भगवान व्यासकृत् 'महाभारत' या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मतत्त्वासंबंधी विवेचन आढळते. महाभारताच्या उद्योगपर्वांतील अध्याय ४१ ते ४६ इथेही ब्रह्मतत्त्वाविषयी चर्चा आढळते. या भागाला 'सनत्सुजातीय' पर्व असे नांव दिले आहे. या सहा अध्यायांत विदुराच्या विनंतीवरून सनत्कुमारांनी राजा धृतराष्ट्राला ब्रह्मविद्येचे गुह्यज्ञान सांगितले आहे -




सनत्सुजातीय

अध्याय १ ला

धृतराष्ट्र उवाच
अनुक्तं यदि ते किंचित् वाचा विदुर विद्यते ।
तन्मे शुश्रूषवे ब्रूहि विचित्राणि हि भाषसे ॥ १ ॥
विदुर उवाच
धृतराष्ट्र कुमारो वै यः पुराणः सनातनः ।
सनत्सुजातः प्रोवाच मृत्युर्नास्तीति भारत ॥ २ ॥
स ते गुह्यान् प्रकाशांश्च सर्वान् हृदयसंश्रयान् ।
प्रवक्ष्यति महाराज सर्वबुद्धिमतां वरः ॥ ३ ॥
धृतराष्ट्र उवाच
किं त्वं न वेद तद्‍ भूयो यन्मे ब्रूयात् सनातनः ।
त्वमेव विदुर ब्रूहि प्रज्ञाशेषोऽस्ति चेत् तव ॥ ४ ॥
विदुर उवाच
शूद्रयोनावहं जातो नातोऽन्यद् वक्तुमुत्सहे ।
कुमारस्य तु या बुद्धिर्वेद तां शाश्वतीमहम् ॥ ५ ॥
ब्राह्मीं हि योनिमापन्नः सुगुह्यमपि यो वदेत् ।
न तेन गर्ह्यो देवानां तस्मादेतद्‍ ब्रवीमि ते ॥ ६ ॥
धृतराष्ट्र उवाच
ब्रवीहि विदुर त्वं मे पुराणं तं सनातनम् ।
कथमेतेन देहेन स्यादिहैव समागमः ॥ ७ ॥
वैशम्पायन उवाच
चिंतयामास विदुरस्तमृषिं संशितव्रतम् ।
स च तच्चिन्तितं ज्ञात्वा दर्शयामास भारत ॥ ८ ॥
स चैनं प्रतिजग्राह विधिदृष्टेन कर्मणा ।
सुखोपविष्टं विश्रान्तमथैनं विदुरोऽब्रवीत् ॥ ९ ॥
भगवन् संशयः कश्चित् धृतराष्ट्रस्य मानसः ।
यो न शक्यो मया वक्तुं त्वमस्मै वक्तुमर्हसि ॥ १० ॥
यं श्रुत्वायं मनुष्येन्द्रः सुखदुःखातिगो भवेत् ।
लाभालाभौ प्रिय द्वेष्यौ यथैनं न जरान्तकौ ॥ ११ ॥
विषहेरन् भयामर्षौ क्षुत्पिपासे मदोद्‍भवौ ।
अरतिश्चैव तन्द्री च कामक्रोधौ क्षयोदयौ ॥ १२ ॥
इति श्रीमहाभारते उद्योगपर्वणि सनत्सुजातपर्वणि
विदुरकृतसनत्सुजातप्रार्थने एकचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४१ ॥


[ १ धृतराष्ट्रानें ब्रह्मतत्त्वाविषयीं प्रश्न केला असतां विदुरानें स्वतःच्या शूद्रयोनीचा विचार करून सनत्सुजाताचें केलेले स्मरण. २ सनत्सुजाताचें आगमन व त्याला सत्कारपूर्वक धृतराष्ट्राच्या संशयनिवृत्तीची प्रार्थना.]


(१) वैशंपायन-राजा जनमेजया, याप्रमाणे ब्रह्मविद्याधिकारी पुरुषाच्या विशेषणाप्रमाणें असलेली जी साधनसंपत्ति तिचे सविस्तर उपपादन केलें. त्यांत विदुराने कचित प्रसंगीं 'यतो यतो निवर्तते' इत्यादि वचनानी संक्षेपतः ब्रह्मविद्या सूचित केली आहे. तीच सविस्तर ऐकण्याच्या इच्छेने धतराष्ट्र म्हणाला- "हे विदुरा, वाणीने अनुक्त पण अवश्य वक्तव्य, असें जर कांहीं तुझ्याजवळ अवशिष्ट असेल, तर तूं श्रवणेच्छु असलेल्या मला तें सांग. कारण तूं विचित्र भाषण करतोस." विदुर- हे धृतराष्ट्रमहाराज, जो पुराण सनातन कुमार सनत्सुजात त्यानें 'मृत्यु नाहीं' असें सांगितलें आहे. तो बुद्धिमानांतील श्रेष्ठ ऋषि तुला योगकलादि गुह्य व शमादि प्रकट असे सर्व हृदयाश्रित धर्म सांगेल.

वैशंपायन- राजा, वर्णाश्रमक्रमाचे उल्लंघन करून ब्रह्मविद्येचा उपदेश करूं नये, हें तत्त्व आख्यायिकेच्या द्वारा धृतराष्ट्र व विदुर यांच्या पुढील संवादांत प्रकट केलें आहे.

धृतराष्ट्र- हे विदुरा, तो सनातन कुमार मला जे तत्त्व सांगणार, ते तूंच कां सांगत नाहींस ? तुला तें यथावत् अवगत नाहीं कीं काय ! तुझ्या ज्ञानाचा जर कांहीं अवशेष राहिला असेल तर तूंच तें मला सांग.

विदुर- हे राजन्, माझा जन्म शूद्रयोनींत झाला आहे, त्यामुळें नीति-प्रभृति लौकिकज्ञानाहून विलक्षण असलेलें ब्रह्मज्ञान सांगण्याचा अधिकार मला नाहीं. ब्रह्मविद्येमध्ये सनातनसंज्ञक कुमाराची बुद्धि किती परिनिष्ठित आहे, हें मी चांगले जाणतो. तो कुमार ब्राह्मयोनींत उत्पन्न झाला आहे, त्यामुळे तो अति गुह्य ब्रह्मज्ञानाचाहि उपदेश करण्यास समर्थ आहे. त्यानें तुला ज्ञानोपदेश केल्यास तो देवांच्या निंदेला पात्र होणार नाहीं. म्हणून मी तुला हे सांगत आहे. धृतराष्ट्र- बा विदुरा, त्या सनातन, पुराण ब्रह्मर्षींशीं या देहाने माझा समागम कसा होईल तें सांग पाहूं ?

(२) वैशंपायन- राजा पारिक्षिता, धृतराष्ट्राची ही शंका ऐकून विदुरानें तीक्ष्ण व्रते धारण करणाऱ्या त्या ऋषीचे चिंतन केलें. त्याबरोबर विदुर आपले स्मरण करीत आहे, असे जाणून तो सनातन कुमार त्याच्यापुढे प्रकट झाला.

विदुराने शास्त्रोक्त मधुपर्कादि विधीनें त्याचें स्वागत केले आणि सुखासनावर बसून किंचित विश्रांति घेतलेल्या त्या महर्षीला तो म्हणाला-"भगवन्, या धृतराष्ट्र राजाच्या मनांत कांहीं संशय आहे, त्याचें निरसन करण्यास मी समर्थ नाहीं, यास्तव तूं या राजाच्या संशयाचे निरसन कर. ज्या ब्रह्मविद्येचे तुझ्या मुखाने श्रवण करून हा नरेंद्र सर्व दुःखांपासून मुक्त होईल, लाभ-अलाभ, प्रिय-द्वेष्य, जरा-मृत्यु, भय-असहिष्णुता, क्षुधा-तृषा, मद व ऐश्वर्य, अरति व तंद्री, काम-क्रोध आणि क्षय व उत्कर्ष आणि यांचें हेतुभूत पुण्य-पाप याला पीडा देणार नाहींत, असा त्याच्यावर अनुग्रह कर.


GO TOP