॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय दुसरा ॥

श्रीशिवराम गुरवे नमः ॥
सावधान असावें श्रोतां । परमार्थ प्रकटेल आतां ।
परम गुह्य हे शिवगीता । शिवा अंतरींची ॥ १ ॥
जीवाच्या भोआग्योदयासाठी । सामें इच्छा धरिलीं पोटीं ।
जेवीं पुत्रास्तव खटपटी । पितयाशी होय ॥ २ ॥
सहस्रकिरणाचें भ्रमण । स्वात्मार्थ नसे जाण ।
जेणें प्रकाशे क्रियाचरण । त्रैलोक्याशी ॥ ३ ॥
तेंवी शिवगीता । तया प्रयोजन नसतां स्वतां ।
केवळ जीवाचिया हिता । अतिसायासें प्रगटविली ॥ ४ ॥
तस्मात् जीवाचा भाग्योदय । झाला वाटतसे निश्चय ।
तरी अवधारावी सोय । गीताथाची ॥ ५ ॥
पूर्वाध्यायीं शौनकां सूत । बोलिला विरजादीक्षेचा संकेत ।
कीं हे दीक्षा शिवराम पावत । अगस्तिमुखें ॥ ६ ॥
हें ऐकोनियां शौनकीं ।प्रश्न केला सकौतुकीं ।
तोचि आरंभीं दिढा श्लोकीं । बोलिजेल ॥ ७ ॥


सार्ध श्लोक । ऋषय ऊचुः -
किमर्थमागतोऽगस्त्यु रामचंद्रस्य सन्निधम् ।
कथं वा विरजां दीक्षां कारयामास राघवम् ।
तत किमाप्तवान् रामः फलं तद्वक्तुमर्हसि ॥ १ ॥


रामचंद्राच्या सन्निधान । किमर्थ अगस्तीचें झालें गमन ।
कैसी विरजादीक्षा पूर्ण । करविता झाला ॥ ८ ॥
नंतर फळ जें पावला राम । सकलसिद्ध पूर्णकाम ।
भूभार हरावया परम । विष्णुच अवतरला ॥ १० ॥
अविद्या मुळीं नसे सहज । तेथें कैसें कार्यरज ।
तरी दीक्षा हे विरज । श्रीरामा असंभव ॥ ११ ॥
कामादि कांहीं असावे । तरीच वैराग्यें निरसावे ।
अगस्तीनें दीक्षाकर्म करवावें । रामाप्रति कैसें ॥ १२ ॥
मुळीं नाहीं अज्ञान भ्रांति । तेथें कैची ज्ञानसंपत्ति ।
निष्कामाशी कर्मफल प्राप्ति । हेंही अघटीत ॥ १३ ॥
जरीं म्हणशी देह धरिला । मानवरूपी भुवीं अवतरला ।
तरी पूर्वीं वसिष्ठें बोधिला । निःसंशयपणें ॥ १४ ॥
तरी तया फलेच्छा कोणती । कीं अमुक व्हावी फलप्राप्ति ।
हें सांगावया आम्हांप्रति । सूता तूं योग्य होशी ॥ १५ ॥
ऐकून शौनकांचें वचन । सूत बोलता झाला आपण ।
तेंचि ऐकावें सावधान । श्रोतेजनीं ॥ १६ ॥


सूत उवाच -
रावणेन यदा सीता अपहृता जनकात्मजा ।
तया वियोगदुःखेन विलपनास राघवः ॥ २ ॥


रावणें जेव्हां हरिली सीता ।रामपत्‍नी जनकदुहिता ।
तेव्हां वियोगदुःखें रामवरुता । शोक करीत बैसला ॥ १७ ॥
सूत म्हणे शौनकांप्रति । तुम्ही जें जें पुशिलें निश्चिती ।
तें तें अनुक्रमें यथारीति । बोलिजेल ऐका ॥ १८ ॥
राम लक्ष्मण सीता । पंचवटिकेशी असतां ।
संधि पाहून जनकदुहिता । रावणें हरिली ॥ १९ ॥
मृगापाठी होते गेले । मागुतीं आश्रमाशी जों आले ।
तों सीतेलागीं हरून नेलें । हें कळलें रामचंद्रा ॥ २० ॥
तेव्हां मानवीक्रिया वरीवरी । दाविली पाहिजे जैशी खरी ।
या हेतूस्तव शोक करी । अति अटाहास्यें ॥ २१ ॥
मनामाजी तो निजकांता । ठेविली असे अग्नि अतौता ।
रावणें नेली छायासीता । हें ठाउकेंचि असे ॥ २२ ॥
आणि पूर्वींच होति प्रतिज्ञा केली । कीं राक्षपंक्ति पाहिजे वधिली ।
तेव्हां रावणा कैसा मारीन खंति वाटली । नाहींच श्रीरामा ॥ २३ ॥
रावण वधार्थ अवतार । हे तरी चिंता नसे अणुमात्र ।
आणि सीता तरी निरंतर । स्वसन्निध असे ॥ २४ ॥
तरी रामा शोक करावयाचें । कारण काय असे साचें ।
तेंचि गुह्य प्रगट वाचे । बोलेन ऐका ॥ २५ ॥
सीतावियोगाचें करून निमित्त । पूर्वील आठविता झाला समस्त ।
तो रामाचे अंतरींचा हेत । बोलून दाखवूं ॥ २६ ॥
मनी विचारी श्रीराम । कीं मी पूर्णब्रह्म आत्माराम ।
जेथें मायेसहित द्वैतभ्रम । उद्‌भवलाच नाहीं ॥ २७ ॥
ऐसा पूर्ण मी निर्विकार । तोचि मायावशें झालों ईश्वर ।
कर्तृत्व नियंतृत्व प्रकार । म्यां माथा घेतले ॥ २८ ॥
भूतभौतिकें करून निर्माण । जीवरूपें मी प्रवेशलों आपण ।
तस्मात् जीवही मजहूनि भिन्न । नसती किमपि ॥ २९ ॥
मज ईश्वरत्व जरी आलें । तरी स्वानुभवज्ञान असे वहिलें ।
जीवत्व जेव्हां प्रगटलें । तेव्हां देहबुद्धि आलीं ॥ ३० ॥
आत्मरूपीं हा विकार नसतां । आणि देहासही मी न वाटे तत्त्वतां ।
परी या देहबुद्धीशी जो धर्ता । तो हा अहंकारू ॥ ३१ ॥
सत्यत्व ब्रह्मींचे घतलें । असत्य देहादिकां अवलंबिलें ।
उगेंचि मी मी हेंस्फूरूं लागलें । उभयात्मक अहंकारा ॥ ३२ ॥
तस्मात् अज्ञान हा भवसागर । माजी रावण हाचि अहंकार ।
कामक्रोधादि त्याचा परिवार । देह लंकापुरी राहिला ॥ ३३ ॥
स्वस्वरूप निजानुभूती । हे ईश्वरनिष्ठ असे प्रतीति ।
परी जीवाची स्वकीय अनुभूति । अहंकारनिष्ठ झाली ॥ ३४ ॥
एवं मन्निष्ठ स्वानुभूतिसीता । रावण अहंकारु झाला हर्ता ।
हेचि खंती वाटतसे चित्ता । मज ईश्वरासीं ॥ ३५ ॥
मज या जीवाचिया कणवे । ईश्वरत्व लागलें धरावें ।
कीं जीवाचें स्वहित करावें । अवतार घेऊनि ॥ ३६ ॥
विधिरूपवेद दैत्यें नेले । तेव्हां म्यां मत्स्यरूप धरिलें ।
शंकासुरा वधून आणिलें । वेदविधीतें ॥ ३७ ॥
दैवीसंपत्ति सागरीं पडली । तेव्हां म्या कूर्माची तनु धारिली ।
देव दैत्य मिळून काधिली । मथून सागरा ॥ ३८ ॥
हिरण्याक्ष दुष्ट मातला । तो वराहरूपें म्यां निवटिला ।
आणि हिरण्यकशिपू वधिला । नृसिंह होऊन ॥ ३९ ॥
इंद्राशी स्पर्धा करितां बळी । तो म्यां वामनें घातला पाताळीं ।
दैत्यांशें माजली क्षत्रिय मंडळी । ते म्यां निवटिली परशुरामें ॥ ४० ॥
तोचि मी हा रघुनंदन । रावण वधार्थ पावलो जनन ।
तरी लंकापुराशीं जाऊन । वधीन त्या सहपरिवार ॥ ४१ ॥
परी मी इतुकेंही करितां । नाहीं केलें जीवाचे स्वहिता ।
अनादि अहंकार रावण तत्त्वता । नाहीं जरी वधिला ॥ ४२ ॥
जीवाशी अहंकारें कष्टविलें । तयाचें हनन नाहीं घडलें ।
वरी वरी स्थूळ दैत्य निर्दाळिले । यांत हित काय जीवाचें ॥ ४३ ॥
तया अहंकारा न वधितां । अनुभूती सीता न आणितां ।
येणें शोकें अति व्याकुळता । श्रीरामें मांडिली ॥ ४४ ॥


निर्निद्रो निरहंकारो निराहारो दिवानिशम् ।
मोक्तुमैच्छत् ततः प्राणान् सानुजो रघुनन्दनः ॥ ३ ॥


अनुजासहित रघुवीर । मी अमुक हा नाहीं अहंकार ।
दिवा निशीं नाहीं निद्रा आहार । शेवटीं प्राणही त्यागूं इच्छी ॥ ४५ ॥
मजकडून या जीवाचें । हितचि नव्हे जरी साचें ।
तरी देह धरून प्राणाचें । संरक्षण व्यर्थ ॥ ४६ ॥
अंतर्बाह्य रिपु निवटावे । तरीच क्षात्रकुळीं जन्मावें ।
ऐसें न होतां व्यर्थ जाणावें । नांवाचे क्षत्रिय ॥ ४७ ॥
तस्मात् क्षत्रिय मी म्हणवितां । लाज वाटे माझिया चित्ता ।
ऐशिया क्खेदें अहंकार त्यजिता । होय श्रीराम ॥ ४८ ॥
मग दिवस अथवा रात्र । कैंची निद्रा कंचा आहार ।
अनुजासहित रघुवीर । रडे पडे आक्रंदे ॥ ४९ ॥
सौमित्र येऊनी चरण धरी । जी जी आपण तरी असो क्षत्री ।
रावण मारूं क्षणार्द्धा माझारी । लंकापुरी जाऊनी ॥ ५० ॥
व्यर्थ शोकी कांसया व्हावें । आतांचि ये क्षणीं चलावें ।
जितुके राक्षस असती आघवें । मारून जानकी आणूं ॥ ५१ ॥
परी राम नेदीच प्रत्युत्तर । म्हणे माझा हेतू न कळे या निर्धार ।
तथापि मी सांगूं सविस्तर । तरी त्याचा उपाय न कळे या ॥ ५२ ॥
या जीवाची करावया सोदवण । पाहिजे श्रीसद्‌गुरु आपण ।
तरीच होय अज्ञान खंडन । अहंकारासहित ॥ ५३ ॥
हा अर्थ मनींचा मनीं ठेवून । सौमित्राशी नेदी वचन ।
हा सीते हा सीते म्हणवून । वनीं हांका मारी ॥ ५४ ॥
तंव ऋषिसुत गंगातीरीं । स्नानें करून जातां माघारी ।
वार्ता सीताहरणाची खरी । ऐकिली तेहीं ॥ ५५ ॥
तैसेचि आश्रमाप्रति आले । अगस्तीशी वर्तलें सांगितलें ।
येरु म्हणे आपणां पाहिजे गेलें । संबोखावया भेटी ॥ ५६ ॥
कोणासी दुःख अथवा होतां हानि । तया शांतवन करावें जाऊनी ।
ऐसा श्रेष्ठाचार पूर्वींपासूनी । चालत आला ॥ ५७ ॥


लोपामुद्रापतिर्ज्ञात्वा तस्य सन्निधिमागमत् ॥ ४.१ ॥


यास्तव उठोनियां अगस्ती । आला गोदावरी तटाप्रति ।
तंव दोघे देखिले दाशरथी । ग्लान वदनीं दीनरूप ॥ ५८ ॥
जानूमध्यें मस्तक घालूनी । राम बैसला अधोवदनीं ।
हें अगस्तीनें देखुनी । थापटुनी सावध म्हणती ॥ ५९ ॥
परी राम नेदीच उत्तर । नाही सत्कार ना नमस्कार ।
हा सीते म्हणून आक्रंदे थोर । भ्रमिष्टाचिये परी ॥ ६० ॥
राम म्हणे मनीं हा ब्रह्मवेत्ता । प्रवर्तेलचि जीवाचिया हिता ।
यास्तव कांहीं प्रश्न न करितां मौनेंचि ऐके ॥ ६१ ॥
लोपामुद्रापति अगस्ती । तामाचा हेतु न जाणुन चित्तीं ।
कीं यासी सीता वियोगाची खंती । तेचि जाणोन बोलता झाला ॥ ६२ ॥
तेंचि श्रोतीं सावध ऐकावें । येणेंचि विवेक वैराग्य प्राप्त व्हावें ।
मुमुक्षा उपजोनि जीव सुटावें । भवसागराहूनि ॥ ६३ ॥


अथ तं बोधयामास संसारासारतां मुनिः ॥ ४ ॥
अगस्त्य उवाच -
किं विषीदसि राजेन्द्र कान्ता कस्य विचार्यताम् ॥ ५ ॥


श्रोतेहो ऐका रामाप्रती । काय बोलता झाला अगस्ती ।
सर्व संसार हा निश्चिती । मिथ्याभूत असे ॥ ६४ ॥
सकल राजांचा तूं इंद्र । यास्तव नामें राजेंद्र ।
शोक करिशी हे रामचंद्र । कांता कोणाची विचारी ॥ ६५ ॥
स्त्री जे हे माझी म्हणशी । ते जडदेहाची आत्मयाशी ।
आणि स्त्री म्हणिजे जयेशी । ते देह कीं आत्मा ॥ ६६ ॥


जडः किं नु विजानाति देहोयं पांचभौतिकः ।
निर्लेपः परिपूर्णश्च सच्चिदानंदविग्रहः ॥ ६ ॥


देह तरी जड अत्यंत । पंचभूतांचे हे निर्मित ।
हें कां न जाणशी समस्त । तेथें मी माझें हा असंभव ॥ ६७ ॥
आत्मा तरी निर्लेप परिपूर्ण । तनु ज्याची सचिद्‌घन ।
तेथेंही मी माझें म्हणे कोण । तिहीं काळीं ॥ ६८ ॥
येथें दुःख जें उद्‌भवलें । आत्मयासी नाहीं स्पर्शलें ।
तेंचि दृष्टान्तयुक्त ऐकिलें । पाहिजे तुवां ॥ ६९ ॥


आत्मा न जायते नैव म्रियते न च दुःखभाक् ।
सूर्योऽसौ सर्वलोकस्य चक्षुत्त्वेन व्यवस्थितः ॥ ७ ॥


आत्मा जन्मलाचि नाहीं ठायींचा । तेथें मृत्यु येईल कैंचा ।
जन्ममरणाभावीं सुखदुःखाचा । विभागी नव्हे ॥ ७० ॥
हाचि सर्व लोकांचा सूर्य । चक्षुरूपें राहिला निश्चय ।
नानात्वें झाला वाटे परी अद्वय । एकरूप असे ॥ ७१ ॥


तथापि चाक्षुषैः दोषैः न कदाचित् विलिप्यते ।
सर्वभूतान्तरात्मापि तुद्वद्‌दृश्यैर्न लिप्यते ॥ ८ ॥


सूर्य चक्षुरूपें जगीं राहिला । चक्षूंशी रोग जरी उद्‍भवला ।
तेणें पिवळा द्विधा वाटे दिसला । परी त्या दोषें निर्लेप सूर्य ॥ ७२ ॥
तैसा आत्मा असोन सर्वांभूतीं । जगाची जे सुखदुःख प्रतीति ।
अज्ञान बुद्धीनें आरोपिती । परी आत्मा निर्लेप ॥ ७३ ॥
आता देह जरी पांचभौतिक । म्हणों सुखदुःख भोगी वश्यक ।
तरी ऐक याचा विवेक । दिढा श्लोकीं ॥ ७४ ॥


देहोऽपि मलपिण्डोऽयं मुक्तजीवो जडात्मक ।
दह्यते वन्हिना काष्ठैः शिवाद्यैर्भक्ष्यतेऽपि वा ।
तथापि नैव जानाति विरहे तस्य का व्यथा ॥९ ॥


तक्त रेत मातापित्याचें । हे देह मलपिंडाचे ।
जीवें सोडिलें असतां साचें । मडें हें जडात्मक ॥ ७५ ॥
काष्ठें मेळवून अग्नि पेटविला । तेणें निःशेष जरी जाळिला ।
अथवा कोल्हे कुतरे यांनीं खादला । तरी देह नको न म्हणे ॥ ७६ ॥
माझा देह अग्नीनें जळे । कीं खाती कुतरीं कोल्हे ।
हें देहासी कांहींच न कळे । मा विरह तरी त्या कैंचा ॥ ७७ ॥
एवं रामा शोक जो वाटला । तो देहाशी ना आत्मयाशी झाला ।
आतां पाहिजे विचार ऐकिला । स्त्रियेचा कैसा ॥ ७८ ॥


सुवर्णगौरी दुर्वाया दलवच्छ्यामलापि वा ।
पीनोत्तुंगस्तनाभोग भुग्नसूक्ष्मवलग्निका ॥ १० ॥


काया गौर सुवर्णाऐशी । अथवा श्यामा दुर्वादम जैशी ।
परी यासमयी आनकहकेशीं । दुजा भाव नाहीं ॥ ७९ ॥
मोठे उंच स्तन जिचे ।करस्पर्शें शिथिलत्व ज्याचें ।
कटीं सूक्ष्मत्व सिंहाचे । परी माज हा बारीक ॥ ८० ॥


बृहत् नितम्ब जघना रक्तपादसरोरुहा ।
राकाचंद्रमुखी बिम्ब प्रतिबिम्बरदच्छदा ॥ ११ ॥


मोठे नितंब आणि जघन । रक्तकमला ऐसे चरण ।
पौर्णिमेचा चंद्र पूर्ण । त्यापरी मुखविकाश ॥ ८१ ॥
रक्तवर्ण तोडोळें । तैसे दिसती ओंठ कोंवळे ।
तयावरूनी लाळ गळे । त्या म्हणती मुखामृत ॥ ८२ ॥


नीलेंदीवरनीकाश नयनद्वयशोभिता ।
मत्तकोकिलसल्लापा मत्तद्विरदगामिनी ॥ १२ ॥
कताक्षैः अनुगृण्हाति मां पंचेषुशरोत्तमैः ॥ १३ ॥


नीलकमला सारिखे नयन । मत्त कोकिला सारखें वचन ।
मत्त गजा ऐसें गमन । जयेचें असे ॥ ८३ ॥
नेत्रकटाक्षें कढून । उत्तम प्रकारें मारी कामबाण ।
तेणें मनोरूप मृगाचें हनन । होय पुरुषाचें ॥ ८४ ॥


इति यां मन्यते मूढ स तु पंचेषुशासितः ।
तस्याविवेकं वक्ष्यामि श्रुणुषु अवहोति नृप ॥ १४ ॥


ते कटाक्षबाण मज पीडिती । ऐसें जे का मूर्ख मानिते ।
ते नर पुनरावृत्ती पावती । यमयातनाही भोगोनी ॥ ८५ ॥
मांसमय शरीर अवघे । दुर्गंधीचें कुंड जाणावें ।
तयेशी दोषदृष्टीच पहावें । विवेकी पुरुषें ॥ ८६ ॥
तो विवेक आहे कैसा । नृपा मी बोलेन कांहींसा ।
तो ऐक सावध मानसा । निमिष्य एक ॥ ८७ ॥


न च स्त्री न पुमानेष नैव चायं नपुंसकः ।
अमूर्तः पुरुषः पूर्णो द्रष्टा देही स जीविनः ॥ १५ ॥


आत्मा स्त्री ना पुरुषात्मक । अथवा नव्हेचि नपुंसक ।
अमूर्त पुरुष पूर्ण एक । द्रष्टा जीवविता देही ॥ ८८ ॥
पुरीचा ईश तोचि पुरुष । द्रष्टेपणें देहीं निर्दोष ।
सर्वां जीववीतया विशेष । जीव ऐसें बोलिजे ॥ ८९ ॥
तस्मात् स्त्रीपुरुषांचे देहीं व्यापला । परी आत्मा त्या त्या ऐसा नाहीं झाला ।
आतां जडाच्या ठायीं भाव कल्पिला । स्त्री म्हणून ते ऐके ॥ ९० ॥


या तन्वङ्‌गी मृदुर्बाला मलपिण्डात्मिका जडा ।
सा न पश्यति यत्किंचित् न श्रृणोति न जिघ्रति ॥ १६ ॥


सूक्ष्मांगी तरुणी युवती । मृदु स्पर्श लागे त्वचेप्रति ।
परी ते जड मलरूप निश्चिती । तयेशी चलन तरी कैचें ॥ ९१ ॥
तिशी पहाणें ऐकणें न घडे । आणि वासही कदां न घे मडें ।
याशीं सुंदर म्हणती ते वेडे । जरी नाना शास्त्रें अधीत ॥ ९२ ॥
चर्ममांसमात्र तनु जीची । जाणून विरह अवस्था तीची ।
सहनचि करीं आज्ञा आमुची । आगा हे राघवा ॥ ९३ ॥
ही सीता जनकात्मजा । प्राणाहून अधिक माझी भाजा ।
ही तुझी तुजचि होईल लज्जा । हंत इति खेदें ॥ ९४ ॥


जायन्ते यदि भूतेभ्यो देहिनः पांचभौतिकाः ।
आत्मा यदेकलस्तेषु परिपूर्णः सनातनः ॥ १८ ॥


जरी भूतांपासून उद्‍भवली । पंचभूतात्मक काया संचली ।
आत्मयाचीही तेथें व्याप्ति झाली । परी आत्मा जड नव्हे ॥ ९५ ॥
तये कायेचे ठायीं आत्मा । परिपूर्ण एक चिदात्मा ।
सनातन या रूप नामा । स्पर्शलाच नाही ॥ ९६ ॥


का कान्ता तत्र कः कान्तः सर्व एव सहोदराः ।
निर्मितायां गृहावल्यां तद् अवच्छिन्नतां गतम् ।
नमस्तस्यां तु दग्धायां कांचित्क्षतिमृच्छति ॥ १९ ॥


ऐसा आत्मा परिपूर्ण असतां । तेथें भर्ता कैंची कांता ।
सहोदर आणि माता पिता । सर्व जनही कैंचे ॥ ९७ ॥
जेवीं छायार्थ झोंपडी निर्मिली । नभाचि तितुकीच व्याप्ति झाली ।
तीझोंपडी जळतां नाहीं पावली । दग्धता आकाशा ॥ ९८ ॥


तद्वत् आत्मापि देहेषु परिपूर्णः सनातनः ।
हन्यमानेषु तेष्वेव स स्वयं नैव हन्यते ॥ २० ॥


तेवीं देहाच्या ठायीं असून । आत्मा परिपूर्ण सनातन ।
देह जरी पावला मरण । तरी आत्मा न मरे ॥ ९९ ॥


हन्ताचेन्मन्यते हन्तुं हतश्चेन्मन्यते हतम् ।
तौ उभौ न विजानितो नायं हन्ति न हन्यते ॥ २१ ॥


मारिता म्हणे मी मारितों । मरणार तो मी मेलों म्हणतो ।
ते उभयतांही नेणती आत्मा जो तो । न मारी आणि न मरे ॥ १०० ॥
अथवा देह आत्मा हे उभय । मी मेलों मारितों नेणती द्वय ।
तस्मात् आलें गेलें हें काय । विचारीं राघवा ॥ १ ॥


अस्मानृपातिदुःखेन किं खेदस्यास्ति कारणम् ।
स्वस्वरूपं विदित्वेदं दुःखं त्यक्त्वा सुखी भव ॥ २२ ॥


देह अथवा आत्मयासतव । खेद करनें हें समूळ वाव ।
स्वस्वरूप जाणून हें दुःख सर्व । टाकून सुखी होई ॥ २ ॥
देहाकृति मुळींच नाहीं । तेथें मी कोण असेअं पाहीं ।
परिपूर्ण आत्मा सर्वदांही । आपण निजांगें ॥ ३ ॥
ऐसें मुळीं मीपण नसतां । माझें काय असे जरी दिसतां ।
तस्मात् कैंचा राघव कईची सीता । खेदकर्ताही कोण ॥ ४ ॥
कैंचा रावण कोणें नेली । सांडी हे नामरूपाची भुली ।
ब्रअह्मात्व अभेदता संचली । कवणेंही काळीं ॥ ५ ॥
अगां रामा तूं पूर्ण ब्रह्म । हा झालाचि नाहीं जगद्‍भ्रम ।
हें तुज ठाउकेंचि आहे निःसीम । मी काय सांगूं ॥ ६ ॥
अगा ज्ञान झालियावरी । देहासकट सर्व जगा आली मारी ।
कीं बुडालीं आवरणोदकीं सारीं । परी आत्मस्थिति दंडळूं नये ॥ ७ ॥
ऐसे अगस्तीचे बोल ऐकिले । किंचित् मुखाकडे पाहून हास्य केलें ।
इतुकेंचि हेथें रामें सुचविलें । कीं मी बोलिल्या ऐसाचि असें ॥ ८ ॥
परी म्यां वरीवरी खेद दाविला । यास्तव अगस्ती संबोखी मजला ।
परंतु गुप्त हेतु या नाहीं कळला । माझिये अंतरीचा ॥ ९ ॥
येणें जो कथिला विचारु । जो कोणी तत्पर ऐके नरु ।
तयासी होय मुक्तिचा अधिकारु । ज् जानासी पात्र ॥ ११० ॥
फिटावया जीवाची भ्राम्ती । व्हावी श्रीशिवगुरुची प्राप्ति ।
तयाचे उपदेशें अभेदभक्ति । सदृढ होय जीवा ॥ ११ ॥
जेधवां दृढ अपरोक्ष ज्ञान । तेधवांचि मरे अहंकाररावण ।
स्वानुभूतिसीता अखण्ड पूर्ण । मन्निष्ठ मज भेटे ॥ १२ ॥
तस्मात् माझिया मनींचा हेतू । तो अगस्तीशी प्रगटवूं समस्तु ।
तरीच उपायाची बोलेल मातु । शिवसद्‌गुरु प्राप्तीच्या ॥ १३ ॥


श्री उमा उवाच -
मुने देहस्य नो दुःखं नैव चेत्परमात्मनः ।
सीतावियोग दुःखाग्निं मा भस्मीकुरुते कथम् ॥ २३ ॥


हे मुने दुःख नाहीम् देहाशी । आणि नाहीं म्हणशी आत्मयाशी ।
सीता वियोगाग्नी तरी मजशी केवीं भस्म करीतसे ॥ १४ ॥
अहो मुनिराया ऐकावें । माझें अंतरीचें गुह्य जाणावें ।
मजशी सीतावियोगाचें दुःख नव्हे । रावणें नेली म्हणोनि ॥ १५ ॥
मी पूर्णब्रह्म सनातन । अभेदरूप मायाविहीन ।
तेथें होतांचि मायास्फुरण । ईश्वरत्व मज आलें ॥ १६ ॥
पुढें चारी खाणी होतां उत्पन्न । त्यांत जीवरूपें प्रवेशलों आपण ।
तेणें स्वस्वरूपाचें झालें अज्ञान । मद्‍रूप जीवाशी ॥ १७ ॥
स्वस्वानुभव कुबेरा कारणें । नरतनुलंका केली निर्माण ।
तेथें राहिला अहंकाररावण । दवडूनियां तया ॥ १८ ॥
आपण सहपरिवारें बळावला । देहलंकापुरीचा राजा झाला ।
हरून नेलें स्वानुभूतीसीतेला । मन्निष्ठ असुनी ॥ १९ ॥
आणि जीवाशी अति पीडिलें । जन्ममरणरूपें भ्रमविलें ।
तेवीं इंद्रियदेवतांशीं बंदी घातलें । स्वाधीन करूनियां ॥ १२० ॥
जया जीवाचे कळवळिया । म्यां ईश्वरत्व धरिलें तत्त्वतां ।
तया जीवाशीं दुःखें पीडितां । मज लागीं सुख कैचें ॥ २१ ॥
आणिक थोर दुःखाशी कारण । माझिये स्वानुभूतीशी केलें हरण ।
तरी मज स्वात्मसुखें शयन । कोणे परी होय ॥ २३ ॥
तुम्हीं बोलिला कीं देहादिकांशी । दुःख किमपि नाही जडाशी ।
आणि तैंसेचि दुःख आत्मयासी । तिहीं काळीं असेना ॥ २४ ॥
तरी सुखदुःखाची प्राप्ति । होत असे कोणाप्रति ।
बहु कासया बोलूं निश्चिती । जीवाचें दुःख मज न साहे ॥ २५ ॥
तस्मात् स्वानुभूतीसीता वियोगाचे । दुःखाग्नीनें मज जाळिलें साचें ।
ऐसे जेतु माझें अंतरींचें । निवेदिले तुम्हां ॥ २६ ॥


सदाऽनुभूयते योऽर्थः स नास्तीति त्वयेरितः ।
जायतां तत्र विश्वासः कथं मे मुनिपुंगवः ॥ २४ ॥


जो अर्थ जीव सदा अनुभविती । तो नाहींच ऐशी तुमची वचनोक्ति ।
तरी ह्या वचनाचा विश्वास मजप्रति । होय कैसा मुनिश्रेष्ठा ॥ २७ ॥
जीवाशी सदां पुनरावृत्ति । नाना योनि भोगित असती ।
जन्मोनियां पुन्हां मरती । आणि जन्मती मरतांचि ॥ २८ ॥
कांहीं काळ देह राहतां । सुखाचि नसेचि वार्ता ।
ऐसे कल्पही गुजरोनि जातां । पुन्हः पुन्हां दुःख ॥ २९ ॥
ऐसें जीवाशीं दुःख होतें । तें प्रत्यक्ष अनुभवा येतें ।
आणि तुम्ही बोलतां नाहींच तें । हें खरें मज कैसें वाटे ॥ १३० ॥
जरी तुम्हीं नाहीं म्हणतां । तरी सुखदुःखाचा कोण भोक्ता ।
देह कीं आत्मा कीं यापरता । कोण पुसेन तें सांगा ॥ ३१ ॥


अन्योऽत्र नास्ति को भोक्ता येन जन्तु प्रतप्यते ।
सुखस्य वापि दुःखस्य तद्‌ब्रूहि मुनिसत्तम ॥ २५ ॥


तरी सुखदुःखाचा भोक्ता कोण । जीव रकर्षें तापती जेणें ।
हे मुनिश्रेष्ठा सांगावी खूण । अन्य भोक्ता आहे कीं नाहीं ॥ ३२ ॥
भोक्ता येथें कोणी नसतां । तरी बंधामोक्षाची कैशी व्यवस्था ।
आणि गुरुशास्त्रादि समस्तां । काय असे प्रयोजन ॥ ३३ ॥
तुम्ही ब्रह्मविद् ब्राह्मण । संशयासहित अज्ञान ग्रासून ।
पावला वस्तुतंत्र विज्ञान । अभेद भक्तीतें ॥ ३४ ॥
तुम्हां जीवशिव मिथ्या झाले । पापपुण्य सुखदुःख नाहीं उरलें ।
अखण्डरसीं समाधान बाणलें । निरतिशयानंदरूपें ॥ ३५ ॥
तो तुम्ही आपुला स्वानुभव । बोलतां असां स्वयमेव ।
हें तुमचेंबोधवैभव । जिवाशी प्राप्त कैचें ॥ ३६ ॥
मोकळा म्हणे बंधन नाहीं । आणि अन्य पडले कारागृहीं ।
भ्केल्याचा अनुभव धाल्यास पाहीं । कदाकाळीं न ये ॥ ३७ ॥
तेवींच सांगतां मजप्रती । कीं दुजे कांहीं नसे येथें रति ।
आणि सुखदुःखाची भोगप्राप्ति । नसेचि कवणा ॥ ३८ ॥
जीव तरी पुनरांवृत्तींत पडिले । सुखदुःखें अति कष्टले ।
या उपदेशून नाहीं सोडविलें । तुम्ही जीवनमुक्तें जरी ॥ ३९ ॥
तरीं येही कैसें सुटावें । त्यांचें अज्ञान कैसें जावें ।
याचा विषाद कां न संभवे । तुम्हां ज्ञात्याप्रति ॥ १४० ॥
तथापि तुम्ही मिथ्या म्हणोनी । सुखें रहाल निजसुखें कडोनी ।
परी उचित नव्हे मजलागूनी । सांडी करणें ॥ ४१ ॥
तरी मुनिराया मज करितां । उपाया सांगावा जीवाच्या हिता ।
हें ऐकूनि झाला बोलता । अगस्त्य मुनि ॥ ४२ ॥


अगस्ति उवाच -
दुर्ज्ञेया शांभवी माया तया संमोह्यते जगत् ।


सावधान ऐकें गा रामराया । दुर्ज्ञेय असे शांभवी माया ।
सर्व जग हें मोहिलें तिया । ज्ञातयासहित ॥ ४३ ॥
केवळ सत्यज्ञान‍अनंतघन । हेंचि शंभूचें निजरूप पूर्ण ।
शं हेचि सुखगहन । भु शब्दें चिद्‌रूप ॥ ४४ ॥
अथवा भु शब्दें अधिष्ठान । तेंचि सद्‌रूप परिपूर्ण ।
एवं शंभु हें अभिधान । सच्चिदानंदाशी ॥ ४५ ॥
तत्संबंधी हे माया । स्फूर्ति ऐसें नाम आलें जिया ।
दुःखें कडोन जाणनें तिया । अशक्य असे ॥ ४६ ॥
त्या मायेनें सर्व जीव भुलले । अंगें ब्रह्म असूनि वेगळे झाले ।
नसतां सुखदुःख उभें केलें । भोक्तेपणा देऊनि ॥ ४७ ॥
न कळणें हें आडवें करूनी । भोगवीत सुखदुःखा लागुनी ।
जेंवीं रज्जु न देखतां नयनीं । सर्प भयें कांपत ॥ ४८ ॥
तस्मात् हें भ्रमेंकडून दिसे । तरी काय रामा सत्य असे ।
निद्रिस्थाशी स्वप्न जैसें । दिसतांही मिथ्या ॥ ४९ ॥
नाहीं तया कैसें निरसावें । बांधिलें नसतां कैसें सोडावें ।
जागियाशी जागवावें । कवणेंपरी रामा ॥ १५० ॥
जया ज्ञानें व्यापार करिती । तिम्ही अवस्था साक्षित्वें जाणती ।
ऐशिया ज्ञानाशी अज्ञान म्हणती । कवणें परी न कळे ॥ ५१ ॥
असो जीव ऐसे मायेनें भुलविले । देहबुद्धि लावून वेडे केले ।
हें काय आश्चर्य नव्हे ठविलें । ज्ञातेही मायेनें ॥ ५२ ॥
देहबुद्धी त्यागून ज्ञान पावती । आणि अभेदत्वें स्फुरे ज्ञप्ति ।
परी जीवास बंध सत्य म्हणती । आणि जाती ताराया ॥ ५३ ॥
तथापि जीवत्व अभिमान गेला । ईश्वरत्व अभिमान उरला ।
तरी तो ज्ञाता जाण भुलविला । अवश्य मायेनें ॥ ५४ ॥
शिष्यत्व त्यागून गुरुत्व घेतां । ते काय देहबुद्धी नव्हे तत्वतां ।
सुवर्णाचीही बेडी घालितां । चालतां श्रम तितुकेचि ॥ ५५ ॥
जीवत्व अवघें मिथ्या झालें । ईश्वराशी सत्यत्व भाविलें ।
हें ज्ञान नव्हे वेगळे पडिले । पूर्वरीती अज्ञानें ॥ ५६ ॥
ईश्वराचेनि सत्यपणें । जीव मिथ्या हें कोण म्हणें ।
आणि जगादिही सत्य होणें । देहासहित ॥ ५७ ॥
ऐशिया भेदरूप ज्ञानाशी । मानितीना पारदर्शी ।
तस्मात् जीव आणि ईश्वराशी । सत्य भावूं नये ॥ ५८ ॥
ईश्वरत्व हें असे मायिक । श्रुतीच बोले निश्चयात्मक ।
अर्थासहित ते श्रुति ऐक । विवंचून बोलिजे ॥ ५९ ॥


मायां तु प्रकृतिं विद्यान् मायिनं तु महेश्वरम् ।
तस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत् ॥ २७ ॥


माया हेचि प्रकृति जाण । आणि मायावि तो हा ईशान ।त
याचिया अंशेकडून । सर्व जग हें व्यापलें ॥ १६० ॥
केवळ परब्रअह्म निर्विकार । जेथें नसे मायाविकार ।
तेथें सृष्टिकाळ येतां उद्‌गार । अहं ब्रह्मास्मि झाला ॥ ६१ ॥
तया स्फुरणाचे प्रकार दोन । चंचळ आणि जाणतेपण ।
जाणतिया नव्हे चलन । चंचळा जाणणें नव्हे ॥ ६२ ॥
चंचळरूप जडत्वें प्रकृति । जाणतां अजड स्वयंज्योति ।
तोचि ईश्वर निश्चिति । पुरुषरूपें ॥ ६३ ॥
हें निवडितां न ये भिन्नभिन्न ।परी स्वानुभवें जाणावे दोन ।
जेवीं साखरेची गोडी आपण । रसज्ञ निवडिती ॥ ६४ ॥
तेवीं स्फुरणामाजी चंचळ जाणिते । स्वानुभवें जाणावें ऐसे ।
सूक्ष्म दृष्टीनें कळों येतें । स्वानुभवाशी ॥ ६५ ॥
चंचळ प्रकृति तेंचि पाणी । तेथें प्रतिबिंब रूपें जो झळपणीं ।
तोचि ईश्वरु हें सत्य मानी । मायाजनित ॥ ६६ ॥
सृष्टिकाळ जातां माया हरपे । तत्क्षणींच ईश्वरत्व लोपे ।
पाणी आटतां सपडपें । प्रतिबिंब नासे ॥ ६७ ॥
ब्रह्मीं स्फूर्ति जे उठली । ते सत्यत्वें न वचे राहिली ।
जेवीं वायूची झुळुक निमाली । आकाशीं उठोनियां ॥ ६८ ॥
जें जें होतसे उत्पन्न । तेंतें नासेल अवश्य जाण ।
तस्मात् चंचलत्वें जें का स्फुरण । उद्‍भवलें तें लय पावे ॥ ६९ ॥
चंचळ प्रकृति जरी सरे । तरी जाण तें ईश्वरत्व कैसें उरे ।
कापुर जळतां सुगंध नुरे । जैशिया परी ॥ १७० ॥
तस्मात् माया लोपतां ईश्वर नसे । याशी सत्यत्व मानिती ते ज्ञाते कैसे ।
असो येणेंचि व्यापिलें असे । जग हें सारें ॥ ७१ ॥
जगीं जड चंचळ जितुकें । प्रकृतीचें रूप जाणावें तितुकें ।
स्फुरद्‌रूप जाणणें जें निकें । तें ईश्वरत्व ॥ ७२ ॥
जे जे पदार्थ झाले निर्माण । जड अथवा चंचळपण ।
तितुक्यामाजी हे असती दोन । प्रकृति पुरुष ॥ ७३ ॥
अथवा अज्ञान ते प्रकृति । ज्ञानपुरुष स्वयंज्योति ।
हे दोन्ही व्यापले सर्व जगती । अणुही सहित ॥ ७४ ॥
रामा तूं हें मानिशी ऐसें । कीं ईश्वरत्व हें मायिक असें ।
या मिथ्यानें जग व्यापिलें कैसें । तरी तेंही अवधारीं ॥ ७५ ॥
सत्य अधिष्ठानां वांचून । भ्रमाशी नव्हेचि दिसणे ।
यास्तव सत्य मिथ्या दोन्ही मिळून । कार्यभाग चाले ॥ ७६ ॥


सत्यज्ञानात्मकोऽनन्तो विभ्रात्मा महेश्वरः ।
तस्यैवांशो जीवलोके हृदये प्राणिनां स्थितः ॥ २८ ॥


सत्य ज्ञानरूप अनंत । विभु आत्मा सदोदित ।
आणि महेश्वर माया जनित । मिळोनियां उभय ॥ ७७ ॥
हे उभय जेव्हां एकवटले । तया विकारा जीवत्व आलें ।
तेंचि जगदंतरीं प्रवेशलें । आणिअ राहिलें यावत् स्थिति ॥ ७८ ॥
तिहीं कालीं जे अबाधित । या नांवे बोलिजे सत ।
चिद्‌रूप विज्ञान सदोदित । ज्ञानात्मक हेंचि ॥ ७९ ॥
त्रिविधा परिच्छेद रहित । तोचि जाणावा अनम्त ।
विभु शब्दें महान् अत्यंत । दीर्घ आकाशाहूनि ॥ १८० ॥
या इतुक्या लक्षणेशी एक आत्मा । माया विरहित परमात्मा ।
या सर्वही जगत्‌भ्रमा । अधिष्ठानमात्र ॥ ८१ ॥
दुसरें पूर्वश्लोकीं बोलिलें । महेश्वराचें रूप केलें ।
तें मायेसहित कारण झालें । सर्व जगाशीं ॥ ८२ ॥
नुसते ब्रह्म नव्हेचि कारण ।तेवीं ब्रह्म जगा नव्हे प्रयोजन ।
रजत न दिसे शिंपीवांचून । स्वरूपेंवीण ईश्वरत्व नसे ॥ ८५ ॥
तस्मात् सत्य मिथ्या हे मिळून । जग कार्याशी होती कारण ।
हेंचि ऐकावें निरूपण । अल्पसें करूं ॥ ८६ ॥
सत्य ब्रह्म तें अधिष्ठान । निर्विकार सच्चिद्‌घन ।
तेथे सकार्य माया होय निर्माण । तरी जैसें तैसें ॥ ८७ ॥
सकार्य रजता शिंप आधार । तेवीं सकार्य मायेशी ब्रह्म थार ।
निरधिष्ठानीं न दिसे अन्यथा प्रकार । यास्तव सत्य ब्रह्म घेतलें ॥ ८८ ॥
माया हेचि उपादान । तेणें जडजात झालें निर्माण ।
आणि ईश्वर हा निमित्तकारण । उत्पत्तीशी हेतू ॥ ८९ ॥
असो सत्य मिथ्या दोन्ही मिळतां । जग हें दिसूं लागे तत्त्वतां ।
जीवरूपें ईश्वर त्या आतौता । प्रवेशता झाला ॥ १९० ॥
अविद्यामाया भूतांतें जनली । त्या भूतांपासून भौतिकें झालीं ।
नाना पिंडें हीं प्रगटलीं । चारी खाणी रूपें ॥ ९१ ॥
तया खाणीमाजी प्रवेशलें । चैतन्य त्या नांव जीवत्व आलें ।
तेंचि कैसें ऐकें वहिले । श्लोकार्धें बोलूं ॥ ९२ ॥


विश्पुलिंगा यथा वन्हेः जायन्ते काष्ठयोगतः ।
अनादि कर्मसंबद्धाः तद्वत् अंशा महिशितुः ॥ २९ ॥


काष्ठयोगें अग्नि पेटे । तयाचे स्फुल्लिंग धांवती नेटें ।
तेंवी जीवाचें कर्म जेधवां उपटे । तेव्हां महेशांश जीव होती ॥ ९३ ॥
काष्ठेंवीण वन्ही न राहे । तरी विस्फुलिंग प्रगटती कैसे हे ।
तेवीं मायेवीण जाणणें आहे । कवणिये परी ॥ ९४ ॥
काष्ठामाजी जेवीं अग्नि । तेवी जाणता असे मायास्फुरणीं ।
विस्फुलिंग प्रगटती अग्नी पासूनी । तेवीं स्फुरणा पासूनि जीव ॥ ९५ ॥
स्फुरणीं जें चैतन्य व्यापलें । त्याशीच ईश्वरत्व नांव आलें ।
तेंचि चैतन्य जीवत्वा पावलें । खाणींत प्रवेशतां ॥ ९६ ॥
परे अनादि कर्म जीवाचें । लय काळीं गुप्तत्वें राहणें त्याचें ।
जेधवां स्फुरण होय उत्पत्तीचें । तेव्हां त्यासवें प्रगटे ॥ ९७ ॥
ऐसें हें अनादि कर्म । तया संबंधीं जीव हा परम ।
प्रवेशता होय अनुक्रम । उंच नीच योनी ॥ ९८ ॥
पुण्य अधिक तरी देव होती । पाधिक्यें पश्वादि जाति ।
पाप पुण्य समानत्वें जन्मती । मनुष्य शरीरें ॥ ९९ ॥
तेथें अनादि वासनेकडून । वर्तूं लागती स्व स्वाचरण ।
तेंचि ऐकें निरूपण । पुढील श्लोकीं ॥ २०० ॥


अनादिवासनायुक्तां क्षेत्रज्ञा इति ते स्मृताः ।
मनो बुद्धिरहंकारः चित्तं चेति चतुष्टयम् ॥ ३० ॥


अनादि वासनेशी युक्त । त्या क्षेत्रज्ञ ऐसें बोलिजेत ।
मन बुद्धि अहंकार चित्त । चतुष्टय ऐसें ॥ १ ॥
कर्म जैसें गुप्त राहिले । तेवीं वासनेनें जीवत्व मा वळलें ।
तेंही पुन्हां उद्‍भवतें झालें । सृष्टिकाळीं ॥ २ ॥
सुप्ति काळीं मनादि हरपती । परे निःशेष नाहीं न होती ।
तेवीं उत्पत्ति काळी उद्‍भवती । यास्तव अनादि बोलिजे ॥ ३ ॥
तेणेंशी युक्त हा जीव । तयाशीच क्षेत्रज्ञ हें नांव ।
सृष्टिकाळीं पूर्वील स्वभाव । घेऊन उठे ॥ ४ ॥
त्या वासनेचे प्रकार चार । मन बुद्धि चित्त अहंकार ।
संकल्प निश्चय मी कर्ता थोर । आणि चौथें चिंतन ॥ ५ ॥


अंतःकरणं इत्याहुः तत्र ते प्रतिबिम्बिताः ।
जीवत्वं प्राप्नुयुः कर्म फलभोक्तार एव ते ॥ ३१ ॥


चतुष्टयापाशी अंतःकरण बोलती । तेथें प्रतिबिंबाची पडे दीप्ति।
तीं चैतन्यें जीवत्वा पावती । कर्मफल भोगावया ॥ ६ ॥
रामा तुवां पुशिलें होतें । कीं सुखदुःख कोण भोगितें ।
मिथ्या असून सत्यत्वें दिसतें । तयाशी आलें भोक्तृत्व ॥ ७ ॥


ततो वैषयिकं तेषां सुखं वा दुःखमेव वा ।
ते एव भुंजते भोगायतनेऽस्मिन् शरीरके ॥ ३२ ॥


वैषयिक हें सुख तेव्हां । सुख आणि दुःख अथवा ।
तोचि जीव भोग्या सर्वां । सह्रीरीं राहून भोगी ॥ ८ ॥
मनादि हे वासनायुक्त । जीवत्व मागें बोलिलें समस्त ।
तोचि भोक्ता सुखदुःखा भोगित । स्थूल शरीरी राहूनी ॥ ९ ॥
तया शरीराचे प्रकार । किती असती ऐक साचार ।
पुढील श्लोकीं निर्धार । बोलिजेल त्यांचा ॥ २१० ॥


स्थावरं जंगमं चेति । द्विविधं वपुरुच्यते ।
स्थावरास्तत्र देहाः स्युः सूक्ष्मा गुल्मलतादयः ॥ ३३ ॥
अण्डजाः स्वेदजास्तद्वद् उद्‌भिज्जा इति जंगमाः ।


स्थावर जंगम प्रकार दोन । जीवाचें रहावयाचें स्थान ।
स्थावर ते वृक्षादि संपूर्ण । सान मोठे लतादि ॥ ११ ॥
अण्डज आणि स्वेदज । जारज चौथें उद्‌भिज्ज ।
या चारी खाणीशी समज । जंगम ऐसें ॥ १२ ॥
न चालती तेचि स्थावर । चालती तितुका जंगम प्रकार ।
तेचि असती चत्वार । अंडजादिक ॥ १३ ॥
अंडापासुनियां झाले । नाग पक्ष्यादि अंडज बोलिले ।
मानवादि जारापासून उपजले । तेचि जारज ॥ १४ ॥
स्वेदज स्वेदापासून होती । उद्‍भिज्ज भूमी फोडून निघती ।
अथवा वायुचेनि उद्‍भवती । तेही उद्‌भिज्ज ॥ १५ ॥


योनिमन्ये प्रपद्यंते शरीरत्वाय देहिनः ॥ ३४ ॥
स्थाणुमन्ये‍नुसंयन्ति यथाकर्म यथाश्रुतम् ।


ऐशिया योनीतें पावूनी । जीव राहे त्या त्या ऐसा होऊनी ।
मीअचल स्थाणु ऐना मानी । जैसें कर्म आणि ऐकिलें ॥ १६ ॥
ह्या योनि मजहून भिन्न । हे नाहींच जयाशी आठवण ।
जड चंचळ एकचि होऊन । वर्तत असे ॥ १७ ॥
पूर्वकर्म असेल जैसें । तैसेंच वर्तणें होतसे ।
पाप तरी तो जात असे । पाप मार्गीं ॥ १८ ॥
पूर्वीच असतां पुण्यसंस्कार । त्याचा पुण्य मार्गीं होय व्यवहार ।
हाही नेमूं न संभवे साचार । पुढें ऐकिलें तिकडे धांवे ॥ १९ ॥
उत्तम प्रकार कांहीं ऐकतां । उत्तम मार्ग लागे चित्ता ।
अधम चरित्रें श्रवण होतां । अधमचि होय ॥ २२० ॥
हे संगतीचे स्वभाव । पालटताती पूर्व भाव ।
परी ते पूर्वकर्माचीच ठेव । संगही लाहणें ॥ २१ ॥
पापाचें फळ तें दुःख । आणि पुण्याचें फळ सुख ।
त्या वर्तणुकी ऐसें देह्ग । पावेनही मानी ॥ २२ ॥


सुख्यहं दुःख्यहं चेति जीव एवाभिमन्यते ॥ ३५ ॥


मीच काय हो असें सुखी । मज ऐसा नाहीं दुःखी ।
ऐसा जीव अभिमानें लेखी । आपुल्याच ठायीं ॥ २३ ॥
पूर्वी मी पुण्यमार्ग आचरलों । तरीच उत्तम कुळीं जन्मा आलों ।
धन सुत उत्तम दारा पावलों । तेणें सुखी अत्यंत ॥ २४ ॥
आतां जें दान पुण्य करीन । तें पुढील जन्मी अवश्य पावेन ।
ऐसा देहाशीच मी म्हणून । बैसला जीव ॥ २५ ॥
म्यां पूर्वीं कांहीं केलें नाहीं । तेणें जन दरिद्र प्राप्त पाहीं ।
जन्मादारभ्य सर्वदांही । मी दुःखीच असे ॥ २६ ॥
येथें मज कांहींच न घडे । तरी मी दुःख भोगीन पुढें ।
ऐसेंच मानून जीव बापुडे । मरती जन्मती ॥ २७ ॥
जैशी चोरी कांहीं न करितां । मी चोर म्हणे कोणी पुसतां ।
तो पावेल दंडाच्या आघाता । येथें संशयो नाहीं ॥ २८ ॥
तैसें देह संघाताचें वर्तन । स्वतां कांहींच न करितां जाण ।
बळेंच मी कर्ता म्हणून । बंधनीं पडें ॥ २९ ॥


निर्लेपोऽपि परं ज्योतिः मोहितः शंभुमायया ।


मुळीं असोनियां निर्लेप । अभिन्नपणें सत्‌चित् सुखरूप ।
मोहें जीव कैसा झाला अल्प । शंभू मायेनें भुलविला ॥ २३० ॥
परंज्योति परात्पर । जीवाचें लक्ष्य ब्रअह्म साचार ।
त्याचे प्रतिबिंबरूपें जीवविकार । नसतां परी सत्य झाले ॥ ३१ ॥
एकाचे एक दाखवावया । दुर्घट असे हे शंभूमाया ।
तिणें मोहिलें जीवा यया । निर्लेप असोनि ॥ ३२ ॥


कामः क्रोधस्तथा लोप्भो मदो मात्सर्यमेव च ।
मोहश्चेत्यरिषड्‍वर्गं अहंकारगतं विदुः ॥ ३३ ॥


काम क्रोध तैसाचि लोभ । आणि मद मत्सर स्वयंभ ।
मोह अहंकार मानी स्वप्रभ । षड्वैरी आपुल्या ठायीं ॥ ३३ ॥


स एव बध्यते जीवः स्वप्नजाग्रदवस्थयोः ।
सुषुप्तौ तदभावाच्च जीवः शंकरतां गतः ॥ ३७ ॥


तोचि स्वप्न आणि जागृतीशी । जीव पावे बोधरूपतेशी ।
सुषुप्तींत अभाव वासनेशी । होतां शंकरचि होय ॥ ३४ ॥
तोचि वासनायुक्त जीव । देहाएदिक घेऊन सर्व ।
मी अमूक हा ठेवूनि नांव । सुखदुःख भोगी ॥ ३५ ॥
मी माझें हें जागृतीशी । अभिमान घेऊनि भोगी विषयाशी ।
कर्ता भोक्ता स्वप्न अवस्थेशी । मी म्हणोन उठे ॥ ३६ ॥
मी सुंदर मी ओखटा । हें माझें माझें म्हणे ओंठा ।
मी कार्यकर्ता असें मोठा । आणि सुखदुःख भोक्ता मीच ॥ ३७ ॥
ऐसा जीव हा प्रपंचवृक्षीं । बांधला जाय असोन साक्षी ।
अगा रामा तूं हें निरीक्षीं । याशी सोडवी कोण ॥ ३८ ॥
जागा असोन जो निजेला । तो कोणाचेनि न जाय उठविला ।
जीवेंचि बळें प्रपंच धरिला । प्रपंच न धरी याशी ॥ ३९ ॥
तोचि सुषुप्तींत अभिमान। वासनेरहित होतां लीन ।
तेव्हां सुखदुःख सर्व निरसून । सुखी शिवरूप होय ॥ २४० ॥
तस्मात् अभिमानें बळें धरिलें । तेचि सुखदुःखा भोक्ते झाले ।
ऐसे हे शंभुमायेनें भुलविले । सुखदुःखा पावती ॥ ४१ ॥


स एव माया संस्पृष्टः कारणं सुखदुःखयोः ।
शुक्तो रजतवद्विश्वं मायया दृश्यते शिवे ॥ ३८ ॥


सुखदुःख भोगावया कारणें । मायेनें मोहिलें सर्व जन ।
शिवशींपावरे सर्व जाण । रजतविश्व अज्ञानें दिसे ॥ ४२ ॥
आपलें निजरूप विसरला । केवळ देहधारी झाला ।
ऐसा मायेनें बांधोन घातला । देहाभिमान बुद्धीनें ॥ ४३ ॥
मीच म्हणोनि कर्ता भोक्ता । सुखदुःख भोगी अचूकता ।
ऐसे हे अनंत कल्प जातां । न सुटे जदां ॥ ४४ ॥
ऐसें हें नसून रामा झालें । असत्य परी सत्यचि केलें ।
दोरीवरी सर्प भाविले । कीं शुक्तिके रजत ॥ ४५ ॥
सच्चिदानन्दरूप शिवीं । विश्व हें दिसतसें तेवीं ।
नसतां सत्याचे परी दावी । अज्ञान माया ॥ ४६ ॥
शिंप दोराशी न जाणतां । सर्प रजत भावी त्या वरुता ।
तेणें हर्ष खेद पावे अवचिता । कंप रोमांचादि ॥ ४७ ॥
तैसें अस्ति भाति प्रियात्मक । शिवीं कल्पिलें नामरूपक ।
तेणें सुखदुःख भोगणें अवश्यक । लागलें जीवाशी ॥ ४८ ॥
शुक्तिका दोरी जरी ओळखिली । तरी कोठे हर्ष शोकाची भुली ।
तेवी सर्व चिदात्मता देखिली । तरी विश्वनाम कोठें ॥ ४९ ॥


ततो विवेकज्ञानेन न कोऽप्यत्रास्ति दुःखभाक् ।
ततो विरम दुःखात्त्वं किं मुधा परितप्यसे ॥ ३९ ॥


ऐसें विवेकज्ञान झालिया । कोण भोक्ता सुखदुःखा यया ।
तस्मात् परतें दुःखा पासोनियां । व्यर्थ कांखेद पावशी ॥ २५० ॥
एक स्वस्वरूपा वांचून । दुजें कांहीं न दिसे आन ।
आदि अंतीं जें नाहीं जाण । तें मध्येंही नाहीं ॥ ५१ ॥
आदि अंतीं जें उरे । तेंचि मध्येंही असे साचारें ।
तिहीं काळीं दुसरें । उद्‍भवेचिना ॥ ५२ ॥
तों काळ सत्यत्व जगाशीं । तंव ओळखिलें नाहीं स्वरूपाशीं ।
न ओळखितां जोंवरी शिंपीशी । तोंवरी रजत ॥ ५३ ॥
ऐशिया विवेकज्ञान कडून । आपण दुजाचि न उरे भिन्न ।
तरी सुखदुःख भोक्ता कोण । असे सांगे ॥ ५४ ॥
बाळपणीं बागुल होता । तो निमे कळूं लागतां ।
अविवेकें झाल होता भोक्ता । तो विवेकज्ञानें मेला ॥ ५५ ॥
अज्ञानें सर्व दिसलें होतें । ज्ञान होतां लया गेलें तें ।
एक ब्रह्म संचलें ऐस्तें । स्थितीगतिवीन ॥ ५६ ॥
कैंची अविद्या कैंचा जीव । कैंची माया कैंचा शिव ।
कैंचा भोग्य भोक्ता नाण्व । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ ५७ ॥
कैंच्या खाणी कैंच्या वाणी । कैंचे देहादि इंद्रिय श्रेणी ।
कैंचा प्राण चंचलपणीं । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ ५८ ॥
कैचें मन बुद्धि अहंकार । कैंचे कल्पनेचे उद्‍गार ।
कैचें स्वप्न सुषुप्ति जागर । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ ५९ ॥
कैंचे पुण्य कैंचे पाप । अकिचें तूं मी हें नामरूप ।
कोथें सुखदुःखाचा आरोप । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ २६० ॥
कोठें नरक कोठें स्वर्ग । कोठें असे अधोर्ध्व मार्ग ।
कोठें उत्तम मध्यम कनिष्ठ भाग । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ ६१ ॥
कैंची भूतें कैंचे गुण । कैंचे साध्य साधक साधन ।
कैंचे ज्ञेय ज्ञाता ज्ञान । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ ६२ ॥
कैंचे अनुभाव्य अनुभविता । कैंची असे स्वानुभूतिसीता ।
कोणाची कोण झाला हर्ता । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ ६३ ॥
कोण जन्मला मरे कोण । कोठें अज्ञान कैंचें ज्ञान ।
कोठे ं मोक्ष कैंचे बंधन । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ ६४ ॥
कैंचा शिष्य कैंचा गुरु । कैंचा उपदेश कैंचा विचारु ।
कैंचा देव कैंचा ॐकारु । पूर्ण ब्रह्म एकलें ॥ ६५ ॥
हे जीव बंधनीं पडिलें । त्याशी सोडवीन ऐसें वाटलें ।
जैसें बाळ म्हणें रांझणी अडकलें । प्रतिबिंब सूर्याचें ॥ ६६ ॥
तैसें तूं या सोडवूं म्हणशी । बळेंचि अभिमान माथां घेशी ।
तेव्हां स्वस्वरूपीं भिन्न पडशी । ईश्वरपणें ॥ ६७ ॥
तस्मात् सांडी हे बाळमति । दुःखापासून परतवीं वृत्ति ।
वा‍उगा खेद आणि सांडी भ्रांति । कोणी बांधी ना सोडवी ॥ ६८ ॥
ऐसें अगस्तीचें ऐकतां उत्तर । श्रीरामीं लोटला आनंदपूर ।
क्षण एक वृत्त्यातीत झाला स्थिर । ईश्वर भावही निमे ॥ ६८ ॥
मागुती अवस्था सांवरूनी । श्रीराम विचारिता झाला मनीं ।
या संवादाचे निरुपणीं ज्ञानी सुखी होती ॥ २७० ॥
आणि उत्तम जे का अधिकारी । ज्यांची अनम्त जन्मींची सामग्री ।
ते समाधान पावती निर्धारी । श्रवणमात्रें ॥ ७१ ॥
परी मंदप्रज्ञ भावार्थीयासी । सुटका होईल कोणे प्रकारेंशी ।
सद्‍गुरु सच्छास्त्रावीण तयाशी । गति दुजी नाहीं ॥ ७२ ॥
तया चिरकाल पाहिजे साध्न । आवडी ऐसें श्रवण मनन ।
तरी तेंचि प्रगटवावें आपण । ऐशी इच्छा अंतरीं ॥ ७३ ॥
परी या अगस्तीनें सिद्धांत वचनीं । कुंथित केलें मजलागुनी ।
आतां अवकाश नसे भिन्नपणीं । कांहीं प्रश्न करावया ॥ ७४ ॥
तरी कैसें करावें आतां । कैसेनि होय जीवाचिये हिता ।
मग कांहीं एक आठवलें चित्ता । तेव्हां बोलतां झाला राम ॥ ७५ ॥


श्रीराम उवाच -
मुने सर्वमिदं सत्यं यन्मदग्रे त्वयेरितम् ।
तथापि ज जहात्येतत् प्रारब्धादृष्टमुल्बणम् ॥ ४० ॥


मुनिराया मज पुढें निकें । ते सत्य सत्य बोलिलां जितुकें ।
तथापि प्रारब्ध हें न चुके । भोगिल्यावीण ॥ ७६ ॥
अविद्यामाया जीव शिव । पापपुण्य सुखदुःख सर्व ।
बंधमोक्षादिकांचा अभाव । स्वरूपाच्या ठायीं ॥ ७७ ॥
ऐसें जें सिद्धांतवचन । सत्य सत्य हें स्प्रमाण ।
परी प्रारब्धें देहाशीं वर्तन । जैसें तैसें भोगणें लागे ॥ ७८ ॥
ज्ञान होतां संचित जळालें । अहं त्यागें क्रियमाण गेलें ।
परी प्रार्ब्ध पाहिजे भोगिलें । देहालागी ॥ ७९ ॥
मूढ आणि ज्ञानियांशी । प्रारब्धभोग समान उभयांशी ।
परी अज्ञान पावती क्लेशाशी । हर्ष शोक नाहीं ज्ञानिया ॥ २८० ॥
हे सरे भोग देऊनियां । न निमेंच कांहींच उपाया ।
तेंचि श्लोकीं दृष्टांतें करूनियां । बोले श्रीराम ॥ ८१ ॥


मत्तं कुर्याद् यथा मद्यं नष्टाविद्यमपि द्विजम् ।
तद्वत् प्रारब्ध भोगोऽपि न जहाति विवेकिनम् ॥ ४१ ॥


अविद्या नष्ट झाली जयाची । विवेकें सीमा पावला ज्ञानाची ।
तया न सुटे गति प्रारब्धाची । मद्य जैसें मत्त करी ॥ ८२ ॥
मद्य प्राशितां उन्मत्त व्हावें । तेवीं प्रारब्धें सुखदुःख द्यावें ।
भोगिल्याविण क्षय नव्हे । ज्ञानियाशीही ॥ ८३ ॥
तस्मात् मुनिराया मजशी । प्रारब्ध भोगणें लागे अवश्येशी ।
प्रारब्ध कैसें म्हणाल तुजशी । त्री म्यां देह धरिला ॥ ८४ ॥
मजशी देह मुळीं नाहीं । जैसा असें तैसाचि सर्वदांही ।
परी देहबुद्धि घेऊनियां पाही । बोलत असे मुनिराया ॥ ८५ ॥
देह प्रारब्धाचे घडले । तेव्हां प्रारब्ध पाहिजे भोगिलें ।
प्रारब्ध नसतां देहत्व उरलें । जाय कैसेनि ॥ ८६ ॥
मज पूर्वीं वसिष्ठमुनि । बोधिते झाले निर्वाणज्ञानी ।
तेव्हां सांगितलें कीं समाधानी । मौनेंचि प्रारब्ध भोगावें ॥ ८७ ॥
आणि जन्मादारभ्य वर्तणूक । माझी कथिता झाला वाल्मिक ।
तरी तैशी तैशी अवश्यक । मज क्रिया करणें लागे ॥ ८८ ॥
तरी मी रावणाशी मारीन । जनकात्मजा सेतेशी आणीन ।
आणि सुखरूप राज्य करीन । अयोध्येचें ॥ ८९ ॥
येथें तुम्ही ऐसें म्हणा । कीं देहाशी भोग घोडोत नाना ।
परी वाउगा कासया कल्पना । हेतुरूपें करिशी ॥ २९० ॥
तरी अवधारा निश्चयेशीं । प्रारब्ध भोग तिहीं देहाशी ।
स्थूल भोग असे स्थूलाशी । कारण आनंद भोग ॥ ९१ ॥
मध्यें सूक्ष्मदेह राहिला । प्रविविक्त भोग असे त्याला ।
तोचि कैसा कैसा ऐकिला । पाहिजे मुनिराया ॥ ९२ ॥
स्थूल भोगाचे अनुकारें । अनंत उठताती उद्‌गारें ।
तेणें सुखदुःख पावे निर्धारें । तैजस अभिमान ॥ ९३ ॥
उत्तम उद्‌गारें सुख वाटे । अधम उद्‍गारें दुःख उमटे ।
उभय प्रकारें प्रारब्ध गोमटें । सूक्ष्म देहा भोगवी ॥ ९४ ॥
तस्मात् देहप्रारब्धासाठीं । करणे लागे आटाआटी ।
मा जीवाचे तरणोपायाची गोष्टी । कां न करावी ॥ ९५ ॥
आणीक म्हणाल कीं अभिमान घेतां । तुजशी लागेल बद्ध मुक्तता ।
तरी चिद् चित् ग्रंथी तुटतां । चिद्‍रूप अहंता मिळेना ॥ ९६ ॥
अहंकारा पासून देहांत । जे जे क्रिया असे होत ।
ते ते अहंकारनिष्ठ समस्त । चिदात्मत्वीं नाहीं ॥ ९७ ॥
आणि चिदात्मा असंग । परिपूर्ण अक्षयीं अभंग ।
तेथें अहंकारादि सर्व सोंग । झालेंचि नाहीं ॥ ९८ ॥
सविता मृगजळीं जरी बुडे । तरी आत्मा अहंकारीं सांपडे ।
ऐसा ग्रंथीभेद होतां कोडें । पुन्हां एक कदां नव्हे ॥ ९९ ॥
तस्मात् होतें आणि जातें । अहंकारगत असे तें तें ।
चिदात्मा या रूप नामातें । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३०० ॥
ऐसा झालिया ग्रंथिभेद । देह वर्तो राहो नसे खेद ।
तिहीं देहांचें प्रारब्ध । तिहीं अभिमानियां ॥ १ ॥
सृष्टिकाळीं होतां उद्‌भव । ईश्वररूपें प्रगटलों मी शिव ।
काल कर्म आणि स्वभाव । तेही अनादि मद् अंश ॥ २ ॥


ततः किं बहुनोक्तेन प्रारब्धसचिवः स्मरः ।
बाधते मां दिवारात्रं अहंकारोऽपि तादृशः ॥ ४२ ॥


आतां बहु काय बोलावें । प्रारब्धचि शिवरूप जाणावें ।
हें मज दिन रात्र बाधितें बरवें अहंकारही तैसाची ॥ ३ ॥
ईश्वरत्व आणि कर्म । सहतंत्र यांचा उद्‌गम ।
तस्मात् प्रारब्धचि ईश्वर हा नेम । येथें संशय नाहीं ॥ ४ ॥
अज्ञानवशें अहंकर्तृत्वपणें । घडे प्रारब्धाचें होणें ।
ज्ञान नंतरही भोग देणें । निरहंकारिया ॥ ५ ॥
असो मजशी प्रारब्धयोगें । सर्व क्रिया हे करणें लागें ।
न करिता बैसोनि राहिलें उगें । तरी बलात्कारें करवील ॥ ६ ॥
असिएं प्रारब्ध मजशी बाधितें । भोगिल्यावीण सोडिना तें ।
तस्मात् वर्तेना देहसमस्तें । प्रारब्धानुकारें ॥ ७ ॥
येथें कोणी म्हणती ऐसें । कीं प्रारब्ध ईश्वरा चुकेना कैसें ।
तरी ईश्वरें जें निर्मिलें अपैसें । तया ईश्वर सारीना ॥ ८ ॥
आपुलीच आज्ञा चक्रवर्ति । नुल्लंघी जैसा यथानिगुती ।
तैसा ईश्वरु स्वयंज्योति । स्वनिर्मित कर्मा न चुकवी ॥ ९ ॥
केवळ प्रारब्धच बाधतें ऐसें नव्हे । माझें ईश्वरत्वही सुख न दे बरवें ।
हें कैसें म्हणाल तरी ऐकावें । अल्पसें बोलेन ॥ ३१० ॥
माया अविद्येचियेमुळें । जीवशिव हे पडिले निराळे ।
तया ऐक्यतेजे मज डोहाळे । होती दिननिशी ॥ ११ ॥
परी जीवत्व पडिलें प्रवाहीं । ईश्वर‍ऐक्या न मिळे कांहीं ।
यास्तव मज खंती वाटे सर्वदांही । ऐसें ईश्वरत्व हें बाधितें ॥ १२ ॥
तैसाचि दुष्ट हा अहंकार । स्वानुभूती हरून मातला थोर ।
याचा कैसा होईल संहार । येणें रीती हा बाधी ॥ १३ ॥
हे मुनिराया तूं ऐसें म्हणशी । कीं रावण मारून सीता सोडविशी ।
हाचि खेद असे दिननिशी । व्यर्थ दाविशी निमित्त दुजें ॥ १४ ॥
कीं जीव पीडिले ते सोडवावे । भिन्न अहंकाराशी वधावें ।
हें उगेंचि निमित्त ठेवावें । परी सीतावियोगाचें दुःख तुज ॥ १५ ॥
तरी स्वामी ऐशी हे कल्पना । कोणेंही काळी न आणा मना ।
मज अशक्य नाहीं मारणें रावना । येचि क्षणीं पहावें ॥ १६ ॥
लक्ष्मणा आणीं धनुष्यबाण । येथूनच मारीन रावण ।
भूमी हे राक्षसरहित करीन । एकाचि बाणें ॥ १७ ॥
म्यां सर्व ऋषींशी प्रतिज्ञा केली । कीं राक्षस मारीन आज्ञा आपुली ।
ते पाहिजे आज सिद्धी नेली । सीतावियोगनिमित्तें ॥ १८ ॥
राक्षवधार्थ अवतार । तें कृत्य करीन आज साचार ।
याचि हेतु सेविलें कांतार । राज्यभार त्यागुनि ॥ १९ ॥
ऐसा रामाचा आवेश पाहून । लक्श्मण बोले वंदून चरण ।
जी जी वाल्मीकाचें भविष्यवचन । मिथ्या करूं पाहतां ॥ ३२० ॥
जैसा अनुक्रम असेल बोलिला । तेणें तेणें रीती पाहिजे केला ।
ऐशीये बंधूचें वचनीं समजला । रामही अंतरीं ॥ २१ ॥
मग अगस्तीशी वंदोनी । म्हणे मज राक्षसवधाची खंती नाहीं मनीं ।
परी जीव सोडवावे बंधापासूनि । विनंती इतुकी पायां ॥ २२ ॥


अत्यंतपीडितो जीवः स्थूलदेहं विमुंचति ।
तस्मात् जीवाप्तये मह्यं उपायः क्रियतां द्विज ॥ ४३ ॥
इति श्री पद्‍मपुराणे श्री शिवगीतासु वैराग्योगदेशि नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥


सर्व जीव हे पीडिले अत्यंत । अज्ञानेंचि स्थूलदेह हा त्यागित ।
तस्मात् जीव रक्षणाचा उपाय त्वरित । मज करावा द्विजश्रेष्ठा ॥ २३ ॥
प्रवेश होतांचि अज्ञानवशें । भिन्न अहंकार लागला असे ।
तेणें जीव पीडित कैसे । न देखवें तें ॥ २४ ॥
जागृतीचे व्यापार होतां । तेथें लागे मी माझें अहंता ।
हाचि विश्वाभिमान तत्त्वतां । जीवा पीडितसएं ॥ २५ ॥
स्थूलदेह हा भौतिक । पंचवीस तत्त्वांचा निर्मित एक ।
जो उभारला पुण्यपापात्मक । याशीच मी म्हणतसे ॥ २६ ॥
ऐसियाच देहा कारनें । हें हें माझीं माझें म्हणे ।
जितुके व्यापार जागृतीस होणें । तितुके ठायीं हें दोन्ही ॥ २७ ॥
सदा अंतरीं मी मी स्फुरे । आणि हे हे पदार्थ माझे सारे ।
ऐसे जिकडिले अहंकारें । उमसूंच न दिजे ॥ २८ ॥
मी कोण देव कोण । जाणें कोठें आलों कोठून ।
गुरुशास्त्रादि आठवण । होऊंच नेदी कदा ॥ २९ ॥
ऐसें जागृतीशी पीडिलें । स्वप्नींहीं अहंकारें नाहीं सोडिलें ।
कर्तृत्व भोक्तृत्व पाठीं लाविलें । तैजसरूपें ॥ ३३० ॥
देह चाले पंचकसत्ता । तेथें बळेंचि म्हणे मी कर्ता ।
पापपुण्यादि समस्तां । करणें मजची ॥ ३१ ॥
आतां जे पुण्यपाप केलें । तें तें पुढें पाहिजे भोगिलें ।
ऐसें भोक्तेपणाचें ओझें घतलें । सुखदुःखात्मक माथां ॥ ३२ ॥
कर्ता भोक्ता उभयपणीं । जाणावा हा तैजसाभिमानीं ।
स्वप्नीं विषय सत्य नसूनी । कल्पून सुखदुःख पावे ॥ ३३ ॥
असो स्वप्नीं अथवा जागरीं । कल्पनेमुळें पीडी व्यापारीं ।
परी वृत्ति नसतां सुषुप्ती माझारीं । अहंकारू न सोडी ॥ ३४ ॥
वृत्तीवीण हा जीव । स्वरूपीं मिळे स्वयमेव ।
परी तेथें लाविली नेणीव । अहंकारेंयेणें ॥ ३५ ॥
तस्मात् तिहींही अवस्थांमाजी । सुखदुःखें पीडीतसे सहजीं ।
हें अनादीच नूतन नव्हे आजि । अनंतकल्प गेले ॥ ३६ ॥
परी जीवाची अन्से सोडवण । न मरेचि अज्ञान अभिमान ।
तैसेचि मरती जन्मून । उंचनीच योनि ॥ ३७ ॥
एक देह जरी सांडिला । तरी दुजा असे पुढें ठेविला ।
केव्हां उत्तम केव्हां नीच योनि पावला । कर्मानुसार ॥ ३८ ॥
नीच पश्वादिकांचे देहीं । तेथें अधिकारचि नसे कांहीं ।
तरी सुटकेचा उपाय सहसाही । बोलोंचि नये ॥ ३९ ॥
परि मानव देहीं जे जन्मले । तेथेंही अहंकारें असे पीडिलें ।
मी मी म्हणतांचि जन्मले मेले । किती वेळ न लळे ॥ ३४० ॥
हे मदंश असती म्हणोनी । मज खंती वाटतसे मनीं ।
तरी सोडवावें जीवा लागूनी । प्रार्थना इतुकी ॥ ४१ ॥
भिन्नत्व जाऊन स्वरूपीं मिळती । हेचि जीवा संरक्षणाची स्थिति ।
हे ज्ञानेवीण अज्ञानभ्रांति । न फिटे कदां ॥ ४२ ॥
न कळतां वेगळे पडिले । यास्तव सुखदुःखा वरपडे झाले ।
तें अज्ञान ज्ञानें जरी नासलें । तरी सुखदुःख कैंचे ॥ ४३ ॥
तस्मात् जीवाचे संरक्षणाशी । सांगावी ज्ञानाचे प्राप्ती कैशी ।
ब्राह्मण गुरु तूं तिहीं वर्णाशी । तरी उपाय सांगावा ॥ ४४ ॥
सूत म्हणे शौनकादिकांशी । तुम्ही सावध असा की श्रवणाशी ।
सर्व जीवां सोडवावयासी । प्रार्थिलें श्रीरामें ॥ ४५ ॥
तंव शौनक म्हणती सूता ऐकावें । आमुच्या प्रश्नासी चित्त द्यावें ।
वसिष्ठें श्रीरामा बोधिलें बरवें । बृहद्‌वासिष्ठीं ॥ ४६ ॥
त्या संवादी काय नसे ज्ञान । तेंचि कां जीव न करिती श्रवण ।
आणि न सुटती बंधापासून । हे आश्चर्य वाटे ॥ ४७ ॥
पूर्वीं सिद्ध तें त्यागूनिया । नूतन उपाय करनें कासया ।
हा शौनकाचा प्रश्न ऐकोनिया । सूत बोलता झाला ॥ ४८ ॥
हे ज्ञान उपाय बहुत असती । परी गुरुवीण नव्हे स्वात्मानुभूति ।
तरी जीवालागीं गुरु निश्चितीं । शिवरूपचि एक ॥ ४९ ॥
तया शिवगुरूची प्राप्ति व्हावी । हेचि श्रीरामा इच्छा बरवी ।
अंतरीं ठेवून अगस्तीसी विनवी । कीं सोडवीं सोडवीं जीवा ॥ ३५० ॥
इति श्रीमद् वेदेश्वरी । शिवगीता पद्‍मपुराणांतरीं
अगस्तिराघव संवादानुकारी ॥ द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥ श्रीगुरुः ॐ ॐ ॐ ॥
ओवी संख्या ३५० ॥ श्लोक ४३ ॥