॥ शिवलीलामृत ॥


श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिलेला 'शिवलीलामृत' हा शेवटचा ग्रंथ. श्रीधरस्वामींनी हा ग्रंथ शके १६४० (सन १७२२) मध्ये फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला बारामतीस कर्‍हा नदीच्या तीरावरील एका प्राचीन मंदिरात बसून संपविला असा उल्लेख केला आहे. श्रीधर स्वामींनी मूळ शिवलीलामृत २४५० ओव्यांचे व १४ अध्यायांचेच रचले होते. मागून कोणीतरी ३२५ ओव्यांचा १५ वा अध्याय त्याला जोडला. पण आता जनमानसात शिवलीलामृताचे १५ अध्यायच रूढ झाले असून येथेही १५ अध्यायच दिले आहेत. श्रीधर स्वामींनी सांगितले आहे की हा ग्रंथ स्कंदपुराणातील ब्रम्होत्तर खंडाच्या आधारे रचला आहे. या ग्रंथाचे वाचन केल्यास स्पष्ट दिसून येईल की, या ग्रंथात ऐहिक कल्याण साधण्यावरच विशेष भर दिलेला आहे. संसारात मनुष्यास पूर्वकर्मानुसार दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काम, क्रोध वगैरेपासून उत्पन्न होणार्‍या अनेक आपत्ती भोगाव्या लागतात. अशा संकटकाळी हताश न होता त्याने ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून त्याची एकनिष्ठपणे उपासना करावी म्हणजे तो त्यास त्यातून मुक्त करतो व शेवटी आपल्या पदी नेतो. हेच तत्त्व वाचकांच्या मनात ठसविण्याचा कवीचा मुख्य हेतू आहे. म्हणूनच ह्या दृष्टीने त्याने जप‍तप, मंत्रर्‍तंत्र, रुद्राक्षधारण, कथाश्रवण, शिवपूजन, नामसंकीर्तन, भस्ममहिमा, अतिथीसेवा, परोपकार इत्यादी उपाय उदाहरणासहित सांगितले आहेत. त्याचप्रमाणे फलश्रुतीतही संतती-संपत्ती व आयुष्य यांचे सौभाग्यवर्धन, गंडांतर क्षय, ग्रहपीडा, पिशाच्चबाधा, रोगव्यथा यापासून मुक्ती, ऋणमोचन व शत्रूक्षय इत्यादी ऐहिक दुःखांचा परिहार व सुखाची प्राप्ती या ग्रंथापासून कशी मिळू शकेल याचाच ठळकपणे निर्देश केला आहे. कवीने अशी ग्वाही दिली आहे की, 'त्रिमास करिता नित्य एक आवर्तन । सर्व संकटे जाती निरसोन । भावे प्रचीत पहावी वाचोन। नाही कारण अभाविकांचे ॥ कवी आणखी सांगतो की या ग्रंथात सांगितलेला भक्तीमार्ग व मंत्रतंत्रादी आचारधर्म सर्व वर्णातील आबालवृद्ध स्त्री पुरुषास सारखाच मोकळा आहे. या सार्वत्रिक मुक्तद्वारामुळे हा ग्रंथ समाजाच्या सर्व थरात मान्यता मिळालेला व लोकप्रिय झालेला दिसून येतो. मनुष्य या जन्मी किंवा जन्मांतरी कितीही पापी वा दुराचरणी असला तरी जर कोणत्याही निमित्ताने त्याचेकडून ईशस्मरण घडले तर त्यास सद्‌गती मिळाल्याशिवाय रहात नाही. हेच तत्व श्रीधरस्वामींनी ह्या ग्रंथात सांगितले आहे. यातील स्त्रियांच्या वर्णनावरून सद्गुणी स्त्रियांचे संसारात किती महत्वाचे स्थान आहे, हे वाचकास पटते. त्याचप्रमाणे वेश्या किंवा निराश झालेल्या पतितांस स्वतःच्या उद्धारासाठी झटून काम करण्यास हा ग्रंथ उत्साह मिळवून देतो. सुलभ भक्तीमार्ग, पतिव्रता धर्म, सौभाग्यवर्धन व्रते वगैरे गोष्टींचा पुरस्कार या ग्रंथातील कथेमध्ये केलेला असल्यामुळे हा ग्रंथ स्त्रियांस विशेष प्रिय व्हावा ह्यात नवल नाही. या ग्रंथाच्या नावाप्रमाणे यात जरी शिवलीलांचा महिमा कवीने गाइला आहे तरी त्यात इतर देवदेवतांस कमी लेखलेले नाही. एवढेच नव्हे तर शिवविष्णूत भेद मानू नये असे कवीने वारंवार बजावले आहे. तो सर्व देवांचे एकत्वच कल्पतो. रामविजयात कवीने एका ठिकाणी म्हटले आहे की, 'शिव विष्णु विठ्ठल मल्हारी मार्तंड सर्व । एकचि असुनी अनेक नामे धरी ।' या तत्वानुसार सर्व देव कवी एकरूपच मानत होता. या ग्रंथात मुख्य रस भक्तीरस आहे. पण त्याबरोबरच कथानुरोधाने करूणरस, वीररस व शृंगाररसही आलेला दिसतो. अशा प्रकारे भक्तीरसाने ओथंबलेला व ज्याच्या वाचनाने ऐहिक व इच्छित सुखांची प्राप्ती होते असा हा श्रेष्ठ ग्रंथ वाचकांना सादर.



GO TOP