॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय नववा ॥


॥ श्रीशिवराम गुरवे नमः ॥
सूत म्हणे शौनकादिकहो ॥ सप्रेमें परमार्थी घ्या लाहो ॥
शिवधन वोळलासे पहाहो ॥ रामवायु साह्य झाला ॥ १ ॥
बोधामृताचें भरण भरूनि ॥ मेघ वोळूनि आला गगनीं ॥
गीतार्थाचें अपार पाणीं ॥ गर्जून वर्षताहे ॥ २ ॥
कवीमयूर गर्जती नेटें ॥ स्वानुभवपर्वर्ती नाद दाटे ॥
निरूपणाचा ओघ लोटे ॥ अद्वैत सागरी मिळूं जात ॥ ३ ॥
तेथें साधक मुमुक्षु हे चातक ॥ पसरूनि चंचूश्रवण गोलक ॥
अर्थामृतपान करिती एक ॥ भावेंकडूनी ॥ ४ ॥
जयासी विषयभूमीचे उदक ॥ घेणेंचि नाहीं निश्चयात्मक ॥
शिवमेघमंडळींच लक्ष्य अनेक ॥ नामरूपें न पाहती ॥ ५ ॥
जयासी येच देहीं मुक्त होणे ॥ भूविषयोदक अव्हरावें तेणें ॥
एकदा गुरुमुखें तृप्ति खूण बाणे ॥ त्याची इच्छाभूक हरे ॥ ६ ॥
ऐसे मागें तृप्त बहुत झाले ॥ आतां असती पुढे होणार वहिलें ॥
परी भूविषयोदक जिंहीं न त्यागिलें ॥ तया गुरुमुखबिंदु मिळेना ॥ ७ ॥
हे विषय दुःखरूप न जाणती ॥ जरी वेदशास्त्रे दीर्घस्वरें बोभाती ॥
परी कैसे हे जीव मंदमति ॥ तेचि सेविती दिननिशीं ॥ ८ ॥
कारण की देहलोभ सुटेना ॥ मीच देह ऐशी केली कल्पना ॥
आपण कोण हे सहसा कळेना ॥ भ्रांति पडली ॥ ९ ॥
ज्या देहास्तव विषय इच्छिती ॥ त्या देहाची कोण विपत्ति ॥
ते गर्भापासून मरणाचे अंतीं ॥ सांगितली अष्टमाध्यायीं ॥ १० ॥
ते ऐकून चिळसी उपजावी ॥ यासी मी म्हणणे बुद्धि त्यागावी ॥
त्यागितां अहं ब्रह्म प्रतीति व्हावी ॥ जे मदभिन्नता ॥ ११ ॥
परी मूढमति कदां न मानिती ॥ देह दुःखरूपचि हा नेणती ॥
मा सांडितील केवीं अहंमति ॥ सुखी होती जया त्यागें ॥ १२ ॥
असो जे मुमुक्षु अधिकारी ॥ अभिन्न ज्ञानाचे वांटेकरी ॥
तिहीं त्यागावी देहबुद्धि खरी ॥ आत्मसुखाकारणे ॥ १३ ॥
याचि हेतू श्रीसदाशिव ॥ निरूपित असे स्वयमेव ॥
या देहाचा कोठून उद्भव ॥ आणि याचें रूपही कैसें ॥ १४ ॥


श्रीभगवानुवाच ॥
देहस्वरूपं वक्ष्यामि शृणुष्वावहितो नृप ॥
मत्तो हि जायते विश्वं मयैवैतत्प्रधार्यते ॥ १ ॥


अव्यापार चित्तें एके हे नृप ॥ सांग बोलेन देहाचे स्वरूप ॥
मजपासून झाला विश्वात्मक आरोप ॥ आणि म्यांचि याशी धरियेलें ॥ १५ ॥
त्वां रामा होतें पुसिलें ॥ की जीव अज्ञाने असती भ्रमले ॥
यासी अभिन्नज्ञान पाहिजे झालें ॥ जें वेदान्तसिद्ध ॥ १६ ॥
हे ज्ञान देहबुद्धि गेलियाविण ॥ उपतिष्ठेना जीवालागून ॥
त्या देहबुाद्धिचे व्हावया खंडन ॥ वैराग्य आधी पाहिजे ॥ १७ ॥
या हेतु देहाची स्थिति गति ॥ आणि याची कैशी स्वरूपस्थिति ॥
हे सांगावें आतां मजप्रति ॥ ऐसा प्रश्न जो तुझा ॥ १८ ॥
त्यांत अष्टमाध्यायीं गर्भादि देहांत ॥ दुःखरूपता असे देहांत ॥
जे ऐकतां चिळसी उपजत ॥ हे निरूपण केलें ॥ १९ ॥
परी या देहाचे स्वरूपलक्षण ॥ कैसे असे झाले कोठून ॥
याचे राहिले असे निरूपण ॥ येथे बोलिजे तें ऐका ॥ २० ॥
अध्याय संपेतों हे असे ॥ जयाच्या श्रवणें देहबुद्धि निरसे ॥
देह मी नव्हे कळेल विश्वासें ॥ मुमुक्षूप्रति ॥ २१ ॥
देह वेगळा आपण वेगळा ॥ आपण सत्य देह अनित्य निराळा ॥
ऐसें प्रत्यक्ष दिसेल ज्ञान डोळां ॥ विचारवंताचे ॥ २२ ॥
देह पंचभूतांचे झाले ॥ ऐसें जयासी पूर्ण कळलें ॥
ते देहबुद्धि त्यागें सुटती वहिले ॥ मदैक्यज्ञान होय ॥ २३ ॥
तस्मात् रामा देहाचे स्वरूप ॥ बोलेन तें ऐकावें साक्षेप ॥
चित्ताची व्याकुळता नसावी अल्प ॥ आणि गजबज इंद्रियांची ॥ २४ ॥
हे मुमुक्षूप्रति उपदेशित ॥ तुझें करूनिया निमित्त ॥
आतां बोलिजे सप्रतीत ॥ अनामत्व देहासी ॥ २५ ॥
परी माझें स्वरूप आधीं जाणावें ॥ मग देहाचे स्वरूप वेगळे पहावें ॥
या निरूपणा उपोध्दात म्हणावें ॥ शास्त्र रीतीनें ॥ २६ ॥
देहस्वरूप असें बोलावयाचें ॥ ते ठेवून मद्रप बोलिजे वाचें ॥
नंतर वर्णन होतसे देहाचें ॥ या नांव उपोध्दात ॥ २७ ॥
आणिकही माझें स्वरूप सांगावया ॥ प्रयोजन असे गा रामराया ॥
जीवाचें स्वरूपाशी आणि माझिया ॥ रूपा भेद नाहीं ॥ २८ ॥
मीच जीवाचें निजरूप ॥ मीच जाणता सच्चिद्रूप ॥
जीव अज्ञानें न जाणती अल्प ॥ की मी शिव असें निजांगें ॥ २९ ॥
देहाकडेचि पाहूं लागले ॥ केवळ मी देहचि होऊन बैसले ॥
मी ब्रह्म असून अज्ञाने विसरले ॥ सोसूं लागले जन्ममरण ॥ ३० ॥
समुद्राचे अंगंतरंग ॥ तेवीं मीच जगजीव निजांग ॥
तरंग मानी मज जन्म भंग ॥ तेवीं जीव मानिती जन्ममृत्यू ॥ ३१ ॥
मी समुद्र हे तरंगा कळलें ॥ तरी आकार असतां ते समुद्रता पावले ॥
तेवीं मी ब्रह्म जीवा जरी अनुभवलें ॥ तरी देह असतां ब्रह्मरूप ॥ ३२ ॥
मग तरंग फुटतां समुद्र न आटे ॥ तेवीं जीव मरतां ब्रह्मत्व न पालटे ॥
जीवाचें अकृत्रिम ब्रह्मरूप गोमटें ॥ येर जीवत्व खोटें मायिक ॥ ३३ ॥
ऐसें मद्रूप हे आघवें ॥ जें जें नामरूप बरवें ॥
ऐसें हें मुमुक्षूसी समजावें ॥ यास्तव बोलिलेंचि बोलतों ॥ ३४ ॥
सहाव्या सातव्या अध्यायीं ॥ जें जें निरूपण असे निःसंशयीं ॥
की पदार्थमात्र मीच मजवीण कायी ॥ दुजें असे रामा ॥ ३५ ॥
दोरीवरी जैसा भुजंग ॥ तेवीं मजवरी नामरूप जग ॥
निःशेष दोरीचें सर्प अंग ॥ तेवीं मीच की जगरूपें ॥ ३६ ॥
दोरी न कळून सर्पभाव झाला ॥ ब्रह्म न जाणून जगभाव कल्पिला ॥
न होऊन जग म्हणावें नामरूपाला ॥ उद्भवलें ऐसें ॥ ३७ ॥
सर्प जेवीं दोरीने धरिला ॥ तेवीं प्रपंच म्यां स्वीकारिला ॥
जोवरी मदैक्य जीव नाहीं पावला ॥ तोंवरीच हा भ्रम ॥ ३८ ॥
वांकडेपणा दोरीचा जैसा ॥ सर्पासी कारण होय सहसा ॥
तेंवीं ह्या जगकार्य सविलासा ॥ सविशेष ईश्वर कारण ॥ ३९ ॥
येरव्हीं दोरिचिये अंगावरी ॥ सर्प झालाचि नाहीं निर्धारीं ॥
तेवीं मी असंग निर्विकारी ॥ तेथे जग उद्भवें कैंचें ॥ ४० ॥
अज्ञाने जें कांहीं असे दिसलें ॥ तें ज्ञान होतांची लया गेलें ॥
त्याउपरी जे काही उरलें ॥ तें निर्वि कार ब्रह्म मी ॥ ४१ ॥


मय्येवेदमधिष्ठाने लीयते शुक्तिरौप्यवत् ॥
अहं तु निर्मलः पूर्णः सच्चिदानंदविग्रहः ॥ २ ॥


हे जग ज्ञान झालियावरी ॥ लय पावे शिंपीचे रजतापरी ॥
उरें शिंप जेवीं मी निर्विकारी ॥ जगाचे अधिष्ठान ॥ ४२ ॥
मी निश्चयेंसी पूर्ण निर्मळ ॥ सच्चिदानंद विग्रह केवळ ॥
रजत नसतां शिंप अढळ ॥ तेवीं परमात्मा मी ॥ ४३ ॥
जोवरी रौप्याचा भास भासे ॥ तोंवरी शिंप असोनिया नसे ॥
तेवीं जगभाव कल्पितां मानसें ॥ मी नाहींच ऐसें दृढ करिती ॥ ४४॥
तेचि शिंपीसी शिंपीचा भाव होतां ॥ निःशेष ठाव नसे रजता ॥
तेवीं मीच माझेपणे अनुभवा येतां ॥ जगतां क्षय होय ॥ ४५ ॥
जेवीं रजत शिंपी, शिंपीवरी ॥ आटे तेवीं जग माझें मजवरी ॥
पुढे अखण्ड मीच एक निर्विकारी ॥ शिंप जैशी शिंपपणें ॥ ४६ ॥
रजतचि अवघे शिंप झालें ॥ तेंवीं जगचि अवघे ब्रह्मत्वा पावलें ॥
न होऊन उगें अज्ञाने दिसलें ॥ तें लया गेलें ज्ञानें ॥ ४७ ॥
आहे शिंप दिसे शिंप ॥ वाउगाचि रजताचा आरोप ॥
तेवीं मीच एक चिद्रूप ॥ जगभाव उगाचि ॥ ४८ ॥
रजतापूर्वी शिंप आहे ॥ तेवीं जगापूर्वी मी असें पाहे ॥
रजत नासलिया शिंप राहे ॥ तेवीं जग लय होतां ब्रह्म मी ॥ ४९ ॥
जयाक्षणी रजतभाव झाला ॥ तेव्हांही शिंपपणा नाही गेला ॥
तैसा जगद्भाव जेव्हां कल्पिला ॥ तेव्हाही एकला मीच ॥ ५० ॥
एवं आदि मध्य अवसानीं ॥ शिंपीपरी मी अखण्डपणीं ॥
जग रजत पहातां तिहीं स्थानीं ॥ नाहीं तें नाहींच नाहीं ॥ ५१ ॥
सच्चिदानंदरूप विग्रहें ॥ म्हणजे अस्ति भाति प्रियरूप देहे ॥
हे बोलिलें याचे कारण आहे ॥ अवधारा बोलूं ॥ ५२ ॥
जगभाव हा नामरूप ॥ तो ज्ञाने उडाला मिथ्या आरोप ॥
मग जे दिसे भासे तें सच्चिद्रूप ॥ आकार असतांही ॥ ५३ ॥
त्या आकारासी देह म्हणावें ॥ परी तें सच्चिद्रूप दिसे आघवें ॥
एवं सृष्टिकाल तों वरी मज वर्णावें ॥ सच्चिदानंदविग्रह ॥ ५४ ॥
सृष्टिपूर्वी की लय झालिया ॥ मीच मी सच्चिदानंदतया ॥
विग्रह म्हणणेचि असे वाया ॥ तेथें अमुक हे न चले ॥ ५५ ॥
सर्वांचा नाही पणा झाला ॥ शून्य म्हणावें जग अभावाला ॥
शून्यासीही अधिष्ठानत्वें संचला ॥ तो मी उर्वरीत ॥ ५६ ॥
जन नसती जया दिशेसी ॥ ओस दिशा म्हणती तियेसी ॥
परी तेथे अभाव होय जनासी ॥ की दिशेसी सांगें ॥ ५७ ॥
दिशेचा जरी अभाव झाला ॥ तरी ओस दिशा में नाम कोणाला ॥
तेवींच विचारें पहा मजला ॥ शून्य कल्पना न करितां ॥ ५८ ॥
जग जीव माया रहित ॥ परमात्मा मी सदोदित ॥
शून्यत्व आले समस्तांतें ॥ परी मी स्वतः शून्य नव्हे ॥ ५९ ॥
मीच जरी नाहींसें व्हावें ॥ तरी शून्य नाम कवणा संभवे ॥
तथापि शून्य मानील तया पुसावें ॥ शून्य आहे की नाहीं ॥ ६० ॥
शून्य जरी नाही म्हणतां ॥ शून्याचा अभावचि झालापुरता ॥
तरी मग शून्यपणाची नुरे वार्ता ॥ अर्थात् शून्य खंडन झाले ॥ ६१ ॥
आतां शून्य आहे म्हणावें ॥ तया आहेपणासी ब्रह्म जाणावें ॥
आहे म्हणतां तें शून्य कदां नव्हे ॥ आहे ते ब्रह्मचि आहे ॥ ६२ ॥
एवं जगाच्या लया नंतर ॥ सदोदित मी निर्विकार ॥
तैसाचि सृष्टी पूर्वीही साचार ॥ परमात्मा मी असें ॥ ६३ ॥
रजतापूर्वी शिंप होती ॥ तरीच मग रजतकल्पना झाली वरुती ॥
तेवीं मी आहे स्वयंज्योति ॥ म्हणूनि जग झालें मजवरी ॥ ६४ ॥
कांहीं अधिष्ठान सत्य नसतां ॥ भ्रम कासयावरी होय उमटता ॥
तस्मात् सृष्टीपूर्वीही तत्त्वतां ॥ मी आहेच आहे ॥ ६५ ॥
एवं सृष्टीपूर्वी आणि उपरी ॥ मीच एक असे निर्विकारी ॥
जें आदि अंती तेंचि असे निर्धारी ॥ मध्येही सृष्टिकाळीं ॥ ६६ ॥
अलंकारापूर्वी सुवर्ण ॥ नग आटितां उरे कांचन ॥
अलंकार असतां सुवर्णावीण ॥ मध्येही काय असे ॥ ६७ ॥
आकाश आहे वायु आहे ॥ तेज आप पृथिवी आहे ॥
भौतिकही अवघेचि आहे ॥ ब्रह्मादि तृणांत ॥ ६८ ॥
ऐसा आहेपणा जो सर्वांचा ॥ तोचि अस्तित्वभाव ब्रह्मींचा ॥
येथे सर्वपणा तरी असे कैंचा ॥ उगा नामरूप भ्रम ॥ ६९ ॥
सुवर्णा नाम अलंकार ॥ तेवीं अस्तित्वनाम जग साचार ॥
एवं मध्येही मीच निर्विकार ॥ असंग ब्रह्म ॥ ७० ॥
ऐसें तिहीं काळी जे संचलें ॥ तोंच सद्रूप पाहिजे कळलें ॥
आतां चिद्रूप असे निरूपिलें ॥ कळावया साधकां ॥ ७१ ॥
स्फुरण उत्पन्न होतां क्षणीं ॥ सर्व जग झाले नामरूपपणीं ॥
त्या जाणूं लागे सर्वालागूनी ॥ स्फुरणादि तृणांत ॥ ७२ ॥
सर्व भौतिकांचे व्यापार ॥ जागृति स्वप्नाचे पांच पांच प्रकार ॥
आत्म्यासी न कळतां सांगा सत्वर ॥ की अमुक कार्य झालें ॥ ७३ ॥
हे असो सुषुप्तीच्याही समया ॥ जाणताच असे नेणिवे तया ॥
ऐसा देखणा असे मूळमाया ॥ पासोन तृणावरी ॥ ७४ ॥
सर्व असतां सर्वां जाणताहे ॥ सर्वांचा लयही स्वप्रभें पाहे ॥
सर्वदां देखणीच दशा आहे ॥ सुषुप्तीपरी ॥ ७५ ॥
येथे कोणी मंदमति ॥ जाणीव दशा नाहींच म्हणती ॥
स्फुरण झालिया होतसे उत्पत्ति ॥ म्हणती चिद्रूपाची ॥ ७६ ॥
कात चुना सुपारी पान ॥ मिळतां रंग होय निर्माण ॥
तैशी पंचभूते मिळतां त्रिगुण ॥ जाणती कळा उत्पन्न होय ॥ ७७ ॥
जोंवरी दृश्य असे तोवरी ॥ जाणत असे सर्व व्यापारी ॥
लय होतां सर्वां बरोबरी ॥ लय होय जाणिवेचा ॥ ७८ ॥
ऐसें बोलती ते अधम ॥ नेणती सामान्याचे वर्म ॥
वृत्ति ज्ञानाकडेच संभ्रम ॥ असे जयाचा ॥ ७९ ॥
वृत्तीच जाणती ऐशी वाटली ॥ तेव्हां वृत्ती अभावी ज्ञप्ति मावळली ॥
स्वरूपाची स्वप्रभता कळली ॥ नाहींच तया ॥ ८० ॥
राजचिन्हित सेवका पाहूनी ॥ परततां राजफळ होईना जनीं ॥
तेवीं वृत्तीसी जाणिवता मानी ॥ तो शून्यसंदेहीं पडे ॥ ८१ ॥
चिद्रूप मायेंचे लक्षण ॥ हे नव्हे की श्रुतिप्रमाण ॥
यस्यभासा भासमान ॥ हे वचन मिथ्या नव्हे ॥ ८२ ॥
पहा पहा उपनेत्रं दिसतें वाटे जया ॥ तरी डोळियांचे देखणे नव्हे वाया ॥
तेवीं चिद्रूप मानितांही माया ॥ ब्रह्म जड नव्हे ॥ ८३ ॥
आतां जेणे असेल मानिलें ॥ तेचि मात्र अंधळे झाले ॥
थित्यां परमार्थासी मुकले ॥ पडिले शून्यसंदेहीं ॥ ८४ ॥
तथापि जाणिवेचा लय मानिला ॥ तरी कोण साक्षी त्याचे लयाला ॥
जेवीं सर्वाचा लय साक्षीने देखिला ॥ तेवीं साक्षीचा पाहिला कोणें ॥ ८५ ॥
चिद्रूप तरी दुसरें नाहीं ॥ कीं जाणीव लया होईल गा ही ॥
तरी लय मानूं नये सर्वथाही ॥ साक्षीविण ॥ ८६ ॥
चिद्रपाचा लय चिद्रूपं पाहिला ॥ तरी आपणां देखतां आपण केवीं मेला ॥
तथापि ज्ञानलयाचा साक्षी जो उरला ॥ तोचि की चिद्रूप ॥ ८७ ॥
सद्रूप जरी चिद्रूपाचा ॥ लय देखणा होय साचा ॥
तरी मग अभाव जाणिवेचा ॥ नव्हेचि नव्हे ॥ ८८ ॥
सद्रूपासी ज्ञान स्फुरलें ॥ तरी अनायासें जडत्व गेलें ॥
चिद्रपही सत्यचि झालें ॥ हे अत्यंत इष्ट ॥ ८९ ॥
तस्मात् सर्व लयाच्याही अंतीं ॥ देखणी दशा असे निश्चितीं ॥
सर्व असतां जाणीव चिन्मूर्ति ॥ बोलणे नको ॥ ९० ॥
पदार्थ असतां डोळा पाहे ॥ पदार्थाभावीं अंध नव्हे ॥
अंधारासी जो देखताहे ॥ डोळा तोचि ॥ ९१ ॥
तेवीं जो सर्वांचा जाणता ॥ सर्वांचा लय जरी होतां ॥
त्या लयाचा जो अनुभविता ॥ तोचि चिद्रूप आत्मा ॥ ९२ ॥
आतां आनंदरूप ब्रह्म कैसें ॥ हेही बोलिजे तें कांहींसें ॥
सुखदुःख किमपि जेथें नसे ॥ तें निजसुख आनंदरूप ॥ ९३ ॥
वृत्ति जे काही उठिली ॥ ते सदा सुखदुःखें व्यापली ॥
केव्हां सुखी केव्हां दुःखी झाली ॥ तें सुखचि नव्हे ॥ ९४ ॥
तस्मात् सुख दुःखाभावी निजसुख ॥ येथेही मानील कोणी मूर्ख ॥
की सुखदुःखाभावी निजदुःख ॥ तरी ऐसा प्रयोग ना अनुभव ॥ ९५ ॥
सुखदुःखाभावी आनंद ॥ तोचि निजानंदाचा कंदै ॥
असे म्हणूनि उठती विशद ॥ वृत्तीसी सुखदुःखें ॥ ९६ ॥
तो आनंद ग्रहण केलियावीण ॥ त्रिपुटीरहित असे परिपूर्ण ॥
म्हणनि जेवीं सच्चिलक्षणे दोन ॥ तेवींच हा आनंद तिहीं काळीं ॥ ९७ ॥
असो सद्रूप तेंचि चिद्रूप ॥ तेंचि ब्रह्म आनंदरूप ॥
ही लक्षणे उणी नव्हेत अल्प ॥ तिहींही काळीं ॥ ९८ ॥
येथेही कोणी आक्षेप करी ॥ की सद्रप तेथें आनंद निर्धारी ॥
तरी आनंदरूपता सर्वांमाझारी ॥ आली असे ॥ ९९ ॥
याचें ऐसें असे समाधान ॥ सर्वत्री सद्रूप असे पूर्ण ॥
परी सुखदुःखाचा होतसे शीण ॥ यास्तव आनंद लोपला ॥ १०० ॥
मागुती आक्षेप एकवाड ॥ की सुखदुःखावीण असती दगड ॥
तरी तोही विकारचि जड ॥ मायाजनित ॥ १ ॥
जेवीं चेतन एकविकार ॥ तेथें सुखदुःखें उमटती अपार ॥
तैसेचि जडजात हे समग्र ॥ विकारीच असती ॥ २ ॥
विकार तेथें सुखदुःखें असती ॥ चेतनी मात्र स्पष्ट दिसती ॥
जडत्वीं गुप्त अनुमानजेती ॥ सुख आणि दुःखें ॥ ३ ॥
जेथें उत्पत्ति आणि लय ॥ तेथें सुखदुःखें असती द्वय ॥
तो विकार जेधवां नाहीसा होय ॥ तेव्हांच अद्वयानंद ॥ ४ ॥
असो सर्व सुखदुःखें कृत्रिमाची ॥ अकृत्रिम एक परब्रह्मचि ॥
तें निश्चयेंसी असें मीचि ॥ ऐसें साधकें ओळखावें ॥ ५ ॥
माया अविद्येनें नाहीं मळलें ॥ अहंकृतीने न जाय विटाळलें ॥
याचि हेतू निर्मळ बोलिलें ॥ तिहीं काळी ब्रह्म ॥ ६ ॥
सर्व जे जे उत्पन्न होती ॥ आकाशासहित अपूर्ण दिसती ॥
परिपूर्ण एक आदिअंतीं ॥ स्वरूप माझें ॥ ७ ॥
सत् चित् आणि आनंदघन ॥ निर्मळ आणि परिपूर्ण ॥
ही लक्षणे असती मात्र भिन्न ॥ परी एक अक्षयी ॥ ८ ॥
येथेही कोणी आशंका घेतली ॥ की ही पांच लक्षणे कासया केली ॥
एका लक्षणे जाती अनुभवली ॥ स्वरूपस्थिति ॥ ९ ॥
याचे ऐसें असे उत्तर ॥ पदार्थ दाटलेती अपार ॥
एक लक्षण सांगतां येर ॥ एकाचे एक भाविती ॥ ११० ॥
एकाच सूर्य प्रकाशक ॥ वाटोळा आणि दाहक ॥
यांतील लक्षण सांगतां एक ॥ सूर्य अनुभवा न ये ॥ ११ ॥
वर्तुलत्व जरी त्यागलें ॥ दाहक प्रकाशक सांगितलें ॥
तरी आग्नि मानितील वहिलें ॥ दहनाभावी चंद्र ॥ १२ ॥
त्यागिली जरी प्रकाशकता ॥ तवा भावितील न सांगतां ॥
तस्मात् तिहीं लक्षणे बोलतां ॥ सूर्य ऐसाच कळे ॥ १३ ॥
तैसेंचि सच्चिदानंद ब्रह्म ॥ तिहीं लक्षणेंशी बोधितां परम ॥
साधकांसी निश्चयें वर्म ॥ कळेल अंतरीं ॥ १४ ॥
नुसधे ब्रह्म जरी बोधावें ॥ तरी वेदा ब्राह्मणा ब्रह्म नांवें ॥
यांत साधके कोणते समजावें ॥ ब्रह्म अंतरीं ॥ १५ ॥
सद्रप ब्रह्म उपदेशितां ॥ जड ऐसे मानील चित्ता ॥
चिद्रूप ऐशियापरी सांगतां ॥ असत्यत्व मानील ॥ १६ ॥
सुखरूप जरी न सांगावें ॥ तरी कवणाची प्रवृत्तीच नव्हे ॥
मग मोक्ष पुरुषार्थ संभवे ॥ कासयावरूनी ॥ १७ ॥
यास्तव सच्चिदानंदघन ॥ उपदशितां बाणे खूण ॥
तथापि न सांगितलें ब्रह्म पूर्ण ॥ तिन्ही लक्षणे सांगूनी ॥ १८ ॥
तरीही ब्रह्म एकदेशी ॥ साधक मानील मानसीं ॥
यास्तव सच्चिदानंद पूर्णपणेंसी ॥ बोधावे लागे ॥ १९ ॥
जरी चारी लक्षणां सांगितलें ॥ परी निर्मळत्व नाही उपदेशिलें ॥
तरी अलिप्तत्व न जाय कळलें ॥ तेणे नव्हे निर्विकार ॥ १२० ॥
तस्मात् पांचही लक्षणात्मक ब्रह्म ॥ सांगितले हे युक्तचि परम ॥
सर्वही अंतरींचा भ्रम ॥ उपदेशमात्र ॥ २१ ॥
ऐसें हें माझें निजरूप ॥ जेथें भेदचि नाहीं अल्प ॥
साधकें जाणावें तें स्वरूप ॥ अपरोक्षवें ॥ २२ ॥
ऐसें में ब्रह्म निर्गुण ॥ मीच असे असंग पूर्ण ॥
सर्व हे झाले मजपासून ॥ मायिकत्वें स्थिति लय ॥ २३ ॥


असंगो निरहंकारः शुद्धं ब्रह्म सनातनम् ॥
अनाद्यविद्यायुक्तःसन् जगत्कारणतां व्रजे ॥ ३ ॥


मी निर्विकार असंग ॥ शुद्ध सनातन ब्रह्मअभंग ॥
अनादि अविद्यायुक्त होत्सातां मग ॥ जगत्कारणता पावें ॥ २४ ॥
सृष्टीचिया आदि अंतीं ॥ निर्विकार ब्रह्म निश्चितीं ॥
सनातनही मातें म्हणती ॥ परी सृष्टी माजीही असंग ॥ २५ ॥
अनंतवेळ हे अविद्यामाया ॥ जगासहित होय जाय लया ॥
परी माझें असंगत्व जैशिया ॥ परी तैसेंचि असे ॥ २६ ॥
जोवरी अज्ञाने नव्हते कळलें ॥ तोंवरी मी संगी होते भाविलें ॥
तोंच जेधवां ज्ञाने मिथ्या झालें ॥ तेव्हां मी असंग ॥ २७ ॥
ज्ञान झालिया असंगत्व पावलों ॥ ऐसें नव्हे आधींच संचलों ॥
अज्ञाने जरी असतों विकारलों ॥ तरी ज्ञाने निर्विकार होतों कैसा ॥ २८ ॥
तस्मात् मी असंग परिपूर्ण ॥ अहंकारादि झालेच नाहींत निर्माण ॥
तेथें मज कर्ता भोक्ता हे वचन ॥ निरहंकारा केवीं ॥ २९ ॥
चुंबकाचिये सन्निधानें ॥ लोहो चळणं पावले म्हणून ॥
आळ घातला बळेंकरून ॥ चाळकत्वाचा त्या जैता ॥ १३० ॥
तेवीं साक्षित्वामुळे मजवरी ॥ का भोक्त्याचा आळ निर्धारीं ॥
घातला परी मी निरहंकारी ॥ जैसा तैसाचि असें ॥ ३१ ॥
मी करीं ना करवीं ॥ धरी ना धरवीं ॥
हाले ना हलवीं ॥ कवणेही काळीं ॥ ३२ ॥
ऐसें साधकें गुरुमुखेंकडून ॥ असंगत्व ज्ञान पावून ॥
चुकवावें जन्ममरण ॥ अज्ञानकृत जें ॥ ३३ ॥
ऐसे ज्ञान जोवरी नाहीं ॥ तोवरी जन्ममरण न चुके कहीं ॥
रज्जु नोळखितां न मरे अही ॥ मिथ्या परी कदां ॥ ३४ ॥
आपण असंग पूर्ण हे कळेना ॥ म्हणून देहादिक मी मानिले आपणां ॥
उगाचि भोगू लागला यातना ॥ कल्पकोटी ॥ ३५ ॥
मागें आतां में बोलिलें ॥ सच्चिदानंदाचें रूप केलें ॥
जे का पूर्ण निर्मळ संचलें ॥ तेंचि जीवाचें निजरूप ॥ ३६ ॥
जेवीं तरंगपणा त्यागितां ॥ निजांगचि समुद्र ऐता ॥
तेवीं अज्ञानकृत देहबुद्धि जातां ॥ पूर्ण ब्रह्म निजांगें ॥ ३७ ॥
परी जीवासी कैसें अज्ञान ॥ तेंचि असतां झाला विलक्षण ॥
स्वकीय सच्चिदानंदत्व त्यागून ॥ असज्जड दुःखात्मक झाला ॥ ३८ ॥
असतें अस्तित्व गेलें ॥ नसते निस्तत्व बळे घेतले ॥
स्वकीय ज्ञान मावळलें ॥ जडत्व भाविलें उगेंचि ॥ ३९ ॥
अकृत्रिमानंद विजिला ॥ नसत्या सुखदुःखा घेऊन बैसला ॥
हा इतुकाही असे घाला ॥ एका अज्ञानाचा ॥ १४० ॥
हे अज्ञान निपटून जावें ॥ देहबुद्धीचें निसंतान व्हावें ॥
याचि हेतु देहादिजाणावे ॥ कैसे कवणापासूनि ॥ ४१ ॥
आपण सच्चिदानंद असंग ॥ देहादि अविद्यात्मक सोंग ॥
रज्जूवरी जैसे भुजंग ॥ तेचि आपण न घडे कधीं ॥ ४२ ॥
या सर्वांचे में जेंअधिष्ठान ॥ तेंचि की आपण जगत्कारण ॥
हेहि यथार्थ नव्हे भाषण ॥ अविद्येस्तव आरोप ॥ ४३ ॥
सर्पासि कारण नव्हे दोरी ॥ न कळण्यामुळे आरोपाची परी ॥
तेवीं मी असंग निर्विकारी ॥ अविद्येस्तव जगकारण ॥ ४४ ॥
येरव्हीं जगचि सत्यत्वे कोठे ॥ तरी मज कारणत्व येईल गोमटें ॥
परी अनादि अविद्येचे कर्म खोटें ॥ नसतां आरोपी ॥ ४५ ॥
अनादि म्हणजे जयेशी ॥ आदिच नाहीं निश्चयेंशी ॥
न जन्मतां वंध्यापुत्रा जैशी ॥ प्रवृत्ति झाली ॥ ४६ ॥
वंध्या पुत्राची जैशी आई ॥ देखिली नाहीं कवणेठायीं ॥
तेवींच हे अविद्यादाई ॥ जग लेंकुराची ॥ ४७ ॥
त्या अविद्येशी आरोपावया ॥ सत्य अधिष्ठान पाहिजे रामराया ॥
म्हणून सत्यस्वरूपी माझिया ॥ अविद्या कल्पिली ॥ ४८ ॥
तेणेंशी युक्त मी असंग ॥ तेणेंशी युक्त मी असंग ॥ जगकारणतेसी पावलो सवेग ॥
परी मी जैसा असें तैसा अभंग ॥ विकारा पावलों नाहीं ॥ ४९ ॥
अज्ञाने सर्पासी जरी भाविलें ॥ तरी दोरीचे दोरीपण नाहीं गेलें ॥
तैसें माझें निरूपण संचलें ॥ जग झाले असतांही ॥ १५० ॥
सर्प होतां अज्ञान एक आहे ॥ तेवीं जगकार्यामुळे अविद्या म्हणों लाहे ॥
तस्मात् कार्यानुमेय माया पाहे ॥ ये‍र्‍हवीं नाहींच ॥ ५१ ॥
ऐशी न होऊन झाली माया ॥ शक्ति दोन असती तयेचिया ॥
विद्या आणि अविद्या तया ॥ बोलिजे विक्षेप आवरण ॥ ५२ ॥
स्वरूपाचें में न कळणें ॥ तेंचि आवरण शक्तीचे लक्षण ॥
जगाचे जे उत्पादन ॥ ते विक्षेपशक्ति ॥ ५३ ॥
रज्जू आच्छादी ते आवरणशक्ति ॥ सर्प निर्मी तयेशी विक्षेप म्हणती ॥
तेवींच अविद्या विद्या मात्र बोलों येती ॥ परी दोन्हीही अविद्या ॥ ५४ ॥
स्वरूपासी जेव्हां आच्छादिलें ॥ तेव्हां तया अज्ञाना अविद्या नांव आलें ॥
एकाचे एक जया ज्ञाने भाविले ॥ तें विक्षेपशक्ति विद्या ॥ ५५ ॥
असो ऐशिया दोन्हीं शक्ति ॥ परी ते एकाच माया निश्चितीं ॥
महाअविद्या जयेशी म्हणती ॥ जिच्या योगे मी जगकारण ॥ ५६ ॥
अहंब्रह्म झालें स्फुरण ॥ तेंचि मूळ मायेचें लक्षण ॥
तेथेंचि असती ज्ञानाज्ञान ॥ परी ती दोन्ही अविद्या ॥ ५७ ॥
विद्यात्मक जे ज्ञानशक्ति ॥ तेथें प्रतिबिंबित ईश्वर स्वयंज्योति ॥
अविद्या अज्ञानी जे प्रतिबिंबित चिति ॥ तो जीव अनीश्वर ॥ ५८ ॥
विद्यायोगें ईश्वरासी ॥ जगत्कर्तृत्व आलें निश्चयेंसी ॥
अविद्यायोगें भोक्तृत्व जीवासी ॥ आले असे ॥ ५९ ॥
परी सत्यत्वे नव्हे ईश्वर कर्ता ॥ तेवींच यथार्थ नव्हे जीव भोक्ता ॥
उगें कांहींच कोठे नसतां ॥ आरोपिती विद्या अविद्या ॥ १६० ॥
असोत ह्या विद्या अविद्या ॥ परी दोहीस कारण जे महाअविद्या ॥
तेचि अनिर्वचनीय मुळीं अनाद्या ॥ अनेक युक्तीसी ॥ ६१ ॥


अनिर्वाच्या महाविद्या त्रिगुणा परिणामिनी ॥
रजः सत्त्वं तमश्चेति त्रिगुणाः परिकीर्तितः ॥ ४ ॥


महाविद्या अनिर्वचनी ॥ तेचि त्रिगुण परिणामिनी ॥
सत्त्व रज तम तिजपासूनी ॥ तिचे गुण बोलिले ॥ ६२ ॥
येथे कोणी शंकील मनीं ॥ की अविद्या नाम कां मायेलागूनी ॥
तरी ऐका सावधपणीं ॥ कारण ययाचें ॥ ६३ ॥
सतचित् घन जें ब्रह्म पूर्ण ॥ तयाचे जाहले विस्मरण ॥
तेंचि अविद्यारूप मूलाज्ञान ॥ वेदान्ती म्हणती ॥ ६४ ॥
अथवा जीवाचें मुख्य रूप आत्मा ॥ असंग परिपूर्ण परमात्मा ॥
तोचि या अविद्येने रूपनामा ॥ वरपडा केला ॥ ६५ ॥
म्हणून अविद्या असे बोलिली ॥ जे स्ववर्श जीवासी बंधन घाली ॥
तरी साधकें पाहिजे ओळखिली ॥ आत्मस्थिती कैशी ॥ ॥ ६६ ॥
मी असंग निर्विकारी ॥ हे साधकें जाणावें अंतरीं ॥
हा विकार जाहला जो मजवरी ॥ तो अविद्येमुळे ॥ ६७ ॥
मी असंगही असून ॥ अविद्येस्तव जाहलों जगकारण ॥
तेवीं अष्टधेच्या उपाधीकडून ॥ जीवत्वा पावलों ॥ ६८ ॥
भ्रमेंकडून जें जें झालें ॥ तें तें ज्ञान होतां जाय नासलें ॥
ऐसें साधक पाहिजे विचारिलें ॥ अविद्या निरासें निजरूप ॥ ६९ ॥
असो अविद्या तेचि मूळमाया ॥ तयेसहित मी कारण जगकार्या ॥
त्या मायेचें लक्षण विचारूनिया ॥ पाहतां त्रिविध ॥ १७० ॥
लोकरीतीने हे सत्यचि असे ॥ विचारानुभवें कांहींच नसे ॥
नाना युक्तीने दिसत असे ॥ अनिर्वाच्या ॥ ७१ ॥
माया अनिर्वचनीय कैसी ॥ बोलिजेताहे कांहीशीं ॥
नाना तर्के अमुक म्हणावें तिजशी ॥ तरी तर्कासी न ये ॥ ७२ ॥
माया भिन्न ना अभिन्न ॥ अथवा नव्हे भिन्नाभिन्न ॥
भिन्नाभिन्ना विलक्षण ॥ माया नव्हे ॥ ७३ ॥
माया नव्हेचि साकार ॥ अथवा नव्हे निराकार ॥
उभयात्मक ना उभयहीन प्रकार ॥ मायेचा न ये बोलतां ॥ ७४ ॥
माया सत् ना असत् ॥ आणि नव्हेचि सदसत् ॥
सदसत् विलक्षण मात ॥ बोलो नये मायेची ॥ ७५ ॥
जैसेंकाअसे मृगजळ ॥ बोलतांचि न ये केवळ ॥
बाराही विकल्पां सकळ ॥ युक्तिकुंठित ॥ ७६ ॥
माया भिन्न जरी म्हणावी ॥ स्वरूपासी सोडून रहावी ॥
सूर्यावीण मृगजळासी उठाठेवी ॥ देखिली नाहीं ॥ ७७ ॥
अभिन्न माया म्हणतां ॥ केवळ स्वरूपी नसे तत्त्वतां ॥
उत्पत्ति मध्यान्हकाळ ढळतां ॥ माया मृगजळ आटे ॥ ७८ ॥
भिन्नाभिन्न उभयात्मक ॥ पदार्थचि नसे निश्चयात्मक ॥
भिन्नाभिन्नही न म्हणतां एक ॥ वस्तुजात नाहीं ॥ ७९ ॥
माया नव्हेचि साकार ॥ कारण अव्यक्त ऐशी बोले ॥
शास्त्र कार्यानुमेय असे साचार ॥ परी जगा ऐशी ही नव्हे ॥ १८० ॥
जरी निराकार म्हणावी माया ॥ तरी सावयवता जगत्कार्या ॥
कांहीं नाहीं तया पासूनिया ॥ साकारता प्रगटे कैशी ॥ ८१ ॥
साकार निराकार उभयात्मक ॥ पदार्थाच नसे निश्चयात्मक ॥
उभयही न म्हणतां एक ॥ वस्तुजात नाहीं ॥ ८२ ॥
माया सत् जरी म्हणावी ॥ तरी स्वानुभवज्ञानें केवीं निरसावी ॥
मृगजळपानें तृप्ति व्हावी ॥ हे तो घडेना ॥ ८३ ॥
आतां माया म्हणावी असत् ॥ तरी जगकार्य कैसेनि होत ॥
अभाव परिणामासी न पावत ॥ न्यायार्थ ऐसा ॥ ८४ ॥
सदसत् उभयात्मक ॥ पदार्थाच नसे निश्चयात्मक ॥
उभयविहीन म्हणतां एक ॥ वस्तु नाहीं ॥ ८५ ॥
तस्मात् कवणेही प्रकारे पाहतां ॥ अमुक निश्चय न ये करितां ॥
हेचि जाणावी अनिर्वचनीयता ॥ मायादेवीची ॥ ८६ ॥
मायेचा निर्धारचि नव्हे जेव्हां ॥ साधकें कैसें करावें तेव्हां ॥
ऐशिया न मानावेंच भावा ॥ निर्धारही होतसे ॥ ८७ ॥
जोवरी जीवासी अज्ञान ॥ कांहीं नसतां सत्य बैसले मानून ॥
तया बोध करितां साशंक मन ॥ म्हणून अनिर्वचनीय ॥ ८८ ॥
ब्रह्म आत्मा अभेदें जाणतां ॥ मायेची किमपि नसे वार्ता ॥
रज्जु कळलियावरी तत्त्वतां ॥ सर्प नाहींच नाहीं ॥ ८९ ॥
नाढळेचि कदां स्वरूपानुभविया ॥ तस्मात् मिथ्याचि आहे सहसा माया ॥
ऐसा निश्चयचि असे वाया ॥ बोलणे अवघे ॥ १९० ॥
अरे जे जाहलीच नाहीं ॥ ते नासेल कैशी कोण पडे संदेहीं ॥
मृगजळ डोळां दिसत असतांही ॥ सांकडे नसे पार जातां ॥ ९१ ॥
हे जळ नव्हे नकळे मानसीं ॥ अनोळख असे तया मृगासी ॥
तैशी माया भयानक अज्ञानासी ॥ अनुलंघनीय ॥ ९२ ॥
माया नाहींच ऐसें जया कळलें ॥ तेचि जन्मभयापासून सुटले ॥
देह असतांच समाधान पावले ॥ जीवन्मुक्त दशेनें ॥ ९३ ॥
असो ऐशी जे मूळ प्रकृति ॥ तेचि अष्टधारू आली व्याक्त ॥
कुमारी गर्भातें झाली धरिती ॥ तेव्हां गुणसाम्य नांव ॥ ९४ ॥
तेचि गुणातें प्रसवली ॥ म्हणून गुणपरिणामिनी बोलिली ॥
किंवा त्रिगुणरूपें तेचि झाली ॥ तरंगाकारें मृगजळ ॥ ९५ ॥
गुण जरी असती प्रगटले ॥ सत्त्व रज तम वेगळाले ॥
परी देहावीण जाती ना अनुमानले ॥ कवणे ही काळीं ॥ ९६ ॥
तस्मात् पिण्डावरूनि ब्रह्माण्ड ॥ ओळखावें अज्ञानबीजाचे झाड ॥
आणि त्रिगुणाचाही होय निवाड ॥ पिण्डी प्रगट अनुभवितां ॥ ९७ ॥


सत्त्वं शुक्लं समादिष्टं सुखज्ञानास्पदं नृणाम् ॥
दुःखास्पदं रक्तवर्ण चंचलं च रजो मतम् ॥ ५ ॥
तमः कृष्णं जडं प्रोक्तमुदासीनं सुखादिषु ॥


श्वेतवर्ण सत्त्वगुण ॥ जेणें सुख पावती सर्व जन ॥
सुख ज्ञानासीच तो स्थान ॥ असे म्हणूनि ॥ ९८ ॥
रक्तवर्ण रजोगुण स्वभावें ॥ जेणें जीवासी दुःखचि द्यावें ॥
चंचळवें सुखदुःखा कारण व्हावें ॥ आणि उत्पत्तीशीही ॥ ९९ ॥
जड कृष्णवर्ण तमोगुण ॥ तो तरी सुखदुःखा उदासीन ॥
वृथा आयुष्य जाय सरून ॥ प्रपंच ना परमार्थ ॥ २०० ॥
एवं त्रिगुण प्रतीति पिंडी पहावी ॥ त्यावरून समष्टीची ओळखावी ॥
कारण की गुणेंवीण उत्पत्तिच न व्हावी ॥ भूत भौतिकांची ॥ १ ॥
जो जो प्रत्यक्ष नव्हे विषय ॥ तो तो अनुमाने जाणावा प्रत्यय ॥
व्यष्टीपरी असती समष्टिमय ॥ गुण हे तिन्ही ॥ २ ॥
हा नदीसी पूर जेव्हां चालिला ॥ तेव्हां उगमी पर्जन्य असे पडिला ॥
तैसा जगाचा प्रवाह दिसला ॥ तेव्हां गुण पूर्वी असती ॥ ३ ॥
पर्जन्य जेव्हां पडतसे ॥ तेव्हां निश्चयें अभ्र आले असे ॥
तैसी गुणउत्पत्ति जरी दिसतसे ॥ तरी अविद्याही आहे ॥ १ ॥
एवं कार्यावरून कारण ॥ अविद्या आहेसें होय अनुमान ॥
तेंही अधिष्ठानेंवीण ॥ उत्पन्न नव्हे ॥ ५ ॥
जैसा मेघासी अवकाश पाहिजे ॥ तेव्हांच ढगाची उठती भोजें ॥
तैसें भ्रमासीही लाहिजे ॥ सत्य आधिष्ठान ॥ ६ ॥
तस्मात् मी आधष्ठान ब्रह्म ॥ असतां मूळ मायेंसी उद्गम् ॥
तयेची पिली सत्त्व रज तम ॥ माय लेकुरे शोभतीं ॥ ७ ॥


अतो मम समायोगाच्छक्तिः सा त्रिगुणात्मिका ॥ ६ ॥


सत्य अधिष्ठानेंवीण भ्रमासी ॥ उत्पत्तीच नव्हे निश्चयेंसी ॥
म्हणुन माझिया समायोगेंसी ॥ त्रिगुणात्मक शक्ति होय ॥ ८ ॥
सच्चिदानंद मी परमात्मा ॥ तो मी अधिष्ठान या रूपनामा ॥
आधिष्ठानेंवीण वाउगिया भ्रमा ॥ उत्पत्ति नव्हे ॥ ९ ॥
साधकेही पहावें ऐसें ॥ की मी प्रत्यगात्मा ब्रह्म ॥
असत्या मजवरी हा भ्रम भासे ॥ त्रिगुण मायेचा ॥ २१० ॥


आधिष्ठाने तु मय्येव भजते विश्वरूपताम् ॥
शुक्तौ रजतवद्रजौ भुजंगो यद्वदेव तु ॥ ७ ॥


ते जे त्रिगुणात्मकशक्ति ॥ असंगा मज अधिष्ठानावरुती ॥
झाली विश्वरूपें विस्तारती ॥ आपुली आपण ॥ ११ ॥
मी सत्य परमात्मा असंग ॥ त्यावरी मिथ्या मायेचें कैसें सोंग ॥
तरी पहा रज्जूवरी भुजंग ॥ की रजत शक्तीवरी ॥ १२ ॥
कोणीकडे सत्य पहा दोरी ॥ कोणीकडे मिथ्या भुजंग त्यावरी ॥
कोणीकडे सत्यत्वे शुक्ति सारी ॥ मिथ्या रजत कोणीकडे ॥ १३ ॥
तेवीं मी परमात्मा केवढा कैसा ॥ अविनाश अक्षयी जैसा तैसा ॥
तेथे हा नामरूपाचा ठसा ॥ मिथ्यात्वें कोणीकडे ॥ १४ ॥
सर्प आणि रजत जैसें ॥ शिंपी दोरीवरी झालेचि नसे ॥
विश्वही नामरूपात्मक तैसें ॥ झालेंचि नाहीं मजवरी ॥ १५ ॥
दोरी शिंपीचे नेणणे झालें ॥ तेव्हांचि सर्प रौप्य भासलें ॥
तैसेंचि मज असंगाचे रूप नाही कळलें ॥ तेव्हां भाविलें जग ॥ १६ ॥
न कळण्यासीच अविद्या म्हणावी ॥ तयेची तीन रूपें जाणावीं ॥
तेचि त्रिगुणात्मक ओळखावी ॥ शक्ति माझ्या ठायीं ॥ १७ ॥
कळणे न कळणे अन्यथा कळणें ॥ हीच त्रिगुणांची लक्षणें ॥
जड चंचळ आणि जाणणें ॥ ह्या शक्ति तिहींच्या ॥ १८ ॥
कळणे सत्त्वगुण ज्ञानशक्ति ॥ जड तमोगुण नेणणे द्रव्यशक्ति ॥
अन्यथात्वे जे चंचल विकृति ॥ ते क्रियाशक्ति रजोगुणा ॥ १९ ॥
अविद्येची जे नेणीवतां ॥ तेचि द्रव्यशक्ति भूताकारता ॥
उद्भवती झाली प्रत्यक्षता ॥ मज अधिष्ठानींच ॥ २२० ॥


आकाशादीनि जायन्ते मत्तो भूतानि मायया ॥


त्या मजपासून मायेच्या योगें ॥ आकाशादि भूतें झाली वेगें ॥
मायेनें म्हणजे कपटरूप अंगें ॥ न होऊन झाली ॥ २१ ॥
माझिये स्वरूपाचा पाहतां ॥ अंताचि न लागे तत्त्वतां ॥
तेथे एकदेशी मायेची वार्ता ॥ जेवीं मोहरी सागरीं ॥ २२ ॥
तेचि त्रिगुणात्मिका शक्ति ॥ तिज पासून भूतें जाहलीं निश्चितीं ॥
अव्यक्तचि आलें व्यक्ति ॥ भ्रमेंकडूनी ॥ २३ ॥
हे अमुका पासूनिया संभवें ॥ तें कासयावरून समजावें ॥
तरी कारणाचे लक्षण कांहीं असावें ॥ कार्यामाजीं ॥ २४ ॥
मज असंगाचें सद्रूप लक्षण ॥ भूतांमाजी आले व्यापून ॥
यास्तव मानावें की मजपासून ॥ भूतें झाली ॥ २५ ॥
केवळ मजपासनाच झालीं ॥ ऐसें नव्हे हे मायेची भुली ॥
त्या अविद्या मायेस्तव भतें प्रगटलीं ॥ तरी मायाही कारण ॥ २६ ॥
मायेचा जो नाहीपणा ॥ भूतकार्यांत आला जाणा ॥
सद्रप नसतां कांही असेना ॥ हेंचि रूप मायेचें ॥ २७ ॥
सुवर्णाविण अलंकारा ॥ रूपचि नसे साचोकारा ॥
तेवीं अस्तित्वेवीण निर्धारा ॥ रूप नसे मायेसी ॥ २८ ॥
एवं कारणाचे गुण कार्याआंत ॥ आले असती अनुभवा येत ॥
परी कार्याची किमपि नसे मात ॥ कारणाच्या ठायीं ॥ २९ ॥
भूतांमाजी आपेआप ॥ माझें व्यापिलेंसे सद्रूप ॥
परी केवळ माझ्याठायीं आरोप ॥ नाहींच भूतांचा ॥ २३० ॥
असो प्रथम विकार अवकाश ॥ रूपें उत्पन्न झालें आकाश ॥
त्या आकाशामाजीं ब्रह्म सदंश ॥ व्यापून आला ॥ ३१ ॥
सदंशा ठेविलें आकाश नाम ॥ त्यावीण नाहीपणाचा संभ्रम ॥
तेंचि मायेचें निस्तत्त्वरूप परम ॥ व्यापलें असे ॥ ३२ ॥
निश्चलत्व अवकाश धर्म जातीचे ॥ शब्द मुख्यगुण आकाशाचे ॥
हे स्वरूपी पाहतां असाचे ॥ परी सद्रप असे आकाशीं ॥ ३३ ॥
मायेपरीस दशगुण ॥ उणें असें हें गगन ॥
तया गगनापासून जनन ॥ वायूचे झालें ॥ ३४ ॥
आतां वायूची जितुकीं कारणे ॥ तितुक्यांची वायूंत आली लक्षणें ॥
वायू आहेसा वाटे जेणें ॥ तो सदंश ब्रह्मींचा ॥ ३५ ॥
तेणेंवीण जो नाहीपणा ॥ मायेचा व्यापला जाणिजे मना ॥
शब्दगुणही व्यापला जाणा ॥ गगनतत्त्वाचा ॥ ३६ ॥
ध्वनि मात्र शब्द होता गगनीं ॥ तो स्पष्ट झालावायूंत येउनी ॥
सुसाट वायू वाहतां ध्वनि ॥ उमटूं लागे ॥ ३७ ॥
वायूचा चंचळचि स्वभाव ॥ विहरणकर्म हे अपूर्व ॥
स्पर्श गुण हा स्वयमेव ॥ जातीचा असे ॥ ३८ ॥
परी आकाशाहून दशगुणें ॥ वायूचे रूप असे उणें ॥
त्या वायूचे पोटी जन्म होणें ॥ महातेजासी ॥ ३९ ॥
आहे अग्नि हा ब्रह्म सदंश ॥ त्यावीण माया निस्तत्वें फोस ॥
ही दोन्ही कारणे आणि भूतांचे अंश ॥ असती कारणत्वें तेजीं ॥ २४० ॥
भुग भुग ऐशी ध्वनि उठिली ॥ तेचि आकाशाची व्याप्ति झाली ॥
उष्णस्पर्शे वायूने वस्ती केली ॥ तेज कार्यामाजीं ॥ ४१ ॥
अग्नीचा उष्णत्व हा धर्म ॥ दहन पचेन हे कर्म ॥
रूप गुण मुख्यत्वे नेम ॥ असती जातीचे ॥ ४२ ॥
परी उणे असे दशगुणीं ॥ भासरूपें एकदेशी अग्नि ॥
तया तेजा पोटीं पाणी ॥ जन्म पावलें ॥ ४३ ॥
आहे पाणी तें सद्रूप ॥ नसे ते माया असद्रूप ॥
बुळबुळ वाजतसे आप ॥ तो शब्द आकाशींचा ॥ ४४ ॥
शीत स्पर्श तो वायूचा ॥ उष्णत्व आणि भास तेजाचा ॥
द्रवत्व क्लेदन रस गण जातीचा ॥ आपाचा प्रसिद्ध ॥ ४५ ॥
परी अमीहून दशांशेंसी ॥ आप उणे असे एकदेशी ॥
तया आपचिये कुशीं ॥ पृथिवी जन्मली ॥ ४६ ॥
आहे पृथिवी तोचि सदंश ॥ नाहीपणा मायेचा अंश ॥
कडड शब्द तेंचि आकाश ॥ पृथिवींत आले ॥ ४७ ॥
वायूचा व्यापला स्पर्श कठिण ॥ चित्र विचित्र भासलें तो अग्न ॥
मृदुत्वें व्यापलें तें जीवन ॥ पृथिवीमाजी ॥ ४८ ॥
कठिण धर्म कर्म धारण ॥ मुख्य पृथिवीचा गंध गुण ॥
परी उणी असे आपाहून ॥ दशगुणें पृथिवी ॥ ४९ ॥
उणें तरी एकाहून एक ॥ परी जडत्वे अधिकाधिकः ॥
गुणही तैसे अवश्यक ॥ आगळेपणें ॥ २५० ॥
आकाशी एक शब्दगुण ॥ वायु शब्द स्पर्श द्विगुण ॥
तेज ते शब्द स्पर्श रूप त्रिगुण ॥ चतुर्गण आप ॥ ५१ ॥
शब्द स्पर्श रूप आणि रस ॥ गंधासहित पांच असती पृथिवीस ॥
परी एकेक गुण जातीचा करी वास ॥ कारणत्वे येर ॥ ५२ ॥
ऐशी पंचभूते वेगळालीं ॥ माझ्या आश्रयें मायेने उभविलीं ॥
तया भूतांपासून तत्त्वे निपजलीं ॥ एकेकांतून त्रिगुणरूपें ॥ ५३ ॥
अंतःकरण व्यानं श्रोत्रं वाचा ॥ शब्द सह उद्भव आकाशी त्रिगुणाचा ॥
मन समान पाणि स्पर्श त्वचा ॥ वायूचे त्रिगुण ॥ ५४ ॥
बुद्धि उदान चक्षु पाद रूप ॥ तेजी प्रगटले त्रिगुणाचे स्वरूप ॥
चित्त प्राण जिव्हा उपस्थरस |आप जन्मलें त्रिगुणाशीं ॥ ५५ ॥
अहंकार अपान प्राण ॥ गुद गंधविषय मिळून ॥
पृथिवीतून प्रगटले त्रिगुण ॥ एवं पंचवीस तत्त्वे ॥ ५६ ॥
इतुका परस्परानुप्रवेश ॥ होतां स्पष्टता आली पंचभूतास ॥
भूतकर्दम म्हणावे यास ॥ येथून पिंडास जन्म होय ॥ ५७ ॥


तैरारब्धमिदं विश्वं देहोऽयं पांचभौतिकः ॥ ८ ॥


ती पांचीही भूते मिळूनी ॥ जे का पंचवीस तत्त्वांची श्रेणी ॥
तेथून देह झाला म्हणूनी ॥ पांचभौतिक म्हणावा ॥ ५८ ॥
परी पंचीकरण केलियावीण ॥ देह हा नव्हचि निर्माण ॥
पूर्वी जी तत्त्वे झाली उत्पन्न ॥ ती अपंचीकृत ॥ ५९ ॥
आतां तेंचि पंचीकरण कैसें ॥ बोलिजेत आहे अपैसें ॥
त्यापासून होताति अस्थिमांसें ॥ आदिकरूनि पंचवीस ॥ २६० ॥
एकेक भूत द्विधा झालें ॥ ज्याचे त्यांतचि अर्ध राहिलें ॥
पुनः अर्धे चतुर्धा विभागलें ॥ तें मिळालें चहूंशीं ॥ ६१ ॥
प्रथम आकाश जाहलें द्विधा ॥ अंतःकरण आकाशी राहिला भाग अर्धा ॥
येर अर्धभाग विभागिला चतुर्धा ॥ तो दिधला चारभूतां ॥ ६२ ॥
व्यान वायूसी मिळाला ॥ श्रोत्र तेजी जाऊन राहिला ॥
वाचा मीनलीआपाला ॥ पृथिवीसी शब्द ॥ ६३ ॥
वायूचे भाग झाले दोन ॥ त्यांत अर्धभाग राहिला समान ॥
येर अर्ध झाला चतुर्गुण ॥ तो मीनला चहूं भूतां ॥ ६४ ॥
मन राहिले आकाशीं ॥ त्वचा मिळाली तेजासी ॥
पाणि मीनला आपासी ॥ पृथिवीसी स्पर्श ॥ ६५ ॥
तेजाचे रूप द्विधा झालें ॥ अर्ध चक्षुतेजींच राहिलें ॥
अर्ध तेंच चतुर्धा विभागलें ॥ तें मीनले चौभूतां ॥ ६६ ॥
आकाशी बुद्धीचा वास ॥ वायूंत उदाना रहिवास ॥
पाद मिळता झाला आपास ॥ पृथिवीसी रूप ॥ ६७ ॥
द्विधा झालें आपभूत ॥ अर्थ भाग त्याचा त्यांत उपस्थ ॥
येर मिळाले चहु भूतांत ॥ चार भाग अर्धाचे ॥ ६८ ॥
आकाशी राहिले चित्त ॥ प्राण वायूमाजी मिळत ॥
जिव्हा तेजी सांठवत ॥ रसभमीशी ॥ ६९ ॥
द्विधा पृथिवी विभागली ॥ गंधरूपें अर्ध आपण राहिली ॥
अर्धचतुर्धारूप झाली ॥ तें प्रवेशली चौभूतीं ॥ २७० ॥
अहंकार आकाशी राहिला ॥ अपान वायूत समरसला ॥
घ्राण तेजासी मिळाला ॥ आपासी गुद ॥ ७१ ॥
एवं परस्परानुप्रवेश ॥ होतां पंचवीस जाहले जडांश ॥
त्यासहित उत्पत्ति झाली स्थूलास ॥ जो देह पांचभौतिक ॥ ७२ ॥
अंतःकरण मन बुद्धि चित्त ॥ अहंकार आकाशी जेव्हां मिळत ॥
तेव्हां कामक्रोधादि समस्त ॥ उद्भवते झाले ॥ ७३ ॥
व्यान समान उदान प्राण ॥ अपान हे पांच मिळतां वायू पूर्ण ॥
तेव्हां चलनवलनादि पांच गुण ॥ होते झाले ॥ ७४ ॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण ॥ पांच मिळतां तेज झालें विस्तीर्ण ॥
तेणें चक्षुधा तृषादि झाले उत्पन्न ॥ पांच गुण तेजाचे ॥ ७५ ॥
वाचा पाणि पाद उपस्थ ॥ गुद मिळतां आप स्पष्ट होत ॥
तेथून लाळ रक्त स्वेद मूत्र शुक्लित ॥ जाहले असती ॥ ७६ ॥
शब्द स्पर्श रूप रस गंध ॥ पांच मिळतां पृथ्वी सुबद्ध ॥
त्यापासून अस्थि मांसादि प्रसिद्ध ॥ प्रगटते झाले ॥ ७७ ॥
एवं ही पंचवीस तत्त्वे मिळूनी ॥ स्थूळदेहाची झाली उभवणी ॥
सर्वची पंचभूतांचे म्हणूनी ॥ भौतिक बोलिजे ॥ ७८ ॥
त्या देहासी मी मी म्हणतां ॥ जीवासी लाज न वाटे तत्त्वतां ॥
जीवाचें निजरूप जरी विचारितां ॥ मी असंग की आत्मा ॥ ७९ ॥
आत्मा देह नव्हे कदां ॥ अथवा माझाही म्हणावया नुरें धंदा ॥
परी या अज्ञान अविद्येने खेदा ॥ योजिलें देहबुद्धीसी ॥ २८० ॥
देह तरी आत्मरूपा पासून ॥ जाहलाचि नाही की निर्माण ॥
अविद्येस्तव भूतें जाहली उत्पन्न ॥ त्यापासून देह ॥ ८१ ॥
भौतिकत्वही स्पष्ट असूनी ॥ परी न होय भूतांपासूनी ॥
प्रत्यक्ष वृक्षलतादिकांची उभवणी ॥ ते तरी शुद्ध असत ॥ ८२ ॥
देह जरी भूतांपासूनी होते ॥ काही तरी शुद्ध असते ॥
याची कारणे असती भूते ॥ तरी जन्मतें कां अमंगळीं ॥ ८३ ॥
स्त्री पुरुषांचे जें मैथुन ॥ अमंगळ रक्त रेत दोन ॥
मिळतां देहाचे होय जनन ॥ हा विस्तार पूर्वाध्यायीं ॥ ८४ ॥
पहिली मानसिक सृष्टि झाली ॥ जे इच्छेनें ब्रह्मदेवें कल्पिली ॥
ती ती जोडपींच असती जन्मलीं ॥ स्त्री पुरुष रूपें ॥ ८५ ॥
पुढे स्त्री पुरुषांचे होतां मैथुन ॥ या देहाचे होय जनन ॥
म्हणून या परता अमंगळ आनं ॥ पदार्थ नसे जगीं ॥ ८६ ॥


पितृभ्यामशितादन्नात्षट्कोशं जायते वपुः ॥
स्नायवोऽस्थीनि मज्जा च जायन्ते पितृतस्तथा ॥ ९ ॥


माता पिता अन्न खाती ॥ त्या अन्नरसें रक्तरेतें होती ॥
उभय वीर्यापासून जन्मती ॥ षट्कोशिक देह ॥ ८७ ॥
कोश म्हणजे सहा धातु ॥ उभय वीर्याच्या असती निफजतु ॥
षट्कोशिक नाम असे या हेतु ॥ तीन तीन एकेकाच्या ॥ ८८ ॥
शिरा अस्थि मज्जा हे तीन ॥ कठीणरूप श्वेतवर्ण ॥
भाग होती पित्यापासून ॥ गर्भी वीर्याच्या योगें ॥ ८९ ॥


त्वङ मांसशोणितमिति मातृतश्च भवन्ति हि ॥
भावाः स्युः षड्वधास्तस्य मातृजाः पितृजास्तथा ॥ १० ॥त्वचा मांस शोणित तिन्हीं ॥ रक्तवर्ण होती मातेपासूनी ॥
एवं तीन तीन भाव मिळून ॥ षट्कोशिक देह ॥ २९० ॥
हे सहाही भाव उभयतांचे ॥ असती माता आणि पितयाचे ॥
परी या निमित्त होय अन्य साचें ॥ तेही बोलिजे ॥ ९१ ॥


रसजा आत्मजाः सत्त्वसंभूताः स्वात्मजास्तथा ॥


देहाचे भाव अनेक ॥ विकाराचे विकारात्मक ॥
रसापासून होती कांहीं एक ॥ कांही जीवात्म्यापासूनी ॥ ९२ ॥
कांहीं गुणापासून उत्पत्ति ॥ कांहीं कर्मापासून होती ॥
कांहीं मानसापासून निपजती ॥ परी सर्व भूतात्मक ॥ ९३ ॥
हे इतुकेही पृथकाकारें ॥ बोलिजेताती अल्प अनुकारें ॥
प्रथम मातेचे भाव किती प्रकारें ॥ असती ते ऐका ॥ ९४ ॥


मृदवः शोणितं मेदो मज्जा प्लीहा यकृदगुदम् ॥ ११ ॥
हन्नाभीत्येवमाद्यास्तु भावा मातृभवा मताः ॥


रक्त मज्जा प्लीहा मेद ॥ यकृत हृदय नाभी गुद ॥
इतुकेही भाव जे जे मृद ॥ ते ते मातेपासूनी ॥ ९५ ॥
मज्जा तरी पित्यापासूनी ॥ मागें बोलिली श्वेतवर्णी ॥
परी रक्तवर्ण मृदुत्वें जननी ॥ पासावही झाली ॥ ९६ ॥
प्लीहा म्हणजे मांसाचे गोळे ॥ ठायी ठायी असती सगळे ॥
यकृत म्हणजे मांसखण्ड काळें ॥ दक्षिण पाश्वीं ॥ ९७ ॥
संधी संधीसी जमतसे मेद ॥ नाभि हृदय आणि प्रसिद्ध गुद ॥
हे इतुकेही भाव सर्व मृदामातेचे असती ॥ ९८ ॥


श्मश्रुलोमकचस्नायुशिराधमनयो नखाः ॥ १२ ॥
दशनाः शुक्रमित्याद्याः स्थिराः पितृसमुद्भवाः ॥


श्मश्रु लोम कच हे केश ॥ स्नायु धमनी शिरा विशेष ॥
नखें दंत रेत स्थिरांश ॥ पित्यापासून होती ॥ ९९ ॥
श्मश्रु मिशा सर्वांगी लव ॥ तया लोम हे ठेविलें नांव ॥
कच म्हणजे मस्तकावरी उद्भव ॥ एवं हे त्रिविधा ॥ ३०० ॥
तेवींच शिराही त्रिविधा असती ॥ ठायी ठायीं बंधनें त्या स्नायु म्हणती ॥
धमनी म्हणाव्या जेणे प्राण वाहती ॥ श्लेष्में व्याप्त त्या शिरा ॥ १ ॥
शुक्र मिशा आणि दर्शन ॥ जन्मानंतर होती उत्पन्न ॥
येर नखें शिरा आदिकरून ॥ गर्भीच होती ॥ २ ॥


शरीरोपचितिवर्णो वृद्धिस्तृप्तिर्बलं स्थिस्तिः ॥ १३ ॥
अलोलुपत्वमुत्साह इत्यादि रसजं विदुः ॥


जन्म झालियानंतर ॥ उपचिती म्हणजे वाढे शरीर ॥
पुढे हळूहळू वाढण्याचा प्रकार ॥ तयासी वृद्धि बोलिजे ॥ ३ ॥
सुंदर वाईट गोरें काळें ॥ दिवसे दिवस वर्ण तो निवळे ॥
तृप्ति आणि बळही प्रबळे ॥ अन्नरसें वांचे ॥ ४ ॥
अमुक पाहिजे अलोलुपता ॥ इच्छित प्राप्तें उत्साह चित्ता ॥
आदि करून सर्व हे तत्त्वतां ॥ अन्नरसें होती ॥ ५ ॥


इच्छा द्वेषः सुखं दुःखं धर्माधर्मों च भावना ॥ १४ ॥
प्रयत्नो ज्ञानमायुश्चेंद्रियाणित्येवमात्मजाः ॥


इच्छा द्वेष सुखदुःख सर्व ॥ धर्म अधर्मादि भाव ॥
हे मनाचे कार्य परी जीवापासाव ॥ यास्तव आत्मज बोलिले ॥ ६ ॥
अथवा देहादि काया सर्वांसी ॥ आत्मा म्हणूनि धरिलें मानसीं ॥
तेव्हां बोलिलें की उत्पत्ति यासी ॥ असे आपणापासूनि ॥ ७ ॥
प्रयत्न आणि ज्ञान ॥ प्रवृत्ति निवृत्तीकडे समान ॥
हे जीवाचें कार्य संपूर्ण ॥ यास्तव आत्मज बोलावें ॥ ८ ॥
तेवींच पूर्वी कर्म आपण ॥ केले तैसें आयुष्याचे नियमन ॥
तस्मात आयुष्यही असे निर्माण ॥ आत्म्या पासूनी ॥ ९ ॥
आणि इंद्रियेही प्रवेशकाळीं ॥ जीव चैतन्य सजीव सकळी ॥
होती म्हणून मुखकमळीं ॥ आत्मज बोलिली ॥ ३१० ॥
ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ॥ हा दशधा इंद्रिय समुदाय ॥
भिन्न भिन्न असती तयांचे विषय ॥ तेही संकेतें बालूं ॥ ११ ॥


ज्ञानेंद्रियाणि श्रवणं स्पर्शनं दर्शनं तथा ॥ १५ ॥
रसनं घ्राणमित्याहुः पंच तेषां तु गोचराः ॥


श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण ॥ ही पांच ज्ञानेंद्रियें बोलती वचन ॥
या पाचांचे पांच भिन्न भिन्न ॥ बोलिजेती विषय ॥ १२ ॥


शब्दः स्पर्शस्तथा रूपं रसो गंध इति क्रमात् ॥ १६ ॥


शब्द स्पर्श रूप रस गंध ॥ पांचांचे अनुक्रमें पांच प्रसिद्ध ॥
मुख्य श्रोत्राचा विषय शब्द ॥ त्वचेचा स्पर्श ॥ १३ ॥
चर्चें रूप जिव्हेचा रस ॥ घ्राणेंद्रियासी घेणे सुवास ॥
हे पांचांचे पांच बहुवस ॥ आतां कर्मेद्रियें ऐकें ॥ १४ ॥


वाकरांघ्रिगुदोपस्थान्याहुः कर्मेंद्रियाणि हि ॥
वचनादानगमनविसर्गरतयः क्रमात् ॥ १७ ॥


वाचा पाणि आणि पाद ॥ उपस्थ चौथे पांचवें गुद ॥
या पांचां कर्मेंद्रियांच्या विशद ॥ पांच क्रिया अनुक्रमें ॥ १५ ॥
वाणीचे वचन हस्ता देणे घेणें ॥ पादाचें गमन उपस्था भोगणे ॥
रति गुदासी विसर्ग करणें ॥ क्रिया पांचांच्या ॥ १६ ॥


क्रियास्तेषां मनोबुध्दिरहंकारस्ततः परम् ॥
अंतःकरणमित्याहुश्चित्तं चेति चतुष्टयम् ॥ १८ ॥


विषयासहित ज्ञानेंद्रिये ॥ क्रियसहित कर्मेद्रिये ॥
ही दशधा बोलिली बहिरिद्रये ॥ अंतरिद्रियें अंतरीं ॥ १७ ॥
एकचि स्फूर्ति अंतःकरणाची ॥ चतुर्धारूप ओळख त्याची ॥
मन बुध्दि चित्त अहंकार रूपेंची ॥ बोलत असती ॥ १८ ॥


सुखं दुःखं च विषयौ विज्ञेयौ मनसः क्रियाः ॥
स्मृतिभीतिविकल्पाद्या बुध्दिः सान्निश्चयात्मिका ॥ १९ ॥


एकचि निर्विकल्प स्फुरण ॥ तेंचि संशयात्मक मन ॥
सुख दुःख उठे तयापासून ॥ संकल्प विकल्पानुसार ॥ १९ ॥
होय की नव्हे हाचि संशय ॥ तेणें सुख दुःखें होती द्वय ॥
अथवा अमुक कार्ये सुख की दुःख होय ॥ हा निवाडा नव्हे ॥ ३२० ॥
तस्मात् सुख दुःखात्मक विषयाची ॥ क्रिया होणे असे मनाची ॥
पुढें निश्चय करणे ते बुद्धि साची ॥ अमुकच म्हणूनि ॥ २१ ॥
स्मृति भीति लज्जा धृति ॥ शोक मोह धारणावृत्ति ॥
संशयात्मक मनासी उठती ॥ निश्चय करी ते बुध्दि ॥ २२ ॥


अहं ममेत्यहंकारश्चित्तं चेतयते यतः ॥
सत्त्वाख्यमन्तःकरणं ॥ गुणभदात्रिधा मतम् ॥ २० ॥


अमुक हे तों अगत्य करूं ॥ हे अमुक सर्वथा न करूं ॥
हे माझें हा मी अहंकारु ॥ बोलिजेताहे ॥ २३ ॥
तें कार्य झालियाविण ॥ जयाचें न राहे चिंतन ॥
हेचि चित्ताचे लक्षण ॥ सर्वदां स्फुरे ॥ २४ ॥
ऐसें चतुर्धारी परी एक ॥ अंतःकरण वृत्त्यात्मक ॥
हे सत्वगुणींच आवश्यक ॥ ज्ञानशक्ति म्हणूनि ॥ २५ ॥
परी त्रिगुण तेथें असती ॥ त्या गुणयोगें त्रिविध प्रकृति ॥
हेही सर्वांसी असे प्रतीति ॥ की अंतःकरण त्रिविध ॥ २६ ॥


सत्त्वं रजस्तम इति गुणः सत्वात्तु सात्त्विकाः ॥
आस्तिक्यशुध्दिधर्मैकमतिप्रभृतयो मताः ॥ २१ ॥


सत्त्व रज तम हे गुण ॥ त्यांत सात्विकवृत्तीची ओळखण ॥
सखचि होय जीवालागून शांतवृत्ति योगें ॥ २७ ॥
आस्तिक्य बुद्धि शुक्ल धर्म ॥ तेचि एक आवडी परम ॥
कर्म होताही भाव निष्कर्म ॥ अथवा ज्ञान वैराग्य ॥ २८ ॥
शांति क्षमा आदिकरून ॥ तितिक्षा श्रध्दा भक्ति भजन ॥
ह्या वृत्ति सुखासीच कारण ॥ असती जीवा ॥ २९ ॥


रजसो राजसा भावाः कामक्रोधमदांदयः ॥
निद्रालस्यप्रमादादि वंचनाद्यास्तु तामसाः ॥ २२ ॥


रजोगुणाचे भाव जे होणें ॥ दुःखचि जीवा होतसे तेणें ॥
कामक्रोध लोभादि लक्षणें ॥ मदमत्सरादि ॥ ३३० ॥
अप्राप्ताची इच्छी प्राप्ति ॥ तयासी काम बोलताती ॥
तेथे विघ्ने जरी होती ॥ तरी क्रोध उठे ॥ ३१ ॥
अथवा प्राप्त जरी झालें ॥ तें असावें न जावें नासलें ॥
या आवडीसी लोभ बोलिलें ॥ एवं तिन्ही दुःखकारी ॥ ३२ ॥
तैसेचि मदमत्सरादि सकळ ॥ तेणेही जीवा होय तळमळ ॥
क्षण एक विश्रांति नव्हे निर्मळ ॥ कवणेही काळीं ॥ ३३ ॥
तमोगुणाची जे वृत्ति ॥ निद्रा आळस प्रमाद उठती ॥
येणें सुखदुःखें दोनीही न होती ॥ आयुष्य जाय वृथा ॥ ३४ ॥
असो रज तम हे गुण दोनी ॥ जीवासी बळें घालिती बंधनीं ॥
परमार्थी लागे तरी याची होय हानि ॥ सत्वाचेनि उदयें ॥ ३५ ॥


प्रसन्नोंद्रियतारोग्यानालस्याद्यास्तु सत्त्वजाः ॥
देहो मात्रात्मकस्तस्मादादत्ते तद्गुणानिमान् ॥ २३ ॥


आरोग्य इंद्रियांची प्रसन्नता ॥ अनालस्यादि अवस्था तत्त्वतां ॥
प्रगटती सत्त्वगुण प्राप्त होतां ॥ ज्या मोक्षकर जीवा ॥ ३६ ॥
देह मात्र जितुका उत्पन्न ॥ तो देह मात्रात्मक आपण ॥
जैसा जैसा अंतरीं उठे गण ॥ तैशी तैशी बाह्यक्रिया ॥ ३७ ॥
मुख्य देहबुद्धीच्या योगें ॥ आशादिकांचा जीवा रोग लागे ॥
जरी पूर्वक, सत्त्वगुण जागे ॥ तरी नैराश्यादि प्रगटती ॥ ३८ ॥
हेचि मुख्य आरोग्यता ॥ होय सत्त्वगुण उदया येतां ॥
तेवींच इंद्रियांची प्रसन्नता ॥ वैराग्य योगें होत ॥ ३९ ॥
ये हवीं बहुत विषय भोगितां ॥ तृप्ति नव्हें इंद्रियां समस्तां ॥
अग्नीवरी धृत शिचितां ॥ आधिक वाढे ॥ ३४० ॥
तस्मात् दोषदृष्टि पदार्थी उपजे ॥ तेणेंचि वैराग्य ही लाहिजे ॥
मग रजकार्य इच्छादिक जें जें ॥ मावळू लागे ॥ ४१ ॥
शब्दादि विषय जरी न मिळती ॥ तरी तळमळचि असेना चित्तीं ॥
सहज इंद्रियां होय ताप्ति ॥ हेचि प्रसन्नता ॥ ४२ ॥
मग परमार्थी गोडी लागे ॥ शमदमादि साधनें करी अंगें ॥
तेव्हां आलस्यादि तमकार्य भंगे ॥ हे अनालस्यता ॥ ४३ ॥
आदि शब्दें विवेक दया शांति ॥ हेही परमार्थाची संपत्ति ॥
सत्त्वगुण प्रगटतां अनायासें संहरती ॥ लोभादि सर्व ॥ ४४ ॥
एवं रज तमाचे निर्दळण ॥ होय वाढतां चित्तीं सत्वगुण ॥
नातरी हे दोन्ही करिती बंधन ॥ अत्यंत जीवा ॥ ४५ ॥
चित्ताचे ठायीं गुणाची वस्ती ॥ तेणें काळानुरूप विकार होती ॥
एक येतां दोन जाती ॥ कर्मानुसार ॥ ४६ ॥
जेवीं सराटा भूमी पडतां ॥ दोन खाली एक कांटा वरुता ॥
तेवीं एक गुण आधिक होतां ॥ आच्छादती दोन ॥ ४७ ॥
असो अंतरीं जो जो गुण उठे ॥ तैशी तैशी बाह्यक्रिया उमटे ॥
सत्वगुणें भवबंध तुटे ॥ जडे रजतमें ॥ ४८ ॥
देहमात्र असे जितका ॥ व्यापार त्रिगुणाचा सारिखा ॥
शब्द स्पर्शादि मात्रादिकां ॥ प्रकारही तोच ॥ ४९ ॥
अंतरींचे गुणाची परी ॥ तैसाचि प्रवर्ते बाह्य व्यापारी ॥
गुणाऐशी प्रवृत्ति धरी ॥ घोर मूढ शांत ॥ ३५० ॥
शांतवृत्तीने सुख पावे ॥ घोरवृत्तीने दुःख पावे ॥
मूढवृत्तीने निर्फळ जावें ॥ आयुष्य वृथा ॥ ५१ ॥
अंतर्वृत्ति तेचि प्रमाण ॥ प्रमेय ते विषय संपूर्ण ॥
प्रमाता स्वयें जीव आपण ॥ सुखदुःख भोक्ता ॥ ५२ ॥
असो ऐशी गुणाची परी ॥ क्षणक्षणां पालट धरी ॥
आतां कोण भूताचें कोण कार्य निर्धारीं ॥ वोलिजेल संक्षेपें ॥ ५३ ॥


शब्दःश्रोत्रं मुखरता वैचित्र्यं सूक्ष्मता धृतिः ॥
वलं च गगनाद्वायोःस्पर्शश्च स्पर्शनेन्द्रियम् ॥ २४ ॥


शब्द श्रोत्र विचित्रता ॥ धैर्य बल दचक भीति आदि सूक्ष्मता ॥
हे आकाशकार्य तत्वतां ॥ वृत्ति स्फूर्तिरूप ॥ ५४ ॥
कांहीं बोलावें हे वाटे ॥ तरी आधी अंतरीं स्फूर्ति हे उठे ॥
तेचि परापुढे शब्द पालटे ॥ वैखरीस येतां ॥ ५५ ॥
त्या शब्दाचा जो गजरं ॥ ऐकावया श्रवण द्वार ॥
परी अंतःकरणी तो निर्धार ॥ जाऊन आदळे ॥ ५६ ॥
पोकळीतूनाच शब्द उठिला ॥तो पोकळ अंतरी जाऊन मिळाला ॥
एवं शब्द श्रोत्र उभय व्यापाराला ॥ आकाश कारण ॥ ५७ ॥
जे जे अंतरीं उठे वत्ति ॥ धृति दचक अथवा भीति ॥
सूक्ष्मरूपें लखलख स्थिति ॥ स्मरतां पाहतां उठे ॥ ५८ ॥
एकाएकी चंद्रप्रभा पाहतां ॥ आगचि लागली भावी चित्ता ॥
हेचि जाणावी विचित्रता ॥ परी आकाशकार्य ॥ ५९ ॥
मुख्य अज्ञानशून्यत्त्वाचे योगें ॥ भीति धृति हे होऊ लागे ॥
आतां वायूचे कार्य बोलिजे वेगें ॥ स्पर्श आणि त्वचा ॥ ३६० ॥
त्वचेशी शीतोष्ण स्पर्शतां ॥ स्पर्श कळे वायूकरितां ॥
मुख्यत्वे त्वचेची वायु देवता ॥ आणि स्पर्शविषय वायूचा ॥ ६१ ॥


उत्क्षेपणमपक्षेपाकुंचने गमनं तथा ॥
प्रसारणमितीमानि पंच कर्माणि रूक्षता ॥ २५ ॥


उठणे आणि बसणें ॥ आखडून घेणे आणि चालणें ॥
पसरणे ही पांच कार्ये होणें ॥ वायुच्यायोगें ॥ ६२ ॥
सूक्ष्मरूपें जें जें चलन ॥ स्फूर्ति सहित अंतरीं स्फुरण ॥
तैसे तैसे व्यापार होणें ॥ सर्व देहाचे ॥ ६३ ॥प्राणापानौ तथा व्यानसमानोदान संज्ञकान् ॥
नागः कूर्मश्च कृकलो देवदत्तो धनंजय॥ २६ ॥


प्राण अपान व्यान समान ॥ उदानाादि हे मुख्य पंचप्राण ॥
तेवीं नाग कूर्म कृकल उपप्राण ॥ देवदत्त धनंजय ॥ ६४ ॥


दशेति वायुविकृतीस्तथा गृह्णाति लाघवम् ॥
तेषां मुख्यतरः प्राणो नाभेः कंठादवस्थितः ॥ २७ ॥


एवं हे वायूचे दहा व्यापार ॥ ते नाम पावले दशधा प्रकार ॥
वायूचें योगें सान की थोर ॥ व्यापार चालती ॥ ६५ ॥
इतुक्यांचे व्यापार वेगळाले ॥ बहु प्रकारे बहू बोलिलें ॥
तयाची स्थाने व्यापारही नेमिले ॥ असती ते ऐकें ॥ ६६ ॥
हृदयीं प्राण हा रहातसे ॥ नासिक द्वारे जात येत असे ॥
तेणें देह सुखरूप होतसे ॥ सहजगती ॥ ६७ ॥
अपान हा गुदी राहून ॥ विसर्ग करीतसे अनुदिन ॥
नाभीसी राहन समान ॥ संधि हालवी ॥ ६८ ॥
व्यान सर्वांगी खेळत ॥ सर्व शरीरी अन्नरस पाववीत ॥
उदान कंठी राहून क्षुत्पान करीत ॥ ऐसे हे नेम केले ॥ ६९ ॥
परी याहीहून न्यूनाधिक ॥ येथे बोलिला एकेकाचा एकेक ॥
कारण की अवघा वायु असे एक ॥ तरी विरोध नाहीं ॥ ३७० ॥
मृगजळाचा जैसा तळ ॥ कल्पिजे इतुका खोल उथळ ॥
तैसें हे कल्पित जग सकळ ॥ तरी पाहिजे तें बोलावें ॥ ७१ ॥
असो कोण कोठें राहातसे ॥ कोणता व्यापार कोण करीतसे ॥
हे सर्व बोलिजेल अपैसें ॥ आपुले विवक्षेनें ॥ ७२ ॥
दहा वायू जे बोलिले ॥ त्यांत मुख्यत्व प्राणाचें पाहिजे कळलें ॥
व्यापार तरी असती निरूपिले ॥ आतां राहे कोठें तें एकें ॥ ७३ ॥
नाभि कंठ आदिकरूनी ॥ राहतसे हृदयभुवनीं ॥
कांहीं व्यापार राहिले ते अल्पवचनीं ॥ बोलिजेताती ॥ ७४ ॥चरत्यसौ नासिकयोर्नाभौ हृदयपंकजे ॥
शब्दोच्चारणनिश्वासोच्छ्वासादेरपि कारणम् ॥ २८ ॥


नाभीपासून नासिकीं ॥ संचरे हृदयपद्म गोलकीं ॥
शदोच्चारणादि वर्तणुकी ॥ आणि श्वासासी कारण ॥ ७५ ॥अपानस्तु गुदे मेढ़े कटिजंघोदरेष्वपि ॥
नाभिकंठे वंक्षणयोरूरुजानुषु तिष्ठति ॥ २९ ॥


गुदीं उपस्थीं नाभिदेशी ॥ अपानाचे राहणें उदरासी ॥
कटि जंघा गुडघे वृषणेशीं ॥ येथेही राहे ॥ ७६ ॥


तस्य मूत्रपुरीषादिविसर्गः कर्म कीर्तितम् ॥
व्यानोक्षिश्रोत्रगुल्फेषु जिव्हाघ्राणेषु तिष्ठति ॥ ३० ॥


मूत्र मल विसर्ग करणे ॥ तया अपानाचे हे कर्म होणें ॥
श्रोत्री डोळियांत राहिजे व्याने ॥ तेवीं जिव्हा घ्राण गुल्फादि सर्वांगीं ॥ ७७ ॥


प्राणायामधृतित्यागग्रहणा द्यस्य कर्म च ॥
समानो व्याप्य निखिलं शरीर वन्हिना सह ॥ ३१ ॥


प्राणायाम धैर्य त्याग ॥ ग्रहण हे व्यानाचे कर्म उमग ॥
सर्वांगीं जो वायूचा वेग ॥ तो यामें स्थिर होय ॥ ७८ ॥
म्हणून प्राणायाम जें कर्म ॥ व्यानाचें बोलिलें कळावें वर्म ॥
ग्रहण त्याग पूरक रेचक नाम ॥ हे यामांगचि असे ॥ ७९ ॥
नाभिस्थानी समान असून ॥ अखिल शरीरी राहे व्यापून ॥
वन्हीच्या सहतंत्रे संधींत भरून ॥ राहिला असे ॥ ३८० ॥
आतां व्यानाचे कर्म जे असे ॥ तेंचि समानाचें बोलिलेंसे ॥
कारण की वायु मुख्य एकाच वसे ॥ तरी नसे विरोध ॥ ८१ ॥


द्विसप्ततिसहस्रेषु नाडीरंध्रेषु संचरन् ॥
भुक्तपीतरसान्सम्यगानयन्देहपुष्टिकृत ॥ ३२ ॥


बहात्तर सहस्र देही नाडी ॥ त्यांत समान संचरे प्रौढी ॥
अशंन पानाचे रस सर्वांगी ओढी ॥ देहपुष्टि व्हावया ॥ ८२ ॥


उदानः पादयोरास्ते हस्तयोरंगसंधिषु ॥
कर्मास्य देहोन्नयनोत्क्रमणादि प्रकीर्तितम् ॥ ३३ ॥


हस्त पादादि संधी आंत ॥ अथवा सर्व संधींत उदान रहात ॥
त्याचे कर्म देहासि उठवीत ॥ आकर्षनि वरुते ॥ ८३ ॥


त्वगादिधातूनाश्रित्य पंच नागादयः स्थिताः ॥
उद्गारादि निमेषादि क्षुत्पिपासादिकं क्रमात् ॥ ३४ ॥


त्वगादि धातूचा आश्रय करून ॥ राहती नागादि पंच उपप्राण ॥
उद्गार क्षुत्पिपासादि उद्धाटन ॥ हे कर्म अनुक्रमें ॥ ८४ ॥


तंद्राप्रभति शोकादि तेषां कर्म प्रकीर्तितम ॥


तंद्रा म्हणजे झोप घेणें ॥ प्रकृतीचे अष्टधा विकार होणें ॥
शोकादि कर्म जें उद्भवणें ॥ तें तें बोलिजे उपप्राणाचे ॥ ८५ ॥
एवं पूर्वी आकाशाचे धर्म ॥ त्यावरी वायूचे निरूपिलें कर्म ॥
आतां अग्नीचं कोण कार्य वर्म ॥ कळावया बोलूं ॥ ८६ ॥


अग्नेस्तु रोचकं रूपं दीप्तं पाकं प्रकाशताम् ॥ ३५ ॥


अग्नीचे रूप रोचक ॥ दीप्त पाक प्रकाशक ॥
वेगळाले याचे रूपक ॥ बोलूनि दाऊं ॥ ८७ ॥
घटादिकांचे साजिरपेण ॥ दिसणे तया रोचक अभिधान ॥
जें नेत्रासी विषयाचे दर्शन ॥ तें तें रूप म्हणावें ॥ ८८ ॥
दीप्त म्हणजे देखणीशक्ति ॥ नेत्रांस उठे ते तेजाची अभिव्यक्ति ॥
प्रकाशक म्हणजे अंतःकरणस्फूर्ति ॥ पाक म्हणजे पचन ॥ ८९ ॥


अमर्षतीक्ष्णसूक्ष्माणामोजस्तेजश्च शूरताम् ॥
मेधावितां तथाऽदत्ते जलात्तु रसनं रसम् ॥ ३६ ॥


कोप तीव्रता आणि सूक्ष्मता ॥ हे तेजाचे रूप तत्वतां ॥
ओज म्हणजे शरीर पाटव्यता ॥ अथवा देह स्थिति ॥ ३९० ॥
तेज म्हणजे संताप ॥ शरता पराक्रमत्वरूप ॥
त्याचि परी बुद्धिमत्ता थोर अल्प ॥ मेधा नामें ॥ ९१ ॥
असो तेजाचे रूप झालियावरी ॥ आपाचें कैसें तें अवधारी ॥
मुख्य रस आणि दुसरी ॥ जिव्हा ही इंद्रियरूप ॥ ९२ ॥


शैत्यं स्नेहं द्रवं स्वेदं गात्रादिमृदुतामपि ॥
भूमेघ्राणेन्द्रियं गंधं स्थैर्य धैर्य च गौरवम् ॥ ३७ ॥


शैत्य स्नेह आणि द्रवत्व ॥ स्वेद मूत्रादि मृदुत्व ॥
हें आपाचें कार्य परत्व ॥ शरीरी असे ॥ ९३ ॥
भूमीपासून गंध घ्राण ॥ स्थिरता धैर्य हे अंश कठीण ॥
जडता ही पृथिवीचे रूप जाण ॥ आणि आस्थ मांसादिक ॥ ९४ ॥
एवं पांचही भूतांचा प्रकार ॥ शरीरी सांगितला विकार ॥
मागें बोलिला पंचीकरण निर्धार ॥ तस्मात् हे पांचभौतिक ॥ ९५ ॥
पंचभूतोंचे मुळी भ्रमरूप ॥ तेथें देहाकारासी कायसें रूप ॥
रज्जूवरी दिसतांही सर्प ॥ झालाचि नाहीं ॥ ९६ ॥
हें सत्यचि जरी असतें ॥ तरी सर्वांचे बोलणे एकचि पडतें ॥
नेमचि नाही म्हणून जयातें ॥ भिन्न भिन्न बोलणें ॥ ९७ ॥
पहा पहा व्यासादि ऋषींचे मत ॥ एका एकाशी न मिळे निश्चित ॥
क्वचित् एकटा व्यासचि अनान बोलत ॥ तस्मात् हे मृगजळाच ॥ ९८ ॥
मुख्य भूचि ही असती मृगजळें ॥ तरी तत्कार्य देह त्यांतील मासोळें ॥
कारणाच आटतां कार्य सगळे ॥ सत्य कैसेनि ॥ ९९ ॥
केवळ व्यासचि अनेकधा बोलिला ॥ ऐसें नव्हे पहा श्रुत्यर्थाला ॥
एका उपानिषदीं जो अर्थ स्थापिला ॥ दुजियाच्या मतें तो भिन्न ॥ ४०० ॥
बहुधा पांचचि भूतें स्थापिलीं ॥ भौतिकेंही पंचीकृत बोलिली ॥
कश्चितपक्षी असती निरूपिलीं ॥ तीनचि भूतें ॥ १ ॥
तिहीं भूतांचें हे सारे जग ॥ त्रिकरणे उमटलें नामरूप सांग ॥
आकाश वायूचें नामाचा प्रसंग ॥ भूतपणांत नुरे ॥ २ ॥
पृथिवी तोच बोलिली अन्न ॥ आप आग्नि ही भूते दोन ॥
एवं तीनचि भूतें संपूर्ण ॥ भौतिक तितुकें तिहींचें ॥ ३ ॥
अन्नाचे रूप कृष्णवर्ण ॥ आप तें जाणावें श्वेतवर्ण ॥
तेज असे रक्तवर्ण ॥ हीच तिन्ही कार्यामाजीं ॥ ४ ॥
एका चंद्राच्या ठायीं पाहतां ॥ कृष्ण श्वेत आणि रक्तता ॥
हे तिन्ही कारणाचे वर्ण तत्त्वतां ॥ या वीण चंद्र कोठे ॥ ५ ॥
कृष्ण तितुकें अन्नाचें ॥ श्वेत तितुकें आपाचें ॥
रक्त तितुकें तेजाचें ॥ तरी चंद्र नाम वाचारम्भण ॥ ६ ॥
ऐसेचि पदार्थमात्र समस्त ॥ वाचरम्भण श्रुति बोलत ॥
तीनचि भूते सत्य सर्वांत ॥ अन्वयरूपें ॥ ७ ॥
तीनचि कारणे समजावीं ॥ यास्तव हीच सत्य म्हणावीं ॥
परी पुढे विवेके मिथ्या व्हावी ॥ ही तिन्ही भूतें ॥ ८ ॥
असो तया तिन्ही भूतांचे ॥ पिण्डी अंश कोणकोणाचे ॥
तें अल्पसें बोलिजे वाचें ॥ श्रुति आभिप्रायें ॥ ९ ॥
हे सौम्य अन्नमय मन ॥ आपोमय असे प्राण ॥
तेजोमय वाचा हे वचन ॥ छांदोग्य श्रुतीचें ॥ ४१० ॥
ऐसें हे श्रुत्युक्त त्रिकरण ॥ गी कैसे होत निर्माण ॥
तेंचि ऐकावें सावधान ॥ राम उद्देशे सवीं ॥ ११ ॥


त्वगसृङमांसमेदोस्थिमज्जाशुक्राणि धातवः ॥
अन्नं पुंसाशितं त्रेधा जायते जठरामिग्निना ॥ ३८ ॥


त्वचा मांस मेद आस्थि ॥ मज्जादि शुक्रधातु होती ॥
परी त्यांची अन्नरसें होय उत्पत्ति ॥ जठराग्नीने पुरुषाचे ॥ १२ ॥
पुरुष एक उपलक्षण ॥ परी मातेचाही अन्नरस कारण ॥
या उभयें होतसें त्रिकरण ॥ कार्य तिहीं भूतांचें ॥ १३ ॥
प्रथम पुरुष अन्न आप सेवितां ॥ जठराग्नीने पावे वीर्यता ॥
तस्मात् कारणे तिन्ही असती रेता ॥ ते पुढे मातेचें उदरीं संचरे ॥ १४ ॥
तिचेही अन्न आप जठराग्न ॥ रक्तासी तिन्ही असती कारण ॥
एवं रक्त रेत मिळता दोन ॥ गर्भ वाढू लागे ॥ १५ ॥
पुढेही प्रतिदिनी माता ॥ अन्नपान करी तत्त्वतां ॥
तिसरा जठराग्नि तया मिळतां ॥ गर्भ वाढू लागे ॥ १६ ॥
आतां अन्नरसे काय होतें ॥ आपरसे कोणतें जन्मतें ॥
तेजापासून काय निजपते ॥ हे वेगळाले बोलूं ॥ १७ ॥
प्रथम अन्नचि त्रिधा होय ॥ अ्शन करितां गर्भिणी माय ॥
तेंचि कैसे कैसें यथान्वयें ॥ बोलिजेल संकेते ॥ १८ ॥


मलः स्थविष्ठो भागः स्यान्मध्यमो मांसतां व्रजेत ॥
मनः कनिष्ठो भागः स्यात्तस्मादन्नमयं मनः ॥ ३९ ॥


अन्न भक्षीतसे माता ॥ त्याचा पाक होय जठरामी करितां ॥
तेंचि अन्न पावे त्रिविधता ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ रूपें ॥ १९ ॥
कनिष्ठ तोचि स्थूळस्थ विष्ठभाग ॥ तेचि विष्टा होतसे बहिर्विसर्ग ॥
अन्नाचा जो का मध्यमभाग ॥ तें मांस होय गर्भाचें ॥ ४२० ॥
आतां उत्तमभाग तो अति सूक्ष्म ॥ तयाचें मन हे ठेविलें नाम ॥
श्रुतीने अन्नमय मन हा केला नेम ॥ तस्मात् मन अन्नापासूनि ॥ २१ ॥
जैसा यंत्रामाजीं ऊद टाकितां ॥ त्रिधा होय उष्णत्व मीनतां ॥
करपे अर्क आणि फूल तत्त्वतां ॥ अनुक्रमेशीं ॥ २२ ॥
करप जैशी खाली उरली ॥ तैशी विष्ठा अपानें विसर्जिली ॥
अर्कापरी मांसता निपजली ॥ फूल तैसें मन ॥ २३ ॥
एवं अन्नमय हे मन ऐसें ॥ आतां आपोमय प्राण ते कैसे ॥
बोलिजेताती ते विश्वासें ॥ श्रोती श्रवण कीजे ॥ २४ ॥


अपां स्थविष्ठो मूत्रं स्यान्मध्यमो रुधिरं भवेत् ॥
प्राणः कनिष्ठो भागः स्यात्तस्मात्प्राणो जलात्मकः ॥ ४० ॥


आपाचें घडतां प्राशन ॥ त्याचेही भाग होती तीन ॥
स्थविष्ठ भागाचें मूत्रविसर्जन ॥ बहिर्देशी होय ॥ २५ ॥
मध्यम भागाचें रक्त झालें ॥ तेंचि असे गर्भासी मीनले ॥
कनिष्ठ सूक्ष्म भागाचें निफजलें ॥ प्राणपंचक ॥ २६ ॥
तेंही मतिच्या वंकना ॥ वायु प्रवेशतां गर्भखोळें ॥
तेणें गर्भ तो चळू लागे चळे ॥ तस्मात् आपोमय प्राण ॥ २७ ॥
जेवीं एका करडीपासून ॥ तेल कुसुंब केशर होती तीन ॥
तेवीं प्राणादि तिन्ही होती निर्माण ॥ आपां पासावें ॥ २८ ॥
तेल तैसें झालें मूत्र ॥ कुसुंबापरी झालें रुधिर ॥
प्राण झालें जेवीं केशर ॥ एवं आपोमय प्राण ॥ २९ ॥
असो अन्नपाचें कार्य सांगितलें ॥ तेजकार्य मात्र असे उरलें ॥
तेंही पाहिजे निरूपिलें ॥ त्रिविध कैसें ॥ ४३० ॥


तेजसोऽस्थि स्थविष्ठः स्यान्मज्जा मध्यमसंभवः ॥
कनिष्ठा वाङ्मता तस्मात्तेजोऽबलात्मकं जगत् ॥ ४१ ॥


जठराग्नि जेव्हां तापत ॥ तेव्हां गर्भ तो उकडत ॥
तयाचे तीन प्रकार उमटत ॥ स्थूल मध्यम सूक्ष्म ॥ ३१ ॥
स्थूल भागाच्या अस्थि होती ॥ मध्यमभागे मज्जेची उत्पत्ति ॥
सूक्ष्मभागें वाणी निश्चिती ॥ तस्मात् तेजोमयी वाके ॥ ॥ ३२ ॥
जेवीं मेघापासून लेंडे पडती ॥ तेवीं तेजापासन हाडें होती ॥
जेवीं मेघाचे मांस डेरियांत धरिती ॥ तेवीं मज्जा तेजाची ॥ ३३ ॥
मेघापासून पर्जन्य पडे ॥ तेवीं तेजी वाणी होय कोडें ॥
वैखरी वर्णाक्षरी बडबडे ॥ तेव्हां तेजोमयी वाणी ॥ ३४ ॥
एवं अन्नाचे मन आपाचा प्राण ॥ तेजाची वाणी होय उत्पन्न ॥
येणे परी तीनचि भूते तयापासून ॥ त्रिकरण झालें ॥ ३५ ॥
परी एकेकांत तिन्हीं असती ॥ अन्नमय तेथें आप तेजा वस्ती ॥
आपोमर्याही उमटती ॥ तेज आणि अन्न ॥ ३६ ॥
तेजोमयी वाणी बोलिली ॥ परी तेथे अन्न आपें वस्ती केली ॥
एवं हे त्रिकरण उभवणी झाली ॥ पंचीकृता ऐशी ॥ ३७ ॥
मन एक बोलिले उपलक्षण ॥ परी झालें चतुष्टय अंतःकरण ॥
तैसेंचि प्राणही चंचलत्वे निर्माण ॥ झाले पंचधा दशधा ॥ ३८ ॥
वाणी एकचि बोलिली असे ॥ परी सर्व इंद्रियां उत्पत्ति होतसे ॥
तस्मात् स्थूल सूक्ष्म देहद्वय उमंसे ॥ तिहीं भूतांपासूनि ॥ ३९ ॥
परी मन प्राण आणि वाणी ॥ या माजी भूतत्रय कारणपणीं ॥
तें काढितां साधक विचारूनि ॥ मग मनादिकां रूप नाहीं ॥ ४४० ॥
श्वेतवर्ण सत्त्वगुण ॥ रक्तवर्ण रजोगुण ॥
कृष्णवर्ण तमोगुण ॥ ही तीन कार्ये तिहींचीं ॥ ४१ ॥
कृष्ण तितुकें अन्नाचें ॥ श्वेत तितुकें आपाचें ॥
रक्त अवघे तेजाचें ॥ भौतिकामाजीं ॥ ४२ ॥
हे तिन्ही गुण तिहींचे काढिलें ॥ मग मनादिकांत काय उरलें ॥
नाम रूप जें होतें भाविलें ॥ तें वाचारम्भण ॥ ४३ ॥
येणें रीती साधकें ऐसा ॥ विचार करावा मनसा ॥
मग देहबुद्धि सांडून सहसा ॥ मी कोण हे विचारावें ॥ ४४ ॥
आधी मी कोण हे विचारावें ॥ मग नामरूप सांडावें ॥
अथवा नामरूप प्रथम त्यागावें ॥ मग पहावें आपणां ॥ ४५ ॥
आणिकही यया देहाची ॥ अमंगळतां बोलिजे साची ॥
कांही सामग्री विटाळाची ॥ येथे कैंची शुद्धता ॥ ४६ ॥
पहा पहा हाडे मांस कातडें ॥ ठायी ठायीं शिरांचे वेढे ॥
माजी धुतांही दुर्गंधी पडे ॥ मळमूत्रं भरले म्हणूनी ॥ ४७ ॥
हे सर्व भूतांचे कार्य ॥ परी निमित्त याचे रक्त वीर्य ॥
पुनः एकापासून एक होय ॥ तेंही एकमेकां कारण ॥ ४८ ॥


लोहिताज्जायते मांस मेदो मांससमुद्भवम् ॥
मेदसोऽस्थीनि जायन्ते मज्जा चास्थिसमुद्भवा ॥ ४२ ॥
नाड्योपि मांससंघाताच्छुक्रं मज्जासमुद्भवम् ॥


रक्तापासूनि मांस होते ॥ मांसापासूनि मेद उद्भवतें ॥
मेद जें कठिणत्व पावते ॥ तीच हाडें ॥ ४९ ॥
हाडांपासून मज्जा होतसे ॥ नाडीही होत असतीं मांसें ॥
आणि मज्जेपासूनि उमसे रेतही पुनः ॥ ४५० ॥


वात पित्त कफाश्चात्र धातवः परिकीर्तिताः ॥ ४३ ॥


ऐशियाधातूची होय उत्पत्ति ॥ आणि वातपित्त कफही तेथें होती ॥
तस्मात हेही बोलिजेताती ॥ धातुरूपचि ॥ ५१ ॥
आतां जलरसादि पातळ ॥ जितकें देहांत असे सकळ ॥
याचे प्रमाण बोलिजे आळुमाळ ॥ चिळसी यावया ॥ ५२ ॥


दशांजलि जलं ज्ञेयं रसस्यांजलयो नव ॥
रक्तस्याष्टौ पुरीषस्य सप्त स्युः श्लेष्मणश्च षट् ॥ ४४ ॥


दशांजली जळ बोलिजे ॥ नऊ अंजली रस ओळाखजे ॥
रक्त ते आठ विष्ठा सप्तांजली जाणिजे ॥ श्लेष्मा सहा अंजली ॥ ५३ ॥


पित्तस्य पंच चत्वारो मूत्रस्यांजलयस्त्रयः ॥
वसाया मेदसो द्वौ तु मज्जा त्वंज्जलिलसंमिता ॥ ४५ ॥


पांच अंजली पित्त असे ॥ चार अंजली मूत्र दिसे ॥
मांस स्नेहवसा बोलिजेतसे ॥ अंजली तीन ॥ ६४ ॥
अंजली दोन असे मेद ॥ मज्जा एक अंजली प्रसिद्ध ॥
हे एकाहून एक होती सिद्ध ॥ आळोन उणे उणे ॥ ५५ ॥


अर्धांजलि तथा शुक्रं तदेव बलमुच्यते ॥
अस्थ्नां शरीरे संख्या स्यात्षष्टियुक्तं शतत्रयम् ॥ ४६ ॥


सर्वाचे बीजरूप सार ॥ अर्धांजली होतसे शुक्र ॥
तेचि वीर्य बोलती प्रकार ॥ बलही तया ॥ ५६ ॥
एवं संख्या रसादिकांची ॥ बोलिलीसे ऋषींनी साची तैसीच ॥
संख्या ऐकें हाडांची ॥ या विटाळाचे मंदिरीं ॥ ५७ ॥
तीनशेसाठ हाडें शरीरीं ॥ तेही असती पंचप्रकारी ॥
सान थोर आंखुड लांब निर्धारी ॥ आणि खापराऐशी ॥ ५८ ॥


जलजानि कपालानि रुचकास्तरणानिच ॥
नलकानीति तान्याहुः पंचधास्थीनि सूरयः ॥ ४७ ॥


जलज म्हणजे शंखाऐसे ॥ अस्थिदय गालावरी वसे ॥
भोवई श्रवणाच्या मध्ये दिसे ॥ कपाल म्हणजे खापरी ॥ ५९ ॥
रुचक म्हणजे नखें दंत ॥ आस्तरण म्हणजे पातळ समस्त ॥
तेचि गडघे कोंपरी उमटत ॥ चक्राकार ॥ ४६० ॥
नवक म्हणजे सारी इतर ॥ जी जी असती सान थोर ॥
एवं पंचविध प्रकार ॥ विद्धान बोलती ॥ ६१ ॥


द्वे शते त्वस्थिसंघीनां स्यातां तत्र दशोत्तरे ॥
रौखः प्रसराः स्कंदसेचनाः स्युरुलूखलाः ॥ ४८ ॥


हाडांच्या संधी दोन शतक ॥ वरुती दहा असती अधीक ॥
त्याचेही प्रकार अष्टसंख्यांक ॥ वेगळाले ऐका ॥ ६२ ॥
रेखा आणि प्रसरणा ॥ कुलुपाऐशा स्कंदसेचना ॥
उलूखला खोल असती जाणा ॥ उखळा ऐशा ॥ ६३ ॥


समुदद्गा मंडलाः शंखावर्ता वामनकुण्डलाः ॥
इत्यष्टधा समुद्दिष्टाः शरीरेष्वस्थिसंघयः ॥ ४९ ॥


गोल संधि त्या समुद्राऐशा ॥ मंडका त्या बारीक शून्यशा ॥
शंखावर्ता शंखाकार जैशा ॥ आणि वायस चंचूसारिख्या ॥ ६४ ॥
एवं अष्टप्रकारें अस्थिसंधींची नांवें सप्रतीत साचीं ॥
असो प्रमाणे बोलिजेत केशांची ॥ श्मश्रुलोमासह ॥ ६५ ॥


सार्धकोटित्रयं रोम्णां श्मश्रुकेशास्त्रिलक्षकाः ॥
देहस्वरूपमेवं ते प्रोक्तं दशरथात्मज ॥ ५० ॥


साडेतीन कोटी रोम असती ॥ श्मश्रूचे केश तीनलक्ष होती ॥
ऐशी हे शरीराची विकृति ॥ संख्येसहित बोलिली ॥ ६६ ॥
अगा हे बापा दशरथात्मजा ॥ शरीराचे स्वरूप ऐसें ओजा ॥
सांगितले तुज लोक काजा ॥ देहबुद्धि गळावया ॥ ६७ ॥
प्रथम देह हा पांचभौतिक ॥ सांगितला निश्चयात्मक ॥
त्यावरी जननी आणि जनक ॥ त्यापासून झाला हेही सांगितलें ॥ ६८ ॥
रक्तापासून काय उत्पत्ति ॥ रेतापासून कोण होती ॥
हे सांगूनि सांगितले पुढतीं ॥ भूतकार्य कोणतें ॥ ६९ ॥
कोणत्या भूताचें कोण कार्य ॥ कर्मापासून झाले काय ॥
आत्मस्वभावाचें जें जें होय ॥ तें तें स्पष्ट सांगितलें ॥ ४७० ॥
तयापुढे भूत त्रिकरण ॥ त्याचे कार्य कैसें झालें उत्पन्न ॥
तया पुढे अस्थादिकांचे प्रमाण ॥ कळावया बोलिलें ॥ ७१ ॥
तुवां पुसिला जगदोद्धार ॥ कैसा होय सुटिकेचा विचार ॥
तरी देहबुद्धि सांडावी हे शरीर ॥ असार जाणोनि ॥ ७२ ॥


यस्मादसारोनास्त्येव पदार्थो भुवनत्रये ॥
देहेऽस्मिन्नभिमानेनन महोपायबुद्धयः ॥ ५१ ॥


या शरीराऐशिया असारा ॥ जाणें त्रैलोक्यी पदार्थ न दुसरा ॥
म्हणोन देहाभिमाने उपाय त्वरा ॥ मुमूक्षेसी नव्हे ॥ ७३ ॥
अनित्य आणि रोगग्रस्त ॥ योनि होत असती अनंत ॥
म्हणून याचा मुमुक्षूने त्वरित ॥ विचार पहावा ॥ ७४ ॥
मायेपासून तृणापर्यंत ॥ असार अवघघेचि वस्तुजात ॥
परी देहाऐसें अमंगळ न होत ॥ भुवनत्रयीं ॥ ७५ ॥
माया अविद्यादि गुण ॥ हे तरी नव्हति दृश्यमान ॥
अविवेके जीवा करिती बंधन ॥ परी ऐसें अशुद्ध नव्हत ॥ ७६ ॥
आकाश वायु तेज आप ॥ पांचवें पृथ्वीचे स्वरूप ॥
परी नव्हेति अशुद्ध रूप ॥ देहाऐसीं ॥ ७७ ॥
वृक्ष तृण लता पाषाण ॥ जड परी नव्हेत हीन ॥
भूमीवरील पदार्थ निर्माण ॥ उत्तमाधम जरी ॥ ७८ ॥
तरी जैशी शरीराची सुटे घाणी ॥ बाह्यांतरी विष्ठेची वरढाणी ॥
जीव गेलिया जे कुश्चळता नयनीं ॥ न देखवे ती ॥ ७९ ॥
असो चारी खाणी आंत ॥ शुद्ध तरी असती पशुजात ॥
परी मानवियामाजी किंचित् ॥ शुद्धता असेना ॥ ४८० ॥
कितेक पशुंचें चर्मशेण ॥ केश नखें मूत्रादिकरून ॥
उपेगा येत जनालागन ॥ कर्म प्रकरणी ॥ ८१ ॥
परी या मानवी देहाचें ॥ कांहीं उपेगा न ये साचें ॥
नखही पडतां नव्हे कामाचें ॥ मा अस्थादि तो अपवित्र ॥ ८२ ॥
काउळ्याची जरी विष्ठा झाली ॥ परी चिळस कवणा नाही आली ॥
जैशी चिळसी मनें घेतली ॥ पुरुषाच्या विष्ठेची ॥ ८३ ॥
ऐसें हे मानवी शरीर ॥ पोटी भरलें मळमूत्र ॥
या ऐसा कोणता असार ॥ पदार्थ जगीं ॥ ८४ ॥
ऐशीया देहास मी मी म्हणती ॥ आणि सुटिकेचा यत्न करूं जाती ॥
परी ते न सुटती कल्पांती ॥ लय झालियाही ॥ ८५ ॥
नाना कर्म नाना धर्म ॥ नाना अनुष्ठान नाना नेम ॥
नाना यज्ञ वर्णाश्रम ॥ देहबुद्धि योगें ॥ ८६ ॥
देहबुद्धि असतां बळकट ॥ जितुकी साधनें तितुके कष्ट ॥
मोक्षप्राप्तीची न मिळे वाट ॥ मुमुक्षूस कदां ॥ ८७ ॥
एक वेळ जरी मी देह ऐसा ॥ किंचित् संकल्प उठतां मानसा ॥
तरी कोटि ब्रह्महत्त्येचा वळसा ॥ जीवापाठी लागे ॥ ८८ ॥
मा ते देहबुद्धि जननापासून ॥ दिननिशी दृढ झाली आमरण ॥
ऐसे अनंत कल्प गेले गणणं ॥ केवीं होय हत्त्येचें ॥ ८९ ॥
हे केवढें पाप सांचलें ॥ माजी पुण्य काहींसें वाटलें ॥
तेंही पापचि ऐसें बोलिलें ॥ ज्ञातयांनीं ॥ ४९० ॥
तस्मात् देहबुद्धि जरी हे झडे ॥ स्वानुभवें आत्मरूप निवडे ॥
तयासीच एक मोक्ष जोडे ॥ येर्‍हवी बंध दृढ ॥ ९१ ॥
मिथ्या परी बंधन तुटेना ॥ कारण की अभिमान नव्हे उणा ॥
सर्प मिथ्या परी पावतसे मरणा ॥ झेंडू फुटोनि ॥ ९२ ॥
तेथें दिवाच निश्चयें लावूनी ॥ रज्जू ओळखावा मनीं ॥
तेवीं आत्मरूप जाणोनि ज्ञानी ॥ देहबुद्धि सांडिती ॥ ९३ ॥
परी अनंत जन्मींचें सुकृत जया ॥ तयासीच ज्ञान होय उपाया ॥
ये-हवीं हा अभिमान पापिया ॥ कदां न सोडी ॥ ९४ ॥
तस्मात् विवेक वैराग्य द्वारा ॥ अनित्याचा त्याग करावा खरा ॥
तरीच चुकेल हा जन्मफेरा ॥ नातरी जन्मे मरे ॥ ९५ ॥


अहंकारेण पापेन क्रियन्ते हंत सांप्रतम् ॥
तस्मादेतत्स्वरूपं तु विबोध्दव्यं मुमुक्षुभिः ॥ ५२ ॥


पहा पहा हा पापी अहंकार ॥ येणे मोहिले प्राणिमात्र ॥
सध्या प्रतीती बांधिले नर ॥ हा खेद अति वाटे ॥ ९६ ॥
तस्मात् मुमुक्षूने एक करावें ॥ देहस्वरूप यथार्थ ओळखावें ॥
अहंकार त्यागून अभिन्न व्हावें ॥ ब्रह्मात्मैक्यरसीं ॥ ९७ ॥
सर्व जीवासी अज्ञानवशे ॥ अहंकारें पीडिलें असे ॥
क्षण एक विसांवा नेदी मानसें ॥ अनंत कल्प जातां ॥ ९८ ॥
जागृतीचे पंचव्यापार ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ प्रकार ॥
परी दृढ बैसला अहंकार ॥ अढळ जैशी चंडाशळा ॥ ९९ ॥
जेवीं जागृतींत विश्वाभिमानीं ॥ बैसला असे अनुदिनीं ॥
येणेंचि रीती तैजस स्वप्नीं ॥ असे सदृढ ॥ ५०० ॥
स्वामींच्या भासा आठवून मनें ॥ सुखदुःख पावे तैजस आपण ॥
चांगुले की वाईट असो स्वप्न ॥ परी मीपण उणे नव्हे ॥ १ ॥
सुषुप्तीमाजीं मनही नसतां ॥ किंचित उणी नव्हे देहअहंता ॥
अहंकार उरे मी म्हणे नेणता ॥ तो प्राज्ञ अभिमानी ॥ २ ॥
बहुत कासया बोलणें ॥ जरी देहासि आले मरण ॥
तरी न सोडी हा अभिमान ॥ पुनः जन्म दावी ॥ ३ ॥
मग एका देही व्यापार तीन ॥ किं बाल वृद्ध अवस्था तरुण ॥
पालटत काळेंकडून ॥ परी मीपणा पालटेना ॥ ४ ॥
ऐसें जन्म किती गेले ॥ परी मपिचि असती गोंविले ॥
महाप्रळय जरी अनंत झाले ॥ तरी अभिमान तैसाची ॥ ५ ॥
प्रळयीं कैसा अभिमान उरे ॥ ऐसें मानील कोणी अंतरें ॥
तरी लीन होऊन अज्ञान विरे ॥ निज स्वरूपीं ॥ ६ ॥
जेवीं सुप्तीमाजी वृत्ति निमे ॥ परी नेणिवाभिमान उरे संभ्रमें ॥
उत्थानी उत्पत्ति होतसें नेमें ॥ म्हणोन आहेसा अनुमान ॥ ७ ॥
तैसेंचि जन्म पुढे होतां ॥ अनुमान कीजे की निमे अहंता ॥
सृष्टीची उत्पत्ति होतसे मागुता ॥ तेव्हां अभाव न कल्पावा ॥ ८ ॥
आरंभी अज्ञान जेधवां प्रकटावें ॥ मीपण त्या सवेंचि उद्भवें ॥
तस्मात् ज्ञानेंवीण न सुटावें ॥ कल्पकोटि ॥ ९ ॥
यास्तव मुमुक्षु जे असती ॥ तिहीं जाणून त्रिविधा प्रतीति ॥
अंगें ब्रह्माचि होणें निश्चितीं ॥ तरीच देहबुद्धि हरे ॥ ५१० ॥
परी अहं ब्रह्मास्मि वृत्तीस ज्ञान ॥ न होतां निजांगें नव्हे आपण ॥
तेही देहबुद्धि गेलियावीण ॥ अहमात्मा स्फुरेना ॥ ११ ॥
अहंस्फति जरी न उठे ॥ तरीच देहबुध्दि पालटे ॥
देहबद्धीच जेधवां तुटे ॥ तेव्हांचि भेटे स्वरूप ॥ १२ ॥
ऐसे हे परस्परें सकौतुका ॥ साह्य असती एकमेकां ॥
यास्तव निरूपिजेल साधका ॥ साधनद्वया ॥ १३ ॥
बळेच मी देहस्फुरण त्यागावें ॥ तैसोंच मी ब्रह्म अनुभवावें ॥
सत्यमिथ्या आधी ओळखावें ॥ स्वकीय विचारें ॥ १४ ॥
अनित्य देहादि समस्त ॥ यासी मिथ्यात्वचि व्हावें निश्चित ॥
सत्य ब्रह्मात्मा सदोदित ॥ आपण ऐसे दृढ व्हावें ॥ १५ ॥
मी ब्रह्म हें वृत्ति स्फुरण ॥ विसरूंच नये अनुदिन ॥
ऐशिया अभ्यासें करून ॥ अंगें ब्रह्म होय ॥ १६ ॥
याचे अवधीचा कोण काळ ॥ तेंही बोलून दावीन निवळ ॥
जेवीं देहबुद्धि सदृढ सर्व वेळ ॥ तेवीं ब्रह्मबुद्धि व्हावी ॥ १७ ॥
स्मरतां न स्मरतां देहबुद्धि ॥ दृढ जैशी तिहीं अवस्थेमधी ॥
तेही मी ब्रह्म हें निरवधी ॥ व्हावें अवीट ॥ १८ ॥
जागृतीचिया अभ्यासें ॥ स्वप्नी उठे मी ब्रह्म जैसें ॥
सुषुप्तीमाजीही तैसें ॥ नेणिवपण नसावें ॥ १९ ॥
ऐसें दृढ होय सामान्यज्ञान ॥ तयासीच बोलिजे पूर्ण विज्ञान ॥
अंगेंचि झाला ब्रह्म अभिन्न ॥ वृत्तिरहित ॥ ५२० ॥
ऐसा निश्चय सदृढ झाला ॥ संशय ब्रह्माण्डा बाहेर गेला ॥
मग देह निमे की क्षय जगाला ॥ होतां अन्यथा नव्हे ॥ २१ ॥
तयासी बंधना मोक्ष नसे ॥ तो नव्हे ब्रह्मविद् ब्रह्मचि असे ॥
ये रीतीं श्रुति गर्जून सायासें ॥ आदरें बोले ॥ २२ ॥
तस्मात् रामराया मुमुक्षूनें ॥ आपुलें ब्रह्मत्व दृढ करणे ॥
येर देहबुद्धीची लक्षणे ॥ त्यागणे सर्व ॥ २३ ॥
अनेक निरूपण झालें जरी ॥ तरी इतुकाची सार अर्थ निर्धारी ॥
म्हणन जो देहबुद्धि त्यागन ब्रह्मता वरी ॥ तो सुटेले हे भाक घेई ॥ ५२४ ॥


इति श्रीपद्मपुराणे शिवगीतासूपनिषत्सू ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
शिवराघव संवादे देहस्वरूपनिर्णयोनाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥


इति श्रीमद वेदेश्वरी ॥ शिवगीता पद्मपुराणांतरीं ॥
देहबुद्धिनिरसन प्रकारी ॥ नवमोध्यायः ॥ ९ ॥

श्रीसद्गुरुसच्चिदानंदार्पणमस्तु ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥

॥ श्रीमद्वेदेश्वरी नवमोऽध्यायः समाप्तः ॥