|
॥ श्रीशिवलीलामृत ॥ ॥ अध्याय पंधरावा ॥
श्रीगणेशाय नमः ॥
जयजय श्रीगंगाधरा । त्रिशूळपाणी पंचवक्त्रा । अर्धनारीनटेश्वरा । श्रीशंकरा नीलकंठा ॥ १ ॥ भस्मोद्भूलना त्रिनयना । कर्पूरगौरा नागभूषणा । गजास्यजनका गौरीरमणा । भक्तवत्सला दयानिधे ॥ २ ॥ तू आदिमध्यांतरहित । अज अव्यय मायातीत । विश्वव्यापक विश्वनाथ । विश्वंभर जगद्गुरो ॥ ३ ॥ तू नामगुणातीत असून । स्वेच्छे मायेसी आश्रयून । नानारूप नामाभिधान । क्रीडार्थ होसी सर्वेशा ॥ ४ ॥ सत्त्व रज तम हे गुणत्रय । तूचि नटलासी निःसंशय । स्थिरचरात्मक भूतमय । त्वद्रुपचि आहे बा ॥ ५ ॥ तू ब्रह्मांडाआदिकारण । विश्वसूत्र तव आधीन । जैसे हालविसी स्वेच्छे करून । तैसे संपूर्ण नाचत ॥ ६ ॥ तुझिया इच्छेवाचुनी । काहीच नोहे जीवाचेनी । ऐसे जाणोनी अंत:करणी । तुज शरण रिघती जे ॥ ७ ॥ तयां भक्तांसी तू शंकर । पूर्णकाम करोनि साचार । भवाब्धीतूनि नेऊनि पार । स्वपदी स्थिर स्थापिसी ॥ ८ ॥ ऐसा तुझा अदभुत महिमा । नकळे त्याची कवणा सीमा । म्हणोनि केवळ परब्रह्मा । शरण आलो असे पा ॥ ९ ॥ तरी दयाब्धे मज पामरा । न्यावे भवाब्धिपैलपारा । तुजवाचुनी कोण दातारा । अनाथासी उद्धरील ॥ १० ॥ असो आता बहू विनवणी । आधी पुरवी मनाची धणी । त्वदगुण प्राकृत वाणी । कीजे ऐसी असे जी ॥ ११ ॥ तुझिया कृपे शिवलीलामृत । चौदा अध्याय वर्णिले यथार्थ । वेदव्यासे स्कंदपुराणात । ब्रह्मोत्तरखंडी कथिले जे ॥ १२ ॥ परी माझ्या मनाची तृप्ती । जाहली नाही बा पशुपती । म्हणोनि आणिक हृदयी स्फूर्ती देऊनि कथा वर्णवी पां ॥ १३ ॥ तूं शंकर होता प्रसन्न । हाता येते सर्व त्रिभुवन । महाराज तू भक्तांलागून । वरप्रदाने तोषविसी ॥ १४ ॥ तुज श्रीशंकरासमान । वरदाना शक्त नसे कोण । तुझे देखोनि उदारपण । ब्रह्माविष्णूही लाजती ॥ १५ ॥ काय वर्णावी उदारता । प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता । देऊनिया रावणभक्ता । आत्मलिंग वोपिलेसी ॥ १६ ॥ तेविच दैत्येंद्र त्रिपुर । तारक आणि भस्मासुर । इत्यादि स्वभक्तांलागी अपार । अनिवार वर दिल्हेसी ॥ १७ ॥ तू अत्यंत भोळा भगवान । कपटेही करिता तव सेवन । देऊनि इच्छित वरदान । आनंदविसी सेविका ॥ १८ ॥ असो ऐका श्रोते सर्व । ऐसा करितां म्यां शिवस्तव । हृदयी प्रकटोनि दयार्णव । स्फूर्ति देत उत्तम ॥ १९ ॥ अरे ह्या कलियुगामाझारी । पाखंडी मातोनि पृथ्वीवरी । श्रुति स्मृति पुराणोक्त सारी । कर्मे बुडविते जाहले ॥ २० ॥ जैनमत ते आगळे । सर्व भूमंडळी पसरले । तेणेयोगे वर्ण सगळे । भुलोनि गेले साचार ॥ २१ ॥ ते देखोनि म्यां सत्वर । तन्मतखंडनालागी भूवर । शंकरनामे अति सुंदर । जो अवतार धरियेला ॥ २२ ॥ ते माझे अद्भुत चरित्र । आधुनिकासी न कळे पवित्र । तरी तू प्राकृत भावे विचित्र । वर्णन करी श्रीधरा ॥ २३ ॥ ऐसी शिवे केली प्रेरणा । म्हणोनि पुराणार्थ-विवरणा । एकीकडे ठेवूनि जाणा । जगद्गुरुचरित्र वर्णितो ॥ २४ ॥ तरी सर्व तुम्ही श्रोते संत । सावध राहा हो श्रवणार्थ । जगद्गुरुकथा ऐकतां समस्त । पापपर्वत भंगती ॥ २५ ॥ कल्पारंभी कमळासने । परब्रह्माच्या आज्ञेने । जी महदादिकांच्या योगाने । ही सर्व सृष्टी रचियेली ॥ २६ ॥ इयेच्या कल्याणालागून । सर्व मार्गदर्शक पूर्ण । ऋग्यजुः-साम-अथर्वण । हे चार वेद जाहले ॥ २७ ॥ परी त्या वेदांचे अर्थराशी । स्पष्ट न होत सर्वांसी । म्हणोनि परमात्म्याच्या मानसी । कृपासमुद्र उचंबळला ॥ २८ ॥ मग तो स्पष्ट व्हावयालागुनी । पाणिन्यादि रूपे अवतरोनी । व्याकरणादि षशास्त्र झणी । करिता जाहला परमात्मा ॥ २९ ॥ आणि मन्वादिक स्मृती । करिता झाला तो विंशती । तदभ्यासे सर्व जगती । श्रुत्यर्थ जाणू लागले ॥ ३० ॥ पुढे कलियुग होता प्राप्त । भूमंडळी मानव समस्त । अल्पायू मंदमती अत्यंत । ऐसे जाण होतील ॥ ३१ ॥ आणि श्रुति स्मृति शास्त्र केवळ । गगनापरी अत्यंत विशाळ । म्हणोनि त्यांचा मानवा सकळ । अभ्यास नोहे कदाचि ॥ ३२ ॥ तेणे ते सर्व अति अज्ञानी । आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी । जन्ममरणादि तीव्र दुःखांनी तडफडतील निश्चये ॥ ३३ ॥ ऐसे पूर्वी नारायणे । जाणुनी मग दयार्द्रपणे । कलिजनांच्या उद्धाराकारणे । व्यासावतार धरियेला ॥ ३४ ॥ आणि त्या व्यासपे चांग । चारी वेदांचे करूनि विभाग । वेदार्थदर्शक ऐसे सवेग । महाभारत रचियेले ॥ ३५ ॥ आणि विष्णु शिव नारद पद्म । मार्कंडेय भागवत ब्राह्म । अग्नि भविष्य वराह कुर्म । मत्स्य लिंग ब्रह्मवैवर्त ॥ ३६ ॥ स्कंद वामन आणि गरुड । तेवीचि अठरावे ब्रह्मांड । ऐसी अष्टादश पुराणे प्रचंड । लोकोद्धारार्थ रचियेली ॥ ३७ ॥ मग मेदिनी एकैक ब्राह्मण । व्यासकृत विभागातून । यथामती एकैक भागालागून । अभ्यासू लागले आनंदे ॥ ३८ ॥ आणि इतिहास पुराणे ऐकून । सन्मार्गे चालू लागले संपूर्ण । परी पुढे कलीच्या योगेकरून संकट दारुण पातले ॥ ३९ ॥ वेदशास्त्र पुराणे निंदनी । तयांचा दूरचि त्याग करूनी । पाखंड बौद्धमते निशिदिनी । वर्ते लागले सकळिक ॥ ४० ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । लोम विलोम आणि संकर । ह्या सर्व जातींचे नारीनर । अधर्मे वर्ते लागले ॥ ४१ ॥ सकळ मेदिनीवरुती । बौद्धधर्म पसरला अती । देवग्रामदेवतांप्रती । भजू लागले जैनशास्त्र ॥ ४२ ॥ वेदशास्त्रे पुराणे समस्त । अनुदिनी चालली लोपत । श्रुतिस्मृतिपुराणोक्त पंथ । बहुतेक पै लोपले ॥ ४३ ॥ अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न । ऐसे व्हावया काय कारण । तरी मंडनमिश्र नामेकरून । एक जैन उद्भवला ॥ ४४ ॥ तो केवळ बुद्धीचा सागर । देवगुरूपरी वक्ता चतुर । जयाच्या विद्येची साचार । सरी न पावे शुक्रही ॥ ४५ ॥ तेणे स्वये अति दारुण । करूनिया पै अनुष्ठान । सरस्वती आणि कृशान । प्रसन्न करून घेतले ॥ ४६ ॥ अग्नीमाजी हवन करूनी । कल्पिले काढी कुंडातुनी । याचकजनांची इच्छा झणी । तृप्त करी सर्वदा ॥ ४७ ॥ जैसा पूर्वी रावणसुत । महापराक्रमी इंद्रजित । हवन करोनि अश्वांसहित । रथ काढिता जाहला ॥ ४८ ॥ तैसा तो मंडनमिश्र अय्या । अग्नीत हवन करुनिया । त्यातून पीतांबरादिक वस्तुया । काढीतसे यथेच्छ ॥ ४९ ॥ विद्या पाहता अति प्रबळ । हुंकारे सूर्यासी उभा करील । अत्यद्भुत सामर्थ्य केवळ । सांगता वाचे न वदने ॥ ५० ॥ शास्त्री पुराणिक पंडित । अय्याचा मानिती धाक बहत । वादविवाद करितां समस्त । खंडित होत तत्क्षणी ॥ ५१ ॥ स्वये नवी शास्त्रे करूनी । पंडिता जिंकी तयांचेनी । कोणी न टिकती सभास्थानी । मुखा गवसणी घालित ॥ ५२ ॥ मोठे मोठे पंडित सगळे । वादविवाद करिता थकले । सकळ सृष्टीते जिंकिले । आपुल्या शास्त्री अय्याने ॥ ५३ ॥ श्रुतिस्मृत्युक्त सद्धर्ममार्ग । अधर्म ऐसे दावूनि सवेग । आपुली शास्त्र सर्वत्र सांग । स्थापना केली दुष्टाने ॥ ५४ ॥ आणि चारी वर्ण अठरा याती । यांच्या मती भ्रष्टवूनि अती । ग्रामदैवते आपुल्या हाती । आपुल्या शास्त्र स्थापिली ॥ ५५ ॥ पूर्वशास्त्र पडली एकीकडे । जैने स्वशास्त्र केले उघडे । तया अय्याच्या सामथ्र्यापुढे । चकित झाले सर्वही ॥ ५६ ॥ आणि आमुचा धर्म नाही उत्तम् । जैनधर्म हा बहु सुगम । ऐसे म्हणोनि सर्व जन परम । अंतरी खिन्न जाहले ॥ ५७ ॥ मग वेदशास्त्र पुराणे सोज्ज्वळ । यांसी टाकून तत्काळ । चारी वर्ण अठरा याती सकळ । चालवू लागले जैनधर्म ॥ ५८ ॥ अहो त्या मंडनमिश्रालागून असे सरस्वती सुप्रसन्न । म्हणोनि त्याच्या जिह्वाग्री बैसोन । बोलिल्या वचना सत्य करी ॥ ५९ ॥ आणि सदा होऊन अंकित । तया अय्याच्या घरी राबत । मद्यपान करूनि सतत । अनाचार वाढवी तो ॥ ६० ॥ नित्य प्रातःकाळी उठोन । मद्याचा एक घट मांडून । तेथे सरस्वतीची पूजा करून । नैवेद्य अप मद्याचा ॥ ६१ ॥ ऐसा तो अय्या त्रिकाल जाणा । सरस्वतीच्या करूनि पूजना । प्रसाद म्हणोनि मद्यपाना । करीतसे यथेष्ट ॥ ६२ ॥ नाही आचार ना विचार । कर्मभ्रष्ट पाखंडी थोर । आपुला शास्त्रधर्म साचार । सर्व स्थळी स्थापितसे ॥ ६३ ॥ सर्व जनांसी शिष्य करून । स्वये तयांचा गुरू होऊन । श्रुतिस्मृत्युक्त धर्म संपूर्ण । आचरो नेदी कवणासी ॥ ६४ ॥ ऐसा अनर्थ करता फार । भूमीसी होऊन अति भार । रात्रंदिवस ती अनिवार । दुःखाश्रु टाकू लागली ॥ ६५ ॥ देव ब्राह्मण साधुसंत । दु:खे पोळती अहोरात । काही काळे हे वृत्त समस्त । श्रुत जाहले शंकरासी ॥ ६६ ॥ तेव्हा तो शंकर पिनाकपाणी । अत्यंत कोपाविष्ट होऊनी । म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवूनी । वर्तती की जैनधर्मे ॥ ६७ ॥ सकळही भूमंडळावर । जैनधर्माचा झाला की प्रसार । तरी आता मी अवतरोनि शंकर । जैन धर्मा उच्छेदितो ॥ ६८ ॥ ऐसे कोपे बोलोनि शिव । जो अनाथनाथ कृपार्णव । पुराणपुरुष महादेव । भाललोचन जगदात्मा ॥ ६९ ॥ जो अनंतब्रह्मांडनायक । भस्मासुरवरदायक । त्रिशूळपाणी मदनांतक । चंद्रशेखर उमापती ॥ ७० ॥ तेणे तत्काळ मेदिनीवर । उत्तरदेशी निर्मळ क्षेत्र । तेथे विप्रकुळामाजी सत्वर । घेतला अवतार नररूपे ॥ ७१ ॥ तेव्हा समुद्रवसनेलागून । परमानंद झाला असे पूर्ण । दशदिशांतरे प्रसन्न । देव संपूर्ण हर्षले ॥ ७२ ॥ मंद सुगंध शीतळ । वाहू लागला तो अनिळ । वापी कूप नद्यांचे जळ । झाले निर्मळ तत्क्षणी ॥ ७३ ॥ ऐसी शुभ चिन्हे अपार । होऊ लागली पृथ्वीवर । मुनि जाणूनि समाचार । निर्मळ क्षेत्री पातले ॥ ७४ ॥ आणि जाऊनियां विप्रसदनी । बालजातक वर्तवूनी । शंकराचार्य ऐसे तत्क्षणी । नाम ठेविते जाहले ॥ ७५ ॥ आता ह्या नामासी काय कारण । तरी शं' म्हणजे सुकल्याण । ‘कृञ्' धातूचा अर्थ करण । आणि 'आचार्य' म्हणजे सदगुरु ॥ ७६ ॥ ऐसा हा तीन शब्दांचा अर्थ । आणि हा सदुपदेशे यथार्थ । सर्व लोकांचे कल्याण सतत । करणार असे निश्चये ॥ ७७ ॥ अथवा संकर छेदावया । अवतरला असे म्हणोनिया । शंकराचार्य ऐसे तया । नाम ठेविते जाहले ॥ ७८ ॥ असो ऐसा कर्पूरगौर । वैदिकमार्ग स्थापावया सत्वर । ‘शंकराचार्य' नामे भूवर । निर्मळक्षेत्री अवतरला ॥ ७९ ॥ पुढे झाले उपनयन । सकळ विद्या अभ्यासून । अल्पवयांतचि संन्यासग्रहण । करिता झाला मातृ आज्ञे ॥ ८० ॥ मग सवे घेऊनि शिष्यमंडळी । तीर्थयात्रार्थ भूमंडळी । फिरता जैनमताची आगळी । प्रवृत्ति देखिली सर्वत्र ॥ ८१ ॥ देशोदेशीचे निखिलजन । शंकराचार्याचा करिती अपमान । सकळ जनांचे लागले ध्यान । जैनशास्त्राकडे पां ॥ ८२ ॥ असो ऐसे फिरता मेदिनीसी । आचार्य पातले कोल्हापुरासी । मग शिष्यांसहित एके दिवशी । ग्रामांत चालिले भिक्षार्थ ॥ ८३ ॥ घरोघरी भिक्षा याचित । येऊनि कासारांच्या आळीत । तयांजवळी भिक्षा मागत । तो हासू लागले जैन ते ॥ ८४ ॥ आणि म्हणती भिक्षा कैची येथ । कांचरस आहे कढईत । पाहिजे तरी हा समस्त । भिक्षेलागी समर्पितो ॥ ८५ ॥ तें स्वामी म्हणती कासारांप्रती । तुमची आहे जैनयाती । तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती । कांचरसचि आम्हां द्या ॥ ८६ ॥ ऐसे तयांप्रती सांगुनी । स्वामी म्हणती शिष्यालागुनी । तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करूनी । कांचरस प्राशिजे ॥ ८७ ॥ ऐसे स्वामींचे ऐकूनि वचन । भिवोनि सकळ शिष्यजन । म्हणती वाचलो तरी यासमान । बहुत गुरु संपादू ॥ ८८ ॥ हा प्रत्यक्ष तप्त कांचरस । स्पर्शतां मृत्यू येईल आम्हांस । ज्याचे त्यानेंचि घ्यावें विष । आम्हां न लगे सेवा ही ॥ ८९ ॥ ऐसे बोलून शिष्यजन । पळू लागले सर्व तेथून । मग स्वामी स्वयें ओंजळ करून । म्हणती ओता कांचरस ॥ ९० ॥ अहो पूर्वी समुद्रमंथनकाळी । कालकूटविष ज्वाळामाळी । प्रगटला येऊनि तयाजवळी । स्वयें प्राशिता झाला जो ॥ ९१ ॥ तोचि तो शंकराचार्य भगवान । तयासी काय कांचरस कठीण । कल्पांतींच्या कृशानूलागून । गिळील जाण क्षणार्धे ॥ ९२ ॥ असो मग ते दुष्ट कासार । तो तप्त कांचरस प्रखर । आचार्याच्या ओंजळींत सत्वर । ओतिते झाले भिक्षेसी ॥ ९३ ॥ जया रसाचा बिंदु तत्त्वतां । भूमीवरी पडला असतां । जळोनि जाईल भूमि समस्ता । ऐसा तप्त अत्यंत ॥ ९४ ॥ परी तो जगद्गुरु भगवान । अति शीतळ मधुर जीवन । प्यावें तैसे त्या रसा तत्क्षण । प्राशिता झाला साचार ॥ ९५ ॥ ऐसें तयाचे पाहूनि साहस । कासारांचे दचकलें मानस । म्हणती हा मैं पुराणपुरुष । धर्मस्थापनार्थ अवतरला ॥ ९६ ॥ अहो पाहतां ज्या रसाप्रती । आमुचे नेत्र गरगरा फिरती । तो रस प्याला स्वये निगुती । धन्य मूर्ति शंकराचार्य ॥ ९७ ॥ ऐसें सर्व कासारीं बोलून । घट्ट धरिले स्वामींचे चरण । मग शंकराचार्य तेथून । जैनग्रामासी पातले ॥ ९८ ॥ आणि स्वकीय शिष्टमुखेंसी । निरोपिलें मंडनमिश्रासी । कीं तुम्हीं भेटून आम्हांसी । शास्त्रविवाद कीजिये ॥ ९९ ॥ वाद स्वमतशास्त्रवैभवें । आम्हांलागीं त्वां जिंकावें । अथवा आम्हीं पराभवावें । सद्धर्मशास्त्र तुम्हांसी ॥ १०० ॥ ऐसा शंकराचार्यांचा निरोप । ऐकोनि तो महागर्वकूप । मंडनमिश्र आगळे अमूप । बोलता झाला अभिमानें ॥ १ ॥ अरे आजपर्यंत बहु पंडित । वादार्थ आले मी मी म्हणत । परी ते म्यां जिंकिले समस्त । आमुच्या जैनशास्रेसी ॥ २ ॥ आतां हा येऊनि संन्यासी । सांगोन पाठवितो आम्हांसी । तरी मी आजी जिंकीन यासी । सरस्वतीचे प्रसादें ॥ ३ ॥ ऐसें गर्वे बोलत वचन । सरस्वतीचे करूनि ध्यान । तो मंडनमिश्र जगद्गुरुलागून । जाऊनि भेटला तत्काळ ॥ ४ ॥ ते दोघेही तेजस्वी महापुरुष । केवळ जैसे चंद्रचंडांश । दोघांचेही पराक्रम विशेष । समसमान निर्धारिं ॥ ५ ॥ दोघेही बोलती एकमेकांसी । सभा करावी आजिचे दिवसीं । वेदशास्त्राची स्वमुखेंसी । चर्चा व्हावी सविस्तर ॥ ६ ॥ पूर्वपक्ष उत्तरपक्ष करोन । अर्थ विवरावा संपूर्ण । ज्यासी अर्थ न होय पूर्ण । तयाचे शास्त्र मिथ्या पैं ॥ ७ ॥ आणि जो पराजय पावेल । तद्धर्म विध्वंसूनि सकळ । ग्रंथही तयाचे तत्काळ । बुडवूनियां टाकावे ॥ ८ ॥ ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलूनि । बैसले मध्ये पडदा लावूनी । सर्व जातींचे लोक तत्क्षणीं । सभेलागुनी पातले ॥ ९ ॥ तों मंडनमिश्रे पडद्याआंत । शंकराचार्यासी नकळत । मद्यघट ठेवूनि तयांत । सरस्वती स्थापूनि पूजिली ॥ ११० ॥ तै त्या मद्याच्या घटांतूनी । सरस्वती बोले अय्यालागुनी । आतां मी शंकराचार्यांसी झणीं । शास्त्रमतें विध्वंसितें ॥ ११ ॥ तूं माझ्या मागे बैसून । चमत्कार पाहें संपूर्ण । मी तुज आहे सुप्रसन्न । वचन सत्य करीन तुझें ॥ १२ ॥ ऐसिये प्रकारे सुंदर । सरस्वतीचा ऐकूनि वर । तो महापंडित मंडनमिश्र । समाधान पावला ॥ १३ ॥ मग पडद्याआंतून । शंकराचार्यासी बोले वचन । कोणता वेद आरंभून । अर्थ करू सांग पां ॥ १४ ॥ हैं शंकराचार्य बोलत । चारी वेद करीं समाप्त । जें जें मी पुसेन यथार्थ । तें तें मजसी सांगावें ॥ १५ ॥ ठायी ठायींचे अर्थ पुसेन । त्यांचे करावें समाधान । न सांगतां पदवीपासून । भ्रष्ट करीन क्षणमात्रे ॥ १६ ॥ मग त्याच आचार्यभाषिता । मान्य करूनि तो तत्त्वतां । सरस्वतीसी म्हणे हे माता । बोलें आतां सत्वरीं ॥ १७ ॥ हैं श्रीशंकराचार्यांप्रती । बोलू लागली सरस्वती । परी शंकराचार्यांच्या चित्तीं । जैन बोलतो ऐसेच ॥ १८ ॥ म्हणोनि आचार्य बोलले । अय्या ऋग्वेद आरंभीं ये वेळे । तंव सरस्वतीने मुख काढिलें । घटांतून बाहेरी ॥ १९ ॥ प्रथम ऋग्वेद ऋचांसहित । सरस्वती चालली बोलत । ठायी ठायीं आचार्य पुसत । अर्थकूटें तेधवां ॥ १२० ॥ परी ज्याच्या मुखापासून । चारी वेद झाले उत्पन्न । त्या ब्रह्मयाचें तें कन्यारत्न न अडखळे कोटेंचि ॥ २१ ॥ शंकराचार्य जें जें पुसत । त्याचे तत्क्षणीं ती उत्तर देत । असो ऐसा ऋग्वेद समस्त । समाप्त जाणा जाहला ॥ २२ ॥ परी सरस्वती म्हणते वेद । हा आचार्थी नेणोनि भेद । आतां बोले रे यजुर्वेद । ऐसे अय्यासी सांगितले ॥ २३ ॥ तें स्वामींचे ऐकूनि भाषित । सरस्वती पडद्याआंत । यजुर्वेदालागीं त्वरित । आरंभिती जाहली ॥ २४ ॥ अस्खलित शब्द उमटती । शंकराचार्य अर्थ पुसती । परी कुशलत्वें ती सरस्वती । करी समाधान तत्काळ ॥ २५ ॥ आचार्याचा न चाले उपाव । कोठेच न होय पाडाव । मग अंतरीं एक उपाव । ऐसा त्यांनीं योजिला ॥ २६ ॥ पूर्वी ऋग्वेद जाहला । आतां यजुर्वेद असे चालला । तरी यासी ऋग्वेदांतील भला । पुनरपि प्रश्न कीजिये ॥ २७ ॥ ऐसा करूनियां निश्चय । अय्यासी बोलती आचार्य । अरे तू सांप्रत नि:संशय । यजुर्वेद बोलतोसी ॥ २८ ॥ परी ऋग्वेदामाजी देख । शंका राहिली असे एक । ती ऋचा बोलूनि सम्यक् । अर्थ सांगें पुनरपि ॥ २९ ॥ ऐशा स्वामींच्या प्रश्नाला । ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा । पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला । परी तिसी त्याचा आठव नसे ॥ १३० ॥ अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग । कीं वेदशास्त्र पुराणे सांग । आरंभापासोनि स्पष्ट सवेग । संपूर्णही म्हणे पां ॥ ३१ ॥ परी पुढे पुढे म्हणत असतां । मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था । तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा । स्मरत नसे कांहीच ॥ ३२ ॥ म्हणोनि अंतरीं गडबडोन । स्तब्ध होतसे तत्क्षण । हें तियेचें वर्म कठीण । ठावुकें नसे कोणासी ॥ ३३ ॥ परी शंकराचार्य चतुर । अंतरीं करीत विचार । ऐसे वेद सार्थ साचार । ब्रह्मांडी कोण बोलणार ॥ ३४ ॥ ब्रह्मा आणि सरस्वती । हीं मात्र बोलतील निश्चितीं । या दोघांवांचूनि जगतीं । नसे कोणी समर्थ ॥ ३५ ॥ ह्या अय्याच्या बापाचेनें । ऐसें नोहे वेद बोलणे । मग ह्या क्षुलुक पामराचेनें । कोठोनियां बोलवेल ॥ ३६ ॥ तरी येथे काही तरी । कपट आहे निर्धारीं । ऐसें जाणोनियां अंतरीं । अय्यालागीं बोलत ॥ ३७ ॥ अरे आतां उगा कां राहिलासी । मम प्रश्नासी को नोत्तरिसी । तों तो अय्या गडबडोनि मानसीं । म्हणे अनर्थ ओढवला ॥ ३८ ॥ दोन चार वेळां स्वामींनी । प्रश्निले असे अय्यालागुनी । परी तो अत्यंत भय पावोनी । कांहींच वाणी बोलेना ॥ ३९ ॥ मग शंकराचार्य उठोन । पाहती पडदा उघडोन । तों तेथे मद्यघटांतून । मुख बाहेर आलें असे ॥ १४० ॥ ते पाहतां ही सरस्वती होय । ऐसा अंतरीं करूनि निश्चय । तै जगद्गुरु शंकराचार्य । कोपें संतप्त जाहले ॥ ४१ ॥ मग सकळ पडदे फाडून । शिरीं घातला दंड दारुण । तेणें तो मद्यघट फुटोन । चूर्ण तत्क्षण जाहला ॥ ४२ ॥ आणि म्हणती हे दुराचारिणी । जैनालागी प्रसन्न होऊनी । वेदशास्त्रचर्चा रात्रंदिनी । चांडाळिणी करितेस ॥ ४३ ॥ तुझे न पाहावें जारिणी मुख । ज्याच्या पोटीं जन्मलीस देख । त्या ब्रह्मयासीच तू निःशंक । अंगभोग देसी निर्लज्जे ॥ ४४ ॥ ऐसी तूं महापापिणी । ह्या जैनासी वश होऊनी । जैनशास्त्र स्थापावया लागुनी । सर्वदा रत झालीस ॥ ४५ ॥ ह्या दुष्ट पाखांडमतासी । आश्रय देऊनि अहर्निशी । अठरा याती चार वर्णासी । एकंकार केलास ॥ ४६ ॥ जैनी झाले लोक समग्र । हा तूंचि केलासि वर्णसंकर । वेद शास्त्र पुराणे परिकर । एकीकडे राहिलीं ॥ ४७ ॥ या जैनाचीं शास्त्रे संपूर्ण । तुवां त्यांचा धरोनि अभिमान । जैनमत प्रकटवून । लोकां पाखंडी घातलेंस ॥ ४८ ॥ तुझ्या आश्रये ह्या दुष्टें स्वमतें । पृथ्वीवरील ग्रामदैवतें । स्थापूनिया स्वकीय हस्ते । भ्रष्ट केलीं सर्वही ॥ ४९ ॥ ऐसा तुझ्यायोगे सगळा । अत्यनर्थ वोढवला । तो म्यां कैलासीं ऐकियला । म्हणोनि घेतला अवतार ॥ १५० ॥ तू अनाचार केलासी अत्यंत । तरी सदा राहें नीचसुखांत । अ ंत्यजादिकांच्या गृहीं सतत । वास होवो मम शापें ॥ ५१ ॥ ऐसे रीतीं सरस्वतीप्रती । शंकरस्वामी शाप देती । मग ती कोपोनि सरस्वती । स्वामींप्रती बोलत ॥ ५२ ॥ तूं तों धर्म स्थापावयासी । साक्षात् शंकर अवतरलासी । तरी तुझा देह कीकटदेशीं । पडेल जाण मद्वचनें ॥ ५३ ॥ ऐसे स्वामींसी शापून । सरस्वती गुप्त झाली तत्क्षण । मग स्वामींचे धरूनि चरण । मंडनमिश्र लोळत ॥ ५४ ॥ परी शंकराचार्यां तत्क्षणीं । जैनशास्त्रांच्या मोटा बांधूनी । अति अगाध समुद्रजीवनीं । नेऊनियां बुडविल्या ॥ ५५ ॥ त्यांतूनि एक अमरकोश । सर्वोपयोगी असे विशेष । म्हणोनि त्या मात्र ग्रंथास । शंकराचार्यां रक्षिलें ॥ ५६ ॥ असो ऐसे जैनशास्त्रांसी । विध्वंसूनियां क्षणार्धेसी । मग जवळ पाचारूनि जनांसी । स्वामी तयांसी बोलत ॥ ५७ ॥ अहो हीं ग्रामदैवतें समस्त । आहेत खरीं जैनस्थापित । परी त्यांतें तुम्हीं सतत । भजत जावें स्वधर्मं ॥ ५८ ॥ जैनें स्थापिलीं म्हणोनी । संशय कांहीं न धरावा मनीं । आपुला धर्म आपणा लागुनी । देवापाशीं काय असे ॥ ५९ ॥ ऐसें स्वामी सकळ लोकां । सांगती तेव्हां अय्या देखा । स्वामीचरणीं स्वकीय मस्तका । ठेवूनियां विनवीत ॥ १६० ॥ म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण । तुम्हीं टाकिलें उच्छेदून । परी कृपें जैनाचे अभिधान । किंचित् तरी रक्षावें ॥ ६१ ॥ ऐसी ऐकतां दीनवाणी । कृपा उपजोनि स्वामींच्या मनीं । ग्रामदैवतांच्या सन्निधानीं । जैनाचा धोंडा स्थापिला ॥ ६२ ॥ जेथे जेथे ग्रामदैवत । तेथे जैनाचा धोंडा वसत । ग्रामदेवतांसंगें त्याप्रत । प्रतिदिनीं पूजिती ॥ ६३ ॥ असो मग स्वामी तेजोराशी । आज्ञापिती सकळ जनांसी । कीं आपुल्या जातिधर्मेसीं । पूर्वीप्रमाणे वर्तावें ॥ ६४ ॥ जरी अधर्मे वर्ताल कोणी । तरी दंडीन ऐसे बोलुनी । वेदशास्त्र पुराणें तत्क्षणीं । प्रगट केलीं साचार ॥ ६५ ॥ मग सकळही ब्राह्मण । करू लागले वेदशास्त्राध्ययन । आणि अन्य जनही संपूर्ण । वढू लागले स्वधर्मे ॥ ६६ ॥ ऐसें शंकराचार्ये दयाळे । आपुल्या उत्तम बुद्धिबळे । जैनाचें पाखंडमत आगळे । विध्वंसिले सर्वही ॥ ६७ ॥ श्रुतिस्मृत्युक्त धर्मपरिकर । सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर । तेवींच अद्वैताचा साचार । मार्ग सर्वांसी दाविला ॥ ६८ ॥ एवं महाराज शंकर । भक्तवत्सल कर्पूरगौर । अवतरोनियां भूमीवर । भूभार हरिता जाहला ॥ ६९ ॥ अहो शंकराची लीला अगाध । जो भक्तवत्सल स्वानंदकंद । सेवकां तारूनियां विशद । निजपदासी नेतसे ॥ १७० ॥ काय वर्णावे त्याचें चरित । जे दीन अनाथ सद्भक्त । शिव पंचाक्षरी षडक्षरी जपत । तयां तारील प्रसादें ॥ ७१ ॥ दाशार्ह राव आणि कलावती । बहुला विदुर पापमती । तीहीं शिवपंचाक्षरे जपतां निगुती । अक्षय गति पावलीं ॥ ७२ ॥ शबर केवळ निषाद । शिवकृपें तरला हे प्रसिद्ध । भस्म होऊनियां तद्भार्या शुद्ध । पुनरपि देहें प्रकटली ॥ ७३ ॥ श्रीशिवयोगियानें । सुमतिभद्रायूकारणे । शिवकवचाच्या उपदेशानें । पावन केलें साचार ॥ ७४ ॥ मैत्रेयीच्या उपदेशेकरूनी । शिवव्रत आचरतां सीमंतिनी । यमुनेत पति बुडाला असोनी । आला वांचोनी शिवकृपें ॥ ७५ ॥ पराशरऋषीने आपण । रुद्राभिषेकेंकरून । राजपुत्राचा मृत्यु टाळून । तयासी राज्य स्थापिलें ॥ ७६ ॥ ऐसें शिवकवच रुद्र । पडक्षरी पंचाक्षरी इत्यादि मंत्र । सर्वोद्धारक आहेत पवित्र । परी अभक्तां काय ते ॥ ७७ ॥ जरी गर्गमुनीसारिखे सद्गुरू । दाशार्हराजापरी शिष्य थोरू । भाविक असतील तरी उद्धारू । होईल जाण निश्चयें ॥ ७८ ॥ जरी भद्रायूसम शिष्यजन । शिवयोगियापरी गुरु सुजाण । तरी प्रत्यक्ष शिव प्रगटोन । नेईल शिष्या कैलासीं ॥ ७९ ॥ कलियुगामाजीं गुरु महंत । एक अडक्यासी तीन मिळत । परी सद्गुरुसम अत्यदभुत । सामर्थ्य तेथे कैंचें पां ॥ १८० ॥ द्रव्याची इच्छा धरूनि मनीं । केवळ शिष्यजनांसीं भोंदुनी । मंत्रतंत्र फुकोनि कानीं । व्यर्थ साधना लाविती ॥ ८१ ॥ शिष्यही अभाविक दुर्जन । गुरूचे पाहती सदा न्यून । म्हणोनि दोघां नरक दारुण । प्राप्त होय शेवटीं ॥ ८२ ॥ आतांचे गुरुशिष्य सकळीक । केवळ द्रव्याचें गि-हाईक । दाशार्मादिकांपरी तो एक । शिष्य न दिसे कलियुगीं ॥ ८३ ॥ सद्गुरु तो शिष्यांच्या धना । नरकासमान मानिती जाणा । सच्छिष्यही तनुमनधना । अर्पितात गुरुपायीं ॥ ८४ ॥ म्हणोनि तरले ते दाशार्हादिक । नातरी तेच मंत्र सकळीक । परी हे आतांचे जन मूर्ख । द्रव्यलोभे भुलले पैं ॥ ८५ ॥ अहो कृतयुगामाजी पाहतां । अस्थिगत प्राण होता । जेव्हां अस्थी पडती सर्वथा । तेव्हां प्राण जातसे ॥ ८६ ॥ म्हणोनि तोपर्यंत साधन । करीत बैसती अरण्य जाऊन । त्रेतायुगीं ते चर्मगत प्राण । चर्म झडतां मृत्यू होय ॥ ८७ ॥ द्वापारीं प्राण नाडीगत । नाही सुकती तों वाचत । ऐसे पूर्वी आयुष्य बहुत । होते सकळ मानवां ॥ ८८ ॥ आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे । ऐसीं तेव्हां होतीं आयुष्यें । म्हणोनि सकळ बहुत वर्षे । अनुष्ठाने आचरत ॥ ८९ ॥ आणि ऐसे तप करित । कीं जेणें अंगीं वारुळे वाढत । मग प्रसन्न होऊनि भगवंत । आपुल्या नेत पदासी ॥ १९० ॥ आतां तों अन्नमय प्राण । अन्नाविना सत्वर मरण । आणि आयुष्य तेही अपूर्ण । नोहे साधन कांहींच ॥ ९१ ॥ देहाचा नाहीं भरंवसा । कोण दिवस येईल कैसा । म्हणोनि साक्षात् जगदीशा । अंतरीं दया उद्भवली ॥ ९२ ॥ आणि औट घटिकांत पूर्ण । परमेश्वरप्राप्ती होऊन । मोक्षासी जावें उद्धरोन । ऐसा मार्ग काढिला ॥ ९३ ॥ तो मार्ग म्हणाल कवण । तरी सद्गुरूसी जावें शरण । यावीण मोक्षलाभालागून । इतर साधन नसेचि ॥ ९४ ॥ आतां सद्गुरु तो कैसा असावा । सदा आनंद तन्मनीं वसावा । वामदेव गर्ग शुक किंवा । पराशरापरी साचा ॥ ९५ ॥ शिष्यही असावे भाविक । गुरूचि मानावा ईश्वर ऐक । ऐसे घडतां हे सकळिक । जन तरतील कलियुगीं ॥ ९६ ॥ श्रीधर म्हणे श्रोतयांसी । ज्या मंत्री तरले महाऋषी । तेचि हे मंत्र तुम्हांसी । प्रकाशित केले पां ॥ ९७ ॥ ज्या मंत्रे भद्रायू तरला । जेणें दाशार्हराव उद्धरला । आणि जो मंत्र सुमतिराणीला । शिवयोगियें दिधला असे ॥ ९८ ॥ ज्या मंत्रे बहुला उद्धरली । विदुर पावला शिवपदकमळीं । आणि भ्रतारासहित तरली । सीमंतिनी ज्या मंत्रे ॥ ९९ ॥ तेचि षडक्षर पंचाक्षरी रुद्र । मृत्युंजय शिवकवच पवित्र । इत्यादि सकळही मंत्र । या ग्रंथांत कथियेले ॥ २०० ॥ परी श्रोते तुम्ही म्हणाल जरी । तेचि मंत्र असतां निर्धारी । तिंहीं सांप्रत पूर्वीच्या परी । कां न उद्धरती जन हे ॥ १ ॥ तरी जपकर्त्यांचे मन । शुद्ध असेल तरी तत्क्षण । पूर्वीप्रमाणे तयासी गुण । येईल जाण निश्चयें ॥ २ ॥ यालागीं विशुद्ध भावेंसी । जपावें या शिवमंत्रांसी । आणि सर्वांनीही अहर्निशीं । शिवलीलामृतासी ऐकिजे ॥ ३ ॥ आपुल्या प्रपंचालागुनी । सावध जैसे निशिदिनी । तैसे जरी शिवस्मरणीं । तरी मग उणें कायसे ॥ ४ ॥ कलियुगींच्या जनाकारणें । शंकराचार्य ह्या अभिधाने । अवतार घेऊनियां शिवानें । जैनमत बुडविले ॥ ५ ॥ ऐसा सद्धर्मप्रतिपालक । जो शंभु अपर्णानायक । तयाचे स्मरण करितां सकळीक । भवभय निरसे मैं ॥ ६ ॥ आपुल्या कार्यात रात्रंदिन । गुंतले असती जे का जन । ते अभागी आयुष्य सरोन । पावती निधन अकस्मात ॥ ७ ॥ जे कित्येक प्रपंची गुंतले । शिवध्यान करू विसरले । जन्मासी आले तैसेचि गेले । ते जन्मले मेले सारखेच ॥ ८ ॥ जे जन्मोनि कांही करीत नाहीं । ते शेवटीं जावोनि यमाचे गेहीं । तेथे पडोनि नरकडोहीं । अनेक भोग भोगिती ॥ ९ ॥ अणि पुनरपि नाना योनींत । जन्मोनि अनंत दुःखे भोगित । एवं संसृतीच्या आवर्तात । बुचकळत सर्वदा ॥ २१० ॥ म्हणोनि सांगतों सर्वांलागुन । शिवचरणीं भाव धरोन । करितां शिवलीलामृतपान । जन्ममरण खंडेल ॥ ११ ॥ शिवस्मरणकर्यांजनांसी । शिव नेतो मोक्षपदासी । ब्राह्मणादि सर्व जातीसी । शिवस्मरण तारक ॥ १२ ॥ परी ब्राह्मण आपुल्या कर्मात । बैसती बहुत ग्रंथ घोकित । आणि प्रपंचीं होऊनि रत । शिवस्मरण विसरले ॥ १३ ॥ आणि क्षत्रिय ते संपूर्ण । नाना शस्त्रे सांभाळून । सदा युद्ध इच्छिती म्हणोन । शिवस्मरण विसरले ॥ १४ ॥ वैश्य ते आपुल्या व्यवहारेंसी । द्रव्याची दुणाई इच्छूनि मानसीं । तागडी धरिती अहर्निशी । शिवस्मरण मग कैचें ॥ १५ ॥ कुणब्यासी नाहीं घरदार । नित्य नूतन संसार । भूमिसेवा करिती निरंतर । मग शिवस्मरण कैचें तयां ॥ १६ ॥ सोनार सुतार कासार । करीत आपुले व्यवहार । प्रपंचीं गुंतले निरंतर । मग शिवस्मरण कोठूनी ॥ १७ ॥ ऐशा सकळही यातीं । आपुल्या व्यवहारीं गुंतती । जन्ममरणांच्या आवृत्ती । न सुटती साचार ॥ १८ ॥ पुनःपुनः जन्ममरणें । चौथ्याऐंशी लक्ष योनी भोगणें । परी तयांच्या परिहाराकारणें । शिवनामामृत समर्थ ॥ १९ ॥ यालागीं शिवलीलामृत ग्रंथ । पापीजनोद्धारक निश्चित । याते जे श्रवण पठण करीत । ते जन होत शिवरूपी ॥ २२० ॥ एक मंडळामाझारी । म्हणजे बेचाळीस दिनाभीतरीं । सदा शिवमूर्ति ध्याऊनि अंतरीं । सात आवर्तने करिती जे ॥ २१ ॥ तयां श्रीगौरीरमण । प्रत्यक्ष देऊनियां दर्शन । सकळ कामना करितो पूर्ण । ऐसा महिमा ग्रंथाचा ॥ २२ ॥ श्रावणमासीं सोमवारी । एक एक आवर्तन जो करी । श्रीशंकर तयाचे घरीं । वास करितो सर्वदा ॥ २३ ॥ श्रीशंकर झालिया प्रसन्न । जगीं तयासी काय न्यून । जैसी कामधेनू मिळतां संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात ॥ २४ ॥ जरी पाहिजे शंभूची कृपा । तरी हा आहे मार्ग सोपा । करीत पंचाक्षरादि मंत्रजपा । शिवलीलामृत वाचावें ॥ २५ ॥ शनिप्रदोषीं शिवरात्रिदिनीं । आवर्तने करितां तत्क्षणीं । सर्व बंधमुक्त होऊनी । इच्छिला पदार्थ लाधतो ॥ २६ ॥ आतां शंकेल श्रोत्यांचे मन । श्रीशिवमंत्राच्या जपेंकरून । जैसीं दाशार्हाच्या अंगांतून । पापें निघालीं काकरूपें ॥ २७ ॥ तेवीं पंचाक्षरीमंत्राचा जप । आम्ही करीत असतां अमूप । काकरूपें आमुचे पाप । गेलें कां न दिसे पैं ॥ २८ ॥ तरी श्रोतेजन हो ऐका । ऐसी अंतरीं न धरा शंका । स्कंदपुराणीं व्यासें जें का । लिहिलें तेंचि हें कथिलेंसे ॥ २९ ॥ यालागीं हें असत्य म्हणतां । जिव्हेसी कीटक पडतील तत्त्वता । दाशार्हापरी भावें वर्तता । पापें भस्म होतील ॥ २३० ॥ चौदा अध्यायांभीतरीं । जे मंत्र कथिले ऋषीश्वरीं । तिहीं निष्पाप होऊनि सत्वरी । बहुत जन उद्धरले ॥ ३१ ॥ शिवकवचे भद्रायूबाळ । शिवमंत्रे शारदा निर्मळ । राजपुत्राचा आलेला काळ । रुद्रावर्तने परतला ॥ ३२ ॥ शबरस्त्री भस्म झाली । परी ती नैवेद्यार्पणाच्या वेळी । अन्नपात्र घेऊनि पतीजवळी । उभी राहिली पूर्ववत ॥ ३३ ॥ बहुला ती केवळ पातकी । पश्चात्तापें गेली स्वर्गलोकीं । विदुरभ्रतार होता नरकीं । तोही तेथे आणविला ॥ ३४ ॥ वामदेवें ब्रह्मराक्षसास । गौतमें कल्माषपादरायास । श्रीशिवें श्रियाळचांगुणेस । आणि चिलयास उद्धरिलें ॥ ३५ ॥ दाशार्हराव आणि कलावती । शिवमंत्रे पावलीं मुक्ती । व्याध तरला अरण्यपंथी । कीर्तनश्रवणमात्रेच ॥ ३६ ॥ गोरक्षकबाळ अज्ञान । तोही तरला शिवमंत्रेकरून । मंत्रांत मंत्र श्रेष्ठ हे दोन । पंचाक्षरी आणि षडाक्षरी ॥ ३७ ॥ शिवकवच महामंत्रासहित । मृत्युंजय भस्ममंत्र विख्यात । रुद्रावर्तन चिताभस्मपूत आणि शिवदर्शन उत्तम ॥ ३८ ॥ ह्यांची माहात्म्ये संपूर्ण । चौदा अध्यायांत वर्णन । ह्या पंधराव्या अध्यायीं आख्यान । जगद्गुरूचे कथियेलें ॥ ३९ ॥ स्कंदाप्रती शंकर सांगत । जे ह्या मंत्रासी मुखें बोलत । तयां मी प्रत्यक्ष उमानाथ । दर्शन देतों प्रीतीनें ॥ २४० ॥ जो शिवलीलेसी पठण करी । तयासी प्रसन्न गिरिकुमारी । आणि मीही तयासी अहोरात्रीं । न विसंबें निश्चयें ॥ ४१ ॥ ऐसें श्रीगिरिजानाथ । कथिते जाहले स्कंदाप्रत । म्हणोनि मीही तैसेचि येथ । वर्णियेलें असे पां ॥ ४२ ॥ मी आपल्या पदरींचे कांहीं । उगाच वर्णन केले नाही । श्रोतेजनी हृदयाठायीं । विकल्प कांहीं न धरावा ॥ ४३ ॥ शिवलीलेचे चौदा अध्याय । हा पंधरावा कोठील काय । ऐसा मनीं विकल्प होय । तरी सांगतो ऐकिजे ॥ ४४ ॥ ज्या शिवें भक्त तारिले अपार । आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र त्यानेच ह्या कलियुगीं अवतार । धर्मस्थापनार्थ घेतला ॥ ४५ ॥ शिवमहिमा अगाध । सकळही कीजे प्रसिद्ध । म्हणोनि पंधरावा अध्याय शुद्ध । शिवाज्ञेनें वर्णिला ॥ ४६ ॥ पूर्वयुगीं जी लीला वर्तली । ती चौदा अध्यायीं वर्णिली । कलियुगीं श्रीचंद्रमौळी । शंकराचार्य अवतरले ॥ ४७ ॥ तेंचि सविस्तर कथन । या पंधराव्यांत केलें पूर्ण । श्रोतीं श्रवणार्थ रात्रंदिन । सादर असावें साचार | ॥ ४८ ॥ हे पंधरा अध्याय संपूर्ण । नित्य करावे श्रवणपठण । अथवा सात पारायणे । अत्यादरें करावीं ॥ ४९ ॥ मद्य मांस भक्षून । न करावें ग्रंथपठण । कीं स्नान केल्यावांचून । पारायण न करावें ॥ २५० ॥ रजस्वलेच्या श्रवणीं । न पडावा हा मंत्रशिरोमणी । कीं अभक्ष्यभक्ष्य भक्षूनी । शिवू नये या ग्रंथा ॥ ५१ ॥ आणि जो दुष्ट दुर्जन । अविश्वासू निंदक महान । तयाच्याही श्रवणीं जाण । न घालावा सर्वथा ॥ ५२ ॥ रजस्वला स्त्रियांसमान । दुर्जननिंदकांचे मन । केवळ अशुद्ध असते म्हणोन । ग्रंथश्रवणा योग्य नव्हे ॥ ५३ ॥ ह्या ग्रंथाच्या पठणेकरून । इच्छिले सर्व प्राप्त होऊन । गंडांतरे रोग मृत्यु पाप ऋण । दरिद्र संकटें निरसती ॥ ५४ ॥ अष्टकुष्ठादि रोग निरसती । शृंखळादि बंधने तुटती । आयुष्यवर्धन धनसंतती । अखंडित होय पां ॥ ५५ ॥ आणि तुष्टि पुष्टि सायुज्यसदन । पठणमात्रे लाधतेपूर्ण । याच्या नित्यपारायणासमान । पुण्य नाहीं दुसरें ॥ ५६ ॥ पंधरा अध्याय ग्रंथ सकळ । जरी नित्य नेमें न वाचवेल । तरी बेचाळीस ओंव्या सोज्वळ । भक्तिभावें वाचाव्या ॥ ५७ ॥ नित्य प्रभातीं स्नान करून । बेचाळीस ओंव्या वाचितां पूर्ण । सर्व शिवलीलामृत पठण । केल्याचे पुण्य येईल ॥ ५८ ॥ शिवलीलामृत ग्रंथ विशेष । पंधरा अध्याय बहुत सुरस । त्यांतील निवडोनि सारांश । बेचाळीस ओंव्या काढल्या ॥ ५९ ॥ आतां बेचाळीस ओंव्या कोणत्या । तरी सांगतों ऐकाव्या त्या । श्रवणमात्रे सकळ श्रोत्यां । स्वर्गप्राप्ती निश्चयें ॥ २६० ॥ नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ॐनमोजी शिवा अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्णब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्गुरु ॥ ६१ ॥ ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ ६२ ॥ जय जय विरूपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमना मनमोहना । कर्ममोचका विश्वंभरा ॥ ६३ ॥ जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण । नाना संकष्टें विघ्ने दारुण । न बाधती कालत्रयीं ॥ ६४ ॥ संकेते अथवा हास्येंकरून । भलत्या मिषे घडो शिवस्मरण । न कळतां परिस लोहालागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥ ६५ ॥ न कळत प्राशितां अमृत । अमर काया होत यथार्थ । औषध नेणतां भक्षीत । परी रोग हरे तत्काळ ॥ ६६ ॥ जयजय मंगलधामा । निजजनतारक आत्मारामा । चराचरफलांकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥ १७ ॥ हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंदाभाललोचना । भवभंजना महेश्वरा ॥ ६८ ॥ हे शिवा वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशाना ईश्वरा । अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ ६९ ॥ धराधरेंद्रमानससरोवरीं । तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीं । तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥ २७० ॥ न कळे तुझे आदिमध्यावसान । आपणचि सर्व कर्ता कारण । कोठे प्रकटसी याचे अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मादिकां ॥ ७१ ॥ जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रकटसी जगन्निवास । सर्वकाळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥ ७२ ॥ सदाशिव हीं अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । तो परम पावन संसारीं । होऊनि तारी इतरांतें ॥ ७३ ॥ बहुत शास्त्रवक्ते नर । प्रायश्चितांचे करितां विचार । परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्चित आगळे ॥ ७४ ॥ नामाचा महिमा अदभुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ७५ ॥ जयजयाजी पंचवदना । महापापद्रुमनिकुंतना । मदमत्सरकाननदहना । निरंजना भवहारका ॥ ७६ ॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा । पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥ ७७ ॥ नीलग्रीवा अहिभूषणा । नंदीवहना अंधकमर्दना । दक्षप्रजापतिमखभंजना । दानवदमना दयानिधे ॥ ७८ ॥ जयजय किशोरचंद्रशेखरा । उर्वीधरेंद्रनंदिनीवरा । त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥ ७९ ॥ कोटिभानुतेजा अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा । समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्ता त्रयिमूर्ते ॥ २८० ॥ परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा । पशुपते पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥ ८१ ॥ जयजय श्रीब्रह्मानंदमूर्ती । तूं वंद्य भोळा चक्रवर्ती । शिवयोगीरूपें भद्रायूप्रती । अगाध नीती कथिलीस ॥ ८२ ॥ जयजय भस्मोद्धूलितांगा । योगिध्येया भक्तभवभंगा । सकलजनआराध्यलिंगा । नेईं वेगीं तुजपासीं ॥ ८३ ॥ जेथें नाहीं शिवाचे नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम । धिक् गृह पुर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥ ८४ ॥ जेथे शिवनामाचा उच्चार । तेथे कैचा जन्ममृत्युसंसार । ज्यांसी शिवशिव छंद निरंतर त्यांहीं जिंकिलें कळिकाळा ॥ ८५ ॥ जयाची शिवनामी भक्ती । तयाची पापे सर्व जळती । आणि चुके पुनरावृत्ती । तो केवळ शिवरूप ॥ ८६ ॥ जैसे प्राणियांचे चित्त । विषयीं गुंते अहोरात । तैसें शिवनामीं जरी लागत । तरी मग बंधन कैचें ॥ ८७ ॥ कामगजविदारक पंचानना । क्रोधजलदप्रभंजना । लोभांधकारचंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥ ८८ ॥ मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना । लोभमहासागरशोषणा । अगस्त्यमहामुनिवर्या ॥ ८९ ॥ आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा । रुंडमालांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥ २९० ॥ धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण । सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥ ९१ ॥ सूत सांगे शौनकादिकांप्रती । जे भस्म रुद्राक्ष धारण करिती । त्यांच्या पुण्यासी नाहीं गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥ ९२ ॥ जे करिती रुद्राक्षधारण । त्यांसी वंदिती शक्र द्रुहिण । केवळ तयांचे घेतां दर्शन । तरती जन तत्काळ ॥ ९३ ॥ ब्राह्मणादि चार वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण । स्त्री बाल वृद्ध आणि तरुण । यहीं शिवकीर्तन करावें ॥ ९४ ॥ शिवकीर्तन नावडे अणुमात्र । ते अत्यंत जाणूनि अपवित्र । लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥ ९५ ॥ जरी भक्षिती मिष्टान्न । तरी ते केवळ पशुसमान । मयूरांगींचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥ ९६ ॥ शिव शिव म्हणतां वाचे । मूळ न राहे पापाचें । ऐसे माहात्म्य शंकराचें । निगमागम वर्णिती ॥ ९७ ॥ जो जगदात्मा सदाशिव । ज्यासी वंदिती कमलोद्भव । गजास्य इंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥ ९८ ॥ जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाहृदयाब्ज़मिलिंद । शुद्ध चैतन्य जगदादिकंद । विश्वंभर दयाब्धी ॥ ९९ ॥ जो पंचमुख पंचदशनयन । भार्गववरद भक्तजीवन । अघोर भस्मासुरमर्दन । भेदातीत भूतपती ॥ ३०० ॥ तो तू स्वजनभद्रकारका । संकट रक्षिसी भोळे भाविकां । ऐसी कीर्ति अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडीं ॥ १ ॥ म्हणोनि भावें तुजलागून । शरण रिघालों असें मी दीन । तरी या संकटांतून काढूनि पूर्ण संरक्षीं ॥ २ ॥ (नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त) ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । ह्या बेचाळीस ओंव्या समग्र । शिवलीलामृताचे होय सार । श्रोतीं निरंतर परिसाव्या ॥ ३ ॥ सकळ शिवलीलामृताचें । आणि ह्या बेचाळीस ओंव्यांचे । श्रवण पठण केल्याचें । फळ असे समान ॥ ४ ॥ जेवीं इक्षुरस गाळुनी । शर्करा काढिजे त्यांतुनी । तेवींचि हे शिवलीलेंतूनी । सार काढिलें सज्जनार्थ ॥ ५ ॥ कोणी व्यवहारीं गुंतत । म्हणोनि वाचवेना सर्व ग्रंथ । कित्येक ते आळस करित । ग्रंथ विस्तृत म्हणोनियां ॥ ६ ॥ हे जाणोनियां अंतरांत । शंकरआज्ञे नित्य पठणार्थ । श्रीशिवलीलेच्या सारभूत । ऐशा ह्या ओंव्या रचियेल्या ॥ ७ ॥ भोळा चक्रवर्ती उदार । भक्तवत्सल कर्पूरगौर । तारावया जन समग्र । नाना उपाय करीतसे ॥ ८ ॥ तो दीनजनांचा कनवाळू । नाना रीतीं करीत सांभाळू । परी हे दुर्जन कृतघ्न केवळू । मुखें नामही न घेती पां ॥ ९ ॥ शिवनाम मुखीं असावे म्हणोन । साधुसंत करिती यत्न । परी हे सर्व अतिमूर्ख जन । प्रपंचीं गुंतोन पडताती ॥ १० ॥ तरणिउदयापासून । अस्तमानापर्यंत अनुदिन । निंदावाद मुखांतून । परी शिवनाम न येचि ॥ ११ ॥ यालागीं सज्जनालागूनी । विनवितो उभय हस्त जोडोनी । शिवलीलामृत पठणे करूनी । मोक्ष जोडूनि घेइजे ॥ १२ ॥ नित्य समस्त नोहे पठण । तरी बेचाळीस ओंव्या संपूर्ण । वाचितां शुद्धभावेंकरून । मनोरथ पूर्ण होतील ॥ १३ ॥ पंचाक्षरी षडक्षरी मृत्युंजय । इत्यादि मंत्र जपतां दिव्य । काशीविश्वेश्वराचे दर्शन भव्य । घेतलें ऐसे होतसे ॥ १४ ॥ श्रीविश्वेश्वराच्या मुखांतील । हे मंत्र आहेत सकळ । म्हणोनि तो जाश्वनीळ । प्रत्यक्ष होय जपकर्त्या ॥ १५ ॥ आतां शेवटीं मी श्रीधर । श्रोतयांप्रती जोडून कर । विनंती करितों ही सादर । अंतरामाजीं ठेवावी ॥ १६ ॥ पंचाक्षरी षडक्षरी रुद्र । शिवकवच मृत्युंजयादि मंत्र । शिवलीलामृतामाजी पवित्र आहेत जाणा निर्धारिं ॥ १७ ॥ यालागी हा उत्तम ग्रंथ । कदापि न द्यावी दुर्जनाप्रत । तथापि देणार तरी निश्चित । इतुकें गुह्य राखावें ॥ १८ ॥ हा पंधरावा अध्याय संपूर्ण । आणि मंत्र न द्यावे निंदकालागून । एवढे श्रीधर हस्त जोडून । श्रोतयांप्रती मागत ॥ १९ ॥ हा शिवलीलामृत ग्रंथ । श्रीमत्स्कंदपुराणांतर्गत । ब्रह्मोत्तरखंडींचा अर्थ असे यथार्थ सर्वही ॥ २० ॥ स्कंदपुराणीं व्यासनारायणे । जैसे कथिले संस्कृत भाषेनें । आणि नैमिषारण्य सूतानें । जैसे ऋषींसी कथिलें पैं ॥ २१ ॥ तैसें हें प्राकृत भाषेत समस्त । पंधरा अध्याय शिवलीलामृत । रचिलें येणें श्रीविश्वनाथ । असो प्रीत सर्वदा ॥ २२ ॥ जैसे शंकरें कर्णी कथिलें । तैसें पत्रीं असे लिहिलें । न्यूनाधिक यद्यपि जाहलें । तरी दोष नसे मजवरी ॥ २३ ॥ जयजय शिवा कर्पूरगौरा । ब्रह्मानंदा जगदुद्धारा । श्रीधरहृदयारविंदभ्रमरा । अक्षय अभंगा दयानिधे ॥ २४ ॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । रसभरित जेवीं इक्षुदंड । संत सज्जन परिसोत अखंड । पंचदशाध्याय गोड हा ॥ ३२५ ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु ॥ ॥ इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त ॥ |