श्रीमत् शंकराचार्य







अद्वैतानुभुति

दशश्लोकी

योगतारावली

सौंदर्यलहरी

वाक्यसुधा

विवेकचूडामणि



श्रीमत् शंकराचार्य - परिचय


वक्तारसामाद्य यमेव नित्या सरस्वती स्वार्थसमन्विताभूत् ।
निरस्तदुस्तर्ककलंकपङ्‍का नमामि नं शंकरमर्चिताघिम्र ॥
यदीयवाग्वैभवमादरेण शिरःसु सन्तः सततं वहन्ति ।
वन्दे तमज्ञानहरं प्रबोधसुधाकरं शंकरदेशिकन्द्रम् ॥

आपल्या भारतामध्ये अनेकवार धर्मसंस्कृति इत्यादिकांच्या घडामोडीमुळे धर्माला आलेली ग्लानी व अधर्माचा होणारा विकास यामुळे जनतेची अतिशय दुरवस्था होते, अशावेळी हे संकट दूर करून जनतेला स्थिरस्थावर कण्यासाठी अवतार होत असतात, झाले आहेत व होत रहाणार आहेत या बद्दलची भगवदुक्ति प्रसिद्ध आहे; 'यदा यदा हि धर्मस्य..' इ.

श्रीमत् आद्य आचार्यांच्या अवतारापूर्वीसुध्दा आपल्या भारतामध्ये बौद्ध, चार्वाक, कापालिक भैरव, शास्त्र व गाणपत्यादि पंथामध्ये धर्माच्या नावाखाली गोंधळ चालू होता. एकमेकांची मते एकमेकांच्या विरूद्ध होती यामुळे काय करावे व काय करू नये हे सामान्य जनतेला कळत नव्हते, त्यामुळे जनता गोंधळून गेली होती. ही आपल्या धर्मप्रिय भारताची परिस्थिती भगवान् शंकरांनी पाहिली आणि आता याचे निर्मूलन कसे करावयाचे याचा विचार करून कुमार कार्तिकस्वामी या आपल्या ज्येष्ठ पुत्रास आज्ञा देऊन भारतात पाठविले. त्यांचा सत्कुलामधे जन्म होवून (कुमारील भट्ट) सर्व विद्यापारंगत होऊन उदयास आले. त्यावेळी हा भारत बौद्धमय बनलेला होता. वेदांबद्दलची, शास्त्रीबद्दलची अनास्था माजली होती. चंद्रगुप्त, अशोकादिकांसारखे राजेसुध्दा बौद्धधर्मानुयायी बनून त्याप्रमाणे वागत होते. दररोज बौद्धधर्माच्या प्रचाराकरिता सभा होत असत. त्यामध्ये वैदिकधर्माची निंदा चालत असे. अशी सभा एक दिवस चालली असतांना कुमारील भट्ट (त्यांना भट्टपाद म्हणत असत) त्या सभेमध्ये आले. त्यांनी सर्व सभा अवलोकन केली. वेद किंवा श्रुति हे नाव जरी ऐकले तरी लोक अपशब्द ऐकल्यासारखे समजून कानांवर हात ठेवीत असत. वेदांच्या निंदेने तोंडसुख घेत असत. असे चालले असताना एका बौद्ध पंडिताने भट्टपादांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या आहेत हे पाहिले आणि हा आपल्यापैकी कुणी नसून वेदाभिमानी असा कुणी आहे असे त्यांना वाटले. राजाला त्यांनी ही हकीकत सांगितली आणि त्या ब्राह्मणाची चौकशी करण्यास सांगितले. भट्टपादांनीसुध्दा आपण वेदाभिमानी आहोत हे कबूल केले. त्यांनी वेदमाहात्म्यही सांगितले, त्यांचे अपोरूषेयत्वही सांगितले तेव्हा सर्व बौध्दपंडित आश्चर्यचकित होऊन राजास म्हणाले; हा कुणीतरी वेदाभिमानी असलेला मनुष्य, याने येथील मागच्या पर्वतावरून उडी घेऊन वेदप्रामाण्य सिद्ध करून दाखविल्यास आम्ही वेद प्रमाण मानू. राजाने ही गोष्ट भट्टपादांना सांगितली. भट्टपादांनी ते मान्य करून तसे करून दाखविण्यास ते तयार झाले. जवळच्या पर्वत शिखरावर जावून प्रतिज्ञा केली की,

यदि वेदाःप्रमाणंस्युः न मे काचित् भवत् क्षतिः

असे म्हणून त्यांनी पर्वताच्या शिखरावरून उडी घेतली. भट्टपादाचा तो देह एखाद्या कापसाच्या गोळ्याप्रमाणे हलका होऊन सावकाश खाली पडला. लोक चकित झाले. भट्टपादांना पायाच्या अंगठ्याला थोडीशी जखम झाली. लोक ते पाहून आश्चर्यचक्ति झाले. त्यावेळी आकाशवाणी झाली की त्यांच्या प्रतिज्ञेमध्ये यदि' हा शब्द संशयात्मिकता दर्शवितो त्यामुळे यांच्या अंगठ्यास थोडी जखम झाली आहे. यांनी वेदाः प्रमाणम् एव' असे म्हटले असते तर यांना काही झाले नसते. सर्वांचे विचार बदलले. पण अभिमान सुटेना ! त्यांनी राजाला सांगितले की हा कुणीतरी जादूगार आहे. त्यामुळे याचा नायनाट करून टाकावा. राजाच्याही मताचे परिवर्तन होत चाललेले होते. शेवटी राजानेच एक युक्ती ठरविली आणि सांगितले की, मी आता एक प्रयोग करणार आहे. त्याचे उत्तर जो कुणी योग्य प्रमाणाने देईल त्याचे म्हणणे मी प्रमाण मानेन. राजाने एका सुवर्णकुंभामध्ये एक साप ठेवला. त्याचे तोंड बंद केले व तो कुंभ सभेमध्ये आणून ठेवला आणि सर्वांना सांगितले की यात काय आहे हे जो कोणी बरोबर सांगेल त्याचे म्हणणे मी प्रमाण मानेन. बौद्ध पंडितांचे गणित चालू झाले आणि त्यांनी सांगितले की यात पिवळसर रंगाचे काहीतरी लांब आहे. भट्टपादांना विचारले असता ते म्हणाले 'महाराज या सुवर्ण कलशामध्ये भगवान शेषशायींची मूर्ति आहे'. राजाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले व कलशाचे तोंड उघडले. आत पहातात तो भगवंतांची शेषशायी मूर्ति ! हे पाहिल्याबरोबर बौद्ध पंडितांची तोंडे काळी ठिक्कर पडली, त्यांचा थरकाप उडाला, आणि ठरल्याप्रमाणे त्या पंडितांना तिबेटच्या बाहेर हाकलून दिले. अशा तऱ्हेने त्या काळामध्ये स्वतःचा प्राण पणाला लावून वेदप्रामाण्य सिद्ध करणारा समाज आणि विद्वान मंडळी होती.

त्याचवेळी आपल्या भारतात अशी घटना घडली की केरळ प्रांतामध्ये कालटी या गावी शिवगुरू आणि आर्यांबा यांच्या पवित्र कुळामध्ये एक मुलगा जन्माला आला. अतिशय सुंदर, देखणा, ज्ञानाचे मुखावर तेज हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. गावातील सुवासिनींनी, ब्राह्मण कुटुंबांनी शिवगुरू व आर्यांबेचे कौतुक केले. बाळ दिवसेंदिवस वाढू लागला. तिसऱ्या वर्षी तो सर्व भाषासंपन्न झाला. त्या मुलाचे पाळाण्यातील नाव शंकर ठेवण्यात आले. भगवान शंकरच साक्षात जन्माला आले होते. भट्टपादाने कर्मकांडाच्या द्वारा, वेदप्रामाण्याच्या द्वारा आचार्यांचा ज्ञानप्रसाराचा मार्ग मोकळा केला होता. म्हणूनच त्यांना प्रत्यक्ष जन्म घ्यावा लागला. वयाच्या ५ व्या वर्षी त्यांची मुंज करण्याचे ठरविले, पण दुर्दैवाने त्यांच्या तिसऱ्या चौथ्यावर्षी त्यांना पितृछत्रास मुकावे लागले. काही काळानंतर आर्यांबांनी मुलाची मुंज करायचे ठरविले. बाळ मोठा मातृभक्त होता. आईला रोज नदीवर स्नानास घेऊन जाई, तिची सेवा अतिशय उत्तम तऱ्हेने तो करी. 'न मातुः परदैवतम्' हे त्यांच्या हृदयावर कोरलेले होते. अशा तऱ्हेने दिवस चालले असतांना बालशंकराची मुंज झाली. आपल्या पुढच्या कार्याची दिशा काय हा विचार त्यांच्या मनात आला. आणि मनाशी काही निश्चय करून आईला नदीवर स्नानासाठी घेऊन आले, आईचे स्नान झाले, तिला कपडे दिले व आईला काठावर बसवून ते आंघोळीला गेले. त्यांनी नदीमध्ये बुडी मारली. त्यावेळी त्यांनी असा देखावा आपल्या आईला दाखविला की एका भयंकर मोठया मगराने आपला पाय तोंडात धरून ते आपणास पाण्यात खेचत आहे. पाण्यातूनच बालशंकर ओरडायला लागले 'माझा पाय मगराने धरला आहे. मी आता बुडून मरणार !' म्हाताऱ्या आईची तारांबळ उडाली. 'आई हा मगर म्हणतो, तू संन्यास घेत असशील तर तुला मी सोडतो, नाहीतर बुडवून टाकतो !' काठावर बसलेल्या आईस काही सुचेना. काय बरे करावे ? संन्यास घेण्यास परवानगी द्यावी तर मुलगा जाणार, नाहीतर मगर गिळून टाकणार, मगराने गिळण्यापेक्षा संन्यास घेऊन जिवंत राहील, पुन्हा भेटेल तरी, असा विचार करून वृद्ध आईने त्याला संन्यास घेण्याची परवानगी दिली. आई थकली होती. दररोज नदीचे स्नान हे तिचे व्रत होते, तिला नदीवर येववत नव्हते म्हणून नदीची प्रार्थना करून बालशंकराने नदीला आपल्या घराजवळून वाहायची विनंती केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पाहतात तो नदीचा प्रवाह घरासमोरून चालला आहे ! लोक आश्चर्यचकित झाले. बाळ शंकराने दुसऱ्या दिवशी प्रस्थान ठेवण्याचे ठरविले. आईचा निरोप घेतला आणि प्राण कंठाशी आणून वृद्ध मातेने आपल्या एकुलत्या एक मुलास निरोप दिला. आई म्हणाली शंकरा ! मी थकले रे ! तू मला एकटा ! तू गेल्यावर माझेौर्ध्वदेहिक कर्म कोण करील ? तू संन्यासी, तुला अधिकार नाही, बाळ शंकराने उत्तर दिले 'आई तू काळजी करू नको. तुझे और्ध्वदेहिक कर्म कुणी केले नाही तर मी करेन. तू माझे स्मरण कर, मी तुझ्या अंतकाली येतो', असे सांगून बाळ शंकर निघाले गुरूच्या शोधाकरिता !

गुरूंचा शोध घेत ते नर्मदेकाठी एका आश्रमात असलेला गौडपादाचार्यांच्या आश्रमात आले. ते जणू त्यांची वाटच पहात होते त्यांनी आपल्या दरवाज्यात एक ताब्या ठेवला होता. त्यामध्ये नर्मदा नदीचा प्रवाह सामावत होता. कुटीला धोका नव्हता. बाल शंकरांना आश्चर्य वाटले. दोघांची भेट होऊन गौडपदाचार्यांनी आपले शिष्य गोविंद भगवत्‌पाद यांचेकडे बालशंकराना पाठविले. तेथे राहून बालशंकराने सर्व वेद शास्त्रांचा अभ्यास केला. ग्रंथ लेखनालाही आरंभ केला. तो त्यांच्या कानावर भट्टपाद तुषाग्नी प्रवेश करताहेत ही बातमी आली. त्यांची भेट घेऊन आपण आपल्या कार्याला आरंभ करावा असा विचार करून ज्या ठिकाणी भट्टपाद तुषाग्नी प्रवेश करीत आहेत त्या ठिकाणी ते आले. बालशंकर त्यांना म्हणाले, 'आपल्याला यापुढे फार मोठे कार्य करावयाचे आहे, हे आपण काय चालविले आहे ? आपण बाहेर यावे'. तेव्हा भट्टपाद म्हणाले, तू कोण आहेस हे मी जाणतो पण मला हे प्रायश्चित्त घेणेच भाग आहे. ज्या वेदांवरील श्रद्धेने मी अनेक विद्वानांना वादामध्ये परास्त केले. त्याचे पाप आणि त्याचे प्रायश्चित्त मला घेणे भाग आहे. मी ते घेणार ! इथून माहिष्यतीनगरीमध्ये मंडनमिश्र माझा शिष्य, मीमांसक, विद्वान आहे. त्याला वादामध्ये जिंकून त्याचा पराजय केल्यास मला जिंकल्यासारखे होईल.' हे ऐकून बालशंकरांना वाईट वाटले. भट्टपादांच्या इच्छेप्रमाणे माहिष्यतीनगरीमध्ये मंडनमिश्र कोण आहे हे पाहण्याकरिता ते निघाले. जाताना वाटेत नदीवर काही बायका पाणी भरण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याकडे बालशंकराने मंडनमिश्रांचा पत्ता विचारला. माहिष्मतीनगरीमध्ये महापंडित म्हणून मंडनमिश्र ओळखले जात होते. बालशंकरांचा हा प्रश्न ऐकून त्या बायकांना आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, 'तुला त्यांचे घर माहिती नाही ? हे पहा ज्यांच्या घरच्या वळचणीवर पिंजरे टांगले आहेत व त्यामध्ये असलेले पोपट व मैना संस्कृत भाषेमध्ये वाद करताहेत,

जगत् ध्रुवं स्यात् जगदध्रुवं स्यात् कीरांगना यत्र गिरं गिरंति ।
द्वारस्थनीडांकितसन्निरूद्धा: जानीहि तन्मडनपंडितौकः ॥

'ते घर मंडनमिश्रांचे समज.' घर उघडण्याची शक्यता दिसत नाही असे पाहून बालशंकराने योगमार्गाने सूक्ष्म शरीर धारण केले व घरच्या अंगणामध्ये उतरले. तो त्यांना मंडन श्राद्ध करण्यात मग्न आहेत असे दिसले. ब्राह्मण बसलेले आहेत. त्यांची पूजा चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये समोर संन्यासी पाहिल्याबरोबर महाकर्मठ पंडित मंडनाने एकदम रागावून 'कुतो मुन्डी ?' असा प्रश्न केला. शंकराने त्यांना चिडविण्याच्या दृष्टीनेच छलवाद स्वरूपाने त्या शब्दांचा अर्थ घेऊन उत्तरे देण्यास सुरूवात केली. कुतो मुन्डी ? आगलात् मुडी !' मंडन म्हणाले, पंथास्ते पृच्छते मया' किम् आह ते पथाः ?' शंकराने विचारले. मंडन म्हणाले 'त्वमाता मुण्डा इति आह' अशा प्रकारे छलवाद रूपाने त्याला क्रोधाविष्ट करून बालशंकराने त्यांच्याकडे वादभिक्षा मागितली. दोघांचा वादाचा दिवस ठरला. मंडनपत्नीला अध्यक्ष ठरविण्यात आले. तिने दोघांनाही बाहेरच्या सोप्यामध्ये सिंहासनावर बसून वादविवादास आरंभ करण्यास सांगितले. दोघांच्याही प्रतिज्ञा झाल्या. शंकर हरला तर त्याने लग्न करावे आणि मंडन हरला तर त्याने संन्यास घ्यावा, असे ठरले. हरल्याची खूण म्हणून ज्याच्या गळयातील पुष्पमाला सुकेल तो हरला ही अट दोघांनीही मान्य केली. रोज मंडनपत्नी शंकराला भिक्षेला चला, (कारण ते संन्यासी) आणि आपल्या पतीला भोजनास चला (कारण ते गृहस्थाश्रमी) असे सांगावयाची. वादविवाद बरेच दिवस चालला होता. जो तो आपल्या परीने शास्त्रप्रमाणे दाखवून आपले मत सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होता. एक दिवस भोजनाचे वेळी मंडनपत्नी बाहेर येऊन पाहते तो आपल्या पतीच्या गळ्यातील माळ झुकलेली असल्याचे तिला दिसले. हे पाहून त्या दिवशी तिने दोघांनाही भिक्षेस चला असे आमंत्रण दिले. शंकराने, बाल संन्याशाने, मंडनांना संन्यास आश्रम घ्यावयास लावला आणि त्यांची कर्नाटकातील शृंगेरी या पीठावर सुरेश्वराचार्य म्हणून नेमणूक केली.

आचार्यांच्या अद्वैत प्रचार कार्याला आरंभ झाला. एक दिवस हिमालय पर्वतामध्ये हिंडत असतांना ते आपल्या शिष्यासमवेत एके ठिकाणी राहिले होते. ज्या ठिकाणी ते राहतील त्याठिकाणी त्यांचे पाठप्रवचन चालत असे. एका वृद्ध ब्राह्मणाच्या वेषात व्यासमहर्षी तेथे आले आणि शिष्यांना विचारले की, 'हा कोण संन्यासी आहे ? काय करतो आहे ?' तेव्हा शिष्यांनी सांगितले की ते आम्हाला शारीरभाष्य शिकवताहेत. 'वा!' व्यास म्हणाले. दोघांचे वाद विवाद चालू झाले व्यासांनी आचार्यांना विचारले की एका सूत्राचा अर्थ मी तुला विचारतो,

तदन्तरप्रतिपत्तौ रांहति संपरिष्वक्त: प्रश्ननिरूपणाभ्याम्

या सूत्रावर दोघांचा बराच वाद झाला. कुणी हटेना. तेव्हा शिष्यांना प्रश्न पडला की हा कुणी साधा ब्राह्मण नव्हे. हे व्यास असतील का ? तेव्हा त्यांनी आचार्यांना सांगितले. आचार्यांनी मनात प्रार्थना केली आपण व्यास असाल तर मला दर्शन देऊन कृतार्थ करावे ! मनोमनी प्रार्थना समजली आणि व्यासांनी आचार्यांना दर्शन दिले. आचार्यांना आनंद झाला. 'तुझी रचना उत्तम आहे. यावच्चंद्रदिवाकरौ तुझे हे भाष्य पृथीवर राहील' असा व्यासांनी आशीर्वाद दिला. तेव्हा आचार्य म्हणाले, माझे वय सोळा वर्षाचे आहे. माझे येथील कार्य संपले आहे. मला आपण परवानगी द्यावी', व्यास महर्षी म्हणाले, 'आत्ताच कामाला प्रारंभ झाला आहे. मी माझ्या सामर्थ्याने तुला आणखी सोळा वर्षाचे आयुष्य देतो, तुला तुझ्या कार्याचा, ग्रंथांचा प्रचार करावयाचा आहे. लक्षात ठेव !'

इथून आचार्यांच्या कार्याला आरंभ झाला. आपल्या प्रचारकार्यामध्ये आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रचाराकरिता आणि रक्षणाकरिता आचार्यांनी चारही दिशेला चार मठांची स्थापना करून चार उत्तम अधिकारी शिष्यांची नेमणूक केली. पद्मपाद, हस्तामलक, तोटकाचार्य आणि सुरेश्वराचार्य अशी त्यांची नावे आहेत. ते कार्य अद्ययावत् यथाशक्ती चालू आहे. या कालामध्येच आचार्यांनी आपल्या सिध्दांतांचा प्रचार करण्यासाठी पुष्कळ ग्रंथ लिहिले आहेत. आकर ग्रंथामध्ये ब्रह्मसूत्रे, त्यांच्यावरील भाष्य, गीताभाष्य आणि उपनिषद्‌भाष्य हे ग्रंथ आहेत. या तीन भाष्यांना प्रस्थानत्रयी असे नाव आहे. गीता हा स्मृतिग्रंथ आहे. उपनिषदे हा श्रुतिग्रंथ आहे आणि ब्रह्मसूत्रभाष्य हा तर्कग्रंथ आहे. या तीन प्रमाणांनी आचार्यांनी अद्वैताची सिद्धी केली आहे. अद्वैताकडे जाण्याचा या मार्गाने विचार होतो.

ईशकेनकठादि दहा उपनिषदांवर, पाचशे पंचावन्न व्याससूत्रांवर आणि श्रीमद्‌भगवदगीतेवर हे भाष्य आहे. ब्रह्मसूत्रभाष्यामध्ये प्रतिपक्षांचे सांख्य, मीमांसा, न्याय, बौद्ध इ. मतांचे तर्काने विचार करून खंडन केले आहे. शारीरभाष्यातील स्मृतिपाद आणि तर्कपाद प्रसिद्धच आहेत. ब्रह्मसूत्रभाष्याचे चार अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायाचे चार पाद आहेत. प्रत्येक अध्यायातील विषय संपल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये परलोक, उपासना वगैरे गोष्टींचा विचार केलेला आहे. याशिवाय प्रकरण ग्रंथामध्ये अनेक देवतांची स्तोत्रे आहेत. आचार्यांनी पंचायतन पूजा भेदनिरसनाकरिता रूढ केली. आचार्यांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे. विष्णूसहस्रनाम व महाभारतातील सनतसुजातीय या ग्रंथावर आचार्यांचे भाष्य आहे.

'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:' हा आचार्यांचा अद्वैतसिध्दान्त सर्वत्र प्रसिद्ध आहे. ग्रंथसंपत्ती विपुल आहे. याचप्रमाणे आचार्यांनी वेदांचे अपौरूषेयत्व सिद्ध केले आहे. इतर शास्त्रकारांनी वेद हे, वेदांतील काही शब्दांवरून, पुरुषकृत आहेत असे मानले आहे. 'त्रयो वेदस्य कर्तारः, भंड धूर्तः निशाचराः ' असे म्हणून त्यांची नालस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आचार्यांनी भ्रम प्रमाद विप्रलिप्सा व करणपाटवादि दोष नसल्यामुळे ते अपौरुषेय आहेत असे सिद्ध केले आहे. यामुळे शास्त्राचे प्रबळ प्रमाणत्व तर सिद्ध होतेच व त्यांच्याबद्दलची प्रामाण्यबुद्धीही उत्पन होते. इतर सर्व सांप्रादायिक संतांनी आपल्या ग्रंथामध्ये वेदाला परमेश्वराचे घोरणे असे म्हटले आहे. घोरणे पुरूषप्रयत्नपूर्वक नसते. त्यामध्ये स्वाभाविकता असते. श्रीज्ञानेश्वरांनी याच अर्थाने त्याला 'जव निद्रिताचा घोरू' असे म्हटले आहे.

या पद्धतीने विचार केला असता वेद हे मनुष्यकृत नसून ते सदा सर्वकाळ नित्यस्वरूपाचे आहेत असे सिध्द होते. जी परब्रह्मवस्तु जगत् निर्माण करण्यापूर्वी ब्रह्मदेवाला निर्माण करते व त्यांचेकडे वेद पाठविते, याचा अर्थ या प्रमाणे जगताची निर्मिती करावी असा होतो.

'यो ब्रह्माणम् विदधाति पूर्वम् यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै' अशी श्रुति आहे. यावरून वेदांचे नित्यत्त्व सिद्ध होते. हे कार्य फार मोठे आहे. 'शास्त्रयोनित्त्वात्' या सूत्रामध्ये शास्त्र या शब्दाचा महर्षी व्यासांना अभिप्रेत असणारा अर्थ 'सर्व वेद' असाच आहे. म्हणून आचार्यांनी भाष्यामध्ये शास्त्रं नाम वेदादि: ' असे म्हटले आहे.

शास्त्रयोनित्त्वात् या सूत्राचा दोन प्रकारांनी विग्रह करून अर्थ करता येतो. 'शास्त्रस्य योनि:' हा एक. 'शास्त्र योनिः यस्य' असे दोन्हीही अर्थ केले आहेत. शास्त्र निर्माण करण्याकरिता कारणी आहे, हे परब्रह्माचे स्वरूपलक्षण मानलेले आहे.
याचप्रमाणे ज्ञानेश्वरीत् सुद्धा -
अहितापासोनि रक्षिति । हित देवोनि वाढविती । नाही गा श्रुतिपरौति माऊली । जगामाजी ॥ - असे म्हटले आहे.

मातेची उपमा देऊन त्यांनी वेदांना गौरविले आहे. म्हणूच मनुष्यमात्रांनी त्यातील उत्तम गोष्टींचा विचार करून आपले जीवन उत्तम प्रकारे घडवावे असे सिद्ध होते. वैदिक पंडितांनी वेदांच्याच आधारे ज्ञानेश्वरादि भावंडांना संस्कारांचा अधिकार नाकारला म्हणून त्यांनी वेदांबद्दल अनुसार काढले नाहीत. हीच त्यांची थोरवी आहे. वैदिक संस्कारांच्या योगानी मनादिकांची शुद्धी करून याच जन्मामध्ये जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेता येते याचे उत्तम उदाहरण 'सदाशिवेंद्रसरस्वती' यांचे देता येईल. या पूर्वीच्या शृंगेरी पीठावरील आचार्यांनी त्यांना गुरुस्थानी मानले आहे. ते फार मोठे अधिकारी पुरूष होऊन गेले. यावरून असे दिसते की जगाची सुस्थिती चालण्याकरिता म्हणून ब्रह्मविद्या आणि धर्म यांची अत्यंत आवश्यकता आहे. आचार्य कौटिल्यांनी आपल्या ग्रंथामध्ये

आन्वीक्षिकी ब्रह्मविद्या दंडनीतिश्च शाश्वती ।
विद्याः चतस्रएवैताः लोकसंस्थितीहेतवः ॥

असे म्हटले आहे. यावरून आपली भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगाला आदर्शभूत असून शाश्वत, कल्याणकारी आहे.

सर्वज्ञशारदापीठाधिरोहण :

सर्वत्र भ्रमण चालू असता श्रीआचार्यांच्या कानावर काश्मीरमधील सर्वज्ञपीठाची हकीकत आली. तिकडे आचार्य गेले व त्यांनी पीठावर बसण्याची इच्छा दर्शविली. त्यावेळी प्रत्यक्ष शारदेने संगितले की, येथे सर्वज्ञता सिद्ध करून दाखवावी लागते. तेव्हा माझ्या प्रश्नाची उत्तरे दिल्यास तुम्हांस पीठाधिरोहण करता येईल. 'विचारा' असे आचार्य म्हणाले. सरस्वतीने त्यांना काम शास्त्रातील प्रश्न विचारले. उत्तर देणे कठीण ! कारण बालपणीच संन्यास घेतलेला होता. उत्तर न द्यावे तर पराजय ! तेव्हा त्यांनी सरस्वतीपाशी १ ते २ महीन्याची मुदत मागितली. ती दिली गेली. त्यासुमारास अमरूक नावाचा एक राजा मरण पावला होता व त्याचे शरीर दहनाकरिता आणले जात होते. अचार्यांनी विचार करून आपले शरीर एका गुहेत शिष्यांस सांभाळण्यास सांगून त्यांनी त्या राजाच्या शरीरांत प्रवेश करून सर्व विषयांचा उपभोग घेऊन, परत येऊन आपल्या शरीरात प्रवेश करून ते पीठाकडे गेले व सरस्वतीला 'आता प्रश्न विचार' असे म्हणताच ती म्हणाली 'आता तुम्हाला उत्तर देणे सहज शक्य आहे' ? सरस्वतीच्या इच्छेप्रमाणे आचार्यांनी दक्षिणेकडच्या पीठावर आरोहण केले. सर्वज्ञतेचा डांगोरा पिटला गेला. दुसऱ्या शरीराच्या माध्यमातून भोग भोगल्यामुळे कोणताही दोष या शरीराला लागला नाही. जीवनातील नियोजित सर्व गोष्टी झाल्यामुळे आता आचार्यांनी निवृत्त व्हायचे ठरवून हिमालयाकडे प्रयाण केले.

आचार्याची ग्रंथ संपत्ति :

प्रमुख दहा उपनिषदांच्यावरील भाष्ये, ब्रह्मसूत्र शारीरभाष्य, भगवत्‌गीता हे आकर ग्रंथ असून सर्व-वेदान्त-सिद्धान्त सारसंग्रह (मराठी अनुवादित), साधनपंचक, उपदेशसाहस्री, शतश्लोकी, अपरोक्षानुभूति, प्रबोधसुधाकर, अनेक देवतांची स्तोत्रे, धन्याष्टक, इत्यादी प्रकरणांचे अनेक ग्रंथ आहेत. भाषा सुंदर, सुलभ लालित्यपूर्ण असून भावनांना प्रेरणा देणारी आहे.

संप्रदाय :

अशा तऱ्हेने जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या श्रीमत् आद्य शंकराचार्यांचा संप्रदाय पुढील प्रमाणे आहे.

नारायण पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च ।
व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंदयोगिन्द्रमथास्य शिष्यम्
श्री शंकराचार्यामास्तास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम्
तंत्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्‌गुरून् संततमानतोस्मि ॥

ही ब्रह्मविद्या श्रीमन् नारायणांच्यापासून ब्रह्मदेवांना ब्रह्मदेवांपासून वसिष्ठांना, वसिष्ठांपासून शक्तिंना शक्तींचे पुत्र पराशरांना, पराशरांपासून व्यासांना, व्यासांच्यापासून शुक्राचार्यांना, शुकाचार्यांपासून गौडपादाचार्यांना, विगौडपादाचार्यापासून गोविंदयोगींद्रांना, त्यांचे शिष्य शंकराचार्य आणि शंकराचार्यापासून त्यांचे शिष्य पद्मपाद, हस्तामलकाचार्य, तोटकाचार्य आणि वार्तिककार (सुरेश्वराचार्य) या गुरूपरंपरेने आपल्यापर्यंत आलेली आहे.

आम्ही भारतीय त्यांचे ऋण आपल्या मस्तकी धारण करून त्यांचे चरणी नतमस्तक होऊ या.

शास्त्रं शारीरमीमांसा देवस्तु परमेश्वरः ।
आचार्या: शंकराचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि ॥
इतिशम्

संदर्भ : कल्याणी विशेषांक - २००९
श्री . वि. ना. दंडगेशास्त्री
डी १/२, राहुल नगर, कोथरूड, पुणे ३८