॥ पंचदशी ॥


प्रस्तावना

१) पंचदशीच्या लेखकांचा परिचय -

पूर्वीचे ग्रंथकर्ते स्वतः विषयी फार कमी लिहीत असत व त्यांच्याविषयी लेखनही कमीच असे. जे होते, तेही काळाच्या ओघात किती नष्ट झाले असेल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाच्या संदर्भातील सनावळ्या अंदाजाने जुळवून काही कालनिर्णय करावे लागतात. ग्रंथाच्या वाचकाला लेखकाविषयी आदरयुक्त कुतूहल असणे स्वाभाविक व स्वागतार्ह असले तरी ते कुतूहल शमण्याची साधने फारच तुटपुंजी आहेत. तथापि उपलब्ध माहिती संक्षेपाने देण्याचा प्रयत्न केला आहे.

यवनांची दक्षिणेकडील सैनिकी आक्रमणे व जुलमी धर्मपरिवर्तने ऐन भरात असतांना, संन्यस्त वृत्तीने राहिलेल्या माधवाचार्यांनी (भावी विद्यारण्य) स्वतःचे श्रीभुवनेश्वरीच्या मंदिरात चाललेले तप थांबवून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. विजयनगरच्या पराभूत साम्राज्यातील हरिहर नावाच्या पराक्रमी पुरुषाला गादीवर बसवून पुन्हा राज्याची घडी नीट बसवून दिली. पुढे ते इ. स. १३८० मध्ये शृंगेरी मठाचे पीठस्थ शंकराचार्य झाले व त्यांनी 'विद्यारण्यतीर्थ' हे नाव घेतले. त्यावेळी त्यांचे वय ८५ वर्षांचे होते. त्या वयात त्यांनी पंचदशी हा महान ग्रंथ लिहावयास घेतला पण सहा प्रकरणे लिहून झाल्यावर त्यांनी देह ठेवला. पुढील ९ प्रकरणे त्यांचे श्रीगुरू श्रीभारतीतीर्थ ह्यांनी लिहून ग्रंथ पूर्ण केला अशी आख्यायिका आहे. विद्यारण्यस्वामींच्या नावाने सुमारे सोळा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यातील वैयासिक न्यायमाला, विवरणप्रमेय, जीवन्मुक्तीविवेक इत्यादी ग्रंथ अधिक प्रसिद्ध आहेत.

इ. स. १२९५ मध्ये जन्म व १३८६ मध्ये समाधी असा निष्कर्ष श्रीविद्यारण्यस्वामींच्या संदर्भात पं. द. वा. जोग ह्यांनी काढला आहे.

पंचदशी ग्रंथामध्ये अन्य वेदान्तपर ग्रंथांचा उल्लेख आहे व त्या ग्रंथांतून काही भाग अत्यल्प प्रमाणात पंचदशी ग्रंथामध्ये स्वीकारलाही आहे.

२) पंचदशी ग्रंथात स्वीकारलेले प्रमुख ग्रंथ व त्यांचा किंचितू परिचय पुढीलप्रमाणे आहे -

१ - संक्षेपशारीरक - सर्वज्ञात्ममुनी हे ह्या ग्रंथाचे लेखक असून या ग्रंथावर तत्त्वबोधिनी, सुबोधिनी इत्यादी टीका आहेत. त्यातील एक टीकाकार मधुसूदनसरस्वती हे अद्वैतसिद्धीचे लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. संक्षेपशारीरकाचे चार अध्याय असून ह्मा ग्रंथाचे दहा विशेष प्रस्तावनेत सांगितले आहेत. अहमदाबाद येथील स्वामी सर्वानंदजी महाराज ह्यांनी ह्या ग्रंथाचे संपादन करून त्यावर हिंदी भाषेत टीका लिहिली आहे.

२ - खंडन खण्ड खाद्य - श्रीहर्ष ह्यांनी ह्या ग्रंथाची रचना केली असून त्यावर स्वामी हनुमानदासजी षट्शास्त्री ह्यांची हिंदी टीका उपलब्ध आहे. ह्या ग्रंथात जाणीवपूर्वक आडवळणी मांडणी करून वितंडा ह्या वादपद्धतीचा स्वीकार केला आहे. ह्यामध्ये स्वतःचे मत बिलकूल न मांडता इतर सर्व मतांचे न्यायशास्त्राच्या आधाराने खण्डन केले असून प्रमुख प्रतिवादी नैय्यायिक आहेत. या ग्रंथात नैय्यायिकांनी मांडलेल्या प्रस्थापित संकल्पनांना हादरे देऊन त्यांच्या मांडणीमध्ये आक्षेपांचे दुर्लंघ्य अडथळे उभे केले आहेत.

३ - विवरणप्रमेयसग्रह - हा ग्रंथ श्रीविद्यारण्य स्वामींचाच असून ते पंचपादिका ह्या ग्रंथाचे व्याख्यान आहे. प्रस्थानत्रयीतील ब्रह्मसूत्राच्या पहिल्या चार सूत्रांवरील ही टीका आहे. सूत्र व त्यावरील वर्णके असे ह्या ग्रंथाच्या रचनेचे स्वरूप आहे. सुमारे नऊशे पृष्ठांच्या ह्मा ग्रंथाचे हिंदी भाषानर पं. ललिताप्रसाद डबराल ह्यांनी केले आहे.

४ - योगवासिष्ठ - हा ग्रंथ श्रीवसिष्ठांनी श्रीरामांना उपदेशिला आहे. अनेक आख्यानांच्या आधारे यात तत्त्वज्ञान स्पष्ट केले असून व्यवहार सांभाळून जीवन्मुक्ताचे जीवन कसे जगता येते हे सांगितले आहे

३) पंचदशीचे काही टीकाकार -

श्रीरामकृष्ण यति व अच्युतराय मोडक ह्यांच्या संस्कृत टीका असून श्री. बापटशास्त्री व पं. द. वा. जोग ह्यांच्या मराठी टीका आहेत. श्री. पीतांबरजी ह्यांची हिंदी टीका आहे. पुढील सर्वच टीकाकार मागील टीकाकारांच्या खांद्यावर उभे राहून वाटचाल करतात. दोन्ही मराठी टीका पन्नास वर्षांपूर्वीच्या असून त्यात वाचकाला त्याकाळची भाषा व त्यातील संदिग्धता ह्यामुळे काही अडचणी जाणवतात. विद्वत्ताप्रचुर भाषा नव्या वाचकांना समजणे कठीण वाटते. मोठ्या पंडितांना त्यांच्या मताने सोप्या असलेल्या बाबींचे स्पष्टीकरण अनावश्यक वाटते. त्यामुळे नवख्या वाचकाच्या दृष्टीने संदिग्धता राहून जाते. ह्या टीकेत या दोन्ही बाबी विचारात घेऊन रचना केली आहे. यशापयश वाचक जाणे !

४) पंचदशीच्या श्लोकांची रचना -

पंचदशीचे बरेचसे श्लोक उपनिषदांच्या मंत्रांवर आधारलेले आहेत. मंत्रांचा काही भाग घेऊन त्याच्या आधारे श्लोकरचना केली आहे. काही श्लोक उपनिषदातून जसेच्या तसे स्वीकारले असून श्रीमद् भगवद्‍गीतेचे व योगवासिष्ठाचेही काही श्लोक जसेच्या तसेच घेतले आहेत. बहुतेक सर्व तत्त्वज्ञान शांकर - अद्वैत वेदांतानुसारी आहे. उपनिषदे व गीताश्लोकांचा तपशील जेथल्या तेथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

५) श्रीपंचदशी ग्रंथाचे महत्त्व -

परमार्थशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. त्याविषयी बरेच समज-गैरसमज श्रद्धावन्त व नास्तिकातही असतात. डोळसपणे साधना करावयाची असेल तर ह्या शास्त्राची स्पष्ट कल्पना असणे चांगले. साधन करतांना व ते पूर्ण झाल्यावर काय होते व काय होत नाही ह्याची कल्पना नसेल तर जे होतच नाही त्याची वाट पाहण्यात वेळ व उत्साह संपतो. जे झाले पाहिजे ते ठाऊक नसेल तर साधना योग्य मार्गाने व वेगाने होत नाही. ह्मा ग्रंथात ह्या दोन्ही बाबींचा तपशीलवार व सुस्पष्ट विचार केला आहे. परमार्थ व पारमार्थिक ह्यांच्यासंबंधी अनेकांच्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. अशा अनेकांच्या अनेक प्रतिमा असल्याने गोंधळ वाढतो. खरे काय आहे ते पंचदशीसारखे ग्रंथ वाचल्याशिवाय कळत नाही. गीता, उपनिषदे, संतवाङ्‍मय इत्यादी ग्रंथातून व त्यांच्या टीकांमधून हे महत्त्वाचे विषय विखुरलेल्या व संदिग्ध स्थितीत असतात. त्या सर्वांचा एकत्रित विचार साधकाला फार उपयुक्त असतो.

६) श्रीपंचदशीची रचना -

पंचदश म्हणजे पंधरा. विवेक, दीप व आनंद अशी तीन मुख्य प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणाचे पाच भाग आहेत. असे एकूण पंधरा भाग मिळून ह्मा ग्रंथाची रचना केली आहे. विवेक म्हणजे शास्त्रशुद्ध विचारपूर्वक केलेली निवड. दीप म्हणजे विशिष्ट विषयावर टाकलेला प्रकाश. आनंद हे ब्रह्माचे स्वरूप असून त्याचे प्रकार व साधने ह्या प्रकरणात सांगितली आहेत.

संदर्भ - श्रीकृष्ण देश्मुख यांचे ’पंचदशी भावदर्शन’

GO TOP