|
॥ श्रीशिवलीलामृत ॥ ॥ अध्याय चौथा ॥
श्रीगणेशाय नमः ॥
धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर । मराळ उदार कर्पूरगौर । अगम्य गुण अपार । तुझे वर्णिती सर्वदा ॥ १ ॥ न कळे जयाचे मूळ मध्य अवसान । आपणचि सर्व कर्ता कारण । कोठे प्रगटेल ज्याचे आगमन । ठायीं न पडे ब्रह्मादिका ॥ २ ॥ जाणोनि भक्तांचे मानस । तेथेच प्रगटे जगन्निवास । येचविषयी सूते इतिहास । शौनकादिकांप्रती सांगितला ॥ ३ ॥ किरातदेशीचा राजा विमर्शन । परम प्रतापी शत्रुभंजन । मृगया करीत हिंसक दारुण । मद्यमांसी रत सदा ॥ ४ ॥ चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगीत । निर्दय अधर्मेचि वर्तत । परी शिवभजनी असे रत । विधीने पूजित नित्य शिवासी ॥ ५ ॥ त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती । परम चतुर गुणवती । पतीप्रति पुसे एकांती । कापट्यरीति टाकोनिया ॥ ६ ॥ म्हणे शिवव्रत आचरता बहुवस । शिवरात्रि सोमवार प्रदोष । गीतनृत्य स्वये करिता विशेष । शिवलीलामृत वर्णिता ॥ ७ ॥ दोषही घडती तुम्हांपासून । इकडे शिवभजनी सावधान । मग तो राजा विमर्शन । वर्तमान सांगे पुरातन पै ॥ ८ ॥ मी पूर्वी पंपा नाम नगरी । सारमेय होतो सुंदरी । तो माघ वद्य चतुर्दशी शिवरात्री । शिवमंदिरासमोर आलो ॥ ९ ॥ शिवपूजा पाहिली समस्त । द्वारी उभे होते राजदूत । तिही दंड मारिता त्वरित । सव्य पळत प्रदक्षिणा करी ॥ १० ॥ आणीक आलो परतोनी । बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी । मागुती दटाविता त्यांनी । प्रदक्षिणा केल्या शिवसदना ॥ ११ ॥ मागुती बैसलो येऊन । तव तिही क्रोधे मारिला बाण । म्या शिवलिंग पुढे लक्षून । तेथेच प्राण सोडिला ॥ १२ ॥ त्या पुण्यकर्मेकरून । आता राजदेह पावलो जाण । परी श्वानाचे दुष्ट गुण । नाना दोष आचरे ॥ १३ ॥ कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान । तरी मी कोण होते सांगा मजलागून । मग तो बोले विमर्शन । कपोती होतीस पूर्वी तू ॥ १४ ॥ मांसपिंड नेता मुखी धरून । पाठी लागला पक्षी श्येन । शिवालयास प्रदक्षिणा तीन । करूनि बैसलीस शिखरी ॥ १५ ॥ तू श्रमलीस अत्यंत । तुज श्येन पक्षी मारीत । शिवसदनासमोर शरीर पडत । ती राणी सत्य झालीस तू ॥ १६ ॥ मग कुमुद्वती म्हणे रायास । तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष । तुम्हीआम्ही आऊ जाऊ कोण्या जन्मास । सांगा समस्त वृत्तांत हा ॥ १७ ॥ यावरी तो राव म्हणे । ऐके मृगनेत्रे इभगमने । सिंधुदेशीचा नृप इंदुवदने । होईन पुढिलिये जन्मी मी ॥ १८ ॥ तू जयानामे राजकन्या होसी । मजलागी राजसे वरिसी । तिसरे जन्मी सौराष्ट्रराव नेमेसी । होईन सत्य गुणसरिते ॥ १९ ॥ तू कलिंगकन्या होऊन । मज वरिसी सत्य जाण । चौथे जन्मी गांधारराव होऊन । तू मागधकन्या होऊन वरिसी मज ॥ २० ॥ पाचवे जन्मी अवंतीराज । दाशार्ह कन्या तू पावसी मज । सहावे जन्मी आनर्तपति सहज । तू ययातिकन्या गुणवती ॥ २१ ॥ सातवे जन्मी पांड्यराजा होऊन । तू पद्मराजकन्या वसुमती पूर्ण । तेथे मी बहुत ख्याति करून । शत्रु दंडीन शिवप्रतापे ॥ २२ ॥ महाधर्म वाढवीन । जन्मोजन्मी शिवभजन करीन । मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन । तपास जाईन महावना ॥ २३ ॥ शरण रिघेन अगस्तीस । शैवदीक्षा घेऊन निर्दोष । शुभवदने तुजसमवेत कैलास- । पद पावेन निर्धारे ॥ २४ ॥ सूत म्हणे शौनकादिकांप्रती । तितुकेही जन्म घेवोनि तो भूपती । ब्रह्मवेत्ता होऊनि अंती । अक्षय शिवपद पावला ॥ २५ ॥ ऐसा शिवभजनाचा महिमा । वर्णू न शके द्रुहिण सुत्रामा । वेदशास्त्रांसी सीमा । न कळे ज्याची वर्णावया ॥ २६ ॥ ऐकून शिवगुणकीर्तन । सद्गद न होय जयाचे मन । अश्रुधारा नयन । जयाचे कदा न वाहती ॥ २७ ॥ धिक् त्याचे जिणे धिक् कर्म । धिक् विद्या धिक् धर्म । तो वाचोनि काय अधम । दुरात्मा व्यर्थ संसारी ॥ २८ ॥ ऐक शिवभजनाची थोरी । उज्जयिनी नामे महानगरी । राव चंद्रसेन राज्य करी । न्यायनीतीकरूनिया ॥ २९ ॥ ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर । त्याचे भजनी रत नृपवर । मित्र एक नाम मणिभद्र । प्राणसखा रायाचा ॥ ३० ॥ मित्र चतुर आणि पवित्र । देशिक सर्वज्ञ दयासागर । शिष्य भाविक आणि उदार । पूर्वसुकृते प्राप्त होय ॥ ३१ ॥ गृहिणी सुंदर आणि पतिव्रता । पुत्र भक्त आणि सभाग्यता । व्युत्पन्न आणि सुरस वक्ता । होय विशेष सुकृते ॥ ३२ ॥ दिव्य हिरा आणि परीस । मुक्ताफळ सुढाळ सुरस । पिता ज्ञानी गुरू तोचि विशेष । हे अपूर्व त्रिभुवनी ॥ ३३ ॥ ऐसा तो राव चंद्रसेन । मित्र मणिभद्र अति सुजाण । तेणे एक मणि दिधला आणोन । चंडकिरण दूसरा ॥ ३४ ॥ अष्टधातूंचा होता स्पर्श । होय चामीकर बावनकस । सर्पव्याघ्रतस्करवास । राष्ट्रात नसे त्याकरिता ॥ ३५ ॥ त्या मण्याचे होता दर्शन । सर्व रोग जाती भस्म होऊन । दुर्भिक्ष शोक अवर्षण । दारिद्रय नाही नगरात ॥ ३६ ॥ तो कंठी बांधिता प्रकाशवंत । राव दिसे जैसा पुरुहूत । समरांगणी जय अद्भुत । न ये अपयश कालत्रयी ॥ ३७ ॥ जे करावया येती वैर । ते आपणचि होती प्राणमित्र । आयुरारोग्य ऐश्वर्य अपार । चढत चालिले नृपाचे ॥ ३८ ॥ भूप तो सर्वगुणी वरिष्ठ । की शिवभजनी गंगेचा लोट । की विवेकभावरत्नांचा मुकुट । समुद्र सुभट चातुर्याचा ॥ ३९ ॥ की वैराग्यसरोवरीचा मराळ । की शांतिउद्यानीचा तपस्वी निर्मळ । की ज्ञानामृताचा विशाळ । कूपचि काय उचंबळला ॥ ४० ॥ ऐश्वर्य वाढता प्रबळ । द्वेष करिती पृथ्वीचे भूपाळ । मणि मागो पाठविती सकळ । स्पर्धा बळे वाढविती ॥ ४१ ॥ बहुतांसी असह्य झाले । अवनीचे भूभुज एकवटले । अपार दळ घेवोनि आले । वेढिले नगर रायाचे ॥ ४२ ॥ इंदिरावर कमलदलनयन । त्याचे कंठी कौस्तुभ जाण । की मृडानीवरमौळी रोहिणीरमण । प्रकाशधन मणि तैसा ॥ ४३ ॥ तो मणि आम्हासी दे त्वरित । म्हणोनि नृपांनी पाठविले दूत । मग राव विचारी मनात । कैसा अनर्थ ओढवला ॥ ४४ ॥ थोर वस्तूंचे संग्रहण । तेचि अनर्थासी कारण । ज्याकारणे जे भूषण । तेचि विदूषणरूप होय ॥ ४५ ॥ अतिरूप अतिधन । अतिविद्या अतिप्रीति पूर्ण । अतिभोग अतिभूषण । विघ्नासी कारण तेचि होय ॥ ४६ ॥ बोले राव चंद्रसेन । मणि जरी द्यावा यालागून । तरी जाईल क्षात्रपण । युद्ध दारुण न करवे ॥ ४७ ॥ आता स्वामी महाकाळेश्वर । करुणासिंधु कर्पूरगौर । जो दीनरक्षण जगदुद्धार । बज्रपंजर भक्तांसी ॥ ४८ ॥ त्यासी शरण जाऊ ये अवसरी । जो भक्तकाजकैवारी । जो त्रिपुरांतक हिमनग-कुमारी - । प्राणवल्लभ जगदात्मा ॥ ४९ ॥ पूजासामग्री सिद्ध करून । शिवमंदिरी बैसला जाऊन । सकळ चिंता सोडून । विधियुक्त पूजन आरंभिले ॥ ५० ॥ बाहेर सेना घेऊन प्रधान । युद्ध करीत शिव स्मरून । महायंत्रांचे नगरावरून । मार होती अनिवार ॥ ५१ ॥ सर्व चिंता सोडूनि चंद्रसेन । चंद्रचूड आराधी प्रीतीकरून । करी श्रौतमिश्रित त्र्यंबकपूजन । मानसध्यान यथाविधी ॥ ५२ ॥ बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ । परी चिंतारहित भूपति प्रेमळ । देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ । चतुर्विध वाद्ये वाजताती ॥ ५३ ॥ राव करीत महापूजन । पौरजन विलोकिती मिळोन । त्यात एक गोपगृहिणी पतिहीन । कुमार कडिये घेऊन पातली ॥ ५४ ॥ सहा वर्षांचा बाळ । राजा पूजा करिता पाहे सकळ । निरखोनिया वाढवेळ । गोपगृहिणी आली घरा ॥ ५५ ॥ कुमार कडेखालता उतरोन । आपण करी गृहीचे कारण । शेजारी उद्वस तृणसदन । बाळ जाऊनि बैसला तेथे ॥ ५६ ॥ लिंगाकृति पाषाण पाहून । मृत्तिकेची वेदिका करून । दिव्य शिवप्रतिमा मांडून । करी स्थापन प्रीतीने ॥ ५७ ॥ कोणी दुजे नाही तेथ । लघुपाषाण आणोनि त्वरित । पद्मासनी पूजा यथार्थ । पाषाणचि वाहे प्रीतीने ॥ ५८ ॥ राजपूजा मनात आठवून । पदार्थमात्राविषयी वाहे पाषाण । धूप दीप नैवेद्य पूर्ण । तेणेचिकरून करीतसे ॥ ५९ ॥ आर्द्र तृण पुष्पध्या सुवासहीन । तेचि वाहे आवडीकरून । नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन । प्रेमभावे पूजीतसे ॥ ६० ॥ परीमळद्रव्ये कैचि जवळी । शिवावरी मृत्तिका उधळी । मृत्तिकाच घेवोनि करकमळी । पुष्पांजुळी समर्पित ॥ ६१ ॥ एवं रायाऐसे केले पूजन । मग मानसपूजा कर जोडून । ध्यान करी नेत्र झाकून । शंकरी मन दृढ जडले ॥ ६२ ॥ मातेने स्वयंपाक करून । ये बा पुत्रा करी भोजन । बहु वेळा हाक फोडोन । पाचारिता नेदी प्रत्युत्तर ॥ ६३ ॥ म्हणोनि बाहेर येवोनि पाहे । तव शून्यगृही बैसला आहे । म्हणे अर्भका मांडिले काये । चाल भोजना झडकरी ॥ ६४ ॥ परी नेदी प्रत्युत्तर । मातेने क्रोधेकरूनि सत्वर । त्याचे लिंग आणि पूजा समग्र । निरखूनिया झुगारिली ॥ ६५ ॥ चाल भोजना त्वरित । म्हणोनि हस्तकी धरूनि ओढीत । बाळ नेत्र उघडोनि पाहत । तव शिवपूजा विदारिली ॥ ६६ ॥ अहा शिव शिव म्हणोन । घेत वक्षःस्थळ बडवून । दुःखे पडला मूर्च्छा येऊन । म्हणे प्राण देईन मी आता ॥ ६७ ॥ गालिप्रदाने देऊन । माता जाऊनि करी भोजन । जीर्ण वस्त्र पांघरून । तृणसेजे पहुडली ॥ ६८ ॥ इकडे पूजा भंगली म्हणून । बाळ रडे शिवनाम घेऊन । तंव तो दयाळ उमारमण । अद्भुत नवल पै केले ॥ ६९ ॥ तृणगृह होते जे जर्जर । झाले रत्नखचित शिवमंदिर । हिर्यांचे स्तंभ वरी शिखर । नाना रत्नांचे कळस झळकती ॥ ७० ॥ चारी द्वारे रत्नखचित । मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजित । चंद्रप्रभेहूनि अमित । प्रभा ज्योतिर्लिंगाची ॥ ७१ ॥ नेत्र उघडोनि बाळ पहात । तव राजोपचारे पूजा दिसत । सिद्ध करोनि ठेविली समस्त । बाळ नाचत ब्रह्मानंदे ॥ ७२ ॥ यथासांग महापूजन । बाळें केले प्रीतीकरून । षोडशोपचारे पूजा समर्पून । पुष्पांजुळी वाहतसे ॥ ७३ ॥ शिवनामावळी उच्चारीत । बाळ कीर्तनरंगी नाचत । शिव म्हणे माग त्वरित । प्रसन्न झालो बाळका रे ॥ ७४ ॥ बाळक म्हणे ते वेळी । मम मातेने तुझी पूजा भंगिली । तो अन्याय पोटात घाली । चंद्रमौळी अवश्य म्हणे ॥ ७५ ॥ मातेसी दर्शना आणितो येथ । म्हणोनि गेला आपुले गृहात । तव ते देखिले रत्नखचित । माता निद्रिस्त दिव्यमंचकी ॥ ७६ ॥ पहिले स्वरूप पालटून । झाली ते नारी पद्मीण । सर्वालंकारेकरोन । शोभायमान पहुडली ॥ ७७ ॥ तीस बाळके जागे करून । म्हणे चाल घेई शिवदर्शन । तव ती पाहे चहूकडे विलोकून । अद्भुत करणी शिवाची ॥ ७८ ॥ हृदयी धरूनि दृढ बाळ । शिवालया आली तात्काळ । म्हणे धन्य तू शिव दयाळ । धन्य बाळ भक्त हा ॥ ७९ ॥ गोपदारा गेली राजगृहा धावून । चंद्रसेना सांगे वर्तमान । राव वेगे आला प्रीतीकरून । धरी चरण बाळकाचे ॥ ८० ॥ शंकराची अद्भुत करणी । राव आश्चर्य करून पाहे नयनी । नागरिक जनांच्या श्रेणी । धावती बाळ पहावया ॥ ८१ ॥ दिगंतरी गांजली हाक बहुत । बाळकासी पावला उमानाथ । अवंतीनगरा येती धावत । जन अपार पहावया ॥ ८२ ॥ चंद्रसेन रायाप्रती । नृप अवनीचे सांगोनि पाठविती । धन्य धन्य तुझी भक्ती । गिरिजावर प्रसन्न तूते ॥ ८३ ॥ आम्ही टाकूनि द्वेष दुर्वासना । तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना । तो बाळ पाहू नयना । कैलासराणा प्रसन्न ज्यासी ॥ ८४ ॥ ऐसे ऐकता चंद्रसेन । प्रधानासमेत बाहेर येऊन । सकळ रायांस भेटून । आला मिरवत घेऊनी ॥ ८५ ॥ अवंतीनगरीची रचना । पाहता आश्चर्य वाटे मना । सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा । उज्जयिनी नाम तियेचे ॥ ८६ ॥ राजे सकळ कर जोडून । शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण । त्या बाळकासी वंदून । आश्चर्य करिती सर्वही ॥ ८७ ॥ म्हणती जै शिव प्रसन्न । तै तृणकुटी होय सुवर्णसदन । शत्रू ते पूर्ण मित्र होऊन । वोळंगती सर्वस्वे ॥ ८८ ॥ गृहीच्या दासी सिद्धि होऊन । न मागता पुरविती इच्छिले पूर्ण । आंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन । कल्पिले फळ देती ते ॥ ८९ ॥ मुका होईल पंडित । पांगुळ पवनापुढे धावत । जन्मांध रत्ने पारखीत । मूढ अत्यंत होय वक्ता ॥ ९० ॥ रंक-भणंगा भाग्य परम । तोचि होईल सार्वभौम । न करिता सायास दुर्गम । चिंतामणि येत हाता ॥ ९१ ॥ त्रिभुवनभरी कीर्ति होय । राजे समग्र वंदिती पाय । जेथे जेथे खणू जाय । तेथे तेथे निधाने सापडती ॥ ९२ ॥ अभ्यास न करिता बहवस । सापडे वेदांचा सारांश । सकळ कळा येती हातास । उमाविलास भेटे जेव्हा ॥ ९३ ॥ गोपति म्हणे गोरक्षबाळा । तुजसी गोवाहन प्रसन्न झाला । गो विप्र प्रतिपाळी स्नेहाळा । धन्य नृपराज चंद्रसेन ॥ ९४ ॥ यात्रा दाटली बहुत । सर्व राजे आश्चर्य करीत । तो तेथे प्रकटला हनुमंत । वायुसुत अंजनीप्रिय जो ॥ ९५ ॥ जो राघवचरणारविंदभ्रमर । भूगर्भरत्नमानससंतापहर । वृत्रारिशत्रुजनकनगर । दहन मदनदमन जो ॥ ९६ ॥ द्रोणाचळउत्पाटण । उर्मिलाजीवनप्राणरक्षण । ध्वजस्तंभी बैसोन । पाळी तृतीयनंदन पृथेचा ॥ ९७ ॥ ऐसा प्रगटता मारुती । समस्त क्षोणीपाळ चरणी लागती । राघवप्रियकर बाळाप्रती । हृदयी धरोनि उपदेशी ॥ ९८ ॥ शिवपंचाक्षरी मंत्र । उपदेशीत साक्षात् रुद्र । न्यास मातृका ध्यानप्रकार । प्रदोष सोमवार व्रत सांगे ॥ ९९ ॥ हनुमंते मस्तकी ठेविला हात । झाला चतुर्दशविद्यावंत । चतुःषष्टि कळा आकळीत । जैसा आमलक हस्तकी ॥ १०० ॥ त्याचे नाम श्रीकर । ठेविता झाला वायुकुमर । सकळ राव करिती जयजयकार । पुष्पे सुरवर वर्षती ॥ १ ॥ यावरी अंजनीहृदयाब्ज़मिलिंद । श्रीकरास म्हणे तुज हो आनंद । तुझे आठवे पिढीस नंद । जन्मेल गोपराज गोकुळी ॥ २ ॥ त्याचा पुत्र पीतवसन । होईल श्रीकृष्ण कंसदमन । शिशुपालांतक कौरवमर्दन । पांडवपाळक गोविंद ॥ ३ ॥ श्रीहरीच्या अनंत अवतारपंक्ती । मागे झाल्या पुढेही होती । जेवी जपमाळेचे मणी परतोन येती । अवतार स्थिति तैसीच ॥ ४ ॥ की संवत्सर मास तिथि वार । तेचि परतती वारंवार । तैसा अवतार धरी श्रीधर । श्रीकरा सत्य जाण पा ॥ ५ ॥ ऐसे हरिकुळभूषण बोलून । पावला तेथेचि अंतर्धान । सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य । सभाग्यपण श्रीकराचे ॥ ६ ॥ ज्याचा श्रीगुरु हनुमंत । त्यासी काय न्यून पदार्थ । श्रीकर चंद्रसेन नृपनाथ । बोळवीत सर्व भूपांते ॥ ७ ॥ वस्त्रे भूषणे देऊनी । बोळविले पावले स्वस्थानी । मग सोमवार प्रदोष प्रीतीकरूनी । श्रीकर चंद्रसेन आचरती ॥ ८ ॥ शिवरात्रि उत्साह करिती । याचकांचे आर्त पुरविती । शिवलीलामृत श्रवण करिती । अंती शिवपदाप्रती पावले ॥ ९ ॥ हा अध्याय करिता पठण । संततिसंपत्तिआयुष्यवर्धन । शिवार्चनी रत ज्याचे मन । विघ्ने भीति तयासी ॥ ११० ॥ शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी । देखोनि विकासती सज्जनकमळिणी । जीव शिव चक्रवाके दोनी । ऐक्या येती प्रीतीने ॥ ११ ॥ निंदक दुर्जन अभक्त । ते अंधारी लपती दिवाभीत । शिवनिंदकासी वैकुंठनाथ । महानरकात नेऊनि घाली ॥ १२ ॥ विष्णुनिंदक जे अपवित्र । त्यासी कुंभीपाकी घाली त्रिनेत्र । एवं हरिहरनिंदकासी सूर्यपुत्र । नानाप्रकारे जाच करी ॥ १३ ॥ ब्रह्मानंदा यतिवर्या । श्रीभक्तकैलासाचळनिवासिया । श्रीधरवरदा मृडानीप्रिया । तुझी लीला वदवी तू ॥ १४ ॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । चतुर्थाध्याय गोड हा ॥ ११५ ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
विमर्शननृपकथा, चंद्रसेन व श्रीकर गोप कथा
श्रीगणेशाय नमः। हे शंकरा ! उदारा, कर्पूरगौरा ! हिमालयाच्या कन्येच्या मनोरूपी सरोवरातील तू राजहंस आहेस ! तुझे गुण अपार आहेत ! अगम्य आहेत, तरीही सर्वजण तुझे गुण वर्णन करीत असतात. तुझा आदि, मध्य व अंत कळत नाही. तूच सर्वांचा कारण व कर्ता आहेस. तू कोठे केव्हा प्रकट होशील हे ब्रह्मादिकांनासुद्धा कळत नाही. हा शंकर सर्व जगाचे विश्रामस्थान आहे पण तो भक्ताचे मन शुद्ध आहे असे पाहून तेथे राहतो. सूत शौनकादिकांना यासंबंधी एक कथा सांगत होता. ती कथा मी आता सांगतो. विमर्शननृप कथा किरात देशात पूर्वी विमर्शन नावाचा राजा होता. तो मोठा पराक्रमी होता. शत्रूचा त्याने पूर्ण पाडाव केला होता. तो हिंसक होता. तो नेहमी शिकार करीत असे. मद्य पिऊन धुंदीत असे. तो अति मांसाहार करीत असे. त्याने चारी वर्णाच्या स्त्रियांशी विवाह केले होते. तो निर्दय होता. अनेक प्रकारे गैरवर्तन करणारा होता, पण एक गुण मात्र त्याच्या अंगी होता, तो म्हणजे शंकराची भक्ती. तो नित्य यथासांग यथाविधि शिवार्चन करी. त्याची एक पत्नी कुमुद्वती ही गुणवती व चतुर होती. तिने एकदा पतीला विचारले, "नाथ, मी प्रांजळपणे विचारते. तुम्ही शिवरात्रीचे व्रत करता, उपोषण करता, नृत्य करता, स्वतःच गीते गाता, शिवलीला मोठ्या आनंदाने वर्णन करता, पण तुमच्या हातून कितीतरी दोष घडतात, त्याचे काय ? तेव्हा तो विमर्शन राजा तिला आपले पूर्वजन्मीचे वृत्त सांगू लागला. राजा म्हणाला, "मी गेल्या जन्मी पंपा नावाच्या नगरीत एक कुत्रा होतो. योगायोगाने मी शिवरात्रीला, म्हणजे माघ वद्य चतुर्दशीला शंकराच्या मंदिरासमोर गेलो. तेथे शिवपूजा चालली होती ती पाहिली. तेथे राजाचे सेवक दाराशी उभे होते. त्यांनी मला काठीने मारले तेव्हा मी पळालो. पळताना मला शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा घडली. मी लोचटपणे पुन्हा तेथे आलो. आशा होती की काहीतरी खायला मिळेल. पुन्हा मला हाकलले तेव्हा मी आणखी एक फेरी मारली. पुन्हा आपला मंदिरासमोर येऊन बसलो. तेव्हा सेवकाने चिडून मला बाण मारला. मला तो वर्मी लागला. माझे प्राण जाऊ लागले. मी शंकराच्या पिंडीकडे पाहता पाहताच प्राण सोडले. राणी ! मजकडून शिवरात्रीस उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले. ते पुण्य मोठे होते. त्यामुळे मला आता राजाचा जन्म व वैभव प्राप्त झाले. पण श्वानाचे गतजन्मीचे वाईट गुण अजून गेले नाहीत. म्हणून मजकडून दोषपूर्ण कर्म घडते." राणी कुमुद्वती म्हणाली, "जर तुम्हाला पूर्वजन्मीचे असे ज्ञान असेल तर मी गतजन्मी कोण होते ते सांगा." तेव्हा राजा म्हणाला - "तू पूर्वजन्मी कपोती होतीस. तू एक मांसाचा तुकडा तोंडात धरून उडत जात होतीस तेव्हा एक ससाणा तुझा पाठलाग करू लागला. तू शिवमंदिराला तीन वेळा घिरट्या घातल्यास, पण ससाण्याने तुला गाठलेच. त्याने तुला मारले व तू मरून पडलीस. देवळाच्या शिखरावरून शिवपिंडीसमोरच अंगणात तू पडलीस. त्या पुण्यामुळे तुला हे वैभव मिळाले आहे." राणीचे कुतूहल जागृत झाले. ती म्हणाली, "नाथ ! तुम्हाला खूपच ज्ञान आहे. भविष्यातील सुद्धा तुम्हाला कळत असेल. आपण पुढच्या जन्मी कोण होऊ ? सांगा बरे !" राजा म्हणाला, "हे मृगाक्षी, हे गजगामिनी, ऐक. तू विचारतेस म्हणूनच मी सांगतो. पुढील जन्मी मी सिंधु देशाचा राजा होईन, तू जया नावाची राजकन्या होऊन माझी पत्नी होशील. त्यापुढील जन्मात मी सौराष्ट्र देशात राजा होईन, तू कलिंग राजाची कन्या म्हणून जन्म घेशील व मला वरमाला घालशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशात राजा होईन आणि मगध राजाची कन्या म्हणून तू जन्म घेशील व माझी पत्नी होशील. त्यानंतर पाचव्या जन्मात मी अवंती नगरीत राजा होईन व तू दाशार्ह राजाची कन्या म्हणून जन्म घेऊन पुन्हा माझीच पत्नी होशील." राणी आश्चर्याने हे ऐकत होती. राजा ओघाने पुढे सांगू लागला. "मी सहाव्या जन्मात आनर्त देशाचा राजा होईन. तू ययातीची गुणवती वंशजा होशील. तुझा व माझा त्या जन्मातही विवाह होईल. सातव्या जन्मात मी पांड्य राजा होईन व तू पद्मदेशाची राजकन्या होशील. त्या जन्मातही आपण पतिपत्नीच होऊ. तुझे नाव वसुमती असेल. मी मोठा पराक्रमी होईन. शंकराची मजवर कृपा असेल. मी शत्रूंना दंड करीन. मी धर्मशील होईन. शिवमहिमा वाढवीन. शंकराचे नित्य भजन करीन. त्या जन्मात मी पुत्राला राज्य देईन आणि तप करण्यासाठी वनात जाईन. मी तेथे अगस्ति ऋषींना शरण जाईन. शैवपंथाची दीक्षा घेईन. तुझ्यासह त्या जन्मी मी शिवलोकात आरूढ होईन." सूत शौनकादिकांना म्हणाला - या प्रकारे तो राजा तेवढे जन्म घेऊन शिवभक्तीने परमपवित्र होऊन आपल्या पत्नीसह कैलासास गेला. शिवभक्तीचा एवढा तर्कापलीकडील महिमा आहे ! त्याचे वर्णन ब्रह्मदेवासही शक्य नाही आणि हिरण्यगर्भासही शक्य नाही. शिवगुणांचे कीर्तन ऐकून ज्याचे मन हेलावत नाही, नेत्रांतून अश्रुधारा गळत नाहीत, त्याचे जीवन व्यर्थ होय ! त्याची विद्या, त्याचे कर्म, त्याचा धर्म - सारे काही व्यर्थ ! याविषयी मी एक कथा सांगतो ती ऐका. चंद्रसेन नप व श्रीकर गोप यांची कथा उज्जयिनी नावाच्या नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो न्यायी होता. महाकालेश्वर नावाचे जे ज्योतिर्लिंग आहे त्याची सेवा तो राजा नेहमी करीत असे. मणिभद्र नावाचा त्या राजाचा एक प्राणप्रिय मित्र होता. खरोखर काही व्यक्ती चांगल्या मिळणे हे पूर्वपुण्याचेच फळ असते. चतुर व चारित्र्यसंपन्न मित्र असावा, सर्वज्ञ व दयाळू गुरू असावा, भाविक व उदार शिष्य असावा, सुंदर आणि पतिव्रता स्त्री असावी, भक्तिमार्गी व भाग्यवान पुत्र असावा, व्युत्पन्न आणि सुरस व्याख्यान करणारा वक्ता असावा. दिव्य हिरा, परीस, सुढाळ मोती, हे जसे उत्तम तसाच ज्ञानी पिता, आणि तोच गुरू असणे हे त्रिभुवनात अपूर्व भाग्य होय. चंद्रसेन राजाचे भाग्य या तोडीचे होते. मणिभद्रही तेवढ्याच योग्यतेचा होता. त्याने एक अजब मणी राजाला आणून दिला. तो सूर्यासारखा तेजस्वी होता. त्या मण्याचा विशेष गुण असा होता की कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श झाला की त्याचे बावनकशी सोने होत असे. त्याचे दर्शन होताच रोग बरे होत असत. त्या राष्ट्रात चोर, तस्कर नव्हते. अवर्षण नव्हते, दुर्भिक्ष नव्हते, दारिद्य नव्हते. तो मणी कंठात धारण केल्यावर राजा इंद्रासारखा दिसे. त्याचा रणांगणात जय होत असे. वैरी मित्र होत. आयुष्य व आरोग्य त्या मण्यामुळे मिळत असे. त्या राजाचे ऐश्वर्य खप वाढले. तो शंकराचा भक्त होता. मोठा विवेकी आणि चतुर होता. तितकाच तो विरक्त, शांत, तपस्वी, ज्ञानी होता. त्यामुळेच की काय, इतर अनेक राजांना त्याच्याजवळचा मणी हवासा वाटू लागला. ते त्याचा द्वेष करीत होते. त्याच्याशी स्पर्धा करीत होते. कोणी कोणी तर "तो मणी दें" म्हणून राजाला धमकी दिली. अर्थात् राजा कोणालाच भिऊन नव्हता. पुष्कळ राजे एकत्र आले. त्यांनी मोठे सैन्य जमविले व उज्जयिनी नगरीला वेढा घातला. दूत पाठविले. संदेश दिला, "तुझ्याजवळचा मणी दे, नाहीतर युद्धाला तयार हो !" राजाला वाटले, "केवढा अनर्थ ओढवला हा ! मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे हे संकटाला आमंत्रणच ! भूषणच दूषण होऊन जाते. अतिशय सौंदर्य, अति श्रीमंती, अति विद्वत्ता, अति प्रीती, अति भोग, अति अलंकार, अति सदगुण - अति झाले की त्यातून विघ्न उत्पन्न होते, चंद्रसेन विचार करू लागला, "मी जर मणी देऊन टाकला तर त्यात माझा क्षात्रधर्म तो काय राहिला ? पण दारुण युद्ध करायलाही मन तयार होत नाही. आता महाकालेश्वरासच शरण जावे. तो दीनांचा रक्षक, जगाचा उद्धार करणारा, करुणासागर आहे, भक्तांचे रक्षण करणारे जणू वज्रकवच आहे. तो भक्तांचा कैवारी आहे. हिमालयाची कन्या पार्वती हिचा तो प्राणवल्लभ असून त्रिपुरांतक आहे. तोच हे संकट निवारण करील." असा विचार करून राजाने सर्व चिंता सोडून महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा आरंभिली. बाहेर प्रधानाने सैन्य जमवून शत्रूशी युद्ध सुरू केले. तोफांचा भडिमार नगरतटावरून शत्रुसेनेवर होऊ लागला. राजा मात्र शंकराच्या आराधनेत मग्न होता. बाहेर प्रखर युद्ध चालले होते. देवद्वारी रणवाद्ये वाजत होती. राजा मात्र मनापासून शिवपूजनात दंग होता. काही नागरिक राजाचे पूजाकर्म पाहायला जमले. त्याच्या निर्भयतेची चर्चा करू लागले. त्यात एका गुराखी स्त्रीचा एक सहा वर्षांचा मुलगाही पाहायला आला होता. त्याने सर्व पूजा मनःपूर्वक पाहिली आणि आईबरोबर घरी परत गेला. मुलाने केलेली शिवपूजा घराशेजारीच एक मोकळी उजाड झोपडी होती. तो मुलगा तेथे गेला. शंकराच्या पिंडीसारखा एक पाषाण त्याने आणला. मातीची वेदिका तयार केली आणि आपल्या समजुतीप्रमाणे त्याने शिवपूजा सुरू केली. पाषाणाशिवाय जवळ काही नव्हते. सर्व उपचारांसाठी त्या मुलाने दगडच वाहिले. धूप, दीप, नैवेद्य - सर्व पाषाणाचेच. त्याला मंत्रध्यान काय माहीत ! ओले गवत आणि बिनवासाची फुलेही त्याने वाहिली. परिमल द्रव्ये कुठली आणणार ? मातीच घेऊन वाहिली. पुष्पांजली कसली ? ओंजळीत मातीच घेतली आणि वाहिली. शंकराचे ध्यान केले ते कसे ? डोळे मिटून स्वस्थ बसला आणि महाकालेश्वराची पिंडी मनासमोर आणली. दृढ ध्यान लागले ! तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागली. पण त्या हाका त्या मुलाला ऐकायलाही आल्या नाहीत. तेव्हा आई बाहेर आली व पाहू लागली तेव्हा मुलगा ओसाड जागी दगड मांडून बसलेला तिला दिसला. "अरे बाळा, तू काय करीत आहेस ? जेवायला चल घरात !" तिने हाक मारून म्हटले. पण मुलगा काहीच बोलेना. तेव्हा आई रागावली. तिने पुढे जाऊन त्या मुलाची सर्व दगडांची मांडणी उधळून टाकली. "चल ऊठ, जेवायला चल !" असे म्हणून तिने मुलाला हात धरून उठविले व ओढू लागली तेव्हा मुलगा भानावर आला; त्याने डोळे उघडून पाहिले, तो शिवपूजा उध्वस्त झालेली ! त्याला फार वाईट वाटले. शिव शिव ! असा आक्रोश करून छाती पिटीत तो मूर्छित पडला. पुन्हा शुद्धीवर आला तेव्हा "मी आता प्राणत्याग करीन !" असे ओरडू लागला. तेव्हा आई त्याला दोष देत परत गेली; आपले जेवण उरकून तृणाच्या आसनावर झोपून गेली. इकडे आपण केलेली पूजा उध्वस्त झाली म्हणून तो मुलगा, "हे शंकरा, हे शंकरा ! हे महाकालेश्वरा !" असा विलाप करीत, रडत बसला. त्यावेळी दयाळू श्रीउमारमण शंकराने अद्भुत चमत्कार केला ! गवताची झोपडी होती तेथे रत्नखचित शिवमंदिर दिसू लागले. त्याचे खांब हिऱ्याचे होते. वर अनेक रत्नांचा कळस झळकू लागला. शिवलिंग तर चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय झाले. तो मुलगा डोळे उघडून पाहू लागला तो सर्व राजोपचार पूजासामग्री तयार करून ठेवलेली दिसली. सारे काही नवलच. ते पाहून तो मुलगा आनंदाने नाचू लागला. लगेच त्याने मन लावून खऱ्या सामग्रीने पूजा केली. पुष्पांजली वाहिली. शिवाचे नाम मोठमोठ्याने घेत तो नाचू लागला. शिव प्रसन्न झाला. बाळाला म्हणाला, "बाळा, तू वरदान माग. मी प्रसन्न झालो आहे." मुलगा म्हणाला, "देवा ! माझ्या आईने तुझी पूजा उडवून दिली तो तिचा अपराध क्षमा कर !" "तथाऽस्तु" शंकर म्हणाला. "मी तुझ्या दर्शनासाठी आईला आणतो, तिलाही दर्शन दे," असे म्हणून तो मुलगा आईकडे धावला. तो आपले घर रत्नखचित भव्य राजगृहासारखे झाले आहे आणि आपली आई दिव्य मंचकावर निजलेली आहे असे त्याला दिसले. ती सुंदर झाली होती. तिने अलंकार धारण केले होते ! "आई ! ऊठ ना ! शंकर प्रसन्न झाले आहेत ! तुला दर्शन घडेल ! चल बाहेर ! बघ तरी केवढे भव्य सुंदर देऊळ, देवानेच निर्माण केले आहे !" आई उठली. मुलाला जवळ घेऊन ती बाहेर आली. देवालय पाहून ती चकित झाली. बाळाच्या नितांत भक्तीने आईलाही शिवदर्शन झाले. ती बाळाला कुरवाळू लागली. आपण पूजा भंग केली याचे तिला वाईट वाटले ! तिला घरी राहवेना. राजा महाकालेश्वराच्या मंदिरात होता तिथे जाऊन तिने राजाला सर्व चमत्कार कथन केला. राजा लगबगीने ते रत्नखचित मंदिर पाहण्यासाठी आला. त्याच्या मागोमाग नागरिक आले. राजाने तर बाळाचे पायच धरले. लोकांत वाऱ्यासारखी वार्ता पसरली. सारेजण तिकडेच धावत सुटले. मुलाला शंकराने दर्शन दिले. रत्नखचित देऊळ निर्माण केले. आईचे दारिद्रय फिटले ! जो तो कौतुक करू लागला. नगराबाहेरसुद्धा शत्रुसेनेत बातमी पसरली. आपले वैर बाजूस ठेवून शत्रू राजांनी दूत पाठविले. निरोप पाठविला, "राजा ! तुझी व तुझ्या प्रजाजनांची शिवभक्ती अद्भुत आहे. आम्ही उगीच दुष्ट बुद्धी धरली. आता आमचे मन पालटले आहे. आम्ही त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घेण्यासाठी नगरात येत आहोत. प्रेमाने तुम्हाला भेटण्यासाठी येत आहोत !" चंद्रसेन राजाला निरोप कळताच त्याने प्रधानाला युद्ध थांबवायला सांगितले. सर्व राजांना पाचारण केले. त्यांना मिरवणुकीने तो नगरात घेऊन आला. अवंती म्हणजेच उज्जयिनी नगरीची सुंदर रचना पाहून राजे आश्चर्य करू लागले. शिवमंदिरापुढे येऊन त्या सर्व राजांनी मंदिराला प्रणाम केले. मुलासही वंदन केले. ते राजे म्हणू लागले, "शंकर प्रसन्न झाला तर काहीही घडू शकेल. झोपडीचा राजवाडा होऊन जाईल ! शत्रूचे मन पालटून ते मित्र होतील. सिद्धी घरी दासी होऊन राहतील. न मागता कामना-पूर्ती करतील. अंगणातले वृक्षच कल्पतरू होतील. मुका पंडित होईल, पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावत जाईल. मूढ मनुष्य चतुर वक्ता होईल. रंक, भिकारी मोठा भाग्यवान होईल. चिंतामणी रत्न सहजच हाती येईल. कीर्ती त्रिभुवनात पसरेल. राजेही पाया पडू लागतील ! सहज खणावे तेथे खजिने सापडतील. वेदांचा अभ्यास न करताही वेदार्थ मनात प्रकटेल. हाती सर्व कौशल्ये येतील ! उमारमणाची कृपा झाली तर काहीही होणे अशक्य नाही." राजा त्या गवळ्याच्या मुलाला म्हणाला, "तू धन्य आहेस. नंदी ज्याचा वाहन आहे तो शंकर तुजवर प्रसन्न झाला आहे !" त्या दिवशी त्या शिवालयात फार मोठी यात्रा लोटली. त्यावेळी तेथे हनुमंत प्रकटला. तो वायुसुत, रामचरणीचा भ्रमर, अंजनीकुमार, सीतेच्या मनाला आनंद देणारा, लंकादहन करणारा, मदनविजयी, द्रोणाचल उपटून नेणारा, लक्ष्मणाचे प्राण वाचविणारा, अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करणारा, मारुती ! तो रुद्राचा अवतार तेथे प्रकट होताच सर्व लोक व राजे त्याला वंदन करू लागले ! हनुमंताने त्या गोपबाळाला जवळ घेतले व त्याला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला; त्याने न्यास, मातृका, ध्यान इत्यादी सर्व शिकविले. प्रदोष व सोमवार व्रत शिकविले. मुलाच्या मस्तकावर हात ठेवला. त्यावेळी हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या अवगत झाल्या; चौसष्ट कला अंगी आल्या. हातावरील आवळा जसा पूर्ण दिसतो तसे त्याला ज्ञान झाले. त्याचे नाव "श्रीकर" असे ठेवले. सर्व राजे जयजयकार करू लागले. देवांनी गगनातून पुष्पवर्षाव केला. हनुमंताने मुलाला सांगितले, "श्रीकरा ! तुला सर्व आनंदाची, सुखाची प्राप्ती होईल ! तुझ्या कुळात, तुझी आठवी पिढी जेव्हा येईल तेव्हा नंद नावाचा गोप जन्माला येईल. गोकुळात त्याचा पुत्र म्हणून विष्णू श्रीकृष्णरूपाने मोठी अवतारलीला करील. तो कंस, शिशुपाल, यांचा वध करील. पांडवांच्याकडून कौरवांचा नाश घडवून आणील. श्रीधराचे, विष्णूचे अवतार युगायुगात वारंवार होतात. श्रीकरा ! तू धन्य आहेस !" असे सांगून व त्या मुलाला उपदेश करून हनुमान अंतर्धान पावला. सर्व राजे चकित होऊन पाहातच राहिले ! आणि नंतर श्रीकराच्या नावाने राजांनी प्रचंड जयजयकार केला. चंद्रसेनाने सर्व राजांना त्यानंतर वस्त्रे व भूषणे दिली ! त्यांनी राजाचा प्रेमाने निरोप घेतला. चंद्रसेन व श्रीकर ह्या दोघांनी नंतर नित्य नियमाने सोमवार व प्रदोष व्रताचे आचरण केले. शिवरात्रीचे व्रत केले. याचकांना तो राजा दाने देऊन तप्त करी. शिवलीला श्रवण करी. ते दोघे अंती शिवपदास पोहोचले. फलश्रुती हा अध्याय पठण केल्यास भक्ताला संतती, संपत्ती व दीर्घायुष्य प्राप्त होईल. ज्याचे मन शिवार्चन करण्यात मग्न असेल त्याला विघ्ने बाधणार नाहीत. हा शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे सूर्यच आहे. त्याच्या शब्दरूपी किरणांनी सज्जनमनरूपी कमले विकास पावतात; जीव आणि शिव हे चक्रवाक पक्ष्याचे युगल एकत्र येते ! दुर्जन-रूपी घुबडे लपून राहतात. शिवाची निंदा करणाऱ्यास शिवाच्या प्रभावाने नरकात जावे लागते. हरिनिंदकांस शंकर कुंभीपाक नरकात घालतो. हरिहरात भेद मानणे व त्यांची निंदा करणे या पापाला यम महाभयंकर शिक्षा करतो. हे ब्रह्मानंदा ! सद्गुरुराया ! यतिवर्या ! कैलासपर्वतावर निवास करणाऱ्या, मृडानीप्रिया श्रीशंकरा ! तू श्रीधरकवीला वरदान दिलेस ! तुझी लीला तूच वदवून घे. विस्तृत अशा स्कंदपुराणात ब्रह्मोत्तरखंडात श्रीशिवलीलारूपी अमृतमय कथा आहे ती सज्जनांना नेहमी श्रवण करायला मिळो ! ॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥ |