॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय नववा ॥

या अध्यायाच्या सुरुवातीला शिवगुरुवर मेघाचे रूपक केले आहे. राम हे वायु असून बोघामृताचे भरण आणि गीतार्थाचे पाणी त्या मेघातून वर्षत आहे. कवी हे मयूर असून गर्जना करीत आहेत. निरूपणाचा ओघ लोटत आहे व तो अद्वैत सागरास मिळतो आहे. साधक मुमुक्षू हे चातक आहेत, जे भूविषयोदक त्यागीत नाहीत त्यांना गुरु मुखबिंदु मिळत नाही.

या अध्यायात देहाचे स्वरूप लक्षण - कसा झाला, कोठून आला याचे वर्णन केले आहे. यातील निरूपणाने मी देह नव्हे हे कळेल व देहबुद्धि नष्ट होईल. देह वेगळा व आपण वेगळा हे जाणून घेतले पाहिजे. आपण सत्य असून देह असत्य आहे. देह पंचभूतांचे झाले आहेत. आधी माझे स्वरूप जाणून मग देहाचे स्वरूप वेगळे पहावे. या निरूपणास उपोद्धात असे शास्त्ररीतीने म्हणावे. शिव आणि जीव यांच्या स्वरूपांत भेद नाही म्हणून आधी शिवस्वरूपाचे वर्णन केले आहे. जीव हे जाणत नाही की मी निजांगे शिवच आहे. शिव समुद्र तर जीव तरंग आहे. तरंगास कळले पाहिजे की मी समुद्रच आहे. जीवाचे अकृत्रिम ब्रह्मरूप गोमटे असून जीव मायिक आहे. पदार्थ मात्र शिव परब्रह्मच आहे. दोरीवर भुजंग तसे ब्रह्मावर नामरूपात्मक जग भासते. जीवब्रह्मैक्य झाले की जगद्‌भ्रम जातो. तरी शिंपीवर रजत तसे पूर्ण निर्मळ सच्चिदानंद परमात्म्यावर जग भासतच असते. रजतभाव जातो तरी शिंपपणा असतोच. तसे जगभाव नाहीसा झाला तरी एकले परब्रह्म असतेच. ज्ञानाने जगभावाचा आरोप उडतो मग आकार दिसला तरी दिसते ते चिद्‌रूप हे कळते.

ईश्वर सच्चिदानंद विग्रह असतो. इतर सर्वांस शून्य पडले तरी परमात्मा असतोच. शून्य आहे कीं नाही असा प्रश्न केला आणि शून्य नाही म्हटले तर शून्य खंडण होतेच. आता शून्य आहे असे जे म्हणणे ते आहेपण तेच ब्रह्म होय. शिंपी असते म्हणून रजत कल्पना केली जाते. तसेच स्वयंज्योती परब्रह्म परमात्मा असतो म्हणून जगाचा भ्रम होतो. आकाश, वायु, तेज, आप, पृथ्वी सर्व आहे असे आपण म्हणतो. तो सर्वांचा अहेपणा हाच ब्रह्माचा अस्तित्वभाव होय. आत्मा सर्व अवस्थेत देखणाच असतो. कोणी मंदमति जाणीवदशा नाहींच असे म्हणतात आणि स्फुरण होतांच उत्पत्ति होते असे म्हणतात. ’जसे कात चुना सुपारी पान । मिळतां रंग होय निर्माण ॥’ तशी पंचभूते झाली की त्रिगुण होतात असे म्हणतात. ’उपनेत्रे दिसते वाटे जया । तरी डोळियांचे देखणे नव्हे वाया । तेवीं चिद्‌रूप मानितांहि माया । ब्रह्म जड नव्हे ॥८३॥’

सुखदुःख विरहित आनंद तेच निजसुख होय. जेथे सत् चित् आहे तेथे आनंद आहेच. हे सर्व तिन्ही काळी असते. सर्वच चिद्‌रूप आहे पण सुखदुःखाचा शीण होऊन आनंद लोपतो. "चेतनेप्रमाणे जडाच्या ठायीही विकार असतात आणि विकार असतात तेथे सुखदुःखेही असतात, चेतनांत स्पष्ट दिसतात, जडांत अनुमानावी लागतात." ’सर्व सुखदुःखे कृत्रिमाची । अकृत्रिम एक परब्रह्मचि । ते निश्चयेसी असे मीच । ऐसें साधके ओळखावे ॥१०५॥ सत् चित् आनंदघन निर्मळ आणि परिपूर्ण ही लक्षणे भिन्न दिसतात, पण ’अक्षयो एकच असतात. लक्षणांनी बोध केला की निश्चयाचे वर्म कळते. ब्रह्म- वेदांना आणि ब्राह्मणांनाही म्हणतात. "मी निर्विकार असंग । शुद्ध सनातन ब्रह्म अभंग । अनादि अविद्यायुक्त होत्सातां मग । जगत्कारणता पावे ॥१२४॥ सृष्टीच्या आदि अंती ही ती असता माझी असम्गता मोडत नाही.

’चुंबकाचिये सन्निधाने । लोहो चळण पावले म्हणून । आळ घातला बळे करून । चाळकत्वाचा त्या जैसा ॥१३०॥’ तसा साक्षित्वामुळे मजवर कर्ता भोक्ता आळ घातला आहे, पण मी निरहंकारी, मी करीत नाही, करवीतही नाही. याप्रमाणे साधकाने गुरुमुखे असंगत्व ज्ञान साधून अज्ञानकृत जन्ममरण चुकवावे. आपण असंग - हे न ओळखल्यामुळे देहादिकांस मी मानून उगाच यातना भोगू लागला. अविद्येचा आरोप करायला सत्य अधिष्ठान लागते, म्हणून माझ्या सत्य स्वरूपावर अविद्या कल्पिली, कार्यानुमेय माया कल्पिली. वास्तविक ती नाहीच. मायेच्या दोन शक्ति मानतात. विद्या आणि अविद्या. स्वरूपाचे जे न कळणे ते आवरणशक्तीचे लक्षण. अविद्या आवरण घालते, आच्छादिते. जगाचे उत्पादन ते विक्षेपशक्तीचे लक्षण असून विद्याशक्तीमुळे विक्षेप, एकाचे एक भावणे हे घडते. दोन्ही मिळून एकच माया, तिला महाअविद्या म्हणतात.

मूळ मायेचे लक्षण - ’स्वरूपी झाले जे स्फुरण’ असे म्हटले असून तेथेच ज्ञानाज्ञान असते, पण दोन्ही अविद्याच. विद्यात्मक ज्ञानशक्ति प्रतिबिंबित ईश्वर - स्वयंज्योतिरूप असून विद्यामायेमुळे ईश्वरास जगकर्तृत्व मानले जाते व अविद्या अज्ञानी प्रतिबिंबित जे ज्ञान त्यास अनीश्वर जीव म्हणतात. अविद्येने जीवास भोक्तृत्व मानतात. पण सत्यत्वें ईश्वर कर्ता नाही आणि जीव भोक्ताही नाही. कुठे काहीच नसता आरोप करतात.

अविद्या नांव कां ? सत्‌चित् आनंदघन पूर्णब्रह्म, त्याचे विस्मरण झाले तेच अविद्यारूप मूळ अज्ञान होय असे वेदांती म्हणतात. मुख्य रूप आत्मा तो अविद्येने नामरूपा वरपडा केला. अविद्या जीवास वश करून बंधनांत घालते. साधकाने सावध असावे.

त्या मायेचे त्रिविधलक्षण : माया अनिर्वचनीय असून तर्काने जाण्तां येत नाही. भिन्न नव्हे, अभिन्न नव्हे, भिन्नाभिन्नही नव्हे. सत् नाही, असत् नाही, सदसत् नाही अशी विलक्षण आहे. माया साकार नाही. जोवर जीवाला अज्ञान असते आणि काही नसता सत्य मानून बस्तात तेव्हां मायादेवीची अनिर्वचनीयता जाणावी. ब्रह्म, आत्मा, अभेदत्त्वें जाणल्यावर मायेचे अस्तित्वच राहात नाही. अज्ञानी लोकांस अनुलंघनीय असते. माया नाहींच असे कळले तेच जीवनमुक्त होत.

माया त्रिगुणात्मक झाली. गुणपरिणामिनी झाली, जसे तरंगाकार मृगजळ भासते तशी. सत्त्वगुण हा श्वेतवर्ण असून त्याच्या योगे सर्वांस सुख मिळते. तो सुख आणि ज्ञानास स्थान असतो. रजोगुण हा रक्तवर्ण असून चंचळत्वे सुखदुःखास कारण होतो, आणि उत्पत्तिलाही कारण होतो. तमोगुण हा कृष्णवर्ण जड असून तो सुखदुःख दोन्हीस उदसीन असतो. त्यच्यायोगे आयुष्य व्यर्थ सरून जाते. ना प्रपंच ना परमार्थ असे होते. गुणांशिवाय भूतभौतिकांची उत्पत्तिच होत नाही. ह्या त्रिगुणांची प्रचिति पिंडी पहावी व त्यावरून समष्टीची ओळखावी.

भ्रमालाही सत्याचे अधिष्ठान असावे लागते. ब्रह्म अधिष्ठान, त्यावर माया भासते. रज्जुसर्प किंवा शुक्तिरजताप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी त्रिगुणात्मक माया जगरूपाने भासते. वास्तविक जग हे झालेच नाही. माझे असंगाचे रूप न कळल्यामुळे जग भाविले. कळणे, न कळणे आणि अन्यथा कळणे हीच त्रिगुणांची लक्षणे आहेत. सत्त्वगुण = जाणणे, ज्ञानशक्ति; रजोगुण = चंचळ विकृति हे लक्षण व क्रियाशक्ति; तमोगुण = जड, नेणणे, द्रव्यशक्ति ही लक्षणे आहेत.

शिवगुरु सांगतात, माझ्यापासून मायेने कपटरूपें आकाश आदि भूतें झाली. कपटरूपे म्हणजे न होऊन झाली. माझ्या रूपाचा अंतच लागत नाही, तेथे माया म्हणजे सागरांत मोहरी तशी आहे. भ्रमामुळे अव्यक्तच व्यक्त झाले. कारणाचे गुण कार्यांत येतात. तसे माझे असंगाचे सद्‍रूप लक्षण भूतांमध्ये व्यापून आले. केवळ माझ्यापासूनच नव्हे तर मायेपासूनही पंचमहाभूते झाली. म्हणून मायाही कारण असल्याने मायेचा नाहींपणा तोही भूतांत आला. कार्याची मात कारणांत नसते. सदंशाला आकाश नांव ठेवले. त्यांत सदंशाचा व्यापकत्व हा गुण आला. यानंतर आकाशाचे गुण निश्वलत्व, अवकाश व शब्द हे होय. आकाशापासून वायु, वायूपासून तेज नंतर आप नंतर पृथ्वी अशी पंचमहाभूतें कशी निर्माण झाली ते वर्णन करून प्रत्येकांत आहेपण हा सदंश, नाहीपण हा मायेचा अंश व शिवाय त्या त्या कारणाचे गुण कसे आले हे सविस्तर वर्णिले आहे. प्रत्येक एकाहून एक दशगुण असून जडत्व अधिकाधिक येत गेले. आकाशाचा शब हा एकच गुण, वायूचे शब्द व स्पर्श हे द्विगुण, तेजाचे शब्द, स्पर्श व रूप हे त्रिगुण, आपाचे शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चारगुण असे वर्णन या पांचापासून एकूण पंचवीस तत्त्वे झाली व ती एकमेकांत मिसळून भूतकर्दम झाला आणि येथून पिंडास जन्म प्राप्त झाला असे सांगितले आहे.

पंचीकरण कोष्टक

पंचीकृत स्थूल आकाश १ = १/२ अंतःकरण + १/८ मन + १/८ बुद्धि + १/८ चित्त + १/८ अहंकार
पंचीकृत स्थूल वायू १    = १/२ समान + १/८ व्यान + १/८ उदान + १/८ प्राण + १/८ अपान
पंचीकृत स्थूल तेज १    = १/२ चक्षु + १/८ श्रोत्र + १/८ त्वचा + १/८ जिव्हा + १/८ घ्राण
पंचीकृत स्थूल जल १    = १/२ उपस्थ + १/८ वाचा + १/८ पाणि + १/८ पाद + १/८ गुद
पंचीकृत स्थूल पृथ्वी १   = १/२ गंध + १/८ शब्द + १/८ स्पर्श + १/८ रूप + १/८ रस

याप्रमाणे पंचभूतांचा परस्परानु प्रवेश होऊन २५ जडांश झाले. त्यापासून पांचभौतिक स्थूल देहाची उत्पत्ति झाली. या प्रकारे हा देह पंचभौतिक असून जीव माझा माझा म्हणतो. अज्ञान, अविद्येने देहबुद्धि उत्पन्न होते. मातापिता अन्न खातात त्या अन्नरसाने रक्त, रेत होतात. उभयवीर्यापासून षट्कौशिक देह जन्मतो. सहा कोश = सहा धातु. पित्यापासून कठीण, श्वेतवर्ण, शिरा, अस्थि व मज्जा हे तीन धातु होतात, तर मातेपासून रक्तवर्ण त्वचा, मांस व शोणित होतात, वगैरे बरेच सविस्तर वर्णन केले आहे. विस्तार भयास्तव देता येत नाही. ’पंचभूतेंचि मुळी भ्रमरूप । तेथे देहाकारासी कायसें रूप । रज्जूवरी दिसतांही सर्प । झालाचि नाही ॥३९६॥’ असे सार सांगितले आहे. देहबुद्धि जितकी दृढ आहे तशी ब्रह्मबुद्धि तिन्ही अवस्थेत दृढ होईतोपर्यंत अभ्यास करावा असे श्रीहंसराज सांगतात. याप्रमाणे यथामति सारांश देण्याचा प्रयत्‍न केला आहे.

GO TOP