॥ श्रीनामदेव गाथा ॥

प्रथम नमन करूं गणनाथा । उमाशंकराचिया सुता ।
चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आतां दंडवत । १ ।
दुसरी वंदू सारजा । जे चतुराननाची आत्मजा ।
वाक्‌सिद्धि पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत । २ ।
आतां वंदू देव ब्राह्मण । ज्यांचेनि पुण्यपावन ।
प्रसन्न होऊनी श्रोतेजन । त्या माझें नमन दंडवत । ३ ।
आतां वंदू साधु सज्जन । रात्रंदिवस हरीचें ध्यान ।
विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझें नमन दंडवत । ४ ।
आतां नमू रंगभूमिका । कीर्तनीं उभे होती लोकां ।
टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें दंडवत । ५ ।
ऐसें नमन करोनि सकळां । हरीकथा बोले बोबड्या बोला ।
अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा । चालवी सकळां नामा म्हणे । ६ ।



प्रथम नमूं गजवदनु । गौरीहराचा नंदनु ।
सकळ सुरवरांचा वंदनु । मूषकवाहनू नमियेला । १ ।
त्रिपुरावधीं गणाधिपति । हरें पूजिला भावें भक्ती ।
एके बाणें त्रिपुर पाडिला क्षितीं । तै पशुपति संतोषला । २ ।
इंद्रादिकीं अष्टलोकपाळीं । लंबोदरू पूजिला कनककमळीं ।
त्यासी प्रसन्न झाला तयेवेळी । म्हणवूनी सकळीं पूजियेला । ३ ।
सटवें रात्रीं मदनु शंभरें नेला । प्रद्युम्न समुद्रामाजी टाकिला ।
तैं कृष्णे विघ्नहरु पूजिला । प्रद्युम्न आला रतीसहित । ४ ।
पुजिला साही चक्रवर्ती । त्यांचिया पुरती आर्ती ।
युधिष्ठिरें पूजिला चतुर्थी । राज्य प्राप्ति झाली तया । ५ ।
म्हणवूनि सुरवरीं केली पूजा । त्रिभुवनीं आणिक नाहीं दुजा ।
विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा । भावे भजा एकदंता । ६ ।



गणेश नमू तरी तुमचा नाचणा । म्हणोनि नारायणा नमन माझें । १ ।
सारजा नमू तरी तुमची गायणी । म्हणोनि चक्रपाणि नमन माझें । २ ।
इंद्र नमूं तरी तुमचिया भुजा । म्हणोनि गरुडध्वजा नमन माझें । ३ ।
ब्रह्मा नमूं तरी तुमचिये कुसी । म्हणोनि हृषिकेशी नमन माझें । ४ ।
शंकर नमूं तरी तुमची विभूती । म्हणोनि कमळापति नमन माझें । ५ ।
वेद नमूं तरी तुझाचि स्थापिता । म्हणोनि लक्ष्मीकांता नमन माझें । ६ ।
गंगा नमूं तरी तुमच्या अंगुष्ठीं । म्हणोनि जगजेठी नमन माझें । ७ ।
लक्ष्मी नमूं तरी तुमच्या पायांतळी । म्हणोनि वनमाळी नमन माझें । ८ ।
ऐसें नमन माझें सकळिकां देवां । नामा म्हणे केशवा नमन माझें । ९ ।



गाण जरी म्हणो तरी गणेश सारजा । आणीक नाहीं दुजा तया वांचूनी । १ ।
नाचणू म्हणों तरी तांडववनीं महेश्वरू । तो एक नृत्यकारु करूं जाणे । २ ।
बोलका म्हणों तरी बोलके वेद चारी । त्याने काय उरी जें मी बोलों । ३ ।
जाणु म्हणों तरी अठराही जाणें । त्यापें काय उणे जें मी जाणों । ४ ।
कळावंत म्हणों तरी चंद्र सूर्य दोन्ही । बारा सोळा गगनीं दाविताती । ५ ।
नामा म्हणे सर्व अवघे वंचले । केशवें आपुलें म्हणावे मातें । ६ ।



देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधी । १ ।
ब्रह्मा आणि इंद्रा वंद्य सदाशीवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु । २ ।
चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधु । ३ ।
योगीयांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेवा जगद्‌गुरू । ४ ।
निर्गुण निर्विकार नाहीं तुज माया । ऐकें कृष्णराया कानडिया । ५ ।
करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । ऐकें कृष्णराया गोजरीया । ६ ।
नामा म्हणे जरी दाविशील पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले । ७ ।



चरणवंदन

दीनाची माऊली । आजि म्यां देखियेली । १ ।
कटी ठेउनियां कर । उभी राहे विटेवर । २ ।
मुगुट रत्नांचा साजिरा । वरी मोतियांचा तुरा । ३ ।
रुप लावण्य गोजिरें । हृदयी पदक साजिरें । ४ ।
कासे पिवळा पीतांबर । चरणी ब्रिदाचा तोडर । ५ ।
भक्ता कृपेची साउली । नामा वंदी पायधुळी । ६ ।



विटेवरी समचरण सुंदर । बाळ सुकुमार यशोदेचें । १ ।
वाळे वांकी गर्जे तोडर चरणी । नाद झणझणी वाजताती । २ ।
कांसे कसियेला पीत पीतांबर । लोपे दिनकर तेणें प्रभा । ३ ।
नामा म्हणे नाही तुझ्या रूपा पार । तेथें मी किंकर काय वानूं । ४ ।



समचरणी उभा कैवल्याचा गाभा । देत असे शोभा पीतांबर । १ ।
चरणीचा तोडर गर्जे दैत्यावरी । मोरपीसा शिरी खोविली असे । २ ।
कंठी कौस्तुभमाळ कुंडले शोभती । मावळलीही ती रविशशी । ३ ।
कस्तुरीचा टीळा व्यंकटी भृकटी । कंदर्पाच्या कोटी न तुळसी । ४ ।
नामा म्हणे याच्या प्रकाशाच्या तेजे । उरले नाही दूजे कोण ठाई । ५ ।



श्रीमुख साजिरे कुंडले गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे । १ ।
कटावरी कर समचरण साजिरे । देखावया झुरे माझें मन । २ ।
माहेरीची आस दसरा दिवाळी । बाहे ठेवी निढळी वाट पाहे । ३ ।
बंदिजन नामा उभा महाद्वारीं । कीर्ति चराचरीं वर्णितसे । ४ ।



१०

सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक ताहान गेली । १ ।
भेटली भेटली विठाई माउली । वासना निवाली जिवांतील । २ ।
चंद्रासी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा । ३ ।
नामा म्हणे पाप आणि ताप दुःख । गेलें झालें सुख बोलवेना । ४ ।



११

आवडे जें जीवा तें पंढरिये उभे । पुंडलिकें लोभें राहविलें । १ ।
जोडुनि पाऊलें ठेवियलीं विटे । करद्वय गोमटें कटावरी । २ ।
कान मुख डोळे न म्हणती पुरे । सेवितां न पुरे धणी मना । ३ ।
गोड लागे पोट न भरे न धाय । मुकेलीच राहे भूक सदा । ४ ।
नामा म्हणे संतसंगती विश्वास । घेऊं अनुभवास फार फार । ५ ।



१२

कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळी । तेणें ते शोभली मूर्ति बरी । १ ।
बरवा बरवा विठ्ठल गे बाई । वर्णावया साही शिणताती । २ ।
श्रीवत्सलांछन वैजंयती गळां । नेसला पाटोळा तेजःपुंज । ३ ।
पाउलें समान विटेवरी नीट । नामा म्हणे भेट घ्यावी त्याची । ४ ।



१३

ब्रह्म अविनाश आनंदघन । याहुनि चरण गोड तुझे । १ ।
ते जीवें न सोडीं अगा पंढरीनाथा । जाणसीं तत्वतां हृदय माझें । २ ।
परात्पर वस्तु जे कां अपरंपार । तियेचा साक्षात्कार पाय तुझे । ३ ।
सच्चिदानंदघन जेथें हरपलें मन । त्याहुनि चरण गोड तुझे । ४ ।
नामा म्हणे तुझीं पाउलें सुकुमार । तें माझें माहेर विटेवरी । ५ ।



१४

झणी दृष्टी लागे तुझ्या सगुणपणा । जेणें माझ्या मना बोध केला । १ ।
अनंता जन्मींचे विसरलों दुःख । पाहतां तुझे मुख पांडुरंगा । २ ।
योगियांच्या ध्यानी ध्यातां नातुडसी । तो तूं आम्हांपाशीं मागें पुढें । ३ ।
नामा म्हणें जीवे करीन निंबलोण । विटेसहित चरण वोंवाळीन । ४ ।



१५

आनंद अद्वय नित्य निरामय । जे का निज ध्येय योगियांचे । १ ।
ते समचरण साजिरे ठेवुनि विटेवरी । उभे भीमा तीरी पंढरीये । २ ।
जे पुराणांसी वाड श्रुती नेणती पार । ते झाले साकार पुंडलिका । ३ ।
नामा म्हणे ज्याचे सनकादिकां ध्यान । ते माझे कुळदैवत पंढरीराव । ४ ।



१६

जे ज्ञानियांचे ज्ञेय ज्ञानियांचे ध्येय । पुंडलिकांचे प्रिय सुख वस्तु । १ ।
ते हे समचरण उभे विटेवरी । पहा भीमातीरीं विठ्ठल रूप । २ ।
जें तपस्वियांचे तप जें जपकांचे जाप्य । योगियांचे गौप्य परम धाम । ३ ।
जें तेजकांचें तेज जें गुरु मंत्राचे गुज । जें पूजकांचे पूज्य कुळदैवत । ४ ।
जें जीवनातें जीवविते पावकातें निववीतें । जें भक्तांचे उगवितें मायाजाळ । ५ ।
नामा म्हणे तें सुखचि आयतें । जोडलें पुंडलिकातें भाग्य योगें । ६ ।



१७

श्री विठ्ठलदर्शन

निर्गुणींचे वैभव आलें भक्तिमिषें । तें हें विठ्ठलवेषें ठसावलें । १ ।
बरविया बरवें पाहता नित्य नवें । हृदयी ध्यातां निवे त्रिविधताप । २ ।
चोविसांवेगळे सहस्रां आगळे । निर्गुणा निराळें शुद्धबुद्ध । ३ ।
वेदां मौन पडे श्रुतींसी कानडे । वर्णितां कुवाडें पुराणांसी । ४ ।
भावाचें आळुके भुललें भक्तिसुखें । दिधले पुंडलीकें सांधूनियां । ५ ।
नामा म्हणे आम्हां अनाथा लागुनी । निडारले नयनी वाट पाहें । ६ ।



१८

ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त । कारण रहित निरंजन । १ ।
तें आम्ही देखिलें चर्मचक्षु दृष्टी । उभा वाळवंटी पंढरीये । २ ।
वेदां अगोचर तयां सहस्रमुखा । तें झालें पुंडलिका लोभापर । ३ ।
परतल्या श्रुती म्हणती नेती नेती । आम्हां गातां गीतीं सापडलें । ४ ।
स्वरुपाचा निर्धार बोलती पुराणें । शिणली दरुशनें वेवादतीं । ५ ।
नामा म्हणे यांसी भावची कारण । पावावया चरण केशवाचे । ६ ।



१९

विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही बाह्या । १ ।
गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळां । भेटे वेळोवेळां केशिराज । २ ।
ऐसा दयावंत घेत समाचार । लहान आणि थोर सांभाळितो । ३ ।
सर्वांलागीं देतो समान दरुशन । उभा तो आपण सम पायी । ४ ।
नामा म्हणे तया भक्तांची आवडी । भेटावया कडाडी उभाची असे । ५ ।



२०

योगीयांचे ब्रह्म शून्य व्योमाकार । आमुचें साकार विटेवरी । १ ।
दाटुगे नागर कटी ठेऊनि कर । सर्वस्वे उदार भक्तालागी । २ ।
ज्ञानिया सिद्धांती लक्षापरी नये । आमुची वाट पाहे अनाथाची । ३ ।
पुंडलिका भावा वोळले वोरसें । नेणों काय कैसें प्रेम त्याचे । ४ ।
जाप्यकाचें जाप्य नाम मंत्रमय । आमुचें भक्तिप्रिय संसारीका । ५ ।
नामा म्हणे जीवे करीन ओंवाळणी । झणी चक्रपाणि दिठावसी । ६ ।



२१

माझा भाव तुझे चरणी । तुझें रुप माझे मनीं । १ ।
सांपडलों एकमेका । जन्मोजन्मी नोहे सुटिका । २ ।
त्वां मज केलें रे विदेही । म्यां तुज धरिले हृदयी । ३ ।
त्वां तोडिली माझी माया । मी जडलो तुझ्या पाया । ४ ।
नामा म्हणे गा सुजाणा । सांग ठकिलें कोणेकोणा । ५ ।



२२

जीव विठ्ठल शिव विठ्ठल । आत्मा विठ्ठल अखंडीत । १ ।
जनक विठ्ठल जननी वितुल । सोयरा विठ्ठल सांगाती । २ ।
अहिक्य विठ्ठल परत्र विठ्ठल । निरंतर विठ्ठल तारिता । ३ ।
नाम विठ्ठल रुप विठ्ठल । पतित पावन विठ्ठल विठ्ठल नामा । ४ ।



२३

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ।
तुटला हा संदेहो । भवमूळव्याधीचा । १ ।
म्हणा नरहरि उच्चार । कृष्ण हरि श्रीधर ।
हेंचि नाम आम्हां सार । संसार तरावया । २ ।
एकतत्त्व त्रिभुवनीं । हेंचि आम्हा हरिपर्वणी ।
जें गाइजे पुराणी । वेदशास्त्रांसहित । ३ ।
नेघों नामाविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलों पाहीं । विठ्ठल विठ्ठल म्हणताचि । ४ ।



२४

विसांवा विठ्ठल सुखाची साउली । प्रेमपान्हा घालीं भक्तांवरी । १ ।
दाखवी चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण नारायणा । २ ।
विठ्ठल आचार विठ्ठल विचार । दावीं निरंतर पाय आतां । ३ ।
नामा म्हणे नित्य बुडालों संसारीं । धांवोनिया धरीं हातीं मज । ४ ।



२५

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल । १ ।
माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल । २ ।
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल । ३ ।
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला । म्हणोनि कळिकाळां पाड नाहीं । ४ ।



२६

जय विठ्ठल श्री विठ्ठल । जय जय विठ्ठल विठ्ठल । १ ।
परब्रह्म विठ्ठल मूर्ति विठ्ठल । निरंजन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल । २ ।
जोचि नाम तोचि देवो । ऐसें म्हणों तरी नाहीं संदेहो । ३ ।
म्हणे विष्णुदास नामा । तो नेईल परमधामा । ४ ।



भूपाळी व काकड आरतीचे अभंग

२७

उठाउठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठल माऊली ।
दीन जनांची साउली । येई धाउनि स्मरतांचि । १ ।
पंढरपुरी जे भिमातटीं । सुंदर मनोहर गोमटी ।
दोन्ही कर ठेवोनियां कटी । भेटीसाठीं तिष्ठतसे । २ ।
किरीट कुंडले मंडित । श्रीमुख अति सुंदर शोभत ।
गळां वैजयंती डुलत । हार मिरवत तुळसीचा । ३ ।
सुरेख मूर्ति सगुण सांवळी । कंठी कौस्तुभ एकावळी ।
केशर उटी परिमळ आगळी । बुका भाळीं विलसतसे । ४ ।
पीत पीतांबर कसला कटी । अक्षयी वीट चरण तळवटी ।
सकळ सौंदर्य सुखाची पेटी । हृदय संपुष्टी आठवा तें । ५ ।
अति प्रिय आवडे तुळसी बुका । तैसीच प्रीति करी भोळ्या भाविका ।
नामा पदपंकज पादुका । शिरी मस्तकीं वंदितसे । ६ ।



२८

उठा जागे व्हारे आता । स्मरण करा पंढरिनाथा ।
भावें चरणीं ठेवा माथा । चुकवा व्यथा जन्माच्या । १ ।
धन दारा पुत्रजन । बंधु सोयरे पिशुन ।
सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी । २ ।
मायाविघ्नें भ्रमलां खरे । म्हणतां मी माझेनि घरें ।
हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल । ३ ।
आयुष्य जात आहे पहा । काळ जपतसे महा ।
स्वहिताचा घोर वहा । ध्यानी रहा श्रीहरीच्या । ४ ।
संत चरणी भाव धरा । क्षणक्षणा नाम स्मरा ।
मुक्ति सायोज्यता वरा । हेंचि करा बापांनों । ५ ।
विष्णुदास विनवी नामा । मुलू नका भवकामा ।
धरा अंतरी निज प्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति । ६ ।



२९

उठा उठा साधुसंत । साधा आपुलें हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत । ध्रु ।
उठोनिया वेगेशीं । चला जाऊं राउळाशी ।
जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखिलिया । १ ।
उठोनियां पहाटे । विठ्ठल पहा उभा विटे ।
चरण तयाचे गोमटे । अमृत दृष्टि अवलोका । २ ।
जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा ।
वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी । ३ ।
पुढें वाजंत्रे वाजती । ढोल दमामे गर्जती ।
होते काकड आरती । पांडुरंगरायाची । ४ ।
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारी ।
केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो । ५ ।



३०

उठा अरुणोदय प्रकाश जाहला । घंटा गजर गर्जिन्नला ।
हरि चौघडा सुरू झाला । काकड आरती समयाचा । १ ।
महाद्वारी वैष्णव जन । पुजा सामुग्री घेऊन ।
आले द्या तयासी दर्शन । बंदीजन गर्जती । २ ।
सभामंडपी कीर्तन घोष । मृदंग टाळ विणे सुरस ।
आनंदे गाती हरीचे दास । परम उल्हास करुनियां । ३ ।
चंद्रभागे वाळवंटी । प्रातःस्नानाची जन दाटी ।
आतां येतील आपुले भेटी । उठा उठा गोविंदा । ४ ।
ऐसें विनवी रुक्मिणी । जागृत जाहाले चक्रपाणि ।
नामा बद्धांजुळी जोडुनी । चरणीं माथा ठेवितसे । ५ ।



३१

पिंगळा बोले महाद्वारीं । निशा सरली दिशा चारी ।
उठा उठा हो श्रीहरी । उदयो प्रकाशला दिनकरी । १ ।
देवा शकून ऐकावा । ध्रु० ।
संत साधु अपरिमित । अवघा भरियेला थाट ।
टाळ वीणे वाद्य वाजत । आवडी मंजुळ स्वरें गात । २ ।
नादें अंबर दणाणलें । तेहतीस कोटी देव मिळाले ।
आवडी पहावया आले । स्वर्गसुखातें विसरले । ३ ।
आई रखुमाई माते । उठवा उठवा श्रीरंगातें ।
नारद तुंबर गायनाते । कर जोडुनि हनुमंत । ४ ।
उठिला सांवळा वनमाळी । आनंदली भक्तमंडळी ।
जयजयकारें पिटिली टाळी । विठ्ठल नामे दिधली आरोळी । ५ ।
पिंगळा आनंदला मनीं । तेज न माये गगनीं ।
हर्षे घातली लोळणी । शिंपी नामा तुझे चरणी । ६ ।



३२

उठा पाहुरंगा प्रभातसमयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला । १ ।
वाळवंटापासुनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडुनि हात । २ ।
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडुनि पाहाताती जगजेठी । ३ ।
सुरवरांची विमानें गगनी दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ । ४ ।
रंभादिक नाचती उभ्या जोडुनि हात । त्रिशूळ डमरु घेउनि आला गिरिजेचा कांत । ५ ।
पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती । भावे ओंवाळिती राही रखुमाईचा पती । ६ ।
अनंत अवतार घेसी भक्तांकारणे । कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें । ७ ।
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी । पाठमागें डोळे लावुनि उभी ते जनी । ८ ।



३३

उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा । १ ।
संत साधु मुनि अवघे झालेती गोळा । सोडा शेजेसुख आतां पाहूं द्या मुखकमळा । २ ।
रंगमंडपी महाद्वारी झालीसें दाटी । मन उतावेळ रुप पहावया दृष्टी । ३ ।
राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया । शेजें हालउनी जागें करा देवराया । ४ ।
गरुड हनुमंत उभे पहाती वाट । स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बोभाट । ५ ।
झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा । ६ ।



३४

अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्रगदापद्मसहित हरी । १ ।
देखिला देखिला देवाआदिदेव बरवा । समाधान जीवा पाहतां वाटे ग माये । २ ।
सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती । वंदुनि चरणरज नामा विनवीतसे पुढती । ३ ।



३५

लाजलें गे माय आतां कवणा ओवाळु । जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळु । १ ।
ओवाळू मी गेले माय गेले द्वारके । जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिखे । २ ।
ओवाळू मी गेले माय सखिया माझारी । जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नरनारी । ३ ।
ओवाळू मी गेले माय सारंगधरा । जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा । ४ ।
श्रीवत्सलांच्छन आता हीच ओळखण । विष्णुदास नामा येणे दावियेली खूण । ५ ।



३६

बाबा अहंकार निशी घनदाट । गुरु वचनी फुटली पहाट ।
माता भक्ति भेटली बरवंट । तिनें मार्ग दाविला चोखट गा । १ ।
नरहरि रामा गोविंदा वासुदेवा । धृ० ।
एक बोल सुस्पष्ट बोलावा । वाचे हरि हरि म्हणावा ।
संत समागमु धरावा । तेणें ब्रह्मानंद होय आघवा गा । २ ।
आला सीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झाले शरीरा ।
फिटला पातकाचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा । ३ ।
अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ ।
अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळु गा । ४ ।



३७

परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरी । वाक्या वाळे अंदु कुणा नवनीत चोरी । १ ।
म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा । २ ।
लपत छपत येतो हरी हा राजभुवनी । नंदासी ठाकूनी आपण बैसे सिंहासनी । ३ ।
सांपडला देव्हारी यासी बांधा दाव्यांनी । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी । ४ ।
बहुतां कष्टें बहुता पुण्यें जोडलें देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा । ५ ।
नामा म्हणे दातारा तुम्ही अहोजी केशवा । जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा । ६ ।



३८

संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत । १ ।
तेथे असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा । २ ।
रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत । ३ ।
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचा जो जिव्हार । ४ ।
ऐशा संतां शरण जावे । जनी म्हणे त्याला ध्यावे । ५ ।



३९

नामाचा महिमा कोण करी सीमा । जपा श्रीरामा एक्याभावें । १ ।
न लगती स्तोत्रे नाना मंत्र तंत्रे । वर्णिजे वक्‌त्रें श्रीरामनाम । ध्रु ।
अनंत पुण्यरासी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत । ३ ।
नामा म्हणे राम हा जप परम । तो देह उत्तम मृत्युलोकी । ४ ।



४०

जन्माचे कारण रामनाम पाठें । जाईजें वैकुंठें एक हेळां । १ ।
रामनामा ऐसां जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल अपैसा इहलोकीं । २ ।
दो अक्षरी राम हा जप परम । नलगे तुज नेम नाना पंथ । ३ ।
नामा म्हणे पवित्र श्रीरामाचें चरित्र । उद्धरसि गोत्र पूर्वजेंसी । ४ ।



४१

विषयांचें कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा । १ ।
सर्व हें लटिके जाणुनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे । २ ।
मायाजाळमोहो इंद्रियांचा रोहो । परि न धरिसी भावो भजनपंथे । ३ ।
नामा म्हणे देवा करी तूं लवलाहो । मयूराचा टाहो घन गर्जे । ४ ।



४२

कांसवीचे दृष्टी जै होईजे भेटी । तै अमृताची वृष्टि घडे त्यासी । १ ।
तैसें हें भजन श्रीरामाचे ध्यान । वाचे नारायण अमृतमय । २ ।
धन्य त्याचे कुळ सदां पै सुफळ । दिननिशी फळ रामनाम । ३ ।
नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम । वाचेसी सुगम रामनाम । ४ ।



४३

सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ । वंदि कळिकाळ शास्त्र सांगे । १ ।
ब्रह्मांडनायक ऐंसे जें कवतुक । तेचि नाम एक श्रीकृष्ण ऐसें । २ ।
आदी अंत पाहतां नाही पै सर्वथा । परिपूर्ण सरीता अमृताची । ३ ।
नामा म्हणे अनंत कां करीसी संकेत । उद्धरिले पतीत युगायुगीं । ४ ।



४४

गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । तो उद्धरे तात्काळ कलीमाजी । १ ।
नारायण नारायण हेंचि पारायण । उद्धरले जन इहलोकी । २ ।
तुटती यातना कर्माच्या भावना । जड जीव उद्धरणा नाम स्मरा । ३ ।
नामा म्हणे राम हा जप परम । न लगती नेम नानाकोटी । ४ ।



४५

तीर्थ तपरासी जप हृषीकेशी । नाम अहर्निशी रामराम । १ ।
तीर्थांचे पै तीर्थ नाम हें समर्थ । होईल कृतार्थ रामनामें । २ ।
साधेल साधन तुटेल बंधन । वाचे जनार्दन सुफळ सदा । ३ ।
नामा म्हणे हरी उच्चार तूं करीं । उद्धरसी निर्धारी इहलोकी । ४ ।



४६

पाहता ये परिपाठी आणीक नाहीं सृष्टी । नामेविण दृष्टी न दिसे माझे । १ ।
नामचि समर्थ नामचि मथीत । शंकरासी हेत रामनामी । २ ।
पुरती सर्व काम वाचे रामनाम । न लगती ते नेम कर्मजाळ । ३ ।
नामा म्हणे उच्चार न करी तूं विचार । तुटेल येरझार नाना योनी । ४ ।



४७

तपांचे पै तप राम हें अमुप । करी कां रे जप रामनामी । १ ।
रामकृष्ण म्हणे वाचे नारायण । तुटेल बंधन यमपाश । २ ।
साधेल साधन होती कोटी यज्ञ । नाम जनार्दन जप करी । ३ ।
नामा म्हणे जिव्हे नाम स्मरण करी । म्हणे नरहरी एक भावें । ४ ।



४८

हाचि नेम सारी साधेल तो हरी । नाम हे मुरारी अच्युताचें । १ ।
गोविंद हरे गोविंद हरे । यादव मुरारे रामनाम । २ ।
न लगती कथा नाना विकलता । राघवाचे स्मरतां नाम वाचे । ३ ।
नामा म्हणे राम आम्हा हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां । ४ ।



४९

करूं हें कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें । १ ।
जगाचा जनक रामकृष्ण एक । न करितां अविवेक स्मरे राम । २ ।
तुटेल भवजाळ कां करिसी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रिय बाधा । ३ ।
नामा म्हणे गोविंद स्मरे तूं सावध । नव्हे तुज बाध नानाविघ्नें । ४ ।



५०

मायेंचे भूचर रज तम सात्विक । रामनाम एक सोडवणें । १ ।
राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । नामे घडे यज्ञ कोटी देखा । २ ।
न लगती साधन नाना मंत्र विवेक । रामनामीं मुख रंगी कां रे । ३ ।
नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां । नित्य ते पौर्णिमा सोळा कळी । ४ ।



५१

माझें मी करिता गेले हे दिवस । न धरीच विश्वास रामनामीं । १ ।
अंती तुज उद्धरती रामकृष्ण हरी । राम पंचाक्षरी मंत्रसार । २ ।
कां करशील सांठा प्रपंच विस्तार । न तुटे येरझार नामेंविणा । ३ ।
नामा म्हणे कैसें रामनामीं पिसें । तो उद्धरेल अपैसे इहलोकी । ४ ।



५२

नको नको माया सांडी लवलाह्मा । पुढील उपाया झोंबे कां रे । १ ।
रामनाम म्हणे तुटेल बंधन । भवबंध मोचन एकानामें । २ ।
स्मरतां पतीत उद्धरले यथार्थ । नाम हाचि स्वार्थ तया झाला । ३ ।
नामा म्हणे हा जप करी तूं अमूप । नामें चुकली खेप इये जनीं । ४ ।



५३

स्मरण करितां रामनाम ध्वनी । ऐकतांची कर्णी पळती यम । १ ।
ऐसें पाठ करी रामकृष्ण हरी । होतील कामारी रिद्धीसिद्धी । २ ।
साध्य तोंचि साधी न करी उपाधि । जन्मांतरींच्या व्याधि हरती नामे । ३ ।
नामा म्हणे सर्व राम हाचि भाव । नाही आणिक देव रामेंविण । ४ ।



५४

रामकृष्ण माळ घाली कां अढळ । तुटेल भवजाळ मायामोह । १ ।
होशील तूं साधु न पवसी बाध । पूर्ण ब्रह्मानंद पावेल तुज । २ ।
जपतां रामनाम पुरती सर्व काम । आदि अंती नेम साधेल तुज । ३ ।
नामा म्हणे कृतार्थ पूर्ण मनोरथ । न लगती ते अर्थ माया फांसे । ४ ।



५५

शरीर संपत्ती मायेचे टवाळ । वायांची पाल्हाळ मिरवितोसी । १ ।
नाम हेंचि तारी विठ्ठल निर्धारी । म्हणे हरी हरी एकी हेळा । २ ।
स्मरतां गोपाळनाम वंदील काळयम । न लगती नेम मंत्रबाधा । ३ ।
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम । राम हेंचि नाम स्मरें कां रे । ४ ।



५६

भवाब्धि तारण रामकृष्ण नांव । रोहिणीची माव सकळ दिसे । १ ।
नाम हेंचि थोर नाम हेंचि थोर । वैकुंठी बिढार रामनामें । २ ।
राम हे निशाणी जपताची अढळ । वैकुंठ तत्काळ तया जीवा । ३ ।
नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल । अंती तुज पावेल नाम एक । ४ ।



५७

जळाचा जळबिंदु जळीच तो विरे । तैसें हें विघरे पांचां ठायी । १ ।
जीवशीव हे उच्चार नाम हें मधुर । जिव्हेसी उच्चार रामनाम । २ ।
रामनाम तारक शिव षडाक्षरी । तैसी वाचा करी अरे मूढा । ३ ।
नामा म्हणे ध्यान शिवाचें उत्तम । मंत्र हा परम रामनाम । ४ ।



५८

करितां हरिकथा नाम सुखरासी । उद्धार जीवाशी एका नामें । १ ।
तें हें रामनाम जप तूं सप्रेम । जप हा सुगम सुफळ सदा । २ ।
नामेंचि तरले नामेंचि तरले । नाम म्हणतां गेले वैकुंठासी । ३ ।
नामा म्हणे एक नामेंसी विनटे । ते वैकुंठीचे पेठे पावले देखा । ४ ।



५९

नामावाचूनि काहीं दुजें येथें नाहीं । वेगी लवलाही राम जपा । १ ।
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ । पावसी केवळ निजपद । २ ।
ध्रुव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध । नामेंचि विद्गद पावले देखा । ३ ।
नामा म्हणे राम वाचे जया नाम । संसाराचे श्रम हरे नामें । ४ ।



६०

म्हणतां वाचे नाम वंदी तया यम । काळादिकासम वंदी तया । १ ।
ऐसें नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ । उच्चारितां नीट वैकुंठ गाजे । २ ।
तो हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा । न कळे तया उपमा आदिअंती । ३ ।
नामा म्हणे पाठें नामाचेनि वाटे । तरी प्रत्यक्ष प्रगटे विठ्ठल हरी । ४ ।



६१

कृष्णनाम श्रेष्ठ गाताती देवऋषि । नाम अहर्निशी गोपाळाचे । १ ।
हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरी । वसे चराचरी जनार्दन । २ ।
आदि ब्रह्म हरी आळवी त्रिपुरारि । उमेप्रती करी उपदेश । ३ ।
नामा म्हणे पूर्ण हा जप उत्तमोत्तम । शंकरासी नेम दिनदिशीं । ४ ।



६२

कां करितोसी शीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज । १ ।
राम कृष्ण हरी गोविंद गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ । २ ।
वंदितील यम कळिकाळ सर्वदा । न पवसी आपदा असतां देही । ३ ।
नामा म्हणे वोळगे सीण झाला सांगे । प्रपंच वाउगे टाकीं परते । ४ ।



६३

नामाचेनि पाठे जातील वैकुंठे । तो पुंडलिक पेठे प्रगट असे । १ ।
विठ्ठल विठ्ठल मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाहीं शस्त्र नामेंविण । २ ।
पुराण व्युत्पत्ति न लगती त्या श्रुती । हरीनाम पंथी मुनि गेले । ३ ।
नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी । जन्माची येरझारी हरे नामें । ४ ।



६४

सर्वांभूती भज नमन करी संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी । १ ।
ऐसें भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची । २ ।
न लगती साधने वायांचि बंधने । एका नामे होणे चतुर्भुज । ३ ।
नामा म्हणे थोर नामेंचि सधर । वैकुंठी बिढार तया भक्तां । ४ ।



६५

तूं तंव नेणता परी हरि जाणता । आहे तों समता सर्वांभूती । १ ।
सर्व ब्रह्म हरी येकचि निर्धारी । होसील झडकरी ब्रह्म तूंचि । २ ।
अच्युत माधव अमृताच्या पाठें । लागतांची वाटे वंदी यम । ३ ।
नामा म्हणे होसील जिवलग विष्णूचा । दास त्या हरीचा आवडता । ४ ।



६६

कां करिसी सोस मायेचा असोस । नव्हे तुज सौरस नामेंविण । १ ।
नामचि हा मंत्र नाराच हो तंत्र । नामेंविण पवित्र न होसी देखा । २ ।
तिही लोकी पाहता नामेंविण सर्वथा । अच्युत म्हणता पुण्य कोटी । ३ ।
नामा म्हणे ब्रह्म आदिअंती नेम । तें विटेवरी सम उभे असे । ४ ।



६७

पवित्र परिकर नाम हा उच्चार । उद्धरण साचार जगा यया । १ ।
गोविंद केशव उच्चार श्रीराम । न लगती नेम अमूप जप । २ ।
तें हें विठ्ठलरूप पिकलें पंढरी । नाम चराचरी विठ्ठल ऐसे । ३ ।
नामा म्हणे विठ्ठल सर्वांत सखोल । उच्चारितां मोल नलगे तुज । ४ ।



६८

पोसिशी शरीर इंद्रियांचा बांधा । सेखी ते आपदा करील तुज । १ ।
नव्हे तुझे हित विषय पोषिता । हरी हरी म्हणता उद्धरसी । २ ।
वायांच पाल्हाळ चरित्र सांगसी । परी राम हें न म्हणसी अरे मूढा । ३ ।
नामा म्हणे हेंचि पंढरीये निधान । उच्चारितां जन तरले ऐसे । ४ ।



६९

विषय खटपट आचार सांगसी । विठ्ठली न भजसी अरे मूढा । १ ।
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी । अंती हा निर्धारी तारील सत्य । २ ।
न लगे सायास करणे उपवास । रामाचा विश्वास ऐसा धरी । ३ ।
नामा म्हणे प्रेम धरी तू सप्रेम । विठ्ठल हाचि नेम दिननिशीं । ४ ।



७०

नव्हे तुज हित विषय पोशितां । हरी हरी म्हणता तरशील । १ ।
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी । वेगीं हा उच्चारी लवलाही । २ ।
घडतील यज्ञ पापें होतील भग्न । प्रपंच सर्वज्ञ होईल ब्रह्म । ३ ।
नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा । उद्धरसी सर्वथा भाक माझी । ४ ।



७१

उपदेश सुगम ऐके रे तूं एक । नाम हे सम्यक विठोबाचे । १ ।
जनीं जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कली माजी । २ ।
साधेल निधान पुरेल मनोरथ । नामेचि कृतार्थ होती जन । ३ ।
नामा म्हणे नाम घेई तूं झडकरी । पावसी निर्धारी वैकुंठपद । ४ ।



७२

सर्वांगे साजिरीं आहेति इंद्रिये । तंव सावध तूं होय हरिकथे । १ ।
कीर्तनी नर्तन वाचे जनार्दन । न पवसी पतन येरझारी । २ ।
पूर्ण मनोरथ घडती एका नामें । दाटेल सप्रेमे जीवन हेतूं । ३ ।
नामा म्हणे विलास न करी तूं आणिक । सर्वी सर्व एक नाम असे । ४ ।



७३

सोपा हा सुगम उपावो परीस । धरी तूं विश्वास नाम महिमा । १ ।
नाम हेचि गंगा नाम हेचि भीमा । अंतरी श्रीरामा जपिजेसु । २ । -
पृग्मृत सुरस राम नाम एक । वाचेचें वाचक मन करीं । ३ ।
नामा म्हणे सुरस एक राम रस । ध्यायीं केशवास दिननिशीं । ४ ।



७४

म्हणतां नाम वाचें वैकुंठ जवळीं । नित्य वनमाळी भक्ता संगे । १ ।
होईल साधन विठ्ठली परिपूर्ण । निवती नयन मूर्ति पाहता । २ ।
शंखचक्रांकित आयुधें शोभती । भाग्योदयीं येती भावशीळा । ३ ।
नामा म्हणें तें रूप पंढरीये आहे । न सोडी तूं सोये केशवाची । ४ ।



७५

रुपाचें रूपस नाम हषीकेश । पंढरी निवास जप करी । १ ।
विठ्ठल श्रीहरी मुकुंद मुरारी । नामेचि बोहरी प्रपंच्याची । २ ।
विठ्ठलाचें नाम हेंचि जीवन हेत । नाम हें अमृत केशवाचे । ३ ।
नामा म्हणे देव अमृताचा साठा । मुखामाजी पैठा होत नामें । ४ ।



७६

सार हें पै नाम विठोबाचे आहे । दिननिशीं सोये मना लावी । १ ।
गुंफिजेल मन जोडिती पाऊलें । तुटे ते घातले मायाजाळ । २ ।
नामचि कारण जप पैं सुफळ । उद्धार निर्मळ सकळ जीवा । ३ ।
नामा म्हणे तो हा विठ्ठल पंढरी । नाम चराचरीं अमृतमय । ४ ।



७७

विठ्ठल नामीं आळस न करी गव्हारा । वायाविण येरझारा शिणतोसी । १ ।
हरि उच्चारण करी हा विचार । नाम हे साचार उद्धरण । २ ।
मी म्हणता अहंता वाढे हे सर्वथा । हरि भजन पंथा नाही मार्ग । ३ ।
मायाजाळ विषय तोडी तोडी सांठा । विठ्ठल नाम पाठा वोळगे जना । ४ ।
सर्वहि लटिके मायाजाळ फिके । रामेवीण एके नाही दुजे । ५ ।
नामा म्हणे उपदेश भजे केशवास । वैकुंठ निवास वोळे तुज । ६ ।

७८

हरिनाम पाठ हाचि भावो । हरि हरि हाचि देवो ।
हरिविण न फिटे संदेहो । सर्व जीवांचा जाण पां । १ ।
हरि सत्य ज्या देहीं । तोचि तरला येथ पाही ।
हरिविण भवडोहीं । तरण कैसें घडेल । २ ।
रामकृष्ण वासुदेवा । हाचि सर्व जीवांचा विसावा ।
ऐसा पुकारुनिया धांवा । विठ्ठल नाम उद्धारी । ३ ।
नामा जपे हृदयीं सदां । रामकृष्ण हाचि धंदा ।
हरिनाम परमानंदा । हाचि जप जपतसें । ४ ।



७९

येईं गे केशवे मज तुझी सवे । तुजविण नुगवे दिनु माये । १ ।
तूं माय जननी कांसवी कौसल्या । दिन बहुसाळ मज पावे । २ ।
न मागें केवळ विषयांचे टवाळ । तूं माझी कृपाळ विठ्ठलमाय । ३ ।
वोळली गगनी केशव कामधेनु । लवतां लोचन स्फुरे बाह्मा । ४ ।
वाजवील वाद्य गोपाळांची मांदी । आल्हाद गोविंदी नित्य माझा । ५ ।
नामा म्हणे केशव येई कामधेनु । तेणें माझी तनु तृप्त सदा । ६ ।



८०

येई गे नारायणी अमृत संजीवनी । चिंतिता निर्वाणीं पावें वेगीं । १ ।
तूं माझें जीवन नाम नारायण । नित्य अनुष्ठान तुझ्या नामें । २ ।
बाह्म अभ्यंतरी तूचि सर्वांठायी । तुजविण सृष्टी शून्य दिसे । ३ ।
चाल लवलाह्मा कृपाळू तूं माये । मज हें न साहे मोह जंजाळ । ४ ।
तुटेल बिरडें सुटतील गांठी । जैव तूं जगजेठी येशील माये । ५ ।
नामा म्हणे धन्य तुझें नाम साचें । उच्चारितां वाचे निवती अंगे । ६ ।



८१

येई गे माधवे पाजीं प्रेमपान्हा । विषयाचा आंदणा नको करूं । १ ।
धांव तूं मधूकरे माधवे उदारे । येई तूं सोइरे जननिये । २ ।
कष्टलो मी भारी शीण दूर करी । येई तू झडकरी माधवे वो । ३ ।
अनंत वो नामें पुराणे पढती । पावसी आकांती विठ्ठले वो । ४ ।
नामा म्हणे लाहो करावा माधवे । माझेनि वो जीवें लाहे चाड । ५ ।



८२

येईं तूं गोविंदे नामामृत धारी । नित्य हें उच्चारी गोविंदाते । १ ।
गोविंद गोविंद नित्य हाचि छंद । पावे तूं हृद्‌गद आदिरूपें । २ ।
गोविंद हो ध्याने निवती अष्टांगे । गोविंदे गे वेगें वेष धरूं । ३ ।
गोविंद गोपाळ मुकुंद केसरी । येई तूं लवकरी सांवळिये । ४ ।
गोविंद हें नाम जनी वनी दिसे । प्रत्यक्ष तें ठसे पंढरीसी । ५ ।
वेणूनादी काला गोविंदे पै केला । धावतचि आला पेंद्यापाशी । ६ ।
ती हीच वो माय उभी बाळमूर्ती । नाम जे जपती पांडुरंग । ७ ।
नामा म्हणे पांग गोविंद हा दवडी । वेगें लवडसवडी करीं माये । ८ ।



८३

येई तूं विष्णू हरि पावे लवकरी । ब्रीद चराचरी सांगे मुनी । १ ।
वैकुंठवासिनी कृष्णविष्णुदेव । नामातें गौरव आम्हालागीं । २ ।
धन्य हाचि दिनु विष्णुमाय पावे । गगनी उगवे सूर्य जैसा । ३ ।
आदि ब्रह्मा हरि विष्णुकृष्णगंगा । भागिरथी पैं गा पदी पावे । ४ ।
गया तें प्रयाग काशी तें सर्वांग । विश्वेश्वर लिंग चराचर । ५ ।
विष्णुगंगाधर विष्णुनाम पाठ । उच्चारितां वाट वैकुंठीची । ६ ।
नामा म्हणे विष्णू भागिरथीमाजी । पंढरीये माझी विठ्ठलमाय । ७ ।



८४

येईं तूं मधुकरे मदनसुंदरे । मज गे न धरे प्रेम पोटी । १ ।
तूं माझी जननी मधुसूदन गाय । कामधेनु होय कांसवीची । २ ।
आनंद निजधने जुनाट मधुसूदने । शुकस्तनपान पाजी पान्हा । ३ ।
केशव कांसवी पद रामगाय । आत्माराम होय निःसंदेह । ४ ।
विठ्ठलमुकुंदे स्वरूपे गोमटी । आकांतली सृष्टी मधुसुदनें । ५ ।
शंखचक्रांकित आयुधें मंडीत । मुकुट शोभत तुझा शिरीं । ६ ।
भक्तवरदायनी मधुसूदनगंगा । व्हावे तू वो वेगा कामधेनु । ७ ।
नामा म्हणे माये मधुसुदन गाय । ते संजीवनी होय आम्हांलागीं । ८ ।



८५

येईं वो त्रिविक्रमे पूर्ण पान्हा देईं । कामधेनु होईं विठ्ठराजे । १ ।
त्रिविक्रमे धरे येई तूं सांवळे । मुकुंद गोपाळे केशवे वेगी । २ ।
तू माझे निजधन त्रिविक्रमधरे । गंगानाममात्रें भंगी पाप । ३ ।
त्रिपदागायत्री त्रिविक्रममुखें । जनाची वो दुःखे हरती नामें । ४ ।
विजया त्रिफणी भागीरथी वेणी । प्रयाग वो धुनी पाप जाळी । ५ ।
त्रिस्थळी त्रिमाये त्रिविक्रम होय । विश्वेश्वर दोहे तारक ब्रह्म । ६ ।
काशी कांची माय अयोध्या द्वारका । मथुरा अवंतिका तूंचि माये । ७ ।
नामा म्हणे माझी त्रिविक्रम गाय । भक्तीसी पान्हाये पंढरपुरीं । ८ ।



८६

येईं वो वामने खुजीयखुजटे । पंढरीचे पेठे उभी राहें । १ ।
येईं वो डोळसे सांवळे तेजसे । वामने बहु वसे ब्रह्मचारी । २ ।
अनंत विद्‌गदे अनंत अपार । कैवल्य वोसरे पदकमळे । ३ ।
तुझे नाम धन्य वामन साजिरें । रुप हें गोजिरें बळीच्या द्वारी । ४ ।
तुझ्या चरणी तीर्थ उद्धरती सर्व । येईं तू सत्वर वामनाई । ५ ।
नामा म्हणे पावे वामन ब्रह्मांडे । स्वरूप वितंडे ब्रह्मचारें । ६ ।



८७

येई वो श्रीधरे सर्व रूपसारे । कैवल्य उत्तरे अभिनव । १ ।
श्रीधर श्रीरंगे नाम पांडुरंगे । प्रगट वो सांगे पूर्णधन । २ ।
श्रीकरे श्रीधरे शोभा ते साचारे । चक्रांकित करे शंख तुझा । ३ ।
सुंदर श्यामळ नाम हे अढळ । मुखी हो वेल्हाळ हस्त तुझे । ४ ।
प्रकाशे हा पूर्ण श्रीधरे पैं जाण । सांगितली खूण खेचराने । ५ ।
नामा म्हणे माता श्रीधर उच्चारू । तरेन साचारू तिन्ही लोकीं । ६ ।



८८

येईं हृषिकेशी दिव्यरूप दिसे । मन हें उल्हासे भेटीलागी । १ ।
हृषीकेशी नामे तरले संभ्रमे । नित्य रामनामें भवसिंधू । २ ।
आराधने धन ऋषीसी संपूर्ण । नाम कोटी यज्ञ झालें तया । ३ ।
पावन हृषिकेशी हेंचि ध्यान मन । नाम सनातन हषिकेशी । ४ ।
विश्वा करी कळा विश्वजन लीळा । त्राहे वेळोवेळां हषीकेशी । ५ ।
नामा म्हणे माय येई हृषिकेश । झालों कासावीस तुजवीण । ६ ।



८९

येईं वो पद्मनाभे पंकजलोचने । विश्व पूर्णघने देखे तुज । १ ।
त्राहें पद्मनाभा वाचा सिद्ध पावे । मज हें नुगवे मायाजाळ । २ ।
पद्मांकित रेखा पद्म हें सुरेख । पावे वो निमिष्य एकमाये । ३ ।
विचरे हे पृथ्वी नाम पद्मनाभ । स्वयंभावो बिंब विठ्ठलेसी । ४ ।
रिकामी मी नसें दिननिशी निमिष्य । पद्मनाभ साक्ष हृदयी भोगी । ५ ।
नामा म्हणे पद्मनाभ हें हो नाम । जपतुसे प्रेम देईं मज । ६ ।



९०

येई वो दामोदरे पवित्र हे करे । मना हो नावरे प्रेमलोट । १ ।
पाहें कृपादृष्टी साहे जगजेठी । पूर्ण पान्हा घोटी ऐसें करी । २ ।
दामोदरे नाम मदन परिकरे । हाचि वो विचार मनें केला । ३ ।
येईं तूं निर्धारें पावें तूं झडकरी । येई वो लवकरी दामोदरे । ४ ।
दामोदर माता पाहे वो समता । पावे वो निवांता पावे वेगीं । ५ ।
नामा म्हणे लोटूं प्रेमामृत निवटूं । नामेंचि वैकुंठे दामोदरे । ६ ।



९१

येईं तूं कृपाळे संकर्षण माते । पवित्र पूर्णभरिते गुणनिधि । १ ।
त्राहेत्राहे वेगी पावे वो झडकरी । ब्रीद चराचरीं वर्णिताती । २ ।
संकर्षण गंगा सर्वांगी तूं असे । जनी वनी दिसें रूप तुझे । ३ ।
निर्धारु सांगतां न माये वो घेता । संकर्षण माता पाव वेगी । ४ ।
विष्णुसंकर्षण नाम हें गहन । पतितपावन चरणरजें । ५ ।
नामा म्हणे माय संकर्षण गाय । हरिदासा पान्हावे पंढरीसी । ६ ।



९२

येईं तूं शारंगे वासुदेवे त्वरें । वासुदेवे सारे गोपाळे वो । १ ।
त्राहे वासुदेवा पावें झडकरी । त्वरें वेगू करी आर्त भेटी । २ ।
वासुदेवनामें साधन सुगम । योगिया विश्राम स्थान झालें । ३ ।
द्वादश अक्षर जपिन्नला धुरु । तयासी साचारू अढळपद । ४ ।
बळी भीष्मदेवी वासुदेवी भाव । रोहिणीची माव ऐसे झालें । ५ ।
नामा म्हणे भक्त वासुदेवीं रत । सायुज्य पावे तो एक्यानामें । ६ ।



९३

येईं तूं प्रद्युम्ने ध्यान तूं धरणे । माझिये कल्पने निर्धारुसा । १ ।
त्राहे झडकरी पावे वो लवकरी । प्रद्युम्ने फुत्कारी वेळोवेळां । २ ।
सांवळे सुंदरे वेणु वाहे करे । ध्यान हें सुंदर यमुनातटी । ३ ।
प्रवाह प्रद्युम्ने नामघोष दाट । जिंकिले जुनाट पापराशी । ४ ।
नामा म्हणे नाम धन्य हें प्रद्युम्न । होईल संपन्न नाम घेतां । ५ ।



९४

येई वो अनिरूद्धे सांवळे प्रबुद्धे । विराटे गोविंदे पाव वेगीं । १ ।
त्राहे माउलीये मना तुझी सोय । चुकती अपाय नाम घेता । २ ।
अनिरुद्धे पाठे जाईन वैकुंठे । पुंडलीक पेठे उभा असे । ३ ।
कटावरी कर सांवळी सुंदर । मनाचा विचार इच्या चरणी । ४ ।
अनिरुद्धसार अनु नाही आधार । सर्वही विचार अनिरुद्धे । ५ ।
नामा म्हणे येईं अनिरुद्धे माये । आणिक उपाय न लगे मज । ६ ।



९५

येईं तूं पुरुषोत्तम संजीवनी रामे । योगिया विश्रामे पुरुषश्रेष्ठा । १ ।
त्राहे मनोधर्म नाम पुरुषोत्तम । साधन आगम ऐसी माये । २ ।
येईं वो सांभाळी लवलाहे मने । जुनाट हो जुने पुरुषोत्तमें । ३ ।
तुझे नाम धन्य पुरुष हें सौजन्य । द्वैत हें अभिन्न अद्वैत हें । ४ ।
एकाक्षरी नाम पुरुष शुचिसम । नाम आत्माराम पुरुषोत्तम । ५ ।
नामा म्हणे पावें पुरुषोत्तम माते । सर्वत्र अद्वैत एकरुप । ६ ।



९६

येईं वो अधोक्षजे वैकुंठ विराजे । नाम गे सहजे अमृतरासी । १ ।
अधोक्षज नामें घालीन गोंधळ । रिता एक पळ जाऊं नेदी । २ ।
अधर हे रंगी अधोर्ध्व सेवीन । सर्वत्र पाहीन अधोक्षज । ३ ।
अरिष्ट हें निरसी माये अधोक्षजे । ऐसी या पाविजे संकटी त्वां । ४ ।
अरि हे मर्दन अधोक्षज जाणें । स्वीकारावे पूर्ण प्रगटतां । ५ ।
नामा म्हणे धांवे अधोक्षज पावे । दिशाद्रुम भावे तुज मग । ६ ।



९७

येईं वो केसरी नरसिंह उच्चारी । पवित्र साचारी तिही लोकी । १ ।
नरसिंह वामन प्रल्हाद रक्षण । आमुचें तें धन नाम तुझें । २ ।
शंखचक्र करी पावे वो लवकरी । येईं तूं केसरी लवलाहे । ३ ।
नरसिंह हें नाम नरसिंह हें प्रेम । उत्तमोत्तम तिन्ही लोकीं । ४ ।
त्रिपुररक्षक दानवमर्दन । विकटवदन पंचाक्षरी । ५ ।
नामा म्हणे हरि नाम नरकेसरी । नरसिंह उच्चारी तरती जीव । ६ ।



९८

येईं वो अच्युते नामामृत रसे । सुंदर डोळसे जान्हवीये । १ ।
अमृताची खोटी अच्युतनाम पेठी । पावे वो जगजेठी अच्युतसार । २ ।
अच्युत अच्युत नामें हेंचि सत्य । हें पियूष त्वरित उच्चारितां । ३ ।
वैकुंठीची मूर्ति अच्युतनाम पाठे । प्रत्यक्ष वो भेटे विटेवरी । ४ ।
पुंडलीक दृष्टी नयनाची भेटी । निवारितां दृष्टी न्याहाळितां । ५ ।
नामा म्हणे अच्युत नाम हेंचि आम्हा । दिननिशी राम जपतसें । ६ ।



९९

येई जनार्दने जनवनसंपन्ने । माझे वो चिद्‌घने पांडुरंगे । १ ।
त्राहे जनार्दने पूर्णानंदघने । येई वो संपन्ने विश्वंभरे । २ ।
नाम हें दुर्लभ जनकजननी । राम जनार्दनी विनटली । ३ ।
सांवळी डोळस रवि एकासनी । तेज प्रकाशनी हिरियाची । ४ ।
जननी ते जननी निकट ते जीवनी । जग प्रगटिणी हरीयाची । ५ ।
नामा म्हणे जन नाम जनार्दन । सनकादिक जाण सेविताती । ६ ।



१००

येईं तूं उपेंद्रे विठ्ठल महिंद्रे । देवामाजी भद्रे सिंहासनी । १ ।
त्राहे वो जननी शिणलों गे माये । तुजविण आहे कवण मज । २ ।
तूं माझे कारुण्य प्रत्यक्ष सौजन्य । विचारतां प्रवीण प्रबुद्ध हो । ३ ।
पावे वो तूं वेगी उपेंद्रे गे माते । पुंडलिक सांगाते पंढरीसी । ४ ।
दीपकु लाविला दिन उगवला । दीपकें फळला पांडुरंग । ५ ।
नामा म्हणे नाम उपेंद्र ऐसे शम । पावेन विश्राम नाम घेतां । ६ ।