संत नामदेव महाराज
अभंग - ००१ -- १००

अभंग - १०१ -- २००संत नामदेव महाराज - परिचय

'राही रखुमाई कुरवंड्या करिती । जीवे ओवाळिती नामयासी ॥' संत नामदेवांचे हे भाग्य. संत निवृत्तिनाथांनी भरल्या मनाने शब्दबद्ध केले आहे. असे हे संत नामदेव श्री क्षेत्र पंढरीत शके ११९२ मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस सूर्योदयाला गोणाईचे उदरी जन्माला आले. 'प्रसवली माता मज मळमूत्री । तेव्ही जिव्हेवरी लिहिले देवे नामदेव ।' जन्मताच ते 'विठ्ठल विठ्ठल विठ्ठल' म्हणाले.

नामदेवांचे ज्ञात पूर्वज यदुशेट शिंपी रिळे, ता. शिराळा, जि. सांगली, (महाराष्ट्र) येथे राहात. यदुशेटीनंतर हरिशेट, गोपाळशेट, गोविंदशेट, नरहरिशेट व दामाशेट या पिढ्या झाल्या. रिळे येथून मध्यंतरी नरसी येथे त्यांचे स्थलांतर झाले. त्यामुळे त्यांचे आडनाव रेळेकर झाले. सर्व पूर्वज विठ्ठलभक्त होते व नेमाने आषाढी कार्तिकीस पंढरीत येत. नरसीहून दामाशेटी पुत्र प्राप्तीसाठी पंढरीत आले आणि 'गोणाईने नवस केला । देवा पुत्र देई मला ।' तोच हा पुत्र नामदेव. 'नामदेव ऐसें नाम त्वां (देवांनी) ठेविले.' त्यांना 'छंद विठूचा लागला' गोणाईने म्हणावे, 'काय पोरा लागली चट । धरी देउळाची वाट ॥ हाती वीणा मुखी हरी । गाय राउळा भीतरी ॥ नामा म्हणे माळ (देवांनी) घातली स्वहस्ते' नामदेव वारकरी झाले.

नामदेवकुळाचा शिवणे, टिपणे करावे, तयार कपडे बाजारहाटासी जावे, असा पूर्वापार धंदा होता. दामाशेटी तोच धंदा करत होते. ते देवाला नित्य नैवेद्य अर्पण करत व मगच बाजाराला जात. एकदा पत्‍नी गोणाईला म्हणाले, 'आम्ही हाटा जाऊ । लवकरी न येऊं । नैवेद्य पाठऊं । नाम्या हातीं ॥' माता गोणाईने नामदेवांचे हाती नैवेद्य दिला व देवाला अर्पण करण्यास सांगितले. नामदेवांनी मोठ्या आनंदात नैवेद्य नेला. देवापुढे ठेवला. 'केशवा माधवा गोविंदा गोपाळा । जेवी तूं कृपाळा पांडुरंगा ॥' ही हात जोडून आर्त प्रार्थना केली. देव भक्ताच्या निर्धाराचा कस पाहतो. देवाने खूप विलंब लावला. नामदेव व्याकूळ झाले. प्राणार्पणास सिद्ध झाले.

देव प्रगट झाले व त्यांनी नैवेद्य ग्रहण केला. 'ऐसी ग्लानी करितां विठ्ठल पावला । नैवेद्य जेविला नामयाचा ।' कृतयुगातील प्रह्लादभक्तीचेच दर्शन कलियुगात नामदेवांनी जगाला घडवले. दामाशेटींनीही दुसर्‍या दिवशी हे प्रत्यक्ष अनुभवले. त्यांना धन्य धन्य वाटले.

नामदेव देवळात जात होते. पायरीवर एक मुलगी आक्रंदत होती. वारीचे दिवस होते. नामदेवांनी कळवळ्याने तिला घरी आणले. तिने आपले नाव जनी, वडिलांचे दमा, आईचे करुंड, गांव गंगाखेड असे सांगितले. हे दांपत्य शूद्र, पण पंढरीला नित्य येई. जनीला विठ्ठलाचे वेडच लागले. ती गावी परतली नाही. नामदेव परिवाराची झाली. त्यांची दासी म्हणे व तसे जगाला सांगे. तिच्या भक्तीसाठी देवही वेडे झाले. तिच्या संगे दळू, कांडू लागले. तिला न्हाऊ घालू लागले. तिला शेणी वेचण्यातही साहाय्य केले. एकदा देव दळण कांडण्यास रात्री आले. वेळ झाला म्हणून घाईने परतले. पदक, माळा तिथेच राहिल्या. जनाईवर चोरीचा आळ आला. सुळी देण्याची शिक्षा झाली. तिथे नेले. या अन्यायाने जनाई पेटून उठल्या. 'देवा, जिवंत आहात का ?' म्हणाल्या. तत्क्षणी सुळाचे पाणी झाले. जनाईंचा उदंड जयजयकार झाला. 'नामदेव जनाबाई भजन' रूढ झाले.

नामदेव चंद्रभागेत स्नानाला व भक्त पुंडलिक-दर्शनार्थ जात. वाल्मीकींनी शतकोटी रामायण रचल्याचा संवाद त्यांच्या कानी आला. त्याचक्षणी देवाच्या शतकोटी अभंगांचा त्यांनी निश्चय केला. 'त्वरा केली प्रति केशिराजे' आणि अपार अभंग प्रगट झाले.

नामदेवांचे लडिवाळ प्रेम, अमृतमधुर अभंग, टाळ, वीणा, मृदंग असा कीर्तनाचा फड उभा झाला. जनसागर लोटला. राऊळ अपुरे झाले. वाळवंटात पुंडलिकापासी नामा उभा कर्तिनासी । अठरा पगड जाती भक्तिरसात न्हाल्या. निवृत्ति ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण । हरि कीर्तनाची दाटी । तेथे चोखा घाली मिठी ॥ चोखा, बंका परिवार, नरहरी, जगमित्र नागा, आसंद सुदामा, विसोबा, सावतोबा, गोरोबा, सार्‍यांची 'एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी' ज्ञानदेवांचा अभंग झाला आणि अभंग बोलता रंग कीर्तनीं भरला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचूं लागला. नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लाऊ जगी ॥ चे दर्शन झाले. नामदेव टाळी वाजवा म्हणाले. गोरोबांचे नेत्री अश्रू दाटले. त्यांनी आपले थोटे हात वर केले. चमत्कार झाला. 'गोरा थोटे वरती करी । हस्त फुटले वरच्यावरी ॥' त्यांचे दिवंगत मूल रांगत आले. 'कीर्तनी गोरियाप्रती कर आले । मूलही देखिले कीर्तनात ॥' गोरोबांना भडभडून आले. म्हणाले, 'जीवे ओवाळावे नामयासी । जणू नामदेवाच्या कीर्तनी । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ।' 'वाळवंटी चंद्रभागेच्या काठी झेंडा रोविला ।' 'ऐसा कर्तिनमहिमा सर्वांमाजी वरिष्ठ । जड मूढ भाविका सोपी केली पायवाट ॥'

नामदेव पार वेडे झाले. दामाजींना व गोणाईंना वाटले, पोर हातचे गेले. लग्नाची बेडी घातली. गोविंदशेट सदावर्तेंची कन्या राजाई नामदेवांची पत्‍नी झाली. पण नामदेवांचे 'येरे माझ्या मागल्या'च कायम. गोणाई त्यांना कळवळून म्हणाली, 'कापड घेऊनी जाई बाजारासी । गोणाई नाम्यासी शिकवीते ॥' तुझे लग्न झाले. 'कुटुंब चालवणे तुज' नामदेव पेचात पडले. 'बरं' म्हणाले, गाठोडे घेऊन बाजाराला गेले. 'अन्न उदक सोडीले । ध्यान देवाचे लागले' मग धंद्याची शुद्ध कुठली ? अंधार पडला भानावर आले. जवळच गणोबा (गणेशमूर्ती) होते. त्यांच्या हवाली गाठोडे केले. तुम्हीच घ्या म्हणाले. शेजारच्या धोंडोबाला (दगडाला) म्हणाले, 'तूं याला जामीन बरं का?' आणि थेट देवापुढे ठाकले. 'केशवासी नामा सांगतसे भावे । व्यवसाय स्वभावे केला तैसा ।' देव हसले. नामदेव घरी आले. राजाई आनंदली. सारा माल खपला. दामाशेटी आले. त्यांनीही विचारले. नामदेव म्हणाले, गणोबांना कापड विकले, आठवड्याची बोली आहे. धोंडोबा जामीन आहे. त्यांनी कपाळाला हात लावला. 'उदीम सारा बुडविला । गमाविले भांडवल ।' 'उधारी आण' म्हणून लकडा लावला. नामदेव गेले, पण गणोबा, धोंडोबा दोन्ही दगडच. नामदेव म्हणाले, 'धोंडोबा, तुम्ही जामीन आहात. चला.' ढकलत ढकलत घरी आणले. कुलूप लावले. देवळात गेले. देवाला आपला प्रताप सांगितला. घरी आले. राजाईने दामाशेटींना सांगितलेच होते. ते कडाडले, 'नाम्या, काय केले । धोंड्या कशाला कोंडिले ॥' डोके फोडून काय होणार ? धोंडा बाहेर ढकलला. अचाट धक्का बसला. धोंडा निखळ सोन्याचा होता. गरीबाचे घरी खूट झाले, तरी गावांत कूट होते. बातमी फुटली. धोंड्याचा मालक तावातावात आला. मालाचे पैसे दिले. अन् धोंडा घेऊन गेला. देव नामदेवाचा पाठिराखा आहे. डंका झाला.

नामदेवांचे मेहुणे आले. आणखी एक चमत्कार झाला. तिथी दशमी होती. नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ति । भोजन निश्चिती करुं नये ॥ उद्या एकादशी. परवा द्वादशीला पारण्याचे भोजन. राजाईचा जळफळाट झाला. आताही देव धावले. वाणी झाले. वराईची गोणी आणली. लागेल तेवढे वेचा म्हणाले, पण नामदेवांना रुचले नाही. त्यांनी ब्रह्मवृंदांना सार्‍या मोहरा दान केल्या. राजाईने आग पाखडली. परिसा भागवंतांच्या मंडळींची व तिची चंद्रभागेतीरी भेट झाली. काकुळतीने त्यांचा परीस आणला. लोखंडाचे सोने केले. घरी थाट झाला. नामदेवांनी आग्रहाने परीस घेतला आणि बिनदिक्कत चंद्रभागेत भिरकावला. परिसा भागवत भडकले. नामदेव म्हणाले, 'चला देतो.' चंद्रभागेत आले. ओंजळभर वाळू घेतली. हताश परिसा भागवतांनी हिय्या करून खड्याला लोखंडी किल्ली लावली. सोने झाले. प्रत्येक खडा पारखला. थक्क झाले. आरती गायिली, 'प्रत्यक्ष प्रचीत हे वाळवंट परीस केले.' राजाईला उपरती झाली. म्हणाल्या, 'आता हे संसारीं मीच धन्य जगी । जे तुम्हां अर्धांगी विनटले' सारी पंढरी दुमदुमली. नकळत नामदेवांना अभिमान झाला. ते पुण्यक्षेत्र आळंदीत आले. ज्ञानदेवादिकांचे भेटीस गेले. सर्वांनी नामदेवांचे दर्शन घेतले. नामदेवांनी प्रतिदर्शन घेतले नाही. माउलींनी हे हेरले. त्यांचा अभिमान जावा म्हणून योजना केली. पण नामदेव दुखवले. ते पंढरीत देवापुढे उभे ठाकले. देवांनी समजावले. ओंढ्या नागनाथ येथील विसोबा खेचरांना गुरू करण्यास सांगितले. विसोबांनी अंतर्ज्ञानाने ते जाणले. नामदेव आले. तर 'खेचरे केली माव । पिंडीवरी ठेविला पाव' नामदेव भांबावले, पाय काढा म्हणाले. विसोबा म्हणाले, 'जेथे नाही देव तेथे ठेवी पाव' नामदेवांनी जिथे जिथे त्यांचे पाय ठेवले, तिथे तिथे पिंड प्रगटली. त्यांचा अहंकार गळाला. ते विसोबांना शरण गेले. विसोबा त्यांचे गुरू झाले. नामदेव पंढरीत परतले. 'नामदेवा भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातले नामदेवे ।' असा नामदेवात पालट झाला. ज्ञानदेव-नामदेव मिलन झाले. देवाच्या अनुज्ञेने तीर्थयात्रेला गेले. मार्गात दोघांचा अपार सुखसंवाद झाला. नामवेद जन्मला. माउली म्हणाले, 'तो हा राजमार्ग सर्वाहुनी चांग । सदा संत संग वाचे नाम ॥ रामकृष्णहरी । देहु आळंदी पंढरी । गाथा भागवत ज्ञानेश्वरी । बाळक्रीडा तीर्थावळी ॥' संतपंचसूत्री झाली. ज्ञानदेव म्हणे, 'तूं भक्त शिरोमणी' 'नामा म्हणे माझा ज्ञानराज प्राण' असे एक हृदय झाले आणि पंढरीत परतले.

देवांनी उभयतांना गहिवरून आलिंगन दिले. देवांनी पुढाकार घेतला. तीर्थयात्रेचे ब्रह्मवृंदांना प्रथम मावंदे घातले. नंतर अठरा पगड जातीच्या संत मांदियाळीला, नामदेव परिवारासह मावंदे घातले. 'आनंदे कवळ देती एका मुखी एक' असा अभेद पंक्तिसोहळा झाला. ब्रह्मवृंदांनी नामदेवांच्या मस्तकी मंत्राक्षता टाकल्या.

वाळवंटात कर्तिनसोहळ्याला महापूर लोटला. 'संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत । तेथे असे देव उभा' भक्तांचे डोळे तृप्त झाले. नामदेवांनी 'आम्हां सांपडले वर्म । करूं भागवतधर्म ।' अशी हाक दिली. ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात, दर्‍याखोर्‍यांत पोचली. गावोगावी भजन - कीर्तनाचे थवे लोटले. रामजन्म, हनुमान जन्म, नृसिंह जन्म, कृष्ण जन्माचे सप्ताह ठाकले. संस्कृती दृढमूल झाली. शिवरात्रीला शिवरात्र कथा व हर हर महादेव गजर झाला. शिवविष्णू द्वैताचे, द्वेषाचे मूळ नष्ट झाले. औंढ्या नागनाथ येथे महाशिवरात्रीला नामदेवांनी कीर्तन मांडले. साक्षात शंभू महादेव गाभारा फिरवून 'फिरविले देऊळ जगामाजी ख्याति' सामोरे झाले. शिव-विष्णु ऐक्याचा ध्वज उभारला. पंढरी सांस्कृतिक, आध्यात्मिक राजधानी झाली. काकडा भजनाने प्रारंभ होई आणि गोपाळ काल्याने वारीची व सप्ताहाची सांगता होई. 'कालया कौशल्य नामदेव जाणे' निवृत्तिनाथांनी गौरव केला.

एका कार्तिकी एकादशीला 'ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी । समाधान तूंचि होसी । परी समाधि हे तुजपाशी । घेईन देवा ॥' 'शांति क्षमा दया ऋद्धि । हे ही पाहतां मज उपाधी । तुझिया नामाची समाधी । कृपानिधि मज द्यावी । बाबा बाळछंदो ॥' सारे सारे व्याकूळ झाले. अश्रुगंगेचे पाट वाहिले. शके १२१८ च्या कार्तिक वद्यात श्री क्षेत्र आळंदीत नामदेव, त्यांची मुले, संत मांदियाळीचा पूर लोटला. मुंगीलाही मार्ग नव्हता. सार्‍यासार्‍यांना संत नामदेवांनी आदी ते समाधीपर्यंतचा अभंगबद्ध जीवनपट कथन केला. त्यांनी व देवांनी आळंदीचे श्रेष्ठत्व प्रतिपादिले. देवांनी ज्ञानदेवांचा अपार महिमा गायिला. अष्टमीपासून उत्सव मांडला. त्रयोदशीची सकाळ उजाडली. नामदेव पुत्र नारा, विठा, महादा, गोंदा यांनी समाधि परिसर सुशोभित केला. 'देव, निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर बैसावया ॥ जावोनी ज्ञानेश्वर बैसले आसनांवरी । पुढे ज्ञानेश्वरी ठेवियली ॥ तीन वेळा देवा जोडिले करकमळ । झाकियेले डोळे ज्ञानदेवें ॥' साधकांचा मायबाप समाधिस्थ झाला. 'माउली, माउली, माउली ज्ञानोबा माउली' हलकल्लोळ झाला. नामदेवांनी ज्ञानदेवांची 'इंद्रायणीचे तटी' आरती केली.

देववचनानुसार श्री क्षेत्र सासवड येथे मार्गशीर्ष वद्य १३ ला संत सोपानदेव संत मांदियाळीच्या साक्षीने समाधिस्थ झाले. संत चांगदेव श्री क्षेत्र पुणतांबे जि. जळगांव येथे माघ वद्य १३ ला समाधिस्थ झाले. शके १२१९ वैशाख वद्य दशमीला संत मुक्ताई मुक्ताईनगर जि. जळगांव येथे गुप्त झाल्या. ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ ला संत निवृत्तिनाथ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे समाधिस्थ झाले. नामदेवांच्या मुलांनी सर्व समाधिस्थानी अपार सेवा केली. हे सर्व समाधिसोहळे नामदेवांनी अपार श्रद्धेने शब्दबद्ध केले. ही सर्व क्षेत्रे अजरामर पुण्यभूमी झाली.

शके १२०७ मध्ये माघ व ३ ला संत नरहरी महाद्वारात गुप्त झाले. संत जगमित्र नागा श्रीक्षेत्र परळी जि. बीड येथे कार्तिक शुद्ध ११ ला समाधिस्थ झाले. आषाढ वद्य १४ ला संत सावता माळी श्री क्षेत्र अरण जि. सोलापूर येथे समाधिस्थ झाले. संत गोरोबा श्री क्षेत्र तेर जि. उस्मानाबाद येथे चैत्र वद्य १३ ला समाधिस्थ झाले. या सर्व सख्यांच्या वियोगाने नामदेव विकळ व एकाकी झाले. त्यांनी दक्षिण भारत यात्रा केली. पण उत्तर भारत त्यांच्या ध्यानी, मनी, स्वप्नी बसला होता. राजस्थानात बिकानेरजवळ कोलादजीला देवाने त्यांच्या हाकेला साद दिली आणि निर्जळ कूप (विहिर) पाण्याने तुटुंब भरला. भोपाळला कमलाकर व सुमती ब्राह्मण दांपत्याच्या घरी संत मांदियाळी आली. सुमतीने मुलगा पद्याकर याला स्वयंपाकासाठी गोवर्‍या आणण्यास सांगितले. दुदैवाने तिथे पद्माकर सर्पदंशाने मृत झाला. भाविक दांपत्याने मनावर दगड ठेवला. संतांची पंगत वाढली. पण नामदेवांना अशुभ जाणवले. त्यांनी नामाचा टाहो फोडला. पद्माकर जिवंत झाले, आदी घटना सतत आठवत होत्या. उत्तर भारतीयांच्या मनामनांत नामदेव ठसले, बसले होते. ते सारे जणू त्यांना खुणावत होते.

उत्तर भारतात भट्टीवालचा जाल्लो उर्फ जाल्हन, मथुरेचे विष्णु स्वामी, घुमानचे फिरणा शहीद व बहोरदास, तारागांवचे केशो-कलंदर, धारीवालचे लध्धाखत्री, हरिद्वाराचे त्रिलोचन अशी निष्ठावंत भक्त मांदियाळी नामदेवाभोवती गोळा झाली. नामदेव त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेत समरस झाले. त्या भाषेत अभंगरचना केली. विषय मांडले. या सर्व शिष्यांनी नामदेवपीठे स्थापली. त्यांच्या कार्याचा ठसा व वसा उचलला. ही गेली सातशे वर्षे अखंड कार्यरत आहेत. आम जनतेने नामदेवांना डोक्यावर घेतले.

नामदेवांचा हा प्रभाव दिल्लीचा सुलतान महंमद तुघलक याला इस्लामला घातक वाटला. त्याने नामदेवांना पकडून आणले. त्यांना 'तू मुसलमान हो' म्हणून जबरदस्ती केली. नामदेव म्हणाले, माझा प्रभू समर्थ आहे. 'जे जे घडेल ते ते घडो । देह राहो अथवा पडो ॥ देह जावो हेचि घडी । पाय हरीचे न सोडी ॥' सुलतान चिडला. नामदेवांनी त्याला सलामसुद्धा केला नव्हता. तो भडकला. नामदेवांना चिरडण्यासाठी त्यांच्या अंगावर हत्ती सोडला. पण चमत्कार झाला. हत्तीने नामदेवांनाच सलाम केला. सुलतान इरेला पेटला. त्याने दरबारात गाय आणली व मारली. 'ती जिवंत कर, नाहीतर तुझे मुंडके उडवतो' म्हणाला. नामदेवांनी नामाचा टाहो फोडला. अजब घडले. गाय जिवंत झाली. तिला वासरू पिऊं लागले. नामदेवांनी दुधाने कटोरा भरला. सुलतानापुढे धरला. सुलतान वरमला. त्याने नामदेवांना सोडले. भर दरबारातील या घटनेने नामदेवांची दिगंत कीर्ती झाली.

गुरु ग्रंथसाहेबमध्ये नामदेवांची ६१ पदे आहेत. त्यात 'सुल्लान पुछूं बै नामा' यात ही कथा सविस्तर आहे. महिकावतीच्या बखरीतही हा चमत्कार नोंद आहे. उत्तरेतील सर्व संतांनीही हा चमत्कार नोंदला आहे. उत्तरेत सर्वत्र शेकडो नामदेव मंदिरे आहेत. पंजाब, मध्यप्रदेशात नामदेव जयंतीची सुट्टी आहे. सर्वत्र संत नामदेव कथा व गौरव गायिला जातो. घुमान जि. गुरुदासपूर (पंजाब) येथे नामदेवांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. तेथे नामदेव दरबार, नामदेव चरणकमल व नामदेव तपियाना अशी प्रचंड मंदिरे आहेत. घुमानमध्ये नामदेवजयंतीदिनी कित्येक लाखांची यात्रा भरते. घुमानचे पीठ बहोरदासांचे घराणे चालवते. संत नामदेवांमुळे उत्तरेत भारतीय संस्कृतीचे फार मोठे रक्षण झाले, हे इतिहासमान्य आहे.

नामदेव महाराष्ट्रात येत-जात. त्यांचे पट्टशिष्य संत चोखोबांनी वैशाख वद्य पंचमीला गुरुवारी मंगळवेढा येथे गावकुसाचे बांधकाम करताना देह ठेवला. त्यांच्या अस्थी 'विठ्ठल विठ्ठल' म्हणतात, ही देवांनी खूण सांगितली. त्या नामदेवांनी संकलित केल्या. पीतांबरात घेतल्या. 'देवाचे अंचळी उठिला गजर । चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुळदेव धर्म चोखा माझा ॥' असे देवांनी धन्योद्‌गार काढले. नामदेवांनी नामाच्या गजरात त्यांना महाद्वारात समाधी दिली. सातशे वर्षापूर्वीच्या नामदेवांच्या या कार्याला आजही जोड नाही, तोड नाही. गुरूने शिष्याची बांधलेली समाधी हे दर्शनही दुर्लभ आहे.

नामदेव पुन्हा पंजाबात गेले. काही वर्षे राहिले. उत्तरेतील शिष्यांचे जीवनात व अन्यत्र त्यांच्या अपार कृपेचे दर्शन आजही वास्तवात आहे. जनमसाखी व जीवन झलकियाँ या हिंदी चरित्रात त्या ग्रथित आहेत. नामदेवात आणि देवात भेद नाही.'नामे नारायण नहीं भेद' हा नारा उत्तर भारतात अखंड दुमदुमत आहे.

नामदेवांना पंढरीची ओढ लागली. पण उत्तरेतील सख्यांना व भक्तांना दुखवणे त्यांच्या जिवावर आले. कुणाच्या ध्यानी, मनी न येता माघ शुद्ध द्वितीयेला त्यांनी पंजाब सोडले. त्या भूमीला अखेरचा साष्टांग दंडवत घातला व निरोप घेतला. माघ शुद्ध २ लाही तिथे प्रचंड उत्सव होतो. नामदेव पंढरीत आले. कार्तिक शुद्ध एकादशीला त्यांना ज्ञानदेवांनी देवाला केलेली समाधीची विनवणी आठविली. आपणही तोच धडा गिरवण्याचा त्यांनी निश्चय केला. शके १२७२ च्या आषाढी एकादशीचा दिवस होता. नामदेवांनी देवाला आपणांस समाधी देण्याची आर्त प्रार्थना केली. 'आषाढ शुद्ध एकादशी । नामा विनवी विठ्ठलासी । आज्ञा द्यावी वो मजसी । समाधी विश्रांतिलागी ॥' भर वारीत सर्वांना चटका लावणारा प्रसंग नको म्हणून 'देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी । पुरतील अंतरी कोड तुझे ॥' नामदेवांनी ते मान्य केले. 'महाद्वारी सुख असे या सुखाचे । लागती संतांचे चरणरज''नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे' असे आपले समाधिस्थान सांगितले. वारीत ही वार्ता कानोपकानी झाली. ज्ञानदेवांची वद्य १३ ची तिथीच देवांनी नामदेवांसाठी धरली. जनाईसह सर्व नामदेव परिवारानेही समाधीत सहभागी होण्याचा निश्चय केला. देवाला नकार देणे अशक्यच होते. मोठी सून लाडाई प्रसूतीसाठी माहेरी होती. (तिचा मुलगा मुकुंद याचाच आज वंश आहे.) वैष्णव पताकांचे भार घेऊन नामाच्या जयघोषात पंढरीत येत होते. नामदेवांनी सख्या-सोबत्यांना वस्तुपाठ दिलेचे कथन केले. सार्‍या हरिदासांना व हरिभक्तीला देवाकडे आकल्प आयुष्याचा उदंड आशीर्वाद मागितला. राही, रखुमाई, सत्यभामा आदींनी नामदेवांना कडकडून आलिंगन दिले. देवांनी तर नामदेवांना आपल्या पोटाशी धरून प्रेमाश्रूंचा अभिषेक घातला. नामदेव भिजून चिंब झाले. त्यांना धन्य धन्य वाटले. देवाने त्या १४ जणांचे परिवारास नामाच्या प्रचंड जयघोषात महाद्वारी समाधी दिली. त्यावेळी नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई हा महान गजर दुमदुमत होता. शेवटी संत परिसा भगवतांनी आरती ओवाळली.

अशा संत शिरोमणी नामदेवांच्या अभंगगाथेची मांडणी संत परंपरेची धारणा प्रणाम मानून केली आहे. जन्म नोंदीतील 'शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा' व आरतीतील 'शतकोटी अभंग रचले' ही वचने उपलब्ध गाथा अत्यल्प अभंग असल्याचे सूचित करतात. दुबार अभंग वगळले आहेत. सुसंगत विषयासाठी थोडे अभंग दुबार घातले आहेत. वाचकांनी व भक्तमंडळीनी हे ध्यानी घ्यावे ही नम्र विनंती. गाथेत जे उत्कट व भव्य दर्शन आहे, ते संत नामदेवांचे आहे. जे अप्रस्तुत व उणीवेचे आहे, ते आमचे आहे. गाथा मांडणीत 'नाचूं कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥' 'आम्हां सापडले वर्म । करूं भागवत धर्म ॥' व 'आम्हां कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी ॥' ही संत नामदेवधारणाच आम्ही हदयात बाळगली आहे. संत नामदेव हे देवाचे प्रेम-भांडारी आहेत. 'सिंधूहूनी सखोल । सुरस तुझे बोल ।' असा माउलींचा निर्देश आहे. स्वाभाविकच त्या प्रेम- भांडारात नामप्रेम, देवप्रेम, भक्तप्रेम, देवचरित्रप्रेम, संतप्रेम, संतांचे देवप्रेम, देवांचे संतप्रेम व नामदेवप्रेम आहे, ते न्याहाळावे अनुभवावे व त्या प्रेमरसात न्हाऊन निघावे, ही सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना.

गीता प्रेस, गोरखपुरने श्री. भिकाजी सदाशिव गणबावले, सरवडे यांच्या सांगण्यावरून ही गाथा प्रकाशित करण्याचे ठरवले. त्यामुळे या आवृत्तीची संपादन सेवा माझ्या पदरी पडली. मी धन्य झालो. मी गीताप्रेसचा ऋणी आहे.

संपादक,
हभप. धों. ए. तथा दादा गोंदकर


अधिक माहिती :
कल्याणी विशेषांक - १९९८