भगवान व्यासकृत् 'महाभारत' या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मतत्त्वासंबंधी विवेचन आढळते. महाभारताच्या उद्योगपर्वांतील अध्याय ४१ ते ४६ इथेही ब्रह्मतत्त्वाविषयी चर्चा आढळते. या भागाला 'सनत्सुजातीय' पर्व असे नांव दिले आहे. या सहा अध्यायांत विदुराच्या विनंतीवरून सनत्कुमारांनी राजा धृतराष्ट्राला ब्रह्मविद्येचे गुह्यज्ञान सांगितले आहे -




सनत्सुजातीय

अध्याय २ रा

वैशम्पायन उवाच
ततो राजा धृतराष्ट्रो मनीषी
     सम्पूज्य वाक्यं विदुरेरितं तत् ।
सनत्सुजातं रहिते महात्मा
     पप्रच्छ बुद्धिं परमां बुभूषन् ॥ १ ॥
धृतराष्ट्र उवाच
सनत्सुजात यदीदं शृणोमि
     न मृत्युरस्तीति तवप्रवादम् ।
देवासुरा ह्याचरन् ब्रह्मचर्य-
     ममृत्यवे तत् कतरन्नु सत्यम् ॥ २ ॥
सनत्सुजात उवाच
अमृत्युः कर्मणा के चिन्मृत्युर्नास्तीति चापरे ।
शृणु मे ब्रुवतो राजन् यथैतन्मा विशङ्‌किथाः ॥ ३ ॥
उभे सत्ये क्षत्रियैतस्य विद्धि
     मोहान्मृत्युः सम्मतोऽयं कवीनाम् ।
प्रमादं वै मृत्युमहं ब्रवीमि
     तथाप्रमादममृतत्वं ब्रवीमि ॥ ४ ॥
प्रमादाद्वै असुराः पराभव-
     न्नप्रमादाद्‍ ब्रह्मभूता सुराश्च ।
न वै मृत्युर्व्याघ्र इवात्ति जन्तून्
     न ह्यस्य रूपमुपलभ्यते ह ॥ ५ ॥
यमं त्वेके मृत्युमतोऽन्यमाहु-
     रात्मावासन्नममृतं ब्रह्मचर्यम् ।
पितृलोके राज्यमनुशास्ति देवः
     शिवः शिवानामशिवोऽशिवानाम् ॥ ६ ॥
आस्यादेशान्निःसरते नराणां
     क्रोधः प्रमादो मोहरूपश्च मृत्युः ।
अहंगतेनैव चरन् विमार्गान्
     न चात्मनो योगमुपैति कश्चित् ॥ ७ ॥
ते मोहितास्तद्वशे वर्तमाना
     इतः प्रेतास्तत्र पुनः पतन्ति ।
ततस्तान् देवा अनु विप्लवन्ते
     अतो मृत्युर्मरणाख्यामुपैति ॥ ८ ॥
कर्मोदये कर्मफलानुरागा-
     स्तत्रानुयान्ति न तरन्ति मृत्युम् ।
सदर्थयोगानवगमात् समन्तात्
     प्रवर्तते भोगयोगेन देही ॥ ९ ॥
तद्वै महामोहनमिन्द्रियाणां
     मिथ्यार्थयोगस्य गतिर्हि नित्या ।
मिथ्यार्थयोगाभिहतान्तरात्मा
     स्मरन्नुपास्ते विषयान् समन्तात् ॥ १० ॥
अभिध्या वै प्रथमं हन्ति लोकान्
     कामक्रोधावनुगृह्याशु पश्चात् ।
एते बालान् मृत्यवे प्रापयन्ति
     धीरास्तु धैर्येण तरन्ति मृत्युम् ॥ ११ ॥
सोऽभिध्यायन्नुत्पतिन् निहन्या-
     दनादरेणाप्रतिबुध्यमानः ।
नैनं मृत्युर्मृत्युरिवात्ति भूत्वा
     एवं विद्वान् यो विनिहन्ति कामान् ॥ १२ ॥
कामानुसारी पुरुषः कामाननु विनश्यति ।
कामान् व्युदस्य धुनुते यत् किंचित् पुरुषो रजः ॥ १३ ॥
तमोऽप्रकाशो भूतानां नरकोऽयं प्रदृश्यते ।
मुह्यन्त इव धावन्ति गच्छन्तः श्वभ्रवत् सुखम् ॥ १४ ॥
अमूढवृत्तेः पुरुषस्येह कुर्यात्
     किं वै मृत्युस्तार्ण इवास्य व्याघ्रः ।
अमन्यमानः क्षत्रिय किंचिदन्य-
     न्नाधीयते निर्णुदन्निवास्य चायुः ॥ १५ ॥
स क्रोधलोभौ मोहवानन्तरात्मा
     स वै मृत्युस्त्वच्छरीरे य एषः ।
एवं मृत्युं जायमानं विदित्वा
     ज्ञाने तिष्ठन्न बिभेतीह मृत्योः ।
विनश्यते विषये तस्य मृत्यु-
     र्मृत्योर्यथा विषयं प्राप्य मर्त्यः ॥ १६ ॥
धृतराष्ट्र उवाच
यानेवाहुरिज्यया साधुलोकान्
     द्विजातीनां पुण्यतमान् सनातनात् ।
तेषां परार्थं कथयन्तीह वेदा
     एतत् विद्वान् नोपैति कथं नु कर्म ॥ १७ ॥
सनत्सुजात उवाच
एवं ह्यविद्वानुपयाति तत्र
     तत्रार्थजातं च वदन्ति वेदाः ।
सवेह आयाति परं परात्मा
     प्रयाति मार्गेण निहत्य मार्गान् ॥ १८ ॥
धृतराष्ट्र उवाच
कोऽसौ नियुङ्‌क्ते तमजं पुराणं
     स चेदिदं सर्वमनुक्रमेण ।
किं वास्य कार्यमथवा सुखं च
     तन्मे विद्वन् ब्रूहि सर्वं यथावत् ॥ १९ ॥
सनत्सुजात उवाच
दोषो महानत्र विभेदयोगे
     ह्यनादियोगेन भवन्ति नित्याः ।
तथास्य नाधिक्यमपैति किञ्चि-
     दनादियोगेन भवन्ति पुंसः ॥ २० ॥
य एतद् वा भगवान् स नित्यो
     विकारयोगेन करोति विश्वम् ।
तथाच तच्छक्तिरिति स्म मन्यते
     तथार्थयोगेन भवन्ति वेदाः ॥ २१ ॥
धृतराष्ट्र उवाच
येऽस्मिन् धर्मान् नाचरंतीह के चित्
     तथा धर्मान् केचिदिहाचरन्ति ।
धर्मः पापेन प्रतिहन्यते स्वि-
     दुताहो धर्मः प्रतिहन्ति पापम् ॥ २२ ॥
सनत्सुजात उवाच
उभयमेव तत्र्रोपयुज्यते फलं
     धर्मस्यैवेतरस्य च ॥ २३ ॥
तस्मिन्स्थितौ वाप्युभयं हि नित्यं
     ज्ञानेन विद्वान् प्रतिहन्ति सिद्धम् ।
तथान्यथा पुण्यमुपैति देही
     तथागतं पापमुपैति सिद्धम् ॥ ४ ॥ ः
गत्वोभयं कर्मणा युज्यतेऽस्थिरं
     शुभस्य पापस्य स चापि कर्मणा ।
धर्मेण पापं प्रणुदतीह विद्वान्
     धर्मो बलीयानिति तस्य सिद्धि ॥ २५ ॥
धृतराष्ट्र उवाच
यानिहाहुः स्वस्य धर्मस्य लोकान्
     द्विजातीनां पुण्यकृतां सनातनान् ।
तेषां क्रमान् कथय ततोऽपि चान्यान्
     नैतद् विद्वन् वेत्तुमिच्छामि कर्म ॥ २६ ॥
सनत्सुजात उवाच
येषां व्रतेऽथ न विस्पर्धा बले बलवतामिव ।
ते ब्राह्मणा इतः प्रेत्य स्वर्गे यान्ति प्रकाशकाः ॥ २७ ॥
येषां धत्मे च विस्पर्धा तेषां तज्ज्ञानसाधनम् ।
ये ब्राह्मणा इतो मुक्ताः स्वर्गं यान्ति त्रिविष्टपम् ॥ २८ ॥
तस्य सम्यक्समाचारमाहुर्वेदविदो जनाः ।
नैनं मन्येत भूयिष्ठं बाह्यमाभ्यन्तरं जनम् ॥ २९ ॥
यत्र मन्येत भूयिष्ठं प्रावृषीव तृणोपलम् ।
अन्नं पानं च ब्राह्मणस्य तज्जीवेन्नानुसंज्वरेत् ॥ ३० ॥
यत्राकथयमानस्य प्रयच्छत्यशिवं भयम् ।
अतिरिक्तमिवाकुर्वन् स श्रेयान् नेतरो जनः ॥ ३१ ॥
यो वा कथयमानस्य ह्यात्मानं नानुसंज्वरेत् ।
ब्रह्मस्वं नोपभुञ्जीत तदन्नं सम्मतं सताम् ॥ ३२ ॥
यथा स्वं वान्तमश्नाति श्वा वै नित्यमभूतये ।
एवं ते वान्तमश्नन्ति स्ववीर्यस्योपजीवनात् ॥ ३३ ॥
नित्यमज्ञातचर्या मे इति मन्येत ब्राह्मणः ।
ज्ञातीनां तु वसन् मध्ये तं विदुर्ब्राह्मणं बुधाः ॥ ३४ ॥
को ह्यनन्तरमात्मानं ब्राह्मणो हन्तुमर्हति ।
निर्लिङ्‌गमचलं शुद्धं सर्वद्वैतविवर्जितम् ॥ ३५ ॥
तस्माद्धि क्षत्रियस्यापि ब्रह्मावसति पश्यति ॥ ३६ ॥
योऽन्यथा सन्तमात्मानमन्यथा प्रतिपद्यते ।
किं तेन न कृतं पापं चोरेणात्मापहारिणा ॥ ३७ ॥
अश्रान्तः स्यादनादाता संमतो निरुपद्रवः ।
शिष्टो न शिष्टवत् स स्याद्‍ ब्राह्मणो ब्रह्मवित् कविः ॥ ३८ ॥
अनाढ्या मानुषे वित्ते आढ्या दैवे तथा क्रतौ ।
ते दुर्धर्षा दुष्प्रकम्प्यास्तान् विद्याद्‌ ब्रह्मणस्तनुम् ॥ ३९ ॥
सर्वान् स्विष्टकृतो देवान् विद्याद् य इह कश्चन ।
न समानो ब्राह्मणस्य तस्मिन् प्रयतते स्वयम् ॥ ४० ॥
यमप्रयतमानं तु मानयन्ति स मानितः ।
न मान्यमानो मन्येत न मान्यमभिसंज्वरेत् ॥ ४१ ॥
लोकः स्वभाववृत्तिर्हि निमेषोन्मेषवत् सदा ।
विद्वांसो मानयन्तीह इति मन्येत मानितः ॥ ४२ ॥
अधर्मनिपुणा मूढा लोके मायाविशारदाः ।
न मान्यं मानयिष्यन्ति मान्यानामवमानितः ॥ ४३ ॥
न वै मानं च मौनं च सहितौ वसतः सदा ।
अयं हि लोको मानस्य असौ मौनस्य तद् विदुः ॥ ४४ ॥
श्रीः सुखस्येह संवासः सा चापि परिपन्थिनी ।
ब्राह्मी सुदुर्लभा श्रीर्हि प्रज्ञा हीनेन क्षत्रिय ॥ ४३ ॥
द्वाराणि तस्येह वदन्ति सन्तो
     बहुप्रकाराणि दुराधराणि ।
सत्यार्जवे ह्रीर्दमशौचविद्या
     यथा न मोहप्रतिबोधनानि ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमहाभारते उद्योगपर्वणि
सनत्सुजातपर्वणि द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४२ ॥


धृतराष्ट्र व सनत्सुजात यांची प्रश्नोत्तरे -

वैशंपायन- राजा, त्यानंतर बुद्धिमान् धृतराष्ट्रराने विदुराच्या पूर्वोक्त वचनाचें अभिनंदन केलें, आणि त्या महात्म्यानें सनत्सुजाताला एकांतांत विस्तूत झालेल्या आत्म्याला ब्रह्मविद्येच्या योगाने जाणण्याच्या इच्छेने ब्रह्मात्मविषयक श्रेष्ठ ज्ञान विचारलें.

धृतराष्ट्र- हे भगवन् सनत्सुजात, मृत्यु नाहीं, असें तूंआपल्या शिष्यांना सांगितलें आहेस, असें हा प्राज्ञ विदुर म्हणतो. ह्यावरून ' मृत्यु ' हा पदा- र्थच नाहीं, असा शिष्यांना केलेला तुझा उपदेश प्रसिद्ध आहे, असें दिसते. पण इंद्रादि देव व विरोचनादि असुर यांनींहि मृत्यूचा अभाव होऊन अमृतत्वप्राप्ति व्हावी म्हणून प्रजापति गुरूपाशीं वास करून ब्रह्मचर्य आचरिलें, असें छान्दोग्योपनिषदाच्या आठव्या अध्यायांत स्मृत आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणें मृत्यु जर खरोखरच नाहीं, तर या देवासुरांनीं मृत्यूच्या परिहारासाठी ब्रह्मचर्य कां आचरिले ? यावरून 'मृत्यु आहे' असें एक पक्ष म्हणतो व 'तो नाहीं' असा दुसरा पक्ष आहे. तर यांतील खरे काय आहे, तें मला सांग.

धृतराष्ट्रराने असा प्रश्न केला असतां भगवान् श्रीसनत्सुजात म्हणाले- हे राजा धृतराष्ट्रा, कित्येक अविद्वान् लोक वस्तुतः मृत्यु आहेच, असें समजून वेदोक्त कर्माने अमृतत्वप्राप्ति होते, असें म्हणतात व वस्तुभूत असलेल्या मृत्यूची निवृत्ति होऊन अमृतत्वप्राप्ति व्हावी यासाठीं वेदोक्त कर्माचे आचरण करतात. विषयविषानें अंध झालेले दुसरे कित्येक विषयावाचून सुखच नाहीं व मोक्ष तर निर्विषय आहे, यास्तव त्याची आम्हांला अपेक्षाच नाहीं, असें समजून कर्माच विषयप्रचुर देवादिभाव प्रास होतो, असें वर्णितात. या विषयीं एका विषयासक्त पुरुषाचें पुढील वचन प्रसिद्ध आहे. ' अपि वृंदावने शून्ये शृगालत्वं स इच्छतु । न तु निर्विषयं मोक्ष कदाचिदपि गौतम ॥ - हे गौतमा, पुरुषानें सर्व विषयशून्य वृंदावनांतील शृगालत्वाचीहि इच्छा करावी, म्ह० त्यानें निर्जन वनांतील श्वानाच्या जन्माचीहि इच्छा करावी, पण निर्विषय- सर्व विषयशून्य मोक्षाची इच्छा केव्हांहि करूं नये.

त्याचप्रमाणे परमात्म्याहून अन्य वस्तु न पहाणारे कित्येक विद्वान् ज्ञानकर्माच्या योगानें अमृतत्वाची प्राप्ति होते, असें वर्णन करतात. आणखी कित्येक अद्वितीय आत्मदर्शी आत्म्याहून व्यतिरिक्त दुसरी वस्तुच नाहीं, असे समजतात व आत्मव्यतिरिक्त दुसरी वस्तु नसल्यामुळे मृत्युहि नाहींच, असें वर्णितात. यास्तव हे राजन्, या दोन्ही पक्षामध्ये विरोध कसा संभवत नाहीं, तें मी तुला सांगतो माझें वचन सावधान चित्ताने ऐक. त्याविषयी तूं साशंक होऊं नको.

हे क्षत्रिया, मृत्यूचे अस्तित्व व नास्तित्व हे दोन्ही पक्ष आदिसर्गापासून- जगाच्या आरंभापासून प्रवृत्त झाले आहेत. ( मूळ वचन- 'उभे सत्ये क्षत्रियाद्यप्रवृत्ते' असें आहे. त्यांतील 'हे क्षत्रिय' व 'आद्यप्रवृत्ते' असा पदच्छेद करून वरील अर्थ केला. पण त्याच पदाचा 'क्षत्रियाद्य' व 'प्रवृत्ते' असा पदच्छेद केला असतां, हे क्षत्रियश्रेष्ठा, मृत्यूचे अस्तित्व व नास्तित्व हीं दोन्ही सत्य आहेत असा अर्थ संभवतो.)

धृतराष्ट्र- पण परस्परविरुद्ध असलेलें अस्तित्व व नास्तित्व या दोहोंचे सत्यस्व कसे संभवते !

सनत्कुमार- हे राजा, विद्वानांना 'प्रसिद्ध मोह' हाच मृत्यु म्हणून संमत आहे. सर्व लोकांच्या ठिकाणीं जो अनादि अविवेक दृढ होऊन राहिला आहे, तोच मृत्यु होय, असें विद्वानांचें मत आहे. यास्तव हे क्षत्रियश्रेष्ठा, तुझ्या म्हणण्याप्रमाणें अस्तित्व व नास्तित्व या दोहोंनाहि सत्यत्व आहे, या म्हणण्यांत विरोध उत्पन्न झाला असता, पण तो केव्हां ? मृत्यु परमार्थरूप असता तर तो दोष उद्भवला असता; पण मृत्यु सत्य नाहीं.

'तर मग मृत्यु कोण' म्हणून विचारशील तर मोह हाच मृत्यु आहे, हे मीं वर सांगितलेंच आहे. मोह म्हणजे मिथ्या ज्ञान. अनात्म्यामध्ये आत्माभिमान. त्यालाच 'अनादि अविवेक' असेंहि म्हणतात व कांहीं विद्वानांच्या मताने तोच मृत्यु आहे. पण मी मोहाला मृत्यु म्हणत नाहीं, तर प्रमादाला मृत्यु म्हणतो. प्रमाद म्हणजे स्वाभाविक ब्रह्मभावापासून च्युत होणें. तो प्रमाद मिथ्याज्ञानाचेंहि कारण आहे. आत्म्याच्या स्वरूपाचा अनिश्चय- आत्म्याचें अज्ञान हाच मृत्यु म्ह० जनन-मरणादि सर्व अनर्थांचे बीज आहे, असें मी मानतों. त्याचप्रमाणें सदा अप्रमाद म्ह० स्वाभाविक स्वरूपाने अवस्थित होणें, यालाच मीमृतत्व म्हणतो. छान्द्योग्यांतील निरतिशय चैतन्यस्वरूप परम ज्योतीला प्रास होऊन आत्मा आपल्या स्वाभाविक स्वरूपाने अभिनिष्पन्न- संपन्न होतो, हें वाक्य स्वरूपावस्थान हेंच मोक्षप्रद आहे, असें दाखविते.

अनुगीतेमध्येंहि 'आत्मा एकच आहे. तो अद्वितीय आहे आणि तोच एक आत्मा सर्व प्राण्यांच्या हृदयांत अभिव्यक्त होतो, असें म्हटलें आहे;' त्याचेंच स्वरूप मी तुला कथन करतो. मर्त्य या सर्व द्वैताचा स्वरूपामध्ये लय करून व आत्म्यामध्यें निश्चयानें स्थित होऊन स्वरूपसंस्थ म्ह. स्वरूपांत अवस्थित होतात, असें स्पष्ट म्हटलें आहे.

ज्याअर्थी स्वरूपावस्थान हाच मोक्ष आहे, त्याअर्थी तो चतुर्विध कर्मफलाहून विलक्षण आहे. उत्पत्ति, प्राप्ति, संस्कृति-संस्कार, विकृति-विकार हे कर्माचे चतुर्विध फल आहे. मोक्ष या चारी प्रकारच्या फलाहून विलक्षण आहे. म्हणूनच अमृतत्व कर्माने साध्य होत नाहीं. समुच्चित ज्ञानकर्मानेंहि अमृतत्वाचा लाभ होणें शक्य नाहीं. त्यामुळे 'अमृत्यः कर्मणा केचित्' हा जो वर एक पक्ष सांगितला आहे, तो सर्वथा अनुपपन्न आहे. ( या पक्षाचे निराकरण स्वतः सनत्सुजातच पुढें करणार आहेत.)

त्यावर धृतराष्ट्र म्हणतो- प्रमाद म्ह० आत्म्याविषयींचे अज्ञान हाच मृत्यु व सदा अप्रमाद- स्वाभाविक स्वरूपाने अवस्थित होणें, हेंच अमृतत्व आहे, हें कशावरून अवगत होतें ?

सनतसुजात- प्रमादापासून पराभव प्राप्त होतो. स्वाभाविक ब्रह्मभावापासून च्युत झाल्यामुळें देहादि अनात्म्याच्या ठिकाणी आत्मभाव धारण केल्याने पूर्वी विरोचन प्रभृति असुरांचा पराभव झाला, याविषयीं छान्दोग्योपनिषदामध्ये प्रमाणाहि आहे. त्याच प्रमाणें अप्रमादामुळें म्ह० स्वाभाविक चित्सदानंद अद्वितीय ब्रह्मस्वरूपानें अवस्थित झाल्यामुळें इंद्रादि देव ब्रह्मभूत झाले. या विषयींहि स्मृतिप्रमाण आहे. किंवा इंद्रियांमध्ये रममाण होणारे जे विषयी अनात्मज्ञ प्राणी ते असुर होत. असले असुर स्वाभाविक ब्रह्मभावाचे अतिक्रमण करून अनात्मभूत देहादिकांमध्ये आत्माभिमान धारण करतात आणि याप्रमाणें अनात्म्यामध्ये आत्मभावास प्राप्त होऊन पशुपक्षी-प्रभृति तिर्यगादि योनीस प्राप्त होतात. हाच त्या असुरांचा पराभव होय. याविषयींहि बह्वृच ब्राह्मणोपनिषदांत आधार आहे. त्याचप्रमाणे जे स्वात्म्यामध्येंच रममाण होतात, ते ब्रह्मज्ञ सुर होत. ते अप्रमादामुळें म्ह० स्वरूपांमध्ये स्थित झाल्यामुळे ब्रह्मभूत झाले. मिथ्या ज्ञान व त्याचें कार्य यांची निवृत्ति होऊन ते साक्षात ब्रह्मच झाले.

धृतराष्ट्र - भगवन्, सर्व जंतूंच्या प्राणांचा उपसंहार करणारा मृत्यु सर्व लोकप्रसिद्ध आहे. असें असतांना 'प्रमाद हाच मृत्यु आहे, असें मी म्हणतो' असे कसें सांगतां !

सनत्सुजात- राजा, मृत्यु व्याघ्राप्रमाणे प्राण्यांना कांहीं खात नाहीं. कारण व्याघ्र जसा प्राण्यांना खातो, त्याप्रमाणें मृत्यूनें जर जीवाला खाल्लें असतें, तर त्याचें स्वरूपहि उपलब्ध झालें असतें, पण मृत्यूचे स्वरूप कोणालाच उपलब्ध होत नाहीं. म्हणून मृत्यु नाहीं, असे मी म्हणतो.

धृतराष्ट्रर - 'अहो पण सावित्रीच्या उपाख्यानांत सत्यवानाच्या शरीरांतून पाशबद्ध व हे त्यामुळेंच मृत्युवश झालेल्या अंगुष्ठमात्र पुरुषाला यमाने बलात्काराने बाहेर ओढून काढलें व सावित्रीला तो प्रत्यक्ष दिसला, असें वर्णन केले आहे. असे असतांना तुम्ही 'यमाचे स्वरूप उपलब्ध होत नाहीं' असें कसें म्हणतां ?

सनत्सुजात- हे राजन्, सावित्रीच्या उपाख्यानांत त्या साध्वीला यमाचे दर्शन झाल्याचे उपलब्ध होतें, हें खरें, पण तो साक्षात् मृत्यु नव्हे. तर जें आत्म्याचें अज्ञान तोच प्रमादाख्य मृत्यु होय. कारण त्याला- अज्ञानाला साक्षात विनाशहेतुत्व आहे. या मनुष्यशरीरांतच आत्म्याला न जाणल्यास फार मोठा विनाश होतो. ( के. भा.) असें म्हणून अज्ञानाला विनाशहेतुत्व आहे, असें सांगितलें आहे. तसेंच बृहदारण्यकामध्यें ' मृत्युर्वै तम: ज्योतिरमृतम्' ( बृ. भा. १- ३- २८) अज्ञान हाच मृत्यु आहे व ज्ञान अमृत आहे, या वाक्याने प्रमादाख्य अज्ञानाला साक्षात् मृत्यूत्व आहे, असें सांगितले आहे. म्हणून प्रमादच साक्षात् सर्व अनर्थाचे बीज आहे, असें मी म्हणतों. म्हणून मुमुक्षूने पूर्वोक्त प्रमाद करूं नये. तर चित्-सत्-आनंद अद्वितीय ब्रह्मभावानें अवस्थित व्हावें.

ज्याअर्थी प्रमादच मृत्यू आणि अप्रमाद अमृतत्व आहे, त्याअर्थी अमृतत्व कर्मसाध्य किंवा कर्मप्राप्य नाहीं. कारण तें नित्यसिद्ध व नित्यप्राप्त आहे. म्हणून प्रमाद हेंच सर्व अनर्थांचे बीज आहे व त्यामुळें तोच मृत्यु आहे, असें मी म्हणतो. मी यमाला मृत्यु समजत नाहीं. पण कित्येक विषयविषानें अंध झालेले अविद्यावान् लोक 'यम स्वात्म्याहून भिन्न आहे' व तो वैवस्वत यम मीं सांगितलेल्या प्रमादाख्य मृत्यूहून भिन्न आहे असेहि म्हणतात, तो आत्मावास- सर्व प्राण्यांच्या बुद्धीमध्यें राहणारा, अमृत म्ह० अमरधर्मा व 'ब्रह्मचर्य' - स्वात्मभूत ब्रह्मामध्ये रममाण होणारा ब्रह्मनिष्ठ आहे. हा मृत्युसंज्ञक देव पितृलोकांत राहून आपल्या राज्याचे अनुशासन करतो. 'पण तो अनुशासन कसें करतो' म्हणून म्हणशील तर तेंहि सांगतो. तो वैवस्वत यमराज पुण्यकर्मे करणारांना सुखप्रद व पापकर्मे करणारांना असुखप्रद होतो.

याप्रमाणे आत्मविषयक अज्ञान हाच प्रमाद व तोच मृत्यू आहे, असें सांगून मीं मृत्युचें स्वरूप निश्चित केलें. आतां त्याचेंच कार्यरूपाने म्हणजे व्यक्तरूपाने अवस्थान कसें होतें, तेंहि सांगतो ऐक.

राजा, हा जो प्रमादाख्य मृत्यु तो प्रथम अहंकाररूपानें परिणाम पावतो [ या श्लोकांत 'आद्य' असा एक शब्द आहे व त्या शब्दाचा अर्थ अभिमानात्मक अहंकार असा केला आहे. पण पूर्वी मोहाला मृत्यु असें म्हटलें असल्यामुळें येथें 'आस्य' म्ह. काम, असेहि म्हणतां येईल. जो सर्व प्राण्यांना संसारांत पाडतो, तो काम. किंवा प्रसिद्ध मुखाप्रमाणें हा काम सर्वभक्षक असल्यामुळें त्याला 'आद्य' असें म्हटलें आहे, असाहि याचा अर्थ संभवेल. ]

आणि सर्व प्राण्यांच्या हृदयांत अहंकाररूपानें स्थित होऊन त्या अहंकारापासूनहि कामरूपानें बाहेर पडतो. तो काम आपल्या विषयाकमध्यें प्रवृत्त होऊं लागला असतां कांहीं निमित्तानें प्रतिबद्ध झाल्यास क्रोध, प्रमाद व मोह या रूपाने परिणत होतो. त्यानंतर अहंकार, काम, क्रोध, प्रमाद व मोह या रूपाने परिणत झालेल्या अज्ञानाशीं तादात्म्य पावून मी ब्राह्मण, क्षत्रिय, स्थूल, कृश, अमक्याचा पुत्र, नातु, इत्यादि प्रकारे राग-द्वेषानें युक्त होऊन उन्मार्गाने वागू लागतो. श्रौत-स्मार्त धर्माचें उलंधन करून त्याच्या उलट वर्तन करूं लागतो. त्यामुळे त्याला आत्म्याचा समाधियोग यत्किंचितहि प्राप्त होत नाहीं.

त्या अहंकारादिरूपानें परिणत झालेल्या अज्ञानाने हे सर्व जीव मोहित होतात, देहादिकांमध्यें आत्मभावाला प्राप्त होतात व पूर्वोक्त प्रमादाख्य मृत्यूच्या अधीन होऊन राहतात. आयुष्य क्षीण झालें असतां ते अज्ञ जीव भूमादि दक्षिणायन मार्गाने परलोकीं गमन करतात. धूमादि मार्गाने गमन करणाऱ्या त्या जीवांना 'चंद्रमस्' या नांवाचा पितृलोक प्राप्त होतो. त्या लोकातील भोगांना कारण होणारे कर्म क्षीण होईपर्यंत ते तेथे रहातात व कर्मक्षय होतांच त्या लोकांतून च्युत होऊन आकाश, वायु, वृष्टि, अन्न, शुक्र, शोणित, इत्यादि क्रमाने या लोकी येऊन देहधारण करतात. देह धारण केलेल्या त्या जीवाला त्याची इंद्रिये अनुसरतात व त्याचीं सर्व कर्में प्रवृत्त होतात. त्यामुळें इंद्रियगुणांच्या अनुरोधानें तो मरण पावतो व दुसरा जन्म घेतो. त्या जन्मांतहि तो पुनः मृत्यु पावतो. याप्रमाणे जन्म-मरणचक्रावर आरूढ होऊन तो त्यांतून केव्हांहि सुटत नाहीं.

याप्रमाणे संसार आत्म्याच्या अज्ञानामुळे प्रवृत्त झाला आहे. त्यामुळें पुरुष जोवर परमात्म्याला साक्षात् आत्मत्वानें जाणत नाहीं, तोवर हा जीव रागादि क्लेशांनीं पीडित व मोहित होत्साता संसार करीत राहतो.

राजा, याप्रमाणे अविद्या व काम यांना बंधहेतुत्व कसें आहे, ते मीं तुला सांगितले. आतां कर्माला बंधहेतुत्व कसें आहे, तेहि सांगतो, ऐक.

कांही अविवेकी लोक कर्मानें अमृतत्व प्राप्त होतें, असें म्हणतात. पण ते बरोबर नाहीं. कर्माने अमृतत्त्वप्राप्ति होत नाहीं, इतकेंच नव्हे, तर कर्माचा उदय झाला असतां त्याच्या फलामध्यें आसक्त झालेले जीव कर्मफलामध्येंच प्रवृत्त होतात. कर्मफलामध्येंच जन्म घेऊन पुनः असलेंच फल मिळावे, म्हणून पुनः कर्माचे आचरण करतात आणि स्वात्म्याला चिदानंदाद्वयब्रह्मत्व आहे, हें न कळल्यामुळें देहाभिमानी जीव विषयासक्तीनें भोगामध्ये प्रवृत्त होतो. एखादा अंध उंच, सखल, कंटकप्रचुर इत्यादि स्थानी जसा परिभ्रमण करीत रहातो, त्याप्रमाणें हा विवेकहीन पुरुषहि सर्वत्र विषयसुखाच्या आकांक्षेनें संसारमार्गांत परिभ्रमण करीत रहातो. आसक्तीने पराभूत झालेल्या पुरुषाच्या इंद्रियांची विषयांमध्यें प्रवृत्ति तेंच 'महामोहन' होय. ज्या पुरुषाला विषय मिथ्या आहेत असें वाटतें, त्याची इंद्रिये विषयांमध्यें प्रवृत्त होत नाहींत आणि त्यांची प्रवृत्ति विषयांमध्यें होत नसल्यामुळे ती प्रत्यगात्म्यामध्येंच होते. त्यामुळें त्यांच्या मोहाची निवृत्ति होते. पण ज्यांची बुद्धि विषय सत्य आहेत अशी असते, त्याची इंडिये बाह्य विषयांमध्येंच प्रवृत्त होतात. असा बहिर्मुख पुरुष सत्, अद्वितीय, प्रत्यगात्मभूत परमात्म्याला आत्मत्वानें साक्षात् जाणत नाहीं. ( स्त्रीशरीराच्या संपर्काने ज्याचे चित्त कलुषित झालेलें असतें, ते विषयविषांध पुरुष ब्रह्माला जाणत नाहींत, असें प्राचीन अभियुक्तांनीं- मुनींनीं म्हटलें आहे.) त्यामुळें पुनः पुनः विषयांमध्यें प्रवृत्त होणें हेंच 'महामोहेन' होय. [ विषयतृष्णा विषयांच्या उपभोगाने शांत होत नाहीं. तर घृतादि हवीनें अग्नि जसा प्रदीप्त होतो, त्याप्रमाणें विषयांच्या उपभोगानें विषयतृष्णा अधिकाधिक वाढते, असें भगवान मनूनेंहि म्हटलें आहे. ]

त्या महामोहनामुळें अविद्याकल्पित मिथ्या शब्दादि विषयांशी संयोग होतो आणि मिथ्यार्थसंबंध झाला असतां या पुरुषाची संसारगति नियमानें सिद्ध होते. मिथ्याभूत विषयसंयोगानें ज्याचा स्वाभाविक ब्रह्मात्मभाव प्रतिबद्ध झाला आहे, असा पुरुष स्त्रियादि विषयांचें स्मरण करीत सर्वकाल त्यांचीच उपासना करतो. सर्वत्र सिद्ध असलेल्या परमात्म्याची उपासना करीत नाहीं. त्यामुळें विषयांचे चिंतनच या पुरुषाचा प्रथम घात करते म्ह. त्याला स्वरूपापासून च्युत करते. त्यानंतर काम विषयध्यानानें प्रतिबद्ध झालेल्या या पुरुषाला विषयाच्या संनिध नेऊन पोंचवितो व त्याचा पूर्वींपेक्षां अधिक घात करतो.

नंतर क्रोध कामाभिहत झालेल्या याला स्ववश करून घेतो. याप्रमाणे विषयचिंतन, काम व क्रोध यांच्या अधीन झालेल्या या मूढ पुरुषांना ते विषयचिंतनादि दोष मृत्यूपर्यंत नेऊन पोचवितात. पण याच्या उलट जे विद्वान् धैर्याने विषयांना जिंकून परमात्म्यालाच आपल्या प्रत्यगात्मत्वानें जाणतात, तेच मृत्यूचे उल्लंधन करूं शकतात.

धृतराष्ट्र- भगवन्, विद्वान् धैर्याने विषयांना जिंकून मृत्यूचे उल्लंघन कसें करतात ?

सनत्सुजात- राजा जो धीर पुरुष या विषयांचे अनित्यत्व, अशुचित्व, दुःखरूपत्व इत्यादि दोषांचे चिंतन करतो, तो पुनः पुनः उत्पन्न होऊन नाश पावणाऱ्या विषयांचा त्याग करतो आणि एखाद्या अशुद्ध पदार्थांप्रमाणे त्याविषयीं उदासीन होऊन रहातो. तो समीप असलेल्या विषयांचेंहि चिंतन करीत नाहीं. असा धीर पुरुषच मृत्युचाहि मृत्यु होतो. प्रसिद्ध मृत्यु ज्याप्रमाणें सर्व भूतांचें भक्षण करतो, त्याप्रमाणें विषयांचा सर्वत्र त्याग करणारा धीर पुरुष मृत्यूचेंहि भक्षण करतो.

पण हे राजा, जो मनुष्य विषयांच्या अनित्यत्वादि दोषाचे चिंतन न करतां त्यांचा आदर करतो, त्याची काय अवस्था होते, तेंहि मी तुला सांगतो. जो पुरुष विषयांचे चिंतन करून त्यांना अनुसरतो, तो कामाच्या बरोबरच नाश पावतो. कामगुण अनित्य व प्रतिक्षणीं विनाश पावणारे आहेत. त्यामुळें कामी पुरुषहि त्यांच्याबरोबरच विनाश पावतो. पण याच्या उलट जो पुरुष विषयदोषदर्शनाने विषयांचा परित्याग करतो, तो या जन्मी किंवा जन्मांतरीं संपादन केलेल्या पुण्यपापलक्षणकर्मांचा विवेकबुद्धीने नाश करतो.

धुतराष्ट्र- अहो, पण आब्रह्मस्तंबपर्यंत सर्व प्राण्यांना अत्यंत इष्ट असलेल्या या देहाचे त्याज्यत्व कसें संभवते ?

सनत्सुजात- राजा, प्राण्यांचा जो हा देह दिसतो, तो अप्रकाश, अचिद्‌घन व केवल नरक आहे. कारण तो कफ, रक्त, पू, कृमि, विष्ठा, मूत्र, इत्यादि पदार्थांनी परिपूर्ण आहे. पण हा असा अत्यंत बीभत्स असूनहि तो अतिशय रमणीय आहे, असें समजून कामी लोक त्याची इच्छा करतात व त्याच्या मागें धांवतात. पण जसे अंध पुढील कूपादि पदार्थास पहाण्यास समर्थ नसल्यामुळें स्वतःच त्यांच्या समीप जाऊन त्यांत पडतात, त्याप्रमाणें स्त्रियादिकांची आकांक्षा करणारे विषयविषांध पुरुष त्यांच्या ठिकाणी आसक्त होऊन नरकांतच पडतात.

हे राजेंद्रा, अशा पुरुषांचा जन्म व्यर्थ आहे. हे क्षत्रियश्रेष्ठा, जो विषयविषांध पुरुष स्त्रियादि अमंगल विषयांची आकांक्षा करून त्याच्या मागोमाग धावतो व त्याहून अगदीं विलक्षण असलेल्या आत्मभूत परमात्म्याला जाणत नाही किंवा परमात्मविषय अध्यात्मशास्त्राचें अध्ययनहि करीत नाहीं, त्या विषयविषांध षडंगवेदवेत्त्या पुरुषाचाहि देह तृणनिर्मित व्याघ्राप्रमाणें व्यर्थ आहे. भगवान् वसिष्ठानेंही 'जो ब्राह्मण चतुर्वेदवेत्ता असूनही सूक्ष्म ब्रह्माला जाणत नाहीं, तो वेदरूप शब्दराशीच्या भारानें पीडिलेला ब्राह्मण गर्दभच होय' असें म्हटलें आहे. त्याचा केवल देहच निरर्थक असतो असें नाहीं, तर अशाप्रकारचा पुरुष हा स्वतःच स्वतःचा मृत्यु आहे. कारण क्रोध, लोभ, मोह व भय यांनीं युक्त असलेला जो हा तुझा आत्मा तु श्या शरीरामध्यें दिसत आहे, तो सुद्धा मृत्यु आहे. म्ह० जो अजितेंद्रिय पुरुष क्रोध-लोभादिकांनीं युक्त होऊन विषयामध्ये प्रवृत्त होतो, तोच त्याचा मृत्यु होय.

धृतराष्ट्र- भगवन्, अशा मृत्यूचा विनाश कोणत्या उपायाने होतो ?

सनत्सुजात- हे क्षत्रिया, याप्रमाणे क्रोधादिरूपाने उत्पन्न होणारा प्रमादाख्य मृत्यु हेंच जन्म-मरणादि सर्व अनर्थांचे बीज आहे, असें जाणून त्या दोषांचा त्याग करून ज्ञानानें सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्मरूपाने अवस्थित होणारा पुरुष मृत्यूला भीत नाहीं. कारण ज्ञानी पुरुषाला परमात्म्याचा साक्षात्कार झाला असतां हा 'प्रमाद'-संज्ञक अज्ञानमृत्यु नाश पावतो. तो आत्मज्ञानी पुरुषाच्या समोर उभाहि रहात नाहीं. संसार हा मृत्यूचा विषय आहे. त्यास प्राप्त झालेला पुरुष जसा नष्ट होतो, त्याचप्रमाणें आत्मवेत्त्याच्या समीप आलेला अज्ञानमृत्यु नष्ट होतो.

[ याप्रमाणें कर्मांचे बंध-हेतुत्व सांगून ज्ञानालाच मोक्षसाधनत्व आहे, असें सनत्सुजातांनीं सांगितले असतां त्यावर धृतराष्ट्रर असा आक्षेप घेतो - ]

धृतराष्ट्र- भगवन्, कर्मांना बंधहेतुत्व आहे, असें कसें सांगतां ! कारण या संसारमंडलात वेद ज्यांना 'धार्मिकांचे लोक' असें म्हणतात व ज्योतिष्टोमादि यज्ञांच्या योगानें धार्मिक ज्यांवर आरूढ होतात त्या ब्रह्मलोकांत पवित्र व सनातन लोकांना परमपुरुषार्थत्व आहे, असेंहि ते ( वेद) सांगतात, ते लोक बंधनकारक आहेत असें कसें म्हणतां येईल ? यज्ञाच्या योगाने प्राप्त होणार्‍या ऊर्ध्व लोकांना परम पुरुषार्थ आहे, असें वेदरूप अपौरुषेय प्रमाणावरून जाणणारा पुरुष त्याचें साधन जें कर्म त्याचें अनुष्ठान कसें बरें करणार नाहीं !

सनत्सुजात- राजा, तूं म्हणतोस तें खरें आहे; विषय-विषांध अज्ञ पुरुष ब्रह्मलोकादि साध्यसुख हाच परम पुरुषार्थ आहे, असें मानून त्या ब्रह्मलोकादिकांचें साधनभूत जें कर्म त्याच्या अनुष्ठानांतच निमग्न होतो, ही गोष्ट खरी आहे. पण विद्वान् ब्रह्मलोकांतील अविद्यादि दोषांना जाणतो व त्यामुळें तो त्यांत आसक्त होत नाहीं.

वेद सर्वफलजात अविद्वानालाच सांगतात. विद्वानाला सांगत नाहींत. त्यामुळें तो विद्वान् ब्रह्मलोकादि अनित्य सुख व त्याचें साधन कर्म, यांत प्रवृत्त होत नाहीं. तर परमात्म्यालाच आत्मत्वानें जाणून स्वतः परात्मा ब्रह्म होऊन परमात्म्यालाच प्राप्त होतो. तो ज्ञानमार्गाने अमार्गांचा नाश करतो. आत्म्याच्या विरुद्ध असलेले व संसारहेतुभूत धर्म, अधर्म आणि उपासनामार्ग हेच अमार्ग होत.

धृतराष्ट्र- भगवन्, तो सत्यादिलक्षण परमात्माच क्रमाने आकाशापासून पृथ्वीपर्यंत जगत् उत्पन्न करून व त्यांत प्रविष्ट होऊन अन्नमयादिरूपानें अवस्थित होत्साता संसार करीत असेल तर त्या सत्यज्ञानादिलक्षण, पुराण व अज परमात्म्याला दुःखबहुल संसारांत कोण नियुक्त करतो ! तो स्वतःच स्वतःला प्रेरणा करतो किंवा दुसरा कोणी त्याला प्रेरणा करतो ! किंवा नाना योनींमध्यें प्रवृत्त न होणाऱ्या, स्व- स्वरूपांत अवस्थित झालेल्या व अंतर्बहिरिंद्रियांनीं कोणतीहि क्रिया न करणारा असा तो परमात्मा संसारामध्यें जर प्रविष्ट न झाला, तर त्याला कोणतें असुख होतें ! तो स्वरूपांतच जर स्थित झाला तर त्यांत त्याची कोणती हानि होते ! हे विद्वन्, हें सर्व तूं मला यथावत् सांग.

सनत्सुजात- राजा, हा प्रश्न करण्यांत एक प्रेरक व दुसरा प्रेरित होणारा, एक नियोजक व दुसरा नियोज्य, असा भेद प्रतीतीला येत असल्यामुळें व एका कूटस्थ आत्म्याच्या ठिकाणी त्याचा असंभव असल्यामुळें जगांत वस्तुभेद असलाच पाहिजे, असा जर तुझा आशय असेल तर तूं मला असे सांग कीं, तूं तो भेद कोणाचा मानतोस ! ब्रह्माच्याच ठिकाणीं नानात्व मानतोस कीं, जीव व परमात्मा यांचा भेद मानतोस ! तूं जर ब्रह्मच विविध आहे, त्याच्या ठिकाणीं भेद आहे, असे समजत असशील तर या पक्षीं फार मोठा दोष येतो. १ अद्वैतवादी मिथ्या भाषण करणारे व अवैदिक आहेत असे होईल. २ परमार्थभूत अद्वैत हें वेदहृदय बाधित होण्याचा प्रसंग येईल. ३ ब्रह्म अनेक रूपानें परिणत झाल्यानें त्याच्या ठिकाणीं अनित्यत्वादि दोष येतील व अस्थूलादि वाक्यांशी विरोध येईल. कारण उपनिपदांत ब्रह्माला अस्थूल, अनणु इत्यादि म्हटले आहे, हें प्रसिद्ध आहे. बरें 'मी ब्रह्माचे नानात्व मानीत नाहीं, तर जीव आणि परमात्मा यांचा भेद मानतों ' असें म्हणून दुसरा पक्ष स्वीकारशील तर त्या पक्षींहि विनाश हा मोठा दोष प्राप्त होतो. श्रुति भेददर्शी पुरुषाला मोठे भय सांगते. स्मृति, इतिहास, पुराण इत्यादि सर्वहि प्रमाण ग्रंथांत भेददर्शी पुरुषाला मोठा प्रत्यवाय सांगितलेला आहे. त्यामुळें जीवेश्वरभेददर्शनांत अवैदिकत्व हा मोठा दोष प्राप्त होतो.

धृतराष्ट्र- तर मग तुमच्या पक्षीं जीवेश्वरादिव्यवहारभेद कसा संभवतो व त्याला नित्यत्व कसें ?

अनादि अविद्याख्य मायेच्या सबंधाने जीवादि नित्य संभवतात. सजातीयादि भेदांनी रहित असलेल्या परमात्म्याचें मायायोगानें बहुरूपत्व संभवते. याविषयींहि पूर्वोक्त श्रुति- स्मृत्यादि प्रमाणग्रंथांत शेकडो प्रमाणें आहेत. ज्याअर्थी एका परमात्म्यालाच मायायोगानें बहुरूपत्व प्राप्त होतें, त्याअर्थी तोच कारणात्मा परमेश्वर कार्यात्म्या जीवाला त्याच्या पूर्व प्रयत्‍नाच्या अपेक्षेने संसारांत नियुक्त करतो. जीवाचा हा संसार मायिक आहे. परमार्थतः नाहीं. त्यामुळें परमात्मा स्वतः संसार करीत नाहीं व करवीतहि नाहीं.

शिवाय माया या निमित्तानें परमात्म्यामध्ये नैमित्तिक भेद होतो, असें जरी मानलें, तरी कार्य- कारणरूपानें अवस्थित असलेल्याहि परमात्म्याचें स्वरूपाधिक्य नष्ट होत नाहीं. कारण संसाराला मायारूपत्व असल्यामुळें तो कार्य-कारणभाव प्राप्त होण्याच्या पूर्वीं जसा निर्विकार होता, तसाच मायिक कार्यकारणभाव प्राप्त झाल्यावरहि तो रहातो. त्यामुळें पूर्ण परमात्म्याला जो जीव-भाव प्राप्त होतो, तो स्वाभाविक नसून आगंतुक आहे. त्यामुळें आमच्या मायिक व्यवहारामध्ये कोणताहि दोष संभवत नाहीं.

[ याप्रमाणे अद्वितीय परमात्म्याला अनादि मायायोगानें बहुरूपत्व प्राप्त होते, असें सांगितलें. आतां ईश्वराचें जगत्कारणत्वहि मायोपाधिक आहे, असे सांगण्यासाठी सनत्सुजात म्हणतात- ] राजा, तो ऐश्वर्यादिगुणयुक्त परमात्मभूत परमेश्वर ईक्षणादिपूर्वक हें सर्व विश्व नित्य विकारयोगानें करतो, असें जें म्हणतात, तें तो स्वतः करीत नसून त्याची मायाशक्तीच तें सर्व करते. त्यामुळे सदानंदाद्वितीय परमात्म्याला स्वतः कारणत्व नाहीं. तर माय संबंधामुळेंच त्याच्या ठिकाणीं जगत्कारणत्वाचा आरोप करतात.

पण ' असंग परमात्म्याच्या ठिकाणी अशा अलौकिक मायेचा संबंध आहे, याविषयी प्रमाण काय ? ' म्हणून म्हणशील तर ईश्वराच्या ठिकाणीं मायेचे अस्तित्व आहे, याविषयी वेद हेंच प्रमाण आहे. 'इंद्र-परमात्मा आपल्या मायाशक्तींनीं बहुरूप होतो' 'मायावी महेश्वर हें सर्व जगत् उत्पन्न करतो' 'त्या परमात्म्याची स्वरूपभूत शक्ति स्वगुणांनी गुप्त होऊन राहिलेली आहे' इत्यादि अर्थाच्या शश्रुति; 'माझी माया दुरत्यय आहे' इत्यादि स्मृति व 'व्यापक परमात्म्याची ही दुस्तर माया अति दुर्ज्ञेय आहे ' इत्यादि पुराणवचनें तिच्याविषयीं प्रमाण आहेत.

याप्रमाणे प्रमाद- आत्मस्वरूपाविषयीं अज्ञान, हेंच मृत्यूचें स्वरूप आहे व या अज्ञानस्वरूप मृत्यूच्या निमित्ताने अनेक अनर्थांची प्राप्ति होते, असें दाखवून आणि ज्ञानानेंच त्या अज्ञानरूप मृत्यूचा परिहार होतो, असे सनत्सुजातांचे मत ऐकून धृतराष्ट्र कर्माचे स्वरूप जाणणाच्या इच्छेने म्हणतो- 'भगवन्, या लोकी कांहीं मानव धर्माचरण करतात व कांहीं लोक अधर्माचरण करतात; पण त्यांतील धर्म पापाचा विनाश करतो कीं, पाप धर्माला प्रतिबंध करतें ! किंवा धर्म व अधर्म हीं दोन्ही तुल्यबल असल्यामुळें त्यातील कोणीच कोणाचा विनाश करूं शकत नाहीं ?"

अविद्वानाला त्या दोहोंचाहि अनुभव येतो. त्यामुळे धर्म व अधर्म यांतील कोणीच कोणाचा नाश करीत नाहीं, असें सिद्ध होतें. पण विद्वानाचा धर्म व अधर्म, या दोहोंचाहि ह ज्ञानाग्नीनें नाश होतो, अशा आशय नें सनत्सुजात म्हणतात- "हे राजन्, पुण्य-पापात्मक कर्मांत स्थित असलेलाहि पुरुष पुण्य व पाप या दोहोंचेंहि अनुष्ठान करतो. पण विद्वान ज्ञानाने त्या उभयविध कर्मांचा नाश करतो व ही गोष्ट श्रुति, स्मृति, पुराण आणि इतिहास यामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ज्ञानहीन पुरुष पुण्यफलाला प्राप्त होतो व तो पापफलाचाहि उपभोग घेतो, हेहि श्रुति-स्मृत्यादि प्रमाण ग्रंथांवरून सिद्ध आहे."

धृतराष्ट्र- भगवन्, अविद्वानाला पुण्य व पाप या दोहोंचाहि अनुभव घ्यावाच लागतो कीं, त्यांतील एकाने दुसऱ्याचा नाश होतो ?

सनत्सुजात - हे वैचित्रवीर्या, पुरुष परलोकास प्राप्त होऊन पुण्य व पाप यांनीं प्राप्त होणार इष्टानिष्ट फल पुण्य-पापलक्षण कर्मामुळेंच भोगतो. तोच पुरुष विद्वान्-कर्माचा विनियोग जाणणारा असला, तर तो ईश्वरार्थ कर्मानुष्ठान करून त्या धर्माच्या योगाने पापाचा विनाश करतो. असा ईश्वरार्थ कर्मानुष्ठान करणारा जो विद्वान् त्याचा धर्म पापाहून बलवान् आहे, असें तूं समज. पण जो केवल कर्मानुष्ठान करतो, त्याचा धर्म पापाहून बलवान् नाही. अशा पुरुषाला पुण्य व पाप या दोहोंचाहि अनुभव घ्यावाच लागतो. त्याच्या पुण्याने पापाचा किंवा पापाने पुण्याचा विनाश होत नाहीं.

धृतराष्ट्र- तर मग, कोण चें कर्म स्वर्गादिकांचे साधन होतें व कोणाचें कर्मानुष्ठान चित्तशुद्धीच्या द्वारा ज्ञानाचें साधन होतें ?

सनत्सुजात - राजन्, विषयासक्त पुरुष स्वर्गंतील उर्वश्यादि भोगांचे श्रवण करून स्वर्गसाधनभूत ज्योतिष्टोमादि कर्मामध्यें स्पर्धेनें प्रवृत्त होतात. एखादा बलाढ्य राजा दुसऱ्या बलवान् राजाला पाहून त्याच्याशी स्पर्धा करूं लागतो. मी स्वबलानें या बलाढ्य शत्रूला जिंकून त्याच्याहिपेक्षा अधिक सुखी होईन, अशा महत्त्वाकांक्षेनें तो विजयाच्या साधनामध्यें जसा आसक्त होतो, त्याचप्रमाणे यज्ञाधिकारी ब्राह्मण स्वर्गफलाच्या आसक्तीनें यज्ञादि धर्म आचरतात. यज्ञाधिकारी प्रत्येक बाह्मण ' मी सर्वांपेक्षा अधिक धर्माचरण करून अधिक सुखी होईन' अशी इतरांशी स्पर्धा करूं लागतो आणि अशा प्रकारे 'अहमहीमेकेने' स्वर्गसाधनभूत धर्माचें अनुष्ठान करून मरणोत्तर धूमादिमार्गाने स्वर्गलोकीं जाणारे कर्मठ तेथें नक्षत्ररूपाने प्रकाश पावतात.

पण याच्या उलट, ज्यांचे चित्त विषयांनीं आकृष्ट झालेलें नसतें, तें अनित्य फळाचे साधन असे जे ज्योतिष्टोमादि धर्म, त्यांविषयीं कोणाशीं स्पर्धा करीत नाहींत. उलट फलाची अपेक्षा न करतां ईश्वराराधनार्थ कर्मानुष्ठान करतात. अशा विरक्त पुरुषांचे यज्ञादि कर्मशुद्धीच्या द्वारा ज्ञानाचे साधन होतें. या विषयीं श्रुतिस्मृतिपुराणांमध्यें पुष्कळ प्रमाणे आहेत.

राजा, यज्ञादि साधनांच्या योगाने ज्याचे चित्त शुद्ध झालेले असून जे परमात्म्याला आत्मत्वानें जाणतात, ते ब्राह्मण या शरीरेंद्रियसंघातरूप लोकापासून मुक्त होत्साते सुखलक्षण पूर्णानंद ब्रह्माला प्राप्त होतात. हाच मुख्य स्वर्ग किंवा त्रिविष्टप आहे. कारण प्रसिद्ध स्वर्गामध्ये अप्सरादि लक्षण विषयांपासून सुख होतें व हा ब्रह्मलक्षण स्वर्ग अध्यात्मिकादि ताप, सत्वादि तीन गुण व जाग्रदादि तीन अवस्था यांनीं रहित आहे.

आतां ब्रह्मचर्यापासूनच सर्व कर्मांचा संन्यास व वेदांतश्रवणादि करून स्वरूपामध्यें स्थित झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य विद्वानांचे आचरण कसें असते ! तें भगवान् सनत्सुजात सांगतात - राजन्, अशा विद्वानांच्या आचरणाला वेदवेत्ते जन सम्यक् समाचार असें म्हणतात. अशा पुरुषांचे यथार्थ स्वरूप त्याचे बाह्य किंवा आंतर जन-भक्त व अभक्त यांतील कोणीहि जाणूं शकत नाहींत. तो कोठे राहतो म्हणून वि चारशील तर तेहि सांगतो. ऐक.

हे राजा, वर्षाकालीं जेथे तृण, उदक, इत्यादि विपुल असतें तेथेंच पशुपक्ष्यादि द जसे रहातात, त्याचप्रमाणे जेथें अन्नोदकाची समृद्धि असते, तेथेंच तो परमहंस परिव्राजक वास करतो. अशा ज्ञानी विरक्त पुरुषाला मृष्टान्नाची आवश्यकता नसते. भक्षण-योग्य फुलें, फळें, पाने, दूर्वादि जेथें सुलभ असतात, त्या प्रदेशी तो सुखानें रहातो. किंबहुना अशा ब्राह्मणानें दूर्वादिकांच्या रसावरही आपला निर्वाह करावा, पण पराधीन अन्नपानादिकांची आशा करूं नये व त्याच्या आशेनें संतप्त होऊं नये. कारण या अन्नपानादिकांनीं रहित असलेल्या प्रदेशांत माझी देहायात्रा कशी सिद्ध होईल ! अशी चिंता तो करूं लागल्यास त्याचा स्वरूपावस्थानरूप योग सिद्ध होणार नाहीं.

आतां त्यानें कशा प्रकारच्या लोकांचा सहवास करावा तेंही सांगतो, ऐक- अशा परमहंस परिव्राजकानें जेथे आपला कोणी सन्मान करील, प्रणिपातादिपूर्वक ईश्वरबुद्धीने पूजन करील, अशा प्रदेशीं राहूं नये. तर आपलें माहात्म्य प्रकट न करतां तें गुप्त ठेवणाऱ्या, प्रसंगीं प्राप्त होईल ते अन्न भक्षण करणार्‍या, कोणत्याहि प्राप्त चैलादिकांनीं शरीराला आच्छादित करणार्‍या, जड, मूक, पिशाच इत्यादिकांप्रमाणें संचार करणाऱ्या त्याने जेथे लोक त्याचा अवमानादि करतील अशाच ठिकाणीं वास करावा.

त्याला मूढ मानून त्याच्या वाटेला न जाणारा प्राकृत जन हाच त्याला श्रेयस्कर आहे. त्याला स्थितप्रज्ञ ब्रह्मविद् मानून त्याची पूजा करणारा जन त्याला श्रेयस्कर होत नाहीं. सर्व साधनांचा त्याग करून पूर्णानंदरूपानें स्थित झालेला जो विद्वान्, त्यानें मूकव्रत धारण करावें. आत्म्याला संतप्त करूं नये. ब्रह्मनिष्ठासाधनभूत चैल, अजिन, कुश, पुस्तक इत्यादि अवश्य वस्तूंचा त्याग करूं नये. कारण आत्मज्ञानी पुरुषाचें कुशादि हेंच ब्रह्मत्व आहे. तेंच त्याचें अन्न होय. ब्रह्मवेत्त्यानें गूढचर्या-अज्ञातवास हेंच माझे नियत कर्तव्य आहे असे मानावे. आपल्या ज्ञातींतील कोणाच्याही सांनिध्याची इच्छा करुं नये. तर सुहृद्-बांधवदिकांचा त्याग करून केवल स्वात्मनिष्ठ होऊन गुप्त वास करावा. तात्पर्य स्थूल व सूक्ष्म देह आणि त्यांचे धर्म, यांचा आत्मत्वानें स्वीकार करूं नये. कारण स्थूल-सूक्ष्म शरीरांनी रहित, शीतोष्ण सुखदुःखादि धर्मवर्जित, सर्वप्रमाणागोचर, सर्वान्तर व सर्वसाक्षी अशा आत्म्याला 'मी स्थूल आहे, कृश आहे, मूक आहे, सुखी आहे' इत्यादि प्रकारें जाणणें कसें शक्य आहे !

मुख्य ब्राह्मणानें शुद्ध चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणीं स्थूल-सूक्ष्मरूप देहद्वयाचा आरोप करणें सर्वथा अयुक्त आहे. कारण त्या विद्वानानें असा अनात्म्याच्या ठिकाणीं आत्म्याचा अध्यारोप केल्यास त्याचें ब्राह्मणत्वच नष्ट होईल ! पण याच्या उलट जो अविवेकी पुरुष पूर्वोक्त प्रकारें सर्व द्वंद्वशून्य व आनंदलक्षण असलेल्या आत्म्याला देहद्वय व त्याचे धर्म यांनीं युक्त, कर्ता-भोक्ता, सुखी-दुःखी, ब्राह्मण-क्षत्रिय इत्यादि प्रकारे जाणतो, त्या आत्म्याचाच अपहार करणार्‍या मूर्ख चोराने कोणतें पाप केलें नाहीं ! त्यानें महापातकादि सर्व पापे केलीच आहेत असें जाणावे. अशा पुरुषाच्या संसाराची निवृत्ति सर्वथा होत नाही. यास्तव हे राजा, विषयभूत देहेंद्रियादि अनात्मवस्तूंवरील आत्मभाव टाकून वागादिकांचा विषय न होणार्‍या परमात्म्यामध्येच निश्चयानें स्थित व्हावें.

देहेंद्रियें व त्यांचे धर्म यांना आत्मत्वानें न पहाणाऱ्या पुरुषाला कोणत्या फलाची प्राप्ति होते, तें सनत्सुजात सांगतात- जो पुरुष अनात्मभूत देह, इंद्रिये व त्याचे धर्म, यांचें आत्मत्वानें ग्रहण करीत नाहीं, तो संसारश्रमानें युक्त होत नाहीं. अशनाया-पिपासा हे प्राणाचे, शोक-मोह हे मनाचे आणि जरा-मरण हे शरीराचे धर्म आहेत. स्थूल व सूक्ष्म या दोन देहांचा आत्म्याच्या ठिकाणीं अध्यास झाला म्हणजे त्याच्या धर्मांचाहि आत्म्यावर अध्यास होतो. पण जो देहेंद्रियें व त्याचे धर्म यांचें आत्मत्वानें ग्रहण करीत नाहीं, त्यांना अशनायादि षडूर्मींचे संसारश्रम होत नाहींत. त्यामुळेंच तो निरुपद्रव असतो. क्रोध, हर्ष, लोभ, मोह इत्यादि विघ्नें हेच उपद्रव होत. पूर्वोक्त प्रकारें जो अश्रान्त असतो, तोच निरुपद्रव होतो. विद्वानांना तोच शिष्ट म्हणून मान्य होतो. पण ब्रह्मज्ञ विद्वान् ब्राह्मणाने शिष्टाप्रमाणें वागूं नये. तर जड किंवा मूढ यांप्रमाणे वागावें.

आतां याप्रमाणे जो गूढ आचरण करीत नाही, त्याची निंदा करीत सनत्सुजात पुढें म्हणतात- जसे बाल म्ह० श्वान किंवा मूढ आपलीच वांत ( ओकून टाकले अन्न) भक्षण करतात, तसे जे शिष्ट ब्रह्मवेत्ते आपले माहात्म्य प्रकट करीत होत्साते गूढचारी रहात नाहींत, ते आपलेंच बल - वीर्य- सामर्थ्य क्षीण करीत असल्यामुळें जणु काय वांतच भक्षण करतात आणि अशा प्रकारे वांताशन करणें हें त्यांच्या अनर्थालाच कारण होतें. यास्तव विद्वानानें गूढचर्या स्वीकारून अशिष्टाप्रमाणे वर्तन करावे.

( आतां सनत्सुजात योग्याची प्रशंसा करतात- ) धृतराष्ट्रा, जे विद्वान् स्त्री, पुत्र, वित्त इत्यादि मानुष वित्तामध्ये आसक्तचित्त होत नाहींत, तर वेदप्रतिपाद्य अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य इत्यादि समाधिसाधनामध्येंच आसक्त होऊन रहातात ते द्विज दुर्धर्ष व दुष्प्रकंप्य असतात. कोणतीहि परिस्थिति, दोष, किंवा पुरुष त्यांना स्वरूपावस्थानापासून ढळवूं शकत नाहीं. ते ब्रह्माची तनुच-ब्रह्मस्वरूपभूतच आहेत, असे जाणावे.

या लोकीं जो कोणी अग्न्यादि देवतांतील प्रत्येक देवतेला उद्देशून याग करतो, तो या ब्रह्मवेत्त्या ब्राह्मणाची बरोबरी करूं शकत नाहीं. कारण ब्रह्मवेत्ता सर्व देवतायाजी पुरुषाहूनही श्रेष्ठ आहे व त्यांत कांहीं आश्चर्यही नाहीं. कारण स्वतः यजमान 'इदमग्नये इदमिन्द्राय' असा देवतोद्देशानें हविस्त्याग करून ज्या देवतेपासून फल संपादन करण्याची इच्छा करतो, ती देवताहि या ब्रह्मवेत्त्याच्या बरोबरीची नाहीं आणि अग्न्यादि देवसुद्धा जर ब्रह्मवेत्त्याची बरोबरी करूं शकत नाहींत, तर देवांचे उपकरण असलेला हा यजमान ब्राह्मणाची बरोबरी कशी करणार ! 'या लोकीं ब्रह्मवेत्त्यांहून श्रेष्ठ भूत नाहीं,' याविषयी अनेक श्रुतिस्मृति प्रमाणें आहेत.

(भगवान् सनत्सुजात पुनः ब्रह्मवेत्त्याचाच आचार सांगतात- ) स्थितप्रज्ञांची लक्षणें जाणणारे कांहीं विद्वान् ब्रह्मचर्याश्रमापासूनच संन्यास करून गूढचर्या करणाऱ्या या परमहंस परिव्राजकाचार्याला ब्रह्मवेत्ता जाणून जर त्याची पूजा करूं लागले, तर त्यांच्याकडून पूजा केली जाणार्‍या या विद्वानाने 'मी असा पूज्य आहे' असें मानून हृष्ट होऊं नये. त्याचप्रमाणें स्थितप्रज्ञांची लक्षणें न जाणणारे अविद्वान् त्या निष्क्रिय आत्मज्ञाला जड व मूढ मानून जर त्याचा अवमान करूं लागले तर त्यानें त्या अवमानाने संतप्तहि होऊं नये.

(तर मग,दुसऱ्याकडून पूजित व अवमानित झालेल्या त्या विद्वानानें आपल्या मनांत काय समजावे ते आतां सनत्सुजात सांगतात-) नेत्रांच्या निमेषोन्मेषाप्रमाणें- उघड झांपीप्रमाणें 'पूज्यांची पूजा करणें' हा विद्वानांचा स्वभावच आहे. त्याला अनुसरून ते माझा आदर करतात, त्यांत काय आश्चर्य आहे, असें मानून ब्रह्मवेत्त्याने हष्ट होऊं नये. त्याचप्रमाणे लौकिक व शास्त्रीय मर्यादेचे उलंघन करणारे अधर्मज्ञ मूढ मान्यांचा मान ठेवीत नाहींत; कारण त्यांचाहि तो स्वभावच आहे, त्यांत तरी काय आश्चर्य आहे; असें समजून त्यानें संतप्त होऊं नये.

( आतां मान व मौन यांचे विषय पृथक् आहेत, असें दाखविण्यासाठी सनत्सुजात म्हणतात- ) हे राजा, मान आणि मौन हीं एकत्र कधीं रहात नाहींत. हा प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय होणारा प्रपंच मानाचा विषय आहे व ब्रह्म हा मौनाचा विषय आहे. मानानें संसारप्राप्ति व मौनाने ब्रह्मप्राप्ति होते. जो पुरुष प्रपंचामध्यें आसक्त असतो, त्याला ब्रह्मप्राप्ति होत नाहीं. कारण जो विषयासक्त पुरुष स्वर्गादि विषयप्राप्तीसाठीं कर्मानुष्ठान करतो, त्या विषयविषांध पुरुषालाच ऐश्वर्य प्राप्त होतें व तें ऐश्वर्यहि श्रेयोमार्गाला विरोध करते आणि जो ऐश्वर्यमदानें विषयांमध्यें प्रवृत्त होतो, त्या विद्याविहीन पुरूषाला ब्रह्यानंदलक्षण ऐश्वर्य दुर्लभ होतें. राजा, आतां मी तुला ब्रह्मानंदलक्षण ऐश्वर्याच्या प्राप्तीची साधने सांगतो. ब्राह्मी लक्ष्मीमध्यें प्रवेश करण्याची द्वारें अनेक आहेत व साधु ब्राह्मण तीं दुश्चर आहेत, असें म्हणतात. यथार्थ संभाषण व भूतहित हे सत्य, अकुटिलता हे आर्जव, अकार्याविषयीं लज्जा ही ह्री, अंतर्बहिरिंद्रियांची उपरति हा दम, दोषप्रक्षालन हें शौच व ब्रह्मविद्या, ही सहा दुश्चर साधने मान-मोहादि दोषांना प्रतिबंध करणारी असून तींच ब्रह्मश्रीमध्ये प्रवेश करण्याची साधने आहेत.


GO TOP