॥ रुद्रार्थ ॥

विश्वाचे विराट महाकाव्य

जीवनांत आमूलाग्र क्रान्ति निर्माण करूं शकणारे भव्य व उदात्त असे विचार असलेली, अनेक सूक्ते आपल्या वेदिक वाङ्मयांत आढळून येतात. आपल्या भारतीय समाजाच्या भव्यतेचे व उदात्ततेचें रमणीय असे प्रतिबिंबच जणू आपल्या वैदिक वाङ्मयांत उमटले आहे असें ही सूर्वे पाहिल्यावर वाटल्यावाचून रहात नाही.

ज्या विचारांचा परिणाम आपल्या समाजधारणेवर झाला व तद्वारा आपल्या राष्ट्रघारणेवर झाला ते विचार केवळ विचार नसून भारतीय जीवन-मूल्यांचे जणू ते अमर असे स्तंभच होत ! अशा या उत्तुंग दीपस्तंभानें उजळून काढलेल्या भारतीय जीवनपथावरील एक महत्त्वाचा दीपस्तंभ म्हणून श्रीरुद्रसूक्ताचा उल्लेख करणें वावगे ठरणार नाहीं.

'रुद्र' हें केवळ सूक्त नसून तें विश्वाचे विराट् महाकाव्य आहें. साक्षात्कृतधर्माण अशा ऋषींच्या क्रान्तिदर्शी दिव्य ऋतम्भरा प्रज्ञेंतून तें उत्स्फूर्त झाल्यामुळें तर त्याचें एक आगळेच महत्त्व आहे. मानवी प्रतिभेला अनाकलनीय अशी विराट् भरारी मारण्याचे सामर्थ्य या दिव्य प्रतिभेला सहजच असतें; म्हणूनच अशा दिव्य व लोकोत्तर प्रतिभेतून विश्वाचें सामान्यतः अज्ञेय व निगूढ असे रहस्यही व्यक्त होत असतें. रुद्रसूक्तांतूनही असेंच रहस्य व्यक्त होत असल्याने मी त्याला विश्वाचे विराट् महाकाव्य असें म्हणतो.

मानवाची उत्क्रांति

मानवी योनींतून दैवी योनींत उत्क्रान्ति करून घ्यावयाची असेल तर या क्रान्तिदर्शी कविप्रतिभेंतून उगम पावलेल्या व महन्मंगल अशा विराट् रुद्रगंगेतच आपणांस अवगाहन करावयास हवें.

भारतीय संस्कृति ही मुख्यतः यज्ञप्रधान संस्कृति आहे म्हणजेच त्याग-प्रधान संस्कृति. या त्यागाची, निरपेक्ष त्यागाची दिव्य प्रेरणा ज्या यज्ञमण्डपांतून आपणांस मिळाली त्या यज्ञमण्डपातच मानवीच केवळ नव्हे तर चराचर सृष्टीच्या जीवनांतील विविधांगाबद्दल वैचारिक मंथन झालें आहे. अग्निमंथन जसे यज्ञमंडपांत होत असें तसेंच साथीसाथ वैचारिक मंथनही त्याबरोबरच होत असे. याचा परिणाम असा झाला कीं, आपल्या सर्व आचार-विचारांचा शेवटीं संगम जो व्हावयाचा तो यज्ञातच व्हावयाचा हे ठरून गेल्यासारखे होतें. आज ही यज्ञसंस्था शिथिल होत हळुहळु नष्ट होण्याच्या मार्गावर आली. नष्ट होणार्‍या या यज्ञसंस्थेबरोबरच तदुद्‌भव उदात्त आचार-विचारांची परंपरा नाहीशी होत चालली आहे. या सर्वांचा परिणाम सामाजिक जीवनांत वैचारिक अराजकता निर्माण होण्यांत न झाला तरच नवल ! समाज हा अवयवी मानला तर व्यक्ति हा त्याचा अवयव होय, हा अवयव जर विकृत होऊं लागला तर त्याचा परिणाम समाजावर झाल्याविना कसा राहील ? म्हणून समाजधारणा जर दृढ व्हावयास हवी असेल तर प्रथम व्यक्ति ही दृढिष्ठ, आशिष्ठ, आणि बलिष्ठ असावयास हवी. हें घडून यावयास पाहिजे तर पुनरपि आपणांस वैदिक विचारांचाच अवलंब करावयास पाहिजे हें निर्विवाद होय.

मानवी जीवन हें मूलतः असंयत व स्वैर असें आहे. जन्मजन्मान्तरीय शुभाशुभ वासनांमुळे त्याची प्रवृत्ति प्रायः बहिर्मुख व भोगैकप्रवण अशी असते. अशा भोगैकप्रवण जीवनाचा जर अभ्युदय व्हावयास हवा तर त्यावर नियन्त्रण हें अपरिहार्य आहे व तेंही दुसर्‍याने लादलेले नव्हे तर स्वतः खुषीने पत्करले पाहिजे. स्वतःचें स्वतःवर नियंत्रण घालून घेण्याइतका मनाचा विकास ज्या विचारांनी होतो त्या विचारांत रुद्रसूक्तान्तर्गत विचार हे महत्त्वाचे आहेत. या अमर विचारांचे सुपरिणाम जीवनात दिसून येण्याचे दृष्टीनेच रुद्रसूक्ताची दैनंदिन जीवनांत आपल्या ऋषींनी मुद्दाम योजना केली आहे. अशा या रुद्रसूक्ताची पार्श्वभूमी तरी काय आहे हें आपण लक्षांत घेतलें पाहिजे.

कृष्णयजुर्वेदातील पांचव्या अध्यायांत हें रुद्रसूक्त आलें आहे. चवथ्या अध्यायांत इष्टकाचिति सांगून झाल्यावर या पांचव्या अध्यायांत चित्यग्निवर 'होम' करावा असें सांगितलें आहे. यज्ञप्रकरणांत हे रुद्रसूक्त असल्यामुळे त्याचा विनियोग प्रथम यज्ञांत झाला. अर्थातच 'रुद्रसूत्र' हे एक यज्ञीय अंग म्हणूनच प्रसिद्ध आहे - सायणाचार्यांनी असेंच सांगितलें आहे. ते म्हणतात -
इष्टकाचितयः सर्वाश्चतुर्थे हि समापिता: ।
रुद्राध्याये पञ्चमेऽतु चित्यग्नौ होम उच्यते ॥
असे सांगून पुढें म्हणतात -
कर्मप्रकरणे पाठात् कर्मांङ्गत्वमपीष्यते ।
चित्यग्नीवर होम करतेवेळी म्हणावयाचे जे मन्त्र त्यांनाच 'रुद्र' असें म्हणतात आणि हा रुद्र म्हणून होम करावयाचा म्हणून रुद्र हा त्या होमाचे अंग, अशा रीतीनें रुद्राचा सर्व प्रथम विनियोग यज्ञामध्यें पूर्वी होत असे. रुद्र या शब्दाचा अर्थ श्रुतीमध्ये असा सांगितला आहे -
"रुद्रोवाएषयदग्नि: स एतर्हि जातो यर्हि सर्वश्चितः स यथा वत्सोजातः स्तनं प्रेप्सत्येवं वा एष एतर्हि भागधेयं प्रेप्सति तस्मै यदाहुतिं न जुहुयादध्वर्युं च य यजमानं च ध्यायेच्छत रुद्रीयं जुहोति भागधेयेनैवैनँ शमयति नार्तिमार्छत्यध्वर्युर्नयजमान: " इति ।

यज्ञामथें प्रगट होणार्‍या अग्नीलाच रुद्र असें म्हणतात. वरील श्रुतिवाक्यांत शतरुद्रीय हा शब्द आला आहे. त्याचा अर्थ या रुद्रसूक्तांत रुद्राची नांवें शंभर आहेत म्हणून याला शतरुद्र असें म्हणतात व या शतरुद्राभिधानानें जो होम केला जातो त्याला शतरुद्रीय असें म्हणतात. या शतरुद्रीय होमाचाच अर्थवाद वरील श्रुतीनें केला आहे.

प्रयोगकालीन अर्थस्मरण हेंच मंत्रांचे मुख्य प्रयोजन मीमांसकांनी मानलें आहे. मीमांसकांच्या या मतालाच अनुसरून सायणाचार्यांनीही आपल्या रुद्रभाष्यांत रुद्रसूक्ताचे मुख्यतः कर्मपर विवेचन केलें आहे.
इहकर्माङ्गतायादृग्वर्णिता ब्राह्मणेन ताम् ।
बोध्दुं शब्दार्थ मात्रस्य विवृतिः क्रियते स्फुट ॥
असें उपोद्‌घातांत त्यांनीं स्वच्छच सांगितलें आहे.

इष्टकाचिति हा शब्द पूर्वी आला आहे, त्याचा अर्थ चयनं चितिः, इष्टकाभिः चितिः इष्टकाचिति:। इष्टका म्हणजे विशिष्ट आकाराच्या मातीच्या तयार केलेल्या विटा, ह्या इष्टकांच्या विशेष प्रकारच्या रचनेनें तयार होणारी जी आकृति तीच इष्टकाचिति. आजकाल चयनयज्ञासारखे महान् श्रौतयज्ञ पाहण्यास सांपडत नाहींत; त्यामुळे इष्टकाचयन म्हणजे काय प्रकार असतो याची सुतरां कल्पनाही रुद्रावर्तन लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र वगैरे प्रकाराने रुद्र म्हणणार्‍या रुद्रभक्त लोकांनाही जिथे इष्टकाचयन म्हणजे काय याची माहिती नाही तिथे इतराना तरी ती माहिती कशी असणार ? यज्ञप्रक्रियेचे संस्कार ज्यांच्यावर अजिबात नाहींत अशा सामान्य परंतु जिज्ञासू वाचकांच्या माहितीसाठी या विषयाचें थोडे विवरण येथें केल्यास तें अप्रस्तुत ठरणार नाहींच; उलट रुद्राच्या संदर्भात ही माहिती असणें आवश्यकच ठरेल.
ह्या इष्टकांचे विविध आकार असतात, ते असे-
षोडश्य इष्टकाः
अर्धेष्टकाः
पादेष्टकाः
पक्षेष्टकाः
पक्षमध्याः
पक्षाग्रीयाः
आग्नीध्रीयाः
इत्यादि अनेक आकारांच्या या इष्टका चयन यागांत तयार कराव्या लागतात. एकूण चयन यज्ञांत अशा इष्टका १२०९ असतात; या हजारों इष्टकांची एकावर एक अशी मन्त्रपूर्वक रचना झाली म्हणजे शेवटीं श्येन पक्ष्याप्रमाणें आकार तयार होतो. "श्येनचितं चिन्वीत" या श्रुति वाक्यांत श्येन पक्षाप्रमाणे चयन करावें असें सांगितलें आहे. याप्रमाणें समन्त्रक हजारों इष्टकांची रचना करणें हें मोठ्या कौशल्याचेच काम आहे. अशा मंत्रोपधानपूर्वक श्येन पक्ष्याकृति जें इष्टकाचयन होते त्यावर जो अग्नी प्रगट होतो तोच रुद्र शब्दानें श्रुतीनें सांगितला आहे. रुद्र म्हणून या चित्यग्निवर होम कसा करावा हे कल्पसूत्रकारांनी पुढीलप्रमाणे सांगितलें आहे- "शतरुद्रीयं जुहोति जर्तिलयवाग्वावा गवीधुकयवाग्वावाजर्तिलैर्गवीधुक सक्तुभिः कुशयवसर्पिषाऽजाक्षीरेण मृगीक्षीरेणवाऽर्कपर्णेनोदङ्‌तिष्ठन्नुत्तरस्यपक्षस उत्तरापरस्यां स्रवत्यां विकर्ण्यां स्वयमातृण्णायामनुपरिचारं वा" । असे सांगून पुढें सांगतात-

नमस्ते रुद्रमन्यव इत्येताननुवाकास्त्रैधं विभज्यापि वा प्रथमादुपक्रम्य नमस्तक्षम्य इति जातुदघ्नेधारयमाणो रथकारेभ्यश्च व इत्युपक्रम्यनमःस्वायुधा येति नाभिदघ्ने शेषेण प्रागवतानेभ्य आस्यदघ्ने हुत्वासहस्राणि सहस्रश इति दशावतानान्हुत्वाऽन्वादोहान् जुहोति नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यामितिजानुदघ्ने धारयमाणो नमो रुद्रेभ्यो येऽन्तरिक्ष इति नाभिदघ्ने नमो रुदेभ्यो ये दिवी त्यास्य दघ्ने हुत्वैनेता व यजमान वाचियत्वा एतानेव विपरीतान् प्रत्यवरोहान् हुत्वा संचरे पशूनामर्कपर्णमुदस्यतियंद्विष्यातसथ संचरे इति ।

हे वरील कल्पसूत्रकारांचे विस्तृत वचन येथें उद्‌धृत करण्याचें कारण रुद्राचा मूळ विनियोग यज्ञांत कसा केला जात असे हें स्पष्ट व्हावें, हाच आशय मनांत ठेवून सायणाचार्यांनी रुद्राचा कर्मपर अर्थ मुख्यतः सांगितला आहे. तथापि सायणाचार्यांनी हेंही त्याबरोबरच मान्य केलें आहे कीं, रुद्राची अनेक ऋषींनीं अनेक तर्‍हेने जी प्रशंसा केली आहे त्यामुळें रुद्राचे महत्त्व केवळ यज्ञांतील विनियागोपुरतेंच नसून व्यापक अशा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेंही रुद्राचे एक आगळे व स्वयंभू असें महत्त्व आहे. आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात -
" ज्ञानहेतुत्वमप्यस्य तथोपनिषदीरितम् ।
स्मृत्यागमपुराणेषु रुदाध्याय प्रशंसनम् ।
बव्हस्ति तद्विस्तरेण रुद्रकल्पेऽभिधास्यते ॥ "

यावरून सायणाचार्यांनाही रुद्राचा अध्यात्मपर असा अर्थ मान्यच होता हें दिसून येईल. मात्र रुद्राचा अर्थ कर्मपर असला तरी चित्तशुद्धिद्वारा ज्ञानप्राति व तद्वारा मोक्षप्राप्तींतच व्हावयाचा हा सिद्धान्त आहे. हातून कर्म घडल नाही तरी त्या कर्माचे स्मरण करून देणारे मन्त्र रोज म्हटले तरी त्या कर्माचें फल मिळाल्यावाचून राहत नाही - म्हणूनच कवींनी "तानेतान् यज्ञानहरहः कुर्वीत" या वाक्यांत पंचमहायज्ञ जे रोज करावेत असे सांगितलें आहे त्यांत महत्त्वाचा जो ब्रह्मयज्ञ त्यांत स्वाध्यायपठण हें अत्यंत महत्त्वाचें सांगितलें आहे. या ब्रह्मयज्ञाचे महत्त्व पूर्वी ऋषींना किती वाटत असें हें पुढील श्रुतिवचनावरून लक्षांत येईल -
"तस्मात्स्वाध्यायोऽध्येतव्यो यं यं क्रतुमधीते तेन तेनास्येष्टं भवत्यग्नेर्वायोरादित्यस्य सायुज्यं गच्छति सदेषाभ्युक्ता "-इति ।

या श्रौत वचनांत ब्रह्मयज्ञाची नुसतीच स्तुति केली आहे असें समजणें चूक ठरेल. सत्यसन्धान ब्रह्मविद्वरिष्ठ ऋषि ज्या वेळीं एखादी गोष्ट करावी म्हणून तिचें वर्णन करतात त्यावेळीं त्यांत फार मोठा निगूढ असा वैज्ञानिक कार्यकारण भाव असतो याची ओळख आज आपणांस होत नाही हें वेगळें. याच ब्रह्मयज्ञाच्या बाबतींत सायाणाचार्यांनी पुढें असें सांगितलें आहे कीं-
"यो हि निरन्तरं स्वाध्यायं पठति तस्य अनुतवदने कः प्रसङ्‌गः ? "
एवढेच नव्हे तर ते पुढें असें म्हणतात कीं-
तपोच्यत्रार्थ सिद्धं निषिद्धविषयप्रवणानामिन्द्रियाणां बलक्षयद्वारेण उद्धतत्वं वारयितुं कृच्छ्चान्द्रायणादिना शरीरशोषरूपं तपः क्रियते । स्वाघ्यायपरस्यतु विषयमात्रचिन्तैवनास्ति कुतो दुष्टविषयेषु प्रवृत्तिः ?
याचा आशय स्पष्ट आहे; कृच्छ्चान्द्रायापादि दुर्घट अशी तपश्चर्या रोज ब्रह्मयज्ञ जे करतात त्यांना करावी लागत नाही, कारण तपाचे उद्दिष्ट तरी अखेरपक्षी बहिर्मुख इन्द्रियांना अन्तर्तुख करणे हेंच की नाही ? तें उद्दिष्ट अनायासेन ब्रह्मयज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणार्‍या स्वाध्याय पठनाने सिद्ध होते. हेंच वरील उधृत वचनाचे तात्पर्य आहे. हें सांगतांना मानसशास्त्राचा एक मोठा सिद्धान्तच सायणाचार्यांनी आपल्यासमोर मांडला आहे.

मनावर ज्या विचारांचे संस्कार दृढ होतात तेच विचार पुढें कृतिरूपानें साकार होतात हें महत्त्वाचे तत्त्व ध्यानांत ठेवूनच आपल्या दैनंदिनींत रुद्र व तत्सदृश सूक्तांची मोठ्या दूरदर्शीपणानें सांगड घातली आहे.-" यज्जाग्रतो दूरमदैति दैवं तदुसतस्य तथैवैति " या शिवसकल्प सूक्तांत तर मनाचें वस्तुनिष्ठ व हृदयंगम असें सुंदर वर्णन केलें आहे. चिदाकाशांत विचारांचे जे सूक्ष्म व तरल स्पन्द निर्माण होतात त्यांचा परिणाम अनंतावकाशांत व तद्वारा संपूर्ण विश्वब्रह्माण्डांत काय काय होतात याचें प्रायोगिक व अनुभवसिद्ध असें ज्ञान झाल्यानंतर वरीलप्रमाणें सिद्धान्त शिवसंकल्प सूक्तांत ऋषींनी प्रगट केला आहे.

आपल्या मनांत निर्माण होणारे विचार ही केवढी प्रचंड शक्ति आहे याचा साक्षात्कार झाल्यामुळेंच आपल्या ऋषींना विचारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता वाटत असे. नुसत्या कृतिशून्य अशा विचारानेंही एक मनुष्य केवळ स्वतःचेंच नव्हे तर सार्‍या जगाचेंही किती नुकसान करूं शकतो याची हवी तेवढीं उदाहरणे आपल्या आर्षवाङ्‌मयांत जागोजागी सापडतील. विचारांची ही प्रचण्ड शक्ति ध्यानांत घेऊनच आपल्या जीवनांत प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगीं ब्राह्ममुहूर्त, स्नान, भोजन, शयन इत्यादि प्रसंगी विचारांना उदात्तस्तरावर नेणारी प्रातःस्मरण, पुरुषसूक्त, भृगुवल्ली, त्रिसुपर्ण, श्रीसूक्त, प्रभृती दिव्य-भव्योदात्त विचारांनी युक्त अशीं सूक्ते म्हणावयास सांगितलें आहे.

व्यक्ति ही समष्टीशी संबद्ध आहे याची जाणीव आपल्यापेक्षा पूर्वजांना अधिक होती असें या सूक्तांकडे पाहिल्यास वाटतें, त्यात अश्रद्ध मनाला जरी तें चमत्कारिक वाटलें तरी सत्याची ओळख करून घेण्यास आपण केव्हांही कचरतां कामा नये.

विश्वब्रह्माण्डांतील अनंतावकाशांत अनंत शूक्ष्म शक्तींचे वास्तव्य आहे; या सर्व शक्तींवर आपला ताबा प्रस्थापित करून त्यांना स्व-परकल्याणासाठीं उपयोग करून घेतां यावा यासाठींच पतंजलीनें आपल्या योगसूत्रात अनेक 'संयम' सांगितले आहेत. ध्यान, धारणा, आणि समाधि या तीन प्रक्रियांमुळे 'संयम' करण्याची पात्रता निर्माण होते; योगसूत्रातील हा 'संयम' शब्द उपरोक्त तीन मानसिक प्रक्रियांचा बोधक म्हणूनच आला आहे. "भुवनज्ञानं सूयेचन्द्रे तारावूहज्ञानं, ध्रुवे तद्‌गतिज्ञानं" इत्यादि सूत्रांतून हे संयम व तद्वारा प्राप्त होणार्‍या शक्ती पतंजलीनें योगसूत्रांत सांगितलेल्या आहेत. ही संयमाने प्राप्त होणारी जी शक्ति तिचें मूळ विचारामध्ये असणार्‍या शक्तींत आहे, हे हजारों वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी ओळखले होतें. मानवी जीवनांतील सर्वंकष अभ्युन्नतीचा पाया वैचारिक संतुलनावरच अवलंबून आहे. म्हणूनच वाईट कृतीपेक्षा वाईट विचार हे अधिक भयानक मानले गेले आहेत. कृति क्षणिक असते तर विचारांनी होणारे संस्कार हे जन्मोजन्मी आपला पिच्छा सोडीत नाहींत. मनांत नेहमी शुभ विचारच यावेत, अशुभाचा स्वप्नांतही विटाळ होऊं नये यासाठी वैखरी वाणींतूनही अपशब्द उच्चारला जाऊं नये म्हणून आपण काळजी घेत असूं. बाणीचे पावित्र्य अपशब्दाने दूषित होते; दुर्योधनाला धर्मराजा सुयोधन या नांवानेंच जें संबोधित असें त्यांतील आशयहि हाच होता. भगवद्‌गीतेमधे विविध तपाचा जो निर्देश केला आहे त्यांत वाङ्‌मय तपाचा उल्लेख सर्वाधिक महत्त्वाचा यामुळेंच मानला गेला आहे. हें वाङ्‌मय तप निरन्तर ब्रह्मयज्ञ करणार्‍याला स्वाध्यायद्वारा होत असल्याने त्याची बहिर्मुख इंद्रियप्रवृत्ति हळू हळू अंतर्मुख होते व तद्वारा 'प्रवाही मन' स्थिर करण्याची अद्‌भुत किमया त्याला साध्य होते. ही अद्‌भुत किमया एकदां साध्य झाली कीं त्यायोगे विश्वब्रह्मांडांतील सूक्ष्म व अनंत शक्तींवर त्याचा ताबा आलाच म्हणून समजावे. या दृष्टीनेंच आपल्या दिनचर्येंत ब्रह्मयज्ञाची योजना आपल्या ऋषींनी जी केली ती किती दूरदर्शीपणानें केली हें वरील विवेचनावरून सामान्यतः लक्षांत येईल. हें सर्व विवेचन करण्याचा उद्देश असा कीं ही महत्त्वाची पार्श्वभूमी जर आपल्या लक्षांत नसेल तर रुद्रसूक्ताचे जें अपरंपार महत्त्व ऋषींनी वर्णन केले, त्याचें खरें रहस्यही आपणांस आकलन होणार नाही. हें रहस्य न ओळखल्यामुळेंच आज मन्त्र म्हटले तरी त्यांतील सुप्तशक्तींचा आपणांस साक्षात्कार होत नाही. कारण उघडच आहे; नुसत्या वैखरीनें जे मन्त्र ह्मटले जातात त्या मन्त्रांतील अर्थाचा मनावर जर संस्कार उमटत नसेल ते मन्त्र म्हणूनही फलाच्या दृष्टीने न म्हटल्यासारखेच असतात. रुद्रसूक्ताच्या बाबतींतही हेंच नेमके घडून येतें.

रुद्रसूक्तातील विचार हे व्यापक स्वरूपाचे आहेत. त्या विचारांशी जो जो समरस व्हावें तो तो आपणही न कळत व्यापक बनत चालल्याची एक आगळीच संवेदना आपणांस जाणवूं लागते. या संवेदनेचा किंचितसा स्पर्शही ब्रह्मानन्द सहोदर आनंदाची थोडीशी चुणूक दाखविण्यास पुरेसा असतो.

रुद्रसूक्तांतील विचारांची ही भव्यता व सामर्थ्य जाणूनच अनेक ऋषींनी रुद्राचे असाधारण महत्त्व वर्णन केलें आहे; त्या सर्वांचा नामनिर्देश येथे .करणे हें अर्थातच शक्य नाही, तरी पण वाचकांना थोडीशी कल्पना यावी यासाठी कांहींचा थोडक्यांत पुढें निर्देश करीत आहे.--

आपस्तम्ब:- " यस्यरुद्र: प्रजां पशून्वा&भिमnयेतोदङ् परेत्य रुद्राञ्जपंश्चरेदित्ययकज्ञसंयुक्तः कल्पः "
शङ्खः- " रहसि कृतानां महापातकानामपि शतरुद्रीय प्रायश्चित्तम् "
याजवल्क्यः - सुराप: स्वर्णहारी च रुद्रजापीजले स्थित: ।
सहस्रशीर्षाजापी च मुच्यते सर्वकिल्बिषैः ॥
वेदमेकगुणं जप्त्वा तदन्हैव विशुध्यति ।
रुदैकादशिनीं जप्त्वा तदन्हैव विशुध्यति ॥
अत्रि व आङ्गिरसः - एकादशगुणान्वाऽपिरुद्रानावृत्यधर्मवित् ।
महापापैरपि स्पृष्टो मुच्यते नात्रसंशयः ॥
या शिवाय वायुपुराण, कूर्मपुराण, लिंगपुराण, हरिवंश महाभारत, आश्वलायनगृह्यसूत्र, बौधायनगृह्यसूत्र, आगमग्रंथ इत्यादि ग्रंथांतून रुद्रासंबंधी अत्यन्त उद्बोधक असें वर्णन आलें आहे. शतशाखांचा विस्तार असलेल्या यजुवर्दोचें सारभूत असें हें रुद्रसूक्त मानण्यांत आल्यामुळें उपनिषदांतही या रुद्रासंबन्धी बरेंच वर्णन आले आहे.

रुद्र हें उपासनेचे अंग

कल्पसूत्रकारांनी रुद्रसूक्त हे यशाचं अंग म्हणून सांगितलें तसच उपनिषत्कारांनीं रुद्रसूक्त हें उपासनेचेंही महत्त्वाचे अंग म्हणून रुद्राचा प्रामुख्यानें निर्देश केलेला आहे; कैवल्योपनिषद्, जाबालोपनिषद्, रुद्रोपनिषद् वगैरे उपनिषदातून या संबंधीचे विवेचन वाचकांना पहावयास सापडेल. प्रथम यज्ञांत विनियुक्त झालेलें हें रुद्रसूक्त पुढें ज्ञानमार्गांतही अत्यंत उपकारक ठरलें; " अत्याश्रमी जपेत् " असें मुद्दाम या रुद्राच्या बाबतीत सांगितलें आहे. कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग या दोनही मार्गांत सारखेच उपयुक्त ठरणारे हें रुद्रसूक्त म्हणूनच एकजात सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरलें आहे.

रुद्राचा कर्मपर अर्थ सायणाचार्यांनी आपल्या रुद्रभाष्यांत विस्ताराने सांगितला असला तरी तो शेवटीं सूक्ष्म म्हणूनच आपाततः न समजणार्‍या ज्ञानमार्गालाच उपकारक ठरणारा आहे. कर्म हें परंपरेने चित्तशुद्धिद्वारा ज्ञानाचेच एक प्राथमिक साधन आहे. या दुसर्‍या सूक्ष्म अशा ज्ञानपर अर्थाचे दृष्टीनेच उपनिषदांतून रुद्राचे वर्णन करण्यांत आलें आहे.

रुद्राचा ज्ञानपर अर्थ

कोणत्या मनाचा जप केला असतां अमृतत्वाची प्राति होऊं शकेल ? असा प्रश्न विचारला गेल्यावर 'शतरुद्रीयेण' असें या प्रश्नाला जाबालोपनिषदांत उत्तर दिलें आहे. रुद्रसूक्तांत आलेली ईश्वराची शतसंख्य नांवें त्याचें सर्वव्यापक स्वरूप व्यक्त करण्यास समर्थ आहेत. अक्षम्य, अजर, अमर व शाश्वत अशा परमात्म स्वरूपाची ओळख ज्या नांवानी होते त्यालाच शतरुद्रीय अशी संज्ञा आहे; एकदां या परमात्म्याच्या मृत्युंजय स्वरूपाची ओळख पटली की अमृतत्वाची प्राति झालीच. असा जाबालोपनिषदांतील प्रश्नोत्तराचा थोडक्यात आशय आहे.

एक प्रशांत सर्वभौतिक विज्ञान !

वरील प्रश्नोत्तरांचा अर्थ वरवर पाहतां उघड व सोपा वाटला तरी तत्वतः त्यांत फार मोठा गंभीर आशय आहे हें लक्षांत घेतलें पाहिजे. प्रश्न मोठ्या खुबीने विचारला गेला आहे. अशा खुबीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तरही तसेंच मार्मिक दिलें गेलें आहे. कठोपनिषदांत नचिकेत्यानें यमराजाकडून वर मागून घेतांना जें लोकोत्तर प्रज्ञाशालित्व प्रगट केलें व वराच्या रूपानें यमाकडून देवांनाही दुर्लभतर असें ज्ञान मिळवले, त्याप्रमाणेच येथें जाबालोपनिषदांतही प्रश्न विचारणार्‍या ऋषींनी आपली क्रांतिदर्शी प्रज्ञा प्रगट केली आहे. प्रश्न विचारला तो "अमृतत्वाची प्राप्ति कशाने होईल ?" असा आहे. या एका प्रश्नांत सर्व भौतिक विज्ञानाचें स्वरूप व त्याची अशाश्वता सूचित केली आहे.

ऋषींच्या मनावर आगंतुक द्वंद्वांचा परिणाम होत नाहीं.

"परिणाम तापसंस्कार दु:खैर्गुणवृत्तिविरोधाच्च दुःखमेव सर्व विवेकिन:"
या सूत्रांत सकल भोग्य पदार्थजातासंबंधी विवेकी लोकांना खरोखरी काय वाटतें याचें मार्मिक दिग्दर्शन पतंजलीनें केले आहे. विषयोपभोगांत प्राप्त होणारा आनंद हा विषयजन्य असल्यामुळेंच एक तर तो विषयपरतंत्र व दुसरें म्हणजे तो आनंद त्या विषयाबरोबरच नाहींसा होणारा. पूर्त्रसंस्कारामुळें असा विषयोपभोगजन्य आनंद प्रथम बरा वाटला तरी तो खरा आनंद नव्हेच; उलट त्याचा आभास मात्र होय. अप्रगत व प्राथमिक अशा अवस्थेंत मनाची जरी बाह्य विषयांकडे ओढ असली तरी पुढें पुढें जसजसें मन अधिकाधिक उत्क्रान्त होत जातें तसतसे क्षणोक्षणी उत्पन्न होऊन नष्ट होणार्‍या या विषयजन्य आनंदापासून मन पराङ्‌मुख होते. आनंद हा स्वरूपगत असा परमात्म्याचा स्थायी धर्म आहे, त्याचेंच थोडेफार प्रतिबिंब अनात्मभूत पदार्थामधे आपणांस दिसते, प्रतिबिंबालाच बिंब समजण्याची चूक मनाकडून पूर्व संस्कारांमुळे होतें, अशी चूक तपस्वी ऋषींकडून कशी होईल ? त्यांना सुखदुःखादिधर्म हे आगमापायी म्हणजेच अनित्य आहेत हे अनुभवानें कळलेले असतें म्हणूनच ते सुख-दुःख, लाभालाभ, जयापजय इत्यादि द्वन्द्वांतही अविचल असे राहूं शकतात. त्यांच्या मनावर या आगंतुक द्वन्द्वांचा कांहीही परिणाम होत नाही. अशी तपःसामर्थ्यसंपन्न व स्थितप्रज्ञ लोकांच्या दृष्टीने विषयांपासून निर्माण होणारा आनंद हा बालिश आनंदच होय. मुग्ध शैवावस्थेत कचकड्याच्या निर्जीव बाहुलीपासून होणारा आनंद त्या शैशवावस्थेबरोबरच नाहींसा होतो. यौवनांत पदार्पण केल्यावर त्याला कचकड्याची निर्जीव बाहुली चालत नाही. बाहुलीची जागा एखाद्या नीलोत्पल पत्रायताक्षी हरिणाक्षीने घेतलेली असते, बाळपणींच्या मुग्ध व निरागस क्रीडा संपलेल्या असतात आणि त्याऐवजी दुसर्‍याच कमिनीवरोबर प्रणयकीडा सुरू होतात. यौवनावस्थेबरोवरच याही कांही काळ धुंद करणार्‍या प्रणयमत्त क्रीडा संपुष्टांत येतात. शिवापराधक्षमापन स्तोत्रांत शंकराचार्यांनी मानवी जीवनांतील आनंदाचे हे क्षणभंगुर टप्पे पुढील प्रमाणें सांगितले आहेत.
"प्रौढोऽहं यौवनस्थो विषयविषधरः पञ्चभिर्मर्मसंधौ
दष्टोनष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादसौख्ये निषणः "
अशा अवस्थेंत तारुण्याचा काल निघून गेला म्हणजे पुढें क्रमप्राप्त वार्धक्य सुरू होतें त्यांतही-
वार्धक्येचेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
पापैरोगैर्वियोगैस्त्ववनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनः
अशी मोठी करुणास्पद अवस्था निर्माण होते. उपनिषदांतून एकापेक्षा एक अशा उच्चस्तरीय आनंदाचे ऋषींनी जें वर्णन केलें आहे तें अनुभवगोचर म्हणूनच विवेकी लोकांना तें प्रत्ययकारी असें वाटतें. तेव्हां अपणांस वाटणार्‍या आनंदाची कक्षा व स्तर कोणता आहे व तो कां आहे हें सामान्य माणसांना कळत नाही म्हणून त्यांच्या विषयगामी स्थूल प्रवृत्तीचे क्षेत्र प्रथम प्रथम जरी शुभकर्मांपुरतेच निर्माण करतां आलें तरी त्यांच्या उत्क्रांतीला सुरवात करून दिल्यासारखे होतें. कर्म विपाकाच्या अबाधित सिद्धान्तानुसार चाललेल्या जगराहटीत लोककल्याणाचा हाच एक अधिक सुलभ असा मार्ग आहे. यासाठींच उपनिषदांतही कर्माचे प्राशस्त्य ऋषींनी सांगितले आहे; कर्मयोगाने हळूहळू होणार्‍या आत्मविकासाला योगसंप्रदायांत पिपीलिकामार्ग असें म्हणतात. जे या मार्गावरून पूर्वीच गेले आहेत त्यांना विहंगममार्गानें ही इष्टसिद्धि करून घेतां येतें. आपण कोणत्या मार्गावरून प्रवास करण्याचे अधिकारी आहोत हे ज्याचें त्यानें एखाद्या अधिकारी पुरुषाच्या मदतीने ठरवावे व तदनुसार त्या त्या मार्गावरून यात्रारंभ करावा. तसा तो केला तर तो निश्चितच विफल होऊं नये. परंतु असें सहसा घडत नाही.

आनंदाची कक्षा

जाबालोपनिषदांत ज्या ऋषींनी प्रश्न विचारला त्यांची आनंदाची कक्षा फारच उन्नत होती, दृश्य आणि भोग्य पदार्थजातांतून प्रात होणार्‍या आनंदाभासाच्या पलीकडील ती कक्षा होती. या कक्षेवरून कवींनी जो प्रश्न केला त्याचें खरें मर्म त्या कक्षेच्या ऐलतीरावरच वावरणार्‍या सामान्यांच्या लक्षांत कसें यावें ? म्हणून ऋषींनी विचारलेल्या प्रश्नासंबंधी त्या प्रश्नाची बाजू किती गंभीर व व्यापक आहे याची पुसटशी तोंडओळख तरी वाचकांना व्हावी याकरितां हें थोडेसें विवेचन येथें करणें भाग पडलें.

अविनाशी मृत्यूचें सौंदर्य !

या जाबालोपनिषदांतील प्रश्नाच्या अनुषंगानें 'मृत्यु' म्हणजे काय याचीही थोडी कल्पना आपणांस असावयास हवी तरच मृत्यूच्या पलीकडे असणार्‍या अमृतत्वाचीच ऋषींनी कां अपेक्षा केली याचेही रहस्य कळेल. मृत्यूसंबंधीं उपलब्ध जागतिक तत्वज्ञानविषयक ग्रंथांत ज्या ज्या कल्पना वा विचार प्रदर्शित केले गेले आहेत त्या सर्वांपेक्षा आपल्या साक्षात्कृतधर्माण ऋषींची कल्पना ही अधिक वास्तव व अधिक निर्भय बनविणारी आहे. चराचर सृष्टींत भीतीचे प्रधानतम व अंतिम असें एकमेव कारण मृत्यूच मानण्यांत आले आहे. जोपर्यंत हें भीतीचे हें कारण बीजरूपानें कां होईना पण आपल्या मनोभूमिकेंत ठाण मांडून राहील तोपर्यत आत्म्याची अभ्युन्नती होणार नाहीं. प्रसिद्ध योगिराज चांगदेव यांचे याबाबत उदाहरण डोळ्यासमोर येण्यासारखे आहे; चौदाशे चौदा वर्षें एकसारखी कालावर 'मात' करणार्‍या या योगिपुंगवाला अखेरपर्यंत मृत्यूला कांहीं ओळखत आले नाही. त्याची वास्तव ओळख त्याला मुक्ताबाईकडूनच शेवटी करून घ्यावी लागली. ती झाल्यावरच त्याचा पुढील मार्ग मोकळा झाला. इतरांच्या दृष्टीने मृत्यू हा भयप्रद व भीषण असला तरी भारतीय तत्वज्ञानानें या मृत्यूलाही एक मनोहारी स्वरूप देऊन त्यांत मनोज्ञ व हृदयंगम असें अविनाशी सौंदर्य निर्माण केलें आहे. मृत्यूच्या कमलांतूनच जीवनाचा सौरभ दरवळत असला तरी तें अमरत्वाच्या नालदण्डावर विकसित झालें आहे याची जाणीव ऋषींच्या क्रान्तिदर्शी कविप्रतिभेला केव्हांच झाली होती. विश्वाच्या उगमापलीकडे जाऊन हें रहस्य आपल्या ऋषींनी हस्तगत केलें आहे. असंख्य लोकांच्या दिव्य तरी पण दाहक अशा तपश्चर्येची अखण्ड परम्परा त्यासाठी भारतांत निर्माण झाली. या दिव्य तपश्चर्येच्या जोरावरच त्यांनीं विश्वब्रह्माण्डातील अणुरेणूंचाही अक्षय्य असा कार्य-कारण भाव ओळखला होता. सामान्य माणसाला होणारे ज्ञान हे अनुलोम पद्धतीने म्हणजे कारणावरून कार्याचें ज्ञान असें होतें तर या उलट अतीन्द्रिय प्रज्ञ लोकांना प्रतिलोम पद्धती म्हणजे कार्यावरून कारणाचे ज्ञान होतें. या दोन पद्धतीने होणार्‍या ज्ञानांतहि फार मोठा फरक आहे. परमात्म्याने आपल्यासमोर टाकलेल्या विश्वाचे रहस्यात्मक कोड्याचा उलगडा करण्याच्या दृढ निश्चयानें बद्धपरिकर होऊन या दृश्य जगताचे मूळ व सुप्त कारण ध्यानावस्थिततद्‌गतेन मनसा ऋषींनी शोधून काढलें. हें शोधून काढतांना त्यांना जें या भासमान विश्वब्रह्माण्डाचें यथार्थ आकलन झालें त्याववरूनच त्यांना खर्‍या परमात्म स्वरूपाची ओळख झाली.

कोणताही पदार्थ वर्तमानकाळांत असेल व त्या पदार्थाशी आपला इन्द्रियसन्निकर्ष होईल तरच त्याचें ज्ञान तेंही त्या पदार्थगत मूलद्रव्याचे नव्हे तर केवळ बाह्य आकाराचेच काय तें आपणांस होऊं शकते. तो पदार्थ पूर्वी कुठे होता व भावी काळांत त्याचें काय होणार, याची आपणांस सुतरां कल्पना नसते. या उलट योग्याचे असतें. तो त्या पदार्थाच्या तीनही कालांतील अवस्था सम्यक्‌रीतीनें जाणू शकतो. हें तो कसें जाणतो याविषयीं पतंजलीनें आपल्या योगसूत्रांत ' परिणामत्रयसंयमादतीतानागतज्ञानम्" असें सांगितले आहे. अशा रीतीनें प्रत्येक पदार्थांच्या तीन अवस्था त्याला कळत असल्यानें तो प्रत्येक पदार्थाचें भविष्य अचूक ओळखू शकतो. उत्पत्ति, स्थिति आणि लय या तीन अवस्थांहून चवथी अवस्था किंवा धर्म कोणत्याही पदार्थाला असूं शकत नाही हा विज्ञानाचा सिद्धान्त आहे. एखाद्या पदार्थाचे वर्तमानकालीन धर्म अतीतकालांत गेले कीं त्या पदार्थाचें बाह्य स्वरूप बदलते व त्या पदार्थावर अनागतकालीन धर्मांचा हळूहळू प्रादुर्भाव होऊं लागतो. असा नवीन धर्मांचा प्रादुर्भाव त्या पदार्थावर झाला कीं आपण तो पदार्थ पूर्वीपेक्षा वेगळा आहे असे म्हणतो. परंतु वस्तुतः तो वेगळेपणा त्या पदार्थावर होणार्‍या अतीतानागतकालांतील धर्मांच्या प्रादुर्भाव-तिरोभावामुळेंच खरोखरी असतो; त्यामुळें एखादी वस्तु अगर व्यक्ति दिसते तशीच आपण ओळतो अगर तर योगी ती व्यक्ति वा वस्तु जशी असेल तशीच ओळखतो, यासाठी अशा योग्यांना कोणीही फसवू शकत नाही. तेव्हां मृत्यु म्हणजे दुसरें तिसरे कांही नसून तें एक आगन्तुक धर्मांच्या प्रादुर्भाव-तिरोभावामुळें घडून येणारे केवळ बाह्य रूपांतर होय, शरीरावरचे कपडे बदलते म्हणून जसें शरीर बदलत नाही, तसेंच शरीर बदललें म्हणून त्या शरीरांत राहणारा आत्मा बदलत नाही. बाहेरून आल्यावर कार्य संपलें म्हणून कपडे शरीरावरून काढून जितक्या सहजतेने आपण बाजूला ठेवतो तितक्याच सहजतेने योगी एका देहाचें कार्य संपलें कीं तो देह टाकून मोकळा होतो. पुनः नवीन देह नव्या उमेदीने धारण करून संचितांतील राहिलेले कर्म भोगण्यासाठी तो तयार होतो. योग्याला तर चालू देह केंव्हां पडणार आहे याचेही आगाऊच ज्ञान होतें तें मृत्यु म्हणजे रूपान्तर असल्यामुळेंच होय. योग्याला हें देहपतनाचे ज्ञान कसें होते हें "सोपक्रमं निरुपक्रमं कर्म तत्संयमादपरान्त ज्ञानमरिष्टेभ्यो वा" । या पातंजल सूत्रांत सांगितलें आहे.

सोपक्रम कर्म व निरूपक्रम कर्म

सोपक्रम कर्म म्हणजे फलोन्मुख कर्म व निरूपक्रम कर्म म्हणजे संचितावस्थेंत असलेलें अद्यापि फलोन्मुख न झालेलें कर्म, अशा या उभयविध कर्मावर 'संयम' करून योग्यांना आपल्या अपरान्ताचे म्हणजे मृत्यूचे ज्ञान होतें, मृत्यु ही भयप्रद अशी घटना नसून उलट ती एक स्वागतार्ह अशीच घटना आहे. जर हा अनाथांचा नाथ, दीनांचा कनवाळू, करुणासागर असा मृत्यू नसता तर या जगाची काय अवस्था झाली असती याची नुसती कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे. मृत्यूतूंनच विश्वातील चराचराचे सौदर्य साकार झालें आहे. म्हणून आम्ही मृत्यूचे स्वागतच नेहमी करीत आलों आहोत. तेव्हां आतापर्यंतच्या विवेचनावरून वाचकांच्या ध्यानांत आवश्यक तेवढे मृत्यूचे वास्तव स्वरूप आलेंच असेल. ही वास्तव कल्पना लक्षांत आली कीं जाबालोपनिषदांत विचारलेल्या प्रश्नाचें खरें मर्म ध्यानी येईल. अशा या महत्त्वपूर्ण प्रश्नाला जें उत्तर दिले गेलें तेंही तितकेच सारगर्भ आहे म्हणून त्याचा आतां थोडा विचार करूं -

अमृतत्व म्हणजे काय !

'रुद्राचा जप केल्याने अमरत्वाची प्राति होते' या उत्तरांतील आशय आपण नीट समजाऊन घेतला पाहिजे. अमरत्व म्हणजे काय ? रुद्राचा जप केल्याने त्याची कशी काय प्राप्ति होते ? जप करावा म्हणजे काय करावें ? जपाची प्रक्रिया कोणती ? इत्यादि याच्या अनुषंगाने निर्माण होणारे अनेक प्रश्न विचारणीय आहेत.

एखादी गोष्ट आत्मसात करावयाची असेल तर त्याच एका गोष्टीचा सतत निदिध्यास असावा लागतो. ध्यानपूर्वक चिंतन म्हणजेच निदिध्यास. अशा निदिध्यासानें अशक्य तें शक्य होतें हा लौकिक व्यवहारांतही आपणांस अनुभव येतो. अवघड अशी तारेवरची कसरत किंवा अचूक लक्ष्यवेध या गोष्टी मनाच्या धारणेशिवाय शक्यच नाहीत. ज्या पदाथावर आपली धारणा सिद्ध होईल त्याच पदार्थाचे गुणधर्म हळु हळु आपल्यामधे प्रादुर्भूत होऊं लागतात. हा मनाचा एक विलक्षण धर्म किंवा गुण म्हणा पण आहे. म्हणून 'मन' हें कितीही चंचल किंवा ओढाळ असलें तरी युक्तीने जबरदस्तीनें नव्हे, त्याला वश करून अनुकूल केल्याशिवाय तरणोपाय नाही. शनैः शनेरुपरमेत् असे याबाबतीत साधकांचे धोरण असेल तर कालान्तराने त्यांना मनाची अनुकूलता प्राप्त करून घेंतां येईल. पतंजलीच्या अष्टांगराजयोगांत धारणा, ध्यान, आणि समाधि ही तीन महत्त्वाची व अंतरंग साधनें सांगितली आहेत, ही अंतरंग साधनें सिद्ध होण्यासाठीच यम-नियमांची साधना प्राथमिक अवस्थेंत अपरिहार्य मानली गेली आहे. जपासंबंधी पूर्वी थोडेसे विवेचन येऊन गेलेंच आहे.

ध्यानाचा प्रांत केव्हा सुरू होतो ?

वैदिक मन्त्र हे अर्थप्रधान मंत्र आहेत, त्यामुळें अशा अर्थप्रधान मंत्रांचा जप तदर्थ भावनेनें झाला तरच त्या त्या अर्थाची धारणा सिद्ध होते. धारणा सिद्ध आणि प्रगाढ होत गेली की ध्यानाचा प्रान्त सुरू होतो. यासाठी रुद्राचा जो जप करावयांचा तो रुद्र मंत्रातील अर्थभावनेने युक्त असाच करावयास हवा. तसा तो जप झाला की अमृतत्वाची प्राप्ति दूर नाही. परंतु हें सारें करीत असतांना मन हें एकाग्र व स्थिर असावयास हवे. परमात्म्याच्या विराट् स्वरूपाशी एकरूप होण्यासाठीच रुद्रांतील मंत्राचा अर्थ अगोदरु कळला पाहिजे.

नमक व चमक कां म्हणतात ?

रुद्राचे मुख्य दोन विभाग आहेत, एक नमक विभाग व दुसरा चमक विभाग. प्रत्येक विभागांत अकरा अनुवाक आहेत आणि प्रत्येक अनुवाकात (नमक विभागांतील) दहा ते पंधराच्या दरम्यान असे मंत्र आहेत. नमक विभागांतील मंत्रांपैकी कांही मंत्र उभयतो नमस्कारात्मक म्हणजे मंत्राच्या प्रारंभी व मंत्राच्या शेवटी 'नमः' असे शब्द असणारे तर कांही मंत्र अन्यतरतो नमस्कार म्हणजे केवळ मंत्राच्या आरंभीच 'नमः' शब्द असणारे आहेत. या नमः शब्दाच्या प्रयोगामुळेच या मंत्र समूहाला 'नमक' असे म्हणण्याचा प्रघात आहे. चमक विभागांत जे मंत्र आहेत त्यांत 'च मे' या शब्दांचा वारंवार उपयोग केल्यामुळेंच या मंत्रसमूहाला 'चमक' असे म्हणण्याचा रिवाज आहे. नमक आणि चमक मिळून रुद्राचा अध्याय तयार होतो.

चारही वेदांचा यज्ञांत विनियोग असल्यामुळें यजुवर्दोचाही यज्ञकर्मात विनियोग व्हावा हें उघडच आहे. किंबहुना इतर वेदांपेक्षां यजुर्वेद हा यज्ञीय कर्माशी अधिक संबद्ध आहे. यज्ञांतील बारीक सारीक कोणतीही कृति यजुर्वेदांतील मंत्राशिवाय होत नाही; अशा यजनार्थक यजुर्वेदांत प्रस्तुत रुद्राध्याय आला आहे. त्यामुळें या रुद्राचा विनियोगही यज्ञांतच प्रथम कसा केला गेला हें मागे सांगितलेंच आहे.

अग्नीचे असाधारण महत्त्व कां !

वेदकालांत अग्नि हीच प्रधान उपास्यदेवता होती त्यामुळें ऐहिक सुखसंपदा, ऐश्वर्य, समृद्धि वगैरे ज्या ज्या आवश्यक गोष्टी त्या सर्व अग्निनारायणापासूनच मिळतात अशी त्यावेळीं दृढ श्रद्धा होती. अशा या सर्वाभिलषित पूर्ण करूं शकणार्‍या अग्निनारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठमोठे यज्ञ त्यावेळी करण्यांत येत असत. ऋग्वेदाची सुरवातच मुळी 'अग्निमीळे पुरोहितम्' अशी आहे, या मंत्रांत अग्नि हा पुरोहित आहे असें सांगितले आहे. केवळ ऐहिक कल्याणच नव्हे तर पारलौकिक कल्याणाचीही तो प्राप्ति करून देणारा आहे असें 'पुरोहित' या शब्दाने सूचित केलें आहे. म्हणूनच रुद्र शब्दाचा अर्थही अग्नि असाच केला. आहे - 'रुद्रो या एष यदग्निः' हा अग्नि म्हणजेच रुद्र होय. तेव्हां या अग्निस्वरूप रुद्राची साधना करतांना या अग्नीची विविध स्वरूपें कोणती आहेत याचेंही वर्णन रुद्रांत येणें अपरिहार्यच होय.

परमेश्वराच्या विविध स्वरूपाला रुद्रांत जो नमस्कार केला आहे ती विविध स्वरूपें अग्निमुळेच निर्माण झाली आहेत. किंबहुना चराचर विश्वांतील आकृतिवैचित्र्य हेंच मुळीं अग्निजन्य आहे असा भौतिक विज्ञानवाद्यांनाही चकित करून सोडणारा सिद्धान्त हजारों वर्षांपूर्वी आर्ष प्रज्ञेंतून प्रथम प्रगट झाला. ह्या ऋतम्भरा प्रज्ञेचीही अनंताकाशांत झेप घेणारी विराट् भरारीच आपणांस रुद्रसूक्तांत पाहवयास सापडते. 'अग्नि' ही एक स्वतन्त्र अशी शक्ति आहे आणि या शक्तीच्या साहाय्यानेंच चराचराची जीवन‍यात्रा सुरळीतपणे चालू आहे याची जाणीव वेदकालीन ऋषींना झाली होती. अशी जाणीव झाल्यामुळेंच वैदिक वाङ्मयांत अग्निवर्णनाची कितीतरी सूक्ते आली आहेत. या सूक्तांतील अर्थाकडे पाहतां भौतिक अणुविज्ञानाचे मूलसिद्धान्त ऋषींना अपरिचित नव्हते असे दिसून येईल. अग्नि आहे म्हणूनच पदार्थाचे वाटेल तसें आपण रूपांतर करूं शकतो. खाल्लेले अन्न अग्नि आहे म्हणूनच पाचकरसांत रूपांतरित होऊन रक्त बनते. अग्नि नसता तर पर्जन्य कुठून पडला असतां ? आणि पर्जन्यच नाही तर अन्नधान्य कसें निर्माण झाले असतें ? अन्नधान्य नाही म्हणजे जीवसृष्टीचे सातत्यच संपुष्टांत आलें असतें. यासाठींच सर्वाधार असे जें अग्नितत्त्व त्याचीच आपण उपासना करीत असू. पूर्वी ही उपासना यज्ञाच्या रूपानें होत असे, "यज्ञात्‌भवति पर्जन्यः" यज्ञ आणि पर्जन्य यांचा निकटतम असा कार्य-कारण भाव आहे तो केवळ श्रद्धेवरच अवलंबून नाही तर प्रमाणगम्य अशा विज्ञानावरही अवलंबून आहे. कालान्तराने आपल्या जीवनाधार अशा यज्ञसंस्थेवर अनेकांची आक्रमणें झालीं. एकदां नव्हे अनेकदा बाहेरून आक्रमणे सुरू झाल्यावर आंतूनही त्याला साथ मिळत गेली. अनेक अवैदिक पंथीयांनी या विध्वंसन कार्यांत मोठ्या हिरिरीने व आत्मीयतेनें भाग घेतला. या सर्वांचा थोडाफार परिणाम म्हणून यज्ञसंस्था उत्तरोत्तर शिथिल होत होत आज ती संपूर्णतया नष्ट होण्याच्या पंथात लागली आहे. त्यामुळें याचा दुसरा असा एक परिणाम होऊं लागला आहे कीं, मूळ वेदांतील मन्त्रांर्चा आज अर्थही आपणांस समजेनासा झाला आहे. यज्ञप्रक्रियाच जिथे माहिती नाही तिथे या प्रक्रियेशीं संबद्ध अशा मंत्रांचा तरी अर्थ कसा माहीत होणार ? अर्थ माहीत नसल्यामुळेंच कसेतरी म्हटले जाणारे मन्त्र कशीतरी केली जाणारी क्रिया यातून फलनिष्पत्ति न झाली तर त्यात नवल तें काय ? असें होऊं नये म्हणूनच पूर्वी अर्थज्ञानासाठी वेदाध्ययन करावें असा सक्त दण्डक घालण्यांत आला होता. "योऽर्थज्ञ‌इत्सकलंभद्रमश्नुते" असें यास्काचार्यानीं सुद्धां सांगितलें आहे, असो. आज मन्त्र म्हणून आपण कर्म करतों परंतु त्या कर्माचा आणि मंत्राचा परस्पर विनियोग कोणत्या कारणानें झाला किंवा केला याचें सुतरां ज्ञान नाही. अशा परिस्थितीत जे जें कर्मानुष्ठान केलें जातें त्याचा तादृश उपयोग न होणें स्वाभाविकच होय.

वैदिकमंत्रांचा खरा आशय कां लक्षांत येत नाही

वैज्ञानिक समजल्या जाणार्‍या कोणत्याहि जागतिक राष्ट्रांत आपल्या परंपरागत धार्मिक आचार-विचारांबद्दल जेवढें औदासिन्य आढळून येत नाही तेवढे आपल्या भारतांत एतद्विषयक औदासिन्य आढळून येतें. 'धर्म' ही सामाजिक जीवनांतच नव्हे तर व्यक्तिजीवनांतही आपणांस अडगळीची गोष्ट वाटूं लागली आहे. ज्या राष्ट्राने धर्म टाकला त्याचा अभ्युदय झाल्याचा आजवरच्या इतिहासांत दाखला नाही. धर्म टाकून केवळ औद्योगिक पायावर राष्ट्राची धारणा करूं पाहणे हें नुसतेच हास्यास्पद नाही तर तें आपल्या प्रज्ञाहीनतेचें, दौर्बल्याचे आणि परप्रत्ययनेयवृत्तीचें लक्षण आहे. सांगण्याचा आशय हा की, आपल्या उज्वल परंपरेबरोबरच ज्ञानाची परंपरा नाहींशी झाली त्यामुळें आपल्या वैदिक सूत्रांचा खरा आशय लक्षांत येत नाही.

समाज धारणेला आवश्यक अशीं प्रतीकें

रुद्रांतर्गत नमक विभागांतील ज्या मंत्रांनी ज्यांना ज्यांना नमस्कार करावा असें सांगितलें ती तीं सर्व प्रतीके समाज धारणेला आवश्यकच अशीं आहेत. विश्वाच्या उत्पत्तीपासून जी जी 'द्वंद्वे' निर्माण झालीं ती सर्व विश्वाचे संतुलन राखण्यासाठी अपरिहार्यच आहेत. सुख-दुःख, पाप-पुण्य, शिव-अशिव, मंगल-अमंगल, साधु-असाधु ही द्वन्द्वे व्यापक अर्थाने जगराहटीला उपयुक्त ठरली आहेत किंवा या द्वन्द्वांमुळेच जगाची राहटी सुरळीत चालू आहे असें म्हणा. साव आला कीं चोर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि त्याच्या अपेक्षेने आपण नकळत सावाचे मूल्यमापन करीत असतो; तुलना ही नेहमीच सापेक्ष असते. चांगली गोष्ट किती चांगली आहे हें शेवटी आपण कशाच्या तरी तुलनेनेच सांगत असत. तात्पर्य या जगांतील प्रत्येक पदार्थ तद्विरुद्धकोटीच्या प्रतीकतुलनेनेंच ओळखला जातो. ज्याची कोणाबरोबरही तुलना करतां येत नाही असा तो एकच एक परमात्मा, तोच या सार्‍या दृश्य विश्वब्रह्माण्डाचें मूळ उपादान कारण; याच्यापापासून सत्व, रज,तम हे त्रिगुण निर्माण झाले व या त्रिगुणांतूनच विश्व दृश्य आकारभावास प्राप्त झालें. अर्थात् विश्वाच्या मूळ कारणांत सत्व-रज तमांत परस्परविरुद्ध गुणधर्म - सत्वविरुद्ध रज, रजाविरुद्ध तम असे नांदत असल्याने 'कारणगुणाः कार्येप्यवतरन्ति' या न्यायानें दृश्य जगतांत द्वन्द्वे निर्माण झालीं. अशा या प्रत्येक द्वन्द्वांत परमात्मशक्तीच ओतप्रोत भरून राहिली आहे. त्यासाठी अमूर्त अशा परमात्मशक्तीला जो नमस्कार करावयाचा तो प्रतीकद्वाराच करणें शक्य आहे; मग तें प्रतीक चांगल्याचे असो किंवा वाईटाचे असो. पुनः प्रतीक चांगले किंवा वाईट हें तरी आपण कशाच्या आधारावर ठरविणार ? हा प्रश्नच आहे. एखादी गोष्ट आपल्या दृष्टीने चांगली किंवा वाईट ठरत असली तरी दुसर्‍या एखाद्याच्या दृष्टीनें ती तशीच ठरावी असें आपण कसें म्हणूं शकणार ? आणि नेहमी आपली दृष्टि ही बरोबरच असेल याची तरी ग्वाही काय ? तेव्हां चराचरांतील यच्चयावत् पदार्थजाताला परमेश्वराचें प्रतीक मानून त्यांना नमस्कार केल्याने तो शेवटी परमात्म्यालाच केल्यासारखा होतो; म्हणूनच नमकांतील मंत्रांत परस्परविरुद्ध प्रतीकांनाही नमस्कार करावा असें सांगितलें आहे त्याचेंही मर्म हेंच आहे. परमात्मा हा त्रिगुणांच्याही पलीकडे असला तरी तो त्रिगुणोद्‌भव विश्वातील अणुरेणूतही आहे हेंच 'नमःसोभ्याय च' या मंत्रांत सांगितलें आहे. सोभ्य हें परमेश्वराचें विशेषण आहे, या शब्दाचा सायणाचार्यांनी आपल्या भाष्यांत पुढीलप्रमाणे अर्थ केला आहे, "उभाभ्यांपापपुण्याभ्यां सहवर्तत इति सोभो मनुष्यलोकः, अतएवाऽऽथर्वणिक आमनन्ति-" "पुण्येन पुण्यलोकं जयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलाकेम्" इति । तत्रभवः सोभ्यः" मनुष्यलोकांत निर्भेळ पुण्यही नाही तसेंच निर्भेळ पापही नाही तर पुण्य आणि पाप यांच्या मिश्रणाने हा मनुष्यलोक तयार होतो अशा पुण्य-पापाच्या द्वन्द्वांने उत्पन्न झालेल्या मनुष्यलोकांतही त्या चिद्धनपरमात्म्याचें वास्तव्य आहे हें लक्षांत ठेवून मनुष्याने आपले सर्व व्यवहार सन्मार्गानें करावेत. वाणीनें नेहमी शुभच बोलावें, मनांत नेहमी शुभसंकल्पाचेंच मनन चालू रहावें कारण आपण उच्चारलेला वाईट शब्द शेवटीं त्या त्या प्रतीकाला लागत नसून तदधिष्ठित परमात्मशक्तीलाच तो लागतो ही शिकवण या मंत्राने आपणांस दिली आहे.

परमात्म्याच्या विविध शक्ती व त्यांचे कार्य

रुद्रातील प्रत्येक मंत्र, समाजधारणेसाठी आपल्या चित्तांत सदैव सद्‌गुणांचीच जोपासना करा असाच जणू आदेश देत आहे.

समाजाचें अनुशासन करण्यासाठीं आवश्यक ती गुणसंपदा संपादन करण्याची प्रेरणा या रुद्रामुळेच आपणांस मिळाली. जगाचा कारभार सुरळीत चालू रहावा यासाठीं परमात्माच्या विविध शक्ती या जगांत काम करीत असतात. दुष्टांचा निग्रह आणि सुष्टांचे परिपालन हें त्यांचें मुख्य कार्य असतें. सन्मार्गानें जाण्यास जो प्रवृत्त झाला त्याला उत्तेजन देणें व त्याच्या मार्गातील विघ्ने दूर करून त्याला अधिकाधिक श्रेयप्राति व्हावी यासाठी त्याला मार्गदर्शन करणें आणि दुष्टांना आपल्या कृतीबद्दल शासन भोगावयास लावून त्यांच्या अंतरांत पश्चात्ताप निर्माण करून हळू हळू त्यांना सन्मार्गगामी बनवणे वगैरे अनेक कार्ये परमेश्वराच्या आज्ञेवरून या विविध शक्तींना पार पाडावयाची असतात. या पारमेश्वरी शक्तींनाच 'गण' अशी संज्ञा आहे असे गण अनेक आहेत. उत्पत्ति-स्थिति आणि लय या त्रिविध शक्तींच्या ज्या अधिष्ठात्री देवता विष्णू-ब्रह्मा-महेश या नांवानें प्रसिद्ध आहेत या देवतांचेही प्रत्येकी भिन्न भिन्न असे गण आहेत. त्यांत शंकराचे गण हे अधिक प्रसिद्ध आहेत. या शंकराच्या प्रसिद्ध गणांना रुद्रांतर्गत नमक- मंत्रांत नमस्कार सांगितला आहे. नमकामध्यें रुद्राचे अवतार म्हणून कांहींचा उल्लेख आला आहे; हे अवतार 'उदार' म्हणून प्रसिद्ध आहेत, यांनी किरिक, विक्षीणक, विचिन्वत्क, आनिर्हत आणि आमीवत्क अशीं नांवें आहेत. या नांवाप्रमाणेंच तें स्वतःचें कार्य करणारे आहेत. किंबहुना त्या त्या कार्यानुरूप त्यांना त्या त्या संज्ञा प्राप्त झाल्या आहेत असें म्हटले तरी चालेल. किरन्तिभक्तेभ्योधनानीति किरिकाः । भक्तांना यथेष्ट ऐश्वर्य प्रदान करणारे जे ते किरिक या नांवानें ओळखले जातात. विक्षीणक म्हणजे क्षीणेभ्यो विपरीताः, कदाचिदपिक्षयरहिताः, असा सायणाचार्यांनी अर्थ केला आहे, तर भट्टभास्काराचार्यांच्या मतानें अभक्तांना नानातर्‍हेचे उपद्रव देणोर असा अर्थ आहे. अशा तर्‍हेचे नाना उपद्रव-पीडानिर्माण करून अभक्तांना, भक्तीच्या मार्गावर आणून सोडणे यावाचून अभक्तांना तरी उपद्रव देण्यामागील आशय कोणता असणार ? विचिन्वत्क, म्हणजे विचिन्वन्ति अपेक्षितमर्थं संपादयन्तीति विचिन्वत्काः, भक्तांना ज्या ज्या विषयाची अपेक्षा असेल ते ते विषय गोळा करून भक्तांना पुरविणे; अर्थातच यासाठीं खरे भक्त कोणते खोटे भक्त कोणते ? भक्त कोण अभक्त कोण ? यांचाही निर्णय लावणे क्रमप्राप्तच आले. आनिर्हत म्हणजे आसमन्तान्निःशेषेण हतं पापं यैस्त आनिर्हताः, भक्तांचे अशेष दुरित हरण करणारे ते आनिर्हत होत; तपश्चर्येने अनेक जन्मार्जित दुष्कृतराशींचा नाश होतो, असा नाश करण्यास या आनिर्हताचें साहाय्य भक्तास होतें. आणि आमीवत्क शब्दाचा अर्थ पौष्कल्य म्हणजे अमर्याद प्राप्ति. परमात्मा प्रसन्न झाला कीं त्याच्या देण्याला सीमा रहात नाही; "अनंतहस्तें कमलावरानें देतां किती घेशिल दो करानें ?" ही उक्ति या बाबतीत प्रसिद्धच आहे. येणेप्रमाणें या किरिक प्रभृति शब्दांचा अर्थ ध्यानांत घेतला की परमेश्वराचे कार्य किती जागरूकपणे व निराबाध चालू आहे याची कल्पना येते. परमेश्वराची अनंत रूपें, अनंत आकार व अनंत कार्यें यांचा मानवांच्या पामरबुद्धीला अर्थ तो काय कळणार व त्याचे आकलन तरी कसें होणार ? 'यो बुद्धेः परतस्तु सः' अशा इन्द्रिये आणि बुद्धि यांच्याही पलीकडे असणार्‍या 'सत्यं शिवं सुन्दरम्' अशा त्या महन्मगल करुणासागर प्रभूचे दर्शन होण्यासाठींच या विश्वातील प्रत्येक अणुरेणू आणि पदार्थ यांच्यामध्यें व्यापून राहिलेल्या त्या जगदात्मा जगदीशाला रुद्रांत नमस्कार करण्यास ऋषी आपणांस सांगत आहेत.

अनेकांतून एकत्वाचीच प्रतीति

हें सांगत असतांना आब्रह्मस्तम्ब पिपीलिकापर्यंत परमात्म्याचे सर्वान्तर्व्यापित्व कसें आहे हें विस्ताराने नमकांतील प्रत्येक अनुवाकामध्यें त्या त्या प्रतीकांनीं सूचित केलें आहे. ब्रह्माण्डाला पालाण घालून उरणारा जगाचा जगड्व्याळ विस्तार कितीही असला तरी त्याचें मूळ मात्र एकाच परमात्मशक्तीत आहे ही भावना रुद्र म्हणतांना उत्तरोत्तर अधिकाधिक दृढ होत जाते. या भावनेचे संस्कार मनाच्या आंतील कप्प्यांत, अप्रगट मनांत एकदां का बद्धमूल झाले की मग द्वैतभाव विलीन होतो. मी-तूपणाच्या चंचल लाटा-चराचर आपण जाहल्याच्या व्यापक अस्मितेच्या महासागरात शांत होऊन जातात. जगाच्या दुःखानें दुःखी, सुखानें सुखी, आनंदानें आनंदी होण्याइतके मीपणाच्या संवेदनेचें क्षेत्र सहजच रुंदावत जातें आणि आपोआपच भेदाभेद, उच्चनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ इत्यादि मानुषनिर्मित कल्पनांना तिलांजली मिळते. ऊस डोंगा रस नोहे डोंगा, नदी डोंगी जल नोहे डोंगे, काय भुललासि वरलिया रंगा ? अशी अद्वैताची एक नवी ज्ञानदृष्टि प्राप्त होते. आपल्या चिदाकाशांत अशा ज्ञानदृष्टीची मंगल उषःप्रमा फाकूं लागली की त्या चिद्‌घनस्वरूप परमात्मशक्तीनें विलसत असलेल्या कर्पूरगौर सांबसदाशिवाचा साक्षात्कार दूर नाहीं. याप्रमाणें नमकविभागांतील मंत्रांनी परमेश्वराच्या वास्तव स्वरूपाची ओळख करून दिल्यावर पुढे चमक विभागांत अशा परमेश्वराजवळ 'मागणे' काय मागावें हें सांगितले आहे. मीपणाला केन्द्रबिंदु कल्पून त्याच्या परिघाभोवतीच फिरणार्‍या आपल्या आशा-आकांक्षा, परमेश्वराची वास्तव ओळख झाल्यावर शिल्लक रहात नाहींत. अंतरांत अद्वैतसूर्याची प्रखर दीप्ति जाणवू लागली कीं मीपणाभोंवतींच घिरट्या घालणार्‍या क्षुद्र अशा आकांक्षांच्या वटवाघळांनी पळ काढावा हे सहजच नव्हे काय ? परमात्मस्वरूप चराचराशी एकरूपता पावल्यावर मनुष्य काय मागूं शकतो याचें अद्वितीय व अनुपम असे उदाहरण चमकांत पहावयास सापडते. चमकांत प्रार्थना करणार्‍या ऋषींचा मीपणा हा व्यक्त जगाची मर्यादा भेदून अव्यक्तांत झेप घेणारा होता. लोक-लोकांतराशीं आत्मीयतेच्या हळूवार परंतु अभेद्य अशा बंधनाने ह्या मीपणांत एक आगळे व लोकोत्तर असे तेज संपुटित झालें होतें. ह्या दिव्य तेजाची आल्हादक प्रभाच चमकांतील अक्षरा-अक्षरांतून ओसंडत आहे.

सामाजिक आकांक्षांचें यथार्थ दर्शन

ज्या विषयांची अभिलाषा चमकांतील मंत्रांत केली आहे त्या विषयांवरून ओझरती नजर टाकली तर त्यांत तत्कालीन समाजाचें प्रतिबिंब दिसल्यावांचून राहणार नाही. तत्कालीन समाजाला कोणकोणत्या गोष्टी राष्ट्रस्थैर्यासाठी आवश्यक वाटत होत्या व त्या कां वाटत होत्या याचें मार्मिक दर्शन चमकांत आपणांस होते. "अश्मा च मे मृत्तिकाश्र मे गिरयश्च मे" या पांचव्या चमकांत जे शब्द आले आहेत त्यावरून राष्ट्राच्या भौगोलिक मर्यादांविषयी त्यावेळचा समाज वा समाजधुरीण किती जागरूक होते हें आपल्या लक्षांत येईल. ही जागरूकता होती म्हणूनच भारतासारख्या खण्डप्राय व विराट् राष्ट्रांत अनुशासन करण्याचें दुर्घट कौशल त्यांनी प्राप्त करून घेतलें होते. राष्ट्रीय ऐक्य हें मुख्यतः सांस्कृतिक ऐक्यावर अवलंबून आहे. यासाठी सामष्टिक मनावर असेच संस्कार त्या वेळी निर्माण करण्यांत येत असत कीं आपोआपच या संस्कारांतून सर्वत्र राष्ट्रीय ऐक्याचा परिमल दरवळावा ! हे राष्ट्रीय ऐक्य पुढें जागतिक ऐक्यांत व त्यापुढेंही वैश्विक ऐक्यांत ज्यावेळीं एकरूप होऊं लागतें त्यावेळींच हें राष्ट्रीय ऐक्य 'कृण्वन्तोविश्वमार्यम्' असे विश्वाकार होते, याची जाणीव रुद्र म्हणतांना विशेषतः चमक म्हणतांना आपणांस व्हावयास हवी. म्हणजेच चमक मंत्रांचे खरें मर्म आपण ओळखले असें होईल. मूळ यज्ञातील रुद्रसूक्त हें दैनंदिन पंचायतन पूजेंत जरी येण्याचे कारण या रुद्राध्यायांतील शाश्वत वैचारिक मूल्यांचे आपल्या चित्तावर संस्कार होत जावेत व त्यायोगे समष्टीशी समरसता प्राप्त करून विश्वकल्याणाशी एकरूप व्हावें हाच होय.

यज्ञीय परिभाषा समजून घेणें आवश्यक

अशा या चमकानुवाकांतील कांहीं अनुवाक श्रौतयज्ञांतील पारिभाषिक शब्द त्यांत आल्यामुळें सामान्य वाचकांना समजण्यास थोडे अवघड असे आहेत. ऋषि-मुनींच्या जीवनाशी यज्ञप्रक्रिया इतकी एकरूप झाली होती कीं कोणताही आशय व्यक्त करतांना तो यज्ञांतील प्रतीकानेंच व्यक्त व्हावा, अशा प्रतीकांनी व्यक्त होणारा अर्थ त्या त्या यज्ञप्रकरणांतील प्रतीकांचा अर्थ नीट समजला तरच ध्यानी येऊं शकतो व त्या अर्थाची संगती लागू शकते. उ. अँशुश्च मे हा सातवा, इध्मश्च मे हा आठवा, व अग्निश्च मे घर्मश्च मे हा नववा अनुवाक श्रौतयज्ञाची परिभाषा कळल्याशिवाय कळणेच शक्य नाहीं. अशी परिभाषा विस्तारभयास्तव येथें सांगतां आली नाही जरी त्या मंत्रांचे अर्थ सांगतांना संक्षेपतः आवश्यक तेवढे विवरण करण्यांत आले आहे; विशेष जिज्ञासा असेल त्यांनी मूळ सायणाचार्यांचे भाष्य वाचावे अशी विनंती आहे. कल्पसूत्र वाचून भाष्य वाचले तर अर्थ अधिक स्पष्ट होईल.

उपरोक्त सात आठ व नऊ या अनुवाकांत जे 'ग्रह' सांगितलें आहेत त्याचा अर्थ थोडक्यांत असा आहे. सोमयाग प्रकरणांत हे अश्वादिग्रह प्रसिद्ध आहेत. गृण्हातिति इग्रहः, सोमरस घेण्यासाठी विशिष्ट आकाराचे जें लाकडाचे पात्र बनवतात त्याला ग्रह असें म्हणतात. ज्या देवतांना उद्देशून हा सोमरस घेतला जातो त्या देवतांची नांवें या ग्रहांना दिलेली आहेत. या ग्रहांपैकीं कांहीं ग्रह प्रकृतिभूत यागामध्ये सांगितले आहेत तर कांहीं विकृतिभूत यागामध्ये सांगितले आहेत. सारस्वतग्रह हा अभिषेचनीय नावाच्या विकृतेष्टीमध्यें सांगितला ओह, तसेंच इध्मा, बर्हि, वेदि ही सर्द यज्ञांगद्रव्ये यज्ञप्रकरणांत प्रसिद्ध आहेत. या सर्व पदार्थांची माहिती मूळ ग्रंथांमध्ये पहावी. हे उपरोक्त सर्व ग्रह व द्रव्यें ज्या ज्या यज्ञामध्ये आहेत ते सर्व-- मे कष्टेपताम् -- महान श्रौतयज्ञ मला सुलभ होवोत, माझ्याकडून यांचे अनुष्ठान होवो हा आशय. असें महान श्रौतयज्ञ हातून घडावयासही फार मोठा पुण्यसंचय गांठी असावा लागतो.

यज्ञप्रक्रियेत शासनसंस्थेचीं मूल्ये

यज्ञ हे कसे पार पाडले जातात हें जरा बारकाईनं पाहिले तर त्यांत राष्ट्रव्यापी शासनसंस्थेचीं सर्व तत्त्वें सुसूत्र ग्रथित केलेली आढळून येतील. शिस्तबद्धता, आज्ञापालन, वेळच्यावेळी काम करण्याची संवय, बिकट प्रसंगांत अचूक व त्वरित निर्णय घेण्याचे कौशल्य, चौफेर दक्षता, स्वावलंबन इत्यादि सद्‌गुणानी मण्डित असेंच ऋत्विज यज्ञासाठी लागत असत. असे सद्‌गुणमण्डित ऋत्विज व गुणज्ञ यजमान यांचा मणिकाञ्चनाप्रमाणें समसमान संयोग ज्यावेळी होत असे त्यावेळीं यज्ञकर्मांतला कर्मठपणा जाऊन अविनाशी तत्त्वज्ञानाच्या मंगलदीक्षेंत त्याचें सहज रूपांतर होत असे. कर्मयोगी बनणे म्हणजे कर्मठ बनणे नव्हे हें लक्षांत ठेवलें पाहिजे. गाणे अनेकांना गाता आलें म्हणून त्यांतील स्वरविज्ञान व स्वरांवर ताबा स्वरयोग्याशिवाय कुणाचा असणार ? यज्ञ हा संग्राहक व मुख्यतः सामूहिक स्वरूपाचा असल्यानेंच भारताच्या राष्ट्रीय जीवनांत त्याला अपरंपार असें असाधारण महत्त्व प्रात झालें होतें. अशा या यज्ञांची पहिली सुरुवात देवांनीच केली. "यज्ञेन यज्ञमयजन्तदेवाः" असें पुरुषसूक्तांतील मन्त्रांत सांगितलें आहे. अर्जुनाला उद्देशून भगवंतांनीही -
सहयज्ञाः प्रजाः सुष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यत्वं एषवोऽस्त्विष्टकामधुक् ॥
असें यज्ञासंबंधी मोठ्या मार्मिक शब्दांनीं सांगितले आहे. यज्ञ हा "इष्ट- कामधुक्" आहे. हवें असेल ते यज्ञापासून मिळू शकतें असें हे सारगर्भ विशेषण यज्ञाला लावून भगवंतांनी सूचित केलें आहे. एवढेच नव्हे तर पुढें "यज्ञशिष्टाशिनः सन्तोमुच्यते सर्व किल्बिषैः" असें यज्ञाचे महत्त्वही वर्णन केलें आहे. यज्ञांत मिळणारी त्यागाची दीक्षाही स्वयंभू व निरपेक्ष होती. आज या त्यागाच्या दीक्षेचे संस्कार व्यक्तिजीवनांतही होत नाहींत. याचा परिणाम म्हणून आपल्या समाजजीवनांत बुद्धिवादाच्या तथाकथित भ्रामक युक्तिवादाच्या आहारी जाऊन उपयुक्तता वादाचा आत्यंतिक अतिरेक दृष्टोत्पत्तीस येऊं लागला आहे. "सर्वांसाठी मी, आणि मग माझ्यासाठी सर्व" या एका सूत्रांत भारतीय जीवनाचे अनघ व रमणीय विविध पैलूंचे त्यावेळीं आपणास जें दर्शन घडत असें तें केवळ एका यज्ञसंस्थेमुळेंच होय असें म्हटले तर त्यांत भौतिकवाद्यांना खरोखरी राग येऊं नये.

चमक म्हणतांना यज्ञाविषयी ऋषी-मुनींची काय धारणा होती याची कल्पना वाचकांना यावी म्हणून हें विवरण केलें. चमकांतील दहाव्या अनुवाकांत ज्ञानेन्द्रिये, कर्मेन्द्रिये आणि आपल्या शरीरांत नांदणारे दशविध प्राण, फार काय शेवटी या पार्थिव देहांतील अपार्थिव चिच्छक्तीही- 'यज्ञे- न कल्पताम्' -यज्ञमय होवो अशी ऋषी प्रार्थना करीत आहेत. व्यक्तीच्या जीवनांतील सार्‍या प्रवृत्ती अशा तर्‍हेने यज्ञमय झाल्या, शिवमय बनल्या कीं त्या व्यक्तीचे जीवन हाच मुळीं एक पवित्र यज्ञ बनतो. असा हा पवित्र जीवनयज्ञ महायज्ञांत एकरूप झाला कीं व्यष्टिजीवन संपुष्टांत येऊन ती व्यक्ति, व्यक्ति या नात्याने न जगतां समष्टि या नात्यानेंच उर्वरित आयुष्यांत जगते हा या अनुवाकाचा महत्त्वाचा आशय आहे. हा भव्य आशय मनांत आणून त्या आशयाशी समरस होतां आलें तर खात्रीनें अनेक जन्म पुण्यपुञ्जपरिपाकवशात् लाभलेले हें क्षणभंगुर मानवी जीवन चरितार्थ-संपन्न झल्यावाचून खचितच राहणार नाही.

परिणत विचारांची दीप्ति

यापुढें "एकाचमे तिस्रश्चमे पंचचमे" या शब्दांनीं शेवटचा अकरावा अनुवाक सुरू होतो. या अनुवाकात ऋषींच्या परिणत-प्रज्ञविचारांची दीप्ति कळसास पोहोंचली आहे. सम आणि विषम संख्या यांचें द्योतक असणारे कांहीं शब्द या अनुवाकांत आले आहेत. हे शब्द केवळ संख्या सांगण्यासाठीच उच्चारले गेले आहेत असें समजणें चूक ठरेल. विश्वातील यच्चयावत पदार्थांच्या धर्मांचें अचूक ज्ञान व्हावें यासाठीं जी अनेक शास्त्रें भारतांत निर्माण झाली त्यांत संख्याशास्त्र म्हणजेच गणित शास्त्र हें अत्यधिक महत्त्वाचें आहे. आधुनिक संशोधनाची उपकरणें जवळ नसतांना केवळ पर्णकुटीत राहून निसर्गाशी समरस होऊन आपल्या ऋषींनीं याही शास्त्रांत आपली निरंकुश प्रज्ञा प्रगट केली आहे. दुर्बिणीशिवायही खगोलाचे इतकें सूक्ष्म व इतकें अचूक ज्ञान कसें प्राप्त करून घेतलें असेल याचा आजही पाश्चात्य गणितज्ञांना मोठा विस्मय वाटतो. गणितातील शून्याचा शोध हा त्या शास्त्रांत आमूलाग्र क्रान्ति करणारा आजही अबाधित असा मानला गेला आहे. गणित हें पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलें आहे याबद्दल आज विद्वानांची खात्री पटत चालली आहे. अशा या गणितशास्त्राच्या आधारे सूक्ष्मातिसूक्ष्म व स्थूलातिस्थूल अशा पदार्थांच्या गतीचे सूक्ष्म अवलोकन करून त्यांच्या हालचालींचा या जगावर काय काय परिणाम होतो हें पाहून ऋषींनीं कांहीं मूलग्राही सिद्धांत मांडले आहेत. या सिद्धान्तानुसार देश आणि काल या सर्वव्यापी अशा दोन तत्त्वांचा त्यांच्या कक्षेत येणार्‍या प्रत्येक पदार्थावर परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. कालतः आणि देशतः अलिप्त अशी कोणतीच वस्तु या ब्रह्माण्डांत आपणांस दाखविता येणार नाहीं. म्हणूनच विश्व हें देशकालपरिच्छिन्न म्हणजे व्याप्त आहे असें म्हणतात. देश-काल यांनी अपरिच्छिन अशी एकच एक शक्ति आहे आणि ती म्हणजे देशकालाच्या मर्यादेपलीकडे असणारी; तथापि देश-कालाच्या मर्यादेतही असणारी अशी सर्वंकुष परमात्मशक्तिच होय. या परमात्मशक्तीच्या नियंत्रणामुळेंच अणुपेक्षाही सूक्ष्मतम असणार्‍या परमाणूंतील घटक द्रव्यांचें 'स्पन्दन' योग्य तर्‍हेने आणि अचूक असे चालूं आहे. जर का हें नियंत्रण नसतें जर अणूंतील केन्द्राणूचा तोल राहिला नसता व हा जर तोल न राहता तर या जगाचें भवितव्य काय झालें असतें याची आजच्या शास्त्रज्ञांना तरी पुरेपूर कल्पना येऊन चुकली आहे. महतो महीयान् अशा महत्तत्त्वाकडे गेल्यावर जशी मानवी बुद्धि कुंठित होते तशीच ती अणोरणीयान् अशा अणुपरिमाणापर्यंतही गेल्यावर कुंठित होते; म्हणून लोकोत्तर बुद्धीनें भारतीय ऋषींनीं गणितशास्त्रांतील जी प्रमेये जगासमोर ठेवली त्या प्रमेयांवरच आजचे बव्हंशी वैज्ञानिक-शोध आपली वाटचाल करीत आहेत. तेव्हां या गणितशास्त्रांतील प्रमेयांनी जी तत्त्वें जीवनाला उपकारक ठरली त्या विशिष्ट तत्त्व प्रणालीचा बोध करून देण्यासाठीच चमकांतील अकराव्या अनुवाकांत संख्यावाचक शब्दांचा उपयोग केला आहे हें या विवेचनावरून वाचकांच्या लक्षांत येईलच. या विषयाचें याहून अधिक विवेचन होणें जरूर होतें; परंतु स्थलसंकोचास्तव येथें थांबणें इष्ट आहे.

मूळ एकच एक अशी जी परमात्मशक्ती होती त्या शक्तींतूनच पुढें 'तिस्रः' म्हणजे सत्व-रज-तम असे त्रिगुण निर्माण झाले, व पुढें या त्रिगुणांतूनच 'पञ्चचमे' या शब्दांनीं पश्चमहाभूते स्थूल आकारभावास प्राप्त झालीं असें सूचित केलें आहे. विश्वाच्या उत्पत्तीचा उगम अशा तर्‍हेने थेट परमात्मशक्तीपर्यन्त नेऊन भिडवला असल्यामुळें सगुणोपासनेचें अंतिम उद्दिष्टही या अनुवाकांत सांगितलें आहे असें म्हटल्यास तें वावगें होणार नाही. चतुर्दश भुवनांवर आधिपत्य येण्यासाठीच त्या सर्वांतर्व्यापि असूनही सर्वांपेक्षा पृथक् असणार्‍या, 'तद्‌दूरेतद्वदन्तिके' ' तदेजति तन्नैजति' या उपनिषद्वाक्यांत सांगितल्याप्रमाणे एकाच वेळी अत्यंत गतिशील व अत्यंत स्थिर अशा परस्पर विरुद्ध गुणधर्मींनी युक्त असणार्‍या त्या एकमेव आदिशक्तीशी एकरूप होऊन जातां यावें, हेंच ऋषींनी चौदादीभुवनांच्या पलीकडे प्रज्ञेची विराट् भरारी मारून या अनुवाकांत सूचित केलें आहे.

रुद्राध्यायांतील कौस्तुभमणी

चमक विभागांतील हा अकरावा अनुवाक म्हणजे रुद्राध्यायांतील जणू कौस्तुभमणीच होय. भारतांत ज्या ज्या विद्या, जी जी दर्शनें, ज्या ज्या कला, फार काय ज्या ज्या गोष्टींतून-भारतीय जीवनाच्या अस्तित्वाचा दिव्य साक्षात्कार झाला त्या सर्वांचा या अनुवाकांत, लघुसंदेशपदासरस्वतीनें ऋषींच्या अर्थगर्भ भारतीने समावेश केला आहे, तो असाः-- सकल जगाचें उपादानकारण म्हणून जगदारंभीं एकच 'प्रकृति' होती. या संबंधी मार्कण्डेय पुराणांत- "एकैवादं जगत्यत्र द्वितीया काममापरा" असा उल्लेखही आढळतो. या एका मूळ प्रकृतीपासून गुणत्रयरूपिणी अशा तीन देवता (शक्ति) प्रगट झाल्या. पुढें या तीन देवतां (शक्ति)- पासून पञ्चमहाभूते साकार झाली. त्यानंतर या पञ्चमहाभूतांच्या तन्मात्रांपासून ( अपंचीकृत महाभूतांपासून) पांच ज्ञानेन्द्रिये, सहावे मन व सातवी बुद्धि निर्माण झाली. या सातांच्या समुदायाने नवद्वारोपलक्षित - नऊ द्वारांनी युक्त असा पार्थिव देह तयार झाला. या स्थूल पार्थिव देहांत दश प्राण आहेत. पांच मुख्य व पांच उप मिळून दहा. यांची नांवें १ प्राण २ अपान ३ व्यान ४ समान ५ उदान ६ नाग ७ कूर्म ८ कृकल ९ देवदत्त १० धनंजय अशी आहेत. या दशप्राणांना आधारभूत अशी 'सुषुम्ना' नांवाची नाडीही तयार झाली. या अकरा तत्त्वांच्या अंशाने तेरा देवता (शक्ति) झाल्या. तसेंच पुष्पा, युगंधरा, शंखिनी प्रभृति चौदा व उपरोक्त सुषुम्ना मिळून एकूण नाड्या तयार झाल्या. लिंग शरीराचे सतरा अवयव, एकोणीस सञ्जीवनी महौषधी- व्रणविरोपिणी, व्रणघ्नी, सहदेवी, ब्राह्मी, मुण्डी प्रभृति या वनस्पति नागार्जुनतंत्रात प्रसिद्ध आहेत. शरीरांतील एकवीस मर्मस्थनें वैद्यक शास्त्रांत प्रसिद्ध आहेत. तसेंच ज्वर, अतिसार, पाण्डू, क्षय वगैरे तेवीस महारोग-हे सर्व मानवी शरीरांत निर्माण होतात असें वैद्यकशास्त्र सांगते. आतां स्वर्गांत जशा अप्सरा प्रसिद्ध आहेत तशाच त्या याही देहांत आहेत. उदाहरणार्थ उर्वशी, तिलोत्तमा, सुकेशी, मञ्जुघोषा, पूर्वचित्ति, रम्भा, मेनका प्रम्लोचा वगैरे पंचवीस कसरा या देहांत आहेत. या अप्सरा क्षणजे काय याचा सुंदर अर्थ योगलतिकेंत विस्ताराने दिला आहे. त्यांत म्हटले आहे, की- पूर्वचित्ति म्हणजेच चित्त, बुद्धि हीच तिलोत्तमा, मन हेंच उर्वशी, अविद्या हीच कोणी एक रम्भा, परोक्षविद्या क्षणजे मेनका, तिची कन्या गौरी हीच अपरोक्ष विद्या इ. अशा तर्‍हेने अर्थाचा समन्वय लावला आहे. तसेच चित्रसेन, विश्वावसु, नारदप्रभृति, सत्तावीस गंधर्व; तसेंच श्रुतीत एकोणतीस विद्युद्देवता सांगितलेल्या आहेत. यांनाच 'कृत्त्या' असेही दुसरें नांव आहे. या कृत्त्या श्रुतींत पुढीलप्रमाणें सांगितल्या आहेत, "ज्योतिष्मती त्वासादयामि ज्योतिर्विदं त्वासादयामि " अशींच एकतीस भुवनेंही प्रसिद्ध आहेत तीं अशीं भूः, भूवः, स्वः, इत्यादि सात, अतलादि पातालपर्यंत सात अधोलोक, वैकुंठलोक, राधालोक, गोलोक, मणिद्वीप, महाकालपूर, शिवपूर, गणेशलोक मिळून सात यांना उपसर्ग असेही म्हणतात. अयोध्या, मधुरा, माया इत्यादि सात नगरींना भूस्वर्ग अशी संज्ञा आहे. कैलास, मानस, मेरु यांचाही यांत समावेश केला की एकतीस ही संख्या पुरी होते. याप्रमाणेच आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, अश्विनीकुमार आणि प्रजापति या एकूण तेहतीस देवता. अनुवाकात आलेल्या विषमसंख्यावाचक शब्दांनीं हा सर्व अर्थ व्यक्त केला आहे - "एकाचमे तिस्रश्च म इत्याह" या श्रुतिवाक्यानें वरील अर्थ हा कल्पनागम्य नसून प्रमाणगम्य आहे असा निर्वाळा दिला आहे तो मुद्दाम ध्यानांत ठेवावा. आतां चतस्रः इत्यादि शब्दांचाही अर्थ पुढीलप्रमाणे घ्यावयाचा आहेः- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ ज्याच्यामुळे प्रात होतात त्या चार विद्या, चार वेद व चार उपवेद मिळून आठ, षट् या शब्दाने षडंगे (सहा अंगे) आणि सहा शास्त्रें मिळून बारा, सोळा सिद्धिस्वरूप अशा महाविद्या. या महाविद्यांमध्यें दूरश्रवण, दूरदर्शन प्रबृति सर्व सिद्धींचा समावेश आहे. पांच ज्ञानेन्द्रियांपासून प्राप्त होणार्‍या सिद्धि, वाक्सिद्धि, अप्रतिहतगति दूरग्रहण वगैरे पांच कमेंन्द्रियांपासून प्राप्त होणार्‍या सिद्धि, तसेच स्थापत्यविद्या, पर्जन्यविद्या, ज्योतिर्विद्या, आयुर्विद्या आणि परोक्ष ब्रह्मविद्या मिळून पांच, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्याशी संबंधित, अपरोक्ष ब्रह्मविद्या ही महत्तत्त्वाशी संबद्ध, मिळून एकूण सोळा, महाभूतें स्थूल व सूक्ष्म या प्रकारांनीं दहा. विषयही त्याचप्रमाणें मिळून दहा, चोवीस तत्त्वें सांख्यप्रक्रियेत प्रसिद्ध आहेत. अठ्ठावीस पशुपक्ष्यांचे भेद भागवतांत प्रसिद्ध आहेत. अष्टविध देवसर्ग (देवांची सृजनशीलता) सहा प्रकारचा मानुषसर्ग, कौमार आणि मानुषसर्ग मिळून दोन, ऐंद्रियसर्ग दहा प्रकारचा त्रिविध अहंकार आणि तीन गुण मिळून बत्तीस, याहून राहिलेल्या इतर सर्वांचाही यांतच समावेश समजावा; या सर्व गोष्टी "मे यज्ञेन कल्पताम्" मी करीत असलेल्या यज्ञानें उपलब्ध होवोत.

या अनुवाकांतील वरील सर्व आशय ध्यानी घेतला की अकराल्या अनुवाकांतील संख्यावाचक शब्दांचे खरें मर्म वाचकांच्या ध्यानी येईल.

पं. विष्णुसूरींनीं आपल्या भाष्यांत वरील अर्थ विस्तारानें सांगितला असला तरी त्याचें मूळ आपल्या योगविषयक उपनिषदांमध्यें आहे, म्हणून विशेष जिज्ञासा ज्यांना आहे त्यांनीं योगविषयक उपनिषदें ही मूळांतून वाचावीत हें बरें.

अनंत संचिताच्या अगाध सरोवरांतून मानवी जीवनाचें हें अनघ रमणीय असें मनोज्ञ कमलपुष्प निर्माण झालें आहे. शत-शत पाकळ्यांनी विकसित होणार्‍या या कमलपुष्पांत दैवी सद्‌गुणांचा दिव्य परिमल नेहमी दरवळत रहावा व या परिमलाने सारें चराचर मोहित होऊन जावें आणि शेवटी या जीवनाच्या कमलपुष्पाची एकेक पाकळी त्या विश्वरूपाच्या अंघ्रियुगुली आपोआप गळून पडावी. ; आणि अशी ती पडतां पडतां आपण एकाजनार्दनीं विश्वरूप होऊन जावें यापेक्षा मानवी जीवनाची अंतिम सफलता ती कोणती ?

या सफलतेचे क्षितिज अमर्याद आहे. रुद्रसूक्ताने हें अमर्याद क्षेत्रही पादाक्रांत करतां येतें असें आपणांस ऋषि सांगत आहेत. त्यांचा हा भव्य आशय मनांत ठसला तर रुद्र म्हणण्याचे खरें सार्थक झालें असेंच समजले पाहिजे. असो.

रुद्राध्यायाचे 'नमक' आणि 'चमक' असे मुख्यतः दोन विभाग असल्याचें मागें येऊन गेलेंच आहे.

संग्रहप्रधान नमक तर संप्रदानप्रधान चमक

नमकमंत्रांत मुख्यतः संग्रहाची कल्पना आहे, तर चमक विभागांत प्रामुख्याने संप्रदानाची कल्पना अभिप्रेत आहे. चमकांतील, चमे, चमे या शब्दांत जो 'मे' शब्द आहे त्याचा अर्थ जरी 'मला' असा स्थूल वाच्यार्थ असला तरी हा ऋषींचा मीपणा व्यष्टीशीं संबद्ध नसून समष्टीशी एकरूप झाला होता, त्यामुळें अशा विश्वाकार झालेल्या ऋषींच्या मी-पणांतही समष्टीचेच कल्याण होते; त्यांचा स्वार्थ तो परार्थ होतो. म्हणून चमकांत जें जें परमात्म्यापासून अपेक्षिलें ते तें समष्टीच्या अम्युदयार्थ आहे यासाठींच चमकांत संप्रदानाची प्रबल अशी 'ऊर्मी' आहे. शक्तींचा संचय नमकांत अपेक्षित आहे तर चमकांत संचित शक्तीचें वितरण अभिप्रेत आहे; "आदानं हि विसर्गाय सतां वारिमुचामिव" असा आपला आदर्श आहे. आपल्याजवळ शक्तिसंचय नसेल तर या विश्वांत आपल्यासाठीं कोणतेंही मानचे स्थान नाही. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीयारण्यकांतील आठव्या प्रपाठकांत माणसाने शक्तिसंपन्न, बलसंपन्न कां असावें हे पुढील उद्बोधक शब्दांत सांगितलें आहे तें आजही तरुणानी मनन करण्याजोगे आहे - ऋषी सांगतातः-
" युवास्यात्साधु युवाऽध्यायकः । आशिष्ट दृढिष्ठो बलिष्ठः । तस्येयं पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् । ख एको मानुष आनंदः " ॥ इति ॥

मानवी योनींत जन्म घेतल्यावर मानुष-आनंदाची प्राप्ति होण्यासाठी शक्तिसंपन्न असलेंच पाहिजे. सामर्थ्याच्या अभावीं जिथे प्राथमिक स्वरूपाचा मानुषआनंदच नाही तिथें त्याहून उच्चस्तरीय आनंद कसे प्राप्त होणार ?

निसर्गातील प्रत्येक पदार्थ हेंच सांगत नाहीं काय ?

त्यागप्रधान महान श्रौतयज्ञ करण्यासाठींच नमकांत परमात्म्याच्या विविध शक्तींची अनुकूलता प्रार्थिली आहे. चमकांत या विविध शक्तींच्या साहाय्याने प्रात करून घेतले महदैश्वर्य यज्ञांत अर्पण करण्याची प्रेरणा आहे. 'आदान' आणि 'प्रदान' या दोन तत्त्वांनी मिळून 'वैश्विकसंतुलन' राखले गेलें आहे, फार काय पण चराचर सृष्टीचे सातत्य जें आजवर अविच्छिन्न राहिलें गेलें तेंही याच आदान-प्रदान तत्त्वाच्या जोरावर होय. निसर्गाकडे जरा बारकाईने पाहिलें तर त्यांतील प्रत्येक पदार्थ आपल्याला हेच तत्त्व सांगेल. परमेश्वरी सृष्टींत निसर्गतः आढळणारे हे तत्त्व मानवी जीवनांतही तितकेच अपरिहार्य आहे. ही तत्त्वें जीवनांत दृग्गोचर व्हावींत यासाठीच भगवंतीनी गीतेमध्ये अस्तेय अपरिग्रह इत्यादि राष्ट्रीय स्वकपाचीं व्रतें आचरावीत असें सांगितले आहे. पूर्वी यज्ञांतून ही दीक्षा आपोआपच मिळत असे. आज यज्ञ लुप्त झालें तरी त्यांतील तत्त्वांची उपयुक्तता मात्र जशीच्या तशीच आजही टिकून राहिली आहे.

विज्ञानसूक्त आणि यज्ञ यांचा संबंध

असे यज्ञविषयक ज्ञान ज्या वैदिक सूक्तांनी प्राप्त होतें त्यांत रुद्रसूक्त हें प्रधानतम असे सूक्त आहे. आपलें विज्ञान हे यज्ञ निर्मितीला कारण च्कसे हे तैत्तिरीयारण्यकांत सांगितले आहे-
"विज्ञानं यज्ञं तनुते । कर्माणि तदनुतेऽपि च ।" कर्म हें यज्ञोभव व यज्ञ हा विज्ञानोद्‌भव व विज्ञान हे रुद्रसूक्तोद्‌भव्व असा या सर्वांचा परस्पर कार्यकारणभाव आहे. हा कार्य-कारणभाव स्पष्ट होण्यासाठीच आतापर्यंत विवेचन केलें.

रुद्र आणि त्याची उपासना

भट्टभास्कराचार्यांनी आपल्या रुद्रावरील भाष्यांत लातर्गत नमकमंत्रांतील प्रत्येक मंत्राचें विविध फलांच्या उद्देशाने पुरश्चरणात्मक अनुष्ठान विस्तारानें सांगितले आहे. तथापि अशी अनुष्ठानें म्हणजे काम्य अनुष्ठाने तकलादू कलापयुक्त च गुरुपदिष्ट मार्गाने केलीं तरच ती यशस्वी होण्याची खात्री देतां येते.

मंत्रांतील शब्दांपासून निर्माण होणारे ध्वनिप्रवाह किती विलक्षण कार्य करूं शकतात याचा जराही प्रत्यय ज्यांना आजवर आलेला नाही त्यांनी प्रथम आपली मनोभूमिका शुद्ध व निःशंक करून मगच या मार्गांत पदार्पण करणे उचित ठरेल. शब्दशक्ति ही ऋषि-मुनींची केवळ कल्पना नसून ती किती प्रत्ययकारी आहे याची प्रात्यक्षिके आजही विज्ञानवादी राष्ट्रांत चालूं आहेत. शब्द तन्मात्रेनेच आपण अखिल ब्रह्माण्डावकाशाशी संबद्ध आहें१त याची जाणीव विज्ञानवाद्यांना नव्यानें होऊं लागली तरी भारतांत ती नवी नव्हती व नाही. साधकांनी हे ध्यानांत ठेवून अश्रद्धमनाच्या वातावरणापासून स्वतःला अलिप्त राखावे हे उत्तम.

मंत्रोपासनेनें मनाचें सामर्थ्य कसें वाढते याचा अनुभव घेण्यासाठी तरीं रुद्राची उपासना करावी. मात्र अशी उपासना करतांना आज जी पद्धति चालू आहे तीत थोडा बदल करणें जरूर आहे.

आज रुद्राची एकादशिनी, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रकारांनी रुद्र म्हटला जातोच. परतु त्यांत पूर्वी सांगितल्याप्रमाणे सकलांग-कलापाचें विधिवत् आचरण होत नाही. लघुरुद्र व महारुद्र हे करीत असतांना ऋषींनी प्रथम न्यास सांगितले आहेत ते अतीव महत्त्वाचे आहेत. अन्तर्मातृकान्यास व बहिर्मातृकान्यास जर अर्थ समजून केले गेले तर मंत्रशक्तीचे जागरण व्हावयास वेळ लागणार नाही. बौधायनासारखे साक्षात्कृतधर्माण ऋषि रुद्राच्या उपासनेपूर्वी आवश्यक त्या पूर्वांगांचे अनुष्ठान करावें असे जें मुद्दाम सांगतात तें निरर्थक आहे असे मानणे योग्य नव्हे. त्यांत हानिप्रद अशी आत्मवंचनाच ठरेल. रुद्राचें जपादि पद्धतीने विशेष अनुष्ठान करूं इच्छिणार्‍या साधकांसाठी बौधायन ऋषींनी- "अथातः पञ्चाङ्गरुद्राणां महान्यासपूर्वकं जपहोमार्चनाभिषेकविधिं व्याख्यास्थामः" असा उपक्रम करून विस्तारानें या अंगोपांगांची माहिती दिली आहे. साधकांनी ती मूळांतूनच समजून घेणें अधिक सोईचे होईल. बौधायनाच्या वरील वाक्यांत 'पञ्चाङ्गरुद्र' हा शब्द आला आहे त्याचा अर्थ पांच प्रकारचे अंगन्यास ज्यांचे आहेत ते पंचांग रुद्र असा आहे.

हे पांच प्रकारचे अंगन्यास पुढीलप्रमाणे आहेत-
(१) शिखाद्यस्त्रान्त एकत्रिंशदङ्गन्यास,
(२) मूर्धादिपादान्त दशाङ्गन्यास,
(३) पादादिमूर्धान्त पञ्चाङ्गन्यास,
(४) गुह्यादि मस्तकान्तन्यास,
(५) हृदवाद्यस्त्रान्त पञ्चाङ्गन्यास.
हे सर्व न्यास व इतर सर्व अंगोपांगे, यांचे शास्त्रशुद्ध ज्ञान गुरुपदिष्ट मार्गानें प्राप्त करून घेतलें तरच तें मंत्रातील प्रसुप्तशक्ति जागृत करण्याचें दृष्टीनें उपयुक्त ठरेल. येथे हा सर्व विषय सोपपत्तिक सांगतां योगें केवळ अशक्य आहे यासाठी फक्त दिग्दर्शन करूनच थांबणे भाग आहे.

रुद्रोपासनेने प्राप्त होणारी विविध फळे

अशा या रुद्रसूक्ताचा विधिपूर्वक जर जप केला तर त्यापासून निर्माण होणार्‍या विविध फलांचाही निर्देश बौधायनांनी पुढीलप्रमाणे केला आहे-
"एतत्पापक्षयार्थी, व्याधिमोचनार्थी श्रीकामः शान्तिकाम आयुष्काम आरोग्यकामश्चकुर्यात् । एवंकुर्वन्नेतत्सर्वमाप्नोति, इत्याह भगवान्बौधायन इति " ॥
या वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे. 'एवं कुर्वन्' हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत- "सकल पूर्वोत्तराङ्गसहित जपानुष्ठान झालें तरच" हा या शब्दांचा महत्त्वाचा आशय आहे; साधकांनी तो आपल्या हृत्पटलावर कायमचा कोरून ठेवावा.

निराश होऊं नका

सध्याच्या संस्कारशून्य आणि अश्रद्ध वातावरणांतही ज्यांना या विषयासंबंधी आदर आहे त्यांनीही 'विशेष ज्ञान नाहीं' म्हणून मुळींच निराश होण्याचे कारण नाही. अनंतावकाशांत गरुडाची झेप घेतां आली नाही म्हणून चिमण्या कांहीं आकाशांत विहार करण्याचे सोडून देत नाहीत हे लक्षांत ठेवून अधिक कांहीं परिस्थितीनुसार करतां आलें नाही तरी पञ्च पञ्च उषःकाली, रम्य, शांत व आल्हादक अशा पवित्र वेळी उठून आवश्यक ते सर्वपूर्व कृत्य आटोपून, काया-वाचा-मनानें अंतर्बाह्य शुचिर्भूत होऊन- त्या अघटित घटना पटीयान् करुणासागर कर्पूरगौर अशा शिवशंकराला श्रद्धेने अभिवादन करून जर प्रत्यही नियमितरीत्या हे पावन रुद्रसूक नुसतें जरी म्हटले तरीहि तो दयाघन कृपेचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही. दीनांसाठी दीन, मोठ्यांसाठी मोठा, लहानांसाठी लहान बनणारा तो परम भक्तवत्सल आपली उपेक्षा करील असें मनातही आणूं नये. मुक्या मनाने जरी त्याची आळवणी केली तरी तो सर्वांगांनीं विरघळणारा आहे. गजेन्द्राच्या मोक्षासाठी धांव घेणारा. तो दीन दयासागर प्रभू- त्याला आपण काय सांगणार व देणार तरी काय ? निष्ठेने, श्रद्धेने आणि विश्वासाने त्याच्या त्रैलोक्यपावन चरणकमळाजवळ विनम्र व्हा की तुमचे काम झाले. पुढचें तो पाहून येईल. नाहीतरी यापेक्षा त्याच्या बाबतींत - " मुक्या मनामें किती उधळावे शब्दांचे बुडबुडे " ?

आता थोडेसे ऋणस्मरण --

ही रुद्रार्थदीपिका मी लिहिली असली तरी या मागची प्रेरणा आपल्या अनलंकृत परंतु भावगर्भ लेखणीने मराठी सारस्वतांत सुपरिचित असलेले, प्रकाशनकार्यात 'साहसी' म्हणून सुविख्यात झालेले य. गो. जोशी, यांची आहे हे मुद्दाम नमूद केले पाहिजे. अशा तर्‍हेने श्री. य. गो. जोशी यांनी जरी प्रेरणा दिली तरी माझेकडून प्रत्यक्ष लिहवून घेण्याचे थोडेसे त्रासदायक वाटगारे काम यशवंत प्रकाशनाचे मुख्य व माझे मित्र अनंतराव वैद्य यांनी पार पाडलें आहे. त्यांच्या उत्साहामुळेच ही रुद्रार्थदीपिका खरोखरी प्रकाशित झाली आहे. आणि यापुढें रुद्रार्थदीपिकेच्या मुद्रितांचे काळजीपूर्वक संशोधन करण्याचे अत्यंत किचकट असें काम ज्यांनीं मोठ्या तत्परतेने व उत्साहाने पार पाडले ते, कै. वामन शिवराम आपटे यांच्या दुर्मीळ संस्कृत-इंग्रजी कोशाच्या प्रकाशनकार्यांत केवळ हौसेमुळे सेवानिवृत्त झाल्यावरही बहुविध भाग घेऊन आपली गुणज्ञवृत्ति प्रगट केली त्यांचे श्री. महादेव पांडूरंग आपटे, बी ए., यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेंच पाहिजे. शेवटी प्तत्यक्षा-प्रत्यक्ष ज्याचे ज्यांचे या कामी साहाय्य लाभले त्या सर्वांचा नामोल्लेख अवश्य असला तरी अशक्य आहे म्हणून मी त्या सर्वांचा अभिमानानें येथें फक्त ऋणनिर्देश करीत आहे. इति लेखनसीमा.

श्रीपादशास्त्री किंजवडेकर.
अक्षय्य तृतीया, शके १८८२, पुणे ४.

GO TOP