भगवान व्यासकृत् 'महाभारत' या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मतत्त्वासंबंधी विवेचन आढळते. महाभारताच्या उद्योगपर्वांतील अध्याय ४१ ते ४६ इथेही ब्रह्मतत्त्वाविषयी चर्चा आढळते. या भागाला 'सनत्सुजातीय' पर्व असे नांव दिले आहे. या सहा अध्यायांत विदुराच्या विनंतीवरून सनत्कुमारांनी राजा धृतराष्ट्राला ब्रह्मविद्येचे गुह्यज्ञान सांगितले आहे -
सनत्सुजातीय
अध्याय ३ रा
धृतराष्ट्र उवाच
कस्यैष मौनं कतरन्नु मौनं
प्रब्रूहि विद्वन्निह मौनभावम् ।
मौनेन विद्वानुत याति मौनं
कथं मुने मौनमिहाचरन्ति ॥ १ ॥
सनत्सुजात उवाच
यतो न वेदा मनसा सहैन-
मनुप्रविशन्ति ततोऽथ मौनम् ।
यत्रोत्थितो वेदशब्दस्तथायं
स तन्मयत्वेन विभाति राजन् ॥ २ ॥
धृतराष्ट्र उवाच
ऋचो यजूंषि यो वेद सामवेदं च वेद यः ।
पापानि कुर्वन् पापेन लिप्यते किं न लिप्यते ॥ ३ ॥
सनत्सुजात उवाच
नैनं सामान्यृचो वापि न यजूंष्यविचक्षणम् ।
त्रायन्ते कर्मणः पापान्न ते मिथ्या ब्रवीम्यहम् ॥ ४ ॥
न छन्दांसि वृजिनात् तारयन्ति
मायाविनं मायया वर्तमानम् ।
नीडं शकुन्ता इव जातपक्षा-
श्छन्दास्येनं प्रजहत्यन्तकाले ॥ ५ ॥
धृतराष्ट्र उवाच
न चेद् वेदा विना धर्मं त्रातुं शक्ता विचक्षण ।
अथ कस्मात् प्रलापोऽयं ब्राह्मणानां सनातनः ॥ ६ ॥
सनत्सुजात उवाच
तस्यैव नामादिविशेषरूपै-
रिदं जगद् भाति महानुभाव ।
निर्दिश्य सम्यक् प्रवदन्ति वेदा-
स्तद्विश्ववैरूप्यमुदाहरन्ति ॥ ७ ॥
तदर्थमुक्तं तप एतदिज्या
ताभ्यामसौ पुण्यमुपैति विद्वान् ।
पुण्येन पापं विनिहत्य पश्चात्
संजायते ज्ञानविदीपितात्मा ॥ ८ ॥
ज्ञानेन चात्मानमुपैति विद्वा-
नथान्यथा वर्गफलानुकाङ्क्षी ।
अस्मिन् कृतं तत् परिगृह्य सर्व-
ममुत्र भुङ्क्ते पुनरेति मार्गम् ॥ ९ ॥
अस्मिँल्लोके तपस्तप्तं फलमन्यत्र भुज्यते ।
ब्राह्मणानामिमे लोका ऋद्धे तपसि तिष्ठताम् ॥ १० ॥
धृतराष्ट्र उवाच
कथं समृद्धममृद्धं तपो भवति केवलम् ।
सनत्सुजात तद् ब्रूहि यथा विद्याम तद् वयम् ॥ ११ ॥
सनत्सुजात उवाच
निष्कल्मषं तपस्त्वेतत् केवलं परिचक्षते ।
एतत् समृद्धमप्यृद्धं तपो भवति केवलम् ॥ १२ ॥
तपोमूलमिदं सर्वं यन्मां पृच्छसि क्षत्रिय ।
तपसा वेदविद्वांसः परं त्वमृतमाप्नुयुः ॥ १३ ॥
धृतराष्ट्र उवाच
कल्मषं तपसो ब्रूहि श्रुतं निष्कल्मषं तपः ।
सनत्सुजात येनेदं विद्यां गुह्यं सनातनम् ॥ १४ ॥
सनत्सुजात उवाच
क्रोधादयो द्वादश यस्य दोषा-
स्तथा नृशंसानि दशत्रि राजन् ।
धर्मादयो द्वादशैते पितॄणां
शास्त्रे गुणा ये विदिता द्विजानाम् ॥ १५ ॥
क्रोधः कामो लोभमोहौ विधित्सा
कृपासूये मानशोकौ स्पृहा च ।
ईर्ष्या जुगुप्सा च मनुष्यदोषा
वर्ज्याः सदा द्वादशैते नराणाम् ॥ १६ ॥
एकैकः पर्युपास्ते ह मनुष्यान् मनुजर्षभ ।
लिप्समानोऽन्तरं तेषां मृगाणामिव लुब्धकः ॥ १७ ॥
विकत्थनः स्पृहयालुर्मनस्वी
बिभ्रत् कोपं चपलोऽरक्षणश्च ।
एतान् पापाः षण्नराः पापधर्मान्
प्रकुर्वते नो त्रसन्तः सुदुर्गे ॥ १८ ॥
सम्भोगसंविद् विषमोऽतिमानी
दत्तानुतापी कृपणो बलीयान् ।
वर्गप्रशंसी वनितासु द्वेष्टा
एते परे सप्त नृशंसवर्गाः ॥ १९ ॥
धर्मश्च सत्यं च दमस्तपश्च
अमात्सर्यं ह्रीस्तितिक्षानसूया ।
यज्ञश्च दानं च धृतिः श्रुतं च
व्रतानि वै द्वादश ब्राह्मणस्य ॥ २० ॥
यस्त्वेतभ्यः प्रववेद् द्वादशभ्यः
सर्वामपीमां पृथिवीं स शिष्यात् ।
त्रिभिर्द्वाभ्यामेकतो वार्थितो य-
स्तस्य स्वमस्तीति स वेदितव्यः ॥ २१ ॥
दमस्त्यागोऽप्रमादश्च एतेष्वमृतमाहितम् ।
तानि सत्यमुखान्याहुर्ब्राह्मणा ये मनीषिणः ॥ २२ ॥
दमोऽष्टादशगुणः प्रतिकूलं कृताकृते ।
अनृतं चाभ्यसूया च कामार्थौ च तथा स्पृहा ॥ २३ ॥
क्रोधः शोकस्तथा तृष्णा लोभः पैशुन्यमेव च ।
मत्सरश्च विहिंसा च परितापस्तथारतिः ॥ २४ ॥
अपस्मारश्चातिवादस्तथा सम्भावनाऽऽत्मनि ।
एतैर्विमुक्तो दोषैर्यः स दान्तः सद्भिरुच्यते ॥ २५ ॥
मदोऽष्टादशदोषः स्यात्त्यागो भवति षड्विधः ।
विपर्ययाः स्मृता एते मददोषा उदाहृताः ॥ २६ ॥
श्रेयांस्तु षड्विधस्त्यागस्तृतीयो दुष्करो भवेत् ।
तेन दुःखं तरत्येव भिन्नं तस्मिन् जितं कृते ॥ २७ ॥
श्रेयांस्तु षड्विधस्त्यागः श्रियं प्राप्य न हृष्यति ।
इष्टापूर्ते द्वितीयं स्यान्नित्यवैराग्ययोगतः ॥ २८ ॥
कामत्यागश्च राजेन्द्र स तृतीय इति स्मृतः ।
अप्यवाच्यं वदन्त्येतं स तृतीयो गुणः स्मृतः ॥ २९ ॥
त्यक्तैर्द्रव्यैर्यद् भवति नोपयुक्तैश्चः कामतः ।
न च द्रव्यैस्तद् भवति नोपयुक्तैश्च कामतः ॥ ३० ॥
न च मर्मस्वसिद्धेषु दुःखं ते न च न ग्लपेत् ।
सर्वैरेव गुणैर्युक्तो द्रव्यवानपि यो भवेत् ॥ ३१ ॥
अप्रिये च समुत्पन्ने व्यथां जातु न गच्छति ।
इष्टान् पुत्रांश्च दारांश्च न याचेत कदाचन ॥ ३२ ॥
अर्हते याचमानाय प्रदेयं तच्छुभं भवेत् ।
अप्रमादी भवेदेतैः स चाप्यष्टगुणो भवेत् ॥ ३३ ॥
सत्यं ध्यानं समाधानं चोद्यं वैराग्यमेव च ।
अस्तेयं ब्रह्मचर्यं च तथा संग्रहमेव च ॥ ३४ ॥
एवं दोषा मदस्योक्तास्तान् दोषान् परिवर्जयेत् ।
तथा त्यागोऽप्रमादश्च स चाप्यष्टगुणो मतः ॥ ३५ ॥
अष्टौ दोषाः प्रमादस्य तान्दोषान् परिवर्जयेत् ।
इंद्रियेभ्यश्च पञ्चभ्यो मनसश्चैव भारत ।
अतीतानागतेभ्यश्च मुक्त्युपेतः सुखी भवेत् ॥ ३६ ॥
सत्यात्मा भव राजेन्द्र सत्ये लोकाः प्रतिष्ठिताः ।
तांस्तु सत्यमुखानाहुः सत्ये ह्यमृतमाहितम् ॥ ३७ ॥
निवृत्तेनैव दोषेण तपो व्रतमिहाचरेत् ।
एतद् धातृकृतं वृत्तं सत्यमेव सतां व्रतम् ॥ ३८ ॥
दोषैरेतौर्वियुक्तस्तु गुणैरेतैः समन्वितः ।
एतत् समृद्धमत्यर्थं तपो भवति केवलम् ॥ ३९ ॥
यन्मां पृच्छसि राजेंद्र संक्षेपात् प्रब्रवीमि ते ।
एतत् पापहरं पुण्यं जन्ममृत्युजरापहम् ॥ ४० ॥
धृतराष्ट्र उवाच
आख्यानपञ्चमैर्वेदैर्भूयिष्ठं कथ्यते जनः ।
तथा चान्ये चतुर्वेदाः त्रिवेदाश्च तथापरे ॥ ४१ ॥
द्विवेदाश्चैकवेदाश्चाप्यनृचश्च तथा परे ।
तेषां तु कतरः स स्याद् यमहं वेद वै द्विजम् ॥ ४२ ॥
सनत्सुजात उवाच
एकस्य वेदस्याज्ञानाद् वेदास्ते बहवः कृताः ।
सत्यस्यैकस्य राजेन्द्र सत्ये कश्चिदवस्थितः ॥ ४३ ॥
एवं वेदमविज्ञाय प्राज्ञोऽहमिति मन्यते ।
दानमध्ययनं यज्ञो लोभादेतत् प्रवर्तते ॥ ४४ ॥
सत्यात् प्रच्यवमानानां सङ्कल्पश्च तथा भवेत् ।
ततो यज्ञः प्रतायेत सत्यस्यैवावधारणात् ॥ ४५ ॥
मनसान्यस्य भवति वाचान्यस्याथ कर्मणा ।
सङ्कल्पसिद्धः पुरुषः सङ्कल्पानधितिष्ठति ॥ ४६ ॥
अनैभृत्येन चैतस्य दीक्षितव्रतमाचरेत् ।
नामैतद्धातुनिर्वृत्तं सत्यमेव सतां परम् ॥ ४७ ॥
ज्ञानं वै नाम प्रत्यक्षं परोक्षं जायते तपः ।
विद्याद् बहु पठन्तं तु द्विज वै बहुपाठिनम् ॥ ४८ ॥
तस्मात् क्षत्रिय मा मंस्था जल्पितेनैव वै द्विजम् ।
य एव सत्यान्नापैति स ज्ञेयो ब्राह्मणस्त्वया ॥ ४९ ॥
छन्दांसि नाम क्षत्रिय तान्यथर्वा
पुरा जगौ महर्षिसङ्घ एषः ।
छंदोविदस्ते य उत नाधीतवेदा
न वेदवेद्यस्य विदुर्हि तत्त्वम् ॥ ५० ॥
छंदांसि नाम द्विपदां वरिष्ठ
स्वच्छंदयोगेन भवन्ति तत्र ।
छंदोविदस्तेन च तानधीत्य
गता न वेदस्य न वेद्यमार्याः ॥ ५१ ॥
न वेदानां वेदिता कश्चिदस्ति
कश्चित् त्वेतान् बुद्ध्यते वापि राजन्
यो वेद वेदान् न स वेद वेद्यं
सत्ये स्थितो यस्तु स वेद वेद्यम् ॥ ५२ ॥
न वेदानां वेदिता कश्चिदस्ति
वेद्येन वेदं न विदुर्न वेद्यम् ।
यो वेद वेदं स च वेद वेद्यं
यो वेद वेद्यं न स वेद सत्यम् ॥ ५३ ॥
यो वेद वेदान् स च वेद वेद्यं
न तं विदुर्वेदविदो न वेदाः ।
तथापि वेदेन विदन्ति वेदं
ये ब्राह्मणा वेदविदो भवन्ति ॥ ५४ ॥
धामांशभागस्य तथा हि वेदा
यथा च शाखा हि महीरुहस्य ।
संवेदने चैव यथाऽऽमनन्ति
तस्मिन् हि सत्ये परमात्मनोऽर्थे ॥ ५५ ॥
अभिजानामि ब्राह्मणं व्याख्यातारं विचक्षणम् ।
यश्छिन्नविचिकित्सः स व्याचष्टे सर्वसंशयान् ॥ ५६ ॥
नास्य पर्येषणं गच्छेत् प्राचिनं नोत दक्षिणम् ।
नार्वाचिनं कुतस्तिर्यङ् नादिशं तु कथञ्चन ॥ ५७ ॥
तस्य पर्येषणं गच्छेत् प्रत्यर्थिषु कथञ्चन ।
अविचिन्वन्निमं वेदे तपः पश्यति तं प्रभुम् ॥ ५८ ॥
तूष्णीम्भूत उपासीत न चेष्टेन्मनसापि च ।
उपावर्तस्व तद् ब्रह्म अन्तरात्मनि विश्रुतम् ॥ ५९ ॥
मौनान्न स मुनिर्भवति नारण्यवसनान्मुनिः ।
स्वलक्षणं तु यो वेद स मुनिः श्रेष्ठ उच्यते ॥ ६० ॥
सर्वार्थानां व्याकरणाद् वैयाकरण उच्यते ।
तन्मूलो व्याकरणां व्याकरोतीति तत् तथा ॥ ६१ ॥
प्रत्यक्षदर्शी लोकानां सर्वदर्शी भवेन्नरः ।
सत्ये वै ब्राह्मणस्तिष्ठंस्तद् विद्वान् सर्वविद् भवेत् ॥ ६२ ॥
धर्मादिषु स्थितोऽप्येवं क्षत्रिय ब्रह्म पश्यति ।
वेदानां चानुपूर्व्येण एतद्बुद्ध्या ब्रवीमि ते ॥ ६३ ॥
॥ इति श्रीमहाभारते उद्योगपर्वणि सनत्सुजातपर्वणि
सनत्सुजातवाक्ये त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४३ ॥
धृतराष्ट्र व सनत्सुजात यांची प्रश्नोत्तरे -
धृतराष्ट्र - भगवन्, कशा प्रकारच्या पुरुषाला हा वागादि - उपरति - लक्षण मौनभाव प्राप्त होतो ! अभाषण व आत्मस्वरूप यांतील तुम्हांला विवक्षत असलेलें मौन कोणतें ! मौन म्हणजे तूष्णींभाव - वाणीचा निरोध असें आम्हांला माहीत आहे. यास्तव या तूष्णींभावाने विद्वान् ब्रह्माला प्राप्त होतो कीं, दुसऱ्या एखाद्या मौनानें त्यला मोक्ष मिळतो ? हे मुने, मुमुक्षु ब्राह्मण या लोकी मौनाचें आचरण कसें करतात ?
सनत्सुजात- राजा, वेद मनासह या परमात्म्याला विषय करूं शकत नाहींत. कारण उपनिषदेंही या परमात्म्याचा साक्षात् वाक्यवृत्तीनें - मुख्यवृत्तीनें बोध करूं शकत नाहींत आणि मनहि त्याचा निश्चय करू शकत नाही. म्हणूनच त्या परमात्म्याला 'वाङ्मनसातीत' असे म्हणतात. यास्तव वाणीचा विषय न होणारा परमात्मा हेंच मौन आहे. जेथून वेदरूप शब्द उत्पन्न झाला व ज्याच्यामध्ये स्थित होऊन तो आपला निमित्तभूत अर्थ प्रकट करतो, ते शास्त्रादिकांचें कारणच ब्रह्म आहे. त्य मुळें हा 'वेद' - शब्दप्रतिपाद्य परमात्मा ज्ञानरूप आहे. पण 'तो जर वाणीचा अविषय आहे, तर तो ज्ञानरूप आहे, हे तरी कसें कळतें !' म्हणून विचारशील तर हे क्षत्रियश्रेष्ठा, तो संविन्मय- ज्योतिर्मय - ज्ञानमय, असाच आमच्या अनुभवाला येतो. आम्हांला परमात्म्याचा अनुभव ज्योतिर्मयत्वाने येत असल्यामुळें तूं माझ्या कथनावर विश्वास ठेव. परमात्मा चिद्रूप आहे, याविषयी अविश्वास करूं नको. कारण श्रुति, स्मृति, इतिहास, पुराण व योगशास्त्र यामध्यें त्याचें चिद्रूपत्वानेंच प्रतिपादन केलेले प्रतीत होतें.
धृतराष्ट्र - जो ब्राह्मण पापाचरण करीत असतांनाहि ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यांचे अध्ययन करतो, तो त्या वेदाध्ययनानें पावन होतो कीं नाहीं तें मला सांगा.
सनत्सुजात - हे विवेकी राजा, पापाचरण करणारा पुरुष ऋवेद, यजुर्वेद व सामवेद या तिन्ही वेदांचे अध्ययन जरी करीत असला तरी ते ऋगादिवेद निषिद्धाचरण करणाराचें रक्षण करूं शकत नाहींत. राजा, हें माझे वचन भयानक किंवा औपचारिक आहे, असें मानू नको. मी हे तुला सत्य सांगत आहें, त्यावर अविश्वास ठेवू नको. कारण वेद पुरुषाचें अधर्मापासून रक्षण करीत नाहींत. एखादा ढोंगी पुरुष लोकांची प्रतारणा करण्यासाठीं सर्व वेदांचे अध्ययन जरी करीत असला तरी तें व्यर्थ होय. पक्ष्यांच्या पिलांना पंख फुटले म्हणजे तीं आपल्या आश्रयभूत घरट्यांना सोडून जशीं निघून जातात, तसे वेद पापीपुरुषाला अंतकालीं सोडून जाततात. ते त्याच्या पुरुषार्थोपयोगी होत नाहींत.
धृतराष्ट्र - भगवन्, नित्य व काम्य कर्में पितृलोकादि प्राप्तीचीं साधनें असल्य्यामुळें त्यांना संसाररूप अनर्थाचें हेतुत्व आहे व प्रतिषिद्ध कर्मांना नरकसाधनत्व असल्यामुळें तीही अनर्थाचीं कारणें आहेत, असें तुम्हीं पूर्वीं सांगितलेच आहे आणि आतां वेदही वेदवेत्त्याचें रक्षण करीत नाही, असें सांगत आहां. पण असें जर आहे, तर 'वेदाध्ययन, तदर्थ विचार व अनुष्ठान करावें' हा ब्राह्मणांचा अनादि वृथालाप कां ऐकूं येतो ?
सतत्सुजात - राजा, वेदाचा जर विधि व निषेध इतकाच असता तर वेद हा ब्राह्मणांचा 'वृथा प्रलाप' झाला असता, पण स्वर्गादिकांहून भिन्न असलेला जो मोक्षसंज्ञक परम पुरुषार्थ, तो मुख्य वेदार्थ आहे. त्याहून जें ज्ञान व त्याचेंही साधन जी अंतःकरणशुद्धि, त्यांचे साधनत्व असल्यामुळें परंपरेनें पुरुषार्थत्व आहे आणि कर्म व उपास्ना हीं परंपरेनें पुरुषार्थाचीं साधनें असल्यामुळें त्यांना वेदप्रतिपाद्यत्व आहे.
आतां परमात्म्यालाच पुरुषार्थत्व कसें म्हणशील, तर बृहदारण्यकांत 'अनात्मज्ञ लोक अंधतमानें व्याप्त असलेल्या स्वर्गादि लोकांस प्राप्त होतात (बृ. ४.४.१०) असें सांगून व 'जो पुरुष परमात्म्यालाच आत्मत्वानें जाणतो, त्याला शोक व संताप देत नाहींत,' असें म्हणून आत्मज्ञाची कृतकृत्यता प्रदर्शित केली आहे. त्याचप्रमाणें आत्मवेत्त्याला अमृतत्वप्राप्ति व अनात्मवेत्त्याला आत्मविनाशरूप अनर्थप्राप्ति सांगितली आहे. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप, याचा साक्षात्कार व त्याचे फल यांचा वारंवार उल्लेख करून भगवान् वेदानें 'मकरादिकांप्रमाणें रागादिकांकडून पीडिल्या जाणार्या या पापी, विषयासक्त पुरुषाला या संसारसागरांतून सोडवून पूर्णानंद मोक्षाख्य परमार्थरूप स्वाराज्यावर मी कसा बरें स्थापन करूं शकेन ?' असा विचार करून मोक्षाच्या प्राप्तीचे साधन जें ज्ञान व ज्ञानाचेंहि साधन जी जिज्ञासा, त्या जिज्ञासेच्या साधनत्वानें यज्ञादिकांचा विनियोग केला आहे आणि ज्या अर्थी वेदांना मोक्ष व मोक्षाची साधने यांचें प्रतिपादकत्व आहे, त्याअर्थी त्यांना संसाररूप अनर्थाचे निवृत्तिहेतुत्वहि आहेच. म्हणून वेद वेदवेत्त्या पुरुषाचें रक्षण करण्यास समर्थ आहेत. अशा आशयाने सनत्सुजात म्हणतात - हे महानुभव राजा धृतराष्ट्रा, त्या परमात्म्याच्या मायापरिकल्पित नामादि विशेषरूपांनी हे जगत् भासतें. हें कशावरून अवगत होतें ? म्हणून विचारशील तर सांगतो. 'परमात्मा आपल्या मायाशक्तींनीं बहुरूप होतो.' अशा बृहदारण्यक वाक्यावरून ते आम्हांला अवगत होतें. ( बृ. भा. २. ५. १९.) श्रुतीने ईश्वराच्या मायानिर्मित बहुरूपत्वाचा असा निर्देश करून पुनः लागलेंच त्याचें 'सर्वविशेषशून्य' चिद्रूपात्मा हें स्वरूपहि सांगितलें आहे.
त्याचप्रमाणे बृहदारण्यकाच्या मूर्तामूर्त ब्राह्मणामध्यें त्याचेंच मूर्तामूर्त सर्व जगत् हें कल्पित स्वरूप सांगून 'नेति नेति' या वाक्याने त्याचे सम्यग्रूप प्रतिपादिले आहे. तसेंच तैत्तिरीयामध्ये आत्म्यापासून आकाशादि पृथ्वीपर्यंत सर्व कार्य उत्पन्न झालें, असें वर्णन करून त्याचेंच वाङ्मनोगोचर सम्यग्रूप सांगितले आहे. छान्दोग्यात नामापासून प्राणापर्यंत मायानिर्मित सर्व जगाचा निर्देश करून शेवटीं सर्व विशेषशून्य भूम-ब्रह्माचा सम्यग्रूपानें उपदेश केला आहे. यावरून सर्व वेद परमात्म्याच्या मायाकल्पित नाम-रूपादिकानीं हें जगत् प्रतीत होतें व तो परमात्मा सर्वविशेषशून्य आहे, असेंच सर्व वेद सांगतात.
राजा, केवल वेदच असें वर्णन करतात असें नाहीं, तर पराशरादि इतर मुनीहि परमात्म्याचे असेंच वर्णन करतात. त्यावरून ईश्वरप्रीत्यर्थ अनुष्ठिलेल्या कर्मांना चित्तशुद्धिद्वारा ज्ञानसाधनत्व असल्यामुळे आणि ज्ञानाने अविद्येची निवृत्ति होऊन परंपरेने तीं (कर्मे) पुरुषार्थाची साधने होत असल्यामुळें ईश्वरार्थ अनुष्ठिलेल्या यज्ञादि कर्मांना पुरुषार्थ आहे. पण जे विषयासक्त पुरुष ईश्वरार्थ कर्मानुष्ठान न करितां स्वर्गादि भोगप्रासीसाठीं त्यांचें अनुष्ठान करतात, त्यांच्या कर्मांना पुरुषार्थत्व नाहीं.
वेदाने विश्वरूपाहून विपरीत असलेलें जें ब्रह्म, त्याच्या प्राप्तीसाठीं कृच्छचांद्रायणादि तप व ज्योतिष्टोमादि यज्ञ ही दोन्ही सांगितली आहेत. त्यांचा पूर्वोक्त विनियोग जाणणारा विद्वान ईश्वरार्थ कर्मानुष्ठान करतो व कर्मजन्य अपूर्वानें - पुण्यानें युक्त होतो. त्या पुण्याने पापाचा क्षय करून निष्पाप होतो. त्यानंतर ज्याचे सर्व पाप क्षीण झाले आहे, असा तो ज्ञानाने ज्याला प्रकाशित केलें आहे, अशा सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्ह० तो आत्मवेत्ता विद्वान् ज्ञानानें परमात्म्यास प्राप्त होतो. पण ज्यानें ईश्वरार्थ कर्मानुष्ठान करून सर्व पापाचा क्षय केलेला नसतो तो ज्ञानी होत नाही. तर तो स्वर्गादि फलांची आकांक्षा करून या लोकीं केलेलें यज्ञादि सर्व कर्म बरोबर घेऊन परलोकीं जातो व त्याच्या फलाचा उपभोग घेतो आणि अवशिष्ट राहिलेल्या कर्मानें पुनः संसारात पडतो. अर्थात् या लोकीं केलेलें जें तप, त्याचें फल परलोकामध्यें भोगणें हें सर्वांना समान आहे, पण ब्रह्मवेत्त्या ब्राह्मणांचे तप अतिशय समृद्ध होतें म्ह० फलाच्या वृद्धीला कारण होतें. पण जे विषयीं अनात्मवेत्ते असतात, त्यांच्या तपाची समृद्धी होत नाही. तर ज्या कर्माचें जें फल श्रुत असतें, तेवढेंच फल त्यांना मिळते. त्याची समृद्धी होत नाही.
धृतराष्ट्र - भगवन्, केवल तप अत्यंत समृद्ध कसें होतें, ते मला सांगा.
सनत्सुजात - राजा धृतराष्त्रा, जें तप पापरहित असतें, त्यालाच 'केवल' असे म्हणतात. जें या सर्व प्रपंचाचें निमित्तभूत तप, त्यालाच केवल असे म्हटलें आहे. कारण उशनाकवीनें गुणसाम्यामध्यें स्थित असलेल्या तत्त्वाला 'केवल' असे म्हटले जाते व त्या केवलापासूनच हे सर्व सदसदात्मक जगत् उत्पन्न झाले, असें म्हटले आहे. तें हे केवल तपच अत्यंत समृद्धीला कारण होते. गुणांच्या साम्यामध्यें स्थित नसलेले तप निष्कल्मष होऊं शकत नाहीं. सत्त्वादि गुणांतील कोणत्याही गुणानें युक्त असलेले तप हें सकल्म तप होय. ते अत्यंत समृद्धीला कधींही प्राप्त होत नाहीं.
हे क्षत्रिया, तूं मला जें विचारीत आहेस, तें हें तप होय व त्या तपोमूलच हें सर्व आहे. आजपर्यंत अनेक वेदवेत्ते तपाच्याच योगानें श्रेष्ठ अमृतत्वाला प्राप्त झाले आहेत.
धृतराष्ट्र- भगवन्, निष्कल्मष तपाला केवल तप म्हणतात, असें आपण सांगितलें. पण तपाचें कल्मष कोणतें, तें मला सांगा, म्हणजे मी निष्कल्मष तपानें गुह्य सनातन ब्रह्माला जाणीन.
सनत्सुजात- राजन्, या तपाचे क्रोधादि बारा दोष आहेत व सात नृशंसे आहेत. तसेंच, वेदशास्त्रांमध्यें सविस्तर वर्णिलेले ज्ञानादि बारा गुण आहेत. यास्तव मी हे तपाचे शास्त्रोक्त बारा गुण व एकोणीस दोष सांगतो. ते ऐक.
१ क्रोध हा तपाचा पहिला दोष आहे. तो कामाला प्रतिबंध झाला असतां उत्पन्न होतो. तो दुसऱ्याला ताडन करणें, शिव्या देणे इत्यादि क्रिया करवितो. शरीराला घाम व कंप सुटणे, दृष्टि क्रूर होणें इत्यादि त्याची बाह्म लिंगे आहेत. क्रोध हा अंतःकरणाचा विक्षेप आहे. २ स्त्रियादि विषयांचा अभिलाष हा काम. ३ परद्रव्येच्छा किंवा संपादन केलेल्या द्रव्याचा योग्य स्थानीं विनियोग करण्याचें धैर्य नसणे हा लोभ. ४ कर्तव्याकर्तव्याचा विवेक न होणें हा मोह; ५ विषय-रसांच्या सेवनाची इच्छा ही विवित्सा; ६ अकृपा- निखुरता, ७ असूया- दुसऱ्याचे गुण दोषरूपानें प्रकट करणें किंवा परकीय गुणादि सहन न होणें; ८ आत्मबहुमानित्व- स्वतःला मोठा मानणे हा मान; ९ इष्ट वस्तूचा वियोग झाला असतां अंतःकरणाला होणारा जो विक्षेप- रोदन, चिंतन इत्यादि ज्याची बाह्य चिन्हें आहेत, तो शोक. १० विषयभोगेच्छा ही स्पृहा, ११ दुसऱ्याच्या ऐश्वयाविषयीं असहिष्णुता हीच ईर्ष्या, १२ दुसऱ्याच्या गुणाचा निषेध करण्याची इच्छा किंवा बीभत्सा हीच जुगुप्सा; असे हे क्रोधादि बारा दोष तपाचें कल्मष आहे. महागुणवान् ब्राह्मणाने त्याला सदा वर्ज करावे.
ब्राह्मणाच्या ठिकाणी उत्कृष्ट गुणांचा योग स्वभावतःच सिद्ध असतो. किंवा ब्रह्मप्राप्ति हाच महागुण होय. त्या ब्रह्मप्राप्तिलक्षण महागुणानें युक्त असलेल्या पुरुषाने सर्वदा या क्रोधादि दोषांना वर्ज करावे. कारण जसा व्याध मृगांचे छिद्र शोधीत त्यांच्या मागोमाग धांवत असतो व त्यांचें छिद्र आढळताच त्यांना मारतो, त्या प्रमाणें या बारा दोषांतील प्रत्येक दोष त्या मनुष्याचे रन्धान्वेषण करीत प्रत्येक मनुष्याला अनुसरतो व छिद्र सांपडतांच त्यांचा घात करतो. यास्तव क्रोधादिकांतील प्रत्येक दोष विनाशाचे कारण आहे आणि ज्याअर्थी असें आहे, त्याअर्थी त्यांना सर्वदा वर्ज करावें.
आतां मीं पूर्वी ज्यांचा उल्लेख केला आहे, ते नृशंससप्तक कोणतें सें सांगतो, ऐक. १ सभोगसंविद्- ज्याची बुद्धि विषयभोगांतच आसक्त असते, तो संभोगसंविद्; २ 'विषमेधमानः' - विषाप्रमाणे इतरांना पीडा देऊन वृद्धि पावणारा (अथवा 'द्विषमेधमानः' हा पाठ घेतल्यास त्याचा अर्थ प्राण्यांना द्वेष्य-अप्रिय असलेलें कर्म करून त्यांच्या द्वारा वृद्धि पावणारा;) ३ पूर्वी धर्मबुद्ध्या धनादिक देऊन मागून मीं हें कशाला दिलें, असें म्हणून संतप्त होणारा दत्तानुतापी. ४ जो अत्यंत क्षुद्र लाभासाठी सर्वांनीं केलेला अवमान सहन करतो तो कृपण; ५ ज्ञानबलशून्य असलेला अबलीयान्; ५ इंद्रियवर्गाची प्रशंसा करणारा वर्गप्रशंसी; व ७ जो आपल्यावरच अवलंबून असलेल्या अनन्यशरण भार्येचा द्वेष करतो तो वनिताद्वेष्टा; असे हे सात पुरुष पूर्वोक्त क्रोधादिकांहून भिन्न व नृशंसरूप आहेत.
आतां ज्ञानादि बारा गुण सांगतो ते ऐक- - तत्त्वार्थज्ञान; २ यथार्थ व सूतांना हितावह भाषण, हें सत्य; ३ मनाचे दमन, हा दम; ४ अध्यात्मशास्त्रश्रवण, हें श्रुत; ५ सर्व भूतांविषयी सहनशीलता, हें अमात्सर्य; ६ अकार्याविषयीं लजा, हीच ह्री; ७ द्वंद्वसहिष्णुता, ही तितिक्षा; ८ परदोषांचें आविष्करण न करणें, ही अनसूया; ९ ज्योतिष्टोमादि यज्ञ व ब्रह्मयज्ञादि महायज्ञ, हाच यज्ञ; १० ब्राह्मणांना धनादि देणे, हेंच दान; ११ विषय संनिध असतांनाहि इंद्रियांचा निग्रह हीच धृति; व १२ अंतःकरणाचीउपरति - शांति हाच शम; हीं ज्ञानादि बारा व्रतें ब्राह्मणांच्या पुरुषार्थांची साधने होतात.
याप्रमाणे ज्ञानादि बारा गुण सांगून सनत्सुजात त्यांची स्तुति करतात- जो ब्राह्मण या गुणांनी युक्त असतो व त्यांच्याशी केव्हांहि वियुक्त होत नाहीं, तो या सर्व पृथ्वीला स्ववश करून घेतो. किंबहुना या बारा गुणांतील तीन, दोन किंवा एका गुणानेंहि युक्त असलेले पुरुष क्रमाने ज्ञानी व ब्रह्मभूत होतात.
राजा, आतां मी तुला दमाचे दोष सांगतो ते लक्षपूर्वक ऐकून ठेव. दम हा एकच दोष दुसऱ्या अठरा दोषांनीं युक्त असतो. त्यांचें दोषत्व तें कोणतें, म्हणून विचारशील तर तेहि सांगतों - मी आतां तुला जे अनृतादि अठरा दोष सांगणार आहें, त्यांतील एक दोष जरी आचरला, तरी दमाच्या प्रतिकूल आचरण केल्यासारखे होतें. तें कोणतें म्हणून म्हणशील तर सांगतो, ऐक.
१ अनृत - अयथार्थ वचन; २ पैशुन - परदूषणवचन; ३ तृष्णा - विषयप्रातीची इच्छा; ४ प्रातिकूल्य - सर्वांची प्रतिकूलता; ५ तम - अज्ञान; ६ अरति - प्राप्त झालेल्या लाभाने संतुष्ट न होणें, किंवा स्त्रियादि विषयभोगांनी तृप्त न होणें; ७ लोकद्वेष - लोकांना उद्वेग होईल असें आचरण करणें; ८ अभिमान - कोणापुढेंहि नम्र न होणें; ९ विवाद - लोकांशीं कलह करणें; १० प्राणिपीडन - स्वदेहाच्या पूर्तीसाठीं प्राण्यांची हिंसा करणें; ११ परीवाद - दुसऱ्यांच्या समक्ष त्यांच्या दोषांचे कथन करणें; १२ अतिवाद - व्यर्थ प्रलाप; १३ परिताप - वृथा दुखचिंतन करणें; १४ अक्षमा - द्वंद्वविषयक असहिष्णुता; १५ अधृति - इंद्रियसंबंधी चपलता; १६ धर्म, ज्ञान व वैराग्य यांची असिद्धि; १७ पापकृत्य - निषिद्ध आचरण व १८ अविहित हिंसा; अत्रे हे दमाचे अठरा दोष सांगितले आहेत. या अठरा दोषांनीं रहित असलेला जो गुण तोच दम होय, असें विद्वान् समजतात.
मदाचेहि अठरा दोष आहेत व त्याग षड्विध आहे. वर 'दमाचे दोष' असे म्हणून अनृतादि- हिंसान्त ज्या दोषांचें संकीर्तन केलें, तेच त्यांच्या विपरीत झाल्यास मदाचे दोष होतात. अनृताच्या उलट १ सत्य, २ अपैशुन, ३ अतृष्णा, ४ अप्रातिकूल्य, ५ ज्ञान, इत्यादि हे पूर्वोक्त विपरीत पदार्थ मदाचे दोष म्हणजे मदाचा नाश करणारे म्हणून सांगितले आहेत.
राजा, मीं तुला त्याग सहा प्रकारचा आहे, असें म्हटलें. तो षड्विध त्याग अतिशय श्रेष्ठ आहे. पण त्यांतील तिसरा त्याग तर अत्यंत दुष्कर आहे. पुरुष त्या तिसऱ्या त्यागाने आध्यात्मिकादि त्रिविध तापाचे निश्चयानें उलंधन करून जातात. तो त्याग केला असतां सर्व जिंकल्यासारखे होतें. पण ते त्याग कोणते म्हणून विचारशील तर सांगतो --
१ याचना करणाऱ्या योग्य पुरुषाला पुत्र व वित्त यांचें दान करणें, हा पहिला त्याग होय; २ श्रौतकर्मामध्यें व स्मार्तकर्मामध्यें दिलेलें जें दान, त्याला क्रमाने इष्ट + पूर्त = इष्टापूर्त असें म्हणतात. कोणी देवांना उद्देशून दान देणे हे इष्ट व पितरांना उद्देशून देणे हें पूर्त असें म्हणतात. ज्याचे चित्त शुद्ध झाले असून जो पदार्थांतील अनित्यत्वादि दोष जाणतो, त्या पुरुषाने विरक्त होऊन धनादिकांचा व कामांचा त्याग करणे हा तिसरा त्याग होय. पण या त्यागाच्या योगाने काय होतें म्हणून विचारशील तर सांगतो.
या त्यागांनीं पुरुष अप्रमादी होतो व हा अप्रमाद आठ गुणांनी युक्त आहे. १ सत्य, २ ध्यान म्ह० सूर्यमंडलस्थ नारायणादि कोणत्याहि शुभपदार्थामध्ये चित्ताची अविच्छिन्न प्रवृत्ति ठेवणे; ३ समाधान म्ह० प्रणवोच्चारानें विश्व, तैजस व प्राज्ञ या तीन अवस्थांच्या अभिमानी जीवाचा उपसंहार करून स्वाभाविक चित्सदानंद अद्वितीय ब्रह्मरूपानें अवस्थित होणें; ४ चोद्य- मी कोण, कोणाचा, कोठून आलों, इत्यादि प्रश्न; ५ वैराग्य - ऐहिक व पारलौकिक विषयांविषयी अप्रीति; ६ अस्तेय - आत्म्याचा किंवा परकीय द्रव्याचा अपहार न करणें; आत्मा निर्विशेष चैतन्यरूप असतांना त्याला शरीरेंद्रियादिरूप समजणे, हेंच आत्मचौर्य होय; ७ ब्रह्मचर्य; ८ असंग्रह - पुत्र, स्त्री, क्षेत्र इत्यादिकांचा परिग्रह न करणें. या आठ गुणांचे नियमानें परिपालन करावे.
याप्रमाणे दमाचे दोष सांगितले. त्या दोषांचे परिमार्जन करावे. त्या अठरा दोषांचा त्याग केला असतां पुरुष प्रमाद करीत नाहीं. अनात्म्याला आत्मा समजणे हाच मुख्य प्रमाद होय. तो अप्रमादहि कोणत्या आठ गुणांनीं युक्त असतो तें वर सांगितलेंच आहे. हे राजेंद्रा, तूं सत्यात्मा हो. सत्यस्वरूप हो. सत्यामध्येच सर्व लोक प्रतिष्ठित आहेत. कारण, सर्व विद्वान् सत्याधीन आहेत, सत्यामुळेच त्यांचे अस्तित्व सिद्ध होतें, असें सांगतात. सत्यामध्येंच असा मोक्षहि स्थित आहे.
धृतराष्ट्रा, मीं वर जे दोष सांगितले आहेत, त्यांच्यापासून निवृत्त होऊन म्ह० त्यांचा त्याग करून या लोकी तप व व्रते यांचें आचरण करावे. परमेश्वराने ब्राह्मणासाठीं सत्य हेंच वित्त उत्पन्न केलें आहे. साधूंचे सत्यच श्रेष्ठ आहे. राजा, या पूर्वोक्त दोषांनीं रहित व गुणांनीं युक्त असें जें अत्यत समृद्ध तप तेंच केवल तप होय. किंबहुना तूं जें मला विचारीत आहेस, तेंच मी तुला संक्षेपतः सांगतो. आतां मी तुला जें सांगणार आहें, तें अत्यंत शुद्ध, पापहर आणि जन्म, मृत्यू व जरा यांची निवृत्ति करणारे आहे.
हे भारता, विषयांसह पंचेंद्रियांपासून आणि अतीत व अनागत म्ह० भूत व भविष्यत् विषयांचे चिंतन करणाऱ्या मनापासून मुक्त झालेला जीव सुखी होतो. इंद्रियांना वर्तमानकालीन विषयांपासून व मनाला भूत-भविष्यत् विषयांपासून निवृत्त करणारा पुरुष मुक्तच आहे, असें समज.
धृतराष्ट्र- भगवन्, पुराणांसह वेदांचे अध्ययन करणाऱ्या पुरुषाची अतिशय ख्याति होते; व तो स्वतःहि मी सर्वाहून अधिक विद्वान् आहें, असे समजतो. काहीं चतुर्वेदी असतात, कोणी त्रिवेदी व कित्येक द्विवेदी असतात. कांहीं लोकांनी एकाच वेदाचे अध्ययन केलेले असतें व दुसऱ्या कित्येकांनीं तर ऋग्वेदादि वेदांचें अध्ययनच केलेले नसतें. अशा या विविध मनुष्यांमध्यें श्रेष्ठ कोण आहे, तें मला सांगा. म्ह० हे त्यालाच मी बाह्मण मानीन.
राजाचा हा प्रश्न ऐकून 'जो स्वाभाविक चित्सदानंद अद्वितीय ब्रह्मस्वरूपाने अधिष्ठित होतो, तोच ब्राह्मण होय' असें सांगण्याच्या आशयानें सनत्सुजात म्हणतात - ' राजा, एका वेदाच्या अज्ञानामुळे ऋगादि अनेक वेद झाले आहेत. तो एक वेद कोणता म्हणून विचारशील तर सांगतों. ज्या पदार्थाचा 'इदं- हा, ही, हें' अशा रूपाने निर्देश करतां येतो, तें वेद्य. त्यालाच 'इदं- रूप' असें म्हणतात. हें इदंरूप जड, अनात्म, विकार व विनाशी असतें व सर्व वेद्याला जें जाणते तें वेदन. त्याला 'अनिदंरूप' - चित्, संविद्, ज्ञप्ति इत्यादि म्हणतात. हें वेदन म्हणजेच वेद होय. हा वेद एक, अद्वितीय व संविद्रूप आहे. अशा या एकवेदरूप ब्रह्माचा बोध न झाल्यामुळें ऋक्, यजुः, साम इत्यादि अनेक वेद झाले. हे ऋगादि वेद, एकवेदरूप ब्रह्माच्या ज्ञानासाठी विचार करतात. म्हणून त्यांना 'वेद' हें नांव प्राप्त झालें आहे. किंवा ते आत्म्याचा सद्धाव साधतात, म्हणून वेद. किंवा ते जाणतात, ते ज्ञानसाधनभूत आहेत, म्हणून वेद. किंवा ब्रह्मामुळें त्यांना आत्मभाव प्राप्त होतो, अथवा ते ब्रह्माचा आत्मत्वानें लाभ होण्यास कारण होतात, म्हणून वेद. कारण 'विद्' हा धातु विचार, सत्ता, ज्ञान व लाभ या अर्थीं पठित आहे. या चार अर्थीं पठित असलेल्या चार प्रकारच्या 'विद्' - धातूपासून निष्पन्न झालेला 'वेद' हा शब्द त्या त्या अर्थीं प्रवृत्त होतो. म्हणून ऋगादि हे वेद होत.
त्या एकवेदाचें स्वरूप काय म्हणून चिचारशील, तर 'सत्य' हें त्याचें स्वरूप आहे, यास्तव तो सत्य. एकवेदस्वरूप जें ब्रह्म, त्याच्या अज्ञानामुळें वेद अनेक झाले आहेत. हे राजेंद्रा, तूंहि हें जाणून सद्ब्रह्मामध्यें स्थित झाला आहेस का ? तूं सत्यब्रह्मनिष्ठ झाला आहेस का ? जो या एका वेदाला तें सत्य जाणतो, तो सर्वदा प्राज्ञ होतो. दान, अध्ययन व यज्ञ ही साधने लोभानेच प्रवृत्त होतात. 'या एकवेदाला जर न जाणले, तर काय होते' म्हणून विचारशील, तर सांगतो. या सत्य-ज्ञानादिलक्षण ब्रह्मापासून च्युत होणार्या म्ह ० स्वाभाविक ब्रह्मबावाचा त्याग करून देहादि अनात्म पदार्थामध्ये आत्मभावाला प्राप्त झालेल्या अज्ञ जीवांचे संकल्प व्यर्थ होतात. म्हणजे त्याचे सत्यसंकल्पादिक सिद्ध होत नाहींत. त्यामुळें यज्ञादि कर्म विस्तार पावते. हें सर्व सत्यादि लक्षण ब्रह्माच्या अनिश्चयामुळें होते. संसार आत्म्याच्या अज्ञानामुळें प्रवृत्त झाला आहे. आत्म्याचे अज्ञान हें निमित्त असून संसार हें त्याचें नैमित्तिक कार्य आहे. त्यामुळें पुरुष जोंवर परमात्म्याला आत्मत्वाने साक्षात् जाणत नाहीं, तोवर तो तापत्रयाने अभिभूत होतो. रागादि दोष जलाशयांतील मकरादिकांप्रमाणें पुरुषाचें इतस्ततः आकर्षण करतात. त्यामुळें तो मोहित व असत्यसंकल्प होतो. तो स्वर्ग, पशु, अन्न इत्यादि हेय साधनांमध्ये प्रवृत्त होतो.
राजा, पुराणासह चार वेदांचे अध्ययन करणाऱ्या ब्राह्मणाला बहुवाक्- पुष्कळ बडबड करणारा ब्राह्मण असें समजावे. तो मुख्य ब्राह्मण आहे, असे समजू नये. 'तर मग मुख्य ब्राह्मण कोण' म्हणून विचारशील तर त्याचे लक्षण सांगतो, ऐक.
जो सत्य- ज्ञानादिलक्षण ब्रह्मापासून दूर होत नाहीं, तर स्वाभाविक सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्मरूपानेंच अवस्थित होतो, तोच मुख्य ब्राह्मण आहे, असें तूं जाण. सत्यापासून च्युत व अकृतार्थ होऊन जो कर्मांमध्यें प्रवृत्त होतो तो मुख्य ब्राह्मण नव्हे. बृहदारण्यकांत ब्रह्मवेत्ताच मुख्य ब्राह्मण आहे, असें स्पष्ट सांगितले आहे. ( बृ. भा. ३.५. १.)
धृतराष्ट्र- अहो पण, तुम्ही म्हणतां तें ब्रह्म जर प्रमाणाने सिद्ध होईल, तर मी हे सर्व मानीन. पण वेद अन्यपर- कर्मादिकांचें प्रतिपादन करीत असल्यामुळें वेदावरून ब्रह्माची सिद्धि होत नाहीं.
सनत्सुजात- हे नरश्रेष्ठा, वेद स्वच्छंदानें-स्वरसतः परमात्म्याविषयींच प्रमाण आहेत. कारण ' सर्वे वेदा यत्पदमामनन्ति०'- सर्व वेद ज्या पदाचें प्रतिपादन करतात, तेंच व्यापक परमात्म्याचे स्वरूप मी तुला सांगतों, असें यमाने नचिकेताला सांगितले आहे. ( का. भा. १. २. १५.) वेदाचे पर्यवसान मोक्षाख्य पुरुषार्थामध्ये होतें. एका मोक्षाख्य पुरूषार्थावांचून इतर सर्व अनित्य, अशुचि व दुःखमिश्रित आहे. त्यामुळें त्याला पुरुषार्थच नाहीं. अर्थांत ब्रह्मस्वरूप, ब्रह्मज्ञान व ब्रह्मज्ञानाचीं साधने यांच्या प्रतिपादकत्वानें वेदांना प्रामाण्य आहे व ज्याअर्थी वेद स्वच्छंदानें 'परमात्मा' या अर्थींच प्रमाण आहेत, त्याअर्थीं त्यांचेच अध्ययन- वेदांचेच श्रवणादि करून ब्रह्मवेत्ते पंडित संविर्रूप परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. ते वेद्य-विषयरूप प्रपंचाला प्राप्त झाले नाहींत.
धृतराष्ट्र- भगवन्, असें जर आहे, तर ' तें ब्रह्म विदित व अविदित याहून विलक्षण आहे.' ( के. भा. १. १. ३.) 'ज्याला विषय न करतां मनासह वाक् निवृत्त होते' ( तै. भा. २. ९. पृ १५३.) इत्यादि श्रुतींशी विरोध आल्यावांचून कसा राहील !
सनत्सुजात- ऋग्वेदादि वेदांतील एकहि वेद मन व वाक् यांचा विषय न होणाऱ्या संविरद्रूप परमात्म्याला जाणत नाहीं. कारण कोणीहि पुरुष ऋगादिरूप जड वेदाने संविद्रूप परमात्माख्य परब्रह्माला जाणूं शकत नाहींत व ते वेद्य प्रपंचालाहि जाणूं शकत नाहींत. कारण चैतन्याच्या योगानें सर्वांची सिद्धि होते आणि ज्या अर्थी सर्व अनात्म पदार्थांची सीद्धि चिद्रूप परमात्म्याच्या अधीन आहे, त्याअर्थी जो वेदाला- चिद्रूप परमात्म्याला जाणतो, तो सर्व वेद्यविषय जाणतो. पण जो वेद्यविषयाला जाणतो, तो सत्यादि लक्षण परमात्म्याला जाणत नाहीं.
धृतराष्ट्र - अहो पण, तुम्ही ' ऋगादिरूप जडवेदानें संविद्रूप परमात्म्याला जाणत नाहीं व वेद्यालाहि जाणत नाहीं' असें म्हणत असल्यामुळें अनात्मवेत्त्यांच्या प्रपंचाची सिद्धिच होत नाहीं, हेंच शेवटीं सिद्ध होते.
सनः कुमार- राजा, जो ऋगादि वेदांना जाणतो, तोही अनात्मवेत्ताच होय. कारण तो स्वतःहून भिन्न असलेल्या ज्ञानाने वेद्य प्रपंचाला जाणतो. यावर तूं कदाचित् म्हणशील कीं, वेदवेत्ता अनात्मज्ञ जरी असला, तरी तो वेद्य प्रपंचाप्रमाणे परमात्म्यालाहि जाणील. पण हे राजा, वाणी व मन यांचा विषय न होणाच्या परमात्म्याला वेदवेत्ते जाणूं शकत नाहीत व साक्षात् वेदहि त्याला विषय करीत नाहीं. 'तर मग ब्रह्माला औपनिषदत्व कसें संभवते ?' असे विचारशील तर तेंहि सांगतो.
वेदवेत्ते व वेद परमात्म्याला जरी विषय करूं शकत नाहींत, तरी जे वेदवेत्ते ब्राह्मण वेदांच्या ब्रह्म प्रतिपादनाचा प्रकार जाणतात ते वेदांच्या द्वारा वागादिकांचा विषय न होणार्याहि परमात्म्याला जाणतात. त्यांना संविद्रूप परमात्म्याचा बोध ऋग्वेदिकांच्या साह्यानेंच होतो.
धृतराष्ट्र - पण वेद निर्विषय ब्रह्माचें प्रतिपादन कसें करूं शकतात ?
सनत्सुजात- राजा, शुक्लप्रतिपदेच्या दिवशीं दिसणाऱ्या चंद्राच्या कलादर्शनास वृक्षाचे शाखाग्र जसे निमित्त होते, त्याचप्रमाणे ऋगादि वेद नित्य चैतन्यरूप परमात्म्याच्या ज्ञानाचे कारण होतात. म्ह. ते मुख्य वृत्तीनें परमात्म्याचे प्रतिपादन करूं शकत नाहींत. तर शाखाचंद्रन्यायानें लक्षणेने बोध करतात. [ जो याप्रमाणे वेदांचा वेदरूप आत्मप्रतिपादन प्रकार जाणून त्याचें व्याख्यान करितो, तोहि ब्राह्मणच होय, असें सांगण्याच्या अभिप्रायाने ते पुढें म्हणतात- ] हे राजा, जो या वेदप्रतिपादन प्रकाराचे व्याख्यान करतो, त्यालाच मी विद्वान् ब्राह्मण समजतो.
धृतराष्ट्र- अहो पण, श्रवण-मननादिकांच्या द्वारा आत्मसाक्षात्कार संपादन करून जो ब्रह्मरूपाने अवस्थित होतो, त्याला श्रुति मुख्य ब्राह्मण म्हणते. असें असतांना आपण 'जो वेदांचे व्याख्यान करतो त्यालाच मी विद्वान् ब्राह्मण समजतो' असें कसें म्हणतां !
सनत्सुजात- हे क्षत्रियश्रेष्ठा, मीं सांगितलेला हा वेदांचा वेदरूप आत्मप्रतिपादन प्रकार जो जाणतो, तो परब्रह्माला अवश्य जाणतोच. जो यथार्थश्रवण संपादन करून आत्मस्वरूपाविषयीं निश्चित झालेला असतो, त्याचें मनन च निदिध्यासन सत्वर सिद्ध होते व तो सत्वर मुख्य ब्राह्मण होतो. [ आणि हे राजा, 'ज्याअर्थी सत्यनिष्ठपुरुषाच्याच ब्राह्मण्याची सिद्धि होते, त्याअर्थीं विषयपरायण होऊं नये' अशा आशयाने सनत्सुजात म्हणतात- ] हे धृतराष्ट्रा, या आत्म्याच्या शत्रूप्रमाणे असलेले जे देह, इंद्रिये व शब्दादि विषय, त्यांचें अन्वेषण करण्यास तत्पर होऊं नये. त्यांच्याच पोषणादिकांत तन्मय होऊन राहू नये. कारण जो या विषयांचा संचय करीत नाहीं, तोच उपनिषदांतील 'तत्त्वमस्थादि' वाक्यांनीं प्रतिपादिलेल्या प्रभु परमात्म्याला जाणतो. हे वैचित्रवीर्या, ज्याअर्थी सर्व विषयांच्या परित्यागानेंच आत्मदर्शनसिद्धि होते, त्याअर्थी सर्व-कर्म-संन्यास करून म्हणजे स्वात्मव्यतिरिक्त सर्व पदार्थांचा त्याग करून सर्व उपाधिशून्य व्हावें व स्वात्मा याच लोकाची उपासना करावी. स्वप्नांतहि विषयांची इच्छा करूं नये. याप्रमाणे सर्व विषयांचा उपसंहार करून जो साधक स्वात्मलोकाचीच उपासना करतो, त्या त्यागी ब्राह्मणाला सर्व विशेषशून्य असलेलें ब्रह्मच स्वतः अभिमुख होतें. त्यामुळें तो स्वरूपाने सिद्ध होऊन अज्ञानतमाहून अत्यंत विलक्षण असलेल्या भूमाख्य ब्रह्माला प्राप्त होतो. हे राजा, मीं तुला पूर्वी तूष्णींभावरूप जें मौन सांगितले आहे, त्या मौनाच्या योगानेच पुरुष मुनि होतो. केवल अरण्यांत जाऊन राहिल्याने तो मुनि होऊं शकत नाहीं.
मीं सांगितलेल्या या तूष्णींभावरूप मौनाने युक्त असलेल्या पुरुषांतील जो कोणी त्या अक्षरपरमात्म्याला 'हा मी आहे' असे साक्षात् जाणतो, तो मुनिश्रेष्ठ होय. हे भारता, हा मुनिश्रेष्ठ सर्व पदार्थांना व्याकृत - अभिव्यक्त करीत असतो. त्यामुळें हाच वैयाकरण होय.
शब्दरूप एकदेशाचें व्याख्यान केल्याने वस्तुतः कोणी वैयाकरण होऊं शकत नाहीं. कारण पूर्वोक्त मूलभूत अक्षरापासूनच सर्व नाम-रूपात्मक प्रपंच अभिव्यक्त झालेला आहे. यास्तव साक्षात् ब्रह्मालाच वैयाकरणत्व आहे. कारण तें मूलभूत ब्रह्मच प्रपंचाला अभिव्यक्त करते. हा विद्वानहि ब्रह्मच आहे. तोहि ब्रह्मरूपाने नामरूप व्याकरण करतो, म्हणून ब्रह्मज्ञच मुख्य वैयाकरण होय. जो 'भूः, भुवः' इत्यादि सर्व लोकांना पहातो, तो सर्वदर्शी होतो व तोच सर्वरूप परमात्म्याला पहातो. हा विद्वान् सत्यादिलक्षण ब्रह्मामध्ये स्थित होऊन आपल्या मनाला निश्चल करतो. यास्तव सत्यादिलक्षण ब्रह्माला आत्मत्वानें जाणणारा पुरुष सर्व जाणतो. म्हणून तोच साक्षात् सर्वज्ञ आहे. केवल अनात्मदर्शी सर्ववित् होऊं शकत नाहीं. हे क्षत्रिया, वर सांगितलेल्या ज्ञानादि गुणांमध्यें स्थित असलेलाहि पुरुष सत्यामध्ये स्थित होऊन जें ब्रह्म पाहतो, तें वेदान्तश्रवणपूर्वकच पहातो. त्यावाचून त्याला ब्रह्मदर्शन होत नाहीं. अर्थात् केवल ज्ञानादिकांमध्यें स्थित झाल्यानेच ब्रह्मदर्शन होईल, अशी आशा करूं नये. तर ज्ञानादि साधनांसह ब्रह्मामध्ये व सत्यामध्ये स्थित होऊन वेदान्तश्रवणादि करावे. त्याच्या योगानेच ब्रह्मज्ञान होतें. आतां हे विद्वन्, वेदान्ताचा विचार कसा करावा ते मी तुला सांगतो.
GO TOP
|