श्रीवेदेश्वरी

पद्मपुराणांतर्गत श्रीशिवगीता मूळ संस्कृत भाषेत असून सामान्य जनांस ती कठीण आहे. त्यांची ही अडचण ओळखून श्रीहंसराज स्वामींनी सोप्या प्राकृत भाषेत शिवगीतेवर ही टीका लिहिली आहे 'श्रीवेदेश्वरी' हा ग्रंथ श्रीहंसराज स्वामीमहाराजांच्या सर्वच ग्रंथांत एखाद्या तेजस्वी हिर्‍याप्रमाणे शोभून दिसणारा आहे.

भगवान् शंकरांनी श्रीरामाला दण्डकारण्यामध्यें जो उपदेश केला तोच उपदेश 'शिवगीता'या नावाने प्रसिद्ध असून 'पद्मपुराण्'मध्ये ही गीता अंतर्भूत आहे.

नैमिष्यारण्यामध्यें व्यासशिष्य सूत एका घनदाट वृक्षाखाली बसून शौनकादि ऋषिमुनींना अष्टादश पुराणें सांगत होते. इतरही वेगवेगळ्या विषयांवर ज्ञानचर्चा सुरू होती. अशी ज्ञानसत्रें त्या काळांत नेहमीच सुरू असत. एक दिवस व्यासशिष्य सूत अतिशय प्रसन्न आहेत असें पाहून शौनकादि मुनी त्यांना हात जोडून म्हणाले, "महाराज, आज आपल्याकडून वेदान्त या विषयावर काही मौलिक विचार ऐकण्याची सर्वांचीच इच्छा आहे. आपण कृपावन्त होऊन ती पूर्ण करावी."

त्या ज्ञानपिपासू ऋषिगणांची ती सुयोग्य इच्छा ऐकून व्यासशिष्य सूतांना अतिशय समाधान वाटले व त्यांनी प्रसन्न चित्ताने 'ठीक आहे' असे म्हणून फार फार वर्षापूर्वी भगवान शंकरांनी दण्डकारण्यामध्ये प्रभु रामचंद्राला कथन केलेल्या अतिश्य गुह्य अशा 'शिवगीते' वर भाष्य करणास सुरुवात केली हीच 'शिवगीता' अठरा पुराणांपैकी प्रसिद्ध अशा पद्मपुराणांत समाविष्ट आहे व तीमध्ये शिवराघव संवादाच्या मिषानें अद्वैत वेदान्ताची चर्चा केलेली आहे.

श्रीस्वामीमहाराज म्हणतात -
शिवगिरीपासून उद्‌भविली । रामसमुद्रा जाऊन मिळाली ॥
गीता गोदावरी चालिली । जगदोद्धार करीत ॥ १.२६ ॥
जन्माला येणारा प्राणी हा भवदुःखांनी पिडलेला असतो. या दुःखाचे मूळ कारण काय याचा विचार केला तर 'अज्ञान' किंवा 'अविद्या' असेंच त्याचे उत्तर सामडते. पण 'अज्ञान' म्हणजे तरी काय ? अज्ञान म्हणजे, "मी" ब्रह्म नाही असे वाटने- असे सोपे उत्तर देता येईल. मी ब्रह्म किंवा आत्मा नसून 'देह' आहे असे जीवाला वाटणे याचे नाव अज्ञान. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, "देहेबुद्धी ती आत्मबुद्धी करावी ।" आपले स्वरूप एकदां लक्षांत आले की दुःख नावाची वस्तूच राहात नाही.

श्रीस्वामीमहाराज म्हणतात -
निजांगे शिवरूपची असतां अज्ञान आली जीवत्वता ॥
तेणें गुणें मीच कर्ता भोक्ता । सदृढ झाले ॥ १.६९ ॥
अज्ञानाच्या योगेंच जग सत्य वाटते. मंद प्रकाशांत एखादी दोरी पडलेली असते. ती पाहणार्‍या मनुष्याला दुरून असे वाटते कीं, तो सर्पच आहे, आणि त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. परंतु दीप लावून कुणी जर त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली तर ती दोरी आहे हे लक्षांत येऊन तो मनुष्य निर्भय होतो.

हे दीप लावण्याचे काम सद्‌गुरु करतात. दीप म्हणजे ज्ञानदीप. 'अरे तू ब्रह्म आहेस' असे सद्‌गुरु शिष्याला महावाक्याचा बोध करून पटवून देतात, आणि तो शिष्य मग निर्भय होतो. जीवाचे अज्ञान केवळ ज्ञानानेंच दूर होऊं शकते, अन्य कशानेंही नाही. आणि हें ज्ञान सद्‌गुरु कृपेनेंच प्राप्त होते. म्हणूनच सद्‌गुरु महिमा खरोखरच अपार आणि अगाध आहे. सद्‌गुरु शिष्याची देहबुद्धी नाहीशी करून त्या ठिकाणीं आत्मबुद्धीचा उदय करतात.

प्रत्येक मनुष्याचें आपल्या देहावर नितांत प्रेम असतें. अन्य कोणत्याही योनींत जीवाला ज्ञानाअभावी आपला उद्धार करून घेणे शक्य नसते. नरदेहांत आल्यानंतर मात्र ज्ञानाच्या संपादनाने तो चारही मुक्तीचा अशिकारी बनूं शकतो. पण नरदेहाची श्रेष्ठता एवढ्यापुरतीच आहे. त्याचा अर्थ मनुष्यानें त्या देहावर फार प्रेम करावे असे नव्हे. देहे हे केवळ साधन आहे. सर्वस्व नव्हे. सर्वस्व केवळ "आत्मा". जिवंतपणीं आपण आपल्या देहावर अमाप प्रेम करतो. परंतु मृत्युनंतर त्या देहाची स्थिती केविलवाणी होते. ज्या देहाला जिवंतपणी आपण नटवले, सजवले, थंडी वार्‍यापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्याला उंची वस्त्रे घातली, कस्तुरी, चंदनाची उटी लावली, तोच देह एकदा गळून पडला ही त्याची स्थिती "अस्पृश्यं जायते प्रेक्ष्यं जीवत्यक्तं सदा वपुः" अशी होते. मुमुक्षुने हे सदा लक्षात ठेवले पाहिजे. त्याशिवाय देहबुद्धी गळून आत्मबुद्धीचा उदय होणे शक्य नाही. आणि देह गळणे हाच मोक्षप्राप्तीचा पाया आहे.

श्रीस्वामीमहाराज म्हणतात -
तस्मात् देहबुद्धि हे झडे । स्वानुभवें आत्मरूप निवडे ॥
तयासीच एक मोक्ष जोडे । येर्‍हवी बंध दृढ ॥ ९.४९१ ॥
या सर्व गोष्टी सद्‌गुरु करून घेतात. ते शिष्याचे ठिकाणी विवेक वैराग्याचा उदय करवून हळूहळू त्याच्या निजस्वरूपाची त्यास जाणीव करून देतात व तसा अनुभव शिष्यास कालांतराने येतो व तो मुक्त होतो. म्हणूनच सद्‌गुरूंचा महिमा अपार आहे. कारण ते ज्ञान देऊन अज्ञान नष्ट करतात. त्याचे संचित जाळून टाकतात. संचित हे केवळ कर्मानें जळत नाही. ते जळते ते केवळ अपरोक्षज्ञानाच्या प्राप्तीमुळें. एकदा ते ज्ञान झाले कीं, पापपुण्यात्मक कर्मांचा दोष राहात नाही. सद्‌गुरुकृपेने आपण असंग आत्मा आहोत असा निश्चय झाल्यानंतरच् देहबुद्धीच नष्ट होते व त्यामुळे कर्तेपणाही नाहीसा होतो व कर्में बाधत नाहींत.

मुमुक्षु साधकाने 'मी ब्रह्म आहे', 'मी शिव आहे' हा विचार सतत मनांत रुजविला पाहिजे वारंवार त्याचे मनन केले पाहिजे. देहबुद्धी टाकून देऊन आत्मबुद्धी निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. देहांत प्राण असेतों हा अभ्यास चालूं ठेवला पाहिजे. ज्यांना ऐक्यबोधाच्या उपदेशाचे प्राशन करून तृप्त व्हावयाचे असेल त्यानें स्वामीमहाराजांच्या या अलौकिक ग्रंथाचे वारंवार श्रवण, पठण व मनन करावे.

श्रीमति कमलताई वैद्य यांनी प्रत्येक अध्यायाचा "अध्यायसार" सांगून ग्रंथाचा विषय समजण्यास फार मोलाची भर घातली आहे.