॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय सार - अध्याय सहावा ॥
प्रारंभी सद्गुरु शिव हे कामधेनु असून राम वत्स आहेत. कास भरून आली म्हणून कामधेनु वत्सासाठी जनस्थानांत धावत आली. चारी वाचा हेच चारी स्तन असून ती न मागतांच पान्हा सोडते. अद्वैत बोधाचे दूध काळवेळ न पाहतां वहात आहे. कान हेच मुख आहेत इत्यादि वर्णन केले आहे. नंतर ब्रह्मचर्य कशास म्हणावे, अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय याचे स्पष्टीकरण केले आहे. ’परब्रह्मीं असावी चित्तवृत्ती । याशीच ब्रह्मचर्य बोलती । सर्वेंद्रियांसहित मनासी उपशांति । तेणेंचि परी ॥६७॥’ ’बहुत कासया बोलावे । स्वरूप जाणणेंचि न संभवे । ते जाणिल्यावीण अंगेचि व्हावे । सद्गुरुकृपे ॥८१॥’ जाणणे म्हणजे वेगळे पडणे, म्हणजे द्वैत आलेच. ’जाणण्या नेणण्याशिवाय अंगे होइजे । या नांव ज्ञान अपरोक्ष ॥८३॥’
संत्ज्ञानानंदघन हे विधिमुखे वेदवचन आणि अन्अणू, अदीर्घ, अस्पर्शादि निषेध खूण या उभयरूपाने वेदाची प्रवृत्ति गुरुमुखाने ठमपणे जाणावी, असे पू. स्वामी सांगतात.
एकदा ब्रह्मा आदि सर्वांना प्रश्न पडला, ’शिव कोण ?’ मग ब्रह्मा शिवास शरण आला. तसेच मुमुक्षुने सद्गुरूस शरण जावे आणि तू निर्विकार अनंत कसा ? इतुकेच पुसावे. मात्र इंद्रिये परतवून बुद्धि दृढ करून अनन्यभावे विचारावे. शिव षड्गुणैश्वर्यसंपन्न असतात. तसेच गुरूमध्ये पुढील सहा लक्षणे हवीत. १) ज्ञान परिपूर्ण सहजगति असावे २) नामरूपत्याग हेच वैराग्य हवे ३)मोक्षलक्ष्मी असावी ४) उपदेशमात्रे दृष्टिमात्रे शिष्य ब्रह्मरूप व्हावा ५) आपणांस स्वतःस देतात असे दातृत्व हवे ६) कीर्ति वेदही गातात. सद्गुरूंच्या ठिकाणी मुख्य दोन गोष्टी, स्वानुभव आणि प्रबोधशक्ति असाव्यात.
आगांतुक सिद्धिचे लक्षण ज्ञाते मानीत नाहीत. सिद्धि म्हणजे गारुड होय. असे असंख्य वेषधारी गुरु आहेत. ज्यांच्या उपदेशाने ज्ञानसूर्य उगवतो, अज्ञानरूप रात्र सरते ते गुरू आणि त्यांचे शिष्य धन्य होत. गुरुशिष्य मिळणी द्वैतच राहात नाही तर भय कसे राहील ?
शिव रामांना सांगतात की सृष्टिपूर्वी मी एकला एक तरंगाविण सागरा सारखा होतो. ब्रह्माचे एक लक्षण ज्ञानघनचिद्रूपता नेणिवेलाही जो जाणतो. अनुभव नसतांही सुखदुःखाशिवाय अनुभाव्यरूप आनंदघन हे तिसरे लक्षण. निश्चल चित्तसागरावर माया ही चंचल लहरी उठली आणि नामरूपात्मक जग कल्पना उमटली. तरंग म्हणजे पाणीच असते. तसे ’समस्त जगीं मीच असे । माझ्याविण काही नसे ॥ मीठ, मोती, गार हे पाण्याचे तीन प्रकार. तसे जड, चंचल आणि मिश्र हे स्वरूपाचे तीन भाव आहेत.
मला न ओळखण्याने नामरूपाचा भ्रम होतो. रज्जुवर सर्प भासतो, शुक्ति (शिंपी) वर रजताचा भास होतो, याप्रमाणे नामरूप भ्रम आहे. मजवेगळी दुसती वस्तूच नाही. अलंकारांत सुवर्ण तसा जगामध्ये मीच सच्चिदघन आहे. घटांत माती, पटांत तंतु, तरंगात पाणी, ज्वाळेत अग्नि. सोन्याचे मणि केले, सुवर्ण तंतूने ओविले, सोन्याच्या पत्र्यावर मढविले त्यास व्याप्य व व्याप्त म्हणावे तसे हे आहे.
पहिले स्वरूप एक निर्विशेष निश्चळ, दुसरे सविशेषाचे जगीं भासते. खरे तर सविशेष झालेच नाही. निर्विशेषच त्रिकाळी असते. पण सविशेषाशिवाय निर्विशेष अनुभवास येत नाही. सविशेष हा आरोप आहे. निर्विशेषाशिवाय दुसरें काही नाहींच. नटासारखे हे सोंग आणलेले आहे. कृत्रिमरूप धारण केल आहे. नट स्वतःचे मूळरूप जाणतो. तसे मी हे सर्व मिथ्या हे जाणतो, पण इतर जन सोंगासच सत्य मानतात. सद्गुरुपासून ब्रह्मज्ञान झाले की शिष्य अभिन्न होतो व समाधान आपोआप होते. सविशेषरूप जग त्यांतच निर्दोष उपदेष्टा सद्गुरु असतो.
नित्यांत नित्यत्व, वेदांत चिद्रूपत्व, ब्रह्मादि सुखी आनंदत्व आणि सर्वांठायी आहेत्व ते मीच आहे. नाहीपणा जगाच्या ठायी आहे. भिंतीवर चित्रे काढली जातात तेव्हां भिंत हे अधिष्ठान सत्य, चित्रे काल्पनिक असतात. माझ्या सत्यत्वावर जग नामरूपपणे मिरवते. माझे सत्यत्व जाणले की नामरूपास शून्य पडते. प्रत्यगात्मा हिरण्यगर्भ वगैरे सर्वे मीच आहे. ब्रह्मशब्दें चारी वेद मीच आहे. वेद म्हणजे जाणीव. त्या सर्वांत ज्ञप्तिरूपे मीच आहे.
सुखाचे ११ प्रकार आहेत. त्यास सातिशय म्हणावे. ब्रह्मसुखाच्या आनंदास निरतिशय म्हणतात. जडांत सद्रूप. चंचळांत चिद्रूप आणि सुखांत आनंदरूप मीच आहे. मी अलिप्तत्वे अनघ आहे. आकाशाच्या ठिकाणची नेणीव, मृदुत्व, भासकत्व, निरोधत्व काढले की उरते ते निश्चयात्मक ब्रह्म (खं ब्रह्म) जाणावे. शिवगुरु सांगतात की, आकाश दशदिशा व्यापून आहे मग मी कां नसेन ? थोडक्यांत ’झाले होणार जे जे करणे । तें तें मीच असे अंग होणें । सर्व विश्वात्मकी जेवी सुवर्णे । असे अलंकारी एवी म्या ॥३७६॥ उत्पत्ति स्थिति आणि संहार । या तिन्ही कार्यासी जे थार । तेचि अभिन्न कारण थोर । निर्गुण परब्रह्मच’ - असे असून ते कोणाचे कार्य नाही म्हणून तेच एक अधिष्ठान आहे. जग उपजते, वर्तते आणि संहार पावते, पण ब्रह्म उपजेना, वर्तेना आणि संहरेना. ’अणोरणीयानहमेव तद्वन्महानहं विश्वमहं विशुद्धम् । पुरातनोऽहं पुरुषोऽहमीशो । हिरण्मयोऽहं शिवरूपमस्मि ॥५५॥ चळे अपद, ऐके विणकाना । हस्तविना कर्मे, करी नाना’ ॥ असा मी दुर्ज्ञेय आहे. इतरांनाच नव्हे तर, ’मीही मज नेणे रामराया’ असे शिव म्हणतात.
वेद विधि आणि निषेध असे उभयमुखाने वर्णन करतात म्हणून गुरुमुखे श्रवन मनन करून यथार्थ ब्रह्म जाणावे. श्रवण मनन निदिध्यासन या प्रमाणे अभिन्न ब्रह्माचें विज्ञान साधकांत होते. ब्रह्म जाणतां येत नाही पण विज्ञानाने ऐक्यत्व जोडते व द्वैतता उडून जाऊन साधक निर्भय होतो. ते निदिध्यासन कसे करावे हे सावध होऊन ऐका व तसा अभ्यास करा. ’न पुण्यपाप मम नास्ति नाशो, न जन्मदेहेन्द्रियबुद्धिरस्ति । न भूमिरापो न च वह्निरस्ति । न च अनिलो मेऽस्ति न मे नभश्च ॥५७॥’ ’मी आत्मा ब्रह्म अखंडरस । परिपूर्ण सच्चिदानंद अविनाश । जेथें नामरूप मायेचा नसे स्पर्श । तिहीही काळी ॥७८८॥’ देह तरी जन्मलाच नाही तर माझे माझे कुठले ? देहासंबंधी मी माझे गेले की पाप पुळ्य कुठले ? याप्रमाणे परमात्मा-आत्मा यांचे यथार्थ रूप जाणावे व मनन करावे. मी विकारी देह असतां ब्रह्म कसा होईन (असेन) असे संशय बुद्धीत आणू नयेत. मी आत्मा हा निश्चय दृढ होणे आवश्यक आहे.
आता देहाचे काही होवो. पुण्यमार्ग आचरो की पापमार्ग, हर्ष, ग्लानी न होणे हे स्वतोत्थान होय. अमुक कर्माने अमुक फलप्राप्ति वगैरे प्रकारे शास्त्रांनी गलबला केला तरी दृढ निश्चय न ढळणे हे परतोत्थान नसणे. स्वतो किंवा परतोत्थान अजिबात नसणे याचेच नांव दृढ समाधान. अपरोक्ष साक्षात्कार म्हणजे देह असताच परिपूर्ण निजरूप होणे. हा झाला की त्यास जन्म मरण नाही. देह असेतो जीवन्मुक्ती आणि देह सुटल्यावर विदेह कैवल्य पावतो. समाधि उत्थानारहित समाधान या रीती जो जाणेल तोच एक मुक्त. मुख्य अभेदज्ञानावाचून जीवास मोक्ष नाही.
या अध्यायात विभूतियोग सांगितला असला तरी गीतेतील विभुतियोगापेक्षा वेगळा आहे. सर्व जे आहे ते मीच आहे, हे गीतेतही सांगितले आहे, पण हे सांगूनही काही ठळक विभूतिंचे वर्णन केले आहे. येथे तसे केलेले नाही. शिवगीतेंत मुख्य गुरुमहिमा व गुरुभक्ति यांनाच महत्त्व दिले आहे. याच अध्यायात हे जग झालेच नाही यावर निरूपण सांगताना अज्ञान जीवरूपी बालकांना श्रुती दाई कथा सांगते तिला बालाऽख्यायिका म्हणावे असे म्हणून अवयवहीन वंध्यासुताची कथा वर्णन केली आहे. ती अद्भुत मनोरंजक कथा मूळातूनच पहावी. विस्तारभयास्तव देता येत नाही. असा हा सहावा अध्याय सोळा अध्यायांचा सारांश, शिवगीतेचा गर्भ किंवा स्वयंभ शिवहृदयच जाणावा असे म्हटले आहे.
GO TOP
|