच नवात्मा असेंही तंत्रशास्त्रांत म्हटलेले आहे. कारण तंत्रशास्त्रांत आनंदभैरवाची नऊ रूपे मानलेली आहेत. " कालव्यूहः कुलव्यूहो नामव्यूहस्तथैव च । ज्ञानव्यूहस्तथा चित्तव्यूह स्यात्तदनन्तरम् । नादव्यूहस्तथा बिन्दुव्यूहः स्यात्तदननरम् । कलाव्यूहस्तथा जीवव्यूहः स्यादिति ते नव ॥" व्यूह शब्दाचा अर्थ शरीर किंवा मूर्ति असा आहे. कालव्यूह, कुलव्यूह, नामव्यूह, ज्ञानव्यूह, चित्तव्यूह, नादव्यूह, बिंदुव्यूह, 'कलाव्यूह आणि जीवव्यूह, अशीं महाभैरवाची नऊ रूपे आहेत.

कालव्यूह म्हणजे चंद्र, सूर्य आणि त्यांच्या निमित्ताने होणारे कालखंड. क्षण, लव, घटका, मुहूर्त, दिन, पक्ष, मास, ऋतु, अयन आणि संवत्सर यांपासून कल्पान्तकालापर्यंतचा सर्व काल महाभैरवाचेंच स्वरूप होय. नामव्यूहः म्हणजे ताजे संज्ञास्कंध. व्यूहालाच स्कंध असा पर्याय आहे. संज्ञास्कंध म्हणजे पदार्थांची सामान्यनामें आणि विशेषनामें. हेंही एक भैरवाचेच रूप आहे. ज्ञानव्यूह म्हणजे विज्ञानस्कंध. सविकल्पक ज्ञान, निर्विकल्पक ज्ञान इत्यादि सर्व ज्ञानांचे प्रकार यांत अंतर्भूत होतात. हेंही आनंदभैरवाचेंच रूप होय. चित्तव्यूहामध्यें मन, बुद्धि, चित्त, अहंकार आणि महत्तत्व यांचा अंतर्भाव होतो. नादव्यूहामध्ये परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरीरूप, संपूर्ण अक्षरराशि अंतर्भूत होतो. बिंदुव्यूह म्हणजे षट्चक्रांचा समुदाय. कलाव्यूह म्हणजे मूळ मातृकासमूह अर्थात् अ पासून क्ष पर्यंतचे सर्व वर्ण. जीवव्यूह म्हणजे सुखदुःखांचे भोक्ते जीवात्मे. हे नऊही व्यूह आनंदभैरवाचेच देह मानले जातात. नामरूपात्मक, विश्वप्रपंच या नऊ व्यूहांचाच असल्यामुळें संपूर्ण विश्व हें आनंदभैरव भगवान् सदाशिव यांचाच देह होय ही गोष्ट सिद्ध झाली. याच अभिप्रायाने शंकरांना "नवात्मा" असें म्हटलेले आहे. जसे भगवान शंकर नवात्मा आहेत त्याचप्रमाणे भगवती त्रिपुरसुंदरी ही देखील नवात्माच आहे. पस्तिसाव्या श्लोकांत हा सिद्धान्त स्पष्टच मांडला आहे. श्रीचक्र हें नव- खंडात्मक आहे हें आपण पूर्वी पाहिलेच आहे. त्रिपुरसुंदरी ही श्रीचक्रस्वरूप आहे म्हणून तीही ही नवात्मा झालीच. संपूर्ण वर्णसमूह हें त्रिपुरसुंदरीचेच रूप आहे. तोही नऊ खंडांनी विभागला जातो. अवर्ग, कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग, पवर्ग, यवर्ग, शवर्ग आणि या सर्वांच्या मूर्धस्थानी मेरूप्रमाणें असलेला क्ष असे हे वर्णराशीचे नऊ विभाग आहेत. याही अभिप्रायानें त्रिपुरसुंदरीला नवात्मा असें म्हटलें जातें इत्यादि पुष्कळ सूक्ष्म विचार नवात्मा या शब्दांत अंतर्भूत आहे.

तात्पर्य, भगवान् शंकर हे जसे नवात्मा आहेत तसेंच त्रिपुरसुंदरीही नवात्मा आहे. याच अभिप्रायाने शंकर शंकरी, भैरव भैरवी, महाभैरव महाभैरवी, आनंदभैरव आनंदभैरवी इत्यादि नामसादृश्यही या दोघांमध्ये असल्याचें दृष्टीस पडते. अशा रीतीनें नामदृष्ट्या आणि रूपदृष्ट्या एकमेकांशी पूर्णपणे समरस असल्यामुळें परानंद म्हणजे भगवान शंकर आणि परा म्हणजे श्रीत्रिपुरसुंदरी यांच्यांतील गौण मुख्य भाव हा संबंध दोघांकडेही सारखाच आहे. आई ! तुम्हां दोघांपैकी कोणाला मुख्य म्हणूं ? आणि कोणाला गौण म्हणूं ? तुम्हा दोघांनाही मी भक्तिपूर्वक प्रणाम करतो. या श्लोकाची यंत्रपूजापद्धति स्ल्लोक सत्तावीसमध्यें दिली आहे.

मनस्त्वं व्योम त्वं मरुदसि मरुत्सारथिरसि
त्वमापस्त्वं भूमिस्त्वयि परिणतायां न हि परम् ।
त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्ववपुषा
चिदानन्दाकारं शिवयुवति भावेन बिभृषे ॥ ३५॥

हे आई जगजननी ! भ्रूमध्यप्रदेशी असलेल्या आज्ञाचक्रांतील मनस्तत्त्व म्हणजे मन तूंच आहेत. कंठस्थानीं असलेल्या विशुद्धिचक्रांतील आकाशतत्त्वही तूंच आहेस. हृदयाच्या जवळ असलेल्या अनाहत नांवाच्या संविच्चक्रांतील "मरुत' म्हणजे वायुतत्त्वही तूंच आहेस आणि उपस्थाच्या सान्निध्यांत असलेल्या स्वाधिष्ठानचक्रातील "मरुत्सारथि" म्हणजे अग्नितत्त्वही तूंच आहेस. वायु हा अग्नीचा मित्र असल्यामुळें त्याला मरुत्सारथि असें म्हटले आहे. मरुत म्हणजे वायु आणि सारथि म्हणजे साहाय्य करणारा. वायुचे साहाय्य असल्याशिवाय अग्नि प्रदीप्त होत नाहीं, हे तर प्रसिद्धच आहे. आई ! नाभिस्थानीं असलेल्या मणिपूरचक्रांतील आप म्हणजे जलतत्त्वही तूंच आहेस आणि मूलाधारचक्रांत असलेलें पृथ्वीतत्त्वही तूंच आहेस. मूलाधारचक्र हें गुदस्थानीं असल्याचें पूर्वी सांगितलेलेच आहे. तात्पर्य, पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें तूंच आहेस, "एवं त्वयि परिणतायां" याप्रमाणे पंचमहाभूतांच्या रूपाने तूं परिणाम पावली असतां "न ही परं" तुझ्यापेक्षा या जगांत निराळें असे कांहींच नाहीं.

"हे शिवयुवति ! त्वं एव स्वात्मानं विश्ववपुषा परिणमयितुं भावेन चिदानन्दाकारं बिमृषे" हे पार्वती ! तूंच स्वतःच्या रूपाला विश्वरूपानें परिणत करण्याकरितां अगदीं मनांतून मोठ्या हौसेनें चिदानन्दाकाराला "बिभृषे" म्हणजे धारण करतेस. चित् म्हणजे शक्तितत्त्व आणि आनंद म्हणजे शिवतत्त्व - या दोन्ही तत्त्वांच्या रूपाने तूंच नटतेस. अर्थात् शक्तीही तूंच आहेस आणि शिवही तूंच आहेस. सर्व कांहीं तूंच आहेस. कार्यही तूंच आहेस आणि कारणही तूंच आहेस. त्याचप्रमाणे सर्व कार्याचें व कारणांचे अधिष्ठानही तूंच आहेस. प्रकृतिरूपाने तूंच परिणत होतेस आणि अधिष्ठानरूपाने तूं निर्विकार रहातेस. आई ! तुला मी नमस्कार करतो.

हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. दूध पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करून हे यंत्र धारण करावे. रोज एक हिरडा अभिमत्रून सेवन करावा. यानें क्षयरोग जातो.

तवाज्ञाचक्रस्थं तपन-शशि-कोटि-द्युति-धरं
परं शम्भुं वन्दे परिमिलित-पार्श्वं परचिता ।
यमाराध्यन्भक्त्या रवि-शशि-शुचीनामविषये
निरालोकेऽलोके निवसति हि भालोकभवने ॥ ३६॥

छत्तीस श्लोकांपासून एक्केचाळीस श्लोकांपर्यंत आपल्या शरीरातील मूलाधारादि पदचक्रामध्ये शिवशक्तिस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीचे निरनिराळ्या रूपाने वास्तव्य असल्याचें वर्णन केले आहे. ही सहा चक्रे म्हणजे शरीरांतर्गत एक श्रीचक्रच होय अशा भावनेनेंही त्यांची उपासना केली जाते. या श्लोकांचे कांहीं विद्वानांनीं पुष्कळ विस्तृत विवेचन केलेले आहे. आम्ही मात्र ग्रंथविस्तारभयास्तव संक्षेपाने आवश्यक तोच अर्थ देत आहो. यांत एक विशेष लक्षांत घेण्यासारखा आहे तो असाः भूमध्यप्रदेशांतील द्विदल आज्ञाचक्र हें मनस्तत्त्वाचें आहे. येथील मनस्तत्त्व हें आत्मतत्त्वस्वरूप मानलेले आहे. " तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः आकाशाद्वायुः" या श्रुतिवचनाप्रमाणें क्रमशः उत्पन्न झालेलीं पंचमहाभूततत्त्वें ही खालच्या चक्रांत सांगितलेली आहेत. त्यांत उपनिषदांतील उत्पत्तिकम आणि लयक्रम सोडून मणिपूरचक्रांत जलतत्त्वाचा व स्वाधिष्ठानचक्रांत अग्नितत्त्वाचा निर्देश केला आहे तो केवळ योगप्रक्रियेला आणि तांत्रिक प्रक्रियेला अनुलक्षून केलेला आहे. याच दृष्टीने नवव्या श्लोकांतही चक्रांचा क्रम बदललेला दिसेल. ही विसंगति टाळण्याकरितां कांहीं विद्वान् मणिपूरचक्राचें ठिकाण उपस्थाच्या मुळाशी मानतात व स्वाधिष्ठानचक्राचे ठिकाण नाभिस्थानाजवळ मानतात. पण हा स्थानविपर्यय बहुसंख्य योग्यांना व तांत्रिकांनाही मान्य असल्याचे दिसत नाहीं. आतां आपण क्रमाने या साही श्लोकांचा अर्थ पाहूं.

हे आई जगज्जननी ! माझ्या शरीरांत जी मूलाधारादि सहा चक्रे आहेत त्यांची अधिष्ठात्री तत्त्वतः तूंच आहेस म्हणून तीं सर्व चक्रे तुझीच आहेत ( श्लोक ९ पहा). त्यांतील माझ्या भूमध्यस्थानी असलेलें तुझें जें द्विदल आज्ञाचक्र आहे त्यामध्ये भगवान् शंभुनाथ हे तुझ्यासह विराजमान झाले आहेत. त्यांना परशंभुनाथ अथवा महाशंभुनाथ असेंही म्हणतात. आणि तुला त्या ठिकाणी चित्परांबा अथवा परचिदंबा असेंही म्हणतात. तेथें ते शंभुनाथ इतके तेजस्वी आहेत कीं, त्यांना पाहून तपन म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र हे कोट्यवधि संख्येनें एकत्र झाले असतां जो प्रकाश आणि जो आह्लाद प्रतीतीस येईल तो प्रकाश आणि तो आह्लाद त्यांच्याकडे पाहून प्रतीतीस येतो. असें तेज त्यांनी धारण केलेलें आहे. परात्पर चित् शक्तिस्वरूप असलेल्या तुझ्या स्वरूपाशी त्यांच्या देहाचा वामभाग संमिलित झालेला आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांची आराधना केली असतां तो भक्त अशा उत्तम लोकाला प्राप्त होतो कीं, त्या ठिकाणी चंद्र, सूर्य आणि अग्नि यांच्याही प्रकाशाला प्रवेश नाहीं. तेथें शुद्ध चित्तत्त्वाशिवाय दुसरा कोणताच प्रकाश नाहीं. त्याच्याच प्रकाशामुळे सर्व कांहीं प्रकाशत आहे. "न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं, नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः । तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥" असें त्याचें मुंडकोपनिषदांत वर्णन केलेले आहे. याच अभिप्रायाने त्याला "निरालोक" असें म्हटलेले आहे. तसेंच तो लोक "अलोक" म्हणजे विजन अर्थात पूर्ण एकान्त स्वरूपाचा आहे. तेथें पोहोचणारा हजारों लाखों लोकांमध्ये एखादा विरळाच असतो. आई ! तुझा भक्त तुझ्याच कृपेने त्या "भालोकभुवने" म्हणजे प्रकाश आणि आनंद यांचे स्थान असलेल्या अनिर्वचनीय आल्हाददायक अशा स्थानांत तो सदासर्वकाळ विराजमान होऊन रहातो. तात्पर्य, आज्ञाचक्रांत अभिन्न शिव- शक्तिस्वरूप असलेल्या परशंभुनाथ आणि श्रीचित्परांबा देवी त्रिपुरसुंदरी यांच्या उपासनेचा केवढा हा प्रभाव आहे !

गंगा आणि यमुनास्वरूप असलेल्या इडा आणि पिंगला या दोन नाड्या मूलाधारचक्रापासून उगम पावतात आणि आज्ञाचक्रांत त्यांचा संगम होतो म्हणून या ठिकाणाला प्रयागराज असे म्हणतात. तेथून पुढें वरणा आणि असि या दोन माझ्या उगम पावून सहस्रदल कमलाकडे जावयास निघतात. वरणा आणि असि या दोन नाड्यांच्या मध्यभागी असलेल्या प्रदेशास वाराणसी असें म्हणतात. वाराणसी म्हणजेच काशी. या काशीक्षेत्राची अधिष्ठात्री देवता भगवान् विश्वनाथच आहेत. त्यांनाच शंभुनाथ असे म्हणतात. त्यांच्या अर्धांगीं चित्‌शक्तिरूप परांबा विराजमान झालेली आहे. प्राणप्रयाणसमयी जे कोणी भ्रूमध्यप्रदेशांत या शिवशक्तीचें स्मरण करतात त्यांना भगवान् शंकर तारकमंत्राचा उपदेश करतात. मृत्यूनंतर त्यांना या लोकाच्या उत्तरार्धांत सांगितलेल्या शिवलोकाची प्राप्ति होते. असाही एक अभिप्राय या श्लोकाचा लक्षांत घेण्यासारखा आहे.

सोन्याच्या पत्र्यावर वर्तुळ काढून त्या वर्तुळांत एकाखाली एक दुं दुं दुं अशी तीन बीजें लिहावींत. त्या तिन्ही बीजांच्या पुढें क्रमाने ठ, ष आणि श अशीं अक्षरे लिहावींत. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. उडदाचे वडे आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार या श्लोकाचा जप करावा. ते यंत्र धारण करावे अथवा पाणी मत्रून प्यावयास द्यावे. नाना प्रकारचे कठीण रोग दूर होतील.

विशुद्धौ ते शुद्ध-स्फटिक-विशदं व्योमजनकं
शिवं सेवे देवीमपि शिव-समान-व्यवसिताम् ।
ययोः कान्त्या यान्त्याः शशि-किरण-सारूप्यसरणे-
र्विधूतान्तर्ध्वान्ता विलसति चकोरीव जगती ॥ ३७॥

आई जगज्जननी ! कंठस्थानीं असलेल्या या षोडशदलात्मक विशुद्धिचक्राची अधिष्ठात्री देवता तूंच आहेस. तुझ्या या विशुद्धिचक्रामध्ये शुद्ध स्फटिकापमार्गे स्वच्छ असलेले भगवान् सदाशिव हे व्योमतत्त्वाचे जनक आहेत. व्योम म्हणजे आकाश. आकाशतत्त्व हे आत्मतत्त्वापासून अभिव्यक्त झालेले आहे. भगवान सदाशिव हे आत्मतत्त्वस्वरूपच आहेत. विशुद्धिचक्रामध्यें त्यांना व्योमेश्वर असे म्हणतात. आई ! मी त्यांची सेवा करीत आहे. त्याचप्रमाणे " शिवसमान-व्यवसितां त्वां देवीं अपि सेवे" विश्वाची उत्पत्ति, स्थिति, प्रलय, निग्रह आणि अनुग्रह इत्यादि सर्व कार्यें श्रीशंकराप्रमाणेच तूं आपल्याकडेही घेतलेली आहेस. तूं या विशुद्धिचक्रांतील देवी आहेस, मी तुझीही उपासना करीत आहें.

आई ! या विशुद्धिचक्रांत व्योमेश्वराच्या सान्निध्यांत विराजमान असलेली व्योमेश्वरी आहेस. चंद्राच्या किरणाप्रमाणें आह्लाद आणि प्रकाश देण्याचे जिचे सामर्थ्य आणि स्वभाव आहे ती तुम्हां दोघांची कांति भक्तांच्या अंतःकरणांत प्रसरण पावूं लागली असतां भक्तांचे जग हे अंतःकरणानें अधिक निर्मळ होतें. त्यांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी तिमिर पार मावळून जातो. आणि चकोर पक्ष्याची स्त्री ज्याप्रमाणें चंद्राच्या प्रकाशाकडे पाहून आनंदित होते त्याचप्रमाणे तुझे भक्तही विशुद्धिचक्रामध्यें शिवशक्तिस्वरूपानें विराजमान असलेल्या तुम्हां दोघांकडे पाहून आनंदित होत असतात. आई ! मी तुम्हां दोघांनाही अनन्य चित्तानें भजत आहे.

चांदीच्या पत्र्यावर हे यंत्र काढून पूजा करावी. गूळ, नारळ आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. पांच हजार या श्लोकाचा जप करून यंत्र धारण करावे अथवा पाणी अभिमंत्रून प्यावें. ब्रह्मराक्षसाची बाधा निवृत्त होईल.

समुन्मीलत्संवित्कमल-मकरन्दैक-रसिकं
भजे हंसद्वन्द्वं किमपि महतां मानस-चरम् ।
यदालापादष्टादश-गुणित-विद्या-परिणति-
र्यदादत्ते दोषाद् गुणमखिलमद्भ्यः पय इव ॥ ३८॥

आई जगज्जननी ! हें माझ्या हृदयाच्या सान्निध्यांत असलेलें अनाहतचक्र हें तुझेंच आहे. यालाच संवित्कमल असें म्हणतात. कांहीं विद्वान् संवित्कमल शब्दानें वक्षस्थलामध्यें असलेलें निराळेंच अष्टदलकमल घेतात; पण तें बरोबर नव्हे. क्रमाने षट्चक्रांचे वर्णन चालू असतां क्रमप्राप्त अनाहतचक्र सोडून मध्येंच दुसऱ्या चक्राचा निर्देश आचार्य करणार नाहीत. हें कमल बारा पाकळ्यांचें आहे. याच्या प्रत्येक दलांत एक एक आदित्यदेवता विराजमान झालेली आहे. द्वादश आदित्यांचा प्रकाश या ठिकाणी सदैव विलसत असतो. ज्ञानाचे - आत्मज्ञानाचेंही तेंच स्थान असल्यामुळें त्याला संवित्कमल असें म्हणतात. "समुन्मीलत्" म्हणजे उत्तम रीतीनें विकसित होणाऱ्या या संवित्कमलांतील मकरंदाचा - पुष्परसाचा प्रामुख्याने आस्वाद घेण्यामध्यें रसिक म्हणजे तत्पर असलेले असे दोन हंस तेथें आहेत. एक हंस आणि एक हंसी. मानसरोवरामध्ये जसे राजहंस असावेत त्याचप्रमाणे योगीजनांच्या अथवा भक्तजनांच्या मानस म्हणजे अंतःकरणरूपी सरोवरामध्यें संचार करणारे ते जसे कांहीं हंसच आहेत. हे दोन हंस म्हणजे एक साक्षात् भगवान् सदाशिव आणि दुसरी प्रत्यक्ष तूंच आदिमाया महाशक्ति. तुम्हा दोघांना या अनाहतचक्रामध्ये हंसेश्वर आणि हंसेश्वरी असे म्हणतात. त्यांचें स्वरूप 'किमपि' म्हणजे अनिर्वचनीय आहे. त्या राजहंसांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादांतूनच अठरा विद्यांची परिणति म्हणजे विकास झालेला आहे. या अठरा विद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याचप्रमाणे या चारी वेदांचे चार उपवेद. आयुर्वेद, धतुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद म्हणजे शिल्पशास्त्र. तसेंच शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छन्दःशास्त्र ही सहा वेदांची अंगें आणि पूर्वोत्तर मीमांसाशास्त्र (मीमांसा आणि वेदान्त), न्यायशास्त्र, पुराण आणि धर्मशास्त्र. चौसष्ट कला आणि तंत्रशास्त्र वगैरे इतर विद्या या सर्वांचा या अठरा विद्यांतच अंतर्भाव होतो. राजहंस ज्याप्रमाणें एकत्र मिसळलेले दूध आणि पाणी यांचें पृथक्करण करतात त्याचप्रमाणे आई ! राजहंसस्वरूप असलेले तुम्ही दोघे देखील भक्तजनांच्या गुणदोषांचे पृथक्करण करून दोष बाजूला सारतां आणि गुणांचे ग्रहण करतां ! शंकरांनी लोकांना ताप देणारे विष कंठांत घातलें आणि आह्लाद देणारा चंद्र मस्तकावर धारण केला ! आई, मी तुम्हा दोघांना मनःपूर्वक भजत आहे.

कांहीं लोक या संवित्कमलामध्यें असलेल्या परमेश्वराला तो अग्नीच्या ज्वालेप्रमाणे असल्यामुळें ज्वालेश्वरमहादेव असें म्हणतात, तर त्यांच्या अर्धागीं विराजमान असलेल्या परमेश्वरीला ज्वालेश्वरीदेवी असें म्हणतात. नारायणोपनिषदांतही या अभिप्रायाने वर्णन केले आहे. "तस्य मध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थिता । नीलतोयदमध्यस्था विद्युल्लेखेव भास्वरा ॥" कंठस्थानाच्या खालीं वीतभर आणि नाभिप्रदेशाच्या ऊर्ध्वभागी हृत्कमलाचा निर्देश केलेला आहे. त्याच्यामध्ये वह्निशिखा म्हणजे अग्नीची ज्वाला दिसते. या ठिकाणी वह्निशिखा शब्दाने शुषुम्ना नाडी विवक्षित आहे. ती अग्नीच्या ज्वालेप्रमाणेंच दिसत असते. अत्यंत सूक्ष्म असते. उभी असते. पाण्यानें भरलेल्या ढगांत जशी वीज चमकावी त्याप्रमाणें ती भास्वर म्हणजे तेजस्वी दिसते. त्याच ठिकाणी साधकाला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होत असतो. "ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत्" तें आत्मतत्त्व चोहोंकडून प्रकाशसमूहानें व्यापलेले दिसतें. विश्वाचे म्हणजे ब्रह्मांडाचे आयतन म्हणजे आधारभूत आहे. त्यालाच 'महत्' म्हणजे परब्रह्म असें म्हणतात. संवित्कमलामध्यें असलेल्या प्रकाश पुंजांत अग्निज्वालेप्रमाणें दिसणारी जी अत्यंत सूक्ष्म सुषुम्न नाडी आहे तिच्यांतच परमात्मतत्त्वाचा साक्षात्कार होत असतो. कारण तो तेथेंच प्रकटरूपानें आहे. "तस्याः शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः" असे त्याचें वर्णन केलेले आहे. त्यालाच नारायण असेंही म्हटलेले आहे. "नारायणः पर ब्रह्म तत्त्वं नारायणः परः । नारायणः परं ज्योतिरात्मा नारायणः परः" "स ब्रह्मा स शिवः सेन्द्रः सोक्षरः परमः स्वराट्" अशीं त्याला अनेक नांवें दिलेलीं आहेत. त्यालाच प्रकृतस्थलीं हंस असें म्हटले आहे. तो परमात्मा आपल्या शक्तीसह तेथें विराजमान असल्यामुळें त्याच्या शक्तीला हंसी असें म्हटलेले आहे. याप्रमाणें हृत्कमल, संवित्कमल आणि अनाहतचक्र ही तिन्ही कमलें वक्षस्थलींच असल्यामुळें त्यांचा व त्यांतील तत्त्वांचा एकरूपानें निर्देश केला गेला आहे. तात्पर्य, हंस आणि हंसी या रूपाने प्राणिमात्रांच्या हृदयांत शिवशक्तितत्त्व हें विराजमान झालेले आहे, ही गोष्ट निर्विवाद होय. याच अभिप्रायाने योगानुशासनांतही या हंसाच्या जोडीचे मोठे सुंदर वर्णन केलेलें आहे -

"अनुपममनभूति-स्वात्मसंवेद्यमाद्यं
वितत-सकल-विद्यालापमन्योन्यमुख्यम् ।
सकल-निगम-सारं सोऽहमोंकार-गम्यं
हृदृयकमल-मध्ये हंसयुग्मं नमामि ॥"

भूतमात्रांच्या हृत्कमलामध्यें विराजमान असलेल्या हंसाच्या जोडीला मी नमस्कार करतो. ती हंसाची जोडी मोठी अनुपम आहे. तिला उपमा देण्यासारखे या जगांत दुसरें कोणीच नाहीं. केवळ स्वतःच्या अनुभवानें स्वतःच जाणता येतें. तें हंसाचें जोडपे सर्व विश्वाच्या अगोदरचें आहे. त्यांचे एकमेकांशी होत असलेले आलाप म्हणजे संभाषण हेंच सर्व विद्यांच्या रूपाने परिणत झालेलें आहे. त्या दोघांमध्ये कोण मुख्य आणि कोण गौण हें सांगतां येत नाहीं. दोघेंही एकरूप असल्यामुळें त्यांचा अंगागीभाव हा अनिर्वचनीय झालेला आहे. ते सर्व वेदांचे सारभूत; आहेत. "सोऽहं" हे त्यांचें स्वरूप आहे. सोऽहं यांतील सकार शक्तिस्वरूप आहे, तर हकार हा शिवस्वरूप आहे. या शिवशक्तीच्या तादात्म्याचेंच दुसरें रूप "हंसः" असें आहे. अशा रीतीनें सोऽहं आणि हंसः ही दोन्ही एकरूपच आहेत. सोऽहं यांतच अभिव्यक्त होणारा ॐकार हाच त्या हंसांची ओळख करून देऊं शकतो. माते जगज्जननी ! ही हंसाची जोडी म्हणजे तादात्म्यभावापन्न शिवशक्तिस्वरूप तूंच आहेस. हृत्कमलवर्ती हंस आणि हंसेश्वरीरूप तुम्हां दोघांना मी भक्तिभावानें भजत आहें. मी तुमचा आश्रय करीत आहें. मी तुमच्या चरणी प्रेमपूर्वक प्रणाम करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर वर्तुळ काढून त्यांत कं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. अकरा उडदाचे वडे, तांबूल, नारळ, आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. तें यंत्र धारण करण्यास द्यावें. अथवा जल अभिमंत्रून प्रोक्षण करावे. लहान मुलांची सर्व अरिष्टे टळतील.

तव स्वाधिष्ठाने हुतवहमधिष्ठाय निरतं
तमीडे संवर्तं जननि महतीं तां च समयाम् ।
यदालोके लोकान् दहति महति क्रोधकलिते
दयार्द्रा या दृष्टिः शिशिरमुपचारं रचयति ॥ ३९॥

हे आई जगजननी ! माझ्या देहांतील स्वाधिष्ठानचक्र हें तुझेंच आहे. कारण त्याची तूं अधिष्ठात्री देवता आहेस. आई ! त्या तुझ्या स्वाधिष्ठानचक्रामध्यें असलेल्या अग्नितत्त्वाच्या ठिकाणी संवर्ताग्नीच्या रूपानें भगवान् सदाशिव निरंतर तन्मयतेनें वास्तव्य करतात. त्यांना तेथें संवर्तेश्वर असें म्हणतात. त्यांच्या वामभागीं सर्वश्रेष्ठ अशी तूं समया, समयांबा अथवा समयादेवी या नांवानें विराजमान झालेली आहेस. मी तुम्हा दोघांचीही "ईडे" म्हणजे स्तुति करीत आहे. आई ! संवर्ताग्नीच्या रूपाने स्वाधिष्ठानचक्रांतील अग्नितत्त्वाच्या ठिकाणी ज्या वेळेला भगवान् शंकर हे प्रलयाग्नीच्या रूपाने अधिष्ठित होतात त्या वेळीं त्यांचा आलोक म्हणजे प्रकाश किंवा ज्वाला क्रोधाने वाढू लागतात. भगवान् शंकर हे त्या वेळेला संहाराच्या अवस्थेंत असतात. म्हणून त्यांचा प्रक्षोभ होत असतो. प्रक्षुब्ध झालेल्या सदाशिवस्वरूप संवर्ताग्रीच्या ज्वाळा लोकांचा जेव्हां दाह करूं लागतात त्याच वेळेला आई ! तुझी दयार्द्र दृष्टि भक्तजनांना शीतोपचार करीत असते. तुझ्या कृपापूर्ण दृष्टीनें होणाऱ्या शीतल उपचारामुळे तुझ्या भक्तांना प्रलयाग्नीच्या ज्वालाही थंडीच्या दिवसांत अग्नीजवळ बसून शेकावें त्याप्रमाणें सुखदायक वाटतात. तात्पर्य, स्वाधिष्ठानचक्रामध्यें विराजमान असलेल्या संवर्तेश्वररूपी भगवान सदाशिवांशीं सर्वस्वीं अभिन्न - एकरूप असलेली तूं समयांबा पराशक्ति, मी तुझें स्वाधिष्ठान चक्रांत ध्यान करीत आहें. मी तुझें भक्तिपूर्वक स्तवन करीत आहें.

श्लोक तेराप्रमाणे सोन्याच्या पत्र्यावर चतुष्कोण काढावा. त्यांत वरच्या ओळींत ठं पं पः हीं अक्षरे लिहावींत. खालच्या ओळींत दोन दोन अक्षरांच्या खालीं ष आणि सं ही अक्षरे लिहावींत. बारा दिवस यंत्राची पूजा करावी. रोज एकशेआठ वेळां या श्लोकाचा जप करावा. दूध, पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्यास वाईट स्वप्ने पडण्याचें थांबते व दुःस्वप्न-दोष टळतो.

तटित्त्वन्तं भक्त्या तिमिर-परिपन्थि-स्फुरणया
स्फुरन्नानारत्नाभरण-परिणद्धेन्द्रधनुषम् ।
तव श्यामं मेघं कमपि मणिपूरैक-शरणं
निषेवे वर्षन्तं हर-मिहिर-तप्तं त्रिभुवनम् ॥ ४०॥

हे आई जगज्जननी ! माझ्या देहातील मणिपूरचक्र हें तुझेंच चक्र आहे. तुझ्या या मणिपूरचक्रांत भगवान् सदाशिव हे मेघेश्वररूपानें वास्तव्य करीत आहेत. कोणी त्यांना अमृतेश्वर असेही म्हणतात. तेथें त्यांच्या वामभागीं तूं अमृतेश्वरी या रूपाने अथवा सौदामनीदेवी या रूपाने विराजमान झालेली आहेस. तुझ्यासह त्या मणिपूरचक्रांत विराजमान असलेल्या अमृतेश्वराची मी भक्तिपूर्वक उपासना करीत आहे. ते मेघेश्वर महादेव हे 'तटित्वात्' आहेत. तटित् म्हणजे विद्युल्लता. मेघामध्ये जशी विद्युल्लता शोभावी तशी तूं सौदामनीदेवी अमृतेश्वराच्या सान्निध्यांत शोभत आहेस. तूं त्यांची शक्तिच आहेस. विद्युलतेनें युक्त असलेला मेघ हा वृष्टि करण्यास उद्युक्त असतो हें प्रसिद्धच आहे. विद्युल्लतेचें स्फुरण म्हणजे प्रकाश हा 'तिमिरपरिपन्थि' म्हणजे अंधकाराचा नाश करीत असतो. विद्युत् ही क्षणभरच प्रकाशत असते, पण तूं मात्र अमृतेश्वराच्या सान्निध्यांत नित्य स्थिररूपानें विराजमान झालेली आहेस. तामिस्रलोकस्वरूप असलेल्या मणिपूरचक्रांतील तिमिराचा नाश तुझ्याचमुळें होत असतो. तूं आपल्या अंगावर धारण केलेल्या अनेक रत्नजडित अलंकारांतील रत्नांच्या कांतीनें अमृतेश्वररूपी मेघामध्यें जणुं कांही इंद्रधनुष्यच निर्माण झालेलें आहे असे वाटतें. ढगांमध्ये दिसणारे इंद्रधनुष्य हें देखील वृष्टीचें द्योतक असतेंच. आई ! तुझ्या सान्निध्यांत असलेले मेघनाथ हे श्याम म्हणजे कृष्णवर्ण आहेत. मेघाचा कृष्णवर्ण देखील मेघ वृष्ट्युन्मुख असल्याचेंच सूचित करीत असतो. तुझें मणिपूरचक्र हें एक त्या अमृतेश्वराचें मुख्य मंदिर आहे. असें हे तुझ्याच सामर्थ्यामुळे समर्थ असलेले श्रीमेघनाथ हे हर म्हणजे अग्नि आणि मिहिर म्हणजे सूर्य यांच्या योगाने पतप्त झालेल्या त्रिभुवनाला अमृताची-जलाची वृष्टि करून शांत करीत आहेत. तात्पर्य, आई ! प्रलयकालीन अग्नि-सूर्याच्या तापाने तप्त झालेल्या त्रिभुवनाला शांत करणारे भगवान् अमृतेश्वर हे तुझ्याच सामर्थ्याने संपन्न असून ते तुझ्याच मणिपूरचक्रांत तुझ्यासह वास्तव्य करीत आहेत. मी तुम्हां उभयतांची भक्तिभावानें उपासना करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर श्लोक तीनप्रमाणें यंत्र काढून त्यांत श्रींच्या जागी ठं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. मध, दूध, पायस आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. तें यंत्र उशीत घालून झोपावे. इष्ट वस्तूचे स्वप्नांत दर्शन घडेल.

तवाधारे मूले सह समयया लास्य परया
नवात्मानं मन्ये नव-रस-महा-ताण्डवनटम् ।
उभाभ्यामेताभ्यामुदयविधिमुद्दिश्य दयया
सनाथाभ्यां जज्ञे जनक-जननीमज्जगदिदम् ॥ ४१॥

आई जगज्जननी ! माझ्या शरीरातील मूलाधारचक्राचीही अधिष्ठात्री तूंच आहेस. माझ्या देहांतील मूलाधारचक्र हें तुझेंच आहे. आई ! तुझ्या या मूलाधारचक्रामध्यें नवात्मा भगवान् महाभैरव हे शृंगार, वीर, करुणा इत्यादि नऊ रसांनीं युक्त असें अद्‌भुत तांडवनृत्य करीत आहेत. तांडवनृत्य करणारे नटच आहेत ते. पुरुषांकडून केल्या जाणाऱ्या नृत्याला तांडवनृत्य असे म्हणतात, तर स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या नृत्याला लास्य असे म्हणतात. शंकरांच्या नृत्यालाही तांडवनृत्य हें नांव प्रसिद्धच आहे. पार्वतीच्या नृत्यालाही लास्य असे म्हणतात. म्हणूनच पार्वतीचे नांव महालास्या (म्हाळसा) असे प्रसिद्धच आहे. आई ! तांडवनृत्य करीत असलेल्या शंकरांबरोबर तूही आपलें लास्यनुत्य करीत असतेसच. तेथें तुला समयादेवी, भैरवी, महाभैरवी अथवा आनंदभैरवी असें म्हणतात. तात्पर्य, मुलाधारचक्रामध्यें तुम्ही दोघेंही नृत्य करण्यामध्यें तत्पर झालेले दिसत आहां. तुम्हां दोघांचेंही नृत्य जगाच्या उपकाराकरितांच आहे. विश्वाची उत्पत्ति-अवस्था लक्षांत घेऊन मोठ्या दयेनें, प्रलयकाळीं दग्ध झालेल्या लोकांचें पुनरुज्जीवन करण्याचें कार्य तुम्ही पत्करले. तुम्हीच या सृष्टीचे माता आणि पिता झालांत. तुमच्यामुळेच ही सृष्टि सनाथ झाली. आई याप्रमाणे ! मूलाधारचक्रांत शिवाभिन्न शक्तिस्वरूप असलेल्या तुझ्या चरणी मी भक्तिभावाने प्रणाम करीत आहें. सौंदर्यलहरीचा पूर्वार्ध येथें संपला.

सोन्याच्या पत्र्यावर चतुष्कोण काढून त्यांत एकाखाली एक यं आणि ह्रीं बीजे लिहावींत. तीस दिवस पूजा करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. रोज चार हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. हे यंत्र धारण केल्यानें सर्व उदररोग निवृत्त होतात.

गतैर्माणिक्यत्वं गगनमणिभिः सान्द्रघटितं
किरीटं ते हैमं हिमगिरिसुते कीर्तयति यः ।
स नीडेयच्छायाच्छुरणशबलं चन्द्रशकलं
धनुः शौनासीरं किमिति न निबध्नाति धिषणाम् ॥ ४२॥

आई जगज्जननी ! तुझ्या किरीटाचे मी काय वर्णन करूं ? आकाशांतील बारा आदित्य म्हणजे सूर्य हे रत्नस्वरूपाला प्राप्त झाले आणि ते मुकुटावर दाटीवाटीने जडविले गेले आहेत. तो तुझा मुकुट शुद्ध सोन्याचा आहे. आई, नगाधिराजतनये त्रिपुरसुंदरी ! जो कोणी तुझ्या या मुकुटाचे वर्णन करावयास प्रवृत्त होईल तो तुझ्या मुकुटावर दिसणाऱ्या धनुष्याकार चंद्रकोरीकडे पाहून हें इंद्रधनुष्य आहे अशी कां बरे कल्पना करणार नाहीं ? हें इंद्रधनुष्य आहे अशीच त्याला बुद्धि होईल. कारण "नीडेय" म्हणजे मुकुटाच्या वर्तुळांत बसविलेली रत्‍नें. तीं विविध जातीची असल्यामुळे त्यांच्या नील, पीत, हरित इत्यादि विविध वर्णाच्या छटा त्या धनुराकार चंद्रामध्यें प्रतिबिंबित झालेल्या आहेत. त्यामुळें ती तुझ्या मुकुटावरील चंद्राची कोर विविध रंगानी विलसत असलेलें जणुं कांहीं हें इंद्रधनुष्यच आहे कीं काय ? असें त्या मुकुटाचे वर्णन करावयास प्रवृत्त झालेल्या कवीला वाटू लागतें ! उत्प्रेक्षा, अपह्नव, संदेह अतिशयोक्ति इत्यादि विविध अलंकारांच्या छटा या श्लोकांत पहावयास सांपडतात.

सोन्याच्या पत्र्यावर विसाव्या श्लोकांतील यंत्राप्रमाणे यंत्र काढून त्यांत पहिल्या ओळींत रं रं व खालच्या ओळींत रीं रीं ही बीजे लिहावित. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. साखरेचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. हें यंत्र धारण केल्याने जलोदरादि सर्व प्रकारचे उदरव्याधि नष्ट होतात.

धुनोतु ध्वान्तं नस्तुलित-दलितेन्दीवर-वनं
घन-स्निग्ध-श्लक्ष्णं चिकुर-निकुरुम्बं तव शिवे ।
यदीयं सौरभ्यं सहजमुपलब्धुं सुमनसो
वसन्त्यस्मिन्मन्ये वल-मथन-वाटी-विटपिनाम् ॥ ४३॥

आई जगत्कल्याणकारिणी ! तुझा हा "चिकुरनिकुरुम्ब" म्हणजे केशपाश मोठा, दाट, स्नेहयुक्त आणि मृदु आहे. विकसित झालेल्या नीलकमलांच्या वनाचीच त्याला उपमा देतां येईल, असा तो सुंदर आहे. तो तुझा कृष्णवर्ण केशपाश आमच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी तिमिराचा निरास करो, हीच माझी प्रार्थना आहे. आचार्यांनी आपल्याबरोबर आपले शिष्य आणि अनेक भक्तजन गृहीत धरलेले असल्यामुळें स्वतःला उद्देशून "नः" या बहुवचनाचा प्रयोग केलेला आहे. एकवचनी प्रयोग हा न्यूनत्वाचा अथवा तुच्छत्वाचा द्योतक असला, तरी प्रकृतस्थलीं अत्यंत लडिवाळपणानें तो मातेला उद्देशून केला जात असल्यामुळें नितान्त प्रेमाचा द्योतक आहे. आईशी बोलतांना आपण "तूं" "तुला" इत्यादि एकवचनीच प्रयोग करीत असतो. तथापि तेथें अनादराचा लेशही नसतो ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. आई ! तुझ्या केशपाशाचे स्वाभाविक सौगन्ध्य इतकें उत्कृष्ट आहे कीं, त्याचा लाभ घेण्याकरितां 'वलमथन' म्हणजे इंद्र, त्याच्या उपवनतील कल्पवृक्षांची फुलें जणुं कांहीं येथे वेणीच्या रूपानें एकत्र येऊन बसलेली आहेत असें वाटतें ! किती सुंदर उत्प्रेक्षा आहे ही !

सहाव्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या पत्र्यावर यंत्र काढून त्याच्या मध्यभागीं फक्त श्रीं हे बीज लिहावे. चाळीस दिवस पूजा करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज तीन हजार जप करावा. अंगठी, अथवा ताईत करून यंत्र धारण करावे. सर्व लोक वश होतील.

तनोतु क्षेमं नस्तव वदन-सौन्दर्यलहरी-
परीवाह स्रोतःसरणिरिव सीमन्तसरणिः ।
वहन्ती सिन्दूरं प्रबल-कबरी-भार-तिमिर-
द्विषां बृन्दैर्बन्दीकृतमिव नवीनार्ककिरणम् ॥ ४४॥

आई जगज्जननी ! तुझ्या मस्तकावरील भांग हा जणुं कांहीं तुझ्या मुखकमलाच्या सौंदर्याचा तरंगयुक्त प्रवाह वहात रहाण्याचा एक तयार केलेला प्रवाहमार्ग म्हणजे पाटच आहे असें वाटतें. "सीमन्तसरणि" म्हणजे केस विंचरून तयार केलेल्या भांगाचे स्वरूप, भांगामध्ये सौभाग्यलंकार म्हणून स्त्रिया शेंदूर धारण करीत असतात. आचार्य, श्रीत्रिपुरसुंदरीच्या भांगांत भरलेल्या शेंदराच्या चूर्णावर उत्प्रेक्षा करीत आहेत. आई ! शेंदरानें भरलेला तुझा भांग पाहिला म्हणजे उदयाला येणाऱ्या बालरवीच्या किरणांचा जणुं कांहीं समूहच तेथें बंदिस्त करून ठेवला आहे असें वाटतें !

तुझा घनदाट केशभार हा अंधकारासारखा काळाभोर आहे. सूर्य उदयाला आला कीं सूर्याचे किरण अंधकाराचा नाश करतात. त्यामुळें सूर्याच्या किरणांकडे तो केशसमूह शत्रुबुद्धीनें पहातो. उदयाला येणाऱ्या सूर्याचीं आरक्त किरणें आपल्याला अंधकार समजून आपला नाश करतील या भावनेनें जणुं कांहीं तो सूर्यकिरणांचा शत्रु बनला. तुझ्या मस्तकावरील घनदाट अंधकाराप्रमाणें कृष्णवर्ण असलेल्या केशसमूहरूपी शत्रुवृंदानी - शत्रुसमूहांनीं - आरक्तवर्ण असलेल्या त्या सूर्यकिरणांना दोहो बाजूंनी बंदिस्त करून ठेवले आहे असें वाटतें. तात्पर्य, श्रीत्रिपुरसुंदरीच्या भांगात भरलेला शेंदूर उदयाला येणाऱ्या सूर्याच्या किरणासारखा आरक्त असून तो भक्तजनांच्या मनाला आकृष्ट करीत आहे. आई ! तुझा तो भांग "नः क्षेम तनोतु" आमचें कल्याण करो.

लोक ४३ प्रमाणें यंत्र लिहून मध्ये ह्रीं हें बीज लिहावे. बारा दिवस यथासांग पूजा करावी. गुळ आणि पायस यांचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. यंत्र धारण करावे. अथवा कुंकू, हळद किंवा केशर अभिमंत्रून त्याचा तिलक धारण करावा. याने सर्व लोक वश होतील. सर्व बाधा निवृत्त होतील.

अरालैः स्वाभाव्यादलि-कलभ-सश्रीभिरलकैः
परीतं ते वक्त्रं परिहसति पङ्केरुहरुचिम् ।
दरस्मेरे यस्मिन्दशनरुचिकिञ्जल्करुचिरे
सुगन्धौ माद्यन्ति स्मर-दहन-चक्षुर्मधुलिहः ॥ ४५॥

आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या मस्तकावरील केश स्वभावतःच अराल म्हणजे कुटिल अर्थात् कुरळे आहेत. त्यांची शोभा बाल्यावस्थेतील भ्रमरांच्या शोभेप्रमाणें दिसत आहे. काळ्याभोर कुरळ्या केसांनी व्यापलेले तुझें मुख, कमलाच्या शोभेलाही तिरस्कृत करीत आहे. अर्थात तुझें मुखकमल निसर्गातींल कमलापेक्षांही अत्यंत सुंदर दिसत आहे. तूं स्मितहास्य करूं लागली असतांना तुझें मुखकमल किंचित् विकसित होतें तेव्हां तुझ्या दंतपंक्तीची कांति ही त्या कमलांतील केसराप्रमाणे दिसते. दंतकांतिरूपी केसरांनी तुझें मुखकमल अत्यंत सुंदर दिसते. स्मरदहन म्हणजे भगवान शंकर यांचें नेत्र हेच कोणी भ्रमर, ते त्या कमलांतील सोगंध्य सेवन करून अत्यंत आनंदित होतात. आई ! तुझें तें मुखकमल आमचे कल्याण करो. या श्लोकांत पूर्वार्धांत उपमा आणि उत्तरार्धांत रूपक असें अलंकार आहेत.

वरीलप्रमाणे यंत्र काढून मध्यभागी एकाखाली एक सं सं सं अशीं तीन बीजे लिहावींत. गूळ, नारळ, केळे आणि मध यांचा नैवेद्य दाखवून ४० दिवस समाराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. यंत्र धारण करावें. याने वाक्‌सिद्धि प्राप्त होतें.

ललाटं लावण्य-द्युति-विमलमाभाति तव यद्-
द्वितीयं तन्मन्ये मकुटघटितं चन्द्रशकलम् ।
विपर्यासन्यासादुभयमपि संभूय च मिथः
सुधालेप-स्यूतिः परिणमति राका-हिमकरः ॥ ४६॥

आई जगननी ! मोत्यांच्या ठिकाणीं जें एक तरल तेज चमकत असतें त्याला लावण्य असें म्हणतात. तारुण्यांत अथवा उत्तम लक्षणांनीं संपन्न असलेल्या शरीरांतही जें एक अशा प्रकारचे तेज चमकत असतें त्यालाही पण लावण्यच म्हणतात. आई ! लावण्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला तुझा जो भालप्रदेश आहे तो जणुं कांहीं तुझ्या मुकुटांतील अर्ध्या चंद्राचा दुसरा अर्धा भागच आहे असें मला वाटतें. मुकुटावरील चंद्राची टोके ऊर्ध्व दिशेला आहेत तर भालस्वरूपी चंद्राची टोके खालच्या दिशेला आहेत. या दोन्ही चंद्रशकलांचीं टोके -अर्ध्या अर्ध्या चंद्राची टोकें उलटी करून एकमेकांवर ठेवली आणि एकमेकांना मिळवून जर "सुधालेपस्यूति" सुधा म्हणजे चुना. सुधा शब्दाचा दुसरा अर्थ अमृत किंवा पाणी असाही आहे. चुना आणि पाणी कालवून त्यांत कस्तूरी, गुग्गुळ आदि द्रव्यांचे मिश्रण करून जर सर्व बाजूंनी लेप दिला तर तोच पूर्णिमेचा पूर्णचंद्र या रूपाने परिणत होतो. तोच आकाशांत दिसतो. तुझ्या मुकुटावरील अर्धा चंद्र आणि भालप्रदेशरूपी अर्धा चंद्र ही दोन्ही चंद्राचीं शकले जर एक केली नाहींत तर हा आकाशांतील पूर्णिमेचा पूर्ण चंद्र कसा दिसूं शकेल ? तात्पर्य, तुझें ललाट भक्तजनांच्या चित्ताला चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत आहे. आई कृपा कर.

सोळाव्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणें त्रिकोण काढून मध्ये ह्रीं हें बीज लिहावे. दुधाचा पायस आणि मधाचा नैवेद्य दाखवून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज एक हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. हे यंत्र स्त्रियांनीं धारण केल्यास भर्तुसमागम आणि गर्भधारणा होईल.

भ्रुवौ भुग्ने किंचिद्भुवनभयभङ्गव्यसनिनि
त्वदीये नेत्राभ्यां मधुकररुचिभ्यां धृतगुणम् ।
धनुर्मन्ये सव्येतरकरगृहीतं रतिपतेः
प्रकोष्ठे मुष्टौ च स्थगयति निगूढान्तरमुमे ॥ ४७॥

हे आई जगजननी ! त्रैलोक्याचे भय सतत दूर करण्याचा तुला सतत छंदच आहे ! तुझ्या भुवयांचा प्रभाव मी काय वर्णन करूं ? त्या थोड्या जरी तूं वाकड्या केल्यास तरी त्यांना पाहून, जगाला आपल्या धाकांत ठेवूं पहाणारे प्रचंड दैत्य, राक्षसही घाबरतात, देवही पण घाबरतात. "भीषास्माद्वातः पवते भीषोदेति सूर्यः" हें वेदवाक्य प्रसिद्धच आहे. आई ! तुझ्या त्या भुवया अत्यंत सुंदर आहेत. त्यांना उपमा देण्याइतके जगांत सुंदर असें दुसरें कांहींच नाही. तुझ्या त्या किंचित् वाकड्या असलेल्या दोन भुवया हें मदनाचे धनुष्यच आहे असे मी समजतो. मदनाचे धनुष्य फुलांचे आहे. त्यानें तो सर्व जग जिंकतो, पण शंकरांना जिंकावयास ते धनुष्य उपयोगाला येईना. म्हणूनच कीं काय, तुझ्या भ्रुकुटींना त्यानें आपलें धनुष्य केलें. त्याच्या धनुष्याची दोरी ही भ्रमरांची असते म्हणून. त्यानें तुझ्या डोळ्यांनाच भ्रमर असें समजून त्यांची दोरी केली ! डोळे हे भ्रमराप्रमाणेच कृष्णवर्ण आणि चंचल दिसतात. गुण शब्दाचा अर्थ या ठिकाणीं धनुष्याची दोरी असा आहे. तात्पर्य, मदनाने शंकरांना जिंकण्याकरितां आपल्या डाव्या हाताने तें धनुष्यच धारण केलेले आहे असे वाटतें. सव्य म्हणजे उजवा आणि सव्येतर म्हणजे डावा. धनुष्य सज करण्याकरितां प्रायः डाव्या हाताने तें धारण केलें जातें हें प्रसिद्धच आहे. मदनाने तें धनुष्य आपल्या डाव्या हातानें धारण केलें असतांना त्या धनुष्याचा मध्यभाग मदनाच्या मुठीने झाकला जातो आणि दोरीचाही मध्यभाग कोपर आणि मनगट यांच्या मधल्या भागाने झाकला जातो. मुष्टि म्हणजे मूठ आणि प्रकोष्ठ म्हणजे कोपर आणि मनगट यांच्यामधला भाग. हे दोन्ही मदनाच्या मुठीमुळें व हाताने झाकले गेल्यामुळे त्यांचें अंतर म्हणजे मध्यभाग लोकांना दिसत नाहीं. आई ! तूं उमा आहेस. उ म्हणजे भगवान् शंकर आणि त्यांची मा म्हणजे प्रत्यक्ष मूर्तिमंत लक्ष्मीच तूं ! म्हणूनच तुझ्या साहाय्याने कामदेव शंकरांना जिंकण्याचा प्रयत्न करतो. तात्पर्य, तुझ्या भुवया, तुझे डोळे आणि नासिका यांचे सौंदर्य अवर्णनीय आहे. आई, माझ्यावर कृपा कर.

सोन्याच्या पावर सममुज चतुष्कोण काढून त्याच्या मधोमध एकाखाली एक ह्रीं ह्रीं ह्रीं अशीं तीन बीजे लिहावी. पंचवीस दिवस पूजा करून या श्लोकाचा रोज सात हजार जप करावा. तें यंत्र धारण करावे. अथवा भस्म अभिमंत्रून धारण करावे. मध, नारळ आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. याने देवता वश होईल. सर्व लोक वश होतील.

अहः सूते सव्यं तव नयनमर्कात्मकतया
त्रियामां वामं ते सृजति रजनीनायकतया ।
तृतीया ते दृष्टिर्दर-दलित-हेमाम्बुज-रुचिः
समाधत्ते संध्यां दिवसनिशयोरन्तरचरीम् ॥ ४८॥

आई त्रिपुरसुंदरी ! तुझा उजवा नेत्र हा सूर्यस्वरूप असल्यामुळे तो दिवस निर्माण करतो. त्याचप्रमाणे डावा डोळा हा चंद्रस्वरूप असल्यामुळें तो रात्र निर्माण करतो. किंचित् विकसित झालेल्या सुवर्णकमलाप्रमाणें - रक्तकमलाप्रमाणें आरक्तवर्ण दिसणारा तुझा तिसरा नेत्र प्रत्यक्ष अग्निस्वरूप असल्यामुळें तो रात्र आणि दिवस, तसेंच दिवस आणि रात्र यांच्या संधिकालांत संध्याकाळ निर्माण करतो. आई ! तुझ्या नेत्रांचा महिमा मी काय वर्णन करूं ? एक सूर्याच्या रूपाने सर्व विश्वाला प्रकाश देतो व आपआपल्या कार्याकडे प्रवृत्त करतो. दुसरा चंद्राच्या रूपाने सर्व विश्वाला आल्हाद देतो, तर तिसरा अग्नीच्या रूपाने यज्ञयागादि कर्माचें आणि जगाच्या जीवनव्यवहाराचे साधन बनला आहे. वैश्वानराच्या रूपाने प्राणिमात्राच्या देहांत तो रहातो. तूं आणि विश्वेश्वर दोघेही त्रिनेत्र असल्यामुळें तुम्ही दोघेंही एकरूपच आहां. आई ! तुला मी नमस्कार करतो. कालाचा परिच्छेद करणारे सूर्य- चंद्र हे तुमचे नेत्र असल्यामुळें तुम्ही काळातीत आहां असाही ध्वन्यर्थ या स्तुतीत आहेच.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून एकोणीस दिवस त्याची पूजा करावी. खिचडी केळे आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. हें यंत्र धारण केल्याने नवग्रहांची पीडा टळते.

विशाला कल्याणी स्फुटरुचिरयोध्या कुवलयैः
कृपाधाराधारा किमपि मधुराभोगवतिका ।
अवन्ती दृष्टिस्ते बहु-नगर-विस्तार-विजया
ध्रुवं तत्तन्नाम-व्यवहरण-योग्या विजयते ॥ ४९॥

आई जगननी ! तुझी दृष्टि म्हणजे अवलोकन करण्याची पद्धति ही आठ प्रकारची आहे. विशाला, कल्याणी, अयोध्या, धारा, मधुरा, भोगावती, अवन्ती आणि विजया अशीं ही त्या आठ दृष्टींची नांवे आहेत. नांवाप्रमाणेच त्यांचे अर्थही आहेत. विशाला दृष्टि ही नित्य अंतर्विकसित स्वरूपाची असते. म्हणूनच तिला विकसिता असेंही म्हणतात. कल्याणी दृष्टि ही असूयादि दोषरहित असून नित्य प्रसन्न असते. भक्तजनांचें कल्याण करते. हिलाच विस्मिता असें म्हणतात. अयोध्या शब्दाचा अर्थ युद्ध करण्यास, सामना करण्यास कठीण असा आहे. अयोध्यादृष्टीची कांति ही अत्यंत स्पष्ट असते. कुवलय म्हणजे नीलकमल, त्यांनाही तिचा पराभव करतां येत नाहीं. अर्थात् नीलकमलापेक्षांही ती अत्यंत मनोहर असते. स्मेरकनीनिका असेही हिला म्हणतात. कारण यांत डोळ्यांतील बाहुल्या प्रफुल्लित अथवा विकसित झालेल्या असतात. धारादृष्टि ही जणुं कांहीं कृपेचा आधारच असते. ती नित्य करुणापूर्ण असते. करुणेचा वर्षाव तिच्यांतून होत असतो. हिला अलसा असेही म्हणतात. 'किमपि मधुरा' म्हणजे अनिर्वचनीय माधुर्याने युक्त. हिला वलिता अथवा विलसिता असेही म्हणतात. भोगवतिका म्हणजे सुख-साक्षात्काराची सूचक. कांहीं लोक या ठिकाणीं आभोगवतिका असेंही पद काढतात व दीर्घ असा त्याचा अर्थ करतात. हिला स्निग्धा असें म्हटलें जातें. अवंती म्हणजे भक्तजनांचें रक्षण करणारी. हिलाच मुग्धा असे म्हणतात. आणि 'बहुनगरविस्तारविजया' म्हणजे अनेक नगरांच्या विस्तार-वैभवावर मात करणारी, विनयशील. हिलाच आकेकरा असें म्हणतात. अर्धोन्मीलित कटाक्षयुक्त अशी या दृष्टीची अवस्था असते. आई ! अशी तुझी दृष्टि "ध्रुवं" म्हणजे खरोखर, त्या त्या नावांनी व्यवहार करण्याला अत्यंत योग्य असून मोठी सर्वोत्कृष्ट आहे.

या आठ नांवांनी प्रसिद्ध असलेल्या आठ नगरी ह्या जणुं कांही श्रीत्रिपुरसुंदरीच्या दृष्टीची विशिष्ट अवस्थाच सूचित करीत आहेत. विशाला म्हणजे बदरीनाथनगरी हिमालयांत आहे. कल्याणी - कल्याणनगरी मुंबईजवळ. अयोध्या- उत्तर प्रदेश, धारा - धारनगरी, माळवा. मधुरा - मथुरा, आग्र्याजवळ. अथवा मदुरा असेही कांहीं लोक मानतात. भोगवतिका, अमरावती. अवंती म्हणजे उज्जैन आणि विजया म्हणजे विजयनगर अथवा विजापूर इत्यादि. अशी या दृष्टींच्या बाबतींत कल्पना ध्वनित केलेली आहे. तंत्रशाखामध्यें या दृष्टींची भिन्न भिन्न कार्यें वर्णन केलेली आहेत. संक्षोभण, आकर्षण, द्रावण, उन्मादन, वशीकरण, उच्चाटन, विद्वेषण आणि मारण अशीं त्याची नांवे आहेत. आई ! तुझी दृष्टि अवर्णनीय आहे. ती माझ्यावर सदा प्रसन्न असो.

हें यंत्र हळकुंडावर लिहून पंचवीस दिवस त्याची पूजा करावी. शिजविलेले मूग आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. नंतर तें हळकुंड विस्तवावर भाजावे. तिळाच्या तेलांत खलावें. मांजराप्रमाणें डोळे असलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाच्या हाताने डोळ्यांत अंजन करावे. याच्या योगाने भूमिगत धन दिसेल.

कवीनां संदर्भ-स्तबक-मकरन्दैक-रसिकं
कटाक्ष-व्याक्षेप-भ्रमर-कलभौ कर्ण-युगलम् ।
अमुञ्चन्तौ दृष्ट्‍वा तव नवरसास्वादतरला-
वसूयासंसर्गादलिक-नयनं किंचिदरुणम् ॥ ५०॥

आई जगज्जननी ! तुझ्या भाळप्रदेशी असलेला तृतीय नेत्र हा अरुणवर्ण आहे. त्याचें कारण मला असे वाटतें कीं, व्यास, वाल्मीकि अथवा शिव, विष्णु इत्यादि कवींनी ( कवि शब्दाचा अर्थ त्रिकालज्ञ तत्त्ववेत्ता असाही आहे) केलेले रसभरित काव्यग्रंथ हेच कोणी पुष्पगुच्छ. त्यांतील पुष्परस प्रामुख्यानें सेवन करण्यांत तत्पर असलेल्या तुझ्या दोन्ही कानांची संगति तुझे नेत्र कधींच सोडीत नाहींत. तुझ्या कानांबरोबर तुझे दोन्ही नेत्र देखील जणुं कांहीं "नवरसास्वादतरलौ" नवरसांचा - शृंगारादि नऊ रसांचा अथवा ताज्या रसाचा आस्वाद घेण्यास अत्यंत उत्सुक झालेले दिसत आहेत. नेत्र कसले ? जणुं कांहीं कटाक्षांच्या मिषाने दोन छोटेसे भ्रमरच आहेत ते. भ्रमर म्हणजे भुंगा. कलभ म्हणजे छावा. लहान भ्रमर असा या ठिकाणी अर्थ करावा. नेत्रकटाक्षही भ्रमराममाणे कृष्णवर्ण आणि चंचल दिसतात. ते भ्रमर तुझ्या कानांची संगति सोडीतच नाहीत. तेही कानांबरोबर सदासर्वकाळ तुझें गुणवर्णन करणाऱ्या उत्तम कवींच्या काव्यांचा रसास्वाद लुटित आहेत. तो आपल्याला मात्र मिळत नाही असें पाहून त्यांच्याबद्दल असूया निर्माण झाल्यामुळेंच की काय हा "अलिकनयन" म्हणजे भालप्रदेशी असलेला तृतीय नेत्र रागावला आहे आणि त्यामुळे तो किंचित् अरुणवर्ण दिसत आहे. तात्पर्य, आई तुझे नेत्र कानांपर्यंत पसरलेले विशाल आणि दीर्घ आहेत. सामुद्रिकशास्त्रदृष्ट्या हे मोठे भाग्याचे लक्षण आहे. तूं सर्वैश्वर्यसंपन्न आहेस. मी तुझ्या चरणी अनन्य, भावाने प्रणाम करतो. प्रसन्न हो.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्या वर लिहून त्याची चार दिवस पूजा करावी. साखर, खडीसाखर, गूळ, केळे, मध आणि नारळ यांचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळ या श्लोकाचा जप करावा. तें यंत्र धारण करावे. अथवा पाणी अभिमंत्रन प्यावे. याच्या योगाने देवी येणार नाहींत.

शिवे शृङ्गारार्द्रा तदितरजने कुत्सनपरा
सरोषा गङ्गायां गिरिशचरिते विस्मयवती ।
हराहिभ्यो भीता सरसिरुहसौभाग्यजयिनी
सखीषु स्मेरा ते मयि जननी दृष्टिः सकरुणा ॥ ५१॥

आई जगजननी ! तुझ्या दृष्टीमध्ये नऊही रस परिपूर्ण भरलेले आहेत. भगवान् सदाशिव यांच्याकडे तूं पहातेस तेव्हां तुझी दृष्टि ही शृंगाररसानें आर्द्र झालेली असते श्रीशंकरांहून भिन्न असलेल्या इतर देवतांकडे तसेंच इतर जनांकडे तू तुच्छबुद्धीने पहातेस. ते परकीय आहेत या भावनेने तूं त्यांचा तिरस्कार करतेस. त्यांच्याविषयी तुझी दृष्टि "कुत्सनपरा" म्हणजे बीभत्सरसानें युक्त असते. बीभत्सरसाचा स्थायीभाव म्हणजेच कुत्सा, तिरस्कार होय. तूं गंगेकडे पहातेस तेव्हा तुझी दृष्टि क्रोधाविष्ट असते. क्रोध हा रौद्ररसाचा स्थायीभाव आहे. आई, तुझी दृष्टि शंकरांचे चरित्र पाहून विस्मयाने, आश्चर्यानें युक्त झालेली आहे. शंकरांच्या चरित्राकडे पाहिले म्हणजे सारेंच चमत्कारिक दिसतें. स्मशानांत रहाणे. अंगावर बोटभर चिंधी नाहीं. दिगंबर ! चिताभस्माचे लेपन. हें सर्व असूनही पुन्हा ते विश्वनाथ, विश्वेश्वर, शिव म्हणजे मंगलमय, शंकर म्हणजे कल्याणकर अशाही नावांनी व्यवहारिले जातात. शंकरांच्या जीवनांत अद्‌भुतता आहे. अद्‌भुतरसाचा स्थायीभाव म्हणजे विस्मय, आश्चर्य. तें तुझ्या दृष्टीमध्यें स्पष्ट दिसत आहे. आई त्रिपुरसुंदरी, शंकरांच्या गळ्यांत, मस्तकावर दंडांत, मनगटांत, पायांत आणि कमरेभोवती सापांची वेटोळी पाहून तुझ्या दृष्टींत भीतीही पण दिसत आहे. भीति वाटणे हा भयानकरसाचा स्थायीभाव आहे. सरसीरुह म्हणजे कमळे. त्यांची शोभा, सौंदर्य तूं आपल्या दृष्टीने जिंकलें आहेस. विजय हा वीररसाचा स्थायीभाव आहे. तूं आपल्या सखीजनांकडे जेव्हां पहातेस तेव्हां आनंदाने प्रफुल्लित होतेस. मुखविकास आणि दृष्टिदिकास हा हास्यरसाचा स्थायीभाव आहे. स्मेरा शब्दाचा अर्थ प्रफुलित अथवा स्मितयुक्त असा आहे. आई ! माझ्याकडे अथवा माझ्यासारखे जे भक्तजन असतील त्यांच्याकडे तूं कृपापूर्ण दृष्टीनें पहातेस. कृपा हा करुणरसाचा स्थायीभाव आहे. शांतरस हा निरुपाधिक निजानंदस्वरूप अनिर्वचनीय आहे. तो तर तुझ्या ठिकाणी स्वतःसिद्धच आहे ! ! तेंच तुझें स्वरूप आहे.

सोन्याच्या पत्र्यावर अरुंद उभा चतुष्कोण काढून त्यामध्ये एकाखाली एक क्लीं क्लीं क्लीं अशीं तीन बीजें लिहावींत. पंचेचाळीस दिवस पूजा करून रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. यंत्र धारण करावे. सर्व लोक वश होतील. चंद्रनावर हें यंत्र कोरून वरीलप्रमाणें अनुष्ठान करावे. त्या चंद्रनाचा तिलक धारण केल्यानेंही वर सांगितले फळ मिळते. नैवेद्य उडदाचे वडे आणि मध.

गते कर्णाभ्यर्णं गरुत इव पक्ष्माणि दधती
पुरां भेत्तुश्चित्त-प्रशम-रस-विद्रावणफले ।
इमे नेत्रे गोत्रा-धर-पति-कुलोत्तंस-कलिके
तवाकर्णाकृष्ट-स्मर-शर-विलासं कलयतः ॥ ५२॥

हे जगज्जननी माते ! तूं पर्वतराज हिमाचलाच्या वंशाचे शिरोभूषण असलेल्या तुऱ्यांतील एक पुष्पकलिकाच आहेस ! गोत्रा म्हणजे पृथ्वी. ती गाईंचे अथवा जलाचें रक्षण करते. म्हणून तिला गोत्रा असें म्हणतात. तिला 'धर' म्हणजे धारण करणारे पर्वत, त्यांचा पति म्हणजे राजा, अर्थात् गोत्राधरपति या शब्दाचा अर्थ हिमालयपर्वत असा झाला. त्याचें कुल म्हणजे वंश. त्या वंशाचा उत्तंस म्हणजे शिरोभूषण असलेला तुरा. त्यांतील कलिका म्हणजे कळी. असा या विशेषणाचा शब्दार्थ आहे. तुझे कानांच्या जवळ जाऊन पोहोचलेले विशाल व दीर्घ नेत्र हे जणुं कांहीं मदनाचे दोन बाणच आहेत असें वाटतें. बाणाला गति मिळावी म्हणून मागच्या बाजूस पिसे जोडलेली असतात. तुझ्या यापण्या हीच जणुं कांहीं पिसे या बाणानी धारण केलेली आहेत. बाणाला पातें म्हणजे लोखंडाचे तीक्ष्ण धारेचे टोकदार पान बसविलेले असतें व लक्ष्याचा भेद करणे हें त्याचें कार्य असतें. आई ! तुझे कटाक्ष हे बाणाच्या टोंकाप्रमाणे तीक्ष्ण असून ते त्रिपुरासुराचा वध करणारे भगवान् श्रीशंकर यांच्या वैराग्यमूलक शांतरसाचा भेद करणारे आहेत. सृष्टीच्या प्रारंभी परब्रह्मस्वरूप अत्यंत विरक्त आणि शांत असलेल्या श्रीसदाशिवाच्या अंतःकरणांत सृष्टीच्या उत्पत्तीला अनुरूप अशा संकल्पाचे स्फुरण तुझ्या कटाक्षामुळेच होत असतें. तात्पर्य, हे त्रिपुरसुंदरी ! तुझे हे दोन्ही नेत्र जणुं कांहीं शरसंधान करण्याकरितां कामदेवाने कानांपर्यंत ताणून धरलेल्या बाणांचाच खेळ खेळत आहेत असें वाटतें.

सोन्याच्या पत्र्यावर चतुष्कोण काढून त्याच्या मध्यभागी रं हें बीज लिहावे पंचेचाळीस दिवस यंत्राची समाराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. तीळ-तांदुळ यांची खिचडी व क्षीरपायसाचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्यानें कानाचे व डोळ्याचे विकार नाहींसे होतात.

विभक्त-त्रैवर्ण्यं व्यतिकरित-लीलाञ्जनतया
विभाति त्वन्नेत्र-त्रितयमिदमीशान-दयिते ।
पुनः स्रष्टुं देवान्‌द्रुहिण-हरि-रुद्रानुपरतान्
रजः सत्त्वं बिभ्रत्तम इति गुणानां त्रयमिव ॥ ५३॥

हे आई जगजननी ! ईशान म्हणजे भगवान् सदाशिव यांची तूं अत्यंत दयिता म्हणजे प्रिय आहेस. म्हणून तुला ईशानदयिता असें म्हटलें जातें. आई ! तुझे हे तीन नेत्र, ज्यांच्यांतील तीन वर्ण शुक्र रक्त आणि नील हे अगदी सुस्पष्ट दिसत आहेत. त्यांतच लीलेने अंजन धारण केलेले असल्यामुळें ते फारच सुंदर दिसत आहेत. शुक्र, रक्त आणि नील हे तीन वर्ण तीन गुणांचे द्योतक आहेत. ते तीन गुण म्हणजे सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. शुक्लवर्ण हा सत्त्वगुणाचा द्योतक आहे तर रक्तवर्ण हा रजोगुणाचा द्योतक आहे. नील शब्द हा संस्कृतमध्ये नील आणि कृष्ण या दोन्ही अर्थानें उपयोगांत आणतात. तो नीलवर्ण तमोगुणाचा द्योतक आहे. त्रिपुरसुंदरीचे तीन नेत्र हे सूर्य, चंद्र आणि अग्निस्वरूप असल्यामुळें सूर्याची श्वेतता, चंद्राची श्यामलता आणि अग्नीची आरक्तता तिच्या तिन्ही नेत्रांत प्रतीतीस येत असते. प्रत्येक नेत्रांतही शुक्ल, रक्त आणि कृष्ण हे तीन वर्ण असतातच. डोळ्यांतील शुक्लमडळ आणि कृष्णमंडळ हें प्रसिद्धच आहे. त्याचप्रमाणे नेत्रामध्ये रक्तवर्णाच्या छटा किंवा रेषा असणें हे सामुद्रिकशास्त्रदृष्ट्या मोठ्या भाग्याचे लक्षण समजले जातें. तें त्रिपुरसुंदरीच्या नेत्रांमध्ये असणें स्वाभाविकच आहे. आई ! तुझ्या नेत्रांनी सृष्टिकालीं ब्रह्मदेवाला, विष्णूला आणि रुद्राला जन्म देण्याकरितां जणुं कांहीं सत्त्व, रज आणि तम हे तीन गुणच धारण केलेले आहेत असें वाटतें. ब्रह्मदेव, विष्णु आणि रुद्र हे प्रलयकालीं परब्रह्मस्वरूप ईशान तत्त्वामध्ये लीन झालेले असतात. म्हणून त्यांना 'उपरतान्' असें विशेषण दिले आहे. द्रुहिण म्हणजे ब्रह्मदेव हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. हरि म्हणजे विष्णु हे सत्त्वगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. रुद्र म्हणजे शंकर हे तमोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत, असा शास्त्रसिद्धान्त आहे. सहस्रदलकमलामध्यें ज्या सदाशिव-तत्त्वाशीं श्रीमहात्रिपुरसुंदरीचें सामरस्य सांगितलें गेलें आहे तें सदाशिवतत्त्व या शंकरांहून निराळें आहे, हे अर्थातच सिद्ध झालें. आई ! तुझ्या नेत्रांचा केवढा हा महिमा आहे ! "हे ईशानदयिते, त्वन्नेत्रत्रितयं देवान् स्रष्टुं रजः सत्वं तमः इति गुणानां त्रयं बिभ्रत् इव भाति " असा या श्लोकांतील मुख्य अन्वय आहे.

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढून त्या मध्ये ह्रा हें अक्षर लिहावे. दिवा लावून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. गुळ, पुऱ्या, वडा यांचा नैवेद्य दाखवावा. कांहीं लोक या श्लोकाचा तीन हजार जप करावा असे सांगतात. दिवा जर उज्ज्वल होत राहील तर कार्यसिद्धीला काल अनुकूल आहे असें समजावे. दिवा जर मंदावत राहील तर कार्यसिद्धीला काल प्रतिकूल आहे असें समजावे.

पवित्रीकर्तुं नः पशुपति-पराधीन-हृदये
दयामित्रैर्नेत्रैररुण-धवल-श्याम-रुचिभिः ।
नदः शोणो गङ्गा तपन-तनयेति ध्रुवममुं
त्रयाणां तीर्थानामुपनयसि संभेदमनघम् ॥ ५४॥

आई जगजननी ! पशुपति म्हणजे सर्व जीवांचे स्वामी भगवान् सदाशिव. तूं आपलें चित्त त्यांच्या स्वाधीन केलेले आहेस. अर्थात् त्यांच्याशीं समरस होऊन सर्व जीवांचे तूंच दयापूर्ण दृष्टीनें संरक्षण करतेस. तुझे नेत्र नेहमी दया - मित्र म्हणजे दयेने पूर्ण भरलेले आहेत. दया ही मित्राप्रमाणे त्या नेत्रांच्या नित्य सान्निध्यांत आहे. त्या नेत्रांची कांति अरुण म्हणजे आरक्त, धवल म्हणजे शुभ्र आणि श्याम म्हणजे नील अथवा कृष्णवर्ण आहे. जणुं कांहीं आम्हांला पवित्र करण्याकरिता तुझ्या मुखकमली हा त्रिवेणीसंगमच विराजमान झालेला आहे. प्रसिद्ध त्रिवेणीसंगमांत गंगा, यमुना आणि सरस्वती असतात, तर या त्रिवेणीसंगमांत गंगा, यमुना आणि शोणभद्र या तिघांचा संगम असल्याचें दिसत आहे. गंगा ही श्वेतवर्ण सत्त्वगुणाची द्योतक आहे तर यमुना ही नीलवर्ण तमोगुणाची द्योतक आहे. शोणनद हा रक्तवर्ण रजोगुणाचा द्योतक मानला जातो. तात्पर्य, आई या तिन्ही पवित्र तीर्थांचा संगम भक्तजनांच्या कल्याणासाठी तूं आपल्या मुखकमलीं नेत्ररूपानें धारण केलेला आहेस. भक्तजन केवल त्यांच्या दर्शनानें सर्वपापांतून मुक्त होतात. संभेद शब्दाचा अर्थ संगम असा आहे.

सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज एक हजार वेळ या श्लोकाचा जप करावा गुळ पायसाचा नैवेद्य दाखवावा. सिद्धयंत्र धारण करावे. याने सर्व योनिरोग नाहींसे होतात.

निमेषोन्मेषाभ्यां प्रलयमुदयं याति जगती
तवेत्याहुः सन्तो धरणिधर-राजन्यनये ।
त्वदुन्मेषाज्जातं जगदिदमशेषं प्रलयतः
परित्रातुं शङ्के परिहृतनिमेषास्तव दृशः ॥ ५५॥

आई जगज्जननी ! डोळ्यांच्या पापण्या झाकणे आणि उघडणे यांना उन्मेष आणि निमेष असें म्हणतात. तूं डोळ्यांच्या पापण्या झांकल्यास कीं जगाचा प्रलय होतो आणि त्या उघडल्या म्हणजे जगाची उत्पत्ति होते, असें सज्जन तत्त्ववेत्ते म्हणतात. हे नगाधिराजतनये माते पार्वती, तुझ्या उन्मेषापासून हें सर्व जग उत्पन्न झालेलें आहे. याचा प्रलय होतां कामा नये. याचे संरक्षण केलें पाहिजे अशा भावनेनेच कीं काय, मला असें वाटतें कीं, या जगाचे संरक्षण करण्याकरितां तुझ्या दृष्टीने निमेष करण्याचें अर्थात पापण्या मिटविण्याचे कार्य सोडून दिलेले आहे. देव है स्वभावतःच अनिमेष असतात. त्रिपुरसुंदरी तर देवांचीही देव आहे. म्हणून सृष्टिकाळी तिच्या दृष्टीने जगाचा प्रलय होऊं नये म्हणून तिनें निमेषक्रिया सोडून दिलेली आहे असे वाटतें. असो. आचार्यानी वस्तुस्थितीला धरून मोठे सुंदर वर्णन केले आहे. आई, तुझ्या दृष्टीचा महिमा अपूर्व आहे ! तूं माझ्यावर अनुग्रह कर, हीच माझी प्रार्थना आहे.

श्लोक सहामध्ये सांगितल्याममाणें सोन्याच्या पत्र्यावर यंत्र काढून त्यांत मध्यभागी फक्त 'ब्लूं ब्लूं' ही दोन अक्षरे लिहावींत. कांहीं ठिकाणी "बंला संला" अशीं ही अक्षरे आढळतात. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज या श्लोकाचा एक हजार वेळ जप करावा. केलळे, दूध, पायस, मध आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. यंत्र धारण करावे. याने वृषणव्याधि निरस्त होतील.

तवापर्णे कर्णेजप-नयन-पैशुन्य-चकिता
निलीयन्ते तोये नियतमनिमेषाः शफरिकाः ।
इयं च श्रीर्बद्ध-च्छद-पुट-कवाटं कुवलयम्
जहाति प्रत्यूषे निशि च विघटय्य प्रविशति ॥ ५६॥

श्री म्हणजे सौंदर्य, आहादकत्व इत्यादि धर्म हे कमलाच्या ठिकाणी असतात. हे सर्व धर्म डोळ्यांच्या ठिकाणी असणें हें सामुद्रिकशास्त्रदृष्ट्या उत्तम भाग्याचे लक्षण समजले जातें. श्रीत्रिपुरसुंदरीच्या नेत्रांमध्यें हे सर्व गुण पराकोटीचे आहेत. आचार्य या श्लोकांत त्यांचें वर्णन मोठ्या गमतीने करीत आहेत. आई, तुझ्या भजनाने भक्त ऋणमुक्त होतात. म्हणून तुला 'अपर्णा' असें म्हटलेले आहे. "अपगतं ऋणं या सा अपर्णा" जिच्यामुळे अर्थात् जिच्या कृपेने ऋण नाहींसे होतें ती अपर्णा. ईश्वराने आपल्याला हा देह दिलेला आहे तो आत्मस्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार करून घेऊन कृतार्थ होण्यासाठीं दिलेला आहे. ईश्वराचें आपल्यावर हें मोठे ऋण आहे. जे लोक मनुष्यदेह मिळूनही कृतार्थ होत नाहींत, धन्य होत नाहींत ते ईश्वराच्या ऋणांतच रहातात. जे श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या चरणी शरण जातात ते कृतार्थ होतात, म्हणूनच श्रीत्रिपुरसुंदरीला अपर्णा असें म्हणतात. आई, तुझे डोळे विशाल, दीर्घ, तरळ आणि सुंदर आहेत. ते कानांपर्यंत पसरलेले आहेत. जणुं कांहीं ते "आपल्या ठिकाणचे तरलत्व दीर्घत्व इत्यादि गुण माशांनीं चोरून नेले. नीलकमलांनीं आपलें सौंदर्य चोरून नेले." अशा रीतीनें तुझ्या कानांशी लागून कांहीं तरी आपल्याबद्दल चहाडी करीत आहेत असें माशांना आणि नी लकमलांना वाटतें. त्यामुळें तुझा राग सहन करावा लागेल या भीतीनें मासे पाण्यांत जाऊन लपले. ते डोळ यांची उघडझांपही करीत नाहींत आणि ही नीलकमलांत ली श्री म्हणजे शोभा, "प्रत्युषे" म्हणजे उषःकाली, सूर्योदयाच्या वेळीं त्या नीलकमलांना सोडून जाते म्हणूनच दिवसा नीलकमलांची दलरूपी कवाडे बंद असतात. आई ! दिवसा ती शोभा तुझ्या नेत्रांच्या ठिकाणीं येऊन वास्तव्य करते आणि रात्र झाली कीं त्या नीलकमलांची दारे उघडून नीलकमलांत प्रवेश करून बसते ! रात्रीच्या वेळीं नीलकमलें विकसित होत असतात. तात्पर्य, तुझे नेत्र माशाप्रमाणें तरल आणि दीर्घ आहेत तर नीलकमलांप्रमाणें ते अत्यंत सुंदर आहेत. या श्लोकांतील पूर्वार्धांत उत्प्रेक्षा आणि उत्तरार्धांत अतिशयोक्ति हे अलंकार आहेत.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचेचाळीस दिवस समाराधना करावी. सुसरीच्या अथवा माशाच्या दांतांवरही हें यंत्र कोरून त्याची समाराधना करतात. रोज वीस हजार वेळ या श्लोकाचा जप करावा. मधाचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण करावें. सेवक वश होतील. अधिकारीही वश होतील. कारागारांतून मुक्तता होईल. हें यंत्र धारण करणाऱ्यानें प्रार्थना केल्यास पाऊसही पडेल.

दृशा द्राघीयस्या दर-दलित-नीलोत्पलरुचा
दवीयांसं दीनं स्नपय कृपया मामपि शिवे ।
अनेनायं धन्यो भवति न च ते हानिरियता
वने वा हर्म्ये वा सम-करनिपातो हिमकरः ॥ ५७॥

आई जगजननी ! तुझें स्वरूप मंगलमय आहे. तूं आपल्या किंचित् विकसित झालेल्या, नीलकमलाप्रमाणें सुंदर असलेल्या, अत्यंत दीर्घ आणि विशाल अशा नेत्राने तुझ्यापासून दूर असलेल्या दीनांकडे आणि माझ्याकडेही कृपेने पहा. तूं आपल्या कृपापूर्णदृष्टीने आम्हांला स्नान घाल. तूं आपल्या कृपादृष्टीची पाखर आमच्यावर पडू दे. अयं म्हणजे हा दीनजन अर्थात आम्ही भक्त. तूं आमच्याकडे केवळ कृपादृष्टीनें पाहिलेस तरी आम्ही धन्य होऊं आणि आमच्याकडे नुसत्या कृपादृष्टीनें पहाणे एवढ्याने तुझी कांहींच हानि नाहीं. त्यांत कांहीं तुझें गाठोडे खर्च होत नाहीं. सर्वभूतांठायी तुझी दृष्टि सम असल्यामुळें आम्हां दीनजनांवर कृपा करणे हे तुला भूषणावहच आहे. चंद्र हा कधीं "ही श्रीमंताची हवेली आहे, हिला चांदण्याने भूषवावे आणि हें ओसाड अरण्य आहे किंवा ही गरिबाची झोपडी आहे हिच्यावरील चांदणें आवरावे" असा विचार करतो कां ? तो आपलें चांदणें सर्वांवर सारखेच पसरतो. चौथ्या चरणांत अर्थांतरन्यास अलंकार आहे.

सोन्याच्या पत्र्यावर लंबचतुष्कोण काढून त्याच्या पोटांत एकाखाली एक श्रीं श्रीं अशीं दोन बीजाक्षर लिहावींत. सहा दिवस आराधना करावी. रोज एक हजार वेळ या श्लोकाचा जप करावा. कांही ग्रंथांतून रोज पंचवीस हजार वेळ या श्लोकाचा जप करावा असाही निर्देश केलेला आहे. दुधाचा पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें सिद्ध यंत्र धारण केल्यास साधक मोठा भाग्यवान होईल.

अरालं ते पालीयुगलमग-राजन्य-तनये
न केषामाधत्ते कुसुम-शर-कोदण्डकुतुकम् ।
तिरश्चीनो यत्र श्रवणपथमुल्लङ्घ्य विलस-
न्नपाङ्गव्यासङ्गो दिशति शरसंधान-धिषणाम् ॥ ५८॥

हे आई जगजननी ! "अग" म्हणजे पर्वत. त्यांच्यांत "राजन्य" म्हणजे श्रेष्ठ असलेला, अर्थात् नगाधिराज हिमालय, त्याची तूं तनया म्हणजे कन्या आहेस. "अराल" म्हणजे कुटिल अर्थात् धनुष्याकार वाकड्या असलेल्या या तुझ्या कानांच्या पाळ्या देखील कोणाच्या बरें अंतःकरणांत, हें जणुं कांहीं मदनाचे धनुष्य आहे, असे कुतूहल निर्माण करणार नाहींत ? त्या धनुराकार नम्र कानांच्या पाळ्या पाहून कोणालाही हें कामदेवाचे धनुष्य आहे असें त्याच्याबद्दल कौतुक वाटेल. "अपाङ्‌गव्यासङ्‌ग" म्हणजे तुझ्या कटाक्षांचा तो दीर्घपणा किंचित् वाकडा आणि कानांच्या मार्गाचें उल्लंघन करून उठावदारपणे दिसणारा जणुं कांहीं तो मदनानें धनुष्याला जोडलेला बाणच आहे कीं काय, असा भास निर्माण करीत आहे. तात्पर्य, तुझ्या कर्णपाली आणि तुझे कटाक्ष हे अत्यंत सुंदर आहेत. ते आमचे कल्याण करोत.

श्लोक ३ मध्ये दिलेल्या यंत्र क्रमांक ९ प्रमाणें सोन्याच्या पत्र्यावर ऊर्ध्वमुख व अधोमुख असे एकमेकांना छेद करणारे दोन त्रिकोण काढावेत. प्रत्येक टोंकास त्रिशूलाचे चिन्ह काढावे. मधल्या षट्कोणांत श्रीं हें बीज लिहावे. सभोवारच्या साही त्रिकोणांत क्रीं ह्रीं बीजाक्षरें लिहावींत. पंचेचाळीस दिवस आराधना करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळ या श्लोकाचा जप करावा. कांहीं ठिकाणी पांच हजार वेळ जप करावयाचे सांगितलें आहे. हें यंत्र धारण केल्यानें लोकप्रियता, राजवशता आणि सर्व व्याधि विनिर्मुक्ति ही फळें मिळतील. हेंच यंत्र कुंकवावर काढून वर सांगितल्याप्रमाणे आराधना करावी व तें कुंकू कपाळी लावावे. वर सांगितल्याप्रमाणे सर्व फळें मिळतील.

स्फुरद्‌गण्डाभोग प्रतिफलित-ताटङ्क-युगलं
चतुश्चक्रं मन्ये तव मुखमिदं मन्मथरथम् ।
यमारुह्य द्रुह्यत्यवनिरथमर्केन्दुचरणं
महावीरो मारः प्रमथपतये सज्जितवते ॥ ५९॥

आई जगजननी ! तुझ्या कानांमध्ये वर्तुळाकार असलेली ही दोन कर्णभूषणें तुझ्या देदीप्यमान असलेल्या दोन्ही गंडस्थलामध्ये - गालांमध्ये प्रतिबिंबित झालेलीं आहेत. त्यामुळें तुझें मुखकमल हें जणुं कांहीं चार चाकें असलेला कामदेवाचा रथच आहे कीं काय असें मला वाटतें.

"महावीर" म्हणजे महापराक्रमी असलेला हा "मार" म्हणजे कामदेव या रथामध्ये बसून शंकरांशी युद्ध करीत आहे. प्रमथगणांचे अधिपति भगवान शंकर यांनी देखील सूर्य आणि चंद्र ही दोन चाकें ज्याला जोडलेली आहेत असा पृथ्यीरूपी रथ सज केलेला आहे. शंकर हे प्रमथगणांचे अधिपति आहेत. पृथ्वी हा त्यांचा रथ आहे. सूर्य आणि चंद्र हे त्या रथाची चाकें आहेत. असे सामर्थ्य शंकरांचें असूनही कामदेव केवळ श्रीत्रिपुरसुंदरीदेवीच्या मुखकमलाचा आश्रय घेऊन युद्ध करीत आहे. यावरून त्रिपुरसुंदरीच्या मुखकमलाचें सौंदर्य हे अवर्णनीय आहे हीच गोष्ट सिद्ध होते.

श्लोक ५७ मध्ये सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या पत्र्यावर चतुष्कोण यंत्र काढून त्यांत मध्यभागी एकाखालीं एक ऐं क्लीं सौः अशीं तीन अक्षरे लिहावीत. पंचेचाळीस दिवस आराधना करावी. रोज एक हजार वेळ या श्लोकाचा जप करावा. गुळ-भात आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण करावे. याने सकल लोक वश होतील.

सरस्वत्याः सूक्तीरमृत-लहरी-कौशल-हरीः
पिबन्त्याः शर्वाणि श्रवणचुलुकाभ्यामविरलम् ।
चमत्कार-श्लाघा-चलित-शिरसः कुण्डलगणो
झणत्कारैस्तारैः प्रतिवचनमाचष्ट इव ते ॥ ६०॥

आई जगज्जननी ! शर्व म्हणजे भगवान् शंकर त्यांची तूं अर्धांगी आहेस. तुझ्या संभाषणातील शब्द इतके गोड असतात कीं, ते भरते आलेल्या अमृताच्या कल्लोळाच्या माधुर्यालाही मागें सारतील. अशा तऱ्हेचे तुझ्या संभाषणांतील मधुर शब्द प्रत्यक्ष सरस्वतीदेवी आपल्या दोन्ही कानांच्या चुळा करून निरंतर अमृताप्रमाणें प्राशन करीत वसते. ती प्राशन करीत असतांना तिला जेव्हां आनंद आणि आश्चर्य वाटत असतें तेव्हां ती वाहवा करीत मान हलविते. ती मान हलवू लागली म्हणजे तिच्या कानांतील कर्णभूषणांचा समूह एकमेकांवर आदळत असल्यामुळें त्यांचा जो मोठा झणत्कार होतो तो झणत्कार म्हणजे जणुं कांहीं तुझ्या शब्दांना तें अनुमोदनच दिलें जात आहे असें वाटतें. तात्पर्य, आई ! तुझे शब्द इतके गोड आहेत कीं, ते आमृतालाही मागें सारतात आणि सरस्वतीलाही मान डोलावयास लावतात. आई ! तूं माझें कल्याण कर.

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढावा. त्याच्या तिन्ही टोकांस त्रिशूळाचा आकार द्यावा. मध्यभागी श्रीं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस आराधना करावी. रोज एक हजारवेळ या श्लोकाचा जप करावा. दुधाचा पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. यंत्र धारण करावें. यानें सर्व विद्यांचा लाभ होईल.

असौ नासावंशस्तुहिन-गिरि-वंश-ध्वजपटि
त्वदीयो नेदीयः फलतु फलमस्माकमुचितम् ।
वहत्यन्तर्मुक्ताः शिशिरकर-निश्वास-गलितं
समृद्ध्या यत्तासां बहिरपि च मुक्तामणिधरः ॥ ६१॥

हे माते जगजननी ! तुहिनगिरी म्हणजे हिमालय पर्वत. त्याच्या वंशाची तूं मूर्तिमंत पताका आहेस. हा तुझा नासावंश म्हणजे सरळ असलेला नासादंड अर्थात् नाक आम्हांला अत्यंत जवळ, अत्यंत योग्य आणि अपेक्षित असलेले आत्मसाक्षात्काररूपी फल 'फलतु' म्हणजे प्राप्त करून देवो. वंश शब्दाचे कुल आणि कळक असे दोनही अर्थ आहेत. वंशामध्ये मोती असतात असे कोणी म्हणेल तर आई ! तुझ्या या नासादंडरूपी वंशामध्येंही आत आणि बाहेर मोती आहेत. आत जर मोती नसते तर हा "शिशिरकरनिश्वासगलित" म्हणजे डाव्या नाकपुडीतून वाहणारा चंद्र अर्थात् इडा नाडी, त्या नाडींतून वाहणाऱ्या वायुच्या साहाय्याने बाहेर आलेला मोती दिसलाच नसता. या नासादंडानें आंतही मौक्तिकें धारण केलेली आहेत आणि बाहेरूनही पण तो मौक्तिक अर्थात मौक्तिकालंकार धारण करणारा आहेच. तात्पर्य, आई ! तुझा हा सरळ नासावंश मोठा भाग्याचा सूचक आहे. त्यांतील मौक्तिकालंकाराची शोभा अद्वितीय आहे. तो आमचे कल्याण करो.

वरील श्लोकांत सांगितल्याप्रमाणें यंत्र तयार करून त्याच्या मध्यभागी ह्रीं बीज लिहावे. त्याची आठ दिवस पूजा करावी. रोज या श्लोकाचा बारा हजार जप करावा. नारळ, केळें आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र स्त्रियांच्या अलंकारांत ठेवले असतां सकल पुरूष वश होतील.

प्रकृत्या रक्तायास्तव सुदति दन्तच्छद-रुचेः
प्रवक्ष्ये सादृश्यं जनयतु फलं विद्रुमलता ।
न बिम्बं तद्‌बिम्ब-प्रतिफलन-रागादरुणितं
तुलामध्यारोढुं कथमिव विलज्जेत कलया ॥ ६२॥

हे आई जगजननी ! तुझी दंतपंक्ति फारच सुंदर असल्यामुळें तुला "सुदती" असें म्हणतात. हे सुदती माते ! अधर आणि ओष्ठ हे दातांचे आच्छादन करीत असल्यामुळें त्यांना "दंतच्छद" असें म्हणतात. रुचि म्हणजे कांति. तुझ्या अधरोष्ठांची कांति ही स्वभावतःच आरक्त आहे. तिला मी कोणाची उपमा देऊं ? तिला उपमा द्यावयाची झाली तर पोवळ्याच्या वेलीला फळ लागलें पाहिजे. प्रवाळांची वेल ही आरक्तवार्ग असते. पोवळ्यांचे अंकुरही आरक्त असतात. त्यांना जर फळ लागेल तर तें फारच फार आरक्तवर्ण दिसेल. पण पोवळ्यांच्या वेलींना कधीं फळ लागत नाहीं आण तुझ्या ओठांना तर उपमा द्यावयास जगांत दुसरा पदार्थ नाहीं. कोणी म्हणेल कीं, अहो, या पिकलेल्या तोंडलीच्या फळांची नाहीं का उपमा देता येणार ? आचार्य म्हणतात, छे, त्यांची कशी उपमा द्यावी ? "न बिम्बं" बिंब म्हणजे -तोंडलीचे फळ. त्याच्याशी श्रीत्रिपुरसुंदरीच्या अधरोष्ठांची तुलना करतां येणार नाहीं. कारण तें स्वतःच त्रिपुरसुंदरीच्या ओठांचा लालिमा संक्रमित झाल्यामुळे आरक्तवर्ण दिसतात. अशा स्थितींत ज्यांनीं स्वतःचाच रक्तिमा श्रीत्रिपुरसुंदरीच्या ओठांकडून मिळविला ते तिच्या ओठांशीं तुलना करण्याकरितां, कसें बरें तिच्यापुढे उभे रहातील ? अंशतः तरी तुलना करतां येईल का ? त्या तोंडलीच्या फळांना त्याची लाज नाहीं का वाटणार ? तात्पर्य, माते त्रिपुरसुंदरी, तुझ्या ओठांशी ज्याची तुलना करावी असा जगांत एकही पदार्थ नाहीं. अरुणवर्ण असलेल्या विश्वातील सर्व पदार्थांचा अरुणिमा हा तुझ्यामुळेच त्यांना प्राप्त झालेला असल्यामुळें ते कोणीही तुझ्या ओठांशी तुलना करण्याकरितां पुढे येऊ शकत नाहींत. असा हा तुझ्या ओठांचा अरुणवर्ण अवर्णनीय आहे. आई, तो आमचे कल्याण करो.

सोन्याच्या पत्र्यावर दीर्घ चतुष्कोण काढून त्यामध्ये एकाखाली एक मं मं मं अशीं तीन बीजाक्षरें लिहावींत. आठ दिवस यंत्राची विधिपूर्वक पूजा करून मधाचा आणि उडदाच्या वड्याचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा आठ हजार वेळ जप करावा. हे यंत्र उशाशी ठेवून झोपल्यास निद्रानाश हा विकार नाहीसा होईल व सुखाने झोप लागेल.

स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां
चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा ।
अतस्ते शीतांशोरमृतलहरीमम्लरुचयः
पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया ॥ ६३॥

आई जगजननी ! तुझें स्मितहास्य म्हणजे हें एक तुझ्या मुखचंद्राचें चांदणेंच होय. त्या चांदण्यांच्या समूहाचे हे चकोरपक्षी नित्य प्राशन करीत असतात. ते तुझ्या मुखचंद्राचें चांदणें अत्यंत मधुर असल्यानें त्याच्या अतिसेवनाने त्या चकोरपक्ष्यांच्या मुखांमध्ये जडता निर्माण होते. "चञ्चुजडिमा" - चोंचीचा जडपणा. अर्थात् त्यांची जीभ मधुररसानें जड होते. कशावरून तुम्ही जाणले ? असें कोणी विचारल्यास आचार्य सांगतात, त्यांची जीभ जड होते म्हणूनच त्यांना कांहीं तरी आंबट खावेसे वाटतें. आई, ते चकोरपक्षी आकाशांतील चंद्राच्या अमृतलहरींचे - चांदण्याचे रोजच्या रोज रात्रीं जणुं कांहीं ही अम्लरसाची कांजी आहे अशा बुद्धीने स्वच्छंदपणे खूप प्राशन करीत असतात. मधुर रस हा पृथ्वीजलभुयिष्ठ असल्यामुळें त्याचें अतिसेवन झाल्यास गौरव, जाड्य, मुखावलेप, अग्निमांद्य इत्यादि विकार निर्माण होतात. अम्लरस हा अग्निजलभूयिष्ठ असल्यामुळें जठराग्नि प्रदीप्त करणे, अन्नपचन करणें, मुखशुद्धि करणें इत्यादि त्याचे धर्म आहेत. अतिमधुर रस सेवन करून ज्यांचे मुख जड झालेलें असतें, त्यांना आम्लकांजी सेवन करावीशी वाटणे स्वाभाविक आहे. तात्पर्य, आकाशांतील चंद्रापेक्षांही तुझ्या मुखचंद्राचे माधुर्य अत्युत्कट आहे. ते आमचें कल्याण करो.

सोन्याच्या पत्र्यावर लंबचतुष्कोण काढून त्यांत ह्रीं हें बीज लिहावे. तीस दिवस आराधना करावी. या श्लोकाचा रोज तीस हजार जप करावा. नारळाचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण करावे. यायोगें साधकाचा शब्द कोणी मोडणार नाही. त्याची आज्ञा सर्व मानतील.

अविश्रान्तं पत्युर्गुणगण-कथाम्रेडण-जपा
जपापुष्पच्छाया तव जननि जिह्वा जयति सा ।
यदग्रासीनायाः स्फटिकदृषदच्छच्छविमयी
सरस्वत्या मूर्तिः परिणमति माणिक्यवपुषा ॥ ६४॥

आई जगजननी ! तुझी जिव्हा अहोरात्र आपले पति भगवान् सदाशिव यांचे गुणगण पुनः पुन्हा वर्णन करणें हाच जप करीत आहे. तुझ्या जिव्हेची कांति जास्वंदीच्या फुलांप्रमाणे आरक्तवर्ण आहे. तिचा महिमा मी काय वर्णन करूं ! तिचा उत्कर्ष असो. जयजयकार असो.

आई ! तुझ्या जिव्हेच्या अग्रभागी स्फटिकाच्या मण्याप्रमाणें कांतीनें अत्यंत स्वच्छ आणि शुभ्र असलेली प्रत्यक्ष सरस्वतीची मूर्ति जिव्हेच्या रक्तवर्णांमुळे माणकाच्या मूर्तीप्रमाणे परिणत झालेली दिसत आहे. माणकाच्या मूर्तींप्रमाणे तीही आरक्तवर्ण दिसत आहे. तात्पर्य, आई, तुझ्या ओठांप्रमाणेंच जिव्हेचाही रक्तिमा अवर्णनीय आहे आणि तुझ्या जिव्हाग्रीं श्रीसरस्वतीदेवी नित्य वास्तव्य करीत आहे. धन्य आहेस तूं. मी तुला भक्तिभावे नमस्कार करतो.

तिसऱ्या श्वोकातील यंत्र क्रमांक ९ प्रमाणें सोन्याच्या पत्र्यावर यंत्र काढून मधल्या षट्‌कोणात क्लीं हें बीज लिहावे. सभोवारच्या सहा त्रिकोणांत श्रीं श्रीं ह्रीं बीजे लिहावींत. आठ दिवस समाराधना करावी. गुळ, पायस आणि मधाचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज दहा हजार जप करावा. यंत्र धारण केल्यास सकल लोक वश होतील. स्त्रियांच्या सर्व व्याधि दूर होतील असेही याचे फल कांहीं ठिकाणी सांगितलेलें आहे. हेंच यंत्र कुंकवावर काढून वर सांगितल्याप्रमाणें सिद्ध करावे व तें कुंकू कपाळी लावावे. वर सांगितल्याप्रमाणेच फल मिळेल.

रणे जित्वा दैत्यानपहृतशिरस्त्रैः कवचिभि-
र्निवृत्तैश्चण्डांश-त्रिपुरहर-निर्माल्य-विमुखैः ।
विशाखेन्द्रोपेन्द्रैः शशि-विशद-कर्पूर-शकला
विलीयन्ते मातस्तव वदन-ताम्बूल-कवलाः ॥ ६५॥

आई जगजननी ! समरभूमीवर युद्धामध्ये दैत्यांना जिंकून त्यांचे मुकुट तुला अर्पण करण्याकरितां ज्यांनीं अपहृत केलेले आहेत, अथवा विजय संपादन करून तुला नमस्कार करण्याकरितां आले असतां ज्यांनीं आपले मुकुट मस्तकापासून दूर केलेले आहेत ( राजे-महाराजे यांना अथवा देवांना नमस्कार करतांना शिरस्त्राण खालीं ठेवून दोन्ही गुडघे व मस्तक जमिनीवर ठेवून नमस्कार करण्याची पद्धति आहे.) त्या विजयी देवांनी आपल्या अंगांत चिलखतें घातलेली असतात. युद्धांतून परत फिरल्यानंतर ते देवाच्या प्रसादाची अपेक्षा करीत असतात, पण ते शंकरांकडे जात नाहींत. कारण शंकरांनी स्वीकारून उरलेल्या वस्तु, निर्माल्य हा चंडेश्वराचा अंश असतो. तो इतरांनी स्वीकारू नये असा शास्त्राचा आदेश आहे. त्यामुळें ते शिवनिर्माल्याला - प्रसादाला विमुख झालेले असतात. अखेर ते तुझ्याकडे येतात. ते षडानन, इंद्र, विष्णु इत्यादि देव तुझ्या मुखकमलांतील तांबूलाचे घांस-ज्यांमधील कर्परखंड चंद्राप्रमाणें स्वच्छ दिसत आहेत, ते तांबूलकवल त्या देवांकडून सेविले जात आहेत. तात्पर्य, इंद्रादि देव शंकरांचीही उपेक्षा करतात व तुझा तांबूल सेवन करून स्वतःला धन्य मानतात. केवढा तुझ्या हा महिमा आहे !

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. त्याला गुग्गुळाचा धूप द्यावा. कण्हेर, जास्वंदी इत्यादि तांबडीं फुलें वाहून श्रीचक्राप्रमाणे त्याची पंचेचाळीस दिवस समाराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. मधाचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्याने सर्व वश होतील. यंत्रांत वरच्या बाजूस डावीकडे दोन त्रिकोणांच्या जागी क्लींच्या ऐवजी ह्रीं हे बीज लिहावे.

विपञ्च्या गायन्ती विविधमपदानं पशुपते-
स्त्वयारब्धे वक्तुं चलितशिरसा साधुवचने ।
तदीयैर्माधुर्यैरपलपिततन्त्रीकलरवां
निजां वीणां वाणी निचुलयति चोलेन निभृतम् ॥ ६६॥

आई जगजननी ! प्रत्यक्ष सरस्वतीदेवी ही तंबोऱ्याच्या स्वरांवर भगवान् पशुपति महादेव यांच्या त्रिपुरविजय, दक्षयज्ञविध्वंस, लोककल्याणास्तव हालाहल विषाचे प्राशन इत्यादि विविध गुणांचे गौरव गात असतांना, ज्या वेळेला तूं मान डोलावतेस, तिला शाबासकी देतेस, त्या वेळेला तुझ्या त्या गोड गोड शब्दांच्या माधुर्यापुढें सरस्वतीच्या तंबोऱ्याच्या स्वरांचेंही माधुर्य कमी पडतें. कारण तंबोऱ्यापेक्षाही तुझे शब्द अत्यंत मधुर असतात. तुझ्या शब्दाच्या माधुर्यापुढें आपल्या तंबोऱ्याची गोडी कमी पडली अशा भावनेनें वाणी म्हणजे सरस्वतीदेवी ही आपला तंबोरा झाकून ठेवण्याकरितां तंबोऱ्याला गवसणी घालते. तात्पर्य तुझे शब्द तंबोऱ्यापेक्षांही अत्यंत मधुर आहेत. तूं आमचे रक्षण कर.

सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पंचेचाळीस दिवस त्याची समाराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. गूळ, पायस, आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केलें असतां साधक संगीत विद्येमध्यें निपुण होईल.

कराग्रेण स्पृष्टं तुहिनगिरिणा वत्सलतया
गिरीशेनोदस्तं मुहुरधरपानाकुलतया ।
करग्राह्यं शम्भोर्मुखमुकुरवृन्तं गिरिसुते
कथङ्कारं ब्रूमस्तव चिबुकमौपम्यरहितम् ॥ ६७॥

आई जगज्जननी ! तुझ्या हनुवटीचे मी काय वर्णन करणार ? कारण त्याला उपमा द्यावी असें या जगांत दुसरें कांहींच नाहीं. "औपम्यरहितं" ती निरुपम आहे. हे गिरिसुते - नगाधिराजकन्ये, तूं लहान होतीस त्या वेळेला पुत्रवात्सल्याने नगाधिराज हिमालय पर्वताने तें आपल्या हातानें पुनः पुन्हा स्पर्शिलेलं आहे. लहान मुलाच्या हनुवटीस आपण प्रेमाने स्पर्श करीत असतो हें सुप्रसिद्धच आहे. अधरपानार्थ उत्सुक झालेल्या परमेश्वराने - विश्वनाथाने तें आपल्या हातांनी वरचेवर उचलून घेतले आहे. भगवान् महादेव सर्व विश्वाचे अथवा विश्वरूपानें तेच नटलेले असल्यामुळें आपलें स्वतःचें प्रतिबिंब अवलोकन करण्याकरितां तुझें मुखकमल हाच कोणी आरसा आपल्या हातांत घेतात तेव्हां तुझी हनुवटी ही त्या आरशाची मूठ अथवा आधारदंड असल्याप्रमाणे दिसते. एवढे भाग्य जगांत कोणालाच लाभले नसल्यामुळे तुझे "चुबुक" म्हणजे हनुवटी ही निरुपमच राहिली आहे. ती आमचे कल्याण करो.

सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पत्नीसह पंचेचाचळिस दिवस समाराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळ जप करावा. दूध, पायस, तांबूल आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. यंत्र धारण करावे. स्त्री अनुकूल होईल. सकल कामना पूर्ण होतील.

भुजाश्लेषान्नित्यं पुरदमयितुः कण्टकवती
तव ग्रीवा धत्ते मुखकमलनालश्रियमियम् ।
स्वतः श्वेता कालागुरु-बहुल-जम्बाल-मलिना
मृणाली-लालित्यं वहति यदधो हारलतिका ॥ ६८॥

आई जगज्जननी ! " इथं तव ग्रीवा " म्हणजे हा तुझा कंठ तुझ्या मुखकमलाचा जणुं कांहीं नाळच आहे. अर्थात् कमळाच्या खालीं जसा त्याचा देठ असावा त्याचप्रमाणे तुझ्या मुखकमलाच्या खालीं असलेल्या कंठाची शोभा दिसत आहे. पुरदैत्याचें निर्दालन करणारे भगवात् श्रीशंकर यांनी प्रेमाने नित्य आपल्या बाहूंनीं तुला आलिंगन दिलेले असल्यामुळें त्या कंठावर उभे राहिलेले रोमांच हे जणुं कांहीं तुझ्या मुखकमलरूपी नालाचे कांटेच आहेत असे वाटतें. कमलनालालाही बारीक लव असते हें प्रसिद्धच आहे. तुझ्या कंठांत असलेलें मोत्यांचे सर स्वतः पांढरे शुभ्र असूनही किंचित श्यामवर्ण दिसतात. कारण तूं आपल्या अंगाला लावलेल्या अगरुकाष्ठाच्या दाट उटण्याचा कल्क म्हणजे गंध त्या मोत्यांच्या सरांना लागलेला असतो. त्यामुळे ते मोत्यांचे सर कमलिनीप्रमाणे शोभत आहेत. त्यांनी जणुं कांहीं कमलिनीचे लालित्य म्हणजे सौंदर्य धारण केलें आहे असें दिसते ! तात्पर्य, तुझ्या गळ्यातील मोत्यांचे हार तुझा कंठ आणि तुझें मुखकमल यांची शोभा मोठी अपूर्व आहे. ते माझे मनोरथ पूर्ण करोत.

श्लोक एकसष्टमध्ये सांगितलेले यंत्र कुंकवावर लिहावे. पंचेचाळीस दिवस त्याची आराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. मधाचा आणि तांबूलाचा नैवेद्य दाखवावा. त्या कुंकुमाचा तिलक धारण केला असतां राजेलोक वश होतील.

गले रेखास्तिस्रो गतिगमकगीतैकनिपुणे
विवाह-व्यानद्ध-प्रगुण-गुण-संख्या-प्रतिभुवः ।
विराजन्ते नानाविध-मधुर-रागाकरभुवां
त्रयाणां ग्रामाणां स्थिति-नियम-सीमान इव ते ॥ ६९॥

आईःजगजननी ! सामुद्रिकशास्त्रदृष्ट्या तुझ्या देहावरील रेखा फारच मोठ्या भाग्याच्या द्योतक आहेत. त्या तुझ्या अनंत वैभवाच्या द्योतक आहेत. त्यांचें मी काय वर्णन करूं ? मानवांचे देहही रेखांकित असतात. हातांवर, पायांवर, उदरावर, कंठावर, मनगटांवर आणि भालप्रदेशावर असलेल्या रेषा मानवाच्या सुखदुःखाच्या जणुं कांहीं साक्षीदार असतात. कांहीं रेषा आरोग्य, आयुष्य आणि महाभाग्य यांच्या सूचक असतात. तर कांहीं याच्या उलट दुःख, दारिद्र्य, कष्ट आणि अल्यायुष्य यांच्याही द्योतक असतात. समुद्र नांवाच्या महापंडितानें या गोष्टींचा खोल अभ्यास करून शरीरावर दिसणाऱ्या रेषा आणि त्यांची फळें यांचा सूक्ष्म विचार केलेला आहे. म्हणूनच या शास्त्राला सामुद्रिकशास्त्र असें म्हणतात. या शास्त्राच्या दृष्टीनें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या कंठस्थानीं ज्या मृदु, गंभीर आणि आरक्तवर्ण अशा आडव्या तीन रेघा दिसत आहेत त्यांचें वर्णन आचार्य या श्लोकानें करीत आहेत. श्रीत्रिपुरसुंदरीच्या कंठस्थानीं वळ्यांच्या आकाराने ज्या तीन रेषा दिसत आहेत त्या भाग्यरेखाच होत. "ललाटे च गले चेव मध्ये चापि वलित्रयम् । स्त्रीपुंसयोरिदं ज्ञेयं महासौभाग्यसूचकम् ॥ " कपाळावर, गळ्यावर आणि नाभीच्या वरच्या भागावर अखंड तीन वळ्या असणें हें त्या स्त्रीच्या अथवा पुरुषाच्या मोठ्या भाग्याचे लक्षण होय. असें सामुद्रिकशास्त्र सांगत आहे. श्रीत्रिपुरसुंदरीदेवी ही तर सर्व ऐश्वर्याचे अधिष्ठान असल्यामुळें तिच्या ठिकाणी या महाभाग्याच्या सूचक रेखा असणें हे स्वभाविकच आहे.

आई त्रिपुरसुंदरी ! "गति-गमकगीतेंक-निपुणे" गति म्हणजे संगीतातले अवांतर प्रकार. "मार्गदेशीविभागेन संगीत द्विविधं स्मृतम्" एक मार्गसंगीत व दुसरें देशी संगीत. मार्गसंगीत म्हणजे ब्रह्मदेवाने वेदांतून शोधून काढलेलें भरतादि शिष्यांच्याद्वारां शुद्ध परंपरेने चाळू ठेवलेले, देवांच्या उपासनेकरितांच उपयोगांत आणले जाणारें संगीत. तसेच देशी संगीत म्हणजे भिन्नभिन्न देशांतील रीतिभातींना अनुसरून लोकरंजनाच्या उद्देशानें गाले जाणारे संगीत. शुद्ध संगीत आणि मिश्र संगीत असेही संगीताचे दोन प्रकार आहेत. शास्त्रीय संगीत आणि लौकिक संगीत असेही पण म्हटलें जातें. तात्पर्य, ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा, ठुमरी, गजल इत्यादि संगीतांतल्या पद्धतींना गति असें म्हणतात.

'गमक' म्हणजे स्वरांचा विशिष्ट प्रकाराने होणारा कंप. तो पांच प्रकारचा असल्याचें नाट्यशास्त्रात वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे गीत म्हणजे गायन. गायन हे शंकरांना अत्यंत प्रिय आहे. श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही सदाशिवाची अर्धांगी असल्यामुळें ती शंकरांची संगीताने सेवा करीत असते. संगीताचा आद्य आविष्कार शंकरांनीच केलेला आहे. संसारतापानें तप्त झालेल्या उत्तम भक्तांची सांसारिक दुःखें दूर करण्याकरितांच प्रभु भगवान शंकर यांनी गीतवाद्ये यांचा आविष्कार केलेला असल्याचें स्पष्टच सांगितलें आहे. " संसारदुखदग्धानामुत्तमानामनुग्रहात्। प्रभुणा शंकरेणात्र गीतवादं्य प्रकाशितम् ॥ " गायनाने सर्व दुःखांची विस्मृति होते. अत्यंत आनंद वाटतो. इष्ट फळांचा लाभ होतो. राजेमहाराजे व इष्ट देवता गायनाने प्रसन्न होतात. वश होतात. सर्व जनांचे चित्त आकृष्ट होतें. फार काय सांगावे, गायन हें एक उत्कृष्ट मोक्षाचे - आत्यंतिक दुःखनिवृत्तीचें व नित्य निरतिशय आनंदाच्या प्राप्तीचे साधन आहे. " परमानन्दविवर्धनमभिमतफलं वशीकरणम् । सकलजनचित्तहरणं विमुक्तिबीजं परं गीतम् ॥ " उपासनेमध्ये जपाला प्राधान्य आहे. जपापेक्षांही कोटिपटीनें ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षांही कोटिपटीनें लय म्हणजे समाधि अर्थात् चित्ताची एकाग्रता ही श्रेष्ठ आहे, तर समाधीपेक्षांही कोटिपटीनें गायन श्रेष्ठ आहे. गायनापेक्षा श्रेष्ठ कांहींच नाहीं. " जपकोटिगुणं ध्यानं ध्यानकोटिगुणो लयः । लयकोटिगुणं गानं गानात्परतरं न ही ॥ " हा गायनाचा महिमा लक्षांत घेऊनच समर्थांनी देखील " धन्य ती गायनी कला " असें संगीताबद्दल धन्योद्गार काढलेले आहेत.

गायन हा श्रीत्रिपुरसुंदरीचाही अत्यंत आवडता विषय आहे. आई जगज्जननी ! तूं गति, गमक आणि गीत अर्थात् संगीतांतले प्रकार, स्वरभेद आणि गायन यांमध्ये अत्यंत निपुण आहेस. संगीतशास्त्रांत सांगितलेल्या गायनाच्या विविध प्रकारांमध्ये तूं "एकनिपुणा" म्हणजे प्रामुख्याने निपुण आहेस. यांतील अभिप्राय असा आहे कीं, वास्तविकदृष्ट्या श्रीमहात्रिपुरसुंदरी ही स्वतः नादरूप आहे. "नारायणी नादरूपा" असें तिचे ललितासहस्रनामामध्यें वर्णन केलेले आहे. नादब्रह्मामध्येंच तिच्या स्वरूपाचा साक्षात्कार होत असतो. अथवा ती स्वयं नादब्रह्मस्वरूपच आहे. म्हणूनच तिला "नादब्रह्मरूपा" असे म्हणतात. अर्थात् ती नादप्रियही आहेच. नादांतून श्रुतींचा, श्रुतींतून स्वरांचा व स्वरांतून संगीताचा आविर्भाव होत असतो. नादातून अभिव्यक्त होणाऱ्या श्रुतींचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्यामुळें त्यांचें पार्थक्यानें ग्रहण होत नाहीं. ध्वनीच्या रूपाने त्यांचें फक्त कानाने ग्रहण होत असत्यामुळे त्यांना श्रुति असे म्हणतात. त्याच श्रुति संकलित झाल्या म्हणजे त्यांना स्वरांचे स्वरूप येते. " श्रवणेन्द्रियग्राह्यत्वाद् ध्वनिरेव श्रुतिर्भवेत्" श्रवणेंद्रियाला गोचर होणारा स्वरांचा घटक असलेला सूक्ष्म ध्वनि म्हणजेच श्रुति असें विश्वावसूनें श्रुतीचे लक्षण केले आहे.

श्रुति ह्या स्वरांचे अवयव होत. तीव्रा, कुमुद्वती, मंदा, छन्दोवती, दयावती, रंजनी इत्यादि त्यांची नावे आहेत. काहींच्या मते मंदा, अतिमंदा, घोरा, घोरतरा इत्यादि नावे आहेत. एकंदर श्रुति बावीस आहेत. काहींच्या मते त्या सहासष्ट आहेत. तर काहींच्या मते त्या अनंत आहेत. सर्वसामान्यपणे षड्‌जाच्या चार श्रुति मानतात. ऋषभाच्या तीन श्रुति आहेत. गांधाराच्या दोन आहेत. मध्यमाच्या चार श्रुति आहेत. पंचमाच्या चार श्रुति आहेत. धैवताच्या तीन आहेत, तर निषादाच्या दोन आहेत. "चतुश्चतुश्चतुश्चैव षड्जमध्यमपश्चमाः । द्वे द्वे निषादगान्धारौ त्रिस्त्रिर्ऋषभधैवतौ ॥ " एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत पोहोंचतांना मध्ये स्थूलमानानें अभिव्यक्त होणाऱ्या ध्वनींची अर्थात् श्रुतींची ही संख्या सांगितलेली आहे. या श्रुतींतून अभिव्यक्त होणारे स्वर सात आहेत. "श्रुत्यन्तर भावी यः स्निग्धोऽनुरणनात्मकः । स्वतो रञ्जयति श्रोतृचित्तं स स्वर उच्यते " ( संगीत रत्नाकर) ध्वनिस्वरूप श्रुतीनंतर स्निग्ध म्हणजे कानाला गोड लागणारा, अनुरणनात्मक म्हणजे सतत प्रवाहशील असा ध्वनि त्याला स्वर असे म्हणतात. तो आपल्या स्वरूपानेच श्रोत्यांच्या चित्ताला रमवित असतो. "स्वतो रञ्जयति" अथवा "स्वतो राजते इति स्वरः" अशी स्वर शब्दाची व्युत्पत्ति आहे.

संगीतामध्यें स्वर सात आहेत. षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम धैवत आणि निषाद अशीं त्यांची नांवे आहेत. या नावातील आद्य अक्षरांवरूनच व्यवहारामध्यें ते सा, रे, ग, म, प, ध, नी या अक्षरांनी गाईले जातात. षड्ज यांतील ष चा सा आणि ऋषभ यांतील ऋ चा रे हें अपभ्रष्ट रूप होय. शुक्लयजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतही ऋ चा उच्चार रे असाच करतात. आपल्या शरीरांतील मुलाधारादि सप्तचक्रांचाही या सप्तस्वरांशी निकट संबंध असल्याचे सांगितलें जातें. सर्व स्वरांत षड्ज हा स्वर मुख्य आहे. मंद्रसप्तकांतील षड्‌जाला खर्ज असें म्हणतात. ष चा उच्चार ख असा होत असतो व ड चा उच्चार र असा होत असतो. पहाटेच्या वेळेला तंबोरा लावून खर्ज धरल्यास अर्थात् खर्ज लावून बसल्यास कंठातील स्वरतंतु शुद्ध होतात. स्वर अत्यंत मधुर होतो. श्वास, दमा, खोकला हे विकार टळतात. फुफ्फुसे बलवान होतात. अद्वितीय नादब्रह्माचा आनंद लुटतां येतो. असा हा खर्जाचा षड्जाचा महिमा आहे. या षद्‌जापासूनच स्वरांच्या गायनाला आरंभ होत असतो. षड्ज हा शरीरांतील सहा स्थानांतून उत्पन्न होत असल्यामुळे त्याला षड्ज असें म्हणतात.

"षड्भ्यः स्थानेभ्यः जायते इति षड्जः" अशी त्याची व्युत्पत्ति आहे. नासा, कंठ, वक्षःस्थल, तालु, जिव्हा आणि दंत हींच तीं सहा स्थानें होत. ऋषभादि सहा स्वर षड्‌जांतूनच उत्पन्न होत असल्यामुळेंही त्याला षड्ज असें म्हणतात. "षड् जन्यने अनेन इति षड्जः" ऋषभ शब्दाचा अर्थ बैल असा आहे. बैलाच्या डरकाळीप्रमाणें दुसऱ्या स्वराचें स्वरूप असल्यामुळें त्याला ऋषभ असें नांव पडले. ऋषभ शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असाही आहे. हा स्वर सर्व स्वरांत श्रेष्ठ मानला जातो. हा स्वर शीघ्र हृदयगामी असल्यामुळेही याला ऋषभ असें म्हणतात. तिसरा स्वर गंधर्वांना फार आवडतो म्हणून त्याला गांधार असें म्हणात. किंवा "गां धारयति इति गांधारः" गायनात्मक वाणीचा तो आधार असल्यामुळेही त्याला गांधार असे म्हणतात. गांधारालाच कचित् गंधार असेही म्हणतात. म या स्वराच्या खालीं गा रे सा आणि वर प ध नी असे तीन तीन स्वर असून म हा त्यांच्यामध्यें आहे. म्हणून त्याला मध्यम असें अन्यर्थ नांव दिलें. प हा स्वर पांचवा असल्यामुळें त्याला पंचम असें म्हणतात. धीवर या शब्दावरून धैवत शब्द बनला. धीवत् म्हणजे बुद्धिमान. बुद्धिमान लोकच या धैवताचे स्वरूप जाणूं शकतात, सांगू शकतात व गाऊं शकतात. म्हणून त्याला धैवत अस म्हणतात. निषाद हा सर्वांतला शेवटचा स्वर आहे. सर्व स्वर त्याच्यांत समाविष्ट होतात, त्याच्यांत विलीन होतात, म्हणूनच त्याला निषाद असें नांव पडलें. "निषीदन्ति स्वराः सर्वे निषादस्तेन कथ्यते "

या सांत स्वरांत षड्ज आणि पंचम हे दोन स्वर अविकृत स्वरूपाचे आहेंत. त्यांच्यांत कधीं बदल होत नाही. बाकीचे पांच स्वर कोमल आणि तीव या स्वरूपांत बदलतात. शुद्ध, कोमल आणि तीव्र मिळून बारा स्वर होतात. या बारा स्वरांतूनच भिन्नभिन्न रागांची निष्पत्ति होत असते. "रञ्जयति इति रागः" श्रोत्यांच्या व सज्जनांच्या चित्ताला रमविणारा असा स्वरवर्णसमुच्चयात्मक विशिष्ट ध्वनि म्हणजेच राग होय. असें रागाचे वर्णन मतंगमुनींनी केले आहे.

"योसौ ध्वनिविशेषस्तु स्वरवर्णविभूषितः । रज्ञको जनचित्तानां स रागः कथिता बुधैः ॥" अथवा "रज्यते येन सच्चित्तं स रागः सम्मतः सताम् !"

"औडव, षाडव आणि संपूर्ण असे रागांचे तीन प्रकार आहेत. ज्या रागांत पांचच स्वरांचा उपयोग होतो त्याला औडव राग असें म्हणतात. उदाहरणार्थ, सारंग, भूप, हिंडोल, दुर्गा, मालकंस पहा. ज्या रागांत सहा स्वरांचा उपयोग होतो त्यांना षाडव असें म्हणतात. उदाहरणार्थ, ललत, मारवा, केदार इत्यादि. ज्या रागांत सातही स्वर उपयोगांत आणले जातात त्यांना संपूर्ण राग असें म्हणतात. उदाहरणार्थ, भैरव, भैरवी, यमन, खमाज इत्यादि. मुख्य राग आणि उपराग अथवा रागिणी पुष्कळच आहेत. "शिवशक्तिसमायोगाद्‌रागाणां सम्मवो भवेत्" शिवशक्तीपासूनच सर्व रागांची उत्पत्ति झालेली आहे, असें संगीतदर्पणकारांनीं सांगितले आहे. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान अशी शंकरांची पांच मुखे आहेत. त्यांतून क्रमशः श्रीराम, वसंतराग, भैरवराग, पंचमराग आणि मेघराग असे पांच राग उत्पन्न झालेले आहेत. सहावा राग नट्ट नारायण हा श्रीललितामहाशक्तीच्या मुखांतून प्रकट झालेला आहे.

गमक म्हणजे ओत्यांच्या चित्ताला सुखावह वाटणारें विशिष्ट प्रकारें होणारे स्वरांचें कंपन. "स्वरस्य कम्पो गमकः श्रोतृचित्तसुखावहः" असें गमकाचे लक्षण केलेले आहे. हे कंप अनेक प्रकारचे आहेत. स्फुरित, कंपित, आदोलित अशी त्यांची नांवें आहेत. हे कंप विविध रसांचे परिपोषण करीत असतात. सप्तस्वरांच्या समूहालाच ग्राम असे म्हणतात. ज्याप्रमाणें अनेक कुटुंबांच्या संकलित वसतीला ग्राम असें म्हटले जातें त्याचप्रमाणें अनेक स्वरांच्या संकलित समूहालाही ग्रामच म्हटलेले आहे. "यथा कुटुम्बिनः सर्वेऽप्येकीभूता भवन्ति हि । तथा स्वराणां सन्दोहो ग्राम इत्यभिधीयते ॥" तात्पर्य, ग्राम म्हणजे संकलित स्वरससूह. तो रागभेदानें भिन्नभिन्न स्वरूपांचा असणें स्वाभाविक आहे. ग्राम तीन प्रकारचे आहेत. षदजग्राम, मध्यमग्राम आणि गान्यारग्राम. पैकी पहिले दोन ग्राम हे भूलोकीं गाले जातात व गाधारग्राम हा देवलोकीं गाईला जातो असें शास्त्रज्ञ सांगतात. या स्वरसमूहालाच कचित् सप्तक असेही म्हणतात. ही सप्तकें तीन आहेत. मंद्रसप्तक, मध्यसप्तक आणि तारसप्तक अशीं त्यांची नावे आहेत. ही सप्तकें आपण आरोह व अवरोह या क्रमाने गाऊं लागलो म्हणजे त्यांना मूर्च्छनांचे स्वरूप येतें. " आरोहणावरोण-क्रमेण स्वरससकम् । मूर्च्छनाशब्दवाच्यं हि वायं तद्विचक्षणैः ॥" अशी मूर्च्छना शब्दाची व्याख्या आहे. षड्जापासून क्रमाने वरचे वरचे स्वर म्हणणें याला आरोह म्हणतात, तर तेच स्वर क्रमाने खालीं (वाली म्हणत येणे याला अवरोह असें म्हणतात.

एखाद्या रागामध्ये जो स्वर वरचेवर लावला जातो अथवा प्राधान्याने गाइला जातो त्या स्वरास वादीस्वर असें म्हणतात. वादीस्वर हा त्या रागांत जासारखा असतो. राजाला जसा प्रधान त्याप्रमाणें वादीस्वराला साहाय्य करणारा जो स्वर असतो त्याला संवादीस्वर असे म्हणतात. राजा आणि प्रधान यांना जसे सेवक अनुसरतात त्याप्रमाणे वादी आणि संवादी स्वरांना साहाय्य करणारे जे स्वर असतात त्यांना अनुवादी स्वर असे म्हणतात. विवादी स्वर हे शत्रूप्रमाणें असल्यामुळें ते त्या त्या रागांत वर्ज्यच असतात. याप्रमाणें रागाचें स्वरूप निश्चित करून ज्या मुर्च्छना द्रुतगतीने गाइल्या जातात त्यांनाच ताना असे म्हणतात. या तानांतही शुद्ध ताना आणि कूट ताना असे दोन भेद आहेतच. अशा रीतीनें नाद, श्रुति, स्वर, ग्राम, मुर्च्छना, आलाप, ताना, वर्ण, जाति व अलंकार इत्यादि रूपाने परिणत होत होत स्वरसमूहाला सुसंगत रचनेचे स्वरूप आलें कीं त्याला गीत असें नांव दिले जातें. " रञ्जकः स्वरसन्दर्भो गीतमित्यभिधीयते" त्याच गीताला नृत्य आणि वाद्य यांची जोड मिळाली कीं, त्याला संगीत असे म्हणतात. " गीतं वाद्यं च नृत्यं च त्रयं संगीतमुच्यते" याप्रमाणें नाद आणि नादाचेंच पर्यवसित रूप संगीत असल्यामुळें संगीतोपासना ही श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचीच उपासना होय. "यत्किश्चिन्नादरूपेण भूयते शक्तिरेव सा"

तात्पर्य, आई ! तुझ्या गळ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या या तीन रेघा म्हणजे जणुं कांहीं विवाहाच्या वेळीं मंगळसूत्र बांधल्यानंतर शंकरांनी तुझ्या गळ्यांत बांधलेले "प्रगुणगुण" म्हणजे अनेक तंतु असलेले मांगल्यसूचक सूत्रांचे धागे, त्यांच्या तीन या संख्येची त्या "प्रतिभू' म्हणजे साक्ष देणाऱ्याच आहेत कीं काय असें वाटतें. विवाहाच्या वेळीं वधूच्या हातांत आणि गळ्यांत सूत्र बांधण्याची पद्धति असते. गळ्यांतल्या सूत्राला त्रिसर असें म्हणतात. गळ्यावर दिसणाऱ्या रेघांवरून गळ्यातील सूत्रही तीन धाग्यांचें असावें असें अनुमान करतां येतें. यावरून श्लोकाच्या पूर्वार्धांत अनुमानालंकार असल्याचें सिद्ध होतें.

याच तीन रेषांवर उत्तरार्धांत मोठी सुंदर उत्प्रेक्षा करीत आहेत "नानाविधमधुररागाकरभुवां त्रयाणां ग्रामाणां स्थितिनियमसीमानः इव ते गले रेखाः विराजन्ते" आई ! तुझ्या गळ्यावर दिसणाऱ्या या तीन रेषा रवरोरवय अनेक प्रकारच्या मधुर, मनोहर रागांच्या जणुं कांहीं जन्मभूमीच असलेल्या षड्जग्राम, मध्यमग्राम आणि गांधारग्राम या तीन ग्रामांच्या म्हणजे स्वर समूहांच्या त्या सीमा दाखविणाऱ्या अथवा तीन ग्रामांच्या स्थितीचें नियमन करणाऱ्या सीमारेषाच होत. अशा रीतीनें तुझ्या गळ्यावरील रेषा शोभत आहेत. आई ! तूं माझें कल्याण कर.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची पंचेचाळीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. मधाचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केले असतां जें मनीं धरावे तें सिद्धीस जातें.

मृणालीमृद्वीनां तव भुजलतानां चतसृणां
चतुर्भिः सौन्दर्यं सरसिजभवः स्तौति वदनैः ।
नखेभ्यः सन्त्रस्यन्प्रथम-मथनादन्धकरिपो-
श्चतुर्णां शीर्षाणां सममभय-हस्तार्पण-धिया ॥ ७०॥

आई जगज्जननी ! तुझ्या या चार बाहुलता अर्थात् भुजा कमलिनीपेक्षांही अत्यंत कोमल आणि सुंदर आहेत. सरसिज-भव म्हणजे कमळांतून जन्माला आलेले भगवान् ब्रह्मदेव हे आपल्या चारी मुखांनी तुझ्या चारी भुजाचें स्तवन करीत असतात. यांत त्यांचा अभिप्राय असा आहे कीं, पूर्वी शंकरांप्रमाणेंच ब्रह्म देवालाही पांच मुखें होतीं. सर्व वाणी आपली कार्य पार पाडण्याकरितां तीं पांच मुखे होतीं. पण ब्रह्मदेवाला शंकराप्रमाणे आपणही पंचमुखी आहोंत असा अहंकार मात्र वाटूं लागला ! त्या अहंकारामुळे त्यांचें अंगीकृत कार्य व्यवस्थितपणे पार पडेना. तेव्हां शंकरांनी त्यांचे पांचवें मस्तक नखाने उडविलें ! अशा रीतीनें "प्रथममथनात्" म्हणजे शंकरांनीं प्रथमच आपलें पाचवें मस्तक उडविल्यामुळें ब्रह्मदेवाला "अंधकरिपु" म्हणजे भगवान शंकर यांच्या नखाची मोठी भीति वाटत होती. त्या भयाने संत्रस्त होऊन यापुढें तरी शिल्लक राहिलेल्या आपल्या चारी मुखांना सारखे संरक्षण मिळावे म्हणून हे आई जगजननी ! ते भगवान् ब्रह्मदेव, तूं चारी हातानीं अभय समर्पण करावेस, आपल्याला चारी हातांनी तूं अभयदान द्यावेंस म्हणूनच तुझ्या बाहुलतांचे ते चारी मुखांनीं स्तवन करीत आहेत. असा हा तुझ्या भुजलतांचा महिमा आहे ! तुझ्यावांचून दुसरा कोण परित्राण करणार ? आई, तूंच आमचे रक्षण कर.

सोन्याच्या पत्र्यावर पहिल्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणें यंत्र काढून त्याच्या मध्यभागी एकाखाली एक क्लीं आणि श्रीं अशी दोन बीजे लिहावींत. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. नारळाचा आणि मधाचा नैवेद्य दाखवावा. सिद्धयंत्र धारण करावे. सकल लोक वश होतील.

नखानामुद्द्योतैर्नव-नलिन-रागं विहसतां
कराणां ते कान्तिं कथय कथयामः कथमुमे ।
कयाचिद्वा साम्यं भजतु कलया हन्त कमलं
यदि क्रीडल्लक्ष्मीचरणतल-लाक्षारसचणम् ॥ ७१॥

हे उमे जगजननी पार्वती माते ! तुझ्या नखाचे "उद्योत" म्हणजे किरण अथवा प्रभापटल इतकें आरक्तवर्ण आहे कीं, त्यांच्या त्या आरक्तवर्णामुळें तुझे हात सूर्योदयाच्या वेळीं विकसित होणाऱ्या ताज्या टवटवीत कमलाच्या रक्तवर्णालाही जणुं कांहीं हसत आहेत असे वाटतें. कमलांचा आरक्तवर्णही त्यांच्यापुढे फिका पडत आहे. अशा तुझ्या हातांची कांति म्हणजे शोभा आम्ही काय वर्णन करणार ? कसें वर्णन करणार ? "कथय" तूंच सांग. लक्ष्मी क्रीडा करीत असतांना तिच्या पायाचा लाक्षारस म्हणजे अळिता ( लाखेचा तांबडा रंग) ज्याला लागलेला आहे असे कमलच कदाचित् "कयाचित् कलया" म्हणजे एखाद्या लेशाने तरी साम्य करील कीं नाही याचा मला संशयच वाटतो. तात्पर्य, तुझ्या हाताची कांति अपूर्व आहे. तुझे ते करकमल आमचें कल्याण करोत.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची पंचेचाळीस दिवस पूजा करावी. वडाच्या झाडाखाली बसून या श्लोकाचा रोज बारा हजार जप करावा. मधाचा नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे हें यंत्र सिद्ध करून धारण केल्यास यक्षिणी वश होईल.

समं देवि स्कन्दद्विपवदनपीतं स्तनयुगं
तवेदं नः खेदं हरतु सततं प्रस्नुतमुखम् ।
यदालोक्याशङ्काकुलितहृदयो हासजनकः
स्वकुम्भौ हेरम्बः परिमृशति हस्तेन झडिति ॥ ७२॥

आई जनजननीदेवी ! "स्कन्द" म्हणजे कार्तिकस्वामी आणि द्विपवदन म्हणजे गजानन हे दोघेही तुझे चिरंजीव तुझें स्तनपान करतात. त्यामुळें तीं स्तनें सतत प्रस्नुतमुख म्हणजे क्षीरस्रावी अर्थात दूध स्रवणारे आहेत. आई ! तुझे ते दुग्धपूर्ण स्तन आमचें सर्व दुःख हरण करोत.

हेरंब म्हणजे गणपति. हे तुझे चिरंजीव मोठे विनोदी आहेत. तुझ्या स्तनाकडे पाहून त्यांच्या अंतःकरणाला अशी शंका येते कीं, माझ्या मस्तकावरील गंडस्थलेंच आईनें काढून घेतली आहेत कीं काय ! आणि या शंकेनें ते झटकन् आपल्या हाताने आपल्या गंडस्थलांना स्पर्शू करीत आहेत. त्यांचा हा बालपणांतला विनोद पाहून भगवान् शंकर आणि देवी पार्वती हे उभयतांही हसतात कार्तिकस्वामीही हसतात. असे हे मोठे हास्यजनक विनोदी चिरंजीव आहेत. असो. आई, तूं त्यांच्याप्रमाणे आमचेही कल्याण कर.

सोळाव्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढावा. त्याच्या तिन्ही टोकास तीन त्रिशूल दाखवावेत. त्रिकोणामध्ये पहिल्या ओळींत "समंदेवि" ही चार अक्षरे लिहावींत. त्यांच्याखाली ह्रीं हें बीज लिहावे त्याच्याही खालीं ह्रीं हे बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. मधाचा नैवेद्य दाखवावा. हें सिद्ध- यंत्र धारण करावे. यायोगें रात्रीं अपरात्री साप, विंचु, भूत, पिशाच वगैरे कशाचीही भीति रहाणार नाही.

अमू ते वक्षोजावमृत-रस-माणिक्य-कुतुपौ
न संदेहस्पन्दो नगपतिपताके मनसि नः ।
पिबन्तौ तौ यस्मादविदित-वधू-सङ्ग-रसिकौ
कुमारावद्यापि द्विरदवदन-क्रौञ्चदलनौ ॥ ७३॥

हे आई जगजननी ! "नगपतिपताके" नगपति म्हणजे हिमालय. त्याच्या वंशाची तूं कीर्तिपताकाच आहेस. तुझे हे वक्षोज म्हणजे स्तन हे अमृतरसाने भरलेले जणुं कांहीं माणकाचे कुतुप म्हणजे बुधलेच आहेत. ते नेहमी अमृतसानें परिपूर्ण आहेत यांत आम्हांला तिळमात्रही संशय नाहीं. कारण ते अमृतपूर्ण आहेत म्हणूनच "द्विरदवदन" म्हणजे गणपति आणि क्रौञ्चदलन म्हणजे कार्तिकस्वामी हे दोघेही विवाह न करतां, संसारांत न पडता अर्थात् स्त्रीसंगविमुख होऊन अद्यापि कुमारच राहिले आहेत आणि तुझें स्तनपान करीत आहेत ! यद्यपि देवसेना ही कार्तिकस्वामींची पत्नी आहे व ऋद्धिसिद्धि या गणपतींच्या पत्नी आहेत. तथापि देवसेना ही सैन्यस्वरूप असल्यामुळें व ऋद्धिसिद्धि या वैभवस्वरूप असल्यामुळें तें केवळ रूपकमात्र आहे. गणपति आणि कार्तिकस्वामी हे कुमारच आहेत. आई ! तूं जसे त्यांना तृप्त केलेस त्याचप्रमाणे आम्हांलाही तृप्त कर.

सोन्याच्या पत्र्यावर चतुष्कोण काढून त्यामध्ये हां हें बीज लिहावे. सात दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. मध आणि दूध यांचा नैवेद्य दाखवावा. हे यंत्र धारण केलें असतां स्त्रियांना भरपूर दूध येईल. गाय, म्हैस यांचे द्‌ध जर कोणी आटविलें असेल तर त्यांनाही भरपूर दूध येईल.

वहत्यम्ब स्तम्बेरम-दनुज-कुम्भ-प्रकृतिभिः
समारब्धां मुक्तामणिभिरमलां हारलतिकाम् ।
कुचाभोगो बिम्बाधररुचिभिरन्तः शबलितां
प्रतापव्यामिश्रां पुरदमयितुः कीर्तिमिव ते ॥ ७४॥

हे अंब जगजननी ! तुझ्या गळ्यातील मोत्यांचा हार किती मनोरम दिसत आहे. "स्तम्बेरम" म्हणजे हत्ती. दनुज म्हणजे दानव. अर्थात् स्तम्बेरमदनुज म्हणजे गजासुर. त्याच्या गंडस्थलांत निर्माण झालेले मुक्तामणि म्हणजे मोती. त्या मोत्यानी तयार केलेली, अमला म्हणजे निर्दोष - स्वच्छ - सुंदर अशी ही "हारलतिका" म्हणजे माला तूं आपल्या वक्षस्थलीं धारण केलेली आहेस. मोती कोठें कोठें निर्माण होतात याचा विचार करतांना रत्नशास्त्रवेत्त्यांनीं मोत्यांच्या उत्पत्तीचीं सहा स्थाने मानलेली आहेत. ( १) हत्तीची गंडस्थले, ( २) कळक, ( ३) नागांची फणा, ( ४) ढग, ( ५) शिंप आणि ( ६) ऊस हीच ती सहा स्थाने होत. हत्तीच्या गंडस्थलांत निर्माण होणारे मोती हे कर्बुर म्हणजे चित्रविचित्र वर्णाचे असतात तर बांसामध्ये असलेलें मोती श्वेतरक्त अशा मिश्र वर्णाचे असतात. नागांच्या फणांमधलें मोती हें नीलवर्ण असतात तर ढगातलें मोती हे दीपज्योतीच्या वर्णाचें असतात. शुक्तिकेतील मोती श्वेतवर्णाचे असतात तर इशुदंडांतील मोती हें पीतवर्णाचें असतात. असें सर्वज्ञसोमेश्वरानें मोत्यांचे वर्णन केले आहे.

"गजकुम्भेषु वंशेषु फणासु जलदेषु च ।
शुक्तिकायामिसुदण्डे षोढा मौक्तिकसम्भवः ॥
गजकुम्मे कर्बुराभाः वंशे रक्तसिताः स्मृताः
फणासु वासुकेरेव नीलवर्णाः प्रकीर्तिताः ॥
ज्योतिर्वर्णास्तु जलदे शुक्तिकायां सिताः स्मृताः ।
इक्षुदण्डे पीतवर्णा मणयो मौक्तिकाः स्मृताः ॥"

गजासुराच्या गंडस्थलांतील मोती हें अधिकच कर्बुर वर्णाचे असणें स्वाभाविकच आहे. अशा मोत्यानी गुंफलेली माळ तूं आपल्या गळ्यामध्यें धारण केलेली आहेस. त्याच्यावर तुझ्या तोंडलीच्या फळाप्रमाणें रक्तवर्ण असलेल्या ओष्ठांच्या कांतीची छटा पसरलेली आहे. तात्पर्य, विविध वर्णांनी युक्त असलेल्या मौक्तिकांचा हा तुझ्या गळ्यातील हार म्हणजे त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या भगवान् शंकर यांचा मूर्तिमंत प्रताप आणि कीर्तिच आहे कीं काय अशा थाटांत शोभत आहे !

कविसंकेतामध्यें प्रतापाचा वर्ण रक्त आणि कीर्तीचा वर्ण श्वेत मानला जातो. श्रीत्रिपुरसुंदरीच्या गळ्यातील मौक्तिकांच्या हारामध्ये असलेल्या रक्तछटा आणि श्वेतछटा या शंकरांच्या प्रतापाच्या व कीर्तीच्या द्योतक आहेत. तात्पर्य, शंकरांचा प्रताप आणि कीर्तीच आई ! तूं आपल्या गळ्यांत धारण केलेली आहेस किंवा महादेवाच्या प्रतापाने व कीर्तीने तुझ्या वक्षस्थलाचा जणुं कांहीं आश्रय केलेला आहे. केवढा तुझा हा महिमा आहे ? तो आमचें कल्याण करो.

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढून त्यामध्ये एकाखाली एक ऐं क्लीं सौः अशीं अक्षरे लिहावींत. देवीच्या सान्निध्यांत पंचेचाळीस दिवस समाराधना करावी. या श्लोकाचा रोज एकशेंआठ वेळां जप करावा. दुधाचा पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्याने साधकाला कीर्तीचा लाभ होतो.

तव स्तन्यं मन्ये धरणिधर-कन्ये हृदयतः
पयःपारावारः परिवहति सारस्वतमिव ।
दयावत्या दत्तं द्रविडशिशुरास्वाद्य तव यत्
कवीनां प्रौढानामजनि कमनीयः कवयिता ॥ ७५॥

धरणीधर म्हणजे पर्वत. श्रीललितामहात्रिपुरसुंदरीदेवी ही पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळें तिला धरणीधरकन्या असें म्हटलेले आहे. हे धरणीधरकन्ये माते जगज्जननी ! तुझें स्तन्य म्हणजे खरोखर हृदयापासून आविर्भूत झालेला तो मूर्तिमंत क्षीरसागरच आहे. पारावार म्हणजे समुद्र. अथवा "सुधाधारासार" असा पाठ घेतल्यास अमृताच्या धारांचा तो मूर्तिमंत प्रवाह अथवा वर्षावच आहे असा अर्थ करावा. तें जणुं कांहीं मूर्तिमंत "सारस्वत" म्हणजे वाङ्‌मयच वहात आहे असें वाटतें. 'मन्ये' म्हणजे मी समजतो.

तूं पूर्णपणे दयायुक्त होऊन अर्पण केलेल्या त्या सारस्वतरूपी स्तन्याचा आस्वाद घेऊन हा तुझ्यापुढे स्तवन करीत असलेला 'द्रविडशिशु' म्हणजे द्रविड जातींत जन्माला आलेला बाळ अर्थात् मी शंकर तुझ्या कृपेने खरोखर "प्रौढानां कवीनां" म्हणजे मोठमोठ्या कविलोकांमध्ये अर्थात् उत्तम काव्य करणाऱ्या विद्वानांमध्यें अथवा "कविः क्रान्त्सदर्शी" या अभिप्रायाने पहाता त्रिकालज्ञ तत्त्ववेत्त्यांमध्ये "कमनीयः कवयिता" म्हणजे अत्यंत रमणीय काव्यकर्ता अथवा सत्यतत्त्वाचा पुरस्कर्ता व प्रतिपादक "अजनि' म्हणजे झाला. आई जगजननी ! या बालकाला जें येवढें उत्तम काव्य स्फुरलें अथवा जें एवढे उत्तम तत्त्वज्ञान प्रतिपादन करण्याचें सामर्थ्य प्राप्त झाले ते केवळ तूं दयेने त्याला पाजलेल्या स्तन्याचाच हा प्रभाव होय.

या ठिकाणी द्रविडशिशु शब्दाचा अर्थ द्रविड राजाचा मुलगा "प्रवरसेन" असा एका टीकाकाराने केलेला आहे तर दुसऱ्या एका गृहस्थाने कांची प्रदेशांतील "सबन्धस्वामी" असा अर्थ केलेला आहे, पण बहुसंख्य विद्वानांना व विद्वत्परंपरेला तो अर्थ मान्य असल्याचें दिसत नाही. आम्हीही पण या बावतींत अनेक विद्वानांशी चर्चा करून आणि स्वतःही शांत चित्ताने सूक्ष्म विचार करून निर्णीत केलेला अर्थ वर निर्दिष्ट केला आहे.

हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून तीन दिवस त्याची समाराधना करावी. या श्लोकाचा रोज बारा हजार वेळां जप करावा. कांहीं ठिकाणी एक हजार वेळां करावा असेही सांगितलें आहे. केळांचा आणि मधाचा नैवेद्य दाखवावा. सिध्दयंत्र धारण करावे. यानें कवित्वशक्तीचा लाभ होतो.

हर-क्रोध-ज्वालावलिभिरवलीढेन वपुषा
गभीरे ते नाभीसरसि कृतसङ्गो मनसिजः ।
समुत्तस्थौ तस्मादचल-तनये धूमलतिका
जनस्तां जानीते तव जननि रोमावलिरिति ॥ ७६॥

हे अचलतनये पर्वतराजकन्ये पार्वती ! शंकरांच्या भडकलेल्या क्रोधाग्नीच्या ज्वालांनी लपेटलेल्या शरीराने हा मनसिज म्हणजे, कामदेव आपल्या शरीराला लागलेली आग शमविण्याकरितां तुझ्या गंभीर असलेल्या नामिरूपी सरोवरामध्यें आश्रय करून राहिलेला आहे. तेथें तो निमग्न झालेला आहे. शंकरांच्या क्रोधाग्नीनें आपल्या शरीराला लागलेली आग तेथें त्यानें शमविलेली आहे असें दिसतें. म्हणूनच तर हे आई ! तेधून ही धूमलतिका म्हणजे धूमराजी निघालेली दिसत आहे. लोक त्या धूमराजीलाच तुझ्या नाभिस्थानावरील रोमराजी आहे असें समजतात. तात्पर्य, तुझी नाभी आणि त्यावर दिसणारी रोमराजी ही अत्यंत मनोहर आहे. ती आमचे कल्याण करो.

पुढें दिले यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची आठ दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज बारा हजार जप करावा. नारळ, केळें, दहिभात आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा, हें सिद्धयंत्र धारण केल्याने सर्व लोक वश होतील.

यदेतत् कालिन्दी-तनुतर-तरङ्गाकृति शिवे
कृशे मध्ये किंचिज्जननि तव यद्भाति सुधियाम् ।
विमर्दादन्योऽन्यं कुचकलशयोरन्तरगतं
तनूभूतं व्योम प्रविशदिव नाभिं कुहरिणीम् ॥ ७७॥

हे आई जगत्कल्याणकारिणी ! हें जे कांही तुझ्या कृश उदराच्या ठिकाणीं थोडेसे यमुनेच्या अत्यंत सूक्ष्म तरंगाच्या आकाराचे रोमराजीच्या रूपाने दिसत आहे तें बुद्धिमान लोकांना असे वाटतें कीं, तुझ्या वक्षस्थलीं विराजमान असलेल्या स्तनांच्या अभिवृद्धीमुळे एकमेकांच्या संघर्षाने आतां येथें आपल्याला जागा मिळणार नाहीं असा विचार करीत तेथील अवकाशरूप आकाशच अत्यंत सूक्ष्म होऊन आपल्याला निराबाध आश्रय मिळावा म्हणून तुझ्या गंभीर नाभिकुहरामध्यें सूक्ष्म रोमराजीच्या रूपाने जणुं कांहीं प्रवेश करीत असल्यासारखे दिसत आहे ! आकाश हें नीलवर्ण आणि मूर्तस्वरूप आहे असा कवि लोकांचा संकेत आहे. त्याला अनुलक्षूनच आचार्यांनी हें वर्णन केलेले आहे. तात्पर्य, आई ! तुझी ती मनोहर नाभी आणि तिच्यावरील रोमराजी आमचे कल्याण करो.

रक्तकमलाची राख कपिला गाईच्या तुपात कालवून त्यावर अधोमुख त्रिकोण काढावा. तिन्ही कोणास त्रिशूलाचा आकार द्यावा. मध्यभागी क्लीं हें अक्षर लिहावे. दहा दिवस पूजा करावी. केळे आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज दोन हजार वेळां जप करावा. अनुष्टानसमाप्तीनंतर त्याचा तिलक धारण करावा. याने राजेलोक वश होतात.

स्थिरो गङ्गावर्तः स्तन-मुकुल-रोमावलि-लता-
कलावालं कुण्डं कुसुम-शरतेजो-हुतभुजः ।
रतेर्लीलागारं किमपि तव नाभिर्गिरिसुते
बिलद्वारं सिद्धेर्गिरिश-नयनानां विजयते ॥ ७८॥

हे गिरिसुते पार्वतीमाते ! तुझ्या नाभिस्थानाचें मी काय वर्णन करूं ? तो खरोखर गंगाप्रवाहांतील पाण्याचा भोवराच दिसत आहे. गंगेच्या प्रवाहांतील भोवरा चल, अस्थिर व क्षणिक असतो तर हा भोवरा नित्य अविनाशी स्थिर स्वरूपाचा आहे. अथवा तें एक वेलीचें आळेंच आहे कीं काय असें वाटतें.

"स्तन-मुकुल-रोमावलि-लता-कलावालं" स्तनरूपी दोन कळ्यांनी युक्त असलेली रोमावलिरूपी लता हीच कोणी कला म्हणजे रेखा, त्या लतारेखेचें-लताप्रतानाचे मूळ असलेलें जणुं कांहीं तें आळेंच आहे असें तुझें नाभिस्थान दिसत आहे. अथवा कुसुमशर म्हणजे कामदेव, त्याचें तेज हाच कोणी अग्नि, त्या अग्नीचे तें जणुं कांहीं वर्तुलाकार कुंडच आहे कीं काय ? अशा रीतीने तुझें नाभिस्थान शोभत आहे. कांहीं लोक तर कामदेवाची पत्नी असलेल्या रतीचें ते क्रीडास्थान आहे अशीच कल्पना करतात. हे जगजननी ! खरोखर तुझें नाभिस्थान अतिशय सुंदर आहे. तें "किमपि" म्हणजे अनिर्वचनीयच आहे. भगवान् शंकर यांच्या नेत्रांच्या साफल्यसिद्धीचें तें निवासस्थान आहे. आई, त्याचा विजय असो. तें आमचे कल्याण करो.

गुलावजल किंवा केवडाजल यांमध्ये रक्तचंदन उगाळावें. त्यांत कस्तूरी मिसळावी. त्यावर अधोमुख त्रिकोण काढावा. तिन्ही कोणास त्रिशूळाचा आकार द्यावा. मध्यभागी ह्रीं हें अक्षर लिहावे. या यंत्राची चव्वेचाळीस दिवस पूजा करावी. उडदाचा वडा आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज १०८ वेळां जप करावा. समाराधनेनंतर याचा टिळा कपाळी धारण करावा. याने राजेलोक वश होतील.

निसर्ग-क्षीणस्य स्तनतटभरेण क्लमजुषो
नमन्मूर्तेर्नारीतिलक शनकैस्त्रुट्यत इव ।
चिरं ते मध्यस्य त्रुटित-तटिनी-तीरतरुणा
समावस्थास्थेम्नो भवतु कुशलं शैलतनये ॥ ७९॥

हे शैलतनये माते पार्वती ! तूं सर्व स्त्रियांमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहेस म्हणून तुला मी नारीतिलक या शब्दाने संबोधित आहे. आई ! स्वभावतःच क्षीण असलेला तुझ्या देहाचा मध्यभाग पर्वतप्राय स्तनांच्या उंचवट्याच्या भाराने अधिकच थकलेला ( कुमजुष्) असा दिसत आहे. त्यामुळें तुझा देह कमरेजवळ किंचित् वांकलेलाही दिसत आहे. तो मोडेल कीं काय अशी मला भीति वाटतें ! कारण तसाच तो दिसत आहे.

"त्रुटित-तटिनी-तीर-तरुणा-समावस्थास्थेम्नः" म्हणजे अगदीं तुटलेल्या ढासळू पहात असलेल्या नदीच्या काठावरील एरवाद्या वृक्षाची जशी अवस्था असावी तशाच अवस्थेंत येऊन पोहोचल्याप्रमाणे तो तुझ्या देहाचा मध्यभाग दिसत आहे. आई ! तो तुटू नये, मोडूं नये, त्याचें कुशल असावें अशी मी मनापासून इच्छा करीत आहे. तात्पर्य, श्रीमहात्रिपुरसुंदरीचा कमरेचा भाग अत्यंत कृश आणि मनोहर दिसत आहे. तिच्या कृपेने आमचे कुशल होवो.

हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचेचाळीस दिवस त्याची पूजा करावी. दुधाचा पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. हें यंत्रधारण केलें असतां साधक इंद्रजाल विद्येमध्यें निपुण होईल.

कुचौ सद्यःस्विद्यत्तट-घटित-कूर्पास-भिदुरौ
कषन्तौ दोर्मूले कनक-कलशाभौ कलयता ।
तव त्रातुं भङ्गादलमिति वलग्नं तनुभुवा
त्रिधा नद्धं देवि त्रिवलि लवलीवल्लिभिरिव ॥ ८०॥

हे आई जगज्जननी ! तूं आपल्या प्रकाशाने त्रैलोक्याला प्रकाशित करतेस म्हणून तुला देवी म्हणतात. दिव् धातूचा अर्थ प्रकाशणें असा आहे. दिव् धातूचा अर्थ खेळणे असा घेतल्यास या सर्व विश्वाची घडामोड ही तुझी क्रीडाच आहे म्हणूनही तुला देवी असें म्हणतात. हे देवी ! भगवान् शंकर यांच्या स्वरूपाचे तूं निरंतर चिंतन करीत असल्यामुळें तुझ्या ठिकाणी जो सात्विक भाग निर्माण होतो त्यामुळे तुझ्या अंगाला घाम सुटतो. इष्ट विषयाचे अथवा उपास्य देवतेचे चिंतन करीत असतांना अंगाला घाम सुटणे हें अष्टविध सात्विक भावांतले एक लक्षण आहे. तत्काळ निर्माण होणाऱ्या घामाने ज्यांचे पार्श्वमाग अथवा वरचे भाग आर्द्र झालेले आहेत असे तुझे स्तन तूं परिधान केलेल्या कूर्पासाला म्हणजे कंचुकीला अर्थात् कंचुकीच्या बंधनाला तोडूं पहात आहेत. तुझ्या बाहुमूलाच्या ठिकाणी ते सारखे घासले जात आहेत. तसेंच ते सुवर्णकलशाप्रमाणें शोभत आहेत. अशाच तऱ्हेच्या या स्तनांना निर्माण करणाऱ्या "तनुभवा" म्हणजे कामदेवाने तुझा कृश असलेला मध्यदेह (पोट आणि कंबर) भग्न होऊं नये म्हणून त्याचे संरक्षण करण्याकरितां, त्यांना आधार मिळण्याकरितां एवढे बंधन पुरे होईल अशा भावनेनें तुझ्या पोटावर असलेल्या तीन वळ्यांच्या रूपाने जणुं कांहीं लवलीवल्लीच्या तीन वेड्यांनी गुंडाळून तुझें उदर बांधूनच ठेवले आहे की काय असे वाटतें. तात्पर्य, त्रिवलयांकित तुझा मध्यदेह अत्यंत कृश असल्यामुळें फारच सुंदर दिसत आहे. तो आमचे कल्याण करो.

या यंत्राचे साधन आणि फल वरच्या श्लोकाप्रमाणेंच समजावे.

गुरुत्वं विस्तारं क्षितिधरपतिः पार्वति निजा-
न्नितम्बादाच्छिद्य त्वयि हरणरूपेण निदधे ।
अतस्ते विस्तीर्णो गुरुरयमशेषां वसुमतीं
नितम्बप्राग्भारः स्थगयति लघुत्वं नयति च ॥ ८१॥

हे माते पार्वती ! क्षितिधरपति म्हणजे पर्वतराज हिमालय याने आपल्या नितंबांपासून अर्थात् पायथ्यांच्या पर्वतांपासून आणि दऱ्याखोऱ्यांच्या भागांतून गुरुत्व आणि विस्तार अर्थात् मोठेपणा आणि वैपुल्य हे दोन्ही गुण गोळा केले व ते तुझ्या ठिकाणी "हरण" म्हणजे लग्नाच्या वेळीं दिले जाणारे अंदणद्रव्य म्हणून अर्पण केलेले - ठेवलेले - दितत आहेत. लग्नाच्या वेळीं वधूला माता- पिता आणि आप्तजन यांच्याकडून अग्नीच्या सान्निध्यांत जें द्रव्य मिळतें तें आणि पहिल्या प्रथम सासरी वाटेस लावतांना जें धन मिळतें तें सर्व स्त्रीधन मानले जातें. त्याला संस्कृत भाषेत "हरण" असें म्हणतात. आई जगजननी, गर्वतराजानें ही देणगी दिल्यामुळेच तुझा "नितम्बप्राग्भार" म्हणजे कटिपश्चात् भागाचा विस्तार आणि गुरुत्व हे दोन्ही गुण साऱ्या पृथ्वीला झाकून टाकीत आहेत आणि एक प्रकारे लघुत्व म्हणजे न्यूनताही आणित आहेत. तात्पर्य तुझें सौंदर्य अपूर्व आहे. गुरुत्व आणि विशालता हे दोन धर्म एका ठिकाणी असणें हा पृथ्वीचा विशेष गुण होय. हिमालय हा सर्व भूधरांचा - पर्वतांचा राजा असल्यामुळें त्याच्याकडे पृथ्वीकडून हा विशेष गुण सहजच आला. पार्वती ही पर्वतराजाची कन्या असल्यामुळें तिलाही या गुणाचा लाभ झाला. असाही भाव या वर्णनांत व्यक्त होत आहे.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून आग्नेय दिशेला तोंड करून सोळा दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. जूळ, पायस, मध आणि उडदाचा वडा यांचा नैवेद्य दाखवावा. सिद्धयंत्र धारण करावे. याने अग्निस्तंभन होतें. अग्नीनें भाजणार नाहीं. अग्नीने होणारा दाह शमेल.

करीन्द्राणां शुण्डान्कनक-कदली-काण्ड-पटली-
मुभाभ्यामूरुभ्यामुभयमपि निर्जित्य भवती ।
सुवृत्ताभ्यां पत्युः प्रणति-कठिनाभ्यां गिरिसुते
विधिज्ञे जानुभ्यां विबुध-करिकुम्भ-द्वयमसि ॥ ८२॥

हे गिरिसुते पार्वती ! तूं आपल्या दोन्ही मांड्यांनीं मोठमोठ्या हत्तींच्या शुंडादंडाना जिंकलेले आहेस. तात्पर्य, हत्तींच्या सोंडांपेक्षांही तुझ्या मांड्या लांब आणि सरळ आहेत. तसेंच त्यांनीं सोन्याच्या केळींच्या खांबांच्या समूहाला पण जिकलेलें आहे. तात्पर्य केळीच्या खांबांपेक्षांही तुझ्या मांड्या अत्यंत सरस आणि सुकुमार आहेत. याप्रमाणे हत्तींच्या सोडा आणि केळीचे खांब या दोघांनाही तुझ्या मांड्यांनीं जिंकलेले आहे. तसेंच आई ! तूं विधिज्ञा आहेस आणि सर्व वेदार्थाला जाणणारी आहेस आणि वेदांत सा गितल्याप्रमाणें वागणारी आहेस. यद्यपि वेद हे तुझेच रूप आहे. "स्वाहा स्वधा मतिर्मेधा श्रुतिस्मृतिरनुत्तमा" याप्रमाणे ललितासहस्रनामांत श्रीत्रिपुरसुंदरी ही श्रुतिस्वरूप असल्याचे सांगितलेलें आहे. तथापि "यद्यदाचरति श्रेष्ठः" या न्यायाने लोकसंग्रहाकरितां तूं स्वतः देखील वेदांत सांगितलेल्या विधीप्रमाणें वागतेस. भगवाद शंकर यांना यद्यपि तुझ्यामुळेच मोठेपणा आलेला आहे. तथापि वेदविहित म्हणून पति या बुद्धीनें रोज तूं त्यांना गुडघे टेकवून नमस्कार करतेस. म्हणून तुला विधिज्ञा असे म्हटलेले आहे.

हे विधिज्ञे पार्वती ! तूं आपल्या सुंदर वर्तुलाकार गुडघ्यांनी अर्थात् गुडघे पृथ्वीवर टेकवून आपल्या पतिराजांना नमस्कार करतेस त्यामळे तुझे दोन्ही गुडघे कठीण झालेले आहेत. त्या दोन्ही गुडघ्यांनी आपल्या काठिन्याने देवांच्या हत्तीच्या दोन्ही गंडस्थलांनाही जिंकलेले आहे. अर्थात् तुझे दोन्ही गुडघे ऐरावताच्या गंडस्थलांप्रमाणे अत्यंत सुंदर वर्तुलाकार आणि कठीण म्हणजे सुदृढ आहेत. आई ! तुला नमस्कार असो.

हे यंत्र भूर्जपत्रावर लिहून पादुकांवर ठेवावे. चव्वेचाळीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. नारळ केळे आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. अनुष्ठानानंतर त्या पादुका धारण कराव्यात. याच्या योगानें साधक पाण्यावर चालू शकेल (पाण्यांत बुडण्याची भीति राहाणार नाहीं).

पराजेतुं रुद्रं द्विगुणशरगर्भौ गिरिसुते
निषङ्गौ जङ्घे ते विषमविशिखो बाढमकृत ।
यदग्रे दृश्यन्ते दश-शर-फलाः पादयुगली-
नखाग्रच्छद्मानः सुर-मकुट-शाणैक-निशिताः ॥ ८३॥

हे गिरिसुते पार्वतीमाते ! तुझ्या या दोन जंघा म्हणजे पिंढऱ्या इतक्या सुंदर आहेत कीं, जणुं कांहीं ते शंकरांचा पराभव करण्याकरितां कामदेवानें भातेच केलेले आहेत असें वाटतें "विषमविशिख" म्हणजे पंचबाण अर्थात् कामदेव. उन्मादन, तापन, शोषण, स्तंभन आणि संमोहन हे मदनाचे पांच बाण असल्यामुळें त्याला पंचबाण असें म्हणतात. पांच ही संख्या विषम असल्यामुळें आणि विशिख शब्दाचा अर्थ बाण असल्यामुळें "विषमविशिख" या शब्दाचा अर्थ पंचशर म्हणजे कामदेव असा आहे. या कामदेवानें श्रीत्रिपुरसुंदरीच्या पिंढऱ्यांना खरोखर निषंग म्हणजे भातेच बनविले आहेत असे वाटतें. कामदेवाचे बाण पांच आहेत, पण या भात्यांत ते दुप्पट म्हणजे दहा बाण ठेवलेले दिसत आहेत. कारण त्या भात्यांच्या अग्रभागी दहा बाणांची दहा पाती दोन्ही पायांच्या नखाग्रांच्या मिषाने स्पष्टच दिसून येत आहेत. फल म्हणजे बाणांचे पाते. आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या चरणी नमस्कार करण्याकरितां येणाऱ्या इंदादि देवांच्या मस्तकावरील मुकुट हेच कोणी " शाण" म्हणजे शस्त्र पाजळण्याचे पाषाण, त्या पाषाणांवर "निशिताः" म्हणजे धार लावून तीक्ष्ण केलेली ही दहा बाणांची पातीं तुझ्या पायांच्या दहा बोटांच्या दहा नखांच्या मिषाने स्पष्टच दिसत आहेतआचार्यांची कल्पना मोठी गमतीची दिसून येत आहे. तात्पर्य, आई ! तुझ्या पायांची ही निर्मल नखे आमचे कल्याण करोत.

सोन्याच्या पत्र्यावर पहिल्या श्लोकांतील यंत्राप्रमाणें यंत्र काढून त्यामध्यें एकाखाली एक ॐ सुं ॐ अशीं अक्षरे लिहावींत. जास्वंदीची फुलें वाहून बारा दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. गूळ, पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. याने शत्रुसैन्याचें स्तंभन होईल.

श्रुतीनां मूर्धानो दधति तव यौ शेखरतया
ममाप्येतौ मातः शिरसि दयया धेहि चरणौ ।
ययोः पाद्यं पाथः पशुपति-जटाजूट-तटिनी
ययोर्लाक्षा-लक्ष्मीररुणहरिचूडामणिरुचिः ॥ ८४॥

आई ! तुझ्या चरणकमलांचा महिमा मी काय वर्णन करूं ! वेदांची मस्तकें अर्थात् उपनिषदें - वेदान्तभाग तुझ्या चरणकमलांना शिरोभूषण म्हणून धारण करीत आहेत. तुझे चरणकमल म्हणजे मूर्तिमंत वेदान्तांचे सिद्धान्तच आहेत. "नमो देव्यै महालक्षम्यैः श्रियै सिद्ध्यै नमो नमः । ब्रह्मविष्णुमहेशानवेदकैः पूजिताङ्‍घ्र्ये ॥" देवी, महालक्ष्मी, श्री, सिद्धि ही सर्व देवीचीच रूपें आहेत. त्यांना माझा नमस्कार असो. ब्रह्मदेव, विष्णु आणि महेश्वर त्याचप्रमाणे "वेदक" म्हणजे वेदांचा मूर्धभाग असलेलीं उपनिषदें यांनी जिच्या चरणकमलाची पूजा केलेली आहे, आदरपूर्वक स्तवन केले आहे त्या त्रिपुरसुंदरीला माझा नमस्कार असो असें वसिष्ठसंहितेंत वर्णन केलेले आहे.

आई ! तुझे ते चरणकमल तूं माझ्या मस्तकावर कृपा करून धारण कर.

तुझ्या चरणकमलांचें प्रक्षालन केलेले हे जल, भगवान् शंकर यांच्या जटाजूटांतील साक्षात् गंगाच होय. तसेंच "लाक्षालक्ष्मी" म्हणजे तुझ्या तळपायाला लावलेल्या लाक्षारसाची कांति - अळित्याचा रक्तवर्ण - हा श्रीहरीच्या गळ्यांत असलेल्या कौस्तुभ रत्नाची किंवा मस्तकावरील मुकुटांत जडविलेल्या उत्तम रत्नाचीच शोभा धारण करीत आहे. किंबहुना तुझ्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करीत असतांना श्रीहरीच्या मकुटावरील रत्नाला तुझ्या पायाचा लाक्षारस लागल्यामुळेंच तो चुडामणि तांबडालाल दिसत आहे. आई ! खरोखर तुझ्या चरणकमलाचा महिमा मोठा अपूर्व आहे. ते तुझे चरणकमल माझ्या हृदयांत नेहमी विराजमान राहोत.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून एक वर्षभर त्याची समाराधना करावी. दुधाचा पायस, खिचडी आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जपकरावा. याप्रमाणें यंत्र सिद्ध करून धारण केलें असतां साधकाला परकायाप्रवेश करण्याचें सामर्थ्य प्राप्त होईल.

नमोवाकं ब्रूमो नयनरमणीयाय पदयो-
स्तवास्मै द्वन्द्वाय स्फुटरुचिरसालक्तकवते ।
असूयत्यत्यन्तं यदभिहननाय स्पृहयते
पशूनामीशानः प्रमदवनकङ्केलितरवे ॥ ८५॥

हे आई जगजननी ! नयनरम्य अशा तुझ्या या दोन्ही चरणकमलांना आम्ही नमस्कार करीत आहो. तुझ्या चरणकमलांना ओला लाक्षारस लावलेला असल्यामुळें ते अत्यंत सुंदर रक्तवर्ण दिसत आहेत. प्रमदवन म्हणजे राजस्त्रियांचे क्रीडोद्यान. त्या उद्यानांतील "कंकेलितरु" म्हणजे अशोकवृक्ष. तो आपल्याला नवपल्लवांचा व फुलाफळांचा बहर यावा म्हणून तुझ्या पायाच्या आघाताची स्पृहा करीत असतो. तरुण स्त्रीच्या पायाचा आघात झाला म्हणजे अशोकवृक्षाला पालवी फुटते व अकालींही फुलाफळांचा बहर येतो अशी प्रसिद्धि आहे. अशोकवृक्ष त्रिपुरसुंदरीच्या पायाचा आघात व्हावा अशी स्पृहा करीत असतांना पशूंचे, सर्व जीवांचे अधिपति असलेले अथवा वृषभवाहन भगवान् शंकर हे मात्र त्या अशोकावर अत्यंत असूया करतात, ईर्षा करतात. आई ! तुझ्या चरण कमलांचा महिमा अगाध आहे. मी तुझ्या चरणी नमस्कार करतो.

सोन्याच्या पत्र्यावर चतुष्कोण यंत्र काढून त्यांत रं रं अशा दोन दोन अक्षरांच्या एकाखाली एक अशा तीन ओळी लिहाव्यात. तांबडी फुलें वाहून बारा दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. दुधाचा पायस, गुळाचे पाणी आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. हे सिद्धयंत्र धारण केलें असतां भूतबाधा निवृत्त होते.

मृषा कृत्वा गोत्रस्खलनमथ वैलक्ष्यनमितं
ललाटे भर्तारं चरणकमले ताडयति ते ।
चिरादन्तःशल्यं दहनकृतमुन्मूलितवता
तुलाकोटिक्वाणैः किलिकिलितमीशानरिपुणा ॥ ८६॥

आई जगज्जननी ! तुझ्या चरणकमलाचा आघातही मोठा स्पृहणीय आहे. शंकर देखील त्याची मनामध्ये स्पृहा ठेवून कांहीं तरी निमित्ताने तुला खिजवितात. तूं रागावलीस म्हणजे त्यांना बरें वाटतें. एकदा भगवान् शंकर हे त्रिपुरसुंदरीचे गुण वर्णन करीत असतांना मध्येंच त्यांना प्रिय असलेल्या गंगेचे नांव ते उच्चारून गेले ! अशा अवस्थेला साहित्यशास्त्रांत गोत्रस्खलन असें म्हणतात. एखाद्या नायिकेविषयीं अनुराग प्रकट करीत असतांना तिच्या जवळ नकळत चुकून अंतःकरणांत असलेल्या दुसऱ्या नायिकेचे नांव घेतलें जाणें म्हणजेच गोत्रस्खलन होय असा साहित्यिकांचा संकेत आहे. शंकरांच्या हातून एकदा असें झालें, पण शंकरांना लागलीच त्याचा पश्चात्ताप झाला. आपण चुकलो असें त्यांना वाटलें व त्यांनीं आपलें डोके त्रिपुरसुंदरीच्या पायावर टेकविण्याकरितां नमविले. इतक्यांत - आचार्य म्हणतात, आई ! तुझ्या चरणकमलाचा त्यांच्या कपाळी अघात झाला. तो अघात होत असतांना तुझ्या चरणातील नूपुरांच्या घुंगरांचा जो आवाज झाला त्या आवाजाबरोबर कामदेवाला मोठा आनंद झाला. कारण त्याच्या मनांत फार दिवसांपासून एक शल्य डाचत होतें तें म्हणजे शंकरानी आपला दाह केलेला आहे. " बरें झालें, त्यांच्या कपाळी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीदेवीची चांगली लाथ बसली !" असें म्हणून तो आपल्या मनातील शल्याचे उन्मूलन करतो. आणि आपण विजयी झालो असें समजून तो विजयाचा द्योतक असा तुझ्या नूपुराच्या आवाजाच्या मिषाने जणुं कांहीं किल-किल ध्वनि करीत आहे असें वाटतें ! तात्पर्य, आई ! भगवान् शंकर यांनींही तुझा अनुनय करावा असा तुझा महिमा आहे ! !

सोन्याच्या पत्र्यावर आडवे चतुष्कोण यंत्र काढून त्यांत मधोमध एका- खाली एक यं यं यं अशी तीन अक्षरें लिहावींत. एकवीस दिवस पूजा करावी. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. दुधाचा पायस, नारळ, केळे आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. तें यंत्र धारण केलें असतां अथवा कलशोदक अभिमत्रून सिंचन केले असतां समस्त पिशाचबाधा निवृत्त होतील.

हिमानीहन्तव्यं हिमगिरिनिवासैकचतुरौ
निशायां निद्राणं निशि चरमभागे च विशदौ ।
वरं लक्ष्मीपात्रं श्रियमतिसृजन्तौ समयिनां
सरोजं त्वत्पादौ जननि जयतश्चित्रमिह किम् ॥ ८७॥

आई जगजननी ! तुझे चरणकमल नैसर्गिक कमलांपेक्षां अत्यंत श्रेष्ठ आहेत. कारण निसर्गातील कमल हें बर्फाच्या समूहांत नाश पावतें. त्याला बर्फ अथवा अधिक थंडी सहन होत नाहीं. तुझे चरणकमल मात्र बर्फाळ प्रदेशांत हिमालयांत निवास करण्यांमध्ये अत्यंत चतुर आहेत, समर्थ आहेत. हिमालयातच ते रहातात. निसर्गातील कमल हें रात्र झाली की मिटते. तुझे चरणकमल रात्रीं पहाटे आणि दिवसा देखील प्रसन्न असतात. प्रफुल्लित असतात. कमल हें लक्ष्मी ला अभीष्ट वाटत असतें. लक्ष्मी तेथे वास्तव्य करते. तुझे चरणकमल तर केवल लक्ष्मीचे अधिष्ठानच आहेत असें नसून ते " समयिनाम्' म्हणजे अंतःकरणपूर्वक मनाने तन्मय होऊन उपासना करणाऱ्यांना कल्पनातीत श्री म्हणजे लक्ष्मी अर्थात् अतिस्पृहणीय निजानंदरूपी ऐश्वर्यही समर्पण करतात. तें सामर्थ्य नैसर्गिक कमलांमध्यें नाहीं. अशा रीतीनें हे आई ! तुझे दोन्ही चरणकमल नैसर्गिक कमलाला पराभूत करीत आहेत. पण यांत आश्चर्य मानण्यासारखे काय आहे ? तुझ्या चरणकमलाचा महिमा अपूर्वच आहे. त्याची तुलना कोणाशी करतां येईल ? तुझ्या चरणकमलाची तुलना करण्यास या जगांत कोणीही योग्य नाहीं.

या श्लोकांत "समयिनां" हें पद मोठे मार्मिक आहे. शाक्त संप्रदायांत समयाचार आणि कालाचार असे दोन मार्ग आहेत. कौलाचारामध्ये बाह्यपूजेला प्राधान्य असतें तर समयाचारामध्यें अंतःपूजेला - मानसपूजेला प्राधान्य असतें. बाह्यपूजेपेक्षा मानसपूजा ही निर्विवाद श्रेष्ठ आहे. पण ही मानसपूजा कशी असावी ? अंबास्तवामध्यें या दृष्टी केलेले वर्णन लक्षांत घेण्यासारखे आहे. "आविर्भवत्पुलक- सन्ततिभिः शरीरैर्निस्यन्दमान-सलिलैर्नयनैश्च नित्यम् । वाग्भिश्च गद्‌गदपदाभिरुपासते ये पादौ तवाम्ब भुवनेषु त एव धन्याः ॥ " नित्य निरतिशय आनंदरूप असलेल्या श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या स्वरूपाचे आणि चरणारविंदांचें चिंतन करतां करतां सर्व शरीरावर आनंदाचे रोमांच उभे राहिले पाहिजेत. तिचे परिपूर्ण दयालुत्व, भक्तवात्सल्य, अद्‌भुत चरित्र आणि अलौकिक सामर्थ्य लक्षांत घेऊन नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले पाहिजेत. तिच्या गुणांचे शक्त्यनुसार वर्णन करीत असतांना कंठ सद्‌गदित झाला पाहिजे. आई ! तुझ्या चरणकमलाची अशा रीतीनें जे उपासना करतात तेच खरोखर त्रिभुवनामध्ये धन्य होत. अशा रीतीची मानसपूजा करणारे तेच प्रकृत श्लोकामध्ये आचार्यानी "समयिनां" या पदाने उल्लिखित केलेले आहेत.

स्मशानांतील भस्मावर अधोमुख त्रिकोण काढावा. तिन्ही टोकास त्रिशूलाचा आकार द्यावा. मध्यभागी सर्प सर्प ही अक्षरे लिहावीत. त्या अक्षरांच्या वरच्या बाजूस ह्रीं व खालच्या बाजूस म हें अक्षर लिहावे. दहा दिवस आराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा दुधाचा पायस, मध, केळे आणि नारळ यांचा नैवेद्य दाखवावा साधक सर्प पकडण्यांत व सर्पावर 'नियंत्रण ठेवण्यांत समर्थ होईल.

पदं ते कीर्तीनां प्रपदमपदं देवि विपदां
कथं नीतं सद्भिः कठिन-कमठी-कर्परतुलाम् ।
कथं वा बाहुभ्यामुपयमन-काले पुरभिदा
यदादाय न्यस्तं दृषदि दयमानेन मनसा ॥ ८८॥

हे आई जगजननीदेवी ! "ते प्रपदं" म्हणजे तुझ्या पायाचा अग्रभाग हा खरोखर "कीर्तीना पदं" म्हणजे कीर्तीचें अग्रस्थान आहे. तसेंच "विपदां अपदं" म्हणजे या संसारांत भोगाव्या लागणाऱ्या ज्या आधिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक विपत्ति, आपदा, संकटे, त्यांचें ते "अपदं" म्हणजे कधीही स्थान होऊं शकत नाही. जे या स्थानाचा आश्रय करतात ते सर्व संकटांतून मुक्त होतात.

आई ! तुझ्या या पायांच्या अग्रभागाला कवि लोकांनी कासवाच्या पाठीवरील कठीण कवचाची उपमा दिली आहे. कोठें ते कासवाच्या पाठीचे कठीण कवच आणि कोठे तुझ्या पायांचा अत्यंत कोमल असा हा अग्रभाग ? कशी या भल्या लोकांनी तुलना केली कोणास माहीत ? मला तर ती अत्यंत अनुचित वाटते.

त्याचप्रमाणे श्रीत्रिपुरारि भगवान् शंकर यांनी विवाहाच्या वेळीं लाजाहोमाच्या प्रसंगीं तुझें पाऊल आपल्या दोन्ही हातांनी उचलून "दृषदि न्यस्तम्" -दगडाच्या पाट्यावर ठेवले ! त्यांचे मन तर अत्यंत दयाळु होते. मग त्यांनीं हें निर्दयपणाचें कार्य कां केलें ? मला तर ते उचित वाटत नाही. "आतिष्ठेममश्मानमश्मेव त्वं स्थिरा भव" हा मंत्र म्हणत तुझें पाऊल आपल्या दोन्ही हातांनी उचलून पायावर ठेवण्यांत शंकरांचा हा अभिप्राय स्पष्टच दिसत आहे कीं, ज्याप्रमाणें हा दगड घन आहे, दृढ आहे, स्थिर आहे त्याचप्रमाणे तूं माझ्या संसारांत स्थिर रहा, दृढ रहा. मी विश्वकुटुंबी आहे. विश्वाच्या भरणपोषणाची जबाबदारी आतां तूंच पार पाडली पाहिजेस. आतां तुझ्या जिवावर मी संसारांत निश्चिंत राहीन. हाच अभिप्राय व्यक्त करण्याकरितां त्यांनीं तुझा हा अत्यंत सुकुमार पाय कठीण पाषाणावर ठेवला. विश्वाच्या भरणपोषणाची जबाबदारी पार पाडण्यास तूं समर्थ आहेस, हें पाहूनच त्यांनीं तुझ्यावर हें कार्य सोपविले आहे. यांत त्यांच्या अंतःकरणांतील विश्वाविषयींचा दयाभावच व्यक्त होत आहे. धन्य आहे आई तुझें चरणकमल. तें माझें कल्याण करो.

सोन्याच्या अथवा चांदीच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढावा. तिन्ही कोणास त्रिशूलाचे चिन्ह काढावे. मध्यभागी ह्रीं ह्रीं ही दोन अक्षरे पहिल्या ओळींत लिहावींत. दुसऱ्या ओळींत त्या दोन्ही अक्षरांच्या खालीं ह्रीं हें एक अक्षर लिहावे. पंधरा दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. गुळ, पायस, नारळ आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्याने साधक वाघ, सिंह हत्ती इत्यादि पशूंवर नियंत्रण ठेवण्यास समर्थ होतो.

नखैर्नाकस्त्रीणां करकमलसंकोचशशिभि-
स्तरूणां दिव्यानां हसत इव ते चण्डि चरणौ ।
फलानि स्वस्थेभ्यः किसलय-कराग्रेण ददतां
दरिद्रेभ्यो भद्रां श्रियमनिशमह्नाय ददतौ ॥ ८९॥

आई जगजननी ! चंद्र, मुंड, शुंभ, निशुंभ, महिषासुर इत्यादि लोककंटक दैत्यांचा युद्धांत वध करताना तूं भयंकर रूप धारण केलेस, रागावलीस, म्हणून तुला चंडी असें नांव पडलें ! तुझ्या चरणकलांचीं नखे चंद्राप्रमाणे आहाददायक आणि स्वच्छ आहेत. जणुं कांहीं चंद्रच आहेत ते. "नाकस्त्री" म्हणजे स्वर्गांतील स्त्रिया, देवांगना ज्या वेळेला तुझ्या चरणीं नमस्कार करतात त्या वेळेला तुझ्या नखचंद्रांच्या किरणांचा स्पर्श झाल्यामुळेंच कीं काय त्यांची करकमले मुकुलित होतात. कमलांना चंद्रकिरणांचा स्पर्श झाला कीं तीं मिटतात हा निसर्ग आहे. प्रकृतस्थलीं श्रीत्रिपुरसुंदरीच्या चरणी नमस्कार करतांना देवांगना हात जोडतात त्यांवर आचार्यानी केलेली ही उत्प्रेक्षा मोठी गमतीची आहे.

आई ! तुझे दोन्ही चरणकमल आपल्या निर्मल नखकांतीच्या मिषाने स्वर्गातील कल्पवृक्षांना जणुं कांहीं हसत आहेत असे वाटतें. हसण्याचे कारण असें कीं, कल्पवृक्ष हे नवपल्लवरूपी कराग्रानें फक्त स्वर्गातील देवांनाच अभीष्ट फळे देतात. आम्ही तर भूलोकांतील दरिद्री लोकांना देखील रात्रंदिवस सत्वर "भद्रा श्रियं" म्हणजे मंगलमय विपुल ऐश्वर्य समर्पण करीत असतो. कल्पवृक्षांमध्ये पक्षपात आहे, आमच्यामध्ये तो नाहीं. तात्पर्य, श्रीत्रिपुरसुंदरीच्या चरणकमलाची नखकांती ही अत्यंत निर्मल आहे आणि ती भक्तजनांचे मनोरथ पूर्ण करते. ती आमचेही मनोरथ पूर्ण करो.

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढून त्यांत मध्यभागी ह्रीं हें बीज लिहावे. तीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. गूळ, पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्यास सर्व रोगांचा निरास होतो.

ददाने दीनेभ्यः श्रियमनिशमाशानुसदृशी-
ममन्दं सौन्दर्यप्रकरमकरन्दं विकिरति ।
तवास्मिन् मन्दारस्तबकसुभगे यातु चरणे
निमज्जन्मज्जीवः करण-चरणः षट्चरणताम् ॥ ९०॥

"हे मातः ! दीनेभ्यः आशानुसदृशीं श्रियं अनिशं ददाने, अमन्दं सौन्दर्य- प्रकरमकरन्दं विकिरति, मन्दारस्तबकसुभगे, अस्मिन् तव चरणे करणचरणः मज्जीवः निमज्जन् षट्चरणतां यातु " आई जगज्जननी ! दीन जनांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वैभवाचे निरंतर दान करणारे तुझे चरणकमल भक्तजनांना "अमन्द" म्हणजे विपुल अशा सौंदर्यसमूहरूपी मकरंदाचे ते वितरण करीत असतात. आपल्या सौंदर्यसमूहाचें चोहोंकडे प्रक्षेपण करीत असलेले तुझे हे चरणकमल मोठे कल्पवृक्षाच्या पुष्पगुच्छाप्रमाणे अत्यंत सुभग म्हणजे सुंदर दिसत आहेत. मनासह पंच ज्ञानेंद्रिये - अर्थात् सहा इंद्रिये हेच ज्याचे चरण आहेत असा हा माझा जीवात्मा तुझ्या चरणकमलामध्ये नित्य निमग्न होऊन राहो. जसा कमळांमध्ये भ्रमर असावा तसा माझा जीव तुझ्या चरणकमळांतला भ्रमर व्हावा हीच माझी इच्छा आहे. आई ! माझे सकल मनोरथ पूर्ण कर.

सोन्याच्या पत्र्यावर दीर्घ चतुष्कोण काढून त्याच्यामध्ये पहिल्या ओळींत क्षां क्षां ही अक्षरे मोकळी लिहावींत. त्यांच्या खालीं दुसऱ्या ओळींत क्षीय क्षीय अशीं अक्षरे लिहावींत. तिसऱ्या ओळींत मध्यभागी ह्रीं हें अक्षर लिहावे. पंधरा दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. दूध, पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्याने सर्व क्षुद्रबाधा निवृत्त होतात.

पदन्यासक्रीडापरिचयमिवारब्धुमनसः
स्खलन्तस्ते खेलं भवनकलहंसा न जहति ।
अतस्तेषां शिक्षां सुभगमणिमञ्जीररणित-
च्छलादाचक्षाणं चरणकमलं चारुचरिते ॥ ९१॥

हे आई चारुचरिते ! तुझें चरित्र अत्यंत सुंदर आहे. वर्णनातीत आहे. तुझी चालण्याची पद्धति अशी आहे की, राजहंसांनीं देखील तिचा अभ्यास करावा. "पदन्यासक्रीडा" म्हणजे पावले कशी टाकावींत ? चालण्यांतील क्रीडा-विनोद कसा करावा ? याचा तुझ्या पावलांकडे पाहून अभ्यास करावा, अभ्यासाला आरंभ करावा असें तुझ्या भवनातील राजहंसांनीं मनांत आणले. ते त्याप्रमाणें अभ्यास करूं लागले. पण ते "स्खलन्तः" म्हणजे चुकू लागले. तरी पण ते तुझ्या चालण्याचा खेळ कांहीं सोडीनात. ही त्यांची चिकाटी पाहून त्यांना चालण्याचे शिक्षण देण्याकरितां तुझीं पावले, सुंदर रत्नखचित नूपुरांच्या - घुंगरांच्या आवाजाचें मिष करून धडा देत आहेत. ते आपल्या नूपुरांच्या मंजुळ आवाजाने जणुं कांहीं "कसें चालावे ?" या विषयाचा पाठ देत आहेत असें वाटतें. तात्पर्य, तुझें चालणें अत्यंत सुंदर आणि पैंजणांचा व वाळ्यांचा आवाजही अत्यंत मधुर आहे. तूं आमचे कल्याण कर.

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण आणि हा श्लोक लिहावा. त्रिकोणामध्यें पहिल्या ओळींत ॐ ह्रीं ही अक्षरें लिहावींत. दुसऱ्या ओळींत त्यांच्याच खालीं ह्रीं ह्रीं ही अक्षरे लिहावींत. पंचवीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. दूधाच्या पायसाचा नैवेद्य दाखवावा. हें सिद्धयंत्र धारण केल्यानें साधकास भूमिलाभ आणि धनलाभ होईल.

गतास्ते मञ्चत्वं द्रुहिणहरिरुद्रेश्वरभृतः
शिवः स्वच्छ-च्छाया-घटित-कपट-प्रच्छद-पटः ।
त्वदीयानां भासां प्रतिफलन-रागारुणतया
शरीरी शृङ्‌गारो रस इव दृशां दोग्धि कुतुकम् ॥ ९२॥

आई जगजननी ! ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि ईश्वरः महेश्वरतत्त्वामध्यें अंतर्भूत असलेल्या या चार देवता पृथ्वी, जल, तेज आणि वायु यांच्या त्या अधिष्ठात्री देवता आहेत. त्या सर्व देवतांनी तुझें दास्य पत्करलेले आहे. "भृत्" म्हणजे भृत्य अर्थात सेवक. तुझी सेवा करण्यासाठींच ते "मश्चत्वं गताः" आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणें रूप धारण करण्यास समर्थ असल्यामुळें त्यांनीं तुझ्या मंचाचें - पर्यंकाचे रूप धारण केलेले आहे. अर्थात् हे चारी देव तुझ्या पर्यंकाचे चार पाय बनलेले आहेत. शिव म्हणजे महेश्वरतत्त्व अर्थात् आकाशाची अधिष्ठात्री देवता भगवान सदाशिव हे स्वच्छ कांतीच्या मिषाने जणुं कांहीं त्या पर्यंकाचें आच्छादन - वस्त्र - चादर - बनलेले आहेत. आई ! तुझ्या पर्यंकावरील गादी आणि गादीवरील वस्त्र ही दोन्ही रूपे सदाशिवाने धारण केलेली आहेत. पर्यकावर शिवाभिन्नशक्तिरूपानें - शिवशक्तिरूपानें परिपूर्ण आनंदरूप अशी तूं विराजमान झालेली आहेस.

"ब्रह्मा विश्च रुदश्च ईश्वरश्च सदाशिवः ।
एते पश्च महाप्रेता भूताधिपतयो मताः ॥
चत्वारो मञ्चचरणाः पश्चमः प्रच्छदः पटः ।
साक्षी प्रकाशरूपेण शिवेनाभिन्नविग्रहः ॥
तत्रासने समासीना निर्भरानन्दरूपिणी । " असें रुद्रयामलामध्यें वर्णन केलेले आहे.

स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असलेल्या परम शिवस्वरूप आच्छादनामध्यें तुझा रक्तवर्ण प्रतिबिंबित झाल्यामुळे चोहींकडे अरुण कांति पसरलेली दिसत आहे. जणुं कांहीं मूर्तिमंत शृंगाररसच आविर्भूत झाला असून तो डोळ्यांना आनंद देत आहे. "कुतुकं दोग्धि" म्हणजे आनंदाचा आविष्कार करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर त्रिकोण काढून त्याच्या तिन्ही कोणास त्रिशूलाचा आकार दाखवावा. मध्यभागी पहिल्या ओळींत ॐ ह्रीं ही दोन अक्षरे लिहावींत त्यांच्या खालीं मध्यरेषेंत एकाखाली एक ह्रीं ह्रीं ही दोन अक्षरे लिहावींत. पंचवीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. खिचडी, दूध, पायस आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. हें सिद्धयंत्र धारण करावे याने राज्यलाभ होईल.

अराला केशेषु प्रकृतिसरला मन्दहसिते
शिरीषाभा चित्ते दृषदुपलशोभा कुचतटे ।
भृशं तन्वी मध्ये पृथुरुरसिजारोहविषये
जगत्त्रातुं शम्भोर्जयति करुणा काचिदरुणा ॥ ९३॥

आई जगजननी ! तूं शंकरांची अरुणवर्ण अशी अथवा अरुणा या नांवानें प्रसिद्ध अशी मूर्तिमंत करुणाच आहेस. आई ! तुझें मी काय वर्णन करूं ? तुझ्याजवळ कुटिलता जर कोठे असेल तर ती फक्त केसांच्या ठिकाणींच आहे. तुझे केश कुटिल आहेत. पण तूं मात्र "प्रकृतिसरला" स्वभावाने अत्यंत सरळ आहेस. हें तुझ्या मंदस्मितावरूनच प्रकट होत आहे. "केशेषु अराला मन्दहसिते प्रकृतिसरला" असा अन्वय समजावा. आई तूं चित्ताने अत्यंत कोमल आहेस. जणुं कांहीं शिरीष वृक्षाचे फूल. शिरसाचे फूल अत्यंत नाजुक असतें हें प्रसिद्धच आहे. "चित्ते" याऐवजी कोठे कोठे "गात्रे" असा पाठ आढळतो. तुझे सर्व अवयव शिरसाच्या फुलासारखे नाजुक आहेत असा त्याचा अर्थ करावा. साऱ्या विश्वाचें भरणपोषण करणाऱ्या स्तन्यानें भरलेले तुझे स्तन शिलाग्रंथीप्रमाणें घनस्वरूपांत शोभत आहेत. तूं देहाच्या मध्यभागीं अत्यंत तन्वी म्हणजे कृश दिसत आहेस, पण वक्षस्थल आणि नितंबप्रदेश मात्र पृथु म्हणजे स्थूल आणि विशाल दिसत आहेत. शरीरसौष्ठवाच्या दृष्टीने ही सर्व लक्षणें उत्तम समजली जातात. आई ! सर्व जगाचे संरक्षण करण्याकरितां नटलेली अरुणवर्ण अशी श्रीशंभुमहादेवांची तूं अनिर्वचनीय, मूर्तिमंत करुणाच आहेस. माझा तुला भक्तिभावानें नमस्कार असो. तुझा विजय असो.

पत्नीविषयक प्रेमाप्रमाणेंच ईश्वरविषयक नितान्त प्रेमालाही शृंगार असें म्हटलें जातें. शृंगाराचा स्थायीभाव आनंद आहे. आनंदाची पूर्णता ईश्वरसाक्षात्‌कारांत होऊं शकते. ईश्वराशी समरस होणें व नित्यनिरतिशय आनंदाचा अनुभव घेणे हेंच खऱ्या शुद्ध सात्त्विक शृंगाररसाचे फळ होय. आई ! तुझा स्वरूपमहिमा अपूर्व आहे. कृपा कर. तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार मला होऊं दे.

श्लोक ब्याण्णवमध्यें सांगितल्याप्रमाणें याही श्लोकातील यंत्राचे विधिविधान व साधन करावे. मधाचा नैवेद्य दाखवावा, या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. यंत्र धारण करावे. याने सकलाभीष्ट सिद्धि होईल.

कलङ्कः कस्तूरी रजनिकर-बिम्बं जलमयं
कलाभिः कर्पूरैर्मरकत-करण्डं निबिडितम् ।
अतस्त्वद्‌भोगेन प्रतिदिनमिदं रिक्तकुहरं
विधिर्भूयो भूयो निबिडयति नूनं तव कृते ॥ ९४॥

आई जगज्जननी ! हें आकाशांत दिसणार चंद्रबिंब हा जणुं कांहीं तुझा पाचूचा करंडा आहे. यांत तूं कस्तूरी, कापूर, गुलाबजल इत्यादि तुझ्या नित्य उपयोगांत आणल्या जाणाऱ्या सुवासिक वस्तु ठेवलेल्या आहेत. काळा डाग हा चंद्रावरचा कलंक नसून ती तुझी अंगाला, कपाळाला लावण्याची कस्तूरी आहे. त्याचप्रमाणें हें चंद्राचें बिंब, यांतील जो जलांश दिसत आहे तें जल म्हणजे तुझे गुलाबजल आहे. येथें जल शब्दाचाच अर्थ "पन्नीर" म्हणजे गुलाबजल, केवडाजल असा केलेला आहे. चंद्रामध्ये जो शुक्लवर्णाचा कलांचा भाग दिसत आहे तो कापूर आहे. अशा रीतीनें कापूर, कस्तुरी, गुलाबजल इत्यादि वस्तूंनी तुझा हा पाचूचा करंडक पूर्ण भरलेला आहे. यांच्यातील वस्तु रोज तूं उपयोगाला आणतेस, त्यामुळें त्या कमी कमी होतात. हाच चंद्राचा क्षय समजला जातो. हा " रिक्तकुहरं" म्हणजे रोजच्या रोज रिकामा होणारा करंडक ब्रह्मदेव तुझ्याकरिता पुन्हा पुन्हा भरून काढतो. यालाच लोक शुक्लपक्षांतील चंद्राच्या कलांची वृद्धि असें समजतात. आई ! तूं माझें कल्याण कर. या श्लोकांत उत्प्रेक्षा, अतिशयोक्ति, अपह्नव इत्यादि अनेक अलंकार आहेत.

याही श्लोकांतील यंत्राचे विधिविधान वरच्याप्रमाणेच समजावे. मुगदळाचा अथवा मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. यंत्र धारण करावे. याने इष्टार्थ सिद्धि प्राप्त होईल.

पुरारातेरन्तःपुरमसि ततस्त्वच्चरणयोः
सपर्यामर्यादा तरल-करणानामसुलभा ।
तथा ह्येते नीताः शतमख-मुखाः सिद्धिमतुलां
तव द्वारोपान्तस्थितिभिरणिमाद्याभिरमराः ॥ ९५॥

हे आई जगज्जननी ! तूं "पुराराति" म्हणजे त्रिपुरासुराचा वध करणारे भगवान् शंकर यांची "अन्तःपुरं" म्हणजे पट्टमहिषी आहेस. त्यांची तूं महाराणी आहेस. म्हणूनच तुझ्या चरणकमलाच्या पूजेची मर्यादा - पूजेचा प्रकार - "तरलकरणानां" ज्यांची इंद्रिये चंचल आहेत अशा इंदादि देवांनाही "असुलभा" म्हणजे अवघड आहे. "तथाहि" म्हणजे ही गोष्ट प्रसिद्धच आहे. शतमख म्हणजे इंद्र ज्यांच्यामध्ये प्रमुख आहे असे मोठे मोठे अधिकारी देव हे तुझ्या मंदिराच्या - श्रीचक्राच्या बाहेरच्या दाराजवळ उम्या असलेल्या अणिमा, महिमा इत्यादि दहा प्रकारच्या सिद्धि, त्यांच्याकडूनच कृतार्थ केले जातात. तुझ्या दारावरील द्वारपाल असलेल्या सिद्धीच त्यांना अपरिमित सिद्धि अर्पण करून कृतार्थ करतात. तात्पर्य, तुझ्या द्वारपालांचा जर एवढा महिमा आहे तर मग तुझा किती असणार १ आई ! धन्य आहेस तूं. तूं मला कृतार्थ कर.

सोन्याच्या पत्र्यावर साधा अधोमुख त्रिकोण काढून त्यांत एकाखाली एक ॐ ह्रीं ही अक्षरे लिहावींत. शुद्ध तिळाच्या तेलांत हें यंत्र ठेवून तीन दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एकशेंआठ वेळां जप करावा. तिळाची खिचडी आणि गूळ यांचा नैवेद्य दाखववा. तें तेल व्रणाला लावावे. व्रण लौकर भरून येईल.

कलत्रं वैधात्रं कतिकति भजन्ते न कवयः
श्रियो देव्याः को वा न भवति पतिः कैरपि धनैः ।
महादेवं हित्वा तव सति सतीनामचरमे
कुचाभ्यामासङ्‌गः कुरवकतरोरप्यसुलभः ॥ ९६॥

हे आई जगजननी ! ब्रह्मदेवाचे "कलत्र" म्हणजे पत्नी. पत्नी ही आपल्या पतीचे कश्मलापासून - पापापासून, नरकापासून - संरक्षण करते म्हणून तिला कलत्र असे म्हणतात. "कश्मलात् त्रायते इति कलत्रं" अशी कलत्र शब्दाची व्युत्यत्ति आहे. ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वतीदेवी, तिची भक्ति कोण कोण कवि म्हणजे विद्वान लोक करीत नाहीत ? सर्वच विद्वान लोक सरस्वतीची भक्ति करतात. तिच्या कृपेने ते वाक्पति - बृहस्पति बनतात. ते सरस्वतीवल्लभ समजले जातात व मंत्र, जप, पुरश्चरण, पूजापाठ, होमहवन करून पुष्कळ लोकश्रीदेवीची-लक्ष्मीची आराधना करतात आणि तिच्या कृपेने कोणत्याही प्रकारचे धन मिळवून ते धनपति बनतात. लक्ष्मीपति म्हणाले जातात. कोण बरें अशा प्रकारें लक्ष्मीपति बनत नाहींत ? सर्वच बनतात. पण हे सतीमाते त्रिपुरसुंदरी ! तूं मात्र "सतीनां" म्हणजे पतिव्रता स्त्रियांमध्ये "अचरमा" म्हणजे अत्यंत श्रेष्ठ आहेस. तुझ्यापेक्षा पातिव्रत्यांत दुसरे कोणीच श्रेष्ठ नाहीं. म्हणूनच तुझ्या वक्षस्थलाचा स्पर्श देवाधिदेव श्रीमहादेव यांना सोडून दुसऱ्या कोणालाच होत नाहीं. तो कुरबक वृक्षाला सुद्धा सुलभ नाहीं. कुरबक म्हणजे सोनेरी अथवा तांबडी कोर्‍हांटी. कोऱ्हांटीच्या झाडाचा असा स्वभाव आहे कीं, त्याला तरुण स्त्रियांनीं आलिंगन दिलें कीं फुलांचा बहर येतो. फुलाफळांची समृद्धि होण्याकरिता वृक्षांना किंवा गर्भाची अभिवृद्धि होण्याकरितां स्त्रियांना जे विशिष्ट उपचार केले जातात त्यांना "दोहद" असे म्हणतात. अशोक वृक्षाला तरुण स्त्रीनें पादाघात करणें किंवा कोर्‍हांटीच्या झाडाला आलिंगन देणें हे त्या वृक्षांचे दोहद-संस्कारच होत.

आई त्रिपुरसुंदरी ! तुझा स्पर्श पुरुषवाचक नामानी युक्त असलेल्या अशोक, कुरबक इत्यादि वृक्षांनाही दुर्लभ आहे, मग इतर पुरुषांना तो कसा सुलभ असेल ? तात्पर्य, लोक उपासनाबलानें वाक्पति, लक्ष्मीपति बनतात पण पार्वतीपति बनण्याचे भाग्य मात्र महादेवालाच लाभले आहे. हे सती ! तुझे पातिव्रत्य असाधारण आहे. धन्य आहेस तूं. तूं माझें कल्याण कर.

पांढऱ्या रुईच्या ( मांदाराच्या) चिकाने भूर्जपत्रावर अधोमुख त्रिकोण काढावा. त्यामध्ये एकाखाली एक क्लीं क्लीं क्लीं अशी तीन अक्षरें लिहावींत. आठ दिवस पूजा करावी. मध आणि दुधाचा पायस यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार वेळ जप करावा. हें यंत्र धारण केल्याने साधक विद्यासंपन्न होईल.

गिरामाहुर्देवीं द्रुहिणगृहिणीमागमविदो
हरेः पत्नीं पद्मां हरसहचरीमद्रितनयाम् ।
तुरीया कापि त्वं दुरधिगमनिःसीममहिमा
महामाया विश्वं भ्रमयसि परब्रह्ममहिषि ॥ ९७॥

महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली ही तत्त्वतः श्रीमहात्रिपुरसुंदरीचीच रूपें आहेत. महात्रिपुरसुंदरीच या रूपांनी नटलेली आहे. ती स्वतः या तिन्ही रूपांच्या पलीकडे अनिर्वचनीय सच्चिदानंदरूपानें विराजमान आहे. तिलाच महाशक्ति महामाया असें म्हणतात. या अभिप्रायाने आचार्य वर्णन करीत आहेत.

हे आई जगजननी ! तूं परब्रह्ममहिषी आहेस. परब्रह्म म्हणजे परात्पर सदाशिवतत्त्व भगवान् शंकर यांची तूं महिषी म्हणजे पट्टराणी आहेस. आगमवेत्ते अर्थात् वेदरहस्य जाणणारे लोक तुलाच ब्रह्मदेवाची गृहिणी, वाणीची अधिष्ठात्री देवता महासरस्वती असें म्हणतात. श्रीविष्णूची पत्नी पद्या महालक्ष्मी असेही तुलाच म्हणतात. आणि रुद्राची सहचारिणी अद्रितनया पार्वती असेंही पण तुला म्हणतात. पण तूं या तिन्ही देवतांच्या पलीकडे असलेली तुरीया म्हणजे चौथी "काऽपि" म्हणजे अनिर्वचनीय आहेस. तुझा महिमा निःसीम आहे. त्याला अंत नाही आणि पारही नाहीं. तो "दुरधिगम" म्हणजे आकलन करण्यास कठीण आहे. तुला महाशक्ति महामाया असें म्हणतात. तूं आपल्या सामर्थ्यानें सर्व विश्वाचे संचलन करीत आहेस.

"ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ" असें पुरुषसूक्तामध्ये परम पुरुषाचे परमब्रह्माचें वर्णन केलेले आहे. ह्री म्हणजे भुवनेची आणि लक्ष्मी म्हणजे श्रीविद्या या दोन्ही हे पुरुषोत्तमा ! परात्पर परब्रह्मरूपा परमेश्वरा ! तुझ्या पत्नी आहेत. यामध्यें श्रीविद्येला प्राधान्य आहे. तंत्रशास्त्रांत श्रीभुवनेश्वरी देवीचा श्रीविद्येमध्येंच अंतर्भाव केलेला आहे. म्हणून श्रीविद्या ही सर्वश्रेष्ठ आहे. आई त्रिपुरसुंदरी ! तीच तूं आहेस. तूं माझ्यावर कृपा कर.

श्लोक ९७, ९८ आणि ९९ या तिन्ही यंत्रांची आकृति एकच आहे. अधोमुख त्रिशूलयुक्त त्रिकोण आणि मध्यभागी ह्रीं हें अक्षर. शंभराव्या श्लोकाचेंही यंत्र असेंच आहे. त्यांत ॐ ह्रीं हीं अक्षरे लिहावींत. यंत्र सोन्याच्या अथवा तांब्याच्या पत्र्यावर लिहावे. सोळा दिवस पूजा. एक हजार वेळां जप. पायसाचा आणि मधाचा नैवेद्य. ९७ व्या लोकानें साधकाचा देह दृढ होईल. ९८ व्या श्लोकाने स्त्रियांना गर्भधारणा व पुरुषांना वीर्यवृद्धि. ९९ व्या श्वोकानें शौर्य, पराक्रम आणि १०० व्या श्लोकानें सकल कार्यसिद्धि होईल.

कदा काले मातः कथय कलितालक्तकरसं
पिबेयं विद्यार्थी तव चरणनिर्णेजनजलम् ।
प्रकृत्या मूकानामपि च कविताकारणतया
कदा धत्ते वाणी-मुखकमल-ताम्बूलरसताम् ॥ ९८॥

आई जगजननी ! तुझ्या चरणकमलांचें तीर्थ मला सेवन करण्याचें भाग्य केव्हां लाभेल ? अशा आशयाने आचार्य प्रार्थना करीत आहेत. आई ! मी विद्यार्थी आहे. तुझें चरणोदक प्राशन केल्याशिवाय मला पूर्ण विद्या कशी प्राप्त होणार ? पूर्ण विद्या प्राप्त होण्यासाठी मला तुझें चरणोदक केव्हां मिळेल ! ज्याला "अलक्तकरस" म्हणजे अळिता अर्थात लाक्षारस लावलेला आहे अशा तुझ्या चरणकमलांचें प्रक्षालन करून तें तीर्थ मी या जन्मांत कोणत्या काळीं प्राशन करूं शकेन ? सांग. तुझें चरणोदक स्वभावतः मूक असलेल्या अर्थात् जन्मापासून ज्यांना बोलतां येत नाहीं अशा जन्मजात मुक्या लोकांनाही कविता करण्याचें सामर्थ्य प्राप्त करून देणारे आहे. मुक्यांना, बहिऱ्यांना व न शिकलेल्या लोकांनाही तें कवित्वशक्ति किंवा विद्वत्ता प्राप्त करून देणारे आहे. तें माझ्या मुखामध्यें सरस्वतीदेवीच्या मुखकमळलांतील तांबूलरसाचें रूप केव्हा बरें धारण करील ? तात्पर्य, हे माते ! तुझ्या चरणकमलाचें तीर्थ लाक्षारसामुळें सरस्वतीदेवीच्या मुखकमलांतील तांबूलरसाप्रमाणें रक्तवर्ण आहे व तें प्राशन करणारा प्रत्यक्ष सरस्वतीरूपच होतो, असा तुझ्या चरणकमलाचा प्रभाव आहे.

सरस्वत्या लक्ष्म्या विधिहरिसपत्नो विहरते
रतेः पातिव्रत्यं शिथिलयति रम्येण वपुषा ।
चिरं जीवन्नेव क्षपित-पशु-पाश-व्यतिकरः
परानन्दाभिख्यं रसयति रसं त्वद्भजनवान् ॥ ९९॥

आई जगजननी ! " त्वद्‌भजनवान् परानन्दाभिरख्यं रसं रसयति" अनन्यचिताने भक्ति करणारा तुझा भक्त परानंदसंज्ञक रसाचा अर्थात नित्य निरतिशय अशा आनंदाचा आस्वाद घेत असतो. तुझ्या उपासनेमुळें त्याला सरस्वतीचा आणि लक्ष्मीचाही लाभ झालेला असतो. तो सरस्वतीचा प्रिय बनल्यामुळें ब्रह्मदेव त्याचा मत्सर करतात. तो लक्ष्मीपति बनल्यामुळे विष्णूही त्याचा मत्सर करतात. याप्रमाणे तो "विधिहरिसपत्न" बनतो. विधि म्हणजे ब्रह्मदेव आणि हरि म्हणजे विष्णू हे दोघेही त्याच्याकडे शत्रुबुद्धीनें पहातात. तो मात्र "सरस्वत्या लक्ष्या च सह विहरते" म्हणजे सरस्वतीसह आणि लक्ष्मीसह आनंदाने विहरत असतो. तात्पर्य तुझी उपासना करणारा सरस्वतीच्या प्राप्तीने विद्वान् होऊन समाजांत लौकिक मिळवतो आणि लक्ष्मीच्या प्राप्तीने श्रीमान् म्हणून मोठ्या डौलाने मिरवत असतो. तसेंच तुझ्या उपासनेमुळें त्याला उत्कृष्ट शरीरसौष्ठवाचा लाभ होतो तो मदनासारखा सुंदर बनतो. त्याच्या देहाची कांति रतीच्या अंतःकरणांत मदनाची भ्रांति निर्माण करते. तो आपल्या रम्य शरीराने कामदेवाची पत्नी जी रति तिच्या पातिव्रत्यधर्मालाही शिथिल करून टाकतो. तात्पर्य, रतीलाही स्पृहणीय वाटावें इतकें त्याचें शरीर तेजस्वी आणि सुंदर बनते. असें हें श्रीविद्येच्या उपासनेचें इहलोकी अलौकिक फळ मिळतें.

आई श्रीविद्ये, तुझ्या उपासनेनें प्राप्त होणाऱ्या पारमार्थिक फलाचें मी काय वर्णन करूं ? तें अवर्णनीय आहे. सामयिक संप्रदायाप्रमाणे अनन्यचितानें श्रीविद्येची उपासना करणारा हा कपिल मुनि, मार्कंडेय मुनि यांच्याप्रमाणे "चीरंजीवन्" म्हणजे चिरंजीव बनतो. "क्षपित-पशुपाश-व्यतिकरः" पशु म्हणजे जीव. "इन्द्रियैः प्रपञ्चं पश्यति इति पशुः" अशी पशु शब्दाची व्युत्पत्ति आहे. चक्षुरादि इंद्रियांच्या द्वारा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांचा प्रपंच तो नेहमी पहात असतो, अनुभवित असतो म्हणून त्याला पशु असें म्हणतात. पाश म्हणजे अविद्या. अविद्येमुळेंच जीव संसारात बांधला जातो म्हणन अविद्येला पाश असें म्हणतात. पशु आणि पाश अर्थात जीवभाव आणि अज्ञान याचा "व्यतिकर" म्हणजे संबंध हा त्याचा पूर्णपणे "क्षपित" म्हणजे नाहींसा झालेला असतो. जीवभाव आणि अज्ञान मावळल्यामुळें तुझा भक्त जीवन्मुक्त होऊन चिरकाल निजानंदाचा आस्वाद घेत रहातो. आई ! असा हा तुझ्या उपासनेचा प्रभाव आहे. तूं मलाही संसारपाशांतून मुक्त कर. मी तुझ्या चरणी नमस्कार करतो.

अविद्येच्या पाशातून मुक्त व्हावें म्हणून वेदांतही श्रीविद्येची आणि श्रीशंकरांची प्रार्थना केलेली आहे. "अदितिः पाश प्रमुमोक्त्वेतन्नमः पशुभ्यः पशुपतये करोमि" (तैत्तिरीय ब्राह्मण) अदिति म्हणजे आदित्यमंडलातर्गत बिंदुस्थानापन्न श्रीविद्या महाशक्ति. ती मला संसारपाशांतून मुक्त करो. मी तिला नमस्कार करतो. पशुपति म्हणजे भगवान् सदाशिव, त्यांनाही मी पशुत्वनिवृत्तीकरितां अर्थात् जीवभावाचा निरास होण्याकरितां हा नमस्कार करीत आहे. पोट दुखण्याचे औषध याचा अर्थ पोट दुखणे थांबण्याचे औषध असा करतात त्याचप्रमाणे "पशुभ्यः" याचा अर्थ पशुत्वनिवृत्तीकरितां असा समजावा. पशुपाशनिवृत्तीनंतर श्रीविद्येचा उपासक हा चिरकाल जिवंत राहून आनंदाचा अनुभव घेत असतो. ही त्याची जिवन्मुक्तावस्था होय. शरीराचा नाश होणें हें कालक्रमानें प्राप्त असतांनाही कपिल मुनि, मार्कंडेय मुनि इत्यादि तत्त्ववेत्ते, भगवद्‌भक्त व योगी यांचीं शरीरे नित्यत्वाच्या कोटींत प्रविष्ट झालेलीं असतात. याचें कारण त्यांचें प्रारब्धकर्म, योगसामर्थ्य अथवा भगवत्कृपा हेंच होय. प्रारब्धकर्म भोगून क्षीण झाल्यानंतर तत्त्ववेत्त्यांचा देह पडतो. योगबलानें निर्माण केलेल्या अथवा धारण केलेल्या शरीरानें अपेक्षित सुखें भोगून झाल्यानंतर अथवा विरक्त झाल्यानंतर आत्मसाक्षात्कारी असलेल्या योग्याचा देह पडतो. भगवत्कृपेनें प्राप्त झालेलें चिरंजीवित्व शेवटी भगवंताच्या इच्छेनेंच परिसमाप्त होतें व भगवद्‌भक्ताचा देह सुटतो. अशी ही जीवन्मुक्तांच्या नित्य जीवनाची व्यवस्था आहे.

आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर तत्त्ववेत्त्यांची पाठीमागची अनंतजन्मींचीं पापपुण्ये जळून भस्म होतात. पण प्रारब्धकर्म मात्र बलवत्तर असल्यामुळे तें भोगावेच लागतें. प्रारब्धकर्म भोगल्याशिवाय क्षीण होत नाहीं. प्रारब्धकर्म भोगून पूर्ण झाल्यानंतरच तत्त्ववेत्त्याचें जीवनकार्य परिसमाप्त होत असतें. याच प्रारब्धकर्माला शास्त्रामध्ये "संस्कार" असें म्हटले आहे. कार्य संपलेलें असलें तरी तत्त्ववेत्त्यांच्या शरीराचा व्यवहार, प्राक्तन संस्कारबलानें दीर्घकाल चालू असतात.

"सम्यग्ज्ञानाधिगमाद्धर्मादीनामकारणप्राप्तौ ।
तिष्ठति संस्कारवशातच्चक्रभ्रमवद्धृतशरीरः ॥ " ( षष्टितंत्र).

पुण्य आणि पाप यांची फलें सुखदुःखांच्या रूपाने भोगाणें हें जीवनाचे कार्य आहे. पुण्य आणि पाप ही धर्माधर्ममूलक असतात. सुखदुःखांच्या रूपानें मनुष्य पुण्यपाप भोगीत असतांना त्याच शरीरांत तो पुन्हा धर्म आणि अधर्म यांचें आचरण करीत असतोच. अशा रीतीनें धर्म आणि अधर्म, पुण्य आणि पाप व सुख आणि दुःख व तीं भोगण्याकरितां शरीर यांचें चक्र हे अखंड चालू असतें. त्याची परिसमाप्तीही आत्मसाक्षात्कारानेच होऊं शकतें. आत्मसाक्षात्कार उपासनाबलानें प्राप्त होणाऱ्या ईश्वरकृपेवर अवलंबून आहे. " ईश्वरेच्छा बलीयसी " ईश्वराच्या इच्छेनेंही भक्तांचा जीवन-व्यवहार हा चिरकाल राहूं शकतो. कुंभाराच्या चाकावरील शेवटचे मडके काढून घेतलें तरी कांही वेळ चाक फिरतच असतें. विजेचा पंखा बंद करण्याकरितां स्विच बंद केलें तरी पंखा कांहीं काळ फिरतच असतो. असा संस्कारांचा प्रभाव आहे. ईश्वरेच्छा तर त्याहिपेक्षां अधिक प्रभावी आहे. ईश्वरेच्छेचें आनुकूल्य संपादन करण्याकरितां ईश्वरोपासना करणें आवश्यक आहे. प्रकृतस्थलीं श्रीललितामहात्रिपुरसुंदरी हीच "सर्वेश्वरी सर्वमयी" असल्यामुळें ईश्वरभावनेनें तिचीच उपासना करणें विवक्षित आहे. कारण ती सर्वज्ञ आहे, सर्व शक्तींनी संपन्न आहे, सर्वांचें मंगल करणारी आहे, उत्तम गति देणारी आहे. सर्व अपराधांची क्षमा करणारी आहे. तिच्यापेक्षा या विश्वांत श्रेष्ठ तर कोणी नाहींच; पण तिच्याशी साम्य दाखवितां येईल असेंही कोणी नाही. ती अत्यंत दयाळु आहे. "सर्वज्ञा सान्द्रकरुणा समानाधिकवर्जिता । सर्वशक्तिमयी सर्वमङ्‌गला सद्‌गतिप्रदा ॥ सर्वेश्वरी सर्वमयी " इत्यादि नामांनी ललितासहसनामांत तिच्या स्वभावाचें व स्वरूपाचे वर्णन केले आहे. "संसारपङ्‌कनिर्मग्नसमुद्धरणपण्डिता॥ ! " " जन्म-मृत्यु-जरा-तप्त-जन-विश्रान्ति-दायिनि ॥ । " संसारपंकामध्यें रुतलेल्या भक्तजनांचा उद्धार करण्यांत ती मोठी कुशल आहे. जन्म, मृत्यु, वार्धक्य इत्यादि दुर्धर दुःखांच्या तापांनीं तप्त झालेल्या जनतेच्या चित्ताला विश्रांति देणारी तीच एक या जगांत आहे. असे तिचे स्वरूप आहे. मग तिला सोडून दुसऱ्या कोणाला शरण जाणार ?

श्रीमहात्रिपुरसुंदरीची उपासना कशी करावी ? याचा आपण आतां थोडक्यांत विचार करूं. पहाटेच उठावे. शुचिर्भूतपणें पवित्र आसनावर विराजमान व्हावें. शांत चित्तानें उपास्यदेवता श्री विद्या-त्रिपुरसुंदरी हिच्या स्वरूपाचे चिंतन करावे. श्रीविद्यास्वरूप श्रीत्रिपुरसुंदरी ही विश्वरूपाने नटलेली असून सर्व विश्वाची माताही पण तीच आहे. याच दृष्टीनें तिला "आब्रह्मकटिजननीं", "विश्वरूपा", "परात्परा" "अनन्तकोटिब्रह्माण्डजननी दिव्यविग्रहा" अशी नांवे दिलेली आहेत. हें तिचें स्वरूप लक्षांत घ्यावें. सौंदर्यलहरीतील पहिल्या एकेचाळीस श्लोकांनी वर्णन केलेलें तिचे तात्त्विक स्वरूप लक्षांत घ्यावे. पुढच्या श्लोकांनी वर्णिलेलें तिचे सगुण स्वरूपही लक्षांत घ्यावे. तिच्या तात्त्विक स्वरूपाचे व सगुण स्वरूपाचे मनाने चिंतन करावे. श्रीचक्र हें तिचें मंदिर आहे व ती स्वतः ही श्रीचक्रस्वरूप आहे. श्रीचक्राचे स्वरूप मागें वर्णिलेलेच आहे. तें आपल्या मनचक्षूपुढे ठेवावे. चतुर्दशमभुवनात्मक ब्रह्माण्ड हें श्रीचक्रस्वरूप आहे अशी भावना करावी. अनाद्यनन्तकाल हाही श्रीचक्रस्वरूपच आहे आणि आपला देह हाही पण श्रीचक्रस्वरूपच आहे. हें सर्व सूक्ष्म तत्त्व सूक्ष्म विचारांनी व गुरुकृपेनें लक्षांत घ्यावे. आपल्या देहांतील षटचक्रें व सहस्रदलकमळ हें श्रीचक्रस्वरूपच आहे. तीं सर्व चक्रें श्रीविद्येची अधिष्ठानें आहेत. तेथें श्रीविद्याही सांगोपांग विराजमान झालेली आहे. तेथें तिची उपासना केली असतां उपासकाला पंचविध मुक्तींचा लाभ होतो. शरीरांतील षटचक्रांपैकी मुलाधारचक्र आणि स्वाधिष्ठानचक्र ही दोन्ही चक्रें अंधतामिस्रस्वरूप असल्यामुळें उपासनेला अयोग्य मानलेली आहेत. मणिपूरचक्र, अनाहतचक्र, विशुद्धिचक्र, अज्ञाचक्र आणि सहस्रदलकमल हीं पांच चक्रे श्रीत्रिपुरसुंदरीचीं पूजास्थानें मानलेली आहेत. नामभिस्थानी असलेल्या मणिपूरचक्रांत तिची पूजा-समाराधना केली असतां साधकाला सार्ष्टिमुक्तीचा लाभ होतो. उपास्यदेवतेशीं समान असलेल्या ऐश्वर्याचा लाभ होणें याला "सार्ष्टि" असे म्हणतात. उपास्यदेवतेच्या नगराजवळ दुसरें नगर निर्माण करून तो तें ऐश्वर्य भोगीत असतो. हृदयस्थानी असलेल्या संवित्कमलामध्यें श्रीविद्येचे ध्यान केलें असतां सालोक्यमुक्ति मिळते. सालोक्यमुक्तीमध्यें श्रीत्रिपुरसुंदरीच्याच नगरामध्ये वास्तव्य करण्याचें भाग्य लाभते. कंठस्थानीं असलेल्या विशुद्धिचक्रांत तिचे ध्यान केले असतां साधकाला सामीप्यमुक्ति प्राप्त होते. सामीप्यमुक्तीमध्ये साक्षात् इष्टदेवतेच्या अंगस्पर्शाचा आनंद मिळतो. पादसंवाहन, हस्तसंवाहन इत्यादि स्वरूपाच्या सेवेचें भाग्य लाभते. आज्ञाचक्रामध्ये उपासना केली असतांना सारूप्यमुक्ति मिळते. उपास्यदेवतेच्या रूपासारखें रूप उपासकालाही प्राप्त होतें. हा उपासकाचा मोठाच उत्कर्ष होय. सायुज्यमुक्तीमध्यें उपास्यदेवतेशी पूर्ण तादात्म्य असतें तर सारूप्यमुक्तीमध्यें उपास्यदेवतेच्या देहासारखा देह लाभत असतो हा फरक आहे. या चारी अवस्थांना मुक्ति म्हटलें जात असलें तरी हें खरें मुक्तीचे स्वरूप नव्हे. बाह्य दुःखांतून बऱ्याच अधिक प्रमाणांत साधकाची सुटका होत असल्यामुळें त्यांना मुक्ति म्हटलें जातें. त्या ठिकाणी मुक्ति शब्द हा औपचारिक आहे. कांही झालें तरी सारूप्यामध्यें द्वैतभाव आहेच. "भयं वै द्वितीयाद्‍भवति " या न्यायाने सारूप्यमुक्तीमध्ये संपूर्ण भयाची निवृत्ति होत नसते. त्यामुळे निरतिशय आनंदाचा साक्षात्कार होत नाहीं. तो सायुज्यमुक्तीमध्ये होतो. तीच खरी मुक्ति होय. सहस्रदलकमलामध्यें श्रीविद्येची उपासना केली असतां सायुज्यमुक्तीचा लाभ होतो. याच अभिप्रायाने आचार्यांनी श्लोकाच्या चौथ्या चरणांत " परानन्दाभिख्यं रसयति रसं त्वद्‍भजनवान्" असें मुक्त झालेल्या भक्ताचें वर्णन केले आहे.

आतां आपल्या देहातील मुलाधारादि चक्रांचे श्रीचक्राशी तादात्म्य कसें आहे तें आपण पाहूं. श्रीचक्रामध्यें शिवचक्रें आणि शक्तिचक्रें ही अन्योन्य संलग्न असल्यामुळें श्रीचक्र हें शिवशक्तितादात्म्यस्वरूप मानले जातें. या तादात्म्यालाच नाद आणि बिंदु यांचें तादात्म्य असें म्हणतात. शिव हा नादस्वरूप आहे तर शक्ति ही बिंदुस्वरूप आहे. "बिन्दुर्नाम जगदुत्पत्तिलयहेतुः शिवस्य शक्तिविशेषः " असें श्रीलक्ष्मीधरांनीं म्हटलेलें आहे. या नादबिंदूंचे ऐक्य हेंच श्रीचक्राचे स्वरूप आहे. श्रीचक्रामध्ये असलेल्या ( १) त्रिकोण, ( २) अष्टकोण, ( ३) अंतर्दशारचक्र, ( ४) बहिर्दशारचक्र, ( ५) चतुर्दशारचक्र आणि ( ६) अष्टदल, षोडशदलादिरूप शिवचक्र यांचे आपल्या देहातील ( १) मूलाधार, ( २) स्वाधिष्ठान, (३) मणिपूर, ( ४) अनाहत, ( ५) विशुद्धि आणि ( ६) आज्ञाचक्र. यांच्याशी क्रमशः तादाम्य समजावे. याप्रमाणे नाद म्हणजे श्रीचक्र आणि बिंदु म्हणजे शरीरातील षटचक्रांचा समूह. अशा रीतीनें नादबिंदूंचे ऐक्य आपल्या शरीरांत असल्याचें लक्षांत घ्यावे. मुलाधारचक्र हें चतुर्दलात्मक आहे. त्याची कर्णिका म्हणजे मधला कोश हा त्रिकोणात्मक आहे. तोच श्रीचकांतील मुख्य त्रिकोण समजावा. स्वाधिष्ठानचक्र हें सहा दलांचे आहे. त्याची कर्णिका हे श्रीचक्रांतील अष्टकोणचक्र समजावे. याच्याच पोटांत मुख्य त्रिकोण आहे. नाभिस्थानचें मणिपूरचक्र हें दहा दलांचे आहे. त्याची कर्णिका ही श्रीचक्रांतील अंतर्दशारचक्रस्वरूप समजावी. अनाहतचक्र हे बारा दलांचे आहे. त्याची कर्णिका हें श्रीचक्रांतील बहिर्दशारचक्र समजावे. कंठस्थानीं असलेलें विशुद्धिचक्र हें सोळा दलांच्या कमलाप्रमाणे आहे. त्याची कर्णिका हें श्रीचक्रांतील चौदा त्रिकोण असलेलें चक्र समजावें. याप्रमाणें मूलाधारापासून विशुद्धिचक्रापर्यंत श्रीचक्रांतील शक्तिचक्राचें ऐक्य लक्षांत घ्यावे. आज्ञाचक्र हें दोन दलांचे आहे. त्याच्यांतील एकदल हें श्रीचक्रांतील शिवचक्रांतर्गत अष्टदलकमल समजावें आणि दुसरें दल हें श्रीचक्रांतील षोडशदल कमल समजावे. आपल्या शरीरांतील षट्चक्रांत तीन ग्रंथी आहेत. स्वाधिष्ठानचक्राच्या शेवटीं असलेल्या ग्रंथीला रुद्रग्रंथि म्हणतात. अनाहतचक्राच्या शेवटीं असलेल्या ग्रंथीला विष्णुग्रंथी म्हणतात तर आज्ञाचक्राच्या अंती असलेल्या ग्रंथीला ब्रह्मग्रंथी असें म्हणतात. त्या ग्रंथी अग्नि, सूर्य आणि चंद्रस्वरूप आहेत असें समजावे. या तीन ग्रंथींचें श्रीचक्रांतील तीन वर्तुळांशी तादात्म्य समजावे. यानंतर श्रीचक्रांतील चार चार दारांनीं युक्त असलेलें तीन रेघांचे चतुष्कोण ही मूर्धस्थानी विराजमान असलेल्या सहस्रदलकमलाची कर्णिकाच होय असें समजावे. अर्थात् मूर्धस्थानीं असलेलें सहस्रदलकमल हें श्रीचक्रांतील चार दारांनी युक्त असलेलें तीन रेघांचे चतुष्कोणाकृति भूपुरच होय अशी भावना करावी. आपण शीर्षासनाची कल्पना केली कीं सहस्रदलकमलाच्या कर्णिकारूप भूपुरामध्यें सारें श्रीचक्र मेरुपृष्ठाप्रमाणें अधिष्ठित असलेलें दिसेल. श्रीचक्रांतील त्रिकोणांत बिंदुस्थानीं श्रीत्रिपुरसुंदरी विराजमान झालेली आहे तर मुलाधारचक्रांतील त्रिकोणांतही कुंडलिनीच्या रूपानें श्रीत्रिपुरसुंदरी विराजत आहेच. असा हा श्रीचक्र आणि षटचक्रे यांच्या तादात्म्योपासनेचा सूक्ष्म विचार आहे. श्रीचक्रांतील प्रत्येक त्रिकोणांत, अष्टदलांत व षोडषदलांत त्याचप्रमाणे भूपुरांतील द्वारांत पूर्वीं वर्णन केलेल्या सर्व देवता आणि स्वरव्यंजनात्मक मातृका तसेंच त्या त्या बीजांत अभिप्रेत असलेली तत्त्वें, पंचमहाभूतें, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रियें, पंचकर्मेंद्रियें, मन इत्यादि सर्व तत्त्वप्रपंच यांचाही अंतर्भाव असलेला, तो शरीरांतील षट्चक्रांच्या प्रत्येक दलांतही यथायोग्य स्थानीं शास्त्रोक्त पद्धतीनें कल्पावा. असें हें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या मानसोपासनेचें स्वरूप आहे. आम्ही त्याचें येथें दिग्दर्शन मात्र केले आहे. हृत्कमलात, आज्ञाचक्रांत अथवा सहस्रदलकमलांत श्रीविद्यास्वरूप उपास्यदेवतेचें ध्यान करून गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने पंचदशी अथवा षोडषी मंत्राचा विधिपूर्वक जप करणें हीही एक उपासनापद्धति आहेच. कोणत्याही मार्गानें गेलें तरी साध्य एकच असल्यामुळें साधक शेवटीं तेथेंच जाऊन पोहोचतो.

श्रीचक्राचें लक्षण पुढीलप्रमाणे सांगितले आहे
"बिन्दु-त्रिकोण-वसुकोद-दशारयुग्म-भन्वश्र-नागदल-संयुत-षोडशारम् ।
वृत्तत्रयं चू धरणीसदनत्रयं च श्रीचक्रमेतदुदितं परदेवतायाः ॥ "
बाह्य भागाकडून अंतर्भागाकडे श्रीचक्राचें क्रमशः स्वरूप पुढीलप्रमाणे सांगतां येईल -

श्रीचक्राच्या चारही मर्यादा अथवा बहिर्भाग हा तिहेरी रेषांनी द्वारयुक्त भूपुराकृति दाखविलेला असतो. यालाच "धरणीसदन" असें म्हटलेले आहे. या चारही बाजू सम असतात. म्हणजेच समभूज चौकोनांच्या साहाय्याने (अर्थात् थोडा बदल करून) हें धरणीसदन दाखविता येतें.

या भूपुराच्या आंत भूपुराचे दोन्ही कर्ण एकमेकांस जेथें छेदतात तो मध्यबिंदू कल्पून तीन वर्तुळे काढलेलीं आहेत. ही वर्तुळें एकमेकांपासून जवळ जवळच आहेत. यांना वृत्तत्रय असें म्हटलें आहे. या वृत्तत्रयाच्या आंत षोडशदल कमल दाखविले आहे. बहुतेक आकृतीमध्ये भूपुराच्या आत व षोडशदलकमलाच्या बाहेर तीनऐवजी चार वर्तुळें दिसतात. त्यांतील एक सर्वांत आतील वर्तुळ हें षोडशदलकमलाची मर्यादा दाखविणारे आहे. आकृतीत हे दाखविलेच पाहिजे असें नाहीं. षोडशदलकमलाच्या आंत अष्टदलकमल आहे. या षोडशदलकमलाची आतील मर्यादा दाखविणारें एक वर्तुळ आहे. तेंच अष्टदलकमलाची बहिर्मर्यादा दाखविणारें वर्तुळ होय. अष्टदलकमलाचीही अंतर्मर्यादा दाखविणारे वर्तुळे आकृतींत दिसतें. पण कमलांची मर्यादा दाखविणारें कोणतेंही वर्तुळ हा यंत्रांतीत आवश्यक भाग नाही. या वर्तुळांमुळे आकृति सुबक होण्यास मदत होते. मर्यादादर्शक वर्तुळें न दाखविता मध्यबिंदूपर्यंत संपूर्ण कमलदलें दाखविलेलीही आकृति पाहण्यांत आहे.

या अष्टदलकमलाच्या आत नऊ त्रिकोण असे काढलेले आहेत की, त्यामुळें एकूण त्रिकोणांची संख्या त्रेचाळीस होते. या नऊ त्रिकोणांपैकी पांच त्रिकोण अधोमुखी असून चार त्रिकोण ऊर्ध्वमुखी आहेत.
ऊर्ध्वमुखी त्रिकोण - ० कखग, ० चछज, ० टठड आणि ० तथद.
अधोमुखी त्रिकोण - ० पफब, ० घझढ, ० धभम, ० यरल आणि ० शषद.

एकूण त्रेचाळीस त्रिकोणांची पांच विभागांत विभागणी होते. सर्वांत बाह्य बाजूस चौदा त्रिकोण होतात. या चौदा त्रिकोणांच्या बाह्य कोनांनी चतुर्दशारचक्र होतें.

या चतुर्दशारचक्राच्या आंत दहा त्रिकोणांचा दुसरा विभाग आहे. या दहा त्रिकोणांच्या बाह्य कोनांनी दशकोणचक्र किंवा दशारचक्र होतें. या दशकोणचक्राच्या आंत आणखी एक दहा त्रिकोणांचा विभाग असून त्या दहा त्रिकोणांच्या बाह्य कोनांनी आणखी एक दशकोणचक्र होतें.

याच्या आंत आठ त्रिकोणांचा चौथा विभाग असून यांच्या आठ बाह्य कोनांनी अष्टकोणचक्र होतें.

पांचवा विभाग एकाच मध्यवर्ति त्रिकोणाचा असून या त्रिकोणांत एक बिंदु आहे. कांहीं श्रीचक्रांमध्यें हा बिंदु या मध्यवर्ति त्रिकोणांत न दाखविता त्याच्या वरील चतुष्कोणांत दाखविलेला आहे.

वर वर्णन केलेलीच माहिती श्रीशंकराचार्य पुढील श्लोकांत सांगतात -

चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिरपि
प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः ।
त्रयश्चत्वारिंशद्‌वसुदलकलाश्रत्रिवलय-
त्रिरेखाभिः सार्धं तव शरणकोणाः परिणताः ॥ सोल .श्लो. ११

या श्रीचक्राची विविध प्रतीकात्मकता प्रतिपादिली गेली आहे. उदाहरणार्थ, सोमात्मकत्व, सूर्यात्मकत्व, अनलात्मकत्व इत्यादि.

प्रदीपज्वालाभिर्दिवसकर-नीराजनविधिः
सुधासूतेश्चन्द्रोपल-जल-लवैरर्घ्यरचना ।
स्वकीयैरम्भोभिः सलिल-निधि-सौहित्य-करणं
त्वदीयाभिर्वाग्भिस्तव जननि वाचां स्तुतिरियम् ॥ १००॥

आई जगज्जननी ! मी तुझी किती स्तुति करणार ? तुझा महिमा अपार आहे. मी कितीही स्तुति केली तरी ती तुझ्या अनंत आणि अपार महिम्यापुढें अपुरीच पडणार. माझा हा प्रयत्न म्हणजे गंगेच्याच प्रवाहांतील पळीभर पाणी घेऊन गंगेला अर्घ्य अर्पण करण्यासारखे आहे. प्रदीप्त अग्निनारायणापुढें छोटासा दिवा किंवा सूर्यनारायणापुढें काडवात लावण्यासारखेंच आहे. अशा अभिप्रायानें आचार्य स्तुति करीत आहेत.

आई त्रिपुरसुंदरी ! तूं समस्त वाक्प्रपंचाची जननी आहेस. तुझ्याच दोन शब्दांनीं मी तुझी ही स्तुति केलेली आहे. ही स्तुति म्हणजे "प्रदीपज्वालाभिः यथा दिवसकर-नीराजन-विधिः " नीरांजनांत लावलेल्या वातींनी ज्याप्रमाणें सूर्यनारायणाला ओवाळावे तसाच हा प्रकार आहे. " सुधासूतेः चन्द्रोपललवैः यथा अर्घ्यरचना" सुधासृति म्हणजे अमृताला स्रवणारा अमृताचा निधि अर्थात चंद्र. त्याला चंद्राच्याच किरणांच्या संपर्कानें द्रवलेल्या चंद्रकांत रत्नाच्या जलकणांनी अर्घ्य अर्पण करण्याप्रमाणे आहे. "स्वकीयैः अम्भोभिः सलिलनिधि-सौहित्य करणं" समुद्राला त्याच्या स्वतःच्याच जलांनीं तर्पण करण्यासारखे आहे. सौहित्य शब्दाचा अर्थ तृप्ति, तर्पण असा आहे. " हे वाचां जननि ! त्वदीयाभिः वाग्भिः इयं तव स्तुतिः अस्ति" हे वाग्जननी ! शब्दप्रपंचाच्या रूपाने नटलेली तूं, शब्दप्रपंचाची जननी आहेस. तुझ्याच शब्दानी मी तुझी ही स्तुति केलेली आहे. या माझ्या अल्प-स्वल्प स्तुतीचा तूं प्रेमाने अंगीकार कर.

ग्रंथः समाप्तः
GO TOP