भगवान व्यासकृत् 'महाभारत' या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मतत्त्वासंबंधी विवेचन आढळते. महाभारताच्या उद्योगपर्वांतील अध्याय ४१ ते ४६ इथेही ब्रह्मतत्त्वाविषयी चर्चा आढळते. या भागाला 'सनत्सुजातीय' पर्व असे नांव दिले आहे. या सहा अध्यायांत विदुराच्या विनंतीवरून सनत्कुमारांनी राजा धृतराष्ट्राला ब्रह्मविद्येचे गुह्यज्ञान सांगितले आहे -




सनत्सुजातीय

अध्याय ४ रा

धृतराष्ट्र उवाच
सनत्सुजात यामिमां परां त्वं
     ब्राह्मीं वाचं वदसे विश्वरूपाम् ।
परां हि कामेन सुदुर्लभां कथां
     प्रब्रूहि मे वाक्यमिदं कुमार ॥ १ ॥
सनत्सुजात उवाच
नैतद्‍ब्रह्म त्वरमाणेन लभ्यं
     यन्मां पृच्छन्नतिहृष्यस्यतीव ।
बुद्धौ विलीने मनसि प्रचिन्त्या
     विद्या हि सा ब्रह्मचर्येण लभ्या ॥ २ ॥
धृतराष्ट्र उवाच
अत्यन्तविद्यामिति यत् सनातनीं
     ब्रवीषि त्वं ब्रह्मचर्येण सिद्धाम् ।
अनारभ्यां वसतीह कार्यकाले
     कथं ब्राह्मण्यममृतत्वं लभेत ॥ ३ ॥
सनत्सुजात उवाच
अव्यक्तविद्यामभिधास्ते पुराणीं
     बुद्ध्या च तेषां ब्रह्मचर्येण सिद्धाम् ।
यं प्राप्यैनं मर्त्यलोकं त्यजन्ति
     या वै विद्या गुरुवृद्धेषु नित्या ॥ ४ ॥
धृतराष्ट्र उवाच
ब्रह्मचर्येण या विद्या शक्या वेदितुमञ्जसा ।
तत्कथं ब्रह्मचर्यं स्यादेतद्‍ ब्रह्मन् ब्रवीहि मे ॥ ५ ॥
सनत्सुजात उवाच
आचार्ययोनिमिह ये प्रविश्य
     भूत्वा गर्भे ब्रह्मचर्यं चरन्ति ।
इहैव ते शास्त्रकारा भवन्ति
     प्रहाय देहं परमं यान्ति योगम् ॥ ६ ॥
अस्मिँल्लोके वै जयन्तीह कामान्
     ब्राह्मीं स्थितिं ह्यनुतितिक्षमाणाः ।
त आत्मानं निर्हरन्तीह देहा-
     न्मुञ्जादिषीकामिव सत्त्वसंस्थाः ॥ ७ ॥
शरीरमेतौ कुरुतः पिता माता च भारत ।
आचार्य शास्ता या जातिः सा पुण्या साजरामरा ॥ ८ ॥
यः प्रावृणोत्यवितथेन वर्णा-
     नृतं कुर्वन्नमृतं सम्प्रयच्छन् ।
तं मन्येत पितरं मातरं च
     तस्मै न द्रुह्येत् कतमस्य जानन् ॥ ९ ॥
गुरुं शिष्यो नित्यमभिवादयीत
     स्वाध्यायमिच्छेच्छुचिरप्रमत्तः ।
मानं न कुर्यान्नादधीत रोष-
     मेष प्रथमो ब्रह्मचर्यस्य पादः ॥ १० ॥
शिष्यप्रवृत्तिक्रमेणैव विद्यामाप्नोति यः शुचिः ।
ब्रह्मचर्यव्रतस्यास्य प्रथमः पाद उच्यते ॥ ११ ॥
आचार्यस्य प्रियं कुर्यात्प्राणैरपि धनैरपि ।
कर्मणा मनसा वाचा द्वितीयः पाद उच्यते ॥ १२ ॥
समा गुरौ यथा वृत्तिर्गुरुपत्‍न्यां तथाऽऽचरेत् ।
तत्पुत्रे च तथा कुर्वन् द्वितीयः पाद उच्यते ॥ १३ ॥
आचार्येणात्मकृतं विजानन्
     ज्ञात्वा चार्थं भावितोऽस्मीत्यनेन ।
यन्मन्यते तं प्रति हृष्टबुद्धीः
     स वै तृतीयो ब्रह्मचर्यस्य पादः ॥ १४ ॥
नाचार्यस्यानपाकृत्य प्रवासं
     प्राज्ञः कुर्वीत नैतदहं करोमि ।
इतीव मन्येत न भाषयेत
     स वै चतुर्थो ब्रह्मचर्यस्य पादः ॥ १५ ॥
कालेन पादं लभते तथार्थं
     ततश्च पादं गुरुयोगतश्च ।
उत्साहयोगेन च पादमृच्छे-
     च्छास्त्रेण पादं च ततोऽभियाति ॥ १६ ॥
धर्मादयो द्वादश यस्य रूपं
     अन्यानि चाङ्‌गानि तथा बलं च ।
आचार्ययोगे फलतीति चाहु-
     र्ब्रह्मार्थयोगेन च ब्रह्मचर्यम् ॥ १७ ॥
एवं प्रवृत्तो यदुपालभेत वै
     धनआचार्याय तदनुप्रयच्छेत् ।
स तां वृत्तिं बहुगुणामेवमेति
     गुरोः पुत्रे भवति च वृत्तिरेषा ॥ १८ ॥
एवं वसन् सर्वतो वर्धतीह
     बहून् पुत्राँल्लभते च प्रतिष्ठाम् ।
वर्षन्ति चास्मै प्रदिशो दिशश्च
     वसत्यस्मिन् ब्रह्मचर्ये जनाश्च ॥ १९ ॥
एतेन ब्रह्मचर्येण देवा देवत्वमाप्नुवन् ।
ऋषयश्च महाभागा ब्रह्मलोकं मनीषिणः ॥ २० ॥
गंधर्वाणामनेनैव रूपमप्सरसामभूत् ।
एतेन ब्रह्मचर्येण सूर्योऽप्यह्नाय जायते ॥ २१ ॥
आकाङ्क्ष्यार्थस्य संयोगाद् रसभेदार्थिनामिव ।
एवं ह्येते समाज्ञाय तादृग्भावं गता इमे ॥ २२ ॥
य आश्रयेत् पावयेच्चापि राजन्
     सर्वं शरीरं तपसा तप्यमानः ।
एतेन वै बाल्यमभ्येति विद्वान्
     मृत्युं तथा स जयत्यन्तकाले ॥ २३ ॥
अन्तवन्तः क्षत्रिय ते जयन्ति
     लोकान् जनाः कर्मणा निर्मितेन ।
ब्रह्मैव विद्वांस्तेन चाभ्येति सर्वं
     नान्यः पंथा अयनाय विद्यते ॥ २४ ॥
धृतराष्ट्र उवाच
आभाति शुक्लमिवलोहितमिवाथो
     कृष्णमथाञ्जनं काद्रवं वा ।
सद्‍ब्राह्मणः पश्यति योऽत्र विद्वान्
     कथंरूपं तदमृतमक्षरं पदम् ॥ २५ ॥
सनत्सुजात उवाच
नाभाति शुक्लमिव लोहितमिवाथो
     कृष्णमायसमर्कवर्णम् ।
न पृथिव्यां तिष्ठति नान्तरिक्षे
     नैतत् समुद्रे सलिलं बिभर्ति ॥ २६ ॥
न तारकासु न च विद्युदाश्रितं
     न चाभ्रेषु दृश्यते रूपमस्य ।
न चापि वायौ न च देवतासु
     नैतच्चन्द्रे दृश्यते नोत सूर्ये ॥ २७ ॥
नैवर्क्षु तन्न यजुःषु नाप्यथर्वसु
     न दृश्यते वै विमलेषु सामसु ।
रथन्तरे बार्हद्रथे वापि राजन्
     महाव्रते नैव दृश्येद् ध्रुवं तत् ॥ २८ ॥
अपारणीयं तमसः परस्तात्
     तदन्तकोऽप्येति विनाशकाले ।
अणीयो रूपं क्षुरधारया समं
     महच्च रूपं तद् वै पर्वतेभ्यः ॥ २९ ॥
सा प्रतिष्ठा तदमृतं लोकास्तद्‍ ब्रह्म तद् यशः ।
भूतानि जज्ञिरे तस्मात् प्रलयं यान्ति तत्र हि ॥ ३० ॥
अनामयं तन्महदुद्यतं यशो
     वाचो विकारं कवयो वदन्ति ।
यस्मिन् जगत् सर्वमिदं प्रतिष्ठितं
     ये तद् विदुरमृतास्ते भवन्ति ॥ ३१ ॥
॥ इति श्रीमहाभारते उद्योगपर्वणि सनत्सुजातपर्वणि
सनत्सुजातवाक्ये चतुश्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४४ ॥


ब्रह्मविद्येचे साधन जे ब्रह्मचर्य त्याचें सविस्तर निरूपण.

याप्रमाणे आत्मज्ञानाचा मार्ग ऐकून त्याचें अंतरंग साधन जो योग त्याचें श्रवण करण्याच्या इच्छेने धृतराष्ट्र म्हणतो- हे भगवन्, तूं ब्रह्माला प्राप्त करून देणारी अशी जी ही सर्व प्रकाशिका वाक् जाणतोस व जिचे ज्ञानझाले असतां दुसरें कांहीं ज्ञातव्य उरत नाहीं, अशी अतिशय उत्कृष्ट व अतिशय दुर्लभ कथा मला सांग. हे सनत्सुजात, माझें हें वचन आज्ञारूप नसून प्रार्थनारूप आहे, असें तूं समज.

सनत्सुजात- हे राजा, मी ब्रह्मविद्येचा अधिकारी आहें, असें समजून तूं अतिशय हृष्ट होत आहेस व त्यामुळें मला ब्रह्मविद्या सांगण्याविषयीं आग्रह करीत आहेस. पण बाबारे, ब्रह्म असें त्वरेने मिळत नसतें. ब्रह्मविद्या फार दुर्लभ आहे. तिच्यासाठीं जन्माच्या जन्म, साधनानुष्ठानांत घालविले पाहिजेत. निश्चयात्मिका बुद्धीमध्ये संकल्प-विकल्पात्मक मन विषयांपासून परावृत्त होऊन लीन झालें असतां तिचें चिंतन करावे लागतें व ती चिंतनाने प्राप्त होणारी विद्या ब्रह्मचर्यांनेंच लाभणारी आहे.

धृतराष्ट्र - भगवन्, ही सनातन ब्रह्मविद्या म्ह० त्रिविध परिच्छेदशून्य ब्रह्माचें ज्ञान ब्रह्मचर्यानें प्राप्त होतें असें तूं सांगत आहेस. ती विद्या नित्यसिद्ध आहे. कारण प्रत्यगात्मा नित्य अपरोक्ष आहे. तशीच ती उत्पक्न्न होत नसून केवल अभिव्यक्त होत असते. कारण कर्माप्रमाणे ती आरंभयोग्य नसते. ती नित्यसिद्ध असल्यामुळें कार्यकालीं या आत्म्यामध्येच स्थित होते. पण असें असतांना ब्राह्मणांना योग्य असलेलें अमृतत्व कसें प्राप्त होईल ? कारण जी वस्तु अगोदरच प्राप्त झाली आहे, तिच्या लाभासाठी यत्न करावा लागत नाहीं. मग ब्रह्मविद्येला ब्रह्मचर्यादि अनुष्ठानाची काय अपेक्षा !

सनत्सुजात- हे राजा, मी तुला पुरातन ब्रह्मविद्या सांगतो. बुद्धिरूप उपाधीच्या संबंधामुळे मलिन झालेली ती विद्या दुर्बोध झाली आहे. तथापि ब्रह्मचर्यानें सिद्ध झालेली तीच विद्या मी तुला आत्मानात्मविवेकपूर्वक सागतों. ज्या विद्येला प्राप्त होऊन ब्रह्मज्ञ पुरुष या मर्त्यलोकाचा त्याग करतात ती विद्या प्राचीन विद्वानामध्ये नित्यसिद्ध असते.

धृतराष्ट्र - भगवन्, जी विद्या ब्रह्मचर्य या साधनानेच साक्षात् जाणणें शक्य आहे, त्या ब्रह्मचर्याचे स्वरूप काय आहे तें मला सांगा.

सनत्सुजात- राजा, आचार्य या स्थानामध्ये प्रवेश करून जे गर्भभूत होत्साते ब्रह्मचर्याचें पालन करतात, ते याच लोकीं शास्त्रकर्तृत्वाला प्राप्त होऊ गुरूच्या अनुग्रहाने येथेंच ब्रह्मभावाला प्राप्त होतात. ते ब्रह्मरूप होतात, त्यांना पुनः या संसारांत यावें लागत नाहीं. जे या लोकी सर्व कामांना जिंकून शास्त्रबलानें ब्राह्मी स्थितीला प्राप्त होतात, ते मुंजातृणांतून त्याच्या मध्यवर्ती असलेल्या कोमल तृणाला- ईषिकेला जसे पृथक् करतात, त्याप्रमाणें आत्म्याला देहाहून पृथक् करतात, ते सत्त्वामध्यें स्थित होतात. म्ह० हे राजा, प्रथम सर्व कामांचा त्याग करावा. नंतर ब्राह्मी स्थिति प्राप्त होण्यासाठी द्वंद्वसहिष्णु व्हावे. नित्य सत्त्वस्थ व्हावें. म्हणजे मुंजा-ईषीकान्यायानें याच शरीरांत देह व आत्मा यांच्या विवेकाचे सामर्थ्य प्राप्त होते.

हे भारता, माता व पिता हीं दोघे मिळून हें शरीर उत्पन्न करतात. पण आचार्याने दिलेला जो जन्म, तो अतिशय पुण्यावह, अजर व अमर असतो. जो आचार्य सत्य वेदाक्षरांनीं दोन्ही कान भरून टाकतो, असत्य झालेल्या आत्म्यालाहि सत्य करतो व अमृतत्व प्राप्त करून देतो, अशा आचार्यालाच माता व पिता मानावे. सत्यब्रह्माचें प्रतिपादन करणाऱ्या वेदाक्षरांनींच शिष्याचे दोन्ही कान भरून सोडणाऱ्या आचार्यांचे उपकार स्मरणाऱ्या शिष्याने त्यांचा कधींहि द्रोह करूं नये. शिष्याने गुरूला नित्य अभिवादन करावें. शुचि व सावधान चित्त होऊन अध्ययन करण्याची इच्छा करावी. 'मी विद्वान् शिष्य असतांना गुरूगृहांतील हें तुच्छ कार्य कसें करूं ?' असा मान धारण करूं नये. एखादे कार्य करीत असतांना जरी अतिशय श्रम झाले तरी क्रुद्ध होऊं नये. हा ब्रह्मचर्याचा प्रथम पाद आहे.

सायंकाली व प्रातःकालीं भिक्षेवर जीवन करणें व गुरूच्या अन्नावर उपजीविका न करणें हा शिष्यवृत्तीचा क्रम आहे. जो शिष्य शुचिर्भूत होऊन या क्रमानेच विद्या संपादन करतो, त्याच्या ब्रह्मचर्याचा हाहि प्रथम पाद म्हटला आहे.

प्राण व धन या दोहोंचाहि व्यय करून शरीर, वाणी व मन यांनीं आचार्‍यांचे प्रिय करावे. तसेंच गुरूप्रमाणें गुरुपत्नीशींहि अत्यंत आदराने वागावे. गुरुपुत्राशीहि तसेंच वर्तन ठेवावे. हा ब्रह्मचर्याचा दुसरा पाद होय.

आचार्यांनें आपल्याला विद्यादान करून त्याचें प्रयोजन - दुःखनिवृत्ति व आनंदप्राप्ति संपादन करून दिली आहे, हे त्याचे उपकार जाणून; या आचार्यानें माझी अतिशय वृद्धि केली आहे, हें स्मरून विद्यासुखानें अतिशय हृष्ट होणारा शिष्य त्याचा अतिशय आदर करितो. यास्तव आचार्योपदेशानें विद्येला प्राप्त होऊन व विद्यासुखाचा अनुभव घेऊन शिष्य त्याचा जो सत्कार करतो, तोच ब्रह्मचर्याचा तिसरा पाद होय.

विद्येच्या निष्क्रयार्थ गुरूला धनदानादि देऊन व त्याचें ऋण फेडून मग गुरुगृहांतून निवृत्त व्हावें. गुरूचे हे ऋण फेडल्यावांचून अन्य आश्रमामध्यें स्थिति करूं नये. म्ह० ब्रह्मचर्याश्रमांतून निवृत्त होऊं नये. पण 'मी गुरूला हें धनप्रदान करीत आहें' असेहि विद्वान् शिष्याने मानूं नये व तसें कोणापाशी बोलूहि नये. म्ह० शिष्याने 'मी धनदानानें गुरूवर उपकार करीत आहें' असे मनांत आणूं नये, इतकेंच नव्हे तर वाणीने तसे शब्दहि उच्चारू नयेत. या चतुष्पाद ब्रह्मचर्याने चतुष्पदी विद्या प्राप्त होते. ती कशी म्हणून विचारशील तर सांगतो. हे राजा, शिष्य बुद्धिपरिपाकानें विद्येचा एक पाद प्राप्त करून घेतो व त्याचा अर्थ जाणतो. त्यानंतर गुरूंच्या सहवासाने त्याला विद्येचा दुसरा पाद प्राप्त होतो. बुद्धिवैभवानें त्याला विद्येचा तिसरा पाद प्राप्त होतो व सहाध्यायी विद्यार्थ्यांबरोबर शास्त्राचा विचार केल्याने त्याला चतुर्थ पाद प्राप्त होतो. (सनत्सुजातांनीं चार उपायांनी विद्येचे चार पाद प्राप्त होतात, एवढेच येथें सांगितलें आहे. कारण अन्य प्रमाणग्रंथांत आचार्यमुखानें शिष्याला एक अंश प्राप्त होतो, त्याच्या धारणाशक्तीनें त्याला दुसरा अंश मिळतो, कालाने तिसरा अंश व सतीर्थ्यांबरोबर शास्त्राची चर्चा केल्याने त्याला चवथा भाग प्राप्त होतो, असें म्हटले आहे.)

धर्मादि बारा गुण हे ब्रह्मचर्याचे स्वरूप आहे. आसन, प्राणायाम इत्यादि ही त्यांची अंगें आहेत. ब्रह्मचर्याचे धर्म परिपालन करण्याचे सर्व सामर्थ्य आचार्याच्या सहवासानेच प्राप्त होते, असें विद्वान् सांगतात. कर्म व ब्रह्म हा दोन प्रकारचा वेदार्थ ज्ञात झाल्यानेच ब्रह्मचर्य फलद्रूप होतें.

याप्रमाणे 'मी हा गुरूवर उपकार करीत आहें' असा अभिमान न धरता व त्या अभिमानाचे प्रकाशक वचन न बोलतां गुरूचा अर्थ संपादन करण्यासाठी जो प्रवृत्त होतो, तो आचार्यांचा प्रसाद संपादन करतो. यास्तव शिष्याने गुर्वर्थ संपादन करून तो गुरूलाच समर्पण करावा. त्यामुळें तो आचार्य अनेक गुणांनी युक्त अशा सद्‌वृत्तीला प्राप्त होतो व दुसऱ्या अनेक शिष्यांचें पोषण करूं शकतो. शिष्यानें गुरुपुत्राशीं असेंच वर्तन ठेवावें. याप्रमाणे ब्रह्मचर्यामध्ये वास करणाऱ्या शिष्याची सर्व प्रकारे वृद्धि होते. त्याला अनेक पुत्र व प्रतिष्ठा यांची प्राप्ति होते. सर्व दिशा व उपदिशा त्याच्यावर धनाची वृष्टि करतात व याला अनेक ब्रह्मचारी प्राप्त होतात. म्ह० त्याच्यापाशी अनेक विद्यार्थी येऊन रहातात व ब्रह्मचर्याचे पालन करतात.

या ब्रह्मचर्यानें देव देवत्वाला प्राप्त झाले आहेत. ब्रह्मचर्याच्या बलावरच महाभाग ऋषि ऋषित्वाला पोचले आहेत. 'ब्रह्मचर्य' या साधनानेंच गंधर्वांसह अप्सरांना रमणीय स्वरूप प्राप्त झालें आहे. फार काय पण हे राजा, या ब्रह्मचर्याख्य व्रतानेंच सूर्य जगताला प्रकाशित करतो. धृतराष्ट्रा, चिंतलेली वस्तु देणाऱ्या चिंतामणीची इच्छा करणार्‍या पुरुषांना त्यांना आकांक्षित असलेल्या मण्याची प्राप्ती झाली असतां जसा चिंतामणिभाव प्राप्त होतो, त्याचप्रमाणे हे देवादि ब्रह्मचर्य पाळून सत्यसंकल्पत्वाच्या योगाने चिंतित वस्तुप्रदत्वाला प्राप्त झाले आहेत. ( पारदाच्या एका विशिष्ट गुटिकेला चिंतामणि ही संज्ञा आहे.) तो चिंतामणि चिंतीत वस्तु देणारा आहे. कांही लोक त्याची आकांक्षा करतात व त्याची प्राप्ती झाली म्हणजे ते लोक इतरांना जसे इष्टार्थ देऊं शकतात - स्वतः चिंतामणितुल्य होतात, त्याचप्रमाणें ते देवादिकही ब्रह्मचर्याच्या बलावर सत्यसंकल्प होतात व आपल्या भक्तांना इष्टार्थ देऊं शकतात.

हे राजा, जो पुरुष सर्व चतुष्पाद ब्रह्मचर्याचा आश्रय करतो व उग्र तपश्चर्या करून शरीराला पावन करतो, तो राग-द्वेषादिराहित्य या बाल्याला प्राप्त होतो किंवा उपनिषदांच्या अर्थाचें युक्तिपूर्वक अनुचिंतन करून तत्त्वनिश्चयाला प्राप्त होतो आणि या क्रमानें विद्वान् झालेला तो अंतकालीं मृत्यूला जिंकतो. यास्तव वर्तमान शरीराचा पात होईपर्यंत राग-द्वेषराहित्य एतद्‌रूप बाल्य, किंवा श्रुत वेदार्थाचे युक्तिपूर्वक अनुचिंतन करून तत्त्वनिश्चक करणें, एतद्‌रूप बाल्य यांचे यावज्जीव आचरण करावें.

हे क्षत्रिया, अविद्वान् लोक पुण्यकर्मानें निनाशी लोकांना संपादन करतात, पण 'ब्रह्मच सर्वांचा आत्मा असल्यामुळे सर्व आहे,' अशा त्या सर्व ब्रह्माला जाणून विद्वान् स्वतःच सर्व होतो. त्याला कर्मानें प्राप्त करून घेण्यास योग्य असें कोणतेंच फल अवशिष्ट रहात नाही. अशा या ज्ञानावांचून मोक्षाला दुसरा मार्ग नाही.

ब्रह्मस्वरूपाचे निरूपण.

'ज्ञानावांचून मोक्षाला दुसरा मार्ग नाही' असें ऐकून धृतराष्ट्र एक क्षणभर आत्म्याचेंच अनुसंधान करीत राहिला, पण तो आत्म्याला प्राप्त झाला नाही, उलट अंतर्हृदयामध्यें नानावर्णांचे नाडीमार्ग पाहून सनत्सुजातास म्हणाला, "हे भगवन्, सद्‌ब्रह्माचे रूप पहाण्याच्या इच्छेनें जर एखादा पुरुष हृदयामध्यें त्याला पाहूं लागला, तर तो शुक्ल, रक्त, कृष्ण, अंजनासारखें कृष्णवर्ण किंवा धूम्रवर्ण, असें त्याचें नावस्थित स्वरूप पहातो. पण तें अमृत अक्षर पद वस्तुतः कोणत्या स्वरूपाचें आहे ! "

सनत्सुजात- राजा, तूं म्हणतोस ते खरे आहे. ब्रह्ममार्गामध्यें अशीं शुक्ल - लोहितादि रूपे दिसतात व तीं श्रुतहि आहेत. तथापि ब्रह्माचे स्वरूप पृथिव्यादि कोणत्याहि भूत-भौतिक पदार्थांमध्ये नाहीं. कारण तें शब्दादि सर्व विशेषांनी रहित आहे. तथापि हीं शुक्लादि रूपे ब्रह्मप्रातीचीं चिन्हें आहेत. त्याचें स्वरूप अंतरिक्षांतहि नाहीं.

या संसारसागरांतील पंचभूतात्मक देहहि त्या परमात्म्याला धारण करूं शकत नाहीं. कारण जीवाप्रमाणें ब्रह्माला उपाधिजन्य दुःख नाहीं. किंवा समुद्राच्या जलांतहि ब्रह्मरूप नाहीं. राजा, रात्रीं आकाशांत दिसणाऱ्या विविध तारका, अभ्रामध्ये चमकणारी विद्युत, वायु, देवता, चंद्र, सूर्य, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शुद्ध सामांतील रथंतर, बार्हद्रथ व महाव्रतें, यांमध्येंहि त्याचें रूप दिसत नाहीं. कारण तें ब्रह्म नित्य आहे. त्याचें अतिक्रमण करून कोणालाहि रहाता येत नाहीं. अज्ञानरूप उपाधीहून तें अगदीं विलक्षण आहे. प्रलयकालीं सर्वभक्षक कालहि त्याच्या स्वरूपांत लीन होतो. त्याचें स्वरूप अतिशय सूक्ष्म आहे. तें क्षुरधारेप्रमाणें अतिशय तीक्ष्ण आहे, त्यामुळें तें दुर्लक्ष्य असून अति सूक्ष्मबुद्धीनेच त्याचें ग्रहण करतां येतें. जसे तें सूक्ष्माहूनहि अतिसूक्ष्म आहे, तसें पर्वतादि महत्पदार्थाहूनहि अति महत् आहे. तेंच सर्वांचे अधिष्ठान आहे. तें अमृत-निर्विकार आहे. कारण एक विकार आपलें स्वरूप सोडून दुसऱ्या स्वरूपास प्राप्त झाला, म्हणजे त्याला मृत असें म्हणतात. परंतु तें तसें नाहीं, म्हणून अमृत. तेंच सर्व दृश्य आहे. तेंच बृहत् आहे व रमणीयहि तेंच आहे. उपादानभूत सुवर्णापासून जसे कुंडलादि अलंकार उत्पन्न होतात, त्याप्रमाणें परमात्म्यापासून हीं भूते उत्पन्न झालीं आहेत व मृत्तिकेमध्यें लीन होणाऱ्या घटाप्रमाणें तीं ब्रह्मामध्येच लीन होतात. यावरून ब्रह्माला जगत्कारणत्व आहे, हें सिद्ध होतें. श्रुतीनेंहि हेंच सांगितलें आहे. तें ब्रह्म द्वैतयन्य आहे. तथापि जगदाकाराने तेंच उदय पावलें आहे. तेंच महद्यश - अतिशय व्यापक व आकाशादिकांहूनहि महत् आहे. ब्रह्मज्ञ लोक केवल वाणीनेंच विकारांचा उच्चार करितात. स्वरूपाने उच्चार करीत नाहींत. कारण विकार वाङ्‌मात्र आहे. रज्जूमध्ये जसा सर्प, त्याप्रमाणें ज्यामध्ये हें सर्व जगत् प्रतिष्ठित आहे व रज्जूसर्पन्यायाने ज्यांत हे लीन होतें, तें अमृत - ब्रह्म आहे. त्याला जे जाणतात, ते मुक्त होतात.


GO TOP