॥ पञ्चदशी ॥
चतुर्थः परिच्छेदः - द्वैतविवेकः

ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं प्रपञ्च्यते ।
विवेके सति जीवेन हेयो बन्धः स्फुटीभवेत् ॥ १ ॥
गु० - ही सर्व द्वैतसृष्टि द्विविध आहे. हिचा कांहीं भाग अंतर्यामी परमेश्वराने उत्पन्न केला आहे, व कांहीं भाग जीवानें केला आहे. त्या दोनही भागांचें विवेचन करून तुला दाखवतो. म्हणजे त्यांपैकीं जीवाने कोणत्या भागाचा त्याग करावा हे तुला स्पष्ट समजेल. ॥ १ ॥

मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ।
स मायी सृजतीत्याहुः श्वेताश्वतर शाखिनः ॥ २ ॥
शि० - ही सृष्टि ईश्वरानें उत्पन्न केली याला प्रमाण काय ? गु० - या गोष्टीस श्रुतीचीं प्रमाणे पुष्कळ आहेत. ''माया ही प्रकृति आहे; आणि त्या प्रकृतीस धारण करणारा परमेश्वर होय. तो मायी परमेश्वरच या सृष्टीस उत्पन्न करतो. अशा अर्थाच्या श्रुती श्वेताश्वतरशाखेंत आहेत. ॥ २ ॥

आत्मा वा इदमग्रेऽभूत्स ऐक्षत सृजा इति ।
सञ्कल्पेनासृजल्लोकान्स एतानिति बह्वृचाः ॥ ३ ॥
ऐतरेय उपनिषदांतही यास प्रमाण आहे. ''हें जगत पूर्वी आत्माच होतें. त्याच्या ईक्षणानेच हें जग उत्पन्न झालें. तो संकल्पेंकरून लोकांप्रत उत्पन्न करिता झाला'' इत्यादि. ॥ ३ ॥

खंवाय्वग्निजलोर्व्योषध्यन्नदेहाः क्रमादमी ।
सम्भूता ब्रह्मणस्तस्मादेतस्मादात्मनोऽखिलाः ॥ ४ ॥
तैत्तिरीय श्रुतीतही असें सांगितले आहे, आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी, ओषधी, अन्न, देह ही क्रमेंकरून एकापासून एक अशीं, मूळब्रह्मापासूनच उत्पन्न झालीं. ॥ ४ ॥

बहु स्यामहमेवातः प्रजायेयेति कामतः ।
तपस्तप्त्वाऽसृजत्सर्वं जगदित्याह तैत्तिरिः ॥ ५ ॥
मी एकाचा अनेक होईन. अशा संकल्पेंकरून तप करून सर्व जग उत्पन्न करिता झाला. ॥ ५ ॥

इदमग्रे सदेवासीद्बहुत्वाय तदैक्षत ।
तेजोऽवन्नाण्डजादीनि ससर्जेति च सामगाः ॥ ६ ॥
छांदोग्य श्रुतीतही असेंच म्हटले आहे ''हें जग. पूर्वी एक सद्वस्तूच होतें. एकाचे अनेक व्हावे अशी त्यासच इच्छा झाली. तेज, उदक, अन्न, अंडज, जरायुज अणि उद्‌भिज्ज अशी सृष्टि त्यांतूनच उत्पन्न झाली.'' ॥ ६ ॥

विस्फुलिङ्गा यथा वह्नेर्जायन्तेऽक्षरतस्तथा ।
विविधाश्चिज्जडा भावा इत्याथर्वणिकी श्रुतिः ॥ ७ ॥
आतां अथर्ववेदाचें प्रमाण ऐक. ''ज्याप्रमाणें अग्नीपासून ठिणग्या उत्पन्न होतात त्याचप्रमाणे अक्षरसंज्ञक परमेश्वरापासून नानाप्रकारचे जड व सजीव पदार्थ उत्पन्न होतात;'' असें अथर्ववेदीय श्रुति सांगते. ॥ ७ ॥

जगदव्याकृतं पूर्वमासीद्व्याक्रियतेऽधुना ।
दृश्याभ्यां नामरूपाभ्यां विराडादिषु ते स्फुटाः ॥ ८ ॥
पूर्वी हे जग अव्यक्त (अस्पष्ट) होतें. ते ईश्वराने आतां अनुभवास योग्य अशा नामरूपांनीं व्यक्त केलें. तीं नामे व रूपे (आकार इत्यादि) विराटादि प्राण्यांमध्यें स्पष्ट प्रतीत होतात. ॥ ८ ॥

विराणानुर्नरो गावः खराश्वाजावयस्तथा ।
पिपीलिकावधिद्वन्द्वमिति वाजसनेयिनः ॥ ९ ॥
(कशी म्हणशील तर ऐक) विराट्, मनु, मनुष्यें, गाई, गर्दभ, अश्व, बकरी, मेंढ्या तसेच मुंगीपर्यंत सर्व लहानथोर प्राणी त्यानें उत्पन्न केले असे वाजसनेयी शाखाध्याची सांगतात. ॥ ९ ॥

कृत्वा रूपान्तरं जैवं देहे प्राविशदीश्वरः ।
इति ताः श्रुतयः प्राहु जीवत्वं प्राणधारणात् ॥ १० ॥
जीवसंबंधीं असें निराळें रूप करून ईश्वर देहांत प्रविष्ट झाला, असे त्या श्रुति सांगतात. प्राणादिकांच्या धारणामुळे त्या ब्रह्माकडे जीवत्व आले आहे. ॥ १० ॥



चैतन्यं यदधिष्ठानं लिङ्गदेहश्च यः पुनः ।
चिच्छाया लिङ्गदेहस्था तत्संघोजीव उच्यते ॥ ११॥
जें अधिष्ठान चैतन्य, तसेच जो लिंगदेह आणि जी लिंग देहस्थ चैतन्याची छाया यांच्या समुदायाला जीव असे म्हणतात. ॥ ११ ॥

माहेश्वरी तु या माया तस्या निर्माणशक्तिवत् ।
विद्यते मोहशक्तिश्च तं जीवं मोहयत्यसौ ॥ १२ ॥
जी ईश्वराची महामाया तिची निर्माण करण्याच्या शक्तिप्रमाणेंच मोहशक्तिही आहे. ती त्या जीवाला मोहित करते ॥ १२ ॥

मोहादनीशतां प्राप्य मग्नो वपुषि शोचति ।
ईशसृष्टमिदं द्वैतं सर्वमुक्तं समासतः ॥ १३ ॥
मोहामुळे हा परतंत्र होऊन शरीरांत निमग्न होत्साता शोक करतो. असो. ह्याप्रमाणे हें ईश्वरनिर्मित सर्व द्वैत संक्षेपत: सांगितलें ॥ १३ ॥

सप्तान्नब्राह्मणे द्वैतं जीवसृष्टं प्रपञ्चितम् ।
अन्नानि सप्तज्ञानेन कर्मणाजनयत्पिता ॥ १४ ॥
सर्व लोकांचा पालक जो समष्टि जीव त्यानें ज्ञान व प्रयत्न यांच्या योगाने सात प्रकारचे अन्न निर्माण केले असें सप्तान्न ब्राह्मणामध्यें जीवनिर्मित द्वैताचे सविस्तर वर्णन केले आहे. ॥ १४ ॥

मर्त्यानामेकं देवान्ने द्वे पश्वान्नं चतुर्थकम् ।
अन्नत्रितयमात्मार्थमन्नानां विनियोजनम् ॥ १५ ॥
मरण धर्मवान् प्राण्यांकरितां एक, देवांकरितां दोन, पशूंकरितां चवथे व स्वत: करितां राहिलेली तीन. अशा प्रकारे त्या अन्नांचा श्रुतीनेच विनियोग केलेला आहे. ॥ १५ ॥

व्रीह्यादिकं दर्शपूर्णमासौ क्षीरं तथा मनः ।
वाक्प्राणश्चेति सप्तत्वमन्नानामवगम्यताम् ॥ १६ ॥
व्रीह्यादिक मनुष्यांकरितां, दर्शपूर्णमास देवांकरितां, क्षीर पशूकरितां, आणि मन, वाणी व प्राण ही आत्म्याकरतां अशीं सात अन्नें समजावी. ॥ ११ ॥

ईशेन यद्यप्येतानि निर्मितानि स्वरूपतः ।
तथापि ज्ञानकर्माभ्यां जीवो कार्षीत्तदन्नताम् ॥ १७ ॥
शि० - मग ही अन्ने ईशनिर्मितच झाली, ती जीवनिर्मित कशी ? गु० - ही अन्ने जरी स्वरूपतः ईश्वरानें निर्माण केलीं, तथापि ज्ञानकर्माच्या योगानें त्यांस अन्नत्व जीवानेंच दिले आहे म्हणून त्यांचें भोग्यत्व त्यानेच निर्माण केले आहे असें समजावे ॥ १७ ॥

ईशकार्यं जीवभोग्यं जगद्द्वाभ्यां समन्वितम् ।
पितृजन्या भर्तृभोग्या यथा योषित्तथेष्यताम् ॥ १८ ॥
ईश्वराची कृति आणि जीवाचा भोग या दोहोंनी हें जग बनले आहे. म्हणजे ईश्वराने सृष्टि करावी आणि ती जीवांनीं भोगावी. यास दृष्टांत पित्यानें उत्पन्न केलेली कन्या जशी भर्त्यास भोग्य होते; तद्वत, शि० - ईश्वर कोणत्या साधनानें सृष्टि करतो ? व जीव कोणत्या साधनानें करतो ? ॥ १८ ॥

मायावृत्त्यात्मको हीशसंकल्पः साधनं जनौ ।
मनो वृत्त्यात्मको जीवो संकल्पो भोगसाधनम् ॥ १९ ॥
गु० - मायावृत्त्यात्मक जो संकल्प तो ईशसृष्टीचें साधन होय आणि मनोवृत्त्यात्मक जो संकल्प तो जीवसृष्टीचें म्हणजे भोगाचें साधन होय. शि ० - ईश्वरानें उत्पन्न केलेल्या पदार्थात जीवानें निर्माण केलेला भोग्यत्वाकार आहे. म्हणतात तो कोठे आहे ? ॥ १९ ॥

ईशनिर्मितमण्यादौ वस्तुन्येकविधे स्थिते ।
भोक्तृधीवृत्तिनानात्वात्तद्‌भोगो बहुधेष्यते ॥ २० ॥
गु० - ईश्वरानें निर्माण केलेल्या एकाच रत्नादि पदार्थाचे ठायीं भोक्त्याच्या मनाच्या नानाविध वृत्तीच्या योगें नानाप्रकारचे भोग घडतात. ॥ २० ॥



हृष्यत्येको मणिं लब्ध्वा क्रुद्ध्यत्यन्यो ह्यलाभतः ।
पश्यत्येव विरक्तोऽत्र न हृष्यति न कुप्यति ॥ २१ ॥
शि० - ते कसे ? गु० - कल्पना कर कीं, तीन पुरुष एका मार्गानें जात असतां त्यांच्या दृष्टीस एक रत्न पडलें. तें न्यावयास त्यांपैकीं दोघे धांवले. त्यांत जो पुढें गेला त्यास तें मिळालें व तेणेंकरून त्यास परम आनंदही झाला. जो मागें राहिला त्यास तें न ' मिळाल्यामुळे वाईट वाटून तो संतापला; आणि तिसरा जो विरक्त होता त्यास हर्ष व शोक हे दोन्ही झाले नाहींत. ॥ २१ ॥

प्रियोऽप्रिय उपेक्ष्यश्चेत्याकारा मणिगास्त्रयः ।
सृष्टा जीवैरीशसृष्टं रूपं साधारणं त्रिषु ॥ २२ ॥
शि० - मग यांत जीवसृष्टि कोणती व ईशसृष्टि कोणती? गु० - यांत प्रियत्व, अप्रियत्व आणि उपेक्ष्यत्व असे जे तीन गुण रत्नाच्याठायी आले ते तिघां पुरुषांनी क्रमेंकरून उत्पन्न केले, म्हणून ते जीवसृष्ट होत; आणि तिहीमध्ये साधारण जें रत्नरूप ते ईश्वरनिर्मित होय. ॥ २२ ॥

भार्या स्नुषा ननान्दा च याता मातेत्यनेकधा ।
प्रतियोगिधिया योषिद्‌भिद्यते न स्वरूपतः ॥ २३ ॥
शि० - हें माझ्या ध्यानात नीट येईना; याकरिता अधिक स्पष्ट करून सांगवे. गु०- तुला आणखी एक दृष्टांत सांगतो म्हणजे.चांगलें समजेल. स्त्री स्वरूपतः एकच असून संबंधभेदानें, नवर्‍यास बायको, सासवेस सून, भावजयेस नणंद आणि पुत्रास माता झाली. येथे स्त्री ही ईशसृष्टि होय; आणि..' तिच्याठायीं बायको, सून, नणंद इत्यादि कल्पना जीवाच्या आहेत. ॥ २३ ॥

ननु ज्ञानानि भिद्यन्तामाकारस्तु न भिद्यते ।
योषिद्वपुष्यतिशयो न दृष्टो जीवनिर्मितः ॥ २४ ॥
शि०--आपण दिलेल्या दृष्टांतांत बायको एकच असून तिजवर केलेल्या जीवांच्या कल्पना मात्र भिन्न आहेत, परंतु बायकोच्या आकारांत कांहीं भेद नाहीं, का जीवाने अधिक काय निर्माण केलें ? ॥ २४ ॥

मैवं मांसमयी योषित्काचिदन्या मनोमयी ।
मांसमय्या अभेदेऽपि भिद्यतेऽत्र मनोमयी ॥ २५ ॥
गु०- अधिक कसे केलें नाही ? येथें दोन स्त्रिया झाल्या, एक मांसमयी आणि एक मनोमयी. मांसमयी ही ईशकृत असून ती एकच आहे. पण मनोमयी स्त्रिया जीवानें निर्माण केल्या आहेत; व त्या भिन्न आहेत. ॥ २५ ॥

भ्रान्तिस्वप्नमनोराज्यस्मृतिष्वस्तु मनोमयम् ।
जाग्रन्मानेन मेयस्य न मनोमयतेति चेत् ॥ २६ ॥
शि० - भ्रांति, स्वप्न, मनोराज्य व स्मृति इत्यादि अवस्थांमध्ये भासणारे पदार्थ मनोमय आहेत; असें म्हणतां येईल. कारण तेथे बाह्य विषय नाहींत; परंतु जागृतींत प्रत्यक्ष दिसणाऱ्या पदार्थास मनोमय असें कसे म्हणावें. ॥ २६ ॥

बाधं माने तु मेयेन योगात्स्याद्विषयाकृतिः ।
भाष्यवार्तिककाराभ्यामयमर्थ उदाहृतः ॥ २७ ॥
गु०- होय तू म्हणतोस तें खरे. परंतु बाह्यविषय जरी असले तरी विषयाकार प्रत्यक्ष होण्याला विषय आणि मन या दोहोंचा संयोग झाला पाहिजे. हें सांगणें आमच्या पदरचें नव्हे. भाष्यकारांनी व वार्तिककारांनींही असाच सिद्धांत केला आहे ॥ २७ ॥

मूषासिक्तं यथा ताम्रं तन्निभं जायते तथा ।
रूपादीन् व्याप्नुवच्चित्तं तन्निभं दृश्यते ध्रुवम् ॥ २८ ॥
भाष्यकारांनीं असे म्हटलें आहे कीं, ज्याप्रमाणें मुशींत ओतलेले तांबे तिच्यासारखेच होतें त्याप्रमाणे रूपादिक विषयांस व्यापणारे चित्त खरोखर तत्तद्विषयाकार झाल्यासारखें दिसतें. ॥ २८ ॥

व्यञ्जको वा यथा लोको व्यङ्ग्यस्याकारतामियात् ।
सर्वार्थव्यञ्जकत्वाद्धीरर्थाकारा प्रदृश्यते ॥ २९ ॥
अथवा दुसरा दृष्टांत. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश ज्या ज्या पदार्थावर पडेल, त्या त्या पदार्थासारखा त्याचा आकार बनतो त्याप्रमाणें बुद्धि ही सर्व पदार्थांची प्रकाशक असल्यामळें ती ज्या पदार्थास व्यापते त्या पदार्थाप्रमाणें तिचा आकार होतो. ॥ २९ ॥

मातुर्मानाभिनिष्पत्तिर्निष्पन्नं मेयमेति तत् ।
मेयाभिसंगतं तच्च मेयाभत्वं प्रपद्यते ॥ ३० ॥
आतां वार्तिककारांचे वचन ऐक. कोणताही पदार्थ गोचर होतांना प्रथमत: चिदाभासापासून मनोवृत्ति उत्पन्न होते:. ती उत्पन्न झाल्यानंतर घटादि विषयांवर जाऊन आदळते. तदनंतर त्या विषयांस व्यापून त्यांसारखाच तिचा आकार बनतो. ॥ ३० ॥



सत्येवं विषयौ द्वौ स्तो घटौ मृण्मयधीमयौ ।
मृण्मयो मानमेयः स्यात्साक्षिभाष्यस्तु धीमयः ॥ ३१ ॥
शि० - मग पुढें काय म्हणतां ? गु० - या वार्तिककारांच्या व भाष्यकारांच्या वचनांवरून सहज लक्षांत येइल कीं, घटज्ञान होतेवेळीं दोन घट असतात. एक मातीचा व दुसरा मनाचा. मातीचा घट मनास गोचर होतो, व मनाचा साक्षीस गोचर होतो. ॥ ३१ ॥

अन्वयव्यतिरेकाभ्यां धीमयो जीवबन्धकृत् ।
सत्यस्मिन्सुखदुःखे स्त स्तस्मिन्नसति न द्वयम् ॥ ३२ ॥
याप्रमाणें ईशनिर्मित व जीवनिर्मित अशी दोन प्रकारची द्वैतसृष्टि सिद्ध झाली. यास अन्वयव्यतिरेक लावून पाहिलें असतां मनोमय दृष्टीच जीवाच्या सुखदुखांस कारण आहे असें समजेल. कारण जोपर्यंत हा मानस प्रपंच आहे, तोपर्यंत जीवांस सुखदुःखे होतात, आणि त्याच्या अभावीं सुखही नाही व दुःखही नाहीं. ॥ ३२ ॥

असत्यपि च बाह्यार्थे स्वप्नादौ बध्यते नरः ।
समाधिसुप्तिमूर्च्छासु सत्यप्यस्मिन्न बध्यते ॥ ३३ ॥
यास उदाहरण. बाहेरील पदार्थ नसूनही मनुष्यास स्वप्नाचेठायीं सुखदुःखे होतात; आणि ते पदार्थ सभोवार असूनही समाधि, निद्रा व मूर्च्छा इत्यादि अवस्थांमध्ये मनुष्यास सुखदुःखांची बाधा मुळीच होत नाहीं. ॥ ३३ ॥

दूरदेशं गते पुत्रे जीवत्येवात्र तत्पिता ।
विप्रलम्भकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति ॥ ३४ ॥
मनोमय प्रपंचच सुखदुःखांस कारण आहे याविषयीं आणखी एक उत्कृष्ट उदाहरण देतों, म्हणजे स्पष्ट समजेल. कल्पना कर कीं एका गृहस्थाचा पुत्र. दूरदेशी गेला आहे. तेथें तो सुखरूप व सुरक्षित असूनही प्रक। ठगानें त्यास असें सांगितलें कीं, तुमचा पुत्र मेला; हें वचन ऐकून तो पुत्रशोकानें खरोखरच रडं लागतो. ॥३४ ॥

मृतेऽपि तस्मिन्वार्तायामश्रुतायां न रोदिति ।
अतः सर्वस्य जीवस्य बन्धकृन्मानसं जगत् ॥ ३५ ॥
बरें आतां याच्या उलट पहा. समज कीं, तो त्याचा पुत्र खरोखरच मेलो. पण बापाच्या कानीं ती वार्ता जोपर्यंत आली नाहीं; तोपर्यंत त्याला त्याचें कांहींच वाटत नाहीं; तो खुशाल आनंदांत असतो. तस्मात ही मानससृष्टीच जीवाच्या सुखदुःखांस कारण आहे, हें सिद्ध झालें. ॥ ३५ ॥

विज्ञानवादो बाह्यार्थवैयर्थ्यात्स्यादिहेति चेत् ।
न हृद्याकारमाधातुं बाह्यस्यापेक्षितत्त्वतः ॥ ३६ ॥
शि० - पण असें जर म्हणावे, तर बाह्य जगताचा कांहींच उपयोग नाहीसा होऊन बौद्धांचा जो विज्ञानवाद तो स्वीकारल्यासारखा होईल ? गु० - विज्ञानवाद कसा होतो ? बौद्ध आपल्या विज्ञानवादांत बाह्य जग मुळींच कबूल करीत नाहींत. ते म्हणतात कीं, या‍वत्‌किंचित, सर्व जग बुद्धीचेंच बनलें आहे. तसें आमचें म्हणणे नाहीं. आमचें म्हणणें असें आहे. की, जरी जीवाच्या सुखदुःखांस कारण हा मानस प्रपंच आहे, तथापि तो होण्याला बाह्य जगाची आवश्यकता आहे. ते बाह्य जग मुळीच नाही असें आमचे मत नाही. मग विज्ञानवाद कसा होईल ? ॥ ३६ ॥

वैयार्थ्यमस्तु वा बाह्यं न वारयितुमीश्महे ।
प्रयोजनमपेक्षन्ते न मानानिति हि स्थितिः ॥ ३७ ॥
शि० - बाह्य सृष्टि जर सुखदुःखांस कारण नाहीं, तर ती असून नसल्यासारखीच झाली. मग विज्ञानवादांत आणि तुमच्या म्हणण्यांत भेद तो काय ? गु० - भेद आहे तर. नाही कसा ? अरे बाह्य दृष्टि निरुपयोगी झाली म्हणून ती मुळींच नाही, असें म्हणतां येणार नाही. अमुक वस्तु आहे, असें सिद्ध करण्यास तिच्या अस्तित्वाबद्दल चांगले प्रमाण असलें म्हणजे झालें; तिच्या प्रयोजनींची मुळींच अपेक्षा नाहीं. ॥ ३७ ॥

बन्धश्चेन्मानसं द्वैतं तन्निरोधेन शाम्यति ।
अभ्यासेद्योगमेवातो ब्रह्मज्ञानेन किं वद ॥ ३८ ॥
श० - आपल्या म्हणण्याप्रमाणें जीवाच्या बंधासही मानस दृष्टीच जर कारण आहे तर तिच्या निवारणार्थ चित्तनिरोधरूप योगाभ्यास केला म्हणजे झाले. मग आणखी ब्रह्मज्ञान कशाला पाहिजे ? ॥ ३८ ॥

तात्कालिक द्वैतशान्तावप्यागामीजनीक्षयः ।
ब्रह्मज्ञानं विना न स्यादिति वेदान्तडिण्डिमः ॥ ३९ ॥
पु ० -अरे बाबा, योगाभ्यासानें द्वैतशांति जरी झाली तरी ती तेवढ्या वेळेपुरती मात्र होते. परंतु एकदां हें मानसजग नाहींसें झाल्यानंतर पुन: उत्पन्न होऊं नये अशा प्रकारची जर शांति पाहिजे तर ती ब्रह्मज्ञानावांचून कधींही होणार नाहीं. असा वेदांताचा डंका वाजत आहे. ॥ ३९ ॥

अनिवृत्तेऽपीशसृष्टे द्वैते तस्य मृषात्मताम् ।
बुद्ध्वा ब्रह्माद्वयं बोद्धुं शक्यं वस्त्वैक्यवादिना ॥ ४० ॥
शि० - बाह्म जग ( ईशसृष्टि) अगदी नाहींसें झाल्यावांचून ब्रह्मज्ञान कसें होईल ? गु० - ज्ञान होण्यास ईशसृष्टीच्या निवारणाची मुळींच गरज नाहीं. ती जरी आहे तशीच असली तरी ती मिथ्या आहे अशी पक्की खात्री झाली असतां, अद्वैत ब्रह्मानें ज्ञान होण्यास कोणतीच नड नाहीं. ॥ ४० ॥



प्रलये तन्निवृत्तौ तु गुरुशास्त्राद्यभावतः ।
विरोधिद्वैताभावेऽपि न शक्यं बोद्धुमद्वयम् ॥ ४१ ॥
शि० - ईशसृष्टि मिथ्या आहे, इतकेंच केवळ समजल्याने ब्रह्मज्ञान कसें होईल ? ती अगदीं नाहींशीच केली प्राहिजे असें मला वाटतें. गु० -अरे तिची निवृत्ति प्रलयकाळी होत नाहीं काय ? मग तेव्हां कोठे ब्रह्मज्ञान होतें ? प्रलयकालीं गुरुशास्त्रादिक ज्ञानसाधनांचा अभाव असल्यामुळें उलटा ज्ञानास प्रतिबंधच होईल. तेव्हां विरोध द्वैताभाव जरी झाला तरी अद्वैतज्ञान होणे अशक्य आहे. ॥ ४१ ॥

अबाधकं साधकं च द्वैतमीश्वरनिर्मितम् ।
अपनेतुमशक्यं चेत्यास्तां तद्द्विष्यते कुतः ॥ ४२ ॥
तस्मात् या ईश्वरनिर्मित सृष्टीपासून मुळीच हानि नाहीं. इतकेच नव्हे, तर तिजपासून पूर्वीं सांगितल्याप्रमाणें गुरुशास्त्रादिकांच्या संबंधाने उलटा फायदाच आहे. बरें तिचें निवारण करणे तरी शक्य आहे म्हणावें तर तेही असाध्यच; मग ती असेना बापडी, तिचा उगीच कां तिरस्कार करतोस. ॥ ४२ ॥

जीवद्वैतं तु शास्त्रीयमशास्त्रीयमिति द्विधा ।
उपाददीता शास्त्रीयमातत्त्वस्यावबोधनात् ॥ ४३ ॥
हे जीवद्वैत दोन प्रकारचे आहे. एक, शास्त्रीय व दुसरे अशास्त्रीय, यांपैकी अशास्त्रीय द्वैतप्रपंचाचा मात्. ममुक्षुनें त्याग करावा परंतु तत्त्वज्ञान होईपर्यंत शास्त्रीय द्वैत सहसा टाकू नये. ॥ ४३ ॥

आत्मब्रह्मविचाराख्यं शास्त्रीयं मानसं जगत् ।
बुद्धे तत्त्वे तच्च हेयमिति श्रुत्यनुशासनम् ॥ ४४ ॥
शि० ---शास्त्रीय द्वैत म्हणजे काय ? गु० - श्रवण, मनन व निदिध्यासनरूप जो ब्रह्मविचार व त्याचीं साधनें, यांसच शास्त्रीय द्वैत म्हणतात. हा मानस प्रपंच तत्त्वबोध झाल्यानंतर सोडून द्यावा. अशी श्रुतींची आज्ञा आहे,. शि० - तर मग ( आसुप्तेरामृतेःकालं नयेद्वेदांतचिंतया) म्हणजे मुमुक्षुंनी सर्व आयुष्य वेदांतचिंतनांत घालवावे, असें जे शास्त्रानें सांगितले त्याचा अर्थ काय ? गु० - त्याचा अर्थ इतकाच कीं, कामादि षड्‍‌रिपूंना मनांत येण्यास अगदी अवकाशच देऊं नये; म्हणून तसें शास्त्राने सांगितले. एऱ्हवीं तत्त्वज्ञान झाल्यावर शास्त्रीय द्वैताची मुळीच गरज नाहीं. ॥ ४४ ॥

शास्त्राण्यधीत्य मेधावी अभ्यस्य च पुनः पुनः ।
परमं ब्रह्म विज्ञाय उल्कावत्तान्यथोत्सृजेत् ॥ ४५ ॥
शि० - बरें याजविषयी श्रुतींची आला आहे असें तुही म्हटले तर त्या श्रुती कोणत्या ? गु० - त्या श्रुतींचा अभिप्राय तुला सांगतों. बुद्धिमान् मुमुक्षूनें शास्त्रांचें अध्ययन व पुन: पुन: अभ्यास करून परब्रह्माचे ज्ञान झालें म्हणजे उल्केप्रमाणें त्यांचा ''त्याग करावा; ही एक श्रुति. ॥ ४५ ॥

ग्रन्थमभ्यस्य मेधावी ज्ञानविज्ञानतत्परः ।
पलालमिव धान्यार्थी त्यजेद्ग्रन्थमशेषतः ॥ ४६ ॥
दुसरी श्रुति असें म्हणते कीं, बुद्धिमान् मुमुक्षूनें शास्त्रांचा अभ्यास करून, धान्यार्थी जसा कोंडा टाकून देतो तद्वत् सर्व ग्रंथांचा त्याग करावा. ॥ ४६ ॥

तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः ।
नानुध्यायाद्बहूञ्छब्दान्वाचो विग्लापनं हि तत् ॥ ४७ ॥
तिसरी श्रुति म्हणते कीं, त्या एका आत्म्याला मात्र जाणून धीर पुरुषाने बुद्धीचा निश्चय करावा. पुष्कळ शब्दांचे अध्ययन करण्यांत कांहीं अर्थ नाही. उगीच वाणीला श्रम मात्र होतों. ॥ ४७ ॥

तमेवैकं विजानीत ह्यन्या वाचो विमुञ्चथ ।
यच्चेद्वाङ्मनसी प्राज्ञ इत्याद्याः श्रुतयः स्फुटाः ॥ ४८ ॥
चौथी म्हणते कीं, त्या आत्म्याला मात्र नीट जाणून घ्या. आत्मविचारावांचून इतर भाषणच सोडून द्या. वाणी आणि मन यांचें नियमन करावें. इत्यादि श्रुतींची स्फुट वचनें आहेत. ॥ ४८ ॥

अशास्त्रीयमपि द्वैतं तीव्रं मन्दमिति द्विधा ।
कामक्रोधादिकं तीव्रं मनोराज्यं तथेतरत् ॥ ४९ ॥
शि० - एथवर शास्त्रीय द्वैत झालें. आता अशास्त्रीय द्वैताविषयी कांहीं सांगावें. गु० - अशास्त्रीय द्वैतामध्ये आणखी तीव्र आणि मंद असे अवांतर दोन भेद आहेत. कामक्रोधाधिक जे मनोविकार ते तीव्र आणि मनोराज्य हें मंद होय. ॥ ४९ ॥

उभयं तत्त्वबोधात्प्राङ्निवार्यं बोधसिद्धये ।
समः समाहितत्वं च साधनेषु श्रुतं यतः ॥ ५० ॥
शि० - मग या अशास्त्रीय द्विविध द्वैतांचा त्याग केव्हां करावा ? गु० - ज्ञानप्राप्ति होण्याकरितां, या दोन्ही द्वैतांचा त्याग तत्त्वज्ञानापूर्वीच केला पाहिजे. कारण शांति व समाधि ही श्रुतींत ब्रह्मज्ञानाच्या साधनांमध्ये गणलीं आहेत ॥ ५० ॥



बोधादूर्ध्वं च तद्धेयं जीवन्मुक्तिप्रसिद्धये ।
कामादिक्लेशबन्धेन युक्तस्य न हि मुक्तता ॥ ५१ ॥
शि० - तर मग तत्त्वज्ञानानंतर त्याचा स्वीकार करावा असें होतें काय ? गु- अरे पूर्वी त्याग करावा.असें म्हटल्यावर नंतर त्याचा स्वीकार करावा कीं काय ? जीवन्मुक्ति संपादन करण्याकरिता तत्त्वज्ञानानंतरही त्याचा त्याग केलाच पाहिजे. कारण कामक्रोधादि क्लेशबंध ज्याला आहेत त्याला जीवन्मुक्ति कधीही प्राप्त होणार नाहीं. ॥ ५१ ॥

जीवन्मुक्तिरियं मा भुज्जन्माभावे त्वहं कृती ।
तर्हि जन्मापि तेऽस्त्येव स्वर्गमात्रात्कृती भवान् ॥ ५२ ॥
शि० - जर तत्त्वज्ञानानें मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होतो असा सिद्धांत आहे, तर तितक्यानेंच कृतार्थता होते; मग आणखी जीवन्मुक्ति ती कशाला पाहिजे ? ती नसली तरी चालेल. गु० - ऐहिक भोग नाहींसे होतात या भयानें जर तुला जीवनमुक्तीचा कंटाळा आला तर पुढील जन्मांतील सुखोपभोग अंतरतील. म्हणून पुनर्जन्माचीही इच्छा कर. जीवन्मुक्ति जर नको तर तुला विदेहमुक्ति तरी कशाला पाहिजे. जन्म असेना बापडा. यज्ञादिकेंकरून स्वर्गप्राप्ति मिळवून धन्य हो म्हणजे झालें. ॥ ५२ ॥

क्षयातिशयदोषेण स्वर्गो हेयो यदा तदा ।
स्वयं दोषतमात्मायं कामादिः किं न हीयते ॥ ५३ ॥
शि० - स्वर्गांतील सुख नित्य नाहीं, तर त्याला क्षय व वृद्धि आहे, म्हणून स्वर्ग त्याज्य आहे, गु० - क्षयवृद्धिरूप दोषांमुळे जर स्वर्ग त्याज्य आहे, तर मूर्तिमंत केवळ दोषच असे जे कामक्रोधादिक त्यांचा त्याग कां बरें करूं नये. ॥ ५३ ॥

तत्त्वं बुद्ध्वापि कामादीन्निःशेषं न जहासि चेत् ।
यथेष्टाचरणं ते स्यात्कर्मशास्त्रातिलङ्घिनः ॥ ५४ ॥
शि० - एकदां तत्त्वज्ञान झाल्यानंतर ऐहिक भोगापुरते कामादिक जरी उत्पन्न झाले तरी काय नड आहे ? गु० - बाबारे, जर' विषयलोभ न सोडशील तर विधिनिषेधशास्त्राचें उल्लंघन होऊन मनास वाटेल तसें आचरण करून अगदीं बहकशील. ॥ ५४ ॥

बुद्धाद्वैतसतत्त्वस्य यथेष्टाचरणं यदि ।
शुनां तत्त्वदृशां चैव कोभेदोऽशुचिभक्षणे ॥ ५५ ॥
शि० - ज्ञान्यानें यथेष्टाचरण केलें म्हणून काय झालें ? गु० - सुरेश्वराचार्य असें म्हणतात कीं, अद्वैततत्वाचा बोध होऊन देखील जर मनुष्य यथेष्टाचरणांत पडला, तर तो अभक्ष्य देखील भक्षण करील. काय पाहिजे तें करील, मग तसें झाल्यावर त्याला आणि कुत्र्याला भेद काय राहिला. शि० - मग काय झाले ? ॥ ५५ ॥

बोधात् पुरा मनोदोषमात्रात्क्लिष्टोऽस्यथाधुना ।
अशेषलोकनिन्दा चेत्यहो ते बोधवैभवम् ॥ ५६ ॥
गु० - अहाहा ! तुझ्या ह्या ज्ञानाचें वैभव काय सांगावे रे ! तत्त्वज्ञान होण्यापूर्वी काक्रोधादि क्लेश मात्र भोगावे लागले, आणि आता तर ज्ञान झाल्यावर सर्व लोकांकडून छी थू म्हणून घ्यावें लागेल. वाहवारे वाहवा. ॥ ५६ ॥

विड्वराहादितुल्यत्वं मा काङ्क्षीस्तत्त्वविद् भवान् ।
सर्वधीदोषसंत्यागाल्लोकैः पूज्यस्व देववत् ॥ ५७ ॥
शि० - मग आपलें म्हणणें काय तें तरी समजू द्या ! गु० - बाबारे आमचें म्हणणें इतकेंच कीं, तूं आतां तत्त्ववेत्ता झालास त्याअर्थी दुकरासारखा वागण्यास इच्छूं नको. कामक्रोधादिक बुद्धीचे दोष काढून टाक; आणि सर्व लोकांकडून देवासारखी पूजा घे. ॥ ५७ ॥

काम्यादिदोषदृष्ट्याद्याः कामादित्यागहेतवः ।
प्रसिद्धा मोक्षशास्त्रेषु तानन्विष्य सुखी भव ॥ ५८ ॥
शि० - ते दोष काढून टाकण्यास उपाय कोणता ? गु० - विषयदोषदर्शनादि उपाय योजले असतां कामक्रोधादिकांचा त्याग होतो. हे उपाय मोक्षशास्त्रांत प्रसिद्ध आहेत, त्यांचा चांगला शोध करून सुखी हो. ॥ ५८ ॥

त्यज्यतामेष कामादिर्मनोराज्ये तु का क्षतिः ।
अशेषदोषबीजत्वात् क्षतिर्भगवतेरिता ॥ ५९ ॥
शि० - कामादिक विकारांपासून मोठमोठे अनर्थ होतात, म्हणून त्यांचा त्याग केला पाहिजे हें योग्य आहे. परंतु मनोराज्य असल्यानें काय हानि आहे ? गु० - बाबारे कामादिक परवडले पण मनोराज्य नको. तें तर सर्व दोषांचें मूळ होय. म्हणून त्याचा त्याग अगदीच केला पाहिजे. त्यापासून मोठी हानि आहे, असें भगवंतांनीं अर्जुनास सांगितले आहे. ॥ ५९ ॥

ध्यायते विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६० ॥
भगवंतांनी काय सांगितले ? गु० - भगवद्वाक्य असें आहे कीं, विषयाचें जे चिंतन त्यापासून संसर्ग घडतो. संसर्गापासून काम, कामापासून क्रोध, क्रोधापासून मोह आणि मोहापासून शेवटीं नाश होतो. एवढ्या अनर्थास कारण मनोराज्य होय. ॥ ६० ॥



शक्यं जेतुं मनोराज्यं निर्विकल्पसमाधितः ।
सुसम्पादः क्रमात्सोऽपि सविकल्पसमाधिना ॥ ६१ ॥
शि० - बरें पण हें मनोराज्य जिंकावे कसे ? गु० - निर्विकल्प समाधीच्या योगानें हे जिंकतां येते. हा निर्विकल्प समाधि साधण्यास आधीं सविकल्प समाधीचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे हखू हळू तो साध्य होतो. ॥ ६१ ॥

बुद्धतत्त्वेन धीदोषशून्येनैकान्तवासिना ।
दीर्घं प्रणवमुच्चार्य मनोराज्यं विजीयते ॥ ६२ ॥
शि० - परंतु हा समाधि साधण्यास तरी अष्टांगयोग केला पाहिजे. पण तो ज्याला साध्य होत नाही त्यानें काय करावें ? गु० - मनोराज्य जिंकण्यास आणखी एक उत्तम साधन आहे, ज्याला चांगलें तत्त्व समजले आहे, व ज्याच्या मनांतील कामक्रोधादिक दोष जाऊन मन अगदी स्वच्छ झालें आहे. अशा पुरुषानें एकांतीं बसून गुरूपदिष्ट प्रणवाचा दीर्घ उच्चार केला असता मनोराज्य नाहींसें होतें. ॥ ६२ ॥

जिते तस्मिन् वृत्तिशून्यं मनस्तिष्ठति मूकवत् ।
एतत्पदं वशिष्ठेन रामाय बहुधेरितम् ॥ ६३ ॥
शि० - बरें; या रीतीनें मनोराज्य जिंकल्यानंतर पुढे काय होतें ? गु० - ज्याप्रमाणे मुका वाग्व्यवहाररहित होऊन उगाच बसतो, त्याप्रमाणें मनोराज्य जिंकलें म्हणजे मन सर्वव्यापाररहित होऊन उगीच बसतें. या दशेचे वर्णन वसिष्ठानें रामचंद्रास पुष्कळ प्रकारें करून दाखविले आहे ॥ ६३ ॥

दृश्यं नास्तीति बोधेन मनसो दृश्यमार्जनम् ।
सम्पन्नं चेत्तदोत्पन्ना परा निर्वाणनिर्वृतिः ॥ ६४ ॥
शि० - वसिष्ठ ऋषींनी काय सांगितलें आहे ? गु० - वसिष्ठ म्हणतात कीं, आत्म्यांवाचून दुसरा दृश्य पदार्थच नाहीं, असा पक्का निश्चय करून सर्व दृश्याचें लयसाक्षित्व संपादन केलें असतां निरतिशय मोक्षसुखाची प्राप्ति होते. ॥ ६४ ॥

विचारितमलं शास्त्रं चिरमुद्ग्राहितं मिथः ।
सन्त्यक्तवासनान्मौनादृते न्यस्त्युत्तमं पदम् ॥ ६५ ॥
कितीही शास्त्रें धुंडाळिलीं, व कितीही वादविवाद केला, तरी शेवटीं सर्वांचा फलितार्थ म्हणून इतकाच कीं, सकल वासनांचा त्याग करून मनाची तूष्णीं स्थिति संपादन केल्यावांचून उत्तम पदाची प्राप्ति होत नाहीं. ॥ ६५ ॥

विक्षिप्यते कदाचिद्धीः कर्मणा भोगदायिना ।
पुनः समाहिता सा स्यात्तदैवाभ्यासपाटवात् ॥ ६६ ॥
शि० - अशी मनाची निर्विकल्प स्थिति होऊनही भोगदायक प्रारब्धकर्माच्या योगानें पुन: विक्षेप झाला असता त्याचा परिहार कसा करावा ? गु० - त्याला दुसरा उपाय नाहीं. पुन: पुन: अभ्यास करून चित्त स्थिर करावें. ॥ ६६ ॥

विक्षेपो यस्य नास्त्यस्य ब्रह्मवित्त्वं न मन्यते ।
ब्रह्मैवायमिति प्राहुर्मुनयः पारदर्शिनः ॥ ६७ ॥
ज्याच्या चित्ताला कधीही विक्षेप होत नाहीं तो ब्रह्मवेत्ता म्हणणें देखील औपचारिकच. वास्तविक तो ब्रह्मच आहे, अंसें वेदांत पारंगत ऋषि म्हणतात. ॥ ६७ ॥

दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवलरूपतः ।
यस्तिष्ठति स तु ब्रह्मन्ब्रह्म न ब्रह्मवित्स्वयम् ॥ ६८ ॥
याविषयीं वसिष्ठांनीहीं असेंच सांगितलें आहे. तें असें म्हणतात कीं, मला ब्रह्म समजलें, व न समजलें असें जें ब्रह्माचे ज्ञान आणि अज्ञान या दोहोंचाही त्याग करून जो केवळ अद्वैत चैतन्य मात्र होऊन जातो, तो वास्तविक ब्रह्मच होय; ब्रह्मवेत्ता नव्हे. ॥ ६८ ॥

जीवन्मुक्तेः परा काष्ठा जीवद्वैतविवर्जनात् ।
लभ्यतेऽसावतोऽत्रेदमीशद्वैताद्विवेचितम् ॥ ६९ ॥
इति द्वैतविवेकनाम चतुर्थः परिच्छेदः ॥ ४ ॥
जीवद्वैताच्या अत्यंत त्यागाने जीवन्मुक्तीची परा काष्ठा ( शेवटची स्थिति) प्राप्त होते. या कारणास्तव आज आम्हीं ईशसृष्टीपासून जीवसृष्टि निराळी करून दाखविली. ॥६९॥
द्वैतविवेक समाप्त