अभंग-०००१-०१००
अभंग-०१०१-०२००
अभंग-०२०१-०३००
अभंग-०३०१-०४००
अभंग-०४०१-०५००
अभंग-०५०१-०६००
अभंग-०६०१-०७००
अभंग-०७०१-०८००
अभंग-०८०१-०९००
अभंग-०९०१-१०००
अभंग-१००१-११००
अभंग-११०१-१२००
अभंग-१२०१-१३००
अभंग-१३०१-१४००
अभंग-१४०१-१५००
अभंग-१५०१-१६००
अभंग-१६०१-१७००
अभंग-१७०१-१८००
अभंग-१८०१-१९००
अभंग-१९०१-२०००
अभंग-२००१-२१००
अभंग-२१०१-२२००
अभंग-२२०१-२३००
अभंग-२३०१-२४००
अभंग-२४०१-२५००
अभंग-२५०१-२६००
अभंग-२६०१-२७००
अभंग-२७०१-२८००
अभंग-२८०१-२९००
अभंग-२९०१-३०००
अभंग-३००१-३१००
अभंग-३१०१-३२००
अभंग-३२०१-३३००
अभंग-३३०१-३४००
अभंग-३४०१-३५००
अभंग-३५०१-३६००
अभंग-३६०१-३७००
अभंग-३७०१-३८००
अभंग-३८०१-३९००
अभंग-३९०१-४०००
अभंग-४००१-४०६९

॥ श्रीतुकाराम अभंग गाथा - प्रास्ताविक ॥गाथेचा वाङ्‌मयीन इतिहास

या महाराष्ट्रात संतांचे अवतार होण्यापूर्वी संस्कृत वाङ्‌मय विपुल निर्माण झाले असले तरी, मराठी वाङ्‌मयाच्या दृष्टीने हा प्रदेश ओसाड होता. महाराष्ट्रातील संस्कृत विद्वानांची कीर्ती संस्कृत विद्येचे माहेरघर असलेल्या काशीपर्यंत पोहोचली होती; पण मराठी भाषेत शास्त्र सांगणाऱ्यांची त्या वेळी उणीव होती. शके अकराशेमध्ये श्रीनिवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चार भावंडे नव्हे, संत रत्‍नें जन्माला आली. या चार संतरत्नांनी विशेषत: ज्ञानियांचे राजे श्रीज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी' लिहून मराठी भाषेचा गौरव केला, आणि सर्वप्रथम मराठी भाषेत शास्त्र आणले. ज्ञानदेवांपूर्वी श्रीमुकुंदराज स्वामींनी 'विवेकसिंधु' आणि 'परमामृत' हे दोन ग्रंथ लिहून महाराष्ट्र-सारस्वताच्या ओसाड प्रदेशात दोन लहानशी घरे वसविली होती; पण श्रीज्ञानदेवांनी त्या ओसाड प्रदेशात विवेकवल्लीची लावणी केली. सोनियांच्या खाणी उघडिल्या ब्रह्मविद्येचा सुकाळ केला, भगवद्‌गीतारूपी गंगेला मराठी शब्दांचा सुंदर घाट बांधून गीतागंगेचे अवगाहन करणे सर्वांना सोपे केले; आणि माझा मर्‍हाठाचि बोल कौतुकें । परि अमृतातेंहि पैजा जिंकें । असा मराठी भाषेविषयी सार्थ अभिमानही व्यक्त केला.

त्याच वेळी श्रीनामदेव महाराजांनी कीर्तनाच्या रंगात नाचून ज्ञानाचे विद्युद्दीप जिकडे तिकडे लावून पंजाबपर्यंतचा प्रांत उजळून काढला. याशिवाय परिसा-भागवत, जनाबाई, जनमित्र नागा, गोरोबा, सावता, सेना व चोखोबा या संतांनीही परमार्थाचे पुष्कळ पीक पिकविले. याप्रमाणे ज्ञानदेवांपर्यंत मराठी वाङ्‌मयाच्या दृष्टीने ओसाड असलेला महाराष्ट्र पुष्कळच समृद्ध झाला.

पण आणखीही याला विशेष सौंदर्याची गरज होती. ती उणीव श्रीएकनाथ महाराजांनी भरून काढली. त्यांनी भागवत आणि रामायण लिहून परमार्थ साधनांच्या अद्ययावत सुखसोयी असलेली शहरे वसविली. हस्तामलक, चतुःश्लोकी भागवत इत्यादी लहान ग्रंथ लिहून उपनगरे वसविली. अभंगाच्या कोरीव लेण्या तयार केल्या, त्यात भारुडांची निरनिराळी चित्रे रेखाटली; व महाराष्ट्राला पोट धरून हसविले. ती सुंदर कलाकृती व ज्ञानभक्तीचा मोठ्या कौशल्याने केलेला आविष्कार पाहून कोणाच्याही तोंडून 'धन्य आहेत एकनाथ महाराज' असेच उद्गार बाहेर पडू लागले. याप्रमाणे श्रीएकनाथ महाराजांपर्यंत महाराष्ट्राचे वाङ्‌मयीन वैभव पुष्कळच वाढले.

तरीपण पारमार्थिक लोकांना शास्त्रीय संगीत भजन हवे होते. वैकुंठाला जाण्याकरिता सोपी पायवाट हवी होती. भवसिंधूवरून जाण्याकरिता पुलाची आवश्यकता होती. मोक्षप्राप्तीकरिता राजमार्ग पाहिजे होता. ह्या गरजा भागविण्याचे कार्य श्रीसंत तुकाराम महाराजांनी केले. त्यांनी अभंग रचना करून घरोघरी शास्त्रीय संगीत ऐकण्याची व्यवस्था केली. हे अभंग लोकांना इतके आवडले की, पंडित लोक देखील प्रवचन पुराणातून हे अभंग गाऊ लागले. वारकऱ्यांनी वेदांप्रमाणे कंठस्थ केले. स्त्रिया जात्यावर म्हणू लागल्या. तुकोबाच्या अभंगावाचून देवाची भजने व कीर्तने होईनाशी झाली. शास्त्री-पंडितांपासून गुराख्यापर्यंत, राजवाड्यापासून गरिबांच्या झोपडीपर्यंत सर्वांच्या तोंडी व सर्वत्र हे अभंग म्हणण्यात येऊ लागले. भोळ्या भाविक लोकांनी वेड्यावाकड्या स्वरात हे अभंग म्हणण्यास सुरुवात केली, तशी गायनाचार्यांनीही आपल्या विविध रागदारीने आळवायला सुरुवात केली. याच अभंगाकरिता मृदंगाचार्यांचे ठेके सुरू झाले; व याच अभंगाच्या समेवर मुखडे व तोडे आदळू लागले. सारांश, महाराजांनी या अभंगाच्या द्वारा सर्व जग हरिभजनाने ढवळून काढले. भक्तीचा डांगोरा पिटवून पंढरीला येण्याचे सर्वांना निमंत्रण दिले. अधिकारानुसार धर्म, वैराग्य, ज्ञान यांचाही उपदेश केला. याप्रमाणे इतर संतवाङ्‌मय आणि श्रीतुकाराममहाराजांची गाथा या महाराष्ट्रात निर्माण झाल्यामुळे मराठी भाषेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा परमोत्कर्ष झाला, असे म्हणावयास हरकत नाही; व हे सारे वाङ्‌मय महाराष्ट्रात निर्माण झाले, याबद्दल महाराष्ट्रीयांना अभिमान वाटणे स्वाभाविक असले तरी, हे वाङ्‌मय महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहे, असे मात्र नाही. कारण, भारतीय संस्कृतीचे पंचप्राण 'धर्म, नीती, भक्ती, अध्यात्म आणि शास्त्रप्रामाण्य' यांचे या संतवाङ्‌मयात उत्कृष्ट रीतीने प्रतिपादन केले आहे; म्हणून हे वाङ्‌मय भारतीयांकरिताच काय पण, साऱ्या जगाच्या सुख-समाधानाकरिता निर्माण झाले आहे.

गाथेची पार्श्वभूमी

श्रीतुकोबारायांच्या गाथेत वेदातील तत्त्वांचाच अत्यंत सुंदर शब्दात आविष्कार झाला आहे. काही लोक म्हणतात - संतांनी हा वारकरी संप्रदाय म्हणजे एक नवा मार्ग काढला आहे. पण 'वाचा बोलों वेदनीती' या तुकोबांच्या उक्तीनेच वरील मत खंडित आहे. शिवाय, हा नवा मार्ग असता, तर तो फार दिवस टिकला नसता. कोणतेही नवे मनुष्याच्या बुद्धीतून निघालेले असते; आणि बिनबुडाचे असते. त्याच्या बुडाशी प्रमाण, अनुभव आणि तर्क नसल्यामुळे ते फार दिवस टिकत नाही. श्रीतुकाराम महाराजांनी किंवा इतर संतांनी काही विशेष जर केले असेल, तर ते हे की, जुनाच असलेला वैदिक मार्ग झाडून स्वच्छ केला; आणि त्यातील सिद्धान्त त्यांनी आपल्या भाषेत व लोकांना कळेल अशा पद्धतीने मांडला.

कोणत्याही संप्रदायात कालांतराने विकृती निर्माण होत असते. दीर्घेण कालेन अनुष्ठातृणां कामोद्भवात् ॥ (गीताभाष्य) त्या संप्रदायातील लोकांमध्ये विषयासक्ती, दांभिकपणा इत्यादी दुर्विकार निर्माण होतात. यालाच धर्मग्लानीही म्हणतात. हे दुर्विकार नष्ट करण्याकरिताच संतांना अवतार घ्यावा लागतो. या नियमानुसार श्रीतुकाराम महाराज म्हणतात - "उजळावया आलों वाटा खरा खोटा निवाडा ॥" वैदिक संप्रदायावर आलेले मालिन्य झाडून झटकून स्वच्छ करण्याकरिता मी येथे आलो आहे. वेदांचा निरोप सांगण्याकरिताच देवाने मला मृत्युलोकात पाठविले आहे; वैदिक धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला अतिशय प्रयत्न करावा लागतो. धर्माचे पालन, पाखंड्यांचे खंडन आणि हरिनाम वाढविणे, हेच आमच्या अवताराचे मुख्य प्रयोजन आहे; आणि हे करीत असताना कोणी केवढाही मोठा असो वा लहान असो, मी त्याची भीड धरणार नाही. अभक्त, दुराचारी, दुष्ट, अतितार्किक, दांभिक, खळ, पापी यांच्यापैकी कोणीही असले; मग ते ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत, संन्याशापासून ब्रह्मचाऱ्यापर्यंत, विद्वानापासून मूर्खापर्यंत, राजापासून रंकापर्यंत, त्यांची मी उपेक्षा करणार नाही. स्पष्ट शब्दात बोलून त्यांची फजिती करीन. मला या जगात कोणतेही कर्तव्य उरले नाही. पण लोक निष्कारण बुडत असलेले मला बघवत नाही. भक्ति-ज्ञान-वैराग्याचा उपदेश करून त्यांच्यावर उपकार करण्याकरिताच मी या जगात उरलो आहे." ही गाथेच्या मागील तुकोबारायांची भूमिका आहे.

गाथेची सांस्कृतिक भूमिका

जगातील कोणत्याही संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे, हे कोण्याही विचारी माणसाला मान्यच करावे लागेल. आजवर कित्येक संस्कृतींचा उदय झाला, तसा कालाच्या ओघात अस्तही झाला; पण भारतीय संस्कृती स्वकीय परकीयांचे आघात सोसून जिवंत राहते, असे या संस्कृतीच्या पोटात अमृत तरी कोणते भरले आहे ? याचा विचार केल्यास 'असामान्य अधिकाराचे संत' हेच या संस्कृतीच्या पोटातील अमृत आहे. हे संत या संस्कृतीच्या ऐन र्‍हासाचे वेळी अवतीर्ण होऊन हिला पुनरुज्जीवित करतात.

संस्कृती शब्दाचा सामान्य अर्थ संस्कार असा आहे. तरीपण संस्कृतीत अनेक तत्त्वांचा समावेश होतो. त्यामुळे 'अनेक शुद्ध तत्त्वांचा संघात म्हणजे संस्कृती' अशी सामान्य व्याख्या करण्यास हरकत नाही. ज्या देशात जो एक विशिष्ट तत्त्वसंघात असतो, ती त्या देशाची संस्कृती समजली जाते, आणि त्यामुळेच तद्देशीयांची स्वदेशाविषयी अस्मिता जागृत राहते. ज्या देशात खास अशी कोणतीच संस्कृती ठेवली जात नाही, त्या देशातील लोकांना संस्कृतिमूलक स्वदेशाविषयी आपुलकी वाटत नाही, जी स्वदेशभक्ती संस्कृतिमूलक असेल, तीच खरी असते. म्हणून देशाचे खरे वैभव संस्कृती आहे. देशाचे रक्षण म्हणजे दगड-मातीचे रक्षण नव्हे ! संस्कृतीच्या रक्षणाकरिताच देशाचे रक्षण करावयाचे असते. म्हणून वेदवाङ्‌मयापासून तहत तुकोबारायांच्या गाथेपर्यंत या सर्व वाङ्‌मयाने संस्कृतीसंरक्षण करण्याचे कार्य केले आहे. या भारतीय संस्कृतिमध्ये १ तत्त्वज्ञान, २ धर्म, ३ समाजरचना, ४ राजशासन आणि ५ अर्थव्यवस्था या तत्त्वांचा अंतर्भाव होतो. (१) तुकाराममहाराजांच्या गाथेत भागवत धर्माचा अर्थात भक्तीचा विशेष पुरस्कार केला असला तरी अद्वैततत्त्वज्ञानाला महत्त्व दिले आहे. (२) वैदिकधर्माचाही मधून मधून उल्लेख केला आहे. (३) समाजरचना वर्णाश्रमयुक्त असावी, हेही अट्टाहासाने प्रतिपादिले आहे. (४) राजशासन हे धर्मनियंत्रित असावे; राजाने अन्यायाचा पक्ष कधीच घेऊ नये; व त्याबरोबर अन्यायाची उपेक्षाही करू नये, असे गाथेत सांगितले आहे. राजा जर अपराधी लोकांना शिक्षा करणार नाही, उलट सज्जनाला शिक्षा करील, आणि स्वत: धर्मविरुद्ध वागेल तर तो नरकाला जातो, असे गाथेत स्पष्ट सांगितले आहे. ज्या देशात राजा वाईट आहे तेथील प्रजादेखील वाईट असणारच. तुकाराममहाराजांच्या पुढे राजशासनाच्या बाबतीत रामराज्याचा आदर्श होता,म्हणून त्यांनी - 'झालें रामराज्य काय उणे आम्हांसी ।' या अभंगात रामराज्याचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. (५) अर्थव्यवस्थेच्या बाबतीत महाराज म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारें । उदासें विचारें वेंच करी ।

धन हे धर्मनीतीने मिळवावे आणि ते निष्कामबुद्धीने व विचारपूर्वक सत्कार्याकडे खर्च करावे. अशी निरुपद्रवी अर्थव्यवस्था गाथेत सांगितली आहे. सारांश, गाथेत भारतीय संस्कृती प्राधान्याने जरी सांगितलेली नसली तरी संस्कृतीतील अनेक तत्त्वे इतस्तत: विखुरलेली दिसतात.

वेद, शास्त्रे व पुराणे यांचे प्रामाण्य

वेदोक्त धर्म दोन प्रकारचा आहे : एक प्रवृत्तिलक्षण आणि दुसरा निवृत्तिलक्षण. वारकरी संप्रदाय प्रवृत्तीशी अविरोधी आणि निवृत्तीचा पुरस्कार करणारा असा आहे. हा धर्म वेदप्रणीत आहे. कारण, तो मानवी बुद्धीला अगम्य आहे. मनुष्याच्या बुद्धीला पशुपक्ष्यापेक्षा पुष्कळच कळते हे खरे असले तरीसुद्धा, सर्वच कळते असे मात्र म्हणता येत नाही. कारण, भूत, वर्तमान आणि भविष्य असे काळाचे तीन प्रकार आहेत. त्यांपैकी भूतकालीन गोष्टी ऐकून किंवा इतिहास वाचून मनुष्याला कळू शकतात. वर्तमानकालीन गोष्टी ऐकून किंवा प्रत्यक्ष पाहून कळतात. पण भविष्यकालात काय होणार आहे. विशेषत: आपण केलेल्या कर्माचे फळ पुढे कोणते मिळणार आहे, हे कोणाच्याही बुद्धीला कळत नाही. कर्माचे फल दोन प्रकारचे आहे, एक दृष्ट आणि दुसरे अदृष्ट. त्यांपैकी दृष्ट फले बुद्धीला कळतात. शेतात पेरले असता धान्य पिकते, व्यापारधंदा केला असता पैसा मिळतो, लग्न केले असता संतती होते. हे भूयोदर्शनावरून सहज कळते. पण काही कर्माचा जो अदृष्टफलाशी कार्यकारणभाव आहे तो मात्र बुद्धीला कळत नाही. कोणत्या कर्माचा कसा स्वभाव आहे, आणि ते तसे फल का देते, हे कोणालाही केवळ बुद्धीने सांगता येणार नाही. बरे, कर्मात अदृष्ट फल देण्याची शक्ती नाही असेही म्हणता येणार नाही. कारण, प्रत्येक प्राण्याला जी सुखदुःखे प्राप्त होतात त्यांचे कारण पूर्वजन्मार्जित कर्म मानल्याशिवाय गती नाही. केवळ स्वभाववादाने सुखदुःखांच्या भोगाची व्यवस्था लागणार नाही, म्हणूनच, श्रीतुकाराममहाराजांनी भोग तो न पडे संचितावाचुनी असा कर्मसिद्धान्त सांगितला आहे. शिवाय, मनुष्याची बुद्धी अस्थिर असते, तशी ती अल्पज्ञही असते. काही वेळेला बुद्धीतील ज्ञान नष्टही होते. पुष्कळ वेळा बुद्धी चुकतही असते, आणि महत्त्वाची गोष्ट अशी की, बुद्धीने केलेली चूक बुद्धीला कळत नाही. विद्यार्थ्याने गणितात केलेली चूक त्याला कळत नाही. पण पंतोजी मात्र सांगू शकतो. त्याप्रमाणे बुद्धीची चूक वेद सांगू शकतो. या दृष्टिकोणातूनच श्रीतुकाराममहाराजांनी वेद, शास्त्रे व पुराणे यांचे प्रामाण्य मानले आहे. एवढेच नव्हे, तर त्याविषयी सोज्वळ अभिमानही त्यांचे ठिकाणी दिसून येतो. महाराज म्हणतात- “मी जो जगाला उपदेश करीत आहे ती माझ्या पदरची वाणी नाही. वेदांतील सिद्धान्तच आम्ही सांगत आहोत. व्यासादिकांनी पुराणांत जे सांगितले, त्याचाच आम्ही अनुवाद करीत आहोत; 'विठोबाला शरण जावे आणि त्याचे निजनिष्ठेने नाम घ्यावे' ही गोष्ट वेदांनीच सांगितली आहे. विठोबाला शरण जाणाऱ्याला भाग्यवान म्हणावे, भगवन्नामाने लोक उद्धरून जातात, ही गोष्ट वेदांनी व पुराणांनी आवर्जून सांगितली आहे. सहा शास्त्रांचे मनोगत विठोबाला शरण जावे हेच आहे. अठरा पुराणेही हेच सांगतात. मला हे वेदांचे तात्पर्य विठ्ठलाच्या कृपेने समजले आहे. एरव्ही मला वेदाक्षरे घोकण्याचा मुळीच अधिकार नाही. पण विठ्ठलाचा प्रसाद माझ्यावर असल्यामुळे मी अभिमानाने सांगू शकतो की, वेदाचा अर्थ आम्हालाच कळतो, येरांनी त्याचा केवळ भार वहावा"; अर्थात तुकोबारायांच्या अभंगाला जे प्रामाण्य आले, याचे कारण तुकोबाराय वेदप्रामाण्य मानीत होते हेच आहे. तुकोबारायांच्याच शब्दात सांगावयाचे झाले, तर ते म्हणतात, “वेदबाहा जो बोलतो तो पाखंडी असतो, त्याचे संतांमध्ये केवळ काळे तोंड होते. ज्याला वेद, शास्त्रे, पुराणे मान्य नाहीत, त्याचे तोंडदेखील पाहू नये. वेदांची निंदा करणारा चांडाळ, पातकी, सुतकी व खळ आहे." असे म्हणणारे तुकाराम महाराज वेदविरोधी काही सांगतील, ही गोष्ट स्वप्नातसुद्धा शक्य नाही. सारांश, श्रीतुकाराम महाराजांची वेदनिष्ठा सोज्वळ होती यात शंकाच नाही. त्यांचे कुलदैवत असलेल्या पांडुरंगाचे वर्णन करताना ते म्हणतात - विठ्ठल आमुचे जीवन । आगमानिगमांचे स्थान । हा विठ्ठल आगमनिगमांचे उत्पत्तिस्थान असून प्रतिपाद्य स्थानही आहे; म्हणजे प्रतिपाद्य विषयही आहे. 'शाखयोनित्वात्' (ब्र. सू. १/१/३) या सूत्राचा पहिल्या व दुसऱ्या वर्णकांत श्रीमत् शंकराचार्यांनी जो अर्थ केला आहे तोच, माझ्या मते 'आगमनिगमांचे स्थान' या वाक्याचा आहे. विठ्ठल आगमनिगमांच्या उत्पत्तीला कारण आहे, तसा तो वेदैकगम्य आहे हे सिद्ध होते. सारांश गाथेत पदोपदी वेदशास्त्रपुराणांतील सिद्धान्त ग्रथित केले असल्यामुळे वेदशास्त्रपुराणांचे प्रामाण्य श्रीतुकाराम महाराजांना मान्य आहे.

गाथेचा आत्मा पांडुरंग

पंढरीचा पांडुरंग हा गाथेचा आत्मा आहे. तुकाराममहाराजांचे विचारचक्र एका पांडुरंगाभोवती फिरत आहे. त्यांनी आपली वाणी पांडुरंगाला समर्पण केली असून, पांडुरंगाचे वर्णन करण्यातच त्या वाणीला धन्यता वाटते. शून्याच्या पाठीमागचा आकडा पुसला तर, शून्याला जसा अर्थ राहात नाही, त्याप्रमाणे गाथेतून पांडुरंग वगळला, तर गाथा म्हणून काही पदार्थच शिल्लक राहात नाही, इतके या गाथेचे पांडुरंगाशी तादात्म्य आहे.
या पांडुरंगाचे महाराजांनी जे वर्णन केले आहे ते पाच प्रकारचे आहे. याचे कारण महाराजांना पांडुरंगाचे दर्शन पाच प्रकारांनी झाले होते, ते असे -
(१) प्रतिमादर्शन, (२) सगुणदर्शन, (३) अवतारदर्शन, (४) ईश्वरदर्शन आणि (५) ब्रह्मदर्शन.

त्यांपैकी प्रतिमेचे वर्णन महाराज असे करतात
(१) हा पांडुरंग बाळमूर्ति असून समचरण आणि कंबरेवर हार ठेऊन भक्तांची आट पहात उभा आहे. गळ्यात तुळशीच्या माळा, कंबरेला पीतांबर, कानांत मकराकार कुंडले, कंठात कौस्तुभमणी आणि डोक्यावर किरीट धारण केलेला असा हा पांडुरंग आहे. हा मूळ निर्गुण असलेला नामरूपाला आला. विटेवर पाय जोडून उभा असून याची दृष्टी किंचित अर्धोन्मीलित व भक्तावर केंद्रित झाली आहे. हा देव प्रथम वैकुंठाहून मथुरेत आला. तेथून तो गोकुळात, गोकुळातून द्वारकेत आणि द्वारकेतून पुंडलिकाकरिता पंढरीत आला. पण पुंडलीक स्वार्थी भक्त नव्हता. पुंडलीक म्हणाला- 'देवा, माझा तर तुम्ही उद्धार केला आहेच. पण जे मूढ, पापी, ज्ञानविज्ञानहीन आहेत त्यांना तू आपल्या कासेला लावून भवसिंधूच्या पलीकडे ने.' अशी प्रार्थना करताच त्या करुणाकर देवाने 'तथास्तु' म्हणून वर दिला व अद्यापही पुंडलिकाला दिलेला वर खरा करण्याकरिता तो उभा आहे. पुंडलिकाच्या आज्ञेवाचून त्याला कोठे जाता येत नाही; व बसताही येत नाही. हा विठ्ठलच श्रीतुकाराममहाराजांचे कुलदैवत होते. महाराज पंढरीला येत होते तेव्हा देवाचे हे प्रतिमारूप पाहून त्यांचा देहभाव हारपत होता. कन्या सासरी जाताना ती जशी पुनः पुन्हा आईबापाकडे परतून पाहते; व तिला वियोग असह्य होऊन तिचे डोळे जसे पाणावतात, त्याप्रमाणे पंढरीहून परत जाताना महाराजांची स्थिती होत असे. इतके त्यांना विठ्ठलाच्या मूर्तीविषयी प्रेम वाटत होते; आणि त्या विठ्ठलमूर्तीचेच ध्यान चित्तात स्थिरावल्यामुळे देहला गेल्यावरदेखील विठ्ठलाच्या सान्निध्याचे सुख भोगीत होते. भंडाऱ्यावर बसूनदेखील शंभर कोसावरची पंढरी त्यांना मूर्तिमंत दिसत होती. इंद्रायणीत स्नान करून देखील चंद्रभागेचे नित्य स्नान घडत होते. कारण विठ्ठल, पंढरी, चंद्रभागा यांवाचून त्यांच्या चित्तात दुसरा विषयच नव्हता. याप्रमाणे विठ्ठलाच्या प्रतिमादर्शनाचा परिणाम विठ्ठलाच्या ध्यानात होत असे.

(२) विठ्ठलाच्या या प्रतिमादर्शनापेक्षाही विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ त्यांच्या अंत:करणात अधिक होती, हेही पुष्कळ अभंगांवरून स्पष्ट होते. “देवाने आपल्याला सगुणदर्शन द्यावे" याकरिता ते देवाला नानापरीने आळवीत होते. दर्शन देण्यास थोडा विलंब लावला तर महाराज रागावतसुद्धा होते. "अरे, अशी दगडाची खोळ पांघरून मैंदासारखा काय बसला आहेस ? तुझ्या दर्शनावाचून माझे मन, बुद्धी, इंद्रिये व शरीर यांच्यापैकी कोणालाही समाधान वाटणार नाही. तू दर्शन नाही दिले तर, ज्यांना तुझे दर्शन झाले आहे ते सर्व संत मला हसतील. तुझे प्रत्यक्ष दर्शन नाही झाले तर, माझ्या मनात तुझ्या अस्तित्वाविषयी संदेह निर्माण होईल; व यापुढे तुझे भजन करणे व्यर्थ आहे, असे मला वाटेल. मला तुझ्यापासून मायिक पदार्थ मागावयाचे नाहीत. केवळ तुझ्या दर्शनाचीच मला आवड आहे." इतके आळविल्यानंतर तो करुणाकर विठ्ठल कसा शांत राहील ! तो त्यांना प्रत्यक्ष सगुणदर्शन देत असे. अर्थात त्या सगुणदर्शनापासून जो आनंद व्हाक्याचा तो त्यांच्याकडून देखील वर्णन करणे अशक्यच. सारांश, विठ्ठल हा तुकाराममहाराजांच्या जीवाचे जीवन, सर्व संपत्तीचे निधान होता. या विठ्ठलाच्या ठिकाणी त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. 'विठ्ठलावाचून दुसरे ब्रह्म आहे,' असे कोणी म्हणेल तर, त्याचे बोलणे कानानेसुद्धा ऐकू नये. विठ्ठलावाचून दुसरे उपास्य दैवत नाही. कारण, इतर शेंदरी हेंदरी दैवते आपल्या पोटासाठी रडतात; व भक्तालाच उलट काहीतरी मागतात. पण माझा पंढरीराय सर्वश्रेष्ठ व बलवान आहे, असे त्यांनी वर्णन केले आहे.

(३) या विठ्ठलानेच मत्स्य-कच्छादी सोंगे घेतली. प्रल्हादाच्या हाकेसरशी उडी घालून स्तंभ फोडणारी हीच कृपावंत विठाई आहे. बलीचा द्वारपाळ होऊन पातळात राहणारा माझा स्वामी श्रीविठ्ठल आहे. श्रीरामदेखील हाच आहे. गोपींशी रममाण होणारा, वाळवंटावर काल्याची क्रीडा करणारा, अर्जुनाचे सारथ्य व गीतोपदेश करणारा हाच विठ्ठल आहे. हरिहरांत तत्त्वत: भेद नसल्यामुळे भगवान शंकरदेखील हाच विठ्ठल आहे. तात्पर्य, अनेक अवतारांत अनेक रूपे धारण करणारा हाच विठ्ठल आहे.

(४) ज्याच्यापासून पृथिव्यादी भूत-भौतिक जगत निर्माण झाले, तोच हा पंढरीचा राणा आहे. हाच शरीर व इंद्रियांना प्रेरणा करतो. हाच त्या त्या इंद्रियांकडून व्यवहार करवून घेतो. हा षड्गुणसंपन्न आहे. याप्रमाणे महाराजांना हा विठ्ठल जगत्कारण ईश्वर आहे, असे प्रतीतीला येत होते. कारण, ते भक्तीच्या क्षेत्रात विठ्ठलाला एकदेशी मानीत असले तरी, हा विठ्ठल तत्त्वत: जगत्कारण व जगाचे अधिष्ठान आहे, असा त्यांना साक्षात्कार होत असे. म्हणूनच निर्गुण स्वरूपाच्या दृष्टीने त्यांनी विठ्ठलाच्या निर्विशेष स्वरूपाचेही वर्णन गाथेत केले आहे.

(५) या विठ्ठलाला वस्तुतः नाव नाही, रूप नाही, देशकालवस्तुमर्यादा नाही. हा विठ्ठल जगाचे अधिष्ठान असल्यामुळे सर्व जनांत व त्रिभुवनांत विस्तारला आहे. हा विठ्ठल नभापेक्षाही मोठा आणि अणूचाही गाभा आहे. हा विठ्ठलच सर्वांचा अंतरात्मा आहे. मी जेथे जेथे पाहतो तेथे तेथे या विठ्ठलाचेच स्वरूप मला दिसत आहे. याप्रमाणे महाराजांना विठ्ठलाचे (१) प्रतिमादर्शन, (२) सगुणदर्शन, (३) अवतारदर्शन, (४) ईश्वरदर्शन (५) ब्रह्मदर्शन असे पाच प्रकारांनी दर्शन झाले होते व पाचव्या दर्शनापर्यंत जो आलेला आहे, त्याला खरे विठ्ठलाचे दर्शन झाले, असे त्यांचे म्हणणे आहे. या पाच दर्शनापैकी प्रतिमादर्शन केवळ चक्षुरिद्रियानेच होते. विठ्ठलाचे सगुणदर्शन अनन्यभक्तीसहित चक्षुरिद्रियाने होते. अवतारदर्शन तत्तद्रूपविषयक भावनासहित चक्षुरिद्रियाने होते. ईश्वरदर्शन' मात्र केवळ परोक्ष आहे, आणि ब्रह्मदर्शन गुरूने उपदेशिलेल्या महावाक्याने विठ्ठलाचे आत्मत्वाने अभेदज्ञान झाले असता ते प्रत्यक्षच होते.

कर्मकांड

तुकाराम महाराजांचा अवतार धर्माच्या रक्षणाकरिता होता, हे त्यांनी 'धर्म रक्षावयासाठीं । करणे आटी आम्हांसी॥' या अभंगात स्पष्टच सांगितले आहे. म्हणून त्यांनी गाथेमध्येच ठिकठिकाणी 'वेदविहित' कर्माचा उपदेश केला आहे. कारण, जीवाला जोपर्यंत देह, इंद्रिय, मन आणि बुद्धी आहेत; आणि यांच्याशी जोपर्यंत तादात्म्य आहे तोपर्यंत जीवाकडून कर्म घडणे अपरिहार्य आहे. मग ते पापात्मक असेल, किंवा पुण्यात्मकही असेल. कर्म करताना मनुष्य, त्याच्या फलाची दक्षता घेत नसला तरी, कर्माचे फळ जीवाला भोगलेच पाहिजे. वर्तमान जन्मात जी सुखदुःखे प्राप्त होतात ते मागच्या संचिताचे फळ आहे. आता जे आपण करू, त्याचे पुढे फळ मिळते. वेदनिषिद्ध कर्माला पाप म्हणावे, आणि वेदविहित कर्माला पुण्य म्हणावे. अर्थात पाप आणि पुण्य हे बुद्धिगम्य नसून शास्त्रगम्य आहे. कारण, बुद्धीने चांगले किंवा वाईट ठरविलेल्या कर्माला पाप किंवा पुण्य म्हणता येणार नाही. याकरिता वेदाचे ऐकावे, वेदविहित कर्मे करावीत. वेदाज्ञेप्रमाणे न वागल्यास नरकाची प्राप्ती होते. निषिद्धविषयाचे सुख येथे गोड वाटत असले तरी पुढे त्याला यमदंड आहे. नरकात कर्मानुसार शिक्षा भोगावी लागते. मग तो पाप करणारा राजा जरी असला आणि त्याचे आचरण चांगले नसेल तर, यमाघरी त्याला रंक व्हावे लागते. इहलोकातील राजेपणा तेथे उपयोगाला येत नाही. म्हणून महाराजांनी गायेत काही निषिद्ध कर्मांचा उल्लेख केला आहे. हिंसा, चोरी, अगम्यगमन, अभक्ष्यभक्षण, अपेयपान, अस्पृश्यस्पर्शन, असत्यभाषण या कर्माचा निषेध केला असून असे कर्म करणाऱ्यांना दुष्ट, नष्ट, दुर्जन, लंड या शब्दांनी निर्देशिले आहे. त्यांची बोलून पुष्कळच फजिती केली आहे. 'कलियुगामध्ये सर्व लोकांची अधर्माने वागण्याकडे फार प्रवृत्ती झाली आहे.' असे त्यांनी 'ऐका कलीचे महिमान' या अभंगामध्ये खेदोद्गार काढले आहेत. त्यांनी आपल्या गाथेत जशी निषिद्ध कर्मे सांगितली, तशी 'वेदविहित तुम्ही आईका हो कम । 'या अभंगात वर्णाश्रमविहित कर्मेही सांगितली आहेत.

'ब्रह्मचारी धर्म घोकावीं अक्षरें । 'या अभंगात आश्रमविहित कर्मे सांगितली आहेत. जो परमहंस स्थितीला पोहोचला आहे, त्यालाच केवळ विधीचे बंधन नाही. एरव्ही देहतादात्म्य व कर्तृत्वभोक्तृत्वाचा अभिमान असूनही 'बोले वर्म जो चाले या विरहित । तो जाणा पतित श्रति बोले । ' वर्णाश्रमधर्माचा त्याग करून जो वागतो तो पतित होतो, असे महाराजांनी म्हटले आहे. धर्माचे फळ चार प्रकारचे महाराजांनी सांगितले आहे(१) सामाजिक दृष्ट फल, (२) वैयक्तिक दृष्ट फल, (३) पारलौकिक अदृष्ट फल, (४) ऐहिक अदृष्ट फल. प्रत्येक मनुष्य धर्माप्रमाणे वागू लागला असता समाजामध्ये नैतिक स्थैर्य निर्माण होऊन समाजरचना सुव्यवस्थित आणि सुसंघटित राहू शकते. केवळ कायद्यावर आधारलेली जी समाजरचना असते ती बहुधा भोगप्रधान असल्यामुळे तिच्यात अनीती, भ्रष्टाचार, बंडखोरी निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. कायदे कितीही जाचक केले, तरी त्यातून माणसे पळवाटा शोधून काढतात. न्यायालये साक्षीपुराव्याच्या अभावी अंधळी असल्यामुळे गुन्हेगारदेखील न्यायालयात निर्दोष ठरतात. म्हणून समाजात अनीतीला वाव मिळतो. भारतीय समाजरचना धर्मनियंत्रित असल्यामुळे अनीतीने वागणे पाप आहे आणि तो एक सामाजिक गुन्हा आहे, त्या गुन्ह्याची शिक्षा न्यायालयात मिळत नसली तरी ईश्वर देत असतो, ही भावना, धर्ममर्यादा पाळणाऱ्या समाजात अद्यापही आहे, आणि ही भावना ज्या समाजात असते तो समाज अधिक नीतिमान असतो. हे धार्मिक मूल्य समाजात रुजविण्याचे कार्य तुकोबारायांनी मोठ्या कौशल्याने व जिव्हाळ्याने केले आहे. जी व्यक्ती राजशासनाच्या क्षेत्रात किंवा व्यवहाराच्या क्षेत्रात जितकी श्रेष्ठ असते तितके तिच्या बुद्धीने केलेल्या नैतिक धार्मिक चुकांचे परिणामदेखील श्रेष्ठच असतात. कुटुंबप्रमुखांनी केलेल्या अनैतिक वर्तनाचे दुष्परिणाम कुटुंबांना जसे भोगावे लागतात, तसे समाजप्रमुखाने केलेल्या अनैतिक वर्तनाचे दुष्परिणाम समाजाला आणि देशाला भोगावे लागतात. म्हणून आपल्या सर्व संतांनी वेदप्रामाण्य, धर्मानुष्ठान, ईश्वरकारणवाद, हरिभक्ती या मूल्यांचा पुरस्कार करून व्यक्तिगत उत्कर्षाकरिताच नव्हे तर, समाजातील नैतिक स्थैर्याकरितादेखील यांची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. म्हणून महाराज म्हणतात - 'जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची॥१॥वर्ते तैसें वर्तेजन । बहुता गुण एकाचा॥२॥' (गा. भाष्य १५०७) ज्याच्या मानेवर महत्त्वाच्या कार्याची धुरा आहे, त्याची बुद्धी धर्म-नीतिसंपन्न असावी; कारण तो जसे वर्तन करील तसे इतर लोक वागतात. त्याच्या एकट्याचा सद्गुण व दुर्गण इतरांना प्रास होतो. प्रत्येक व्यक्तीने, विशेषत: समाजप्रमुखांनी आणि संतांनी सामाजिक-नैतिक स्थैर्याकरिता धर्माप्रमाणे वागले पाहिजे. त्या योगाने समाजाचा नैतिक उत्कर्ष होतो हे धर्माचे सामाजिक दृष्ट फल आहे. आता व्यक्तीने धर्मानुष्ठान केल्यास सामाजिक नीती हे जसे धर्माचे घर फल आहे तसे व्यक्तीची चित्तशुद्धी होऊन त्याला भगवत्प्राप्ती होते हे वैयक्तिक दृष्ट फल आहे.

व्यक्तीने सकामबुद्धीने धर्मानुष्ठान केल्यास परलोकप्राप्ती हे व्यक्तिगत अदृष्ट फल आहे. वेदविहित धर्मानुष्ठान केल्यास त्याला सद्गती प्राप्त होते हे गाथेत सांगितले आहे. याप्रमाणे व्यक्तीला मिळणारे धर्माचे हे तिसरे अदृष्ट फल आहे. आता धर्मानुष्ठानापासून कालांतराने इहलोकातही अट (ज्यांच्यातील कार्यकारणभाव प्रत्यक्षप्रमाणाने कळत नाही.) असे फल मिळते. व्यक्तीने वा समाजाने यज्ञ, दान, तप इत्यादी धर्मानुष्ठाने केल्यास सुवृष्टी, सुभिक्ष, धनधान्यसमृद्धी, सुप्रजोत्पत्ती व पशुसंपत्ती, वृक्षलतावृद्धी होते. हे धर्माचे चौथे अदृष्ट फल आहे. म्हणून 'यज्ञभूतांच्या पाळणा' असे महाराज म्हणतात, याप्रमाणे धर्मानुष्ठानाने सामाजिक वैयक्तिक दृष्ट फल; व पारलौकिक-ऐहिक अदृष्ट फल प्राप्त होते. याउलट अधर्मानुष्ठानाने सामाजिक-वैयक्तिक नैतिक अध:पात, हे दृष्ट फल आहे व नरकप्राप्ती आणि इहलोकात अनावृष्टी, अतिवृष्टी, दुर्भिक्ष्य, दुःख, दैन्य इत्यादी अदृष्ट फल प्राप्त होते. हे सर्व धार्मिक सिद्धान्त गाथेत प्रसंगानुसार महाराजांनी इतस्ततः सांगितले आहेत.

ही धर्माधर्माची फले कदाचित वर्तमान जन्मात प्राप्त होतात. कदाचित भावी जन्मात प्राप्त होतील. कारण कर्माचे तीन प्रकार आहेत; (१) पुढे होणारे ते क्रियमाण, (२) मागे करून ठेवले ते संनित, (३) ज्याचा भोग चालू आहे ते प्रारब्ध. याप्रमाणे सुखदुःखाच्या भोगाला व जन्ममरणाला कारण कर्म आहे असे महाराज सांगतात. सारांश, पाप, पुण्य, पूर्वजन्म, पुनर्जन्म, सुख, दुःख, चांगल्या वाईट योनीत जन्म, सद्गती, दुर्गती ही सारी मनुष्यदेहात घडलेल्या कर्माची फले आहेत, असे तुकोबांनी पदोपदी सांगितले आहे.

कर्तव्योपदेश श्रीतुकाराममहाराजांनी गाथेत जो मनुष्यमात्रांना कर्तव्यांचा उपदेश केला आहे तो आजही लक्षात घेण्यासारखा आहे. मनुष्यमात्राने वेदविहित धर्माप्रमाणे वागावे हे सर्व कर्तव्यांचे मुख्य सूत्र असले तरी वेगवेगळी कर्तव्येही सांगितली आहेत. ब्रह्मचाऱ्याने ब्रह्मचर्याश्रमात वेदाक्षरे घोकावीत, गृहस्थाश्रमात षट्कर्मसंपन्न असावे, वानप्रस्थाश्रमात परिग्रहात राहूनही वनात किंवा गावात अपरिग्रहवृत्तीने राहावे, संन्याशाने अहंममतेचा त्याग करावा. परमहंसाला मात्र विधीचे बंधन नाही. याप्रमाणे चार आश्रमांची कर्तव्ये सांगितली, तशी चार वर्णांचीही कर्तव्ये सांगितली आहेत. हे चार वर्ण एकाच हरीपासून झाले आहेत. 'चारी वर्ण झाले एकाचिये अंगी । पापपुण्य भार्गी विभागिलें । ' (गा. भा. ९६८) एकाच हरीपासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांची उत्पत्ती झाली असून त्यांच्या पापपुण्यानुसार परस्परात भेदही निर्माण झाला आहे. ब्राह्मणाने आपली विहित कर्मे करावीत. क्षत्रियाने प्रजापालन करावे. वैश्याने व्यापार करावा. शूद्राने परिचर्या करावी. तसेच, सगळ्या जातीकरिता सामान्य धर्मही सांगितले आहेत. जोपर्यंत हातापायांत शक्ती आहे तोपर्यंत तीर्थयात्रा कराव्यात. काळाने अवकाश दिला आहे तोपर्यंत हरिगुण ऐकावेत आणि गावेत. अर्मनीतीने धन मिळवावे, पण ते जमिनीत पुरून न ठेवता त्या साधनाने ब्रह्मवृंदांची व यतीची पूजा करावी. सत्य आचरण असावे. भूतमात्राविषयी दया असावी. विषयासक्त नसावे. काम-क्रोध-लोभ यांचा त्याग करावा.संतसंगती करावी. थोडाफार परोपकार करावा. सेवकाने स्वामिनिष्ठ असावे, सैनिकांनी राजनिष्ठ असावे. पतिव्रतेने पतीची शुश्रूषा करावी. पुत्राने मातापित्यांची सेवा करावी, मुमुक्षने गुरूची सेवा करावी. गायत्री, कन्या, गाय आणि हरिकथा यांचा विक्रय करू नये, वेदनिंदा करू नये, सर्वांनी पंढरीला जावे, एकादशी, सोमवार ही व्रते करावीत. गळ्यात तुळशीची माळ घालावी. पंढरीला जाऊन चंद्रभागेचे स्नान करावे. हरिकथा करावी व ऐकावी; आणि हरिनाम घ्यावे, हा तर सर्वांचा परमधर्म आहे.

भक्तिकांड

गाथेचा मुख्य विषय 'विठ्ठलभक्ती' आहे. पण ही भक्ती निर्दोष असणे अत्यंत आवश्यक आहे. या भक्तीची फले चार प्रकारची असून ती अतिशय महत्त्वाची आहेत. ती अशी-(8) सगुणसाक्षात्कार, (२) भक्तांचा योगक्षेमनिर्वाह, (३) देवकृत भक्तसेवा, (४) भोग-मोक्षप्राप्ती (५) भक्तीविषयी प्रेम. ही फले भक्तीने प्राप्त होतात. पण भक्तीत चार दोष नसावेत. ते दोष असे- (१) दंभ, (२) पाप, (३) कामना आणि (४) व्यभिचार. तुकाराम महाराजांनी या चार दोषांचा तीव्र निषेध केला आहे.

(१) दंभाचा तर महाराजांना भारी वीट होता. ते म्हणतात, दांभिक भक्तीमुळे लोक भुलतील, चार लोकांत मानमान्यताही मिळेल. पण देवाला भुलविता येणार नाही. मग तो दांभिक भक्ती करणारा कितीही विद्वान असला तरी, बेगडाच्या रंगाप्रमाणे ती विद्वत्ता फुकट आहे. सासू मेली म्हणून सून रडते, किंवा मोल देऊन रडावयास लावले तर, डोळ्यांत आसवे नसतात; आणि मनात प्रेम नसते. अंतरात संसार आणि बाह्यात्कारी भक्ती दाखविली तर त्याचा काय उपयोग आहे ? वांझेने पोटावर चिरगुटे बांधून गरोदर असल्याचे सोंग दाखविले, तर त्यापासून कोणते फल मिळणार आहे ? त्याप्रमाणे दांभिक भक्ती करणाऱ्यांना वरील फले मिळत नाहीत.

(२) तसेच भक्तीमध्ये पापाचाही दोष नसावा. एकीकडे स्नान-संध्या करतो आणि दुसरीकडे निषिद्ध अन्न खाऊन पाप जोडतो. विषयाची आसक्ती ठेवून थोडी भक्ती केली, तर त्या दुराचाऱ्याचे भजन ओंगळवाणे आहे. त्यामुळे त्याचे नरकाला जाणे चुकणार नाही. इंद्रियांना कोणताही नियम नसेल, तर मुखाने 'राम राम' म्हणण्यात काय अर्थ आहे ? पक्वान्ने खाता खाता माशी पोटात गेली, तर ते जेवण सुखकारक होत नाही. त्याप्रमाणे पापसहकृत भक्ती, वरील फलप्राप्तीला कारण नाही. ङ्के) तसेच, जे लोक भोगावामनेने देवाची मी करतात, ते देखील सोने देस लोखंड विकत घेतल्यासारखे आहे. आपल्या घरी संतती वाढावी, धन-धान्याची समृद्धी असावी, या हेतूने जी भक्ती केली जाते, ती भक्ती देवाला आवडत नाही. (४) तसेच जगत्कारण पंढरीरायाला सोडून जे लोक क्षुद्र देवतांची उपासना करतात ती भक्ती व्यभिचारी आहे. ज्या देवता आपल्या पोटासाठी रडतात, भक्तांनाच काहीतरी खाण्यास मागतात, त्यांच्या भक्तीपासून कोणते फळ मिळणार आहे ? शाक्ताने केलेली शक्तीची उपासना व मद्यमांसाचे भक्षण, हा तर शुद्ध अधर्म आहे. हरिहरांसारखे महान देव सोडून क्षुल्लकाचे ठिकाणी जे भाव ठेवतात त्या देवभक्तपणाची फजिती फार असते. कवड्यांची माळ घालणे, तोंडाला शेंदूर फासणे, हातात झेंगट घेणे, ह्या सर्व क्रिया वेदबाह्य असल्यामुळे तामस आहेत. म्हणून एका पंढरीरायावाचून जीवदशेतील अन्य देवतांची उपासना करणे हा व्यभिचार आहे. सारांश, दंभ, पाप, कामना आणि व्यभिचार हे चार दोष वगळून जी असते ती खरी 'शद्ध भक्ती' होय.

मूर्तिमीमांसा

आपल्या वैदिक धर्मामध्ये मूर्तिपूजा ही अनादिकालापासून आहे. वेदामध्ये 'उद्गीथ, दहर, शाण्डिल्य, मधु' इत्यादी उपासना सांगितल्या आहेत. पुराणकालापासून रामकृष्णांच्या मूर्तीची उपासना सुरू झाली. या मूर्तिपूजेचा उपयोग निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार होण्याकरिता आहे. कारण, निर्गुणाचे ज्ञान अनधिकाऱ्यांना होत नाही. रामकृष्णादिकांचा सगुण साक्षात्कार उत्कृष्ट भक्तीशिवाय होत नाही. म्हणून त्यांच्या प्रतिमा किंवा मूर्ती करण्यात येतात, आणि त्यांची पूजा करण्यात येते. यालाच श्रीमद्भागवतामध्ये 'प्राकृत भक्ती' असे म्हटले आहे. प्राकृत याचा अर्थ 'प्रकृतिः आरम्भः' असा श्रीधराचार्यांनी केला आहे. प्रकृती याचा अर्थ प्राथमिक भक्ती.म्हणून या भक्तीला प्राकृत भक्ती म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगमूर्तीची उपासना ही मुख्य आहे. आणि ही पांडुरंग मूर्ती पुराणोक्त आहे, असे श्रीएकनाथ महाराजांनी पुढील ओवीत म्हटले आहे. 'ज्या पांडुरंगादि द्वारावती त्या स्थावरा मूर्ति पुराणोक्त-'(ए.भा.अ.३ ॥५७१) पण ही पांडुरंगमूर्ती केशवादी चोवीस मूर्तीपिकी नसून साक्षात परब्रह्माची मूर्ती आहे याविषयी सर्व संतांचे एकमत आहे. ते असे- 'परब्रह्मलिना भजे पाण्डुरङ्गम्॥' असे श्रीमदाद्य शंकराचार्यांनी म्हटले आहे. 'नेणो ब्रह्म मार्ग चुकलें । उघडे पंढरपूरा आलें । ' असे श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात. 'पुंडलीकाचे भेटी परब्रह्म आलें गा॥' असे श्रीनामदेव महाराज म्हणतात. 'ते हैं ब्रह्म विटेवरी । 'असे श्रीतुकाराम महाराज म्हणतात.

या प्रमाणावरून पांडुरंगाची दिगंबर असलेली मूर्ती केशवादी चतुर्विंशति मूर्तीहून वेगळी, आणि साक्षात असंग अशा परब्रह्माची मूर्ती आहे, हे सिद्ध होते. ही परब्रह्ममूर्ती वारकरी संप्रदायामध्ये उपास्य आहे. याशिवाय शिवविष्णूंच्या ज्या प्रतिमा केल्या जातात, त्याही उपास्य आहेत, असे श्रीतुकाराम महाराजांनी म्हटले आहे. कित्येक नास्तिकांना मूर्तिपूजा मान्य नाही, पण त्यांना मूर्तीचे स्वरूप कळत नाही. येवढेच काय, पण कित्येक भाविकांनाही त्या मूर्तीच्या पाठीमागे जे शास्त्र आहे, ते आकलन होत नाही. महाराज नास्तिकांना असे विचारतात, 'अवघे ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नोहें ? । '

"सर्वच ब्रह्मरूप आहे, तर मग धातूंच्या किंवा पाषाणांच्या प्रतिमेत देव का बरे असणार नाही ? पण ज्यांना अशी शास्त्रशुद्ध श्रद्धा नाही, त्यांना किती म्हणून सांगावे ? नास्तिक लोक आपला तर्क पुढे करतात आणि तकनि देवाची सिद्धी करू पाहतात. पण संतांनी प्रतिमेत देव असतो या विषयात शास्त्रशुद्ध श्रद्धेलाच प्राधान्य दिले आहे. पण नास्तिकांना हे कळत नसल्यामुळे ते मूर्तीचा व मूर्तिपूजेचा निषेध करतात."

मूर्तीचे शास्त्रीय दृष्टीने पृथक्करण केल्यास त्यात चार पदार्थ दिसून येतात. यासंबंधी विवेचन महाराजांनी पुढील अभंगात केले आहे - 'केला मातीचा पशुपति । परि मातीशी काय महती । शिवपूजा शिवासी पावें । माती मातीमार्जी सामावें॥' (गा. भा. १३९)

. या वचनातून असा निष्कर्ष निघतो की, माती हा पहिला 'पार्थिव पदार्थ.' त्या मातीला दिलेला शिवलिंगाचा आकार हा दुसरा पदार्थ. पण मातीला दुसरा आकार जरी प्राप्त झाला, तरी त्याला महत्त्व नाही. त्या आकारात मंत्राने आवाहित शिवस्वरूप जेव्हा असते, तेव्हा त्या मातीच्या आकाराला देवत्व प्राप्त होते. अर्थात त्या आकारातील 'आवाहित शिव' हा तिसरा पदार्थ आहे, आणि या तीन पदार्थांत निर्गुण ब्रह्माची सामान्यरूपाने व्याप्ती आहे. त्यामुळे 'निर्गुण ब्रह्म' हा चवथा पदार्थ आहे. एकूण मूर्तीत, (१) माती, (२) मातीला दिलेला शिवलिंगाचा आकार, (३) मातीच्या आकारात असलेला आवाहित शिव, (४) आणि सर्वांत व्याप्त असे निर्गुण ब्रह्म. आता या चार पदार्थापैकी मंत्राने आवाहित शिव नसेल तर, माती, मातीला दिलेला आकार आणि निर्गुण ब्रह्म असे तीनही पदार्थ पूजार्ह नाहीत. कारण आवाहित शिवावाचूनदेखील माती आणि मातीला दिलेला आकार आहेच. पण त्यात शिवाचे आवाहन केले नसेल तर 'मातीसी काय महती ?' त्यात शिवाचे आवाहन केल्यानंतरच ती माती व मातीला दिलेला आकार पूजाह होतो, आणि त्याची पूजा केली असता ती पूजा शिवाला प्राप्त होते, आणि विसर्जनानंतर माती मातीत सामावते. हाच न्याय सर्व मूर्तीच्या बाबतीत आहे. काही मूर्ती चल असतात, काही मूर्ती अचल असतात. आणि मूर्ती ह्या केवळ मातीच्याच असतात असे नाही. 'पाषाण, काष्ठ, धातू' इत्यादी पदार्थांच्या मूर्ती कराव्यात असे शास्त्र सांगते. तसेच वेदापासून ज्ञानेश्वरी-गाथेपर्यंत असलेले आस्तिक ग्रंथ आणि शालिग्राम हेदेखील भगवंताचे स्वरूपच आहे. ग्रंथांत आणि शालिग्रामात देवाच्या आवाहनाची गरज नाही. कारण, तेथे देव नित्यसन्निहित असतो. म्हणून कित्येक वारकऱ्यांच्या घरी 'ज्ञानेश्वरी' इत्यादी पोथ्यांची पूजा केली जाते, ते सुद्धा शास्त्रशुद्ध आहे.

मूर्तीत आवाहित जे देवत्व असते ते केवळ शास्त्रगम्य आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने पाषाणाचा किंवा काष्ठाचा एक विशिष्ट आकार दिसतो. पण त्यात आवाहित असलेले देवत्व केवळ शास्त्रगम्य असल्यामुळे, 'हा देव आहे' ही दृष्टी येण्याकरिता व त्याची उपासना करण्याकरिता शास्त्रशुद्ध श्रद्धा हीच कारण आहे. शास्त्रशुद्ध श्रद्धा म्हणण्याचे कारण, तामस आणि राजस या श्रद्धेने देवाची पूजा केली, तर ती पूजा होत नाही, म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात. 'श्रद्धा म्हणितलियासाठी । पातेजों नये किरीटी । काय द्विज अंत्यज पृष्टिाअंत्यज नोहे॥' (ज्ञा. अ. १७.५१) मुळात श्रद्धा चांगली असली तरी रजोगुण-तमोगुणामुळे त्या श्रद्धेचे स्वरूप बिघडत असते, आणि त्या श्रद्धेने केलेले वैदिक कर्मदेखील केवळ निष्फळच नव्हे तर अनर्थालाही कारणीभूत होते. म्हणून शास्त्रशुद्ध श्रद्धा अर्थात सात्त्विक श्रद्धा असणे आवश्यक आहे. अशी सात्त्विक श्रद्धा ज्यांचे ठिकाणी नसते त्यांना मूर्तीत 'आवाहित देव' असूनदेखील देव न दिसता पाषाण दिसेल. 'म्हणे देवासी पाषाण । तुका म्हणे भावहीन ॥'असे महाराज म्हणतात. आता याउलट ज्यांच्या ठिकाणी सात्त्विक श्रद्धा असते, तो प्रत्यक्ष प्रमाणाने समोर पाषाण दिसत असला तरी, त्यात 'आवाहित देव आहे, असे त्याला शास्त्रीय ज्ञान असल्यामुळे तो त्या मूर्तीला देवच मानतो, आणि त्याला त्यापासून योग्य फलही मिळते. त्या दृष्टीने महाराजम्हणतात- 'पाषाण देवपाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी॥१॥भाव तोसार भाव तो सार । अनुभवी देव तेचि झाले॥२॥'यातील रहस्य असे आहे की, प्रत्यक्ष प्रमाणाने पाषाणाची पायरी आणि पाषाणाची प्रतिमा या दोघांत आकाराचा भेद असला तरी, पाषाणत्व जाती दोघांत समानच आहे, आणि निर्गुण-ब्रह्माची व्याप्तीदेखील समानच आहे. पण एका पाषाणावर पाय ठेवला जातो; आणि एका पाषाणाची पूजा केली जाते. याचे कारण ज्याच्यावर पाय ठेवला जातो त्यात शास्त्रसिद्ध आवाहित देवत्व नसते, आणि एकात शास्त्रसिद्ध विशेष देवत्व असते.

वारकरी संप्रदायात विष्णुप्रमाणे शिवाची उपासनादेखील विहित आहे आणि इतर राजस तामस देवतांचा तुकाराममहाराजांनी निषेध केला. 'हरिहर सांडुनी देव । धरिती भाव क्षुल्लकीं । 'तुकाराममहाराजांना 'शेंदरी हेंदरी दैवते' आणि 'शक्ती' यांची उपासना मान्य नव्हती. याचे मुख्य कारण असे की, सिद्धान्तदृष्टीने अनेक देव नाहीत. अर्थात हरीवाचून इतर सर्व देव जीवदशेतील देव आहेत. शिवाय, त्याचे स्वरूप तामस, त्यांच्या उपासनांचे प्रकार तामस आणि उपासकही तामस. त्यामुळे मुमुक्षूला त्या उपासना विहित नाहीत; म्हणून महाराजांनी त्या उपासनांचा निषेध केला आहे. आणखी एक सर्वांत महत्त्वाचे कारण असे सांगतात. की 'विधीचाहि लोप बुडविला वेद । शास्त्राचाहि बोध हरविला॥' इतर तामस देवतांच्या उपासनेत “विधीचा लोप, वेद बुडविला जातो, आणि शास्त्रांचा बोध हरविला जातो." अर्थात हे सर्व ज्या उपासनेत होते, ती उपासना श्रीतुकाराम महाराजांना मान्य नाही. हा विधीचा लोप हरिहरांच्या उपासनेत नाही म्हणूनच महाराजांनी हरिहरांच्या उपासनेला महत्त्व दिले आहे. जर हा विधिलोप हरिहरांच्या उपासनेतही मान्य असता, तर त्यांनी शाक्तांचा, त्यांच्या उपास्यदेवतेचा, उपासनाप्रकारांचा, व त्यांच्या श्रद्धेचा 'धरिती भाव क्षुल्लकी' असा उपहासगर्भ निषेध केला नसता. यावरून हरिहरांच्या मूर्तीची उपासना करताना विधिलोप होऊ देऊ नये, वेदशास्त्रांचे प्रामाज्य मानले जावे हेच महाराजांचे मनोगत आहे; हे कोण्याही नि:पक्षपाती बुद्धीच्या माणसाला मान्य करावे लागेल. जर विधिलोप दोन्ही उपासनेत समान असेल, तर केवळ मूर्तीच्या आकृतिभेदावरून. 'धरियेली सोंगें । येणे अवर्षी पांडुरंगे ॥ अवधे ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव ॥'

अशी उदार दृष्टी असणाऱ्या तुकाराम महाराजांना 'शेंदरी हेंदरी दैवते' यांचा निषेध करता आला नसता. सारांश, वारकरीसंप्रदायात हरिहारांच्या मूर्तीचा पुरस्कार केला, याचे कारण, त्या मूर्तीच्या पाठीमागे फार मोठी प्रक्रिया आहे; आणि ती म्हणजे पाषाणादिकांची आकृती, त्यात सिद्ध किंवा मंत्राने आवाहित देवत्व, सात्त्विक श्रद्धा आणि वेदशास्त्रप्रामाण्य. ही मूर्तिप्रक्रिया तुकोबांना चांगली परिचित होती; म्हणून त्यांनी मूर्तीतील देवाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असते, यासंबंधी 'केला मातीचा पशपति' इत्यादी अभंगांत उत्कृष्ट मीमांसा केली आहे.

श्रीतुकाराममहाराजांची भक्ती

श्रीतुकाराम महाराजांची गाथा हे एक भक्तिशास्त्र आहे, आणि या गाथेत शिकलेले बोल नसून अनुभविलेले बोल आहेत. महाराज म्हणतात- मी ज्याचा अनुभव घेतला, तेच या जगाला सांगत आहे. मी भक्तिरसाचे सेवन करतो; आणि तोच रस सर्वांना पाजत आहे. महाराजांची भक्ती सगुणसाक्षात्कारापर्यंत गेली होती. त्यांचे भाग्य असे होते की, देव त्यांचा क्रणी झाला होता. आपण मनुष्यजन्माला येऊन विठोबाचे दास झालो, याबद्दल त्यांना धन्यता वाटत होती. त्यांच्या आवडीचे विषय चार होते: (१) पंढरी, (२) चंद्रभागा, (३) पुंडलीक, (४) पांडुरंग. पंढरीची वारी करणे हीच त्यांची तीर्थयात्रा. एकादशी करणे हेच त्यांचे व्रत. विठोबाचे नाम घेणे हाच त्यांचा नेमधर्म. रामकृष्णहरी हाच त्यांच्या आवडीचा मंत्र, देवभक्तांत द्वैत न पाहणे हेच त्यांचे ज्ञान. “ह्या एकविध मार्गातून आम्ही भ्रष्ट होणार नाही. जी एक कल्याणाची वाट सापडली आहे त्याच वाटेने आम्ही जाऊ. देवा, माझ्या मनात दुर्वासना निर्माण होऊ देऊ नकोस. उत्पन्न झालेला एकनिष्ठ भाव तुमच्या कृपेने सिद्धीला जावो हीच प्रार्थना आहे." महाराजांच्या भक्तीत दंभ नव्हता. लोक त्याची निंदा-स्तुती काहीही करीत असले, तरी तिकडे त्यांचे लक्षच नव्हते. नामसंकीर्तनभक्ती करीत असता देहाचा व देशकाळाचा विसर पडत होता. चार लोकांचे रंजन करण्याकरिता त्यांचे कीर्तन नसे. देवाच्या उद्देशानेच देवाला ते आळवीत असत. पाप तर त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नसे. विहित विषय भोगणे सुद्धा ज्यांना आवडत नव्हते ते निषिद्ध विषयाकडे प्रवृत्त होणेच शक्य नाही. परधन मृत्तिकेसमान आणि परस्त्री रुक्मिणीमातेसमान मानीत होते. महाराजांच्या भक्तीत कामना तर मुळीच नव्हती. ते म्हणतात-"मला खावयास नाही मिळाले, संतती नाही वाढली, तरी चालेल. पण नारायण कृपा करो म्हणजे पुरे झाले." ऐहिक भोग भक्तीपुढे त्यांना तुच्छ वाटत असत. तसे पारलौकिक भोगांचीही त्यांना मुळीच इच्छा नव्हती. परमेष्ठीपद, इंद्रपद हे भोग नसून भवरोग आहेत असे ते मानीत होते. भक्तीपुढे ब्रह्मज्ञान आणि मोक्ष यांना सुद्धा मानले नाही, यापेक्षा भक्तीत निष्कामता कोणती असावी ? अव्यभिचारी भक्तीचा तर महाराजांनी कट्टरपणाने पुरस्कार केला आहे. पतिव्रतेला जसा भ्रतार प्रमाण, त्याप्रमाणे आम्हाला नारायण प्रमाण आहे. पांडुरंगावाचून इतरांना देव म्हणताना मला कसेसेच वाटते. हा पांडुरंग सर्वांत बलवान आणि देवांचाही देव आहे. ह्या पांडुरंगानेच अनेक अवतारांत अनेक सोंगे घेतली. विटेवर समचरण समष्टी असलेल्या पांडुरंगाच्या ठिकाणीच माझी अखंडवृत्ती राहो. त्या वृत्तीत विठ्ठलावाचून दुसरी कोणताही माथिक पदार्थ नसावा, ही त्यांची इच्छा होती. याप्रमाणे महाराजांनी अव्यभिचारी निष्ठेने पांडुरंगाची भक्ती केली आणि जगालाही सांगितली.

गाथेतील नामयोग

श्रीतुकाराममहाराजांनी जगाला जो उपदेश केला तो मुख्यत: नामाचा केला आहे. याचा अर्थ दुसऱ्या श्रवणादी भक्ती त्यांना मान्य नव्हत्या असे नाही. कारण, गाथेत नवविधा भक्तीचा उल्लेख आहे. 'तुका म्हणे नवविधा भक्ति जाणे तोच शुद्ध ॥ नवविधा काय बोलिले जी भक्ति द्यावी माझे हातीं संतजनीं॥' असा त्यांनी नवविधा भक्तीचा उल्लेख करून, ती संतांजवळ मागितली आहे; आणि त्या त्या भक्तीत निष्णात असणाऱ्या भक्तांचाही उल्लेख केला आहे. शुक, परीक्षिती, नारद, प्रल्हाद, लक्ष्मी, अक्रूर, हनुमान, अर्जुन, बली या महाभागवतांचा गौरव केला आहे. पण सर्व भक्तींत नामसंकीर्तन भक्ती श्रेष्ठ आहे असे आग्रहाने सांगितले आहे. याचे कारण सांगताना महाराज म्हणतात- 'आणिकां भजमां विधि बोलिला निषेध । ' (गा. भाष्य २२०६)

नामावाचून इतर अर्चनवंदनादी भक्तीकरता शास्त्रविधीची आवश्यकता आहे. शुद्ध देश, काल, योग्य अधिकारी, देवाची पूजार्ह सगुणमूर्ती, मंदिर, आणि पूजाद्रव्य यांची आवश्यकता आहे. तसेच श्रवणाकरिता देखील योग्य अशा अधिकारी गुरूची आवश्यकता आहे; पण नामसंकीर्तनाकरिता यापैकी कशाचीच आवश्यकता नाही. म्हणून नामसंकीर्तनभक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. एवढेच काय पण, वेदप्रतिपादित इतर साधनांपेक्षाही नामसंकीर्तन श्रेष्ठ आहे. याचे कारण महाराज सांगतात'अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन । उचित विधि विधानान कळे न घडे सर्वथा । ' (गा. भा. २२०१)

या कलियुगामध्ये हरिप्राप्तीच्या सर्व वाटा क्षीण झाल्या आहेत. राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे कोणतेही साधन यथाविधि घडत नाही. लोकही उत्तरोत्तर मंदप्रज्ञ झाल्यामुळे वेदाने सांगितलेल्या साधनांचे रहस्य जेथे मुळातूनच कळणे शक्य नाही; तेथे घडणे तर दूरच राहिले. यज्ञादी कर्मे त्रैवार्णिकांवाचून. इतरांना करता येत नाहीत. अष्टांग योग विरक्त व अपरिग्रही साधकावाचून इतरांना झेपत नाही. ब्रह्मज्ञान विवेक, वैराग्य, शमादी, मुमुक्षुत्व इत्यादी साधनांवाचून होणे शक्य नाही. सारांश, प्रत्येक साधनात काही ना काही अडचणी आहेत. म्हणून महाराजांनी मनुष्यमात्राकरिता अधिकारनिरपेक्ष, इतरसाधननिरपेक्ष व फलप्राप्तीची निश्चितता ज्यात आहे असा नामयोग गाथेत सांगितला आहे. याचा अर्थ असा नाही की, यज्ञादी करें, अष्टांग योग व ब्रह्मज्ञान हे सर्व तुकाराम महाराजांना मान्य नव्हते. कारण, गाथेत या सर्वांचा उल्लेख आहे. ज्यांचा जसा अधिकार असेल त्यांनी ते करावे. करण्याविषयी महाराजांचा मुळीच विरोध नाही. पण ती साधने करण्याचा सर्वांचा अधिकार असतोच, असे मात्र नाही, आणि ती साधने करता येत नाहीत म्हणून सर्वांच्या उद्धाराचा मार्ग खुंटला आहे, असेही नाही. सामान्य माणसाकडे श्रीतुकोबा जेव्हा बघत, तेव्हा त्यांना असे वाटे की, या लोकांना इतकी कठीण साधने कशी झेपतील ? आणि हे लोक कसे तरून जातील ? या विचारातूनच त्यांनी नामयोगाचा राजमार्ग प्रकाशित केला, आणि स्वत:देखील हरिभजन करून सारे जग ढवळून काढले. हा नामयोग श्रीतुकोबांनी नवीन सांगितला, असे मात्र नाही. तर तो श्रुतिस्मृतिपुराणप्रणीत जुनाच आहे. 'आस्य जानन्तो नाम' (क्र. २/२/२६), 'सततं कीर्तयन्तो माम् (भ.गी. ९/१४), 'नामसंकीर्तनं यस्य' (श्री. भा. स्कं. १२/१३/२३) याप्रमाणे वेदांत, गीतास्मृतीत व श्रीमद्भागवतपुराणात नामयोगाचा उल्लेख आहे. महाभारतांतर्गत विष्णुसहस्रनाम हे तर प्रसिद्धच आहे. सारांश, श्रीतुकाराममहाराजांनी कलियुगात इतर साधने सर्वांना करता येणे शक्य नसल्यामुळे श्रुतिस्मृतिपुराणप्रणीत जुनाच असलेला नामयोग, त्यांनी आपल्या भाषेत व आपल्या पद्धतीने सांगितला. महाराजांनी नामाविषयी असा विश्वास दर्शविला आहे की, इतर साधने करण्यापासून जे पुण्य व जे साध्य प्राप्त होते, ते एका नामाने प्राप्त होते. 'काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥ सकळ साधनांचे सार भवसिंधु उतरी पार ॥' 'अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तने गोविंदाच्या ॥'

याप्रमाणे नामयोगाचे महत्त्व सांगितले आहे. नामयोग हा शब्द गाथेत नाही. पण मी बुद्धिपूर्वक नामयोग शब्द वापरला आहे. गीतेत 'द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ' या ठिकाणी यज्ञ जसा सामान्यवाचक आहे, तसा 'कर्मयोग, सांख्ययोग' या ठिकाणी योग शब्ददेखील सामान्यदाचक आहे. योग शब्दाची सामान्य व्युत्पत्ती अशी आहे की, 'युज्यते येन इति योग:'. ज्या साधनाने परमात्म्याशी एकरूप होता येते, त्याला 'योग' म्हणतात. व्युत्पत्तीला अनुसरून नामाला वाच्यानिदेखील योग म्हणता येईल. कारण, नाभाने नामधारकाचा देवाशी संबंध जोडला जातो. नामनामींचा अभेद असतो. त्यामुळे नामाचा आणि देवाचा तादाम्यसंबंध आहे, आणि नामधारकाचा नामद्वारा देवाशी अभिव्यक्ततादात्म्यसंबंध' आहे. म्हणून नामाला मुख्य अर्थाने 'योग' असे मी म्हटले आहे. आणि श्रीतुकाराममहाराजांच्या एका अभंगात 'अच्युताचा योग नाम छंद' या वाक्यात तो अर्थ ध्वनितही झाला आहे. या नामयोगामध्ये सर्वांचा अधिकार आहे, आणि महाराजांनी याकरिता सर्वांना निमंत्रण दिले आहे. 'यारे यारे लहानथोर । याती भलत्या नारी नर करावा विचार । नलगे चिंता कोणासी॥' सारांश, यच्चयावत माणसे नामयोगाचे अधिकारी आहेत.

नामयोगाच्या चार अवस्था

(१) नामयोगाचे अनुष्ठान करणारा सुरुवातीला पापी जरी असला तरी कालांतराने त्याची पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट होऊन तो शुद्ध होतो. या अभिप्रायाने महाराज म्हणतात, 'चाल केलासी मोकळा/ बोल विठ्ठल वेळोवेळां । ' पातके करीत करीत नाम घेतले तरी चालेल, पण श्रद्धेने नाम घे. त्याच नामांच्या प्रभावाने केलेली पातके नष्ट होतील; व चित्ताची शुद्धता होईल. (२) आता काही लोक पापी नसले तरी संसारासक्त आहेत. त्यांना सांगतात 'कामामध्ये काम । कांहीं म्हणा राम राम । ' संसारातील कामातून थोडा तरी वेळ काढून नाम घ्या. पोटापुरते काम करा; पण प्राधान्याने रामनाम घ्या. सुरुवातीला तुम्ही संसारासक्त असला तरी पण नामाच्या प्रभावाने ती संसारासक्ती नाहीशी होईल.

(३) आता काही नामधारकही आहेत. पण सांग नामयोगाचे शुद्धस्वरूपात अनुष्ठान करीत नसतील तर त्यांच्याकरिता गतात- 'इंद्रियनिग्रह करा, संतसंगती करा, एकादशी, सोमवार ही व्रते करा, पंढरीची वारी करा, धर्मनीतीने वागा, नाम घेताना उत्कट श्रद्धा व हरिप्रेम मनात असू द्या, असे सांग नामानुष्ठान झाल्यास ते निर्दोष वीर्यवत्तर व वर्तमान देहातच फलप्राप्तीला कारण होते.

(४) जे विरक्त, निष्पाप आहेत अशांनी अखंड, दीर्घकाल, श्रद्धाप्रेमपूर्वक नाम घ्यावे. त्या नामयोगापासून तीन फले प्राप्त होतात : (१) समाधी, (२) सगुणसाक्षात्कार आणि (३) मोक्ष.
अष्टांग योगाने जी समाधी प्राप्त होते तीच नामयोगाने प्राप्त होते. समाधीकरिता आसन, प्राणायाम, कुंडलिनीचालन, षट्चक्रभेदन, इत्यादी अवघड साधने करण्याची आवश्यकता नाही. केवळ नामानेसुद्धा समाधी प्राप्त होऊ शकते. याविषयी गाथेत पुष्कळ प्रमाणे आहेत, आणि हा सिद्धान्त योगशास्त्रकार श्रीपतंजलिमुनी यांनाही मान्य आहे. म्हणूनच 'ईश्वरप्रणिधानाद्वा' (योगसूत्र १/१/२३) या सूत्रातील 'वा' शब्दाने समाधीचे वैकल्पिक साधन ईश्वरभक्ती सांगितली आहे. ईश्वरभक्तीचे नऊ प्रकार असले तरी नामसंकीर्तनातच समाधी प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे. समाधीकरिता यम आणि नियम ही दोन अंगे ज्यांनी आत्मसात केली आहेत त्यांनी आसन आणि प्राणायाम हे दोन मधले टप्पे सोडून केवळ नामसंकीर्तन करीत करीत नामी जो श्रीहरी, त्याच्या सगुणरूपाचे ठिकाणी चित्ताची धारणा म्हणजे स्थिरीकरण केले असता व ध्येयाशी एकतान चित्त करून ध्यान केले असता ध्याता आणि ध्यान ही दोन्ही जाऊन ध्येयाशी सामरस्य प्राप्त होते व 'तदेवार्थनिर्भासं स्वरूपशून्यभिव समाधिः' (योगसूत्र ३/३/३) ही योगात सांगितलेली समाधी अनायासे प्राप्त होते, असे महाराज सांगतात. 'तुका म्हणे सुख समाधि हरिकथा । नेणें भवव्यथा गायील तो॥'या समाधीत देश, काल व देह यांचा विसर पडतो.

'आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदु:खा नाहीं चाड आम्हां॥' (गा. भा. १७९६)
'असो ऐसा कोठे आठवचि नाहीं । देहींच विदेही भोगं दशा॥' (गा. भा. ३२३९)
अशी नामयोगाने अवस्था प्राप्त होते. शिवाय या समाधीतून व्युत्थान झाल्यानंतरही वैष्णवांच्या संगतीत गदारोळ करून मृदंग-वीणा सुस्वर लावून, टाळांच्या घोषात नामघोष केला तरी समाधीत जो ब्रह्मानंद आहे, तोच व्युत्थानावस्थेतही भोगता येतो. हा अष्टांगयोगाने प्राप्त होणाऱ्या समाधीपेक्षा विशेष आहे.

नामाचे दुसरे फळ सगुणसाक्षात्कार आहे. प्रेमपूर्वक अखंड नामचिंतन करणाऱ्याजवळ देव आपण होऊन धावत येतो. कारण, त्याला वैकंठापेक्षाही जेथे नामघोष होतो ते वैष्णवांचे सदन फार आवडते; तो नामधारकांची सर्व कामे न सांगता करतो. त्यांच्या योगक्षेमाचा भार वाहतो; हा देव केवळ ब्रह्मज्ञान्याची सेवा करील की नाही शंकाच आहे, पण अखंड नामचिंतनाने ज्यांना सगुणसाक्षात्कार झाला आहे, अशा भक्तांची देव स्वत: सेवा करतो. हा ब्रह्मज्ञान्यापेक्षा नामधारक भक्तांत विशेष आहे.

नामयोगाचे तिसरे फळ मोक्ष आहे. हा मोक्ष मिळविण्याकरिता नामधारकाला नामचिंतनाशिवाय दुसरा कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. नामचिंतनाने नामधारकाच्या चित्ताचे हळूहळू अवस्थांतर होते. प्रथम पापनिवृत्ती आणि पुण्यप्राप्ती होते. नंतर त्याच्या चित्तात विवेक-वैराग्य आपोआप उदित होऊन त्याच नामजन्य पुण्याने संतांची भेट होऊन ज्ञान प्राप्त होते, किंवा देवच त्याचा गुरू होऊन ज्ञान सांगतो.

'माझ्या विठोबाचा कैंचा प्रेमभाव आपणचि होय देवगुरु॥' (गा. भा. ५०५) या नामयोगाचे पापी, संसारी, मुमुक्षू हे जसे अधिकारी आहेत तसे मुक्तही आहेत. 'मुक्ताने नाम घ्यावे' असे विधान नसले तरी, काही मुक्त पूर्वसंस्कारानुसार आवडीने नाम घेतात. त्यामुळे त्यांना जीवन्मुक्तीचे विलक्षण सुख प्राप्त होते. याप्रमाणे श्रीतुकाराममहाराजांनी गाथेत प्राधान्याने नामयोग सांगितला आहे. आणि त्यांनी 'आम्ही नामाचे धारक । नेणो प्रकार आणीक । सर्व भावें एकाविठ्ठलचि प्रमाण ॥' असा नामाविषयी सोज्वळ अभिमानही व्यक्त केला आहे.

अद्वैत तत्त्वज्ञान-

श्रीतुकाराम महाराजांनी गाथेत भक्तीवर विशेषत: नामावर अधिक भर दिला असला तरी गाथेत अद्वैत तत्त्वज्ञान नाही असे म्हणता येणार नाही. उपनिषदामध्ये जे अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले, ज्याचा श्रीमदाद्य शंकाराचार्यांनी पुरस्कार केला, जे श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी ज्ञानेश्वरीत व अमृतानुभवात विस्ताराने सांगितले, तेच श्रीतुकाराम महाराजांनी थोडक्यात पण मार्मिक भाषेत प्रतिपादन केले आहे. अद्वैत तत्त्वज्ञानातील मुख्य विषय दोन आहेत : (१) जगन्मिथ्यात्व आणि (२) जीव-ब्रह्मैक्य. त्यापैकी जगन्मिथ्यात्व 'रजसकार भासियलें जगडंबर॥'हा संसार फलकटाप्रमाणे असार आहे. दवावाचून जगात शाश्वत असे काही नाही. संसार दुःखाची बांदवडी आहे. हा संसार मायाकार्य आहे. विश्वाला उपादान कारण असलेल्या मायेने ब्रह्माला आवृत केले. त्यामुळे सत्य भोळ्यावर गेले. त्याविषयी असत्वापादक व अभानापादक आवरण निर्माण झाले; आणि भूत भौतिक विश्वाच्या रूपाने त्या अविद्यारूपी मायेची थोरवी वाढली. देवा, तू हे खोटे जगत सत्य म्हणून आम्हाला का भासविले ? तूच ही आपली माया आवर, आम्हाला निष्कारण भयभीत का केले ? याप्रमाणे 'जगत् असत्, जड, दुःखात्मक आहे' हा सिद्धान्त कित्येक अभंगांत स्पष्टपणे सांगितला आहे. जीवब्रह्मक्याचा उपदेश तर महाराजांनी मोठा सुंदर केला आहे. महाराज म्हणतात. 'अमर आहा अमर आहा खरें की पहाखोटें ते॥' (गा. भा. ९०१) अरे, तुम्ही सर्वजण जन्ममरणातीत आहात. तुम्ही देहाचे तादात्म्य सोडून द्या, म्हणजे तुम्हाला माझ्या म्हणण्यातील सत्यता पटेल. देहाच्या उपाधीमुळे तुम्हाला आपण जीव आहोत, असे वाटते; पण वस्तुत: तुम्ही 'देवचि बरें देवचि बरें । तुका म्हणे खरे तुम्ही॥' (गा. भा. ९०१) जीव हा वस्तुस्थितीने मुक्तच आहे, पण स्त्रीपुत्रादिकांचे ठिकाणी माझेपणाचा अभिमान ठेवल्यामुळे तो बद्ध झाला. देहेंद्रियांकडून पापपुण्ये होत असता, ती आपल्या अंगी जडून घेतली, पण पापपुण्याचे कर्ते देहेंद्रियादी आहेत ? का आत्मा आहे ? हा विवेक त्याचे ठिकाणी नसल्यामुळे तो बद्ध झाला. जीवाला बद्धता उपाधीच्या तादात्म्यभ्रमाने आहे. वस्तुत: आत्मस्वरूपाच्या दृष्टीने बद्धतेचा जसा भ्रम आहे तसा मोक्षाचाही आहे. 'सारी झाली मेली लटिके वचन बद्ध मुक्त शीण तुका म्हणे॥' (गा. भा. ३३२३) सोंगट्याच्या खेळातील सोंगटी (लाकडाचा ठोकळा) मेली आणि जिवंत झाली म्हणणे जसे शब्दमात्र आहे, त्याप्रमाणे कल्पित व परिच्छिन्न उपाधीने पारमार्थिक व व्यापक आत्म्याला बंधनच जेथे संभवत नाही. तेथे बंधसापेक्ष मोक्ष तरी खरा कसा असणार ? अर्थात आत्मा बंधमोक्षातीत नित्यमुक्तच आहे. पण भ्रमाने मनुष्य स्वत:ला बद्ध समजतो. महाराज बद्ध जीवाला सांगतात- अरे, तू देहत्रयाशी संबंध ठेवू नकोस; आपल्या स्वरूपस्थितीत राहा. ममतेचा मळ लागू देऊ नकोस. यालाच खरे ब्रह्मज्ञान म्हणावे. अशी स्थिती प्राप्त न होता ब्रह्मज्ञानासंबंधी बोलणे म्हणजे शुद्ध बडबड आहे. ब्रह्माचा आत्मत्वाने अनुभव येणे यालाच ब्रह्मज्ञान म्हणावे. महाराज देखील स्वतः बद्धाची भूमिका घेऊन सांगतात, "मी पंचमहाभूतांच्या अडचणीत सापडलो अर्थात देहत्रयाच्या तादात्म्यात गुंतलो. त्यांच्या ठिकाणी अभिमान ठेवून मी पूर्ण बद्ध झालो. अर्थात माझे बंधन मीच निर्माण केले आहे. वस्तुस्थितीने देहत्रयापेक्षा वेगळा असूनही हा वेगळेपणा मला कळत नाही." याप्रमाणे श्रीशंकराचार्यांनी सांगितलेला आत्म्याचा व अनात्म्याचा 'अन्योन्याध्यासच' पण महाराजांनी थोड्या वेगळ्या भाषेत सांगितला आहे. याप्रमाणे महाराजांनी बद्धाची भूमिका स्वत:च्या अंगावर घेऊन सांगितली असली तरी, तुकाराम महाराज हे स्वतः अद्वैताच्या भूमिकेवरूनच भक्ती करीत होते. देवाला म्हणतात देवा, तुम्ही जगाच्या रूपाने नाटक केले आहे. तुम्ही जे अनेक अवतार घेता ती तुमची सर्व सोंगे आहेत. तुम्ही भक्तांचा उद्धार करता. हा सुद्धा तुमचा एक कल्पित खेळच आहे. लोकांना हे सर्व सत्य वाटत असले तरी गाय आणि वाघ लाकडाचीच आहेत हे आम्हाला समजूनच चुकले आहे. देवा, तुम्ही असे निर्गुण रूपाने अमर आहा. तसा मीसुद्धा अमर का बरे नाही ? तुला जर माझे म्हणणे पटत नसेल; चल. आपण संतांपुढे जाऊ; आणि ते संतच याचा निवाडा करतील. तुला जसे परमार्थतः नामरूप नाही, तसे मलाही नाही. तू जसा व्यवहारदृष्टीने देह धारण करतोस, तसा मीही धारण करतो; यावरून श्रीतुकाराम महाराजांची भक्ती मध्व-रामानुजांप्रमाणे द्वैतमूलक नव्हती हे निश्चित.

श्रीतुकाराम महाराजांनी उपनिषदातीलच अद्वैत गायिले आहे, पण त्याचा आविष्कार शास्त्रीय पद्धतीने न करता लौकिक पद्धतीने फारच सुंदर केला आहे. उदाहरणार्थ-तत्त्वमसि' या महावाक्यामध्ये तत्पदार्थ आणि त्वंपदार्थ यांच्या वाच्यार्थात विरोध असल्यामुळे जहदजहल्लक्षणा करावी. अर्थात वाच्यार्थाचा त्याग करावा म्हणजे ऐक्य संभवते, असे वेदान्तशास्त्रात प्रतिपादिले आहे. श्रीतुकाराम महाराजांनी एका अभंगात 'तत्' शब्दाच्या वाच्यार्थाचा त्याग करूनच देवाचे वर्णन केले आणि 'माझ्या मी शब्दाच्या वाच्यार्थाचा नाश तू कर व मलाही तुझ्यासारखे कर' अशा प्रार्थनेच्या भाषेत तत्त्वमसि महावाक्यातील अभेदार्थ आविष्कृत केला आहे. 'उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । कांहींच संसार तुम्हां नाहीं । ऐसे मज करुनि ठेवा नारायणा । समूळ वासनानुरवावी ॥ देवा, तुम्ही कार्यकारणात्मक उपाधीहून वेगळे आहा. तुम्हाला अवस्थात्रयाचा आणि जगाच्या उत्पत्ति-स्थिति-लयकारणत्वाचा विकार परमार्थत: नाही. जन्म-मरणरूप संसारही नाही. नारायणा, मलादेखील तुमच्यासारखेच करा. पण तुमच्यासारखे करण्याकरिता ज्यामुळे मी जीव झालो, त्या अविद्येसह वासनेचा नाश करा; म्हणजे मी तुमच्यासारखाच होईन; याप्रमाणे अखंड महावाक्यार्थ या अभंगात स्पष्ट झाला आहे. याप्रमाणे महाराजांनी अद्वैत तत्त्वज्ञान फारच सोप्या भाषेत व सुंदर पद्धतीने सांगितले आहे.

विरोध परिहार

श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेत सकृद्दर्शनी परस्पर विरोधी वाटणारी काही विधाने आहेत, की ज्यांचा विचार करणे आवश्यकच आहे. पुष्कळ लोक तेवढीच वाक्ये घेतात आणि 'तुकाराममहाराजांचे हेच मत होते,' असे म्हणतात. पण गाथा हे शास्त्र आहे. शास्त्रात अनेक विषय चर्चिलेले असतात. काही विषय परस्परविरुद्ध वाटत असले तरी वस्तुतः त्यात विरोध नसतो. त्या त्या विषयांचे प्रतिपादन करणारी जी वाक्ये असतात यांच्यातील समन्वय कळलेला नसतो; म्हणून अनेक विरुद्ध शंका येतात. अशा विरुद्ध शंका ज्या ज्या वाक्यात येतात त्यांचा आता आपण विचार करू - 'मुखीं नाम हाती मोक्ष । 'असे तुकाराममहाराजांनी म्हटले आहे. या वाक्यात नामाचा आणि मोक्षाचा साध्यसाधनभाव दाखविला आहे. पण उपनिषदात 'नान्य: पंथा विद्यतेऽयनाय । ' मोक्षाकरिता ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही असे म्हटले आहे. 'ज्ञान जयाचे हाती । तोचि समर्थ मुक्ति॥' असे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. याचे कारण मोक्षसापेक्ष असलेला बंध कल्पित असल्यामुळे बंधाची निवृत्ती ज्ञानानेच होते. मुखाने नामोच्चार करणे ही क्रिया आहे. क्रियेने कल्पित बंधाची निवृत्ती कशी होईल ? या शंकेचे समाधान असे की, तुकाराम महाराजांना ज्ञान मान्य नव्हते असे नाही. तसे असते तर- 'तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंर्दी सांग । तेंचि झाला अंगें तुका आतां॥' या अभंगात तत्त्वमसि महावाक्याचा आणि 'विद्या' शब्दाने ज्ञानाचा उल्लेख केलाच नसता. एवढेच काय, पण तत्त्वमसिमहावाक्यजन्यज्ञानाने मी पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप झालो-अर्थात मुक्त झालो, असा अनुभव या अभंगात सांगितला आहे. त्यामुळे याचे पहिले उत्तर असे की'मुखी नाम हाती मोक्ष । 'या अभंगात जो साध्य-साधनभाव सांगितला आहे तो बहिरंग आहे. नामाने चित्तशुद्धी होते आणि तद्वारा ज्ञानप्राप्त होते. - दुसरे उत्तर असे की, नामजन्य पुण्याने मोक्षप्राप्तीत येणारे प्रतिबंध नाहीसे होऊन निश्चित मोक्ष प्राप्त होतो असे 'हाती' शब्दातील स्वारस्य आहे.

तिसरे उत्तर असे की, नामाने सगुण साक्षात्कार होऊन तो देवच नामधारकाला ज्ञान सांगून मुक्त करतो.

दुसरे शंकास्थळ असे की- 'नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिति भावामी भक्त तूं देव ऐसें करी॥'या अभंगात ब्रह्मज्ञानाचा व आत्मस्थितीचा निषेध केला आहे. याचे उत्तर देताना प्रथम हे सांगणे आवश्यक आहे की, तुकाराम महाराज भक्तिमार्गी असले तरी श्रीरामानुज, श्रीमध्व यांच्याप्रमाणे दैती नव्हते हे निश्चित. तसे असते तर 'न करी रे संग राहीरे निश्चळ । ' या अभंगात त्यांनी अद्वैत ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला नसता. पण असे असूनही ब्रह्मज्ञानाचा निषेध करतात. यातील रहस्य असे आहे की, तुकाराम महाराजांना सगुण दर्शनाची तीव्र इच्छा होती, आणि हे सगुण दर्शन, देव आणि भक्त या नात्यातूनच होत असते. सगुण दर्शनाला संसारासक्तीचा जसा प्रतिबंध आहे तसा ब्रह्मज्ञान आणि त्याने प्राप्त होणारी आत्मस्थिती यांचाही प्रतिबंध आहे. संसारासक्त माणसाला सगुणदर्शनाकरिता भक्ती करावी, अशी जशी इच्छा नसते, तशी केवळ ब्रह्मज्ञानी आत्मनिष्ठांनाही नसते. म्हणून महाराज म्हणतात-देवा, ज्यामुळे तुझ्या दर्शनाला प्रतिबंध होईल, असे ब्रह्मज्ञान आणि आत्मस्थितीसुद्धा नको. सारांश, या अभंगाचे तात्पर्य ब्रह्मज्ञानाचा निषेध करण्यात नसून सगुण दर्शनाच्या आवडीत आहे. 'नहि निन्दा निन्द्यं निन्दितुं प्रवर्तते, अपितु विधेयं स्तोतुम्' निंदा ही निंद्य अर्थाची निंदा करण्यासाठी प्रवृत्त होते असे नाही, तर विधेय अर्थाची स्तुती करण्याकरिता प्रवृत्त होते. याच न्यायाने ब्रह्मज्ञानाची निंदा करण्यात या अभंगाचे तात्पर्य नसून 'मी भक्त तूं देव' हे मागण्यात आणि- 'दावी रूप मज गोपिकारमणा॥'ही सगुण दर्शनाची आवड व्यक्त करण्यात तात्पर्य आहे. याप्रमाणे ज्या ठिकाणी अद्वैत नको, मुक्ती नको, असे म्हटले आहे, त्या त्या ठिकाणी वरील समाधान समजावे.

तिसरे असे की, बहुतेक सर्व संतांना स्वाभाविक आवड भक्तीची आहे. श्रीमद्भागवतातसुद्धा असे म्हटले आहे की, 'आत्मारामाश्च मुनयो निर्गन्था अप्युरुक्रमे । कुर्वत्यहैतुकी भक्तिमित्थंभूत गुणो हरिः॥' (श्री.भा.स्कंध १७१०) "स्वरूपस्थितीला पोहोचलेले संतदेखील हरीची निष्काम भक्ती करतात. कारण, हरी तसा आकर्षक आहेच." म्हणून श्रीशंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज हे सर्व संत मुक्त होते, तरी पण त्यांची व्यक्तिगत आवड म्हणून किंवा लोकसंग्रहाकरिता भक्तीकडे स्वभावत: त्यांचा ओढा होता, हे निश्चित. मग त्या भक्तीला प्रतिबंध करणारे मायिक पदार्थ असोत वा जन्माभावरूप मोक्ष असो. त्यालासुद्धा ते नको म्हणतात. तसेच महाराजांनी एका अभंगात 'अद्वैताची वाणी । मज नायकवे कानीं । 'असे म्हटले आहे. यावरून महाराजांच्या मनात अद्वैताविषयी अत्यंत वीट तिरस्कार होता, असे सामान्य बुद्धीच्या लोकांना वाटते. परंतु या वाक्याची दुसऱ्या एका वाक्याशी एकवाक्यता करावयाची झाल्यास या प्रस्तुत वाक्याचे असे तात्पर्य सिद्ध होते की, अद्वैतश्रवण हे योग्य अधिकाऱ्याकडून करावे. 'खळाच्या मुखाने श्रवण करूं नये' असे महाराजांनी म्हटले आहे. त्यामुळे एखाद्या अननुभवी, आणि दांभिक, केवळ शब्दज्ञानाच्या बळावर अद्वैत सांगेल, तर ती अद्वैतवाणी मला ऐकावीशी वाटत नाही. असा- 'अद्वैताची वाणी । मज नायकवे कानीं ॥' या म्हणण्याचा निष्कर्ष आहे. आणखी एक शंकास्थळ असे आहे की, श्रीतुकाराम महाराजांनी'न मानावें तैसें गुरुचे वचन । ' अशी एक अभंगाची सुरुवात करून- 'देव जोडे तरी करावा अधर्म । अंतरे ते कर्म नाचरावें ॥' असे पुढे म्हटले आहे. या विधानासंबंधी साहजिकच अशी शंका येते की, देव अधमनि जोडला जातो का ? अधर्म देवाला प्रिय आहे का ? आणि तसे असेल तर, धर्म रक्षणाकरिता देव का अवतार घेतो ? आणि तुकाराम महाराज देखील 'धर्म रक्षावयासाठीं । करणे आटी आम्हासी ॥' असे का म्हणतात ? देवाला अधर्म आवडत असेल तर, तो अधर्म करणाऱ्या दुष्टांचा नाश का करतो ? याचे थोडक्यात उत्तर असे आहे की, देवाची रूपे चार आहेत: (१) निरुपाधिक ब्रह्म (२) सोपाधिक ईश्वर (३) रामकृष्णरूपाने अवतीर्ण झालेला (४) मंदिरातील प्रतिमा. या चार देवापैकी अधर्म करण्याची आवश्यकता कोठे आहे ? याचा विचार केल्यास, निरुपाधिक ब्रह्म, ज्ञानाने प्राप्त होते, आणि ज्ञानाकरिता चित्तशुद्धी व त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सोपाधिक ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान कधीच होत नसल्यामुळे त्याकरिता धर्म किंवा अधर्म करण्याची आवश्यकताच नाही. रामकृष्णादिकांच्या रूपाचे दर्शन अर्थात सगुण साक्षात्कार हा अधमनिच होतो, अशी व्याप्ती नाही. कारण वसिष्ठ, व्यास यांना रामाचे व कृष्णाचे जे दर्शन झाले ते अधर्मानेच झाले असे नाही. आता मंदिरात ज्या प्रतिमा असतात त्याकरिता अधर्माची आवश्यकता आहे काय ? तर, तेथेही शास्त्रशुद्ध श्रद्धेनेच देव जोडला जातो; असे श्रीतुकाराम महाराज म्हणतात. 'पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी॥'प्रतिमा पाषाणाची असते व पायरीही पाषाणाचीच असते. पण एकाची पूजा केली जाते व एकावर पाय ठेवला जातो. याचे कारण दोन्हीमध्ये निर्गुण ब्रह्माची व्याप्ती समान असली तरी शास्त्रसिद्ध विशेष देवत्व प्रतिमेमध्ये असते आणि त्या देवाचे पूजा-अर्चन करण्याकरिता शास्त्रशुद्ध श्रद्धा कारण आहे, असे महाराज पुढे सांगतात - 'सार तो भाव सार तो भाव । अनुभवी देव तेचि जाले । 'सारांश, प्रतिमेतील देव ओळखण्याकरिता किंवा त्याची भेट होण्याकरिता संतांनी शास्त्रशुद्ध श्रद्धेला प्राधान्य दिले आहे; आणि त्या देवाचे उपचार करण्याकरिता शास्त्रविधीची आवश्यकता आहे, हे नास्तिकावाचून कोणालाही कबूल करावे लागेल. आता देव जोडण्याकरिता अधर्माची आवश्यकताच नसेल तर 'देव जोडे तरी करावा अधर्म ।' असे का सांगितले ? हा प्रश्न शिल्लकच राहतो. याचे उत्तर असे की, या अभंगाचा पूर्वापार विचार केल्यास, नृसिंह, वामन, राम व श्रीकृष्ण यांच्या सगुण दर्शनाकरिता वडिलांच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हेच या ठिकाणी अधर्माचे स्वरूप आहे. आणि ज्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले ते व्यवहारदृष्टीने पिता, गुरू, बंधु, पती असले तरी भगवदर्शनाला आड येणारे अभक्त आहेत. म्हणून त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करणे अधर्म नसून अधर्माभास आहे. सारांश, शुक्रासारखा अभक्त गुरू, बलीसारखा महाभक्त आणि वामनासारखा सगुणविग्रही देव अशी त्रिपुटी जेव्हा असते तेव्हा आज्ञाभंगासारखा मर्यादित स्वरूपाचा अधर्म करण्यास हरकत नाही; असा या अभंगाचा आशय आहे.GO TOP