तैत्तिरीयसंहिता : उद्गम आणि महत्त्व
वैदिकसाहित्यामध्ये यजुर्वेद आणि सामवेद यांचा यज्ञीयकर्माशी साक्षात आणि घनिष्ठ संबंध असलेला आढळून येतो. यजुर्वेदाचा उपयोग अध्वर्यु आणि त्याचे सहकारी हे प्रामुख्याने करतात. यज्ञक्रियेतील प्रत्यक्ष शारीरिक हालचालींचा भाग हा अध्वर्यूकडे असल्यामुळे अध्वर्यूला आणि यजुर्वेदाला कर्मकाण्डात जास्त महत्त्व असणे स्वाभाविकच आहे. यजुर्वेदाचे शुक्क आणि कृष्ण ही नावे पडण्यामागील कारणांची चिकित्सा विविध पंडितांनी विविधप्रकारे केली असली तरी त्यातील एक उपपत्ती अशी आहे की शुक्कयजुर्वेदामध्ये केवळ मंत्र असल्यामुळे तो स्वच्छ आणि शुद्ध म्हणूनच "शुक्ल" आहे. तर कृष्ण यजुर्वेदामध्ये संहिता आणि ब्राह्मण या दोन्ही भागांचे मिश्रण असल्यामुळे तो भाग मलिन म्हणूनच "कृष्ण" आहे असे म्हटले गेले असावे. कृष्णयजुर्वेदाच्या पुन्हा अनेक उपशाखा आहेत. आणि त्यापैकी तैत्तिरीयशाखा ही सर्वाङ्गपरिपूर्णस्वरूप आजही उपलब्ध आणि प्रचलित असल्यामुळे तिला विशेष महत्त्व असणे स्वाभाविकच आहे. सायणाने अनेक वैदिक ग्रंथांवरती भाष्य लिहिले असले तरी यजुर्वेदाला यज्ञकर्माच्याबाबतीत भित्तिस्थानीय म्हणूनच अधिक महत्त्वाचा मानून कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीयसंहितेवरच प्रथम भाष्य लिहिले आहे.
विष्णुपुराणामध्ये तैत्तिरीयशाखेच्या उद्गमाविषयी पुढीलप्रमाणे पुराणकथा आलेली आहे - व्यासाचा शिष्य वैशंपायन ह्याने यजुर्वेदाच्या विविध शाखा आपल्या विद्यार्थ्यांना शिकवल्या. याज्ञवल्क्य हा त्याचा एक शिष्य होता. याज्ञवल्क्याच्या अहंकारामुळे वैशंपायन क्रुद्ध होऊन त्याने त्याला आपल्याकडून घेतलेले सर्व ज्ञान आपल्याला परत करण्यास सांगितले. मग याज्ञवल्क्याने पूर्वी शिकलेले सर्व यजुर्मन्त्र ओकून टाकले. अन्य शिष्यांनी ते यजुर्मन्त्र तित्तिरपक्ष्याचे रूप घेऊन ग्रहण केले. त्यामुळे त्या शाखेला "तैत्तिरीय" असे नाव पडले. अशाच प्रकारची कथा भागवतपुराणातही आलेली आहे.
सारस्वतपाठ आणि आर्षेय पाठ -
तैत्तिरीय शाखेच्या सारस्वतपाठात संहिता, ब्राह्मण व आरण्यक ह्या भागांचा समावेश आहे. सारस्वतपाठासंबंधी पुढीलप्रमाणे पौराणिक कथा आहे - ब्रह्मसभेत दुर्वासमुनि सामगायन करीत होते. त्यांना पाहून सरस्वतीदेवीने स्मित केले. मग क्रुद्ध अशा मुनीने सरस्वतीला शाप दिला की "तू मर्त्य म्हणून जन्माला येशील." मग सरस्वतीने त्यांचे मन प्रसन्न केले आणि निदान ब्राह्मणकुलात मला जन्म मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली. मग मुनींनी ते मान्य केले. नंतर सरस्वतीचा जन्म आत्रेय गृहात झाला. तिला वेदविद् असा पति मिळाला. तिने विद्यानिधी पुत्राला जन्म दिला. त्याला पित्याने वेद शिकवला. पित्याने एकदा त्याला छडीने मार दिला. तेव्हा तो रडू लागला. मग आईने म्हणजे सरस्वतीने त्याला सर्ववेदांचे अधिपति केले. पुढे ह्या सरस्वतीपुत्राने अन्य मुनींना वेदाध्यापन केले. ज्याने त्या क्रमाने पाठ दिला त्याला सारस्वतपाठ असे नाव आहे.
तैत्तिरीयशाखेच्या दुसऱ्या पाठाला आर्षेय पाठ असे म्हणतात. विषयानुक्रमाने केलेली माडणी ही या पाठाचे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार संहिता, ब्राह्मण, आरण्यक ह्यांमधील एका विषयाच्या अनुवाकांची मांडणी एकत्र केली गेली आहे. येथे पाच काण्डे असून त्यांना प्राजापत्य, सौम्य, आग्नेय, वैश्वदेव, स्वायंभुव अशी नावे आहेत. त्यांचे अनुक्रमे प्रजापति, सोम, अग्नि विश्वेदेव आणि स्वयंभू असे ऋषी आहेत.
GO TOP