श्रीहंसराजस्वामी - संक्षिप्त परिचय


मराठीतील विचार विग्रही संतांची एक तेजस्वी परंपरा आहे. त्यांच्या लीलांपेक्षा त्यांनी आपल्यामागे पुढील पिढ्यांसाठी जे शाश्वत स्वरूपाचे विचारधन ठेवलेले आहे त्यासाठी ते आज ओळखले जातात. या संतकवि परंपरेतील हंसराजस्वामींनी त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण ग्रंथरचनांमुळे स्वतःचे एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांचे चरित्रही त्यांच्या ग्रंथांइतकेच उद्बोधक आहे.

स्वामींचा जन्म मराठवाड्यातील परभणी या गावी सन् १८०५ मध्ये झाला, त्यांचे मूळचे नाव नारायण. त्यांचे आजोबा रामचंद्रपंत हे सावकार असून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. त्यांचे वडील गंगाधरपंत हे सावकारी न करता परभणी येथेच नोकरी करत होते. त्यांच्या आईचे नाव रेणुकाबाई. नारायण हा या दांपत्याचा मधला मुलगा. नारायणाच्या जन्मापासून या कुटुंबाची ग्रहदशा फिरली व गंगाधरपंतांची नोकरी सुटली. त्यांच्यावर उपजीविकेच्या शोधात गावोगाव भटकण्याची पाळी आली. या भ्रमंतीत असताना हे कुटुंब रेणुकाबाईंच्या माहेरी कोयाळ येथे आले. तेथे ता काळच्या रीतीप्रमाणे नारायणाचे लग्न बालवयातच तेथील कुलकर्ण्यांच्या मुलीशी लावून देण्यात आले. त्यांच्या पत्नीगचे सासरचे नाव लक्ष्मी असे होते. ही लक्ष्मी आपल्या पावलांनी घरात आली. पण त्या अगोदरच लक्ष्मीदेवीने त्या घरातून काढता पाय घेतला होता. त्यातच भर म्हणून की काय, नारायणाचा थोरला भाऊ पत्नी सह वेगळे घर करू लागला. त्याच्या रोजगारीची जी थोडीफार आवक होती, तीही बंद पडली. त्यामुळे गंगाधरपंतांची विवंचना अधिकच वाढली. तेव्हां कुमारवयाच्या नारायणाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि म्हणून द्रव्यार्जन करून कुटुंबाला मदतीचा हात देता यावा, म्हणून त्याने घराबाहेर पडून थेट सुरत गाठले. तेथे एका नातेवाईकाने केलेल्या द्रव्य साहाय्याने थोडासा व्यापार करून काही पैसा मिळवला. तो घेऊन गावाकडे येत असता ते चोरांनी लुबाडले. कर्माने मिळवले होते, दैवाने ते नेले. त्यानंतर पुन्हा प्रयत्ना करावा, म्हणून नारायण ग्वाल्हेरला गेला. आईची रक्मा नावाची बालमैत्रीण तेथील राजघराण्यात दिली होती. तिच्या ओळखीने तेथील पागेची नोकरी मिळवायचा त्याने प्रयत्ना केला. पण तिच्या दिवाणाच्या आडकाठीमुळे त्या नोकरीचे काही जमू शकले नाही. अखेर निराश होऊन नारायण परतला. ग्वाल्हेरला मिळवलेले थोडेफार द्रव्यही त्याने वाटेत एका गरीब ब्राह्मणाला देऊन टाकले.

परभणीला आल्यानंतर तेथील पागेचे काम त्याला मिळाले. काही दिवसांनंतर हद्रे आणि अर्धापूर तालुक्याच्या सरदेशपांडेगिरीचे कामही त्याला मिळाले. पण तीही नोकरी फार काळ टिकली नाही. पण नारायणाला त्याचे काही वाटले नाही. कारण प्रपंचाविषयी त्याची वृत्ती मुळातच विरक्त होती. द्रव्यलोभ त्याला नव्हताच. त्याचे चित्त परमार्थाकडे जास्त ओढ घेऊ लागले. त्याला गुरुप्राप्तीची तळमळ लागली. मनाच्या या अवस्थेत असतानाच पाथरी येथे त्याची व एका संन्याशाची गाठ पडली. त्याने “वसमतचे लक्ष्मणराव तुला गुरुपदेश देतील,” म्हणून सांगितले. “लक्ष्मणराव हे एक सरकारी नोकरीतले गृहस्थ, ते आपल्याला काय गुरुमंत्र देणार ?” असा एक विकल्प नारायणाच्या मनात येऊन गेला. त्याने तो संन्याशाला सांगितला. तेव्हा त्याने “साखर खाणार्‍याने वाण्याच्या रूपाकडे पाहू नये.” अशा मार्मिक उत्तराने त्याचे समाधान करून त्यास लक्ष्मणरावांकडे पाठविले. तेव्हा नारायणाने लक्ष्मणरावांकडे जाऊन गुरुमंत्राची याचना केली. त्यांनी आरंभी चालढकल केली. पण त्याची निष्ठा व तळमळ पाहून त्यास शेवाळे येथे उपदेश दिला. हा गुरु अनुग्रह साधारणपणे १८२७-२८ साली झाला असावा.

लक्ष्मणराव हे श्रीसमर्थ रामदास – उद्धव – माधव – रुद्रराम – नागनाथ – लक्ष्मण या परंपरेतील समर्थांपासून सहावे पुरुष होत. आदिनारायणाने हंसरूपाने ब्रह्मदेवाला उपदेश केला व त्याचे अज्ञान दूर केले, ब्रह्मदेवाने तेच ज्ञान वसिष्ठांना दिले व वसिष्ठांनी ते प्रभु रामचंद्रास दिले, प्रभु रामचंद्र हे समर्थांचे गुरू होत. अशा तर्हे्ने आदिहंस गुरूपासून सुरू झालेल्या ज्ञानपरांपरेचे समर्थ व उद्धवादी त्यांचे शिष्य प्रशिष्य हे वारसदार ठरतात. ब्रह्मविद्येची ही अखंड परंपरा जोपासणार्यात या संप्रदायाला तो हंसापासून सुरू झाला म्हणून ’हंस संप्रदाय’ असे नाव हंसपद्धतिकारांनी दिले आहे. कलियुगातले समर्थ हे पहिले हंस असून लक्ष्मणहंस हे सहावे आणि नारायण हंस हे सातवे हंस होत. हंस म्हणजे मूल हंसप्रेरित अद्वैतज्ञानाची अधिकारी आणि गुरुपदवी प्राप्त करून स्वशिष्यांमध्ये अद्वैतज्ञानाचा प्रसार करणारी थोर विभूती होय. हंसराजस्वामींच्या मूळ नारायण या नावाऐवजी हंसराज हे नाव रूढ होण्यामागचे हे स्पष्टीकरण हंसपद्धतिकारांनी दिले आहे.

पुढे नारायण हंसांना वर्‍हाडात अनसिंग येथे सरदेशपांडेगिरीची नोकरी मिळाली. पण त्यांनी तीनच वर्षे ती नोकरी केली, नोकरीतून त्यांचे मन उडून गेल्यामुळे त्यांनी तिचा राजीनामा दिला व ते थेट शेवाळ्यास लक्ष्मण हंसांकडे आले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईही त्यांच्याबरोबर आल्या. (१८३०). लक्ष्मण हंसांनी नारायण हंसांना तेथील एका दुकानदाराकडे हिशेब लिहिण्याचे काम मिळवून दिले. मिळकत थोडी असली तरी गुरुसांनिध्याचा लाभ झाल्यामुळे ते आनंदात होते, शेवाळ्यात दोन वर्षे मोठ्या आनंदात गेली. या अवधीत लक्ष्मीबाईंना दिवस गेले. पण सातव्या महिन्यातच त्या प्रसून झाल्या. पुत्र झाला पण तो मृत अवस्थेत होता. लक्ष्मीबाईही पाचव्या दिवशी मृत्यू पावल्या. नारायण हंसाच्या गळ्यात जो काही प्रपंचाचा पाश अडकला होता, तोही तुटून गेला, तेव्हा त्यांनी गुरूंची अनुज्ञा घेऊन संचारास प्रारंभ केला (१८३२).

प्रथम ते माहुरास गेले. तेथे त्यांना श्रीदत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला. नंतर लक्ष्मणहंसांच्या आजाराचे वृत्त ऐकून ते परत शेवाळ्यास आले. तेथे गुरूंची त्यांनी उत्कृष्ट सेवा केली. याच मुक्कामात गुरूंच्या प्रेरणेने त्यांनी ’गुरुभक्तिसार’ नामक ग्रंथाची रचना केली. नंतर गुरूंची संमती घेऊन ते पुन्हा संचारास बाहेर पडले. ते फिरत फिरत डोमगावला आले. तेथून पंढरपूरला आले. तेथे जनार्दन उत्पात, सखारामबाबा डोमगांवकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्याचे पुढे स्नेहात रूपांतर झाले. तेथून सज्जनगडास जावे असे नारायण हंसांच्या मनात होते. पण समर्थांनीच एके रात्री त्यांना दर्शन दिले, पंढरपूरला असतानाच पूर्णाश्रमस्वामींचा व नारायण हंसांचा परिचय वाढला होता. हे स्वामी उत्तर हिंदुस्थानात जायला निघाले, तेव्हा नारायणहंसांनी त्यांच्याकडून, मनात येईल तेव्हा संन्यास घेता येईल, या हेतूने प्रैषोच्चार लिहून घेतला होता. स्वामी उत्तरेकडे निघून गेल्यानंततर थोड्याच दिवसांनी त्यांनी संन्यास घेतला व ते ’नारायणतीर्थ’ बनले. त्यांच्या या परमहंस दीक्षेमुळे त्यांना हंसराज म्हणू लागले, असे स्पष्टीकरण श्रीरघुनाथशास्त्री गोडबोले यांनी दिले आहे. पण ते पटणारे नाही. कारण स्वतः समर्थ व त्यांचे उद्धवादी शिष्य रामदासी असले तरी त्यांनाही हंसपद्धतिकारांनी ’हंस’ म्हणूनच संबोधले आहे.

संन्यास दीक्षेनंतर सखारामबाबा डोमगावकरांच्या आग्रहावरून हंसराजस्वामी डोमगावला गेले. तेथे त्यांचे वास्तव्य सन् १८३३ पासून सन् १८४० पर्यंत होते. या काळात त्यांना बर्‍यापैकी स्वास्थ्य अनुभवता आले. त्यामुळे त्यांचे संकेत कुबडी, आगमसार, पूर्वारंभ गाथा व सदाचार असे चार ग्रंथ लिहून झाले.

सन् १८४० च्या चातुर्मासात सखारामबाबा कीर्तनासाठी म्हणून हैद्राबादला गेले आणि तेथेच ते समाधिस्थ झाले. त्यामुळे हंसराजस्वामींनी डोमगाव कायमचे सोडले आणि ते परांड्यास राहू लागले. सम् १९४० ते १८५५ ही पंधरा वर्षे त्यांचे वास्तव्य काही अपवाद सोडल्यास परंडा येथेच होते.

परंडा येथे प्रथम त्यांचे वास्तव्य केशवराजाच्या मंदिरात होते, त्यानंतर ते राममंदिरात राहू लागले. त्यानंतर त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी राममंदिराच्या मागच्या बाजूस मोकळी जागा घेऊन तेथे मठ बांधून त्यांची राहण्याची व्यवस्था केली. तेथे त्यांना ध्यानासाठी गुंफा बांधली. तिच्या पूर्वभागात मारुतीची स्थापना केली. तेथेचे ते अखेरपर्यंत राहिले.

केशवराजाच्या मंदिरात राहत असताना त्यांनी मनाबाई रजपूत या निरक्षर स्त्रीला लिहायला, वाचायला शिकवून तिला वेदान्त शिकण्यासाठी आख्याने रचली. तोच ’कथा कल्पलता’ हा ग्रंथ होय. राममंदिरात राहत असताना (१८४०-४७) त्यांनी चूडालाख्यान, वेद नावाची पदे, शिवगीतेवरील ’वेदेश्वरी’ टीका हे ग्रंथ रचले. मठात रहायला आल्यानंतर वाक्यवृत्ति टीका, ईशावास्य उपनिषदावरील वेदाज्ञा ही टीका, अनुभवामृत, तत्त्वझाडा इ. ग्रंथ रचले.

१८५० मध्ये त्यांनी रघुनाथ भास्कर गोडबोले यांना गुरुमंत्र दिला. सन् १८५४ मध्ये माघी पौर्णिमेस ते एकाएकी ध्यानस्थ झाले. आणि ध्यान उतरल्यानंतर पुढेही अबोलच राहिले. फाल्गुनी पौर्णिमेस रघुनाथशास्त्री गोडबोले यांना बोलावून घेतले आणि त्यांच्याशी ३६ तास संवाद केला. सन् १८५५ मध्ये वैशाख शु. ८ ला पहाटे शुचिर्भूत होऊन आपण चौरंगावर बसले, त्यांचे शिष्य बाबाजी जोशींना स्वतःची पूजा करावयास सांगितले. त्यानंतर-

"ब्राह्मी मुहूर्त उत्तम काळ । मुखासी पाहत असतां सकळ ।
तंव एकाएकी अंतराळ । तेजोभरित जाहले ॥" (हं प. १३-८-३६)

त्या तेजाने सर्वांचे डोळे दिपले. अर्ध्या घटकेनंतर डोळे उघडून पाहतात तो सद्‌गुरू हंसराजस्वामी आत्मस्वरूपात विलीन झाल्याचे सर्वांना समजले. असा त्यांच्या निर्वाणाचा क्षण हंसपद्धतिकारांनी शब्दबद्ध करून ठेवला आहे.

हंसराजस्वामींचे वरील चरित्र पाहता त्यांना शास्त्रशुद्ध अध्ययन करायला वेळच मिळाला नाही असे दिसते. परंतु अध्यात्मशास्त्राकडे त्यांचा ओढा लहानपणापासूनच होता. भगवद्‌गीता, शिवगीता, विष्णुसहस्रनाम हे ग्रंथ त्यांच्या नित्य पठनात होते. विवेक सिंधू, एकनाथी भागवत, दासबोध, दीपरत्नाणकर इ. ग्रंथांचे त्यांनी वाचन केले होते. अशा नित्यनियमाने केलेल्या ग्रंथपठनामुळे स्वामी व्युत्पन्न झाले होते. त्यांची बुद्धीही तीव्र होती. रघुनाथशास्त्री गोडबोले लिहितात, “यांची बुद्धी इतकी विलक्षण तीव्र होती की, कोणताही विषय असो, एकदा नजरेखालून किंवा कानावरून गेला की पुरे. मग तो जातो कोठे ?” असे असल्यामुळे संजीवन कवी आश्चर्याने म्हणतात –

पहा व्युत्पत्ती काही नसता । वेदशास्त्रे निघती मुखता ।
सहा शास्त्र अधयन असता । तोही पुढे कुंठित ॥ - (हंसपद्धती ९-८-६७)

तेथेच चिमणकवी म्हणतात –
नारायण हंसस्वामींनी पहिली । रूपावळीही नाही म्हणितली ।
परी संस्कृत व्युत्पत्ती बाणली । आपोआप (हंसपद्धती ७-७-१२८)

हंसराज स्वामींची सर्व ग्रंथरचना डोमगाव, परंडा या भागातील वास्तव्याच्या काळात झाली. ते स्वतः मुक्तच होते. पण केवळ लोकानुग्रहाखातरच त्यांनी ग्रंथप्रपंच केला. त्यांच्या नावावर त्यांच्या चरित्रकारांनी जवळ जवळ सोळा ग्रंथांची नोंद केली आहे. त्यातील काही अद्यापी मिळालेलेच नाहीत, काही ग्रंथ अर्धवट अवस्थेत मिळालेले आहेत, काही प्रकाशित झालेले आहेत तर काही अजून प्रकाशनाची वाट पहात आहेत. याशिवाय स्वामींचे ’गुरुभक्तिसार’ व स्वात्मदर्शन’ हे ग्रंथ अजून मिळालेले नाहीत.

प्रकाशित ग्रंथ –

१) आगमसार (वेदान्तावर स्वतंत्र ग्रंथ) २) संकेत कुबडी (दासबोधातील संगती दाखविणारी चिंतनिका) ( ३) कथा कल्पलता (कथांद्वारे वेदान्त - एकूण १८ प्रकरणे असल्याची माहिती आहे पण त्यातील केवळ ८ प्रकरणे उपलब्ध/प्रकाशित आहेत) ४) सदाचार (श्रीशंकराचार्यांच्या ’सदाचार’ ग्रंथावरील ओवीबद्ध टीका) ५) वाक्यवृत्ती (श्रीशंकराचार्यांच्या ’लघुवाक्यवृत्ति’ वरील टीका) ६) वेदाज्ञा (ईशावास्य उपनिषदावरील टीका) ७) वेदेश्वरी (पद्मपुराणांतर्गत शिवगीतेवरेल बृहद् टीका) ८) चूडालाख्यान (योगवसिष्ठातील एका आख्यानावर आधारीत अभंगरचना) ९) वेद नावाची पदे; आणि १०) अनुभवामृत (ज्ञानेश्वरांच्या ’अमृतानुभव’ ग्रंथावर समच्छंदी टीका) – या व्यतिरीक्त १) पूर्वारंभ गाथा, व २) तत्त्वझाडा (गद्य) हे दोन ग्रंथ अजून अप्रकाशित आहेत.

वरील सर्व ग्रंथांतून स्वामींनी मराठी वाङ्म यात अपरिचित अशा विषयांवर लिहून नव्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्ना केला आहे. या ग्रंथांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व ग्रंथ वेदांत याच विषयावरचे आहेत. हंसराजस्वामी वेदान्ताचे गाढे अभ्यासक आणि प्रवक्ते होते. वेदान्ताखेरीज दुसरे काहीही लिहीत नसल्याची त्यांची प्रतिज्ञाच होती.

अखाद्या पतिव्रतेच्या निष्ठेने त्यांनी आपली वेदान्तनिष्ठा जपली आहे. वेदान्ताखेरीज दुसर्‍या कोणत्याही विचाराचे वा मार्गाचे समर्थन त्यांच्या ग्रंथात आढळणार नाही. त्यांच्या ग्रंथात नामदाखल कोणत्याही देवतेची स्तुती आढळणार नाही. एका सद्‌गुरूखेरीज दुसरे कोणतेही दैवत त्यांनी मानले नाही. सांख्य, योग, भक्ति या सर्व निष्ठा त्यांच्या वेदान्ताच्या भट्टीत एकरूप होतात. अशा तर्हेुची जाज्वल्य वेदान्तनिष्ठा मराठीत तरी कोणत्याही संत कवीने दाखविलेली नाही. या निष्ठेमुळेच ते स्वतःच्या ग्रंथकर्तृत्वाबद्दल सुद्धा मौन पाळून आहेत. कोणत्याही ग्रंथात त्यांनी स्वतःचा ग्रंथकर्ता म्हणून उल्लेख केला नाही, त्यांनी आपले बहुतेक सर्व ग्रंथ वेद या टोपणनावाने मुद्रांकित केले आहेत. त्यांच्या वेदेश्वरी, वेदाज्ञा, वेदनावाचे अभंग या ग्रंथनामांमध्ये हेच टोपण नाव अभिप्रेत आहे. चूडालाख्यानातील अभंगांमध्ये हीच नाम मुद्रा सामान्य अर्थाने येते.

स्वामींच्या बहुतेक ग्रंथामध्ये वेदान्ताची मांडणी अगदी मुद्देसूद आणि टप्प्याटप्प्याने केलेली असते. त्यांचे ग्रंथलेखन बह्वंशी शिष्य प्रबोधनासाठी असल्यामुळे त्यांच्या लेखनात हा गुण उतरला आहे असे दिसते. स्वामींच्या सर्व ग्रंथात वेदान्त प्रतिपादनाची एक शास्त्रीय पद्धत आढळते. बहुतेक सर्व ग्रंथात आरंभी अनुबंधचतुष्टयाची चर्चा असते. त्यानंतर वेदान्तातील ब्रह्म, माया, जीव, ईश्वर, पिंडब्रह्मांडाची रचना इ. विषयांचे अत्यंत सुबोध आणि सोदाहरण विवेचन आढळतें. प्रत्येक ग्रंथात याप्रमाणे ज्ञानखंड असतोच, नंतर उत्तरार्धात स्वरूपाच्या प्राप्तीसाठी वेगवेगळे अभ्यास सांगितलेले असतात. हा उपासना खंडही बहुतेक ग्रंथात असतोच. स्वामींच्या वेदान्ताचा मूलाधार शंकराचार्यप्रणीत वेदान्त हाच असला तरी अधिकारपरत्वे स्वामींनी त्याची मांडणी निरनिराळ्या प्रकारांनी केली आहे. स्वामींनी केलेले अभ्यासनिरूपण ही त्यांनी मराठी वाङ्मययाला दिलेली देणगी मानावी लागेल. त्यांच्या अभ्यासमीमांसेची बहुतेक सर्वच अभ्यासकांनी एकमुखाने प्रशंसा केली आहे.

आपल्या सर्वच संतांप्रमाणे हंसराजस्वामींनीही आपल्या काळातील परिस्थितीचे भान ठेऊन आपली ग्रंथरचना केली आहे. सभोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन करता, अज्ञानामुळे लोकांची कशी हानी होते हे त्यांच्या लक्षात आले होते. त्याबद्दल खंत वाटूनच त्यांनी ग्रंथरचनेचा एवढा मोठा खटाटोप केला. समाजात परमार्थाच्या नावाखाली क्रियाप्रधान मार्गाचे फारच स्तोम माजले होते. स्नानसंध्या, होमहवन, तीर्थयात्रा, वार्‍या, उपासतापास, व्रते, पारणी, उद्यापने, क्षुद्र देवांच्या उपासना, नवससायस यातच परमार्थ अडकून पडला होता. कोणालाही परमेश्वराचे खरे स्वरूप कळत नव्हते. चमत्कार, सिद्धी इ. जेथे दिसतील तेथे लोक वेड्यासारखे धावत होते. त्याचा गैरफायदा घेऊन भोंदू गुरू लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकत होते. त्यातल्या त्यात योगाभ्यासाच्या भोवती विशेष तेजोवलय निर्माण झाले होते. अशा या गोंधळाच्या परिस्थितीत हंसराजस्वामींना वेदान्ताची शिकवण यथार्थ स्वरूपात लोकांसमोर मांडण्याची गरज वाटली. वरील सर्व क्रियाप्रधान मार्गांचा स्पष्ट शब्दात निषेध करून “ज्ञानादेव तु कैवल्यम्” हा वेदान्त सिद्धान्त त्यांनी ठासून सांगितला. एखाद्या धर्मोपदेशकाच्या निष्ठेने आपल्या सर्व ग्रंथांतून त्यांनी याच सिद्धान्ताचा पाठपुरावा केला.


[ स्वामींच्या ’संकेत कुबडी’ या ग्रंथावरून ]


GO TOP