हरिवरदा

अध्याय १ ला

अध्याय २ रा

अध्याय ३ रा

अध्याय ४ था

अध्याय ५ वा


कृष्णदयार्णव चरित्र

माझे पूर्वज हरिनिकटीं । हरी रक्षी त्यां नानासंकटीं ।
मीहि ऐके हे कुळकटी । म्हणोनि पोटीं उत्कंठा ।।

ज्यांनीं तेराचौदा वर्षांइतक्या दीर्घ कालपर्यंत परिश्रम करून, विशेषतः पित्तातून रक्त पडून शरीराचा दाह होऊ लागला, या व्याधीला न जुमानता किंवा त्या व्याधीच्या परिहारार्थ औषध म्हणूनच एका प्रचंड ग्रंथाची रचना केली, त्या 'नरहरी' कवीचे म्हणजेच 'कृष्णदयार्णवानुचरांचें चरित्र थोडक्यांत पुढें दिलें आहे.

ह्या ग्रंथकर्त्यांचे देशावरील मूळ गांव कोपारूढ म्हणजे कोपर्डे हे होय. हे गांव सातारा जिल्ह्यांत साताऱ्यापासून दक्षिणेस तीस मैलांवर कऱ्हाड तालुक्यांत कृष्णा नदीचे कांठीं आहे. ह्या गावचे जें वतनदार जोशी-कुलकर्णी घराणे तें या कवीचे कुल होय. ह्यांचें गोत्र गौतम व शाखा माध्यंदिन. ह्या घराण्यांत शालिवाहन शकाच्या सोळाव्या शतकाच्या मध्यांत शंभुशर्मा नांवाचा विद्वान् ब्राह्मण होऊन गेला. शंभुशर्माचा पुत्र नारायण हा आपल्या बापापेक्षा अधिक विद्वान असून शिवाय अध्यात्मज्ञानसंपन्न होता. नारायणास पुष्कळ दिवस मूलबाळ नव्हतें. यामुळे त्याची बायको बहिणाबाई कष्टी असे. पुढें तिने एक तपपर्यंत अश्वत्थसेवा व ईश्वराराधन केल्यावर तिला एक मुलगा झाला. त्याचें नांव जनार्दन. थोडे दिवसांनीं जनार्दनाचे पाठीवर दुसरा मुलगा झाला. तोच प्रस्तुत चरित्राचा लायक नरहरी होय. हाच पुढें 'कृष्णदयार्णव' नामेंकरून विख्यात झाला. ह्या नरहरीचा जन्म शके १५९६ आनंद संवत्सरीं अक्षय्य तृतीयेस ( वैशाख शु. ३) झाला. हें आनंदसंवत्सर श्रीशिवराज्याभिषेकोत्सव प्रसंगाने महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासांत केवळ संवत्सरावतंसच होऊन बसले आहे. असो. नरहरीस मातेचें छत्र मुळींच लाभले नाही म्हटलें तरी चालेल. म्हणजे नरहरीची दुसऱ्याच वर्षी त्याची आई, नारायणपत्नी बहिणादेवी ही मृत्युवश झाली. पुढें पाचव्याच वर्षी नरहरीची मुंज झाज्ञी व त्याच्या शिक्षणास प्रारंभ झाला. हें खरे उपनयन दिसते. पण नंतर श. १६०४ मध्ये म्हणजे नरहरीच्या आठव्याच वर्षी पिता नारायण यानें त्याचें लग्न केलें आणि पुढें चार वर्षांनीं नरहरीचा बाप मरण पावला. अवघ्या सोळा वर्षाच्या आंत आईबाप वारले, संसार अंगावर पडला; ह्यामुळे नरहरीची स्थिति जरा केविलवाणी झाली. अशांतच देशावर गुदरलेल्या आपत्तीची भर पडली. म्हणजे ह्या वेळीं सर्व महाराष्ट्रभर यवनांचा नुसता धुमाकूळ सुरू असल्यामुळें नरहरीवर ग्रामत्याग करून देशान्तरावर श्रमण करण्याचाच प्रसंग ओढवला. त्या वेळचे वर्णन स्वत: कुळादयार्णवस्वामींनीच असें केलें आहे -

शिवभूपती पावतां मुक्ति । दक्षिणे येवोनी ताम्रपती ।
केली विजयपुरा समाप्ती । महाविपत्ती राष्ट्रातें ॥ ३२ ॥
मग सोडूनि कृष्णातीर । भ्रमता कालचक्रानुसार ।
आश्रयूनि ठेलो अंबापूर । सपरिवार साग्रज ॥ ३३ ॥

स्वराज्यस्थापनेचा उद्योग करून श्री शिवराजे परंधामाप्रत गेले होते; व हे पाहून यवनाप्रणी जो औरंगजेब तो आपल्या अफाट सेनेसह सर्व दक्षिण म्लेंच्छमय करण्याच्या हेतूनें सर्व महाराष्ट्रभर रणकंदन करीत होता. विजापूरची अदिलशाही नष्ट केली, छत्रपति संभाजीराजांचा त्याने शिरच्छेद केला, महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यावर हले चालविले. अशा प्रकारे देशांत प्रलय चालला होता. अशा त्या महाप्रसंगांत कित्येकांबरोबर नरहरीवर वर म्हटल्याप्रमाणें सकुटुंब देशत्याग करण्याची पाळी आली. भ्रमण करतां करता तो अंबापुरी म्हणजे जोगाईचे अंबे (मोमिनाबाद) येथें येऊन राहिला आणि तेथूनच त्याच्या आयुष्याच निराळें वळण मिळून त्याचा उदय झाला.

ह वळण मिळण्यास या काळी गुरूपदेश ही एक नव्या जन्मार्जिताचीच जी गोष्ट, तिचा लाभ व्हावा लागत असे. संत, साधू व असे आमानात्मविचारप्रतिपादक ग्रंथाची रचना करणारे परमार्थचिंतनैकाग्र अधिकारी, ह्यांचे बाबतीत गुरूपदेश ही एक मुख्य बाब आहे. पितृपरंपरा जशी तशीच ही गुरुपरंपरा. किंबहुना ह्या गुरुपरंपरेलाच अधिक मान असे. संतादिकांचे ग्रंथ पाहिले असतां त्यांस किंवा त्यांच्या चरित्रांतीलमुख्य भागाला ह्या गुरूपदेशापासून प्रारंभ झालेला आहे. स्वतःची ओळख म्हणजे माहिती सांगतांना आपली गुरुपरंपरा सांगणे हें मुख्यत: त्यांनीं केलें आहे. अध्यात्मज्ञानप्राप्तीच्या कामी इतर आनुषंगिक गोष्टीबरोबर व अभ्यासाबरोबर किंबहुना त्याहून अधिकतया ह्या गुरूपदेशाची आवश्यकता प्रतिपादिली आहे व ती खरीही आहे. ह्या दृष्टीने गुरुमंत्राचा लाभ ह्या नरहरीस येथे घडला व म्हणून येथूनच त्याच्या चरित्राला वेगळे व तसें वळण मिळाले.

तेथ युवाब्दीं करुणासिंधु । भेटला सद्‌गुरु श्रीगोविंदु ।
श्रावणवद्य‌अष्टमीस वरदू । लृष्णोपासन निरूपिले ॥ ३४ ॥

स्वामींनी आपली गुरुपरंपरा ८७ व्या अध्यायाच्या अखेरीस व अध्याय १ मध्ये पृ. २ वर दिली आहे. शक १६१७ मध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीच्या सुमुहुर्तावर नरहरीला आनंदसांप्रदायी श्रीगोविंद ह्या सत्पुरुषाकडून श्रीकृष्णोपासनदीक्षामंत्र मिळाला. हे गोविंदगुरू प्रथम राजकारणी व नंतर ब्रह्मचिंतनपर वृत्तीचे झाले असावे असेत वाटते. ह्यांचें उपनांव चौधरी असून ते श्रीशिवाजी महाराजांजवळ पालखीपदाचा मान असलेले एक बडे अधिकारी म्हणून होते. एकदा शिवाजीरावांनी आपल्यी नेहमींच्या देवद्विजगुरु-प्राज्ञपूजन-प्रवृत्त्यनुसार श्रीस्वानंदस्वामी नांदाच्या सत्पुरुषास रायगडावर आणले असतां ह्या गोविंदरावांची व स्वानंस्वामींची भेट झाली व तेव्हांपासून हे विरक्त झाले. ह्याच श्रीगोविंदस्वांमींजवळ नरहरीने 'कालचक्रें आचारविहीन । जठरचिंतने अभ्यासविहीन । एवं जड समूढ अज्ञान ।' (३५) आहें, अशी आपली कथा निवेदन केली.

तिहीं पाहोन कृपादृष्टी । म्हणती भजनप्रेम पोटीं ।
आहे म्हणूनि निष्कपटी । वदसि गोष्टी निजवृत्तें ॥ ३६ ॥

म्हणजे नरहरीचा निष्कपट भाव व भजनाविषयींची आवडी पाहून गुरु गोविंदांनी त्यावर कृपा केली व त्यास उपदेश दिला आणि

करूनि निरपेक्ष कोरान्न । । कृष्णदयार्णवनामस्मरण ।
स्नानसंध्या गीतापठण । पारादण ज्ञानेश्वरी ॥ ३८ ॥

असा नित्यनेम करण्यास सांगितले. ब्रह्मचारी किंवा संन्यासी ह्यांनाच पक्वान्न म्हणजे शिजविलेले अन्नाची मधुकरी मागण्याची अनुज्ञा आहे, गृहस्थांना नाहीं; म्हणून कोरान्न मागत. त्याप्रमाणें मुखाने 'कृष्णदयार्णव' कृष्णदयार्णव असें म्हणत. गांवांत कोरान्नभिक्षा मागून जठरपूर्ति करावी व राहिल्या वेळांत ज्ञानेश्वरादिकांच्या ग्रंथांचें पठण व मनन करावें असा नरहरीचा आयुष्यक्रम सुरू झाला. 'जयजय रघुवीर समर्थ' ह्या ललकारीने रामदास असें 'समर्थ' ह्या नावानें ओळखले जात त्याप्रमाणें नरहरीचे नरहरी हें नांव जाऊन 'कृष्णदयार्णव' ह्याच नावाने लोक त्यांस आतां ओळखू लागले. याप्रमाणे कांहीं काल गेल्यावर कृष्णदयार्णवांनी आपल्या गुरुसमवेत श्रीकाशी, उत्तरमानस, दक्षिणमानस इत्यादि तीर्थयात्रा केली. ह्याच वेळीं गयेस कांहीं दिवस राहून गोविंडगुरूंनी 'भाषाव्याख्यान दशमावरी । वरदात्तरों करविले ॥' पुढें दीड वर्ष केवळ निंबाची पाने खाऊन तपश्चर्याही केली. सर्त्रजित् संवत्सरी म्हणजे शक १६२९ मध्ये कृष्णदयार्णवांनी द्वारका इत्यादि इतर तीर्थे केली व नंतर ते परत अंब्यास आले. येऊन पाहतात तो अंबापुरीचा विध्वंस झालेला; व औरंगजेब नुकताच मेला होता तरी प्रांतांतील धुमश्चक्री पुरती बंद झालेली नव्हती. मग दयार्णप पिंपळनेरास राहण्यास गेले. तेथें कांहीं दिवस ह्या कुटुंबास सुखाचे गेले. दयार्णवांच्या मनांत अग्निहोत्र घेण्याचें आलें. पण इतक्यांत त्यांची बायको वारली. ह्या वेळीं एक मुलगा व एक मुलगी अशीं दोन अपत्ये त्यांना होतीं; मनांत तर अग्निहोत्राची इच्छा, म्हणून गुर्वाज्ञेने दुसरें लग्न केलें व (शक १६३३) अग्न्याधान करून ती दीक्षा घेतली. अशांत सहा सात वर्षे जातात तो दयार्णवांवर निराळेंच अरिष्ट कोसळले.

तेथूनि विलंबीपर्यंत । काळ क्रमिला प्रारब्धजनित ।
पुढें उदेला प्रसूप्त वात । रक्तपित्त तुळणेचा ॥ ४७ ॥

पित्ताबरोबर रक्त पडू लागल्याने त्यांचें चित्त उदास झालें काय, करावे हें सुचेना. पण प्रभूचा स्वप्नानुवाद आठवला. मागें गयाक्षेत्रीं असतां श्रीमद्‌भागवत दशम स्कंधावर गोविंदगुरूंच्याजवळ अध्ययन झाले होतें. पण तेव्हां ग्रंथरचना करावी असें वाटलें नाहीं. आणि आतां

पुढतीं तेंचि एकनाथी । मेषजायीं अनुग्रहिले ॥ ५० ॥
हें सेवितां दिव्य औषध । तोडील अवशेष रोग विरुद्ध ।
ऐसा प्रभुचा स्वप्नानुवाद । कथिला विषद संतांसी ॥ ५२ ॥
रोगें शरीर झालें क्षीण । त्यासी औषध भगवद्‌गुण ।
श्रीमद्‌भागवतव्याख्यान । अमृतपूर्ण प्रभुवरे ॥ ५८ ॥

अशा प्रकारे स्वामींना उद्‌भूत झालेल्या या व्याधीवर श्रीमद्‌भागवतानुसारें ग्रंथलेखन हेंच औषध एकनाथांनी स्वप्रामध्यें दृष्टान्त देऊन व गुरु गोविंदस्वामी आणि इतर संतमंडळी यांनीही अनुमति देऊन सांगितल्यामुळे कृष्ण-दयार्णवांनीं त्यांच्या ५४ व्या वर्षी, ज्या वयांत कानावरची लेखणी नळकांड्यांत ठेवून स्वस्थ राहावयाचे त्या वयांत दयार्णवांनीं तरुणाप्रमाणें ग्रंथलेखनास प्रारंभ केला.

ह्या ग्रंथलेखनांत दयार्णवांनीं आपले उर्वरित सर्व आयुष्य वेंचले. हा ग्रंथ फारच मोठा म्हणजे ४२ हजार ओव्यांचा झालेला आहे. महाराष्ट्र-सारस्वतांत एवढाले मोठे व उत्कृष्ट ग्रंथांचे लेखक आठ दहाच झालेले दिसतात. दासोपंतांचा गीतार्णव, शिवकल्याणांची भागवत दशमस्कंधावरील टीका, रामचंद्रबोवाकृत महाभारत, कृष्णयाज्ञवल्कींचा कथाकल्पनरु, एकनाथांचे भावार्थरामायण, हे ग्रंथ विस्ताराने व गुणविशेषानें अपूर्व झालेले आहेत. त्यांतीलच हा कृष्णदयार्णवांचा ग्रंथ ह्यास 'हरिवरदा टीका' असें मोठे गोड नांव आहे. श्रीमद्‌भागवतांतील दशमस्कंधात्रर ही कृति आधारलेली आहे. ज्या वयांत मनाचे आणि शरीराचे व्यापार शिथिल व्हावे त्या वयांत एवढा ग्रन्थ आरंभून पार पाडावा हें केवढे कर्तृत्व ! या ग्रंथाची उभारणी श्रीधरी टीकेच्या आधारे कवीने केली आहे. याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग असून पूर्वार्धाचे ४९ अध्याय आहेत. या एकट्या पूर्वार्धास स्वामींना सात वर्षे लागली. तेव्हां स्वामींचे वय ६० वर्षाचे झाले होतें. शक १६५६ आनंद संवत्सरांत गोकुळ अष्टमीच्या दिवशींच वयाला साठ वर्षे पुरी झाली व ग्रंथाचा पूर्वार्ध संपला. आणि पूर्वार्ध संपल्यावर व्याधी-रोगापासून दयार्णवांची मुक्तता झाली. पूर्वाधाच्या अंती दयार्णव म्हणतात,

सद्‌गुर्वाज्ञा अति समर्थ । परम कृपाळू एकनाथ ।
संती कथिला परमार्थ । स्वार्था सफळ येथ तो झाला ।
शरिराची शमली व्यथा । ग्रंथ व्याख्याने वक्तृत्वप्रथा ।
शामलशमनी हरिगुणत्रिपथा । धरिले माथांशिवश्रोतीं ॥

याप्रमाणे स्वामींना मोठे समाधान झालें, एक प्रकारे कृतार्थता वाटली. पण दुसऱ्या एका दृष्टीनें स्वामींच्या हळुवार मनाला उदासीनता प्राप्त झाली. बरोबरीचे जिवलग मित्र दिवंगत झाले; इंद्रियशक्ति क्षीण झाल्या; गुरु गोविंदहि अंतर्धान पावले; आपलाही अंतकाळ समीप आला असें वाटून दयार्णव विषण्णचित्त झाले. दयार्णवांच्या मनांत ग्रंथाचा उत्तरार्ध लिहावा असें होतें. पण पूर्वार्धाच्या वेळचा उत्साह व आत्मविश्वास आतां उरला नव्हता. उलट, पुढें उत्तरार्धाची टीका 'जरी करवणें श्रीनायका । स्वसामर्थ्ये करील देखा । किमर्थ शंका मज येथें ॥' म्हणजे परमेश्वराच्या मनांत असेल तर होईल ' असे दैववादाचे विचार दयार्णवांना सुचू लागले. पुढें एका ओवीत तर त्यांनीं 'सुखविश्रांती भावितसे ।' असें सहज पण स्पष्ट सांगितलें आहे. तात्पर्य, उत्तरार्ध लिहायला घेण्यास स्वामींचे मन धजेना. पण गुरुपुत्र शिवदीक्षित चौधरी यांच्या आग्रहावरून एक दोन महिन्यांनी म्हणजे शके १६५६ च्या कार्तिकांत उत्तरार्ध लिहिण्यास दयार्णवांनीं प्रारंभ केला. उत्तरार्धाचे ३७ अध्याय म्हणजे एकंदर ग्रंथाचे ८६ अध्याय संपवून ८७ च्या अध्यायाचे २३ श्लोक झाले तो दयार्णवांचा आयुर्दाय संपला. म्हणजे शक १६६२ मध्ये मार्ग शु० ५ गुरुवारी श्रीक्षेत्र पैठण येथें दयार्णव समाधिस्थ झाले. दयार्णवांच्या पश्चात बाकीचा तीन अध्यायापुरता राहिलेला ग्रंथ, त्यांचा एक शिष्य, जो प्रथमपासून ह्या हरिवरदाग्रंथाचे लेखनकार्य करीत असे, त्यानें दयार्गवांच्या आज्ञेनुसार पूर्ण केला. ह्याचे मूळचे नांव माधवराव व्यापारी असें होते व गुरु कृष्णदयार्णव ह्यास 'उत्तमश्कोक' असें म्हणत असत. कृष्णदयार्णवाचे एकंदर सोळा शिष्य व मठ होते. त्यांत 'उत्तमश्लोक' हा पट्टशिष्य होता व त्याचा मठ उमरखेड ( वऱ्हाड) येथें असल्याचें सांगितले आहे. ह्या उत्तमाने हा हरिवरदा ग्रंथ शके १६६५ मध्ये म्हणजे आपल्या गुरूंच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या दिवशींच समाप्त केला. कृष्णदयार्णवांच्या समाधीशेजारींच उत्तमश्लोकाचीही समाधि आहे. उत्तमश्लोकाने (शके १६८२) 'प्रबोधसार' हा स्वतंत्र ग्रंथ केला आहे. त्याचा निर्याण शक १७०८ चैत्र वद्य ४ हा आहे.

दयार्णवांनी ह्या टीकाग्रंथाशिवाय ' तन्मयानंदबोध (ओव्या ३२५) व सारांशात्मक गीता हे दोन ग्रंथ केले असून कांहीं स्फुट पदें, अभंगही लिहिले आहेत. 'हरिवरदाटीका' हा ग्रंथ ओवीबद्ध असून ओवीची बांधणी एकनाथांच्याप्रमाणें साडेचार चरणी पण लहान आहे. ग्रंथाचा नायक दयार्णवांचें उपास्य दैवत श्रीकृष्ण हें असून टीकाव्याख्यानार्थ मूळ ग्रंथ श्रीमद्-भागवत दशम स्कंध हा आहे. व्याख्याता कवि हा जातीचा प्रेमळ असून त्याच्या अंगी जाडी विद्वत्ता, वंदनीय साधुत्व व अप्रतिम कवित्व वसत असल्यामुळें टीकाग्रंथ फारच सरस उतरला आहे. प्रपंची आणि परमार्थी अशा दोघांनाही तो आनंददायक व उद्‌बोधक झाला असून मधून मधून आलेली वर्णनें तर चटकदार उतरली आहेत. ग्रंथकाराची विद्वत्ता व बहुश्रुतपणा ही त्या ग्रंथांतील कोणत्याही भागावरून स्पष्ट दिसून येतात. ग्रंथाची भाषा ओघवती असून संस्कृतशब्दभरणा जरा अधिक आहे.