रुद्रार्थ

॥ चमकप्रश्नः ॥

अनुवाक पहिला

आतापर्यंत (नमकप्रश्न) रुद्राध्यायांतील महत्त्वाच्या भागाचें विवेचन झाले आहे. या पुढील चमक विभागाचे विवेचन सुरू होणार आहे. चमक विभागांत अकरा अनुवाक मिळून एक मंत्र होतो. अशा अकरा चमकांचा विनियोग प्रामुख्यानें वसोर्धारा होमामध्यें करण्यांत आला आहे. एतद् विषयक पुढील कल्पसूत्र.

''अग्ना विष्णू सजोषसा इति चतुर्गहीतम् हुत्वौदुंबरीम् सृचम् व्याममात्रिम् मृदा प्रदीग्धाम् पश्चादासेचनवतीम् घृतस्य पूरयित्वा वाजश्वमे प्रसवश्वमे इति संतताम् वसोर्धाराम् जुहोत्या मंत्र समापनादिति" या प्रमाणें आहेत.

अग्नाविष्णू येथून चमकाला सुरुवात होते.


ॐ अग्ना॑विष्णू सजोष॑से॒ मा व॑र्धन्तु वां॑ गिरः॑ या द्यु॒म्नैर्वाजे॑भि॒रा ग॑तम् ॥ १ ॥


अर्थ - अग्नाविष्णू, तुम्ही परस्पर प्रीतियुक्त व्हा. तुमचे परस्परांवर प्रेम असो. आम्ही करीत असलेल्या स्तुतीनें आमची वाणी समृद्ध होवो. वाणीचे पावित्र्य आणि मांगल्य आमच्या वाणींना प्राप्त होवो. आणि आपण दोघे धनधान्यासह समृद्धीसह ऐश्वर्ययुक्त असे होऊन येथे या.


वाज॑श्च मे प्रस॒वश्च॑ मे॒ प्रय॑तिश्च मे॒ प्रसि॑तिश्च मे धी॒तिश्च॑ मे॒
क्रतु॑श्च मे॒ स्वर॑श्च मे॒ श्लोक॑श्च मे श्रा॒वश्च॑ मे॒ श्रुति॑श्च मे॒
ज्योति॑श्च मे॒ सुव॑श्च मे प्रा॒णश्च॑ मेऽपा॒नश्च॑ मे व्या॒नश्च॒ मेऽसु॑श्च मे
चि॒त्तं च॑ म॒ आधी॑तं च मे॒ वाक्च॑ मे॒ मन॑श्च मे॒ चक्षु॑श्च मे॒ श्रोत्रं॑
च मे॒ दक्ष॑श्च मे॒ बलं॑ च म॒ ओज॑श्च मे॒ सह॑श्च म॒ आयु॑श्च मे
ज॒रा च॑ म आ॒त्मा च॑ मे त॒नूश्च॑ मे॒ शर्म॑ च मे॒ वर्म॑ च मे॒ऽङ्गा॑नि
च मे॒ऽस्थानि॑ च मे॒ परूँ॑षि च मे॒ शरी॑राणि च मे ॥ १ ॥


अर्थ - या व पुढील अनुवाकांमध्यें जो चकार आलेला आहे तो समुदाय वाचक म्हणून आलेला आहे. आणि मे या शब्दाचा अन्वय दहाव्या अनुवाकामध्यें आलेल्या कल्पताम् या पदाशी आहे. मला प्राप्त होवो. असा मे कल्पताम् याचा अर्थ आहे.

वाजः म्हणजे अन्न. प्रसव म्हणजे अनुज्ञा, म्हणजेच अन्नाचे स्वामित्व. प्रयति म्हणजे शुद्धि. प्रसितिः म्हणजे अन्नासंबंधी औत्सुक्य. धीति म्हणजे अन्न धारण करण्याची क्षमता (कुवत, अन्न पचविण्याची शक्ति). क्रतु म्हणजे अन्नाला कारणीभूत असणारा यज्ञ. यज्ञात् भवति पर्जन्य: पर्जन्यादन्नसभवः असें सांगितलेंच आहे. स्वर म्हणजे मंत्रगत उपात्त-अनुपात्त इ. निषाद, धैवत, गांधार हेही संगीतशास्त्रांतील स्वर यांत येतात. स्वर शब्दाचा अर्थ स्वतः रंजयति इति स्वरः । व्यंजननिरपेक्ष स्वर अनुरंजन करतो म्हणूनच त्याला स्वर असें म्हटले आहे. श्लोक म्हणजे स्तुति. ही दोन प्रकारची. यथार्थ आणि अयथार्थ. परमात्मशक्तीची यथार्थ स्तुति करण्याची शक्ति म्हणजेच श्लोक असा अर्थ आहे. श्रावः म्हणजे ऐकविण्याचे सामर्थ्य. माझ्या मुखांतून अशी अमृतस्रावी वाणी निघू दे की जी ऐकल्यामुळे चराचर मोहित व्हावें. श्रुतिः ऐकण्याचे सामर्थ्य. विश्वावकाशांत निर्माण झालेला ध्वनिंचा अति सक्ष्मूहि स्पंद आपल्या कानांना पकडता यावा. ज्योतिः म्हणजे प्रकाश. कधींही कमी न होणारा असा ज्ञानाचा प्रकाश माझ्या हदयाकाशांत निर्माण होऊं दे. (आकाशांतील सूर्य अस्ताला जातो आणि नंतर जगांत अंधाराचें साम्राज्य सुरू होतें. परंतु हृदयाकाशांत ज्ञानसूर्य एकदां उदयाला आला म्हणजे त्याला कधींही अस्त नाही.) या दृष्टीनें हा अर्थ मनांत आणूनच भगवंतांनीही ’ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ असें सांगितलें आहे. सुवः म्हणजे स्वर्ग. स्वर्ग या शब्दाचा अर्थ दुःखानें कलुषित न झालेलें असें सुख म्हणजे स्वर्ग. प्राण अपान् हे शरीरांत असणारे वायुविशेष आहेत. त्यांच्यावर माझें प्रभुत्व असो हा आशय. असुः प्राणशक्तीने युक्त असें वायुचित्त, म्हणजे मनोजन्य ज्ञान. म्हणजेच प्रगट मनाने ग्रहण केले ज्ञानाचे संस्कार ज्या ठिकाणीं चिरंतन वज्रलेप होतात तें चित्त समर्थ असो.

आधीतं म्हणजे ज्ञान विषयक पदार्थजात. वागादि चार शब्द प्रसिद्धार्थक आहेत. दक्ष म्हणजे ज्ञानेंद्रियामध्यें असणारे कौशल आणि बल म्हणजे कर्मद्रियांचें सामर्थ्य. ओज म्हणजे सामर्थ्याचा मुख्य आधार असलेला आठवा धातू. सह म्हणजे शत्रूंचा पराभव करण्याचें सामर्थ्य. आयु; म्हणजे आयुष्य हें प्रसिद्ध आहे. जरा म्हणजे केस पांढरे होईपर्यंत आयुष्य (दीर्घायुष्य). आत्मा म्हणजे शास्त्रप्रसिद्ध परमात्मा. तनुः म्हणजे रेखीव अवयवाने सौंदर्य प्राप्त झालेलें आणि लावण्याची लव्हाळी असलेलें शरीर. शर्म म्हणजे सुख. वर्म म्हणजे शरीराचे रक्षण करणारे कवच (चिलखत). अङ्गानि म्हणजे संपूर्ण अवयव, अस्थानि म्हणजे त्या त्या स्थानांत असणार्‍या अस्थि - हाडें. परुँषि म्हणजे बोटांची पेरें, शरीराणि म्हणजे शरीरांतर्गत सर्व अवयव. हें सर्व या अनुवाकात सांगितलेलें - मे कपताम् - म्हणजे मला प्राप्त होवो.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविभागे प्रथमोऽनुवाकः ।


अनुवाक दुसरा

ज्यैष्ठ्यं॑ च म॒ आधि॑पत्यं च मे म॒न्युश्च॑ मे॒ भाम॑श्च॒ मेऽम॑श्च॒
मेऽम्भ॑श्च मे जे॒मा च॑ मे महि॒मा च॑ मे वरि॒मा च॑ मे प्रथि॒मा
च॑ मे व॒र्ष्मा च॑ मे द्राघु॒या च॑ मे वृ॒द्धं च॑ मे॒ वृद्धि॑श्च मे स॒त्यं
च॑ मे श्र॒द्धा च॑ मे॒ जग॑च्च मे॒ धनं॑ च मे॒ वश॑श्च मे॒ त्विषि॑श्च
मे क्री॒डा च॑ मे॒ मोद॑श्च मे जा॒तं च॑ मे जनि॒ष्यमा॑णं च मे सू॒क्तं
च॑ मे सुकृ॒तं च॑ मे वि॒त्तं च॑ मे॒ वेद्यं॑ च मे भू॒तं च॑ मे भवि॒ष्यच्च॑
मे सु॒गं च॑ मे सु॒पथं॑ च म ऋ॒द्धं च॑ म॒ ऋद्धि॑श्च मे कॢ॒प्तं च॑ मे॒
कॢप्ति॑श्च मे म॒तिश्च॑ मे सुम॒तिश्च॑ मे ॥ २ ॥


अर्थ- ज्यैष्ठ म्हणजे श्रेष्ठता. आधिपत्य म्हणजे स्वामित्व. मन्यु अणि भाम हे दोन शब्द क्रोधाचे वाचक आहेत. एक आंतरक्रोध व एक बाह्य. आंतर म्हणजे मानसक्रोध, बाह्य म्हणजे शारीरिक अक्षमतेमुळें निर्माण होणारा. अमः म्हणजे गणना करण्याला अशक्य. अम्भः शैत्य आणि माधुर्य यांनी युक्त असें पाणी, जेमा म्हणजे जिंकण्याचें सामर्थ्य, महिमा म्हणजे शत्रूंना जिंकून आणलेली संपत्ति. वरिमा म्हणजे पूज्यत्व. प्रथिमा म्हणजे गृह. गृहक्षेत्रादि स्थावर संपत्तीचा विस्तार. वर्ष्मा म्हणजे पुत्रपौत्र यांचीं शरीरे. आणि द्राघुया म्हणजे पुत्रपौत्रांचें दीर्घकाल सातत्य, अविच्छिन्न संतती. वृद्धम् म्हणजे अन्न आणि धन यांची वृद्धि. वृद्धि म्हणजे विद्यादि गुणांनीं होणारा उत्कर्ष. सत्य म्हणजे यथार्थ भाषण. श्रद्धा म्हणजे परलोक आहे अशी बुद्धि. जगत् म्हणजे जंगम गायी वगैरे संपत्ति. धन म्हणजे सुवर्णादि. वशः म्हणजे सर्ववशताः; त्विषिः म्हणजे शरीरकांति; क्रीडा अक्षद्युतादि (जुगार- फासे वगैरे). मोद म्हणजे त्यापासून निर्माण होणारा आनंद. जातम् - पूर्वी झालेली संतति. जनिष्यमाणम् म्हणजे पुढें होणारी संतति. सूक्तं म्हणजे वेदांतील ऋचांचा समूह. (ऋचा म्हणजे दोन मंत्र मिळून एक ऋचा आणि अशा अनेक ऋचा मिळून एक सूक्त होतें.) सुकृतं म्हणजे सूक्तांच्या जपामुळें निर्माण हाणारें अपूर्व (पुण्य). वित्त म्हणजे पूर्वीं मिळालेले द्रव्य. वेद्यम् - म्हणजे पुढें मिळविले जाणारें (भावी काळांत) द्रव्य. भूतं- म्हणजे वडिलार्जित किंवा स्वतःच्या पूर्व संचिताने मिळालेली संपत्ति. भविष्यत् म्हणजे स्वतःच्या पराक्रमावर भिस्त ठेवून मिळविली जाणारी संपत्ति. सुगं म्हणजे स्नेही सोबती, बंधुजन यांच्यासमवेत सहलीला जाणे. सुपथं - म्हणजे निष्कंटक, आणि चोरांची भीति नसलेला मार्ग. ऋद्धं म्हणजे वाढलेले ऐश्वर्य किंवा अनुष्ठित कर्माचे फल. ऋद्धि म्हणजे पुढें अनुष्ठान केल्या जाणार्‍या यज्ञाचें फल. कॢप्तं म्हणजे समर्थ, आपल्या हातीं असलेलें द्रव्य. कॢप्तिः म्हणजे स्वतःचें सामर्थ्य ( युक्ति सामर्थ्य, बुद्धि सामर्थ्य वगैरे). मतिः म्हणजे बरें वाईट ओळखण्याची बुद्धि. सुमति म्हणजे अत्यंत दुर्घट अशी कार्ये अंगावर घेऊन तडीस नेण्याचे साहस. हें सर्व - मे कल्पताम् - तुझ्या कृपेने मला प्राप्त होवो.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविभागे द्वितीयोऽनुयाकः ॥


अनुवाक तिसरा

शं च॑ मे॒ मय॑श्च मे प्रि॒यं च॑ मेऽनुका॒मश्च॑ मे॒ काम॑श्च मे
सौमन॒सश्च॑ मे भ॒द्रं च॑ मे॒ श्रेय॑श्च मे॒ वस्य॑श्च मे॒ यश॑श्च मे॒
भग॑श्च मे॒ द्रवि॑णं च मे य॒न्ता च मे ध॒र्ता च मे॒ क्षेम॑श्च मे॒
धृति॑श्च मे॒ विश्वं॑ च मे॒ मह॑श्च मे सं॒विच्च॑ मे॒ ज्ञात्रं॑ च मे॒
सूश्च॑ मे प्र॒सूश्च॑ मे॒ सीरं॑ च मे ल॒यश्च॑ म ऋ॒तं च॑ मे॒ऽमृतं॑ च
मेऽय॒क्ष्मं च॒ मेऽना॑मयच्च मे जी॒वातुश्च मे दीर्घायु॒त्वं च॑
मेऽनमि॒त्रं च॒ मेऽभ॑यं च मे सु॒गं च॑ मे॒ शय॑नं च मे सू॒षा
च॑ मे सु॒दिनं॑ च मे ॥ ३ ॥


अर्थ - शम् म्हणजे ऐहिक सुख. मयः म्हणजे पारलौकिक सुख. प्रियं म्हणजे प्रीतीला कारणीभूत होणारी वस्तु. अनुकाम म्हणजे अनुकूल स्वभावामुळे अपेक्षिला जाणारा पदार्थ. प्रिय आणि अनुकाम या दोन्ही गोष्टी ऐहिकच घ्यावयाच्या. तारतम्याने परंतु ऐहिकच. काम म्हणजे आमुष्मिक (परलोकांमध्यें मिळणारें) स्वर्गादिरूप फल. सौमनसः म्हणजे मनाला स्वास्थ्य देणारा हितचिंतक व प्रिय असा बंधुवर्ग. भद्र आणि श्रेय म्हणजे इहपरलोकांमध्यें कल्याण. वस्य म्हणजे निवासस्थान, गृह, प्रासाद वगैरे. यशः, भगः, व द्रविणम् म्हणजे कीर्ति, सौभाग्य, आणि धन. यन्ता म्हणजे नियामक आचार्य, गुरु वगैरे. धर्ता म्हणजे पोषण करणारे, पित्रादि. क्षेमः म्हणजे असलेल्या संपत्तीचे रक्षण करण्याची असलेली शक्ति. धृतिः म्हणजे संकटकालांतही धीर न सोडणे. विश्व म्हणजे सर्व लोकांचें आनूकूल्य. महः म्हणजे पूजा. संवित् म्हणजे वेद शास्त्रादि विज्ञान. ज्ञानम् म्हणजे दुसर्‍याला समजावून देण्याचें सामर्थ्य. सूः आणि प्रसूः म्हणजे पुत्र आणि भृत्य ( नौकर-सेवक) यांना प्रेरणा देण्याचें सामर्थ्य. सीरम् म्हणजे नांगर इत्यादि शेतीची अवजारें. लयः म्हणजे शेती करीत असतांना येणार्‍या अडचणीचें निराकरण करण्याचे सामर्थ्य. ऋतम् आणि अमृतम् म्हणजे यज्ञादि कर्म आणि त्याचें फल. यक्ष्मम्, अनामयत् म्हणजे क्षयासारखे जीवनव्यापी आणि दुःसाध्य व ज्वरासारखे अल्पकाल राहणारे व लौकर बरे होणारे असे रोग. जीवातुः म्हणजे जीवनाला कारणीभूत होणारे (आरोग्यकर), व्याधींचा परिहार करूं शकणारें औषध. दीर्घायुत्वम् म्हणजे अपमृत्यूरहित अशा दीर्घायुष्याचा लाभ. अनमित्रम् म्हणजे शत्रु नसणारे (अजातशत्रु). अभयम् भय नसणें. सुगम् सद्‌वर्तन ( शुभ आचार) ज्याचें अनुकरण इतरांनी करावें. शयनम् म्हणजे गाद्यागिरद्या, पलंग वगैरे झोपण्याची समृद्ध साधनें. सूषा म्हणजे स्नान, संध्या, देवपूजा इ. शुभ कर्मांनी सुरुवात होणारा रमणीय प्रातःकाल. आणि सुदिनम् म्हणजे यज्ञ, दान, अध्ययनादि दैवी कर्माचरणानें गेलेला संपूर्ण दिवस. हें सर्व तुझ्या कृपेने - मे कल्पताम् - मला प्राप्त होवो.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविमागे तृतीयोऽनुवाकः ॥


अनुवाक चवथा

उर्क्च॑ मे सू॒नृता॑ च मे॒ पय॑श्च मे॒ रस॑श्च मे घृ॒तं च॑ मे॒ मधु॑ च
मे॒ सग्धि॑श्च मे॒ सपी॑तिश्च मे कृ॒षिश्च॑ मे॒ वृष्टि॑श्च मे॒ जैत्रं॑ च म॒
औद्भि॑द्यं च मे र॒यिश्च॑ मे॒ राय॑श्च मे पु॒ष्टं च॑ मे॒ पुष्टि॑श्च मे
वि॒भु च॑ मे प्र॒भु च॑ मे ब॒हु च॑ मे॒ भूय॑श्च मे पू॒र्णं च॑ मे
पू॒र्णत॑रं च॒ मेऽक्षि॑तिश्च मे॒ कूय॑वाश्च॒ मेऽन्नं॑ च॒ मेऽक्षु॑च्च मे
व्री॒हिय॑श्च मे॒ यवा॑श्च मे॒ माषा॑श्च मे॒ तिला॑श्च मे मु॒द्‌गाश्च॑ मे
ख॒ल्वा॑श्च मे गो॒धूमा॑श्च मे म॒सुरा॑श्च मे प्रि॒यङ्ग॑वश्च॒ मेऽण॑वश्च मे
श्या॒मका॑श्च मे नी॒वारा॑श्च मे ॥ ४ ॥


अर्थ -उर्क म्हणजे सामान्य अन्न. सूनृता म्हणजे प्रियोक्ति, प्रिय वचनम्. पयः शब्दापासून पुढील शब्द म्हणजे विशेष अन्नवाचक समजावेत. ते असे. पयः म्हणजे दूध (दूध हे पूर्णान्न व लवकर पचणारे म्हणून सर्व आहारांमध्ये श्रेष्ठ ठरणारे असे आधुनिक वैज्ञानिकही मान्य करतात) रसः म्हणजे दुधांतले सार, गर्भभाग (लोणी). घृत, मधु हे शब्द प्रसिद्धार्थक आहेत. सग्धिः म्हणजे आप्तेष्टासह भोजन. तसेच सपीतिः म्हणजे सहपान. कृषि, वृष्टि हेही शब्द प्रसिद्धच आहेत. कृषि म्हणजे शेती व वृष्टि म्हणजे पाऊस. धान्य निर्मितीसाठी या दोहोंची जरूरी असते. जैत्र म्हणजे जयशील, जय प्राप्त करून देणारे, म्हणजे धनधान्याच्या रूपानें सुक्षेत्र अशी भूमि. औद्भिद्यम् म्हणजे वृक्षलता इत्यादिंची उत्पत्ति. शेती आणि पाऊस यांची धान्य निर्मितीला जशी आवश्यकता असते तशाच घनदाट अरण्यांचीही असते. घनदाट अरण्यें हें राष्ट्राचें भूषण मानले जात होते. प्राणिसृष्टीचे जीवन हे वनस्पति सृष्टीवरच मुख्यतः अवलंबून असल्यामुळे अरण्यांना मानवी जीवनांत अपार महत्त्व प्राप्त झालें होतें. आज सुरू झालेली जंगलें वाढवा ही मोहीम; शुभ सूचकच आहे. प्राचीन काळीं जंगलाचे महत्त्व लोकांना किती वाटत असें याचा सूचक म्हणून हा शब्द लक्षांत ठेवण्यासारखा आहे. रयिः म्हणजे सुवर्ण. हें निर्माण होण्याची खाण; खाणींतून निर्माण होणारी सर्व तर्‍हेची खनिज संपत्ति. तसेच रायः म्हणजे मणिमौक्तिकें, म्हणजेच मोती ही पाण्यांतून काढली जाणारी संपत्ति. जलसंपत्ति आणि स्थलसंपत्ति म्हणजेच खनिज संपत्ति, ही त्या काळांत लोकांना महत्त्वाची वाटत असे आणि ती ते प्राप्त करून घेत असत याबद्दलचा हा' संदर्भ इतिहासतज्ञांना विचार करण्यासारखा आहे. पुष्टं आणि पुष्टिः म्हणजे पूर्वी सांगितली आकरज म्हणजे खनिज संपत्ति आणि जलसंपत्ति (मणिमौक्तीकें) आणि शरीरपुष्टता. विभु पासून अक्षिति पर्यंत उत्तरोत्तर वाढत्या प्रमाणांत धान्यांची वृद्धि तारतम्यानें समजावी. ही वृद्धि सात प्रकारांनी सांगितली आहे. केवळ प्रवृद्ध प्रकर्षाने असलेली धान्येच नव्हेत तर क्षुद्र धान्यें सुद्धां. (अल्पधान्यें) पुढें सांगतात. कूयवाः कुत्सित यवधान्य. नासलेल्या धान्यांचेही उल्लेख करण्याचें कारण, अशी धान्यें खाण्याला निरुपयोगी असली तरी त्यांचा उपयोग दुसर्‍या प्रकाराने होऊं शकतो. म्हणून ती सर्वथैव निरुपयोगी न समजतां अशा धान्यांचा उपयोग पुनर्धान्यउत्पत्तिकडे करावा (खतांच्या रूपानें) असा ऋषिंचा आशय असावा. अन्नम् हे प्रसिद्ध आहे. अक्षुत म्हणजे अन्नानें होणारा क्षुधेचा परिहार (भूक थांबणे). व्रीहिः (भात), यव (जव-सातू), माष (उडीद), तिल (तीळ), व मुद्‌ग (मूग) ही धान्ये प्रसिद्धच आहेत. खल्व म्हणजे मुगापेक्षां किंचित मोठ्या आकाराचे धान्य. अथर्ववदोमध्ये खल्व म्हणजे चणक (चणे) हरभरे, असे सांगितले आहे. गोधूम म्हणजे गहूं. मसूरा म्हणजे मसूर. पियङ्गवः - धान्यविशेष (एक प्रकारचे बारीक भात असावें). अणवः म्हणजे बारीक तांदळाचे भात. श्यामाक म्हणजे गांवांत निर्माण होणारा धान्यविशेष. नीवार म्हणजे अरण्यांत निर्माण होणारा धान्यविशेष. ही सर्व धनधान्यें माझ्या घरी विपुल प्रमाणांत निरंतर तुझ्या कृपेनें - मे कल्पताम् - मला प्राप्त होवोत.

टीप- या अनुवाकांत आलेल्या कडधान्यांचा विचार केला असतां त्या काळांत ही कडधान्ये सर्रास उपयोगांत आणही जात असत; त्यामुळें, आरोग्य चांगलें रहात होतें. कडधान्यात असलेल्या जीवनसत्वाची (व्हिटॅमिन्सची) चांगलीच ओळख त्या वेळी लोकांना होती असे दिसते. कारण, हीं सर्व धान्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत मानवी शरीरधारणेला अत्यावश्यक अशीच आहेत.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविभागे चतुर्थोऽनुवाकः ।


अनुवाक पांचवा

अश्मा॑ च मे॒ मृत्ति॑का च मे गि॒रय॑श्च मे॒ पर्व॑ताश्च मे॒
सिक॑ताश्च मे॒ वन॒स्पत॑यश्च मे॒ हिर॑ण्यं च॒ मेऽय॑श्च मे॒
सीसं॑ च मे॒ त्रपु॑श्च मे श्या॒मं च॑ मे लो॒हं च॑ मे॒ऽग्निश्च॑ म॒
आप॑श्च मे वी॒रुध॑श्च म॒ ओष॑धयश्च मे कृष्टप॒च्यं च॑
मेऽकृष्टप॒च्यं च॑ मे ग्रा॒म्याश्च॑ मे प॒शव॑ आर॒ण्याश्च॑ य॒ज्ञेन॑
कल्पन्तां वि॒त्तं च मे॒ वित्ति॑श्च मे भू॒तं च॑ मे॒ भूति॑श्च मे
वसु॑ च मे वस॒तिश्च॑ मे॒ कर्म॑ च मे॒ शक्ति॑श्च॒ मेऽर्थ॑श्च म॒
एम॑श्च म॒ इति॑श्च मे॒ गति॑श्च मे ॥ ५ ॥


अर्थ - अश्मादि पदार्थ प्रसिद्ध आहेत. या सर्वांचा उपयोग मानवी जीवनांत असून त्यांचा विश्वकल्याणाकडेही उपयोग करण्यांत येतो, हाच मुख्य आशय हे पदार्थ सांगण्यामागें आहे. शाम म्हणजे काळे लोखंड (खाणींतून काढलेलें अशुद्ध लोहम् म्हणजे कांस्य, कासें-तांबे वगैरे खनिज धातु घ्यावयाचे). अग्न्यादि शब्द हे प्रसिद्ध आहेत. ग्राम्य पशु आणि आरण्यक पशु हे यज्ञाच्या निमित्तानें समर्थ होवोत. वित्तम् आणि वित्तिः म्हणजे पूर्वी प्रास झालेलें व पुढें प्राप्त होणार द्रव्य-ऐश्वर्य. भूतं म्हणजे ऐश्वर्यशाली अशी पुत्रादि संतति. भूतिः म्हणजे स्वतःचे ऐश्वर्य, वसू म्हणजे निवाससाधन गायी वगैरे. (ज्यांच्या आधारावर जीवंत राहता येईल असें गायीचे दूध हा आशय. दूध हें पूर्णान्न आहे.) वसतिः म्हणजे घर वगैरे. कर्म म्हणजे अग्निहोत्रादि. शक्तिः म्हणजे वेदप्रतिपादित कर्म करण्याचें सामर्थ्य. अर्थः म्हणजे प्रयोजनविशेष (संकल्प सिद्धि). एमः म्हणजे एतव्यम् प्राप्तव्यम्, भावी काळांत प्राप्त होणारें सुख. इति हा शब्द गतिवाचक आहे. अयनम् - इष्टप्राप्तीचा उपाय आणि गति म्हणजे इष्टप्राप्ति होणें.

सर्व स्थावर जंगम संपत्तीचा उपयोग मानवी जीवनांत कुशलतेने करून घेण्याचें बुद्धिवैभव तत्कालीन लोकांना होते असें या अनुवाकावरून म्हणण्यास हरकत नसावी.
इति श्रीरुदार्थदीपिकायां चमकविमागे पंचमोऽनुवाकः ।

अनुवाक सहावा

अ॒ग्निश्च॑ म॒ इन्द्र॑श्च मे॒ सोम॑श्च म॒ इन्द्र॑श्च मे सवि॒ता च॑ म॒
इन्द्र॑श्च मे॒ बृह॒स्पति॑श्च म॒ इन्द्र॑श्च मे मि॒त्रश्च॑ म॒ इन्द्र॑श्च मे॒
वरु॑णश्च म॒ इन्द्र॑श्च मे॒ त्वष्टा॑ च म॒ इन्द्र॑श्च मे धा॒ता च॑
म॒ इन्द्र॑श्च मे॒ विष्णु॑श्च म॒ इन्द्र॑श्च मे॒ऽश्विनौ॑ च म॒ इन्द्र॑श्च मे
म॒रुत॑श्च म॒ इन्द्र॑श्च मे॒ विश्वे॑ च मे दे॒वा इन्द्र॑श्च मे पृथि॒वी च॑ म॒
इन्द्र॑श्च मे॒ऽन्तरि॑क्षं च म॒ इन्द्र॑श्च मे॒ द्यौश्च॑ म॒ इन्द्र॑श्च मे॒ दिश॑श्च म॒
इन्द्र॑श्च मे मू॒र्धा च॑ म॒ इन्द्र॑श्च मे प्र॒जाप॑तिश्च म॒ इन्द्र॑श्च मे ॥ ६ ॥


अर्थ - या अनुवाकांत अग्निप्रमुख ज्या देवता सांगितल्या आहेत त्या प्रसिद्धच आहेत. भारतीय ऋषींच्या दैवी प्रज्ञेंतून विश्वकल्याणार्थ आवश्यक असणार्‍या या सर्व देवता म्हणजे भौतिक शक्तीच होत. यापैकी एकही शक्ति कमी अधिक जास्त झाली तर विश्व ब्रह्मांडाचें संतुलन राहणार नाही. इतक्या या सर्व शक्ति अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सर्व शक्ति तपश्चर्येच्या योगानें स्वाधीन करून घेतल्या तर भौतिक जगावर पूर्ण ताबा येणें अशक्य नाहीं.

या सर्व शक्तींसह इंद्राचा उल्लेख ह्या अनुवाकात केला आहे. याचें कारण इंद्र हा त्रिविध ऐश्वर्यांचे प्रतीक म्हणूनच सर्वश्रेष्ठ अशी देवता मानण्यांत आला आहे. अशा या सवर्श्रेष्ठ इंद्रदेवतेसह या सर्व शक्ति तसेच दिक् या शब्दानें या अनुवाकात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशा, मूर्धा शब्दाने सांगितलेली उर्ध्व दिशा (सर्व दिशांमध्यें ती मुख्य असल्यामुळें तिचा मुद्दाम स्वतंत्र शब्दानें उल्लेख केला गेला.) तुझ्या कृपेनें मला अनुकूल होवोत.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविभागे षष्ठोऽनुवाकः ।


अनुवाक सातवा

अँ॒शुश्च॑ मे र॒श्मिश्च॒ मेऽदा॑भ्यश्च॒ मेऽधि॑पतिश्च म उपाँ॒शुश्च॑
मेऽन्तर्या॒मश्च॑ म ऐन्द्रवाय॒वश्च॑ मे मैत्रावरु॒णश्च॑ म आश्वि॒नश्च॑ मे
प्रतिप्र॒स्थान॑श्च मे शु॒क्रश्च॑ मे म॒न्थी च॑ म आग्रय॒णश्च॑ मे
वैश्वदे॒वश्च॑ मे ध्रु॒वश्च॑ मे वैश्वान॒रश्च॑ म ऋतुग्र॒हाश्च॑ मेऽतिग्रा॒ह्या॑श्च म
ऐन्द्रा॒ग्नश्च॑ मे वैश्वदे॒वाश्च॑ मे मरुत्व॒तीया॑श्च मे माहे॒न्द्रश्च॑ म
आदि॒त्यश्च॑ मे सावि॒त्रश्च॑ मे सारस्व॒तश्च॑ मे पौ॒ष्णश्च॑ मे
पात्नीव॒तश्च॑ मे हारियोज॒नश्च॑ मे ॥ ७ ॥


अर्थ - या अनुवाकांपासून पुढील सर्व अनुवाकांमध्यें शश्रौत यज्ञप्रक्रियेंतील म्हणजे वेदांत सांगितलेल्या यज्ञाच्या परिभाषेंत यज्ञाची कांहीं अंगें - अंगभूत पदार्थ सांगितले आहेत. हे पदार्थवाचक शब्दही पारिभाषिक स्वरूपाचे असल्यामुळें सामान्य वाचकांना कळण्यास थोडे कठीण आहेत. तथापि श्रोत यज्ञाची परिभाषा अगोदर समजून घेतली तर या व यापुढील अनुवाकांत आलेल्या यज्ञिय पदार्थवाचक पारिभाषिक शब्दांचा अर्थ उत्तम तर्‍हेनें लक्षांत येईल.

सोमप्रकरणांमध्यें अश्वादि सोमग्रहविशेष प्रसिद्ध आहेत. सोमग्रह या शब्दाचा अर्थ सोमरस ठेवण्याचे लाकडी आकारविशेषाने युक्त असे पात्र. अशा पात्रांना ग्रह-गृण्हाति सोमरसम् इति ग्रहः- असा यज्ञ प्रकरणांमध्यें पारिभाषिक शब्द आहे. हे ग्रह ज्या ज्या देवतांना उद्देशून सांगितलेले आहेत त्या त्या देवतांच्या नांवानेंच हे प्रसिद्ध आहेत. उदा० आदित्य ग्रह म्हणजे आदित्य देवता आहे ज्याची असा ग्रह, त्याला आदित्य ग्रह असे म्हणतात. ऐन्द्रवायवग्रह याचा अर्थ इंद्र आणि वायू या दोन देवतांना उद्देशून ज्या आकारविशिष्ट पात्रांतून (लाकडाच्या) सोमरस अग्निमध्यें प्रक्षिप्त केला जातो त्याला ऐंद्रवायवग्रह म्हणतात. या विवेचनावरून वाचकांच्या लक्षात ग्रह म्हणजे काय हे आलेंच असेल. हीच उपपत्ति ग्रह शब्द जिथे जिथे येईल तिथें तिथे समजावी. सोमप्रकरणांमध्यें रश्मिग्रह नाहीं. म्हणून अदाभ्य नांवाचा जो ग्रह तोच अंशु म्हणजे किरणं पृथः कृत्य - बाजूला करून - रश्मि शब्दाने येथें सांगितला आहे. रश्मिच्या योगानें तो ग्रह घेतला जातो म्हणून त्याला रश्मिग्रह म्हणतात. या रश्मिग्रहाचा ग्रहणमंत्र पुढीलप्रमाणे आहे.

''शुक्रन्ते शुक्रेण गृह्णाम्यन्होरूपेण सूर्यस्य रश्मिभिः''

अधिपति शब्दाने दधिग्रह इथे घ्यावयाचा. तो श्रेष्ठ असल्यामुळे त्याला अधिपति असें म्हणतात. दधिग्रह हा सर्व ग्रहांत श्रेष्ठ असल्याबद्दल ''ज्येष्ठो वा एषयद्ग्रहाणाम्'' असें श्रुतिवाक्य याविषयीं प्रमाण आहे प्रतिप्रस्थान या शब्दाने द्विदैवत्य ग्रहांबरोबर त्यांचा प्रतिनिधिही विवक्षित आहे. ध्रुवाख्य ग्रहाच्या विशिष्ट दशेमध्यें वैश्वानरसूक्ताचा पाठ असल्यामुळे वैश्वानर शब्दानेंच या ग्रहाचा उल्लेख करण्यांत आला आहे. पहिला वैश्वदेव ग्रह हा प्रातःसवनांतील आहे, तर दुसरा वैश्वदेव ग्रह हा तृतीय सवनांतील आहे. 'सारस्वत ग्रह अभिषेचनीय नांवाच्या विकृतीमध्ये सांगितला आहे. ''सारस्वतग्रहं गृण्हन्ति'' असें या ग्रहाचे विधायक श्रुतिवाक्य तेथें आहे. त्याचप्रमाणे पोष्ण नांवाचा ग्रहही विकृतीमध्येंच सांगितलेला आहे. हे सर्व ग्रह ज्या यज्ञामध्ये सांगितलेले आहेत ते सर्व श्रौतयज्ञ तुझ्या कृपेनें - मे कल्पेताम् - मला प्राप्त होवोत, माझ्याकडून होवोत, करण्याचें सामर्थ्य येवो.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविभागे सप्तमोऽनुवाकः ॥


अनुवाक आठवा

इ॒ध्मश्च॑ मे ब॒र्हिश्च॑ मे॒ वेदि॑श्च मे॒ धिष्णि॑याश्च मे॒ स्रुच॑श्च मे
चम॒साश्च॑ मे॒ ग्रावा॑णश्च मे॒ स्वर॑वश्च म उपर॒वाश्च॑ मेऽधि॒षव॑णे च मे
द्रोणकल॒शश्च॑ मे वाय॒व्या॑नि च मे पूत॒भृच्च॑ म आधव॒नीय॑श्च म॒
आग्नी॑ध्रं च मे हवि॒र्धानं॑ च मे गृ॒हाश्च॑ मे॒ सद॑श्च मे पुरो॒डाशा॑श्च मे
पच॒ताश्च॑ मेऽवभृ॒थश्च॑ मे स्वगाका॒रश्च॑ मे ॥ ८ ॥


अर्थ - या अनुवाकांत सर्व यज्ञाची अंगभूत द्रव्यें-यज्ञसाधने सांगितली आहेत. ही सर्व यज्ञप्रकरणामध्यें प्रसिद्ध आहेत. वाचकांनी यज्ञपरिभाषा समजून घेऊन मगच या शब्दांचा अर्थ लक्ष्यांत घ्यावा. येथें त्यांचें विवेचन स्थल कालाच्या मर्यादा लक्षांत घेतां अधिक विस्तुत केलें नाहीं. इध्मा, बर्हि, वेदि वगैरे सर्व शब्द हे पारिभाषिक आहेत. यांचा अर्थही सामान्यतः याज्ञिक सांप्रदायामध्यें प्रसिद्ध आहे. गृहा या शब्दाचा अर्थ पत्नी, शाला वगैरे. पचतः या शब्दाचा अर्थ शामित्र वगैरे. शामित्रशाला म्हणून स्वतंत्र असते. स्वगाकारः म्हणजे शंयुवाक. याला शंयुवाक असें म्हणण्याचें कारण त्या त्या देवतांना हविर्द्रव्य याने पोचविले जातें म्हणून. अवभृत म्हणजे यज्ञ समाप्तीनंतर जें स्नान करतात त्याला अवभृतस्नान असें म्हणतात. पूर्वोत्तरांग सहित कर्माचे विधिपूर्वक अनुष्ठान केल्याशिवाय अशा अवभृतस्नानाचा अधिकार प्राप्त होत नाहीं. म्हणून हें अवभृतस्नान तुझ्या कृपेनें - मे कल्पेाताम् - म्हणजे मला मिळो.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविभागे अष्टमोऽनुवाकः ।


अनुवाक नववा

अ॒ग्निश्च॑ मे घ॒र्मश्च॑ मे॒ऽर्कश्च॑ मे॒ सूर्य॑श्च मे प्रा॒णश्च॑ मेऽश्वमे॒धश्च॑ मे
पृथि॒वी च॒ मेऽदि॑तिश्च मे॒ दिति॑श्च मे॒ द्यौश्च॑ मे॒ शक्व॑रीर॒ङ्गुल॑यो॒
दिश॑श्च मे य॒ज्ञेन॑ कल्पन्ता॒मृक्च॑ मे॒ साम॑ च मे॒ स्तोम॑श्च मे॒
यजु॑श्च मे दी॒क्षा च॑ मे॒ तप॑श्च म ऋ॒तुश्च॑ मे व्र॒तं च॑
मेऽहोरा॒त्रयो॑र्वृ॒ष्ट्या बृ॑हद्रथन्त॒रे च॑ मे य॒ज्ञेन॑ कल्पेताम् ॥ ९ ॥


अर्थ - या अनुवाकांतही येणारे शब्द यज्ञ प्रकरणांतील पारिभाषिक स्वरूपाचे आहेत.

अग्निः, चयनसंस्कार ज्याच्यावर केलेला आहे असा वन्हि म्हणजेच या अनुवाकांत सुरुवातीला सांगितलेला अग्नि होय. घर्म म्हणजे प्रवर्ग्य हा पारिभाषिक शब्द आहे. याचा विशेष खुलासा यज्ञ प्रकरणांमध्ये वाचकांनी पहावा. अर्क या शब्दाचा अर्थ, 'इंद्रायार्कवते पुरोडाशम्' या वाक्यानें सांगितलेला जो याग तो अर्कयाग. सूर्य म्हणजे, सौर्यंचरु. या वाक्याने विहित तो सूर्ययाग; ''प्राणायस्वाहा'' या वाक्यानें सांगितलेला जो होम तो प्राण. अश्वमेध प्रसिद्ध आहे. पृथ्वीप्रभृति ही विशेषदेवतांची नांवें आहेत. शक्वरी म्हणजे अंगुली. हाताची बोटें ही जशी माणसाची म्हणजेच सृष्टींतल्या व्यक्तीची अंगे-अवयव असतात, त्याचप्रमाणें विराट पुरुषाच्या ज्या अंगुली त्यांना शक्वरी असें म्हणतात. समष्टींतल्या विराटपुरुषाचे शरीरावयव हा आशय. दिशः या शब्दानें दाही दिशा घ्यावयाच्या. या सर्व दिशा माझ्या यज्ञानें, मी करीत असलेल्या विशेषयज्ञानें, त्या त्या दिशा स्वकार्यामध्यें समर्थ होवोत. ऋगादि हें मंत्रवाचक शब्द आहेत. स्तोम म्हणजे ज्या मंत्रावर सामाची आवृत्ति करून जी स्तुति केली जाते त्याला स्तोम असें म्हणतात. ऋग्वेदांतील मंत्रावर साम गायलें जातें. साम म्हणजे विशिष्ट प्रकारच्या आरोहावराहोनी लयबद्ध, तालबद्ध असें जें गायन केले जातें त्याला म्हणतात. सामवेद हा संगीत शास्त्रांतील मूल प्रमेयांचा आद्यग्रंथ म्हणून जागतिक संगीत वाङ्‌मयाच्या इतिहासांत मान्यता पावला आहे. दीक्षा म्हणजे यज्ञ सुरू करतांना केला जाणारा यजमानावर एक संस्कारविशेष. तपः म्हणजे पापक्षयासाठीं केली जाणारी अनशन, कृच्छ्र, चांद्रायणादि व्रतें. ऋतु म्हणजे यज्ञाच्या अंगभूत असा काल. व्रत म्हणजे विशेष नियम स्वेच्छेने पालन करणे. दिवस आणि रात्र यांच्याशी संबंधित अशी जी वृष्टी म्हणजे पाऊस त्यानें माझें धान्य समृद्ध होवो असा आशय. बृहत् आणि रथंतर ही। दोन सामांची नांवें आहेत. बृहत्‌साम आणि रथंतरसाम (साम शब्दाचा अर्थ वर दिलाच आहे) अशीं दोन सामे. हे सर्व माझ्या यज्ञानें आणि तुझ्या कृपेनें स्वकार्यक्षम होवोत.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविमागे नवमोऽनुवाकः ।

अनुवाक दहावा

गर्भा॑श्च मे व॒त्साश्च॑ मे॒ त्र्यवि॑श्च मे त्र्य॒वी च॑ मे दित्य॒वाट् च॑ मे
दित्यौ॒ही च॑ मे॒ पञ्चा॑विश्च मे पञ्चा॒वी च॑ मे त्रिव॒त्सश्च॑ मे
त्रिव॒त्सा च॑ मे तुर्य॒वाट् च॑ मे तुर्यौ॒ही च॑ मे पष्ठ॒वाट् च॑ मे
पष्ठौ॒ही च॑ म उ॒क्षा च॑ मे व॒शा च॑ म ऋष॒भश्च॑ मे वे॒हच्च॑ मेऽन॒ड्वान्
च॑ मे धे॒नुश्च॑ म॒ आयु॑र्य॒ज्ञेन॑ कल्पतां प्रा॒णो य॒ज्ञेन॑ कल्पतामपा॒नो
य॒ज्ञेन॑ कल्पतां व्या॒नो य॒ज्ञेन॑ कल्पतां॒ चक्षु॑र्य॒ज्ञेन॑ कल्पताँ॒ श्रोत्रं॑
य॒ज्ञेन॑ कल्पतां॒ मनो॑ य॒ज्ञेन॑ कल्पतां॒ वाग्य॒ज्ञेन॑ कल्पतामा॒त्मा
य॒ज्ञेन॑ कल्पतां य॒ज्ञो य॒ज्ञेन॑ कल्पताम् ॥ १० ॥


अर्थ - गर्भ हा शब्द प्रसिद्ध आहे. वत्स म्हणजे दीड वर्षाली झाले आहे असा बैल. यालाच त्र्यविः असें म्हणतात. एवढाच काल झालेल्या कालवडीला त्रियवी असें म्हणतात. ऋषभ म्हणजे दोन वर्षांचा बैल. त्याला दित्यवाट् असें म्हणतात. दोन वर्षांच्या गाईला दित्यौही. असे म्हणतात. पञ्चाविः म्हणजे अडीच वर्षांचा बैल आणि अडीच वर्षांची गाय ही पंचावी. तीन वर्षांचा जो बैल तो त्रिवत्स आणि तीन वर्षांची जी गाय ती त्रिवसा. तसेंच साडेतीन वर्षांचा जो बैल तो तुर्यवाट् आणि साडेतीन वर्षांची जी गाय ती तुर्यौही. चार पूर्ण वर्षांचा जो बैल तो षष्ठवाट् आणि तितक्याच वर्षांची जी गाय ती षष्ठौही. चांगल्या तर्‍हेची पशुसंपत्ति निर्माण व्हावी म्हणून खास जे वळू पाळलेले असतात त्यांना उक्षा असें म्हणतात. यावरून पूर्वी पशुसंपत्तिविषयीं किती आस्था होती याची कल्पना येते. संतति न होणारी म्हणजे वंध्या अशी जी गाय तिला वशा असें म्हणतात. उक्षा म्हणजे म्हातारा बैल आणि वेहत् म्हणजे गर्भाचा घात करणारी गाय. हा गर्भघात जाणूनबुजून नव्हे, तर आगंतुक कारणांनी होणारा गर्भस्राव. गाडी ओढणारा जो बैल त्याला अनड्‌वान् असें म्हणतात. नवप्रसूता म्हणजे नुकतीच व्यालेली गाय. तिला धेनू असें म्हणतात. आयुरादि शब्द हे प्रसिद्धार्थक आहेत. आत्मा म्हणजे शरीर असा या ठिकाणी अर्थ घ्यावयाचा. आप्नोति पांचभौतिकम् शरीरम् इति आत्मा. वर सांगितलेले आयुरादि सर्व पदार्थ मी करीत असलेल्या यज्ञाने स्वकार्यक्षम होवोत आणि पुढें केला जाणारा अश्वमेधप्रभृति यज्ञ तोही सध्यां करीत असलेल्या यज्ञानें स्वकार्यक्षम होवो. म्हणजे या यज्ञाने तो यज्ञ (भावी काळांत करावयाचा यज्ञ) करण्याचें सामर्थ्य तुझ्या कृपेनें मला मिळो.
इति श्रीरुद्रार्थदीपिकायां चमकविभागे दशमोऽनुवाकः ।

अनुवाक अकरावा

एका॑ च मे ति॒स्रश्च॑ मे॒ पञ्च॑ च मे स॒प्त च॑ मे॒ नव॑ च म॒
एका॑दश च मे॒ त्रयो॑दश च मे॒ पञ्च॑दश च मे स॒प्तद॑श च मे॒
नव॑दश च म॒ एक॑विँशतिश्च मे॒ त्रयो॑विँशतिश्च मे॒ पञ्च॑विँशतिश्च
मे स॒प्तविँ॑शतिश्च मे॒ नव॑विँशतिश्च म॒ एक॑त्रिँशच्च मे॒
त्रय॑स्त्रिँशच्च मे॒ चत॑स्रश्च मे॒ऽष्टौ च॑ मे॒ द्वाद॑श च मे॒ षोड॑श
च मे विँश॒तिश्च॑ मे॒ चतु॑र्विँशतिश्च मे॒ऽष्टाविँ॑शतिश्च मे॒ द्वात्रिँ॑शच्च
मे॒ षट्‌त्रिँ॑शच्च मे चत्वरिँ॒शच्च॑ मे॒ चतु॑श्चत्वारिँशच्च
मे॒ऽष्टाच॑त्वारिँशच्च मे॒ वाज॑श्च प्रस॒वश्चा॑पि॒जश्च॒ क्रतु॑श्च॒ सुव॑श्च
मू॒र्धा च॒ व्यश्नि॑यश्चान्त्याय॒नश्चान्त्य॑श्च भौव॒नश्च॒ भुव॑न॒श्चाधि॑पतिश्च ॥ ११ ॥


अर्थ - एक प्रभृति हे शब्द सर्व संख्यापर असे आहेत. त्यांत कांहीं विषम संख्यावाचक तर कांही सम संख्यावाचक असे शब्द आहेत. या उभयविध संख्यावाचक शब्दांनीं ती ती संख्या मला प्राप्त होवो असा जरी वाच्यार्थ असला तरी याच्या पाठीमागे सूक्ष्मार्थ आहे. तो अर्थ या संख्यावाचक शब्दांनीं घ्यावयाचा आहे. विश्वब्रह्मांडाचा पसारा सुरू होण्यापूर्वी तो ज्या परंपरेने आणि क्रमाने सुरू झाला तो क्रमही येथें विवक्षित आहे. एक या शब्दावरून अविकृत, निर्गुण, निराकार, असें ब्रह्म (जगाचें उपादानकारण) घेतलें तर त्याच्यापासून पुढें तिस्रः म्हणजे सत्व, रज, तम असे तीन गुण हे त्या मूळ एक ब्रह्मापासून निर्माण झाले आणि पुढें पंच या शब्दाने पंचमहाभूतें आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी अशी निर्माण झाली. पंचमहाभूतापासूनच सर्वे स्थूल सृष्टीचा पसारा आपणांस दिसतो. याच्या बुडाशीं ज्या तीन शक्ति, त्या अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळें, त्या तुझ्या कृपेनें मला अनुकूल होवोत हा मंत्रदृष्टया ऋषीचा मुळांतील आशय. पंचमहाभूतांपासून पुढें ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धि अशीं सात निर्माण झाली. पुढें पंचीकृत महाभूतांपासून नवद्वारांनीं युक्त असा मानवी देह निर्माण झाला. या देहामध्ये पांच मुख्य व पांच अंगभूत मिळून दहा प्राण. अपान, समान, व्यान, आणि उदान हें पांच मुख्य. देवदत्त, धनंजय, नाग, कुर्म आणि कृकल हे पांच अंगभूत असे मिळून दहा व या दहा प्राणांना आधारभूत असणारी एक सुषुम्ना नाडी मिळून एकादश. एकादश व इतर संख्यावाचक शब्दांचा खरा तात्त्विक अर्थ काय आहे याची ओझरती कल्पना यावी एवढ्याचसाठी हें दिग्दर्शन येथें केलें आहे. विशेष जिज्ञासा असणार्‍या जिज्ञासूंनीं मुळांतूनच हा विषय नीट समजावून घ्यावा.

वाज म्हणजे अन्न. प्रसव म्हणजे त्या अन्नाची उत्पत्ति; अपिज म्हणजे त्याच अन्नाची पुनः पुन्हा उत्पत्ति. क्रतुः या शब्दाचे दोन अर्थ. एक भोगविषयक संकल्प आणि दुसरा याग. सुवः म्हणजे यज्ञाला कारणीभूत होणारा आदित्य म्हणजे सूर्य. यज्ञ या शब्दाचा अर्थ त्याग असाही आहे. त्यागावर सर्व विश्वाची धारणा अवलंबून आहे. म्हणूनच ''त्यागेनैके अमृतत्वमानशुः'' असें श्रुतीने सांगितलें आहे. ही त्याग करण्याची क्षमता सूर्यावरच अवलंबून असते. म्हणून चराचर सृष्टीच्या जीवनयज्ञाला कारणीभूत असणारा सूर्य असा अर्थ येथें विवक्षित आहे. मूर्धा म्हणजे स्वर्ग. व्यश्नियः म्हणजे विशेषेण अश्नोति व्याप्नोति इति व्यश्न म्हणजे आकाश; या आकाशांत किंवा आकाशापासून उत्पन्न होणारा तो व्यश्नीय. आन्त्यायनः म्हणजे- अंते जातः - शेवटीं झालेला. सर्व सृष्टीचा महाप्रलय ज्यावेळी होतो त्यावेळीं पुन्हां सृष्टीच्या उत्पत्तिसाठीं जो प्रथम प्रगट होतो तो अन्त्यः म्हणजे सर्वांचा प्रलय झाला तरी सर्व सृष्टीच्या अंती म्हणजे शेवटीं राहणारा तो अंत्य. चतुर्दश भुवनामध्ये जो होतो (म्हणजे ज्याचें अस्तित्व असतें) तो भौवन् परमात्मा हा आशय. भुवनः म्हणजे जगत्-स्वरूपामध्ये असणारा. अधिपतिः म्हणजे सर्व पदार्थांमध्यें राहून त्यांचें रक्षण करणारा. अधिष्ठाय रक्षयति इति अधिपतिः । अहोबल भाष्यामध्यें याचा राजा असाही अर्थ केला आहे. तोही फारसा चूक नाहीं. कारण 'ना विष्णुः पृथीवीपतिः' असें श्रुतिवचनही आहे. दुसराही एक वाज्‌प्रभूति शब्दांचा मासवाचक असा अर्थ होऊं शकतो.

चैत्रादि बारा महिन्यांचीच ही वाजप्रभूति नांवें गुणविशेषांवरून असावीत असेही काहींचे मत आहे. तें चिन्तनीय वाटतें. ज्यावेळी मासपर असा अर्थ घेतला जाईल त्यावेळीं हा सर्व द्वादशमासात्मक संवत्सररूपी काल मला अनुकूल राहो असा अर्थ करावा. या अनुवाकांत व या मागच्या सर्व अनुवाकांत आलेले चकार हे समुच्चयार्थक किंवा अनुक्त म्हणजे न सांगितलेले असे काल, देवता, इत्यादींचे वाचक समजावेत. अशा तर्‍हेनें हे सर्वव्यापी रुद्रा, तुझ्या अपार करुणेने या एकादश चमकानुवाकांत सांगितलेले पदार्थ - मे कल्पताम् - मला प्राप्त होवोत.

इति श्री किंजवडेकरान्वयसम्भूत श्रीमत्साग्निचित्सार्वपृष्ठाप्तोर्यामयाजी श्रीमद्दत्तात्रेय-तनुजनुषा-मीमांसातीर्थ पदवीविभूषितेन पं. श्रीपादशास्त्रिणा विरचितायां महाराष्ट्रभाषावष्टब्धायां रुद्रार्थदीपिकायामेकादशोऽनुवाकः । समाप्ता चेयं रुद्रार्थदीपिका
GO TOP